युगान्त/कृष्ण वासुदेव

(नऊ - कृष्ण वासुदेव पासून पुनर्निर्देशित)




नऊ



कृष्ण वासुदेव




 कृष्ण महाभारतात येतो, तो आदिपर्व संपता-संपता, द्रौपदी स्वयंवराच्या वेळी. त्याच्या आधी कृष्णाचा पांडवांशी किंवा कौरवांशी कसलाच संबंध दाखवलेला नाही. वसुदेवाची बहीण कुंती (म्हणजे कृष्णाची आत्या) पांडूने करून घेतली, एवढा एक उल्लेख येतो. त्यापलीकडे यादवांशी काही संबंध दाखवलेला नाही. पांडू मरेपर्यंत पांडव हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या रानात राहत असत. पांडू मेल्यावर व माद्री सती गेल्यावर विधवा कुंती पोरक्या मुलांना घेऊन हस्तिनापूरला आली व हस्तिनापूरला राहिली. भीष्माच्या देखरेखीखाली त्यांचे शिक्षण झाले. कुंतीच्या व विदुराच्या दक्षतेमुळे कौरव दरबारी त्यांचे संरक्षण झाले. पुढे त्यांना गंगेकाठच्या एका गावाला पाठवून मारायचा घाट कौरवांनी घातला. जळत्या घरातून मोठ्या युक्तीने बाहेर पडून कुंती व पाच पांडव एक वर्ष, द्रुपदाच्या राजधानीत येईपर्यंत, लपत-छपत राहिले. पांडवांनी द्रौपदीला मिळवली, तीसुद्धा आपण कोण, हा सुगावा लागू न देता. म्हणजे पांडवांच्या लहानपणी त्यांच्यावर नाना आपत्ती कोसळत असताना व अतिशय सावधगिरी बाळगावी लागत असताही कुंतीने माहेरच्या माणसांची मदत घेतली नाही असे दिसते. ही वागणूक कुंतीने कदाचित जाणून-बुजून ठेवली असेल. गांधारीचा भाऊ तिच्या लग्नाच्या दिवसापासूनच कौरवांच्या दरबारात ठाण मांडून प्रतिष्ठित झाला होता. कुंती आणि माद्री ह्यांच्याबरोबर कुणी माहेरची माणसे आली नव्हती. जरी काही आली असली, तरी लौकिकाप्रमाणे लग्नसोहळा आटोपल्यावर परत गेली असणार. नवऱ्याच्या मागे माहेरच्या कोणाला हक्काने बोलावणे शक्य नव्हते. ती स्वतःच इतकी दीन होती की, तिच्या माहेरच्या माणसांना कौरवांच्या दरबारी स्थान मिळणे शक्यच नव्हते. फार तर तिला व तिच्या मुलांना तिच्या माहेरी आसरा मिळाला असता; पण त्यामुळे हस्तिनापुराच्या राज्यावरील तिच्या मुलांचा हक्क कदाचित कायमचा नाहीसा झाला असता. वडिलोपार्जित संपत्तीवरील मुलांचा हक्क नाहीसा होऊ नये, म्हणून ज्या शहाणपणाने व खालच्या मानेने विधवा भावजय थोरल्या दिराच्या कुटुंबात राहते,अगदी त्याचप्रमाणे कुंती राहिलेली होती. आणि ह्यामुळेच कदाचित यादवांचे नाव द्रौपदी स्वयंवरापर्यंत महाभारतात ऐकू येत नाही. पांडव लहान असल्यापासून द्रौपदी-स्वयंवरापर्यंतचा काळ यादवांना फार धकाधकीचा गेला असणार. कंसवध, जरासंधाशी युद्ध व त्याला भिऊन यमुनाकाठचा प्रदेश सोडून दक्षिणेकडे जाणे, द्वारका स्थापणे व तेथे स्थिरस्थावर होणे ह्या सर्व घटना याच काळातल्या असणार.

 स्वयंवर मंडपात यादवांची मंडळी आली होती, पण ती द्रौपदी मिळवायला नव्हे. एकंदर समारंभ बघून स्वयंवरात काय होते, हे बघण्यापुरतेच ते आलेले दिसतात. अर्जुनाने पण जिंकल्याबरोबर कृष्णाची नजर ब्राह्मणवेषाने बसलेल्या पाच पांडवांकडे गेली, व त्याने शेजारी बसलेल्या बलरामाला नाव घेऊन कुठचा कोण, हे सांगितले. सांगता-सांगता तो असेही म्हणतो, “माझ्या गुप्त हेराने अशी वार्ता आणली होती की, पांडव वारणावताला जळत्या घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेले नाहीत, ते निसटून गेले असावेत, असा कयास आहे; तेच हे दिसताहेत." त्याने व बलरामाने लवाजमा न घेता लपत-छपत धर्माच्या पाठीमागे जाऊन पांडवांच्या राहण्याचे ठिकाण हुडकून काढले. ते उभयता कुंतीला व पांडवांना भेटुन, त्यांचे ठिकाण कोणाला सापडू नये, ह्या बुद्धीने फार थोडा वेळ थांबून गुपचूप परत आले.
 ह्या भेटीनंतर मात्र महाप्रस्थानपर्व वगळून श्रीकृष्ण नाही, असे एकही पर्व महाभारतात नाही. श्रीकृष्ण नव्हता अशा वेळात धर्मराजाने द्यूत खेळून राज्य गमावले. बारा वर्षांच्या वनवासात पांडवाचा आणि कृष्णाचा संबंध फारसा आला नाही; पण कृष्ण त्यांच्या पाठीमागे उभा होता. विराटपर्वामध्ये गोग्रहणाच्या वेळी पांडवांनी कौरवांना पळवून लावले. ह्या अपवादाखेरीज ज्यात श्रीकृष्णाची मदत नाही, अशी मोठी कृत्ये पांडवांचे हातून झाली नाहीत. द्रौपदी-स्वयंवरात यादव मोठा आहेर घेऊन आपल्या लवाजम्यानिशी द्रुपदाच्या राजधानीला आले. द्रुपदाच्या व यादवांच्या बलशाली युतीमुळे पांडवांना राज्यार्ध देणे धृतराष्ट्राला भाग पडले. कृष्णाने उघडपणे हा पुरस्कार केला नसता, तर एकट्या द्रुपदाच्या बळावर सहजासहजी पांडवांना राज्य मिळते ना!
महाभारतात लिहिले आहे की, धृतराष्ट्राने युधिष्ठिराला खांडववन व त्यातले खांडवप्रस्थ गाव दिले आणि कृष्णाला पुढे करून पांडव खांडवांच्या अरण्यात शिरले. तेथे त्यांनी कृष्णाच्याच मदतीने खांडवप्रस्थ या लहान गावाचे मोठ्या राजधानीत रूपांतर केले.एवढेच नव्हे, तर खांडववन जाळून कृष्णाने व अर्जुनाने मोठा प्रदेश प्रजेसाठी मिळवून दिला. हे सर्व झाल्यावर मयाकडून मोठा राजवाडा बांधण्याची तजवीज करून कृष्ण द्वारकेला निघून गेला.
 कृष्ण गेल्यावर निरनिराळे लोक धर्मराजाला भेटायला आले. त्यांचे बोलणे ऐकून आपण राजसूय यज्ञ करवा, असे धर्माच्या मनात आले.त्या वेळी कृष्णाला बोलावणे पाठवून धर्माने आपला बेत कृष्णाला सांगितला आणि कृष्णाने त्यावेळी राज्य करीत असलेल्या निरनिराळ्या राजांची माहिती देऊन कोण अनुकूल, कोणी प्रतिकूल, कोण जिंकायला सोपे वगैरे सांगून मगधाधिपती जरासंधाचा वध केल्याशिवाय राजसूय यज्ञ करणे शक्य नाही, हे धर्माला पटवून दिले. जरासंधाबद्दल बोलत असताना कृष्णाच्या पूर्वायुष्याचा ओझरता उल्लेख व यादवांचे मथुरेहून द्वारकेला जाणे ह्या दोन गोष्टी कृष्णाने स्वतःच्या शब्दांनी सांगितलेल्या आहेत.
 महाभारतामध्ये ज्या कृष्णाचे दर्शन घडते, तो कृष्ण हरिवंशामधील कृष्णापेक्षा किंवा भागवतामधील कृष्णापेक्षा अगदी निराळा आहे. महाभारतामध्ये कृष्ण येतो तो मोठेपणी, द्वारकेत राहणारा असा येतो. त्याच्याबद्दलच्या काही गोष्टी त्याच्या स्वत:च्या तोंडून कळतात. त्याने व बलरामाने कंसाला व सुनाम्याला मारले. कंसाच्या राण्या ह्या जरासंधाच्या मुली होत्या. त्यांनी आपल्या बापामागे कंसवधाचा सूड घेण्याचे टुमणे लावले व जरासंध यादवांवर चाल करून गेला. जरासंधापुढे यादवांचा टिकाव लागेना म्हणून यमुनाकाठचा प्रदेश सोडून यादव पश्चिमेकडे पळाले आणि रैवतक पर्वताच्या भोवती ‘कुशस्थली' नावाच्या ठिकाणी राहिले व तेथे द्वारका नावाची कोणाही शत्रूला घेता येणे शक्य नाही, अशी एक नगरी त्यांनी बांधली. ही नवी नगरी व तिच्या भोवतालचा प्रदेश येथे वृष्णी, अंधक, भोज वगैरे यादवांची निरनिराळी कुळे बलरामाच्या अधिपत्याखाली राहिली. कृष्णाचा बाप वसुदेव ह्याला बऱ्याच बायका होत्या. बलराम हा रोहिणीचा मुलगा. सुभद्रा व सारण ही सख्खी भावंडे वसुदेवाच्या आणखी एका राणीची मुले. म्हणजे बलराम, श्रीकृष्ण व सुभद्रा ही एकमेकांची सावत्र भावंडे होती. कृष्णाने आपल्या शौर्याने व शहाणपणाने यादवांचे स्वातंत्र्य कायम राखले होते. ह्या यादवांच्या निरनिराळ्या शाखांचे वर्णनही महाभारतात काही ठिकाणी येते. सभापर्वात मोठमोठ्या यादव-वीरांची नावेदेखील सांगितलेली आहेत. पण महाभारतात ठिकठिकाणी विखुरलेली माहिती गोळा करूनही यादव वंशाचा संगतवार इतिहास सांगता येत नाही.
 महाभारतामधील वर्णनावरून यादव हे बलशाली, श्रीमंत, बरेच दांडगे, स्वभावाने तापट, चटकन शस्त्राला हात घालणारे, आपल्याच ऐटीत असणारे, रथविद्येत निपुण असे लोक होते, असे दिसते. त्यांच्या श्रीमंतीचे वर्णन बऱ्याच ठिकाणी येते. यादवांतल्या यादवांत पक्षोपपक्ष होते. एका पक्षाचे मत कृष्णाने राजा व्हावे, असे होतेसे दिसते. पण कृष्णाच्या विरुद्ध बाजूलाही पुष्कळ लोक हाते; आणि कुळातल्या कुळात भांडणे नकोत, म्हणून कृष्णाने वसुदेवाचा सगळ्यांत थोरला मुलगा व आपला सावत्र भाऊ बलराम ह्याला राजा केले. बलराम आणि कृष्ण यांच्यामध्ये प्रत्यक्ष स्पर्धा जरी नव्हती, तरी पुष्कळच मतभेद होते. कृष्णामुळे आपण राजे आहोत, ही गोष्ट बलराम बहुतेक करून जाणून असावा. पण काही बाबतीत इच्छा नसूनही त्याला कृष्णाच्या पुढे नमावे लागे. अर्जुनाने कृष्णाच्या मदतीने व सल्ल्याने सुभद्रेला पळवली. क्षत्रिय रूढीप्रमाणे सुभद्रचे स्वयंवर झाले असते, पण कृष्णानेच अर्जुनाला सांगितले की, "बाबा, या पोरी स्वयंवरात कोणाला माळ घालतील, याचा नेम नाही. तुला ती हवी आहे ना, मग मी तुला माझा रथ देतो, त्यात तिला घाल व पळवून घेऊन जा." ह्याप्रमाणे अर्जुन गेला, तेव्हा बलरामसुद्धा सर्व यादव-वीर अर्जुनाचा पाठलाग करून त्याला मारावयाला निघाले होते. पण कृष्णाने चार गोष्टी जागून त्यांना परावृत्त केले व पांडवांचा व आपला संबंध जमणे ही कशी फायद्याची गोष्ट आहे. हे त्यांना पटवून दिले. कृष्णाचा पांडवांकडे अतिशय ओढा होता. बलरामाला पांडवांबद्दल सदिच्छा होती, पण ओढ नव्हती. कौरव व पांडव या दोघांबाबत तो कोठच्याच एका बाजूचा नव्हता. युद्ध सुरू झाले, तेव्हा या भानगडीत पडायलाच नको, म्हणून तो अलिप्त राहिला होता. युद्धाच्या वेळी दुर्योधनाला भीमाने मांडीवर म्हणजे कमरेखाली गदा मारली, म्हणून तो भीमाला मारायला उठला होता. पण कृष्णाने त्याला आवरले. यादवांमधले पक्षोपक्ष भारतीय लढाईच्या वेळी उघड होतात. कृष्ण जरी प्रत्यक्ष लढला नाही, तरी कृष्णाच्या बाजूचे यादव पांडवांच्या बाजूने लढत होते व दुसरे कित्येक यादव दुर्योधनाच्या बाजूने लढत होते. वर सांगितल्याप्रमाणे बलराम आपल्यापुरता अलिप्त राहिला.
 कृष्णाच्या बायकांमध्ये सत्राजिताची मुलगी सत्यभामा ही महाभारतात प्रामुख्याने येते. कृष्ण ज्यावेळी सपत्नीक पांडवांना भेटावयास आला, त्यावेळी त्याने सत्यभामेला बरोबर आणले होते. वनपर्वामध्ये सत्यभामा त्याच्याबरोबर होती. उद्योगपर्वामध्ये युद्धाच्या छावण्या पडल्या होत्या, तेव्हाही अर्जुनाच्या शिबिरात कृष्णाबरोबर सत्यभामा होती.
 रुक्मिणीचे फक्त नाव मात्र एक-दोनदा येते. रुक्मिणी ही कृष्णाची विशेष आवडती राणी होती, असे पुढील वाङ्मयात येणारे उल्लेख महाभारतात कुठेही नाहीत. किंबहुना, अमकीचा नवरा म्हणून पुरुषाचे वर्णन करण्याची प्रथाच महाभारतात नाही. इंद्रप्रस्थाचे राज्य कृष्णाचा पणतू वज्र या रुक्मिणीच्या नातवाच्या मुलाला दिले. पण अर्जुनाने राज्य दिले, ते कृष्णाच्या आवडत्या राणीचा तो पणतू म्हणून नव्हे, तर कृष्णाचा उरला-सुरला वंश म्हणून. वज्राचा आजा प्रद्युम्न व सात्यकी हे अर्जुनाचे मित्र व अर्जुनाच्या शौर्याचे पूजक, म्हणजे जवळजवळ भक्तच होते, असा उल्लेख महाभारतात ठिकठिकाणी आलेला आहे. तेव्हा अर्जुनाने ह्या दोघांच्या वंशजांस राज्ये दिली असेही म्हणता येईल. ह्या घटना रुक्मिणी ही कृष्णाची लाडकी होती व त्यामुळे तिच्या वंशाला मिळाले, असा प्रकार काडीमात्र नाही.
