तिच्या डायरीची पाने/रुखसाना..लक्ष्मी की लिली?


रुखसाना .. लक्ष्मी की लिली? एक भारतीय स्त्री?


 लहानशा खेड्याच्या अगदी एकाकी टोकावर असलेलं चिमुकलं देऊळ. त्यात कुणीतरी लावलेली पणती. लपेटलेल्या अंधारात एकाकीपणे.... मंदपणे तेवणारी. ते शेवरीच्या कापसासारखं मऊपणे तेवणं जसं मनाला खालावून जातं, तसेच लिलीचे डोळे. ही लिली आमच्या मनांत अनेक प्रश्नचिन्हे निर्माण करून गेली.
 गेल्या बारा वर्षात दिलासा घरात तऱ्हेतऱ्हेचे प्रश्न.... वेदना घेऊन महिला आल्या. हरेक वेदनेचा रंग वेगळा. पोत वेगळा. वाण वेगळा आणि पेठही वेगळी. दलितांच्या कुटुंबातली ती लेक जिद्दी नि हुशार. पाटी-पेन्सिलीवर जीव ओतणारी. घरातली कामे करून शाळेत पळे. पाहाता पाहाता सातवी पास झाली नि त्याच वर्षी न्हातीधुती झाली. तिच्या मनाचा…वयाचा विचार करण्याचा प्रश्न येतोच कुठे? एकदाची खुंट्याला बांधून मोकळे व्हायचे नि सुटल्याचा श्वास सोडायचा एवढेच बापाला माहीत. तसेच केले. शिक्षक आत्ते भावाच्या … पंचवीस वर्षाच्या आतेभावाच्या गळ्यात पार्वतीला बांधले. पार्वतीला चौदावे वर्ष लागलेले. या नवऱ्याचे आणि त्याच्या शाळेतील एका शिक्षिकेचे पहिल्यापासूनच सूत जमलेले होते. त्याने पंधरा दिवस पार्वतीला नांदवले. त्यानंतर परत आणण्यास नकार दिला. त्या पंधरा दिवसात पार्वती नि नवऱ्याच्या मनाचे धागे जुळले नाहीत. पण शरीराचे धागे मात्र जुळले आणि पार्वती पंधराव्या वर्षीच एका मुलाची आई झाली. पार्वतीने परत पाटी-पन्सिल हाती घेतली. चांगल्या रितीने दहावी पास झाली. मुलगा जणू तिच्या आईचाच झाला. गावाजवळच्या एका सामाजिक संस्थेत डी.एड. अभ्यासक्रमाचे महाविद्यालय होते. दोन वर्षांचा अभ्यासक्रम होता. मुलींना वसतिगृहात राहून शिक्षण घ्यावे लागे. संस्थापक
पती-पत्नी या मुलींवर विविध माध्यमातून जीवनास उभारी देणारे संस्कार करीत. कोणत्याही प्रकारच्या राजकारणापासून दूर राहून समाजाला निर्भय बनविण्याचा वसा उचललेल्या संस्था आणि कार्यकर्ते गांवातील राजकीय खेळ मांडणाऱ्यांना गैरसोयीचे असतात. त्यांचा अडथळा दूर करण्यासाठी अत्यंत गलिच्छ प्रकारचे डाव खेळले जातात. या संस्थापक पती-पत्नींची निर्भय सचोटी, त्यांनी हळूहळू जमा केलेला कार्यकर्त्यांचा संच, लोकप्रियता यांचा धसका घेतलेल्यांनी, महाविद्यालयातील मुलींचे आणि संस्थापकाचे अनैतिक संबंध आहेत त्यासाठी संस्थापकाची पत्नीच सहकार्य करते वगैरे प्रचार सुरू केला. काही पालकांनी मुलींना वसतिगृहातून काढून घरी बसवले. पार्वती मात्र तिथेच राहिली. तिच्या नवऱ्याला हाताशी धरून, त्याला पैशांची लाच देऊन, त्याच्याकडून पोलिसांत तक्रार करविली की त्याची पत्नी पार्वती व संस्थाचालकाचे अनैतिक संबंध आहेत. कोर्टाने सावित्रीची