दासबोध/दशक विसावा
<poem> ॥ श्रीरामसमर्थ ॥ ॥ श्रीमत् दासबोध ॥ दशक विसावा : पूर्णनामदशक समास पहिला : पूर्णापूर्णनिरूपण
॥ श्रीराम ॥ प्राणीव्यापक मन व्यापक । पृथ्वी व्यापक तेज व्यापक । वायो आकाश त्रिगुण व्यापक । अंतरात्मा मूळमाया ॥ १ ॥ निर्गुण ब्रह्म तें व्यापक । ऐसें अवघेंच व्यापक । तरी हें सगट किं काये येक । भेद आहे ॥ २ ॥ आत्मा आणि निरंजन । येणेंहि वाटतो अनुमान । आत्मा सगुण किं निर्गुण । आणि निरंजन ॥ ३ ॥ श्रोता संदेहीं पदिला । तेणें संदेह वाढला । अनुमान धरून बैसला । कोण तो कैसा ॥ ४ ॥ ऐका पहिली आशंका । अवघा गल्बला करूं नका । प्रगट करून विवेका । प्रत्यये पाहावा ॥ ५ ॥ शरीपाडें सामर्थ्यपाडें । प्राणी व्याप करी निवाडें । परी पाहतां मनायेवढें । चपळ नाहीं ॥ ६ ॥ चपळपण येकदेसी । पूर्ण व्यापकता नव्हे त्यासी । पाहातां पृथ्वीच्या व्यापासी । सीमा आहे ॥ ७ ॥ तैसेंचि आप आणि तेज । अपूर्ण दिसती सहज । वायो चपळ समज । येकदेसी ॥ ८ ॥ गगन आणि निरंजन । तें पूर्ण व्यापक सघन । कोणीयेक अनुमान । तेथें असेचिना ॥ ९ ॥ त्रिगुण गुणक्षोभिणी माया । माईक जाईल विलया । अपूर्ण येकदेसी तया । पूर्ण व्यापकता न घडे ॥ १० ॥ आत्मा आणि निरंजन । हें दोहिकडे नामाभिधान । अर्थान्वये समजोन । बोलणें करावें ॥ ११ ॥ आत्मा मन अत्यंत चपळ । तरी हें व्यापक नव्हेचि केवळ । सुचित अंतःकर्ण निवळ । करून पाहावें ॥ १२ ॥ अंतराळीं पाहातां पाताळी नाहीं । पाताळीं पाहातां अंतराळीं नाहीं । पूर्णपणें वसत नाहीं । चहुंकडे ॥ १३ ॥ पुढें पाहातां मागें नाहीं । मागें पाहातां पुढें नाहीं । वाम सव्य व्याप नाहीं । दशदिशा ॥ १४ ॥ चहुंकडे निशाणें मांडावीं । येकसरीं कैसीं सिवावीं । याकारणें समजोन उगवी । प्रत्ययें आपणासी ॥ १५ ॥ सूर्य आला प्रतिबिंबला । हाहि दृष्टांत न घडे वस्तुला । वस्तुरूप निर्गुणाला । म्हणिजेत आहे ॥ १६ ॥ घटाकाश मठकाश । हाहि दृष्टांत विशेष । तुळूं जातां निर्गुणास । साम्यता येते ॥ १७ ॥ ब्रह्मींचा अंश आकाश । आणी आत्म्याचा अंश मानस । दोहींचा अनुभव प्रत्ययास । येथें घ्यावा ॥ १८ ॥ गगन आणि हें मन । कैसे होती समान । मननसीळ महाजन । सकळहि जाणती ॥ १९ ॥ मन हें पुढें वावडे । मागें आवघेंचि रितें पडे । पूर्ण गगनास साम्यता घडे । कोण्या प्रकारें ॥ २० ॥ परब्रह्मचि अचळ । आणि पर्वतासहि म्हणती अचळ । दिनीही येक केवळ । हें कैसें म्हणावें ॥ २१ ॥ ज्ञान विज्ञान विपरितज्ञान । तिनी कैसीं होती समान । याचा प्रत्ययो मनन । करून पाहावा ॥ २२ ॥ ज्ञान म्हणिजे जाणणें । अज्ञान म्हणिजे नेणणें । विपरितज्ञान म्हणिजे देखणें । येकाचें येक ॥ २३ ॥ जाणणें नेणणें वेगळें केलें । ढोबळें पंचभूतिक उरलें । विपरीतज्ञान समजलें । पाहिजे जीवीं ॥ २४ ॥ द्रष्टा साक्षी अंतरात्मा । जीवात्माची होये शिवात्मा । पुढें शिवात्मा तोचि जीवात्मा । जन्म घेतो ॥ २५ ॥ आत्मत्वीं जन्ममरण लागे । आत्मत्वीं जन्ममरण न भंगे । संभवामि युगे युगे । ऐसे हें वचन ॥ २६ ॥ जीव येकदेसी नर । विचारें जाला विश्वंभर । विश्वंभरास संसार । चुकेना कीं ॥ २७ ॥ ज्ञान आणि अज्ञान । वृत्तिरूपें हें समान । निवृत्तिरूपें विज्ञान । जालें पाहिजे ॥ २८ ॥ ज्ञानें येवढें ब्रह्मांड केलें । ज्ञानें येवढें वाढविलें । नाना विकाराचें वळलें । तें हें ज्ञान ॥ २९ ॥ आठवें देह ब्रह्मांडीचें । तें हें ज्ञान साचें । विज्ञानरूप विदेहाचें । पद पाविजे ॥ ३० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे पूर्णापूर्णनिरूपणनाम समास पहिला ॥
समास दुसरा : सृष्टीत्रिविधलक्षणनिरूपण
॥ श्रीराम ॥
मूळमाया नस्तां चंचळ । निर्गुण ब्रह्म तें निश्चळ । जैसें गगन अंतराळ । चहुंकडे ॥ १ ॥ दृश्य आलें आणि गेलें । परी तें ब्रह्म संचलें । जैसें गगन कोंदाटलें । चहुंकडे ॥ २ ॥ जिकडे पाहावें तिकडे अपार । कोणेकडे नाहीं पार । येकजिनसी स्वतंत्र । दुसरें नाहीं ॥ ३ ॥ ब्रह्मांडावरतें बैसावें । अवकाश भकास अवलोकावें । तेथें चंचळ व्यापकाच्या नांवें । सुन्याकार ॥ ४ ॥ दृश्य विवेकें काढिलें । मग परब्रह्म कोंदाटलें । कोणासीच अनुमानलें । नाहीं कदा ॥ ५ ॥ अधोर्ध पाहातां चहुंकडे । निर्गुण ब्रह्म जिकडे तिकडे । मन धांवेल कोणेकडे । अंत पाहावया ॥ ६ ॥ दृश्य चळे ब्रह्म चळेना । दृश्य कळे ब्रह्म कळेना । दृश्य आकळे ब्रह्म आकळेना । कल्पनेसी ॥ ७ ॥ कल्पना म्हणिजे कांहींच नाहीं । ब्रह्म दाटले ठाईंचा ठाईं । वाक्यार्थ विवरत जाई । म्हणिजे बरें ॥ ८ ॥ परब्रह्मायेवढें थोर नाहीं । श्रवणापरतें साधन नाहीं । कळल्याविण कांहींच नाहीं । समाधान ॥ ९ ॥ पिप्लीकामार्गें हळु हळु घडे । विहंगमें फळासी गांठी पडे । साधक मननीं पवाडे । म्हणिजे बरें ॥ १० ॥ परब्रह्मासारिखें दुसरें । कांहींच नाहीं खरें । निंदा आणि स्तुतिउत्तरें । परब्रह्मीं नाहीं ॥ ११ ॥ ऐसे परब्रह्म येकजिनसी । कांहीं तुळेना तयासी । मानुभव पुण्यरासी । तेथें पवाडती ॥ १२ ॥ चंचळें होते दुःखप्राप्ती । निश्चळायेवडी नाहीं विश्रांती । निश्चळ प्रत्ययें पाहाती । माहानुभाव ॥ १३ ॥ मुळापासून शेवटवरी । विचारणा केलीच करी । प्रत्ययाचा निश्चयो अंतरीं । तयासीच फावे ॥ १४ ॥ कल्पनेचि सृष्टी जाली । त्रिविध प्रकारें भासली । तिक्षण बुद्धीनें आणिली । पाहिजे मना ॥ १५ ॥ मूळमायेपासून त्रिगुण । अवघें येकदेसी लक्षण । पांचा भूतांचा ढोबळा गुण । दिसत आहे ॥ १६ ॥ पृथ्वीपासून च्यारी खाणी । चत्वार वेगळाली करणी । सकळ सृष्टीचि चाली येथुनी । पुढें नाहीं ॥ १७ ॥ सृष्टीचें विविध लक्षण । विशद करूं निरूपण । श्रोतीं सुचित अंतःकर्ण । केलें पाहिजे ॥ १८ ॥ मूळमाया जाणीवेची । मुळीं सूक्ष्म कल्पनेची । जैसी स्थिती परे वाचेची । तद्रूपचि ते ॥ १९ ॥ अष्टधा प्रकृतीचें मूळ । ते हे मूळमायाच केवळ । सूक्ष्मरूप बीज सकळ । मुळींच आहे ॥ २० ॥ जड पदार्थ चेतवितें तें । म्हणौन चैतन्य बोलिजेतें । सूक्ष्म रूपें संकेतें । समजोन घ्यावीं ॥ २१ ॥ प्रकृती पुरुषाचा विचार । अर्धनारीनटेश्वर । अष्टधा प्रकृतीचा विचार । सकळ कांहीं ॥ २२ ॥ गुप्त त्रिगुणाचें गूढत्व । म्हणौन संकेत महत्तत्त्व । गुप्तरूपें शुद्धसत्व । तेथेंचि वसे ॥ २३ ॥ जेथून गुण प्रगटती । तीस गुणक्षोभिणी म्हणती । त्रिगुणाचीं रूपें समजती । धन्य ते साधु ॥ २४ ॥ गुप्तरूपें गुणसौम्य । म्हणौनि बोलिजे गुणसाम्य । सूक्ष्म संकेत अगम्य । बहुतांस कैंचा ॥ २५ ॥ मूळमायेपासून त्रिगुण । चंचळ येकदेसी लक्षण । प्रत्ययें पाहातां खूण । अंतरीं येते ॥ २६ ॥ पुढें पंचभूतांचीं बंडें । वाढलीं विशाळें उदंडें । सप्तद्वीपें नवखंडें । वसुंधरा हे ॥ २७ ॥ त्रिगुणापासून पृथ्वीवरी । दुसर्या जिनसान्याची परी । दोनी जिनस याउपरी । तिसरा ऐका ॥ २८ ॥ पृथ्वी नाना जिनसाचें बीज । अंडज जारज श्वेतज उद्भिज । च्यारी खाणी च्यारी वाणी सहज । निर्माण जाल्या ॥ २९ ॥ खाणी वाणी होती जाती । परंतु तैसीच आहे जगती । ऐसे होती आणी जाती । उदंड प्राणी ॥ ३० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सृष्टीत्रिविधलक्षणनिरूपणनाम समास दुसरा ॥
समास तिसरा : सूक्ष्मनामाभिधाननिरूपण
॥ श्रीराम ॥
मुळींहून सेवटवरी । विस्तार बोलिला नानापरी । पुन्हा विवरत विरत माघारी । वृत्ति न्यावी ॥ १ ॥ च्यारी खाणी च्यारी वाणी । चौर्यासी लक्ष जीवयोनी । नाना प्रकारीचे प्राणी । जन्मास येती ॥ २ ॥ अवघे होती पृथ्वीपासूनी । पृथ्वीमधें जाती नासोनी । अनेक येती जाती परी अवनी । तैसीच आहे ॥ ३ ॥ ऐसें हें सेंड्याकडिल खांड । दुसरें भूतांचें बंड । तिसरें नामाभिधानें उदंड । सूक्ष्मरूपें ॥ ४ ॥ स्थूळ अवघें सांडून द्यावें । सूक्ष्मरूपें वोळखावें । गुणापासून पाहिलेच पाहावें । सूक्ष्मदृष्टीं ॥ ५ ॥ गुणाचीं रूपें जाणिव नेणीव । पाहिलाच पाहावा अभिप्राव । सूक्ष्मदृष्टीचें लाघव । येथून पुढें ॥ ६ ॥ शुद्ध नेणीव तमोगुण । शुद्ध जाणीव सत्वगुण । जाणीवनेणीव रजोगुण । मिश्रित चालिला ॥ ७ ॥ त्रिगुणाचीं रूपें ऐसीं । कळों लागलीं अपैसीं । गुणापुढील कर्दमासी । गुणक्षोभिणी बोलिजे ॥ ८ ॥ रज तम आणि सत्व । तिहींचें जेथें गूढत्व । तें जाणिजे महत्तत्त्व । कर्दमरूप ॥ ९ ॥ प्रकृती पुरुष शिवशक्ति । अर्धनारीनटेश्वर म्हणती । परी याची स्वरूपस्थिती । कर्दमरूप ॥ १० ॥ सूक्ष्मरूपें गुणसौम्य । त्यास बोलिजे गुणसाम्य । तैसेंचि चैतन्य अगम्य । सूक्ष्मरूपी ॥ ११ ॥ बहुजिनसी मूळमाया । माहांकारण ब्रह्मांडीची काया । ऐसिया सूक्ष्म अन्वया । पाहिलेंचि पाहावें ॥ १२ ॥ च्यारी खाणी पांच भूतें । चौदा सूक्ष्म संकेतें । काये पाहणें तें येथें । शोधून पाहावें ॥ १३ ॥ आहाच पाहातां कळेना । गरज केल्यां समजेना । नाना प्रकारीं जनाच्या मना । संदेह पडती ॥ १४ ॥ चौदा पांच येकोणीस । येकोणीस च्यारी तेविस । यांमधें मूळ चतुर्दश । पाहिलेंचि पाहावें ॥ १५ ॥ जो विवरोन समजला । तेथें संदेह नाहीं उरला । समजल्याविण जो गल्बला । तो निरर्थक ॥ १६ ॥ सकळ सृष्टीचें बीज । मूळमायेंत असे सहज । अवघें समजतां सज्ज । परमार्थ होतो ॥ १७ ॥ समजलें माणूस चावळेना । निश्चै अनुमान धरीना । सावळगोंदा करीना । परमार्थ कदा ॥ १८ ॥ शब्दातीत बोलतां आलें । त्यास वाच्यांश बोलिलें । शुद्ध लक्ष्यांश लक्षिलें । पाहिजे विवेकें ॥ १९ ॥ पूर्वपक्ष म्हणिजे माया । सिद्धांतें जाये विलया । माया नस्तां मग तया । काये म्हणावें ॥ २० ॥ अन्वये आणी वीतरेक । हा पूर्वपक्षाचा विवेक । सिद्धांत म्हणिजे शुद्ध येक । दुसरें नाहीं ॥ २१ ॥ अधोमुखें भेद वाढतो । ऊर्धमुखें भेद तुटतो । निःसंगपणें निर्गुणी तो । माहांयोगी ॥ २२ ॥ माया मिथ्या ऐसी कळली । तरी मग भीड कां लागली । मायेचें भिडेनें घसरली । स्वरूपस्थिती ॥ २३ ॥ लटके मायेनें दपटावें । सत्य परब्रह्म सांडावें । मुख्य निश्चयें हिंडावें । कासयासी ॥ २४ ॥ पृथ्वीमधें बहुत जन । त्यामधें असती सज्जन । परी साधूस वोळखतो कोण । साधुवेगळा ॥ २५ ॥ म्हणौन संसार सांडावा । मग साधूचा शोध घ्यावा । फिरफिरों ठाइं पाडावा । साधुजन ॥ २६ ॥ उदंड हुडकावे संत । सांपडे प्रचितीचा महंत । प्रचितीविण स्वहित । होणार नाहीं ॥ २७ ॥ प्रपंच अथवा परमार्थ । प्रचितीविण अवघें वेर्थ । प्रत्ययेज्ञानी तो समर्थ । सकळांमध्यें ॥ २८ ॥ रात्रंदिवस पाहावा अर्थ । अर्थ पाहेल तो समर्थ । परलोकींच निजस्वार्थ । तेथेंचि घडे ॥ २९ ॥ म्हणौन पाहिलेंचि पाहावें । आणि शोधिलेंचि शोधावें । अवघें कळतां स्वभावें । संदेह तुटती ॥ ३० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सूक्ष्मनामाभिधाननिरूपणनाम समास तिसरा ॥
समास चौथा : आत्मानिरूपण
॥ श्रीराम ॥ सकळ जनास प्रार्थना । उगेंच उदास करावेंना । निरूपण आणावें मना । प्रत्ययाचें ॥ १ ॥ प्रत्यये राहिला येकेकडे । आपण धांवतो भलतेकडे । तरी सारासाराचे निवाडे । कैसे होती ॥ २ ॥ उगिच पाहातां सृष्टी । गल्बला दिसतो दृष्टीं । परी ते राजसत्तेची गोष्टी । वेगळीच ॥ ३ ॥ पृथ्वीमधें जितुकीं शरीरें । तितुकीं भगवंताचीं घरें । नाना सुखें येणें द्वारें । प्राप्त होती ॥ ४ ॥ त्याचा महिमा कळेल कोणाला । माता वांटून कृपाळु जाला । प्रत्यक्ष जगदीश जगाला । रक्षितसे ॥ ५ ॥ सत्त पृथ्वीमधें वांटली । जेथें तेथें विभागली । कळेनें सृष्टि चालिली । भगवंताचे ॥ ६ ॥ मूळ जाणत्या पुरुषाची सत्ता । शरीरीं विभागली तत्वता । सकळ कळा चातुर्यता । तेथें वसे ॥ ७ ॥ सकळ पुराचा ईश । जगामध्यें तो जगदीश । नाना शरीरीं सावकास । करूं लागे ॥ ८ ॥ पाहातां सृष्टिची रचना । ते येकाचेन चालेना । येकचि चालवी नाना । देह धरुनी ॥ ९ ॥ नाहीं उंच नीच विचारिलें । नाहीं बरें वाईट पाहिलें । कार्ये चालों ऐसें जालें । भगवंतासी ॥ १० ॥ किंवा नेणणें आडवें केलें । किंवा अभ्यासीं घातलें । हें कैसें कैसें केलें । त्याचा तोचि जाणे ॥ ११ ॥ जगदांतरीं अनुसंधान । बरें पाहाणें हेंचि ध्यान । ध्यान आणी तें ज्ञान । येकरूप ॥ १२ ॥ प्राणी संसारास आला । कांहीं येक शाहाणा जाला । मग तो विवरों लागला । भूमंडळीं ॥ १३ ॥ प्रगट रामाचें निशाण । आत्माराम ज्ञानघन । विश्वंभर विद्यमान । भाग्यें कळे ॥ १४ ॥ उपासना धुंडुन वासना धरिली । तरी ते लांबतचि गेली । महिमा न कळे बोलिली । येथार्थ आहे ॥ १५ ॥ द्रष्टा म्हणिजे पाहाता । साक्षी म्हणिजे जाणता । अनंतरूपी अनंता । वोळखावें ॥ १६ ॥ संगती असावी भल्यांची । धाटी कथा निरूपणाची । कांहीं येक मनाची । विश्रांती आहे ॥ १७ ॥ त्याहिमधें प्रत्ययेज्ञान । जाळून टाकिला अनुमान । प्रचितीविण समाधान । पाविजेल कैंचें ॥ १८ ॥ मूळसंकल्प तो हरिसंकल्प । मूळमायेमधील साक्षेप । जगदांतरीं तेंचि रूप । देखिजेतें ॥ १९ ॥ उपासना ज्ञानस्वरूप । ज्ञानीं चौथा देह आरोप । याकारणें सर्व संकल्प । सोडून द्यावा ॥ २० ॥ पुढें परब्रह्म विशाळ । गगनासारिखें पोकळ । घन पातळ कोमळ । काये म्हणावें ॥ २१ ॥ उपासना म्हणिजे ज्ञान । ज्ञानें पाविजे निरंजन । योगियांचें समाधान । येणें रितीं ॥ २२ ॥ विचार नेहटूनसा पाहे । तरी उपासना आपणचि आहे । येक जाये एक आहे । देह धरुनी ॥ २३ ॥ अखंड ऐसी घालमेली । पूर्वापार होत गेली । आतां हि तैसीच चालिली । उत्पत्ति स्थिती ॥ २४ ॥ बनावरी बनचरांची सत्ता । जळावरी जळचरांची सत्ता । भूमंडळीं भूपाळां समस्तां । येणेंचि न्यायें ॥ २५ ॥ सामर्थ्य आहे चळवळेचें । जो जो करील तयाचें । परंतु येथें भगवंताचें । अधिष्ठान पाहिजे ॥ २६ ॥ कर्ता जगदीश हें तों खरें । परी विभाग आला पृथकाकारें । तेथें अहंतेचें काविरें । बाधिजेना ॥ २७ ॥ हरिर्दाता हरिर्भोक्ता । ऐसें चालतें तत्वता । ये गोष्टीचा आतां । विचार पाहावा ॥ २८ ॥ सकळ कर्ता परमेश्वरु । आपला माइक विचारु । जैसें कळेल तैसें करूं । जगदांतरें ॥ २९ ॥ देवायेवढें चपळ नाहीं । ब्रह्मायेवढें निश्चळ नाहीं । पाइरी चढोन पाहीं । मूळपरियंत ॥ ३० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे आत्मानिरूपणनाम समास चौथा ॥