 महाभारतात जो कृष्ण दाखवला आहे, त्यात गोपीवल्लभत्वाचा मागमूसही नाही. त्या वेळच्या सर्वच क्षत्रिय राजांच्या संपत्तीमध्ये गोधनाचा समावेश होई. राजाची स्वत:ची अशी खिल्लारे असत. राजाने नेमलेले गवळी असत. राज्याच्या सीमेलगत शेतीखाली जमीन संपून अरण्याला जेथे सुरवात होई. त्या प्रदेशामध्ये ही खिल्लारे ठेवलेली असत. हस्तिनापूरच्या राजाची तशी खिल्लारे होती, हे घोषयात्रेवरून दिसून येते. विराटाच्या राजाची तशाच तऱ्हेची खिल्लारे होती, हे विराटपर्वात दिसून येते. वर्षा-दोन वर्षांनी राजाने स्वतः जाऊन आपली खिल्लारे मोजून पहावीत; नवीन जन्मलेल्या जनावरांवर आपल्या स्वामित्वाची मुद्रा ठोकावी, असा प्रघात होता. यादव हे त्यावेळचे अतिशय श्रीमंत क्षत्रिय घराणे होते. तेव्हा त्यांचेही गुरांचे कळप मोठे असणारच. द्रौपदी स्वयंवराच्या वेळी किंवा सुभद्रेच्या लग्नाच्या वेळी त्यांनी पांडवांना रथ, दासदासी, घोडे ह्यांबरोबर खूप गोधनही दिले. सुभद्रेला इंद्रप्रस्थाला घेऊन येताना द्रौपदीच्या रागावर उपाय म्हणून अर्जुनाने एक युक्ती योजली. सुभद्रेला सुंदर ‘गोपालिका'-वेष देऊन ‘मी तुमची दासी आहे,' असे म्हणत द्रौपदीकडे पाठविले. ह्या एका ठिकाणी गोपाल कन्यकेचा उल्लेख आलेला आहे. पण त्यातही असे दिसते की, पांडवांच्या पट्टराणीला भेटायला जाताना तोऱ्याने न वागता नम्रता दाखवण्यासाठी एका खालच्या वर्गातील स्त्रीचा म्हणजे गौळवाड्यातील गौळणीचा वेष सुभद्रेला दिला.
 त्या वेळच्या रिवाजाप्रमाणे कृष्णाने बऱ्याच बायकांना जिंकले होते. अर्जुनाशी गप्पा मारताना यमुनेच्या काठी दोघे मित्र जे बोलले, ते एकमेकांनी केलेल्या पराक्रमाबद्दल; आणि तो पराक्रम लढाईतला व प्रेमातला (विक्रान्तानि रतानि च।) असा होता. पण ज्याप्रमाणे अर्जुन पुष्कळ स्त्रिया जिंकूनही स्त्रीलंपट नव्हता,त्याचप्रमाणे कृष्णही स्त्रीलंपट नव्हता. किंबहुना, निरनिराळ्या स्त्रियांना जिंकणे हा प्रेमापेक्षा राजकारणाचाच एक भाग होता.
 कृष्णार्जुनांच्या मैत्रीचा आरंभ द्रौपदी स्वयंवराच्या वेळी झालेला असावा. इथे परत एकदा निरनिराळ्या लोकांची वये काय असावीत, असा प्रश्न उपिस्थत होतो. द्रौपदी स्वयंवराच्या वेळी अर्जुनाचे वय कमीत कमी वीस वर्षांचे असावे, असे आपण म्हटले आहे. ते सहज पंचवीसापर्यंत नेणे शक्य आहे. अर्जुनाचे वय जास्त न धरण्याचे मुख्य कारण भारतीय युद्धात भीष्माचे वय नव्वदच्या वर जाऊ नये, हे ! एरवी दुसरी काही हरकत नव्हती. महाभारतामध्ये दोन माणसे भेटली,म्हणजे एकमेकांशी कसे वागावे, याचे अगदी काटेकोर नियम आहेत. लहानाने वडिलांना नमस्कार करायचा. बरोबरीच्यांना उराउरी भेटायचे, व लहानांना आशीर्वाद द्यायचा, अशी पद्धत होती. काही गोष्टी बरोबरीची माणसे एकमेकांत करू शकत असत. वडील माणसांच्या बरोबर किंवा लहान माणसांबरोबर तशा गोष्टी करण्याची शक्यता नव्हती. कृष्ण पांडवांना भेटायला येई, तेव्हा दर वेळेला कुंतीला, धर्माला व भीमाला नमस्कार करीत असे, आणि नकुल व सहदेव त्याच्या पाया पडत असत. अर्जुनाला मात्र तो आलिंगन देत असे. तेव्हा तो अर्जुनाच्या बरोबरीचा होता. खांडववनात ते वनविहाराला गेले, तेव्हा कोणा वडील माणसांना न घेता हे दोघे आपल्या बायका व दासदासी घेऊन गेले होते. बायकांचे दारू पिणे, नाचणे, गाणे वगैरे गोष्टी वडील माणसांच्या देखत कदापि झाल्या नसत्या. उद्योगपर्वात लढाईच्या आधी अर्जुनाच्या शिबिरामध्ये कृष्ण आणि अर्जुन दोघेही दारू पिऊन अर्जुनाचे पाय सत्यभामेच्या मांडीवर व कृष्णाचे द्रौपदीच्या, अशा तऱ्हेने बसले होते, असे संजयाच्या तोंडी वर्णन आहे. ह्या शिबिरामध्ये अभिमन्यू वगैरे मुलांना जाण्याला मज्जाव होता, असेही संजय सांगतो. म्हणजे कृष्ण आणि अर्जुन हे अगदी बरोबरीचे जीवश्च कंठश्च मित्र होते.
 द्रौपदी-स्वयंवराच्या सुमारास यादव द्वारकेला जाऊन स्थिर झाल्याला फार काळ लोटलेला नसावा. यादव एका दिव्यातून पार पडले होते. पांडव अशाच तऱ्हेच्या कठीण दिव्यातून बाहेर निघत होते. ह्या वेळेला एकमेकांच्या आधाराने दोघांचेही हित साधणार होते. कृष्णाच्या धोरणी मनाला हा विचार शिवला नसेल, असे म्हणवत नाही. पांडवांच्या संबंधात कृष्णाने बरेच मोठे धोरण ठेवले होते, हे दिसून येते. पण कृष्णार्जुनांच्या वैयक्तिक मैत्रीत धोरणापेक्षा निर्व्याज प्रेमच जास्त दिसते.
 कृष्णाचा पांडवांशी जो संबंध होता, त्याचा विचार करताना कृष्णाच्या सबंध आयुष्याचाच विचार करण्याची आवश्यकता आहे. भगवद्गीतेत ‘न मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किञ्चन' असे म्हणणाऱ्या श्रीकृष्णाच्या आयुष्यामध्ये पुष्कळच कार्ये व धोरणे होती. काही कुलाविषयीची, काही त्या वेळच्या सबंध क्षत्रियवर्गाविषयीची व काही सर्वस्वी स्वतःविषयीची अशी होती. कंसवध हे काही अंशी स्वतःचे खाजगी कर्तव्य होते, तर काही अंशी सबंध कुळाचीच ती सोडवणूक होती. कंसाच्या वधामुळे कंसाच्या सासऱ्याचे म्हणजे जरासंधाचे यादवांना जे भय उत्पन्न झाले, त्यातून यादवांची मुक्तता करणे, त्याचप्रमाणे क्षणोक्षणी जागरूक राहून ह्या भांडकुदळ व द्वाड वंशाला एकत्र ठेवणे हे आणखी एक कर्तव्य होते. त्या वेळच्या क्षत्रिय रूढीला हरताळ फासून शंभर क्षत्रियांना बळी द्यायला निघालेल्या जरासंधाचा काटा काढणे हेही त्याचे कार्य होते. हे कार्य जितके स्वतःच्या कुळासाठी हाते, तितकेच ते सर्व राजवंशांची एक विशिष्ट घडी बसवण्याच्या त्याच्या प्रयत्नांचेही निदर्शक होते.
 महाभारतात एक गोष्ट मनात भरते, ती म्हणजे क्षत्रियराण्यांचे एकमेकांशी संबंध व क्षत्रियांनी वागण्याचे नियम. निरनिराळ्या राजघराण्यांची वंशपरंपरागत राज्ये व राजधान्या होत्या. सिंधू, सौवीर, मद्र, गांधार, मत्स्य, पांचाल,हस्तिनापूर, खुद्द मगध, चेदी, विदर्भ या सर्व देशांचे राजे वंशपरंपरागत आलेल्या राज्यावर बसलेले होते. यादवांना मथुरेहून पळावे लागले. त्यांनी नवी राजधानी वसवली; ती दुसऱ्या कोणाचे राज्य हिसकावून घेऊन वसवली असे दिसत नाही. लढाईची वर्णने आहेत. दिग्विजयाची वर्णन आहेत, पण कोणी कोणाचे राज्य जिंकून घेतल्याचे उल्लेख नाहीत. जरासंधाला मारल्यावर जरासंधाच्या मुलाला अभय देऊन राज्यावर बसवले. जरासंधाने पकडलेल्या राजाची मुक्तता करून ज्याला-त्याला आपापल्या लहान-लहान राज्यात रहायची परवानगी दिली. शिशुपालाला मारले तेव्हा शिशुपालाचा मुलगा गादीवर बसला, भारतीय युद्ध झाल्यावर धर्मराज हस्तिनापुराच्या गादीवर बसला. तेव्हा व्यासाने धर्माला जे पहिले कर्तव्य सांगितले ते असे... “जे-जे राजे युद्धात मारले गेले, त्या सर्वांच्या राजधानीमध्ये दूत पाठवून राण्यांचे सांत्वन कर, त्यांना अभय दे! मृत राजाचा जो कोणी मुलगा असेल, त्याला अभिषेक कर व त्याचे रक्षण करण्याची काळजी घे ! एखादी राणी गर्भवती असेल व दुसरा वंश नसेल, तर चांगले लोक नेमून तिचे रक्षण कर व तिला मूल झाले म्हणजे त्याच्या नावाने द्वाही फिरव." (शांतिपर्व : अध्याय ३४:श्लोक ३१-३३) ह्या सर्व उदाहरणांवरून असे दिसून येते की, त्या वेळी युद्धाचे काही विशिष्ट नियम असत. क्षत्रियांनी एकमेकांची राज्ये हिसकावणे हे त्या वेळच्या रीतीला धरून नव्हते. धर्माच्या राजसूय यज्ञाच्या वेळी श्रीकृष्णाचा पांडवांशी जो विचारविनिमय झाला, त्यातही हीच गोष्ट दिसून येते. कोठचे राजे जिंकण्याला सोपे, आपले आप्त म्हणून कोणाकडून साहाय्य मिळेल, कोणाला मारले पाहिजे, हा तो विचार होता. प्रत्यक्ष चार भाऊ दिग्विजयाला गेले, तेव्हाही राजांचा पराभव करून, त्यांच्याकडून करभार घेऊन आणि त्यांना यज्ञाचे निमंत्रण देऊन ते आले. शिशुपाल धर्माला अग्रपूजेच्या वेळेला हेच बजावतो. “तू जो राजसूय यज्ञ करतो आहेस, तो आम्ही सर्वांनी तुला मान्य केले म्हणून." हा त्याच्या म्हणण्याचा मथितार्थ होता. कृष्णाने जरासंधाबद्दल व जरासंधाशी भाषण करताना हेच सांगितले, "राजे लोकांना पकडून आणून ठेवले आहेस व त्यांना बळी देणार आहेस हे कृत्य राजनीतीच्या विरुद्ध आहे. त्यांना सोडून दे, म्हणजे आमचे काही म्हणणे नाही.” ह्या म्हणण्याला जरासंध कबूल होईना म्हणून त्याला मारावे लागले. राजसूय ज्याने करावयाचा तो राजा नुसता वीर्यशालीच नव्हे, तर धर्मज्ञही असावा, अशी त्या वेळची कल्पना होती. कृष्णाने धर्माला हेच सांगितले. “तू सम्राट म्हणून सगळ्यांना पसंत पडशील. जरासंध जिवंत असेपर्यंत मात्र ते पद तुला मिळणे शक्य नाही.” जो राजा राजसूय यज्ञ करील, त्याला जर दहा राजांना जिंकावे लागले, तर इतर दहा राजे बरोबरीचे मित्र म्हणून असावे लागत. राजसूय यज्ञ हे जसे दिग्विजयाचे प्रतीक होते, तसे मान्यतेचेही प्रतीक होते. जवळजवळ तुल्यबल राजे एकमेकांच्या शेजारी राज्य करीत असत. कोणी राजसूय यज्ञ केला किंवा अश्वमेध यज्ञ केला, म्हणून हा समतोलपणा नाहीसा होत नसे. भीतीचा दरारा बसवून जरासंधाने ही घडी पार विस्कटून टाकली होती. बरोबरीच्या राजांना तुरुंगात टाकणे किंवा आपल्या सैन्याच्या जोरावर त्यांच्यावर दरारा बसवून साम्राज्य मिळवणे हे कृष्णाच्या मते तरी त्या वेळच्या क्षत्रियनीतीला धरून नव्हते.
 महाभारत-कालानंतर आपल्याला बौद्धकालातील वाङ्मय सापडते. त्यात काशी-कोसलांच्या साम्राज्याचे वर्णन आहे. त्यावेळी राज्यस्पर्धेमध्ये राजे लोक एकमेकांचा निःपात करण्यासाठी झटत असत व साम्राज्ये स्थापीत असत असे दिसते. बुद्धानंतर चंद्रगुप्त मौर्याने अशा तऱ्हेचे साम्राज्य स्थापले. त्यानंतर अशोकानेही तोच प्रकार केला. मागाहून आलेले कुमारगुप्त व समुद्रगुप्त वगैरेही साम्राज्यस्थापकच होते. शेजारच्या राजांची भूमी बळकावून आपल्या राज्याचा विस्तार करणे हे साम्राज्यस्थापनेचे सर्वमान्य तत्त्व झाले होते. तरीही गुप्तकालात होऊन गेलेल्या कालिदासाने जुन्या मूल्यांचा उच्चार रघुवंशात केलाच. रघूच्या दिग्विजयाचे वर्णन करताना तो म्हणतो, “श्रियं कलिङ्गनाथस्य जहार न तु मेदिनीम्', अगदी बरोबर हीच कल्पना महाभारतकालीही रूढ होती. दिग्विजय म्हणजे काही विशिष्ट मर्यादेत खेळलेला एक डाव होता. स्पर्धा कीर्तीसाठी होती, भूमीसाठी नव्हती. करभार घ्यायचा आणि तो दान म्हणून देऊन टाकायचा, स्वत:जवळ साठवून ठेवायचा नाही, असाही दंडक होता.मोठा दिग्विजय करायचा. सर्व राजांकडून खूप धन, रत्ने वगैरे मिळवायची आणि एक मोठा यज्ञ करायचा, व इतरांकडून जे मिळवले असेल, त्यात आपली स्वतःची भर घालून सर्व संपत्ती दान करायची. ज्या राजांना जिंकले असेल, त्या सर्वांना बोलावून त्यांचा पाहुणचार करायचा, त्यांचा सन्मान करायचा व त्यांना घरोघर पोहोचवायचे, ह्या त्या वेळच्या रूढीचे वर्णन धर्माच्या राजसूय यज्ञात केलेले आहे. हीच कल्पना परत कालिदासाने रघुवंशात सांगितलेली आहे. सर्व संपत्ती वाटता-वाटता स्वतः दरिद्री होऊन जायचे- इतके की, कोणाला मोठे दान करायचे सामर्थ्यदेखील राहू नये अशी अवस्था यायची. हा क्षत्रियाचा मोठेपणा समजला जाई. रघूविषयी लिहिताना अगदी हेच चित्र कालिदासाने उभे केले आहे. ‘अकिञ्चनत्वं मखजं व्यनक्ति'. रघुराजा यज्ञात दिलेल्या दानामुळे गरिबी भोगीत होता असे हे वर्णन आहे. निरनिराळ्या क्षत्रियकुलांचा वंशपरंपरागत आलेल्या आपल्या राज्यावरचा हक्क अबाधित असे. लढाईमध्ये त्यांची 'श्री' जाई; पराभव झाला की अपकिर्ती होई, व करभार द्यावा लागे. पराभवाचा अपमान व संपत्तीचा व्यय हे दोन्ही ‘श्री’ गेल्याचे लक्षण होते. भूमी मात्र कुणी कुणाची घेत नसे. समोरासमोर लढाई झाली की तीत एखादा राजा मारला जाई, पण पराभूत शत्रूला तुरुंगात टाकायचे किंवा मारायचे हा प्रघात नव्हता. ह्या जुन्या प्रघाताला जरासंधाने हरताळ फासला होता. जरासंधाच्या भयामुळे केवळ यादवच नव्हे, तर इतरही राजे राज्य सोडून गेल्याचे, किंवा दुसरीकडे त्यांनी राज्य स्थापन केल्याचे उल्लेख सभापर्वात येतात. जरासंध मगधाहून मथुरेपर्यंत आला होता. पण हस्तिनापूरच्या राजांना त्याचा उपद्रव झाल्याचे दिसत नाही. जरासंधाबद्दल धर्माला काहीच माहिती नाही. अशा तऱ्हेने कृष्णाला त्याला माहिती सांगावी लागते. ह्यावरून दुस-याही एका गोष्टीला पुष्टी मिळते,ती ही की कृष्णाचा व पांडवांचा संबंध द्रौपदीस्वयंवरापर्यंत आलेला नव्हता. तो आला असता, तर जरासंधाच्या भयाने आपण कसे पळून गेलो, ही कथा सांगण्याचे कारणच नव्हते.
