दत्तात्रेयस्वामी ! नमितों मीं, दीनबांधवा ! देवा ! तुमचें स्तवन कराया किति माझा मंदबुद्धिचा केवा ? १ तूं या संसारवनीं भ्रांतां जीवांसि लाविसी वाटे, दु:खित दीन पहातां, करुणासिंधो ! तुझा गळा दाटे. २ त्वां तारिले असंख्य प्राणी संसारसागरीं, दत्ता ! लोकत्रयांत नांदे, देवा ! अव्याहता तुझी सत्ता. ३ तूं तीर्थांचें तीर्थ, ज्ञान्यांचें ज्ञान, योग योग्यांचा; धार्मिक, सदय, चिकित्सक दु:सहसंसाररोगरोग्यांचा. ४ जे जे लोकीं पुत्री, त्यांमध्यें धन्य तव पिता अत्री; कीं त्वां नित्य उभविली ब्रह्मांडशिरीं स्वकीर्तिसुछत्री. ५ अनसूयेचा कुक्षि क्षीरधिगुनि कोटिगुण गुणें महित, कीं तज्ज अमृतकर तूं जाड्याकलंकक्षयादिकीं रहित. ६ जें अनसूया पावे सुख, विधिची शंन्जुचीहि न वधू तें, जननीजनकसुहृन्मन हर्षविलें बा ! तुवांचि अवधूतें. ७ एक गुणग्राहक तूं, सारग्राही दुजा नसेचि कवी, अगनगखगादिकां गुरु कोण म्हणे ? स्वहित कोण हें शिकवी ? ८ तूं लोकसंग्रहार्थचि योगाचा करिसि नित्य अभ्यास, तुज अन्य काम कोण स्वलाभपूर्णास भक्तिलभ्यास ? ९ एकांततीर्थभिक्षासेवन जनसंग्रहार्थ करितोस, चरितें सुकीर्तिभरितें निर्मुनि, बा ! लोकशोक हरितोस. १० भजला अर्जुन भावें, त्यावरि केली दयासुधावृष्टि, शरणागतीं अलकीं वत्सीं सुरघेनु होय तव दृष्टी. ११ दिधले बहु वर देव द्रुमदर्पघ्न त्वदंघ्रिकंजरजें होतां प्रसन्न, होतें शरणागरदीनवज्रपंजर जें. १२ देवा ! दयासमुद्रा ! दत्ता ! दासांसि देसि अपवर्ग, तुजला भजोनि, जाले कृतकृत्य असंख्य विप्रनृपवर्ग. १३ या विषयवासना विषलिप्ता, तप्ता, सुदु:खदा, जाणो मन सूया; अनसूयापुत्रा ! वैराग्य चांगलें वाणो. १४ अर्जुनहि भ्रम पावे जेणें, देवूं नकोचि दत्ता ! तें; कीं त्वत्प्रियजन दूर त्यागिति त्या भाग्यमद्यमत्तातें. १५ सत्कीर्ति पावलाचि स्तुत्य सहस्रार्जुन त्वदीय जन, सद्रति कसी घडेना, भावें केल्या तुझ्या पदीं यजन ? १६ शरणागतीं अलर्कीं प्रसाद जो, तोचि सज्जना रुचला, कृतवीर्यनंदनींचा विषयविरक्तांसि भासला कुचला. १७ वैराग्य, योगभाग्य, श्रेष्ठ, प्राज्ञप्रिय, प्रभो ! साचें, इक्षुक्षेत्र उपेक्षुनि, कोण रसिक वन वरील भोसाचें ? १८ जे वरिति विषयभोगा, योगाभ्यासप्रसंग ज्यां न रुचे, ते सुरस इक्षुचेहि त्यागुनि सुग्रास, चोखिती बरुचे. १९ दत्ता ! त्वत्पदपद्मच्छाया तापत्रयार्तविश्रांति; तत्काळ अलर्काची गेली शोकप्रदा भवभ्रांति. २० दत्ता ! सत्तापघ्ना ! बहु शरणागतजनासि वागविसी; बोधकरें