नवनाथ भक्तिसार’ या धुंडीसुत मालुकविविरचित प्रासादिक ग्रंथातील कथांचे सार



नवनारायण नवनाथ संपादन

नवनाथ नवनारायण गुरू
मच्छिंद्रनाथ कवि दत्तात्रेय
गोरक्षनाथ हरि मच्छिंद्रनाथ
गहिनीनाथ करभाजन गोरक्षनाथ
जालिंदरनाथ अंतरिक्ष दत्तात्रेय
कानिफनाथ प्रबुद्ध जालिंदरनाथ
भर्तरीनाथ द्रुमिल दत्तात्रेय
रेवणनाथ चमस दत्तात्रेय
नागनाथ आविर्होत्र दत्तात्रेय
चरपटीनाथ पिप्पलायन दत्तात्रेय

श्रीनवनाथ भक्तिसार कथामृत संपादन

अध्याय १ संपादन


मंगलाचरण, नऊ नारायणांपैकी मच्छिंद्रनाथाचा जन्म, त्याची तपश्चर्या

ग्रंथारंभी मालुकवि म्हणतात- कलियुगास प्रारंभ झाला त्यावेळी लक्ष्मीकांताने नवनारायण यांना द्वारकेस बोलावून आणण्याकरिता आपल्या सेवकास पाठविले. त्यावेळ सुवर्णाच्या सिंहासनावर लक्ष्मीकांत बसला होता. जवळ उद्धवही होता. इतक्यात कवि, हरि, अंतरिक्ष, प्रबुद्धि, पिप्पलायन, अविर्होत्र (ऐरहोत्र), चमस, द्रुमिल, (ध्रुवमीन) आणि करभाज असे नऊ नारायण तेथे येऊन दाखल झाले. त्यास पाहताच हरीने सिंहासनाखाली येऊन मोठ्या गौरवाने त्यांस आलिंगन देऊन आपल्या सुवर्णाच्या सिंहासनावर बसविले. नंतर त्यांची षोडशोपचारांनी पूजा केली. तो मोठा समारंभाचा थाट पाहून कोणत्या कारणास्तव आम्हास बोलावून आणिले, असे नवनारायणांनी हरीस विचारिले. तेव्हा त्यांने त्यास सुचविले की, आपणा सर्वांना कलियुगात अवतार घ्यावयाचे आहेत. जसे राजहंस एका जुटीने समुद्राच्या उदकात जातात, त्याप्रमाणे आपण सर्व एकदम अवतार घेऊन मृत्युलोकात प्रगट होऊ. हरीचे असे भाषण ऐकून ते म्हणाले, जनार्दना ! आपण आम्हांस अवतार घ्यावयास सांगता, पण अवतार घ्यावयाचा तो कोणत्या नावाने हे कळवावे. त्यांचे हे म्हणणे ऐकून द्वारकाधीशाने सांगितले की, तुम्ही सर्वांनी अवतार घेऊन संप्रदाय स्थापन करून दीक्षा देऊन उपदेश करीत जावा. तुम्ही कदाचित असे म्हणाल की, आम्हासच अवतार घ्यावयास सांगता, असे मनात आणू नका. तुमच्याबरोबर दुसरी बहुत मंडळी मृत्युलोकी अवतार घेणार आहेत, प्रत्यक्ष कवि वाल्मीकि हा तुळसीदास होऊन येईल. शुकमुनि हा कबीर, व्यासमुनि तो जयदेव व माझा अति आवडता जो उद्धव तो नामदेव होईल. जांबुवंत हा नरहरी या नावाने अवतार घेउन प्रसिद्धीस येईल. माझा भाऊ बलराम हा पुंडलिक होईल. मीसुद्धा तुमच्याबरोबर ज्ञानदेव या नावाने अवतार घेऊन येणार आहे. कैलासपति शंकर हा निवृत्ति होईल. ब्रह्मदेव हा सोपान या नावाने अवतार घेऊन प्रसिद्धीस येईल. आदिमाया ही मुक्ताबाई होईल. हनुमंत हा रामदास होईल. मजशी रममाण होणारी जी कुब्जा ती जनी दासी या नावाने उघडकीस येईल. मग आपणाकडून होईल तितके आपण कलीमध्ये भक्तिमाहात्म्य वाढवू. अवतार कोणत्या ठिकाणी व कशा रितीने घेऊन प्रगत व्हावे ते सविस्तर कळविण्याविषयी नवनारायाणांनी पुन्हा विनंति केली. तेव्हा हरीने त्यांस सांगितले की, पराशर ऋषीचा पुत्र जो व्यास मुनि त्याने भविष्यपुराणात हे पूर्वीच वर्णन करून ठेविले आहे. पूर्वी ब्रह्मदेवाचा वीर्यापासून अठ्यांयशी हजार ऋषि निर्माण झाले. त्याप्रसंगी वीर्याचा काही भाग ठिकठिकाणी पडला आहे; पैकी थोडासा भाग तीनदा यमुनेत पडला. त्या तीन भागापैकी दोन भाग द्रोणात पडले व एक भाग यमुनेतील पाण्यात पडला. ते वीर्य लागलेच एका मच्छीने गिळिले तिच्या उदरात कवि नारायणाने जन्म घेऊन मच्छिंद्रनाथ या नावाने जगात प्रगट व्हावे. शंकराने तृतीय नेत्रापासून अग्नि काढून जाळून टाकिलेला जो काम तो अग्नीने प्राशन केला आहे; यास्तव अंतरिक्ष नारायणाने त्याच्या जठरी जन्म घेऊन जालंधर नावाने प्रसिद्ध व्हावे. ते अशा रितीने की, कुरुवंशात जनमेजय राजाने नागसत्र केले आहे, त्याच्याच वंशात बृहद्रवा राजा हवन करील; तेव्हा द्विमूर्धन (अग्नि) गर्भ सांडील. त्या प्रसंगी जालंदराने त्या यज्ञकुंडात प्रगट व्हावे. अठ्यायशी हजार ऋषी झाले तेव्हा ब्रह्मदेवाच्या वीर्याचा काही अंश रेवातीरी सुद्धा पडला आहे, तेते चमसनारायण याने रेवणसिद्ध या नावाने प्रगट व्हावे. त्याच वीर्यापैकी थोडासा अंश एका सर्पिणीलाहि मिळाला होता. तो तिने प्राशन केला. मग जनमेजय राजाच्या सर्पसत्रात ब्राह्मणांनी साऱ्या सर्पांची आहुति दिली; त्या समयी हिच्या उदरात ब्रह्मबीज आहे, असे जाणल्यावरून त्या सर्पिणीला आस्तिक ऋषीने वडाच्या झाडाखाली लपवून ठेविले. पूर्ण दिवस भरल्यानंतर ती अंडे तेथेच टाकून निघून गेली. ते अंडे अजून तेथे होते तसे आहे, त्यात आविर्होत्र नारायणाने जन्म घेऊन वटसिद्ध नागनाथ या नावाने प्रसिद्ध व्हावे. मच्छिंद्रनाथ यांनी सूर्यरेत प्राप्तीस्तव मंत्र म्हणून दिलेले भस्म उकिरड्यावर पडेल, त्यात सूर्य आपले वीर्य सांडील, ते उकिरडामय असेल; त्यात हरिनारायण याने गोरक्ष या नावाने प्रगट व्हावे. दक्षाच्या नगरात त्याची कन्या पार्वती हिला लग्नसमारंभसमयी पाहून ब्रह्मदेवाचे वीर्य गळाले; त्यासमयी त्यास परम लज्जा उत्पन्न झाली. मग ते वीर्य रगडून चौफेर केले, त्यावेळी ते एके बाजूस साठ हजार ठिकाणी झाले, त्याचे साठ हजार वालखिल्य ऋषी झाले. दुसऱ्या अंगाचे केराबरोबर भागीरथी नदीमध्ये पडले ते कुश बेटात गेले; ते अद्यापि तेथे तसेच आहे. यास्तव पिप्पलायन नारायणाने तेथे प्रगट होऊन चरपटीनाथ नावाने प्रसिद्ध व्हावे. भर्तरी या नावाने भिक्षापात्र कैलीकऋषीने आंगणात ठेविले होते; त्यात सूर्याचे वीर्य अकस्मात पडले; ते त्याने (भर्तुहरि) तसेच जपून ठेविले आहे. त्यात धृवमीन नारायणाने संचार करून भर्तरी या नावाने अवतीर्ण व्हावे. हिमालयाच्या अरण्यात सरस्वतीचे उद्देशाने ब्रह्मदेवाची वीर्य गळाले; त्यातले थोडेसे जमिनीवर पडले. त्यावरून वाघ चालल्यामुळे त्याच्या पायात राहिले व थोडेसे हत्तीच्या कानात पडले. त्यात प्रबुद्धाने संचार करून कानिफा या नावाने प्रगट व्हावे. गोरक्षाने चिखलाचा पुतळा केला, त्यात करभंजनाने संचार करावा. अशा रीतीने, कोणी कोठे व कसे जन्म घ्यावयाचे, ह्याही नवनारायणांना खुलासेवार समजूत करून दिली. मग ते आज्ञा घेऊन तेथून निघाले व मंदराचलावर गेले, तेथे शुक्राचार्यांच्या समाधीजवळ समाधिस्त होऊन राहिले. पुढे हे नऊ व शुक्राचार्य असे दहा जण निघाले. एके दिवशी शिव-पार्वती कैलास पर्वतावर असता, 'तुम्ही जो मंत्र जपत असता, त्याचा मला अनुग्रह द्यावा,' असे पार्वतीने शंकरास म्हटले. हे ऐकून तो तिला म्हणाला, 'मी तुला त्या मंत्राचा उपदेश करीन; पण यासाठी एकांतस्थान पाहिजे. तर चल, आपण ते कोठे आहे त्याचा शोध करू. असे म्हणून ती उभयता एकांतस्थान पाहावयास निघाली. ती फिरत फिरत यमुनेवर आली. तेथे मनुष्याचा वास नव्हता. यामुळे ते स्थान त्यांनी पसंत केले व तेथे ती उभयता बसली. तेथे पार्वतीस सुंदर मंत्रोपदेश करू लागले. पण ज्या एका मच्छाने ब्रह्मवीर्य गिळून यमुनेत प्रवेश केला होता, ती गर्भिणी जवळच उदकात होती. तिच्या उदरातील गर्भ तो मंत्र ऐकत होता. तेणे करून त्यास शुद्ध ज्ञान प्राप्त झाले व द्वैतभाव नाहीसा होऊन तो ब्रह्मरूप झाला. उपदेश संपल्यावर उपदेशाचे सार काय समजलीस म्हणून शंकराने पार्वतीस विचारले, इतक्यात मच्छिंद्रनाथ गर्भातून म्हणाला की, सर्व ब्रह्मरूप आहे. हा ध्वनि ऐकून शंकराने तिकडे पाहिले. तेव्हा मच्छीच्या उदरी कविनारायणाने संचार केल्याचे समजले. मग त्यास शंकराने सांगितले की, तुला माझा उपदेश ऐकल्याने पुष्कळ लाभ झाला; परंतु हाच उपदेश मी तुला दत्तात्रेयाकडून करवीन. यास्तव तू पुढे बदरिकाश्रमास ये; तेथे मी तुला दर्शन देईन. असे सांगून पार्वतीसह शंकर कैलासास गेले. मच्छींद्रनाथ मच्छीच्या उदरामध्ये तोच मंत्र जपू लागला. पूर्ण दिवस भरल्यानंतर त्या मच्छीने अंडे नदीतीरी टाकून आपण उदकात निघून गेली. पुढे काही दिवसांनी कितीएक बकपक्षी मासे धरावयास यमुनातटी आले. त्यांनी ते अंडे पाहिले व लागलेच आपल्या तीक्ष्ण चोचींनी फोडिले. तेव्हा त्याची दोन शकले झाली व एका शकलात ते बालक पाहून व त्याच्या कर्कश रडण्याचा शब्द ऐकून ते भिऊन पळून गेले. पुढे तो शिंपला कामिक नावाच्या कोळ्याने पाहिला. त्यात सूर्यासारखा दैदीप्यमान बालक पाहून त्याचे अंतःकरण कळवळले आणि कोणी तरी सावज या कोमल बालकास मारील असे त्यास वाटले. इतक्यात आकाशवाणी झाली की, हा साक्षात कविनारायणाचा अवतार आहे. ह्या बालकास तू आपल्या घरी घेऊन जा. नीट संरक्षण कर व ह्याचे नाव मच्छिंद्रनाथ असे ठेव. ह्याच्याविषयी तू मनात किमपि संशय आणू नको. ते ऐकून कोळ्याने त्यास घरी नेऊन आनंदाने आपल्या शारद्धता स्त्रीस दिले व मुलगा आपणाला ईश्वराने दिला म्हणून सांगितले. तिने त्यास घेऊन अति आनंदाने स्तनाशी लाविले, तो पान्हा फुटला. मुलगाहि दूध पिऊ लागला. मग मुलास न्हाऊ-माखू घालून पाळण्यात निजविले. आधीच त्या उभयताना मूल व्हावे म्हणून आशा सुटली होती; तशात अवचित पुत्ररत्न हाती आल्याने त्यांस अनुपम आनंद झाला. मच्छिंद्रनाथाचे वय पाच वर्षाचे झाल्यावर एके दिवशी त्यास समागम घेऊन त्याचा बाप कामिक, मासे मारण्यासाठी यमुनेवर गेला. तेथे त्याने मासे मारण्यासाठी जाळे पसरिले आणि पुष्कळ मासे त्यात आल्यावर ते बाहेर मच्छिंद्रनाथाजवळ आणून ठेवून पुन्हा जाळे घेऊन तो पाण्यात गेला. ते बापाचे कृत्य पाहून आपल्या मातृकुळाचा नाश करावयास हा उद्युक्त झाला आहे; असे मच्छिंद्रनाथाच्या मनात आले. तसेच आपण असता बाप हे कर्म करीत आहे, हे स्वस्थ बसून पाहणे चांगले नाही व आस्तिक ऋषीने सर्व प्रकारे उपकार करू जनमेजय राजाच्या सर्पसत्रात नागकुळाचे जसे रक्षण केले त्याचप्रमाणे आपण कसेहि करून ह्याचा हा उद्योग हा उद्योग बंद केला पाहिजे, असे मच्छिंद्रनाथाने मनात आणले. मग तो एक एक मासा उदकात टाकू लागला. ते पाहून त्याच्या बापास इतका राग आला की, तो लागलाच पाण्याबाहेर आला आणि त्यास बऱ्याच चपराका मारून म्हणाला, मी मेहनत करून मासे धरून आणितो व तू ते पुन्हा पाण्यात सोडून देतोस; तर मग खाशील काय? भीक मागावयाची असेल अशा लक्षणानी ! असे बोलून तो पुन्हा उदकात शिराल. त्या माराच्या तिरिमिरीसमसे मच्छिंद्रनाथास फार दुःख होऊन भिक्षेचे अन्न पवित्र असते व तेच आता आपण खावे, असा विचार करून व बाप पाण्यात शिरलासे पाहून त्याची दृष्टि चुकवून मच्छिंद्रनाथ तेथून निघाला व फिरत फिरत बदरिकाश्रमास गेला. तेथे त्याने बारा वर्षै तपश्चर्या केली. ती इतकी कठीण की, त्याच्या हाडांचा सांगाडा मात्र राहिला. इकडे श्रीदत्तात्रेयाची स्वारी शिवालयात गेली व शंकराची स्तुति करताच शंकराने प्रसन्न होऊन प्रत्यक्ष भेट देऊन आलिंगन दिले व जवळच बसविले. नंतर उभयतांनी एकमेकांस नवल वर्तमान विचारले. तेव्हा बदरिकाश्रमाचे अत्यंत रमणीय अरण्य पाहाण्याची दत्तात्रेयाने आपली इच्छा असल्याचे शंकरास कळविले. मग त्यास बरोबर घेऊन शंकर अरण्यात गेला. त्याच समयी मच्छिंद्रनाथाचा उदयकाल होण्याचे दिवस आल्याकारणाने तो योगायोग घडून येण्यासाठीच दत्तास अरण्य पाहाण्याची वासना होऊन त्यास शंकराचा रुकारहि मिळाला. ते उभयता बदरिकावनातील शोभा पाहून आनंद पावले.

अध्याय २ संपादन


मच्छिंद्रनाथास दत्तात्रेय व शंकराचे दर्शन; देवीचा उपदेश, सूर्यापासून वरप्राप्ति, ब्राह्मण स्त्रीस भस्मदान

शंकर व दत्तात्रेय वनात निघाले व वनशोभा पहात पहात ते भागीरथीच्या तीराने जात होते तो त्यांची नजर मच्छिंद्रनाथाकडे गेली. त्याची स्थिति पाहून या कलीमधे दृढनिश्चयाने कडकडीत तप करण्याच्या त्याच्या वृत्ताबद्दल त्यांना विस्मय वाटला. मग आपण तेथे एक ठिकाणी उभे राहून शंकराने दत्तात्रेयास मच्छिंद्रनाथाकडे विचारपूस करण्यासाठी पाठविले.

मग दत्तात्रेय मच्छिंद्राजवळ जाऊन उभा राहिला व कोणत्या इच्छेस्तव आपण येथे तप करीत आहा, वगैरे खुलासा विचारू लागला. तेव्हा मच्छिंद्रनाथाने डोळे उघडून दत्तात्रेयाकडे पाहिले. मग मान हलवून नमन करून म्हटले, महाराज ! आज मला येथे बारा वर्षे झाली. पण आजपावेतो मी या अरण्यात कोणीच मनुष्य पाहिला नसता आपण आज एकाएकी मला विचारीत आहा, त्याअर्थी आपण कोण आहा हे प्रथम मला कळवावे व ज्याअर्थी आपले दर्शन झाले आहे त्याअर्थी आपण आता माझी मनोकामना पूर्ण करून जावे. ते ऐकून दत्तात्रेय सांगू लागला. मी अत्रि ऋषीचा पुत्र आहे. मला दत्तात्रेय असे म्हणतात. आता तुझी इच्छा काय आहे, ती मला सांग. हे ऐकून, आज आपली तपश्चर्या फळास येऊन केल्या कर्माचे सार्थक झाले असे मानून व सर्व नेमधर्म सोडून मच्छिंद्राने दत्ताच्या पायांवर मस्तक ठेविले. त्यास प्रेमाचा पाझर सुटल्याने नेत्रांतून एकसारखे पाणी वाहू लागले; तेणेकरून दत्ताचे पाय धुतले गेले. नंतर तो दत्तात्रेयास म्हणाला, महाराज ! आपण साक्षात भगवान आहा. शंकर, विष्णु व ब्रह्मदेव या तिघांचे रूप एकवटून आपण अवतरला आहा, असे असता माझा विसर तुम्हास पडला तरी कसा? आता माझे सर्व अपराध पोटात घालून माझा अंगिकार करावा. असे बोलून पुन्हा पुन्हा पाया पडू लागला.

मग दत्तात्रेयाने त्यास सांगितले की, तू चिंता करू नको; तुझ्या मनोकामना पूर्ण होतील. असे बोलून आपला वरदहस्त त्याच्या मस्तकावर ठेविला आणि कानात मंत्राचा उपदेश केला. तेणेकरून मच्छिंद्रनाथाचे अज्ञान तत्काळ निघून गेले व तत्क्षणीच सर्व चराचर ब्रह्ममय दिसू लागले. मग शंकर व विष्णु कोठे आहेत ते मला सांग, असे दत्तात्रेयाने त्यास विचारल्यावर त्याने उत्तर दिले की, ईश्वरावाचून मला दुसरे काही दिसत नाही. सर्व ठिकाणी ईश्वराची व्याप्ति आहे. हे त्याचे भाषण ऐकून व एक भावना झालेली पाहून दत्तात्रेय त्याचा हात धरून त्यास घेऊन जाऊ लागला. मग हा पूर्वीचा कविनारायण असे जाणून शंकराने मच्छिंद्रनाथास पोटाशी धरिले आणि त्याजकडून सकल सिद्धींचा अभ्यास करविण्याची दत्तात्रेयास सूचना केली. मग दत्तात्रेयाने त्यास सर्व विद्यांचा मंत्रोपदेश केला आणि कानफाड्यांचा संप्रदाय नाथसंप्रदाय निर्माण करून दत्तात्रेय व शंकर निघून गेले. मग मच्छिंद्रनाथहि तीर्थयात्रा करावयास निघाला.

मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करीत करीत सप्तशृंगीस गेला. तेथे त्याने भक्तिपूर्वक अंबेचे दर्शन घेतले व स्तुति केली. त्या समयी साबरी विद्या आपणास पूर्ण अवगत होऊन त्यावर कविता करावी असे त्याच्या मनात येऊन गेले. ह्या कवित्वाच्या योगाने लोकांना पुष्कळ फायदा होईल अशी त्याची कल्पना होती; परंतु दैवत अनुकूल झाल्यावाचून कार्यसिद्धि व्हावयाची नाही अशीहि त्याच्या मनात शंका आली. मग त्याने अंबेसन्निध सात दिवसपर्यंत अनुष्ठान केले. तेव्हा अंबा प्रसन्न झाली व कोणता हेतु मनात धरून तू हे अनुष्ठान करीत आहेस ते मला सांग, म्हणून म्हणाली. त्याने सांगितले की, मातोश्री ! साबरी विद्येवर कवित्व करावयाचे माझ्या मनात आले आहे, तरी माझा हेतु पूर्ण होण्यासाठी मला उपाय सांगावा. मच्छिंद्रनाथाचा असा मनोदय जाणून, 'तुझे मनोरथ पूर्ण होतील.' असा देवीने त्यास आशीर्वाद दिला. मग त्याच्या हातात हात घालून ती त्यास मार्तंड पर्वतावर घेऊन गेली. तेथे एक मोठा वृक्ष होता. तेथे मंत्रोक्त हवन केल्यावर वृक्ष सुवर्णासारखा देदीप्यमान असा त्यास दिसू लागला. तसेच झाडांच्या फांद्यावर नाना दैवते बसली आहेत असेही त्यास दिसू लागले.

असा चमत्कार अंबिकेने त्यास दाखविला. ती सर्व दैवते मच्छिंद्रनाथाकडे पाहात होती. पण बोलत चालत नव्हती. नंतर अंबेने त्यास सांगितले की, तू आता येथून ब्रह्मगिरीच्या जवळच अंजन पर्वत आहे, त्यावर महाकालीचे स्थान आहे, तेथे जाऊन भगवतीला नमस्कार कर. तेथून दक्षिणेकडे नदीवर जा. तेथे उदकाने भरलेली श्वेतकुंडे दिसतील, त्यातील शुक्लवेल तोडून एक एक कुंडात टाक. ती कुंडे शंभर आहेत; पण ज्या ज्या कुंडात तो वेल सजीव दिसेल त्यात स्नान करून उदक प्राशन कर. त्या योगाने तुला मूर्च्छना होऊ लागल्यास बारा आदित्य स्मरून जप करवा, म्हणजे पुढचा मार्ग दिसेल. नंतर काचेच्या कुपीत तेथील उदक घेऊन बारा आदित्यांचे नामस्मरण करीत वृक्षास घालावे म्हणजे सर्व दैवते प्रसन्न होऊन वरदान देतील. हा कार्यभाग एका खेपेस न झाला तर सहा महिनेपर्यंत अशाच खेपा घालून करावा. दर खेपेस एक एक दैवत प्रसन्न होईल. असे सांगून देवी आपल्या स्थानी गेली.

पुढे मच्छिंद्रनाथ अंजन पर्वतावर गेला. तेथे त्याने महाकाळीचे दर्शन घेतले. शुक्लवेल घेऊन कुंडे पाहावयास लागला. इतक्यात देवीने सांगितल्याप्रमाणे शंभर कुंडे त्याच्या पाहण्यात आली. त्यात त्याने शुक्लवेल टाकिला. पुन्हा परत येऊन पाहू लागला, तो आदित्य नामक कुंडात टाकलेल्या वेलास पाने आलेली दिसली. मग त्याने त्यात स्नान केले व उदक प्राशन करिताच त्यास मूर्च्छना आली. म्हणून त्याने देवीच्या सांगण्याप्रमाणे द्वादश आदित्यांच्या नामस्मरणाचा जप चालविला. इतक्यात सूर्याने त्याजजवळ जाऊन कृपादृष्टीने पाहून त्यास सावध केले आणि मस्तकावर हात ठेवून तुझे सकल मनोरथ पूर्ण होतील, म्हणून वर दिला.

सूर्याने वरदान दिल्यानंतर मच्छिंद्रनाथ काचेची कुपी पाण्याने भरुन घेऊन मार्तंड पर्वतावर गेला व त्या मोठ्या अश्वत्थ वृक्षाच्या पाया पडला. सूर्याचे स्मरण करून ते उदक घालताच तेथे सूर्य प्रसन्न झाला आणि काय हेतु आहे, म्हणून विचारले. तेव्हा त्याने सांगितले की, कविता करावी असे माझ्या मनात आहे; तर त्वा साह्यभूत होऊन मंत्रविद्या सफळ करावी. मग सूर्य त्याचे हेतु पूर्ण होण्यासाठी त्यास सर्वस्वी साह्यभूत झाला. याप्रमाणे मच्छिंद्रनाथाने सात महिने ये-जा करून सारी दैवते प्रसन्न करून घेतली आणि साबरी विद्येचा एक स्वतंत्र ग्रंथ रचून तयार केला. मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करीत फिरत असता बंगाल्यात चंद्रगिरी गावास गेला. तेथे सुराज म्हणून एक ब्राह्मण होता. त्याच गावात सर्वोपदयाळ या नावाचा एक वसिष्ठगोत्री गौडब्राह्मण रहात असेल. तो मोठा कर्मठ होता. त्याच्या स्त्रीचे नाव सरस्वती. ती अति रूपवती असून सद्गुणी असे; पण पुत्रसंतती नसल्याकारणाने नेहमी दिलगीर असे. त्या घरी मच्छिंद्रनाथ भिक्षेकरिता गेला. त्याने अंगणात उभे राहून 'अलख' शब्द केला आणि भिक्षा मागितली. तेव्हा सरस्वती बाहेर आली. तिने त्यास आसनावर बसविले आणि भिक्षा घातली. नंतर आपली सर्व हकीगत सांगून संतति नसल्याने दिलगीर आहे, असे त्यास सुचविले आणि काही उपाय असला तर सांगावा; म्हणून विनंति करून ती त्याच्या पाया पडली. तेव्हा मच्छिंद्रनाथास तिची दया आली. मग त्याने सूर्यमंत्राने विभूति मंत्रून ते भस्म तिला दिले आणि सांगितले की, हे भस्म रात्रीस निजतेवेळी खाऊन नीज. हे नुसतेच भस्म आहे, असे तू मनात आणू नको, हा साक्षात हरिनारायण जो नित्य उदयास येतो तो होय ! तो तुझ्या उदरी येईल, त्या तुझ्या मुलास मी स्वतः येऊन उपदेश करीन; तेणे करून तो जगात कीर्तिमान निघेल. सर्व सिद्धि त्याच्या आज्ञेत राहतील. असे बोलून मच्छिंद्रनाथ जावयासाठी उठला असता, तुम्ही पुन्हा परत कधी याल म्हणून तिने त्यास विचारले. तेव्हा मी बारा वर्षांनी परत येऊन मुलास उपदेश करीन असे सांगून मच्छिंद्रनाथ निघून गेला.

सरस्वतीबाईस भस्म मिळाल्यामुळे अत्यंत हर्ष झाला होता. ती राख तिने आपल्या पदरास बांधून ठेविली. मग ती आनंदाने शेजारणीकडे बसावयास गेली. तेथे दुसऱ्याही पाच-सात बायका आल्या होत्या व संसारासंबंधी त्यांच्या गोष्टी चालल्या होत्या. त्यावेळी तिनेहि आपल्या घरी घडलेला सर्व वृत्तांत त्यास सांगितला आणि त्या कानफोड्या बाबाने सांगितल्याप्रमाणे मी भस्म शेणात खाल्ले असता, मला पुत्र होईल काय म्हणून विचारले. तेव्हा एकजणीने तिला सांगितले की, त्यात काय आहे? असल्या धुळीने का पोरे होतात? तू अशी कशी त्याच्या नादी लागलीस कोण जाणे? आम्हाला हे चिन्ह नीट दिसत नाही. अशा तर्‍हेने त्या बायांनी तिच्या मनात किंतु भरविल्यामुळे ती हिरमुसले तोंड करून आपल्या घरे गेली व गोठ्याजवळ केरकचरा, शेण वगैरे टाकण्याची जी खांच होती, त्या उकिरड्यात तिने ते भस्म टाकून दिले.

अध्याय ३ संपादन


मारुती व मच्छिंद्रनाथ यांची भेट; मच्छिंद्रनाथाचे स्त्रीराज्याकडे गमन

मच्छिंद्रनाथ पूर्वेकडच्या जगन्नाथादि तीर्थयात्रा करून सेतुबंध-रामेश्वरास गेला. तेथे मारुती स्नान करून बसणार तोच पाऊस पडू लागल्यामुळे, तो आपणास राहावयाकरिता दरडी उकरून गुहा करू लागला. हे मारुतीचे कृत्य पाहून मच्छिंद्रनाथास विस्मय वाटला. त्याने मारुतीला म्हटले की, मर्कटा ! तू अगदीच मूर्ख आहेस. शरीराच्या संरक्षणाकरिता तू आता सोय करीत आहेस. अरे ! पाऊस एकसारखा सपाटून पडत आहे; आता तुझे घर केव्हा तयार होईल? घरास आग लागल्यानंतर विहीर खणावयास लागावे, तद्वत पाऊस पडत असता तू आता घराची तजवीज करतोस हे काय? असे मारुतीला मच्छिंद्रनाथाने म्हटल्यानंतर, तू असा चतुर दिसतोस तो कोण आहेस, म्हणून मारुतीने मच्छिंद्रनाथास विचारिले. तेव्हा मी जती आहे व मला मच्छिंद्र म्हणतात, असे त्याने उत्तर दिले. त्यावर तुला जती असे लोक कोणत्या अर्थाने म्हणतात, असे मारुतीने मच्छिंद्रास विचारिले. तेव्हा माझा शक्तिप्रताप पाहून लोक मला जती म्हणतात, असे त्याने उत्तर दिले. त्या वेळेस मारुती म्हणाला, आजपर्यंत आम्ही एक हनुमंत जती आहे असे ऐकत होतो, असे असता तुम्ही एक नवीनच जती एकाएकी उत्पन्न झालात ! पण आता ते कसेहि असो, मी काही दिवस मारुतीच्या शेजारी होतो, यास्तव त्याच्या कलेचा हजारावा हिस्सा माझ्या अंगी महान प्रयासाने आला आहे, तो मी या समयी तुला दाखवितो. त्याचे निवारण कसे करावे ते तू मला दाखव, नाही तर जती हे नाव तू टाकून दे.

याप्रमाणे मारुतीने मच्छिंद्रनाथास किंचित लावून म्हटल्यानंतर त्याने उत्तर दिले की, तू मला कोणती कला दाखवीत आहेस ती दाखव, तिचे निवारण श्रीगुरुनाथ करील. हे ऐकून मारुत्स अत्यंत राग आला. मग तो लागलीच उड्डाण करून एकीकडे गेला आणि विशाल रूप धरून त्याने मच्छिंद्रनाथास न कळू देता अचानक त्याच्या अंगावर सात पर्वत उचलून फेकले. ते आकाश मार्गाने ढगांप्रमाणे येत आहेत हे मच्छिंद्रनाथाच्या लक्षात येऊन 'स्थिर स्थिर' असे त्याने वातप्रेरकमंत्रशक्तीच्या योगाने ते पर्वत जागच्या जागी अटकवून ठेवले. पुढे मारुती एकावर एक असे शेकडो पर्वत नाथावर टाकीतच होता. पण त्याने त्या एकाच मंत्राच्या शक्तीने ते सर्व पर्वत तेथल्या तेथेच खिळवून टाकिले. हे पाहून मारुती रागाने प्रलयकाळच्या अग्नीप्रमाणे भडकून गेला व एक मोठा पर्वत उचलून तो मस्तकावर घेऊन तो फेकून देण्याच्या बेतात आहे. तोच मच्छिंद्रनाथाने पाहिले. मग नाथाने समुद्राचे पाणी घेऊन, वायुआकर्षणमंत्र म्हणून जोराने ते मारुतीच्या अंगावर शिंपडले आणि त्याला तेथल्या तेथेच जसाच्या तसा खिळवून टाकिला. त्यावेळी त्याचे चलनवलन बंद झाले. मारुतीने वर हात करून मस्तकावर पर्वत धरून ठेविला होता तो तसाच राहिला, ते पाहून वायूने आपल्या पुत्रास (मारुतीस) पोटाशी धरिले. नंतर त्यास या संकटातून सोडविण्याकरिता वायूने मच्छिंद्रनाथास विनंति केली. ती नाथाने मान्य करून पुन्हा उदक मंत्रून शिंपडले. तेणेकरून पर्वत जेथल्या तेथे गेला व मारुतीहि पूर्वस्थितीवर आला. नंतर मारुतीने जवळ जाऊन 'धन्य धन्य' म्हणून नाथास शाबासकी दिली. इतक्यात वायूने मारुतीला म्हटले की, बाबा मारुती ! तुझे या सिद्धापुढे काही चालावयाचे नाही. याने तुला व मला बांधून टाकून अगदी दुर्बल करून टाकिले. याची शक्ती अघटित आहे. तू कदाचित मला असे म्हणशील की, तुम्ही आपल्या तोंडाने त्याच्या मंत्राच्या सामर्थ्याची प्रौढी वर्णन करून दाखविता; तर माझी शक्ती ईश्वराच्या हातात आहे आणि याने आपल्या भक्तीच्या जोराने सकल दैवते आपली ताबेदार करून टाकिली आहेत.

नंतर मच्छिंद्रनाथ वायूच्या व मारुतीच्या पाया पडला आणि आपणाशी सख्यत्वाने वागण्याकरिता त्याने त्यांची प्रार्थना केली. तेव्हा ते दोघे नाथास प्रसन्न चित्ताने म्हणाले की, तुझ्या कार्याकरिता आम्ही उभयता झटून तुला सर्व प्रकारे साह्य करू व पाहिजे तसे करून तुला सुख देऊ. असे प्रफुल्लित मनाने बोलून, आता 'आपण जती आहो' असे तू खुशाल सांगत जा, असे मारुतीने वरदान दिले. त्या वेळेस मच्छिंद्रनाथाने मारुतीस विचारले की, मी जती या नावाने विख्यात होईन हे तर ठीकच आहे ! पण माझ्या मनात एक शंका आली आहे, तिची आपण निवृती करावी. कोणती शंका आली आहे, असे मारुतीने विचारल्यावर त्याने सांगितले की तू त्रिकाळज्ञानी आहेस, असे असता माझ्याशी विनाकारण वितंडवाद कशासाठी केलास? तुझी माझी नागाश्वत्थाच्या झाडाखाली पूर्वीच भेट झाली होती, त्या वेळेस साबरी विद्येचे मजकडून कवित्व करवून तू मला वरदान दिले आहेस, असे असता हा बखेडा का उत्पन्न केलास? हे ऐकून मारुतीने मच्छिंद्रनाथाचे असे समाधान केले की, जेव्हा तू समुद्रस्नान करीत होतास त्या वेळेस मी तुला ओळखल्यावरून तुझ्याजवळ आलो. तू कविनारायणाचा अवतार आहेस व मत्स्यीच्या पोटी जन्म घेतलास हे पक्के ठाऊक होते; परंतु माझ्या मनात अशी कल्पना आली की, नागाश्वत्थाच्या वृक्षाखाली देवांनी जे अभिवचन तुला दिले, त्या वरप्रदानाचे सामर्थ्य कितपत आहे हे आपण एकदा पहावे. शिवाय यापुढे तुला आणखी पुष्कळ प्रसंगामधून पार पडावयाचे आहे, म्हणून तू हिंमत करून पुढे कितपत टिकाव धरशील ह्याचाहि अजमास मला अशा रितीने पाहाता आला. असो.

नंतर मारुती म्हणाला, तू आता येथून स्त्रीराज्यात जा आणि तेथे खुशाल ऐष आराम कर तुझी भेट झाली हे एक फारच चांगले झाले. तुझ्या हातून माझ्या मस्तकावरचा भार उतरला जाईल. मग असे कोणते ओझे तुजवर पडले आहे, म्हणून मच्छिंद्रनाथाने विचारल्यानंतर, मारुतीने मुळारंभापासून सर्व कच्चा मजकूर त्यास सांगितला. मारुती म्हणाला, योगेश्वरा ! लंकेच्या रावणास जिवे मारून रामचंद्र सीतेस घेऊन अयोध्येस येत असता, तिच्या मनात आले की, मारुती निःसंशय रामाचा पक्का दास आहे, यास्तव आपल्या हातून त्याचे होईल तितके कल्याण करावे, म्हणजे ह्याचे लग्न करून देऊन, संपत्तिसंतति सर्व अनुकूल करून देऊन, सर्व सुखसंपन्न करावे. स्त्रीवाचून संसारात सुख नाही, तर ती करून देऊन याजकडून सर्व संसार करवावा. परंतु हा ब्रह्मचारी असल्याने माझे भाषण मान्य करील की नाही असा संशय तिच्या मनात आला. मग तिने मला गृहस्थाश्रमी करण्याकरिता व मला वचनात गोवून टाकण्यासाठी आपल्याजव्ळ बोलाविले व ममतेने माझ्या तोंडावरून हात फिरविला. नंतर सीतामाता मला म्हणाली. बा मारुती ! तू तिन्ही लोकामध्ये धन्य आहेस. माझे एक तुझ्याजवळ मागणे आहे, ते तू देशील तर फारच उत्तम होईल. मी सांगेन ते माझे वचन तू सहसा नाकबूल करणार नाहीस.

अशा प्रकारचे सीतेचे भाषण ऐकून मला संतोष वाटला. मग कोणते काम आहे असे मी तिजला विचारिले. परंतु मी आपले वचन दिल्यावाचून ती आपला हेतु मला कळवीना. असे पाहून मी तिला वचन देऊन तिची आज्ञा मान्य करण्याचे मनापासून कबूल केले तेव्हा मी लग्न करून गृहस्थाश्रम पत्करावा आणि संसार करून सुख भोगावे असा भाव दाखवून तसे करण्याविषयी तिने मला भारी भीड घातली. तेव्हा मी महत संकटात पडलो व खिन्नवदन होऊन उगीच बसून राहिलो. तेव्हा तिने रागाने मजकडे पाहिले व मला सांगितले की, तू अगदी दिलगीर होऊ नको. स्त्रीराज्यातल्या सर्व स्त्रिया तुझ्याच आहेत; परंतु यातील मख्खी अशी आहे की, तुला व मला चार चौकडीस जन्म घ्यावयाचा असतो. मी व रामाने नव्याण्णव वेळा घेतला. तूहि नव्याण्णवावा मारुती आहेस व त्याप्रमाणे लंकाधीशहि नव्याण्णवावा होय. त्यास मारून आल्यानंतर तुला स्त्रीराज्यात जावे लागेल. तो योग आता घडून आला. यास्तव समयास अनुसरून वाग.

याप्रमाणे रामचंद्राने मला सांगितल्यानंतर मी स्त्रीराज्यात गेलो. त्यावेळी त्या ठिकाणी मैनाकिनी नावाची राणी राज्य करीत होती. पृथ्वीच्या अन्य भागावर मनुष्य, पशु, पक्षी आदिकरून सर्व स्त्रीपुरुष एके ठिकाणी आनंदाने रममाण होतात असे तिच्या ऐकिवात आले होते. ही कल्पना मनात उद्भवताच तिच्या अंगाची लाही लाही होऊन गेली. मग प्रत्यक्ष मारुतीचा संग घडावा म्हणून ती अनुष्ठान करू लागली. आपल्या शरीराचे मांस तोडून तिने अग्निकुंडात माझ्या नावाने आहुति दिल्या. असे अनुष्ठान तिने बारा वर्षेपर्यंत केले. त्यामुळे तिच्या अंगावरचे सारे मांस संपले. तरीहि तिचा निश्चय ढळेना. असे पाहून मी तिला प्रसन्न झालो. त्यावेळी ती माझ्या पाया पडून मनोरथ पूर्ण करण्याकरिता विनंति करू लागली. तेव्हा तुझा कोणता हेतु आहे, म्हणून मी तिला विचारिले. तेव्हा ती मला म्हणाली की, मारुती ! तुझ्या भुभुःकारा पासून येथील सर्व स्त्रिया गर्भिणी राहतात, यास्तव तू येथील स्त्रियांचा प्राणनाथ ठरतोस. तेणेकरून सर्वांना सुख होते. परंतु माझ्या मनात तुझ्याशी प्रत्यक्ष मैथुन करावे असे आहे. ही माझी इच्छा तू पूर्ण कर. मैथुनाची पद्धत तिन्ही लोकात चालत असता तो प्रसंग आम्हास स्वप्नात सुद्धा नसावा अशी आमच्या कर्माची स्थिति आहे. तर तू ते सुख आम्हांस प्रत्यक्ष दे. असा तिने आपला अभिप्राय मला सांगितला. नंतर मी तिला सांगितले की, ब्रह्मचर्यव्रत मी कडक पाळतो असा माझा डंका सर्वत्र गाजत आहे; यास्तव ही गोष्ट माझेकडून घडावयाची नाही. आता तुझे मनोरथ पूर्ण करण्याकरिता मच्छिंद्रनाथ येथे येईल, तो तुझ्या मर्जीनुरूप वागेल, तो मच्छिंद्रनाथ साक्षात कविनारायणाचा अवतार होय. त्याजपासून तुला तुझ्या तपाची फलप्राप्ति होईल. अशा युक्तीच्या मार्गाने मी तिचे शांतवन केले. तो योग आज घडुन आला; तर तू तिकडे जाऊन तिचे मनोरथ पूर्ण कर.

मारुतीचे असे भाषण ऐकुन मच्छिंद्रनाथाने सांगितले की, मीहि ऊर्ध्वरेताच आहे; म्हणून मला हे कार्य सांगून काय उपयोग आहे? माझ्या ब्रह्मचर्याचा मात्र अशाने समूळ नाश होईल व जगात दुर्लौकिक होईल; म्हणून हे कुकर्म मला सांगू नये. तशात स्त्रीसंग हे अपकीर्तीचे भांडार होय; म्हणून ही गोष्ट करावी असे माझ्या मनात येत नाही.

अशा प्रकारचे मच्छिंद्रनाथाचे भाषण ऐकून मारुतीने त्यास सांगितले की, ही अनादिकालापासून रहाटी चालत आली आहे. म्हणून भोग भोगल्याचा दोष नाही. जसे नव्याण्णव मारुती तसेच नव्याण्णव मच्छिंद्रनाथ असा क्रम चालत आला आहे. तुझ्या पोटी मीननाथ म्हणून पुत्र होईल. त्याची सूर्यासारखी कीर्ति प्रगट होईल असे मारुतीने त्यास सांगून त्याचे मन वळवून घेतले. मग मारुतीच्या म्हणण्यास मान देऊन मच्छिंद्रनाथ स्त्रीराज्यात जाण्यास कबूल झाला व एकमेकांस नमस्कार करून ते दोघेजण मार्गस्थ झाले.

अध्याय ४ संपादन


देवीच्या भैरवांची व दासींची फजिति; देवीचे दर्शन

मच्छिंद्रनाथाने सेतुबंधरामेश्वरास मारुतीशी सख्यत्व केल्यानंतर तो हिंगळादेवीच्या दर्शनास जावयास निघाला. ती ज्वालामुखी भगवती महाप्रदीप्त आदिशक्ति होय ! जेव्हा मच्छिंद्रनाथ देवीच्या प्रचंड दरवाजाशी पोचला, तेव्हा दरवाजावर महाप्रबळ अष्टभैरव उभे होते; त्यांनी मच्छिंद्रनाथास पाहाताच ओळखिले व साबरी मंत्राने नागपत्र अश्वत्थाच्या झाडाखाली नाथाने सर्व देव अनुकूल करून त्यांच्यापासून वरदाने मागून घेतली आहेत, तो ह्याचा कार्यभाग कितपत सिद्धीस गेला आहे, ह्याची प्रचीति पाहाण्याचे त्याच्या मनात आले. म्हणून ते भैरव आपली रूपे पालटून संन्यासी बनले आणि दाराशी उभे राहिल्यावर, तुम्ही कोठे जात अवगैरे मच्छिंद्रनाथास ते विचारू लागले. तेव्हा त्याने सांगितले की, देवीचे दर्शन घ्यावयाचे माझ्या मनात आहे म्हणून मी आत जात आहे. असे सांगून मच्छिंद्राने त्यांस विचारले की, तुम्ही संन्यासी आहा, तुमची मर्जी आत जावयाची आहे की काय? त्यावर ते म्हणाले, आम्ही येथले द्वारपाळ आहो. येथे दाराशी उभे राहून जे कोणी देवीच्या दर्शनास येतात त्यांच्या पापपुण्याची चौकशी करून मग जो पुण्यवान व मनापासून दर्शनाची इच्छा करणारा असेल त्यास आम्ही आत जाऊ देतो. यास्तव तुझ्या पापपुण्याचा आम्हांस झाडा देऊन मग तू आत जावे कोणी विषयविलासाचे दुष्कृत्य जर लपवून ठेविले, तर आत प्रवेश करतेवेळेस तो मध्येच दारात अडकतो. कारण, त्या वेळेस दार अतिशय अरुंद होते. मग खोटे बोलून अडकला आहे असे पाहाताच आम्ही त्यास मागे ओढून शिक्षा करितो. याकरिता तुमच्या हातून जी जी कर्मै झाली असतील, ती ती सर्व सांगून येथे झडती द्यावी व मग दर्शनास जावे.

अष्टभैरवांचे असे भाषण ऐकून घेऊन मच्छिंद्रनाथ म्हणाला मी पापपुण्य काही एक जाणत नाही, मजकडून आजपर्यंत जी जी कर्मै घडली, ती ती सारी ईश्वराप्रीत्यर्थ केली आहेत, तशात आम्ही पापपुण्यापासून अलिप्त आहो. हे भाषण ऐकून ते संन्यासरूपी अष्टभैरव चकित झाले व म्हणाले, जन्मास आल्यानंतर तू केलेली कामे छपवून ठेवलीस तर येथे तुझा निभाव लागावयाचा नाही, मार खाऊन परत जावे लागेल. ह्याकरिता काही वाईट असेल ते सांगून आत जावे, म्हणजे अंबाबाई कृपा करील व तुला दर्शन देईल. अशा प्रकारचा बराच संवाद होऊन शेवटी मच्छिंद्रनाथ म्हणाला, की, प्राण्यांना शासन करण्याकरिता मी अवतार घेतला आहे, मजपुढे तुम्हा मशकांचा प्रताप अद्भूत आहे असे माझ्याने म्हणवेल तरी कसे? हे ऐकून अष्टभैरवास राग आला व ते त्रिशूळ, फरस, गांडीव, तरवारी, अंकुश, बरची, गदा, भाले, कुर्‍हाडी, अशी तीव्र शस्त्रे घेऊन युद्ध करण्यास सिद्ध झाले. मच्छिंद्रनाथाने 'जयजय श्रीदत्तगुरुराज' म्हणत हातात भस्म घेतले आणि मंत्रून म्हटले की, मित्रा वरुणीदेवा ! माझ्या कार्यासाठी तयार रहा. अग्निनी, वरुणी, अग्नि, वायु, इंद्रादि देव, गण, गंधर्व आदिकरून सर्वांनी कार्यामध्ये साह्य करण्यासाठी तयार रहावे, तुम्हा सर्वांना मी नमस्कार करितो. अशा रितीने सर्वांना युद्धाचे आमंत्रण करून मंतरलेले भस्म दाही दिशांस फेकले. नंतर वज्रपंजरप्रयोग म्हणून विभूति अंगास लाविल्यानंतर त्याचे शरीर वज्राहून कठीण झाले. नंतर मच्छिंद्रनाथाने भैरवास सांगितले की, तुम्ही आता आळस करून विलंब करू नका. युद्ध करण्यास तयार व्हा, न कराल तर तुम्हास मातापित्यांची शपथ आहे. ते ऐकून अष्टभैरवांनी रागाने तीव्र शस्त्रे सोडली, परंतु मच्छिंद्रनाथाने त्यास जुमानिले नाही. ती त्यास गवताच्या काड्यांप्रमाणे वाटली, परंतु त्या योगाने तिन्ही लोकात थरकाप होऊन गेला. त्यावेळी वासवशक्ति सोडण्यात आली, तिच्या आवाजाने ब्रह्मांड दणाणून गेले. तो अंबेने ऐकताच शोध करण्यासाठी आपल्या लावण्याखाणी दासी पाठविल्या. त्यांनी हा प्रळय पाहिल्यानंतर दुसऱ्या असंख्य दासी मदतीस आणून शस्त्रास्त्राचा मजबूत मारा चालू केला. परंतु मच्छिंद्रनाथाने त्या सर्वांचे निवारण केले आणि भुलविणारे मोहिनी अस्त्र कामशरामध्ये योजून प्रेरितांच त्या अस्त्राने दासीच्या देहात गुप्त संचार करून पिशाच्यासमान सर्वात भ्रमविले. या प्रकारचा चमत्कार चालला असता, विद्यागौरव अस्त्राच्या योगाने त्याने सर्वांस नग्न करून त्यांची वस्त्रे आकाशात उडवून दिली. नंतर मायाअस्त्राच्या योगाने मच्छिंद्राने हजारो पुरुष त्या स्त्रियांपुढे निर्माण केले आणि स्मरण अस्त्राच्या योगाने त्या सर्व स्त्रियांस शुद्धीवर आणिले त्या वेळी, समोर हजारो पुरुष व आपण वस्त्ररहित असा प्रकार पाहून त्या दासी परम लज्जित होऊन रानोमाळ पळत सुटल्या.

अशा स्थितीमध्ये त्या पळत असता, भैरव कंठी प्राण धरून अत्यवस्थ पडलेले त्यांनी पाहिले. मग त्या पळून भगवतीजवळ गेल्या. त्यांची अवस्था पाहून अंबेला आश्चर्य वाटले. तिने काय प्रकार घडला म्हणून विचारता दासी म्हणाल्या, सुकृत सरल म्हणून ही दशा प्राप्त झाली ! कोणीएक जोगी आला आहे, त्याने ह्या रितीने आमची दुर्दशा करून टाकिली. त्यानेच भैरवाचा प्राण कासावीस केला आहे. आता तुम्ही आपला गाशा गुंडाळून येथून कोणीकडे तरी पसार व्हा नाही तर तुम्हावर हाच प्रसंग येऊन गुदरेल असे आम्हांस दिसते. अशा प्रकारे त्या दासी कावऱ्या बावऱ्या होऊन भगवतीस सांगू लागल्या, त्या भिऊन गेल्यामुळे थरथरा कापत होत्या व त्यांच्या डोळ्यांपुढे तो जोगी दिसत असल्यामुळे भयाने 'आला आला !' असा शब्द त्या करीत होत्या.