 कृष्णाच्या मनात क्षत्रियत्व व क्षत्रियांचे परस्पर संबंध यांबद्दल काही कल्पना होत्या. स्वतःच्या कुळाला दिलेल्या उपद्रवामुळे त्याचा जरासंधावर राग होता हे जितके खरे, तितकेच जरासंध वर वर्णन केलेल्या क्षत्रियनीतीला धरून वागत नव्हता, व त्याने शंभर राजे कैदेत टाकून त्यांना बळी देण्याचा घाट घातला होता, हेही कारण त्याच्या रागाला होते. महाभारतामध्ये निरनिराळ्या कुळांचे एकमेकांशी संबंध कसे गुंतागुंतीचे होते ते ह्या प्रकरणात दिसून येते. चंदीचा राजा शिशुपाल हा यादवांच्याच एका मुलीचा मुलगा. पांडवांशी कृष्णाचे जे नाते, तसेच शिशुपालाशीही होते. पण शिशुपाल इतर काही कारणांमुळे कृष्णाचा वैरी व जरासंधाचा हस्तक झालेला होता. कृष्णाने योजिलेल्या कार्यात शिशुपालाचा नाश करणे हे नव्हते. जरासंधाचा काटा काढून टाकायचा, हे मात्र त्याच्या मनात होते व तो त्या संधीची वाट पाहत होता. जरासंधाला मारून त्याने बंदीत टाकलेल्या राजांना मुक्त करणे व क्षत्रियांचे पूर्वापार-संबंध परत प्रस्थापित करणे हे तो एक महान कार्य समजत होता. क्षत्रिय-समाजाविषयीची ही त्याच्या आयुष्यातील एक महत्त्वाकांक्षा होती.
 ह्या सर्व भानगडीत कृष्णाचा काही वैयक्तिक लाभ झालेला दिसत नाही. हे सर्व राजकारण कुलासाठी आणि त्या वेळच्या एकंदर राजकीय संबंधांबद्दल होते. कृष्णाला केवळ स्वतःची अशी आकांक्षाच नव्हती का? शूर व पराक्रमी असूनही अर्जुनाप्रमाणेच धाकटा भाऊ असल्यामुळे तो राजा झाला नव्हता. एकदा का त्याने राज्य पत्करले असते. तर थोरल्या मुलाला गादीवर बसवायचे ही रूढी मोडली असती व मग यादवांयादवांत भांडणे लागली असती; म्हणून त्याने जाणून-बुजून कमीपणा पत्करला होता. पण जरी राजा होता आले नाही, तरी कृष्णाला एक मोठी महत्त्वाकांक्षा होती, हे महाभारतावरून स्पष्ट दिसते. ती महत्त्वाकांक्षा ‘वासुदेव' होण्याची !
 ‘वासुदेव' होणे हे प्रकरण काय आहे, ह्याचा नीटसा उलगडा होत नाही. पुराणातून कृष्ण-वासुदेव हा विष्णूचा अवतार होता व अवतारकार्य करून तो गेला, अशी कथा येते. तीच कथा सर्वांना माहीत असते. कृष्ण वासुदेव आपल्या स्वतःच्या आयुष्यभर देव म्हणून वावरला. त्याने देव म्हणून चमत्कार केले व तो आपल्या काळी देव मानला गेला, हेच आपण धरून चालतो. मागाहूनचे संस्कृत लिखाण हेच सांगते. मराठीत तर पांडवप्रताप, भक्तिविजय हे ग्रंथ, रुक्मिणी-स्वयंवर, सुभद्राहरण ह्यांची रसभरित आख्याने, त्यांवर आधारलेली नाटके ही तर कृष्णाबद्दल हीच भावना दृढ रुजवतात. महाभारत वाचताना त्यामुळे आश्चर्याचा धक्का बसतो. कृष्ण असामान्य मानव-पण मानवच असे महाभारतात चित्रण आले त्याचे काही नवल वाटत नाही; पण ‘वासुदेव' म्हणवून घेण्याचे त्याचे प्रयत्न, दुसऱ्या काही जणांचा तोच अट्टाहास, कृष्णाला आपले ‘वासुदेवत्व' टिकवण्यासाठी त्यांना मारावे लागणे, हे उल्लेख वाचून मन बुचकळ्यात पडते.
 महाभारतात ह्या प्रकरणाचा काही उलगडा होत नाही; जैन वाङ्मयात होतो. जैनांची ‘वासुदेव' कल्पना पुढीलप्रमाणे आहे : जैनांनी कालचक्राचे चोवीस भाग कल्पिले आहेत. त्यांतील बारा भाग ‘उत्सर्पिणी (वर जाणाऱ्या) अवस्थेचे व बारा भाग'अवसर्पिणी' (खाली येणाऱ्या) अवस्थेचे धरतात. खालून वर येणाऱ्या अवस्थेत सर्व जीवमात्र जास्त-जास्त चांगल्या मूल्यांकडे जात राहतात, तर अवसर्पिणीत त्यांची अधोगती होत राहते. 'कालचक्राच्या काही काही विभागात मिळून नऊ ‘वासुदेव', नऊ ‘बलदेव' व नऊ ‘प्रतिवासुदेव' असे निर्माण झाले. अवसर्पिणीतच राम व कृष्ण असे दोन ‘वासुदेव' झाले. सर्व नऊ वासुदेवांच्या आयांची व बापांची नावे दिलेली आहेत. रामाची आई केगमई व बाप दशरथ, कृष्णाची आई देवकी व बाप वसुदेव म्हणून कृष्ण (कण्ह) हा पैतृक अर्थाने ‘वासुदेव' होता. 'वासुदेव' अखिल त्रिखंडभरत चक्रवर्ती असत. रामाला बलदेव लक्ष्मण होता, प्रतिवासुदेव रावण होता. कृष्णाला बलदेव बलराम होता. प्रतिवासुदेव कंस होता. सात वासुदेव गौतमगोत्री, आठवा राम दाशरथी व नववा कृष्ण वासुदेव हे दोन्ही कच्छप गोत्री. सर्व वासुदेवांची स्वत:ची अशी सात रत्ने असत. ती म्हणजे चक्र, खङ्ग, धनू, मंणी, माला, गदा, शंख. कृष्णालाही चक्र, खङ्ग, कौमोदकी गदा, वैजयंती माला, स्यमंतक(?) मणी, शार्ङ्गधनू होतेच. 'अभावो नत्थि वासुदेवाणम्' (वासुदेवांना कशाची कमतरता नसते.) हिंदूच्या कल्पनेने वरील वाक्य घ्यावयाचे, म्हणजे वासुदेव हे पूर्ण सगुण-सर्वसंपन्न असे पुरुषोत्तम होते, असा अर्थ लावता येईल. आणखी दोन गोष्टी सांगितल्या आहेत. ‘अवगुणं न गिण्हन्ति'. म्हणजे कितीही तुच्छ वा भयंकर गोष्ट असली, तरी तीत त्यांना काहीतरी चांगले सापडते. हा गुण ‘अभावो नत्थि' याला पूरक समजला पाहिजे. ‘नीएण जुज्झेण न जुज्झंति' (‘खाली उभे राहून लढत नाहीत.') हा त्यांच्या रथित्वाचा निदर्शक समजला पाहिजे.
 ह्या सर्व कल्पनेत काही सनातन कल्पना, काही बौद्ध संप्रदायाच्या कल्पना, काही ख्रिस्ती(?) कल्पना ओळखू येतात. सत्ययुगापासून कलीपर्यंत चतुष्पाद धर्माचा एक एक पाय तुटत होता, ही कल्पना अवसर्पिणी कालचक्रात येते. वासुदेव, प्रतिवासुदेव वगैरे एकेका कालखंडाचे प्रतिनिधी ही आपल्या मनूच्या कल्पनेप्रमाणे आहे. पूर्णपुरुष ही कल्पना-दशावतार (नऊ वासुदेव?) ही कल्पना आपल्याकडे आहेच. वासुदेव-प्रतिवासुदेव ही कल्पना ख़िस्त-प्रतिख्रिस्त (Christ-anti Christ) यांसारखी वाटते. 'अवगुण न गिण्हन्ति' ही कल्पना बौद्ध-वाङमयात वारंवार येते. ह्या कल्पना कोठून आल्या वगैरेत शिरले, तर कृष्ण-चरित्र बाजूलाच राहील. एवढे मात्र दिसते की, महाभारतात वासुदेवाचा व पुरुषोत्तमाचा उल्लेख अशा तऱ्हेने केला आहे की, ती एक कृष्णाची महत्त्वाकांक्षा होती असे समजते. वासुदेवाची चिन्हे होती असे समजते. पण या कल्पनेचा उलगडा काही नीट होत नाही. भारताचे वैचारिक धन, कथा, कल्पना, मूल्ये, तत्त्वज्ञान, धर्म ही सर्वच इतक्या निरनिराळ्या तऱ्हेने, निरनिराळ्या उगमातून आलेली आहेत की, त्यांचा अभ्यास केवळ तत्त्वशोधक दृष्टीने होणे जरूर आहे.
 महाभारतात जे काही अर्धवट उल्लेखिलेले व अतिशय कुतूहल जागृत करणारे विषय आहेत. त्यांमध्ये ‘वासुदेव' हा एक आहे. त्या काळात तीन लोक वासुदेव होण्याची मनीषा बाळगून होते असे दिसते. एक वसुदेवाचा मुलगा वासुदेव कृष्ण; दुसरा शिशुपाल. ह्याला जन्मतःच चार हात होते. ह्यांतील दोन कृष्णाच्या दृष्टीपातानेच गळून पडले व त्यानंतर त्याने वासुदेव होण्याचा प्रयत्न केलेला दिसत नाही. पण त्याचे कृष्णाशी भयंकर वैर होते असे दिसते. पूर्वेकडे(?) पौंड्र देशाचा राजा स्वतःला ‘वासुदेव' म्हणवून घेई. कृष्ण स्वतः सांगतो की, 'हा पौंड्र माझी चिन्हें धारण करतो.' पौंड्रावर चाल करून कृष्णाने त्याला युद्धात मारले. त्याचे कारण तो स्वतःला ‘वासुदेव' म्हणवून घेई हे ! ‘वासुदेव' हे नाव प्राप्त करून घेणे म्हणजे काय होते, हे स्पष्ट कोठेही सांगितलेले नाही. पण वासुदेव म्हणवून घेण्याची धडपड पाहिली, म्हणजे त्यात काहीतरी विशेष होते, ह्याबद्दल शंका राहत नाही. कोठच्याही राज्याचा राजा नाही; सम्राट तर नाहीच नाही; पण वासुदेव असलेला असा कृष्ण होता. भगवद्गीतेत कृष्ण स्वतः म्हणतो, ‘वृष्णीनां वासुदेवोऽहम्।'. वसुदेवाला पुष्कळ बायका होत्या व त्यांना बलराम, सारण वगैरे मुलगेही होते. पण फक्त कृष्णच आपल्याला वासुदेव म्हणवून घेई, हे कसे ? प्रत्येक मुलाला आपल्या आईवरून नाव पडे. जसे रौहिणेय, कौंतेय, माद्रेय वगैरे. पण जर निरनिराळ्या आयांचे मुलगे असले, तरी एका बापाचे असले म्हणजे सर्वाचे पैतृक नाव सारखे असावयाचे. उदाहरणार्थ, धर्म, भीम, अर्जुन हे कौंंतेय होते व नकुल, सहदेव माद्रेय होते, व पाचही जण पांडूचे म्हणून पांडव होते. त्याप्रमाणे खरे पाहिले, तर वसुदेवाच्या सर्वच मुलांना वासुदेव ही संज्ञा असावयास पाहिजे होती. पण ती फक्त कृष्णालाच तेवढी दिसते. म्हणजे वासुदेव हे पैतृक नाव नसून काही विशेष अधिकार प्राप्त झालेल्या व्यक्तीनेच फक्त घ्यावयाचे ते पद होते. ज्याप्रमाणे राजसूय यज्ञ केलेल्या माणसाला सम्राट पदवी प्राप्त होई, व एकाच वेळी राजसूय यज्ञ केलेले दोन राजे असू शकत नव्हते, तसेच काहीतरी वासुदेव ह्या पदवीत असावे. वासुदेव म्हणवून घेण्याची धडपड काही राजे करीत. पण खरोखर ती पदवी एकच धारण करू शकत असे.
 कृष्णाच्या वर्णनामध्ये एक गोष्ट प्रामुख्याने नजरेस येते. डोळे दिपतील अशा तऱ्हेचे दैवी तेज व असामान्य वैभव त्याच्याजवळ होते. त्याचा रथ, त्याचे घोडे, तो स्वतः कोठेही असला, तरी लोकांचे डोळे दिपत असत. तो रत्ने व संपत्ती ह्यांचा स्वामी होता. 'वासुदेव' ह्या शब्दातही तो अर्थ प्रतीत आहे. ‘वस' म्हणजे संपत्ती, समृद्धी असा अर्थ होतो. 'देव' हा शब्द तेजस्वीपणा व अतिमानुषता दाखवतो. कृष्णाने लोकांचे डोळे दिपवून टाकायचे प्रसंग महाभारतात ठिकठिकाणी आलेले आहेत. सर्व ऋद्धिसिद्धी ज्या ठिकाणी एकत्र झालेल्या आहेत, ती व्यक्ती म्हणजे वासुदेव, अशी कल्पना मनात येते. आपण अशी व्यक्ती आहोत, असा कृष्णाचा आग्रह होता; व तसे असल्याबद्दल आपल्याला सर्वांनी मान्यता द्यावी, असा त्याचा अट्टाहास होता असे वाटते.
 बौद्ध वाङ्मयामध्ये कृष्ण वासुदेव (कण्ह वासुदेव) हा देवागब्भा व अंधकवण्ही ह्यांचा मुलगा होता, असे म्हटले आहे. पण बापाचे नाव वसुदेव असे दिलेले नाही. ह्याहीवरून वासुदेव हे पैतृक नाव नसून तो काहीतरी अधिकार असावा असे वाटते. वर सांगितल्याप्रमाणे जैनांच्या संप्रदायामध्ये वासुदेव कल्पना काय आहे, हे कळते. जैन संप्रदाय हा बौद्ध धर्माच्याही आधीचा होता. भारतीय युद्धाच्या पूर्वीही जैन किंवा तत्सम पंथ असेल. त्यांच्या संप्रदायाप्रमाणे दैवी सामर्थ्य व कर्तबगारी असलेली ‘वासुदेव' पदवी मिळविणारी अशी व्यक्ती दर कालखंडात होऊन जाई असे दिसते. वासुदेव-पदवीला योग्य कोण, कशामुळे वासुदेव-पदवी मिळविता येई, ह्या गोष्टी जैन वाङ्मयात काय, किंवा महाभारतात काय, कोठेही स्पष्ट केलेल्या नाहीत. ती पदवी मिळवण्याची श्रीकृष्णाने अतिशय खटपट केली व कृष्णाच्या आयुष्यात त्याची स्वतःबद्दल अशी जी आकांक्षा होती, ती ‘वासुदेव' होण्याची होती यात शंकाच नाही. म्हणजे ‘न में पार्थास्ति कर्तव्यम्' असे म्हणणाऱ्या कृष्णाला, स्वतःबद्दल, कुलाबद्दल व समाजाबद्दल काही आकांक्षा व ध्येय होते व ती पार पाडण्यासाठी त्याने धडपड केली, हे स्पष्ट होते.
