युगान्त/गांधारी

(दोन - गांधारी पासून पुनर्निर्देशित)




दोन



गांधारी




१ -

 डोंगराळ प्रदेश संपून उत्तर-भारताचे न संपणारे, कंटाळवाणे, विस्तीर्ण मैदान लागले होते. मार्गातला अडथळा काय तो नद्यांचा, नाहीतर अधून-मधून लागणाऱ्या अरण्यांचा. कधी रथात बसून, मधूनमधून पायी, किंवा शिबिकेतून राजकन्येचा प्रवास चालला होता. तिच्याबरोबर सखी म्हणून तिच्यापेक्षा वयाने थोडी मोठी दासी होती. माहेर सोडताना राजकन्येची समजूत तिनेच घातली. नाना तऱ्हेच्या गोष्टी सांगून मार्गावरील रमणीय स्थळे दाखवून ती गांधारीचे चित्त प्रसन्न ठेवायचा प्रयत्न करीत होती. घरची माणसे नव्हती, पण राजपुत्र शकुनी बरोबर आला होता. तोही बहिणीची


 या लेखात आलेल्या गोष्टींपैकी फक्त खालील गोष्टी महाभारताच्या संशोधित आवृत्तीत आहे.
१. नवरा आंधळा म्हणून गांधारीने डोळे बांधले, २. गांधारीला खूप मुले झाली, व ती सगळी युद्धात मेली, ३. गांधारी, धृतराष्ट्र व कुंती वणव्यात मेली.
 या लेखात दाखवल्याप्रमाणे या तिघांच्या बरोबर न मरता विदुर महाभारतात त्यांच्या आधीच मेलेला आहे.
वास्तपुस्त अधून-मधून घेत होता. गांधाराचे विचार हळूहळू मागे पडून राजकन्येचे मन न पाहिलेले हस्तिनापूर रंगवीत होते. हस्तिनापुराची मंडळी राजकन्येला मागणी घालायला आली, त्या वेळी त्यांनी आणलेल्या आहेराने सर्वांचे डोळे दिपून गेले होते. त्यांचे रथ, त्यांची अंगावरील वस्त्रप्रावरणे सर्वच मौल्यवान होते. वागणे-बोलणेही गोड व नागर होते. आत्तासद्धा बरोबरच्या मंडळीत गांधारापेक्षा हस्तिनापूरचाच परिवार मोठा होता. प्रवास इतका लांबचा व इतका झपाट्याने चालला होता, की शेवटी शेवटी तर श्रमांमुळे राजकन्येचे मनही शरीराबरोबर थकले होते. कधी एकदाचा प्रवास संपेल, असे तिला झाले होते.

