चिमुकली इसापनीती/सिंह आणि उंदीर

एक सिंह दररोज एका झाडाखाली निजत असे. जवळच एक उंदीर राहात होता. सिंहाला झोप लागली की, उंदीर बिळातून बाहेर येई व सिंहाची आयाळ कुरतडीत असे. तो जागा झाला की उंदीर पळून जाई. एकदा सिंह जागा होता तोच उंदीर बाहेर आला. सिंहाला झोप लागली आहे असे उंदराला वाटले आणि तो जरासा जवळ आला. पण सिंहाने लागलीच उंदराची शेपटी धरली. उंदराने पाहिले की, आता सिंह आपणाला मारणार. मग तो रडू लागला व हात जोडून सिंहाची विनवणी करू लागला की, महाराज, मला क्षमा करा. माझा जीव घेऊ नका. आपण मला मारले नाही तर मी कधी तरी आपले उपयोगी पडेन. हे ऐकून सिंहाला हसू आले व तो बोलला की, जा, वेडा कुठला. मी सिंह जनावरांचा राजा आहे आणि तू एवढासा उंदीर. तू माझे काय काम करणार? पण मला तुझी दया येते. तू आता जा; फिरून असे करू नकोस. सिंहाने सोडून देताच उंदीर घरात पळून गेला. पुढे काही दिवसांनी एक पारधी तेथे आला व झाडाखाली आपले जाळे पसरून निघून गेला. काही वेळाने सिंह निजावयाला आला. सिंहाने जाळे पाहिले नाही आणि तसाच निजू लागला. तोच जाळे अंगावर पडून सिंह खाली सापडला. हे पाहून बिचारा सिंह ओरडू लागला. आेरडणे ऐकून उंदीर बाहेर धावून आला, व सिंहाला बोलला, महाराज, घाबरू नका. मी आपला चाकर हजर आहे. आता जाळे तोडून टाकतो. असे बोलून तो दातांनी ते जाळे कुरतडू लागला. नंतर एका घटकेत उंदराने सारे जाळे तोडले आणि सिंहाला मोकळे केले. पाहा, उंदीर एवढासा जीव! पण सिंहाला कसा उपयोगी पडला. कोण कधी उपयोगी पडेल याचा नेम नाही.



हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.