 भीमाने जरासंधाचा वध केला. धर्माच्या राजसूय-यज्ञात कृष्णाला अग्रपूजेचा पहिला मान मिळाला. त्याच निमित्ताने शिशुपालाचाही वध झाला. ह्या सर्व प्रकारानंतर पांडवांचा पाहुणचार घेऊन, सर्वांचा निरोप घेऊन कृष्ण द्वारकेला परत गेला. जिवाच्या भयाने लपत-छपत रानोमाळ हिंडणारे पांडव इंद्रप्रस्थात दिग्विजयी सम्राट म्हणून मिरवले. पांडवांच्या आयुष्यातला हा विजयाचा क्षण कृष्णाच्याही आयुष्यातील परमोच्च बिंदू होता. सामाजिक, कौटुंंबिक व वैयक्तिक अशा सर्व महत्त्वाकांक्षा ह्या क्षणी कृष्णाच्याही बाबतीत पुऱ्या झाल्या होत्या. यादव द्वारकेमध्ये स्थिर झाले होते. इंद्रप्रस्थाला पांडव व हस्तिनापुराला कौरव ही दोन्ही घराणी यादवांच्या नात्यातील व स्नेहातील होती. शिशुपालाच्या गादीवर शिशुपालाचा मुलगा बसला होता. तो कृष्णाला अनुकूल होता. जरासंधाच्या मुलाला अभय देऊन जरासंधाच्या राज्यावर बसवले होते. एकमेकांशी तुल्यबळ असलेले राजे एकमेकांशेजारी नांदत होते. म्हणजे क्षत्रिय समाजाची घडी पूर्ववत झाली होती. एवढेच नव्हे, तर यादवांच्या दृष्टीने त्यांचे प्रतिस्पर्धी नाहीतसे होऊन मित्रराज्ये त्यांच्या शेजारी स्थापन झालेली होती. हे सर्व होत असताना कृष्णाच्या शौर्याची व शहाणपणाची छाप सर्वांवर बसली होती. काही थोडे असंतुष्ट लोक वगळल्यास कृष्णाचे वैयक्तिक महत्त्व इतरांना मान्य होते. सार्वजनिक दृष्टीने या मान्यतेला अग्रपूजेच्या वेळी शिक्कामोर्तब झाले. राजा नसूनही, वयाने सर्वांत वडील नसूनही, क्षत्रियांच्या सभेत कृष्णाला हा मान मिळाला होता. इतके करूनही अजून एक राजा स्वतःला वासुदेव म्हणवून घेणारा राहिला होता. पण त्याला मारणे कृष्णाला कठीण नव्हते. म्हणजे वासुदेवत्व सर्वस्वी प्राप्त झाले नसले, तरी हातात आल्यासारखे होते. कृष्णाचे सर्व हेतू साध्य होऊन तो कृतकृत्य झालेला होता. नंतरच्या कथाभागावरून आपल्याला समजते की, इंद्रप्रस्थाहून निघाल्यावर कृष्ण लगेच आपल्या काही उरलेल्या शत्रूंंचा समाचार घेण्यात गुंतला.
 सर्व आयुष्यभर जे मिळवायची धडपड केली, जे स्वप्न उराशी बाळगले, ते प्रत्यक्षात उतरले होते. पण ही सफलता क्षणजीवी ठरली. मोठ्या प्रयासाने बांधलेली ही इमारत अनपेक्षितपणे व धर्माच्या नादानपणामुळे एका क्षणात गडगडली. कृष्णाची साध्ये ही विशाल असली, तरी पांडवांच्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षेशी निगडित चालली होती. पांडव सुप्रतिष्ठित असणे हे कृष्णाच्या साध्यांना आवश्यक होते. पांडव इंद्रप्रस्थात राहून त्यांची आणि धार्तराष्ट्रांची कुरबूर झाली असती, तरी कृष्णाच्या हेतूला तडा गेला नसता. पण धर्मराजाच्या कृत्यामळे सगळ्याच हेतूंचा एक प्रकारे नाश झाला. कृष्णाचे वासुदेवत्व राहिले. वैयक्तिक मोठेपणा राहिला, पण बाकी सर्व गेले.
 धर्माच्या राजसूय यज्ञाच्या वेळेला सर्व क्षत्रिय घराण्यांचा म्हणून जो एक तोल साधलेला होता, तो इंद्रप्रस्थाचे राज्य पांडवांच्या हातून गेल्यामुळे कोलमडून पडला. ह्या प्रसंगी कृष्णाच्या मित्रप्रेमाची कसोटी लागली. पांडवांनी आपले राज्य नादानपणाने घालविले, ह्याचा अर्थ एवढाच झाला की, अर्धे तोडून दिलेले राज्य हस्तिनापूरच्या शाखेला परत मिळाले. पांडवांनी आपल्या हातांनी नाश करून घेतला. झाले त्याला इलाज नाही, असे म्हणून कृष्णाला स्वस्थ बसता आले असते. कौरवही त्याचे मित्रच होते. द्यूताचे आमंत्रण क्षत्रियाला नाकारता येत नाही, असा धर्मराजाचा दावा होता. तो जरी खरा मानून चालले तरी बायकोसुद्धा सर्वस्व पणाला लावणे हे निश्चित योग्य नव्हते. चाललेल्या द्यूतात चुकून एकदासुद्धा फासे आपल्या बाजूला पडत नाही हे दिसूनही, हे द्यूत खरेपणाने खेळले जात नाही हे धर्माला न उमजावे, हेही आश्चर्यच. एक प्रकारच्या धुंदीत धर्मराज द्यूत खेळत होता, असे वाटते. अशा या नादान मित्रांना कृष्णाने सोडले असते, 'नशीब तुमचे,' असे म्हणून तो गप्प बसला असता, तरी त्याचा राजकीय, सामाजिक व कौटुंबिक डाव स्थिर झाला असता. 'आम्ही यादवांनी नाही का आमच्या जन्मभूमीवरून पळून जाऊन दुसरीकडे राज्य स्थापले? तुम्हीही लांब जाऊन तसेच करा; या कौरवांचा शेजारच नको; मी तुम्हांला मदत करतो,' असेही त्याला म्हणता आले असते. पांडव वनवासात गेल्यानंतर कृष्ण त्यांना भेटायला आला, तेव्हा झाल्या गोष्टींबद्दलची त्याची तीव्र निराशा व हळहळ व्यक्त झाली आहे. "मी असतो, तर हे द्यूत मी कदापि खेळू दिले नसते," हे शब्द त्याने परत-परत उच्चारले, पण ह्या कठीण प्रसंगी त्याला मैत्रीचा विसर पडला नाही. तो पांडवांच्या बाजूने ठाम उभा राहिला. वनवास व अज्ञातवास चुकवता येणे शक्य नव्हते; पण पांडवांच्या मुलाबाळांची व्यवस्था त्याने पांचालांच्या मदतीने पार पाडली. पांडव वनवासातून आल्यावर लढाई न होता काहीतरी तडजोड करण्यासाठी त्याने आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा केली, दुर्योधनाच्या सभेत शिष्टाईचा प्रयत्न फसल्यावर द्रौपदीची लालूच दाखवून कर्णाला फोडण्याचा त्याने प्रयत्न केला. शिष्टाईच्या वेळेला आपल्या मित्रांच्या वतीने अर्धे राज्य न मागता 'काही थोडे तरी दे', असे म्हणण्याची लाचारी त्याने पत्करली. पण त्याचे सर्व प्रयत्न फुकट गेले, 'तुम्ही आपापसांत भांडा; मी आपला बाजूला राहतो', असे बलरामाप्रमाणे त्याला म्हणता आले असते. पण तसे न करता परत तो मित्रांच्या बाजूने उभा राहिला. ह्या सर्व प्रकरणात कृष्णाच्या मैत्रीचा दृढपणा दिसून येतो. त्याच्या मित्रांनी काही इतरांच्या अन्यायाने, काही स्वतःच्या गुणांनी सर्वस्व गमावले होते. त्या अन्यायाचा प्रतिकार करायला कृष्ण सिद्ध होता. दूरवरचे परिणाम सर्व काही त्याला दिसले असतील, असे म्हणवत नाही. पण काही थोडे परिणाम तरी डोळ्यांपुढे दिसतच होते. वर म्हटल्याप्रमाणे त्याने मोठ्या प्रयत्नाने दूरदर्शीपणाने जमविलेली व्यवस्था ह्या त्याच्या उतावळ्या, शूर; पण नाकापलीकडे न दिसणाऱ्या मित्रांनी गमावली. त्यांच्याबद्दल कृष्णाने रागाचे शब्द काढले; पण गेलेले मिळवून देण्यासाठी त्याने मदतच केली.
 अर्जुनाला लढाईला उभे राहण्याचा उपदेश करताना कृष्णाची वाक्ये वरील संदर्भात वाचली म्हणजे त्याला एक निराळाच अर्थ प्राप्त होतो. कृष्णाच्या जीवनमूल्यांवर, जीवनविषयक दृष्टिकोणावर एक निराळाच प्रकाश पडतो, पांडवांना राज्य मिळाल्याबरोबर कृष्णाचे हेतू साध्य झाले होते. त्याचप्रमाणे पांडवांच्या राज्य गमावण्याबरोबर ते धुळीला मिळाले होते. तो विचार करून उघड्या डोळ्यांनी कर्म करीत होता. त्याचे स्वतःचे असे काही साध्य व्हायचे नव्हते. त्याच्या संपत्तीत, त्याच्या कीर्तीत नवी भर पडायची नव्हती. काही बाबतीत सर्वस्वहानी झाली होती, तरी कर्तव्य म्हणून तो लढाईला उभा राहिला. अर्जुनाला त्यातून काहीतरी मिळणार होते, पण कृष्णाला तरी काहीच मिळणार नव्हते. 'हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम्'. कृष्ण त्या लढाईत मरायचा तर नव्हताच, किंवा लढाई जिंकून राजाही व्हायचा नव्हता. त्याचा सर्वस्वी हेतुनिरपेक्ष, स्वार्थनिरपेक्ष लढा होता. तो मित्रकार्य करीत होता. त्याच्या दृष्टीने मित्रांची बाजू न्यायाची होती. दुर्बलही होती. प्रत्यक्ष पांडव व पांचाल शूर होते. स्वतःचे गमावलेले मिळवण्याच्या हिरिरीने ते लढत होते. ह्या गोष्टी जरी खऱ्या असल्या, तरी कौरवांचे सैन्य पांडवांच्यापेक्षा कितीतरी मोठे, दिढीपेक्षा अधिक होते. कृष्णाच्या कुशल धोरणाने पांडव वाचले.
 एक फार वाईट गोष्ट ह्या युद्धामुळे झाली. कृष्णाच्या संभाळून घेण्याच्या वृत्तीमुळे यादवांमधील आपापसांतील दुहीवर झाकण पडले होते. यादवांत निरनिराळे गट होते. पण कृष्णाने त्या गटांच्या स्पर्धेला व वैमनस्याला लगाम घातला होता. ह्या युद्धाच्या निमित्ताने ते गट उघडे झाले. कृष्ण व त्याच्याबरोबर सात्यकी वगैरे त्याचे मित्र पांडवांच्या बाजूला होते. कृतवर्मा व भोज दुर्योधनाच्या बाजूला होते आणि कोणाच्याच बाजूला लढणे नको म्हणून बलराम बाहेर निघून गेलेला होता. यादवांत उघड-उघड दोन तट पडले. बाहेरून दिसावयाला एकसंध असलेली यादवांची फळी या निमित्ताने भंगली. जुन्या कुरबुरीत नव्या हेव्या-दाव्यांची भर पडली आणि यादवांच्या अंताची बीजे महाभारत-युद्धात पेरली गेली. यादवांचा अंत कृष्णाला दिसला असे म्हणवत नाही, पण यादवांची दुफळी झाली, हे तर त्याच्या डोळ्यांपुढे स्पष्ट होते. याचे परिणाम काही चांगले होणार नाहीत, हे समजण्याची प्रज्ञा त्याच्याजवळ खासच होती. इतके असूनही तो लढाईला उभा राहिला, त्या वेळी गीतेमधील जो एकेक श्लोक अर्जुनाला उद्देशून म्हणत होता, तो त्याला स्वतःलाच लागू होता. तो लढाईला उभा राहिला, हा प्रसंग काही दृष्टींनी त्याच्या आयुष्यातील मोठ्या त्यागाचा क्षण ठरतो. आकांक्षा धुळीला मिळाल्या असतानाही तो मित्रांसाठी व न्यायासाठी उभा राहिला हा वेडपणा की मोठेपणा?