हा सर्व प्रकार भवानीने ऐकून घेतल्यानंतर तिला परम आश्चर्य वाटले. मग तो कोण आहे हे ती अंतर्दृष्टीने पाहू लागली, तेव्हा मच्छिंद्रनाथ या नावाने कविनारायणाने अवतार घेतला असल्याचे तिच्या लक्षात आले. नंतर तिने सर्वास वस्त्रे दिली आणि त्यांसह अंबा मच्छिंद्रनाथाजवळ गेली तिने अतिप्रेमाने त्यास ह्रदयी धरिले. तेव्हा तो जगन्मातेच्या पाया पडला. अंबेने त्यास मांडीवर बसविले व प्रताप करून दाखविल्यावर तिने त्याची तारीफ केली. शेवटी तिने त्यास भैरवांना सावध करावयास सांगितल्याबरोबर त्याने वात आकर्षण अस्त्र काढून घेतले. भैरव सावध होऊन पाहू लागले तो अंबा मच्छिंद्रनाथास मांडीवर घेऊन बसली आहे असे त्यांच्या दृष्टीस पडले. त्यांनी देखील मच्छिंद्रनाथाची तारीफ करून त्याला शाबासकी दिली व नाग अश्वथाखाली संपूर्ण दैवते प्रसन्न होऊन त्यास आशीर्वाद दिल्याबद्दलचा मूळचा सादंत मजकूर अंबेला कळविला.

तो ऐकून माझ्या मनात तुझा पराक्रम पाहावा असे आले आहे, म्हणून अंबेने नाथास सांगितले. त्यावेळी तू सांगशील तसे मी तुला करून दाखवितो, असे नाथाने म्हटल्यावर तिने पर्वत आकाशात उडवून पुनः जागच्या जागी आणून ठेवावयास सांगितले. हे ऐकून त्याने वातास्त्र योजून व मंत्र म्हणून भस्म पर्वतावर फेकले. तेव्हा पर्वत आकाशात भ्रमण करू लागला. मग तिने त्याची पाठ थोपटून वाखाणणी केली आणि पर्वत उतरावयास सांगितले. तेव्हा त्याने वायुअस्त्र काढून घेऊन पर्वत जागच्या जागी आणून ठेविला. ते पाहून अंबेस संतोष वाटला. मग नाथास घेऊन अंबा आपल्या स्थानास गेली. नाथ तेथे त्रिरात्र राहिले. जातेसमयी अंबेने प्रसन्न होऊन त्यास सप्रास्त्र आणि भिन्नास्त्र अशी दोन अस्त्रे प्रसादादाखल दिली. त्यांचा स्वीकार करून मच्छिंद्रनाथा अंबेस नमस्कार करून निघाला.

अध्याय ५ संपादन


मच्छिंद्राकडून वेताळाचा पराभव व त्यास सांगितलेल्या अटी

मच्छिंद्रनाथाने हिंगळादेवीचे दर्शन घेतल्यानंतर तो तेथून जो निघाला तो बारामल्हार नामक अरण्यात गेला व तेथे एका गावात मुक्कामास राहिला. रात्री एका देवालयात स्वस्थ निजला असता सुमारे दोनप्रहर रात्रीस मोठा आवाज ऐकू येऊन असंख्य दिवट्या त्यास दिसल्या. हे पाहून भुतावळ उठली, असे मच्छिंद्रनाथाच्या मनात आले व काही चमत्कार दाखवून त्या सर्वांस अनुकूल करून घ्यावे, असा त्याने विचार केला. मग त्याने लागलीच स्पर्शास्त्राची योजना केली. त्या अस्त्राच्या अत्यद्भुत शक्तीच्या प्रभावाने सर्व भूतावळ तेथे खिळून राहिली. त्यांना हालचाल करिता येईना व ती सर्व भूते झाडाप्रमाणे चिकटून राहिली. ती भुते नित्यनियमाप्रमाणे वेताळाच्या भेटीस जाण्यास निघाली होती; परंतु मध्येच हा प्रसंग पडल्यामुळे ती त्या दिवशी वेताळास भेटली नाहीत. इकडे वेताळाने ती का आली नाहीत ह्याची चौकशी करण्यासाठी दुसरी भुते तिकडे पाठविली. मग पाच-सात भुते वेताळाची आज्ञा मान्य करून शरभतीरी आली आणि शोध करून पाहू लागली, तो ह्यांची अशी झालेली अवस्था त्यांच्या दुरून दृष्टीस पडली मग ती त्यांच्याजवळ जाऊन चौकशी करू लागली. तेव्हा तेथे कोणीएक सिद्ध आला असून त्याच्या सामर्थ्याचा हा सर्व खेळ असल्याचे समजण्यात आले. मग तो सिद्ध कोठे उतरला आहे, ह्याचा तपास करीत फिरत असता, मच्छिंद्रनाथास वेताळाकडुन आलेल्या भुतांनी पाहिले. तेव्हा ह्याचीच अद्भुत करणी असावी, असा त्यांच्या मनात संशय आला. मग त्या भुतांनी मच्छिंद्रनाथाजवळ जाऊन त्याची प्रार्थना केली की, स्वामी ही भुते पतित आहेत, ह्यांची मुक्तता करावी; म्हणजे ती गरीब बिचारी आपापल्या कामकाजास जातील. त्यावेळी ही सर्व भुते खिळली असता, तुम्हीच मोकळे कसे राहिलात म्हणून त्यांस विचारिले. तेव्हा त्यांनी उत्तर दिले की, ही भुते आज आली नाहीत म्हणून त्यांच्या तपास करण्याकरिता वेताळाने आम्हांस इकडे पाठविले आहे. तर महाराज ! यांची सुटका करावी म्हणजे ही वेताळाकडे पाया पडण्यासाठी जातील. त्यावर मच्छिंद्रनाथ म्हणाला, मी त्यांना कदापि सोडणार नाही, हा माझा निरोप तुम्ही वेताळाला सांगा, म्हणजे तो कितपत प्रबल आहे हे पाहता येईल.

मच्छिंद्रनाथाचा असा अभिप्राय पडल्यानंतर ती भुते लागलीच परत वेताळाकडे गेली आणि त्याच्या पाया पडून म्हणाली की, तिकडे एक योगी आला आहे, त्याने शरभतीरावरची भुते मंत्राच्या जोराने एका जागी खिळवून टाकिली आहेत व तुम्हांलाहि तसेच करून टाकण्याचा त्याने निश्चय केला आहे. हे ऐकताच वेताळाची नखशिखात आग झाली. त्याने सर्व देशातील भुतावळ आणण्यासाठी जासूद पाठविले. त्याप्रमाणे सर्वांनी येऊन वेताळास नमस्कार केला. त्यांना वेताळाने साराकच्चा मजकूर कळविला. मग सर्व जण आपापल्या फौजेनिशी शरभतीरि येऊन दाखल झाले व तेथे भयकारक भूतचेष्टा करून दाखवू लागले. हे मच्छिंद्रनाथाने पाहून भस्म मंत्रून ठेविले व त्यांचा प्रताप किती आहे ते पाहण्याच्या विचाराने काही वेळ उगाच राहिला. पुढे त्याने वज्रस्त्रमंत्र जपून सभोवती एक रेघ ओढिली व वज्रशक्ति मस्तकावर धरिली, तेणेकरून भुतांना जवळ जाता येईनासे झाले. भुतांच्या राजांनी झाडे, डोंगर नाथावर टाकिले, परंतु त्यांचे काही चालले नाही. त्यांनी आपल्याकडून सर्व शस्त्रे अस्त्रे सोडून इलाज केले, परंतु मच्छिंद्रनाथापुढे ते दुर्बळ ठरले. शेवटी मच्छिंद्रनाथाने स्पर्शास्त्र योजून सर्व भूतांना एकदम खिळवून टाकिले. त्या वेळी पिशाच्चांच्या अष्टनायकांपैकी झोटिंग, खेळता, बावरा, म्हंगदा, मुंजा, म्हैशासुर व धुळोवान हे सातजण मच्छिंद्रनाथाचे पाय धरून ओढण्याची वाट पाहात होते. पण तितक्यात नाथाने चपळाइने वज्रास्त्र सिद्ध करून ते सर्व दिशांकडे संरक्षणासाठी ठेविले व दानवास्त्र सिद्ध करून मृदु, कुंमक, मरु, मलीमल, मुचकुंद, त्रिपुर, बळजेठी हे सात दानव निर्माण केले. मग सात दानव व सात भूतनायक यांची झोंबी लागली. एक दिवसभर त्यांचे युद्ध चालले होते, पण दानवांनी त्यास जर्जर करिताच ते अदृश्य झाले. शेवटी मच्छिंद्रनाथाने वासवशक्ति सोडून वेताळास मूर्च्छित केले. त्याची अगदी प्राण जाण्याची वेळ आली, तेव्हा निरुपाय होऊन त्याने निरभिमानाने मच्छिंद्रनाथास शरण जाऊन प्राण वाचवून घेण्याचा बेत केला.

मग वेताळासह सर्व भूतनायकांनी मच्छिंद्रनाथाची प्रार्थना केली की आमच्या मरणाने तुला कोणता लाभ व्हावयाचा आहे? आमचे प्राण वाचविल्याने आम्ही जगात तुझी कीर्ति गाऊ व तू सांगशील ते काम करू. यमाजवळ यमदूत आहेत, विष्णुजवळ विष्णुदूत आहेत, त्याचप्रमाणे आम्ही अवघे आपापल्या पिशाच्चफौजेसहित तुझ्याजवळ राहून तुझा हुकुम मानू. हे वचन जर आम्ही असत्य करू तर आम्ही आमच्या पूर्वजांस नरकात टाकू अशी भुतांनी दीनवाणीने केलेली प्रार्थना ऐकून मच्छिंद्रनाथाने सांगितले की साबरी विद्येवर माझे कवित्व आहे, याकरिता जो मंत्र ज्या प्रकरणाचा असेल, त्याप्रमाणे तुम्ही वागून मंत्राबरहुकूम कार्य सिद्ध होण्यासाठी तुम्ही मंत्र जपणाराला साह्य करावे. तसेच मंत्र घोकून पाठ करणारासहि मंत्र सफल झाला पाहिजे. हे सर्व मच्छिंद्रनाथाचे म्हणणे सर्वांनी संतोषाने कबूल केले. तसेच, त्यांचे भक्ष्य कोणते हे सर्व त्यांना सांगून ठेविले आणि मंत्राच्या सिद्धतेची वेळ ग्रहणामधली कायम केली.

याप्रमाणे मच्छिंद्रनाथाने सर्व प्रकारच्या लागणाऱ्या कबुलायती वेताळाजवळून करून घेतल्या. नंतर प्रेरक अस्त्राची योजना करून त्यांना मोकळे केले. मग सर्व मंडळी मच्छिंद्रनाथाच्या पाया पडली व त्यांनी जयजयकार करून त्याची स्तुति केली व त्यास नमस्कार करून सर्व आपापल्या ठिकाणी गेले.

अध्याय ६ संपादन


मच्छिंद्रनाथास कालिकास्त्राची प्राप्ति

बारामल्हार पवित्र स्थानी मच्छिंद्रनाथाने अष्टभैरवादिकांची खात्री करून देवीचा प्रसाद मिळविल. कुमारदैवत तीर्थ करून कोकणात कुडाळ प्रांतात अडूळ गावात येऊन राहिला. त्या गावाबाहेर महाकालिकादैवत आहे, त्या देवताच्या दर्शनाकरिता मच्छिंद्रनाथ गेला. ते कालिकादैवत अति खडतर असून शंकराच्या हातातल्या कालिकास्त्राची तेथे स्थापना केलेली आहे. त्या अस्त्राने पुष्कळ दैत्यांचा प्राण घेतला म्हणून शंकर प्रसन्न होऊन त्या अस्त्ररूपी कालिकेस वरप्रदान देण्यास तयार झाले. तेव्हा तिने वर मागून घेतला की, आजपर्यंत मला सांगितलेली सर्व कामे मी केली, आता मला येथे विश्रांति घेऊ द्यावी. मग तिच्या मर्जीप्रमाणे शंकराने अंबेची त्या ठिकाणी स्थापना केली. त्या दैवताच्या दर्शनास्तव मच्छिंद्रनाथ देवालयात गेला व त्याने देवीचे दर्शन घेतले आणि प्रार्थना केली की, मातोश्री ! मी मंत्रकाव्य केले आहे, त्यास तुझे साह्य असावे आणि माझ्या हातात राहून माझी कवित्वविद्या गौरवून वरदान देऊन तू उदयास आणावी. अशा प्रकारची मच्छिंद्रनाथाने केलेली प्रार्थना ऐकून देवी संतप्त झाली. अगोदर त्या अस्त्रास (देवीस) श्रम झाले होतेच, तशात ते मच्छिंद्रनाथाचे भाषण ऐकून अग्नीत तूप पडल्यासारखे होऊन तिला अत्यंत राग आला व ती त्यास म्हणाली की, अरे नष्टा, पतिता, मला फार श्रम झाले आहेत, असे असता मला आणखी दुःख देऊ पाहतोस? तू कवित्वविद्या निर्माण करून माझ्याजवळ वरप्रदान मागत आहेस; पण तेणेकरून मला तू विघ्न करावयास आला आहेस. हे निवांत स्थान पाहून मी येथे येऊन राहिले; असे असता, दुरात्म्या! मला त्रास देण्यास आला आहेस, तर आता माझ्या डोळ्यासमोर उभा न राहता चालता हो. नाही तर तुला शिक्षा करीन. अरे ! शंकराच्या हातातील अस्त्र, ते मी तुझ्या हातात येऊन राहीन की काय? अरे, मला बोलाविण्यासाठी तुझ्या मनात शंका तरी कशी आली नाही? आता तू येथून निमूटपणे चालता हो; नाही तर व्यर्थ प्राणास मुकशील. हे भाषण ऐकून मच्छिंद्रनाथाने देवीस म्हटले की, मी प्राणास मुकेन ही गोष्ट तू स्वप्नात सुद्धा आणू नको. अगे ! सूर्यबिंब अगदी लहान दिसते, परंतु ते त्रिभुवन प्रकाशित करिते, त्याप्रमाणे मी माझा प्रताप दाखवून तुला क्षणात वश करून घेतो पहा. तेथे अंबा म्हणाली, भष्टा, तू कान फाडून हातात कंकण घालून व कपाळास शेंदुर लावून येथे येऊन मला भिववीत आहेस, पण मी या तुझ्या धमकावणीला भिणार नाही. अरे ! तुझी उत्पत्ती मला ठाऊक आहे. अरे बोलून चालून तुझा बाप कोळी, तू मासे मारून निर्वाह करावयाचा, ते सोडून का दिलेस? तुला दरिद्राला ही अस्त्रविद्या कशाला पाहिजे? तुला वाटत असेल की, मी थोर प्रताप दाखवून भुतावळ वश केली तशी ही देवी करून घेईन. पण मी तशापैकी नव्हे, हे तू पक्के समज. मी विषअस्त्र आहे किंचित वाकडी नजर करीन, तर सारे ब्रह्मांड पालथे घालुन लोळवून टाकीन. तेथे तू आपला कसचा दिमाख दाखवितोस? तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाला, देवी मी सांगतो ते ऐक. बळी वामनाला मशकासमान समजत होता; परंतु त्यालाच परिणामी पाताळलोक पाहावा लागला ! हे भाषण ऐकून देवीस अतिशय राग आला. ती त्यास म्हणाली, तुजमध्ये कोणता प्रताप आहे तो मला आताच दाखीव. तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाला की, तू शंकराच्या हातामध्ये राहून मोठमोठाले पराक्रम केल्याचा दिमाख मला दाखवीत आहेस, तर तो तुझा प्रताप तू मला आता दाखीव.

याप्रमाणे मच्छिंद्रनाथाचे भाषण ऐकून भद्रकाली सिंहासारखी आरोळी मारून आकाशात प्रगट झाली. इतक्यात भयंकर शब्द होऊ लागला की, जोगड्या, आता आपला प्राण वाचीव. तू आपल्या गुरूचे स्मरण कर. कारण वज्रास्त्राने जसा पर्वताचा चुराडा होतो, तसा तुझ्यामुळे पृथ्वीचा होईल. अरे, ही कालिका आज पृथ्वी सपाट करून टाकण्यास तयार झाली आहे. आता तुझा निभाव कसा लागेल? अशी बरीच धमकावणीची भाषणं मच्छिंद्रनाथाने ऐकून घेतल्यानंतर तो तिला म्हणाला, तू पाहिजे तसे बोललीस तरी तुझ्यापासून माझे काही वाकडे व्हावयाचे नाही. असे म्हणून त्याने भस्म हातात घेतले व वासवशक्तिमंत्र जपून ते भस्म आकाशात फेकून दिले. तेव्हा ती दैदीप्यमान वासवशक्ति तत्काळ प्रगट झाली. सूर्याच्या हातचे वासवास्त्र आणि शंकराच्या हातचे भद्रकाली किंवा कालिकाअस्त्र या उभयतांचे युद्ध सुरू झाले. दोन्ही अस्त्रांची झोंबी लागून ती एकमेकांवर प्रहार करीत होती. झगडता झगडता शेवटी कालिकेने वासवशक्तीचा पाडाव केला आणि मोठ्या आवेशाने ती मच्छिंद्रनाथावर चालली. हे नाथाच्या लक्षात येताच त्याने पुन्हा भस्म घेऊन एकादश रुद्र मंत्रयोग सिद्ध करून फेकताच एकादश रुद्र प्रगट झाले. ते भयंकर व अनिवार प्रळय करणारे प्रगट होताच कालिकेचे तेज फिक्के पडले. तिने सर्वांस नमस्कार करून भक्तिपूर्वक स्तुति केली; तेव्हा ते सौम्य झाले. असे पाहून मच्छिंद्रनाथाने वज्रास्त्र, धूम्रास्त्र ही सोडिली; परंतु त्यांचे काहीच वर्चस्व होईना. कारण कालिकेने धूम्रास्त्र गिळून टाकिले व वज्रास्त्र शैलाद्रि पर्वतावर आपटले. तेणेकरून तो पर्वत फुटून गेला. याप्रमाणे दोन्ही अस्त्राची पडती पाहून मच्छिंद्रनाथाने पुनः वाताकर्षणास्त्राची योजना केली. त्या वातास्त्राची मख्खी त्यास पक्की साधून गेली होती. दत्तात्रेयाच्या कृपाप्रसादाने मच्छिंद्रनाथास वाताकर्षणास्त्राचा मोठा लाभ झाला होता. ते अस्त्र सिद्ध करून प्रेरिताच त्याने कालिकादेवीवर प्रवेश केला; तेव्हा देहाचे चलनवलन बंद होऊ लागले. इतक्यात देवी विकल होऊन गगनामधून जमिनीवर धाडकन आदळली व बेशुद्ध होऊन पडली, ते पाहून देव दानवांनासुद्धा मोठा विस्मय वाटला.

कालिकेचे प्राण जाऊ लागले, तेव्हा तिने शंकराचे स्मरण केले. हा प्रकार कैलासास शंकराच्या कानावर गेला व हा सर्व खेळ मच्छिंद्रनाथाचा आहे, तसे त्याच्या ध्यानात आले. मग नंदीवर बसून शंकर लगेच त्या ठिकाणी गेले. शंकरास पाहून मच्छिंद्रनाथाने त्यांच्या पायांवर मस्तक ठेविले. मग शंकराने त्यास दाही हातांनी पोटानी धरून कडकडून भेट दिली व प्रताप दाखवून अस्त्र जिंकल्याबद्दल त्याची प्रशंसा केली. तेव्हा नाथाने शंकरास सांगितले की, बदरिकाश्रमास तुम्ही प्रसन्न होऊन दत्तात्रेयाकडून मला मंत्र-अस्त्रविद्यादि सर्व शिकविले, तो हा सर्व तुमच्या कृपेचा प्रताप होय. त्यावर शंकराने म्हटले, तूर्त ते असो, तू प्रथम कालिकादेवीस सावध कर. तेव्हा नाथ म्हणाला, तुम्ही आपला वरदहस्त माझ्या मस्तकावर ठेवा. असे ऐकून तुला कोणती इच्छा आहे म्हणून शंकराने त्यास विचारिल्यावर त्याने मागणे मागितले की, जशी शुक्राचार्याने संजीवनीविद्या कचास दिली, त्याचप्रमाणे साबरी विद्येचे तू मजकडून कवित्व करविलेस, तसा वर देऊन मला कालिकास्त्र द्यावे व तुझ्या हाती राहून कालिकेने जशी असंख्य कार्ये केली, तशीच तिने माझ्या हातात राहून करावी व पुढेहि मंत्र कार्यात तिने उपयोगी पडावे. असे जर मला वरदान द्याल तर मी निरंतर समाधानवृत्तीने राहीन. तेव्हा शंकराने सांगितले की, तू कालिकेस जीवदान देऊन उठव, तिला मी सर्वस्वी तुझ्या स्वाधीन करितो व मी देखील तुला सर्व प्रकारे अनुकूल आहे. असे वचन मिळताच मच्छिंद्रनाथ शंकराच्या पाया पडला. मग वातास्त्रमंत्र म्हणून भस्म फेकून वाताकर्षण अस्त्र काढून घेतले. तेव्हा देवी सावध होऊन उठून बसली व इकडे तिकडे पाहू लागली. तो शंकरास तिने पाहिले. मग ती झटकन येऊन त्यांच्या पाया पडली व प्रसंगी कैवार घेऊन प्राण वाचविले वगैरे बोलून तिने त्याची स्तुति केली.

मग शंकराने तिला सांगितले की, माझे एक तुझ्यापाशी मागणे आहे तेवढे तू ह्या वेळेस कृपा करून मला दे. तेव्हा कोणता हेतु आहे म्हणून देवीने शंकरास विचारल्यावर त्याने सांगितले की, माझ्या हातात तू बहुत दिवस राहिलीस, पण आता तू जगाच्या उपकारार्थ मच्छिंद्रनाथास साह्य व्हावे, हे माझे मागणे तू कृपा करून कबूल कर. हे ऐकून तिला हसू आले. ती म्हणाली. मी तुमच्या पायाची दासी आहे; असे असता आर्जव केल्यासारखे करून मजजवळ दान मागता हे काय? मला तुमची आज्ञा प्रणाम आहे. जिकडे पाठवाल तिकडे मी जाईन. मग तिने मच्छिंद्रनाथास बोलाविले. तो येताच देवीने त्यास आलिंगन दिले व मी सर्वस्वी तुला साह्य आहे असे वचन देऊन त्याचे तिने समाधान केले. मच्छिंद्रनाथ व शंकर ह्यांना देवीने तीन रात्री तेथे ठेवून घेतले. चौथे दिवीस विचारून शंकर कैलासास व मच्छिंद्रनाथ गदातीर्थी हरेश्वरस गेला.

अध्याय ७ संपादन


वीरभद्राबरोबर मच्छिंद्राचे युद्ध; स्वर्गलोकी सन्मान; वज्रावतीचे दर्शन

मच्छिंद्रनाथ हरेश्वरास गेल्यावर तेथे त्याने गदातीर्थी स्नान केले. इतक्यात स्नानासाठी त्या समयी त्याच तीर्थास त्रिशूळ, डमरू, धनुष्य वगैरे आयुधे घेऊन वीरभद्र आला होता; तेथे त्याची व मच्छिंद्रनाथाची भेट झाली. उभयतानी एकमेकास नमस्कार केला. मग तुम्ही कोण, कोठचे, पंथ कोणता, अशाबद्दल वीरभद्र विचारपूस करू लागला. तेव्हा ह्या देहाला मच्छिंद्र म्हणतात, नाथपंथ तो आमचाच आहे, शैली, कंथा व मुद्रा ही आमची भूषणे आहेत वगैरे मच्छिंद्रनाथाने सर्व सांगितल्यावर वीरभद्र म्हणाला, हे एक नवीन पाखंड बंड मातवून असे काळे तोंड जगात मिरविता, हे तुम्हास योग्य नाही, यास्तव ह्या मुद्रा टाकून दे. न टाकशील तर ठिकठिकाणी त्याबद्दल तुला पुष्कळ दुःखे सोसावी लागतील. वेदविधीने लावून दिलेल्या धर्माविरुद्ध हा एक निराळाच पंथ काढणारा असा मूर्ख तुझा गुरु तरी कोण? अशी त्याची निंदाप्रचुर भाषणे ऐकून, मच्छिंद्रनाथाचे पित्त खवळून गेले. तो क्रोधाच्या तडाख्यात वीरभद्रास म्हणाला, अरे अधमा ! तुझ्या दर्शनाने मला स्नान करावयाला पाहिजे. आता निमूटपणे आपल्या कामास जा; नाही तर माझ्या हाताने तू आता मरण पावशील. ह्या भाषणाचा वीरभद्रास अतिशय राग आला व तो म्हणाला, अरे मूर्खा ! आता तुझा प्राण घेतो पाहा. असे म्हणून त्याने धनुष्यासह अर्धचंद्र निर्वाण बाण काढला. तेव्हा मच्छिंद्रनाथाने म्हटले की, अरे पतिता ! उन्मत्तपणाने तू जनात आपले अहित करून घेत आहेस. अरे ! धनुष्यबाण काढून मला सोंग दाखवीत आहेस; परंतु या योगाने तू या वेळेस मरण मात्र पावशील. अरे ! असली बहुरूप्यांची सोंगे दाखविणारे मजसमोर पुष्कळ येऊन गेले. तुझे हे हावभाव मजसमोर क्षणभरसुद्धा टिकाव धरणार नाहीत. आता तुझे आयुष्य सरले म्हणूनच तू येथे आलास असे मला वाटते !

अशी त्या समयी उभयताची आवेशाची पुष्कळ भाषणे झाली. नंतर वीरभद्राने धनुष्यास बाण लावून मच्छिंद्रनाथाला रामाचे स्मरण करावयास सांगितले. ते ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणाला, राममंत्र तुला अपवित्र वाटला, म्हणून त्या मंत्राचे मला स्मरण करावयास सांगतोस, पण इतके पक्के समज की, त्याच मंत्राने शंकर दुःखातून मोकळे होऊन सुखी झाले. वाला (वाल्मीकि) तरला तोच मंत्र मला तारील. आता तू सावध राहा. असे म्हणून त्याने हातात भस्म घेतले व वज्रास्त्र सिद्ध करून फेकले, ते दाही दिशा फिरू लागले. त्यावेळी वीरभद्राने सोडलेला बाण मच्छिंद्रनाथास तृणासमान भासला. तो बाण मच्छिंद्रनाथाचा प्राण घ्यावयास येत होता, पण भस्माच्या जोराने तो आकाशात भ्रमण करू लागला. इतक्यात मच्छिंद्रनाथाच्या वज्रशक्तीने त्या बाणाचा चूर होऊन गेला. नंतर वीरभद्राने दुसरा बाण काढून नागास्त्राची योजना करून तोहि पाठोपाठ सोडला. ते पाहून मच्छिंद्रनाथानेहि आपल्या संरक्षणाकरिता रुद्रास्त्र व खगेंद्रास्त्र प्रेरिले. त्यांनी वीरभद्राची शक्ती क्षीण करून टाकली. पुढे वीरभद्राने वातास्त्र सोडताच, मच्छिंद्रनाथाने पर्वतास्त्र सोडले. अशा रितीने ते दोघे वीर, अस्त्रे पेरून एकमेकांचा पाडाव करावयास पाहात होते. शेवटी ब्रह्मा, विष्णु, महेश यांनी युद्धस्थानी येउन मच्छिंद्रनाथाचे समाधान केले. नंतर वीरभद्रास जवळ बोलावून त्याचे मच्छिंद्रनाथाशी सख्य करून दिले व हा नाथ कविनारायणाचा अवतार आहे असे सांगितले. मग तो देखील त्यास वर देण्यास तयार झाला. त्याने बोलून दाखविले की, मी आजपर्यंत मोठमोठाले बलवान असे असंख्य वीर जेरीस आणून हतवीर्य केले. पण मच्छिंद्रनाथासारखा वीर मला आढळला नाही. असे बोलून त्याने प्रेमाने त्यास आलिंगन दिले व कोणती मनकामना आहे म्हणून विचारिले. तेव्हा मच्छिंद्रनाथाने सांगितले की, मी साबरी विद्या साध्य केली आहे, तर तीस तुझे साहाय्य असावे. मग मंत्राबरहुकूम सर्व कामे करण्याचे वीरभद्राने मच्छिंद्रनाथास वचन दिले व आम्हीहि साहाय्य आहो असे संपूर्ण देवांनी आश्वासन दिले. तेव्हा मच्छिंद्रनाथाने सर्व देवांना नमस्कार केला.

नंतर विष्णूने मच्छिंद्रनाथास पोटाशी धरले आणि सांगितले की, तुझ्या विद्येस माझे पूर्ण साहाय्य आहे, माझे स्मरण करताच मी त्या ठिकाणी दृश्य होऊन तुझ्या संकटाचे निवारण करीन, असे बोलून त्याने त्यास चक्रास्त्र दिले. नंतर शंकराने प्रसन्न होऊन त्रिशूलास्त्र, ब्रह्मदेवाने शापादप्यास्त्र, तसेच इंद्राने वज्रास्त्र दिले. त्याचप्रमाणे देवांनी प्रसन्न होऊन एक एक वर दिला. मग आपापल्या विमानात बसून ते सर्व स्वस्थानास जावयास निघाले. त्या वेळेस मच्छिंद्रनाथाने देवाची प्रार्थना केली की, मणिकर्णिकेचे स्नान करावे असा माझा हेतु आहे; तेवढी माझी मनकामना पुरवावी. ते त्याचे म्हणणे सर्व देवांनी आनंदाने कबूल केले.

मग लक्ष्मीकांताने त्यास आपल्या विमानात बसवून वैकुंठास नेले व आपल्या आसनावर त्यास बसविले. त्याचे भोजन, निजणे, बसणे, उठणे, सर्व विष्णूबरोबर वैकुंठात होत होते. वैकुंठात असता मच्छिंद्रनाथ नित्य मणिकर्णिकेचे स्नान करीत असे. एकदा आपण पूर्वजन्मी मेरुपर्वतावर घेतलेली समाधी पाहाण्याची इच्छा होऊन त्याने हा आपला हेतु विष्णूस कळविला. म्हणून त्याने त्यास तेथे नेऊन एक वासुदेवाची व दुसरी नवनारायणाची अशा समाधि दाखविल्या; त्या पाहून तो आनंद पावला.

मच्छिंद्रनाथ वैकुंठास एक वर्षभर राहिला. तेथून त्यास शंकर कैलासी घेऊन गेले. तेथेहि तो एक वर्षभर राहिला. मग मोठ्या सन्मानाने इंद्र त्यास अमरावतीस घेऊन गेला. तो तेथे तीन महिने होता. नंतर ब्रह्मदेवाने सांगितल्यावरून नारद येऊन त्यास सत्यलोकास घेऊन गेला. तेथे तो सहा महिने राहिला. पुढे सर्व देवांनी त्यास आपल्याकडे एक एक दिवस आग्रहाने राहवुन घेतले. तो एकंदर सात वर्षे स्वर्गात राहून पाहुणचार खात होता. नंतर सर्वांना विचारून तो मृत्युलोकी यावयास निघाला, तेव्हा सर्व देवांनी त्याला विमानात बसवून अति आदराने मृत्युलोकी आणून पोचविले नंतर ते स्वर्गास गेले व मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रेस निघाला.

मच्छिंद्रनाथ फिरत फिरत केकडा देशातील वज्रवनात गेला. त्या ठिकाणी वज्रभगवतीचे स्थान आहे. तेथे त्याने तीनशेसाठ उष्णोदकाची कुंडे पाहिली, तेव्हा त्यास परम आश्चर्य वाटले. मग तेथल्या सर्व तीर्थात स्नान करून तो अंबिकेच्या देवालयात गेला व पुजाऱ्यास बोलावून कुंडाबद्दल विचारू लागला. तेव्हा पुजाऱ्यांनी सांगितले की, पूर्वी या ठिकाणी वसिष्ठ मुनीने यज्ञ केला. त्या समयी सर्व देव खाली आले होते. त्यांनी स्नानास गेल्यावर ऊन पाण्याची कुंडे निर्माण केली व स्नान करून आपापली नावे कुंडास ठेविली. ते देव बारा वर्षे बारा दिवसपर्यंत येथे राहिले होते. यज्ञ समाप्त झाल्यावर देव परत गेले, पण कुंड अजूनपर्यंत त्याच ठिकाणी आहेत.

असा मजकूर ऐकल्यावर आपणहि कुंडे निर्माण करावी, असे मच्छिंद्रनाथाच्या मनात येऊन त्याने त्रिशूळाच्या योगाने कुंडे खणून तयार केली व वरुणमंत्र जपून भोगावतीचे उदक उत्पन्न केले. मग अग्निमंत्र जपताच त्यात अग्नीने प्रवेश करून पाणी ऊन केले, नंतर त्या नव्या भोगावतीच्या कुंडात मच्छिंद्रनाथाने स्नान करून तो वज्रादेवीच्या देवळात गेला व तिला त्या कुंडातील ऊन पाण्याने स्नान घातले. तेव्हा तिने त्यास शाबासकी देऊन एक महिना राहवून घेतले. नंतर तुला वज्राबाई का म्हणतात, असे मच्छिंद्रनाथाने तिला विचारिले असता ती देवी म्हणाली वसिष्ठाच्या यज्ञात इंद्र हवनाच्या वेळी आला होता, पण सभेत जे ऋषि बसले होते, त्यांच्याकडून त्यास मान न मिळाल्यामुळे त्याने वज्राची प्रेरणा केली. हे पाहून श्रीरामचंद्राने 'शक्ति' मंत्राने दर्भ मंत्रून सोडला. त्यात मी प्रगट होऊन वज्र गिळून टाकिले आणि हवनास हरकत होऊ दिली नाही. मग इंद्राने आपले वज्र मिळविण्यासाठी रामाची प्रार्थना केली. त्याने इंद्रास वज्र परत दिले. मग त्याच वेळेस देवांनी व ऋषींनी मला 'वज्राबाई' असे नाव दिले. मग सर्व ठिकाणी गेल्यानंतर रामाने माझी येथे स्थापना केली. त्याने प्राणप्रतिष्ठा करतेसमयी मला भोगावतीचे स्नान घातले होते. त्यावर आज झाले. पण रामापेक्षा तू एक गोष्ट विशेष केलीस. ती ही की, त्यांनी मला थंड पाण्याने स्नान घातले व तू ऊन पाण्याने घालून भोगावती येथे अक्षयी ठेविलीस, असो; तेथे मच्छिंद्रनाथ महिनाभर राहिला व देवीचा निरोप घेऊन पुढे गेला.

अध्याय ८ संपादन


मच्छिंद्राचे सूर्याबरोबर युद्ध


नंतर मच्छिंद्रनाथ तीर्थे हिंडत हिंडत द्वारकेस गेला व गोमतीचे स्नान करून रामचंद्राचे दर्शन घेऊन अयोध्येस आला. तेथे शरयूतीरी स्नान करून रामचंद्राचे दर्शन घेण्याकरिता देवालयाकडे चालला. त्यावेळी अयोध्यामध्ये पाशुपत या नावाचा राजा राज्य करीत होता. हा सूर्यवंशीय श्रीरामचंद्राचा वंशज होय. तो आपल्या सैन्यासह श्रीरामचंद्राचे दर्शन घेण्याकरिता देवालयात गेला होता. राजा देवालयात पूजेस गेला असता, देवळाभोवती पाऊल ठेवण्यास जागा नाही इतकी दाटी झाली होती. तशा गर्दीतून मच्छिंद्रनाथाची स्वारी रामाचे दर्शन घेण्यासाठी पुढे घुसली व तो जेमतेम देवळाच्या दरवाजापाशी आला. पण द्वारपाळांनी त्यास आत जाण्यास अटकाव केला.

मच्छिंद्रनाथ उतावळीने देवळात जात असता त्याच्याशी द्वारपाळ उद्धटपणाने बोलू लागले. त्यांनी मर्यादा न ठेविता पुष्कळ अपशब्दांनी ताडण करून व शेवटी हात धरून त्यास मागे लोटले. अशी अप्रतिष्ठा झाली, तेव्हा मच्छिंद्रनाथासहि वाईट वाटले. त्यास संताप आला असताहि, त्याने तो विवेकाने सहन केला, कारण सेवकांबरोबर तंटा करणे शोभत नाही, ह्या विचाराने तो उगीच राहून द्वारपाळाशी न बोलता राजासच शिक्षा करण्याचा विचार त्याने मनात आणिला. राजाचा जीव संकटात पडल्यानंतर सर्व ताबेदार मंडळींचा जीव खालवर होऊन अवघे फिकिरीत पडतील, ह्या हेतूने त्याने स्पर्शास्त्रमंत्र म्हणून व रामाचे नाव घेऊन भस्म मंत्रून ठेविले. नंतर राजाने देवीची पूजा करून हात जोडून जमिनीस साष्टांग नमस्कार घातला. त्याचे कपाळ जमिनीस लागले आहे, अशी संधि पाहून त्या स्पर्शास्त्राने आपला अंमल राजावर बसविला व त्यामुळे राजास जमिनीपासून सुटे होता येईना. तो चिकटून राहिला. त्याने पुष्कळ खटपट करून पाहिली, पण निष्फळ. मग राजाने प्रधानास बोलावून हा प्रकार कळविला. मंत्री मोठा चाणाक्ष होता, तो लागलाच बाहेर येऊन कोणाबरोबर कोणाचा तंटाबखेडा झाला आहे काय, ह्याची चौकशी करू लागला. त्याने तर्काने असे धोरण बांधिले की, नगरात कोणी जती किंवा साधु आला असेल, त्याचा राजसेवकांनी छळ केल्यामुळे तो रागावला असावा. पण त्याने राग मनात ठेविल्यामुळे भगवंतास ही गोष्ट सहन न होऊन त्याचाच क्षोभ असावा. म्हणून देवीच्या भक्ताचा छळ कदापि कोणी करू नये. येथेहि या वेळी असाच काही तरी छळ राजसेवकांकडून होऊन भगवंतास शस्त्र धरावे लागल्यामुळे ह्या परिणामास गोष्ट आली असावी, असा तर्क करून शोध चालविला. तो देवळाच्या दाराशी येताच सर्व खबर त्यास लागली. त्याने मच्छिंद्रमुनीस शोधून काढिले. मग तो त्याच्या पाया पडला व हात जोडून प्रार्थना करू लागला की, आता स्वामींनी कृपा करावी. तुम्ही संत शांतीचे भांडार. औदार्याला तर सीमाच नाही. या भाषणाने मच्छिंद्रनाथाचा क्रोध शांत होऊन त्यास संतोष वाटला. मग हातात भस्म घेऊन विभक्तमंत्र म्हणून त्यास भस्म फुंकताच राजा जमिनीस चिटकलेला होता तो लागलाच सुटा झाला.

राजा उठून बसल्याची बातमी लागताच प्रधानाने मच्छिंद्रनाथाचा हात धरून त्यास देवळात नेले व राजास झालेला समग्र वृत्तांत निवेदन केला. मग राजा त्याच्या पाया पडला व नाव विचारू लागला असता, मला मच्छिंद्र म्हणतात म्हणून त्याने त्यास सांगितले. मच्छिंद्रनाथाची कीर्ति पूर्वीच राजास ऐकून ठाऊक झालेली होती. तोच मच्छिंद्रनाथ आज येऊन दर्शन देत आहे, म्हणून राजास फार आनंद झाला. नंतर राजाने त्याचा हात धरून आपल्या समागमे राजवाड्यात नेले. तेथे सिंहासनावर बसवून त्याची षोडशोपचारांनी पूजा केली व स्वतः त्याच्या सेवेकरिता हात जोडून उभा राहिला. अशी राजाची निष्ठा पाहून मच्छिंद्रनाथास परमानंद झाला. मग प्रसन्न होऊन कोणता हेतु तुझ्या मनात आहे तो मला कळव म्हणून त्याने म्हटले. तेव्हा राजा म्हणाला, मी सूर्यवंशी श्रीराम राजाच्या घराण्यातला आहे. माझे नाव पाशुपत. मला इतकेच मागावयाचे की, सूर्यकुळांत उत्पन्न झालेला जो वीरशिरोमणी श्रीराम त्याची मला भेट व्हावी. ते ऐकून रामाची व तुझी भेट आताच करून देतो, असे बोलून राजास घेऊन मच्छिंद्रनाथ सभेच्या बाहेर आंगणात येऊन उभा राहिला.

त्यावेळी त्याने धूम्रास्त्रमंत्र म्हणून व भस्म मंत्रून सूर्यावर टाकिले, तेणेकरून संपूर्ण आकाश धुराने भरून गेले; सूर्य झाकून गेला व त्याचा सारथी अरुण धुरामुळे डोळे पुसू लागला आणि तोंडात धूर गेल्याने कासावीस होऊ लागला. तेव्हा क्षत्रिय कुळातील कोणी तरी राजाने ही धुम्रास्त्रविद्या प्रेरिली आहे, असे सूर्यास वाटले. मग त्याने वायु अस्त्राची योजना बाणावर करून तो बाण सोडला. तेव्हा मोठा वारा सुटला, त्या योगाने धूर दाही दिशांस फाकला. मग मच्छिंद्रनाथाने पर्वतास्त्राची योजना केली. त्याने सूर्याच्या रथास अडथळा झाला त्या क्षणीच सूर्यनारायणाने वज्रास्त्र सोडिले. तेणेकरून पर्वतास्त्रापासून निर्माण झालेल्या सर्व पर्वताच्या नाश झाला. मग मच्छिंद्रनाथाने भ्रमास्त्राची योजना केली. तेव्हा घोड्यासहित अरुण सुद्धा भ्रमिष्ट होऊन वाट सोडून रथ भलतीकडे नेऊ लागला. असे पाहून सूर्याने ज्ञानास्त्र सोडिले. तेव्हा अग्नीवर उदक टाकल्याने जसा तो नाहीसा होतो किंवा शिष्याचे अज्ञानपण बोध करून सद्गुरू नाहीसे करतो. त्याचप्रमाणे सूर्याने ज्ञानास्त्राची प्रेरणा करून भ्रमाचे निरसन केलं, ते पाहून मच्छिंद्रनाथाने वाताकर्शण अस्त्र सोडिले. तेव्हा सूर्यासह सारथी, घोडे ह्यांचा श्वासोच्छ्वास बंद झाला व रथ उलटून जमिनीवर आदळला. त्याबरोबर सूर्यहि रथाखाली पडला. त्या तेजोमय सूर्याच्या योगाने पृथ्वी जळून जाऊ लागली. तेव्हा मच्छिंद्रनाथाने उदकास्त्राची योजना केली. मग अपरिमित जलवृष्टि होऊन दाह शांत झाला. परंतु सूर्य खाली पडून बेशुद्ध झाल्याने देवांची तोंडे सुकून गेली. ते सर्व मच्छिंद्रनाथाजवळ आले. ब्रह्मदेव, विष्णु, शिव, वरुण, अश्विनी, कुबेर गंधर्व वगैरे सर्व देव लगबगीने धावत आले. एका सूर्यासाठी हे सर्व देव महीवरती उतरून मच्छिंद्रनाथाजवळ गेले व सूर्यापासून कोणता अपराध झाला आहे, म्हणून त्यानी विचारले. तेव्हा मच्छिंद्रनाथाने नमस्कार केला आणि उत्तर दिले की, हा पाशुपत राजा सूर्यकुळातला असताहि सूर्य आपल्या वंशाचा बिलकुल समाचार घेत नाही. व ह्याच्याकडे नुसता ढुंकूनसुद्धा पाहात नाही. पाशुपत राजा सूर्यास आवडत नाही, म्हणून त्यास वळणावर आणावयासाठी मला असे करावे लागले. असे करण्यामध्ये आणखी दुसरे हेतु आहेत. माझ्या साबरि मंत्रविद्येला सुर्याचे बिनहरकत साह्य मिळावे व ज्याने सूर्यवंशामध्ये अवतरून विजयध्वज लाविला, त्या श्रीरामचंद्राची या पाशुपत राजास भेट व्हावी; का की, या राजाचा मजवर पूर्ण लोभ आहे. यास्तव हे चक्रपाणी, माझे इतके हेतु पुरवावे. हे ऐकून विष्णुने सांगितले की, तुझ्या मनाप्रमाणे सर्व गोष्टी घडून येतील, परंतु अगोदर सूर्याला सावध कर. तो तुझ्या मंत्राला सर्व गोष्टींनी अनुकूल असून जेथे त्याचे नाव निघेल तेथे तो स्वतः येऊन तुझे कार्य पार पाडून देईल. सहज सूर्याचे नाव घेतले असता पातक भस्म होते. मग ते मंत्रप्रयोगाच्या जोडीने घेतले तर फारच उत्तम फल प्राप्त होईल. आम्ही सर्व देव तुझ्या कार्यासाठी उतरलो आहो, आता विलंब न करिता यास लवकर उठीव. वीरभद्राच्या युद्धप्रसंगाच्या वेळेस आम्ही तुझ्या म्हणण्याप्रमाणे वागण्याचे कबूल केले, नागपत्रअश्वत्थाचे ठिकाणी तुला वरदाने दिली. असे असता अजून संशयात का पडतोस? असे बोलून सर्व देवांनी दुःखापासून सोडविण्याबद्दल मनस्वी भीड घातली. परंतु मच्छिंद्रनाथाने सांगितले की, पाशुपत राजास रामाचे दर्शन करवा; म्हणजे माझ्या मनाला स्वस्थता वाटेल. हे ऐकताच रामचंद्र प्रगट झाले. तेव्हा राजास व नाथास अपार आनंद झाला. नंतर मच्छिंद्रनाथ पाशुपत राजासह रामाच्या पाया पडला. त्यास रामाने पोटाशी धरिले.

त्याच वेळी मच्छिंद्राने रामाची प्रार्थना केली की, तुझे नाम श्रेष्ठ होय. साबरी विद्येच्या मंत्रयोगामध्ये तुझे नाव येईल, तेव्हा तू येथे हजर राहून ते कार्य सिद्धीस न्यावेस व ह्याबद्दल प्रसन्न मनाने वचनादाखल माझ्या हातावर हात द्यावा. हे ऐकून रामाने की, तिन्ही देवांचा अवतार दत्तात्रय, त्याचा पूर्णपणे वरदहस्त तुझ्या मस्तकावर, तो पूर्णब्रह्म नरसिंहअवतार, त्याचीहि तुला पूर्ण अनुकूलता. मग मी का तुला साह्य न व्हावे? तर तुला मी सर्वस्वी साह्य आहे. मंत्रात माझे नाव निघताच मी ते कार्य करीन, असे त्यास रामाने वचन दिले. त्या वेळी त्याने असेही सांगितले की, तु कविनारायणाचा अवतार असल्यामुळे आपण उभयता एकच आहो, असे सांगून सूर्यास उठविण्यासाठी रामाने मच्छिंद्रनाथाचे पुष्कळ आर्जव केले.

मच्छिंद्रनाथाचा त्या वेळचा आनंद अपरिमित होता. मग मच्छिंद्रनाथाने वायूक्त अस्त्रमंत्र म्हणून भस्म टाकिताच सुर्य सावध झाला व त्याने सर्व देवाना जवळ बोलाविले. सर्व देवांनी त्यास नमस्कार केला. पुढे हा कोणत्या वीराचा प्रताप म्हणून सूर्याने विष्णूस विचारिले व मला हात दाखविणाऱ्या प्रतापीवीरास एकदा आणून मला भेटवा म्हणून सांगितले. सूर्यास भेटण्यासाठी देवानी मच्छिंद्रनाथास बोलाविले, मग सूर्यापासून दाह न व्हावा म्हणून चंद्रास्त्र मंत्रून नाथ त्यास भेटावयास गेला. नमस्कार केल्यानंतर सूर्याने त्यास नाव गाव विचारिले असता विष्णूनेच मुळापासून त्यास कथा सांगितली. तेव्हा सूर्याने मच्छिंद्रनाथास साबरी विद्येस साह्य असल्याबद्दल वचन दिले. मग पाशुपत राजास त्याच्या पायावर घातले. आपला वंशज पाहून सूर्यास आनंद झाला. मग त्याचे समाधान करून सूर्यासह सर्व देव आपापल्या ठिकाणी गेले. मच्छिंद्रनाथहि राजाचा निरोप घेऊन व रामाचे दर्शन घेऊन पुढे तीर्थयात्रा करीत चालला.

अध्याय ९ संपादन


गोरक्षनाथाचा जन्म


अयोध्येहून मच्छिंद्रनाथ निघाल्यानंतर मथुरा, अवंती, काशी, काश्मीर, मथुरा, प्रयाग, गया आदिकरून तीर्थे करीत करीत तो बंगाल्यात गेला. तेथे चंद्रगिर गावात उतरल्यावर भिक्षेस निघाला असता, एका ब्राह्मणाचे घर दिसले. ते पाहताच, त्यास भस्माची आठवण झाली तो मनात विचारू लागला की, मागे मी भस्म मंत्रून दिले होते, ते हेच घर. येथच्या यजमानीणबाईचे नाव सरस्वती, तिला मी बारा वर्षांनी परत येईन म्हणून सांगितले होते तिचा मुलगा कसा आहे तो पहावा, असा विचार करून तो त्या घराजवळ गेला व बाहेरून त्याने तिचे नाव घेऊन हाक मारिली. हाक ऐकून ती बाहेर आली व गोसावी पाहून भिक्षा आणून घालू लागली. तेव्हा खूण पटण्यासाठी त्याने तिला तिचे व तिच्या नवऱ्याचे नाव वगैरे विचारिले. त्यावरून तिने आपले नाव सरस्वती, नवऱ्याचे दयाळ व जात गौडब्राह्मण वगैरे सर्व सांगितले; तेव्हा त्यास खूण पटली. मग मुलगा कोठे आहे, म्हणून त्याने तिला विचारिले असता, मला अजूनपर्यंत पुत्र झालाच नाही, असे तिने उत्तर दिले. हे ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणाला, तू खोटे का बोलतेस? तुला पुत्र होण्यासाठी मी विभूति मंत्रून दिली होती ती काय झाली? असे विचारताच ती घाबरली व आपण ती उकिरड्यावर टाकिली, हे वाइट केले, म्हणून तिला पूर्व पश्चात्ताप झाला. आता हा कानफाड्या माझी काय दशा करील कोण जाणे? आता मी करू तरी काय? ह्याने तर मला पक्के ओळखले. असे विचार तिच्या मनात येऊ लागल्याने ती भांबावून गेली. तशात मच्छिंद्रनाथ पुत्र दाखविण्यासाठी वारंवार तिला टोचीत होताच. नंतर ती त्याच्या पायावर मस्तक ठेवून म्हणाली, योगिराज ! माझा विश्वास नव्हता म्हणून तुम्ही दिलेला प्रसाद मी उकिरड्यावर टाकून दिला, ह्या माझ्या अन्यायाची मला क्षमा करा.