 एकदाचा प्रवास संपला! हस्तिनापुरातून गांधाराच्या राजकन्येला भीष्म सामोरा आला होता. राजधानीतून जाताना लोक दुतर्फा उभे राहून सत्कार करीत होते. पण या सभारंभाकडे लक्ष देण्याइतकी शक्ती राजकन्येस राहिली नव्हती. तिला नेमून दिलेल्या मंदिरात ती येऊन दाखल झाली. दोन दिवस ती म्लानपणे पडूनच होती. पण तिची सखी राजकुलात फिरून येई व कुरूंंच्या वैभवाची नित्य-नवी वर्णने ऐकवी. गांधार-राजपुत्र शकुनी हा हस्तिनापुरातच कायम राहण्याचे ठरले आहे, ही बातमी ऐकून गांधारी चकित झाली. पण थोरला भाऊ राज्यावर बसणार असल्यामुळे धाकट्या भावाने दुसऱ्या राज्यात राहून कीर्ती व लक्ष्मी मिळवल्याची त्या काळातली पुष्कळ उदाहरणे तिला माहीत होती. इतक्या लांब आली तरी माहेर सर्वस्वी तुटले नाही; भाऊ तरी बरोबर आहे, असे वाटून तिला जरा बरे वाटले. दासीने येऊन शकुनीच्या नव्या राजवाड्याचे वर्णन केले, तेव्हा तर तिला आपल्या सासरच्या संपत्तीचा अभिमान वाटला. आज ती संध्याकाळी मंदिराच्या एका सौधावर उभी राहून, खाली दिसणारी गजबजलेली राजधानी व त्याच्या पलीकडची यमुनाकाठची विस्तीर्ण अरण्ये बघत होती. गांधारामध्ये एवढा मोठा सपाट प्रदेश तिला दिसलाच नव्हता. तिच्या माहेरच्या राजवाड्याच्या मानाने इथला राजवाडाही खूपच विस्तीर्ण होता. माहेरची आठवण कमी होऊन सासरच्या राणीपदाच्या वैभवात तिचे मन गुंतले होते. इतक्यात तिची सखी आली. 'वैभवाच्या कोणत्या नव्या गोष्टी ही आज ऐकवणार आहे बरे?' म्हणून गांधारी अपेक्षेने तिच्याकडे पाहू लागली. पण आजचा नूर काही वेगळाच होता. आज दासी नेहमीप्रमाणे हसतहसत, चंचल गतीने येत नव्हती. तिचा चेहरा फिक्कट पडला होता. पावले अडखळत होती. सखी आजारी आहे, असे वाटून राजकन्या दोन पावले पुढे सरकली. तोच तिची सखी धडपडत पुढे सरकली. तिने राजकन्येचे हात घट्ट धरले आणि तिच्या तोंडून कसेबसे शब्द निघाले, "घात झाला! बिचाऱ्या पोरी, घात झाला! तुझे ज्यांच्याशी लग्न व्हावयाचे, ते राजकुमार जन्मांध आहेत." एक क्षणभर दासीच्या शब्दांचा अर्थच राजकन्येला कळला नाही. दुसऱ्याच क्षणी ती धाडकन जमिनीवर बेशुद्ध पडली.


२ -

 डोळस बायको आंधळ्याची काठी होईल, अशी काही धृतराष्ट्राची आशा असली, तर ती पार नष्ट झाली. नवरा आंधळा, हे कळल्यावर गांधारीने आपले डोळे फडक्याने गच्च बांधून घेतले. डोळे बांधले, तरी संसार व्हायचा राहिला नाही. गांधारीला खूप मुले झाली. कौरव-पांडवांच्या युद्धात ती सगळी मेली. सगळ्यांत मोठा शेवटपर्यंत राहिलेला दुर्योधन, तोही मेल्याची बातमी दूताने आणली.


