तिच्या डायरीची पाने/सुधामती...भेगाळ भुईवरून भरारणारी!!!


सुधामती..... भेगाळ भुईवरून भरारणारी!!!


 "ताई, ओळखलंत का मला?"
 समोर बसलेली तरतरीत तरुणी मला विचारीत होती. मी मेंदूला खूप ताण दिला. पण काही केल्या डोळ्यासमोर नाव येईना, की व्यक्ती पाहिल्याची खूण पटेना. माझे गोंधळलेले डोळे, चेहरा पाहून ती हसली.
 "ताई, मी सुधामती आणि हा तुमचा लाडका बिंदू. खूप दिवसात भेट नाही. आठवण तर यायचीच मला. पण यायला जमलं पाहिजे ना?" सुधामती म्हणाली. आणि अचानक माझ्यासमोर उभी राहिली आठ वर्षापूर्वीची सुधामती. पाठीवर कोयत्याची जखम, सुजलेला चेहरा, पायानं धड चालता येत नव्हतं, दूध पिते लेकरू नवऱ्याने हिसकाटून नेलेले अशी एक हताश आई नि बाई. मनस्विनीच्या दिलासाघरात आश्रय घेण्यासाठी आणि आपले दहा अकरा महिन्याचे बाळ परत मिळावे म्हणून कायद्याची मदत मागण्यासाठी, म्हाताऱ्या बापाला घेऊन सुधामती आली होती.
 तिचे माहेर डोंगरातल्या दगडवाडीचे. लहान असतानाच आई मेली. घरात म्हातारा बाप, कोरडी जमीन आणि वेशीच्या आत लहानसं पडकं घर एवढीच काय ती जायदाद. जमीन अशी की दगडगोट्यांनी भरलेली. पाऊस वेळेवरी पडला तर पिवळी जवारी, जवस असलं काहीतरी पदरी पडणार. म्हातारा बाप लोकांची जनावरं, गायी, म्हशी घेऊन रानात जाई. एका जनावरामागं रोज एक भाकर नि महिन्याला वीस रुपये मिळत. भाकर ताजी नाही तर शिळीच. पण काही का होईना दहा भाकरी नेमाने घरी येत. कधीमधी कालवण पण मिळे. तीन माणसांना लागणार तरी किती? त्यात एक पोरगी. तिने बेतानेच खायचे असते. दोनतीन भाकरी उरतच. त्या कडकडीत वाळवून, त्याचे तुकडे डब्यानी
भरून ठेवायचे काम सुधीकडे असे. सकाळी थेंबभर तेलाची फोडणी करून त्यात बदाबदा पाणी ओतायचे. मिठाचा खडा टाकायचा. पाण्याला खळाखळा उकळी आली की त्यात वाळलेले तुकडे टाकायचे. एक वाफ आली की असा खमंग वास येई की तोंड पाण्याने भरून जाई. हे तुकडे म्हणजे रोजचा सकाळचा जन्मसावित्री नाश्ता. त्यात बदल नाहीच.
 भाऊ, बाबू त्याचे नाव. तोही शेळ्यामेंढ्या राखायला जाई. सीताफळाचे दिवस आले की अख्खे घर सीताफळाच्या टोपल्या आंब्याला म्हणजे अंबाजोगाईला विकायला नेण्यात गुंतत असे. शंभर फळाची एक टोपली आठ दहा रुपयांना विकली जाई. हे रुपये बाजूला पडत. त्यातून वर्षाचा कपडालत्ता आणावा लागे. सुधीला आठवते तेव्हापासून ती शेण गोळा करून, त्याच्या गोवऱ्या लावण्याचे, थापटण्याचे काम करी. कुणाची का जनावरे असेनात, त्यांच्या मागेमागे धावायचे. दिवसभर शेण गोळा करून घरासमोर साठवायचे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून गवऱ्या थापायच्या. आंब्याच्या गवळणी दर मंगळवारी येत नि आठवड्याला रुपया पदरात येई. मग तो मधल्या घरातल्या कोनाड्यातल्या बारक्या गाडग्यात ती ठेवी नि वरून दगड झाकी.
 बाप म्हणे, "सुधीचा हुंडा सुधी साठवतीया."