 महाभारतामध्ये निरनिराळ्या प्रसंगी कृष्णाने पांडवांना जो उपदेश केला, त्यात त्याची कपटनीती दिसून येते असे काहींचे म्हणणे आहे. कृष्ण हा अतिशय प्रज्ञासंपन्न आणि सदैव जागृत अशा व्यक्तींपैकी एक होता, त्या वेळच्या नीतीला धरून उघड्या डोळ्यांनी तो वर्तन करीत होता. त्याला जे वर्तन अतिशय गर्ह्य वाटत होते, त्याचा बीमोड करण्यासाठी त्याने मोठे संकट पत्करले. फक्त तिघांनी जाऊन भीमाच्या एकट्याच्या बळावर जरासंधाचा वध करावयाचा, ह्या गोष्टीत युक्ती तर होतीच, पण त्याहीपेक्षा मोठे धाडस होते. जरासंधाच्या सैन्याशी सामोरे उभे राहून युद्ध करणे शक्य नव्हते. त्या सैन्यापुढे पळताना यादवांना भुई थोडी झाली होती. जरासंध स्वतःही निष्णात आणि बलशाली योद्धा होता. पण त्याच्याशी एकट्याशी लढाई करणे शक्य होते. भीमाच्या शक्तीवर व मल्लयुद्धनिपुणतेवर कृष्णाचा विश्वास होता. तितकाच अर्जुनाच्या व स्वत:च्या शस्त्रविद्येवर होता; तरीही इतक्या लांब जाऊन समोरासमोर युद्ध करण्याची मागणी करणे हे मोठ्या धाडसाचे काम होते, यात शंकाच नाही. लढाई करताना 'जरासंध दमला आहे; आता त्याला उसंत मिळू देऊ नकोस,' असा त्याने भीमाला इशारा दिला, यातही काही खोटेपणा नव्हता. भीम निश्चितच जरासंधापेक्षा बलवान होता आणि त्याने सरळ लढाईत जरासंधाला मारले. लढाईला उभे राहण्याआधी 'कैदेतील राजांना सोड.' म्हणून कृष्णाने जरासंधाजवळ मागणी केली होती. 'ती झिडकारलीस तर जामच्यापैकी कोणाशीही युद्ध कर,' अशी दुसरी मागणी होती.झालेला व्यवहार सरळ होता. तसेच रुक्मिणीला पळवून नेले, हेही सर्वस्वी त्या वेळच्या राजनीतीला धरून होते. भीष्माने राजांच्या मुली स्वयंवर मंडपामधून पळवून आणल्या होत्या. रुक्मिणी काही शिशुपालाची वाग्दत्त वधू नव्हती. तिच्या भावाच्या मनात काहीही असले, तरी एकदा स्वयंवर मांडल्यावर मुलीला पळवून नेणे हे शक्य असल्यास तसे करणे हे क्षत्रियनीतीला धरून होते. शिशुपालाचा तिसरा आक्षेप होता. 'कृष्ण राजा नाही.' हा! तोही फोलच होता. अर्जुनाने द्रौपदीला जिंकले. तेव्हा तो काही राजा नव्हता, एवढेच नव्हे तर थोरला भाऊ जिवंत असल्यामुळे राजा होण्याची शक्यताही नव्हती. राजा नाही, म्हणून कृष्णाला हिणवणारा शिशुपाल याच तोंडाने 'भीष्माला अग्रपूजा द्या.' म्हणत होता.भीष्मही राजा नव्हता. शिशुपाल कृष्णाचा प्रतिस्पर्धी होता; जरासंधाच्या प्रमुख सेनापतींपैकी होता. प्रत्येक बाबतीत कृष्णाने आपल्यावर कडी केली म्हणून चिडलेला होता. त्याच्या आरोपामध्य काही खरे, काही खोटे असे होते. भीष्माबद्दल व कृष्णाबद्दल काही थोड्या लोकांना काय वाटत असे, हे त्याच्या तोंडून वदवले गेले आहे. कृष्णाच्या कृत्यांची छाननी केल्यास जी कृत्ये शिशुपालाने दोषास्पद ठरवली होती, ती तशी होती, असे म्हणता येत नाही. शिशुपालाचा वध हे मात्र काहीसे दोषास्पद वाटते. तो वधाला योग्यच होता. पण आवेशाने बोलत असताना भर सभेत कृष्णाने त्याच्यावर चक्र फेकून मारावे, हे कृत्य खटकल्याखेरीज राहत नाही. तसे करण्यावाचून गत्यंतर नव्हते, एवढे मात्र खरे ! सर्व राजसूय यज्ञ पार पडलेला होता. आलेल्या राजेलोकांचा सन्मान करून त्यांना परत पाठवणे एवढेच कृत्य उरले होते. पांडवानी भीष्माला पुढे करून कृष्णाला पहिले अर्घ्य देण्याचा घाट घातला. शिशुपाल उठून त्याने अर्घ्याला हरकत घेण्याचा अतिप्रसंग केला. बोलण्याने बोलणे वाढत चालले होते. राजे-लोकांच्यामध्ये चुळबूळ सुरू झाली होती. शिशुपाल युद्धाच्या गोष्टी बोलू लागला होता. अशा वेळी मंडपाबाहेर जाऊन युद्धाला सुरवात झाली असती तर मोठेच विघ्न झाले असते. एकटा शिशुपाल तडकाफडकी मारला गेल्यामुळे कोणाला काही करता येईना. हा प्रसंग झाल्यावर आश्चर्याने व भीतीने सर्व सभा स्तब्ध झाली. काही राजे चुळबुळत, हात चोळीत स्वस्थ बसले होते, असे महाभारतात वर्णन आहे. कृष्णाने शिशुपालाला असे मारले नसते, तर राजसूय यज्ञाचा शेवट मोठा वाईट झाला असता. शिशुपालाला मंडपातून रागारागाने बाहेर जाऊ देणे हे योग्य नव्हते.
 ह्या प्रसंगात ज्या एक दोन गोष्टी प्रामुख्याने लक्षात येतात, त्या इतर वेळीही येतात.

  1. मनुष्य जन्मला, म्हणजे त्याचे स्वतःचे वर्तन व सामाजिक संबंध त्याला एका कोंडीत पकडतात. त्याचा स्वतःचा ताबा नाही, अशा प्रसंगात तो सापडतो व त्याच्या हातून काही कार्ये होत राहतात. भीष्माच्याही बाबतीत आपण हेच पाहिले. धृतराष्ट्राच्या बाबतीत व महाभारतातील प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत हेच घडत गेले. 'भ्रामयन् सर्वभूतानि यन्त्रारूढानि मायया' असे हे अनाकलनीय व अटळ चक्र आहे. एकदा त्याच्यात मनुष्य सापडला की, त्याच्या कृत्याला ठराविक दिशा लागत जाते. प्रत्येक कृत्याच्या बाबतीत करू की न करू हे स्वातंत्र्य राहत नाही. एका ठरलेल्या दिशेने आयुष्याचा मार्ग जाऊ लागेल, तसेतसे हे स्वातंत्र्य कमी कमी होत जाते.
  2. आयुष्यामधील निवड खरे-खोटे, चांगले-वाईट अशा दोन टोकांमध्ये क्वचितच असते. थोडे वाईट, थोडे चांगले अशा मिश्र स्वरूपाच्या कृत्यांमधून माणसाला निवड करावी लागते. सर्व दृष्टींनी चांगले व सर्व दृष्टींनी वाईट, अशा तऱ्हेने निवड करायची संधी क्वचितच मिळते. त्यामुळे कोणचीही निवड केली, तरी थोडे वाईट येतेच. अगदी तोलून, मोजून-मापून पाहिले तर प्रत्येक व्यावहारिक कृत्यामध्ये काहीतरी दोषास्पद असतेच. त्यातूनही मोजून-मापून पाहणारा परीक्षक बहुतेककरून झाल्या-गेल्या गोष्टीबद्दल मते देत असतो. दोन किंवा तीन मार्गामधून कुठची निवड केली आणि त्याचे परिणाम काय झाले, हे त्याला दिसत असते. केलेल्या निवडीचे परिणाम काय झाले, हे ह्या मागाहून आलेल्या टीकाकाराला माहीत असतात. पण प्रत्यक्ष जी व्यक्ती स्वतःच्या आयुष्यात आणीबाणीच्या प्रसंगी दोन वाटांपैकी एक वाट टाकून दुसऱ्या वाटेने जाते, ती कितीही शहाणी व दूरदृष्टीची असली, तरी तिला संपूर्ण भविष्यज्ञान होत नाही. त्या व्यक्तीपुढे त्या प्रसंगाची, त्या क्षणाची आणीबाणी असते. त्यातच स्वतःचे क्रोध, मोह, एक प्रकारची कर्तव्यनिष्ठा, वगैरे विकार असतात. स्वतः कृष्णही ह्या दोन्ही नियमांना अपवाद नव्हता. तोही स्वतः केलेल्या कृत्यांच्या व स्वतः आखलेल्या ध्येयांच्या भोवऱ्यात सापडलेला होता. धीट प्रकृतीचा व विचारशील असूनही त्यालाही राग, मित्रप्रेम हे विकार होतेच. ज्या वेळी तो एखादे कृत्य करी, किंवा दुसऱ्याला एखादे कृत्य करण्याला प्रवृत्त करी, त्या वेळी त्याच्यापुढे जी निवड होती, ती उत्तम किंवा अधम यांच्यामधील नसून मिश्र अशा मध्यम प्रकारच्या कृत्यांमधील होती.

 सबंध महाभारतामध्ये त्याने केलेली मुख्य कृत्ये म्हणजे अर्जुनाच्या मदतीने खांडववनाचा दाह, जरासंध वध, शिशुपाल वध, पांडवांच्या वतीने कौरवांकडे शिष्टाई, द्रौपदीची लालूच दाखवून कर्णाला फोडण्याचा प्रयत्न, भीष्माला रथावरून खाली पाडण्यासाठी अर्जुनाचे मन वळवणे, द्रोणाचे धैर्य खचवण्यासाठी अश्वत्थाम्याला मारल्याचा बभ्रा करणे ही आहेत. खांडव दाहाबद्दल मागे लिहिलेच आहे. खांडवदाह-प्रकरणी नागांचा वंशच्छेद व एक मोठे अरण्य जाळणे ही दोन्ही कृत्ये आत्ता विचार केला तर गर्ह्य वाटतात. पण कृष्णाच्या वेळेला कोणीही हे कृत्य गर्ह्य मानले नाही. कृष्णाच्या प्रत्येक कृत्याबद्दल टीका करणाऱ्या शिशुपालालाही हे कृत्य गर्ह्य वाटले नाही. परवंशाबद्दल असहिष्णुता, शक्य तर त्यांचा उच्छेद ह्या गोष्टी पूर्वी सर्व जगातील लोक सरसकट करीत होते. कृष्णाने केले, ते त्याच्या काळाला व त्याच्या क्षत्रिय वर्णाला धरून होते. ते नसते केले, तर तो, आपल्याच युगातील असामान्य व्यक्ती न राहता देशकालातीत असामान्यत्व त्याला प्राप्त झाले असते. आपल्या जमातीतील नसलेल्या अशा सर्व मानव-जातीबद्दल करुणा हा गुणच महाभारतकालीन नव्हे! त्या वेळच्या इतर सुसंस्कृत देशांनासुद्धा तो गुण माहीत नव्हता. होमरचे इलियड वाचले, तरी हेच अनुभवास येते. सबंध मानव-जातीबद्दल कणव वाटली, ती पुढील युगांतील पुरुषांना बुद्धाला व ख्रिस्ताला ! भगवद्गीतेमध्ये कृष्णाने अर्जुनाला जो उपदेश केलेला आहे, त्यातील पहिले जेमतेम तीन अध्याय मूळ भगवद्गीता असावी असे वाटते. भगवद्गीतेच्या पुढील-पुढील अध्यायांत सांगितलेल्या जगन्मित्रत्व व जगाबद्दल करुणा ह्या दोन गुणांचा वासही महाभारतात नाही.
 'दया भूतेषु' 'अहिंसा' हे शब्द महाभारतात येतात, पण अहिंसेचा अर्थ प्राण्यांना न मारणे असा नसून मित प्रमाणात व ठरलेल्या नियमांना धरून मारणे असा होता. गीतेच्या पहिल्या किंवा दुसऱ्या अध्यायात 'कृपा' हा शब्द थोड्याशा हेटाळणीनेच वापरलेला आहे. 'कृपयाविष्ट' अर्जुन किंवा अर्जुनाची 'कृपयाविष्टता' हे एक क्षत्रियाला न शोभेसे वर्तन होते. 'विषीदन्तम्' हेही विशेषण क्षत्रियाला न शोभेसे आहे, ह्या विषादामुळे व करुणेमुळे अर्जुनाच्या हातून शस्त्रे गळून पडली होती. डोळ्यांतून पाणी वाहत होते. तो रथात बसून राहिला होता आणि ह्या तिन्हीबद्दल कृष्ण जी विशेषणे लावतो ती विचार करण्यासारखी आहेत. त्याला तो 'कश्मल' म्हणतो. 'कश्मल' ह्या शब्दाचे काळेबेरे किंवा पाप ह्या शब्दांनी मराठीत भाषांतर करण्यासारखे आहे. 'कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे सुपस्थितम्', ('अरे अर्जुना. ह्या आणीबाणीच्या वेळी हे रे काय तुझ्या मनात काळेबेरे आले आहे ?') असे हे वाक्य ! हे त्याचे कृत्य 'अनार्यजुष्ट', 'अस्वर्ग्य', 'अकीर्तिकर' असे होते, असे कृष्ण म्हणतो. अर्जुनाच्या ह्या कृतीला तो पुढे 'क्लैब्य' म्हणतो. त्याला वाटणाऱ्या करुणेला 'क्षुद्र हृदयदौर्बल्य' म्हणतो. ही कृष्णाची मीमांसा महाभारतामध्ये सर्व क्षत्रियांच्या मनाला धरून होती. 'अवाच्यवादांश्च बहून् वदिष्यन्ति तव' असे तो अर्जुनाला सांगतो. व 'आज नाही, तर उद्या मरायचेच आहे. सरळ सामना देऊन मर. कर्म, जन्म व जातीप्रमाणे आलेले कर्तव्य करण्याचाच फक्त तुला अधिकार आहे. त्या कर्मातून मला काही चांगले मिळेल किंवा वाईट मिळेल, ही चिकित्सा करण्याचा तुला अधिकार नाही. फलाशा धरू नकोस. कर्तव्य म्हणून कर्म कर' असे सांगतो. अशी महाकठीण, स्वतःबद्दल किंवा इतरांबद्दल करुणेचा लवलेश नसलेली ही नीती होती. त्याप्रमाणे क्षत्रिय पुरुषच नव्हे, तर गांधारी, कुंती व द्रौपदी या क्षत्रिय स्त्रियाही वागल्या.
 जरासंधवधाबद्दल वरती आलेच आहे. कृष्णाने तो उघड्या डोळ्यांनी कर्तव्य म्हणून करवला. ह्या कृत्यात नाव ठेवण्यासारखे काहीच नव्हते. शिशुपालवध ही घटना अटळ होती. कृष्णाने रागाच्या भरात ती केली हे जितके खरे, तितकेच महाभारतकथेच्या दृष्टीने त्यावेळी ती व्हावयालाच पाहिजे होती अशी होती. पांडवांचा राजसूय यज्ञ निर्विघ्नपणे पार पाडण्याची जबाबदारी कृष्णावर होती. त्यामुळे तो निरनिराळ्या कृत्यांत गोवला गेला होता. बोलाचाली वाढू देणे व यज्ञमंडपातच लढाई उभी करणे शक्य नव्हते. म्हणून शिशुपाल त्याच तऱ्हेने, तिथेच एकाकी, इतर राजे पुढे सरसावायच्या आत मारणे अत्यावश्यक होते. एक प्रकारे शिशुपाल गाफील होता, बोलावलेला पाहुणा होता. त्याला तशा तऱ्हेने मारणे योग्य नव्हते. पण त्यानेही पाहुणचाराच्या मर्यादा राखल्या नाहीत. आपल्या यजमानांचा, भीष्मासारख्या वृद्धाचा अपमान करून आपल्या शत्रूवर तोंडसुख घेण्याची संधी शिशुपालाने साधली. तेव्हा कृष्णाने असहाय किंवा निरपराध मनुष्याला मारले असेही होत नाही. एकदा आगळीक करण्यास सुरवात झाली, म्हणजे त्या आगळिकीस प्रत्युत्तर जितक्यास तितके, जेवढ्यास तेवढे देता येईल, असे होत नाही. शिशुपालाने शिव्या दिल्या, नाहक अपमान केला, याचा बदला परत शिव्या देऊन घेता आला असता. त्याऐवजी कृष्णाने त्याला मारून घेतला. आता हा बदला फार झाला असे वाटणे शक्य आहे. पण राजेलोकांत भांडण लागून मोठा रक्तपात झाला असता, तो एका शिशुपालाच्या वधामुळे टळला, असेही म्हणता येईल.
 पांडव वनवासातून आल्यावर ज्या मसलती झाल्या, त्यांत कृष्णाचा वाटा मोठा होता व सर्वस्वी योग्य असाच होता. शिष्टाईच्या वेळीही त्याने भांडण मिटावे, म्हणून पराकाष्ठा केली. 'अर्धे राज्य नाही. पाच गावे नाहीत, एवढेच नव्हे, तर सुईच्या अग्राखाली मावेल एवढीदेखील जमीन मी देणार नाही,' या दुर्योधनाच्या उत्तरामुळे लढाईखेरीज उपाय उरला नाही. कौरवांच्या दरबारातून कृष्ण निसटला. त्याने जाता-जाता वाटेत कर्णाला आपल्या रथावर घेतले व पांडवांच्या बाजूने कर्णाला फितवण्याचा प्रयत्न केला. कृष्णाला पकडले की पांडवांना लढणे अशक्य होईल, असा ज्याप्रमाणे दुर्योधनाचा कयास, तसाच कर्ण बाजूला निघाला, तर दुर्योधनाला पांडवांचे मागणे झिडकारता येणार नाही, हा कृष्णाचा कयास. सबंध उद्योगपर्वभर शह, काटशह असे प्रकार चालले होते. दुर्योधनाचा प्रयत्न आडदांडपणाचा होता. कृष्ण त्यातून निसटला व दुर्योधनाचा प्रयत्न फसला. कृष्णाचा प्रयत्न अगदी याउलट, मोठ्या चतुराईचा; पण कर्णाच्या दुर्योधनभक्तीपुढे व दुखावल्या स्वाभिमानापुढे तोही फसला. कृष्णाने कर्णाला सांगितले, बाबा, तू कुंतीचा कुवारपणाचा मुलगा. शास्त्रार्थाने त्या कुवारणीचे ज्याच्याशी लग्न झाले, त्याचाच तू होतोस. म्हणजे बापाकडून तू पांडव व आईकडून वृष्णिकुलातला आहेस. माझ्याबरोबर ये, पांडवांना तू कुंतीचा मुलगा, युधिष्ठिराचा थोरला भाऊ, हे कळू दे. मी तुला राजा म्हणून अभिषेक करवतो. पांडवांतला सहावा म्हणून द्रौपदी तुझी होईल. (षष्ठे च त्वां तथा काले द्रौपद्युपगमिष्यति।) धर्म तुझा युवराज होईल, भीम तुझ्यावर चवरी धरील, अर्जुन तुझे सारथ्य करील. वृष्णी व पांचाल तुझे सेवक होतील. 'वसुषेण' म्हणून तुझ्या नावाची द्वाही फिरेल' कृष्णाने ह्या ठिकाणी कर्णाच्या पाळण्यात ठेवलेल्या 'वसुषेण' नावाचा उच्चार केला. सेन हा प्रत्यय क्षत्रियांच्या नावापुढे असे. त्या नावावरून त्याचे क्षत्रियत्व प्रतीत होते. कर्ण वैकर्तन (कानफाट्या) हे टोपणनाव उच्चारलेच नाही, हाही कृष्णाचा शहाणपणाच.