त्या वेळी स्त्रियांचे कर्तृत्व सर्व प्रकारे अनर्थास कारण होते, अशा अर्थाचे बहुत विचार मच्छिंद्रनाथाच्या मनात आले. ह्या बाईच्या नादी लागल्यामुळे त्या वेळी आपला मूर्खपणा झाला, असे त्याला वाटले. पुत्रप्राप्तीस्तव सूर्याच्या वीर्याने अभिमंत्रण करून दिलेल्या भस्माची धुळदाणी झाल्याने त्यास रुखरुख लागली. ते भस्म फुकट न जाता त्याला देह झालाच पाहिजे असे वाटून व ते भस्म कोठे टाकिले त्याचा तपास करावा म्हणजे काय अवस्था झाली आहे ते कळेल, असा विचार मनात आणून तो म्हणाला की, माते ! जसे व्हावयाचे तसे घडून आले. तुजवर जरी मी आता रागावलो तरी माझ्या पदरात काय पडावयाचे आहे? होणारी गोष्ट होऊन गेली. आता इतके कर की, जेथे ते भस्म टाकिले होतेस ती जागा मला दाखव म्हणजे झाले.

मच्छिंद्रनाथाने असे म्हटल्यावर तिची भीति उडाली. मग जेथे ते भस्म टाकिले होतेस ती जागा मला दाखव म्हणजे झाले.

मच्छिंद्रनाथाने असे म्हटल्यावर तिची भीति उडाली. मग जेथे भस्म टाकिले होते तो मोठा उंच गोवराचा ढीग त्यास दाखवून येथेच भस्म टाकले. असे ती म्हणाली. ती जागा पाहिल्यावर त्याने मुलास उद्देशून हाक मारिली की, हे प्रतापवंता हरिनारायणा सूर्यसुता, तू जर गोवरात असलास तर बाहेर नीघ. तुझा जन्म येथे झाला व आज बारा वर्षे ह्यात राहिलास म्हणून तुझे नाव गोरक्ष असे ठेविले आहे. यास्तव हे गोरखनाथा, तू आता उशीर न लावता बाहेर ये. इतके शब्द ऐकताच उकिरड्यातून शब्द आले की, गुरुराया, मी गोरक्षनाथ आत आहे; पण गोवराची रास मोठी असल्यामुळे बाहेर निघता येत नाही; यास्तव गोवर एका बाजूस करून मला बाहेर काढावे. नंतर खाच उकरून गोरक्षनाथास बाहेर काढिले. तो तेजःपुंज पुत्र बाहेर येताच सूर्यासारखा प्रकाश पडला. तेव्हा सरस्वतीस फार पश्चात्ताप झाला. असा पुत्र आपल्या हातून गेला. म्हणून तिला तळमळ लागली व ती रडू लागली. तेव्हा मच्छिंद्रनाथाने तिला सांगितले की, आता रडतेस कशाला? तो मुलगा तुझ्या नशिबीच नव्हता, मग तो तुला कोठून प्राप्त होणार? आता तू येथून जा. कारण माझा कोप प्रत्यक्ष अग्नीप्रमाणे आहे. तो ब्रह्मादिकाना देखील सहन होण्यास कठीण. आता व्यर्थ खेद न करिता जा; नाही तर शाप मात्र घेशील. ते भाषण ऐकून ती घाबरली व मुकाट्याने मागल्या पायी घरी गेली, पुढे गोरक्षनाथ गुरूच्या पाया पडला. त्यास मच्छिंद्रनाथाने प्रसन्न होऊन उपदेश केला व आपला वरहस्त त्याच्या मस्तकावर ठेविला आणि त्यास नाथदीक्षा दिली. नंतर तो त्यास घेऊन तीर्थयात्रेस निघाला.

मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथास घेऊन तीर्थे करीत हिंडत असता, जगन्नाथास जाण्याच्या वाटेवर एक कनकगिरी म्हणून गाव लागला तेथे येताच तो क्षुधेने व्याकुळ झाल्यामुळे त्याने गोरक्षनाथास भिक्षेस पाठविले. तो घरोघर भिक्षा मागत असता एका ब्राह्मणाच्या घरी गेला. त्या दिवशी त्या ब्राह्मणाकडे पितृतीथ होती, म्हणून चांगली चांगली पक्वान्ने केलेली होती. तेथे जाऊन गोरक्षनाथाने 'अलख' शब्द केला. तो ऐकून घरधनीण बाहेर आली. तिने त्याच्या त्या गंभीर भव्य व तेजस्वी चेहऱ्याकडे पाहताच हा कोणी तरी योगी असावा, असा विचार तिच्या मनात आला. त्यावेळेस तिने त्यास सर्व पदार्थ वाढलेले घवघवीत पान दिले. अनेक पदार्थ पाहून गोरक्षास समाधान वाटले व तिला आशीर्वाद देऊन तो निघून गेला. पोटापुरती बेगमी झाली असे पाहून तो जास्त न फिरता माघारी गेला व ती भिक्षा त्याने गुरुपुढे ठेविली. षड्रस पक्वानांनी भरलेले पात्र पाहून गुरूस आनंद झाला. मग तो जेवावयास बसला. ते अन्न स्वादिष्ट लागल्यामुळे मच्छिंद्रनाथ प्रीतीने जेवला. त्या योगाने त्याचे पोट भरले; तरी त्याचा त्या पात्रातील वड्यावर हेतु राहून गेला. तेव्हा त्याने गोरक्षनाथाकडे पाहिले त्याने काय इच्छा आहे ते कळवावी अशी विनंति केली. त्यावर तो म्हणाला, वड्यावर माझे मन गेले आहे; तो जर आणखी एक असता तर चांगले झाले असते.

गुरूने आपली वासना वड्यावर आहे असे सांगताच मी आता जाऊन वडे घेऊन येतो. असे बोलून गोरक्षनाथ पुन्हा त्याच घरी गेला व गुरूकरिता त्या बाईपाशी आणखी वडे मागू लागला. तेव्हा ती म्हणाली, गुरूचे नाव कशाला घेतोस? तुला पाहिजेत असे का म्हणेनास? हे ऐकून त्याने तिला सांगितले की, खरोखर मला नकोत, मी गुरुजींची इच्छा पूर्ण करण्यासाठीच वडे मागून नेत आहे. तेव्हा ती म्हणाली, अरे तुला बैरागी समजून मी भक्तिपूर्वक पुष्कळ पदार्थ घालून चांगले घवघवीत पान वाढून दिले होते, तू फिरून आलास? असे उत्तम अन्न वारंवार फुकट मिळते काय? हे तिचे शब्द ऐकून गोरक्षनाथ म्हणाला. मी तुला जे मागशील ते देतो; पण गुरूची इच्छापूर्ण करण्याकरिता मला वडे दे. हे ऐकून त्याची परीक्षा पाहाण्याकरिता तिने त्याचा एक डोळा मागितला. तेव्हा गोरक्षनाथाने लागलीच डोळ्यात बोट घालून आतले बुबुळ काढले व ते तिच्या हवाली करू लागला. तेव्हा डोळ्यातून रक्ताची धार वाहू लागली. ते साहसकृत्य पाहून तिने तोंडात बोट घातले. तिची छाती दडपून गेली. तिला त्याचा फारच कळवळा आला. ती पाच सात वडे घेऊन बाहेर आली व ते त्याच्या पुढे ठेवून हात जोडून म्हणाली, महाराज ! मी सहज बोलले, माझ्या अन्यायाची मला क्षमा करा. दुसऱ्याकरिता तुम्ही साधु अनेक प्रकारचे क्लेश आपल्या जिवास करून घेता; वगैरे त्यास म्हटल्यावर गोरक्ष म्हणाला, तू का खंती होतेस? वड्यांच्या मोबदला मी तुला डोळा दिला. तेव्हा ती म्हणाली, मजवर कृपा करून बुबुळासह अन्न घेऊन जा व माझे अन्याय पोटात घाला.

मग गोरक्षनाथ तिचे समाधान करून बुबुळ व वडे घेऊन निघाला व परत गुरूकडे आला. त्याने डोळ्याचे व्यंग दिसण्यात येऊ नये म्हणून पट्टा बांधिला होता. पट्टा बांधण्याचे कारण गुरूने विचारिले. परंतु ते ऐकून त्याला दुःख होऊन तो वडे खाणार नाही व त्याची इच्छा तशीच राहून जाईल म्हणून त्याने पट्टा सहज बांधिला म्हणून सांगितले पण गुरूने डोळा दाखविण्यासाठी हट्ट घेतला, तेव्हा गोरक्षाने झालेला सर्व प्रकार कळविला व अन्यायाची क्षमा करण्याकरिता विनंति केली. मग बुबुळ मागुन घेऊन मच्छिंद्रनाथाने मंत्र म्हटला व नाथाच्या डोळ्यात ते बसवून डोळा पूर्ववत केला व मांडीवर बसवून त्याच्या तोंडावरून हात फिरविला. नंतर उभयतांनी भोजन केले. तेथे महिनाभर राहून मच्छिंद्राने त्यास सर्व साबरी विद्या शिकविली आणि अस्त्रविद्येतहि निपुण केले.

अध्याय १० संपादन


गहिनीनाथाचा मातीच्या पुतळ्यापासून जन्म, मधुनाभा ब्राह्मणाकडून संगोपन


कनकागिरी गावात मच्छिंद्राने गोरक्षनाथास उपदेश करून सर्व वेदशास्त्रांत प्रवीण केले, चौदा विद्याहि त्यास पक्क्या पढविल्या; सकल अस्त्रात वाकब केले, साबरी विद्या शिकविली व सर्व देवाच्या पायांवर त्यास घातले. नरशी, कालिका, म्हंदा, म्हैशासुर, झोटिंग वेताळ, मारुती, श्रीराम इत्यादिकांची दर्शने करविली. जेव्हा रामाची भेट झाली, तेव्हा रामाने गोरक्षनाथास मांडीवर बसवून आशीर्वाद दिले. असो बावन वीरांसहवर्तमान श्रीराम, सूर्य, आदिकरून सर्वांनी गोरक्षास वरदाने दिली व त्यास तपास बसविण्यासाठी मच्छिंद्रनाथास सांगून ते आपापल्या ठिकाणी गेले.

एके दिवशी गोरक्षनाथ संजीवनीमंत्र पाठ करीत बसला होता. जवळ मच्छिंद्रनाथ नव्हता. तो एकटाच त्या ठिकाणी बसला आहे अशा संधीस गावची मुले खेळत खेळत त्याच्या जवळ गेली. ती मुले चिखलाचा गोळा घेऊन आपसात खेळत होती. त्यांनी गोरक्षास चिखलाची गाडी करावयास सांगितले, पण त्याने आपणास गाडी करता येत नाही म्हणून सांगितल्यावर ती मुले आपणच करू लागली. त्यांनी चिखलाची गाडी तयार केली. त्या गाडीवर बसावयासाठी एक गाडीवान असावा असे त्या मुलांच्या मनात येऊन ती चिखलाचा पुतळा करू लागली, परंतु त्यांना साधेना, म्हणून ती एक मातीचा पुतळा करून देण्याविषयी गोरक्षनाथाची प्रार्थना करू लागली. त्याने त्यांची ती विनवणी कबूल केली व चिखल घेऊन पुतळा करावयास आरंभ केला.

गोरक्षनाथ जो चिखलाचा पुतळा करील त्यापासून गहिनीनाथाचा अवतार व्हावयाचा, वगैरे संकेत पूर्वी ठरलेला होता. त्या अन्वये त्यास पुतळा करून देण्याची बुद्धि उत्पन्न झाली. नवनारायणांपैकी करभंजन हा अवतार ह्या मातीच्या पुतळ्यापासून व्हावयाचा, म्हणून गोरक्षास तशी बुद्धि होऊन त्याने पुतळा करावयास घेतला. त्या वेळी मुखाने संजीवनी मंत्राचा पाठ चालला होता. संपूर्ण पुतळा तयार झाला अशी संधि पाहून करभंजनाने त्यात प्रवेश केला. तेव्हा अस्थी, त्वचा, मांस, रक्त इत्यादि सर्व होऊन मनुष्याचा तेजःपुंज पुतळा बनला. मग तो रडू लागला. हा आवाज जवळ असलेल्या मुलांनी ऐकिला. तेव्हा गोरक्षनाथाने भूत आणिले. असा त्या मुलांनी बोभाटा केला व लागलेच सर्वजण भिऊन पळून गेले. पुढे मार्गात मच्छिंद्रनाथाशी भेट होताच, त्याने त्या मुलास भिण्याचे व ओरड करून लगबगीने धावण्याचे कारण विचारिले व तुम्ही भिऊ नका म्हणून सांगितले. तेव्हा पुतळ्याचा मजकूर मुलांनी सांगितला.

मुलांचे भाषण ऐकून मच्छिंद्रनाथ विस्मयात पडला व काय चमत्कार आहे तो आपण स्वतः डोळ्यांनी पाहावा असे त्याने मनात आणिले आणि मुलांस जवळ बसवून सर्व खाणाखुणा विचारून घेतल्या.

मच्छिंद्रनाथास मुलांनी दुरून ठिकाण दाखविले होतेच. तेथून एक मुलाचा शब्द त्यास ऐकू येऊ लागला. तेव्हा हा करभंजन नारायणाचा अवतार झाला, असे मच्छिंद्रनाथाने समजून मुलास उचलून घेतले व तो मार्गाने चालू लागला. गोरक्षनाथाने पुतळा केला असूनहि तो जवळ दिसेना, म्हणून मच्छिंद्रनाथ मुलास घेऊन जात असता, गोरक्षनाथास हाका मारीत चालला. ती गुरूची हाक ऐकून गोरक्ष एका घरात लपला होता तेथून बाहेर आला. पण मच्छिंद्राच्या हातातील मुलास पाहताच त्यालाहि भीति वाटली. त्याची गुरूजवळ येण्यास हिंमत होईना. हे पाहून गोरक्षास भय वाटते असे मच्छिंद्रनाथ समजला. मग त्याने मुलास चिरगुटात गुंडाळून ठेविले व गोरक्षापाशी जाऊन सांगितले की. हा मनुष्य आहे व तो नवनारायणापैकी एक नारायणाचा अवतार आहे. मग गोरक्षानेहि कसा काय प्रकार झाला होता तो सांगितला तेव्हा ते वर्तमान ऐकून मच्छिंद्रनाथास आनंद झाला जसा तू गोवरामध्ये झालास तसाच तू संजीवनी मंत्र म्हणून हा पुतळा केलास. त्यात करभंजन नारायणाने संचार केला आहे; तो भूत नसून मनुष्य झाला आहे, अशी साद्यंत हकीगत सांगून मच्छिंद्रनाथाने गोरक्षाची भीति उडविली मग त्यासहवर्तमान मुलास घेऊन मच्छिंद्रनाथ आपल्या आश्रमास गेला तेथे त्याने गाईचे दूध आणून मुलास पाजिले व त्यास झोळीत घालून हालवून निजविले

याप्रमाणे प्रकार घडल्याची बातमी गावभर झाली. तेव्हा गावचे लोक भेटीस जाऊन मुलाची चौकशी करीत तेव्हा नाथहि सर्व वृत्तांत सांगत; तो ऐकून त्यांना नवल वाटे मच्छिंद्रनाथाने आपल्या शिष्याकडून मातीचा पुतळा जिवंत करविला ह्यास्तव ब्रह्मदेवाकडून मच्छिंद्रनाथाची योग्यता विशेष होय, असे जो तो बोलू लागला

तेथून पुढे तीर्थयात्रा करीत फिरताना मुलासहि बरोबर नेणार असा मच्छिंद्राचा मानस पाहून, त्यामुळे मुलाची अनास्था होईल मुलाचे आईवाचून संरक्षण व्हावयाचे नाही, म्हणून मुलास कोणाच्या तरी हवाली करा, असे पुष्कळांनी मच्छिंद्रनाथास सुचविले. ते ऐकून, तसे होईल तर फारच चांगले होईल असे नाथाने उत्तर दिले. अशा तर्‍हेने मच्छिंद्रनाथाचा रुकार मिळाल्यानंतर मुलास कोणाच्या तरी माथी मारावा असा गावकऱ्यांनी घाट घातला. मग मधुनाभा या नावाचा एक ब्राह्मण तेथे राहात होता. त्याची गंगा ह्या नावाची स्त्री महापतिव्रता होती. उभयता संतति नसल्याने नेहमी रंजीस असत व त्यास कोणत्याच गोष्टीची हौस नसे. ती ह्या मुलाचा प्रतिपाळ आस्थेने करतील असे जाणून त्यांच्याबद्दल सर्वांनी मनापासून मच्छिंद्राजवळ शिफारस केली. मग अशा जगन्मान्य स्त्रीपुरुषांच्या हातात गहिनीनाथासारखे रत्‍न देणे नाथासहि प्रशस्त वातले. त्याने मुलास गंगाबाईच्या ओटीत घातले आणि सांगितले की, मातोश्री ! हा पुत्र वरदायक आहे. करभंजन म्हणून जो नवनारायणांपैकी एक त्याचाच हा अवतार आहे. ह्याचे उत्तम रितीने संगोपन कर. तेणेकरून तुझे कल्याण होईल व जगाने नावाजण्यासारखा हा निपजेल; हा पुढे कसा होईल हे मातोश्री, मी तुला आता काय सांगू? पण याचे सेवेसाठी मूर्तिमंत कैलासपति उतरेल. ज्याचे नाव निवृत्ति असेल त्यास हा अनुग्रह करील. याचे नाव गहिनीनाथ असे ठेव. आम्ही तीर्थयात्रेस जातो. पुन्हा बारा वर्षांनी हा आमचा बाळ गोरक्षनाथ येथे येईल, तेव्हा तो ह्यास अनुग्रह करील.

मग मोहनास्त्र मंत्र म्हणून विभूति तिचे अंगावर टाकताच, तिच्या स्तनात दूध उत्पन्न झाले. मग मुलास स्तनपान करविल्यानंतर तिने गावातील सुवासिनी बोलावून मुलास पाळण्यात घालून गहिनीनाथ असे त्याचे नाव ठेविले

पुढे मच्छिंद्रनाथ काही दिवस तेथे राहिला व गावकऱ्यांची रजा घेऊन गोरक्षासहवर्तमान तो तीर्थयात्रेस गेला. जाताना गोरक्ष अजून कच्चा आहे असे मच्छिंद्रनाथास दिसून आले. मग त्यास बदरिकेद्वार स्वामींच्या हवाली करून तपास लावावे असे मनात जाणून अनेक तीर्थयात्रा करीत करीत ते बदरिकाश्रमास गेले.

अध्याय ११ संपादन


मच्छिंद्रनाथाचे स्त्रीराज्यात गमन, जालिंदरनाथाची जन्मकथा


गहिनीनाथास गंगाबाईच्या स्वाधीन केल्यावर गोरक्षनाथास समागमे घेऊन मच्छिंद्रनाथ निघाला. तो तीर्थयात्रा करीत करीत बदरिकाश्रमास शिवालयात गेला. दोघांनी शंकरास नमस्कार केला आणि स्तवन करण्यास आरंभ केला. त्यांची स्तुति ऐकून शंकर प्रसन्न झाला व प्रगट होऊन त्याने दर्शन दिले. मग उभयतास आलिंगन देऊन जवळ बसविले, त्या वेळी शंकराने गोरक्षाच्या तोंडावरून हात फिरविला व तू हरिनारायणाचा अवतार आहेस असे म्हटले आणि मच्छिंद्रनाथास असे सांगितले की, हा तुझा गोरक्षनाथ ब्रह्मांडास तारक होईल. कनकगिरीवर तू अभ्यास करून दैवते साध्य करून घेतलीस; श्रीराम, नरसिंह, सूर्य, हनुमंत, कालिका वगैरे वीरांसहवर्तमान भैरवांना बोलाविलेस तेव्हा मीहि आलो होतो. तेव्हापासून माझी व या गोरक्षाची ओळख आहे. तू ह्याचेकडून विद्याभ्यास करविला आहेस खरा, पण त्यापासून विशेष उपयोग व्हावयाचा नाही. ह्याने तप केलेच पाहिजे, यास्तव माझ्या आश्रमामध्ये ह्यास तू तप करण्याकरिता बसव. मग ह्याची विद्या, अस्त्रे ही सर्व फलद्रूप होतील, असा जेव्हा शंकराने मच्छिंद्रनाथास बोध केला, तेव्हा गोरक्षनाथास उत्तम मुहूर्तावर तपश्चर्येस बसविले. मग तो लोखंडाच्या काट्यावर पाय ठेवून उभा राहिला व नजर करून फळे, पाला खाऊन तपश्चर्या करू लागला. हे पाहून मच्छिंद्रनाथ आपली पुन्हा बारा वर्षांनी भेट होईल असे गोरक्षनाथास सांगून तीर्थयात्रेस जावयास निघाला.

तो अनेक तीर्थे करून शेवटी सेतुबंधरामेश्वराला गेला तेथे रामेश्वराचे दर्शन घेऊन समुद्रस्नानास गेला असता त्यास मारुतीने नमस्कार केला. त्यावेळेस त्यास फारच हर्ष झाला. त्यास ह्रदयी धरून जवळ बसविल्यावर मारुती म्हणाला, आज चोवीस वर्षांनी तुझी भेट झाली. मग त्याने तेथे नाथाचे आदरातिथ्य उत्तम प्रकारे केले. पुढे गोष्टी सांगता सांगता योग्य संधि पाहून मारुतीने गोष्ट काढिली की, स्त्रीराज्यात जाण्याचे तू मला वचन दिले होतेस; असे असता तू अजूनपर्यंत तिकडे गेला नाहीस; तर कृपा करून तिकडे जाऊन तिचे हेतु पूर्ण करून मला एकदा तिच्या वचनांतू मोकळा कर. 'मच्छिंद्रनाथ येथे येऊन तुझे मनोरथ पुरवील' असे मी तिला वचन देऊन ठेविले आहे. ते पूर्ण केले पाहिजे व तूहि मला मागे वचन दिले आहेस ते पाळण्याची आता ही चांगली संधि आहे, असे हनुमंताने म्हटल्यानंतर मच्छिंद्रनाथ 'ठीक आहे' असे म्हणाले व तीन रात्री तेथे राहून ते दोघेहि स्त्रीराज्यात जाण्यासाठी निघाले.

ते थोड्याच दिवसात तीर्थे करीत करीत स्त्रीराज्यात गेले. त्या राज्यात पुरुष नावाला सुद्धा नव्हता. राज्यपदावर एक राणी असून सर्व राजकीय कारभार पाहाणाऱ्या स्त्रिया आहेत. त्या राज्यकारभार सुयंत्र चालवीत. असो; या दोघांनी राजवाड्यात प्रवेश करून राणीची भेट घेतली. तेव्हा तिला आनंद होऊन त्यास कनकासनावर बसविले. मग त्यांची षोडशोपचारानी पूजा करून ती हात जोडून उभी राहिली व हा दुसरा बरोबर कोण आहे हे सांगण्यासाठी तिने मारुतीची प्रार्थना केली. मारुतीने तिला सांगितले की, तू तप केलेस त्या वेळी मच्छिंद्रनाथ येऊन तुला विषयविलासाचे यथेच्छ सुख देईल' म्हणून मी वरदान दिले होते, तोच हा होय. तर आता ह्याच्यापासून तू आपली मनकामना पुर्ण करून घे. या प्रमाणे तिला सांगितल्यावर मारुती तेथे तीन रात्री राहून परत सेतुबंधरामेश्वरास आला व रामाचे भजन करीत बसला.

इकडे मच्छिंद्रनाथ विषयविलासाच्या सुखामध्ये निमग्न होऊन गेला. मच्छिंद्रनाथ विषयविलासाचा उपभोग घेत असता काही दिवसांनी राणी गरोदर राहिली. मग पूर्ण दिवस भरल्यावर प्रसूत होऊन पुत्ररत्‍न झाले. त्याचे नाव मोठ्या आवडीने 'मीननाथ' असे ठेविले.

इकडे कुरुकुळात जनमेजय राजापासून सातवा पुरुष जो बृहद्रव राजा, त्याने हस्तिनापुराचे राज्य करीत असता सोमयाग करण्यास प्रारंभ केला. पूर्वी शंकराच्या नेत्राच्या प्रळयाग्नीने मदन जाळीला होता. तो अग्नीच्या उदरात वाढत होता. त्यात अंतरिक्षनारायणाने संचार करून तो गर्भ अग्निकुंडात टाकिला. पूर्णाहुति झाल्यानंतर यज्ञकुंडातील रक्षा घेण्यासाठी ब्राह्मणांनी हात घातला असता मुलगा हातास लागून त्याचे रडणेहि त्यास ऐकू येऊ लागले. मग पुरोहिताने ही गोष्ट राजास कळविली. त्या मुलास पाहून बृहद्रवा राजास संतोष झाला. त्यास राजाने आपल्या हातात घेतले व त्याचे मुके तो घेऊ लागला. हा प्रत्यक्ष मदनाचा पुतळा असे राजास वाटले.

मग राजा बालकास घेऊन घाईघाईने अंतःपुरात सुराचना राणिकडे गेला. तिचे रुप देवांगनेप्रमाणे होते. कुरुकुळास तारण्यासाठी साक्षात रमा, सरस्वती किंवा पार्वती अवतरली आहे, असे वाटे. मुलगा कोणाचा म्हणून विचारल्यावर राजाने तिला सांगितले की, हा अग्निनारायणाने प्रसाद दिला आहे; मीनकेत तर तुला एक पुत्र आहेच, त्यास ह्यांचे पाठबळ होईल. हे ऐकताच तिने बालकास आपल्या हाती घेऊन स्तनाशी लावताच दूध उत्पन्न जाले, मग मोठा उत्सव सुरू झाला. बाराव्या दिवशी मुलगा पाळण्यात घातला व जालंदर असे त्याचे नाव ठेविले. त्या दिवशी गावात साखर वाटली व याचकांना पुष्कळ द्रव्य दिले. पुढे बृहद्रवा राजाने जालंदरचा व्रत बंध केला. नंतर त्याचे लग्न करावे असे एके दिवशी राजाच्या मनात आले. त्यावरून त्याने धूमीण प्रधानाबरोबर पुरोहितास देऊन उत्तम मुलगी पाहण्यासाठी पाठविले.

प्रधान गेल्यावर धूमीण प्रधान आताशी दिसत नाही, तो कोठे दूर गेला आहे काय, म्हणून जालंदराने एके दिवशी आईस विचारिले असता ती म्हणाली, तुझ्या बापाने तुला बायको पाहावयास त्यास व पुरोहितास पाठविले आहे. तेव्हा बायको कशी असते, असे त्याने तिला विचारल्यावर, माझ्यासारखी बायको असते, म्हणून तिने त्यास सांगितले. ही गोष्ट लक्षात ठेवून त्याने खेळावयास गेल्यावर आपल्या खेळगड्यास विचारिले की, गड्यांनो, माझे आईबाप मला बायको करून देणार आहेत; तर ती कशासाठी करतात ह्याची माहिती तुम्हास असली तर मला सांगा. असे त्याने विचारल्यावर मुलांना त्याच्या अज्ञानाचे फारच नवल वाटले. त्यास त्यानी सर्व कारण उघड करून सांगितले. तेव्हा तो मनात विचार करू लागला की, हे जग परम अधम आहे; जेथून उत्पन्न व्हावयाचे ते स्थान आपण वर्ज्य करावे व अशा अयोग्य कार्यास प्रवृत्त होऊ नये, असे मनात आणून तो अरण्यात निघाला. गावाच्या सीमेवर रक्षक होते त्यांनी त्यास पाहिले; पण राजपुत्र असल्यामुळे त्यांनी त्यास कोठे जातोस म्हणून विचारिले नाही. मात्र मनुष्य पाठवून ही गोष्ट त्यांना राजास कळविली. ती ऐकताच राजा घाबरून धावत आला व तोहि अरण्यात शोध करू लागला. अंधार पडेपर्यंत पुष्कळ लोक एकसारखे त्यास धुंडीत होते; पण पत्ता लागला नाही. मग निराश होऊन सर्व मंडळी घरोघर गेली. नंतर मुलाच्या वियोगाने राजास व राणीस अतिशय दुःख झाले. ती उभयता त्याचे गुण आठवून शोक करू लागली.

इकडे जालंदर अरण्यात निजला असता रात्रीस वणवा लागला. मग गवत पेटत पेटत अग्नि अगदी जवळ आला; त्या अग्नीने मुलास ओळखले. मग चांगल्या ठिकाणी ह्यास सोडिले असता हा अशा स्थितीत येथे कसा आला म्हणून तो चिंतेत पडला तेव्हा अग्नीने मूर्तिमंत्र प्रगट होऊन त्यास जागृत केले आणि मांडीवर बसवून येथे येण्याचे कारण विचारिले. तेव्हा तू कोण आहेस असे जालंदराने अग्नीला विचारिले असता तो म्हणाला, मी तुझी आई व बाप आहे; मला अग्नि म्हणतात. मग तू माझा आईबाप कसा म्हणून उलट त्याने त्यास विचारल्यावरून अग्नीने त्यास सविस्तर जन्मकथा सांगितली.

अध्याय १२ संपादन


जालंदरनाथास वरप्राप्ति; कानिफनाथ जन्मकथा व त्यास वरप्राप्ति


अग्नीने जालंदरास त्याच्या जन्माची सविस्तर कथा सांगितल्यानंतर तुझ्या मनात कोणता हेतु आहे तो निवेदन कर. असे अग्नीचे भाषण ऐकून जालंदरनाथ म्हणाला की, तू सर्व जाणत आहेस, मी सांगितले पाहिजे असे नाही; तरी सांगतो ऐकावे. हा नरदेह प्राप्त झाला आहे, त्या अर्थी ह्याचे काही तरी सार्थक होईल असे कर. नाही तर जन्मास येऊन न येऊन सारखेच, असे मात्र होऊ देऊ नको. माझी कीर्ति त्रिभुवनात अखंड राहील व मी चिरंजीव होईन असे कर. असा जालंदराचा मानस पाहून अग्नीला परमानंद झाला व त्याने त्याची वाहवा केली.

मग हा जालंदर सर्वापेक्षा प्रबल व्हावा म्हणून अग्नि त्यास घेऊन दत्तात्रेयाकडे गेला. उभयतांच्या मोठ्या आदरसत्काराने भेटी झाल्या. नंतर दत्तात्रेयाने अग्नीला विचारले की, आज कोणता हेतु धरून येणे झाले आहे व हा बरोबर दुसरा कोण? तेव्हा अग्नीने दत्तास वृत्तांत निवेदन केला की, शंकराच्या देहातला काम म्या जाळिला, तो मी आजपर्यंत उदरात रक्षण करून ठेविला होता. मग बृहद्रवा राजाच्या यज्ञकुंडात या जालंदरनाथाच्या देहास निर्माण केले. ह्यास तुमच्या पायांवर घालितो, याचे तुम्ही संरक्षण करावे. व ह्यास अनुग्रह देऊन सनाथ करून चिरंजीव करावे. मग दत्तात्रेयाने सांगितले की, मी तुझ्या पुत्रास तुझ्या हेतुप्रमाणे तयार करीन, परंतु ह्यास येथे बारा वर्षेपर्यंत ठेविले पाहिजे. हे ऐकून जालंदराला दत्तात्रेयाजवळ ठेवण्यास अग्नि कबूल झाला. शेवटी दत्ताने जालंदरास मांडीवर बसवून त्याच्या मनातील विकल्प घालविण्याचा प्रयत्‍न चालविला. वरदहस्त मस्तकावर ठेविताच त्याच्या अज्ञानपणाचा भ्रम निरसन होऊन त्यास ज्ञान प्राप्त झाले. नंतर अग्नि दत्तास नमस्कार करून गुप्त जाला.

मग जालंदरास बरोबर घेऊन दत्तात्रेय नित्य फिरे. तो नित्य भागीरथीचे स्नान करून विश्वेश्वराचे दर्शन घेई. व कोल्हापुरास भिक्षा मागून पांचाळेश्वर भोजन करी. असो, अशी बारा वर्षे दत्त समागमात काढून नाना प्रकारच्या शस्त्रास्त्रविद्येत जालंदर निपुण झाला. तसाच तो सर्व वेद, शास्त्रे, पुराणे, व्याकरण वगैरे सर्व विद्यांमध्ये प्रवीण झाला.

अशा रितीने परिपूर्ण झाल्यानंतर दत्ताने दैवतांची आराधना केली. व ती सर्व दैवते जालंदरास वर देण्यासाठी खाली उतरली. मग अग्नीने तेथे येउन व जालंदरास वर देण्यासाठी खाली उतरली. मग अग्नीने तेथे येऊन व जालंदरास सर्व विद्येत निपुण पाहून आपला आनंद प्रदर्शित केला. तेव्हा दत्तात्रेयाने अग्नीस सांगितले की, आता हा सर्व विद्यांमध्ये निपुण झाला. आता दैवते प्रसन्न करून घेतल्यावर त्यास भेटवून त्यांच्यापासून वर देववावे. हे ऐकून अग्नीने त्यास खांद्यावर बसवून त्रिभुवनातील दैवते दाखविली मागे मच्छिंद्रनाथाचे ज्या दैवतास अनुकूल करून वर मागून घेतले होते, त्याच दैवतांनी जालंदरास वर दिले. नंतर जालंदराने बदरिकाश्रमास जाऊन तेथे बारा वर्षे तप केले व कसोटीस उतरल्यावर सर्व देवांनी माना डोलविल्या. नंतर आशीर्वाद देऊन ब्रह्मा, विष्णु, महेश आदिकरून सर्व आलेले देव आपापल्या स्थानी संतोष पावून गेले.

पुढे बदरिकाश्रमी बदरिनाथाने (शंकराने) अग्नीस व जालंदरनाथास आपल्याजवळ तीन रात्री ठेवून घेतले. त्या वेळी सत्यलोकात घडून आलेली विपरीत कथा शंकराने त्यास सांगितली ती अशी - ब्रह्मदेवाची मुलगी सरस्वती ही बारा वर्षांची असता तिचे रूप व अवयवांचा नीटनेटकेपणा पाहून ब्रह्मदेवास कामाने व्याकुळ केले; तेव्हा तो अविचारास प्रवृत्त झाला. तो तिच्या मागे लागला असता धावताना वीर्यपात झाला. तेव्हा वाऱ्याच्या नेटासरसा वीर्यबिन्दु हिमाचलाच्या वनात एक हत्ती होता त्याच्या कानात पडला. त्यात प्रबुद्धनारायणाने संचार केला. ह्या गोष्टीस युगेच्या युगे लोटली. तरी तो हत्ती जिवंत होता. त्याच्या कानातून प्रबुद्धनारायणाचा अवतार-जन्म होईल, त्यास जालंदराने आपला शिष्य करावा. कानापासून जन्म आहे म्हणून 'कानिफा' असे त्याचे नाव पडेल. असे शंकराने सांगताच अग्नि म्हणाला, तुम्ही ही फारच चमत्कारिक गोष्ट सांगत आहा, पण तो हत्ती कोठे आहे हे दाखवून द्यावे. एरव्ही ही गोष्ट फार चांगली झाली की, माझ्या मुलास एक पाठबळ झाले.

ह्याप्रमाणे अग्नीने म्हटल्यानंतर जालंदर व अग्नि यास गजस्थान दाखविण्यासाठी शंकर हिमालयाच्या अरण्यात घेऊन गेले, तेथे एका पर्वतावर विशाळ हत्ती दिसला. तेव्हा शंकराने सांगितले की, हा पर्वतासारखा बलाढ्य हत्ती आता मोठे रण माजवील; तर ह्यास आळवण्यासाठी कोणती युक्ति करावी? तेव्हा जालंदरने हिंमत धरून म्हटले की महराज ! माझ्या मस्तकावर दत्तात्रेयाने आपला वरदहस्त ठेविला आहे; त्याचा चमत्कार आपण आता पाहाल ! प्रळयकाळचा काळहि जेरीस येऊन उगीच बसेल, मग ह्या हत्तीचा काय हिशेब आहे? असे म्हणून त्याने झोळीतून चिमटीभर भस्म घेतले आणि मोहनीअस्त्राचा मंत्र म्हणून व स्पर्शास्त्र मंत्रून ते भस्म हत्तीवर टाकिले तेव्हा एवढा मोठा बलाढ्य गज, पण अगदी नरम पडला.

मग जालंदर त्याच्याजवळ एकटाच कानिफास आणावयास गेला. तो अगदी जवळ जाऊन हत्तीस म्हणाला की, तुझ्यासारखा धैर्यवान कोणी नाही. तुझ्या कानात दिव्य रत्न निर्माण झाले अहे; आता हे समर्थ प्रबुद्धनारायणा ! तू हत्तीच्या कानात निर्माण झाला आहेस, म्हणूण तुझे नाव 'कानिफा' असे ठेविले आहे. आता सत्वर बाहेर ये. जालंदराचे वचन ऐकून कानिफा म्हणाला की, महाराज गुणनिधे ! स्थिर असावे. मग हत्तीच्या कानाच्या भोकाशी येऊन कानिफाने जालंदरास नमस्कार केला; त्या वेळी ती सोळा वर्षांची महातेजस्वी मूर्ति जालंदराने हाताचा आधार देऊन कानातून खाली जमिनीवर घेतली. मग त्यास खांद्यावर बसवून शंकरापाशी नेले व खाली उतरून शंकरास व अग्नीला नमस्कार करावयास सांगितले. हे ऐकून कानिफाने त्यास व जालंदरासहि नमस्कार केला तेव्हा कानिफास शंकराने प्रेमाने मांडीवर बसविले व त्याचे मुके घेतले. पुढे त्यास अनुग्रह देण्याकरिता जालंदराने शंकरास विनंति केली.

अनुग्रह झाल्यावाचून अज्ञानपणाचा मोड व्हावयाचा नाही असे मनात आणून शंकराने सुचविल्याप्रमाणे गुरूचे स्मरण करून जालंदरनाथाने कानिफाच्या मस्तकावर हात ठेवून कानात मंत्राचा उपदेश केला. तेणेकरून त्याचे अज्ञान तत्काळ नाहीसे झाले. मग चौघेजण बदरिकाश्रमास गेले. तेव्हा दत्ताने जे काय दिले, ते कानिफास द्यावे असे जालंदरास सांगून अग्नि गुप्त झाला. तेथे शंकर सहा महिने पावेतो त्यांना भेटत होते. सहा महिन्यात कानिफा सर्व विद्यामध्ये निपुण झाला. पण संजीवनी वाताकर्षण ही दोन अस्त्रे मात्र जालंदराने त्यास सांगितली नव्हती.

कानिफास अस्त्रे, दैवते प्रसन्न करून द्यावी म्हणून शंकराने जालंदरास सांगितले. मग जालंदराने हात जोडून प्रार्थना केली. की, कानिफा सकल विद्येत निपुण झाला त्यास वर द्यावेत. हे ऐकून सर्व दैवते म्हणाली की, तुला आम्ही वरप्रदान दिले. कारण दत्तात्रेयाने तुला विद्या शिकविली व अग्नीचीहि मीड पडली, यास्तव त्यांचा शब्द मोडवेना म्हणून तुला वरप्रदान मिळाले, पण असे वर वारंवार दुसऱ्यांना देता येत नाहीत. या पुढे तुमचे असंख्य शिष्य होतील, तेवढ्यांना कोठवर वर देत बसावे ! याप्रमाणे बोलून देव विमानात बसून जाऊ लागले. त्या योगाने जालंदरास अति क्रोध आला. तो म्हणाला, माझा अनादर करून तुम्ही निघून आपापल्या स्थानी चाललेत, परंतु माझा प्रताप कसा आहे तो अजून पाहिला नाही. आताच तुम्हास चमत्कार दाखवितो, असे म्हणून त्याने वातास्त्राची योजना केली. तेव्हा प्रचंड वारा सुटून विमाने भलतीकडे जाऊ लागली. मग त्या त्या दैवतांनी आपापली शस्त्रे सोडिली. तितक्यांचे जालंदराने निवारण केले. परंतु हरिहर दुरून हा चमत्कार पाहात होते. जालंदरनाथापुढे अस्त्राचे काही चालत नाही, असे पाहून शस्त्रे घेऊन खाली उतरण्याचा दैवतांनी निश्चय केले. त्यात प्रथम अग्नीचा प्राण घेण्याचा घाट घातला आणि शस्त्रे घेऊन ते महीवर उतरले.

त्या समयी जालंदराने कामिनीअस्त्र सोडिले; तेव्हा हजारो सुंदर स्त्रिया निर्माण झाल्या. नंतर त्याने कामास्त्राची प्रेरणा केली. तेणेकरून देव कामातुर होऊन त्या स्त्रियांच्या मागे लागले. त्याच्यावर स्त्रिया आपले नेत्रकटाक्षबाण सोडीत होत्याच. त्या पुढे पळत व देव त्यांची विनवणी करीत पाठीमागून जात; असे करीत त्या बोरीच्या वनात शिरल्या. त्या स्त्रिया झाडावर चढल्या तेव्हा देवहि चढले इतक्यात स्पर्शास्त्र मंत्र म्हणून भस्म फेकताच ते प्रगट होऊन गेले. तेव्हा देवांचे पाय झाडावर चिकटले. कित्येकांची डोकी खाली व पाय वर अशी दशा होऊन ते लोंबू लागले. तेव्हा हरिहर दिसू लागले व आज बरी गंमत पाहावयास मिळाली असे ते बोलू लागले; इतक्यात स्त्रियांनी सर्वांची वस्त्रे सोडून घेऊ त्यास नग्न केले व जालंदरनाथापाशी त्या वस्त्रांचा एक मोठा ढीग केला.

मग जालंदरनाथाने कानिफास इषाऱ्याने सर्व देव उघडे झाल्याचे जाणविले. यावरून तो ज्याचे त्यास वस्त्र नेसवू लागला. आपली अशी दुर्दशा झाल्यामुळे देवांना पश्चात्ताप होऊन अतिशय दुःख झाले. त्यास कानिफा म्हणाला, मी गुरूच्या नकळत तुम्हास वस्त्रे नेसवीत आहे, पण ही गोष्ट गुरूना सांगू नका. तो दरएक देवास वस्त्र नेसवून त्याच्या पाया पडे. याप्रमाणे कानिफाची नम्र भक्ति पाहून देव समाधान पावले व त्यानी प्रसन्न चित्ताने त्यास वर दिले अस्त्रांत आम्ही सर्वप्रकार अनुकूल असल्याचे कबूल केले. मग जालंदरनाथाने विभक्त अस्त्र सोडले. तेव्हा सर्व देव झाडास चिकटले. होते तेथून मुक्त झाले व अस्त्रेभूषणे सावरून जालंदरनाथाजवळ गेले. त्यास त्यांनी नमस्कार केला व अस्त्रामध्ये आम्ही स्वतः प्रगट होऊन साक्षात्कार दाखवू, असा कानिफात वर दिल्याबद्दल कळविले. तेव्हा जालंदराने सर्वांस सांगितले की, पुढे मी साबरीकवित्व करणार आहे; त्यास कृपा करून तुम्ही सर्वांनी साह्य व्हावे. त्यास त्यानी रुका देऊन वचन दिले व ते सर्व आपापल्या स्थानी गेले. नंतर हरिहर, जालंदरनाथ व कानिफनाथ तीन दिवस बदरिकाश्रमात राहिले.


अध्याय १३ संपादन


जालिंदरनाथ व मैनावतीची भेट, मैनावतीस उपदेश


पुढे शंकर व विष्णु हे जालंदरनाथ व कानिफा यांसह बदरिकाश्रमास गेले. ते सर्वजण जालंदरनाथाची शक्ती पाहून थक्क झाले त्यांच्या आपापसात गोष्टी चालल्या असता, दैवतांची विटंबना जालंदराने केल्यामुळे ते त्यांची वाहवा करू लागले. व आजपर्यंत त्यांना हात दाखविणारांमध्ये असा वस्ताद कोणीहि मिळाला नव्हता असेही उद्गार बाहेर पडले. नंतर शंकराने जालंदरास सांगितले की, तू नागपत्रअश्वत्थाच्या ठिकाणी जाऊन यज्ञ कर व तेथेच कवित्व करून दैवतापासून वर मिळवून घे. वेदविद्येचे मंत्र पुष्कळ आहेत. अस्त्रविद्या महान प्रतापी खरा, परंतु कलियुगात तिचे तेज पडणार नाही. मंत्रविद्येचा लोकांस काडीचासुद्धा लाभ व्हावयाचा नाही. ह्यास्तव कविता सिद्ध करून ठेव. आणि त्या सर्व विद्या कानिफास शिकव. ह्या कानिफाचे उदारपण दांभिकपणाचे आहे, परंतु कारणपरत्वे उपयोगी पडण्यासाठी ह्याची ही वृत्ति ठीक आहे, हजारो शिष्य करील, ह्याला सर्व विद्या अवगत असतील, येणेकरून ह्याचे वर्चस्व सर्व जगात राहील. पूर्वी साबरी ऋषीने हा मंत्रविद्येचा मार्ग शोधून काढिला, परंतु ती विद्या थोडी असल्यामुळे तिजपासून जनाला म्हणण्यासारखा लाभ होण्याचे चिन्ह दिसत नाही. शंभर कोटि कविता पाहिजे ती नऊ नाथांनी करावी. सर्व खटपट परोपकारासाथी करावयाची आहे. तुम्ही सर्वज्ञ आहा ! तुम्हास सांगावयास पाहिजे असे नाही. जारण, मारण, उच्चाटणादिकांवरहि कविता करावी. असे शंकराने जालंदरनाथास सांगून कानिफाबद्दल दोन शब्द सुचविले की, ह्यास तपास बसवून समर्थ कर. हे शंकराचे सर्व म्हणणे जालंदराने मान्य केले.

मग जालंदर व कानिफा या उभयतांनी बारा वर्षे तेथे राहून चाळीस कोटि वीस लक्ष कविता तयार केल्या. ते पाहून शंकर प्रसन्न झाला. मग त्याने नाग अश्वत्थाखाली ते प्रयोग सिद्ध करून घेण्यासाठी त्यांस बोध केला. त्यावरून उभयता तेथे गेले. तेथे हवन करून प्रयोग सिद्ध करून घेतले. सूर्यकुंडाचे उदक आणून बावन वीरावर शिंपडून त्यांची अनुकूलता करून घेतली. ते पुनः बदरिकाश्रमास परत आले, तेथे जालंदराने कानिफास तपश्चर्येस बसविले आणि आपणहि तपश्चर्येस गेला. तेथे गोरक्षनाथहि तपश्चर्या करीत होता, पण त्याना परस्परांविषयी माहिती नव्हती.

इकडे जालंदरनाथ तीर्थयात्रा करीत फिरत होता. तो आपल्या मस्तकावर गवताचा भारा घेऊन अरण्यातून गावात जाई व तेथे तो गायीस चारीत असे. त्याने मस्तकावर भारा घेतला असता त्यास त्यापासून भार वाटून त्रास होऊ नये म्हणून वायु तो भारा मस्तकापासून काही अंतरावर वरच्यावर झेलून धरून ठेवी. याप्रमाणे जालंदरनाथ गवताचा भारा मस्तकावर घेऊन फिरत फिरत गौडबंगाल देशांतील हेलापट्टनास गेला, तेव्हा गवताचा भारा मस्तकाच्या वर आधारावाचून कसा राहिला ह्याचे तेथील लोकांस मोठे नवल वाटू लागले. त्यांना हा कोणी तरी सिद्ध आहे, असे वाटून ते त्याच्या दर्शनासहि जाऊ लागले. तो गावातील घाणेरड्या जागेत राही व आपला उदरनिर्वाह भिक्षा मागून चालवीत असे.

त्रिलोचन राजाचा पुत्र गोपीचंद हा त्या काळी तेथचा राजा होता. गोपीचंद राजाची आई मैनावती ही मोठी सद्‌गुणी स्त्री होती ती एके दिवशी राजमहालाच्या गच्चीवरून शहराचा रमणीय देखावा पहात असता, तिने जालंदरास पाहिले. आधारावाचून डोक्याच्या वर मोळी घेऊन जाणारा असा तो जोगी पाहून तिला आश्चर्य वाटले व हा कोणी प्रतापी पृथ्वीवर उतरला आहे, असे तिच्या मनात आले. मग त्यास गुरु करून आपल्या देहाचे सार्थक करून घ्यावे, असा तिने मनाचा निग्रह करून आपल्या दासीस बोलाविले. ती दासी तर चतुरच होती. ती येताच हात जोडून उभी राहिली आणि मोठ्या अदबीने का बोलाविले, म्हणून विचारू लागली. तेव्हा मैनावती तिला म्हणाली, माझे एक फार नाजुक काम आहे, ते मी तुला करावयास सांगत आहे, यास्तव ही गोष्ट अगदी बाहेर फुटता कामा नये. का की, प्रसंगवशात जिवावर येऊन बेतणार म्हणून सावध राहिले पाहिजे. असे बोलून तिने तिला तो जोगी कोठे जात आहे, त्याचा पक्का शोध, गुप्त रितीने करून येण्यास सांगितले.

जालंदरनाथास पाहून दासी चकित झाली व आपण जाउन त्याचा अनुग्रह घ्यावा व जन्ममरणापासून मुक्त व्हावे, असा तिने मैनावतीस चांगला बोध केला. नंतर तो जोगी कोठे उतरतो ते ठिकाण पाहण्यासाठी ती दासी त्याच्या पाठोपाठ चालली. अस्तमान झाला तेव्हा एका घाणेरड्या ठिकाणी निवांत जागा पाहून जालंदर वस्तीस राहिला. ते ठिकाण दासीने परत येऊन मैनावतीस सांगितले.

मग मैनावतीने एका ताटात फळफलावळ व पक्वान्ने घेतली आणि अर्धरात्रीस दासीस बरोबर घेऊन ती जालंदरनाथाजवळ गेली तेव्हा तो ध्यानस्थ बसला होता. त्या दोघीजणी त्याच्या पाया पडून हात जोडून उभ्या राहिल्या. त्या वेळी मैनावतीने त्याची पुष्कळ स्तुति केली. मैनावतीने केलेली स्तुति जालंदराने ऐकिली, पण तिचा निग्रह पाहण्यासाठी त्याने तीचा पुष्कळ छळ केला. तो तिजवर रागाने दगड फेकी, शिव्या देई. मैनावतीने धैर्य खचू दिले नाही. ती त्याची विनवणी करीतच होती. ह्याच्या हाताने जरी मरण आले तरी मी मोक्षास जाईन अशी तिची पुरी खात्री झाली होती म्हणून त्याच्या छळणुकीने तिचे मन किंचितसुद्धा दुखावले नाही. मग तू कोणाची कोण व येथे येण्याचे कारण काय म्हणून त्याने तिला विचारिले. तेव्हा ती म्हणाली, योगिराज ! महाप्रतापी त्रिलोचन राजाची मी कांता आहे, परंतु त्यास कृतांतकाळाने गिळून टाकिल्यामुळे मी सांप्रत वैधव्यदुःखसागरात बुडून गेले आहे. ही जन्ममरणाची जगाची रहाटी पाहून मी भिऊन गेले आहे व ह्या योगाने मला पश्चात्ताप झाला आहे. काळाने पतीची जी अवस्था केली, तोच परिणाम माझा व्हावयाचा ! असे ऐकून तो म्हणाला, जर तुझा पति निर्वतला आहे, तर तू हल्ली कोणाजवळ असतेस ? तो प्रश्न ऐकून ती म्हणाली, माझा मुलगा गोपीचंद राजा ह्याच्या जवळ मी असते, पण आता ह्या वाटाघाटीचा विचार करण्याची जरुरी नाही. कृपा करून मला तुम्ही कृतांतकाळाच्या भीतीपासून सोडवावे अशी माझी हात जोडून चरणापाशी विनंति आहे. तेव्हा त्याने सांगितले की, कृतांताच्या पाशाचे बंधन मोठे बिकट आहे, ते मजसारख्या पिशाच्च्याकडुन तुटावयाचे नाही, यास्तव तु येथून लवकर निघून आपल्या घरी जा. जर ही गोष्ट तुझ्या पुत्राच्या समजण्यात आली तर त्याच्याकडून मोठा अनर्थ घडून येईल. इतका प्रकार होईपर्यंत उजाडले, तेव्हा ती त्यास नमस्कार करून आपल्या घरी गेली. तिला सारा दिवस चैन पडले नाही. मग रात्र झाल्यावर दासीस बरोबर घेउन ती पुन्हा जालंदरनाथाकडे गेली व पाया पडून हात जोडून उभी राहिली. पण नुसते उभे राहण्यात काही हशील नाही व थोडी तरी सेवा घडावी म्हणून ती पाय चेपीत बसली. नंतर सूर्योदय होण्याची वेळ झाली असे पाहून त्यास नमस्कार करून आपल्या घरी आली. अशा रितीने सहा महिनेपर्यंत तिने जालंदरनाथाची सेवा केली.