रवानगी जिल्ह्याच्या महिला स्वीकारगृहात केली. या स्वीकारगृहाचे व्यवस्थापन करणाऱ्या ताईना पार्वतीसारख्या सुजाण, अबोल, असहाय्य सुशिक्षित तरुणीने तेथे राहणे योग्य वाटेना. कारण या स्वीकारगृहातील बहुतेक महिला मानसिकदृष्ट्या आजारीच होत्या. त्यांनी आमच्या संस्थेकडे एका महिला कार्यकर्तीव्दारा निरोप केला. पार्वतीची इच्छा आमच्या दिलासागृहात राहण्याची असल्याचा अर्जही पाठवून दिला. आणि एक दिवस पार्वती त्या व्यवस्थापिकाताईबरोबर संस्थेत दाखल झाली. परतताना व्यवस्थापिकाताईंनी आणखीन एक अत्यंत चांगली मुलगी त्या स्वीकारघरात गेल्या तीन वर्षापासून सडते आहे. तिलाही दिलासागृहात प्रवेश द्यावा आणि तिच्या पायावर उभे करावे अशी विनंती केली. दिलासागृहात सहा महिला एकावेळी रहात. त्यावेळी दोन जागा रिकाम्या होत्या. आम्ही त्यांची विनंती मान्य केली. आणि दोन दिवसांनीच लिली आपले सामान आणि पूर्वेतिहासाच्या भल्यामोठ्या फाईलसह दिलासाघरात दाखल झाली.
 लिलीचे अब्बा रेल्वेखात्यात कामाला होते. कोल्हापूरजवळच्या एका गेटवर हिरवा-लाल झेंडा दाखवायची ड्यूटी होती. लिलीला नऊ बहिणी आणि दोन भाऊ. बारा मुलं नि आईबाप असे चौदा जणांचे घर. हातात येणारा पैसा पुरणार कसा? कोल्हापुरात त्यांच्या वडिलांनी बांधलेले पडके घर होते. त्यात चार
भावांचा हक्क. लिलीच्या अब्बांच्या वाट्याला एक खोली, एक पडवी नि थोडी बखळ जागा आली होती. दोन्ही मुलगे शाळेत जात. मुली मात्र सकाळी मौलवीसाबांकडे थोडेफार धार्मिक शिक्षण घेण्यासाठी जात असत. एखाद वर्षांनंतर तिथे जाणेही बंद होई. अवतीभवतीच्या घरात धुणभांडी, केरवारे करून चार पैसे कमावण्यासाठी पोरींची पाठवणी होई. लिली एका सुसंस्कृत मराठी कुटुंबात काम करी. त्यांच्याकडे मुंबईहून पाहुणे आले होते. चुटचुटितपणे काम करणारी, गोंडस लिली त्यांना आवडली. त्यांच्या घरात मूलबाळ नव्हते. गृहिणीला हाताशी कोणीतरी हवेच होते. त्यांनी लिलीला मुंबईस नेण्याबद्दल तिच्या आईवडिलांना विचारले. तिला शाळेत घालण्याची, शिक्षण देण्याची हमी दिली. वडिलांना ही बात पसंत नव्हती. पण आईला मात्र वाटे, की आपले आयुष्य रांधा वाढा उष्टी काढा करण्यात गेले. पोरगी शिकून शहाणी झाली तर घराला हातभार लावील. आणि आईने, नवऱ्याचा विरोध पत्करून रुखसाना बेगमची रवानगी मुंबईला.... म्हणजे घाटकोपरला केली. ती आता लिली झाली होती. शालू मावशी नि तात्यांचे दोन खोल्यांचे घर. दोघेही नोकरीला जात. लिली मावशीला मदत करी. आठ वर्षांची लिली भाकरी.. पोळ्या झकास करायची. त्याचे कौतुक चाळीतल्या साऱ्यांना वाटे. त्या चाळीसाठी ती लिली होती. शालू मावशीच्या मावसबहिणीची मुलगी. आई नसलेली, सावत्र आईच्या त्रासाने जाचलेली. वगैरे... वगैरे. जूनमध्ये लिलीचे