३ -

 गांधारी आपल्या मंदिरात बसली होती. तिची सखी मागे उभी राहून तिच्या केसांवरून हळूहळू हात फिरवीत होती. स्वतःचे अश्रू पुसता-पुसता गांधारीचे सांत्वन करावयाचा प्रयत्न करीत होती. "धीर धर, राजकन्ये." गांधारी नुसती आईच नव्हे, तर आजीसुद्धा झाली होती. तरीही सखीच्या तोंडी 'राजकन्ये' हे तिचे माहेरचेच संबोधन येई. 'धीर धर.' हे शब्द उच्चारल्यावर तिचे तिलाच वाटले, 'काय वेड्यासारखी सांगते आहे मी. कशाच्या आधारावर तिने बिचारीने आता धीर धरायचा? बाकीची गेली, तरी एका दुर्योधनामुळे ती पुत्रवती होती, सनाथ होती. सर्व दु:खे गिळून तिला मान ताठ ठेवून चालता येत होते. आता ती काय करणार?' सखी म्हणाली, "शांत हो, गांधारी." एक सुस्कारा टाकून गांधारी म्हणाली, "सखे, हृदयाची कालवाकालव व्हायला आता काही कारणच उरले नाही. तुला वाटत होते की, मुले झाल्यापासून एवढ्या मुलांची आई म्हणून आता एकदाचे माझ्या गांधारीला सुख लाभेल. पण तसे नव्हते ग! मुलांना काही दुखले-खुपले की माझा ऊर धपापायला लागायचा. त्यांचे रडणे ऐकू आले की माझ्या जिवाची तारांबळ उडायची. रथांच्या रंगणात त्यांनी 'जिंकले नाही,' हे ऐकले की मी उदास व्हायची. ते घोषयात्रेत फजिती पावून आले, तेव्हा त्यांना झाले नसेल इतके दु:ख मला झाले. सीमेजवळील गावात दूरवर पांडवांना पाठवले, तेव्हा ती दीनवाणी पोरे मला नमस्कार करायला आली होती. मी वरवर त्यांना आशीर्वाद दिला, पण पोटातून वाटत होते, बरा निर्वेध झाला माझ्या मुलांचा मार्ग. "लढाई जुंपायच्या आधी सभेत जाऊन 'भांडू नका,' म्हणून उपदेश केला, तोसुद्धा तुझ्या प्रेरणेने. मला मनातून वाटत होते की, हस्तिनापूरचे राजपद माझ्या मुलांकडेच राहील म्हणून आणि नंतरचा एकेक दिवस उजाडे, तोच 'आज काय बरं वार्ता कानी पडेल?' अशा धास्तीने मन व्यापून राही. दिवस जाऊ लागले, तसे 'आज किती बरे उरली?' असा प्रश्न मी करी, प्रत्येक मूल हे एकेक दु:ख होते. माझा असा जन्मच राहिला नव्हता. त्यांचे सुखाचे क्षण, ते माझ्या सुखाचे क्षण; त्यांच्या दु:खाचे क्षण, ते माझ्या दु:खाचे क्षण; असे संबंध आयुष्य गेले." बोलता-बोलता गांधारी जोरजोराने बोलू लागली होती. सखीला भीती वाटून तिने परत कळवळून म्हटले, "गडे, शांत हो." गांधारीने लगेच उत्तर दिले, "अग, तेच तर तुला सांगते आहे. आज मी अगदी सर्वस्वी शांत झाले आहे. आता माझे मन कोणाच्या विजयाने फुलायला नको, कोणाच्या पराभवाने सुकायला नको. कोणाचे कसे होणार, म्हणून काळजीने वरखाली व्हायला नको, कसली भीती नको." हे बोलणे चालले असताना धृतराष्ट्र स्वतःचे दुःख गिळून गांधारीच्या सांत्वनासाठी एका प्रतिहारीचा हात धरून मंदिराच्या दाराशी आला होता. दारातूनच त्याने 'गांधारी गांधारी,' अशी हाक मारली. गांधारीचे शेवटचे वाक्य संपते, तोच तिच्या कानावर ती हाक आली. आपले शब्द किती खोटे आहेत, ह्याचा तिला तत्काळ प्रत्यय आला, आपला आंधळा नवरा जिवंत आहे, तोपर्यंत आपले मन सुख-दुःखांच्या पलीकडे कधी जाणेच शक्य नाही, ह्याची तिला जाणीव झाली. तिरिमिरीने ती उठली, "अगबाई, पण हे-" हे शब्द कसेबसे तिच्या तोंडून बाहेर आले. आयुष्यात दुसऱ्यांदा ती कोसळून धाडदिशी खाली पडली...

 राणी बेशुद्ध पडलेली बघून सर्व परिजन घाईघाईने तिकडे धावले. प्रतिहारीसुद्धा राजाचा हात सोडून गांधारीकडे धावली. मंदिराच्या आत दोन पावले आलेला धृतराष्ट्र एकाकी उभा होता; भोवतालचा गोंधळ त्याला ऐकू येत होता. पण काय झाले, ते कळत नव्हते. आपले दृष्टिहीन डोळे सर्वत्र फिरवीत तो केविलवाणे विचारीत होता, "झाले काय? झाले काय?"