एके दिवशी फार काळोख पडला आहे, अशी संधि पाहून मैनावती त्याजकडे गेल्यानंतर त्याने एक मायीक भ्रमर उत्पन्न केला व आपण गाढ झोपेचे ढोंग करून स्वस्थ घोरत पडला. तो भ्रमर तिच्या मांडीखाली शिरला व त्याने तिची मांडी फोडून रक्तबंबाळ करून टाकिली; तरी तिने आपले अवसान खचविले नाही. असा तिचा दृढनिश्चय पाहून जालंदरनाथाने प्रसन्न होऊन मंत्रोपदेश केला. तेणेकरून तिची कांति दिव्य झाली. तिने त्याच्या पायांवर मस्तक ठेविले व मी जन्मास आल्याचे आज सार्थक झाले असे ती म्हणाली. नंतर त्याने संजीवनी मंत्राची तिच्या देहात प्रेरणा केली, तेणेकरून मैनावती अमर झाली, जसा रामचंद्राने बिभीषण अमर केला, तद्वत जालंदराने मैनावती अमर केली. पुढे तिची भक्ति दिवसेंदिवस अधिकाधिक वाढत चालली.


अध्याय १४ संपादन


गोपीचंदाने जालंदरनाथास खड्ड्यात पुरले


जालंदरनाथाचा उपदेश मैनावतीने घेतल्यानंतर तिला झालेला आनंद पोटात मावेनासा झाला व आज जन्मास आल्याचे सार्थक झाले असे तिला वाटले. परंतु आपला पति त्रिलोचन ह्याच्या शरिराची स्मशानात जशी राखरांगोळी झाली तशीच आपला पुत्र गोपीचंद ह्याची व्हावयाची, म्हणून तिला परम खेदही झाला. म्हणून मुलाला दोन बोधाच्या गोष्टी सांगण्यासाठी ती बहुत दिवसपर्यंत संधि पाहात होती.

माघ महिन्यात एके दिवशी मैनावती महालाच्या गच्चीवर थंडीच्या निवारणासाठी उन्हात बसली होती. त्याच संधीस गोपीचंद राजा खालच्या बाजूस रत्‍नखचित चंदनाच्या चौरंगावर बसून अंगास स्त्रियांकडून सुवासिक तेले, अर्गजे लावून घेत होता. सभोवती दुसऱ्या सुंदर स्त्रियाहि होत्या. अशा मोठ्या चैनीमध्ये राजा स्नान करण्याच्या बेतात आहे, तो वरती मैनावतीला हे गोपीचंदाचे सुंदर शरीर नाश पावणार, म्हणून वाईट वाटले. तिला त्या वेळेस दुःखाचा उमाळा येऊन रडे लोटले, ते काही केल्या आवरेना. तिचे ते अश्रु राजाच्या अंगावर पडले तेव्हा राजा चकित होऊन ऊन पाणी कोठून पडले म्हणून इकडे तिकडे पाहू लागला. तेव्हा माडीवर आपली आई रडत बसली आहे, असे त्यास दिसले. त्या वेळी राजा चूळ भरून दात घाशीत होता, त्या वेळी राजा चूळ भरून दात घाशीत होता, तो तसाच उठला व मातोश्रीपाशी गेला, आणि तिच्या पाया पडून हात जोडून उभा राहिला. नंतर तिला म्हणाला, मातोश्री ! रडण्याचे कारण काय, ते मला कृपा करून लवकर सांगावे. तुला कोणी गांजिले, ते सांग. ह्या वेळेस त्याचे डोळे फोडून टाकितो ! जर मी तुझे दुःख निवारण न केले तर तुझ्या पोटी मी व्यर्थ जन्म घेतला. तुझ्या मनाला संतोष होण्यासाठी मी कोणतीही गोष्ट करीन. ती करताना प्रत्यक्ष प्राणावरहि बेतले तरी तुझे दुःख निवारण केल्यावाचून राहणार नाही.

गोपीचंद राजाचे हे भाषण ऐकून मैनावती म्हणाली की, महान प्रतापी अशा गोपीचंद राजाची मी माता असता, मला गांजील असा कोण आहे? परंतु मला दुःख होण्याचे कारण इतकेच की, तुझा बाप तुझ्यासारखाच स्वरूपवान होता; परंतु काळाने ग्रासिल्यानंतर त्याच्या देहाची क्षणात राखरांगोळी होऊन गेली. तुझ्या ह्या स्वरूपाची तरी तीच गत व्हावयाची म्हणून मला मोठे वाईट वाटते. शरिराची व्यर्थ माती न होऊ देता, कृतांतकाळापासून सोडविण्याची युक्ति योजावी हा मार्ग मला उत्तम दिसतो. आपले हित होईल तितके करून घ्यावे. गोपीचंदा, क्षणभंगुर ऐश्वर्यास न भुलता देहांचे सार्थक करून घे; पण सध्याच्या तुझ्या वृत्तीकडे पाहून मला तुझी काकुळता येते व ह्या करिताच रडे आले. एर्‍हवी माझा कोणाकडून उपमर्द झाला नाही.

मग राजाने सांगितले की, मातोश्री ! तुझे म्हणणे खरे आहे. पण सांप्रत असा गुरु मला कोठे मिळतो आहे? प्रथमतः तो अमर असला तर तो मला अमर करील. तर असा आजकाल आहे तरी कोण? तेव्हा मैनावती म्हणाली, बाळा ! जालंदरनाथ त्याच प्रतीचा असून तो सांप्रत आपल्या नगरात आला आहे. तरी तू त्यास कायेने, वाचेने व मनाने शरण जा आणि ह्या नाशिवंत ऐश्वर्याचा लोभ न धरिता त्याच्यापासून आपली काया अमर करून घे. हे ऐकून गोपीचंदाने सांगितले की त्याच्या उपदेशाने मी माझी बायकामुले, सुखसंपत्ति, राज्यवैभव आदिकरून सर्वांस अंतरेन ! ह्याकरिता आज एकाएकी माझ्याने योग घेववणार नाही, तर मला आणखी बारा वर्षे सर्व तऱ्हेचे विलास भोगू दे. मग मी गुरूस शरण जाऊन योगमार्गाचा स्वीकार करीन व उत्तानपाद राजाच्या पुत्राप्रमाणे ब्रह्मांडात कीर्ति करून घेईन. तेव्हा आई म्हणाली, मुला, ह्या देहाचा एका पळाचासुद्धा खात्रीने भरवसा देता येत नाही. असे असता तू एकदम बारा वर्षांची जोखीमदारी शिरावर घेतोस ! पण बाळा ! बारा वर्षे कुणी पाहिली आहेत? कोणत्या वेळेस कसा प्रसंग गुदरून येइल ह्याचा नेम नाही.

मैनावती गोपीचंद राजास करीत असलेला हा बोध त्याची पट्टराणी लुमावती दडून ऐकत होती. तो ऐकून तिला त्या वेळेस परम दुःख झाले. ती मनात म्हणू लागली की, ही आई नव्हे. वैरीण होय. हे राजाचे ऐश्वर्य भोगावयाचे सोडून त्याचा त्याग करावयास सांगणारी ही आपली सासू नसून एक विवशीच उत्पन्न झाली असे वाटते. आता ह्यास उपाय तरी कोणता करावा? अशा अनेक कल्पना तिच्या मनात येऊन ती आपल्या महालात गेली व तळमळत राहिली.

गोपीचंदाने मैनावतीचा उपदेश ऐकून उत्तर दिले की, मातोश्री ! ज्याअर्थी तुझी अशी मर्जी आहे, त्याअर्थी मीहि तुझ्या इच्छेविरुद्ध वागत नाही. पण त्या जालंदरनाथाचा प्रताप कसा आहे तो पाहून व त्याच्यापासून खचित माझे हित होईल अशी माझी खात्री झाली की, मी त्यास शरण जाऊन कार्यभाग साधून घेईन. आता तू हे सर्व मनातले दुःखमय विचार काढून टाकून खुशाल आनंदाने राहा; असे तिचे समाधान करून राजा स्नानास गेला.

इकडे राजाच्या प्रीतीतली मुख्य राणी लुमावती, हिला राजास मैनावतीने केलेला उपदेश न पटल्याने तिने निराळाच प्रयत्‍न चालविला. तिने आपल्या दुसऱ्या पाच सात सवतींना बोलावून व त्यांचा चांगला आदरसत्कार करून त्यांना मैनावतीचा राजास बिघडवून योग देण्याचा घाट कळविला. ती म्हणाली, गोपीचंद राजास जगातून उठवून लावण्याचा मैनावती मनसुबा करित आहे. जालंदर म्हणून कोणी एक ढोंगी गावात आला आहे व त्याचा अनुग्रह राजास देऊन त्याला जोगी बनविण्याची तिची इच्छा आहे मैनावतीचे ते बोलणे प्रत्यक्ष मी आपल्या कानांनी ऐकिले. तिच्या उपदेशाने राजाचेहि मन वळले आहे. त्याचे मन उदास झाल्यावर राजवैभव सर्व संपलेच म्हणावयाचे ! मग आपल्यास तरी जगून कोणता उपयोग घडावयाचा आहे? परचक्र येऊन सर्व वैभवाची धूळधाण होऊन जाईल. तरी असे न होऊ देण्यासाठी आताच एखादी युक्ति काढा म्हणजे त्याचा तो बेत आपणास मोडून टाकता येईल.

लुमावतीने सवतींच्या मनात अशा तर्‍हेने विकल्प भरवून त्यांची मने दूषित केली; परंतु कोणासहि चांगली युक्ति सुचेना. त्या अवघ्या जणी चिंतेत पडून रडू लागल्या. ते पाहून लुमावती हिने असा विचार केला की, मैनावतीवर खोटा आळ घेतल्याखेरीज प्रसंगातून सुटका नाही म्हणून राजास असे सांगावे की, जालंदर म्हणून जो वैरागी गावात आला आहे, त्याची बायकांवर वाईट नजर असून मैनावतीस कामविकार सहन होत नसल्यामुळे ती त्याच्या नादी लागली आहे. तसेच राजास बोध करून व त्यास योग देऊन तीर्थाटनास पाठवावे आणि जालंदरास राज्यावर बसवून आपण निर्धास्तपणाने त्या जालंदरसमागमे विषयविलासाचा उपभोग घ्यावा, असा त्या दोघांचा मतलब आहे, असे आपण राजास सांगून मनात विकल्प येउ दिला म्हणजे राजास अतिशय क्रोध येईल व तो जालंदराचा एका क्षणात नाश करील. तो बेत लुमावतीने इतर स्त्रियास सांगितला व त्याना तो पसंत पडून त्या सर्व आपापल्या महालात गेल्या.

त्या दिवशी राजा सर्व दिवसभर राजकीय कारभार पाहून रात्रीस भोजन झाल्यानंतर सर्वांसह मुख्य राणी जी लुमावती इच्या महालात गेला. तिने त्यास मंचकावर बसविल्यानंतर गोड गोड बोलून त्याच्या प्रेमास पाझर आणिला. तो पूर्ण प्रेमात आल्यावर ती हात जोडून म्हणाली की, माझ्या ऐकण्यात एक गोष्ट आली आहे, पण ती तुमच्यापाशी सांगावयास मला भीति वाटते व न बोलता तशीच गुप्त ठेविली तर मोठा अनर्थ घडून येईल; अशी मी दोहींकडून चिंतेत पडले आहे, तेव्हा राजा म्हणाला, तू मनात काही किंतु आणिल्याशिवाय निर्भयचित्ताने मला सांग. मग अभय वचन देत असाल तर बोलते, असे तिने त्यास सांगितल्यावर त्याने तिला अभय वचन दिले. नंतर तिने संकेत केल्याप्रमाणे वरील मजकूर त्यास समजाविला आणि म्हटले की आमच्या सौभाग्यसुखाचा बाध न येण्यासाठी तुम्ही बारकाईने दुरवर विचार करून जे बरे दिसेल ते करा.

तो मजकूर राजाने ऐकिल्यावर त्यास ते खरे वाटून रागाने तो अगदी लाल होऊन गेला. मग राजाने प्रधानास सांगून जालंदरास आणविले व एक मोठी खाच खणून तीत त्यास लोटून दिले. नंतर त्यावर घोड्याची लीद घालून खाच भरून टाकिली आणि जर ही गोष्ट कोणाकडून उघडकीस आली तर त्यास जिवे मारून टाकिन, अशी त्या वेळेस हजर असणारांना सक्त ताकीद दिली.

राजा प्राण घेईल त्या भीतीस्तव ही गोष्ट कोणी उघडकीस आणिली नाही व मध्यरात्रीच्या सुमारास कार्यभाग करून घेतल्यामुळे ही गोष्ट लोकांनाहि समजली नाही. दुसरे दिवशी सकाळी जालंदरनाथ कोठे निघून गेल्याची वार्ता गावभर झाली. तेव्हा तो बैरागी असल्यामुळे लोक त्याच्याविषयी अनेक तर्क योजू लागले. गुरुजी निघून गेल्याची वार्ता दासींनी मैनावतीस सांगितली, तेव्हा तिला फार दुःख झाले. पुत्रास अमर करून घेण्याचा तिने योजलेला बेत जागच्या जागी राहून गेला, हे पाहून मैनावतीस परम दुःख झाले. पण राजांना परमानंद झाला आणि गावकऱ्यास त्या साधूचे दर्शन अंतरले.

जालंदरनाथ त्या खड्ड्यात वज्रासन घालून आकाशास्त्राची योजना करून स्वस्थ बसून राहिला. आकाशास्त्र सभोवती असल्याने व त्यावर वज्रास्त्राची योजना केल्याने लीद वरच्यावर राहून गेली, ह्यामुळे त्यास खड्ड्यात निर्भयपणाने राहता आले.

अध्याय १५ संपादन


कानिफनाथ व मारुती यांचे युद्ध, कानिफनाथाचे स्त्रीराज्यात आगमन.


गोरक्षनाथ आणि कानिफनाथ या उभयतांनी बारा वर्षै बदरिकाश्रमास तपश्चर्या केली. ती पूर्ण झाल्यानंतर ते दोघे आपापल्या गुरूंचा शोध करावयाकरिता निघाले. पण कोठेहि शोध न लागल्यामुळे ते दोघेहि माशाप्रमाणे तडफडत होते व गुरूच्या वियोगामुळे त्यांच्या डोळ्यातून टपटपा पाणी पडत होते. अशा स्थितीमध्ये ते देशोदेशी फिरत होते.

गोरक्षनाथ फिरत फिरत गौडबंगाल्यात गेल्यावर हेलापट्टणास आला व तेथील शिवेशी येऊन स्वस्थ बसला. तेथे गावचे जे रक्षक होते त्यांनी त्यास नमस्कार केला. तेव्हा त्यांच्याजवळ गोरक्षनाथ मच्छिंद्राविषयी विचारपूस करू लागला. तेव्हा ते म्हणाले, तुम्ही म्हणता तो गोसावी येथे आला नव्हता, पण जालंदरनाथ या नावाचा एक गोसावी आला होता. तो सूर्यासारखा मोठा तेजस्वी असून आधाराशिवाय त्याच्या डोक्याच्या वर गवताचा भारा राहात असे. तो ते गवत रानातून आणत गावातील लोकांच्या गायींना घाली. तो येथे सुमारे एक वर्षपर्यंत राहिला होता, पण पुढे तो कोठे व केव्हा गेला ह्याची माहिती कोणास नाह. ह्या गोष्टीस आज सुमारे दहा वर्षे होत आली. ते भाषण ऐकल्यानंतर, मी तप सोडून त्याचा शोध करीत हिंडेन म्हणून गुरूने नाव पालटले असावे, अशा अनेक कल्पना त्याच्या मनात येऊन त्याला अतोनात दुःख झाले त्या समयी ईश्वरकृपेने गुरूची व तुझी भेट होईल तू काही काळजी करू नकोस, अशी ते त्याची समजूत करीत होते.

पुढे तो अंमळसा विवेक करून गावात भिक्षेस गेला. तो घरोघर भिक्षा मागावयास फिरत असता, तेथे जालंदरास पुरले होते तेथे गेला व त्याने 'अलख' शब्द करताच आतून जालंदरनाथाने 'आदेश' केला तेव्हा गोरक्षनाथाने 'आदेश' करून आपले नाव काय, म्हणून विचारिले. त्यावरून त्याने मला जालंदरनाथ म्हणतात असे आतून उत्तर दिले व तसेच त्याने त्यासहि तुझे नाव काय व तुझा गुरु कोण म्हणून विचारिले. तेव्हा गोरक्षनाथाने सांगितले की, माझा गुरु मच्छिंद्रनाथ होय व या देहास गोरक्ष असे म्हणतात. मग तुमची ही अशी अवस्था कशी झाली, वगैरे गोरक्षनाथाने विचारल्यावर जालंदराने सविस्तर मजकूर त्यास सांगितला. तो ऐकताच गोरक्षनाथ रागावून गोपीचंद राजाचे समूळ वाटोळे करून टाकण्याकरिता जालंदरापाशी आज्ञा मागू लागला. पण पुढील भविष्य जाणून त्याने त्यास ह्या कामात हात घालण्याची मनाई केली. तो म्हणाला, तूर्त तू ह्या भरीस पडू नको व ही गोष्ट कोणाजवळ बोलू नको. तुझा व माझा शिष्य कानिफ ह्याची जेव्हा भेट होईल तेव्हा त्यास मात्र तू हे सर्व कच्चे वर्तमान सांग; म्हणजे तो येथे येऊन हरयुक्तीने नाथपंथाचा उत्कर्ष होण्यासाठी राजास बचावून मला खांचेतून बाहेर काढील. आता ही गोष्ट नीट लक्षात ठेवून तू तीर्थयात्रेस जा. मग गोरक्षनाथ 'आदेश' करून तेथून निघाला. तो फिरत फिरत जगन्नाथास गेला.

इकडे कानिफा गावगन्ना उपदेश करीत चालला होता. पुष्कळ लोकहि त्याचे हौशीने शिष्य होत. त्याचा समागमे सातशे शिष्य निरंतर असत. ते फिरत फिरत स्त्रीराज्याच्या आसपास गेले. त्या राज्यात पुरुष वाचत नाही, हे सर्वांना ऐकून ठाऊक होते; म्हणून पुढे जाण्यास कोणी धजेना. पण कानिफाचाच स्त्रीराज्यात प्रवेश करण्याचा रोख दिसल्यावरून शिष्यमंडळीत मोठी गडबड उडून गेली. तरी त्यातून कितीएक असेही म्हणू लागले की, गुरुचे पाय मनापासून धरिल्यानंतर जिवाचे भय कसले आहे ! तशातून तन, मन, धन इत्यादि सर्व आपण पूर्वीच ह्यास अर्पण केले आहे; तर आता जिवाची आशा धरून व्रतभंग करणे अनुचित कर्म होय.

हा त्यांच्या मनसुब्याचा सर्व प्रकार कानिफाच्या लक्षात आला म्हणून त्याने स्पर्शास्त्रमंत्र म्हणून भस्म तिन्ही दिशांकडे फेकिले आणि स्त्रीराज्याचा मार्ग मोकळा ठेवून त्याशिवाय बाकीच्या सर्व दिशा भारून टाकिल्या. त्याला असे करण्यास दोन कारणे होती. शिष्य पळून जाऊ नयेत हे एक आणि मारुतीचा भुभुःकार त्या ठिकाणी पोचू नये हा दुसरा. ह्याप्रमाणे व्यवस्था करून त्याने आपल्या शिष्यास जवळ बोलावून सांगितले की, मला आता स्त्रीराज्यात जावयाचे आहे; परंतु तो देश मोठा कठीण आहे. त्या ठिकाणी मारुती भुभःकार करीत असतो, त्यामुळे तेथे पुरुष वाचत नाही. असे पुढचे देश मोठे कठीण आहेत व त्या देशांच्या यात्रा करून येण्याचा माझा मानस आहे. जर जालंदरनाथ गुरूच्या चरणी माझा खरा विश्वास असेल तर दंग्याधोक्याशिवाय मनात धरिलेल्या यात्रा करून सुरक्षित माघारा येईन. कदाचित जिवावर प्रसंग येऊन प्राणहानि झाली तरी पुरविली. परंतु मनात आले आहे त्यापेक्षा तिकडे जाऊन यावयाचे खचित ! तर आता तुमचा विचार कसा आहे तो कळवा. ज्यांची गुरूच्या चरणी पूर्ण निष्ठा असेल, त्यांनी माझी संगत धरावी आणि ज्यांना जिवाची आशा असेल त्यांनी परत घरी जावे.

कानिफाने असे सांगितल्यानंतर त्याच्या सातशे शिष्यांपैकी अवघे सात जण तेथे त्याच्याजवळ राहिले आणि बाकीचे सर्व परत चालले. आपण होऊन विचारल्याशिवाय जाणार होते, पण तेणेकरून मूर्खत्व मात्र पदरी आले असते, त्यापेक्षा गुरुजीनी आपण होऊन राजीखुशीने जावयास परवानगी दिली, ही गोष्ट फार चांगली झाली, हाच हर्श मानून ते आनंदाने परत जाऊ लागले. ते गावच्या सीमेपर्यंत सुमारे एक कोस लांब गेले. परंतु तेथे स्पर्शस्त्राने त्यास चिकटून धरिले. जागच्या जागी खिळून टाकिल्याने त्यास हालता चालता येईना. मग हात जमिनीवर ठेवून त्यांच्या नेटाने ते पाय सोडावयास पहात होते; पण हातसुद्धा जमिनीस चिकटून ते सर्व ओणवे होऊन राहिले.

इकडे कानिफनाथाने राहिलेल्या सात शिष्यात विभक्त अस्त्रविभूति लावून सांगितले की, तुम्ही तिकडे जाऊन दुसरे शिष्य ओणवे होऊन राहिले आहेत, त्यांच्या पाठीवरून एकएक दगड ठेवा. अशी आज्ञा होताच ते सात जण त्यांचा शोध काढीत तेथे गेले. ह्या सातांना पाहाताच बाकीचे सर्व शिष्य लज्जित झाले. मग त्यांची चांगली खरडपट्टी काढून गुरूने सांगितल्याप्रमाणे त्यांच्या पाठीवर दगड ठेविले. ते दगड देखील त्यांच्या पाठीस चिकटून गेले. मग ते शिष्य रडून त्या दुःखापासून सोडविण्यासाठी प्रार्थना करू लागले. तेव्हा ते सात शिष्य म्हणले, जिवाची आशा धरून येथे खुशाल असा, गुरुजी देश पाहून आल्यानंतर तुम्हास सोडवून नेऊ. संकटापासून सोडविण्यासाठीच तर गुरु करावयाचा असतो परंतु विश्वास धरणारास तो मात्र फलद्रूप होतो. तेव्हा आपला अन्याय क्षमा करून स्त्रीराज्यात समागमे घेऊन जाण्यासाठी त्यांनी या सात जणांचे पुष्कळ प्रकारांनी आर्जव केले व आमचा भ्रम उडून गुरूचा प्रताप समजला, असेही त्यांनी बोलून दाखविले.

मग ते सातहिजण परत गुरूकडे येऊन जोडीदारांची स्थिति सांगून मुक्तता करण्यासाठी मध्यस्थी करू लागले. गुरूला दया येण्याजोगे त्यांनी बरेच मार्मिक भाषण केले. तेव्हा गुरू कानिफाचे अंतःकरण द्रवले व त्याने विभक्तास्त्र मंत्र म्हणून भस्म दिले; ते एका शिष्याने जाऊन त्यास लाविताच ते मोकळे झाले. मग ते सर्वजण येऊन लीनतेने गुरूच्या पाया पडले. पुढे सर्व शिष्यांसह वर्तमान कानिफा स्त्रीराज्यात जावयास निघाला. तो नगराच्या सीमेवर जाऊन तळ देऊन राहिला.

नंतर असा चमत्कार झाला की, भुभुःकार करण्यासाठी मारुती सेतुबंधरामेश्वराहून रात्रीस स्त्रीराज्यांत तो जात असता तो कानिफाच्या स्पर्शास्त्राच्या सपाट्यात सापडला गेला; पण महाप्रबळ वीर असल्यामुळे त्याने त्या अस्त्रास दाद दिली नाही. तो त्यांच्या तळापर्यंत येऊन पोचला, त्या वेळी स्पर्शास्त्राने हरकत केल्याची कल्पना त्याच्या मनात आल्यावरून येथे कोणी तरी प्रतापी असला पाहिजे, असेही त्याच्या मनात बिंबले. इतक्यात सीमेजवळ येताच त्यास नाथपंथाचे लोक दिसले. त्या वेळी मारुतीस असे वाटले की, आपण महाप्रयत्‍नाने स्त्रीराज्यात पाठविलेल्या मच्छिंद्रनाथास हे लोक जाऊन उपद्रव देतील व बोध करून त्याचे मन वळवितील. मग तोहि ह्यांच्या समागमे स्वदेशाला गेला तर केलेले श्रम फुकट जाऊन राणीचा मुखचंद्र उतरेल व तिचे हेतु जागच्या जागी राहून जातील. ह्यास्तव त्यांना दुर्बल करून परत लावण्यासाठी मारुतीने अतिविशाल असे भीमरूप प्रगट केले आणि भुभुःकार केला. तेव्हा सर्व शिष्य घाबरून गुरुजीच्या आड दडून बसले व रक्षण करण्याकरिता गुरूस विनंति करू लागले. त्यांचे अवसान गळून गेले असे पाहून कानिफाने त्यांस पुष्कळ धीर देऊन सांगितले की, पुढे काय चमत्कार होतो तो धैर्य धरून तुम्ही पाहा; ह्यांच्यापासून तुम्हांस मुळीच धक्का बसणार नाही.

नंतर कानिफाने वज्रास्त्र सिद्ध करून भस्म मंत्रून फेकिले. ते कृत्य मारुतीच्या लक्षात आले. त्या क्षणीच तो आवेशाने मोठमोठे प्रचंड पर्वत कानिफाच्या अंगावर फेकू लागला. परंतु वज्रास्त्राच्या योगाने दगडांचे चूर्ण होऊन जाई, म्हणून मारुतीने वज्रमुष्टीचा प्रहार करताच वज्रास्त्र क्षीण झाले. ते पाहून कानिफनाथाने, कालिकास्त्र, अग्न्यस्त्र, वासवास्त्र, वाय्वास्त्र अशी वरच्यावर सोडिली. तेव्हा अग्न्यास्त्रास वाय्यास्त्राचे पुष्कळ पाठबळ मिळाल्याने त्याने प्रळय उडवून दिला. त्या वेळी मारुतीने सर्व इलाज केले, पण त्याचे काही चालले नाही. तो अगदी जेरीस येऊन गेला. मग, मी तुझा मुलगा असता, माझा तू प्राण घेऊ पाहात आहेस, तर मुलाची दुर्दशा पाहून कोणत्या तरी बापास सुख वाटणार आहे काय? अशा मतलबाची मारुतीने आपला पिता जो वायु त्याची बरीच स्तुति केली. तेव्हा पुत्राच्या ममतेस्तव वातास्त्र क्षीण झाले. मग कानिफाने मोहिनी योजना केली. त्याने मारुतीस काहीसे भ्रमिष्ट केले; तरी त्याने अग्न्यास्त्र समुद्रात झुगारून दिले. त्या तापाने समुद्राचे उदक कढू लागले. मग तो (समुद्र) मूर्तिमंत येऊन पाहू लागला असता कानिफा व मारुती ह्यांचे युद्ध चाललेले दिसले. मारुती आपल्याकडून करवेल तितके उपाय योजून कानिफाचा पाडाव करावयास पाहात होता, परंतु त्याचे वर्चस्व कमी झाले नाही; उलट मारुतीच जर्जर होऊन मूर्च्छना येऊन जमिनीवर पडला.

मग मूर्तिमंत वायु पुत्रमोहास्तव मारुतीजवळ गेला. इतक्यात मारुती सावध होऊन पुनः युद्धाची धामधूम करण्याच्या बेतात आहे असे पाहून वायूने त्याचा हात धरून सांगितले की, हे नाथ मोठे प्रबळ आहेत. पूर्वी मच्छिंद्रनाथाने तुझी कशी दुर्दशा करून सोडिली होती ह्याची आठवण कर ! वाताकर्षणविद्या ह्यांच्या जवळ पक्क्या वसत आहेत. यास्तव यांच्याशी सख्य करून तुझे कार्य साधून घे. सख्यत्वासारखी दुसरी योग्य युक्ति मलासुद्धा दिसत नाही, असा समुद्राचाहि अभिप्राय पडला. मग ते मारुतीला घेऊन कानिफाजवळ गेले व त्यास परम प्रीतीने भेटले. कानिफानेहि वायू व समुद्र यांस प्रेमाने नमस्कार केला आणि युद्ध का सोडलेस म्हणून मारुतीला विचारिले. पण युद्ध करण्याचे कारण कोणते असे वायूने कानिफास विचारल्यावर त्याने उत्तर दिले की, मारुतीने काय कारणास्तव युद्धास आरंभ केला हे मला माहीत नाही, त्याला विचारले असता तो सांगेल. तेव्हा मारुती म्हणाला, मी मोठ्या प्रयत्नाने मच्छिंद्रनाथास स्त्रीराज्यात पाठविले. हे त्याचे जातवाले असल्यामुळे, युक्ति प्रयुक्तिने त्यास बोध करून तेथून आपल्या देशास घेऊन जातील तसे ह्यांनी करू नये म्हणून मी ही खटपट केली, दुसरा काही मतलब नव्हता. मच्छिंद्रनाथास ह्यांचा उपद्रव होणार नाही, असे माझी खात्री पटण्यासाठी मला वचन देऊन त्यांनी खुशाल स्त्रीराज्यात गमन करावे. मग मारुतीचे म्हणने कानिफाने मान्य करून त्यास वचन दिले. मग अग्नि, वायु व मारुती संतुष्ट होऊन आपापल्या ठिकाणी गेले.

मग प्रातःकाळी कानिफा आपल्या शिष्यांसहवर्तमान निघून स्त्रीराज्यात गेला. तेथे तीर्थे करीत राजधानीचे मुख्य शहर जे श्रृंगाल मुरुडी येथे ते दाखल झाले. तेथे मैनाकिनी राणी मच्छिंद्रनाथास घेऊन सभेमध्ये सिंहासनावर विराजमान झाली होती. कानिफ आपल्या शिष्यांसह एका राजवाड्यात गेला. तेव्हा द्वारपाळांनी तपास करून सातशे शिष्यांसह कानिफनाथ या नावाचा जती आल्याचे वर्तमान मच्छिंद्रनाथास कळविले. ते ऐकून गोरक्षनाथ आपले नाव बदलून मला न्यावयास आला असावा, असे वाटून त्यास फार वाईट वाटले. आता आपण ह्या विषयविलासाच्या अनुपम सुखास अंतरणार ! हाच विचार त्याच्या मस्तकात भरून गेला; तेणेकरून तो दिलगीर झाला. मग त्यांना परभारे गावात न्यावे असे मनात आणून मच्छिंद्रनाथ मोठ्या समारंभाने पालखीत बसून त्यास भेटावयास गेला. उभयतांच्या मोठ्या आनंदाने भेटी झाल्या. भरजरी गालिचे पसरून त्यावर सर्व मंडळी बसविली. मग एकमेकांच्या हकीगतीची विचारपूस झाली. त्या वेळेस खरा प्रकार बाहेर पडला. ओळख पटल्यानंतर उभयतांचे पुष्कळ बोलणे झाले. मग त्यास मच्छिंद्रनाथाने हत्तीवर बसवून मोठ्या थाटाने गावातून आणिले आणि एक महिना राहवून घेतले.

अध्याय १६ संपादन


कानिफनाथ व गोरक्षनाथांची भेट, कानिफनाथाचे गोपीचंद राजाकडे आगमन


स्त्रीराज्याच्या राजधानीत मच्छिंद्रनाथाने कानिफनाथास मोठ्या आदरसत्काराने राहवून घेतल्यानंतर त्याची उत्तम बर्दास्त ठेविली. असे करण्यात मच्छिंद्रनाथाचा हेतु असा होता की, कानिफा येथून गेल्यानंतर गोरक्षनाथास भेटेल व तो मजविषयी त्यास बातमी देईल. मग तो मला नेण्यासाठी येथे येईल व मला घेऊन जाईल. असे झाल्यास मी ह्या सर्व सुखास मुकेन; इतक्या पल्ल्यास गोष्ट येऊ नये व त्याचेहि मन रमून त्याने निरंतर येथेच राहावे म्हणून सुम्दर रूपवान देवांना देखील भ्लविणाऱ्या अशा स्त्रिया, विषयात गोवून टाकण्याकरिता त्याच्या शिबिरास पाठवू लागला. पण कानिफाने त्या स्त्रियांकडे ढुंकूनसुद्धा पाहिले नाही. कानिफापुढे स्त्रियांचे तेज पडत नाही. त्यांचा हिरमोड होऊन त्या रडत परत येतात, असे वर्तमान मच्छिंद्रनाथास समजल्यावर त्याच्या शिष्यांना विषयात गोवून टाकण्याला सांगितले; पण शिष्यांजवळहि स्त्रियांचे काही चालले नाही. त्या इलाज करून थकल्या, पण त्यांचा हेतु सफळ झाला नाही. महिनाभर राहून कानिफाने मच्छिंद्रनाथापाशी जावयास आज्ञा मागितली; ती त्याने बिनतक्रार दिली. तेव्हा हत्ती, घोडे, पालख्या, उंची वस्त्रे, तंबू राहुट्यादि पुष्कळ देऊन हिरे, माणके, सुवर्ण व पैसा विपुल दिला. अशा मोठ्या लवाजम्यानिशी मच्छिंद्रनाथाने कानिफाची रवानगी करून दिली.

कानिफा तेथून निघून तीर्थयात्रा करीत चालला. तो जेथे जेथे जाई तेथे तेथे त्याचा उत्तम प्रकारे आदरसत्कार होई. पुष्कळ लोक त्याचे शिष्य झाले. जो तो त्याची वाखाणणी करी व मोठ्या हौसेने दूरदूरचे लोक येऊन आपआपल्या गावास मोठ्या सन्मानाने त्यास घेऊन जात. त्याजविषयी लोकांच्या मनात पूज्यबुद्धि उत्पन्न होऊ लागली. अशी त्याची कीर्ति पसरत हेलापट्टणातहि त्याच्या नावाचा डंका बराच गाजला. तेव्हा गोपीचंद राजाने दूत पाठवून नाथाचा समाचार आणविला त्याच्या ऐश्वर्याची दूतांनी राजापाशी फारच स्तुति केली.

इकडे गोरक्षनाथ जगन्नाथहून तीर्थयात्रा करीत फिरत असता त्याची व कानिफाची एका अरण्यात भेट झाली. उभयतांनी आदेश केला. मग कानिफाने गोरक्षास भरजरी गालिच्यावर बसविले. त्या वेळी गोरक्षनाथाची विद्या कशी काय हे पाहावे असे कानिफाच्या मनात येऊन त्याने गोष्ट काढिली की, त्या पलीकडील आम्रवृक्षावर जी मधुर फळे पक्व झालेली दिसत आहेत, त्यातून थोडीशी आणविण्याचे माझ्या मनात आहे. ते ऐकून गोरक्ष म्हणाला, कशाला इतका खटाटोप ! आपल्याला काही गरज नाही. तेव्हा कानिफा म्हणाला, खटपट कशाची आली आहे त्यात? आता शिष्य पाठवून ते आंबे तोडून आणवितो. हे ऐकून गोरक्ष म्हणाला, इतका यत्न करण्याचे काय कारण आहे? आता शिष्य जवळ आहेत म्हणून त्यांच्यापासून आणवाल; पण कोणे वेळेस शिष्य जवळ नसेल तर आपण कसे करावे? आपल्या विद्येच्या प्रभावाने फळे तोडून विद्येचा प्रताप व गुरूचा प्रसाद उजेडास आणावा व फळे खाऊन आत्मा संतुष्ट करावा. तेव्हा कानिफाने सांगितले की, जर अशी तुमची मर्जी आहे, तर मी गुरूच्या कृपेने आता फळे आणितो. असे म्हणून त्याने विभक्तास्त्रमंत्र म्हणून भस्म मंत्रून त्यावर आकर्षणास्त्राची योजना केली व भस्म फेकले; त्यामुळे पिकलेले सर्व आंबे झाडावरून त्याचे जवळ येऊन पडले. मग सर्वांनी ते आंबे खाल्ले व हात धुतल्यानंतर गोरक्षनाथाने मनात विचार केला की, कानिफाने आपले कर्तृत्व तर मला दाखविले. तेव्हा आपणहि ह्यास थोडासा चमत्कार दाखवावा. असा विचार करून कानिफास तो म्हणाला की, तुम्ही माझा पाहूणचार केलात ! आता मी काही फळे आणितो तर ती खाऊन आपण तृप्त व्हावे. कानिफाने त्याचे हे बोलणे मान्य केले. मग गोरक्षनाथाने आकर्षणशक्ति व विभक्तास्त्र जपून भस्म फेकताच एका लवंगवनातील तर्‍हेतर्‍हेची फळे येऊन जवळ पडली. ती मधुर फळे खाऊन सर्व तृप्त झाले.

मग गोरक्षनाथाने मुद्दाम गोष्ट काढिली की, ही शिल्लक राहिलेली फळे पुन्हा परत झाडावर नेऊन डहाळीस चिकटवावी. तेव्हा कानिफा म्हणाला, ही गोष्ट अशक्य होय. त्यावर गोरक्ष म्हणाला, निःसीम गुरुभक्तास काही अवघड नाही. तो दुसरा ब्रह्मदेवहि उत्पन्न करील. अशा प्रकारचे पुष्कळ दृष्टांत देऊन म्हणाला, मी माझ्या सद्गुरूच्या कृपेने पाहिजे ते करीन. हे ऐकून कानिफास राग आला. तो म्हणाला मी तुला व तुझ्या गुरूला जाणतो, तो नरकात पिचत पडला आहे ! स्वतःला योगी असे म्हणवून तो स्त्रीराज्यात रतिविलासात निमग्न होऊन गेला आहे. ब्रह्मदेवाला शक्तिहीन समजून मोठमोठाल्या चढाचढीच्या गोष्टी तू करीत आहेस पण ही सर्व प्रौढी सोडून देऊन मार्गस्थ हो. अशा प्रकारचे उपमर्दाचे पुष्कळ भाषण ऐकून घेतल्यावर गोरक्षनाथ म्हणाला, तू भ्रमिष्टासारखा भाषण करतोस ! तुझा गुरू जालंदरनाथ दीनासारखा आज दहा वर्षे घोड्याच्या लीदीत पडला आहे. सुटुन जाण्याचे त्याच्या अंगी सामर्थ्य नाही म्हणून कुजतो आहे. गौडबंगाल देशात हेलापट्टणच्या गोपीचंद राजाने वस्तादगिरी करून त्यास खाचेत पुरून वर घोड्याची लीद टाकून अगदी बेमालूम करून टाकिले. शाबास त्या राजाची ! माझा गुरु अशा प्रतीचा नव्हे. हे ब्रह्मांड हालवून टाकील असा त्याचा प्रताप आहे. त्याच्या कृपेने तुला आताच चमत्कार दाखवितो पहा. असे म्हणून संजीवनी म्म्त्र म्हणून भस्म फेकताच ती उरलेली फळे जागच्या जागी जाऊन लटकू लागली. ते पाहून कानिफा चकितच झाला. त्याने निराभिमानाने गोरक्षाजवळ जाऊन त्याचि वाहवा केली व प्रेमाने त्यास आलिंगन दिले आणि म्हटले की, आपल्या भाषणाने मला आज एक मोठा फायदा झाला. तो हा क, माझ्या जालंदर गुरूचा शोध लागला. मग गोरक्षनाथ म्हणाला, गोष्ट खरी आहे. माझ्या योगाने जसा तुला तुझ्या गुरूचा शोध लागला, तसा तुझ्या योगाने माझ्या मच्छिद्रनाथ गुरूचाहि मला शोध लागला. आजचा योग फारच उत्तम आला; असे बोलून त्यानी एकमेकास नमस्कार केला. मग गोरक्षनाथ स्त्रीराज्याकडे व कानिफनाथ हेलापट्टणास चालला.

आपला गुरु जालंदरनाथ ह्यास गोपीचंद राजाने पुरून टाकल्याचि बातमी कळताक्षणीच कानिफाच्या मनात क्रोधाग्नि उत्पन्न झाला व केव्हा सूड उगवीन असे त्यास झाले होते. तो आपल्या सातशे शिष्यांसह हेलापट्टणच्या अरण्यात येऊन राहिला. कानिफा आल्याचि बातमी लागताच गोपीचंद राजाने त्यास सामोरे जाण्याचा निश्चय केला. त्याने कानिफाचा लौकिक ऐकलेला होताच, त्यामुळे अंतःकरणापासून त्यास गुरु करण्याचे राजाच्या मनात भरले होते. स्वतःबरोबर हत्ती, घोडे, उंट, पालख्या, गाड्या, तंबू, डेरे, राहुट्या वगैरे घेऊन मोठ्या वैभवाने सातशे शिष्यांसहवर्तमान कानिफानाथ देशपर्यटन करीत होता. कानिफास नगरात आणावयास राजा आपले सातशे सरदान व असंख्य फौजेनिशी मोठ्या दिमाखाने जात असता वाटेमध्ये तो प्रधानास म्हणाला की, प्रारब्धयोगेकरून या नगरास आज महान सिद्धपुरुषाचे पाय लागले आहेत, त्या अर्थी ह्यास गुरु करावा असे माझ्या मनात आले आहे. हा गुरू मला योग्य असाच आहे व माझ्या वैभवाप्रमाणे याचेहि वैभव आहे. नाही तर आमच्या मातोश्रींनी जो गुरु केला तो अगदी कंगाल, घाणेरडा असा होता. मी राजा आहे; माझ्या पंक्तीस बसण्यास राजे लोकच योग्य होत. तो जालंदर पिशाच्च्यासमान भटकणारा घाणेरड्या जागेत राहणारा व दरिद्री असा माझ्या आईने गुरु केला, परंतु कोणतीहि गोष्ट करावयाची ती सारासार विचार करूनच केली पाहिजे. मजसारख्या राजाला गुरु करावयाचा म्हणजे तो असाच ऐश्वर्यवान असला पाहिजे. हा कानिफा मला योग्य गुरु आढळला आहे. असे बोलून राजा मोठ्या समारंभाने कानिफास आणावयास गेला.

कानिफनाथाने गोपीचंद राजास पाहिले मात्र, तोच त्याचा क्रोधरूपी अग्नि भडकून गेला. परंतु विवेक करून त्याने क्रोध आवरून धरिला. त्याने त्या वेळेस असा विचार केला की, जर आपण ह्यास आताच शाप देऊन भस्म करावे, तर आपणास ह्याच्यापासून मोठा कार्यभाग साधून घ्यावयाचा आहे, तो तसाच राहून जाईल. तशात गुरूची कोणत्या ठिकाणी कशी काय अवस्था केली आहे तीहि आपणास पुरी माहीत नाही. यास्तव ह्याच्याकडून गुरूची माहिती करून घेऊन नंतरच ह्यास शिक्षा करावी अशा विचाराने राग आवरून धरून तो अगदी शांत झाला. इतक्यात गोपीचंद राजा अगदी जवळ जाऊन कानिफाच्या पाया पडला नंतर उभा राहून हात जोडून दीनवाणीने विनंती करू लागला की, महाराज ! दैवयोगाने मला अनाथास सनाथ करावयासाठी आपल्या कृपारूपी गंगेचा ओघ आज मजकडे वळला आहे. राजा याप्रमाने बहुत प्रकारे बोलत असता, तिकडे कानिफांचे पूर्ण लक्ष होते. राजाशी सलगी ठेवण्याचा विचार त्याने प्रथम मनात आणलेलाच होता. तशात राजाच्या लीन भाषणाने कानिफास आनंद होऊन त्याने राजाचा हात धरून त्यास आपल्या शेजारी बसविले. मग क्षेमकुशल विचारल्यानंतर त्याने राजास म्हटले की, राजा ! तुझ्या हातून एक मोठे अनुचित कर्म घडले आहे. परंतु तुझे सबळ भाग्य फळास आले म्हणून माझे चित्त शांत झाले; नाही तर ह्या वेळेस मोठा अनर्थ होऊन तुझ्या प्राणावर प्रसंग येऊन ठेपला होता. आता गावात चल, तेथे सर्व वृत्तांत निवेदन करीन.

मग राजा त्यास पालखीत बसवून राजवाड्यास घेऊन गेला. त्याने आज सुवर्णाच्या आसनावर बसविले षोडशोपचारांनी त्याचि यथाविधी पूजा केली. वस्त्रेभूषणे दिली व अनुग्रह करण्यासाठी त्याची विनवणी करू लागला. राजाचे मन वळवून त्यास सर्वस्वी अनुकूल करून घेण्याची खटपट कानिफा करीत होताच. तशात राजा तर अनुग्रह घेऊन उत्सुकतेने चेला होण्यास तयार झालेला पाहून त्यास अतिशय आनंद झाला. तेव्हा कानिफाने राजास म्हटले की, तू माझा अनुग्रह घ्यावया पाहतो आहेस. पण दुधात मीठ घातल्याप्रमाणे तुझ्या हातून एक कर्म घडले आहे, ज्याच्यापासून मी अनुग्रह घेतला आहे, त्या जालंदरनाथास तू घोड्याच्या लीदीत पुरून टाकिले आहेस; परंतु तुझे आयुष्य पुष्कळ व तुझ्या पुण्याईचा जोर बळकट म्हणून माझा कोप शांत झाला. नाही तर जालंदरनाथाने तुला तुझ्या वैभवासुद्धा एका क्षणात भस्म करून टाकिला असता. तेव्हा राजा भयभीत होऊन थरथरा कापू लागला व कानिफाच्या पायांवर मस्तक ठेवून विनंति करू लागला की, महाराज ! मजकडून घडलेल्या अन्यायाची आता मला क्षमा व्हावी आणि या शरण आलेल्या दासावर कृपा करावी. मग तो राजास घेऊन आपल्या शिबिराप्रत गेला.

हा सर्व प्रकार दासींनी मैनावतीस जाऊन कळविला व राजाच्या इतर स्त्रियासहि ती बातमी समजली. हा सर्व मजकूर आम्ही राजदरबारात ऐकिला, म्हणुन मैनावतीच्या दासी म्हणाल्या व त्यांनी दुसरे असेही मैनावतीस कळविले की, कानिफा या नावाचा जालंदरनाथाचा शिष्य आला असून त्याच्या समागमे गोपीचंद राजा त्याच्या शिबिरात गेला आहे. तेथे कसा काय प्रकार घडेल तो मागाहून कळवू. गोपीचंद राजाने जालंदरास लिदीत पुरल्याचा वृत्तांत ऐकून मैनावतीस राग आला व अतिशय वाईट वाटले. पण पुत्राच्या ममतेस्तव त्यास शासन होऊ नये. असे तिला वाटले.

राजा गोपीचंद तर कानिफाच्या सेवेस हात जोडून हजर राहिला व गुलामासारखा खपू लागला. कानिफाने मागितलेला पदार्थ पाहिजे तेव्हा व लागेल तितका तयार ठेविला; न्यूनता बिलकूल पडू दिली नाही. त्या दिवशी सायंकाळ झाल्यावर नाथाने राजास राजवाड्यात जाण्याची आज्ञा दिली. राजाने राजवाड्यात आल्यावर प्रथम मैनावतीकडे जाऊन तिच्या पाया पडून झालेला साद्यंत वृत्तांत तिला कळविला व आपल्या अपराधाची कानिफाने आपणास क्षमा करावी, म्हणून त्याला युक्तिप्रयुक्तिने सांगून व स्वकार्य साधून घेण्यासाठी मध्यस्थी करण्याची तो मातेला विनंती करू लागला. तिने ते त्याचे म्हणणे ऐकून घेऊन नाथाने जाऊन खटपट करून पाहाण्याचे कबूल केले.

नंतर मैनावती कानिफाच्या शिबिरात गेली व त्याच्या पाया पडून जवळ बसली. मग विचारपूस झाल्यावर मी जालंदरास गुरु केले आहे व आपणास नाथपंथी म्हणवीत आहे, असे तिने त्यास सांगितले. ते ऐकून, आपणहि तोच गुरु केलेला आहे असे कानिफाने सांगून आपल्या गुरूची अशी कशी अवस्था होऊ दिलीस, असे तिला विचारिले. तेव्हा तिने सांगितले की गुरूची पुत्राने अशा रितीने वाट लाविल्याची बातमी मला आताच कळली. मग तिने आपली मुळारंभापासून सर्व हकीगत त्यास कळविली. शेवटी गोपीचंदाचे अपराध पोटात घालून त्याला पदरात घ्यावे आणि जालंदरनाथाच्या कोपाग्नीत न होरपळू देता, आपल्या पुत्रास निर्भय करावे आणि गुरूस कूपातून काढून या ब्रह्मांडभुवनात आपला कीर्तिध्वज फडकेल असे करावे म्हणून मैनावतीने कानिफास सांगितले. तेव्हा जालंदरनाथाने अनुग्रह करविण्याचे व त्यास निर्भय ठेवण्याचे कानिफाने तिला वचन दिले, मग तिने घरी येऊन पुत्रास झालेला मजकूर सांगितला आणि त्याच्या मनातील भीति समूळ उडविली.