नांव शाळेत घातले. वर्गातील साऱ्या मुली सहा वर्षांच्या आतबाहेरच्या. नि लिली मात्र नऊ वर्षाची. तिलाही ते कसेतरीच वाटे. सकाळी सातला शाळा भरे. पहाटे पाचला उठून मावशी आणि ती तिघांचे डबे तयार करीत असे. साडेसहाला लिली दप्तर उचलून घराबाहेर पडे. परत यायला साडेबारा वाजत. आल्यावर एकटीनेच जेवायचे. मग घर चित्रातल्यासारखे साफ करून चक्क ठेवायचे. शिवाय कधी हे निवडायचे असे तर कधी ते मिक्सरवर वाटून ठेवायचे असे. दोन खोल्यातल्या कामांना वेळ तो कितीसा लागणार? तात्या बरोबर सहाला घरात पाऊल टाकत. पंधरा मिनिटात मावशीपण येई. मग चहा करण्याची जबाबदारी लिलीचीच. लिली चहा मोठा सुरेख करी. दिवाळी.. दसरा.. पंचमी सारे सण हसत खेळत येत. छान फ्रॉक.... रंगीत रिबिनी. शिवाय अधूनमधून हॉटेलात जेवायला जायचे. दिवस पळत होते. पाहाता पाहाता
लिली दुसऱ्या नंबराने पास होऊन चौथीत गेली. एक दिवस मधल्या सुट्टीत शिवणापाणी खेळताना एक मैत्रिण लिलीकडे पाहून ई ऽ ऽ ऽ करून ओरडली. लिलीच्या झग्याला लाल डाग पडले होते. लिली घाबरून घरी आली. घरात तरी कोण होते? दोनदा चड्डी बदलली तरी खरावच होई. लिली दिवसभर रडत होती. संध्याकाळी तात्या आले. तेही बावरून गेले. बाहेरच चहा पिऊन येतो सांगून बाहेर पडले. शालूमावशी आली. तिने मात्र पाठीवरून हात फिरवून धीर दिला. आंघोळ घातली. सारे समजावून सांगितले. पण त्या दिवसापासून मावशी नि तात्यांची लिलीकडे बघण्याची दृष्टी बदलली. एरवी अभ्यासात मदत करणारे, डोक्यावरून हात फिरवणारे तात्या हरवून गेले. एरवी शालूमावशी, तात्या लिलीवर घर सोपवून सुट्टीत मैत्रिणीकडे रहायला जात. पण आता मात्र थोडा वेळही तात्या आणि लिली दोघेच घरात नसत. लिलीला झग्यांऐवजी दोन मॅक्सी शिवून आणल्या होत्या. शरीरात होणारे बदल लिलीला जाणवत. खूप...खूप प्रश्न मनात गर्दी करून उठत. पण विचारणार कोणाला? वर्गातल्या मुली तर निव्वळ चिंटुकपिंटुक वाटत. तशात खालच्या मजल्यावरच्या सिंधीण मावशीची पुतणी रेणू नाशिकहून दोन महिन्यांसाठी रहायला आली होती. तिची नि लिलीची अगदी घट्ट मैत्री जमली. चौथीतून पाचवीत जातांना दुसऱ्या नंबरने उत्तीर्ण झालेल्या लिलीचे लक्ष पुस्ताकातून उडत चालले. रेणूच्या गप्पा खूप निराळ्या आणि चवदार असत. त्या सारख्या आठवत. मग पुस्तकातली अक्षरे दिसेनाशी होत. दोन महिन्यांसाठी आलेली रेणू काकीला मदत करण्यासाठी तिथेच राहिली. तिने आठवीनंतर शाळा सोडून दिली होती. सातवीत असतांनाच तिचे एका वर्गमित्रावर प्रेम जडले होते. तो पण खूप प्रेम करी. इतके की त्याने करंगळीचे रक्त काढून तिचा भांग भरला होता. एका संध्याकाळी बागेत त्याने शपथ घेतली होती. आता तो जर ब्लेडने करंगळीतून रक्त काढतो तर मग रेणूनेही त्याला गोड मुका दिला होता. एक दिवस त्याची चिठ्ठी दप्तरात सापडली नि रेणूची शाळा बंद झाली. तिला घाटकोपरच्या काकीकडे पाठविण्यात आले. रेणूच्या नादात लिलीचे अभ्यासातून तर लक्ष उडालेच पण शालूमावशीही तिला आवडेनाशी झाली. गणितात नापासचा शिक्का घेऊन लिली सहावीत गेली. मुळात लिलीचा रंग गव्हाळ. लांबट डोळे. घनदाट पापण्या. चेहऱ्यावर नवथर कोवळेपणाची