४ -

 हिमालयाच्या पायथ्याशी असलेली पर्णकुटी सोडून आज सगळीजण वर पर्वतात जावयास निघाली होती. ह्या खालच्या पर्णकुटीत त्यांच्या सेवेला दासदासी होत्या. शेजारी निरनिराळ्या तपस्व्यांच्या झोपड्या होत्या. धर्मादी राजपुत्र दोनदा येऊन भेटून-राहून गेले होते. एकंदर जीवन संथ व स्वस्थ चालले होते. धृतराष्ट्र आणि गांधारी, विदुर आणि कुंती ह्या चौघांचे दिवसांमागून दिवस चालले होते. विदुर, धृतराष्ट्र आणि इतर तापसी ह्यांचे काही-ना-काही विषयांवर संभाषण चाले. गांधारी व कुंती ऐकत असत. ह्या वरवर शांत जीवनात हस्तिनापूरचे पाहुणे आले, की लाटा उसळत असत. राजपुत्रांच्या नव्हे, राजांच्या परिवाराने सारा आसमंत भरून जाई. मुलांनी पायांवर डोके टेकले म्हणजे प्रत्येकाच्या मनात भिन्नभिन्न भावनांचा पूर लोटे. मुले निरोप घेऊन गेली, की बाहेरचे वातावरण शांत होई; पण आतली खळबळ निवायला वेळ लागायचा. आजही हस्तिनापुराहून मुले, सुना आल्या होत्या. धृतराष्ट्राने काही निश्चय करून धर्माला सांगितले, "युधिष्ठिरा हा काही खरा शेवटचा आश्रम नाही. आता आम्हांला चौघांनाच झोपडी बांधून एकांत जागी राहू दे. राजवाड्यातून बाहेर निघाल्यावर सवय व्हावी, म्हणून येथे रहायला लागल्याला पुष्कळ महिने लोटले. आता वर जाऊन अरण्यात राहिलेले बरे." युद्धिष्ठिराने व इतरांनी चुलत्याचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. पण धृतराष्ट्र काही ऐकेना. धर्माने विदुराकडे पाहिले. पण आज विदुरसुद्धा धृतराष्ट्राचे म्हणणे उचलून धरीत होता. "धर्मा, धृतराष्ट्र म्हणतो आहे, ते योग्यच आहे. तू आता आम्हांला निरोप दिला पाहिजेस. तुला धर्म माहीत असता आम्हांला मोहात का पाडतोस? तू मोहात का पडतोस?" कुंतीचे डोळे भरून आले होते; पण तिनेही सध्याची पर्णकुटी सोडण्याचा आपला निश्चय सांगितला. गांधारीला कुणी निराळे असे विचारलेच नाही. धृतराष्ट्राची इच्छा तीच तिची. असे सर्वच धरून चालली होती.

 सर्वजण दिवसभर चालत होती. सुना-मुलेच नव्हे, तर तापसीदेखील पोहोचवायला आले होते. नदीचे खोरे अरुंद झाले होते. विदुराने एक प्रशस्त, शांत सावलीची जागा पसंत केली. बरोबर आलेल्या दासदासींनी झोपडी उभी केली; आठ-पंधरा दिवस तरी पुरेल. एवढी सामग्री भरून ठेवली. एक दिवस सर्व तिथेच निजली व दुसरे दिवशी जड मनाने परतली. अगदी एकही दासी किंवा दास धृतराष्ट्राने राहू दिला नाही. विदुराने धृतराष्ट्राचे सर्व करायची खात्री दिली. "मी थोरल्या जाऊबाईंचे अतिशय आनंदाने करीन. त्यांची संमती असावी." असे कुंती म्हणाली. काय होत होते, त्याला गांधारीने मनापासून संमती दिली. 'मला दासी नको,' असे तिने निक्षून सांगितले. शेवटी निरोप घेतला. जाता-जाता धर्माने विदुराला बोलावून सांगितले, "येथून खाली पाव योजन अंतरावर चार-पाच विश्वासू दासांना झोपडी बांधून रहावयास देत आहे. दोन-चार दिवसांनी ते येऊन काय हवे-नको त्याची विचारपूस करतील. त्यांना 'नको,' म्हणू नका. त्यांना तुमच्याजवळ एरवी येऊ नका, म्हणून सांगत आहे." चार पावले मुलांबरोबर चालत जाऊन विदुरही परत आला. आता फक्त चौघेच त्या एकांत स्थळी राहिली.