अध्याय १७ संपादन


जालंदरनाथ व राजा गोपीचंद यांची भेट


मैनावतीने कानिफापासून वचन घेऊन गोपीचंदाच्या मनातील भीति नाहीशी केल्यानंतर दुसरे दिवशी प्रातःकाळी गोपीचंद राजा नाथाच्या शिबिरास गेला व पायांवर मस्तक ठेवून हात जोडून उभा राहिला. तेव्हा कानिफाने राजास विचारिले की, तू जालंदरनाथास कोणत्या जागी पुरून टाकिले आहेस ते ठिकाण मला दाखव. मग ती जागा दाखविण्यास राजा तयार झाला व ती जागा पाहून येण्यासाठी नाथाने आपल्या एका शिष्यास त्याच्या बरोबर पाठविले. स्थळ त्या शिष्यास दाखवून राजा परत आल्यानंतर कानिफाने राजास सांगितले की, आता कोणत्या युक्तीने जालंदरमहाराजांस कूपाबाहेर काढितोस ते सांग. हे ऐकून गोपीचंदाने प्रार्थना केली की, महाराज ! या बाबतीत मला काहीच समजत नाही; मी सर्वस्वी तुम्हांस शरण आहे, माता, पिता, गुरु, त्राता, सर्व तुम्ही आहात. मी आपला केवळ सेवक आहे. हा संबंध लक्षात आणून जसे विचारास येईल तसे करावे. असे राजाने अति लीनतेने सांगितल्यानंतर कानिफाने त्यास सुचविले की, राजा, तुझ्या प्राणाचे रक्षण होण्यासाठी मी तुला एक युक्ति सांगतो. प्रथम तू असे कर की, सोने, रुपे, तांबे, पितळ व लोखंड ह्या धातूंचे पाच तुझ्यासारखे पुतळे तयार कर. हे ऐकून राजाने शिपाई पाठवून सोनार, कासार, लोहार अशा उत्तम कारागिरांना बोलावून आणले व त्यास पंचधातू देऊन हुबेहुब आपल्याप्रमाणे प्रतिमा करावयास सांगितले. त्या कारागिरांनी आपली सर्व कला व अक्कल खर्च करून सोन्याचे, रुप्याचे, तांब्याचे, पितळेचे व लोखंडाचे असे गोपीचंद राजाचे पाच पुतळे तयार करून आणिले.

नंतर एक उत्तम दिवस व मुहूर्त व सर्व पुतळे घेऊन राजाबरोबर कानिफनाथ, गुरूस पुरून टाकिले होते तेथे गेला. तेथे आपण काठावर बसून प्रथम सोन्याचा पुतळा मध्यभागी गोपीचंदाकडून ठेवविला. त्या वेळी राजास सांगून ठेविले की, तू कुदळी घेऊन खणावयास लाग आणि जालंदर गुरूने तुला नाव वगैरे विचारताच तू ते सांगून मोठ्या चपळाईने बाहेर नीघ. ते ऐकून राजाने हातात कुदळी घेतली व कानिफाने चिरंजीवप्रयोग सिद्ध करून विभूति राजाच्या कपाळास लाविली. मग राजा मध्यभागी पुतळा ठेवून खाच खणू लागला असता, आतून ध्वनि निघाला की, खांचेवर जो कोण घाव घालीत आहे त्याने आपले नाव लवकर सांगावे. तो शब्द आतून निघाल्यानंतर, 'गोपीचंद राजा आहे, महाराज !' असे म्हणून राजा पटकन बाहेर सरला. गोपीचंद हे नाव ऐकताच जालंदरनाथाचा क्रोधाग्नि भडकून गेला. तो म्हणाला, 'गोपीचंद असेल तर जळून भस्म होऊन जावो.' असे मुखातून शापवचन निघताच, सुवर्णाचा पुतळा तत्काळ जळून गेला. याच पद्धतीने दुसरे चार पुतळे जालंदरनाथाच्या शापाने जळून भस्म होऊन गेले.

शेवटी कानिफाच्या आज्ञेवरून गोपीचंद राजा पुनः खणावयास लागला असता तो आवाज ऐकून जालंदरनाथाने विचार केला की, माझा क्रोधवडवानळ समग्र ब्रह्मांड जाळून टाकणारा असे असता त्रिलोचन राजाचा पुत्र गोपीचंद या सपाट्यातून वाचला, ही मोठी आश्चर्याची गोष्ट आहे ! ह्यावरून परमेश्वर साह्य होऊन तो राजास रक्षीत आहे ह्यात संशय नाही. ह्यास्तव आता राजास अमर करू असा जालंदरनाथाचा विचार ठरून त्याने राजास विचारिले की, अद्यापपावेतो तू खणीत आहेस, तस्मात तू आहेस तरी कोण हे मला सांग. कानिफाने आपले नाव सांगून राजाचे नाव सांगितले आणि तो म्हणाला, गुरुजी ! मी बालक कानिफा आहे. आपला शोध करून या ठिकाणी आलो आहे. माझे डोळे आपल्या चरणांकडे लागले असून ते माझ्या दृष्टीस केव्हा पडतील असे मला झाले आहे म्हणून गोपीचंद राजा खांच उकरून आपल्यास बाहेर काढण्याची तजवीज करीत आहे. ते शिष्याचे भाषण ऐकून आतून ध्वनि उमटला की, गोपीचंद राजा अद्यापपावेतो जिवंत राहिला आहे; तर तो अमर होऊन जगामध्ये वास्तव्य करो !' असा आशीर्वाद देऊन बाहेर काढण्याची आज्ञा केली.

बहुत दिवस खाड्यास झाल्यामुळे जमीन घट्ट होऊन गेली होती. सबब मोठमोठ्याने घाव घालावे लागले तेव्हा आतून शब्द निघाला की, तुम्ही आता खणू नका, स्वस्थ असा ! मग जालंदरनाथाने शक्रास्त्र जपून वज्रास्त्र काढून घेतले; तो माती दोहो बाजूस झाली. नंतर गुरु-शिष्यांची नजरानजर झाली. त्या वेळेस कानिफाचा कंठ सद्गदित होऊन त्याच्या डोळ्यातून आसवे गळू लागली ! मग जालंदरनाथाने आपल्या शिष्यास पोटाशी धरून म्हटले की, या समयी तू येथे होतास म्हणून राजा वाचला. इतक्यात गोपीचंद राजाने जालंदरनाथाच्या पायांवर मस्तक ठेविले. तेव्हा त्याने त्यास कवटाळून धरून त्याच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेविला आणि आशीर्वाद दिला की. 'प्रळयाग्नीतून तू आता चंद्र-सूर्य आहेत तोपर्यंत पृथ्वीवर राहा !' मग मैनावतीने पाया पडून सांगितले की महाराज, लोभ्याचा द्रव्यठेवा सांडल्यावर किंवा आंधळ्याची काठी नाहीशी झाल्यावर तो जसा चिंतेत पडून खिन्न होतो, तद्वत अकरा वर्षे माझी दशा झाली होती. याप्रमाणे मैनावती भाषण करीत असता तिच्या नेत्रातून एकसारख्या पाण्याच्या धारा चालल्या होत्या. हे पाहून जालंदरनाथाने आपल्या हातांनी तिचे डोळे पुसून समाधान केले.

नंतर जालंदर गोपीचंदाच्या मुखावरून हात फिरवून त्यास म्हटले की, तुझ्या मनात जे मागावयाचे असेल ते माग, मी देण्यास तयार आहे. राज्यवैभव भोगावयाचे असेल ते माग, मी देण्यास तयार आहे. राज्यवैभव भोगावयाचे असेल तर तसे बोल; योगमार्ग पाहावयाचा असेल तर तसे सांग. मी तुझ्या मर्जीनुरूप मागशील ते देण्यास तयार आहे. मी तुला अमर केले आहे; पण राज्यवैभव चिरकाल राहावयाचे नाही. कारण, हे जेवढे वैभव दिसते आहे तितके सारे नाशिवंत आहे. जसा बोध करून त्यास विचार करण्यास सांगितले.

त्या वेळी गोपीचंद राजाने मनात आणिले की, राज्यवैभव शाश्वत नाही. जालंदरनाथाची योग्यता विलक्षण प्रकारची असून तो चिरंजीव आहे, आज अकरा वर्षेपर्यंत पुरून राहिला असता, जसाच्या तसाच कायम ! ह्याच्यापुढे यमाची प्रतिष्ठा म्हटली म्हणजे खिसमतगाराप्रमाणे हात जोडून पुढे उभे राहण्याची ! ह्याच्यापुढे राजाचीहि काय प्रौढी ! तर आता आपणहि ते अप्रतिम वैराग्यवैभव साध्य करून घ्यावे, हाच उत्कृष्ट विचार होय. असा त्याने मनाचा पुर्ण निग्रह करून जालंदरनाथास सांगितले की, गुरुमहाराज ! पदार्थास अग्नीचा स्पर्श झाल्याने तो जसा अग्निमय होतो, तद्वत आता मला तुमच्यासारखे करून सोडा. हे ऐकताच जालंदरनाथाने त्याची पाठ थोपटून त्यास शाबासकी दिली. मग आपला वरदहस्त त्याच्या मस्तकावर ठेवून कृपादृष्टीने त्याचा सर्व देह अवलोकन केला व कानात मंत्रोपदेश करून त्यास सनाथ केले. त्या वेळी राजास संसारातील सर्व पदार्थ अशाश्वत व नाशिवंत दिसू लागले. मग राजाने वडाचा चीक काढून जटांस लाविला. कौपीन (लंगोटी) परिधान केली, कानात मुद्रा घातल्या, शैलीकंथा अंगावर घेतली. शिंगी वाजविली, कुबडी, फावडी हातात घेऊन नागपंथी म्हणविले. तसेच भस्माची झोळी काखेत व भिक्षेची झोळी हातात घेतली आणि गुरूच्या आज्ञेची वाट पाहात तो उभा राहिला.

गोपीचंद राजा बैरागी झाल्याची बातमी गावातील लोकांस आणि अंतःपुरातील राजस्त्रियांस समजल्यानंतर जिकडे तिकडे सर्वत्र रडारड सुरू झाली. इकडे जालंदरनाथाने राजास तपश्चर्यैस जावयास सांगितले. त्या वेळी त्याने राजास उपदेश केला की, आपल्या अठराशे स्त्रियांकडे भिक्षा मागावयास जा. भिक्षा मागताना शिंगी वाजवावी. माई भिक्षा घाल, असे प्रत्येकीस म्हणावे. अशा रितीने भिक्षेच्या मिषाने स्त्रियांची भेट घेऊन तपाकरिता निघून जावे.

मग गुरूची आज्ञा शिरसामान्य करून गोपीचंद राजा स्त्रियांकडे भिक्षा मागावयाकरिता निघाला. राजास त्या स्थितीत स्त्रियांच्या दुःखास भरती आली. त्या वेळी त्यांना इतके रडे लोटले की, त्या झालेल्या कल्होळामुळे ब्रह्मांड हलकलून गेले. राजाचे गुण स्वरूप आदिकरून आठवून त्या दुःसह शोक करू लागल्या. मुख्य राणी लुमावती व दुसऱ्या चंपिका, करिती अशा साऱ्या स्त्रियांनी एकीमागून एक जवळ येऊन त्यास गराडा घालून वेढून टाकिले. त्या त्याची प्रार्थना करू लागल्या की ईश्वरसत्तेने जे व्हावयाचे होते ते झाले; पण आता येथेच राहून योगमार्ग चालवा; कोठे तरी दूर जाऊ नका. आम्ही विषयसुखाकरिता आपला छळ करणार नाही. तुमच्या मुखचंद्राकडे पाहून आनंद मानून राहू, हुकूम कराल तेथे पर्णकुटिका बांधून देऊ; तेथे खुशाल रहावे. आम्ही सेवाचाकरी करून आयुष्याचे दिवस सुखाने काढू. स्त्रियांनी त्यास तेथे राहण्याबद्दल फारच आग्रह केला. पण राजाने त्यांच्या भाषणाकडे बिलकुल लक्ष दिले नाही; उलट त्यांचा धिक्कार करून त्यांना दूर जायला सांगितले.

परंतु, मोहपाशाने गोवून टाकिल्यामुळे स्त्रियांना दूर जाववेना. त्या म्हणाल्या, पतिराज, अरण्यात आपणास एकटे राहावे लागेल. तेथे तुमच्याशी गोड गोड गोष्टी कोण करील? तेव्हा शिंगी, कुबडी ह्या मजशी गोष्टी सांगतील, असे राजाने उत्तर दिले. त्यावर पुनः असेच काही प्रश्न केल्यावर राजाने त्यांस सांगितले, जमिनीचे आसन व आकाशाचे पांघरूण मला पुरेल, कुबडी व फावडी या माझ्या दोन्ही बाजूला निजतील. धुनी पेटवून थंडीचे निवारण करीन. व्याघ्रांबरावर वज्रासन घालून बसल्यानंतर शेकडो पुरुष, बायका व मुले तेथे हांजी हांजी करावयास तयार असतील. घरोघर माझी आईबापे, भाऊ-बहिणी असतील, ती मजवर पूर्ण लोभ करतील. कंदमुळाची गोडी षड्रस अन्नाहून विशेष आहे. कौपीन फाटल्यावर इंद्रिय दमनाचा कांसोटा घालीन. जर ही अंगावर असलेली कंथा फाटली तर योग आचरून दिव्य कंथा परिधान करीन. सगुण, निर्गुण या दोन्ही शिंगी व कुबडी कधीच फुटावयाच्या नाहीत. आगम, निगम यांच्या तारा त्यांना बळकट आहेत त्या कदापि तुटावयाच्या नाहीत. कुबडी, फावडी जीर्ण झाल्यानंतर खेचरी, भूचरी या दोन आदेय विदेय ह्या दोन्हीकडे प्रकाशित राहतील व मीहि तन्मय होऊन निरंजनी लक्ष लावून स्वस्थ निजेन. शेवटी मोक्ष, मुक्ति ह्या शैलीचे मी भूषण मिरवीन.

असा बराच संवाद झाल्यावर राजाने भिक्षा घालावयास सांगितली असता, मोहयुक्त होऊन त्या भेटावयास जवळ येऊ लागल्या. ते पाहून राजाने कुबडी, फावडी त्यांना मारावयास उगारिल्या. ते पाहू मैनावती शिजवलेले अन्न घेऊन आली आणि म्हणाली, नाथा, ही भिक्षा घे. मग गोपीचंद भिक्षा झोळीत घेऊन व मातोश्रीच्या पायावर मस्तक ठेवून जालंदरनाथाकडे गेला व झालेला सर्व मजकूर त्यास सांगता झाला. मागाहून मैनावती ताबडतोब आली; तिनेहि तसेच सांगितले. मग तीन दिवसापर्यंत राजास जवळ ठेवून गुरूने त्यास परोपरीने उपदेश केला. शेवटी राजास तप करण्यासाठी बदरिकाश्रमास जाऊन लोखंडाच्या काट्यावर आंगठा ठेवून बारा वर्षे तप करण्याची आज्ञा केली. त्या क्षणीच गोपीचंद तिकडे जावयास निघाला. राजास बोलवावयास कोस दोन कोसपर्यंत कानिफा, जालंदर व प्रधानादि लहानथोर पुष्कळ मंडळी गेली होती. राजाच्या जाण्याने संपूर्ण नगर दुःखसागरात बुडून गेले.

राजास लोमावतीच्या उदरी जन्मलेला एक मुलगा होता, त्याचे नाव मुक्तचंद. त्यास गोपीचंदाच्या राजसिंहासनावर लोकांनी बसविले. त्यास राज्याभिषेक स्वतः जालंदरनाथाने केला आणि प्रधान, सरदार आदिकरून सर्वांना वस्त्रे अलंकार देऊन योग्यतेनुरूप सत्कार केला व त्याचे समाधान केले. मग अंतःपुरात जाऊन सर्व स्त्रियांचे समाधान केले व मुक्तचंद यास गोपीचंदाच्या ठिकाणी मानून समाधानाने राहावयास सांगितले. नंतर कानिफा व त्याचे शिष्या यांसहवर्तमान जालंदर सहा महिनेपर्यंत तेथे राहिला. त्याने आपल्या देखरेखीखाली त्या सर्व राज्याची नीट व्यवस्था लावून दिली.

अध्याय १८ संपादन


गोपीचंदाचे बहिणीच्या राज्यात आगमन; तिचा मृत्यु व गुरुकृपेने पुनः सजीवता


गोपीचंद राजा जालंदरनाथ गुरुजीच्या आज्ञेने वैराग्य घेऊन बदरिकाश्रमास तपश्चर्या करण्याकरिता निघाला. तो वाटेने जाताना भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह चालवी. राजा बैरागी झाल्याची बातमी जो जो ऐके, तो तो असा नीतिमान राजा पुन्हा होणार नाही, असे म्हणून हळहळ करी. तो जेथे जेथे जाई, तेथे तेथे त्यास राहण्याकरिता लोक अति आग्रह करीत. परंतु तो त्यांचे भाषण मनास न आणिता पुढे मार्गस्थ होई.

हिंडता हिंडता काही दिवसांनी तो गौडबंगाल टाकून कौलबंगाल्यात गेला. तेथे पौलपट्टण नगरात त्याची बहीण चंपावती रहात होती. तेथील तिलकचंद राजाची ती सून होय. तो राजाहि गोपीचंद्राप्रमाणेच ऐश्वर्यवान होता. त्याच्या पदरी द्रव्याची अनेक भांडारेच्या भांडारे होती. अशा राजघराण्यात चंपावती ही सासुरवाशीण होती. नणंद, जावा, दीर ह्यांना ती देवाप्रमाणे मानी. काळासारखा प्रतापी असा तिचा सासरा होता; सासूदेखील मोठी वस्ताद बायको होती. तेथे त्यांना हा गोपीचंदाचा वृत्तांत समजला. तेव्हा ती सर्व टीका करू लागली की, गोपीचंद राजा षंढ खरा; याने राज्याचा विनाकारण त्याग केला आणि हा आता दारोदार भीक मागत फिरत आहे ! मरण आले तरी बेहेत्तर; पण क्षत्रियधर्म काय भीक मागण्याकरिता आहे? या नपुंसकाने जन्मास येऊन कोणते शौर्याचे कृत्य केले ! कुळाला बट्टा मात्र लाविला. याने आमच्या तोंडाला काळे लाविले. लोकांमध्ये फटफजिती झाली. आता आपण काळे तोंड दाखवीत फिरत आहे, त्यापेक्षा हा वेडा पिसा जन्मताच मेला असता तरी चांगले झाले असते. अशा प्रकारची त्यांनी बहुत वल्गना केली. परंतु ही त्यांची भाषणे ऐकून चंपावतीस फार वाईट वाटे. तेव्हा नणंदा, जावा तिला जास्त लावून बोलू लागल्या.

इकडे गोपीचंद फिरत फिरत त्याच नगरीत येऊन पोचला व पाण्याच्या आश्रयास बसून श्रीहरीचे गुणानुवाद गात बसला. तो गोसावी झाला होता तरी मोठा तेजस्वी दिसे. चंपावतीच्या काही दासी अकस्मात तिकडे गेल्या होत्या. त्यांनी त्यास पाहिले व लागलेच ओळखले. त्यांनी ही बातमी प्रथम चंपावतीस सांगितली व नंतर सर्वांच्या कानावर घातली. तेव्हा गोपीचंद तेथे आल्याने आमची फजिती होऊन लोक नावे ठेवतील म्हणून संतापून राजा तिलकचंद हवे तसे बोलू लागला. घरच्या मनुष्यांनीहि यथेच्छ तोंडसुख घेतले. मग तिलकचंद राजाने घरात जाऊन सांगितले की, आता गडबड करून फायदा नाही; तो घरोघरी भीक मागेल व हा आमक्याचा अमुक म्हणून लोक म्हणतील; तेणेकरून आपलाच दुर्लौकिक होईल. तर आता त्यास गावातून आणून अश्वशाळेत ठेवा. तेथे त्यास जेवावयास घालून एकदाचा गावातून निघून जाऊ द्या.

राजाने याप्रमाणे सांगितल्यानंतर दासींनी जाऊन गोपीचंदास सांगितले की, चंपावतीला भेटण्यासाथी तुम्हास राजाने बोलाविले आहे. तेव्हा प्रथम त्याचा जाण्याचा विचार नव्हता. मग बहिणीला भेटण्याकरिता म्हणून तो त्यांच्याबरोबर गेला. त्यांनी त्यास राजाज्ञेप्रमाणे घोडशाळेत नेऊन ठेविले व गोपीचंदास आणल्याबद्दल राजास व राणीस जाऊन सांगितले. मग राणीने अन्नपात्र वाढून दिले. ते घेऊन दासीने त्यास अश्वशाळेत नेऊन दिले व चंपावती मागून भेटावयास येणार आहे, म्हणून सांगितले. हे ऐकून गोपीचंद राजाने मनात आणिले की, मानपान पैक्याला असतो. आपण तर बैरागी झालो. आपणास शत्रुमित्र समान आहेत. आपल्यापुढे आलेल्या अन्नास पाठ देऊन जाऊ नये. विवेकाने असे विचार मनात आणून तो तेथे आनंदाने भोजन करू लागला.

गोपीचंद राजा जेवावयास बसल्यानंतर त्यास राजवाड्यातील स्त्रियांनी पाहून चंपावतीस आणून दाखविले व निर्लज्जपणाने सोयऱ्याकडे येऊन घोडशाळेत भोजन करीत बसला, म्हणून तिच्या तोंडावर त्याची फारच निंदा केली. ती चंपावतीस सहन झाली नाही. ती तशीच त्यांच्यामधून निसटून घरात गेली व जिवावर उदार होऊन तिने खंजीर पोटात खुपसून घेऊन आत्महत्या करून घेतली.

इकडे गोपीचंद राजाने दासीस सांगितले की माझ्या चंपावती बहिणीस इकडे घेऊन या, म्हणजे मी तिला भेटेन. तेव्हा त्या म्हणाल्या, ती सहसा ह्या वेळेस येथे यावयाची नाही; आम्ही तिला तजविजीने रात्रीस घेऊन येऊ व तुम्हास भेटवू. आता तुम्ही जाऊ नका; मर्जी असल्यास उद्या जावे. ते त्यांचे म्हणणे ऐकून रात्री चंपावती भेटेल म्हणून ते त्याने कबूल केले.

मग दासी तेथून निघून राजवाड्यात गेल्या व चंपावतीस पाहू लागल्या. तो तिची ती भयंकर दशा झालेली पाहून त्या दुःखी झाल्या. त्यांनी लागलेच हे वर्तमान सर्वांस कळविले. तेव्हा घरची सर्व मंडळी धावून गेली. सर्वांनी रडून एकच गोंधळ केला. तिचे गुण आठवून ते रडू लागले व तिच्या भावास शिव्या देऊ लागले पुढे भावाकरिता चंपावतीने प्राण दिला, अशी बातमी थोड्याच वेळात सर्व शहरात प्रसिद्ध झाली.

राजवाड्यात रडारड चाललेली ऐकून ती का चालली आहे, असे गोपीचंदाने अश्वरक्षकांस विचारले. तेव्हा ते म्हणाले की, गौडबंगालचा गोपीचंद राजा चंपावती राणीचा बंधु होय; तो राज्य सोडून बैरागी झाला व गावोगाव भीक मागत फिरत आहे, हे दुःख त्या राजाच्या बहिणीला सहन न होऊन तिने पोटात खंजिर खुपसुन जीव दिला. ही दुःखदायक बातमी ऐकून गोपीचंद राजासहि चंपावतीच्या मरणाचे फारच दुःख झाले व माझ्या येथे येण्यानेच हा सर्व अनर्थकारक परिणाम घडून आला, असे वाटून तो चंपावतीचे गुण आठवून रडू लागला.

मग चंपावतीचे प्रेत दहन करण्याकरिता राजवाड्यातील लोक घेऊन जाऊ लागले. तेव्हा गोपीचंदहि प्रेताबरोबर चालला. जाताना त्याच्या मनात अशी कल्पना आली की, जर ही गोष्ट अशीच राहू दिली तर जगात माझी अपकीर्ति होईल. यास्तव बहिणीचे प्रेत उठवावे व सोयऱ्यांनाहि थोडासा आपल्या प्रतापाचा चमत्कार दाखवावा. योग घेतला म्हणून या लोकांनी मला तृणासमान मानिले; यास्तव नाथपंथाचा प्रताप ह्यांना प्रत्यक्ष दाखवावा. ह्यांनी आमच्यात बिलकूल पाणी नाही, असा ग्रह करून आमची मन मानेल तशी निंदा करून मानहानि केली; यास्तव नाथपंथाचा तडाका दाखविल्यावाचून ठेविता कामा नये, असा विचार मनात आणून तो स्मशानामध्ये प्रेताजवळ उभा राहिला आणि म्हणाला. मी सांगतो ते कृपा करून ऐका. तुम्ही प्रेत दहन करू नका; मी जालंदरगुरूस आणून प्रेत उठवितो. ह्या प्रसंगी मी येथे असता भगिनीचे प्रेत वाया जाऊन दिले तर नाथपंथाची मातब्बरी ती काय? ह्या त्याच्या बोलण्याकडे कोणीच लक्ष दिले नाही. ते त्याची उलट कुचेष्टा करू लागले. मेल्यावर कोणी जिवंत होत नाही. असे अनेक दाखले देऊ लागले. तेव्हा गोपीचंद म्हणाला, तुम्ही म्हणता ही गोष्ट खरी; पण माझ्या गुरूचा प्रताप असा आहे की, त्याची कीर्ति वर्णन करताना सरस्वती दमली. त्याने कानिफासाठी अवघे देव पृथ्वीवर आणिले. मी त्यास घोड्याच्या लिदीच्या खाचेत पुरून टाकिले व अकरा वर्षानंतर त्यास बाहेर काढिले, पण जसाच्या तसा कायम ! तुम्ही चार दिवस प्रेताचे रक्षण करा, म्हणजे मी गुरूस आणून बहिणीस उठवितो पण त्याचे म्हणणे कोणी ऐकेना. लोकांनी प्रेत ठेवून चिता रचिली व ते अग्निसंस्कार करणार, इतक्यात गोपीचंद चितेवर बसून 'मलाहि भस्म करून टाका, माझे भस्म झाल्यानंतर जालंदरगुरूच्या कोपानळ शांत व्हावयाचा नाही व तो हे समग्र नगर पालथे घालून तुम्हा सर्वांची राखरांगोळी करून टाकील. असे सांगू लागला.

गोपीचंदाची अशी भाषणे ऐकून तिलकचंद रागावला व म्हणाला गुरूच्या प्रतापाची एवढी प्रौढी वर्णन करीत आहेस; तर आम्हास चमत्कार दाखीव. आम्ही चार दिवस प्रेत जतन करून ठेवितो. मग प्रेत खात्रीने उठविण्याचे त्याने कबूल केल्यानंतर गुरूस दाखविण्यासाठी प्रेताचा डावा हात तिच्या सासऱ्याच्या हुकुमावरून नवऱ्याने काढून दिला. तो घेऊन गोपीचंद गुरूस आणण्यासाठी गौडबंगाल्यात जावयास निघाला. तो बराच लांब गेल्यावर इकडे यांनी प्रेत दहन केले.

गोपीचंद सुमारे पाच कोस गेला असेल इतक्यात हा सर्व प्रकार जालंदरच्या लक्षात आला व गोपीचंद आल्यास घोटाळा होईल म्हणून तो स्वतः तिकडे जावयास निघाला. त्या वेळी त्याने प्राणास्त्राची विभूति कपाळास लाविली. पृथ्वीवर नैषधराजपुत्रावाचून ह्या अस्त्राची कोणास माहिती नव्हती. हे अस्त्र जालंदरास मिळाले होते. ते लावल्याबरोबर एका निमिषात तो शंभर कोस गेला व गोपीचंदास भेटला. तेव्हा गोपीचंदाने जालंदराच्या पाया पडून सर्व मजकूर सांगितला. तो ऐकून चंपावती उठविण्याचे गुरूने आश्वासन दिले आणि त्यासह पौलपट्टणास जाऊन राजवाड्यात सर्व मंडळी शोक करीत होती तेथे प्रवेश केला.

ह्या उभयतास पहाताच तिलकचंद पुढे झाला. त्याने जालंदरनाथाच्या पाया पडून त्यास कनकासनावर बसविले व आपण पुढे उभा राहिला. त्याने केलेला आदरसत्कार केवळ कुभावाचा होता. ही त्याची मानभावी करणी जालंदरनाथाच्या लक्षात येऊन गेली मग तो म्हणाला, राजा, चंपावतीचे तेज ह्या घरात लोपून गेले. ह्या घरात ती शोभत नाही. असे बोलून त्याने गोपीचंदापासून तिचा हात मागून घेतला. मग संजीवनीमंत्र म्हणून भस्म हातास लाविले आणि हाक मारिली; त्यासरशी चंपावती उठली व जालंदरनाथाच्या पाया पडली. शुक्राचार्याने कचास उठविले, तद्वत जालंदरनाथाने चंपावतीस उठविले. ते पाहून सर्व मंडळी प्रेमपूर्वक नाथांच्या पाया पडली. तरीसुद्धा ते प्रेम स्मशानातल्या क्षणिक वैराग्याप्रमाणे होते.

मग जालंधरनाथ उठून जावयास निघाले. तेव्हा तिलकचंद राजाने पाया पडुन प्रार्थना केली की, महाराज, मी पतित आहे. राज्यवैभवाने उन्मत्त होऊन गोपीचंदाचा छळ केला, तरी आता माझ्या अन्यायाची आपण मला क्षमा करावी. या बालकाचे अन्याय उदरामध्ये साठवावे ! असे बोलून त्याने पायांवर मस्तक ठेविले आणि ती रात्र राहण्याकरिता तो प्रार्थना करू लागला. मग जालंदराने तेथे एक रात्र राहण्याचा बेत केला. तेव्हा जालंदराने चंपावतीकडून स्वयंपाक करविला. तिला तिच्या भ्रतारासह आपल्या पंक्तिस जेवावयास बसविले व तिला अनुग्रह देऊन नाथपंथी केले व आपला उच्छिष्ट ग्रास देउन तिला अमर केले.

मग भोजन होऊन विडा खाल्ल्यानंतर जालंदरनाथाने राजास सांगितले की, गोपीचंद राज्य सोडून तपश्चर्यैस जात आहे. ह्याचा मुलगा मुक्तचंद अज्ञान आहे म्हणून त्याच्या राज्यावर तुमची देखरेख असू द्या. तुमचा प्रताप जगास ठाऊक आहे. म्हणून कोणी शत्रु उठणार नाही. मीहि येथे सहा महिने राहून बंदोबस्त करून देईन. परंतु त्यापुढे माझे राहणे व्हावयाचे नाही. म्हणून तू त्यास लागेल ती मदत देऊन त्याचे संरक्षण कर. ती आज्ञा राजाने मनापासून मान्य केली.

मग ती रात्र तेथे राहून दुसरे दिवशी दोघेहि मार्गस्थ झाले. गोपीचंद जालंदरच्या पाया पडून तीर्थयात्रेत व जालंदरनाथ हेळापट्टणास गेला. त्या वेळी राजा उभयतांस पोचवावयास गेला होता. गोपीचंद राजा बदरिकाश्रमास जाऊन तपश्चर्या करू लागला. जालंदरनाथ हेळापट्टणास सहा महिने राहून, मुक्तचंदास अनुग्रह देऊन कानिफासहवर्तमान फिरत फिरत बारा वर्षांनी बदरिकाश्रमास जाऊन गोपीचंदास भेटला. त्याच्या तपाचे उद्यापन करावयासाठी सर्व देवांना आणिले होते; तेथे त्याने त्यास सर्व विद्या शिकविल्या व पुनः दैवते आणून वर देवविले.


अध्याय १९ संपादन


कलिंगा गणिकेबरोबर गोरक्षनाथाचा स्त्रीराज्यात प्रवेश, मारुतीशी युद्ध


जेव्हा कानिफा व गोरक्ष यांच्या भेटी झाल्या. तेव्हा तू गुरूच्या शोधास का फिरतोस? तुझा गुरु मच्छिंद्रनाथ तर स्त्रीराज्यात मौजा मारीत आहे, असे गोरक्षास कानिफाने सांगितले होते. ते ऐकून गोरक्ष स्त्रीराज्यात जावयास निघाला व त्या सीमेपर्यंत येऊन पोचला. नंतर त्याच्या मनात अनेक विचार येउ लागले. ते तर्क अशा प्रकारचे की, ज्या ठिकाणी गुरुराज आहेत त्या ठिकाणी वैभव काही कमी नसावयाचे; परंतु ख्यालीखुशालीत गुरुजी पडल्यामुळे मला ओळखतील की नाही, हीच भ्रांति आहे. अशा प्रकारचे अनेक तर्क त्याच्या मनात आले.

त्या वेळी कलिंगा या नावाची एक वेश्या आपल्या परिवारासह स्त्रीदेशात जात होती. ती रूपवती असून नृत्यगायनात अप्सरा, गंधर्व यांना लाजविण्याइतकी हुशार होती. तिची व गोरक्षनाथाची मार्गात गाठ पडली. मग तो तिच्याजवळ जाऊन तुला तिचे नाव गाव व कोठे जावयाचे हे विचारू लागला. तेव्हा ती म्हणाली, मला कलिंगा असे म्हणतात. मी स्त्रीराज्यात जात आहे. तेथे मैनाकिनी या नावाची स्त्री राज्यकारभार करीत असते. तिला मी आपली नृत्यगायनकला दाखवून वश करून घेणार आहे. तिची मर्जी प्रसन्न झाली म्हणजे ती मला पुष्कळ द्रव्य देईल. ते कलिंगेचे भाषण ऐकून तिच्याच संगतीने गोरक्षनाथाने स्त्रीराज्यात जाण्याचा बेत ठरविला. तिच्याबरोबर आपणास राजगृहात जाता येईल व मच्छिंद्रनाथ गुरूचाहि पक्का तपास लागेल, हा त्याचा विचार होता. त्यावरून त्याने तिच्याजवळ गोष्ट काढिली की, कृपा करून मला समागमे न्याल तर बरे ! माज्या मनातून तुमच्याबरोबर यावे असे आहे. हे ऐकून ती म्हणाली, तुमच्या अंगात कोणता गुण आहे? तेव्हा गोरक्ष म्हणाला, मला गाता येते व मृदंगहि वाजविता येतो. मग तिने त्यास सांगितले की, तुमच्या अंगचा गुण प्रथम येथे दाखवा. तेव्हा त्याने आंब्याच्या झाडाखाली बसावयास घातले व तिने सारंगी-मृदंग वगैरे सर्व साज त्याच्या पुढे आणून ठेविले.

मग गोरक्षनाथाने गंधर्वप्रयोगमंत्र म्हणून भस्म कपाळावर लाविले व ते चोहीकडे फेकून गावयास बसला. तेव्हा झाडे, पाषाण ही सुद्धा सुस्वर गायन करू लागली व वाद्ये वाजू लागली. हा चमत्कार पाहून कलिंगेने तोंडात बोट घातले. तिला तो त्या वेळी शंकरासारखा भासू लागला. जो मनुष्य झाडे; दगड यांच्यापासून गंधर्वाप्रमाणे सुस्वर गायन करवीत आहे, त्याला स्वतः उत्तम गाता, वाजविता येत असेल ह्यात आश्चर्य कोणते? त्याच्या अंगचा गुण पाहून तिला अत्यानंद झाला व आपण त्याच्या संगतीत राहण्याचा निश्चय करून ती त्यास म्हणाली की, महाराज ! गुणनिधे! आपल्यापुढे माझी काहीच प्रतिज्ञा चालावयाची नाही. असे बोलून ती त्याच्या बद्दल सर्व विचारपूस करू लागली. तेव्हा गोरक्षनाथ गहन विचारात पडला. त्याने तिला नाव न सांगण्याचा बेत केला. कारण त्याचा पुढील कार्यभाग साधावयासाठी याला नाव गुप्त ठेवावयास पाहिजे होते. यास्तव त्याने तिला पूर्वडाम असे आपले नाव सांगितले. मग तिने तुमच्या मनात कोणता हेतु आहे, म्हणून विचारिले. त्यावर तो म्हणाला, विषयसुखाविषयी मी अगदी अज्ञानी आहे व ते मला नको; पण पोटाला मात्र एक वेळेस घालीत जा. ह्यावाचून माझी दुसरी काहीच इच्छा नाही. गोरक्षनाथाचे ते भाषण ऐकून कलिंगा म्हणाली, महाराज ! आपण म्हणता त्याप्रमाणे तजवीज होईल. पण मुख्य अडचण अशी आहे की तुमच्या मनात स्त्री राज्यात जावयाचे आहे, पण त्या देशात पुरुषाचे जाणे होत नाही. ते ऐकून पुरुष तेथे न जाण्याचे कारण गोरक्षाने तिला विचारिले. तेव्हा ती म्हणाली, मारुतीच्या भुभूःकाराच्या योगाने सर्व स्त्रिया गरोदर होतात, त्यात पुरुषाचा गर्भ मरतो व स्त्रियांचा जगतो. कोणी मोठा पुरुष का जाईना, तो तेथे मरावयाचाच ! ह्यास्तव तेथे तुमचा कसा निभाव लागेल, ह्याचा मला मोठा संशय आहे. तेव्हा गोरक्षनाथ म्हणाला, मारुती मला काय करणार आहे? त्याच्या भुभुःकारापासून मला काही एक इजा व्हावयाची नाही. तू हा संशय मनात अजिबात आणू नको, असे बोलून तो तेथून उठला. मग कलिंगा रथात बसल्यावर गोरक्षनाथ तिचा सारथी झाला. व त्याने घोड्याचे दोर हातात धरिले, प्रथमारंभी त्याने वज्रास्त्र, स्पर्शास्त्र, मोहनास्त्र व नागास्त्र यांची योजना केली. त्याने त्यास बिनहरकत स्त्रीराज्यात प्रवेश करता आला. पुढे अस्तमान झाल्यामुले ते चिन्नपट्टण गावी वस्तीस राहिले. तेथे भोजन झाल्यानंतर सर्वांनी शयन केले. नंतर सुमारे प्रहर रात्रीस अंधार नाहीसा होऊन स्वच्छ चांदणे पडले.

इकडे मारुती सेतुबंध रामेश्वराहून स्त्रीराज्यात जावयास निघाला तो सीमेवर येताच गोरक्षानाथाने भारून ठेविलेल्य चार अस्त्रातून प्रथम वज्रास्त्र येऊन उदरात बसले. एवढा वज्रशरीरी मारुती, पण त्या अस्त्राच्या झपाट्यासरसा मूर्छित होऊन धाडकन जमिनीवर पडला. तेव्हा स्पर्शास्त्राने त्यास जमिनीवर खिळवून टाकिले, तेणेकरून त्यास हलता चालता येईना. त्यानंतर मोहिनीअस्त्राचा अंमल बसला. शेवटी नागास्त्रामुळे प्रत्यक्ष शेष येऊन त्यास वेढा देऊन बसला. नागास्त्राच्या वेष्टणाने मारुती फारच विकल होऊन पडला. अशा चारी अस्त्राचा त्याजवर मारा झाल्याने त्याचे काही चालेनासे झाले तो काही वेळाने मरणोन्मुख झाला व आपण आता वाचत नाही असे त्यास वाटू लागले. तो वारंवार सावध होई व बेशुद्ध पडे, आता अंतकाळी श्रीरामाचे स्मरण करावे असा विचार करून त्याने श्रीरामचंद्राचे स्तवन केले. त्यामुळे श्रीराम तत्काळ धावून गेले व मारुतीची ती कठीण अवस्था पाहून त्यांना कळवळा आला. मग रामाने पाकशासन (इंद्र) अस्त्राच्या योगाने वज्रास्त्र काढून घेतले. विभक्तास्त्राच्या योगाने स्पर्शास्त्राचेहि निवारण केले व शेषास काढून घेऊन मोहिनीअस्त्राचेहि निवारण करून रामाने मारुतीस त्या संकटातून सोडविले.

मग मारुती सावध होऊन रामाच्या पाया पडला व हात जोडून म्हणाला की रामा ! अशी प्राण घेणारी ही प्रखर अस्त्रे आहेत. आज माझा प्राण गेलाच होता, पण तू धावत येऊन मला जीवदान दिलेस म्हणून वाचलो. प्रभो ! तुझे उपकार माझ्याने कदापि फिटावयाचे नाहीत. असे म्हणून मारुती रामाच्या पाया पडला. त्यास रामाने पोटाशी धरिले व असा तुला हात दाखविणारा शत्रु कोण आहे म्हणून विचारले. तेव्हा मारुती म्हणाला, सांप्रतकाळी माझ्याशी शिरजोरपणा दाखविणारा क्षत्रिय कोणी राहिलेला नाही, परंतु नाथपंथाचे लोक तूर्त प्रबळ झालेले आहेत. त्या नऊ नाथांपैकी कोणी येथे आला असावा. आजकाल ते अजिंक्य असून पृथ्वीवर निर्धास्तपणे संचार करीत आहेत. ते मारुतीचे भाषण ऐकून रामाने त्यास सांगितले की, नाथपंथाचे लोक हल्ली प्रबळ झाले असून ते अनिवार आहेत. परंतु ते माझे पूर्ण भक्त आहेत व माझी त्याजवर पूर्ण कृपा आहे, यास्तव तू आपल्या बळाचा अभिमान मिरवून त्यांच्या वाटेस जाऊ नको. असा मारुतीला बोध करून कोणत्या नाथाचे हे कृत्य म्हणून अंतर्दृष्टीने पाहिल्यानंतर हे गोरक्षनाथाचे असे रामाच्या ध्यानात आले. मग मारुतीला रामाने सांगितले की, हरिनारायणाचा अवतार जो गोरक्षनाथ तो आला आहे व हा प्रताप त्याचाच आहे.

मग मारुतीने रामाला सांगितले की, त्याने हे संधान करून स्त्री राज्यात संचार केला आहे, त्याच्या दर्शनास चलावे. त्याची भेट घेऊन मला त्याच्यापासून एक मोठे कार्य करून घ्यावयाचे आहे. हे ऐकून त्याच्याशी तुझे असे कोणते काम आहे म्हणून रामाने विचारले असता, मारुतीने मच्छिंद्रनाथाची मूळारंभापासून सर्व हकीगत सांगितली. नंतर तो म्हणाला, त्या मच्छिंद्रनाथास हा गोरक्ष आता घेऊन जाईल. यास्तव त्यास गोड गोड बोलून अनुकूल करून घ्यावे म्हणजे तो त्यास नेणार नाही. तेव्हा रामाने म्हटले की, चल, तुझे काम आहे ह्यास्तव मीही युक्तिप्रयुक्तीच्या दोन गोष्टी सांगेन व होईल तितकी खटपट करीन. असे बोलून दोघेजण निघाले.

ते मध्यरात्रीच्या सुमारास चिन्नापट्टणास जाऊन पोचले. त्या वेळी सर्वत्र सामसूम झाली होती. हे दोघे ब्राह्मणाचे रूप घेऊन गोरक्षनाथाजवळ गेले. त्या वेळेस तो निवांत ध्यान करीत बसला होता. त्यास नमस्कार करून हे दोघेजण त्याच्याजवळ बसले. मग आम्ही षडशास्त्री ब्राह्मण आहो, असे बोलून गोरक्षनाथाची पुष्कळ स्तुतु करू लागले. नंतर आमच्या मनात एक हेतु आहे, तो पूर्ण करावा. असे मारुतीचे भाषण ऐकून कोणते काम आहे ते कळवावे म्हणून गोरक्षनाथाने त्यास विचारले. त्या वेळी ते म्हणाले, मी कार्य करून देतो, असा प्रथम भरवसा देऊन वचन द्या, म्हणजे आमचा हेतु सागू. हे ऐकून गोरक्षनाथाने मनात आणिले की, हे मजपाशी काय मागणार आहेत? शिंगी, सारंगी, कुबडी, फावडी, शैली, भोपळा ही काय ती संपत्ति आमच्याजवळ आहे. ह्यावाचून आमच्यापाशी तर काही नाही. असे असता हे आमच्या जवळ काय मागणार नकळे ! असा विचार करीत असता दुसराहि एक विचार त्यांच्या मनात आला की, आता मध्यरात्र उलटून गेली असता या वेळी ह्या स्त्रीराज्यात पुरुष आले कसे? तर हे सहसा मनुष्य नसावे, कोणीतरी स्वर्गात राहणारे देव असावे. अशी त्यांच्याबद्दल अटकळ करून मग त्यांच्याकामाबद्दल विचार करून पाहू लागला, तो काहीच त्याच्या लक्षात येईना मग आपण ज्या कामासाठी आलो त्याखेरीजकडून त्यांचे म्हणणे कबूल करण्यास हरकत नाही, असा विचार करून तो त्यांना म्हणाला की, महाराज ! आपण विप्र म्हणता, पण येथे येण्याची त्यांची छाती नाही; तरी आपण कोण आहा हे मला प्रथम सांगा. असे बोलून त्याने लीनतेने त्यांच्या पायावर मस्तक ठेविले. तेव्हा ह्यास आता ओळख द्यावी असा रामाने विचार केला. त्यास मारुतीचाहि रुकार मिळाला. मग रामाने आपले स्वरूप प्रगट करून त्यास पोटाशी धरून मच्छिंद्रनाथास न नेण्याबद्दलचा मारुतीचा हेतु त्यास कळविला व मारुतीने मैनाकिनीला वचन दिले आहे म्हणून तू त्याला नेऊ नये, हा ह्याचा हेतु तू पूर्ण कर म्हणून कळविले. तेव्हा गोरक्षनाथ म्हणाला, आम्ही योगी ! आम्हास हे कर्म अनुचित होय; यास्तव हे वगळून दुसरे पाहिजे ते मागा मी देतो, पण या पुढे मच्छिंद्रनाथास येथे ठेवणार नाही हे खचित. आपण या बाबतीत मला अगदी भीड घालू नका म्हणून गोरक्षनाथाने धडकावून उत्तर दिले. तेव्हा मारुतीस राग येऊन तो युद्ध करण्यास तयार झाला. ते पाहून रामाने मारुतीचे सांत्वन करून त्या दोघामध्ये होणारा तंटा मिटवून गोरक्षनाथास पोटाशी धरिले. गोरक्षनाथ रामाच्या पाया पडला. नंतर श्रीराम आणि मारुती आपापल्या स्थानी गेले.


अध्याय २० संपादन


मैनाकिनीचे पूर्वचरित्र, गोरक्षनाथाचे तबलावादन व गुरु मच्छिंद्रनाथाची भेट


पुढे मारुतीने लहान रूप धारण केले व श्रृंगमुरुडास जाऊन गुप्त रूपाने राजवाड्यात प्रवेश केला. त्यावेळी राणी पद्मिणी (मैनाकिनी) आपल्या मंचकावर स्वस्थ निजली होती. तिच्या दासी वगैरे दुसरे कोणी जवळ नाही, असे पाहून मारुती तिच्या महालात जाऊन मंचकावर बसला. त्याने राणीचा हात धरिला, तेव्हा ती जागी झाली व मारुती तिच्या दृष्टीस पडला. त्यासरसे तिने त्याच्या पायांवर मस्तक ठेविले. असो.

त्या राणीला तिलोत्तमा, मैनाकिनी व पद्मिणी अशी तीन नावे होती ही तीन नावे पडण्याची कारणे अशी की, सिंहलद्वीपामध्ये पद्मिणी स्त्रियात ही मैनाकिनी स्त्री फारच सुंदर होती. तिच्यासारखी रूपवती दुसरी नव्हती. एके दिवशी ती सहज आकाशाकडे पाहात असता, त्यावेळी विमानात बसून जात असलेल्या वसूचे धोतर एके बाजूस होऊन विषयदंड विमानाच्या गवाक्षद्वारातून मैनाकिनीच्या पाहण्यात आला. तेव्हा तिला हसू आले हे पाहून तो तिला म्हणाला, माझ्याविषयी तुला प्रीति उत्पन्न झाल्यामुळे तुला हसू आले आहे. खरोखर तू व्यभिचार कर्म करणारी पापीण आहेस मी तसा भ्रष्ट नाही. सर्व वसूंमध्ये मी श्रेष्ठ व तपस्वी आहे. असे असता माझ्या अभिलाषाची इच्छा करून हसतेस तर आताच स्त्रीराज्यात तुझी वस्ती होईल. तेथे तुला पुरुष दिसावयाचा नाही. तो शाप ऐकताच ती त्याची स्तुति करून म्हणाली, महाराज ! चुकून अपराध घडला त्याचा परिणाम अशा प्रकारचा झाला. जे प्रारब्धी असेल ते बिनतक्रार भोगले पाहिजे हे खरे; परंतु आता इतके तरी करा की मला उःशाप देऊन आपल्या चरणाच्या ठिकाणी जागा द्यावी. ती प्रार्थना ऐकून वसूने उःशाप दिला की, हे पद्मिणी, तुला सांगतो ऐक. स्त्रीराज्यात हल्ली राज्यपदावर राणी तिलोत्तमा बसलेली आहे. ती मरण पावल्यावर तू त्या राज्यपदावर बसशील. आता माझ्या ठिकाणी तुझा हेतु गुंतला आहे तर माझा पुत्र मच्छिंद्रनाथ तुजशी रममाण होईल. त्याच्यापासुन तुला 'मीननाथ' या नावाचा एक पुत्र झाल्यावर मच्छिंद्रनाथ तुजपासून दूर जाईल मग तूहि स्वर्गाप्रत येऊन भोग भोगशील हे ऐकताच मैनाकिनीने त्यास विचारिले की, त्या ठिकाणी एकहि पुरुष नसून साऱ्याच स्त्रिया आहेत. मग त्यांना संतति तरी कशी होते? तेव्हा त्याने सांगितले की, वायूचा पुत्र मारुती ऊर्ध्वरेता आहे. त्याच्या भुभुःकाराच्या योगाने स्त्रियांना गर्भधारणा होते; पण पुरुषगर्भ मात्र गळून जातो व स्त्रीगर्भ वाढतो.

उपरिक्षवसूने ही माहिती मैनाकिनीला सांगितल्यानंतर, मच्छिंद्रनाथाची व माझी भेट कशी होईल म्हणून तिने त्यास विचारिले. शिवाय तिने अशी शंका विचारिली की, ज्या ठिकाणी पुरुष मरण पावतात तेथे मच्छिंद्रनथाचे येणे कोणत्या युक्तीने होईल, हे मला कळवावे. ते ऐकून तो म्हणाला, तू आता तप करून मारुतीची आराधना कर म्हणजे तो प्रसन्न होऊन तुझी चिंता दूर करील. पण तुला एक गोष्ट सांगून ठेवतो ती नीट लक्षात धरून ठेव. ती ही की, ज्या वेळेस मारुती प्रसन्न होऊन वर देण्यास तयार होईल त्या वेळेस तू त्याच्या प्रत्यक्ष अंगसंगाचे मागणे माग. तो संकटात पडून मच्छिंद्रनाथास घेऊन येईल. अशा बेताबेताने तुझा कार्यभाग साधून घे. त्या मारुतीविषयी तू कोणत्याहि प्रकारच्या शंका मनात आणू नकोस. तो तुझी मच्छिंद्रनाथाची निःसंशय गाठ घालून देईल. असा वर देऊन उपरिक्षवसू आपल्या स्थानाप्रत गेला.