तकाकी चढू लागली होती. शालू मावशीला वाटे इतक्या दुरून पोरीला आणलं, तिला नर्सिंगला पाठवावं. पायावर उभं करावं. तात्यांनी एका मित्राला गणित आणि इंग्रजी लिलीला शिकवण्यासाठी विनंती केली. काकांनी तात्काळ मान्य केली. काका दुपारी तीन ते चार येत. जीव तोडून शिकवत. पण लिलीचे लक्ष रेणूच्या हाकेकडे असे. काकांचा त्रास कसा चुकवावा हे तिला कळेना. ती युक्ती पण रेणूनेच शिकविली. एक दिवस लिलीने मुसमुसत ....संतापत काकांबद्दल मावशीजवळ तक्रार केली. काका तिचा हात गच्च दाबतात. नको तिथे हात लावतात. एक ना दोन. शालूमावशी विथरली. तिने एक शब्द वेडावाकडा न बोलता शांतपणे काकांना उद्यापासून येऊ नका असे सांगितले. ती तात्यांकडेही सारखे लक्ष ठेवी. लिली नि रेणूचे भटकणे तिने बंद केले. तरीही दुपारच्या वेळात लिली शेजाऱ्यांच्या नजरा चुकवून रेणूबरोबर फेरफटका मारी. रेणूचा मावसभाऊ सत्येनचे कापडाचे दुकान सिंधी बाजारात होते. सत्येन त्याच्या आईचा एकुलता एक बेटा. नववीपर्यंत कसाबसा गेलेला नंतर दुकानाकडे पाहू लागला. पोरीसोरीकडे पाहाण्याची, सारखे बाहेर फिरण्याची सवय तारूमावशीने हेरली. पोराने घाणेरडे सिनेमे पाहू नयेत. दुकानात लक्ष घालावे असे तिला वाटे. पण याचा धिंगाणा वेगळाच. सत्येन दिवसातून जेमतेम दोन तास दुकानावर थांबे, बाकी सारे तारूमावशीलाच बघावे लागे. हा सत्येन लिलीला पाहून विरघळला. इवलेसे ओठ, लांबट डोळे, लांबसडक केस. त्याने रेणूशी दोस्ती वाढवली. लिलीला घेऊन रेणू दुकानात जाई. मग सत्येन तिथेच थांबे. सातवीची परीक्षा जवळ आलेली. लिलीच्या वागण्याला शालूमावशी कंटाळली होती. पण करणार काय? तिच्या अब्बांची दूर बदली झाली होती. गेल्या सहा-सात वर्षात त्यांनी कधी चौकशी केली नाही की पत्राला उत्तर पाठवले नाही. फक्त निरोप आला होता की पोरीला सांभाळा. तिला आमची आठवण येऊ देऊ नका. वाटल्यास हिंदू करून दत्तक घ्या. त्या निरोपाचा विचार करावासा वाटला नव्हता आणि एक दिवस लिली शाळेतून घरी आलीच नाही. खूप शोधाशोध केली. रेणूला पोलिसात नेण्याचे भय दाखवले तेव्हा तिने सारे सांगितले. तारूमावशीने सत्येनचे लिलीशी लग्न करून दिले होते. आणि दोघांना महाबळेश्वरला धाडले होते. लिली जेमतेम सोळाची होती. पोलिसात जावे तर नाते काय सांगणार? तिच्या पालकांचाही
ठावठिकाणा नाही. या विचाराने शालूमावशी नि तात्या गप्प बसले.