 ही लालूच तर फारच मोठी होती, पण कर्ण बधला नाही. राज्य, मोठेपणा व त्यामुळे द्रौपदी आणि बलाढ्य क्षत्रिय-घराण्यांशी संबंध व मैत्री एवढे सर्व सूतवंशातील कर्णाला मिळणार होते. ही सर्व वचने पाहिली म्हणजे भावा-भावांतील युद्ध थांबवण्याचा कृष्णाने किती निकराने प्रयत्न केला हे दिसते. कर्ण कोणत्याही मोठेपणाला बळी पडणार नाही हे माहीत होते, म्हणून कृष्णाने अशी भरमसाट प्रलोभने दाखवली, हे म्हणणे योग्य वाटत नाही. पांडव-कृष्णाचे एवढे ऋणी होते की, मी सांगेन ते ते ऐकतील, अशी कृष्णाची खात्री होती, म्हणून त्याने ही विलक्षण प्रलोभने कर्णाला दाखवली. ही दाखवीत असता राज्य मिळेल, ह्या आशेवर बसलेल्या धर्माचा त्याने गळा कापला, किंवा बिचाऱ्या द्रौपदीचा सौदा केला, असे दोन्ही आक्षेप त्याच्यावर येतील पण त्याने शिष्टाई दांभिकपणे केली, हा आरोप खासच येणार नाही. परत एकदा कृष्णाची मूल्ये ही त्या काळाची मूल्ये होती, हे निदर्शनाला येते. धर्म मोठा भाऊ म्हणून राज्याचा वारस होता. एखादा मनुष्य धर्मापेक्षा वडील, त्याच्या आईचा मुलगा म्हणून राज्याचा वाटेकरी असा पुढे आला असता व इतर भावांनी त्याला मान्यता दिली असती, तर त्याला राज्य मिळण्याचा चांगलाच संभव होता. राज्याचा वाटा कुंतीच्या मुलांना मिळावा व युद्ध टाळावे, अशा दोन गोष्टी कृष्ण साधू पाहत होता. आपण मित्राचा विश्वासघात करतो आहे असे त्याला वाटले नाही. द्रौपदीचे अर्जुनावर प्रेम असूनही तिला सर्व पाच जणांची बायको व्हायला लागले होते. त्यात एकाची भर पडली म्हणून काही वावगे झाले, असे त्याला वाटले नाही. बायकांना मन असते, ही गोष्ट त्या वेळचे कोणतेच पुरुष- भीष्म, वसुदेव, पांडव, कृष्ण-कोणीच मानीत नसत. जे इतर क्षत्रिय करीत असत, तेच ह्या बाबतीत कृष्णानेही केले. द्रौपदीला चीड आली असती किंवा नसती, हा विचार त्याच्या मते गौण होता.
 भीष्माचा पराभव व द्रोणाचा वध ह्या दोन्ही वेळी त्याचे कृत्य असेच सर्वस्वी समर्थनीय होते. आजोबांना मारू नये, गुरुंना मारू नये हे जितके खरे, तितकेच आजोबाने किंवा गुरूने नातवाविरुद्ध व शिष्याविरुद्ध लढाईला उभे राहू नये, हेही खरे ! एक आगळीक झाली की, त्याला प्रत्युत्तर म्हणून दुसरी आगळीक करणे प्राप्तच होते. एकदा लढाईला उभे राहिले, म्हणजे ती शेवटपर्यंत नेणे हे कर्तव्यच होते. भीष्माला मार, किंवा द्रोणाला मार, असे त्याने सांगितले नव्हतेच. भीष्माला घायाळ करून लढाईतून बाजूला सारणे एवढाच त्याचा उद्देश होता. त्याचप्रमाणे भीमाने व धृष्टद्युम्नाने द्रोणाचा रथ पकडल्यावर तो तसाच हाकून गुरुजींना पकडून आणले असते, तरी कृष्णाला पुरले असते. द्रोणाला मारून धृष्टद्युम्नाने वडिलार्जित वैराचा सूड उगवला, हा काही कृष्णाचा अपराध नाही. अश्वत्थामा मेला, ही खोटी हूल उठवायची हाही प्रकार अपरिचित नव्हता. अगदी ह्याच उपायाने हंस व डिम्भक हे जरासंधाचे दोन सेनानी मारले गेले होते. कृष्णाने शिष्टाईच्या वेळेला युद्ध टळावे, म्हणून जशी पराकाष्ठा केली, तसाच युद्धाला एकदा उभे राहिल्यावर ते जिंकावे, म्हणून जिवाचा आटापिटा केला. हीच गोष्ट कर्णाच्याही बाबतीत लागू पडते. जे लढाईला उभे राहिले होते, त्या सर्वांनी आगळीक केलेलीच होती, त्यांतील कोणीही निर्व्याज किंवा निरपराधी नव्हता. त्यांना कृष्णाने मारवले, ते काही गाफील अवस्थेत नाही. एवढे म्हणता येईल की, एकदा युद्धात उभे राहिल्यावर कृष्णाने कोणत्याही तऱ्हेची दयामाया दाखवली नाही. आपल्याला कोणी दयामाया दाखवील, अशी त्याची आशा नव्हती. सर्व लोक मारले गेले, केवळ दुर्योधन उरलेला होता. प्राणभयाने तो लपून राहिलेला होता. तो प्रत्यक्ष दयेची याचना करणारा नव्हता. पण बापाकडून दडपण आणून प्राण वाचवावा, असा त्याचा प्रयत्न असावा, असे वाटते. अगदी निष्ठुरपणे कृष्णाने तोही प्रयत्न हाणून पाडला. दुर्योधन जिवंत राहता, तर त्याने पांडवांना सुखाने राज्य करू दिले नसते, अशी कृष्णाची मनोमन खात्री होती.
 दुर्योधन मेल्यानंतर पांडवांना धृतराष्ट्र व गांधारी यांच्यापुढे जाण्याचा धीर झाला नाही. परत कृष्णालाच दुर्योधन मेल्याचा निरोप घेऊन त्यांच्याकडे जावे लागले. गांधारी व धृतराष्ट्र यांच्याशी बोलत असतानाच दूत येऊन दुर्योधनाच्या व अश्वत्थाम्याच्या शेवटच्या संभाषणाची बातमी सांगत असताना काहीतरी दगाफटका आहे, हे हेरून, आपले भाषण अर्धवट टाकून, घाईघाईने निरोप घेऊन कृष्ण पांडवांच्या शिबिराकडे परत आला. पांडव आणि द्रौपदी यांना घेऊन तो कौरवांच्या ओसाड शिबिरात येऊन राहिला. कृष्णार्जुन जातील, तिथे सात्यकी असायचाच, या न्यायाने सात्यकीही बरोबर होता. रात्रीच्या छाप्यात व निर्घृण कत्तलीत द्रौपदीची मुले व भावंडे मारली गेली पण पांडव वाचले.
 ह्याही घटनेत कृष्णाला दोष देण्यासारखे काहीही नाही. जासुदाच्या बोलण्यावरून काहीतरी घातपात होणार, असे कृष्णाला वाटले. पण तो घातपात नक्की काय होणार, हे काही त्याला कळले नव्हते. मुख्य युद्ध दुर्योधन-पांडवांचे होते. सूडाचे उद्देश्य पांडवच असणार, असे त्याला वाटले असले पाहिजे. लढाई जिंकल्याच्या उन्मादात लढाईच्या वेळची शिस्त व जागरूकपणा पार नाहीसा झाला होता. जे ते नाच-रंगात व दारू पिण्यात दंग होते. प्रत्यक्ष सेनापती धृष्टद्युम्नाची व इतर मोठमोठ्या लोकांची परिस्थिती ही होती. सैन्याची काय होती, हे सांगायलाच नको. कृष्ण हस्तिनापुराहून परत आला, तो रात्र पडली होती. अशा वेळी ह्या अस्ताव्यस्त शिबिराला परत सुस्थित करणे हे दुष्कर काम होते. त्यातूनही ज्यांच्यासाठी सबंध लढाई व वैर उत्पन्न झाले होते, त्या पांडवांनाच बाजूला काढले म्हणजे झाले, असे कृष्णाला वाटले असले पाहिजे. कृष्णाला देवत्वाच्या कोटीला पोहोचवून त्याला सर्व किंवा त्रिकालज्ञ करायचे आणि मग त्याने न केलेल्या गोष्टींचेही कर्तृत्व त्याच्याकडे चिकटवायचे, किंवा त्याच्या हातून काही गोष्टी घडल्या नाहीत, म्हणून त्याला दोष द्यायचा, हे दोन्ही चुकीचे आहे. अर्जुनाने सुभद्रेशी लग्न करावे, म्हणून त्याला वनवास घडवायचा; त्रिदंडी संन्यास घ्यायला लावायचा, आणि यती म्हणून त्याला अंतःपुरात आणून बसवायचा; बलरामदादाला फसवायचे, वगैरे ज्याप्रमाणे कृष्णाने केले नाही, त्याचप्रमाणे पुढे काय होणार हे कळून सर्वांना वाचवण्याची शक्यता असताही पृथ्वीला भार झाला आहे, म्हणून सर्व योद्ध्यांना अश्वत्थाम्याच्या हातून मारवले, हेही कृष्णाने केले नाही.
 अभिमन्यूचा मुलगा परीक्षित म्हणजे सुभद्रेचा, कृष्णाच्या बहिणीचा नातू पुढे हस्तिनापूरच्या राज्यावर बसला. ह्यातही कृष्णाचे काही कर्तृत्व वा कारस्थान नव्हते. अज्ञातवासाच्या शेवटापर्यंत पांडवांच्या कुठल्याच मुलाचे लग्न झालेले नव्हते. निदान महाभारतात तसा उल्लेख नाही. सत्यभामेस घेऊन कृष्ण वनवास सरता-सरता पांडवांना भेटण्यास आला होता. मुलांची खुशाली व अस्त्रविद्येतील त्यांची प्रगती ह्याबद्दल त्याने द्रौपदीस सांगितले. मुलांची लग्ने झाली असती, तर तसा उल्लेख ह्या वेळी यावयास पाहिजे होता. अर्जुन बृहन्नडारूपाने मुलीला नृत्य शिकवीत होता, हे कळल्यानंतर, 'तूच उत्तरेशी लग्न कर, म्हणजे योग्य होईल.' असे विराटाने सांगितले. चार दिवस अंबा हस्तिनापुरात राहिली, तर शाल्व तिच्याशी लग्न करीना, तर वर्षभर अर्जुनाबरोबर नृत्य शिकणाऱ्या उत्तरेला दुसरा नवरा मिळणे जडच गेले असते. 'मी तिच्याकडे पितृभावनेने पाहतो. माझ्या मुलाशी तिचे लग्न होऊ दे', हे अर्जुनाचे उत्तर मिळाल्यावर द्वारकेहून अभिमन्यूला बोलावले; अर्जुनाला द्रौपदीच्या पोटी झालेला मुलगा होता, त्याला का नाही बोलावले ? उत्तर सरळ आहे. द्रौपदीला पाच मुले होती. त्यांपैकी धर्माचा मुलगा वडील होता. द्रौपदीने द्युताच्या वेळी त्याचा उल्लेख 'युवराज' म्हणून केला होता. द्रौपदीच्या मुलांची लग्ने एक तर एकामागून एक ओळीने झाली असती, किंवा सर्वांची एकदम झाली असती. त्यातल्या मधल्याचे सर्वांआधी होणे शक्यच नव्हते. अभिमन्यू अर्जुनाचा मुलगा, पण पांडवांच्या पट्टराणीचा नसल्यामुळे राज्याचा वारस नव्हता. तो वारसांपैकी दुय्यम होता, नव्हताच म्हणावयास हरकत नाही.
 त्याच्या लग्नाने एक मोठी सोयरीक जडत होती. अर्जुनाचा मुलगा हा मोठेपणा होताच व दुसरा काही वांधा येत नव्हता. द्रौपदीची मुले मारली जातील, असे कोणाच्या स्वप्नीही नव्हते. अभिमन्यूने, घटोत्कचाने व इरावताने लढाईच्या खाईत उड्या घेतल्या पण द्रौपदीच्या मुलांच्या बाबतीत तसे दिसून येत नाही. ती मुले राज्याची वारस होती. ती सर्व लढाई झाल्यावर जिवंत होती. अश्वत्थाम्याने कपटाने व क्रूरपणाने त्यांची हत्या केली नसती, तर ते युवराज म्हणून वावरले असते; त्यांची लग्ने झाली असती, पण ते मारले गेले. शेवटी अभिमन्यूचा मुलगा पोटात होता, तो मरतामरता वाचला व राजा झाला. ह्यात कृष्णाचे काही कारस्थान नव्हते. कृष्ण शहाणा होता, दूरदर्शी होता, पण त्रिकालज्ञ व सर्वशक्तिमान नव्हता. त्याने आपल्यापुरती काही उद्दिष्टे ठेविली होती, पण ती पुरी करताना त्याने स्वतःला काही मूल्यांची मर्यादाही घातली होती. आपल्या मुलांना राज्य मिळवण्याची ज्याने खटपट केली नाही, तो आपल्या भावांच्यासाठी काही हीन कारस्थान करील असे संभवत नाही.
 कृष्ण-पांडवांच्या मैत्रीमुळे पांडवांचा सर्व तऱ्हेने लाभ झाला. स्वकुळाच्या दृष्टीने व अगदी स्वतःच्या दृष्टीने कृष्णाचाही लाभ झाला. जरासंध मारला गेला व सर्वोत्तम क्षत्रियाग्रणी म्हणून क्षत्रियसभेत पहिला मानाचा अर्घ्य मिळाला; पण कृष्णाची अर्जुनाशी जी मैत्री होती; ती निरपेक्ष होती. कृष्णाला अर्जुनाची गाढ मैत्री मिळाली, पण दुसरा व्यावहारिक लाभ झाला नाही. कृष्णाने तितक्याच उत्कटतेने अर्जुनाला जीव लावला व आपली सर्व प्रज्ञा, साहस अर्जुनाचे शरीर, यश व आत्मा ह्यांचे धारण व संरक्षण करण्यात घालवली.
भीष्मपर्वात, द्रोणपर्वात व कर्णपर्वात अर्जुनाने निरनिराळ्या तऱ्हेने कृष्णापुढे मोठे कठीण पेच टाकले. जे करायला पाहिजे त्यात माघार घेतली, जे करायला महाकठीण त्यात उताविळीने उडी घेतली, जे क्रमप्राप्त ते त्यावेळी थांबवण्याचा घाट घातला. अर्जुनाच्या कीर्तीला कायमचा काळिमा लागण्याचा संभव होता, अर्जुनाच्या शरीराला अपाय होण्याचा संभव होता, अर्जुनाचे मन खचले होते. ह्या सर्वांतून कृष्णाने त्याला वाचवले. आपल्या स्वतःला कृष्णाने जपले नाही, इतके अर्जुनाला जपले. गीतेत म्हटल्याप्रमाणे अगदी अक्षरशः कृष्णाने अर्जुनाचा 'योगक्षेम' वाहिला.