त्यानंतर मैनाकिनीने स्त्रीराज्यातील शृंगमुरुड नामक शहरात प्रवेश केला. तेथे ती एका चांभाराच्या घरी गेली व ओटीवर बसली. तेव्हा घरधणीन तिची चौकशी करू लागली असता तिने आपली मूळकथा सांगितली. ती अशी की, मी सिंहलद्वीपी राहात असते, पण उपरिक्षवसूचा शाप झाला म्हणून या शहरात आले. आता माझा येथे कसा निभाव लागेल हे माझे मलाच कळत नाही. हे ऐकून चांभारणीने सांगितले की, तू मला कन्येप्रमाणे आहेस. येथे खुशाल राहा व आपल्या हाताने स्वयंपाक करून जेवीत जा. मग ती आनंदाने तेथे राहिली. ती दोघींचा स्वयंपाक करू लागल्यामुळे चांभारणीची चूल सुटली. ती तेथे राहून आनंदामध्ये आपली कालक्रमणा करी.

एके दिवशी तिलोत्तमा राणीने प्रधानादि दरबारातील स्त्रियांस सांगितले की, माझा वृद्धापकाळ झाल्यामुळे मी किती दिवस जगेन याचा नेम नाही; ह्यास्तव या स्त्रीराज्यपदावर कोणाची स्थापना करावी याचा विचार केला पाहिजे. तेव्हा मंत्रिमंडळाने सांगितले की, हत्तीच्या सोंडेत माळ देऊन त्यास नगरात पाठवावे. व तो जिच्या गळ्यात माळ घालील तिला राज्यपदावर बसवावे. ही युक्ति तिने आनंदाने मान्य केली. मग एका सुमुहूर्तावर हत्तीच्या सोंडेत माळ देऊन त्यास नगरात पाठविले. त्याने मैनाकिनीच्या गळ्यात माळ घातली. त्यावरून तिला राजवाड्यात मोठ्या थाटाने नेऊन सिंहासनावर बसविले. मैनाकिनीस राज्य प्राप्त झाल्यानंतर तिने मोठे तप केले. तिची निष्ठा पाहून मारुती प्रसन्न झाला वगैरे इतिहास मागे विदित केलाच आहे. ती सिंहलद्वीपामध्ये असता, तिच्या आईबापांनी आवडीने तिचे 'मैनाकिनी' असे नाव ठेविले होते. ती सिंहलद्वीपातील स्त्री पद्मिणी असल्याने लोक तिला त्याच नावाने हाक मारीत. तिला तिलोत्तमाचे राज्य मिळाल्यामुळे कोणी तिला तिलोत्तमा असेही म्हणत. अशी ही तिची तीन नावे प्रसिद्ध झाली; असो.

मारुतीने मैनाकिने राणीचा हात धरल्यानंतर तो म्हणाला की, मी वचनात गुंतल्याप्रमाणे मच्छिंद्रनाथ तुझ्या स्वाधीन केला, परंतु तो आता येथे फार दिवस राहणार नाही. का की, मच्छिंद्रनाथाचा शिष्य गोरक्षनाथ हा त्यास घेऊन जाण्यासाठी येथे येत आहे; तो सर्वांना अजिंक्य आहे, मी तुझ्यासाठी पुष्कळ उद्योग केला. श्रीरामानेहि सांगून पाहिले. परंतु आम्हा उभयतांचे त्याने ऐकिले नाही. गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथास नेल्याशिवाय राहणार नाही, म्हणून मारुती स्पष्ट बोलला. तसेच, मारुतीने मैनाकिनीस सांगितले की, गोरक्षनाथ आता येईल, त्यास हरयुक्तीने येथे रमीव. पण तो विषयासक्त नाही हे लक्षात ठेव आणि जसे होईल तसे करून त्यास तुझ्या छापेत आण इतके सांगून मारुती निघून गेल्यानंतर मैनाकिनी चिंतेत पडली.

इकडे गोरक्षनाथ कलिंगा वेश्येसमागमे शृंगमुरुडास जाऊन पोचला. ती सर्व मंडळी एका धर्मशाळेत उतरली होती. तेथून ती वेश्या आपला सारसरंजाम बरोबर घेऊन राजवाड्यात जावयास निघाली. तिच्या समागमे पाच सात जणी होत्या. तिने आपण आल्याची वर्दी देण्यासाठी द्वारपाळास सांगितले. त्यांनी तो निरोप राणीस कळविल्यावर तिच्या बरोबरीच्या मंडळीसुद्धा कचेरीत आणावयाचा राणीने हुकूम दिला. त्यावरून ती सभेमध्ये गेली. त्यावेळी मच्छिंद्रनाथ रत्‍नखचित सिंहासनावर बसला होता व शेजारी मैनाकिनी होती. त्यांच्या तैनातीस पुष्कळ स्त्रिया हजर होत्या कलिंगेने दरबारात आल्यावर पद्मिणी राणीस सांगितले की, आपली कीर्ति ऐकून मी या ठिकाणी आले आहे व आपले ऐश्वर्य पाहून समाधान पावले. तिने त्या वेळी पद्मिणीची फारच स्तुति केली. नंतर त्याच रात्रीस कलिंगेचा नाच करण्याचे राणीने नक्की ठरविल्यावर कलिंगा आपल्या बिर्‍हाडी गेली.

त्या समारंभाकरिता मैनाकिनीने सभामंडपात सर्व तयारी केली व कलिंगेला आणावयाला पाठविले. तेव्हा ती आपला साजसरंजाम घेऊन जाण्यास सिद्ध झाली. ते पाहून गोरक्षनाथहि तिजसमागमे जाण्यास निघाला जाण्यापूर्वी त्याने तिला एकांती बोलावून सांगितले की, मृदंग वाजवावयास मला दे; तो मी इतक्या कुशलतेने वाजवीन की, मच्छिंद्रासह राणीस खूशच करीन. त्या वेळी लागेल तितका पैसा तू त्यांच्याजवळून मागून घे. परंतु कलिंगा म्हणाली की, मी तुला बरोबर घेऊन गेले असते; परंतु तेथे सर्व स्त्रिया असून पुरुषाला जाण्याची मनाई आहे. तुला पाहून त्यांच्या मनात विकल्प येऊन अनेक संशय येतील. ते ऐकून गोरक्षनाथ म्हणाला मी स्त्रिच्या रूपाने येतो, यात दोन फायदे आहेत. गुरुची भेट मला व्हावी हे माझे कार्य होईल व तुलाहि पैसा पुष्कळ मिळेल. हे त्यांचे म्हणणे कलिंगेने कबूल केले. मग उत्तम तर्‍हेने लुगडे नेसून चोळी घालून, वेणीफणी करून व दागदागिने घालून त्याने हुबेहुब स्त्रीचा वेष घेतला. नंतर ती सर्व मंडळी थक्क झाली. उर्वशी सारख्या स्त्रियांनी दासी व्हावे, असे ते अप्रतिम रूप होते. ते पाहून राणी वगैरे मंडळींनी तिची अत्यंत वाखाणणी केली. कलिंगा मुख्य नायकीण, पण तिचेहि गोरक्षाच्या स्त्रीरूपापुढे तेज पडेनासे झाले. त्याने ताल, सूर बरोबर जमवून मृदंगावर थाप दिली. नंतर नाच सूरू झाला. त्या वेळचे कलिंगेचे गाणे ऐकून सर्वांस अत्यानंद झाला.

गोरक्षनाथाने मच्छिंद्रनाथास पाहताच मनात नमस्कार केला व इतके दिवसांनी दर्शन झाल्याने आपण कृतार्थ झालो असे त्यास वाटले. तेथील नृत्यगायनाचा समारंभ फारच अपूर्व झाला व खुद्द मच्छिंद्रनाथाने मान डोलावून शाबासकी दिली. परंतु त्यानंतर गोरक्षनाथ मृदंग वाजवीत असता, मधून मधून 'चलो मच्छिंदर गोरख आया' असा ध्वनि वारंवार उठवी. तो ऐकून मच्छिंद्रनाथास दचका बसे व गोरक्ष कसा आला ह्या विचारात तो पडे. त्या आवाजाने त्याची मुखश्री उतरून गेली व गाण्यावरून त्याचे मन उडाले. तेव्हा असे होण्याचे कारण पद्मिणीने विचारिले. त्यावरून त्याने तिला गोरक्ष नाथाचा सर्व प्रकार मुळापासून कळविला.

मारुतीने पद्मिणीस गोरक्ष आल्याविषयी सांगितलेली खूण पटताच तीहि खरकन उतरून गेली. तेणेकरून त्या गाण्याच्या आनंदरंगाचा भंग झाला. तरी मैनाकिनी तशीच लक्ष देऊन ऐकत होती. काही वेळाने तिच्याहि श्रवणी तसाच आवाज पडला, मग तिने कलावंतीणीस सांगितले की, आमच्या संग्रही मृदंग आहे तो वाजवून पाहा. त्यावरून तिने तो वाजविला असताहि तोच आवाज निघू लागला. राणीने आपली कलावंतीण वाजवावयास पाठविली. पण तिला 'चलो मच्छिंदर गोरख आया' हे शब्द काढता येईनात; तेव्हा त्या स्त्रीवेषधाऱ्याला (गोरक्षाला) मैनाकिनीने एकीकडे नेऊन खरा प्रकार सांगण्याविषयी प्रार्थना करून गुरूची शपथ घातली. तेव्हा प्रगट होण्याचा हाच योग्य समय आहे असा विचार करून तो तिला म्हणाला की, मी खरोखर स्त्री नव्हे, मच्छिंद्रनाथाचा प्रिय शिष्य गोरक्षनाथ आहे. तुझ्या राज्याच्या व्यवस्थेमुळे मी स्त्रीवेष घेतला आहे. ते ऐकून मैनाकिनी त्याच्या पाया पडली. मग रत्‍नखचित अलंकार व पुरुषांची ऊंची वस्त्रे आणून गोरक्षनाथास दिली. तेव्हा त्याने स्त्रीवेष टाकून पुरुष वेश घेतल्यानंतर ती त्याचा हात धरून त्यास सभेमध्ये मच्छिंद्रनाथाकडे घेऊन गेली. तेथे तिने मच्छिंद्रनाथास खूणेने इषारा केला व सांगितले, तुमच्या भेटीची इच्छा धरून गोरक्षनाथ येथे आला आहे. प्रारब्ध उदयास आले म्हणून आज हा येथे दृष्टीस पडत आहे ! ह्याच्या योगाने संपूर्ण राष्ट्रास मोठे भूषण आहे. आता माझी सर्व काळजी दूर झाली. राज्याची जोखमदारी आपल्या अंगावर घेऊन हा मुलगा नीट राज्यकारभार चालवील. हा आता आपला धाकटा भाऊ मीननाथ याचेहि उत्तम संगोपन करील.

अशा प्रकारे मैनाकिनीने त्यास मोहून टाकण्याचा उत्तम घाट घातला. परंतु तो तिचा बेत पाहून गोरक्षनाथास हसू आले. तो तिला म्हणाला, आम्ही शुद्ध वैष्णव लोक; आम्हास हे भूषण काय कामाचे? विधवेला कुंकवाची उठाठेव कशाला पाहिजे? असे जरी त्याने बाह्यतः म्हटले तरी मच्छिंद्रनाथ त्याच्या स्वाधीन होईपर्यंत पद्मिणी जसे वागवील तसे वागण्याचा त्याने बेत केला, नंतर मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथाच्या गळ्यास मिठी मारली व कलिंग नायकिणीस बहुत द्रव्य देऊन निरोप दिला.

नंतर गुरूने शिष्यास नवल वर्तमान विचारले. तेव्हा त्याने आपली संपूर्ण हकीकत त्यास कळविली व आता तुम्हास सोडून मी कदापि एकटा राहावयाचा नाही, म्हणून सांगितले. त्या वेळेस मच्छिंद्रनाथानेहि त्याची परोपरीने समजूत करून म्हटले की, तुझ्याविषयी मी निरंतर विचार करीत आहे, पण काय करू? न घडावे त घडून आले. मला मारुतीने गोवून येथे आणून घातले. पण तुझ्यावाचून मला येथे चैन पडत नाही. अशी बहुत प्रकारांनी त्याची तो समजूत करू लागला. तेव्हा गोरक्षनाथ म्हणाला की, तुमचे शिष्य अनेक आहेत. तुम्ही जाल तेथे दुसरेही पुष्कळ शिष्य कराल, त्या योगाने तुमची माया सर्वाठायी वाटली जाईल, पण मला तर तुम्ही एकटे गुरु आहात,म्हणून माझा सर्वस्वी लोभ तुमच्यावर. जशी माशांना उदकावाचून गति नाही, तद्वत माझा सर्व आधार कायय तो तुम्हीच ! असे भाषण करीत असता गोरक्षनाथाच्या नेत्रावाटे आसवे गळत होती. मग मच्छिंद्रनाथाने त्यास पुष्कळ बोध करून त्याचे समाधान केले. त्या वेळी त्यांची प्रेमाची बरीच भाषणे झाली. नंतर उभयतांनी एके ठिकाणी भोजन केले व एकाच ठिकाणी निद्रा केली. दुसरे दिवशी सकाळी नित्यकर्म झाल्यावर एका मांडीवर गोरक्ष व दुसऱ्या मांडीवर मीननाथ यांना घेऊन मच्छिंद्रनाथ रत्नखचित सिंहासनावर बसून गोष्टी सांगू लागले.


अध्याय २१ संपादन


गोरक्षनाथास मोहविण्याचे मैनाकिनीचे सर्व प्रयत्‍न निष्फळ


मच्छिंद्रनाथानें गोरक्षास तेथें राहवून घेतल्यावर त्याचें मन रमून त्यानें तेथें राहावें म्हणून मैनाकिनीनें अनेक प्रयत्‍न केले. ती तर आपल्या पुत्राहून त्याच्यावर विशेष प्रेम ठेवूं लागली. तिनें त्याच्या खाण्यापिण्याची, निजण्याबसण्याची वेळच्या वेळेस योग्य तरतूद ठेविली व त्यास कपडालत्ता व दागदागिना हवा तसा उंची वापरावयास देऊं लागली. गोरक्षनाथास अशीं सर्व सुखें मिळत असतांहि त्यास तें गोड लागेना. तो नित्य मच्छिंद्रनाथास म्हणे कीं, तिन्ही लोकांत आपण मान्य, अशीं आपली योग्यता असतां ह्या विषयसुखाच्या खाडयांत कां पडत आहां ? तशांत तुम्ही मूळचे कोण आहां, आतां कार्य कोणतें करीत आहां व अवतार घेऊन कोणतें कर्म करावयाचें आहे ह्याचा थोडासा विचार केला पाहिजे; यास्तव सर्वसंगपरित्याग करून ह्या काळजींतून मोकळें व्हावें.

अशा प्रकारें गोरक्षानें मच्छिंद्रनाथ गुरुस बरेच वेळां सांगितलें तेणेंकरुन त्यास विरक्तता उत्पन्न झाली. मग मायापाशांत गुंतून न राहतां आपल्या मुलुखास जाण्याबद्दल त्यानें गोरक्षास वचन दिलें; तेव्हां त्यास आनंद झाला. पुढें गोरक्षासमागमें गेल्यावांचून आतां मला सुटका नाहीं, असा आपला विचार मच्छिंद्रनाथानें तिलोत्तमेस कळविला पण तुला सोडून जाण्यास हिंमत होत नाहीं, असेंहि सुचविलें. तेव्हां ती म्हणाली, तुम्ही जर गेला नाहीं तर तो तुम्हांस कसा नेईल ? तें ऐकून, आपण त्यास दिलेलें वचन आणि गोरक्षाबरोबर झालेलें भाषण त्यानें तिला कळविलें आणि म्हटलें, त्याच्याबरोबर गेल्यावांचून सुटका नाहीं व तुझा मोहपाश मला जाऊं देत नाहीं, अशा दुहेई संकटांत मी सांपडलों आहें, आतां ह्यास एकच उपाय दिसतो. तो हा कीं, तूं त्यास आपल्या कुशलतेनें मोहवून टाक. हें ऐकून ती म्हणाली, मीं पूर्वीच उपाय करून पाहिले. त्यांत कोणतीहि कसर ठेविली नाही, परंतु व्यर्थ ! माझ्या बोधानें व करामतीनें कांहीं एक निष्पन्न झाले नाहीं. असें तिचें निराशेचें भाषण ऐकूनहि आणखी एकदां प्रयत्‍न करून पाहावयासाठीं मच्छिंद्रनाथानें तिला सुचविलें.

एके दिवशीं गोरक्षनाथानें पद्मिनीपाशीं गोष्ट काढिली कीं, आज मी मच्छिंद्रनाथास घेऊन तीर्थयात्रेस जातों. तेव्हां तिनें त्यास बोध केला कीं, बाळा, मी तुला माझा वडील मुलगा म्हणून समजतें. भावाचें तुला पाठबळ आहेच, आतां आम्ही अन्नवस्त्र घेऊन स्वस्थ बसून राहणार. गोरक्षनाथाला दया यावी म्हणून ती दीन मुद्रेनें असें बोलत असतांहि त्याच्या मनांत दया उत्पन्न झाली नाहीं. उलट तिला त्यानें त्यावेळीं स्पष्ट सांगितलें कीं, आम्हांस त्रैलोक्याच्या राज्याची देखील पर्वा नाहीं; मग तुझ्या या स्त्रीगज्याच्या राज्याची देखील पर्वा नाहीं; मग तुझ्या या स्त्रीगज्याचा हिशेब काय ? तें तुझें खुशाल भोग. आम्ही योगी. आम्हांस या भूषणामध्यें मोठेसें महत्त्व वाटत नाहीं; यास्तव आम्ही तीर्थाटनास जातों. तेथें सुकृतक्रिया आचरण करून सुखसंपत्ति भोगूं. असें म्हणून तिच्यापाशीं जाण्याकरितां आज्ञा मागूं लागला. तिनें त्यास पुष्कळ समजावून सांगितलें, परंतु तो ऐकेना. सरतेशेवटीं एक वर्षभर तरी, राहावें म्हणून तिनें अतिशय आग्रह केला असतां तो तिला म्हणाला, मला येथें येऊन सहा महिने झाले, यास्तव आतां मी येथें जास्त रहाणार नाहीं. तेव्हां पद्मिणी आणखी सहा महिने राहाण्यासाठीं आग्रह करुं लागली व आतां थोडयासाठीं उतावळी करुं नकोस; मग मी मोठया आनंदानें मच्छिंद्रनाथास तीर्थयात्रा करावयाची आज्ञा देईन, अशा प्रकारच्या भाषणानें ती त्याची पायधरणी करुं लागली. तिनें इतकी गळ घातल्यामुळें त्याच्यानें तिचें म्हणणे अमान्य करवेना. त्यानें तिला सांगितलें कीं, तुझ्या म्हणण्याप्रमाणें मी आणखी सहा महिने तुझ्याकरितां राहातो. पण त्या मुदतीनंतर तरी आम्हांस जाण्याची तूं कधीं परवानगी देणार तो दिवस आज नक्की मला कळव, म्हणजे ठीक पडेल. मग चैत्र शुद्ध प्रतिपदेस भोजन झाल्यानंतर मी राजीखुषीनें तुमची रवानगी करून देईन, म्हणून तिनें गोरक्षनाथास कबूल केलें. ते सहा महिने हां हां म्हणतां निघून जातील असें मनांत आणून तो तेथें स्वस्थ राहिला.

या गोष्टी कांहीं दिवस लोटल्यानंतर एके दिवशीं मैनाकिनीनें गोरक्षनाथास हांक मारुन जवळ बसविलें. तोंडावरुन हात फिरविला आणि म्हटलें, बाळा, माझ्या मनांत तुझें एकदांचें लग्न करून द्यावें असें आहे ! मग त्या माझ्या सुनेबरोबर हंसून खेळून माझी कालक्रमणा तरी होईल. जी फारच स्वरुपवता स्त्री असेल तिच्याशीं मी तुझा विवाह करीन. लग्नसमारंभहि तुझ्या खुशीप्रमाणें मोठया डामडौलानें करीन. तुम्ही तीर्थयात्रा करून लौकरच परत या. फार दिवस राहूं नका. येथें आल्यावर सर्व राज्यकारभार तूं आपल्या ताब्यांत घे, बाळा, इतकी तूं माझी हौस पुरवलीस म्हणजे झालें. असें बोलून त्यानें मोहजालांत गुंतावें म्हणून ती पुष्कळ प्रकरच्या युक्‍त्या योजून पाहात होती, परंतु तिच्या भाषणांपासून बिलकुल फायदा झाला नाहीं. त्यानें तिला निक्षून सांगितलें कीं, मला कर्णमुद्रिका या दोन बायका आहेत, आणखी तिसरी करण्याची माझी इच्छा नाहीं व आतां लग्न करणें मला शोभतहि नाही. असा जेव्हां त्यानें तिला खडखडीत जबाब दिला, तेव्हां ती निराश होऊन स्वस्थ बसून राहिली.

नंतर एके दिवशीं गोरखनाथास मोहविण्यासाठीं पद्मिणीनें एक सुंदर स्त्री खेळण्याच्या मिषानें रात्रीस त्याच्याकडे पाठविली. तिनें सोंगटयाचा पट बरोबर घेतला होता. ती गोरक्षनाथाच्या खोलींत जाऊन त्यास म्हणाली, तुमच्या समागमें आज दोन सोंगटयाचे डाव खेळावे असें माझ्या मनांत आलें आहे. हें ऐकून तोहि तिचा हेतु पुरविण्यास्तव तिजबरोबर खेळावयास बसला. त्या वेळीं तिनें नेत्रकटाक्षांनीं पुष्कळ बाण मारुन त्यास विंधून टाकण्याविषयीं प्रयत्‍न केले. पण तो तिच्या नेत्रकटाक्षांस, तिच्या भाषणास व हावभावांस कांहीं एक जुमानीना. शेवटीं तिनें आपल्या मांडया उघडया ठेवून गुह्यभागहि त्याच्या नजरेस पाडला. इतक्या निर्लज्जपणानें ती त्याशीं वागत असतांहि त्याच्या मनांत मुळींच कामवासना उत्पन्न होईना; असें पाहून ती अखेरीस खिन्न झाली व राणीस सर्व वृत्तांत सांगून विन्मुख होऊन परत घरीं गेली. सारांश, मैनाकिनीनें गोरखनाथास राहविण्याकरितां केलेले सर्व प्रयत्‍न फुकट गेले.

पुढें पुढें, मच्छिंद्रनाथाचा वियोग होणार म्हणून मैनाकिनी मीननाथास पोटाशीं धरुन रडत बसूं लागली. त्या वेळीं दुसऱ्या स्त्रिया तिची वारंवार समजूत करीत व गोरक्षनाथास आपण वश करुं असा तिला धीर देत; तरी त्यांच्या बोलण्यावर तिचा विश्वास बसेना. अशा रीतीनें ती चिंतेमध्यें दिवस काढीत असतां, पूर्वी ठरलेला वर्षप्रतिपदेचा दिवस येऊन ठेपला. त्या दिवशीं जिकडे तिकडे लोक आनंदांत मौजा मारण्यांत गुंतावयाचे; परंतु त्या दिवशीं सर्व नगरी हळहळूं लागली.

इकडे गोरक्षनाथ शिंगी, फावडी इत्यादि घेऊन मच्छिंद्रनाथास बोलावूं आला. तो त्याच्या पायां पडून निघण्यासाठीं उतावळी करुं लागला. तेव्हां तर मैनाकिनी मोठमोठयानें रडूं लागली. तिनें म्हटलें कीं बाळा, तुम्ही दोघेहि जेवून जा; उपाशीं जाऊं नका. मग स्वयंपाक झाल्यावर गुरुशिष्यांनीं एके पंक्तीस भोजन केलें.

नंतर तिलोत्तमा राणीनें मच्छिंद्रनाथाजवळ गोष्ट काढिली कीं, तुम्ही तर आतां जावयास निघालांत तरी मीननाथास घेऊन जाण्याचा विचार आहे कीं नाहीं, हें मला सांगावें. हें ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणाले कीं, त्याच्याविषयीं जसें तुझ्या विचारास येईल तसें आम्ही करुं. त्याच्याबद्दल तुझें मन आम्ही दुखविणार नाहीं, तेव्हां ती म्हणाली, तुम्हीं मीननाथास आपल्या समागमें घेऊन जावें. आजपर्यंत तुम्ही येथें होतां म्हणून मारुतीच्या भुभुःकारापासून त्याचे संरक्षण झालें. तुम्ही गेल्यानंतर त्याचे येथें रक्षण करणारा कोणी नाहीं. दुसरीहि ह्यांत एक अशी गोष्ट आहे कीं, मला उपरिक्षवसूचा (तुमच्या पित्याचा) शाप आहे. त्याच्या शापास्तव मीं सिंहलद्वीप सोडून येथें आले आहे. शापाचि मुदतहि भरत आली आहे; यास्तव तुम्ही जातांच उःशापाचें फळ मला प्राप्त होईल व तो येऊन मला येथून घेऊन जाईल; मग मीननाथाचें येथें संरक्षण कोण करील ? जर त्यास स्वर्गास घेऊन जावे तर मनुष्यदेह तेथें जात नाहीं, अशा या सर्व अडचणीं लक्षांत आणून माझें मत असें आहे कीं, मीननाथास तुम्ही आपल्याबरोबर घेऊन जावें. मग तिच्या मर्जीनुरुप मीननाथास घेऊन जाण्याचा विचार ठरला.

मग भोजन झाल्यानंतर गोरक्षनाथानें निघण्याची घाई मांडिली. मीननाथाकडे पाहून तिलोत्तमेच्या मुखांतून शब्द निघेनासा झाला. तिला गहिंवर येऊन ती एकसारखी रडत होती. तेव्हां तेथील स्त्रियांनीं गोरक्षनाथास वेढून टाकिलें. त्यानें जाऊं नये म्हणून त्या राजवैभवाचें वर्णन करुं लागल्या. निरनिराळ्या दागदागिन्यांचा व कपडयालत्त्यांचा त्याचेपुढें ढीग करून रत्‍नखचित अलंकार व भरजरीचे शेलेदुपेटे त्यांनीं त्याचेपुढें आणून ठेविले. तसेंच, आम्ही अवघ्या जणी तुझ्या बटीक होऊं, तुझ्या मर्जीप्रमाणें नटून श्रृंगारुन तुला यथेच्छ रतिसुख देऊं, असा पुष्कळ प्रकारांनीं त्यांनीं त्याला मोहविण्याचा प्रयत्‍न केला; पण गोरक्षनाथ त्या सर्वांचा धिःकार करून म्हणाला, आम्हांला सुखसंपत्तीशीं काय करावयाचें आहे ? जमिनीचें आथंरुण आम्हांस फार सुखदायक होतें. अशा प्रकारें बोलून तो लागलाच निघाला. जातांना त्यानें मैनाकिनीस नमस्कार केला, मीननाथास खांद्यावर घेतलें व मच्छिंद्रनाथास बरोबर घेऊन तो गांवाबाहेर गेलां.

ते निघण्यापूर्वी गोरक्षनाथाच्या नकळत आपल्या भांडारातील सोन्याची एक वीट मैनाकिनीनें मच्छिंद्रनाथास दिली होती; ती त्यानें त्यास न कळूं देतां झोळींत ठेविली. वेशीपर्यंत मंडळी त्यांस पोंचवावयास गेली होती तेथें मैनाकिनी मच्छिंद्रनाथाच्या पायां पडली. तिनें गोरक्षनाथास पोटाशीं धरिलें व त्यास नाथाची बरदास्त ठेवून त्याच्या जिवास जपण्याविषयीं पुष्कळ सांगितलें, तरी पण तिचा मायामोह सुटेना. तिनें गोरक्षनाथाच्या गळ्यास मिठी घातली आणि मोठमोठयानें रडूं लागली. मग त्या प्रसंगांतून निसटून गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथाचा हात धरुन सपाटयानें चालूं लागला.

इकडे तिलोत्तमा (मैनाकिनी) ऊर बडवून व डोकें आपटून घेऊं लागली व गायीसारखा हंबरडा फोडून शोक करुं लागली. तो शोक उपरिक्षवसूनें आकाशांतून ऐकतांच विमान घेऊन तो तिच्याजवळ आला व तिला तिच्या घरीं घेऊन गेला. तो म्हणाला, तुला वेड तर लागलें नाहीं ना ? तूं हें मांडिलें आहेस काय ? तूं स्वर्गांतील राहणारी असून शाप मिळाल्यामुळें येथें आलीस. आतां शापमोचन होऊन तूं सुखी होणार ! असें बोलून त्यानें तिच्या अंगावर हात फिरवून तिला पोटाशीं धरिलें व तिचे डोळे पुसून तिला घरीं नेल्यानंतर युक्तिप्रयुक्तीनें बोध केला.


अध्याय २२ संपादन


मच्छिंद्रनाथ व राणी मैनाकिनीची भेट; गोरक्षनाथाची संशयनिवृत्ति


गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथास घेऊन गेल्यानंतर तिलोत्तमा (मैनाकिनी) शोकसागरांत बुडून गेली असतां तेथें उपरिक्षवसु प्राप्त झाला. त्यानें तिला घरीं नेऊन बोध केला आणि तिचा भ्रम उडविला. त्या समयीं तो म्हणाला, या जगांत जें सर्व दिसतें तें अशाश्वत व नाशिवंत आहे. म्हणून शोक करण्याचे काहीं एक कारण नाहीं. तूं जेथून पदच्युत झाली होतीस, त्या स्वर्गांतील सिंहलद्वीपीं आता चल. बारा वर्षानंतर मी तुला मच्छिंद्रनाथास भेटवीन. गोरक्षनाथ व मीननाथ हेहि समागमें राहतील.आतां हा योग कोणत्या कारणानें घडून येईल म्हणून तुला संशय असेल, तर सांगतो ऐक. सिंहलद्वीपास इंद्र एक मोठा यज्ञ करील. त्या वेळेस तेथें विष्णु , ब्रह्मदेव, शंकर आदिकरुन श्रेष्ठ देवगण येतील, नवनाथहि येतील. ह्यास्तव आतां शोकाचा त्याग करून विमानारुढ होऊन सिंहलद्वीपांत चल. तेव्हां ती म्हणाली. इंद्र यज्ञ करो अगर न करो; पण मच्छिंद्रनाथाची भेट करविण्याचें आपण मला वचन द्यावे, म्हणजे माझा जीव स्वस्थ होईल. तें ऐकून त्यानें मच्छिंद्रनाथाची भेट करवून देण्याबद्दल वचन दिलें. मग त्याच्या आज्ञेनें मैनाकिनी दैर्भामा नांवाच्या आपल्या दासीस राज्यावर बसवून आपण स्वर्गी जावयास निघाली. मैनाकिनीच्या जाण्याचे सर्व स्त्रियांना परम दुःख झालें. तरी जातांना तिनें सर्वांची समजूत केली व दैर्भामेस, नीतीनें राज्य चालवून सर्वांना सुख देण्यासाठीं चांगला उपदेश केला. नंतर मैनाकिनीस विमानांत बसवून सिंहलद्वीपास पोंचविल्यावर उपरिक्षवसु आपल्या स्थानीं गेला. अशा रीतीनें मैनाकिनी शापापासून मुक्त झाली.

इकडे मच्छिंद्रनाथ फिरत फिरत गौडबंगाल्यांत आले. येतांना वाटेंत कानिफनाथाची गांठ पडली.तेव्हां आपल्या गुरुचा शोध ह्या कानिफानें पक्क्या खाणाखुणा सांगितल्यामुळें लागला, असें मनांत आणून गोरक्ष मीननाथास खांद्यावरुन खालीं उतरवून कानिफनाथाच्या पायां पडला. भेटतांना डोळ्यांतून अश्रू वाहूं लागले. मग मच्छिंद्रनाथानें त्यास रडतोस कां, म्हणून विचारल्यावर गोरक्षनाथानें बदरिकेदार सोडल्यापासून तो पूर्वी कानिफाची भेट झाली होती त्या वेळेपर्यंतचा सर्व मजकूर निवेदन केला. मग मच्छिंद्रनाथ गोरक्षाचें समाधान करून पुढें मार्गस्थ झाले. जाण्यापूर्वी जालंदरनाथास राजा गोपीचंदानें खांचेंत पुरल्याबद्दलचा सविस्तर मजकूर गोरक्षनाथानें मच्छिंद्रनाथास कळविला.

जालंदरनाथास घोडयाच्या लिदींत पुरल्याची हकीगत ऐकतांच मच्छिंद्रनाथास अनिवार क्रोध येऊन तो गोपीचंदाच्या नाशास प्रवृत्त झाला. नंतर ते फिरत फिरत गोपीचंदाच्या राजधानीचे नगर हेळापट्टण येथें येऊन पोंचले. तेव्हां कित्येक ग्रामस्थ मंडळी त्यांस भेटली. त्यांच्यापाशीं शोध करितांना कानिफानें जालंदरास वर काढिल्याची, गोपीचंदास अमर करविल्याची व मुक्तचंदास राज्यावर वसविल्याची सविस्तर बातमी त्यांनीं सांगितली. ती ऐकून मच्छिंद्रनाथाचा कोप शांत झाला. मग हल्लीं येथील राज्यकारभार कोणाच्या अनुसंधानानें चालत आहे म्हणून ग्रामस्थांना विचारल्यावर, मैनावतीच्या मार्फत तो चालतो, असें सांगून लोकांनीं तिची स्तुति केली.

मग तिची भेट घेण्याचा उद्देशानें गोरक्षनाथ व मीननाथ यांस घेऊन मच्छिंद्रनाथ राजवाडयांत गेले. तेथें आपलें नांव सांगून आपली राणीला भेटण्याची मर्जी आहे, ह्यास्तव आपण आल्याची वर्दी देण्यासाठीं दारावरील पहारेकऱ्यास पाठविलें. त्या द्वारपाळानें जलद जाऊन कोणी योगी दोन शिष्यांस घेऊन आला आहे असें मैनावतीस सांगितलें. त्याच्या स्वरुपाचें व लक्षणांचे वर्णन करून हुबेहुब जालंदरनाथाप्रमाणें तो दिसत आहे असेंहि कळविलें. मग प्रधानादिकरुन मंडळी समागमें घेऊन मैनावती त्यांस सन्मानानें मंदिरांत घेऊन गेली व त्यांस सुवर्णाच्या चौरंगावर बसवून त्यांची तिनें षोडशोपचारांनीं पूजा केली. नंतर आपलें चरण आज घरीं लागल्यानें मी कृतार्थ झालें, वगैरे बोलून तिनें मच्छिंद्रनाथाची पुष्कळ स्तुति केली व आदरपूर्वक विचारपूस करुं लागली. त्या समयीं मच्छिंद्रनाथ आपली मूळ कथा सांगू लागले :---

मी उपरिक्षवसूचा मुलगा, मला मच्छिंद्रनाथ असें म्हणतात. सर्व समर्थ दत्तात्रेयानें मला अनुग्रह दिला; त्यांनींच जालंदरनाथास उपदेश केला.तो जालंदरनाथ माझा धाकटा गुरुबंधु होय. त्याची येथें दुर्व्यव्यवस्था झाली असें ऐकण्यांत आल्यावरुन मी येथें क्रोधानें येत होतों, परंतु येथें झालेला सर्व प्रकार इकडे आल्यावर ग्रामस्थांकडून मला कळला. ह्यावरुन तुझ्या उत्तम गुणाबद्दल मी जितकी तारीफ करीन तितकी थोडीच होय. तूं जन्मास आल्याचें सार्थक करून घेऊन त्रिलोक्यांत सत्कीर्तीचा झेंडा लावून घेतलास. बेचाळीस कुळें उद्धरिलीस. धन्य आहेस तूं ! असें नाथानें बहुत प्रकारें तिचें वर्णन केल्यानंतर मैनावती त्याच्या पायां पडली आणि म्हणाली, महाराज ! हा सर्व आपल्या कृपेचा प्रताप होय. बरें किंवा वाईट जसें इच्छावें तसें कल्पतरु फळ देतो; परीस लोखंडाचे सुवर्ण करितो; पण त्या दोहोंपेक्षांहि तुमचें औदार्य अनुपम होय. अशा रीतीनें मैनावतीनें त्याची स्तुति केली आणि पायांवर मस्तक ठेविलें. मग मोठया सन्मानानें त्यांचें भोजन झालें. मच्छिंद्रनाथ तेथें तीन दिवस राहून तेथून निघाले. पुष्कळ मंडळी त्यांस पोंचवावयास गेली होती.

हेळापट्टणाहून निघाल्यानंतर गोरक्षनाथ व मीननाथ यांसह मच्छिंद्रनाथ फिरत फिरत जगन्नाथक्षेत्रास गेले. तेथें तीन रात्रीं राहून तेथून पुढें निघाले. ते फिरत फिरत सौराष्ट्रगांवीं मुक्कामास राहिले. तेथें दुसरे दिवशीं सकाळीं गोरक्षनाथ भिक्षेकरितां गांवांत गेला. त्या वेळी मीननाथें निजला होता. तो उठल्यावर मच्छिंद्रनाथानें त्यास शौचास बसविलें. इतक्यांत गोरक्षनाथ भिक्षा मागून आला. तो येतांच त्यास मीननाथास ’धुऊन’ आणावयास सांगितलें. मीननाथ लहान वयाचा असल्यामुळें त्याचे हातपाय मळानें भरुन गेलेले पाहून गोरक्षनाथास घाण वाटली. तो मनांत म्हणाला, आपणां संन्याशास हा खटाटोप कशाला हवा होता ? अशा प्रकारचे बहुत तरंग मनांत आणून मच्छिंद्रनाथाच्या स्त्रीराज्यांतल्या कृत्यास त्यानें बराच दोष दिला.

त्या रागाच्या आवेशांत गोरक्षनाथ मीननाथास घेऊन नदीवर गेला व तेथें एका खडकावर त्यास आपटून त्याचा प्राण घेतला. नंतर त्याचें प्रेत पाण्यांत नेऊन हाडें, मांस हीं मगरी, मासे यांना खावयास टाकून दिलीं. कातडें मात्र स्वच्छ धुवून घरीं नेऊन सुकत घातलें. त्या वेळीं मच्छिंद्रनाथ आश्रमांत नव्हता. तो परत आल्यावर मीननाथ कोठें आहे म्हणून त्यानें विचारिलें. तेव्हां त्यास धुवून सुकत घातला आहे, असें गोरक्षनाथानें त्यास सांगितलें; पण ह्यांत त्याची बरोबर समजूत पटेना. तो पुनः पुनः मीननाथ कोठें आहे, मला दिसत नाहीं असें म्हणे. मग बाहेर नेऊन वाळत घातलेलें मीननाथाचें कातडें गोरक्षनाथानें दाखविलें. तेव्हां मुलाची ती अवस्था पाहून मच्छिंद्रनाथानें धाडकन्‌ जमिनीवर अंग टाकिलें. तो गडबडां लोळून परोपरीनें विलाप करुं लागला; कपाळ फोडून घेऊं लागला. तसेंच एकीकडे रडत असतां त्याच्या एक एक गुणांचें वर्णन करी.

मीननाथासाठीं मच्छिंद्रनाथ शोक करीत आहे, असें पाहून गोरक्षनाथ गुरुजवळ जाऊन म्हणाला, गुरुराज’ तुम्ही असें अज्ञानांत का शिरतां ? तुम्ही कोण, मुलगा कोणाचा आणि असें रडतां हें काय ? विचार करून पाहतां मेला आहे कोण ? नाशिवंतचा नाश झाला, शाश्वतास मरण नाहीं. तुमचा मीननाथ कदापि मरावयाचा नाहीं. शस्त्रानें, अग्निनें, वाऱ्यानें, पाण्यानें किंवा कोणत्याहि प्रकारानें त्याचा नाश व्हावयाचा नाहीं. कारण तो शाश्वत आहे.अशा प्रकारें बोलून गोरक्षनाथ त्याचें सांत्वन करुं लागला. परंतु ममतेमुळें मच्छिंद्रनाथास रडें आवरेना व विवेकहि आवरेना. मग गोरक्षनाथानें संजीवनी मंत्राचा प्रयोग सिद्ध करून भस्माची चिमटी मीननाथाच्या कातडयावर टाकताच तो उठून उभा राहिला. त्यानें उठतांच मच्छिंद्रनाथाच्या गळ्यांत मिठी मारली. त्यानें त्यास पोटाशीं धरिलें. त्याचे मुके घेतले व त्याच्याशीं लडिवाळपणानें बोलूं लागला. मग आनंदानें ते त्या दिवशीं तेथेंच राहिले.

दुसरे दिवशीं ते पुनः मार्गस्थ झाल्यावर गोरक्षनाथानें मच्छिंद्रनाथाजवळ गोष्ट काढिली कीं, तुमची शक्ती अशी आहे कीं, निर्जीवास सजीव करून सहस्त्रावधि मीननाथ एका क्षणांत तुम्ही निर्माण कराल. असें असतां रुदन करण्याचें कारण कोणतें तें मला कळवावें. तुमचें हें वर्तन पाहून मला आश्चर्य वाटलें. असें गोरक्षनाथाचें भाषण ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणाले कीं, त्यास तूं कोणत्या हेतुवस्तव मारिलेंस, तें कारण मला सांग. तेव्हां तो म्हणाला, तुमचा लोभ पाहावयासाठीं ! तुम्ही विरक्त म्हणवितां आणि मीननाथावर इतकी माया, ममता धरिली. म्हणून तो तुमचा भाव कितपत खरा आहे. हें पाहावयासाठींच ती मीननाथास मारिलें. पण तुम्ही सुज्ञ असून रडूं लागलेत हें कसें, तें सांगावें. तेव्हां मच्छिंद्रनाथ म्हणाला, आशा, तृष्णा इत्यादिकांचा तुझ्या अंगी कितपत वास आहे, हें पाहण्यासाठींच मीं मुद्दाम हें कौतुक करून दाखविलें. तसेंच ज्ञान, अज्ञान, शाश्वत, अशाश्वत, हें तुला कळलें आहे कीं नाहीं याचा मला संशय होता; तो मी या योगानें फेडून घेतला. ते भाषण ऐकून आपल्या प्रसादाचाच हा सर्व प्रताप, असें गोरक्षनाथानें मच्छिंद्रनाथास सांगून त्याच्या पायांवर मस्तक ठेविलें.


अध्याय २३ संपादन


मच्छिंद्रनाथास सोन्याच्या विटेचा मोह, समाराधना, गहिनीनाथास गोरक्षाचा उपदेश


मच्छिंद्र व गोरक्षनाथ सौराष्ट्र गावांहून निघाले ते मार्ग क्रमीत तैलंगणांत गेले. तेथें त्यांनीं गोदेचे संगमीं स्नान करून श्रीशिवाचें पूजन केलें. पुढें आंवढयानागनाथ, परळीवैजनाथ आदिकरुन तीर्थे केल्यावर महारण्यांत गर्भागिरी पर्वतावर जे वाल्मीकिऋषीचें स्थान आहे, तेथें ते आले. तें अरण्य महाभयंकर, वाट देखील धड उमगेना; अशा त्या घोर अरण्यांतून प्रवास करण्याचा प्रसंग आल्यामुळें मच्छिंद्रनाथ भिऊन गेला. त्याचें कारण असें होते कीं, स्त्रीराज्यातून निघतांना त्यास मैनाकिनी राणीनें जी सोन्याची वीट दिली होती ती कोणास न समजूं देतां त्याने झोळींत ठेविली होती. ती वीट चोर नेतील या धास्तीनें त्याच्या जिवांत-जीव नव्हता. ही सर्व भीति गोरक्षनाथाच्या लोभाबद्दल परीक्षा पाहण्यासाठींच होती, नाहीं तर मच्छिंद्रनाथास भीति कशाची असणार ! तो मार्गात चालत असतां गोरक्षास विचारी कीं, ह्या घोर अरण्यांत चोरांची धास्ती तर नाहीं ना ? हें ऐकून गुरुला चोराचें भय कशासाठीं असावें, ही कल्पना गोरक्षनाथाच्या मनांत उत्पन्न झाली. गुरुजवळ कांहीं तरी वित्त असलें पाहिजे व तें चोर लुटून नेतील ही भीति त्यांना आहे, असा त्यानें तर्क केला व ते भय निरसन होण्याचा उपाय योजावा, असा मनांत विचार करून तो कांहीं उत्तर न देतां तसाच मुकाटयानें चालत होता. इतक्यांत त्यांस एक पाण्याचें ठिकाण लागलें तेथें मच्छिंद्रनाथानें गोरक्षास अंमळ थांबावयास सांगितलें व आपली झोळी त्याच्याजवळ देऊन तो शौचास गेला. तेव्हां गोरक्षनाथानें गुरुच्या झोळींत पाहिलें तों सोन्याची वीट दिसली. तेव्हां हेंच भीतीचें मूळ असें जाणून त्यानें ती वीट फेंकून देऊन तितक्याच वजनाचा एक दगड तींत भरुन ठेविला व आपण चालूं लागला. मच्छिंद्रनाथहि मागून तांतडीनें शौचाहून आल्यानंतर चालूं लागला. गोरक्ष बराच लांब गेल्यावर गुरु मागून येत होता. त्याची वाट पहात विसांवा घेत बसला, इतक्यांत एक विहीर त्याचे नजरेस पडली. तींत त्यानें स्नान केलें, मीननाथास स्नान घातलें व नित्यकर्म उरकून घेत आहे तो मच्छिंद्रनाथ जवळ आला आणि पूर्ववत्‌ ’येथून पुढें कांहीं भय वगैरे नाहीं ना ?’ असें विचारुं लागला. त्यावर ’भय होतें तें मागें राहिलें, आतां काळजी न वाहतां स्वस्थ असावें’ असें गोरक्षनाथानें उत्तर दिलें.

अशा उडवाउडवीच्या गोष्टी जेव्हां गोरख सांगूं लागला तेव्हां मच्छिंद्रनाथ चकित झाला.मग त्यानें आपणांस वीट मिळाल्याची हकीकत सांगितली व तिला कोणी चोरटे येऊन लुटून नेतील, ही मोठी मला धास्ती आहे, म्हणून बोलला. तें ऐकून गोरक्ष म्हणाला, अशाश्वत वित्त आतां आपल्याजवळ नाहीं म्हणून भय देखील नाहीं ! हें ऐकून कांहीं तरी दगा झाल्याची कल्पना मच्छिंद्रनाथाच्या मनांत उद्भवली व त्यास तळमळ लागली. तेव्हां गोरक्षानें मच्छिंद्रनाथाचा हात धरला आणि उभयतांनीं आपापल्या झोळ्या घेऊन पर्वतावर जाण्याची तयारी केली. निघण्यापूर्वी झोळी तपासतां झोळींत वीट नाहीं असें पाहून मच्छिंद्र गोरक्षास पुष्कळ टाकून बोलला व रडून त्यानें एकच गोंधळ केला. त्या दुःखानें तो गडबडां लोळूं लागला व मोठमोठयानें रडून पिशाच्चासारखा चौफेर फिरुं लागला. त्यानें गोरक्षास नाहीं नाहीं तें बोलून शेवटीं निघून जा. तोंड दाखवूं नको, इतकें सुद्धां सांगितलें.

मच्छिंद्रनाथाचे तें काळजास झोंबणारे शब्द ऐकून देखील गोरक्ष उगाच राहिला व त्याचा हात धरुन त्यास पर्वतशिखरावर घेऊन गेला. जातांना पर्वतावर गोरक्षानें सिद्धयोगमंत्र जपून लघवी केली. त्यामुळें तो सर्व पर्वत सुवर्णमय होऊन गेला. मग लागेल तितकें सुवर्ण नेण्यास त्यानें गुरुस विनंति केली. तें अघटित कृत्य पाहून त्यानें गोरक्षाची वाहवा करून त्यास शाबासकी दिली आणि त्यास आलिंगन देऊन पोटाशीं धरुन म्हटलें, बाळा गोरक्षा, तुझ्यासारखा परीस सोडून सोन्याला घेऊन काय करुं ? अशा प्रकारच्या अनेक उपमा देऊन मच्छिंद्रनाथानें त्याची पुष्कळ वाखाणणी केली.

गोरक्षानें गुरुच्या बोलण्याचा तो झोंक पाहिला, तेव्हां आजपर्यंत सुवर्णाची वीट कोणत्या कारणास्तव जपून ठेविली होती तें मला सांगावें, असा त्यानें आग्रह धरिला. तेव्हां मच्छिंद्रनाथ म्हणाला कीं, माझ्या मनांत अशी इच्छा होती कीं, आपल्या देशीं गेल्यावर साधुसंतांची पूजा करून एक मोठी समाराधना घालावी. तें ऐकून तुमचा हा हेतु मी पुरवितों, म्हणून गोरक्षानें त्यास सांगितलें. मग गोरक्षानें गंधर्वास्त्रमंत्र म्हणून भस्माची एक चिमटी स्वर्गाकडे फेंकलीं; त्याबरोबर चित्रसेन गंधर्व येऊन नाथास वंदन करून काय आज्ञा आहे म्हणून विचारुं लागला. तेव्हां गोरक्षानें सांगितलें कीं, आणखी कांहीं गंधर्वांस बोलाव आणि त्यांना चौफेर पाठवून बैरागी, संन्यासी, जपी, तपी, संतसाधु, देव, गंधर्व, दानव किन्नर या सर्वांस येथें आणावें. कां कीं, आम्हांस एक टोलेजंग जेवणावळ घालावयाची आहे. मग चित्रसेनानें शंभर गंधर्व आणून जिकडे तिकडे पाठविलें. ते गंधर्व पुष्कळांस आमंत्रण करून त्यांस घेऊन आले. नवनाथ, शुक्राचार्य, दत्तात्रेय, याज्ञवलक्य, वसिष्ठ, वामदेव, कपिल, व्यास, पराशर, नारद, वाल्मिकि, आदिकरुन मुनिगण तेथें थोडक्याच वेळांत येऊन पोहोंचले.

नंतर गोरक्षनाथानें मच्छिंद्रनाथास सांगितलें कीं, भोजनसमारंभास पुष्कळ मंडळी जमली आहे; तरी तुमची मी मागें मार्गांत टाकून दिलेली सोन्याची वीट आणून देतों, ती घेऊन समारंभ साजरा करावा. यावर मच्छिंद्रनाथानें त्याचें समाधान केलें कीं, बाळा तुझ्यासारखा शिष्य असल्यावर मला यःकश्चित्‌ सोन्याची वीट घेऊन काय करावयाची आहे ? मग गोरक्ष म्हणाला, सर्व यथासांग होईल; पण हा सर्व आपल्या कृपेचा प्रताप, मजकडे कांहीं नाहीं, असें बोलून त्यानें चरणांवर मस्तक ठेविलें व मी सर्व व्यवस्था लावून बंदोबस्त करितों, आपण कांहीं काळजी न करितां स्वस्थ असावें असे सांगितलें.

नंतर त्यानें अष्टसिद्धींस बोलावून त्यांच्याकडे स्वयंपाकाचें काम देऊन उंची उंची अनेक पक्वान्नें तयार करण्याची आज्ञा केली व बंदोवस्त नीट राहून कांहीं एक न्यून न पडूं देण्याची सक्त ताकीद दिली. मग त्यानें एकंदर कामाची व्यवस्था लाविली व उत्सवाचा बंदोवस्त उत्तम प्रकारचा ठेविला. त्या वेळेस सर्वांना अत्यानंद झाला.