 अर्थात हे तपशील लिलीच्या फाईलमध्ये नव्हते. लिली बोलती व्हायला सहा महिने लागले. लिली अत्यंत कमी बोलत असे. अगदी इवलेसे ओठ गच्च मिटलेले असत. आवाज तर इतका गोड आणि नाजूक की, ती काय बोलतेय हे कळायला पाच मिनिटे लागत. कपडे अत्यंत स्वच्छ धुवी. तिला हातखर्चासाठी जे शंभर रुपये मिळत त्यातले साबणासाठीच पंचवीस तीस रुपये जात. परकर वा साडी कधी फाटलेली दिसणार नाही. ती वेळच्या वेळी नीट शिवली जाई. तिच्या भांडणाचा मुद्दा एकच. हिने माझा साबण पळवला वा तिने सर्फची पावडर चोरली. एक दिवस पेटीसाठी कुलूप आले. साबण कुलूपबंद असत. अगदी वाटोळा चेहरा. अपरे कपाळ. ओळीत बसलेले चिमुकले हात. बांधा मात्र काहीसा आडवा. एक दिवस तिने गंगामावशींना ....दिलासातील मम्मीला विनंती केली की मम्मीने तिला लक्ष्मी म्हणावे. मम्मीशी ती जरा मोकळे बोलत असे. सत्येनने तिचे नाव लक्ष्मी ठेवले होते. लग्नाचे पहिले वर्ष खूप छान गेले. लिलीला घरातली सारी कामे उत्तम येत. हाताला चव होती. सत्येन लग्नानंतर घरात स्थिर झाला. दुकानाकडे पाहू लागला. अकराव्या महिन्यात लिलीने अपुऱ्या दिवसांच्या बाळाला जन्म दिला. त्या बाळाच्या मेंदूची वाढ योग्य रीतीने झालेली नव्हती. अशा बाळाचे कौतूक कोण करणार? आणि बाळाच्या आईची काळजी तरी कोण घेणार? घरात कामाचा ताण. पोटभर अन्न मिळत नसे. तारूमावशी हाल हाल करी. तिला वाटे, की लिलीने बाळ घेऊन घरातून निघून जावे. सत्येनला जातीतली चांगली मुलगी करून देण्याचा घाट तिच्या मनात शिजत होता.
 "पोरगं बिघडू लागलं. मग म्हटलं वेसवांकडे जाऊन जिंदगी खराब होण्यापेक्षा आईबाप नसलेल्या पोरीशी जुळवून दिलं. लग्न कसलं आलंय? उगा माळा घातल्या घरात. नि धाडून दिलं महाबळेश्वरला मज्जा मारायला. पोराची जात. बापाच्या वळणावर गेलीया. तो पण असाच होता. आन् त्यातच रोग लागून मेला. मला पन तरास झाला. तवा ही नवी युगत शोधली. रेणूच्या काकीनंबी साथ दिली. आता आपल्या जातीची… खानदानाची नवी दुल्हन आणू, भाईसा, तिकडं जयपुराकडेच बघा कोना अडल्यापडल्याची पोरगी. इथं
काय कमी नाही. पैसा अडका भरपूर आहे." तारूमावशी जयपूरहून आलेल्या तिच्या भावाला आपला बेत सांगत होती.
 "वर्षात लेकरू पन झालं. पण ते आहे डोंक नसलेलं, अशक्त. केव्हापण मरेल. नाही तर मलाच काय तरी करावं लागेल. दोगांचा काटा काढावाच लागेल." हे सारं ऐकतांना लिलीच्या अंगावर काटा आला. हीच तारूमावशी लग्नाआधी हौशीनं नवी साडी नेसायला द्यायची. बाजारातून मिठाई, लस्सी, मिसळ आणून खाऊ घालायची. तीच आता अशी वागतेय? बाळाच्या मृत्यूच्या कल्पनेने लिली विलक्षण धास्तावली. आणि एका संध्याकाळी ती घराबाहेर पडली. घराबाहेर पडली खरी. समोर बारा वाटा मोकळ्या होत्या. पण एकाही वाटेवर घर नव्हतं... डोक्यावरून हात फिरवील असं माणूस नव्हतं. एक वाट तिला दिसली आणि ती थेट एस. टी. स्टँडवरच्या दिशेने चालू लागली. पण चढणार कोणत्या एस्.टी.बसमध्ये… बाळाला पदराखाली घेऊन तशीच बसून राहायची. पोटात अन्न नाही. जवळ एक पिशवी नि स्टीलचा ग्लास. दोन दिवस असेच गेले. एस्.टी. स्टँडवरच्या लोकांच्या नजरेत हे मायलेकरू बिन रस्त्याचं आहे हे लक्षात आलं असावं. तिसऱ्या रात्री पोलिस आले आणि त्यांनी लिलीची रवानगी ठाण्याच्या महिला स्वीकारगृहात केली. अवघ्या चार दिवसात ते मूल लिलीच्या मनाला धक्का देऊन कायमचे दुरावले.