 ह्या सर्व वृत्तान्तात कृष्ण अर्जुनाशी बरोबरीच्या... गाढ मैत्रीच्या नात्यानेच वागत होता, असे दिसते. गीतेच्या पुढच्या पुढच्या अध्यायांत म्हटल्याप्रमाणे अर्जुनाला कृष्ण जर “त्वमादिदेवः पुरुषः प्रमाणम्” असे वाटते, तर कृष्णाला भीष्मावर चालून जाण्याचे, किंवा 'नुसते पाड, मारू नकोस,' अशी विनवणी करण्याचे कारणच पडले नसते.
 द्रोणपर्वात कृष्णार्जुनाचे नाते जास्ती बरोबरीचे व जिव्हाळ्याचे दाखवले आहे. "अर्जुन समोर असेपर्यंत मला पांडवांवर मात करणे शक्य नाही. तू त्याला दुसरीकडे अडकव, म्हणजे मी धर्माला बांधून जिवंत तुझ्याकडे आणतो," असे द्रोणाने सांगितल्यावरून अर्जुनाला संशप्तकांशी युद्धात अडकवण्याची युक्ती दुर्योधनाने योजिली. पहिल्या दिवशी धर्मास पकडता आले नाही. दुसऱ्या दिवशी द्रोणाने अभेद्य असा चक्रव्यूह रचला, अर्जुन संशप्तकांकडे गुंतला होता. एकट्या अभिमन्यूला व्यूह फोडणे माहीत होते. तो आत जाऊन शत्रूच्या तावडीत सापडून मारला गेला. अर्जुन संध्याकाळी परत येतो, तो मुलगा गेल्याचे त्याला कळले. "अभिमन्यू पुढे गेला, तेव्हा तुम्ही एवढे मोठे लढवय्ये काय करीत होता?" असे त्याने रागाने विचारले. तेव्हा धर्माने उत्तर दिले, "आम्ही त्याच्या मागोमाग होतो. पण सिंधुराज जयद्रथाने आम्हांला थोपविले. आम्ही शिकस्त केली, पण आम्हांला फळी फोडता आली नाही.' हे उत्तर ऐकल्यावर अर्जुनाने रागाच्या व दुःखाच्या भरात प्रतिज्ञा केली, "उद्या सूर्यास्ताच्या आत जयद्रथाला मारीन" सर्वच दृष्टीने ही प्रतिज्ञा विलक्षण होती. जयद्रथ व्यूहाच्या तोंडाशी होता; पांडवसैन्य अडवण्याचे त्याचे कामच होते. तो ज्या स्थानावर नेमला होता, त्या स्थानामुळे ही जबाबदारी त्याच्यावर पडली होती. अभिमन्यूशी लढून त्याला मारणारे निराळेच होते; त्यांना बाजूला सारून जयद्रथवधाची प्रतिज्ञा त्याने रागाच्या भरात केली ! जयद्रथ ही महाभारत-युद्धातली एक क्षुद्र व्यक्ती होती. धर्मराज त्याला 'क्षुद्र'च म्हणतो. अर्जुनाच्या प्रतिज्ञेने सगळेच मोठ्या चिंतेत पडले. कृष्णाने आश्चर्याने विचारले, "अरे, अशी काय प्रतिज्ञा करून बसलास? मला विचारले नाहीस, भावांना विचारले नाहीस, आणि रागाच्या भरात बोलून गेलास? आता कसे हे साहस पार पाडणार?" अर्जुनाचे उत्तरही अनपेक्षितच वाटते. अर्जुन आपल्या धुंदीतच होता. तो म्हणतो, "कृष्णा, मला काय हे अवघड का आहे? अरे, मी अमक्याला जिंकले, तमक्याला जिंकले. देव आले, तरी त्यांना जिंकीन. माझे धनुष्य, माझे बाहु व मला माहीत असलेली अस्त्रे ह्यांना कमी लेखू नकोस. बघशील उद्या. अगदी पहाटे रथ तयार ठेव मात्र ".
 कृष्णाने उत्तर दिले नाही. तो त्याच्या शिबिरात गेला. तेथे सुभद्रा रडत बसली होती. थोड्याच वेळाने द्रौपदी व उत्तराही आल्या. कृष्णाने त्यांचे सांत्वन केले, म्हणण्यापेक्षा शक्य तितक्या थोड्या वेळात, थोड्याशा कठोरपणानेच त्यांना वाटेला लावले. "सुभद्रे, अशी रडू नकोस. तुझा मुलगा वीरमरणाने मेला. आम्ही सर्वच त्या दिशेने चाललो आहोत. क्षत्रिय युद्धात मरायचे नाहीत तर कुठे मरायचे? त्याला स्वर्गप्राप्ती झाली आहे." हे काय सांत्वन? पुढे तो काय म्हणतो, "आता जा, उद्या तुला आनंदाची बातमी कळेल." आनंदाची बातमी कसली? तर तुझ्या शत्रूचे... जयद्रथाचे मरण ! ही काय आनंदाची बातमी? ह्या अशा प्रसंगांनी सबंध महाभारताची कठोर, कर्तव्यदक्ष भूमिका विशद होते. "मानवी भावनांना स्थान नव्हतेच का? कारुण्य, व्याकुळता ह्यांना वाव नव्हताच का?' असे वाटून मन घाबरे होते. "द्रौपदीला, सुभद्रेला व उत्तरेला चार गोष्टी सांग," असे म्हणून त्याने दुःखाने वेड्या झालेल्या त्या बायांना निरोप दिला व तो अर्जुनाच्या शिबिरात शिरला. त्याने हातपाय धुऊन, नवे दर्भ पसरून अर्जुनाची तृणशय्या केली. भोवती आयुधे ठेवली. अर्जुनाचे उपचार केले. ह्या कृत्यांनी अर्जुन ताळ्यावर आला. त्यानेही हातपाय धुवून कृष्णाचा सत्कार केला. कृष्णाने 'स्वस्थ नीज', असे म्हणून त्याचा निरोप घेतला. त्याच्या शिबिराभोवती रक्षणासाठी उत्तम योद्धे ठेवले व तो स्वतःच्या शिबिरात जाऊन उद्याची जबाबदारी कशी पार पाडावी, ह्याची चिंता करीत बसला. त्याने दारुकाला बोलावले व स्वत:चा रथ जोडून उत्तम शस्त्रांनी भरून ठेवावयास सांगितला. "अर्जुन नाही, तर मी जयद्रथाला मारीन. सर्व कौरवांना मारीन. मुलंबाळं, नातेवाईक कोणीही मला अर्जुनापेक्षा आवडते नाहीत. अर्जुनापाठीमागे मुहूर्तमात्रसुद्धा मी जगणे शक्य नाही. त्याचे शत्रू ते माझे शत्रू, त्याचे मित्र ते माझे मित्र. तो माझा शरीरार्ध आहे. हे उद्या सर्वांना समजेल. रथ तयार ठेव, कवच घालून तयार रहा. मी पांचजन्य वाजवला की असशील तसा रथ घेऊन ये." अशी त्याने दारुकाला आज्ञा केली. महाभारतातील कृष्णाने दुसऱ्या कोणाहीबद्दल हा जिव्हाळा, ही तळमळ दाखवलेली नाही. अर्जुनाला रात्री साक्षात श्रीशंकराचे दर्शन झाले वगैरे भाग सोडला, तर पुढचा भाग युद्धातील डावपेच व कृष्णार्जुनांचे विलक्षण युद्धकौशल्य ह्या दृष्टीने अतिशय वाचनीय आहे. 'लढाईत मोठा कोण, सारथी की रथी?' हा प्रश्न पडतो. सारथ्याचे कौशल्य अजबच होते. सारथ्य जाणणाऱ्याला नलोपाख्यानात 'अश्वहृदय' शब्द आहे. तो घोड्यांचे अंतरंग जाणणारा असावा लागे. आपले घोडे काय करू शकतील, हे त्याला कळत असे. त्यांना दाबावे केव्हा, दौडवावे केव्हा, हे त्याला समजत असे. ते दमलेले, भ्यालेले असले, तर त्याला ताबडतोब उमगावे लागे. दुसऱ्या बाजूने तो नुसता 'अश्वहृदय'च नाही, तर 'रथीहृदय'ही असावा लागे. योद्धा आता कोणता डावपेच लढवणार आहे, कोणते बाण वापरणार आहे, कोणते अस्त्र योजणार आहे हेही त्याला कळणे आवश्यक होते. कृष्ण व अर्जुन ही दोन शरीरे व एक आत्मा होते. एकमेकांना न बोलता एकमेकांचे हृदय कळत होते. रथी व सारथी ह्यांचे हे ऐकात्म्य ह्या पर्वात फारच उत्तम दिसते. ह्याशिवाय प्रतियोद्धे... ज्यांना तोंड द्यावयाचे ते काय करीत आहेत, काय योजीत आहेत, हेही सारथ्याला निमिषमात्रात कळणे अवश्य असे. सारथी स्वतः उत्तम रथी असेल, उत्तम योद्धा व अस्त्रविद्य असेल, तरच हे सर्व शक्य होते आणि कृष्ण हे सर्व होता. शिवाय अर्जुनाला प्रेमाने बांधला गेला होता.
 अर्जुनाला लांब गुंतवून धर्माला पकडणे हे साध्य ह्या दिवसापुरते तरी दूर ठेवणे कौरवांना प्राप्त होते. जयद्रथाला सर्वांत पाठीमागे ठेवून अर्जुनाला तेथपर्यंत पोहोचणे अशक्य करणे एवढाच ह्या दिवसाचा दुर्योधनादींचा प्रयत्न होता. एकेका योद्धयाच्या हाताखाली एकेक सैन्यविभाग होता. प्रत्येक आपल्या सैन्यानिशी अर्जुनावर तुटून पडत होता. पहिली सलामी खुद्द द्रोणाशीच झाली. द्रोणाच्या सैन्याला पळवून लावल्यावर वाट सापडताच कृष्णाने रथ पुढे काढला. द्रोणाने अर्जुनाला आव्हान केले, 'असा निसटून काय जातोस? ये ना माझ्याशी दोन हात करायला' तेव्हा 'नमस्कार गुरुजी, आज नाही', म्हणून अर्जुन पुढे सरकला. दु:शासन आडवा आला, त्याला घायाळ करून रथ पुढे निघाला. भोजाच्या सैन्याची अशीच दाणादाण झाली. पक्ष्यांच्या भरारीने जाणारे घोडे छिद्र सापडेल तेथून वाट काढीत होते. अर्धा दिवस कंदन झाले. घोडे थकले होते. अर्जुन म्हणाला, "मी शत्रूला संभाळतो, तू घोड्यांची चाकरी कर" त्याने रथातून उडी टाकली व तो रथापुढे जमिनीवर उभा राहून युद्ध करू लागला. मागच्या बाजूने कृष्णाने घोडे सोडले, त्यांच्या पाठीवर रुतलेले शर काढले, त्यांना पाणी पाजले जमिनीवर लोळू दिले, त्यांच्या अंगावरून हात फिरविला. हे सर्व शांतपणे, न घाबरता चालले होते. घोडे ताजेतवाने झाले. अर्जुनाने आपल्या बाणवर्षावाने सर्वांना थोपवून धरले होते. त्याने रथावर परत उडी घातली व रथ चालू लागला. घोडे, सारथी व रथी सर्वच एकमेकांचे हृदय जाणणारे होते.
 इकडे धर्मराजाचा जीव थोडथोडा होत होता. त्याने दारुकाच्या रथातून शैनेय सात्यकीला अर्जुनाकडे पाठवले. भीमही थोड्या वेळाने आला, व अर्जुनाच्या प्रवासाला गती मिळाली. शेवटी तो जयद्रथाजवळ पोहोचला. जयद्रथाचा रथ व पताका त्याने मोडून टाकली, व शेवटी जयद्रथाचे शीर उडवले. दोघा मित्रांनी एकमेकांचे अभिनंदन केले.
 एका दिव्यातून अर्जुन पार पडला होता. पण अजून त्याला सांभाळायचे होते. त्या दिवशी दोन्ही बाजूंना इतका त्वेष चढला होता की, पलिते लावून रात्री लढाई पुढे चालू झाली. योद्धयांना मध्ये थोडी विश्रांती मिळाली. सूर्य उगवल्यावर परत युद्धाला तोंड लागले. ह्या रात्रीच्या युद्धात कृष्णाने घटोत्कचाला इरेला घातले. शेवटी त्याच्यापुढे ठिकाव लागेना, तेव्हा दुर्योधनाच्या विनंतीवरून कर्णाने अमोघ अशी वासवी शक्ती त्यावर सोडली व घटोत्कच मेला. घटोत्कचाच्या मृत्यूमुळे पांडव दुःखात बुडाले, तर कृष्ण आनंदाने नाचतच सुटला. शेवटी अर्जुनाला कृष्णाला दाबणे भाग पडले. "अरे, एवढा वीर पडला, तर तू आनंदाने नाचतोस का?" "बाबा रे, कर्ण जी शक्ती तुला मारण्यासाठी जपून ठेवीत होता, ती फुकट गेली म्हणून" कृष्णाने उत्तर दिले. इकडे धर्म संतापला होता. "अभिमन्यू मेला, तेव्हा अर्जुन नव्हता. अर्जुन असताना घटोत्कचासारखा गुणी मुलगा मारला गेला. किती त्याने आमची सेवा केली होती. त्याच्याबद्दल कोणीच काही म्हणत नाही. मुख्य शत्रूना मारायचे सोडून त्या क्षुद्र जयद्रथापायी एक दिवस फुकट गेला. आता मीच जातो द्रोणाला व कर्णाला मारायला" असे म्हणून तो निघाला होता. कृष्णाने चार युक्तीच्या गोष्टी सांगून त्याला थोपवले. दोन्ही बाजू रात्रंदिवस लढून दमल्या होत्या, तो दिवस युद्ध झाले. मग रात्रीची झोप झाल्यावर पुढल्या दिवशी द्रोण मारला गेला. अर्जुनाकडून कर्णाला मारवायचे होते. द्रोणाच्या वधामुळे अर्जुन खिन्न झाला होता. पांडवांमध्ये आपापसातच चांगली मोठी भांडणे लागली होती. सात्यकीचे व धृष्टद्युम्नाचे हमरीतुमरीवरून युद्धच जुंपायचे, पण कृष्ण मध्ये पडला.
 कर्णाच्या रथाचे चाक खाली गेले, तेव्हा अर्जुनाने त्याला मारले. तो अर्जुनाला थांबण्याची विनंती करीत होता. धर्माच्या गोष्टी बोलत होता. पण कृष्णाने त्याला उसंत मिळू दिली नाही. मागची सर्व वर्मे काढून, "कोठे गेला होता धर्म तुझा तेधवा वृषा सांग," [कर्ण क्व ते धर्मस्तदा गतः] ह्या पालुपदाने अर्जुनाची सर्व अपमानाची आठवण कृष्णाने धगधगत जिवंत ठेविली. कर्ण मारला गेला.
 लढाई संपली; पण कृष्णाचे काम संपले नव्हते. केवळ अर्जुनाला नाही पण इतरांनाही त्याने परत वाचवले. गांधारीचा राग व शाप स्वतःवर घेतला. कृष्णाचे पाठीराखेपण नसते, तर पांडवांना कौरवांचा निःशेष नाश करणे शक्य नव्हते, हे गांधारीने जाणले होते. माझा एकही मुलगा तू जिवंत ठेविला नाहीस, असा ती कृष्णाला बोल लावते. ज्या भीमाने तिची मुले मारली, त्याला ती दोष देत नाही. "आमच्या कुलाचा जसा सर्वनाश झाला, तसा तुझ्याही कुलाचा होईल. आम्ही जसे मेलो, तसे तुम्हीही आपापसांत भांडून मराल." असा तिने कृष्णाला शाप दिला. कृष्णाने तो शापही हसत झेलला. "बये! अपराध केलास; मुलाला वेळीच आवर घातला नाहीस, आता कशाला उगीच तळतळाट करतेस ?" असे त्याने गांधारीला बजाविले. "आम्ही यादव इतके बलाढ्य आहोत की, आमचा नाश करील, असा बाहेरचा शत्रू नाही. आमचा नाश झाला, तर आमच्याच मूर्खपणाने," असे त्याने सांगितले.