या भोजनसमारंभांत गहिनीनाथ आले नव्हते. म्हणून गोरक्षनाथानें ही गोष्ट मच्छिंद्रनाथास सुचविली. तेव्हां मधुब्राह्मणाकडे एका गंधर्वास पाठवून पुत्रासह त्यास घेऊन येण्यास सांग, म्हणजे तो त्यास आणील, असें मच्छिंद्रनाथानें गोरक्षास सांगितलें. त्यावरुन गोरक्षनाथानें चित्रसेनगंधर्वास सर्व वृत्तांत कळविला व त्याच्या अनुमतीनें एक पत्र लिहविलें. तें त्यानें सुरोचन नामक गंधर्वाजवळ दिले. ते त्यानें कनकगिरीस जाऊन त्या मधुब्राह्मणास दिले व इकडील सविस्तर मजकूर सांगितला. मग तो ब्राह्मण मोठया आनंदानें मुलास आणि गहिनीनाथास घेऊन निघाला, तो मजल दरमजल करीत करीत गर्भाद्रिपर्वतीं येऊन पोहोंचल्यावर त्यानें गहिनीनाथास मच्छिंद्रनाथाच्या पायांवर घातले. त्या वेळेस त्याचे वय सात वर्षाचें होते. मच्छिंद्रनाथ मुलाचे मुके घेऊं लागला. त्या नंतर हा गहिनीनाथ करभजननारायणाचा अवतार असल्याचे त्यानें सर्वांस निवेदन केलें.

त्या वेळीं शंकरानें मच्छिंद्रनाथास सांगितलें कीं, आम्हास पुढें अवतार घ्यावयाचा आहे, त्या वेळीं मी निवृत्ति या नांवानें प्रसिद्धीस येईन व हा गहिनीनाथास अनुग्रह करील; यास्तव यास अनुग्रह देऊन सकल विद्यांमध्यें प्रवीण करावें. हें ऐकून मच्छिंद्रनाथानें गोरक्षनाथाकडून गहिनीनाथास लागलाच अनुग्रह देवविला. तसेंच संपूर्ण देवांच्या समक्ष त्याच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेविला हा समराधनेचा समारंभ एक महिनाभर सतत चालला होता. मग गोरक्षानें कुबेरास सांगितलें कीं, तूं हा सुवर्णाचा पर्वत घेऊन जा आणि ह्याच्या मोबदला आम्हांस अमोल वस्त्रें-भूषणें दे; म्हणजे तीं सर्व मंडळीस देऊन रवाना करतां येईल. हें भाषण ऐकून कुबेरानें येथील धन येथेंच असूं द्या. आज्ञा कराल त्याप्रमाणें वस्त्रालंकार मी घेऊन येतों. मग त्यानें वस्त्रांचीं दिंडें व तर्‍हेतऱ्हेचे पुष्कळ अलंकार आणून दिले. तीं वस्त्रें भूषणें सर्वांना दिलीं; याचकांना द्रव्य देऊन त्या सर्वांच्या इच्छा तृप्त केल्या व मोठया सन्मानानें सर्वांची रवानगी करून दिली.

समारंभ झाल्यावर उपरिक्ष वसूसमागमें मीननाथास सिंहलद्वीपास त्याच्या तिलोत्तमा मातोश्रीकडे पाठवून दिलें. त्यानें मीननाथास तिलोत्तमेच्या स्वाधीन केलें व मच्छिंद्रनाथाचा सारा वृत्तांत तिला सांगितला. तेव्हां मच्छिंद्रनाथाच्या भेटीची निराशा झाल्यामुळें तिच्या डोळ्यांस पाणी आले. तें पाहून एक वेळ तुला मच्छिंद्रनाथ भेटेल, तूं कांहीं चिंता करुं नको, असें सांगून उपरिक्षवासु आपल्या स्थानीं गेला. मग ती मुलावर प्रीति करून आनंदानें राहिली.

इकडे गर्भाद्रिपर्वतावर गहिनीनाथास अभ्यास करविण्याकरितां गोरक्ष व मच्छिंद्रनाथ राहिले. उमाकांतहि तेथेंच होते. त्या सुवर्ण पर्वतावर अदृश्यास्त्राची योजना करून कुबेर आपल्या स्थानीं गेला. अदृश्यास्त्राच्या योगानें सुवर्णाचा वर्ण झांकून गेला; परंतु त्या पर्वतावर शंकर राहिले. ते अद्यापि तेथेंच आहेत. त्यास ’म्हातारदेव’ असें म्हणतात. त्याच्या पश्चिमेस कानिफनाथ राहिला; त्यानें त्या गांवाचें नांव मढी असें ठेविलें. त्याच्या दक्षिणेस मच्छिंद्रनाथानें वसति स्थान केलें. त्याच्या पूर्वेस जालंदरनाथ राहिला. त्याच पर्वताच्या पलीकडे वडवानळ गांवीं नागनाथानें वस्ती केली. विटे गांवांत रेवणसिद्ध राहिला. गर्भाद्रिपर्वतावर वामतीर्थी गोरक्षनाथ राहिला. त्यानें तेथेंच गहिनीनाथाकडून विद्याभ्यास करविला. एका वर्षांत तो सर्व विद्येंत निपुण झाला. नंतर त्यास मधुब्राह्मणांकडे पाठवून दिलें. पुढें त्या ठिकाणीं बहुत दिवसपर्यंत राहून शके दहाशें या वर्षीं त्यांनीं समाधि घेतल्या.

कबरीच्या घाटाच्या समाधि बांधण्याचा मुख्य मुद्दा हाच होता कीं, पुढें यवनराजाकडून उपद्रव होऊं नये. एकदां औरंगजेबबादशहानें ह्या समाधि कोणाच्या आहेत म्हणून विचारल्यावरुन लोकांनीं त्यास सांगितलें कीं, तुमच्या पूर्वजांच्या आहेत. मठांत कान्होबा; पर्वती; मच्छिंद्र, त्याच्या पूर्वेस जालंदर, त्याच्या पलीकडे गहिनीनाथ असें ऐकून त्यानें तीं नांवें पालटून दुसरीं ठेविलीं, तीं अशीं : जानपीर असें नांव जालंदरास दिलें. गैरीपीर हें नांव गहिनीनाथास ठेविलें. मच्छिंद्राचें मायाबाबलेन व कानिफाचें कान्होबा अशी नांवें ठेवून तेथें यवन पुजारी ठेविले. कल्याण कलयुगीं बाबाचैतन्य यांची समाधि होती, पण तें नांव बदलून राववागशर असें नांव ठेविलें. गोरक्ष आपल्या आश्रमीं सटव्यांस ठेवून तीर्थयात्रेस गेला.

अध्याय २४ संपादन


भर्तरीची जन्मकथा, त्याचे बालपण व आईबापांचा वियोग


एके दिवशीं सांयकाळी सूर्याची व ऊर्वशीची नजरानजर होऊन सूर्यास कामानें व्यापून टाकिल्यामुळें वीर्यपात झाला. तें वीर्य आकाशांतून पडतांच वाऱ्यानें त्याचे दोन भाग झाले. त्यांपैकी एक भाग लोमेशऋषीच्या आश्रमांतील घटामध्यें पडून त्यापासून अगस्तीचा देह उप्तन्न झाला. दुसरा भाग कौलिकऋषीच्या आश्रमास आल. त्या वेळेस तो भिक्षा मागावयास बाहेर जात होता. तो आपलें भिक्षापात्र अंगणांत ठेवून दार लावीत होता. इतक्या अवकाशांत तें वीर्य त्यांत येऊन पडलें. हें ऋषीच्या पाहाण्यांत आलें. त्या वेळीं हें वीर्य सूर्याचें आहे, असें तो समजला. तीन हजार एकशें तीन वर्ष लोटन्यांनतर धृमीननारायण या पात्रांत संचार करील; यास्तव हें नीट जपून ठेवलें पाहिजे, असा विचार करून त्यानें तें भिक्षापात्र नीट जपून ठेवलें.

ह्या गोष्टीस बहुत वर्षे लोटल्यानंतर पुढें कलियुग सुरू झालें. नंतर त्या ऋषीनें तें पात्र मंदराचळाच्या गुहेंत तोंडाशींच नेऊन ठेविलें आणि आपण निघून गेला. पुढें कलीची तीन हजार एकशें तीन वर्षें लोटल्यानंतर द्वारकाधीशानें धृमीननारायणाच्या अवतारामध्यें त्या पात्रांत संचार केला. तो गर्भ दिवसेंदिवस वाढत जाऊन नऊ महिने पूर्ण भरतांच पुतळा तयार झाला. तो त्यांत सामावेना, तेव्हा त्या पात्राचीं दोन शकलें झालीं. त्यांतलें मूल सूर्याप्रमाणें दैदीप्यमान होतें; पण रडून आकांत करीत होतें.

त्याच संधीस कांहीं हरिणें तेथें चरावयास आलीं. त्यांत एक हरिणी गर्भिणी होती ती चरत तेथें जाऊन प्रसूत झाली. तिला दोन बाळें झालीं; परंतु ती मागें पाहूं लागली तेव्हां तिला तीन बाळें दिसली. तीं तिन्ही मुलें माझींच असा तिला भास झाला. मग ती त्यांस चाटूं व हुंगूं लागली. ती दोन्ही हरणें प्यावयास लागली, पण तिसऱ्यास प्यावयाचें कसें तें माहित नव्हतें. ह्यामुळें तें टकमक पाहूं लागलें. परंतु तिनें युक्तिप्रयुक्तीनें स्तनपान करवून त्या मुलीचें सरंक्षण केलें. पुढें कांहीं दिवसांनी मूल रांगूं लागलें. तिन्ही मुलें एके ठिकाणीं ठेवून ती हरिणी चरावयास जात असे, तरी तिचा सर्व जीव मुलांवर होता. ती घडोघडी येऊन त्यांस पाहून पुन्हां चरावयास जाई. याप्रमाणें तीन वर्षे लोटली. मग तो हरिणामध्यें जाऊन झाडपाला खाऊं लागला तो निरंतर आपल्या आई मागे राहीं. अशा रीतीनें त्यानें तिच्या संगतीनें पांच वर्ष काढली.

एके दिवशीं तीं चौघें चरत चरत मार्गावर आलीं असतां त्या वाटेनें एक भाट आपल्या स्त्रीस घेऊन जात होता. त्यानें हें मूल पाहिलें. त्या भाटाचें नांव जयसिंग व त्याच्या स्त्रीचें नांव रेणुका असें होतें. तीं उभयतां एकमतानें वागत. त्यांनी सूर्याप्रमाणें तेजस्वी असा तो मुलगा तेथें पाहून, अशा सुकुमार व स्वरूपवान् मुलास आईबापांनीं अरण्यांत सोडून दिल्यामुळें त्या मुलाविषयीं त्याच्या मनांत नानाप्रकारे विचार येऊं लागले. जयसिंहास पाहून हरिणी पळून जाऊ लागली व तिच्यामागून तो मुलगाहि धांवत जाऊं लागला. परंतु जयसिंहानें त्यास धरिलें. नंतर तो त्यास म्हणाला मुला, भिऊं नको. तुझीं आईबापें कोठें आहेत तीं मला सांग. मी तुला तुझ्या घरीं नेऊन त्यांच्या स्वाधीन करतो. परंतु तें रडून हंबरून आकांत करूं लागलें व मुलगा मनुष्याच्या हाती सांपडल्यामुळें त्या हरिणीसहि परम दुःख झालें. तिला मनुष्याच्या भयानें जवळ येण्यास हिंमत होईना. म्हणुन लांबूनच ती हंबरडा फोडूं लागली.

जयसिंह भाट मुलास म्हणाला, मुला ! तूं रडून असा कां आकांत करून घेत आहेस ? तुझीं आईबापें कोठें आहेत, मला सांग, मी तुला त्यांच्या स्वाधीन करितों. पण मुलाच्या तोंडून एक शब्दसुद्धां निघेना. तो ब्यां ब्यां करून रडत होता. मग मुका असेल असें जयसिंगास वाटलें, म्हणुन तो त्यास हातांच्या खुणा करून विचारूं लागला. परंतु त्या त्यास समजत नसल्यामुळें तो कांहींच उत्तर देईना. सरतेशेवटीं त्यानें त्या मुलास आपल्या घरीं घेऊन जाण्याचा निश्चय केला. मग तो त्यास खांद्यावर घेऊन जाऊं लागला. तो मुलगा ओरडून हरिणीस हांक मारीत होता व ती पाठीमागून येत होती. पण मनुष्याच्या भीतीनें ती जवळ येईना. ह्यांतलें वर्म जयसिंगास काय तें कळेना. ती हरिणी जयसिंगाच्या मागून ओरडत जातच होती. ती बरीच लांबपर्यत गेली, तेव्हां हिचें पाडस रानांत चुकलें असेल, म्हणुन ही रडत आहे असें जयसिंगाला वाटून तो मुलास घेऊन चालता झाला.

मुलास घेऊन जयसिंग जात असतां, सांयकाळ झाल्यावर एका पदरहनी गांवांत वस्तीस राहिला. त्यानें तो मुलगा आपल्या बायकोच्या स्वाधीन केला. पुढें मुलास हळूहळू हरिणीचा विसर पडत चालला. त्याला थोडें खाणें, पिणें, बोलणें, चालणें, उठणें बसणें हें सर्व कळूं लागलें.

अशा रीतीनें तो भाट फिरत फिरत काशीस गेला. तेथें भागीरथीचें स्नान करून विश्वेश्वराचें दर्शन घेण्यासाठीं देवालयांत गेला. बरोबर मुलगा होता. दर्शन घेत असतां लिंगातून शब्द निघाला कीं, 'यावें भर्तरी ! तुम्ही अवतार घेऊन प्रकट झालांत, फार चांगलें.' हें शंकराचे शब्द ऐकले. तें ऐकून हा मुलगा अवतारी असल्याबद्दलची कल्पना जयसिंगाच्या मनांत आली व हा आपल्या पूर्वपुण्याईच्या योगानें आपणांस प्राप्त झाला आहे असेंहि त्यास वाटलें. मग शिबिरास गेल्यावर त्यानें हा सर्व प्रकार कांतेस निवेदन केला व आजपासून ह्याचें भर्तरी नांव ठेवून याचें पुत्राप्रमाणें पालन कर, ही अलभ्य जोड आपणांस प्रयत्‍नावांचून कर्मधर्मसंयोगानें प्राप्त झाली आहे, असे सांगितलें.

'यावें भर्तरी' म्हणुन शंकरानें कां म्हटलें, अशी कदाचित कोणी कल्पना काढील. तशी हांक मारण्याचें कारण असें कीं, त्याचा जन्म भर्तरीमध्यें झाला म्हणुन शंकरानें त्याच नांवानें त्यास हांक मारली. असो, शंकराच्या देवालयांतला वृत्तांत जयसिंगानें रेणुकाबाईस कळविल्यानंतर तिला परमानंद झाला. त्या दिवसापासुन तीं उभयतां त्यास भर्तरी असें म्हणूं लागली. त्यांस पुत्र नसल्यामुळें त्यांची भर्तरीवर अत्यंत प्रीति जडली. तीं त्याचें लालनपालन उत्तम प्रकारें करीत. त्यासहि आनंद होऊन तो त्यांशीं त्यांच्या मनाप्रमाणें वागे. त्यांस हा मुलगा प्राप्त झाल्यानें अतिशय हर्ष झाला होता. परंतु त्या मुलाच्या आईबापांस, तो चुकल्यामुळें परम दुःख होत असेल, तीं ह्याचा तपास करीत असतील, व आपली भेट झाल्यास त्यास आपणांपासून घेऊन जातील, अशी शंका त्यांच्या मनांत वारंवार येई. मग ती त्याच क्षेत्रांत राहून भिक्षा मागुन आपला उदरनिर्वाह करूं लागली.

भर्तरीस संपूर्ण राजयोग होता. तो गांवांतली मुलें जमवून अनेक प्रकारचे खेळ खेळतांना आपण राजा बनून दुसऱ्यांस कामदार करी. अश्व, पायदळ, मंत्री आदिकरून सर्व मुलांस निरनिराळे वेष देऊन तो राजाच्या स्वारीचा हुबेहुब थाट आणीत असे. जसजसा योग असेल तशतशीं त्याच्या हातून कृत्यें घडत.

एके दिवशीं काठीचे घोडे करून खेळत असतां भरधांव पळत व तोंडानें हो हो म्हणत आणि त्यांची पाठ थोपटीत, ते गांव सोडून अरण्यांत गेले. तेथें खेळतांना भर्तरिस ठेंच लागून तो उलथून खाली पडला. अगदी बेशुद्ध झाला. त्यानें जेव्हां डोळे पांढरे केले तेव्हां मुलें भिऊन पळून गेलीं व हा आतां मेला व भूत होऊन बोकांडीस बसेल आणि आपणांस खाऊन टाकील असें म्हणुं लागली. मग सर्व मुलें तेथून पळून भागीरथीच्या कांठीं जाऊन विचार करूं लागलीं कीं, भर्तरी भूत होऊन गांवांत हिंडेल व आपणांस खाऊन टाकील, ह्यास्तव आतां आपण बाहेर जाऊं नये. ज्यानें त्यानें आपपल्या घरींच खेळावें. असा तीं आपसांत विचार करून घरीं गेलीं.

इकडे भर्तरी अगदीच बेशुद्ध होऊन निश्चेष्ट पडला. त्याचें सर्वांग दगडाने ठेचून गेल्यामुळें अंगांतून रक्त निघाले होतें. सर्व प्रकार सूर्यानें पाहिला व त्यास पुत्रमोहास्तव कळवळा आला. तत्क्षणीं त्यानें भूतलावर येऊन, प्रेमानें मुलास उचलून पोटाशीं धरिलें. नंतर भागीरथीचं उदक आणुन त्यास पाजलें व सावध केलें. मग कृपाद्दष्टीनें त्याच्याकडे पाहतांच त्याचा देह पूर्वीप्रमाणें झाला. इतकें झाल्यावर सूर्यानें विप्राचा वेष घेतला आणि भर्तरीस घरीं आणून पोंचविलें. येतांना वाटेंत भर्तरीस पोरांनीं ओळखून तो भुत होऊन आला, असें तीं ओरडूं लागली आणि भिऊन घरोघरी जाऊन लपून राहिली.

सूर्यानें भर्तरीस घरीं नेऊन रेणुकेच्या स्वाधीन केलें, तेव्हां ती त्यांची विचारपूस करूं लागली. तो तेजःपुंज ब्राह्मण पाहून तिनें त्यास आसनावर बसविलें आणि म्हटलें, महाराज ! तुम्ही अति ममतेनें या मुलास घेऊन आलां आहां, त्याअर्थी आपण कोठून आलां व आपलें नांव काय हें सर्व मनांत काडीभर सुद्धां संशय न आणितां सांगावें. तेव्हां सूर्य म्हणाला, मी या मुलाचा बाप आहे; म्हणुन ममतेनें मी ह्यास तुजकडे घेऊन आलों आहें व मीं तुला या मुलास अं:तकरणपूर्वक अर्पण केलें आहे. ह्यास्तव तूं मनांत कोणत्याहि प्रकारची आकांक्षा आणिल्यावांचून ह्याचें संगोपन कर. तें ऐकून, तुम्हीं याचे जनक कसे, असें रेणुकेनें विचारल्यावर तो म्हणाला, मी विप्रवेषानें तुजकडे आलों आहें म्हणुन तुं मला ओळखलें नाहींस. सुर्य म्हणून देव म्हणतात तो मी. असें सांगून मुळापासून भर्तरीची कथा सांगून त्याचें हरिणीनें संगोपन कसें केलें व तो त्यांच्या हातीं कसा आला हा सर्व साद्यंत वृत्तांत सांगितला. शेवटीं तो तिला म्हणाला, हा मुलगा आपल्याच पोटचा आहे असें मानून निर्धास्तपनें तूं याचें संरक्षण कर. हा पुढें मोठमोठालीं कृत्यें करून लौकिकास चढेल. तुझें भाग्य उदयास आलें म्हणून हा तुला प्राप्त झाला. असें तिला सांगून विप्रवेषधारी सूर्य निघून गेला.

ह्या वेळेस तिचा नवरा जयसिंग घरीं नव्हता. तो येतांच तिनें हें वर्तमान त्यास सांगितलें; तें ऐकून त्यासहि परमानंद झाला. त्याच्या संशयाची निवृत्ति झाली. मग त्याचें त्यावर पूर्ण प्रेम बसलें. मुलाचें वय सोळा वर्षाचें होईपर्यंत ती काशींत राहिली. पुढें मुलांचें लग्न करण्याचा विचार मनांत आणून तीं आपल्या गांवीं जाण्यासाठीं काशीहून निघाली. तों मार्गात अरण्यामध्यें चोरांनी जयसिंगास ठार मारून व त्याजवळचें सर्व द्रव्य लुटून ते चालते झाले. पतीचें दुःख दुःसह होऊन रेणुकाहि गतप्राण झाली. मग भर्तरीनें उभयतांना अग्नि देऊन दहन केलें. तो निराश्रित होऊन शोकसागरांत बुडून गेला. त्यास शोक आवरेना व निराश्रित झाल्या मुळें तो अनेक प्रकारच्या विवंचनेंत पडला.

त्या वेळीं कांहीं व्यापारी व्यापारासाठीं त्याच मार्गानें जात होते ते भर्तरीस पाहून त्याच्यापाशीं गेलें. त्यांना त्याची दया आली आणि त्यांनीं त्यास विचारल्यावरून भर्तरीनें त्यास सर्व प्रकार निवेदन केला. मग त्यांनी त्यास बोध केला कीं, प्रारब्धीं होतें तसें झालें, आतां तुं रडून कपाळ फोडून घेतलेंस तरी तीं आतां पुन्हां परत येणार नाहींत. ह्या रीतीचा त्यास पुष्कळ बोध करून ते त्यास आपल्याबरोबर घेऊन गेले, ते त्यास अन्नवस्त्र देत व तोहि त्यांचें कामकाज करी. असें कांहीं दिवस लोटल्यावर व्यापाऱ्यांच्या सहवासानें त्यास आपल्या दुःखाचा थोडाथोडा विसर पडत चालला पुढें ते कांहीं दिवसांनीं अवंतीनगरी येऊन पोचले.

अध्याय २५ संपादन


भर्तरीचे व्यापाऱ्याबरोबर गमन; सुरोचन गंधर्वाची कथा

.

मागल्या अध्यायांत सांगितल्याप्रमाणें भर्तरीनाथ व्यापाऱ्यांच्या समागमें अवंतीनगरास आल्यानंतर ते एका गांवाजवळ उतरले. तेथें माल नीट रचून ठेवून सारे एके ठिकाणीं अग्नि पेटवून शेकत बसले. इतक्यांत तेथें कांहीं कोल्हे आले आणि कोल्हाळ करून त्यांनीं असें सुचविलें कीं, व्यवसायी हो ! या अशा निर्धास्त स्थितींत बसून न राहतां सावध असा, तुह्मांवर चोरटे येऊन धाड घालण्याच्या विचारांत आहेत व ते तुम्हांस हाणमार करून सर्व द्रव्य घेऊन जातील. अशी सूचना देऊन कोल्हे निघून गेले.

पूर्वी भर्तरी श्वापदांमध्यें राहिला असल्यामुळें त्यास जनावरांची भाषा चांगली येत होती. हा कोल्हांनीं सांगितलेला संदेश आपण व्यापाऱ्यांस सांगून सावध करावें, असा भर्तरीनें विचार करून चोर लुटावयास येणार आहेत, ही गोष्ट त्यांस सांगितली. कोल्हांची भाषा मला समजते व ते भोंकत असतां जें सांगत होते. तें सर्व मी लक्षपूर्वक ऐकून तुम्हांला सांगून अगोदरच सूचना केली आहे, असें तो व्यापाऱ्यास म्हणाला. ह्या भर्तरीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून, त्यांनीं आपल्या मालांची नीट लपवालपवी केली व हातांत शस्त्रें घेऊन व चांगला उजेड करून सर्वजण पाहारा करूं लागले. इतकेंच केवळ नव्हें, तर ते मोठ्या सावधगिरीनें व शौर्यानें आपलें संरक्षण करण्यास तयार झाले. इतक्यांत त्यांच्यावर चोरांची धाड येऊन पडली; परंतु व्यापाऱ्यांनी शस्त्रांचा मारा चालविल्यामुळें चोरांचें कांहीएक न चालतां ते जर्जर होऊन पळून गेले. तरीसुद्धां ते व्यापारी गाफील न राहतां मोठ्या सावधगिरीनें रात्रभर जागत राहिले होते.

पुढें दीड प्रहर रात्र राहिली असतां, पुन्हां कोल्हांनीं येऊन कुही केली, तेव्हां कोल्हे आतां काय बोलले म्हणुन व्यापाऱ्यांनी भर्तरीस विचारलें. तेव्हां तो म्हणाला, शंकरानें ज्यास वर दिलेला आहे. असा एक राक्षस उत्तर दिशेकडून दक्षिण दिशेकडे जाण्याकरितां येत आहे. तो महाबलाढ्य आहे. त्याच्यापाशीं तेजस्वी अमोल अशीं चार रत्‍नें आहेत. त्यास जो मारील त्यास हा अलभ्य लाभ होईल आणि त्यास मारल्यानंतर त्याच्या रक्ताचा टिळा गांवच्या दरवाजास व आपल्या कपाळास जो लावील तो अवंती ( उज्जेनी ) नगरीचा सार्वभौम राजा होईल. व्यापाऱ्यांस भर्तरी ही माहिती देत होता त्यांच वेळेस कर्मधर्मसंयोगानें विक्रम तेथून जात होता. त्यानें हें भर्तरीचें सर्व भाषण ऐकून घेतलें व लागलाच तो हातांत शस्त्र घेऊन राक्षसास मारवयास निघाला. त्या राक्षसाचा मूळ वृतांत असा कीं, पूर्वी हा चित्रमा या नांवाचा एक गंधर्व होता. एके दिवशीं तो शंकराच्या दर्शनाकरितां कैलासास गेला, त्या वेळेस शंकर व पार्वती सोंगट्यांनीं खेळत बसली होतीं. तो त्यांच्या पायां पडला व शंकराच्या आज्ञेनें त्यांच्याजवळ बसला. कांहीं वेळानें एक डाव शंकरावर आला व दानाविषयी शंकर व पार्वती ह्यांच्या म्हणण्यांत फरक पडला. तेव्हां दोघांत बराच वाद होऊन दान काय पडलें, हें त्यांनीं त्या गंधर्वास विचारलें, त्यानें शिवाचा पक्ष धरून अठरा पडले म्हणुन सांगितलें. परंतु त्या वेळेस खरोखर बारा पडले होते. पण शंकराची मर्जी मिळविण्याकरितां गंधर्वानें खोटें सांगितले, त्यामुळें भवानीस राग आला. ती त्यास म्हणाली, गंधर्वा ! तूं खोडसाळ आहेस. असत्याचा अंगीकार करून सांबाकडचें बोलतोस, तस्मात्‌ तूं मृत्युलोकीं राक्षस होऊन राहा. असा पार्वतीचा शाप मिळतांच तो थराथरां कापूं लागला. त्यानें शंकराच्या पायां पडून विनंति केली कीं, देवा ! आपला पक्ष स्वीकारल्यानें मी शापबद्ध झालों; आतां माझी वाट काय ? असें म्हणुन तो ढळढळां रडूं लागला. तेव्हां शंकरास दया येऊन तो म्हणाला, गंधर्वनाथ ! पार्वतीनें शाप दिला हें खरें; पण तूं कांहीं चिंत्ता करूं नको. सुरोचन गंधर्वास इन्द्रानें शाप दिलेला आहे, त्यास जो पुत्र होईल तो शस्त्रप्रहार करून तुझा प्राण घेऊन राक्षसदेहापासून तुला सोडवील. तेव्हां मला मारल्यानें त्यास लाभ कोणता व माझें वृत्त त्यास कसें व कोणत्या रीतीनें लागेल, हें कळल्यास बरें पडेल म्हणुन गंधर्वानें म्हटल्यानंतर शंकरानें सांगितलें कीं, तुला मारुन तुझ्या रक्ताचा टिळा कपाळीं लाविल्यानंतर त्यास सार्वभौमपद प्राप्त होऊन तो सदासर्वदा विजय मिळवीत जाईल. तुझी माहिती त्यास भर्तरीनाथाच्या मुखानें लागेल ! तो भर्तरी धृमीणनारायणाचा अवतार होय. हें ऐकून गंधर्वास समाधान वाटलें. मग तो राक्षसाचा देह धरून मृत्युलोकीं आलां.

सुरोचन गंधर्वाला इन्द्रानें कोणत्या अन्यायास्तव शाप दिला, यांविषयी मूळ कथा अशी आहे कीं, एके दिवशीं अमरावतीस इन्द्र सभेंत असतां तेथें गंधर्व आदिकरून मंडळी आपापल्या स्थानीं बसली होती. अप्सरांचें नृत्यगायन चाललें होतें. त्या सभेंत बसलेल्या मेनका, तिलोत्तमा इत्यादि अत्यंत स्वरूपवान् अप्सर पाहून सुरोचन मोहित होऊन भरसभेमधून एकदम उठला व मेनकेचा हात धरून तिचे स्तन मर्दन करूं लागला. अशी अमर्यादा होतांच इंद्रास राग आला. त्यानें त्याची पुष्कळ निर्भर्त्सना केली व त्यास शाप दिला कीं, तूं यत्किचितही शरम न बाळगतां एकदम हें दुष्कर्म करावयास प्रवृत्त झालास; असा तूं दुष्ट असल्यानें स्वर्गापासून पतन पावून मृत्युलोकीं गाढव होऊन राहा. असा शाप मिळतांच तो पतन पावला. परंतु या वेळीं त्यानें इंद्राची प्रार्थना केली कीं महाराज अमरनाथ, मला आतां उःशांप द्यावा. मजकडून होऊं नये असा अपराध घडला खरा; पण मला माझ्या अपराधाची कृपा करून क्षमा करावी. अशी त्यानें स्तुति करून इंद्रास मोठेपणा दिला. तेणेंकरून त्याचें अंतःकरण द्रवून त्यानें त्यास उःशाप दिला कीं, तूं बारा वर्षांनीं पुनः परत आपल्या स्थानास येशील. परंतु तुला सांगतों तें ऐक, मिथिला नगरीच्या सत्यवर्मा नामक राजाच्या कन्येशीं युक्तिप्रयुक्तीनें तूं विवाह कर. पुढें विष्णूसारखा तेजःपुंज मुलगा विक्रम तुझ्या पोटीं येतांच तूं मुक्त होशील व पूर्ववत्‌ गंधर्व होऊन स्वर्गास येशील. याप्रमाणे इंद्रानें उःशाप देतांच तो स्वर्गाहून पतन पावून मिथिलेच्या रानांत गाढव होऊन राहिला. त्या गांवात कमट म्हणुन एक कुंभार होता. तो गाढवांच्या शोधासाठीं अरण्यांत गेला असतां तेथें मिळालेली सर्व गाढवें त्यानें हांकून आपल्या घरीं नेलीं. त्यांतच हें शाप मिळालेलें गाढव होतें. पुढें कांहीं दिवसानीं तो दरिद्री झाला; तेव्हां शाप मिळालेलें गाढव ठेवून बाकींची सर्व गाढवें त्यानें विकून टाकिली.

तो गाढव तेथें एकटाच राहिला असतां दोन प्रहर रात्रीस कुंभारास उद्देशून म्हणूं लागला कीं, सत्यवर्मा राजाची कन्या मला बायको करून दे. गोठ्यांतुन असा मनुष्यासारखा आवाज त्यास नित्य ऐकूं येई. पण कुंभारानें घराबाहेर येऊन पाहिल्यावर त्यास तेथें मनुष्य दिसत नसे. असा तो अनेक वेळां फसला. गाढव बोलत असल्याची कल्पना त्याच्या मनांतच येईना.. एकदां तो ह्याच संशयांत पडून कांहीं वेळ उभा राहिला. मग आपण याची आतां भ्रांति फेडावी, असा गाढवानें विचार करून कमटास आपल्याजवळ बोलाविलें आणी म्हणाला कीं, सत्यवर्मा राजाची कन्या मला बायको करून दे. हेंच मी तुला नित्य सांगत असतो. ह्यांत संशयाचें कांहींच कारण नाहीं. कसेंहि करून माझें इतकें काम कर. हें ऐकून तो कुंभार खोल विचारांत पडला व त्याच्या मनांत भीति उप्तन्न झाली. कारण, ही अघटित गोष्ट कोणापाशीं बोलता येईना. जर ही गोष्ट बाहेर फुटली तर राजा मला शिक्षा करील. हा गाढव असतां राजाचा जांवई होऊं पाहतो ही गोष्ट घडेल तरी कशी ? ह्याचा परिणाम चांगला होणार नाहीं. यास्तव आतां येथून निघून दुसऱ्या राज्यांत राहावयास जावें हें चांगलें , असा विचार त्या कुंभारानें करून निघण्याची तयारी केली. दुसरे दिवशी सकाळीं हा सर्व प्रकार त्यानें आपल्या स्त्रीस कळविला व तिचाहि रुकार मिळविला. परंतु त्या उभयतांहि नवराबाकोच्या मनांत अशी कल्पना आली नाही कीं, गाढवास मुळीं वाचा नसते. असें असतां हा मनुष्यांप्रमाणें बोलतो आहे, यास्तव हा गंधर्व, यक्ष, किन्नर यांपैकींच कोणी तरी शापग्रस्त असावा.

मग त्यांनीं त्याच गाढवावर सामानसरंजाम भरला व पळून जात असतां सीमेवर रक्षकांनीं त्यास प्रतिबंध केला आणि हें नगर सोडून कां जातां म्हणुन विचारूं लागले. पळून जाण्याचें कारण सांगावें म्हणुन राजसेवकांनीं पुष्कळ प्रयत्‍न केला, परंतु तो व स्त्री कांहींच न बोलतां उभीं राहिली. कारण ही गोष्ट सांगावी तर राजा प्राण घेतल्यावांचून सोडणार नाहीं, ही त्यांस मोठी भीति होती. ह्यामुळें रक्षकांनीं जरी मनस्वी आग्रह केला तरी कांहीं न बोलतां स्वस्थ राहण्याखेरीज दुसरा मार्गच त्यांस दिसेना.

इतक्यांत कमट कुंभार पळून जात असतां त्यांस आम्हीं पकडुन ठेविलें आहे, अशी बातमी रक्षकांनी सत्यवर्मा राजास सांगितली. ती ऐकून त्यास दरबारांत आणण्याचा हूकूम झाला. दूतांनी त्यास राजसभेंत नेऊन उभें केलें. त्यास सत्यवर्मा राजा म्हणाला, माझ्या राज्यांत मी कोणास दुःख होऊं देत नाहीं, असें असतां तूं कां पळून जात आहेस ? तुला कोणतें दुःख झालें आहे तें मला सांग मी बंदोबस्त करितों. तें राजाचें भाषण ऐकून कुंभार म्हणाला, महाराज ! प्रजेच्या सुखाकडे आपलें पूर्ण लक्ष आहे, हें मी जाणतों, परंतु मला जें दुःख आहें तें माझ्यानें सांगवत नाही. तें सांगितलें असतां माझ्या जिवास मला धोका दिसतो. मग राजानें त्यास आश्वासन दिलें कीं, एखाद्या अन्यायामुळें मजकडून शासन होइल अशी तुला धास्ती असेल तर मी तो अन्याय तुला माफ करून तुझ्या प्राणाचें रक्षण करीन. तूं कांहीं संशय आणूं नको. मी तुला वचनहि देतों. असें बोलून लागलेंच राजानें त्यास वचन दिलें मग त्यानें राजास एके बाजूस नेलें आणी तो त्यास म्हणाला, राजा ! तुझी कन्या सत्यवती आपल्यास स्त्री करून देण्याचा हट्ट माझ्या गाढवानें धरला आहे व हें तो नित्य मजपाशीं मनुष्यवाणीनें बोलत असतो. ही गोष्ट तुला समजल्यानंतर तूं रागावशील, ही कल्पना मनांत येऊन मी येथून पळून जात होतो.

कमटाचें तें भाषण ऐकून राजास फार आश्चर्य वाटलें व त्यानें विचार केला कीं, ज्या अर्थी हा गाढव बोलतो आहे, त्याअर्थी हें जनावर नसुन कोणी तरी दैवत असलें पाहिजे व कारणपरत्वें त्यास पशूचा देह प्राप्त झाला असावा. असा विचार करून त्यानें कमट कुंभारास सांगितलें कीं, या कारणाकरितां तूं भय धरून गांव सोडून जाऊं नकोस; खुशाल आपल्या घरीं जाऊन आनंदानें राहा. मी या गोष्टीचा विचार करून व त्या गाढवाची परिक्षा घेऊन त्यास माझी कन्या अर्पण करीन. आतां तूं घरी जाऊन गाढवास सांग कीं, तूं म्हणतोस ही गोष्ट मी राजाजवळ काढिली होती, परंतु त्याचा अभिप्राय असा आहे कीं, हे सर्व मिथिलानगर तूं तांब्याचें करून दाखव म्हणजे तो आपली कन्या सत्यवती तुला देईल. इतके बोलून राजानें कमटास घरीं जावयास सांगितलें.

नंतर तो कमट स्त्रीसह आपल्या घरीं गेला. त्या रात्री पुनः गाढवानें कमटास हाक मारून लग्नाची गोष्ट पूर्ववत्‌ निवेदन केली. तेव्हां कमटानें त्यास राजच्या संकेताप्रमाणें सर्व मजकूर सांगितला नंतर कमट म्हणाला कीं, राजाचा हेतू पूर्ण करावयाचें तुझ्या अंगी सामर्थ्य असेल तर सर्व नगर तांब्याचें कर. म्हणजे सत्यवती तुला प्राप्त होईल. तें कमटाचें भाषण ऐकून तो गाढवरूपी गंधर्व म्हणाला, राजा मोठा बुद्धिवान् असें दिसत नाहीं . कारण या कामी त्यानें अगदीं पोक्त विचार केला नाहीं. अरे रत्‍नखचित सुवर्णाची नगरी त्यानें मला करावयास सांगितली असती तरी मी ती करून हुबेहुब दुसरी अमरावती त्यास बनवून दिली असती किंवा इंद्राची सर्व संपत्ति त्यास आणून दिली असती. त्यानें कल्पतरूचें आरामवन मागावयाचें होतें किंवा कामधेनू मागावयाची होती. असली अलभ्य मागणी मागावयाची सोडून त्यानें ताभ्रमय नगर करून मागितले ! असो ! मी तुझ्या म्हणण्याप्रमाणें आज रात्रीं तांब्याचें नगर करून देतों, असें त्या गंधर्वानें कबूल केलें, तो निरोप कुंभारानें राजास कळविला. तेव्हां राजानें गर्दभाचें म्हणणें आपणास कबूल असल्याबद्दल त्याच कुंभाराबारोबर उत्तर पाठविलें. तें ऐकून त्या गर्दभरूपी गंधर्वानें विश्वकर्म्याची प्रार्थना करतांच तो प्रत्यक्ष येऊन काय आज्ञा आहे म्हणुन विचारूं लागला. त्यास गंधर्वानें सांगितलें कीं, ही सर्व मिथिलानगरी एका रात्रींत तांब्याची करून दे, तें कबुल करून विश्वकर्मानें तें सर्व नगर रात्रींत तांब्याचें करून टाकिलें व राजापासून अंत्यजापर्यंत सर्वांचीं एकसारखीं तांब्याची घरें केलीं असें सांगून व गर्दभरूपी गंधर्वाची आज्ञा घेऊन विश्वकर्मा निघून गेला.

दुसरे दिवशीं प्रातःकाळीं सर्व लोक उठून पाहातात तो, सारें नगर तांब्याचें झालेलें ! तें पाहून सारे आश्वर्यचकित झाले. तो चमत्कार पाहून त्यांच्या मनांत अनेक प्रकारचे तर्क येऊं लागले. राजास मात्र खूण पटली; परंतु ह्यास आतां कन्या दिल्यावांचुन चालावयाचें नाहींच. जर दिली लोक हसतील, असे विचार मनांत येऊं लागले. मग कन्या कमटाचे स्वाधीन करून त्यास गांवातून दुसरीकडे पाठविण्याचा विचार करून त्यानें कुंभारास बोलावून आणिलें व लोकनिंदेचा सर्व प्रकार त्यांस ऐकविला. आणि कन्या घेऊन देशीं जाण्याकरितां प्रार्थना केली. त्यानें राजाचें म्हणणें कबूल केलें व सामानसुमान बांधून जाण्याची तयारी केली. रात्रीस जाऊन राजास तसें सांगितलें.

मग राजानें कन्येस बोलावून तिला सांगितले कीं, मुली, तुला मी देवास अर्पण केलें आहे, तर त्याचा आनंदानें अंगीकार कर. त्यानें सर्व नगर तांब्याचें करून टाकिल हा प्रत्यक्ष अनुभव पहा. यावरून तो गाढव नसून प्रत्यक्ष देव असल्याविषयीं माझी खात्री आहे. आतां तो कोण आहे वगैरे सर्व विचारपुस तूं करून घे. माझ्या सांगण्याचा अपमान करूं नकोस. नाहीतर माझ्या कुळास डाग लागेल व तो रागावला तर शाप देईल. तूं युक्तिप्रयुक्त्तीनें या गाढवाच्या देहापासून त्याची मुक्तता करून घे. त्यानें पूर्वदेह धारण केल्यावर त्या योगानें उभय कुळांचा उद्धार होईल. आतां प्रफुल्लित अंतःकरणानें कमटाच्या घरीं जा. तें बापाचें म्हणणें सत्यवतीनें आनंदानें कबुल केलें.

नंतर रात्रीं कन्येस घेऊन राजा कुंभाराच्या घरीं गेला. कमटानें बोटाच्या खुणानें जांवई ( गाढव ) दाखविल्यानंतर राजानें त्याचे पाय धरून विनंति केली कीं, महाराज ! ही माझी कन्या तुम्हांस अर्पण केली आहे, हिचें आतां आपण पालन करावें. हें राजाचें भाषण ऐकून गाढवानें सांगितलें, राजा, तूं महाभाग्यवान् आहेस म्हणून मी तुझा जांवई झालों. पण तूं माझ्या देहाकडे पाहा ! यामुळें लोक काय म्हणतील ? जो तो निंदाच करील. तरी तूं भाग्यवान् असें मी समजतो. नंतर त्यानें आपल्याला कोणत्या कारणानें इन्द्रानें शाप दिला वगैरे सर्व प्रकार सांगितला. तो ऐकून हा सुरोचन गंधर्व आहे असें समल्यावर राजास परमानंद झाला आणि आपली मुलगी त्याच्या स्वाधीन करून राजा घरीं गेला. कुंभारहि तो गांव सोडून रातोरात अवंतीनगराकडे जावयास निघाला.


अध्याय २६ संपादन


सुरोचन गंधर्वाची कथा, त्याचा पुत्र विक्रमाकडे भर्तरीचे आगमन.


तो कमट कुंभार मजल दरमजल करीत, सहकुटुंब सहपरिवार अवंतीनगरीस येऊन पोंचला. तेथें एका कुंभाराकडे जागा पाहून बिर्‍हाडास राहिला. तो सत्यवतीस आपल्या मुलीप्रमाणें पाळी. एके दिवशीं सत्यवतीनें आपल्या पतीस पहावयाचें आहे असें त्या कमट कुंभारास सांगितलें व तिच्या म्हणण्याप्रमाणे त्यानें भेट करून देण्याचें कबूल केलें. मग रात्रीं तो गाढवापाशी गेला व त्यास म्हणाला, गंधर्व महाराज, तुमच्या म्हणण्याप्रमाणें राजानें आपली कन्या तुम्हांस अर्पण कीले ती सत्यवती तुमची वाट पाहत आहे व माझ्याहि मनांत तुम्हीं उभयतांनी आतां आनंदानें वागावें असे आहे. हें कमटाचें भाषण ऐकून गंधर्व म्हणाला, लग्नाचा मंगल सोहाळा अद्यापपावेतों कोणत्याहि प्रकारानें झाला नाहीं, तरी पण असुरी गांधर्वविवाह करून सत्यवतीचा मी स्वीकार करीन, हें ऐकून कमट म्हणाला, महाराज ! आपण म्हणतां ही गोष्ट खरी आहें ; परंतु आपण पशूच्या देहानें वागत आहां. अशा अवस्थेंत मनुष्याचा संग होईल कसा ? हा माझा संशय फेडून आपल्या स्त्रीचा अंगीकार करावा. तें भाषण ऐकून गंधर्वानें उत्तर दिलें कीं तिला ऋतुकाळ प्राप्त झाला म्हणजे चौथ्या दिवशीं मी माझें मूळ स्वरूप प्रकट करून स्त्रीची मनकामना पूर्ण करीन; यास्तव तिचा चौथा दिवस मला कळवावा. हें भाषण ऐकून त्यास परमानंद झाला. त्यानें ही गोष्ट सत्यवतीस सांगितली, तेव्हां तिलाहि आनंद झाला.

पुढें काहीं दिवस लोटल्यानंतर सत्यवती ऋतुस्नान होऊन चौथा दिवस प्राप्त झाला. त्या दिवशीं कमटानें जाऊन गंधर्वास सांगितलें. तें ऐकतांच त्यानें गाढवाचा वेष टाकून सुरोचन गंधर्वीचें स्वरूप प्रकट केलें. नंतर त्यानें जडावाचे दागिने घातले व भरजरी पोषाख केला. त्यामुळें सूर्याप्रमाणें लखलखीत तेज पडूं लागलें तें तेजस्वीं रूप पाहून कमटाचा आनंद पोटांत मावेनासा झाला. स्वर्गीच्या रत्‍नाचें आज प्रत्यक्ष आपल्या घरीं दर्शन झाल्यानें आपण धन्य झालों असें त्यास वाटलें. सत्यवती दैववान म्हणून हें पुरुषरत्‍न तिला प्राप्त झालें, असे अनेक दृष्टांत योजून तो आनंदानें सुरोचनाच्या पायां पडला व विनंति करूं लागला, महाराज ! मी अज्ञानी आहें. मी दुष्टानें तुमची योग्यता न जाणतां तुम्हांस बहुत कष्ट दिले; तुमच्या पाठीवर ओझीं घातलीं, वाहनासारखा उपयोग केला व निर्दयपणानें मारलेंहि, तरी मजकडून अज्ञानपणें झालेले अपराध पोटांत घालून त्यांची क्षमा करून मला पदरांत घ्यावें, असें म्हणून त्यानें पायांवर मस्तक ठेविलें.

मग कमटानें सुरोचन गंधर्वास हातीं धरून घरांत नेलें व सत्यवती त्याच्या स्वाधीन करून तिचा प्रतिपाळ करण्यासाठी विनंती केली. मग ती उभयतां एकांतांत गेलीं. तिनें त्याची षोडशोपचारें पूजा केली. मग गांधर्वविवाह करून उभयतां अत्यंत प्रीतीनें रममाण झाली. त्याच रात्रीस सत्यवतीस गर्भसंभव झाला. गंधर्वानें तिला आपणास शाप दिल्याबद्दलचा सविस्तर मजकूर निवेदन केला. शेवटीं तो म्हणाला, हे सत्यवती ! तुला पुत्र झाला म्हणजे मी स्वर्गी गमन करीन. तुझा तो पुत्र मोठा योग्यतेस चढेल व विक्रम या नांवानें सार्वभौम राजा होईल. धैर्य, उदारपणा हेहि गुण त्याच्या अंगीं पूर्ण असतील व तो शककर्ता होईल असं पुत्ररत्‍न तूं प्रसवलीस म्हणजे मी तुझ्या ऋणांतून मुक्त झालों असें समज. मी शापमुक्त होऊन तुला टाकून स्वर्गास गेल्यानंतर तूं मजविषयीं बिलकूल दुःख मनांत आणूं नकोस. त्या पुत्रापासून तुला अनेक सुखें प्राप्त होतील. असा तिला बोध करून पुनः वेष पालटून सुरोचन गंधर्व गाढव होऊन राहिला.

सत्यवतीविषयीं लोकांच्या मनांत संशय येऊन ही मुलगी कोण आहे, असें जो तो कमटास विचारी. तेव्हां तो त्यास सांगे कीं, ही माझी मुलगी आहे. बाळंतपणासाठीं मी तिला माहेरीं आणिलें आहे. पुढें नऊ महिने भरल्यावर उत्तम वेळेवर ती प्रसुत होऊन पुत्ररत्‍न झालें. बारावे दिवशीं बारसें करून मुलास पाळण्यांत घालून त्याचें नांव विक्रम असें ठेविलें. अस्तमान झाल्यावर सुरोचन गंधर्वानें गाढवाचा वेष पालटून आपलें रूप प्रगट केलें व घरांत जाऊन स्त्रीपासून मुलास मागुन घेतलें आणी त्याचा मुखचंद्र पाहून तो शापमुक्त झाला. त्याच वेळीं त्यास आणावयासाठीं इंद्रानें मातलीस विमान देऊन पाठविलें. तो अवंतीस आल्यावर कमटाकडे गेला. त्या वेळेस सुरोचन परम स्नेहानें मुलाचे मुके घेत बसला होता. इतक्यांत मातली त्याच्याजवळ गेला त्यास म्हणाला 'गंधर्वनाथ ! तुम्हांस नेण्यासाठीं इंद्राच्या आज्ञेनें मी विमान घेऊन आलों आहें; तर आतां हा पुत्रमोह सोडून विलंब न लावतां विमानारुढ व्हावें. अमरनाथ वाट पाहात बसला आहे.

मातलीचें तें भाषण ऐकून सुरोचन गंधर्वानें मुलास सत्यवतीच्या हवाली केलें व सांगितलें कीं, मी आतां जातों तूं येथें मुलासह समाधानाने वास कर. तेव्हां ती म्हणाली, प्राणनाथ, मुलाला टाकून तुम्ही कसे जातां ? तुमच्यासाठीं मी आईबापास व त्यांच्याकडे मिळण्याऱ्या सर्व सुखांस सोडून या परदेशांत आलें. तुमच्यावांचून मला कोण आहे, असें म्हणून ती मोठमोठ्यानें रडू लागली. तिनें त्याच्या गळ्यास मिठी मारली. तेव्हां त्यानें तिला सांगितलें कीं तूं मुलासमागमें खुशाल आनंदानें राहा. ज्या वेळेस माझें तुला स्मरण होईल त्या वेळेस मी येऊन तुला भेट देईन. असें त्यानें तिलाज वचन देऊन तिचें समाधान केलें. मग मुलाला व सत्यवतीला कमटाच्या पदरांत घालून त्याची आज्ञा घेऊन गंधर्व विमानारुढ होऊन आपल्या स्थानीं गेला.