 तेव्हापासून लिलीचे ओठ जणू गच्च मिटून गेले. पण डोळ्यात एकाकी… असहाय चमक आली. तीन वर्षे त्या स्वीकारगृहाचे नियम पाळीत. तिथे राहिल्यावर तिची रवानगी लातूरच्या स्वीकारगृहात झाली. लातूरच्या स्वीकारगृहातील बहुतेक महिला गुन्हेगारी प्रवृत्तीची शिकार असलेल्या वा होणाऱ्या कौटुंबिक त्रासामुळे मानसिक संतुलन बिघडलेल्या महिला असाव्यात. तिच्या आणि पार्वतीच्या बोलण्यातून हे लक्षात आले. तसेच पार्वतीला दिलासात घेऊन येणाऱ्या स्वीकारगृहाच्या व्यवस्थापिकेच्या मनातील खंतही जाणवली. लिली या व्यवस्थापिकेच्यापूर्वी काम करणाऱ्यांच्या घरी मदत करत असे. त्यामुळे तिचा वेळ बरा जाई. नव्या व्यवस्थापिकाबाईना वाटे की या अबोल, शहाण्या आणि वंचित मुलीला जगाच्या मुख्य धारेत सहभागी होण्याची संधी मिळावी. त्या हेतूनेच त्यांनी पार्वती आणि लिलीला दिलासात आणले.
 लिलीच्या म्हणण्यानुसार ती मॅट्रिक नापास असली तरी तिची झेप जेमतेम पाचवी इयत्तेची होती. वाचनाचा नाद नव्हता. पण टायपिंग शिकण्याचे वेड, हो...वेडच म्हणावे लागेल, होते. त्यातूनही मराठी टायपिंग अजिबात आवडत नसे. ए बी सी डी टाईप करण्यात दिवसाचे पाच-सहा तास जात. या वेडातून इंग्रजी शिकण्याकडे तिची प्रवृत्ती वाढेल, त्या निमित्ताने १० वी पास होण्याचा ध्यास तिच्या मनांत घुसवता येईल असे आमच्या संवादिनींना वाटे. पण लिलीची गाडी चार दोन शब्द आणि ए.बी.सी.डी यांपुढे सरकलीच नाही. पुण्यातील आमच्या... मनस्विनीच्या मैत्रिणींकडे, तिच्या वृद्ध आईला सोबत देण्यासाठी तसेच त्यांची काळजी घेण्यासाठी एक निरक्षर दिलासा-कन्या पाठवली होती. ती तिथे केवळ रमली नाही तर साक्षर झाली. आणि समाजवादी महिला सभेत जाऊन बाहुल्या करण्यास शिकली. दिवसातून दुपारचे तीन तास ती केंद्रावर जाई. आमची मैत्रीण तिच्या नांवाने तीनशे रुपये बँकेत जमा करीत असे. हात खर्चासाठी शंभर रुपये देई. शिवाय ती घरातली एक सन्माननीय सभासद होती. या मैत्रिणीच्या बहिणीकडे तिच्या वृद्ध मायपित्यांची काळजी घेण्यासाठी, त्यांना वर्तमानपत्र वाचून दाखवण्यासाठी एका गरजू महिलेची आवश्यकता होती. आम्ही लिलीशी चर्चा केली. लिलीलाही बदल हवाच होता. त्या कुटुंबाशी चर्चा करताना तिच्या मनातील टायपिंग विषयीच्या कमालीच्या आवडीबाबत सांगितले होते. त्यांच्या घरी टाईपरायटर तर होताच. परंतु लिलीला टायपिंगच्या क्लासमध्ये घालण्याची विनंतीवजा अटही आम्ही घातली. ती त्यांनी प्रेमळपणे स्वीकारली. लिली आनंदाने पुण्याला गेली. पाचसहा महिने बरे गेले. आणि एक दिवस अचानक फोन आला की लिलीला घेऊन मंडळी येत आहेत.