 डोंगरात दुष्काळाचाही सुकाळ असे. कधीतरी वेळेवर पाऊस यायचा. दोन वर्षे लागोपाठ दुष्काळ येई. त्या साली तर उलटी गंगाच वाहिली. दोन महिन्यात शंभर इंच पाऊस झाला. नद्या भरभरून साहू लागल्या. शेते बदबदून डबडबली. पेरलेले दाणे सडून गेले. जरा ऊन पडले नि हाहाकार आणखीनच वाढला. धड दिसणारे वाडेही कोसळू लागले. दगडमातीच्या घरात राहाणाऱ्यांचे हाल तर काय सांगावेत? उन्हाने माती वापसली. फुगली नि घरे धडाधड कोसळली. डोईवरचे छप्पर उडाले नि पायाखालची जमीनही बुडाली. पण पोटातली भूक कुठे उडून जाणार? गांवातल्या माणसांचे जथेच्या जथे मुंबई-पुण्याच्या रस्त्याने धावू लागले. गावात फक्त लेकुरवाळ्या बाया आणि म्हातारी माणसे. सुधीचा भाऊ जेमतेम सोला वर्षाचा होता. त्यालाही मुंबईची ओढ लागली. म्हातारा बाप हात जोडून विनवी, "बाळा रे, एवढी सुरी म्यानात घालून टाक. मग कुटं बी जा. पन घरात शानी पोर टाकून नगं जाऊ. मी म्हातारा मानूस. माझं काय चालणार? पोरीसाठी
नवरा बघ. टाक उरकून नि मग जा. पुरूस असला की झाले. म्हातारा, लांडगा कसा का असेना. पोरीला दोन येळेला भाकर घालणारा असला की बस!!" तेरा वर्षाच्या सुधामतीसाठी नवरा बघण्याची घाई सुरू झाली. सहा महिन्यांखाली सुधी शहाणी झाली होती. मुळातला गोरा रंग उजळून आला होता. किंचित अपरे नाक. गुबरे गाल. लाल ठिपका रेखावा तसे नाजूक इवलेसे ओठ. हसली की डाव्या गालावर खळी पडे. दाट कुरळे केस. किंचित सोनेरी, तपकिरी रंगाचे. ठेंगणा बांधा. फाटक्यातुटक्या कपड्यातली सुधी देखणी दिसे.
 एक दिवस बाबूचा मित्र नेकनुराहून एका तरुण माणसाला घेऊन आला. त्याची गावात दोन पानाची दुकाने होती. दिवसाला शंभर रुपये थेट पदरात पडत. गावात घर होते. जवळच्या खेड्यात आठ एकर पाणभरताची जमीन होती. घर होते. दारात जनावरे होती. घरात म्हातारी माय होती. धाकटा भाऊ होता. चार वर्षापूर्वी या माणसाचे लग्न झाले होते. बायको पहिल्या वाळंतपणासाठी माहेरी गेली. ती लेकरू दहा महिन्याचे झाले तरी सासरी परतलीच नाही. दोनदा नवरा घ्यायला गेला. दोनदा मुऱ्हाळी पाठविला. पण ती येईना. खात्यापित्या घरातली लाडकी लेक होती. मुलगी वर्षाची झाली की पाठवू, तोवर जावयानेच अधूनमधून यावे असे सासरेबुवांनी सुचवले. जावई चिडला. "एक नाही तर चार बाया दारात हुब्या करीन." अशी धमकी देऊन घरी परतला आणि मित्रासोबत सुधीला पाहण्यासाठी आला.
 सुधी पाहताक्षणी आवडली. दुसऱ्या दिवशी खंडेश्वराच्या देवळात जाऊन माळा घातल्या. नव्या नवरीला… आपल्या दुसऱ्या बायकोला घेऊन नेकनुरात आला. भरपूर लाड. छानछान साड्या. पोट भरून खायला. सुधी दिवसागणिक उजळत होती. नाकात सोन्याची नथ. कानात झुमके. कपाळावर भलामोठा सूर्य. गौरीसारखी दिसे. लग्न होऊन पाच सहा महिने झाले तोच सुधीला घेऱ्या येऊ लागल्या. पाय जड झाले. मग तर कोडकौतुकालाही उधाण आलं. सुधी मुलाची माय झाली. संदीपान पोराचा बाप झाला. दिवस कसे छान चालले होते. आणि एक दिवस पोस्टमनने संदीपानच्या नावाने रजिस्ट्रीचा कागद आणला. पहिल्या बायकोने नवऱ्याला वकिलामार्फत नोटीस पाठवली होती. वीडचे एक चांगले वकील तिच्या भावकीतले होते. संदीपानही दुसऱ्या वकिलाला जाऊन भेटला.