संसारस्वप्रभ्रमपरवशांसि जागविसी. २१ दत्तात्रेया ! तुमचा नाशाया दीनताप कर वीर, भेटा मला, हरील क्षणपापिस्पर्शपाप करवीर. २२ पडतांचि दृष्टि तुमची, होइन निष्पापताप; हा लटिका संसारभ्रम जाया नलगे, त्वच्चरण पाहतां, घटिका. २३ सुविशुद्ध, बुद्ध, मुक्त, क्षणमात्रें तो अलर्क नृप जाला, तुमचा प्रसाद होतां बोधाच्या क्षण नकोचि उपजाला. २४ भक्त अलर्कार्जुन इत्यादि असंख्य तारिले, दत्ता ! त्वत्पदबळेंचि मुनिनीं संसृतिकृत्येसि मारिली लत्ता. २५ म्हणुनि तुला कर जोडुनि देवा ! मीं दीन विनवितों भावें; घन जेंवि चातकाला, करुणौदार्यव्रतीश्वरा ! पावें. २६ सोडवितें भवपाशापासुनि निजदास्य सादरा जीवा, म्हणउनि मुमुक्षु भावें विनविति तुझियाचि पादराजीवा. २७ ‘ बा ! गा ! मागा, देतों. ’ हे तों वाणी निघे तुझ्याचि मुखें, अभयार्थिकृपणशरणागतकटकें त्वां न पाहिली विमुखें. २८ त्वां भक्तांसि निजात्मा दिधला, आतां तुझी नसे सत्ता, दत्ताख्याचि वदे हें, सत्यव्रत, सत्यसंध, तूं दत्ता ! २९ तम नाशी, ताप हरी, कळानिधी, अमृतकर, महेशमत, श्रम तत्काळ निवारी, जर्‍हि जगदवना असे सदा भ्रमत, ३० तर्‍हि न बधे मन तुमच्या जगदाह्लादप्रदोदया भावा; भावानें हें वदतों; भावाल मलाचि मोढ, तरि भावा. ३१ मूढ कसा मीं ? स्वामी ! कांति तयाची असो निकाम हिमा, भूतपति शिरिं धरूं द्या; तुमचा विधुला न ये निका महिमा. ३२ न गुहागत तम नशे चंद्रकरांहीं, न तापही सर्व, माथां पिशाचपतिनें धरिलें, म्हणऊनि कां वृथा गर्व ? ३३ अमृतकर कळानिधि तो कैसा ? न हरी निजक्षयव्याधी, वंद्य कसा तो ? ज्याची गुरुदारधर्षणी अभव्या धी. ३४ स्वामी ! क्षमा करा; हा निंदक, पापी, असें न मानावें; घेतों तुमची शुद्धें पुण्यश्लोकोत्तमोत्तमा ! नावें. ३५ श्रीदुर्वासा भगवान् बंधु तुझा, सर्ववरदगुरु दक्ष, त्रिभुवनवंद्यपदांबुज; वर देउनि दास सुखविले लक्ष. ३६ हें विश्वाला ठावें, वेदपुराणप्रसिद्ध परि कोपी, तो पीतपट प्रभुला वळला, तद्भक्ति न इतरा सोपी. ३७ मुष्ठींत धरिल कोणी तरि, जरि दुर्धर असे, असो, पारा, परि हा सुदुर्धर प्रभु, इंद्रप्रमुखांसही न सोपारा. ३८ आराधाया त्याच्या अमरद्रुमगर्वहरपदास कसीं सामर्थ्यें पुरती ? बा ! कैसा उतरेल दीन दास कसीं ? ३९ सोसाया त्याचे छळ, बळ कैचें आज पामरा मातें ? कांपे हृदय, पुराणीं आइकतां चरित रामरामा ! तें. ४० जोडुनि रथीं सदार प्रभुसि, पुरीं चालवि प्रतोदानें, छळितो, परि बहु देतो इष्टार्थांचीं सुविप्र तो