 पर्णकुटीमध्ये सकाळची कृत्ये आटोपल्यावर विदुराने हाती धरून धृतराष्ट्राला व कुंतीने गांधारीला आणून फार ऊन लागणार नाही, अशा थंड ठिकाणी बसवले. स्वतः दोघेजण जरा मागच्या बाजूला टेकून बसली. गांधारी स्वस्थ बसली होती. एक खोल उसासा तिच्या तोंडून बाहेर पडला. तो ऐकून धृतराष्ट्र तिच्याकडे तोंड वळवून किंचित उपहासाने म्हणाला, "आता सुस्कारून काय उपयोग? दोन आंधळ्यांचा व्हायचा, तसा आपला संसार झाला." हे वाक्य आणि त्यामागील स्वर ऐकून गांधारी चमकली. एरवी तिने प्रत्युत्तर दिले नसते. पण राजाच्या शब्दांतला उपहास तिला बोचला. जरा रुक्षपणे ती उत्तरली. "मी स्वतःच्या दुःखांनी सुस्कारा नाही टाकला महाराज. इथे आल्यापासून अंगाला भासणारे गार डोंगरी वारे, पायांखाली देवदारांच्या काड्यांसारख्या लांब पानांचा दाट गालिचा, भोवती देवदारांचा मंद वास, प्रत्येक झुळुकीबरोबर सगळे रान जसे सुस्कारे टाकते आहे असा देवदारांच्या पानांचा आवाज, रात्रंदिवस चाललेला नदीचा खळखळाट ही सर्व अनुभवून मला एकाएकी गांधाराची आठवण झाली आणि अगदी नकळत सुस्कारा बाहेर आला. दुसरे काऽऽही नाही." गांधारीच्या शब्दांनी तिला डिवचण्याचा हेतू नाहीसा होऊन धृतराष्ट्र कळवळून म्हणाला, "खरंच गांधारी, आंधळ्याशी जखडून तुझी दुर्दशा झाली नाही? माहेरच्या आठवणींनी तू पोळत असशील, नाही का?" गांधारी म्हणाली, "मुळीच नाही, माहेरच्यांची आठवण ज्या दिवशी आपल्याशी लग्न झाले त्याच दिवशी बुजवलेली आहे. आज आठवण झाली, ती गांधाराच्या प्रदेशाची, माणसांची नव्हे. आपल्याला माहीतच आहे, महाराज, की राजवाड्याच्या एका प्रांगणांत राहूनही मी माझ्या भावाशी कधी बोलले नाही." थोडा वेळ स्तब्धतेत गेला. विदुराच्या व कुंतीच्याही तोंडावर आश्चर्य उमटलेले होते. नवरा-बायकोचे हे भाषण कोणत्या थराला जाणार, अशीच चिंता कुंतीला लागल्यासारखी दिसत होती. आता धृतराष्ट्राची बोलायची पाळी होती. त्याच्या आवाजातला पहिला उपहास गेला होता. थोड्याशा अजिजीच्या स्वराने तो म्हणाला, "तुला फसवून माझ्या आंधळेपणाची वार्ता न देता इकडे आणून तुझी माझ्याशी गाठ घातली. तुझ्या माहेरच्यांनी व आम्ही तुझे कोटि-कोटी अपराध केले. पण गांधारी, तूही त्याचा कोटि-कोटी बदला घेतलास. अजूनसुद्धा झाल्या-गेल्याची क्षमा करणे शक्य नाही का?"