"चार बाया दारात उभ्या करीन" असे म्हणणे सोपे होते. पहिल्या पत्नीला रीतसर काडीमोड न देता दुसरी बायको करणे कायद्याच्या दृष्टीने फार मोठा गुन्हा होता. त्यासाठी हातकड्याही पडतात. हे सत्य कळल्यावर संदीपान घाबरला. पहिली बायको शालू बऱ्या घरची होती. तिनेही दोनं वर्ष चांगला संसार केला होता. खरं तर तिचीच गोडीने समजून घालायला हवी होती.
 दुसरी बायको केली तर आपला केस कोण वाकडा करणार? असे त्याला वाटे. मित्रही म्हणत, "लेका कर दुसरी बायको. कोन काय म्हनत न्हाई. कायदा कोरटात. मोठ्या शहरात. इथं कोन त्याला मानतंय? कितीक मानसं दुसरी बायकू आणतात. तू काय नवं करतूस व्हय?"
 संदीपान वकिलाला जाऊन भेटला. वकिलाने संदीपानला सल्ला दिला. दुसऱ्या बायकोला पढवा नि ती बहीण आहे असे धट्टावून सांगायला लावा. पुढचे पुन्हा पाहू. पण या गोष्टीला सुधी मुळीच तयार होईना. नोटिसा घेऊन पोलिस येऊ लागले. लपता भुई थोडी झाली. धंद्यावर त्याचा वाईट परिणाम होऊ लागला. या साऱ्या प्रकरणात सर्वात निर्दोष असलेली सोळा वर्षाची सुधी बळी ठरली. घरी नवऱ्याचा मार सुरू झाला. सासू घालून पाडून बोले. जेवायला अर्धीचतकोर भाकर नि लाल तिखट मिळे. जणू घर उलटे फिरले. एक दिवस संदीपान सुधीला आणि तान्ह्या बिंदूला, नितीशला दगडवाडीला, सुधीच्या माहेराला सोडून आला. माहेरी तर अठरा विश्वे दारिद्र्य म्हातारा बाप रोजगार हमीच्या कामावर जाई. भाऊ दुष्काळात मुंबईला गेला. तो तिकडेच होता. बापाला मिळणाऱ्या दहा रुपयात लेकराला दूध कुठून मिळणार? मग सुधीही कामावर जाऊ लागली. 'बराशी' खंदू लागली. महिना निघून गेला. नेकनुराहून येणाऱ्या बातम्यांकडे तिचे कान लागलेले असत. कोणीतरी सांगितले की संदीपानने पहिल्या बायकोला आणि लेकीला आणलेय. समदे आपसात मिटलेय. अलीकडे सुधीबी वैतागून बापावर कडाडे, "म्हातारपनी कशाला जलमाला घातलंस दादा ? दुसरेपनावर देण्यापरीस हिरीत ढकलून द्यायचं व्हतं. मी तर कशी बी जगेल. पन ह्या लहानग्यानं काय पाप केलंय? त्याच्या बिगर मी तरी कशी जगू? नि त्याला कुठून खाऊपिऊ घालू ? शिक्षाण देऊ? मला बी साळंत घातलं न्हाई तुमी. लई मोठं पाप क्येलं दादा तुमी. कुठं फेडाल ?"
 इकडे संदीपानच्या घरातलं वादळ शांत झालं होतं. शालूचा राग होता. पण त्याच्याकडे कोण लक्ष देणार? पण लहानग्या बिट्टूची मात्र संदीपानला सारखी आठवण येई. सुधी लोकाच्यात काम करते. बापाला काम होत नाही. लेकरू वाळलंय असे कानावर येई. मन चळबळून उठे. मन कशात लागत नसे. एक दिवस त्याने दोन दांडग्या मित्रांना बरोबर घेतले. तिघे दगडवाडीला आले. बरोबर कपडे, पेढे घेतले. सुधीच्या बापाला भेटले. मायलेकराला घेऊन जातो म्हणाले. बापाने दुपारच्याला लेकीला खुशीने वाटे लावले. क्षणभर सुटकेचा श्वास टाकला. पण…
 सांजच्याला गांवची माणसं सुधीला गाडीत घालून अंगणात आली. संदीपाननं दगा दिला होता. बिट्टूला घेऊन तो गेला होता. विरोध करणाऱ्या दुसऱ्या बायकोला मारहाण करून कुऱ्हाडीने कमरेत घाव घालून तिघेही पळाले होते. पोलिसात जावे तर तिथंही ओळख लागते म्हणे. वकील करावा तर तिथेही पैसा पाहिजे. म्हाताऱ्यात दम कुठे होता? गावातल्या तरुण मंडळींनी आंबाजोगाईचा पत्ता दिला. सुधी दुसऱ्याच दिवशी आमच्याकडे दाखल झाली. जखम फारशी खोल नव्हती. मुका मार मात्र खूप होता. पोलिसांमार्फत मोठ्या दवाखान्यातून तपासणी झाली. संस्थेत आधी आलेल्या चौघी दुःख घेऊनच आलेल्या. दुःखाचा रंग नि पोत वेगळा, एवढेच! चार दिवसात ती रमली. वकिलांकडे तिने एकच हट्ट धरला, की
 "वकीलसाब, मला नवऱ्याकडून कायबी नको. फकास्त, माजं दूधपितं लेकरू मिळवून द्या." दुधानं ओली होणारी चोळी नि पदर पाहून कुणाचेही डोळे भरून येत. या दाव्यासाठी जिल्ह्याच्या गावी जावे लागणार होते. पण संस्थेने सारे केले. लेकराने मायला पाहाताच नोकराच्या हातातून उडी मारली. सुधीचा चेहरा फुलून गेला. बाळ आईला भेटले. बाळासह सुधी संस्थेत राहू लागली.