 यादवांच्या विनाशाला एक पर्व खर्च पडले आहे; पण ते अगदी लहान आहे. एवढेच नव्हे तर पंधरा वीस श्लोकांच्या एका अध्यायात जे सांगितले आहे, त्याचा दुसऱ्याशी मेळ नाही. एका अध्यायात सांगितले आहे की, ऋषीच्या शापाने सांबाला मुसळ झाले. त्याचे चूर्ण करून समुद्रात फेकून दिले व राज्यात द्वाही फिरवली की, जो कोणी दारू पिईल, त्याला राजा कडक शिक्षा करील. त्याच्याच पुढच्या अध्यायात सांगितले आहे की, सर्व यादव समुद्रतीरी जत्रेला गेले व रामकृष्णांसह सर्वच यथेच्छ दारू प्याले व त्या धुंदीत एकमेकांची उणीदुणी काढू लागले. समुद्रतीरी म्हणजे कुठे ? काय द्वारका समुद्रतीरी नव्हती? द्वारकेच्या सर्व बाजूला भरभक्कम तटबंदी होती. म्हणून किनाऱ्याला लागायचे तर द्वारकेतून बाहेर पडावे लागे, असे दिसते. दारू पिऊ नये, अशी द्वाही राजाने फिरवली असता सर्वजण दारू प्याले कसे ? का मद्यपान निषेधाचे प्रकरण जैन कथेतून महाभारतात घुसले? पहिली कुरापत शैनेय सात्यकीने हार्दिक्य कृतवर्म्याची काढली. "बिचाऱ्या द्रौपदीची निजलेली मुले अश्वत्थाम्याच्या मदतीने तू मारलीस हे कृत्य फारच वाईट" "असे होय ! मग भूरिश्रव्याचे हात तुटले असता तू त्याचे शिर कापलेस, हे काय चांगले केलेस?" असे हार्दिक्याने विचारले. त्यातच सात्यकीने स्यमंतकमण्याच्या चोरीचे जुने प्रकरण उकरून काढल्यामुळे सत्यभामा रडायला लागली. सात्यकीचे व कृतवर्म्याचे युद्ध जुंपले. त्यात कृतवर्मा मारला गेला. सात्यकी इतरांनाही मारीत सुटला तेव्हा भोज व अन्धक एक होऊन त्याच्या भोवती जमले, व जेवणातील उष्टी भांडी त्याच्यावर फेकू लागले. हे पाहून प्रद्युम्न सात्यकीच्या मदतीला धावला, पण ते दोघेही त्यात मारले गेले. एका बाजूने वृष्णि-शैनेय व दुसऱ्या बाजूने अन्धक-भोज अशी लढत जुंपली. पाहता -पाहता सांब, प्रद्युम्न, चारुदेष्ण, अनिरुद्ध हे असे मारले गेले. हा संहार पाहून कृष्ण रागावला, व एक मूठ लव्हाळे उपटून मारणाऱ्यांना त्याने ते मारले. तो ते लव्हाळे लोखंडाचे झाले व ज्याच्यावर मारले तो मेला. हे पाहून जो-तो लव्हाळे उपटून एकमेकांना मारू लागला. मोठा संहार झाला. हे पाहून राम व त्याच्या मागोमाग कृष्ण ह्या दंगलीतून बाहेर पडले. कृष्णाने बभ्रूला सांगितले, "मी बाहेरच राहतो; तू बायका-मुलांना नीट संभाळून आत ने" ते करीत असता बभ्रूच मारला गेला, तेव्हा बलरामाला थांबावयास सांगून कृष्ण सर्वांना घेऊन द्वारकेत गेला व वसुदेवाकडे जाऊन म्हणाला, "तुम्ही सर्वांना संभाळा. अर्जुन येईल व सर्वांची व्यवस्था करील. मी बलरामाला थांबायला सांगितले आहे, तिकडे जातो." तो त्वरेने बाहेर पडला. दारुकाला त्याने अर्जुनाकडे पाठविले. तो रामाकडे जातो, तो रामाचे प्राणोत्क्रमण होत होते. रामाचा अंत पाहून तो झाडाखाली योगस्थ बसला, एवढ्यात एका पारध्याचा बाण लागून तोही मेला.
 दारूच्या धुंदीत एकमेकांना मारून सर्व कुल मरणे जरा कठीणच वाटते. बभ्रू, बलराम व कृष्ण हे तरी यादवांच्या हातून मेले नाहीत. म्हणजे यादवांच्या धुंदीचा व मारामारीचा फायदा घेणारा शत्रू निर्माण झाला होता, असे दिसते. त्यामुळेच द्वारकेभोवतालचा प्रदेश निर्धास्त नव्हता. तो शत्रू जुन्या क्षत्रिय घराण्यातील नसून भारतात नवीनच आलेल्या आभीरांच्या टोळ्या होत्या. त्यांनीच अर्जुनालाही जेरीस आणले.* कृष्णाच्या मृत्यूची बातमी ऐकून म्हाताऱ्या वसुदेवाने हाय खाल्ली व अंथरूण धरले. अर्जुन आल्यावर मरणोन्मुख वसुदेव


 

*ह्याच 'आभीर' लोकांनी काठेवाड, गुजरात व उत्तर महाराष्ट्रात ऐतिहासिक काळात राज्य केले, असे दाखले आहेत. ज्यांना 'अहीर' म्हणतात, खानदेशातील अहिराणी बोली ह्या आभीरांच्या वंशजांची असावी. ह्याच लोकांनी पुढे यादवांशी आपला संबंध जोडला. बहुतेक आपण क्षत्रिय आहो, हे दाखवण्याचा तो प्रयत्न असावा. यादवांबरोबर कृष्णालाही त्यांनी आपल्यातला देव बनवला असला पाहिजे. त्यामुळेच महाभारतातील राजकारणी योद्धा 'गोपाल'-कृष्ण झाला असावा. गोपालकृष्णाचा गोपीकृष्ण कोणी व कधी केला, हे मात्र महाभारतकथेवरून कळत नाही.

त्याला म्हणाला, "बाबा, ज्या प्रद्युम्न-सात्यकीचे तू गुणगान करीत होतास, ते तुझे दोघे भक्त व शिष्यवर ह्या सगळ्या अनर्थाला कारण आहेत" अर्जुनाने वसुदेवाला राजाच्या इतमामाने जाळले, मग रामकृष्णांसह सर्व मृत यादववीराना जाळले. वसुदेव सर्वांत वडील, म्हणजे तोच यादवांचा राजा होता का? का बलराम राजा व वसुदेवाचा मान? दुर्योधन राजा, पण धृतराष्ट्र जिवंत होता म्हणून त्याला 'महाराज' म्हणत, तसाच प्रकार होता की काय?
 बलराम, कृष्ण वृद्ध होऊन गेले. वसुदेव तर कुंतीचा भाऊ व राम-कृष्णांचा बाप म्हणजे खूपच म्हातारा. कृष्णाची मुले अभिमन्यूपेक्षा थोडी वडील असतील, म्हणजे पन्नाशीच्या आतबाहेर. ह्या संहारात तिसरी पिढी जिवंत राहिली. ती परीक्षिताच्या वयाची, म्हणजे पस्तीस छत्तीस वर्षांची होती. ते कसे जिवंत राहिले ? का अतिवृद्ध वसुदेव व ही नातवंडे ह्यांना ठेवून फक्त मधल्या दोन पिढ्यांची माणसेच यात्रेला गेली होती? ही पासष्ट ते पंचाहत्तर वयाची माणसे व त्यांचे मुलगे दारू पिऊन शुद्ध विसरून एकमेकांशी भांडून मेली, असे समजायचे का? महाभारत व सर्व पुराणे असेच सांगतात. काही दिवसांतच द्वारका पाण्यात बुडाली. धरणीकंपाने का? ह्या संबंध किनाऱ्यावर वारंवार धरणीकंप होत असत, अजूनही होतात. तसाच प्रकार झाला असावा का? 'एरका' नावाचे गवत लोहाचे झाले, ह्याचा अर्थ काय? एरका नावाच्या सरळ टणक गवताच्या कांड्यांचे बाण करून त्यांना लोखंडाची पाती लावणारे काही लोक होते व त्यांनी यादव धुंदीत आहेत, असे पाहून त्यांचा नाश केला काय? किती तरी प्रश्न मनात उद्भवतात. द्वारकेच्या उत्खननात असे दिसते की, द्वारका कधीतरी पाण्याखाली बुडाली व परत वसवली गेली. एकदा का अनेकदा? ह्याचे उत्तर देण्याइतका पुरावा अजून सापडलेला नाही.
 अंताच्या क्षणापर्यंत कृष्ण शांत राहिला. ह्या अवस्थेत जेवढी निरवानिरव करणे शक्य होते, तेवढी त्याने केली. तो रडला नाही. सर्व मुले डोळ्यांदेखत मेली होती, तरी रडला नाही. द्वारकेत त्याने पाऊल घातले, ते वसुदेवाला निरोप सांगण्यापुरते. सर्व स्त्रिया आकान्त करीत होत्या. पण हा थांबला नाही. बलराम तर कुठच्याच कृत्यात पुढाकार घेत नसे. तो आधीच निघून गेला होता. कृष्णाने उरलेल्या यादवांचा भार शिरावर का घेतला नाही? व्याधाने मारले नसते, तरी तो प्रायोपवेशनाने मरणाच्याच तयारीत होता, असे का ? वृद्ध वसुदेवाला त्याने सर्वांना संभाळण्यास का सांगितले? ह्या भयंकर क्षणीही कृष्णाने विचार केला असेल का? तरुण पोरे दुसऱ्याच्या आश्रयाला गेली, तरी हरकत नव्हती. यदुवंशाची रोपटी जिवंत होती. ती वाढवणे पांडवांना शक्य व जरूरच होते. पण आपण कसे परघरी दैन्यात राहणार? ज्यांना आयुष्यभर मोठ्या शौर्याने, मोठ्या दिमाखाने सांभाळले, त्यांच्या घरी सर्वस्व नष्ट झाले अशा परिस्थितीत राहणेच शक्य नव्हते. वैभवशाली वासुदेवाला तर मुळीच नव्हते. मृत्यूखेरीज दुसरी वाटच नव्हती. कृष्णाला मरणाखेरीज मार्गच नव्हता. अंगावर आलेल्या सर्व कर्तव्यांना त्याने जसे तोंड दिले, त्याच कठोरतेने नातवांत, बायकांत मन न गुंतवता त्याने ह्याही वेळी तोंड दिले. अर्जुनावर सर्व भार सोपवला व आपण चालता झाला.
 जन्मभर लौकिक अर्थाने अर्जुनाला व पांडवांना कृष्णाच्या अगणित उपकारांची फेड करता आली नाही. त्याच्या मृत्यूनंतर ही फेड व्हावयाची होती. कृष्ण अर्जुनाशिवाय मुहूर्तभरही जगू शकत नव्हता. अर्जुनाचेही तसेच होते, असे समजायला हरकत नाही. शेवटी कृष्णाचा निरोप पोहोचल्यावर अर्जुन द्वारकेला आला तेव्हा, कृष्ण जिवंत नव्हता; पण एरवी एवढ्या तेवढ्यावरून प्रतिज्ञा करणाऱ्या व आगीत उडी घेऊन जीव देण्यास निघणाऱ्या अर्जुनाला त्या वेळी ही मोकळीक नव्हती. वसुदेवाचा शोक ऐकून त्याचा प्राण गेल्यावर इतमामाने त्याला अग्नी द्यायचा होता. कृष्णाचे शरीर शोधून त्याला अग्नी द्यायचा होता. उरला-सुरला परिवार घेऊन हस्तिनापुराला जायचे होते, स्वतःची व यादव स्त्रियांची विटंबना पहायची होती. राज्याला मुकलेल्या यादवांपैकी कृष्णाच्या नातवाला एक राज्य पांडवांनी दिले, सात्यकीच्या मुलाला एक दिले; एवढेच नव्हे, तर मार्तिकावताचे राज्य अश्वत्थाम्याला मदत करणाऱ्या कृतवर्मा हार्दिक्याच्या वंशाला दिले. सर्व यादव जिवंत राहते, तर त्यांपैकी कोणाचाच कुठल्याच राज्यावर अधिकार नव्हता. नवी राज्ये मिळाली, ती पांडवांमुळे. यादवांची व्यवस्था लावल्यावर कृष्णाच्या देण्याची अशी विलक्षण निरानंद फेड करून,मग अर्जुन व इतर पांडव मरणास तयार झाले.
 कृष्णाने एवढे प्रेम करण्यासारखे अर्जुनात होते तरी काय? अर्जुन त्या वेळच्या वीरांत अप्रतिम योद्धा म्हणून गाजलेला होता; सर्व तरुण पिढीचा, उत्तराचा, धृष्टद्युम्नाचा, सात्यकीचा, प्रद्युम्नाचा आदर्श होता. नावाप्रमाणे तो ऋजू होता. अर्जुनाच्या बाहुबलाने धर्म राजा झाला. कृष्णाने इतरांनाही राज्य मिळवून दिले. दोघेही शत्रूंना व स्त्रियांना जिंकणारे होते. कृष्णाने आयुष्यभर जे व जितके दिले, तितके अर्जुनाने देणे शक्यच नव्हते. पण अर्जुनाच्या प्रेमात त्याला सर्व मिळाले होते, व कृष्णाच्या जिवंतपणी नाही, पण मागाहून सर्व फेड अर्जुनाने केली.
 कृष्णाने असामान्य कर्तृत्वाने इतरांना राज्ये मिळवून दिली. भीष्माने तेच केले. भीष्म उपभोगशून्य राहिला. कृष्णाने श्री व संपत्ती याचा उपभोग घेतला. भीष्माने अधिकार भोगला, तर कृष्णाचा भोग अधिकारशून्य होता. एक लौकिकदृष्ट्या सर्वस्वाचा होम करून काहीतरी उपभोगीत होता, तर दुसरा सर्व भोगून खरोखरीने अलिप्तच राहिला. इतर सर्व कधीतरी रडले. भीष्म स्वतःसाठी रडला नाही. कृष्णही कधी रडला नाही. निष्कामच राहिला. इतका की, कधीकधी तो कठोरच भासतो.
 ह्यामुळेच महाभारतातील कृष्ण हातीच लागत नाही. अंत:करणाला भिडत नाही. त्याने प्रेम केले, सूड उगवला, तो आनंदाने नाचला, पांडवांनी राज्य घालविले तेव्हा दुःखाने हळहळला; पण हे सर्व करूनही तो गुंतला नाही. महाभारतात राधेचा कृष्ण नाही, कुंजवनात गोपाळांमध्ये वेणू वाजविणारा कृष्ण नाही, द्रौपदीच्या धाव्याला धावणारा कृष्ण नाही, रक्मिणीवल्लभ कृष्ण नाही. तो स्वतः सांगतो की, आपण अर्जुनावर प्रेम केले, पण वेळोवेळी कृतीने ते प्रेम व्यक्त होऊनही हृदयाचा ठाव घेण्यासारखे त्यात काही नाही. 'सह नौ भुनक्तु, सह वीर्यं करवावहै’ अशा तऱ्हेचा तो संबंध होता; पण त्यातही तो कुठे गुंतून पडला नाही. सर्व मानवी कष्ट, मानवी सुखे, मानवी विकार त्याच्या चरित्रात होते, तरीही ह्या विलक्षण अलिप्ततेमुळे त्याला साकार करता येत नाही. त्याने गीता नुसती सांगितली नाही, तो गीता जगला.

 फेब्रुवारी, १९६६