दासबोध/दशक एकोणिसावा
<poem> ॥ श्रीरामसमर्थ ॥ ॥ श्रीमत् दासबोध ॥ दशक एकोणविसावा : शिकवण समास पहिला : लेखनक्रियानिरूपण
॥ श्रीरामसमर्थ ॥ ब्राह्मणें बाळबोध अक्षर । घडसुनी करावें सुंदर । जें देखतांचि चतुर । समाधान पावती ॥ १ ॥ वाटोळें सरळें मोकळें । वोतलें मसीचें काळें । कुळकुळीत वळी चालिल्या ढाळें । मुक्तमाळा जैशा ॥ २ ॥ अक्षरमात्र तितुकें नीट । नेमस्त पैस काने नीट । आडव्या मात्रा त्या हि नीट । आर्कुलीं वेलांड्या ॥ ३ ॥ पहिलें अक्षर जें काढिलें । ग्रंथ संपेतों पाहात गेलें । येका टांकेंचि लिहिलें । ऐसें वाटे ॥ ४ ॥ अक्षराचें काळेपण । टांकाचें ठोसरपण । तैसेंचि वळण वांकाण । सारिखेंचि ॥ ५ ॥ वोळीस वोळी लागेना । आर्कुली मात्रा भेदीना । खालिले वोळीस स्पर्शेना । अथवा लंबाकार ॥ ६ ॥ पान शिषानें रेखाटावें । त्यावरी नेमकचि ल्याहावें । दुरी जवळी न व्हावें । अंतर वोळींचे ॥ ७ ॥ कोठें शोधासी आडेना । चुकी पाहातां सांपडेना । गरज केली हें घडेना । लेखकापसुनी ॥ ८ ॥ ज्याचें वय आहे नूतन । त्यानें ल्याहावें जपोन । जनासी पडे मोहन । ऐसें करावें ॥ ९ ॥ बहु बारिक तरुणपणीं । कामा नये म्हातारपणीं । मध्यस्त लिहिण्याची करणी । केली पाहिजे ॥ १० ॥ भोंवतें स्थळ सोडून द्यावें । मधेंचि चमचमित ल्याहावें । कागद झडतांहि झडावें । नलगेचि अक्षर ॥ ११ ॥ ऐसा ग्रंथ जपोनी ल्याहावा । प्राणी मात्रास उपजे हेवा । ऐसा पुरुष तो पाहावा । म्हणती लोक ॥ १२ ॥ काया बहुत कष्टवावी । उत्कट कीर्ति उरवावी । चटक लाउनी सोडावी । कांहीं येक ॥ १३ ॥ घट्य कागद आणावे । जपोन नेमस्त खळावे । लिहिण्याचे सामे असावे । नानापरी ॥ १४ ॥ सुर्या कातर्या जागाईत । खळी घोंटाळें तागाईत । नाना सुरंग मिश्रित । जाणोनि घ्यावें ॥ १५ ॥ नाना देसीचे बरु आणावे । घटी बारिक सरळे घ्यावे । नाना रंगाचे आणावे । नाना जिनसी ॥ १६ ॥ नाना जिनसी टांकतोडणी । नाना प्रकारें रेखाटणी । चित्रविचित्र करणी । सिसेंलोळ्या ॥ १७ ॥ हिंगुळ संग्रहीं असावे । वळले आळिते पाहोन घ्यावे । सोपें भिजौनी वाळवावे । संग्रह मसीचे ॥ १८ ॥ तगटी इतिश्रया कराव्या । बंदरी फळ्या घोटाव्या । नाना चित्रीं चिताराव्या । उंच चित्रें ॥ १९ ॥ नाना गोप नाना बासनें । मेणकापडें सिंदुरवणें । पेट्या कुलुपें जपणें । पुस्तकाकारणें ॥ २० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे लेखनक्रियानिरूपणनाम समास पहिला ॥
समास दुसरा : विवरणनिरूपण
॥ श्रीरामसमर्थ ॥ मागां बोलिले लेखनभेद । आतां ऐका अर्थभेद । नाना प्रकारीचे संवाद । समजोन घ्यावे ॥ १ ॥ शब्दभेद अर्थभेद । मुद्राभेद प्रबंधभेद । नाना शब्दाचे शब्दभेद । जाणोनी पाहावे ॥ २ ॥ नाना आशंका प्रत्योत्तरें । नाना प्रचित साक्षात्कारें । जेणें करितां जगदांतरें । चमत्कारती ॥ ३ ॥ नाना पूर्वपक्ष सिद्धांत । प्रत्ययो पाहावा नेमस्त । अनुमानाचे स्वस्तवेस्त । बोलोंचि नये ॥ ४ ॥ प्रवृत्ति अथवा निवृत्ती । प्रचितीविण अवघी भ्रांती । गलंग्यांमधील जगज्जोति । चेतेल कोठें ॥ ५ ॥ हेत समजोन उत्तर देणें । दुसर्याचे जीवीचें समजणें । मुख्य चातुर्याचीं लक्षणें । तें हें ऐसीं ॥ ६ ॥ चातुर्येंविण खटपट । ते विद्यादि फलकट । सभेमधें आटघाट । समाधान कैचें ॥ ७ ॥ बहुत बोलणें ऐकावें । तेथें मोन्यचि धरावें । अल्पचिन्हें समजावें । जगदांतर ॥ ८ ॥ बाष्कळामधें बैसो नये । उद्धटासिं तंडों नये । आपणाकरितां खंडों नये । समाधान जनाचें ॥ ९ ॥ नेणतपण सोडूं नये । जाणपणें फुगो नये । नाना जनाचें हृदये । मृद शब्दें उकलावें ॥ १० ॥ प्रसंग जाणावा नेटका । बहुतांसी जाझु नका । खरें असतांचि नासका । फड होतो ॥ ११ ॥ शोध घेतां आळसों नये । भ्रष्ट लोकीं बैसों नये । बैसलें तरी टाकूं नये । मिथ्या दोष ॥ १२ ॥ अंतर आर्ताचें शोधावें । प्रसंगीं थोडें चि वाचावें । चटक लाउनी सोडावें । भल्या मनुष्यासी ॥ १३ ॥ मज्यालसींत बैसों नये । समाराधनेसी जाऊं नये । जातां येळीलवाणें होये । जिणें आपुलें ॥ १४ ॥ उत्तम गुण प्रगटवावे । मग भलत्यासी बोलतां फावे । भले पाहोन करावे । शोधून मित्र ॥ १५ ॥ उपासनेसारिखें बोलावें । सर्व जनासि तोषवावें । सगट बरेंपण राखावें । कोण्हीयेकासी ॥ १६ ॥ ठाईं ठाईं शोध घ्यावा । मग ग्रामीं प्रवेश करावा । प्राणीमात्र बोलवावा । आप्तपणें ॥ १७ ॥ उंच नीच म्हणों नये । सकळांचें निववावें हृदये । अस्तमानीं जाऊं नये । कोठें तऱ्ही ॥ १८ ॥ जगामधें जगमित्र । जिव्हेपासीं आहे सूत्र । कोठें तऱ्ही सत्पात्र । शोधून काढावें ॥ १९ ॥ कथा होती तेथें जावें । दुरी दीनासारिखें बैसावें । तेथील सकळ हरद्र घ्यावें । अंतर्यामीं ॥ २० ॥ तेथें भले आडळती । व्यापा ते हि कळों येती । हळुहळु मंदगती । रीग करावा ॥ २१ ॥ सकळामधें विशेष श्रवण । श्रवणाहुनी थोर मनन । मननें होये समाधान । बहुत जनाचें ॥ २२ ॥ धूर्तपणें सकळ जाणावें अंतरीं अंतर बाणावें । समजल्याविण सिणावें । कासयासी ॥ २३ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे विवरणनिरूपणनाम समास दुसरा ॥
समास तिसरा : करंटलक्षणनिरूपण
॥ श्रीरामसमर्थ ॥ सुचित करूनी अंतःकर्ण । ऐका करंटलक्षण । हें त्यागितां सदेवलक्षण । आंगीं बाणें ॥ १ ॥ पापाकरितां दरिद्र प्राप्त । दरिद्रें होये पापसंचित । ऐसेंचि होत जात । क्षणक्षणा ॥ २ ॥ याकारणें करंटलक्षणें । ऐकोनी त्यागचि करणें । म्हणिजे कांहीं येक बाणें । सदेवलक्षण ॥ ३ ॥ करंट्यास आळस आवडे । यत्न कदापि नावडे । त्याची वासना वावडे । अधर्मीं सदा ॥ ४ ॥ सदा भ्रमिष्ट निदसुरा । उगेंचि बोले सैरावैरा । कोणीयेकाच्या अंतरा । मानेचिना ॥ ५ ॥ लेहों नेणे वाचूं नेणे । सवदासुत घेऊं नेणे । हिशेब कितेब राखों नेणे । धारणा नाहीं ॥ ६ ॥ हारवी सांडी पाडी फोडी । विसरे चुके नाना खोडी । भल्याचे संगतीची आवडी । कदापी नाहीं ॥ ७ ॥ चाट गडी मेळविले । कुकर्मी मित्र केले । खट नट येकवटिले । चोरटे पापी ॥ ८ ॥ ज्यासीं त्यासीं कळकटा । स्वयें सदाचा चोरटा । परघातकी धाटामोटा । वाटा पाडी ॥ ९ ॥ दीर्घ सूचना सुचेचिना । न्याय नीति हे रुचेना । पराभिळासीं वासना । निरंतर ॥ १० ॥ आळसें शरीर पाळिलें । परंतु पोटेंविण गेलें । सुडकें मिळेनासें जालें । पांघराया ॥ ११ ॥ आळसे शरीर पाळी । अखंड कुंसी कांडोळी । निद्रेचे पाडी सुकाळीं । आपणासी ॥ १२ ॥ जनासीं मीत्री करीना । कठिण शब्द बोले नाना । मूर्खपणें आवरेना । कोणीयेकासी ॥ १३ ॥ पवित्र लोकांमधें भिडावे । वोंगळामधें निशंक धांवे । सदा मनापासून भावे । जननिंद्य क्रिया ॥ १४ ॥ तेथें कैचा परोपकार । केला बहुतांचा संव्हार । पापी अनर्थी अपस्मार । सर्वाबद्धी ॥ १५ ॥ शब्द सांभळून बोलेना । आवरितां आवरेना । कोणीयेकासी मानेना । बोलणें त्याचें ॥ १६ ॥ कोणीयेकास विश्वास नाहीं । कोणीयेकासीं सख्य नाहीं । विद्या वैभव कांहींच नाहीं । उगाचि ताठा ॥ १७ ॥ राखावीं बहुतांची अंतरें । भाग्य येतें तदनंतरें । ऐसीं हें विवेकाचीं उत्तरें । ऐकणार नाहीं ॥ १८ ॥ स्वयें आपणास कळेना । शिकविलें तें ऐकेना । तयासी उपाय नाना । काये करिती ॥ १९ ॥ कल्पना करी उदंड कांहीं । प्राप्तव्य तों कांहींच नहीं । अखंड पडिला संदेहीं । अनुमानाचे ॥ २० ॥ पुण्य मार्ग संडिला मनें । पाप झडावें काशानें । निश्चय नाहीं अनुमानें । नास केला ॥ २१ ॥ कांहींयेक पुर्तें कळेना । सभेमधें बोलों राहेना । बाष्कळ लाबाड ऐसें जना । कळों आलें ॥ २२ ॥ कांहीं नेमकपण आपुलें । बहुत जनासी कळों आलें । तेंचि मनुष्य मान्य जालें । भूमंडळीं ॥ २३ ॥ झिजल्यावांचून कीर्ति कैंची । मान्यता नव्हे कीं फुकाची । जिकडे तिकडे होते ची ची । अवलक्षणें ॥ २४ ॥ भल्याची संगती धरीना । आपणासी शाहाणे करीना । तो आपला आपण वैरी जाणा । स्वहित नेणे ॥ २५ ॥ लोकांसी बरें करवें । तें उसिणें सवेंचि घ्यावें । ऐसें जयाच्या जीवें । जाणिजेना ॥ २६ ॥ जेथें नाहीं उत्तम गुण । तें करंट्याचें लक्षण । बहुतांसीं न मने तें अवलक्षण । सहजचि जालें ॥ २७ ॥ कार्याकारण सकळ कांहीं । कार्येंविण तो कांहींच नाहीं । निकामी तो दुःखप्रवाहीं । वाहातचि गेला ॥ २८ ॥ बहुतांसीं मान्य थोडा । त्याच्या पापासी नाहीं जोडा । निराश्रई पडे उघडा । जेथें तेथें ॥ २९ ॥ याकारणें अवगुण त्यागावे । उत्तम गुण समजोन घ्यावें । तेणें मनासारिखें फावे । सकळ कांहीं ॥ ३० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे करंटलक्षणनिरूपणनाम समास तिसरा ॥