 लिली त्या कुटुंबातील वृद्धांची सेवा अत्यंत प्रेमाने, मायेने करी. घरात स्वयंपाकासाठी वेगळी महिला होती. पण हक्काने त्यांना आवडणारे पदार्थ स्वतः तयार करून खाऊ घाली. सारे कसे छान चालले होते. पण अचानक एक दिवस एक अनोळखी माणूस लिलीची चौकशी करीत घरी आला. आठ पंधरा दिवसांनी त्याची खेप होई. दुपारच्या वेळात
घरी लिली आणि दोन वृद्ध माणसेच असत. लिलीला समजावून सांगितले. त्या गृहस्थांविषयी माहिती विचारली. पण लिली फक्त मान खाली घालून बसे.
नाईलाजाने दोघे पती-पत्नी स्वतः लिलीला पोचवण्यासाठी संस्थेत आले. त्या वेळी दिलासा घरात आठ जणी राहात होत्या. तिथे जागा नव्हती. माझ्या घरी माझे वडील… पपा, अपंग होऊन आलेले होते.
 …आमच्या घरात एक जुनी लाकडी खुर्ची होती. ती घराबाहेरच्या ओट्यावर ठेवलेली असे. सायंकाळी तिच्यावर बसून पपा वाहत्या रस्त्याकडे बघत बसत. डोळ्यांनी वाचता येत नसे. अंधूक दिसे. त्यात पंचावन्न वर्षे संगत देणारी सखी नुकतीच निघून गेलेली. मग वेळ पळावा कसा? तो रस्त्याकडे पाहात पळवीत असत. थंडी संपत आली. फाल्गून सुरू झाला. होळी जवळ येऊ लागली. आपल्या लाडक्या खुर्चीचा बळी जाऊ नये म्हणून पपा खुर्ची उचलाचला गेले नि पडले. कमरेचे हाड निकामी झालेले. सतत भिरभिरणारी पावले पार आडवी झाली होती.
 पपांकडे लक्ष द्यायला, त्यांना पेपर वाचून दाखवायला, वेळेवर जेवण वाढायला मायेची व्यक्ती जवळ हवी होती. मग लिली माझ्या घरी येऊ लागली. रहायला मात्र केंद्रावर जाई. कारण तिथे मम्मी, इतर मैत्रिणी होत्या. लिलीच्या मनाचे दरवाजे या काळात अधिक जवळिकीने ठोठावणे शक्य झाले. मूल एकाकी… एकटे… कुठेही वाढले तरी त्याच्या हृदयस्थ गाभ्यात आई आणि वडिलांबद्दल नितांत उत्सुकता व कोवळीक असते. लिली टायपिंगच्या क्लासला जात असे. तिथे एक मुलगा लिली वाढली त्या कोल्हापूरच्या परिसरात वाढलेला होता. ओळखीतून विशेष आस्था वाढली. त्यातून कळले की अब्बा सेवानिवृत्त झाले आहेत. अम्मा दहा वर्षापूर्वीच अल्लाकडे निघून गेल्या. आणि मोठा भाऊ शब्बीरमियाँ चिंचवड रेल्व स्टेशनवर अब्बांच्या जागेवर काम करतो. अर्थातच लिलीच्या मनातील उत्सुकता शिगेला पोचली. दरम्यान तो मुलगा क्लासमध्ये येईनासा झाला. एक दिवस खोटे कारण सांगून, लिली चिंचवडला जाऊन आली. पण तिथेही पत्ता लागला नाही. तिथेच नसीम चाचा… दाढीवाला माणूस भेटला. त्याने वडिलांना भेटवण्याची खात्री दिली. शब्बीरमियाँची बदली मध्यप्रदेशात झाली होती असे तो सांगे. पण त्याच्याबरोबर एकटीने जाण्याची हिंमत लिलीने केली नाही. नसीम चाचा तिचा पत्ता शोधत घरी येऊन गेले. साहेबांना आणि वहिनींना सांगून ते लिलीला घेऊन मध्यप्रदेशात जाणार होते. पण ते यायचे ते
नेमके दुपारी, जेव्हा हे दोघे कामावर गेलेले असत. तिसऱ्यांदा चाचा येऊन गेल्यावर मात्र लिलीला परत पाठवण्याचा निर्णय त्या कुटुंबाने घेतला. लिलीच्या मनात मात्र आता वडिलांना...भावाला... बहिणींना भेटण्याची जबरदस्त आकांक्षा निर्माण झाली होती. दिवाळीत पपांना खामगांवला भावाकडे पोचवले. लिलीच्या मनाचा विरंगुळाही संपला होता. पपांचे सारे वक्तशीर करण्यात ती हौसेने बुडून जात असे. पुन्हा एकदा अब्बांना भेटण्याची ओढ मनाला लागली. एक दिवस सकाळी केंद्र संवादिनीचा फोन आला की लिलीला पुण्याला जायचे आहे. तिला अब्बांचा शोध घ्यायचा आहे. आम्ही आमच्या परीने त्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न केले होते. पण शोध लागत नव्हता. तीही आता कंटाळली होती. वयाची तिशी ओलांडलेली तर होतीच. तिने रीतसर विनंतीपत्र लिहून दिले आणि ती पुण्याला गेली.