दानें. ४१ तो श्रीमदंबरीष छळिला, तें व्यसन केव्हडें भारी ! करितां श्रवण, थरारां कांपे अद्यापि सत्सभा सारी. ४२ वनवसव्यसनांत छळकाम धरी; परंतु पांचाळी गेली शरण प्रभुला, तोचि अकाळक्षयासि त्या टाळी. ४३ छळितो, परंतु सद्यश वाढवितो; ज्यासि चाटितो दहन, तें पहिल्याहुनि पवे, पुष्कळ संपत्ति मालतीगहन. ४४ छळ साहतां, गुरुकृपे पाप जळे, होय भद्र बहु मोटें, हें मृदुयत्नें घडतां, चतुरें व्हावें जनांत कां खोटें ? ४५ ‘ छळ न करितां, नव्हे शिव दासांचें, ’ जरि म्हणाल जी ! स्वामी ! छळिला अलर्क केव्हां ? हें पुसतों तुज निजाश्रितस्वा मीं. ४६ छळ न करितां कराल प्रभुजी ! जी, तीच मज दया मोटी, अपमान, श्रम नसतां, जें जोडे स्वल्प, तेंचि धन कोटी. ४७ असतां अघहर गंगाह्रद, शिखिकुंडीं शिरेल कोण कवी ? आरोग्य शर्करा दे, तरि कटुकीची न घे रसज्ञ चवी. ४८ तूं भक्तवत्सळ प्रभु, करुणालय, शुद्धसत्वमयकाय; तुजलाचि आठवितां, मजला संसारदु:खभय काय ? ४९ भगवंताला त्याला करितों दूरूनि भीरु मीं नमनें, दुग्घाब्धिकीर्ति परिसो, परि सोडी मानसा न मीन मनें. ५० लक्ष्मण काय विचक्षण नव्हता सत्पात्रही प्रसादास ? त्याहि दुराराध्य मुनी; मग आराधील हा कसा दास ? ५१ ज्यांज्यांवरि सेवेनें झाला मुनि सुप्रसन्न, ते धन्य तरले सिंधु भुजांहीं, दैवें संप्रति नसे तसा अन्य. ५२ तुमचें होतें, त्याचें दुर्लभ कळिमाजि दर्शनचि आधीं, त्यांत दुराराध्य, तसें उग्रत्व नसे हरी, मृगव्याधीं. ५३ श्रीमन्नारदबावा तेही कळिमाजि भेटती न जना, कलहप्रिय म्हनति म्हणुनि भी मन, परि पाय योग्य ते भजना. ५४ न टिके मुहूर्तभरिहि क्वचित् कथांचिदपि, तत्पद भ्रमती. दर्शन घडतें, तरि ते करितेचि दया गुरु अदभ्रमती. ५५ बाल्मीकिव्यासशुकप्रल्हादधृवमुखांसि तो तारी, हरिभक्तिज्ञानरसें वोती जो शिष्यमूर्ति बोतारी. ५६ कांटाळे मायहि बहु, हरितां शिशुचाहि बाह्य मळ हातें, बाह्यांतर नतमळ तो गुरुवर हरि, करि शिवार्थ कळहातें. ५७ वाल्मीकिचें दुरित किति होतें हो ! तें, तरी न धरि वीट, स्वकरें हरि; हरिहुनि मुनिसिंग प्रणताघकरिवधीं धीट. ५८ या गुरुराजें अगणित जीव भवदवानळांत वांचविले, सोडविले बहुत, जिहीं ममतापाशीं स्वकंठ कांचविले. ५९ भवकारागृहमुक्त प्राणी करितो, हठेंचि हरि ताप, बाप प्रेम खरें तें, बद्धविमोक्षीं सुखेंचि वरि शाप. ६० कोठेंहि आढळेना मुनि तो, भ्याला असेल या कळिला, कीं अद्भुत सच्छिष्यप्रेमगणांहीं बळेंचि आकळिला ! ६१ भ्याला म्हणतों, त्वद्यश जरि