समास चौथा : सदेवलक्षणनिरूपण
॥ श्रीरामसमर्थ ॥ मागां बोलिले करंटलक्षण । तें विवेकें सांडावें संपूर्ण । आतां ऐका सदेवलक्षण । परम सौख्यदायेक ॥ १ ॥ उपजतगुण शरीरीं । परोपकारी नानापरी । आवडे सर्वांचे अंतरीं । सर्वकाळ ॥ २ ॥ सुंदर अक्षर लेहो जाणे । चपळ शुद्ध वाचूं जाणे । अर्थांतर सांगों जाणे । सकळ कांहीं ॥ ३ ॥ कोणाचें मनोगत तोडिना । भल्यांची संगती सोडिना । सदेवलक्षण अनुमाना । आणून ठेवी ॥ ४ ॥ तो सकळ जनासी व्हावा । जेथें तेथें नित्य नवा । मूर्खपणें अनुमानगोवा । कांहींच नाहीं ॥ ५ ॥ नाना उत्तम गुण सत्पात्र । तेचि मनुष्य जगमित्र । प्रगट कीर्ती स्वतंत्र । पराधेन नाहीं ॥ ६ ॥ राखे सकळांचें अंतर । उदंड करी पाठांतर । नेमस्तपणाचा विसर । पडणार नाहीं ॥ ७ ॥ नम्रपणें पुसों जाणे । नेमस्त अर्थ सांगों जाणे । बोलाऐसें वर्तों जाणे । उत्तम क्रिया ॥ ८ ॥ तो मानला बहुतांसी । कोणी बोलों न शके त्यासी । धगधगीत पुण्यरासी । माहांपुरुष ॥ ९ ॥ तो परोपकार करितांचि गेला । पाहिजे तो ज्याला त्याला । मग काय उणें तयाला । भूमंडळीं ॥ १० ॥ बहुत जन वास पाहे । वेळेसी तत्काळ उभा राहे । उणें कोणाचें न साहे । तया पुरुषासी ॥ ११ ॥ चौदा विद्या चौसष्टी कळा । जाणे संगीत गायेनकळा । आत्मविद्येचा जिव्हाळा । उदंड तेथें ॥ १२ ॥ सकळांसी नम्र बोलणें । मनोगत राखोन चालणें । अखंड कोणीयेकाचे उणें । पडोंचि नेदी ॥ १३ ॥ न्याय नीति भजन मर्याद । काळ सार्थक करी सदा । दरिद्रपणाची आपदा । तेथें कैची ॥ १४ ॥ उत्तम गुणें श्रृंघारला । तो बहुतांमधें शोभला । प्रगट प्रतापें उगवला । मार्तंड जैसा ॥ १५ ॥ जाणता पुरुष असेल जेथें । कळहो कैचा उठेल तेथें । उत्तम गुणाविषीं रितें । तें प्राणी करंटे ॥ १६ ॥ प्रपंची जाणे राजकारण । परमार्थीं साकल्य विवरण । सर्वांमधें उत्तम गुण । त्याचा भोक्ता ॥ १७ ॥ मागें येक पुढें येक । ऐसा कदापी नाहीं दंडक । सर्वत्रांसीं अलोलिक । तया पुरुषाची ॥ १८ ॥ अंतरासी लागेल ढका । ऐसी वर्तणूक करूं नका । जेथें तेथें विवेका । प्रगट करी ॥ १९ ॥ कर्मविधी उपासनाविधी । ज्ञानविधी वैराग्यविधी । विशाळ ज्ञात्रुत्वाची बुद्धी । चळेल कैसी ॥ २० ॥ पाहातां अवघे उत्तम गुण । तयास वाईट म्हणेल कोण । जैसा आत्मा संपूर्ण । सर्वां घटीं ॥ २१ ॥ आपल्या कार्यास तत्पर । लोक असती लाहानथोर । तैसाचि करी परोपकार । मनापासुनी ॥ २२ ॥ दुसर्याच्या दुःखें दुखवे । दुसर्याच्या सुखें सुखावे । आवघेचि सुखी असावे । ऐसी वासना ॥ २३ ॥ उदंड मुलें नानापरी । वडिलांचें मन अवघ्यांवरी । तैसी अवघ्यांची चिंता करी । माहांपुरुष ॥ २४ ॥ जयास कोणाचें सोसेना । तयाची निःकांचन वासना । धीकारिल्या धीकारेना । तोचि महापुरुष ॥ २५ ॥ मिथ्या शरीर निंदलें । तरी याचें काये गेलें । ज्ञात्यासी आणि जिंतिलें । देहेबुद्धीनें ॥ २६ ॥ हें अवघें अवलक्षण । ज्ञाता देहीं विलक्षण । कांहीं तऱ्ही उत्तम गुण । जनीं दाखवावे ॥ २७ ॥ उत्तम गुणास मनुष्य वेधे । वाईट गुणासी प्राणी खेदे । तीक्षण बुद्धि लोक साधें । काये जाणती ॥ २८ ॥ लोकीं अत्यंत क्षमा करिती । आलियां लोकांचे प्रचिती । मग ते लोक पाठी राखती । नाना प्रकारीं ॥ २९ ॥ बहुतांसी वाटे मी थोर । सर्वमान्य पाहिजे विचार । धीर उदार गंभीर । माहांपुरुष ॥ ३० ॥ जितुके कांहीं उत्तम गुण । तें समर्थाचें लक्षण । अवगुण तें करंटलक्षण । सहजचि जालें ॥ ३१ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सदेवलक्षणनिरूपणनाम समास चौथा ॥
समास पांचवा : देहमान्यणनिरूपण