 दिवस जात होते. सुधीला अक्षरे ओळखता येऊ लागली. सही करू लागली. शिवणाचे प्रशिक्षण सुरू होतेच, आमच्या संस्थेच्या मायच्या (मम्मीच्या) लक्षात आले की एक माणूस सारखा येरझारा घालतो. लेकरासाठी बिस्कीटचा पुडा आणतो. तो माणूस संदीपानच्या दुकानातला जुना म्हातारा होता. कधीमधी तो सुधीशी दोन शब्द बोलायचा प्रयत्न करी. पण हिने कधीही दाद दिली नाही.
 एक दिवस रात्री वकीलसाहेबांचा फोन आला, "दीदी, तुमच्याशी चर्चा करायची आहे. येऊ का?" चर्चा सुधीच्या प्रकरणाची होती. बिट्टूशिवाय संदीपानला करमत नव्हते. आपण केलेल्या चुकीची शिक्षा अश्राप लेकराला आणि गरिबाच्या पोरीला होतेय, या जाणिवेने तो भाजून निघे. सुधीला अर्धे घर नि थोडी जमीन द्यायला तो तयार होता. मात्र लेकरू त्याला हवे होते. सुधी जर त्याच्याजवळ राहाणार असेल तर त्यालाही त्याची मान्यता होती. आमच्यासमोर फार मोठे प्रश्नचिन्ह होते…!
 दुसरे लग्न करणाऱ्या बेईमान नवऱ्याला शिक्षा व्हायला नको? निष्पाप मुलीला बायको म्हणून घरात आणणाऱ्या नीच, फसव्या पशूसमान पुरुषाला मोकळे सोडायचे? दुसरी बायको म्हणजे कायद्याच्या भाषेत 'ठेवलेली बाई'. एका सोळा वर्षाच्या निरपराध पोरीने 'ठेवलेली बाई' म्हणून तथाकथित नवऱ्याबरोबर उभे आयुष्य काढायचे? आमच्या बरोबर काम करणाऱ्या तरुण पोरींनाही या प्रश्नाने भेंडाळून टाकले.