समास पांचवा : चत्वारजिन्नसनिरूपण
॥ श्रीराम ॥ येथून पाहातां तेथवरी । चत्वार जीनस अवधारीं । येक चौदा पांच च्यारी । ऐसें आहे ॥ १ ॥ परब्रह्म सकळांहून वेगळें । परब्रह्म सकळांहून आगळें । नाना कल्पनेनिराळें । परब्रह्म तें ॥ २ ॥ परब्रह्माचा विचार । नाना कल्पनेहून पर । निर्मळ निश्चळ निर्विकार । अखंड आहे ॥ ३ ॥ परब्रह्मास कांहींच तुळेना । हा येक मुख्य जिनसाना । दुसरा जिनस नाना कल्पना । मूळमाया ॥ ४ ॥ नाना सूक्ष्मरूप । सूक्ष्म आणी कर्दमरूप । मुळींच्या संकल्पाचा आरोप । मूळमाया ॥ ५ ॥ हरिसंकल्प मुळींचा । आत्माराम सकळांचा । संकेत नामाभिधानाचा । येणें प्रकारें ॥ ६ ॥ निश्चळीं चंचळ चेतलें । म्हणौनि चैतन्य बोलिलें । गुणसामानत्वें जालें । गुणसाम्य ऐसें ॥ ७ ॥ अर्धनारीनटेश्वर । तोचि शड्गुणैश्वर । प्रकृतिपुरुषाचा विचार । शिवशक्ती ॥ ८ ॥ सुद्धसत्वगुणाची मांडणी । अर्धमात्रा गुणक्षोभिणी । पुढें तिही गुणांची करणी । प्रगट जाली ॥ ९ ॥ मन माया अंतरात्मा । चौदा जिनसांची सीमा । विद्यमान ज्ञानात्मा । इतुके ठाइं ॥ १० ॥ ऐसा दुसरा जिनस । अभिधानें चतुर्दश । आतां तिसरा जिनस । पंचमाहाभूतें ॥ ११ ॥ येथें पाहातां जाणीव थोडी । आदिअंत हे रोकडी । खाणी निरोपिल्या तांतडी । तो चौथा जिनस ॥ १२ ॥ च्यारी खाणी अनंत प्राणी । जाणीवेची जाली दाटणी । च्यारी जिनस येथूनी । संपूर्ण जाले ॥ १३ ॥ बीज थोडें पेरिजेतें । पुढें त्याचें उदंड होतें । तैसें जालें आत्मयातें । खाणी वाणी प्रगटतां ॥ १४ ॥ ऐसी सत्ता प्रबळली । थोडे सत्तेचि उदंड जाली । मनुष्यवेषें सृष्टी भोगिली । नान प्रकारें ॥ १५ ॥ प्राणी मारून स्वापद पळे । वरकड त्यास काये कळे । नाना भोग तो निवळे । मनुष्यदेहीं ॥ १६ ॥ नाना शब्द नाना स्पर्श । नाना रूप नाना रस । नाना गंध ते विशेष । नरदेह जाणे ॥ १७ ॥ अमोल्य रत्नें नाना वस्त्रें । नाना यानें नाना शस्त्रें । नाना विद्या कळा शास्त्रें । नरदेह जाणे ॥ १८ ॥ पृथ्वी सत्तेनें व्यापिली । स्थळोस्थळीं आटोपिली । नाना विद्या कळा केली । नाना धारणा ॥ १९ ॥ दृश्य अवघेंचि पाहावें । स्थानमान सा।म्भाळावें । सारासार विचारावें । नरदेहे जालियां ॥ २० ॥ येहलोक आणी परलोक । नाना प्रकारींचा विवेक । विवेक आणी अविवेक । मनुष्य जाणे ॥ २१ ॥ नाना पिंडीं ब्रह्मांडरचना । नाना मुळींची कल्पना । नाना प्रकारीं धारणा । मनुष्य जाणे ॥ २२ ॥ अष्टभोग नवरस । नाना प्रकारींचा विळास । वाच्यांश लक्ष्यांश सारांश । मनुष्य जाणे ॥ २३ ॥ मनुष्यें सकळांस आळिलें । त्या मनुष्यास देवें पाळिलें । ऐसें हें अवघें कळलें । नरदेहयोगें ॥ २४ ॥ नरदेह परम दुल्लभ । येणें घडे अलभ्य लाभ । दुल्लभ तें सुल्लभ । होत आहे ॥ २५ ॥ बरकड देहे हें काबाड । नरदेह मोठें घबाड । परंतु पाहिजे जाड । विवेकरचना ॥ २६ ॥ येथें जेणें आळस केला । तो सर्वस्वें बुडाला । देव नाहीं वोळखिला । विवेकबळें ॥ २७ ॥ नर तोचि नारायेण । जरी प्रत्ययें करी श्रवण । मननशीळ अंतःकर्ण । सर्वकाळ ॥ २८ ॥ जेणें स्वयेंचि पोहावें । त्यास कासेस नलगे लागावें । स्वतंत्रपणें शोधावें । सकळ कांहीं ॥ २९ ॥ सकळ शोधून राहिला । संदेह कैचा तयाला । पुढें विचार कैसा जाला । त्याचा तोचि जाणे ॥ ३० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे चत्वारजिनसनाम समास पांचवा ॥
समास सहावा : आत्मागुणनिरूपण