॥ श्रीरामसमर्थ ॥ मातीचे देव धोंड्याचे देव । सोन्याचे देव रुप्याचे देव । काशाचे देव पितळेचे देव । तांब्याचे देव चित्रलेपे ॥ १ ॥ रुविच्या लांकडाचे देव पोंवळ्य्यांचे देव । बाण तांदळे नर्मदे देव । शालिग्राम काश्मिरी देव । सूर्यकांत सोमकांत ॥ २ ॥ तांब्रनाणीं हेमनाणी । कोणी पूजिती देवार्चनीं । चक्रांगीत चक्रतीर्थाहुनी । घेऊन येती ॥ ३ ॥ उदंड उपासनेचे भेद । किती करावे विशद । आपलाले आवडीचा वेध । लागला जनीं ॥ ४ ॥ परी त्या सकळांचें हि कारण । मुळीं पाहावें स्मरण । तया स्मरणाचे अंश जाण । नाना देवतें ॥ ५ ॥ मुळीं द्रष्टा देव तो येक । त्याचे जाहाले अनेक । समजोन पाहातां विवेक । उमजों लागे ॥ ६ ॥ देह्यावेगळी भक्ति फावेना । देह्यावेगळा देव पावेना । याकारणें मूळ भजना । देहेचि आहे ॥ ७ ॥ देहे मुळींच केला वाव । तरी भजनासी कैंचा ठाव । म्हणोनी भजनाचा उपाव । देह्यात्मयोगें ॥ ८ ॥ देहेंविण देव कैसा भजावा । देहेंविण देव कैसा पुजावा । देह्याविण मोहछाव कैसा करावा । कोण्या प्रकारें ॥ ९ ॥ अत्र गंध पत्र पुष्प । फल तांबोल धूप दीप । नाना भजनाचा साक्षेप । कोठें करावा ॥ १० ॥ देवाचें तीर्थ कैसें घ्यावें । देवासी गंध कोठें लावावें । मंत्रपुष्प तरी वावें । कोणें ठाईं ॥ ११ ॥ म्हणोनी देह्याविण आडतें । अवघें सांकडेंचि पडतें । देह्याकरितां घडतें । भजन कांहीं ॥ १२ ॥ देव देवता भूतें देवतें । मुळींचे सामर्थ्ये आहे तेथें । अधिकारें नाना देवतें । भजत जावीं ॥ १३ ॥ नाना देवीं भजन केलें । तें मूळ पुरुषासी पावलें । याकारणें सन्मानिलें । पाहिजे सकळ कांहीं ॥ १४ ॥ मायावल्ली फांपावली । नाना देहेफळीं लगडली । मुळींची जाणीव कळों आली । फळामधें ॥ १५ ॥ म्हणोनी येळील न करावें । पाहाणें तें येथेंचि पाहावें । ताळा पडतां राहावें । समाधानें ॥ १६ ॥ प्राणी संसार टाकिती । देवास धुंडीत फिरती । नाना अनुमानीं पडती । जेथ तेथें ॥ १७ ॥ लोकांची पाहातां रिती । लोक देवार्चनें करिती । अथवा क्षत्रदेव पाहाती । ठाईं ठाईं ॥ १८ ॥ अथवा नाना अवतार । ऐकोनी धरिती निर्धार । परी तें अवघें सविस्तर । होऊन गेलें ॥ १९ ॥ येक ब्रह्माविष्णुमहेश । ऐकोन म्हणतीं हे विशेष । गुणातीत जो जगदीश । तो पाहिला पाहिजे ॥ २० ॥ देवासी नाहीं थानमान । कोठें करावें भजन । हा विचार पाहातां अनुमान । होत जातो ॥ २१ ॥ नसतां देवाचें दर्शन । कैसेन होईजे पावन । धन्य धन्य ते साधुजन । सकळ जाणती ॥ २२ ॥ भूमंडळी देव नाना । त्यांची भीड उलंघेना । मुख्य देव तो कळेना । कांहीं केल्यां ॥ २३ ॥ कर्तुत्व वेगळें करावें । मग त्या देवासी पाहावें । तरीच कांहींयेक पडे ठावें । गौप्यगुह्य ॥ २४ ॥ तें दिसेना ना भासेना । कल्पांतीं हि नासेना । सुकृतावेगळें विश्वासेना । तेथें मन ॥ २५ ॥ उदंड कल्पिते कल्पना । उदंड इछिते वासना । अभ्यांतरीं तरंग नाना । उदयातें पावती ॥ २६ ॥ म्हणोनी कल्पनारहित । तेचि वस्तु शाश्वत । अंत नाहीं म्हणोनी अनंत । बोलिजे तया ॥ २७ ॥ हें ज्ञानदृष्टीनें पाहावें । पाहोनी तेथेंचि राहावें । निजध्यासें तद्रूप व्हावें । संगत्यागें ॥ २८ ॥ नाना लीळा नाना लघवें । तें काये जाणिजे बापुड्या जीवें । संतसंगें स्वानुभवें । स्थिति बाणे ॥ २९ ॥ ऐसी सूक्ष्म स्थिति गती । कळतां चुके अधोगती । सद्गुरुचेनि सद्गती । तत्काळ होते ॥ ३० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे देहमान्यणनिरूपणनाम समास पांचवा ॥
समास सहावा : बुद्धिवादनिरूपण
॥ श्रीरामसमर्थ ॥ परमार्थी आणि विवेकी । त्याचें करणें माने लोकीं । कां जे विवरविवरों चुकी । पडोंचि नेदी ॥ १ ॥ जो जो संदेह वाटे जना । तो तो कदापी करीना । आदिअंत अनुमाना । आणून सोडी ॥ २ ॥ स्वतां निस्पृह असेना । त्याचें बोलणेंचि मानेना । कठिण आहे जनार्दना । राजी राखणें ॥ ३ ॥ कोणी दटून उपदेश देती । कोणी मध्यावर्ती घालिती । ते सहजचि हळु पडती । लालचीनें ॥ ४ ॥ जयास सांगावा विवेक । तोचि जाणावा प्रतिकुंचक । पुढें पुढें नासक । कारबार होतो ॥ ५ ॥ भावास भाऊ उपदेश देती । पुढें पुढें होते फजिती । वोळकीच्या लोकांत महंती । मांडूंचि नये ॥ ६ ॥ पहिलें दिसे परी नासे । विवेकी मान्य करिती कैसे । अविवेकी ते जैसे तैसें । मिळती तेथें ॥ ७ ॥ भ्रतार शिष्य स्त्री गुरु । हाहि फटकाळ विचारु । नाना भ्रष्टाकारी प्रकारु । तैसाचि आहे ॥ ८ ॥ प्रगट विवेक बोलेना । झांकातापा करी जना । मुख्य निश्चय अनुमाना । आणूंच नेदी ॥ ९ ॥ हुकीसरिसा भरीं भरे । विवेक सांगतां न धरे । दुरीदृष्टीचे पुरे । साधु नव्हेती ॥ १० ॥ कोण्हास कांहींच न मागावें । भगवद्भजन वाढवावें । विवेकबळें जन लावावे । भजनाकडे ॥ ११ ॥ परांतर रक्षायाचीं कामें । बहुत कठीण विवेकवर्में । स्वैछेनें स्वधर्में । लोकराहाटी ॥ १२ ॥ आपण तुरुक गुरु केला । शिष्य चांभार मेळविला । नीच यातीनें नासला । समुदाव ॥ १३ ॥ ब्रह्मणमंडळ्या मेळवाव्या । भक्तमंडळ्या मानाव्या । संतमंडळ्या शोधाव्या । भूमंडळीं ॥ १४ ॥ उत्कट भव्य तेंचि घ्यावें । मळमळीत अवघेंचि टाकावें । निस्पृहपणें विख्यात व्हावें । भूमंडळीं ॥ १५ ॥ अक्षर बरें वाचणें बरें । अर्थांतर सांगणें बरें । गाणें नाचणें अवघेंचि बरें । पाठांतर ॥ १६ ॥ दीक्षा बरी मित्री बरी । तीक्षण बुधी राजकारणी बरी । आपणास राखे नानापरी । अलिप्तपणें ॥ १७ ॥ अखंड हरिकथेचा छंदु । सकळांस लागे नामवेदु । प्रगट जयाचा प्रबोधु । सूर्य जैसा ॥ १८ ॥ दुर्जनासी राखों जाणे । सज्जनासी निवऊं जाणे । सकळांचे मनीचें जाणे । ज्याचें त्यापरीं ॥ १९ ॥ संगतीचें मनुष्य पालटे । उत्तम गुण तत्काळ उठे । अखंड अभ्यासीं लगटे । समुदाव ॥ २० ॥ जेथें तेथें नित्य नवा । जनासी वाटे हा असावा । परंतु लालचीचा गोवा । पडोंचि नेदी ॥ २१ ॥ उत्कट भक्ति उत्कट ज्ञान । उत्कट च्यातुर्य उत्कट भजन । उत्कट योग अनुष्ठान । ठाईं ठाईं ॥ २२ ॥ उत्कट निस्पृहता धरिली । त्याची कीर्ति दिगांतीं फांकली । उत्कट भक्तीनें निवाली । जनमंडळी ॥ २३ ॥ कांहीं येक उत्कटेविण । कीर्ति कदापि नव्हे जाण । उगेंच वणवण हिंडोन । काये होतें ॥ २४ ॥ नाहीं देह्याचा भरंवसा । केव्हां सरेल वयसा । प्रसंग पडेल कैसा । कोण जाणे ॥ २५ ॥ याकारणें सावधान असावें । जितुकें होईल तितुकें करावें । भगवत्कीर्तीनें करावें । भूमंडळ ॥ २६ ॥ आपणास जें जें अनुकूळ । तें तें करावें तत्काळ । होईना त्यास निवळ । विवेक उमजावा ॥ २७ ॥ विवेकामधें सापडेना । ऐसें तो कांहींच असेना । येकांतीं विवेक अनुमाना । आणून सोडी ॥ २८ ॥ अखंड तजवीजा चाळणा जेथें । पाहातं काय उणें तेथें । येकांतेंविण प्राणीयांतें । बुद्धि कैसी ॥ २९ ॥ येकांती विवेक करावा । आत्माराम वोळखावा । येथून तेथवरी गोवा । कांहींच नाहीं ॥ ३० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे बुद्धिवादनिरूपणनाम समास सहावा ॥
समास सातवा : यत्ननिरूपण
॥ श्रीरामसमर्थ ॥ कथेचें घमंड भरून द्यावें । आणी निरूपणीं विवरावें । उणें पडोंचि नेदावें । कोणीयेकविषीं ॥ १ ॥ भेजणार खालें पडिला । तो भेजणारी जाणितला । नेणता लोक उगाच राहिला । टकमकां पाहात ॥ २ ॥ उत्तर विलंबीं पडिलें । श्रोतयांस कळों आलें । म्हणिजे महत्व उडालें । वक्तयाचें ॥ ३ ॥ थोडें बोलोनि समाधान करणें । रागेजोन तरी मन धरणें । मनुष्य वेधींच लावणें । कोणीयेक ॥ ४ ॥ सोसवेना चिणचिण केली । तेथें तामसवृत्ती दिसोन आली । आवघी आवडी उडाली । श्रोतयाची ॥ ५ ॥ कोण कोण राजी राखिले । कोण कोण मनी भंगिले । क्षणक्षणा परीक्षिले । पाहिजे लोक ॥ ६ ॥ शिष्य विकल्पें रान घेत । गुरु मागें मागें धांवतो । विचार पाहों जातां तो । विकल्पचि अवघा ॥ ७ ॥ आशाबद्धी क्र्यियाहीन । नाहीं च्यातुर्याचें लक्षण । ते महंतीची भणभण । बंद नाहीं ॥ ८ ॥ ऐसे गोसावी हळु पडती । ठाईं ठाईं कष्टी होती । तेथें संगतीचे लोक पावती । सुख कैचें ॥ ९ ॥ जिकडे तिकडे कीर्ति माजे । सगट लोकांस हव्यास उपजे । लोक राजी राखोन कीजे । सकळ कांहीं ॥ १० ॥ परलोकीं वास करावा । समुदाव उगाच पाहावा । मागण्याचा तगादा न लवावा । कांहीं येक ॥ ११ ॥ जिकडे जग तिकडे जगन्नायेक । कळला पाहिजे विवेक । रात्रीदिवस विवेकी लोक । सांभाळीत जाती ॥ १२ ॥ जो जो लोक दृष्टीस पडिला । तो तो नष्ट ऐसा कळला । अवघेच नष्ट येकला भला । काशावरुनी ॥ १३ ॥ वोस मुलकीं काये पाहावें । लोकांवेगळें कोठें राहावें । तऱ्हे खोटी सांडतें घ्यावें । कांहीं येक ॥ १४ ॥ तस्मात लोकिकीं वर्ततां नये । त्यास महंती कामा नये । परत्र साधनाचा उपाये । श्रवण करून असावें ॥ १५ ॥ आपणासी बरें पोहतां नये । लोक बुडवावयाचें कोण कार्य । गोडी आवडी वायां जाये । विकल्पचि अवघा ॥ १६ ॥ अभ्यासें प्रगट व्हावें । नाहीं तरी झांकोन असावें । प्रगट होऊन नासावें । हें बरें नव्हे ॥ १७ ॥ मंद हळु हळु चालतो । चपळ कैसा अटोपतो । अरबी फिरवणार तो । कैसा असावा ॥ १८ ॥ हे धकाधकीचीं कामें । तिक्षण बुद्धीचीं वर्में । भोळ्या भावार्थें संभ्रमें । कैसें घडे ॥ १९ ॥ सेत केलें परी वाहेना । जवार केलें परी फिरेना । जन मेळविलें परी धरेना । अंतर्यामीं ॥ २० ॥ जरी चढती वाढती आवडी उठे । तरी परमार्थ प्रगटे । घसघस करितां विटे । सगट लोकु ॥ २१ ॥ आपलें लोकांस मानेना । लोकांचें आपणांस मानेना । अवघा विकल्पचि मना । समाधान कैचें ॥ २२ ॥ नासक दीक्षा सिंतरु लोक । तेथें कैचा असेल विवेक । जेथें बळावला अविवेक । तेथें राहणें खोटें ॥ २३ ॥ बहुत दिवस श्रम केला । सेवटीं अवघाचि वेर्थ गेला । आपणास ठाकेना गल्बला । कोणें करावा ॥ २४ ॥ संगीत चालिला तरी तो व्याप । नाहीं तरी अवघाचि संताप । क्षणक्षणा विक्षेप । किती म्हणौनि संगावा ॥ २५ ॥ मूर्ख मूर्खपणें भरंगळती । ज्ञातेपणें कऴो करिती । होते दोहींकडे फजिती । लोकांमधें ॥ २६ ॥ कारबार आटोपेना करवेना । आणि उगेंहि राहेना । याकारणें सकळ जना । काये म्हणावें ॥ २७ ॥ नासक उपाधीस सोडावें । वय सार्थकीं घालावें । परिभ्रमणें कंठावें । कोठें तरी ॥ २८ ॥ परिभ्रमण करीना । दुसर्याचें कांहींच सोसीना । तरी मग उदंड यतना । विकल्पाची ॥ २९ ॥ आतां हें आपणाचिपासीं । बरें विचारावें आपणासी । अनुकुळ पडेल तैसी । वर्तणूक करावी ॥ ३० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे येत्ननिरूपणनाम समास सातवा ॥
समास आठवा : उपाधिलक्षणनिरूपण
॥ श्रीरामसमर्थ ॥ सृष्टीमधें बहू लोक । परिभ्रमणें कळे कौतुक । नाना प्रकारीचे विवेक । आडळों लागती ॥ १ ॥ किती प्रपंची जन । अखंड वृत्ति उदासीन । सुखदुःखें समाधान । दंडळेना ॥ २ ॥ स्वभावेंचि नेमक बोलती । सहजचि नेमक चालती । अपूर्व बोलण्याची स्थिती । सकळांसी माने ॥ ३ ॥ सहजचि ताळज्ञान येतें । स्वभावेंचि रागज्ञान उमटतें । सहजचि कळत जातें । न्यायेनीतिलक्षण ॥ ४ ॥ येखादा आडळे गाजी । सकळ लोक अखंड राजी । सदा सर्वदा आवडी ताजी । प्राणीमात्राची ॥ ५ ॥ चुकोन उदंड आढळतें । भारी मनुष्य दृष्टीस पडतें । महंताचें लक्षणसें वाटतें । अकस्मात ॥ ६ ॥ ऐसा आडळतां लोक । चमत्कारें गुणग्राहिक । क्रिया बोलणें नेमक । प्रत्ययाचें ॥ ७ ॥ सकळ अवगुणामधें अवगुण । आपले अवगुण वाटती गुण । मोठें पाप करंटपण । चुकेना कीं ॥ ८ ॥ ढाळेंचि काम होतें सदा । जें जपल्यानें नव्हे सर्वदा । तेथें पीळपेंचाची आपदा । आडळेचिना ॥ ९ ॥ येकासी अभ्यासितां न ये । येकासी स्वभावेंचि ये । ऐसा भगवंताचा महिमा काये । कैसा कळेना ॥ १० ॥ मोठीं राजकारणें चुकती । राजकारणा वढा लागती । नाना चुकीची फजिती । चहुंकडे ॥ ११ ॥ याकारणें चुकों नये । म्हणिजे उदंड उपाये । उपायाचा अपाये । चुकतां होये ॥ १२ ॥ काये चुकलें तें कळेना । मनुष्याचें मनचि वळेना । खवळला अभिमान गळेना । दोहिंकडे ॥ १३ ॥ आवघे फडचि नासती । लोकांचीं मनें भंगती । कोठें चुकते युक्ती । कांहीं कळेना ॥ १४ ॥ व्यापेंविण आटोप केला । तो अवघा घसरतचि गेला । अकलेचा बंद नाहीं घातला । दुरीदृष्टीनें ॥ १५ ॥ येखादें मनुष्य तें सिळें । त्याचें करणेंचि बावळें नाना विकल्पाचें जाळें । करून टाकी ॥ १६ ॥ तें आपणासी उकलेना । दुसर्यास कांहींच कळेना । नाचे विकल्पें कल्पना । ठाईं ठाईं ॥ १७ ॥ त्या गुप्त कल्पना कोणास कळाव्या । कोणें येऊन आटोपाव्या । ज्याच्या त्यानें कराव्या । बळकट बुद्धि ॥ १८ ॥ ज्यासी उपाधी आवरेना । तेणें उपाधी वाढवावीना । सावचित करूनियां मना । समाधानें असावें ॥ १९ ॥ धांवधावों उपाधी वेष्टी । आपण कष्टी लोक हि कष्टी । हे कामा नये गोष्टी । कुसमुसेची ॥ २० ॥ लोक बहुत कष्टी जाला । आपणहि अत्यंत त्रासला । वेर्थचि केला गल्बला । काअसयासी ॥ २१ ॥ असो उपाधीचें काम ऐसें । कांहीं बरें कांहीं काणोंसें । सकळ समजोन ऐसें । वर्ततां बरें ॥ २२ ॥ लोकांपासीं भावार्थ कैचा । आपण जगवावा तयांचा । सेवट उपंढर कोणाचा । पडोंचि नये ॥ २३ ॥ अंतरात्म्याकडे सकळ लागे । निर्गुणीं हें कांहींच न लगे । नाना प्रकारीचे दगे । चंचळामधें ॥ २४ ॥ शुद्ध विश्रांतीचें स्थळ । तें एक निर्मळ निश्चळ । तेथें विकारचि सकळ । निर्विकार होती ॥ २५ ॥ उद्वेग अवघे तुटोनि जाती । मनासी वाटे विश्रांती । ऐसी दुल्लभ परब्रह्मस्थिती । विवेकें सांभाळावी ॥ २६ ॥ आपणास उपाधी मुळींच नाहीं । रुणानुबंधें मिळाले सर्वहि । आल्यागेल्याची क्षिती नाहीं । ऐसें जालें पाहिजे ॥ २७ ॥ जो उपाधीस कंटाळला । तो निवांत होऊन बैसला । आटोपेना तो गल्बला । कासयासी ॥ २८ ॥ कांहीं गल्बला कांहीं निवळ । ऐसा कंठीत जावा काळ । जेणेंकरितां विश्रांती वेळ । आपणासी फावे ॥ २९ ॥ उपाधी कांहीं राहात नाहीं । समाधानायेवढें थोर नाहीं । नरदेहे प्राप्त होत नाहीं । क्षणक्षणा ॥ ३० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे उपाधिलक्षणनिरूपणनाम समास आठवा ॥
समास नवावा : राजकारणनिरूपण
॥ श्रीरामसमर्थ ॥ ज्ञानी आणी उदास । समुदायाचा हव्यास । तेणें अखंड सावकाश । येकांत सेवावा ॥ १ ॥ जेथें तजवीजा कळती । अखंड चाळणा निघती । प्राणीमात्राची स्थिती गती । कळों येते ॥ २ ॥ जरी हा चाळणाचि करीना । तरी कांहींच उमजेना । हिसेबझाडाचि पाहीना । दिवाळखोर ॥ ३ ॥ येक मिरासी साधिती । येक सीध्या गवाविती । व्यापकपणाची स्थिती । ऐसी आहे ॥ ४ ॥ जेणें जें जें मनीं धरिलें । तें तें आधींच समजलें । कृत्रिम अवघेंचि खुंटलें । सहजचि येणें ॥ ५ ॥ अखंड राहतां सलगी होते । अतिपरिचयें अवज्ञा घडते । याकारणें विश्रांती ते । घेतां नये ॥ ६ ॥ आळसें आळस केला । तरी मग कारबारचि बुडाला । अंतरहेत चुकत गेला । समुदायाचा ॥ ७ ॥ उदंड उपासनेचीं कामें । लावीत जावीं नित्यनेमें । अवकाश कैंचा कृत्रिमें । करावयासी ॥ ८ ॥ चोर भांडारी करावा । घसरतांच सांभाळावा । गोवा मूर्खपणाचा काढावा । हळु हळु ॥ ९ ॥ या अवघ्या पहिल्याच गोष्टी । प्राणी कोणी नव्हता कष्टी । राजकारणें मंडळ वेष्टी । चहुंकडे ॥ १० ॥ नष्टासी नष्ट योजावे । वाचळासी वाचाळ आणावे । आपणावरी विकल्पाचे गोवे । पडोंच नेदी ॥ ११ ॥ कांटीनें कांटी झाडावी । झाडावी परी ते कळों नेदावी । कळकटेपणाची पदवी । असों द्यावी ॥ १२ ॥ न कळतां करी कार्य जें तें । तें काम तत्काळचि होतें । गचगचेंत पडतां तें । चमत्कारें नव्हे ॥ १३ ॥ ऐकोनी आवडी लागावी । देखोनी बळकटचि व्हावी । सलगीनें आपली पदवी । सेवकामधें ॥ १४ ॥ कोणीयेक काम करितां होतें । न करितां तें मागें पडतें । या कारणें ढिलेपण तें । असोंचि नये ॥ १५ ॥ जो दुसर्यावरी विश्वासला । त्याचा कार्यभाग बुडाला । जो आपणचि कष्टत गेला । तोचि भला ॥ १६ ॥ अवघ्यास अवघें कळलें । तेव्हां तें रितें पडिलें । याकारणें ऐसें घडलें । न पाहिजे कीं ॥ १७ ॥ मुख्य सूत्र हातीं घ्यावें । करणें तें लोकांकरवीं करवावें । कित्तेक खलक उगवावे । राजकारणामधें ॥ १८ ॥ बोलके पहिलवान कळकटे । तयासीच घ्यावे झटे । दुर्जनें राजकारण दाटे । ऐसें न करावें ॥ १९ ॥ ग्रामण्य वर्मीं सांपडावें । रगडून पीठचि करावें । करूनि मागुती सांवरावें । बुडऊं नये ॥ २० ॥ खळदुर्जनासी भ्यालें । राजकारण नाहीं राखिलें । तेणें अवघें प्रगट जालें । बरें वाईट ॥ २१ ॥ समुदाव पाहिजे मोठा । तरी तनावा असाव्या बळकटा । मठ करुनी ताठा । धरूं नये ॥ २२ ॥ दुर्जन प्राणी समजावे । परी ते प्रगट न करावे । सज्जनापरीस आळवावे । महत्व देउनी ॥ २३ ॥ जनामधें दुर्जन प्रगट । तरी मग अखंड खटखट । याकारणें ते वाट । बुझूनि टाकावी ॥ २४ ॥ गनीमाच्या देखतां फौजा । रणशूरांच्या फुर्फुरिती भुजा । ऐसा पाहिजे किं राजा । कैपक्षी परमार्थी ॥ २५ ॥ तयास देखतां दुर्जन धाके । बैसवी प्रचितीचे तडाखे । बंडपाषांडाचे वाखे । सहजचि होती ॥ २६ ॥ हे धूर्तपणाचीं कामें । राजकारण करावें नेमें । ढिलेपणाच्या संभ्रमें । जाऊं नये ॥ २७ ॥ कोठेंच पडेना दृष्टीं । ठाईं ठाईं त्याच्या गोष्टी । वाग्विळासें सकळ सृष्टी । वेधिली तेणें ॥ २८ ॥ हुंब्यासीं हुंबा लाऊन द्यावा । टोणप्यास टोणपा आणावा । लौंदास पुढें उभा करावा । दुसरा लौंद ॥ २९ ॥ धटासी आणावा धट । उत्धटासी पाहिजे उत्धट । खटनटासी खटनट । अगत्य करी ॥ ३० ॥ जैशास तैसा जेव्हां भेटे । तेव्हां मज्यालसी थाटे । इतुकें होतें परी धनी कोठें । दृष्टीस न पडे ॥ ३१ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे राजकारणनिरूपणनाम समास नववा ॥