 सुमारे दोन वर्षानंतर बारामतीच्या स्वीकारगृहाच्या व्यवस्थापिकाताई लिलीसह संस्थेत आल्या. त्यांचे बंधू अंबाजोगाईला नोकरीला आहेत. त्या अंबाजोगाईत येणार म्हटल्यावर लिलीनेही आग्रह केला इकडे येण्याचा. मनापासून भेटायला आली. गळा पडून भेटली. इथून गेल्यावर ती चिंचवडच्या स्टेशन मास्तरना भेटली. पण त्यांनी दोन वर्षापूर्वीच हे कुटुंब मध्य प्रदेशातील लहानशा गावी बदलून गेल्याचे सांगितले. इतक्या दूर जाणे शक्य नव्हते. ती पुण्याच्या पोलिस स्टेशनमध्ये गेली. तिथून तिला बारामतीच्या स्वीकारगृहात पाठविण्यात आले. तिथल्या ताईंचा अनुभव आमच्या सारखाच. त्यांनी तिला परिचारिकेचे शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. पण ती तेथे टिकू शकली नाही. वागायला अत्यंत मायाळू, साधी. बोलण्यात गोडवा. कुणाशीही वाद न घालणारी वा भांडणारी. पण मनाने खूप खूप थकलेली लिली. तिच्या भविष्याची काळजी त्यांनाही लागली. त्यांनी अनेक ठिकाणी पत्रव्यवहार केला. लिलीने मोकळेपणी सांगितले की ती आता कुणाच्याही घरी काम करणार नाही. तिला संस्थेतच राहायचे आहे. जिथून तिला कोणीही, कधीही काढू शकणार नाही. कुठेही कामाला पाठवले जाणार नाही अशा संस्थेत.
 आणि त्या ताईंनी अशा संस्थेचा शोध घेतला. कदाचित केडगांवच्या रमाबाई महिला अनाथाश्रमान लिली स्थिरावलीही असेल.
 जन्मल्यापासूनचा खडतर प्रवास. तऱ्हेतऱ्हेच्या आडवाटांनी जाणारा, ऐन विशी-तिशीत शेवटच्या दिवसाची वाट पाहणारी लिली समाज, कुटुंब, धर्म यांनी आधार न दिलेली, एकाकी भारतीय स्त्री. तिने मम्मीला.. आमच्या गंगामावाशींना एकदा सवाल केला होता -
 "मम्मी, मी रुखसानाबेगम की लक्ष्मी की लिली? तू नवव्या वर्षी विधवा झालीस नि म्हातारी होईतो लोकांच्या घरात न्हाईतर भावाच्या दारात धुणीभांडी उपशीत बसलीस. तू हिंदू घरात जनमलीस तर मी मुसलमानाच्या घरात. या जगानं.... आपल्या आईबापानं.... या सूर्यानं… या मातीनं.... काय दिलं गं आपल्याला? झाडांनी सावली बरिक दिली. पण तीही क्षणभराची. आता पुढच्या जन्माची वाट पाहात बसायचं. बस्स… मम्मी हे असं का? हे असं का?"