कीं त्याच्या सदा मनीं नसतें, भवभयहर भवदंघ्रिध्यानहि न विशुद्ध मानसीं ठसतें. ६२ काय नृसिंहोपासक कीं शरभमनुज्ञ भील वेताळा ? जंभें उगारिल्या कीं वज्रकर स्वर्पती लवे ताळा ? ६३ यदनुग्रहें अनळविधु ज्या दु:सह, त्याहि अंधकारा ती धाकेल चंडकररुचि ? किंवा कामासि अंधकाराति ? ६४ सद्वृत्तीस खळाच्या धाकें न कदापि साधु सोडील, चोरभयास्तव लोभी जन कोण बरें धनें न जोडील ? ६५ धरिलें नसेचि चित्तीं कळिचें भय एकवल्ल भागवतें, जिंकावें केंवि कधीं स्वाहेच्या प्राणवल्लभा गवतें ? ६६ तरि कां नुगवे भगवच्छुद्धयश:पुंडरीकसुहृदर्क ? बहुधा दिधलें कळिला अभय, असा हा कसा बरा तर्क ? ६७ दुष्टजना शरणागत व्हावें, साधूंसि हें रुचेनाच; दैचें रुचतां, न रुचे स्वगुण; रुचे सत्कथा, रुचे नाच. ६८ देते जरि भलत्याला भलतें, जें ज्यास अर्थजात रुचे, तरि कां कवी न म्हणते कीं ‘ संत सखे समुद्रजा तरुचे ’. ६९ संत विवेकी, करिती पाहुनी अधिकार जी दया साजे; ऐसे प्रसाद त्यांचे, देती अन्योन्य न प्रयासा जे. ७० म्हणउनि अभय कळीला दिधलें म्हणतां नयेचि; तरि तो कां सांप्रत कळींत न दिसे भगवान् मुनि अस्मदादिकां लोकां ? ७१ बहुधा असमद्दृष्टि सछ नसे अमित पातकीं मळली, घूकेक्षणासि रविसा, मुनि न दिसे, तर्क मति असा फ़ळली. ७२ मति वाखाणी मानुनि सुंदर या तर्कबाळाला जे, हांसे वाल्मीकिकथा, म्हणउनि ती विश्वपाळका ! लाजे. ७३ करुणा कराल, तरि बा ! तारालचि शुद्ध तर्क हा मात्र. केले पुष्कळ पामर पापी प्राणी तुम्हीं कृपापात्र. ७४ पाहुनि मनिं रेखावे भवदंघ्रि दयानदा ! सदा पावा. हा षड्रिपुंनीं, तुमच्या न धरूनि , भया, न दास दापावा. ७५ ऐसें भक्त मयूर प्रार्थी तुजला, दयाघना ! दत्ता ! नमनेंहि कोप न शमे, तरि हाणीं या शिरावरी लत्ता. ७६ व्यसनीं दीन तुलाचि प्रार्थिति, देवूनि हाक, दादास; रक्षिसि, धावुनि आंगें, सदया, तैसाचि हा कदा दास ? ७७ शरणागत पितृसखजमदग्निकुलज राख विप्र, तापाला पावे, बा ! वेगानें स्वजनीं जन दाखवि प्रतापाला. ७८ आंगीं असोनि अद्भुत सामर्थ्य, प्रेमही यशीं मोटें, प्रभुजि ! जिरविले असता अमितप्रणतापराधही पोटें, ७९ किंच सकृन्निजनामोच्चारश्रवनें जळे महापंक, सर्वहि अवगत असतां, कां हो ! सदया ! न उद्धरा रंक ? ८० व्यसनीं नत रक्षावे, निस्तुळ सर्वज्ञनायका ! यश तें. इतरां विभूषणांचीं, प्रभुचा शोभविति काय, काय शतें ? ८१ माते ! अनसूये ! सति ! तूं तरि पुत्रासि आपुल्या बोधीं. बुडतों मज कर नेदी, जवळि