समास दहावा : विवेकलक्षणनिरूपण
॥ श्रीरामसमर्थ ॥ जेथें अखंड नाना चाळणा । जेथें अखंड नाना धारणा । जेथें अखंड राजकारणा । मनासी आणिती ॥ १ ॥ सृष्टीमधें उत्तम गुण । तितुकें चाले निरूपण । निरूपणाविण क्षण । रिकामा नाहीं ॥ २ ॥ चर्चा आशंका प्रत्योत्तरें । कोण खोटें कोण खरें । नाना वगत्रुत्वें शास्त्राधारें । नाना चर्चा ॥ ३ ॥ भक्तिमार्ग विशद कळे । उपासनामार्ग आकळे । ज्ञानविचार निवळे । अंतर्यामीं ॥ ४ ॥ वैराग्याची बहु आवडी । उदास वृत्तीची गोडी । उदंड उपाधी तरी सोडी । लागोंच नेदी ॥ ५ ॥ प्रबंदाचीं पाठांतरें । उत्तरासी संगीत उत्तरें । नेमक बोलतां अंतरें । निववी सकळांचीं ॥ ६ ॥ आवडी लागली बहु जना । तेथें कोणाचें कांहीं चालेना । दळवट पडिला अनुमाना । येईल कैसा ॥ ७ ॥ उपासना करूनियां पुढें । पुरवलें पाहिजे चहुंकडे । भूमंडळीं जिकडे तिकडे । जाणती तया ॥ ८ ॥ जाणती परी आडळेना । काये करितो तें कळेना । नाना देसीचे लोक नाना। येऊन जाती ॥ ९ ॥ तितुक्यांचीं अंतरें धरावीं । विवेकें विचारें भरावीं । कडोविकडीचीं विवरावीं । अंतःकर्णें ॥ १० ॥ किती लोक तें कळेना । किती समुदाव आकळेना । सकळ लोक श्रवणमनना । मध्यें घाली ॥ ११ ॥ फड समजाविसी करणें । गद्यपद्य सांगणें । परांतरासी राखणें । सर्वकाळ ॥ १२ ॥ ऐसा ज्याचा दंडक । अखंड पाहाणें विवेक । सावधापुढें अविवेक । येईल कैचा ॥ १३ ॥ जितुकें कांहीं आपणासी ठावें । तितुकें हळुहळु सिकवावें । शाहाणें करूनी सोडावे । बहुत जन ॥ १४ ॥ परोपरीं सिकवणें । आडणुका सांगत जाणें । निवळ करुनी सोडणें । निस्पृहासी ॥ १५ ॥ होईल तें आपण करावें । न होतां जनाकरवीं करवावें । भगवद्भजन राहावें । हा धर्म नव्हे ॥ १६ ॥ आपण करावें करवावें । आपण विवरावें विवरवावें । आपण धरावें धरवावें । भजनमार्गासी ॥ १७ ॥ जुन्या लोकांचा कंटाळा आला । तरी नूतन प्रांत पाहिजे धरिला । जितुकें होईल तितुक्याला । आळस करूं नये ॥ १८ ॥ देह्याचा अभ्यास बुडाला । म्हणिजे महंत बुडाला । लागवेगें नूतन लोकांला । शाहाणे करावें ॥ १९ ॥ उपाधींत सांपडों नये । उपाधीस कंटाळों नये । निसुगपण कामा नये । कोणीयेकविषीं ॥ २० ॥ काम नासणार नासतें । आपण वेडें उगें च पाहातें । आळसी हृदयसुन्य तें । काये करूं जाणें ॥ २१ ॥ धकाधकीचा मामला । कैसा घडे अशक्ताला । नाना बुद्धि शक्ताला । म्हणोनी शिकवाव्या ॥ २२ ॥ व्याप होईल तों राहावें । व्याप राहातां उठोन जावें । आनंदरूप फिरावें । कोठें तऱ्ही ॥ २३ ॥ उपाधीपासून सुटला । तो निस्पृहपणें बळावला । जिकडे सानुकूळ तिकडे चालिला । सावकास ॥ २४ ॥ कीर्ति पाहातं सुख नाहीं । सुख पाहातां कीर्ति नाहीं । केल्याविण कांहींच नाहीं । कोठें तऱ्ही ॥ २५ ॥ येरवीं काय राहातें । होणार तितुकें होऊन जातें । प्राणी मात्र अशक्त तें । पुढें आहे ॥ २६ ॥ अधींच तकवा सोडिला । मधेंचि धीवसा सांडिला । तरी संसार हा सेवटाला । कैसा पावे ॥ २७ ॥ संसार मुळींच नासका । विवेकें करावा नेटका । नेटका करितां फिका । होत जातो ॥ २८ ॥ ऐसा याचा जिनसाना । पाहातां कळों येतें मना । परंतु धीर सांडावाना । कोणीयेकें ॥ २९ ॥ धीर सांडितां कये होतें । अवघें सोसावें लागतें । नाना बुद्धि नाना मतें । शाहाणा जाणे ॥ ३० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे विवेकलक्षणनिरूपणनाम समास दहावा ॥ दशक एकोणविसावा समाप्त ॥
<poem>
हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. |