 अशा तऱ्हेचे संभाषण तिसऱ्याने न ऐकणे बरे, अस वा विदुर व कुंती मुकाट्याने उठून जाऊ लागली. पण डोळस माणसांच्या डोळ्याला जे दिसणार नाही, ते आंधळ्या धृतराष्ट्राच्या कानाला ऐकू येत होते. विदुर व कुंती यांच्या बाजूला डोके वळवून धृतराष्ट्र म्हणाला, "थांबा, कोठेही जाऊ नका. इथेच बसा. आम्हा नवरा-बायकोच्या संबंधात, एकांतात अशी एकही गोष्टी झाली नाही, यापुढेही होण्याचे कारण नाही. मी वडीलकीच्या नात्याने सांगतो, बसून रहा, जाऊ नका." आपली आज्ञा ऐकून ती दोघेजण बसली ना, एवढे ऐकण्यापुरते तो थांबला, व मग गांधारीकडे वळून रुद्ध पण उत्तेजित स्वराने म्हणाला, "खरोखर, फार मोठी शिक्षा दिलीस गांधारी. डोळ्यांना फडके बांधून लग्नाला उभी राहिलीस, त्या वेळी नाही मला इतके वाटले. मला वाटले, मी तुझी विनवणी करीन, माझ्या प्रेमाने तुझा राग विझवीन; पण तसे झाले नाही. रात्रीची शय्यागारात आलीस तीही डोळे बांधून, धडपडत, कोणाचा तरी हात धरून आलीस. मी जन्मांध. मला आंधळेपणाने वागायची सवय होती. पण तू जाणून-बुजून डोळे बांधले होतेस. तुझ्या शरीराला आंधळेपणाने वावरायची सवय नव्हती. कसली ती भयानक रात्र! त्याच वेळी मी तुला मारून कसे टाकले नाही, कोण जाणे!" गांधारीही कडवटपणे उत्तरली, "फार बरे झाले असते तसे होते तर. आयुष्यातील पुढचा ग्रंथ तरी टळला असता." "असे बोलू नकोस गांधारी," धृतराष्ट्र आवेगाने म्हणाला. "आम्ही कुरुकुलातले पुरुष कितीही नादान झालो, तरी क्षत्रियत्व विसरलो नाही. बायकांना मारण्याचे आमचे पौरुष नाही." असे म्हणून पहिलेच वाक्य जणू अडथळा न आल्यासारखे त्याने चालू केले, "मी माझ्या राजधानीत राजा होतो. तुझ्या डोळ्यांवरचे फडके फाडून काढता आले असते. मला वाटले, अधिकाराच्या बळावर करण्यापेक्षा सावकाशीने करीन. पण तुझ्या मनातली पहिल्या दिवशीची अढी कायमच राहिली. तुला मूल झाले, त्या वेळी मनात आले होते की, 'गांधारी, माझ्यासाठी नाही, पण तुझ्या मुलाचे तोंड पाहण्यासाठी तरी डोळे उघड ग.' पण माझेही मन त्या वेळेपर्यंत कठीण झाले होते. मुलासाठी तू कदाचित डोळे उघडलेही असतेस; पण ते तुला करू देण्याची माझी तयारी नव्हती. तुला पुत्रमुख पहायला मिळत नाही, ह्याबद्दल मला एकप्रकारे सूडाचा आनंदच झाला. डोळे बांधून घेऊन सतीच्या थाटात तू वावरत होतीस. एकदा केलेल्या कृत्याच्या परिणामात तू जखडली गेली होतीस. तुला स्वतःला डोळे उघडणे शक्य नव्हते. फक्त माझ्या आज्ञेनेच ते तुला करता आले असते. आणि मी ती आज्ञा केली नाही.