 "ताई, विट्टूचे पप्पा मला नेणार असतील तर मी जाईन. दुसऱ्या बायकोला नवऱ्याच्या दारात काहीच किंमत नसतीया, हे इथं राहून शिकलेय मी. मी शिकल्याली असते तर त्या घरची पायरी कंदीच धरली नसती. पन मी अशी अडानी. बाप म्हातारा. आज आहे तर उद्या नाही. भावाचाही पत्ता नाही. माझं मन लेकरात गुंतलंया. त्याला सोडून खिनभर जगायची नाय मी. ताई, आमच्या भावकीतली एक मुलगी अशीच दुसरेपनावर दिली. नवऱ्यानंही पुन्हा हाकलून दिलं. चारदोन वर्ष माहेरात बरी राहिली. फुडं तिथूनपण निघाली. सांगाया लाज वाटती. पन सोलापूर रस्त्याच्या कुठल्या की हाटेलात ऱ्हाते नि तिथे धंदा करते. तिचा तरी काय दोस? कसा का असेना पुरुसाचा आधार असंल तर बाई इज्जतीनं राहू सकते. एकट्या तरण्या बाईकडे समद्यांचे डोळे असतात. हितं माज्या सारक्या कित्येक बाया यायच्या. कुनाकुनाला कायमचं ठिऊन घेनार तुमी? आनि आमचं मन चळलं तर? आमी बी मानूसच. तहान लागली की पान्यासाठी वनवननारच! त्या परिस बिट्टूच्या पपाचा आधार बरा व्हईल. त्यांना चांगलं समजून सांगा. पोटाला आन्न, अंगाला कपडा हवा. मारहाण मातुर सोसायची न्हाई." सुधीच्या म्हणण्यात व्यवहार होता. तो मनाला पटवून घ्यावा
लागला. तिला जन्मभर सांभाळण्याचे आश्वासन 'देणे' सोपे होते. पण 'पाळणे' अवघड होते. पुनर्वसन करायचे तर, शिक्षण काहीच नाही. 'जिद्द' होती पण मातृत्वाच्या भावनेने ओथंबलेल्या जिवासमोर अडचणींचा डोंगर दिसे. जिद्द कशी नि कुठून टिकणार? असे मनात येई. सुधीला संदीपानकडे पाठवताना मी अत्यंत अस्वस्थ होते. आपण व्यवहाराचा विचार करताना, आपल्याच विचारांच्या विरुद्ध आचरण करतो आहोत अशी बोच मनाला होती. वकिलांना माझे मन कळत होते. पण तेही मला पुनःपुन्हा व्यवहार सांगत. ग्रामीण भागातील निरक्षर आणि तरुण परित्यक्तांच्या पुनर्वसनाचा विचार करतांना विचारांची चौकट पुनःपुन्हा पारखून घ्यावी, पुढे काय घडू शकते याचे अंदाज घेऊन निर्णय घेणे महत्त्वाचे आहे, असे सतत पटवीत आणि धाडसानेच निर्णय घेतला. पहिली दोन वर्ष सुधीची खबर कळत असे. आमची संवादिनी - कार्यकर्ती भेटूनही आली होती. पण गेल्या पाचसात वर्षात काही कळलं नव्हतं.
 वर्षावर वर्ष उलटत होती. आणि आज सुधी नि बिट्ट समोर उभे होते. "ताई मी हितं घर करतेया. बिट्टू आता पाचवीला गेलाय. चौथीला तालुक्यात तिसरा आला. हितलं शिक्षण चांगलंया. खोली केलीय. तुमचीबी सावली मिळंल…"
 माझ्या डोळ्यातला प्रश्न तिला उमजला असावा. तिनं बिट्टूच्या हातात बिस्किटचा पुडा देत सांगितलं, "बिट्टू, हितल्या लेकरांची वळख करून घे. त्यानला बिस्किटं दे. तू बी हितं होतास बरं का लहानपणी!"
 माझ्याकडे वळून ती बोलू लागली, म्हणाली-
 "ताई, मी ठीक हाय. बिट्टूच्या पपानं मारहाण केली न्हाई. तुमी तवाच बिट्टूच्या नावाने चार एकर रान नि घराचा अर्धा भाग करायला लावला होता. तुमच्या म्होरं कबूल केल्यापरमाने दररोज इस रुपये देत. आता पंचवीस देतात. मी एका दुकानातल्या सुपाऱ्या रोज फोडून देते. ती दुसरीपण बरी हाय. वेगळ्याच ऱ्हातो. पन कधीमधी भेटतो. तिचा तरी काय दोस? आम्ही अडानी. आमचे मायबाप अडानी. नवरापन सातवी झालेला. सरकारचे कायदे कानून आमाला सांगनार तरी कोन? नि कळनार तरी कसे?.... बैलाने जू वढावा तसा संसार वढायचा. पोरगा हीच दौलत. त्याचे पपा येतात अधूनमधून. पन
पहिल्यासारखं सूत काही जमलं नाही." येते. हिते आले नि वाटलं म्हायेराला आले. भेटते समद्यास्नी. येईल पुन्हा." सुधामतीचं वय अजूनही तिशीच्या आतच असेल. तिच्या वयाच्या कितीतरी शहरी वा मध्यमवर्गीय मुली शिक्षण घेत असतील… सुंदर सुंदर स्वप्नांच्या गुलमोहरी झुल्यावर हिंदोळत असतील.... पायाखालच्या भुईचे भान विसरून.
 आणि सुधामती? अशा किती? आणि किती शतकं त्यांनी भेगाळ भुईवरून तडफडत धावायचे?