॥ श्रीराम ॥ पाहों जातां भूमंडळ । ठाईं ठाईं आहे जळ । कित्तेक तें निर्मळ माळ । जळेंविण पृथ्वी ॥ १ ॥ तैसें दृश्य विस्तारलें । कांहींयेक जाणिवेनें शोभलें । जाणीवरहित उरलें । कीतीयेक दृश्य ॥ २ ॥ च्यारी खाणी च्यारी वाणी । चौर्यासी लक्ष जीवयोनी । शास्त्रीं अवघें नेमुनी । बोलिलें असे ॥ ३ ॥ श्लोक ॥ जलजा नवलक्षाश्च दशलक्षाश्च पक्षिणः । कृमयो रुद्रलक्षाश्च विंशल्लक्षा गवादयः ॥ स्थावरा स्त्रिंशल्लक्षाश्च चतुर्लक्षाश्च मानवाः । पापपुण्यं समं कृत्वा नरयोनिषु जायते ॥ मनुष्यें च्यारी लक्ष । पशु वीस लक्ष । क्रिम आक्रा लक्ष । बोलिलें शास्त्रीं ॥ ४ ॥ दाहा लक्ष ते खेचर । नव लक्ष जळचर । तीस लक्ष स्थावर । बोलिलें शास्त्रीं ॥ ५ ॥ ऐसी चौर्यासी लक्ष योनी । जितुका तितुका जाणता प्राणी । अनंत देह्याची मांडणी । मर्यादा कैंची ॥ ६ ॥ अनंत प्राणी होत जाती । त्यांचें अधिष्ठान जगती । जगतीवेगळी स्थिती । त्यास कैंची ॥ ७ ॥ पुढें पाहातां पंचभूतें । पावलीं पष्टदशेतें । कोणी विद्यमान कोणी तें । उगीच असती ॥ ८ ॥ अंतरात्म्याची वोळखण । तेचि जेथें चपळपण । जाणीवेचें अधिष्ठान । सावध ऐका ॥ ९ ॥ सुखदुख जाणता जीव । तैसाचि जाणावा सद शिव । अंतःकर्णपंचक अपूर्व । अंश आत्मयाचा ॥ १० ॥ स्थुळीं आकाशाचे गुण । अंश आत्मयाचे जाण । सत्व रज तमोगुण । गुण आत्मयाचे ॥ ११ ॥ नाना चाळणा नाना धृती । नवविधा भक्ति चतुर्विधा मुक्ती । अलिप्तपण सहजस्थिती । गुण आत्मयाचे ॥ १२ ॥ द्रष्टा साक्षी ज्ञानघन । सत्ता चैतन्य पुरातन । श्रवण मनन विवरण । गुण आत्मयाचे ॥ १३ ॥ दृश्य द्रष्टा दर्शन । ध्येय ध्याता ध्यान । ज्ञेय ज्ञाता ज्ञान । गुण आत्मयाचे ॥ १४ ॥ वेदशास्त्रपुराणार्थ । गुप्त चालिला परमार्थ । सर्वज्ञपणें समर्थ । गुण आत्मयाचे ॥ १५ ॥ बद्ध मुमुक्षु साधक सिद्ध । विचार पाहाणें शुद्ध । बोध आणी प्रबोध । गुण आत्मयाचे ॥ १६ ॥ जागृति स्वप्न सुषुप्ति तुर्या । प्रकृतिपुरुष मूळमाया । पिंड ब्रह्मांड अष्टकाया । गुण आत्मयाचे ॥ १७ ॥ परमात्मा आणि परमेश्वरी । जगदात्मा आणीई जगदेश्वरी । महेश आणी माहेश्वरी । गुण आत्मयाचे ॥ १८ ॥ सूक्ष्म जितुकें नामरूप । तितुकें आत्मयाचें स्वरूप । संकेतनामाभिधानें अमूप । सीमा नाहीं ॥ १९ ॥ आदिशक्ती शिवशक्ती । मुख्य मूळमाया सर्वशक्ती । नाना जीनस उत्पती स्थिती । तितुके गुण आत्मयाचे ॥ २० ॥ पूर्वपक्ष आणी सिद्धांत । गाणें वाजवणें संगीत । नाना विद्या अद्भुत । गुण आत्मयाचे ॥ २१ ॥ ज्ञान अज्ञान विपरीतज्ञान । असद्वृति सद्वृति जाण । ज्ञेप्तिमात्र अलिप्तपण । गुण आत्मयाचे ॥ २२ ॥ पिंड ब्रह्मांड तत्वझाडा । नाना तत्वांचा निवाडा । विचार पाहाणें उघडा । गुण आत्मयाचे ॥ २३ ॥ नाना ध्यानें अनुसंधानें । नाना स्थिति नाना ज्ञानें । अनन्य आत्मनिवेदनें । गुण आत्मयाचे ॥ २४ ॥ तेतीस कोटी सुरवर । आठ्यासी सहश्र ऋषेश्वर । भूत खेचर अपार । गुण आत्मयाचे ॥ २५ ॥ भूतावळी औट कोटी । च्यामुंडा छपन्न कोटी । कात्यायेणी नव कोटी । गुण आत्मयाचे ॥ २६ ॥ चंद्र सूर्य तारामंडळें । नाना नक्षत्रें ग्रहमंडळें । शेष कूर्म मेघमंडळें । गुण आत्मयाचे ॥ २७ ॥ देव दानव मानव । नाना प्रकारीचे जीव । पाहातां सकळ भावाभाव । गुण आत्मयाचे ॥ २८ ॥ आत्मयाचे नाना गुण । ब्रह्म निर्विकार निर्गुण । जाणणें येकदेसी पूर्ण । गुण आत्मयाचे ॥ २९ ॥ आत्मरामौपासना । तेणें पावले निरंजना । निसंदेहे अनुष्ठना । ठावचि नाहीं ॥ ३० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे आत्मागुणनिरूपणनाम समास सहावा ॥
समास सातवा : आत्मानिरूपण
॥ श्रीराम ॥ अनुर्वाच्य समाधान जालें । तें पाहिजे बोलिलें । बोलिल्यासाठीं समाधान गेलें । हें तों घडेना ॥ १ ॥ कांहीं सांडावें लागत नाहीं । कांहीं मांडावें लागत नाहीं । येक विचार शोधून पाहीं । म्हणिजे कळे ॥ २ ॥ मुख्य कासीविश्वेश्वर । श्वेतबंद रामेश्वर । मलकार्जुन भीमाशंकर । गुण आत्मयाचे ॥ ३ ॥ जैसीं मुख्य बारा लिंगें । यावेगळीं अनंत लिंगें । प्रचित जाणिजेत जगें । गुण आत्मयाचे ॥ ४ ॥ भूमंडळीं अनंत शक्ति । नाना साक्षात्कार चमत्कार होती । नाना देवांच्या सामर्थ्यमूर्ती । गुण आत्मयाचे ॥ ५ ॥ नाना सिद्धांचीं सामर्थ्यें । नाना मंत्रांचीं सामर्थ्यें । नानामोहरेवल्लींत सामर्थ्यें । गुण आत्मयाचे ॥ ६ ॥ नाना तीर्थांचीं सामर्थ्यें । नाना क्षेत्रांचीं सामर्थ्यें । नाना भूमंडळीं सामर्थ्यें । गुण आत्मयाचे ॥ ७ ॥ जितुके कांहीं उत्तम गुण । तितुकें आत्मयाचें लक्षण । बरें वाईट तितुकें जाण । आत्म्याचकरितां ॥ ८ ॥ शुद्ध आत्मा उत्तम गुणी । सबळ आत्मा अवलक्षणी । बरी वाईट आवघी करणी । आत्मयाची ॥ ९ ॥ नाना साभिमान धरणें । नाना प्रतिसृष्टी करणें । नाना श्रापौश्रापलक्षणें आत्मयाचेनी ॥ १० ॥ पिंडाचा बरा शोध घ्यावा । तत्वांचा पिंड शोधावा । तत्वें शोधितां पिंड आघवा । कळों येतो ॥ ११ ॥ जड देह भूतांचा । चंचळ गुण आत्मयाचा । निश्चळ ब्रह्मावेगळा ठाव कैचा । जेथें तेथें ॥ १२ ॥ निश्चळ चंचळ आणी जड । पिंडीं करावा निवाड । प्रत्ययवेगळें जाड । बोलणें नाहीं ॥ १३ ॥ पिंडामधून आत्मा जातो । तेव्हां निवाडा कळों येतो । देहे जड हा पडतो । देखतदेखतां ॥ १४ ॥ जड तितुकें पडिलें । चंचळ तितुकें निघोनी गेलें । जडचंचळाचें रूप आलें । प्रत्ययासी ॥ १५ ॥ निश्चळ आहे सकळां ठाईं । हें तों पाहाणें नलगे कांहीं । गुणविकार तेथें नाहीं । निश्चळासी ॥ १६ ॥ जैसें पिंड तैसें ब्रह्मांड । विचार दिसतो उघड । जड चंचळ जातां जाड । परब्रह्मचि आहे ॥ १७ ॥ माहांभूतांचा खंबीर केला । आत्मा घालून पुतळा जाला । चालिला सृष्टीचा गल्बला । येणें रितीं ॥ १८ ॥ आत्मा माया विकार करी । आळ घालिती ब्रह्मावरी । प्रत्ययें सकळ कांहीं विवरी । तोचि भला ॥ १९ ॥ ब्रह्म व्यापक अखंड । वरकड व्यापकता खंड । शोधून पाहातं जड । कांहींच नाहीं ॥ २० ॥ गगनासी खंडता नये । गगनाचें नासेल काये । जरी जाला माहांप्रळये । सृष्टीसंव्हार ॥ २१ ॥ जें संव्हारामध्यें सापडले । तें सहजचि नासिवंत जालें । जाणते लोकीं उगविलें । पाहिजे कोडें ॥ २२ ॥ न कळतां वाटे कोडें । कळतां आवघें दिसें उघडें । म्हणोनी येकांतीं निवाडे । विचार पाहावा ॥ २३ ॥ मिळता प्रत्ययाचे संत । येकांपरीस येकांत । केली पाहिजे सावचित । नाना चर्चा ॥ २४ ॥ पाहिल्यावेगळें कळत नाहीं । कळतां कळतां संदेह नाहीं । विवेक पाहातां कोठेंचि नाहीं । मायाजाळ ॥ २५ ॥ गगनीं आभाळ आलें । मागुती सवेंचि उडालें । आत्म्याकरितां दृश्य जालें । उडेल तैसें ॥ २६ ॥ मुळापासून सेवटवरी । विवेकी विवेकें विवरी । तोचि निश्चय थावरी । चळेना ऐसा ॥ २७ ॥ वरकड निश्चय अनुमानाचे । अनुमानें बोलतां काये वेंचे । जाणते पुरुष प्रचितीचे । ते तों मानीतना ॥ २८ ॥ उगेंच बोलणें अनुमानाचें । अनुमानाचें कोण्या कामाचें । येथें सगट विचाराचें । काम नाहीं ॥ २९ ॥ सगट विचार तो अविचार । कित्येक म्हणती येकंकार । येकंकार भ्रष्टाकार । करूं नये ॥ ३० ॥ कृत्रिम अवघें सांडावें । कांहीं येक शुद्ध घ्यावें । जाणजाणों निवडावें । सारासार ॥ ३१ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे आत्मानिरूपणनाम समास सतवा ॥
समास आठवा : देहेक्षेत्रनिरूपण
॥ श्रीराम ॥ विधीप्रपंचतरु वाढला । वाढतां वाढतां विस्तीर्ण जाला । फळें येतां विश्रांती पावला । बहुत गुणी ॥ १ ॥ नाना फळें रसाळें लागलीं । नाना जिनसी गोडीस आलीं । गोडी पाहावया निर्माण केलीं । नाना शरीरें ॥ २ ॥ निर्माण जाले उत्तम विषये । शरीरेंविण भोगितां नये । म्हणोनी निर्मिला उपाये । नाना शरीरें ॥ ३ ॥ ज्ञानैंद्रियें निर्माण केलीं । भिन्न भिन्न गुणांचीं निर्मिलीं । येका शरीरासी लागलीं । परी वेगळालीं ॥ ४ ॥ श्रोत्रैंद्रिंई शब्द पडिला । त्याचा भेद पाहिजे कळला । ऐसा उपाये निर्माण केला । इंद्रियांमधें ॥ ५ ॥ त्वचेइंद्रियें सीतोष्ण भासे । चक्षुइंद्रियें सकळ दिसे । इंद्रियांमधें गुण ऐसे । वेगळाले ॥ ६ ॥ जिव्हेमधें रस चाखणें । घ्राणामधें परिमळ घेणें । इंद्रियांमधें वेगळाल्या गुणें । भेद केले ॥ ७ ॥ वायोपंचकीं अंतःकर्णपंचक । मिसळोनि फिरे निशंक । ज्ञानैंद्रियें कर्मैंद्रियें सकळिक । सावकास पाहे ॥ ८ ॥ कर्मैंद्रियें लागवेगीं । जीव भोगीं विषयांलागीं । ऐसा हा उपाये जगीं । ईश्वरें केला ॥ ९ ॥ निषय निर्माण जाले बरवे । शरीरेंविण कैसें भोगावे । नाना शरीराचे गोवे । याकारणें ॥ १० ॥ अस्तीमांशाचे शरीर । त्यामधें गुणप्रकार । शरीरासारिखें यंत्र । आणीक नाहीं ॥ ११ ॥ ऐसीं शरीरें निर्माण केलीं । विषयभोगें वाढविलीं । लाहानथोर निर्माण जालीं । येणें प्रकारें ॥ १२ ॥ अस्तीमांशांचीं शरीरें । निर्माण केली जगदेश्वरें । विवेकें गुणविचारें । करूनियां ॥ १३ ॥ अस्तिमौंशाचा पुतळा । जेणें ज्ञानें सकळ कळा । शरीरभेद वेगळा । ठाईं ठाईं ॥ १४ ॥ तो भेद कार्याकारण । त्याचा उदंड आहे गुण । सकळ तीक्ष्ण बुद्धीविण । काये कळे ॥ १५ ॥ सकळ करणें ईश्वराला । म्हणोनी भेद निर्माण जाला । ऊर्धमुख होतां भेदाला । ठाव कैंचा ॥ १६ ॥ सृष्टिकर्णीं आगत्य भेद । संव्हारें सहजचि अभेद । भेद अभेद हा संवाद । मायागुणें ॥ १७ ॥ मायेमधें अंतरात्मा । नकळे तयाचा महिमा । जाला चतुर्मुख ब्रह्मा । तोहि संदेहीं पडे ॥ १८ ॥ पीळ पेंच कडोविकडीं । तर्क तीक्षण घडीनें घडी । मनासी होये तांतडी । विवरण करितां ॥ १९ ॥ आत्मत्वें लागतें सकळ कांहीं । निरंजनीं हे कांहींच नाहीं । येकांतकाळीं समजोन पाहीं । म्हणिजे बरें ॥ २० ॥ देहे सामर्थ्यानुसार । सकळ करी जगदेश्वर । थोर सामर्थ्यें अवतार । बोलिजेती ॥ २१ ॥ शेष कूर्म वऱ्हाव जाले । येवढे देहे विशाळ धरिले । तेणें करितां रचना चाले । सकळ सृष्टीची ॥ २२ ॥ ईश्वरें केवढें सूत्र केलें । सूर्यबिंब धावाया लाविलें । धुकटाकरवीं धरविलें । अगाध पाणी ॥ २३ ॥ पर्वताऐसे ढग उचलिती । सूर्यबिंबासी अछ्यादिति । तेथें सवेंचि वायोची गती । प्रगट होये ॥ २४ ॥ झिडकझिडकुं धांवे वारा । जैसा काळाचा म्हणियारा । ढग मारुनी दिनकरा । मोकळे करी ॥ २५ ॥ बैसती विजांचे तडाखे । प्राणीमात्र अवचिता धाके । गगन कडकडून तडके । स्थळांवरी ॥ २६ ॥ येहलोकासी येक वर्म केलें । महद्भूतें महद्भूत आळिलें । सकळां समभागें चालिलें । सृष्टिरचनेसी ॥ २७ ॥ ऐसे अनंत भेद आत्मयाचे । सकळ जाणती ऐसे कैंचें । विवरतां विवरतां मनाचे । फडके होती ॥ २८ ॥ ऐसी माझी उपासना । उपासकीं आणावी मना । अगाध महिमा चतुरानना । काये कळे ॥ २९ ॥ आवाहन विसर्जन । हें चि भजनाचें लक्षण । सकळ जाणती सज्जन । मी काय सांगों ॥ ३० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे देहेक्षेत्रनिरूपणनाम समास आठवा ॥
समास नववा : स्य्य्क्ष्मनिरूपण
॥ श्रीराम ॥ मृतिकापूजन करावें । आणी सवेंचि विसर्जावें । हें मानेना स्वभावें । अंतःकर्णासी ॥ १ ॥ देव पूजावा आणी टाकावा । हें प्रशस्त न वटे जीवा । याचा विचार पाहावा । अंतर्यामीं ॥ २ ॥ देव करिजे ऐसा नाहीं । देव टाकिजे ऐसा नाहीं । म्हणोनि याचा कांहीं । विचार पाहावा ॥ ३ ॥ देव नाना शरीरें धरितो । धरुनी मागुती सोडितो । तरी तो देव कैसा आहे तो । विवेकें वोळखावा ॥ ४ ॥ नाना साधनें निरूपणें । देव शोधायाकारणें । सकळ आपुले अंतःकर्णें । समजलें पाहिजे ॥ ५ ॥ ब्रह्मज्ञाचा उपाये । समजल्याविण देतां नये । पदार्थ आहे मा घे जाये । ऐसें म्हणावें ॥ ६ ॥ सगट लोकांचे अंतरींचा भाव । मज प्रतक्ष भेटवावा देव । परंतु विवेकाचा उपाव । वेगळाचि आहे ॥ ७ ॥ विचार पाहातां तगेना । त्यास देव ऐसें म्हणावेना । परंतु जन राहेना । काये करावें ॥ ८ ॥ थोर लोक मरोनि जाती । त्यांच्या सुरता करुनी पाहाती । तैसीच आहे हेहि गती । उपासनेची ॥ ९ ॥ थोर व्यापार ठाकेना जनीं । म्हणोनि केली रखतवानी । राजसंपदा तयाचेनी । प्राप्त कैची ॥ १० ॥ म्हणोनि जितुका भोळा भाव । तितुका अज्ञानाचा स्वभाव । अज्ञानें तरी देवाधिदेव । पाविजेल कैचा ॥ ११ ॥ अज्ञासी ज्ञान न माने । ज्ञात्यास अनुमान न माने । म्हणोनि सिद्धांचिये खुणें । पावलें पाहिजे ॥ १२ ॥ माया सांडून मुळास जावें । तरीच समाधान पावावें । ऐसें न होतां भरंगळावें । भलतीकडे ॥ १३ ॥ माया उलंघायाकारणें । देवासी नाना उपाय करणें । अध्यात्मश्रवणपंथेंचि जाणें । प्रत्ययानें ॥ १४ ॥ ऐसें न करितां लोकिकीं । अवघीच होते चुकामुकी । स्थिति खरी आणि लटकी । ऐसी वोळखावी ॥ १५ ॥ खोट्याचे वाटे जाऊं नये । खोट्याची संगती धरूं नये । खोटें संग्रहीं करूं नये । कांहींयेक ॥ १६ ॥ खोटें तें खोटेंचि खोटें । खर्यासी तगेनात बालटें । मन अधोमुख उफराटें । केलें पाहिजे ॥ १७ ॥ अध्यात्मश्रवण करीत जावें । म्हणिजे सकळ कांहीं फावे । नाना प्रकारीचे गोवे । तुटोनी जाती ॥ १८ ॥ सूत गुंतलें तें उकलावें । तैसे मन उगवावें । मानत मानत घालावें । मुळाकडे ॥ १९ ॥ सकळ कांहीं कालवलें । त्या सकळाचें सकळ जालें । शरीरीं विभागले । सकळ कांहीं ॥ २० ॥ काये तें येथेंचि पाहावें । कैसें तें येथेंचि शोधावें । सूक्ष्माचीं चौदा नांवें । येथेंचि समजावी ॥ २१ ॥ निर्गुण निर्विकारी येक । तें सर्वां ठाईं व्यापक । देह्यामधें तें निष्कळंक । आहे कीं नाहीं ॥ २२ ॥ मूळमाया संकल्परूप । तें अंतःकर्णाचें स्वरूप । जड चेतवी चैतन्यरूप । तें हि शरीरीं आहे ॥ २३ ॥ समानगुण गुणसाम्य । सूक्ष्म विचार तो अगम्य । सूक्ष्म साधु जाणते प्रणम्य । तया समस्तांसी ॥ २४ ॥ द्विधा भासतें शरीर । वामांग दक्षिणांग विचार । तोंचि अर्धनारीनटेश्वर । पिंडीं वोळखावा ॥ २५ ॥ तोचि प्रकृतिपुरुष जाणिजे । शिवशक्ती वोळखिजे । शडगुणईश्वर बोलिजे । तया कर्दमासी ॥ २६ ॥ तयासीच म्हणिजे महत्तत्त्व । जेथें त्रिगुणाचें गूढत्व । अर्धमात्रा शुद्धसत्व । गुणक्षोभिणा ॥ २७ ॥ त्रिगुणें चालतें शरीर । प्रतक्ष दिसतो विचार । मुळींच्या कर्दमाचें शरीर । ऐसें जाणावें ॥ २८ ॥ मन माया आणि जीव । हाहि दिसतो स्वभाव । चौदा नामांचा अभिप्राव । पिंडीं पाहावा ॥ २९ ॥ पिंड पडतां अवघेंचि जातें । परंतु परब्रह्म राहातें । शाश्वत समजोन मग तें । दृढ धरावें ॥ ३० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सूक्ष्मनिरूपणनाम समास नववा ॥