 "मुलांच्या प्रेमामुळे... आंधळ्या प्रेमामुळे काय ते आपण जवळ आलेलो होतो. एरवी कुठल्याही क्षणी तुला माझ्याबद्दल आपलेपणा वाटला नव्हता. आम्ही कुरुकुलातील पुरुषांनी बायकांच्यावर फार अन्याय केले. त्यांचे प्रायश्चित्तही आम्हांला पुरेपूर मिळाले. अंबेच्या रागात भीष्म जळाला; तुझ्या रागात मी जळत आहे. माझी मुले पण जळून गेली. कुंतीचे लग्नसुद्धा अशाच एका व्यंग असलेल्या माणसाशी झाले. पण तिने मात्र पत्नीची फार आवडत्या नसलेल्या पत्नीची- भूमिका तर पार पाडलीच; शिवाय पतीच्या मागे अविरत जागृत राहून मुलांचे हित पाहिले. प्रत्येक माणूस कोणत्या-ना-कोणत्या तरी अन्यायाच्या परंपरेत गुरफटलेला आहे. मी तुझ्यावर अन्याय केला; पांडूने कुंतीवर अन्याय केला. स्वतः मी आणि पांडू ह्यांना आयुष्यात जी विफलता भोगावी लागली, तो अन्याय कोणाचा? आमच्या आयांचा तळतळाट भोवला आम्हांला, असे म्हणायचे काय? बिचारा विदुर अंगाने आणि बुद्धीने धड होता. ज्या बापाची आम्ही मुले, त्या बापाचाच होता. पण केवळ दासीचा, म्हणून त्याला राज्यावर बसविले नाही. त्यानेही आपल्या आयुष्यातील निराशेचा सूड कोणावर उगवला नाही. आमच्या कुळात अहर्निश जागरूक राहिली, ती विदुर आणि कुंती. तू समजतेस, गांधारी, की तुझीच तेवढी वंचना झाली. पण विचार कर, आमच्या तीन पिढ्यांतली माणसे- प्रत्येकजण असा वंचित आहे. मी तुला सांगतो आहे, ते फक्त मला क्षमा हवी म्हणून नव्हे, तर आयुष्याशी तुझा झगडा चालला आहे तो मिटावा म्हणून. माझ्यावरचाच नव्हे, तर सर्व आयुष्यावरचाच राग सोड. मी तुझ्यावर अन्याय केला म्हणून आपल्या मुलांबाळांवर, आपल्या संसारावर, अन्याय करायचा तुला काही अधिकार प्राप्त होत नाही. एका अन्यायाची भरपाई दुसरा अन्याय करून कशी होणार गांधारी? डोळ्यांवरचे फडके अजून तरी सोड. भोवतालची सृष्टी, माणसे आणि आयुष्यात आतापर्यंत घडलेल्या सर्व गोष्टी ह्यांच्याकडे एकदा निरपेक्ष दृष्टीने पहायला शीक. आपल्या आयुष्याचा शेवट जवळ आला आहे. मरताना तरी डोळे बांधून मरू नकोस."

 धृतराष्ट्राला पुढे बोलवेना. इतरही बुडून गेली होती. बराच वेळ गेल्यावर गांधारी हळूच म्हणाली, "महाराज, मी डोळे सोडले आहेत, पण अजून मला नीट दिसत नाही. आयुष्यात पहिल्यांदा मोठ्या आवेगाने धृतराष्ट्राने गांधारीचे हात धरले आणि तो लहान मुलासारखा रडला. कुरूंच्या कुटुंबातील सुख-दुःखाचे भोक्ते गांधारी व धृतराष्ट्र होते. कुंती आणि विदुर हे साक्षी होते. पण आज साक्षींच्याही डोळ्यांना पाणी आले. पहिला उमाळा ओसरल्यावर धृतराष्ट्र कोमल आवाजात म्हणाला, "गांधारी, एकदोन दिवसांत कुंतीच्या मदतीने तू पहायला शिकशील. ज्या दिवशी तुला नीट दिसायला लागेल, त्या दिवशी हात धरून मला इथे आणून बसव." कोणालाच पुढे बोलवेना. पर्णकुटीत परत गेल्यावरही जो-तो आपल्या विचारांत मग्न होता.