असोनिहि, भवाब्धिच्या रोधीं. ८२ हा पंकजपत्रेक्षण अत्रे ! क्षण न भरतांचि तारील, भवदाज्ञा लंघीना, दीनांचें व्यसन सर्व वारील. ८३ काय उणा करुणार्णव होइल ? मज एक अर्पितां बिंदु. जग तर्पी अमृतरसें, धन्य जडप्रकृति सक्षयहि इंदु. ८४ पुत्रासि विश्वहित उपदेश करायासि तूं महाबिंदु. सर्वस्वामृदानें पुनरपि वृद्धीस पावतो इंदु. ८५ अत्रिस्वामी ! काय स्वमुखें स्वसुतासि पढविलें युक्त ? नमुनि विनवितों भावें, न करी अद्यापि कां मला मुक्त ? ८६ ऐका, हो ! संत ! तुम्ही, सदय कसा हो नतासि होगलिता ? अजि सांवरा, गुरुची गुर्वी बिरुदावली न हो गलिता. ८७ नित्य परोपकृतिव्रत संत तुम्हीं, म्हणुनि एकदा भागा, कांहींच न मागा, परि उपकृतिधर्मार्थ एह्वडें मागा. ८८ तुमचें वचनोल्लंघन न करील प्रभु, पहा बरें, हटका. वागवितो भीड सदा, संशय आणूं नका मनीं लटका. ८९ वेंचिति परोपकारीं सर्वस्व, अनित्य जीवितहि, संत. वचनाची काय कथा ? जोडिति सद्यश अनंत मतिमंत. ९० पहिलें, तों आम्हां जड जीवांसि तुम्हांचि संतरायांचें चरणस्मरण सदोषध, बुधसंमत, संपदंतरायांचें. ९१ मीं केवळ मूढचि, कीं देव तुम्हांहूनि वेगळा म्हणणें, तें हें तैसें, जैसें कूपातें सुरसरित्तटीं खणणे. ९२ ‘ न ह्यम्मयानि ’ हा ये श्लोक, परि जसा खरासि पाटीर, काळाचीही कांपे, तुमची होतां उणी कृपा, टीर. ९३ तुमचा वरप्रसाद ब्रह्मा, हरि, शंभु; देव यापरता सृष्टिस्थितिलयकर्ता नाहीं; श्रद्धेय हें न पापरता. ९४ सत्पदरजीं जसा जन, गांगींहि न होय पट तसा धुवट, या भवसिंधूंत तुम्हीं प्रभुचे आधारभूत साधु वट. ९५ क्षीरधि संतसमाधिहि शेषरुचि प्रभुपदासमीप रमा कसि वाखाणूं तुमची कीर्ति अहो ! बाप ! दास मीं परमा ? ९६ करुणेचें वतन तुम्हीं, शांतीचें भाग्यवंत माहेर, सुघन ज्ञामरसाचे. संत रवे मधुर आंत बाहेर. ९७ स्मरभूतभूतवैद्य, स्पर्शमणी सर्वपापिलोहाचे, ब्रह्मग्रह संत तुम्हीं प्रणतजनाच्या अनादिमोहाचे. ९८ सुरभिस्वर्द्रुमचिंतामणि शिष्यांचे दयानिधी पंत; निजबिंब प्रतिबिंबा अमृतकराचें, खरे तुम्हीं संत. ९९ साधुगुणग्राहकता, भूतीं सर्वत्र सर्वदा समता, गुरुरीति वसे संतांपासीं, हे उक्ति सर्वदासमता. १०० विमळ सकळ गुण तुमचे कां न सुधाधिक म्हणों ? निवे दास ज्यांच्या श्रवणेंचि; असे अद्भुत, रुचले म्हणोनि वेदास. १०१ श्रीदत्तात्रेयातें, तत्तुल्यांतें समस्त संतांतें, साष्टांग नमन आहे, सांभाळा जी ! मयूरपंतांतें. १०२


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.