समास दहावा : विमलब्रह्मनिरूपण
॥ श्रीराम ॥ धरूं जातां धरितां न ये । टाकूं जातां टाकितां न ये । जेथें तेथें आहेच आहे । परब्रह्म तें ॥ १ ॥ जिकडे तिकडे जेथें तेथें । विन्मुख होतां सन्मुख होतें । सन्मुखपण चुकेना तें । कांहीं केल्या। ॥ २ ॥ बैसलें माणूस उठोन गेलें । तेथें आकाशचि राहिलें । आकाश चहुंकडे पाहिलें । तरी सन्मुखचि आहे ॥ ३ ॥ जिकडेतिकडे प्राणी पळोन जातें । तिकडे आकाशचि भोवतें । बळें आकाशाबाहेर । कैसें जावें ॥ ४ ॥ जिकडेतिकडे प्राणी पाहे । तिकडे तें सन्मुखचि आहे । समस्तांचें मस्तकीं राहे । माध्यानीं मार्तंड जैसा ॥ ५ ॥ परी तो आहे येकदेसी । दृष्टांत न घडे वस्तुसी । कांहीं येक चमत्कारासी । देउनी पाहिलें ॥ ६ ॥ नाना तीर्थें नाना देसीं । कष्टत जावें पाहाव्यासी । तैसें न लगे परब्रह्मासी । बैसलें ठाईं ॥ ७ ॥ प्राणी बैसोनीच राहातां । अथवा बहुत पळोन जातां । परब्रह्म तें तत्वतां । समागमें ॥ ८ ॥ पक्षी अंतराळीं गेलां । भोवतें आकाशचि तयाला । तैसे ब्रह्म प्राणीयाला । व्यापून आहे ॥ ९ ॥ परब्रह्म पोकळ घनदाट । ब्रह्म सेवटाचा सेवट । ज्यासी त्यासी ब्रह्म नीट । सर्वकाळ ॥ १० ॥ दृश्या सबाहे अंतरीं । ब्रह्म दाटलें ब्रह्मांडोदरीं । आरे त्या विमळाची सरी । कोणास द्यावी ॥ ११ ॥ वैकुंठकैळासस्वर्गलोकीं । इंद्रलोकीं चौदा लोकीं । पन्नगादिकपाताळलोकीं । तेथेंचि आहे ॥ १२ ॥ कासीपासून रामेश्वर । आवघें दाटलें अपार । परता परता पारावार । त्यास नाहीं ॥ १३ ॥ परब्रह्म तें येकलें । येकदांचि सकळांसी व्यापिले । सकळांस स्पर्शोन राहिलें । सकळां ठाईं ॥ १४ ॥ परब्रह्म पाउसें भिजेना । अथवा चिखलानें भरेना । पुरामधें परी वाहेना । पुरासमागमें ॥ १५ ॥ येकसरें सन्मुक विमुख । वाम सव्य दोहिंकडे येक । आर्धऊर्ध प्राणी सकळीक । व्यापून आहे ॥ १६ ॥ आकाशाचा डोहो भरला । कदापी नाहीं उचंबळला । असंभाव्य पसरला । जिकडे तिकडे ॥ १७ ॥ येकजिनसि गगन उदास । जेथें नाहीं दृश्यभास । भासेंविण निराभास । परब्रह्म जाणावें ॥ १८ ॥ संतसाधुमहानुभावां । देवदानवमानवां । ब्रह्म सकळांसी विसांवा । विश्रांतिठाव ॥ १९ ॥ कोणेकडे सेवटा जावें । कोणेकडे काये पाहावें । असंभाव्य तें नेमावें । काये म्हणोनी ॥ २० ॥ स्थूळ नव्हे सूक्ष्म नव्हे । कांहीं येकासारिखें नव्हे । ज्ञानदृष्टीविण नव्हे समधान ॥ २१ ॥ पिंडब्रह्मांडनिरास । मग तें ब्रह्म निराभास । येथून तेथवरी अवकास । भकासरूप ॥ २२ ॥ ब्रह्म व्यापक हें तो खरें । दृश्य आहे तों हें उत्तरें । व्यापेंविण कोण्या प्रकारें । व्यापक म्हणावें ॥ २३ ॥ ब्रह्मासी शब्दचि लागेना । कल्पना कल्पूं शकेना । कल्पनेतीत निरंजना । विवेकें वोळखावें ॥ २४ ॥ शुद्ध सार श्रवण । शुद्ध प्रत्ययाचें मनन । विज्ञानी पावतां उन्मन । सहजचि होतें ॥ २५ ॥ जालें साधनाचें फळ । संसार जाला सफळ । निर्गुण ब्रह्म तें निश्चळ । अंतरीं बिंबलें ॥ २६ ॥ हिसेब जाला मायेचा । जाला निवाडा तत्वांचा । साध्य होतां साधनाचा । ठाव नाहीं ॥ २७ ॥ स्वप्नीं जें जें देखिलें । तें तें जागृतीस उडालें । सहजचि अनुर्वाच्य जालें । बोलतां न ये ॥ २८ ॥ ऐसें हें विवेकें जाणावें । प्रत्ययें खुणेंसी बाणावें । जन्ममृत्याच्या नांवें । सुन्याकार ॥ २९ ॥ भक्तांचेनि साभिमानें । कृपा केली दाशरथीनें । समर्थकृपेचीं वचनें । तो हा दासबोध ॥ ३० ॥ वीस दशक दासबोध । श्रवणद्वारें घेतां शोध । मनकर्त्यास विशद । परमार्थ होतो ॥ ३१ ॥ वीस दशक दोनीसें समास । साधकें पाहावें सावकास । विवरतं विशेषाविशेष । कळों लागे ॥ ३२ ॥ ग्रंथाचें करावेंस्तवन । स्तवनाचें काये प्रयोजन । येथें प्रत्ययास कारण । प्रत्ययो पाहावा ॥ ३३ ॥ देहे तंव पांचा भूतांचा । कर्ता आत्मा तेथींचा । आणी कवित्वप्रकार मनुशाचा । काशावरुनी ॥ ३४ ॥ सकळ करणें जगदीशाचें । आणी कवित्वचि काय मानुशाचें । ऐशा अप्रमाण बोलण्याचें काये घावें ॥ ३५ ॥ सकळ देह्याचा झाडा केला । तत्वसमुदाव उडाला । तेथें कोण्या पदार्थाला । आपुलें म्हणावें ॥ ३६ ॥ ऐसीं हें विचाराचीं कामें । उगेंच भ्रमों नये भ्रमें । जगदेश्वरें अनुक्रमें । सकळ केलें ॥ ३७ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे विमळब्रह्मनिरूपणनाम समास दहावा ॥ ॥ दशक विसावा समाप्त ॥
<poem>
हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. |