 दोन दिवस झाले होते. गांधारीला डोळ्यांनी पाहून कृत्ये करायची सवय झाली होती. नेहमीच्या बसायच्या जागी राजाचा हात धरून त्याला घेऊन ती आली होती. परत सगळीजणे जवळजवळ बसली होती, जणू मधले दिवस गेलेच नाहीत, अशा तऱ्हेने मागील संभाषण चालू झाले. धृतराष्ट्राने खाली बसतानाही गांधारीचा हात आपल्या हातातच ठेवला होता. तो पुढे बोलू लागला, "गांधारी, तू माझ्यापेक्षा लहान आहेस. मी गेल्यावरही तुला आता स्वतंत्रपणे राहता येईल." डोळस बनलेल्या गांधारीने हे शब्द ऐकताच धृतराष्ट्राच्या तोंडावर हात ठेवला, "नाही महाराज, ते कदापि होणार नाही. मी जो हात धरला आहे तो सोडण्यासाठी नव्हे. मी जे डोळे उघडले आहेत, ते केवळ माझ्यासाठी नाहीत, आपल्या दोघांसाठी आहेत." धृतराष्ट्राला परत बोलवले नाही. बराच वेळ गेल्यावर मन शांत करून तो परत म्हणाला, "गांधारी, तुम्हां डोळसांना जे दिसत नाही, त्याचा मला वास येतो; ते मला ऐकू येते. पहा बरे, रानात वणवा कुठे लागला आहे तो. मला आज सकाळपासून धुराचा वास येतो आहे; भ्यालेल्या पक्ष्यांचे ओरडण ऐकू येत आहे. मला वाटतेय, आपण नदीच्या ज्या बाजूला आहोत, तिकडेच मागे कोठेतरी रान पेटले आहे. त्याची उष्णता भासण्याइतके ते जळत आले नाही. पहा बरे." विदुर, कुंती, गांधारी तिघेही उठून बघू लागली. खरोखरच लांबवर त्यांना धूर दिसू लागला. ज्वाळेची लालसर, पिवळसर हलणारी जीभही त्यांना दिसली. तिघेही खाली बसले. गांधारी हलक्या पण स्पष्ट आवाजात म्हणाली, "महाराज, आपले बरोबर आहे. वणवा पाव योजनसुद्धा दूर नाही." त्यावर धृतराष्ट्र म्हणाला, "गांधारी, शेवटपर्यंत माझा हात धरणे तुला वाटते त्यापेक्षा कठीण आहे. मरणाची वाट पाहत आश्रमात रहायचे, दर पाच-सहा महिन्यांनी मुले आली, की जुन्या दुःखांना उजाळा द्यायचा, परत मन कसेबसे शांत करायचे, ह्या गोष्टी करायला मी कंटाळलो आहे. मी येथेच थांबणार आहे; तुम्हांला नदीपार होऊन वणव्याबाहेर निघता येईल." गांधारीने धृतराष्ट्राचा हात घट्ट धरला. "महाराज, मी आता आपला हात सोडणार नाही. येथे थांबून वणव्याची वाट पाहण्यापेक्षा आपणच त्याच्याकडे जाऊ या ना."

 "बरोबर बोललीस, गांधारी." धृतराष्ट्र उभा राहिला. तो व गांधारी चालू लागली. त्यांच्या मागोमाग कुंती व विदुर चालू लागलेले ऐकून धृतराष्ट्र थबकला. त्याने मागे वळून पाहिले. "तुम्ही पण..." एवढेच तो म्हणाला, व परत वळून चालू लागला.

 एक मोठी विचित्र गोष्ट घडत होती. एक पतिव्रता आपल्या जिवंत पतीचा हात धरून सहगमन करण्यास निघाली होती. एक दीर आपल्या थोरल्या भावाच्या विधवेला चितेवरून उठवण्याऐवजी बरोबर घेऊन चितेकडे चालला होता.

 जुलै, १९६२