पुढें विक्रम दिवसेंदिवस वाढत चालला. त्यानें अल्पवयांत चांगली विद्या संपादन केली. पुढें सोळा वर्षाचा झाल्यावर त्यानें राजची भेट घेतली व दरबारी मंडळींत विक्रमात चांगला स्नेह झाला. राजानें त्यास गांवच्या रखवालीचें काम दिल्यामुळें पहारा करण्यासाठीं त्याला गांवात फिरावें लागे. त्याप्रमाणें तो कामगिरीवर असतां एकदां एके ठिकाणीं उतरलेले कांहीं व्यापारी आपली मालमत्ता राखण्यासाठी जागत बसलेले त्यास दिसले. त्यांत भर्तरीनाथ होता. त्यास पशुंची भाषा समजत होती. त्यानें प्रथम कोल्हे ओरडले तेव्हां चोर येणार आहेत, असें व्यापाऱ्यांस सांगितलें. त्यावरून त्यांनीं सावध राहून चोरांचा मोड केला. दुसऱ्या वेळीं कोल्हे भुंकूं लागले तेव्हां भर्तरी व्यापाऱ्यांस म्हणाला, उत्तरेकडून दक्षिणेकडे जावयास एक राक्षस मनुष्यावेषानें येत आहे, त्यास मारून त्याच्या रक्तांचा टिळा गांवच्या दरवाजास व आपल्या कपाळास जो लावील तो अवंतीमध्यें सार्वभौम राजा होईल. हें भर्तरी बोलावयास व विक्रम त्याच समयीं रस्त्यानें जावयास एकच गांठ पडली.

पूर्वी सांगितल्याप्रमाणें चित्रमा गंधर्व पार्वतीच्या शापानें राक्षस होऊन फिरत होता. त्यास शंकराने उःशाप दिला होता कीं, सुरोचन गंधर्व शापबद्ध होऊन पृथ्वीवर फिरेल; त्याच्या वीर्यापासून जो विक्रम नावांचा पुत्र होईल त्याच्या हातून तूं मारला जाशील व राक्षसयोनींतून मुक्त होशील; तोच हा राक्षस . राक्षस मारल्यावर तो राजा होईल म्हणुन जें भर्तरीनें सांगितलें, तें त्याच विक्रमाविषयीं व त्यानें तें ऐकलेंहि होतें.

तो चित्रमा गंधर्व राक्षस झाला होता तरी पण या वेळी मनुष्यवेष घेऊन तो उत्तरेकडून दक्षिणेस जात होता. इतक्यांत विक्रमानें त्यास शस्त्रप्रहार करून जमिनीवर पाडलें व त्याच्या रक्तानें वस्त्रें भिजविलीं आणि आपल्या कपाळीं एक टिळा रेखिला. त्याच वेळीं राक्षसरूपी गंधर्व शापमुक्त होऊन लागलेंच विमान आलें; त्यात बसुन तो जाऊं लागला, त्यास विक्रमानें विचारलें कीं, तूं राक्षस असतां स्वर्गास जातोस ही गोष्ट नीटशी माझ्या लक्षांत येत नाहीं. मग त्यानें त्यास शंकर-पार्वतीच्या खेळापासूनचा साद्यंत वृत्तांत निवेदन केला आणि मी चित्रमा गंधर्व आहें असें सांगून तो स्वर्गास गेला. विक्रमानें राक्षसाचें प्रेत चांचपून पाहिलें तों त्याच्या मुठींत चार रत्‍नें सांपडली. ही साक्ष पटतांच त्यानें मनांत भर्तरीची वाखाणणी करण्यास आरंभ केला व हा पुरुष आपल्याजवळ असावा असें त्याच्या मनांत आलें. नंतर राक्षसाच्या रक्ताचा टिळा गांवच्या दरवाजास त्यानें लावला.

मग विक्रम त्या व्यापाऱ्याकडे पुनः गेला. त्या वेळेस ते सर्व भर्तरीस मध्यभागीं घेऊन जागत बसले होते. तुम्ही कोण वगैरे व्यापाऱ्यांनीं विक्रमाला विचारिलें.तेव्हां विक्रमानें आपलें नांव सांगून तुमच्या गोष्टींत मन रमलें म्हणुन आंत आलों असें त्यांस सांगितलें. त्यावर तुम्हीं आमच्या कोणत्या कोणत्या गोष्टी ऐकल्या म्हणून व्यापाऱ्यांनीं विक्रमास विचारल्यावर तो म्हणाला, माझा पहारा जवळच आहे, त्यामुळें तुमच्या सर्व गोष्टी मला ऐकूं आल्या. पण तुमच्यावर जी चोरांची धाड आली तिचा सुगावा तुम्हांस पूर्वीच कसा लागला याचा शोध करण्यासाठीं मी आलों आहें चोरांचा सुगावा काढण्याची युक्ति तुमच्याकडून समजल्यास आम्हांस बंदोबस्त ठेवण्यास ठीक पडेल. ते म्हणाले, चोरांच्या टोळींत एकंदर किती मंडळी असतील ती नकळे; पण सुमारें शंभर असामी तर आम्हीं पाहिलें, ते चोर येण्याच्या पूर्वीं कांहीं वेळ अगोदर कोल्हे भुंकत होते, ती त्यांची भाषा आमच्याबरोबर जो भर्तरी नांवाचा मुलगा बसला आहे त्यास समजते. त्यानें चोर लुटावयास येणार आहेत हें आम्हांस सांगितल्यावरून आम्ही सावध राहिलों होतों. तेव्हां विक्रमानें त्यास ( भर्तरीस ) पुरें लक्षांत ठेवलें. मग कांहीं वेळानें तो तेथून निघून गेला.

सुमारे घटिका रात्र राहिल्यावर एक जकातदार शौचास जात होता. त्यास विक्रमानें एकांतीं सांगितलें कीं, गांवाबाहेर जे व्यापारी आले आहेत त्यांच्यापाशीं जकातीचा पैसा तुम्ही मागूं नका त्याच्याऐवजीं मी तुम्हांस तिप्पट रक्कम देईन. तुम्हीं त्यांना तो पैका माफ करून भर्तरी नांवाच्या मुलास माझ्याकडें घेऊन यावें. तो माझ भाऊ आहे. तो माझ्या हवाली कराल तर तुम्हांस अतोनात पुण्य लाभेल. अशा प्रकारें विक्रमानें जकातदाराची विनवणी केली व द्रव्यलोभस्तव जकातदारानें वचन देऊन विक्रमाचें म्हणणे कबुल केले.

पुढें कचेरींत आल्यावर जकातदारांनें शिपाई पाठवून त्या व्यापाऱ्यांस बोलावून आणलें आणि मालाची टीप करून दस्तुरीच्या पैक्याचा आंकडा केला. मग तुम्हांमध्यें भर्तरी नांव कोणाचें आहे म्हणून त्यानें व्यापाऱ्यांस विचारलें. तें ऐकून व्यापाऱ्यांनीं भर्तरीस बोलावून जकातदारास दाखविलें. त्यास पाहतांच त्याच्या तेजावरून हा कोणी तरी अवतारी असावा, असें जकातदारास वाटलें. त्यानें व्यापाऱ्याच्या मुख्यास एकीकडे नेऊन सांगितलें कीं, तुमच्याकडे जकातीचा जो आंकडा येणें आहे; त्याची मी तुम्हांस माफी करून देतो; पण तुमच्याकडे जो भर्तरी आह, त्यास कांहीं दिवस आमच्याकडे राहूं द्या. असे बोलून त्यानें त्यास पुष्कळ प्रकारें समजावून वळवून घेतलें.

मग व्यापाऱ्यानीं भर्तरीस दोन गोष्टी सांगुन त्यास खूष केलें व ऐवज वसूल करून त्यांतून जकातीची रक्कम घेण्याबद्दल जकातदरास सांगितल्यावर भर्तरीस जकातदाराच्या स्वाधीन केलें. तसेंच माल विकून कोणाकडे काय येणें राहिलें आहे. हें जकातदारास माहीत आहे, यास्तव ह्यांच्या मार्फतीनें सारा वसूल कर, तुला जी मदत लागेल ती हे करतील, असे भर्तरीस बजावून व त्यास जकातदाराकडे ठेवून व्यापारी निघून गेले.

मग जकातदारानें विक्रमास बोलावून आणिलें व त्यास जकातीच्या रकमेच्या आंकडा दाखवून तो सर्व पैसा भरावयास सांगितलें तेव्हां विक्रमानें आपल्याजवळचें एक रत्‍न जकातीचा ऐवज पटेपर्यंत त्याच्याजवळ गहाण ठेविलें आणि सांगितल्यें कीं, तूर्त भर्तरीस माझ्याकडे नुसता भोजनास पाठवीत जा. पुढें हळूहळू ओळख पटेल. असें विक्रमाचें मत पाहून जकातदारानें भर्तरेच्या देखत विक्रमास सांगितलें कीं, आमचा हा गडी आहे; ह्याची भोजनाची सोय तुजकडे कर. तुझी आई स्वयंपाक करील व शिधा मी येथून धाडीत जाईन. याप्रमाणें ठरल्यावर त्याचीं बोलणें विक्रमानें मान्य केलें व भर्तरीस घेऊन तो आपल्या घरीं गेला. घरीं ओटीवर चार घटका उभयंतांचे बोलणें झालें. मग विक्रमानें रात्रीं झालेला हा सर्व प्रकार आईस सांगितला, तेव्हां तिला अति आनंद झाला.

मग पुत्राप्रमाणेंच भर्तरीचें संगोपन करण्यासाठीं विक्रमानें आईस सांगितलें . भोजन झाल्यावर भर्तरी तेथेंच राहिला. तो जकातदाराकडे गेला. तेव्हां त्यास सांगितलें कीं, तूं विक्रमाच्याच घरी राहा मला कारण पडेल तेव्हां मी तुला बोलावीन. मग भर्तरी विक्रमाकडे राहूं लागला, ती दोघें मायलेक भर्तरीवर अतिशय ममता करीत व तीं तिघें अगदीं आनंदानें वागत.


अध्याय २७ संपादन


विक्रम राजाचा सुमेधावतीबरोबर विवाह, भर्तरीचा पिंगलेबरोबर विवाह व दत्तात्रेयाची भेट


अवंतीनगरात शुभविक्रम या नांवाचा एक राजा राज्य करीत होता. त्यास सुमेधावती या नांवाची एकच कन्या होती. ती अति रूपवति होती. एके दिवशीं ती आपल्या बापाच्या मांडीवर बसली असतां तिचें लग्न करावें, असें त्याच्या मनांत आलें. नंतर त्यानें प्रधानापाशीं गोष्ट काढिली कीं, सुमेधावती उपवर झाली आहे,याकरितां तिच्या रूपास योग्य असा वर शोधून पाहावा. त्या बोलण्यावर सुमंतीक प्रधानानें सांगितलें कीं , माझ्या मनांत एक विनंति करावयाची आहे, ती अशी कीं, आपला आतां वृद्धापकाळ झाला आहे; पुत्र होण्याची आशा मुळींच नाहीं; कन्येच्या मुखाकडे पाहून, काय तें सुख मानावयाचें ! यास्तव कन्येस मी जो उत्तम वर पाहिन त्यास राज्यावर बसवून कन्या अर्पण करावी. जांवई तुम्हांस पुत्राच्या ठिकाणींच आहे. त्यास गादीवर बसविल्यानें राज्यव्यवस्था चालू पद्धतीस अनुसरून उत्तम रीतीनें चालेल व तुम्ही काळजींतून दूर व्हाल.

सुमंतीक प्रधानानें ही काढलेली युक्ति राजाच्या मनास पटली व त्यानें त्याच्या म्हणण्यास रुकार दिला. तो म्हणाला, प्रधानजी तुम्हीं ह्या प्रसंगीं ही फार चांगली युक्ति मला सुचविली. यास्तव अतां असे करा कीं, हत्तीच्या सोंडेंत माळ देऊन ईश्वरी इच्छेनें तो ज्याच्या गळ्यांत ती माळ घालील त्यास राज्यावर बसवून नंतर कन्येचा त्याशीं विवाह करावा, हा विचार मला चांगला वाटतो. शुभविक्रम राजनें काढलेली ही तोड प्रधानास रुचली. मग त्यानें राजाज्ञेनें सुमुहूर्तावर एक मोठा मंडप घालून दरबार भरविला गुढ्यातोरणें उभारून आनंदानें नगरांत धामधूम चालली. नंतर हत्तीस श्रुंगारून त्याच्या सोंडेंत माळ देऊन त्यास सोडलें. राजा, प्रधान, सरदार, मानकरी व नागरिक लोक अशी पुष्कळ मंडळी त्याच्यामागून जात होती.

हत्तीनें प्रथम सभामंडपातलें लोक अवलोकन केले; पण तेथें कोण्याच्याहि गळ्यांत माळ न घालिता तो शहरांत चालला. तो सर्व नगर फिरत फिरत किल्ल्याजवळ जाऊन उभा राहिला. त्यावेळीं किल्ल्यावर विक्रमासह आठजण पाहारेकरी होते. त्यांस राजानें खालीं बोलाविलें. ते आल्यानंतर त्यांपैकीं विक्रमाच्या गळ्यांत हत्तीनें मोठ्या हर्षानें माळ घातली. ती घालतांच वाद्यें वाजूं लागली व सर्वास मोठा आनंद झाला. मग विक्रामास मोठ्या सन्मानानें हत्तीवर बसवून वाजतगाजत मोठ्या वैभवानें सभामंडपांत आणलें. तेव्हां हा कुंभार आहे असें लोक आपापसांत बोलूं लागले. ही गोष्ट राज्याच्याहि कानीं आली. मग त्यानें प्रधानास एकीकडे नेऊन सांगितलें कीं, हा कुंभार आहे अशी लोकांत चर्चा होत आहे. ही गोष्ट खरी असेल तर आपली मुलगी त्यास देणें अनुचित होय.

राजानें असें सांगितल्यावर प्रधानहि फिकिरींत पडला. परंतु दूरवर नजर पोंचवून त्यानें विक्रमाच्या साथीदारांस बोलावून आणिलें व एकीकडे नेऊन तो विक्रमाच्या जातीची त्यांच्यापाशीं विचारपूस करुं लागला. तेव्हां ते म्हणाले, विक्रम जातीचा कोण आहे ह्याविषयीं आम्हांला नक्की माहिती नाही; पण त्यास कुंभार म्हणतात. तर त्या जातीच्या लोकांत चौकशीं केली असतां, ह्याची जात कोणती आहे ह्याचा पक्का शोध लागेल. मग प्रधानानें कमट कुंभारास बोलावून आणलें व त्यास विचारिलें. तेव्हां तो म्हणाला कीं, मिथिलानगरीच्या सत्यवर्मा राजाची कन्या सत्यवती ही याची माता व स्वर्गीत राहाणारा गंधर्व सुरोचन हा याचा पिता होय. तें कमटाचें भाषण ऐकतांच प्रधानास परमानंद झाला. मग कमटास घेऊन प्रधान राजापाशीं गेला व खरें वर्तमान त्याच्याकडून राजास कळविलें. तेव्हां राजासहि परम संतोष वाटला. शेवटीं खुद्द सत्यवर्मा राजास घेऊन येण्याबद्दल प्रधानानें राजास सुचविलें व त्या गोष्टीस राजाची संमति घेतली.

राजाज्ञा मिळाल्यावर प्रधान कमटास समागमें घेऊन सत्यवर्मा राजास आणावयाकरितां मिथिलानगरीस गेला. तेथे गेल्यावर त्यानें राजाची भेट घेतली. त्याचा सत्यवर्मा राजानें चांगला आदरसत्कार केला. मग कमटानें राजास अवंतीनगरांतील विक्रमाचा समग्र इतिहास कळविल्यानंतर, सुरोचनगंधर्व विक्रमाचा समग्र इतिहास कळविल्यानंतर, सुरोचनगंधर्व स्वर्गास गेला हेंहि सांगितलें शेवटीं, तो कमट कुंभार राजास म्हणाला, विक्रमाच्या जातीविषयीं तेथील लोकांस संशय आहे. यास्तव आपण आमच्याबरोबर तेथें येऊन त्यांच्या संशयाची निवृत्ति करावी.

सत्यवर्मा राजाने तें सर्व ऐकून घेतल्यानंतर त्यास परमानंद झाला. त्यानें स्वतः अवंतीस जाऊन आपली कन्या सत्यवती हिची भेट घेतली. तेव्हां सर्वांच्या संशयाची निवृत्ति झाली. मग विक्रमास राज्याभिषेक झाला. दानधर्म पुष्कळ करून याचक जनांस संतुष्ट केलें. नंतर शुभविक्रमराजानें आपली मुलगी सुमेधावती विक्रम राजास दिली. तो लग्नसमारंभहि मोठ्या थाटाचा झाला. शेवटीं सत्यवर्मा राजानेंहि आपलें राज्य विक्रमास अर्पण केलें.

याप्रमाणें विक्रम दोन्ही राज्यांचा राजा झाल्यानंतर भर्तरी युवराज झाला. ते दोघे एकविचारानें राज्यकारभार करीत असतां सुमंतीक प्रधानानें आपली मुलगी पिंगला ही भर्तरीस द्यावी असें मनांत आणून ती गोष्ट त्यानें विक्रमराजाजवळ काढिली. त्याचें म्हणणें विक्रमानें कबूल करून लग्न नक्की केलें. तेव्हां त्याच्या जातीचा प्रथम शोध करण्यासाठी एक परिटानें प्रधानास सूचना केली. त्यावरून त्यानें कुंभारास विचारिलें असतां त्या कमटाने आपणास याची जात माहित नाही म्हणून सांगितलें. मग ही गोष्ट त्यानें सत्यवतीस विचारली. परंतु तिनें तो माझ्या पोटचा मुलगा नाहीं म्हणून कळविल्यावर प्रधानानें विक्रमास विचारलें. त्यानेंहि सांगितलें कीं, आपल्या जातीची मला माहिती नाहीं, मी त्याला आपला भाऊ मानिला आहे. याप्रमाणे तिघांनी सांगितल्यानंतर प्रधानानें ही गोष्ट खुद्द भर्तरीस विचारली. तेव्हां त्यानें आपला जन्मवृत्तांत त्यास निवेदन केला. मग प्रधानानें त्यास सांगितले कीं, जर सूर्यापासून तुम्ही झालां आहां, तर त्यास लग्नासाठी येथें बोलवा. तो तुमचा पिता असल्यानें अगत्यानें येईल. तें ऐकून भर्तरी म्हणाला, ही गोष्ट कांहीं अवघड नाहीं.

नंतर भर्तरीनें अंगणांत उभें राहून वर तोंड केलें आणी सूर्याची प्रार्थना केली कीं, जर मी तुझा मुलगा असेन तर माझ्या लग्ना करितां येथवर येऊन सर्वाच्या संशयाची निवृत्ति करावी, ती पुत्राची प्रार्थना ऐकून सुर्य मृत्युलोकीं अवंतीनगरास आला. त्यानें सुमंतीक प्रधानाची भेट घेतली व त्यास सांगितलें कीं, मनांत कांहीएक संशय न आणतां माझ्या भर्तरीस तूं आपली मुलगी पिंगला दे. नंतर सूर्य त्यास म्हणाला, लग्नाच्या मंगल कार्यास नवऱ्यामुलाचा बाप जवळ असावा असें तुं म्हणशील, तर तूं त्याची काळजी बाळगूं नकोस. प्रत्यक्ष देव जयजयकार करून पुष्पवृष्टि करतील. विक्रमराजाचा बाप जो सुरोचर गंधर्व, त्याससुद्धां या लग्नाकरितां येथें धाडून देईन. मात्र मी जर या ठिकांनीं लग्नाकरितां राहिलों तर माझा ताप लोकांस सहन होणार नाहीं. इतकें सांगितल्यानंतर प्रधानाचा संशय गेला व त्यानें लग्नसमारंमास आरंभ केला.

भर्तरीच्या लग्नाच्या दिवशी सीमंतपुजनाच्या वेळी राजाचा पिता सुरोचन गंधर्व स्वर्गाहून खाली आला. तो सत्यवतीस व विक्रमात भेटला. त्या वेळी विक्रमराजा पित्याच्या पायां पडला. मग राजानें सुमंतीक प्रधानास बोलावून आणलें व सुरोचनास भेटविलें त्यां गंधर्वानें प्रधानास म्हटलें, तुझें थोर भाग्य म्हणून धृमीननारायणाचा अवतार जो भर्तरी तो तुझा जांवई झाला. हा प्रत्यक्ष मित्रावरूणीचा ( सूर्याचा ) पुत्र होय. अशी त्याची समग्र मूळकथा सांगितल्यानंतर प्रधान पुन्हां सुरोचनाच्या पायां पडला व त्यास आग्रह करून सन्मानानें सीमंतपूजनासाठीं मंडपांत घेऊन गेला. तेव्हां त्या गंधर्वानें मनुष्याचा वेष घेतला होता. सीमंतपूजन झाल्यावर वधुवरांस आशीर्वाद देतेस मयीं स्वर्गीतून देवांनी पुष्पवृष्टि केली व लग्नमंडपांत असलेल्या लोकांनी टाळ्या वाजवून जयघोष केला.नंतर पांच दिवसपर्यंत लग्नसमांरभ मोठ्या थाटानें करून सर्वांस उत्तम वस्त्रें, भूषण दिलीं व वर्‍हाडी मंडळी मोठ्या गौरवानें रवाना केली. त्या लग्नासमयीं गोरगरिबांस राजानें पुष्कळ द्रव्य देऊन संतुष्ट केलें.सुरोचन गंधर्व आणि सत्यवती मुलाच्या लग्नसमारंभांत व्याही व विहीण म्हणून मिरवत होती. सुरोचन तेथें एक महिनाभर राहिला होता. नंतर सर्वांस भेटून व त्यांची परवानगी घेऊन तो आपल्या स्थानी गेला.

भर्तरीचें पिंगलेशीं मोठ्या थाटाने विवाह लागल्यानंतर पुढें कांहीं दिवसांनीं त्यानें दुसऱ्याहि स्त्रिया केल्या. त्यास एकंदर बाराशें स्त्रिया होत्या. त्यांत मुख्य पट्टराणी पिंगलाच होती, ही उमयतां अत्यंत प्रीतीनें वागत. त्यांना एकमेकांचा वियोग घटकाभर सुद्धां सहन होत नसे. तो मोठा विषयी होता. यास्तव त्यास रात्रदिवस स्त्रियांचे ध्यान असे. अश रीतीनें भर्तरीराजा सर्व सुखांचा यथेच्छ उपभोग घेत असतां बरीच वर्षे लोटली.

एके दिवशीं भर्तरी अरण्यांत शिकारीकरितां जात असतां, मित्रावरूणीनें ( सूर्यानें ) त्यास पाहिलें व मनांत विचार केला कीं, माझे पुत्र दोन; एक अगस्ती व दुसरा भर्तरीनाथ, त्यापैकीं पहिल्यानें तर ईश्वरप्राप्ति करून घेऊन आपलें हित साधून घेतलें, पण दुसरा भर्तरीनाथ मात्र विषयविलासांत निमग्र होऊन आपले कर्तव्यकर्म विसरला. यास्तव हा आपलें स्वहित साधून घेईल, असा कांही तरी उपाय योजिला पाहिजे.

मग भर्तृहरी ( भर्तरी ) चा भ्रम उडावा आणि त्यानें आपल्या हिताचा मार्ग पाहावा म्हणून मित्रावरूणीनें पृथ्वीवर येऊन दत्तात्रयाची भेट घेतली व समग्र वर्तमान निवेदन करून आपला हेतु कळविला. तेव्हा दत्तात्रेयानें सूर्यास सांगितल्यें कीं, भर्तरीविषयी तूं कांहीं काळजी न करितां आपल्या स्थानास जा; मी त्यास नाथपंथी म्हणुन मिरवून त्रैलोक्यांत नांवाजण्याजोगा करीन, तुझा पुत्र भर्तरी हा माझ्या आशीर्वादानें चिरंजीव होईल. ह्यापूर्वीच जें भविष्य करून ठेविलिलें आहे तदनुसार घडून आल्यावांचून राहावयाचें नाहीं, परंतु तूं मला आठवण केलीस हें फार चांगलें झालें आतां तूं पुत्राविषयीं कांही एक काळजी न वाहतां खुशाल जा: मला जसें योग्य दिसेल तसें मी करीन. इतकें सांगुन सूर्यास रवाना केलें व दत्तात्रेय भर्तृहरीसमगमें गुप्तपणें जाऊं लागला.

भर्तृहरी अरण्यांत शिकारीला गेला, त्या वेळी त्यानें अपार सेना समागमें घेतली होती. चौत्राचा महिना असल्यानें प्रखर उन्हाचे दिवस होते त्या दिवशी तिसरा प्रहर होऊन गेला. तरी त्यास कोठें पाणी मिळेना. तहानेनें ते लोक कासावीस होऊं लागले. त्यानीं बराच शोध केला, पण उदकाचा पत्ता लागेना, सर्वजण व्याकुल होऊन चौफेर पडून राहिले. राजाहि पाणी पाणी करीत होता व त्याच्या घशास कोरड पडली. बोलण्याचें अवसानहि राहिलें नाही. अशी सर्वांची अवस्था होऊन गेलीं. तें पाहूण दत्तात्रेयानें एक मायावी सरोवर निर्माण केलें. त्याच्या आजूबाजूस मोठेमोठे वृक्ष असून ते फलपुष्पांनी लादलेले व थंडगार वारा सुटलेला व तेथें पक्ष्यांचा किलकिलाट चालला होता. अशा सुंदर व रमणीय स्थानीं दत्तात्रेय आश्रम बांधून राहिलेले दिसत होते.

भर्तहरी स्वतः अरण्यामध्यें पाण्याचा शोध करीत फिरत होताच त्याच्या दृष्टीस हें सरोवर पडलें. तेव्हां तो एकटाच उदक पिण्यासाठी त्या सरोवराच्या कांठीं गेला व आतां पाणी पिणार इतक्यांत पलीकडे दत्तात्रेयानें ओरडून म्हटलें, थांब थांब ! उदकास स्पर्श करूं नकोस. तूं कोण आहेस ? तुझें नांव काय ? तें मला प्रथम सांग. दत्तात्रेयस्वामीस पाहतांच राजा चकित झाला आणि त्यास भीतीहि उत्पन्न झाली. तो तोंडांतून ब्रहि न काढितां, टकमक पाहूं लागला. तेव्हां दत्तात्रेयानें त्यास म्हटलें कीं तूं बोलत कां नाहींस ? तूं कोण आहेस ? तुझे आईबाप कोण ? गुरु कोण ? हें मला सांग व मग पाणी पी. तें भाषण ऐकून भर्तहूरी दत्तात्रेयाच्या पायां पडला. नंतर त्यानें आपली सविस्तर हकीगत त्यास सांगितलीं व अजूनपर्यंत गुरु केला नाहीं असें सांगितलें. तेव्हां दत्तात्रेयानें त्यास सांगितलें की, ज्याअर्थीं अद्यापपावेतों तूं गुरु केला नाहींस, त्या अर्थी तूं अपवित्र आहेस म्हणुनच तुला अजून कोणी गुरु मिळाला नाहीं, याकरितां तूं उदकास शिवूं नको. शिवशील तर तें सर्व पाणी आटून तळें कोरडें पडेल व मग मला राग येईल. तेणेंकरून तूं नाहक भस्म होऊन जाशील.

अशा प्रकरें दत्तात्रेयानें भर्तृहरीचा धिक्कार केल्यानंतर तो स्वामीच्या पायां पडून प्रार्थना करूं लागला की, महाराज ! माझा प्राण तृषेनें जाऊं पाहात आहे; आपन अनुग्रह करून मला उदक पाजावें. त्यावर दत्तात्रेयानें सांगितलें कीं, माझ्या अनुग्रहास तूं योग्य नाहींस, शंकर, ब्रह्मदेव माझ्या अनुग्रहासाठीं खेपा घालितात; असें असतां, तूं मला अनुग्रह करावयास सांगतोस ही गोष्ट घडेल तरी कशी ? हें ऐकून भर्तृहरी म्हणाला, तें कसेंहि असो, तुम्हीं कृपाळू आहां; दया क्षमा तुमच्या अंगीं आहे, तर कृपा करून मला उदक पाजावें व माझे प्राण वांचवावें. तेव्हां दत्तात्रेयानें त्यांस सांगितलें कीं, तुं म्हणतोस तर मी तुला अनुग्रह देतों; पण तूं बारा वर्षेपर्यंत तपश्चर्या करून अनुग्रह घेण्यास योग्य हो. त्यावर राजा म्हणाला, सध्यांच माझा प्राण जात आहे; मग बारा वर्षे कोणीं पाहिलीं आहेत ? दत्तात्रेयानें त्यास समजावून सांगितलें कीं, तूं मनाचा निग्रह करून संकल्प सोड, म्हणजे मी तुला उदक पाजतों, पण पुनः संसाराची आशा धरतां कामा नये व अगदीं विरक्त होऊन राहिलें पाहिजे. ह्या सर्व गोष्टी तुला पत्करत असल्या तर पाहा. तें भाषण ऐकून राजा कुंठित होऊन विचार करीत बसला. त्यानें शेवटीं पोक्त विचार करून दत्तात्रेयास सांगितलें कीं मी अजून प्रपंचांतून मुक्त झालों नाहीं गयावर्जन करून पितुऋणांतून मुक्त होईन. तसेंच कांतेस पुत्र झाल्यावर तिच्या ऋणांतून मुक्त होईन. पुत्राचें लग्न झाल्यावर त्याच्या ऋणांतून मुक्त होईन. हीं सर्व ऋणें अद्यापर्यंत जशीच्या तशींच कायम आहेस: यास्तव आणखीं बारा वर्षें मला संसार करण्याची मोकळीक द्यावी.

मग दत्तात्रेयानें भर्तृहरीचें म्हणणें कबूल केलें व त्यास पिण्यास पाणी देऊन अनुग्रह दिला. त्याच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेवून कानांत मंत्र सांगितला आणि आपण दत्तात्रेय आहों असें सांगून त्यांस ओळख दिली. नंतर तें मायिक सरोवर अदृश्‍य करून आपणहि गुप्त झाला. पाण्यावांचून सर्व तळमळत असल्यामुळें इतकी खटपट करून व्यर्थ असें भर्तृहरीस वाटून त्यानें श्रीदत्तात्रेयाची प्रार्थना केली. मग दत्तात्रेयानें भोगावतीचें उदक आणून सर्वांस पाजिलें. कामधेनूपासून अन्न निर्माण करविलें; शेवटीं राजा सैन्यासह भोजन करून व पाणी पिऊन तृप्त झाल्यावर दर्शन घेऊन आपल्या नगरास गेला. इतक्यांत दत्तात्रेय भोगावतीस व कामधेनूस रवाना करून आपणहि निघून गेले.


अध्याय २८ संपादन


पिंगलेचे भर्तरीवरील प्रेम; त्याच्या कसोटीकरितां पाठविलेला निरोप; त्याचा दुष्परिणाम


अरण्यामध्यें दत्तात्रेयानें अनुग्रह दिल्यानंतर भर्तृहरीनें संसार करण्यासाठीं त्याजपाशीं बारा वर्षांचीं मुदत मागितली. ती मिळाल्यानंतर तो उज्जैनीस गेला व रात्रीं भोजन झाल्यानंतर पिंगलेच्या महालांत गेला. महालांत जातांच पिंगलेनें त्यास सुवर्णाच्या मंचकावरील पुष्पशय्येवर बसवून त्याची पूजा केली व राजावरील आपलें प्रेम व्यक्त केलें. तीं उभयतां अगदीं जवळ बसून विनोदाचीं भाषणें करूं लागली. मग राजानें तिला आपल्या डाव्या मांडीवर बसवून तिचे मुके घेतले व सर्वांमध्यें तूं माझी आवडती आहेस; आपल्या दोघांच्या कुडी दोन, पण प्राण एकच आहे, अशा भावार्थाचीं व विनोदाचीं पुष्कळ भाषणें झालीं.

नंतर पिंगलेनें राजास तांबूल दिला आणि म्हटलें, महाराज, ब्रह्मदेवानें आपला जोडा निर्माण केला, त्याप्रमाणें योगहि घडून आला. आपली एकमेकावरची प्रीति म्हटली म्हणजे जसें मीठ पाण्यांत मिळून एकत्र होतें, त्याचप्रमाणें आपलें दोघांचें मन एक होऊन गेलें आहे; परंतु निर्दय कृतांत केव्हा धाड घालील ही भीति आहे. तुमच्यापूर्वी मी मरावें हा मार्ग उचित होय व ईश्वरकृपेनें जर असा योग घडून आला, तर मी मोठी भाग्यवती ठरेन. असें पिंगला राणी बोलत असतां भर्तृहरे तिला म्हणाला, प्रिये ! ह्या गोष्टी ईश्वराधीन आहेत, आपल्या कोणाच्या हातांतील नाहींत. त्याचा संकेत काय आहे हें आपणांस कसें समजणार ? माझ्यपूर्वीं तूं मरण इच्छीत आहेस ही गोष्ट कांहीं वाउगी नाहीं. परंतु सूर्यपुत्र ( यम ) अगदी निर्दय आहे. त्याच्यामध्यें विचाराचा लेशसुद्धां नाहीं. तेव्हां न जाणों, जर तुझ्याअगोदर मी मरण पावलों तर पुढें तूं आपले दिवस कसे काढशील ? तेव्हां पिंगला म्हणाली, ब्रह्मदेवानें कपाळीं काय लिहिलें आहे हें कळत नाही. पण जर तुम्ही म्हणता अशी गोष्ट घडून आली, तर मी जीव ठेवणार नाही. अग्नीत देहाची आहुति तुमच्या समागमें देईन.

पिंगला राणीचें हें भाषण ऐकून भर्तृहरि म्हणाला, मी जिवंत आहें तोंपर्यत तुझें हें बोलणें ठीक आहे. परंतु स्वतःच्या जिवासारखी प्रिय वस्तु दुसरी कोणतीच नाही. म्हणून जिवाचा घात कोणाच्यानं करवत नाहीं. मला खूष करण्यासाठी तुझें हें सारें बोलणें; पण प्रसंग पडल्यानंतर हें बोलणें असेंच राहून जाईल ! राजाच्या या भाषाणावर पिगंलेनें उत्तम दिलें कीं, मी मनःपूर्वक बोललें तरी तुम्ही तें खरें मानीत नाहीं. परंतु इतकी पक्की खात्री असूं द्या कीं, वैधव्याचा डाग मी माझ्या देहास कदापि लागूं देणार नाही. कशावरून म्हणाला तर काया, वाचा, मन हीं मी तुम्हांस अर्पण केलीं आहेत. ह्यास साक्ष ईश्वर आहे. तो ईश्वर सत्यवादी असल्याचें सर्व जग म्हणून सांगतें. म्हणून मी विधवा राहाणार नाहीं हें खचित, अशा रीतीनें त्याची समजुत करून ती उगीच राहिली व राजानहि ह्या भाषणाचा अनुभव पाहण्याचा निश्चय केला.

पुढें एके दिवशीं राजा अरण्यांत शिकारीस गेला असतां त्यास राणीच्या ह्या भाषणाची आठवण झाली. तेव्हां त्यानें असा प्रकार केला कीं, एक मृग जिवंत धरिला आणि त्याचा वध करून आपला मुकुट व वस्त्रें त्याच्या रक्तानें भिजविलीं. नंतर तीं एक सेवकाजवळ देऊन त्यास सांगितलें कीं, हीं वस्त्रें घेऊन तूं पिंगलेकडे जा व तिला सांग कीं, राजा शिकार करीत असतां वाघानें त्याच्यावर झडप घालून त्याचा घात केला. हा निरोप तिला कळविल्यासाठी राजानें त्या सेवकास अंवतीस पाठविलें व आपण अरण्यांत स्वस्थ बसून राहिला.

राजाच्या सेवकानें अवंतीस जाऊन पिंगलेची भेट घेतली व ती रक्तानें भरलेलीं वस्त्रें पुढें ठेवून हात जोडून उभा राहिला. राजानें शिकवून ठेविल्याप्रमाणें त्यानें पिंगलाराणीस निरोप सांगितला व राजाच्या कलेवराचें दहन करून त्याच्याबरोबर गेलेलें उष्कर लौकरच परत येईल, असें म्हटलें. सेवकाचे हे शब्द पिंगलेच्या कानीं पडले मात्र, तोंच तिची जी अवस्था झाली ती वर्णन करतां येत नाहीं. ती कपाळ बडवून घेऊं लागली. केस तोडूं लागली, हेल काढून मोठमोठ्यानें रडूं लागली. इतक्यांत राजवाड्यांत हे दुःखकारक बातमी पसरली. ती ऐकून राजाच्या बाराशें स्त्रिया रडत ओरडत धांवत आल्या व त्यांनीहि अतिशय शोक केला. पिंगलेस मात्र सर्वापैक्षां विशेष दुःख झालें

शेवटी पिंगलेनें सती जाण्याचा निश्चय करून सर्व तयारी केली. राजाचें वस्त्र परिधान केलें, वाणें घेतलीं व समारंभानें स्मशनांत जाऊन अग्नि तयार केला. सर्वांनी तिला आशीर्वाद दिले. नंतर तिनें अग्निकुंडांत उडी टाकून आपलें स्वहित साधून घेतलें. त्या वेळीं संपूर्ण नगरवासी लोक शोक करीत आपपल्या घरीं गेलें.

इकडे अस्तमान होऊन रात्र झाल्यावर राजा नगरांत जावयास निघाला. त्यावेळीं आपल्या मरणाची बातमी सांगण्यासाठी राजवाड्यांत जो सेवक पाठविला होता त्याची राजास आठवण होऊन त्याच्या मनांत नानाप्रकारच्या वाईट कल्पना येऊं लागल्या.

असा मोठा प्रसंग गुदरला असतांहि भर्तृहरीचा बंधु विक्रमराजा स्वस्थ कसा राहिला, ही कल्पना साहजिकच मनांत येते. तसेंच ज्या नोकरानें राजवस्त्रें नेऊन पिंगलेस दिलीं होतीं, तो तरी या पल्ल्यास गोष्ट येऊन ठेपेपर्यंत स्वस्थ कसा बसला, अशीहि शंका येते. परंतु या गोष्टीविषयींचा विचार करून पाहतां असें दिसतें कीं, तो सेवक वस्त्रें नेऊन दिल्यानंतर फार वेळ तेथें न राहतां तसाच परत भर्तृहरीकडे अरण्यांत गेला; परंतु राजा दुसऱ्या रस्त्यानें परतल्यामुळें त्यांची चुकामुक झाली. तो सेवक मागाहून त्यांस जाऊन मिळाला. तसेंच त्या समयीं विक्रमराजा मिथुलनगरास आपल्या आजोळी गेला होता. सुमंतीक प्रधान, शुभविक्रम राजा वगैरे मंडळीही राजासमागमें गेलीं होती. राजवाड्यांत फक्त स्त्रियाच होत्या. गांवकरी लोकांनी पिंगलेस सती जाण्याविषयीं हरकत केली होती, पण तिच्यापुढें कोणाचें कांही चाललें नाहीं अज्ञानामुळें पिंगला मात्र प्राणास मुकली.

भर्तृहरी राजा गांवाच्या शिवेशीं येतांच द्वाररक्षकांनीं पिंगला सती गेलाचा वृत्तांत कळविला. तेव्हां राजास अत्यंत दुःख झालें. तो तसाच रडत, ओरडत स्मशानांत गेला व आपणहि पिंगलेप्रमाणें जळून जावें, अशा उद्देशानें तो तिच्यासाठीं केलेल्या अग्नींत उडी टाकू लागला. पण बरोबरच्या लोकांनीं त्यास धरून ठेवल्यामुळें राजाचा कांहीं इलाज चालला नाहीं. पिंगलेची ही अवस्था झाल्यानें राजास अतिशय दुःख झालें. तो तिचे एक एक गुण आठवून रडत होता.

पिंगला सती गेली म्हणून भर्तृहरी स्मशानांत शोक करीत आहे, ही बातमी ऐकून गांवचे लोकहि धांवत धांवत स्मशानांत आले. तेहि राजाबरोबर मोठमोठ्यानें रडूं लागले. परंतु त्यांचें तें रडणें वरवर दाखविल्यापुरतेंचि होतें.

राजा शोकसागरांत पडला असतां लोक त्याची समजूत करूं लागलें कीं, राजन् ! अशाश्वताचा शोक करून काय उपयोग ! ईश्वरावर भरंवसा ठेवून स्वस्थ असावें. अशा रीतीचा लोकांनी राजास पुष्कळ बोध केला. परंतु राजाचें तिकडे लक्ष जाईना. शेवटीं लोक आपापल्या घरोघर गेले. राजा मात्र स्मशांनांत पिंगलेच्या चितेशींच बसून राहिला. राख भरून टाकण्यासाठीं दुसऱ्या दिवशीं लोक स्मशानांत गेले. परंतु भर्तृहरी चित्तेस हात लावूं देईना व आपणहि तेथून उठेना. या पल्ल्यास गोष्ट आल्यानंतर लोक निघून गेले. भर्तृहरी मात्र अन्नपाण्यावांचून तसाच तेथें रात्रंदिवस बसून राहिला.

याप्रमाणें अवंतीमध्यें घडलेला प्रकार दूतांनीं मिथूलेस जाऊन विक्रमराजास सांगितला. तो ऐकून सत्यवर्मा, शुभविक्रम, सुमंतीक प्रधान आदिकरून सर्व मंडळींस अत्यंत दुःख झालें. ते सर्व ताबडतोब उज्जैनीस आले व स्मशानामध्यें जाऊन पाहतात तों त्यांना पिंगलेचें दुःख करीत भर्तृहरी रडत बसलेला दिसला. तेव्हां विक्रमराजा भर्तृहरीची समजूत करूं लागला. परंतु त्याला वेड लागल्यासारखें झालें तो पिंगला ! पिंगला ! असें म्हणून रडत होता. त्यास बोध करितां करितां दहा दिवस गेल्यावर विक्रमानें पिंगलेची उत्तरक्रिया केली. नंतर तो राज्यकारभार पाहूं लागला. विक्रमराजा त्यास नित्य जाऊन बोध करीत असे. याप्रमाणें बारा वर्षें झाली. पण बोध केल्यानें कांहीं फायदा झाला नाहीं. पिंगलेच्या दुःखाने भर्तृहरीनें अन्न सोडलें होतें व तो फक्त झाडांची पानें खाऊन व उदक प्राशन करून राहिला होता. त्यायोगानें त्याचें शरीर कृश झालें.

भर्तृहरीची अशी अवस्था पाहून मित्रावरूणीस ( सूर्यास ) त्याची दया आली. नंतर तो दत्तात्रेयाकडे गेला. दत्तात्रेयानें त्यास येण्याचें कारण विचारलें असतां मित्रावरूणी म्हणाला, आपणांस सर्व ठाऊक आहे. मीच सांगितलें पाहिजे असें नाहीं. परंतु सुचवायचें इतकेंच कीं भर्तृहरीवर आपली कृपा असूं द्या म्हणजे झालें. मग मित्रावरुणीस दत्तात्रेयानें धीर देऊन भर्तृहरीबद्दल काळजी न वाहतां स्वस्थ मनानें जावयास सांगितिलें व मच्छिंद्रनाथाचा शिष्य गोरक्षनाथ यास मी भर्तृहरीकडे पाठवून त्यास बोध करून ताळ्यावर आणतो, अशा रीतीनें मित्रावरूणीची समजूत करून त्याची रवानगी केली.


अध्याय २९ संपादन


गोरक्षनाथाच्या भेटीनें भर्तरीचा मोहनाश; भर्तृहरीस वैराग्यदीक्षा


मागें एका अध्यायांत सांगितल्याप्रमाणें गर्भाद्रिपर्वतावर मच्द्रिंनाथ राहिला व गोरक्षनाथ तीर्थयात्रा करीत होता. त्यानें गिरिनारास जाऊन दत्तात्रेयाची भेट घेतली. तो दत्तात्रेयाच्या पायां पडल्यावर दत्तात्रेयानें तोंडावरून हात फिरविला व मच्छिंद्रनाथ कोठें आहेत व तूं इकडे कोठें आलास, म्हणुन विचारलें. तेव्हां गर्भाद्रिपर्वतावर मच्छिंद्रनाथ तपश्चर्या करावयास राहिले आहेत व त्यांनीच सांगितल्यावरून व मी तीर्थ करीत करीत आपल्या चरणांजवळ आलों, असें गोरक्षनाथानें सांगितलें. नंतर दत्तात्रेयानें गोरक्षनाथास सांगितलें, मला तुझ्यापासून एक कार्यभाग करून घ्यावयाचा आहे. तो असा कीं, भर्तुहरीवर मी अनुग्रह केला, पण तो आपल्या बायकोसाठीं स्मशांनांत शोक करीत राहिला आहे. या गोष्टिस आज बारा वर्षे झाली. तो गवत, पानें खाऊन जिवंत राहिला. तरी तूं तेथें जाऊन त्यास सावध कर. हें सर्व जग मिथ्या, अशाश्वत आहे, असें त्याच्या अनुभवास आणून दे व त्यास नाथ पंथांत आण. मी त्यास मागें उपदेश केला तेव्हां त्यानें 'मी नाथपंथास अनुसरीन' असें माझ्याजवळ कबूल केले होते. असें सांगून भर्तृहरीची जन्मापासूनची संपूर्ण हकीकत सांगितली. ती ऐकून घेतल्यानंतर गोरक्षनाथानें दत्तात्रेयास सांगितलें कीं, आपल्या कृपेनें मी हें कार्य करून येतों. नंतर दत्तात्रेयाची आज्ञा घेऊन आणि त्यास वंदन करून तो निघाला.

मग गोरक्षनाथानें व्यानअस्त्राचा जप करून कपाळी भस्म लावतांच तो एक निमिषांत पन्नास योजने लांब अवंतीस गेला. तेथें स्मशानामध्यें भर्तृहरी बसला होता. शरीर अगदीं क्षीण झालें होतें व त्यास पिंगलेचा एकसारखा ध्यास लागला होता. त्याची स्थिती पाहतांच गोरक्षास अत्यंत वाईट वाटलें. त्यानें असा विचार केला कीं, या समयीं हा पिंगलेच्या विरहानें अगदीं भ्रमिष्टासारखा होऊन गेला आहे. अशा वेळीं जर मी ह्यास उपदेश करीन, तर फायदा होण्याची आशा नाहींच, पण उलट माझें सर्व भाषण मात्र व्यर्थ जाईल. यास्तव तो आपल्या सांगण्यास अनुकूल होऊन आपल्या मनाप्रमाणें वागले अशी युक्ति योजून कार्यभाग साधून घ्यावा.

त्याप्रमाणें विचार करून गोरक्षनाथानें कुंभाराकडे जाऊन एक मडकें विकत घेतलें व त्यास बाटली असें नाव दिलें. नंतर त्या मडक्यास चित्रविचित्र रंग देऊन सुशोभित केल्यावर तें तो स्मशानांत घेऊन गेला. तेथें ठेंच लागली असें ढोंग करून तो जमिनीवर पडला व बेशुद्ध झाल्यासारखें त्यानें केलें. त्या वेळेस बाटली ( मडकें ) फुटून गेली असें पाहून तो रडूं लागला. त्यानें तिच्यासाठीं फारच विलाप केला. त्यानें त्या खापराचें सर्व तुकडे जमा करून जवळ घेतले आणि रडत बसला, ती आपणास अत्यंत उपयोगाची होती व मी मरून ती बाटली राहिली असती तर फार नामी गोष्ट पडती, अशा भावार्थाच्या शब्दांनी फारच विलाप करून 'बाटली ! बाटली !' म्हणून मोठमोठ्यानें गोरक्षनाथ रडत बसला. हें पाहून जवळच बसलेला भर्तृहरीस नवल वाटले. त्यास राहून राहून हसूं येई. गोरक्षनाथ एकसारखा धायधाय रडत होता. तो म्हणे, माझें बाटलीधन कोण्या दुष्टानें हिरावून नेलें ! हे बाटले ! एकदां मला तुझें तोंड दाखीव पाहू. अशा प्रकारचा त्याचा विलाप ऐकून भर्तृहरी पिंगलेचा नाद विसरला. अर्ध्या पैशाची त्या बाटलीची किंमत आणि तेवढ्यासाठीं 'बाटली, बाटली' म्हणत रडत असलेला गोरक्षनाथास पाहून भर्तुहरीस उगीच बसून राहवेना. तो गोरक्षनाथास म्हणाला, मडक्याची किंमत ती काय व तेवढ्यासाठीं मूर्खाप्रमाणें तूं योगी म्हणवीत असतां रडत बसला आहेस, हें काय ? तेव्हा गोरक्षनाथ विचारूं लागला, राजा ! तूं कोणासाठीं दुःख करून शोक करीत बसला आहेस बरें ? आवडत्या वस्तुच्या दुःखाचा अनुभव तुला आहेच. त्याचप्रमाणें माझी बाटली फुटल्यामुळें मला किती दुःख झालें आहे हें माझें मीच जाणतो ! हें ऐकून भर्तृहरी म्हणाला मी मडक्यासारख्या क्षुल्लक वस्तुकरितां शोक करीत नाहीं. प्रत्यक्ष माझ्या पिंगलाराणीचा घात झाला आहे; म्हणून तिचें मला भारी दुःख होत आहे. ती मला आतां पुन्हां प्राप्त व्हावयाची नाहीं, परंतु अशीं मडकीं हवीं तितकीं मिळतील. तें ऐकून गोरक्षनाथानें सांगितलें कीं, तुझ्या पिंगलेसारख्या लक्षावधि पिंगला एका क्षणांत निर्माण करून देईन; पण माझ्या बाटलीसमान दुसरी बाटली कदापि मिळावयाची नाहीं. तेव्हां भर्तृहरीनें म्हटलें कीं, तुं लक्षावधि पिंगला उत्पन्न करून दाखीव म्हणजे मी तुला लाखों बाटल्या निर्माण करून देतो; उगीच थापा मारून वेळ साजरी करून नेऊं नकोस तें ऐकून, जर मी पिंगला उत्पन्न करून दाखविल्या तर तूं मला काय देशील म्हणून गोरक्षानें भर्तृहरीस विचारलें, तेव्हां आपलें संपूर्ण राज्य देण्याचें भर्तृहरीनें कबूल केलें व दैवतांना साक्षी ठेवून बोलल्याप्रमाणें न केल्यास माझे पूर्वज नरकवास भोगतील आणि मीहि शंभर जन्म रवरव नरक भोगीन, अशी भर्तृहरीनें प्रतिज्ञा केली. मग गोरक्षनाथ त्यास म्हणाला, तूं आपलें बोलणें खरें करून न दाखवशील, तर शंभर जन्मच नव्हे, पण सहस्त्र जन्मपर्यंत नरक वास भोगशील.

नंतर गोरक्षानें कामिनीअस्त्राचा जप करून पिंगलेच्या नांवाने भस्म सोडतांच लक्षावधि पिंगला खाली उतरल्या. पिंगला राणीप्रमाणें त्या सर्वांची रूपें पाहून राजांस आश्चर्य वाटलें. त्या सर्व जणी भर्तृहरीजवळ बसून संसाराच्या खाणखुणा विचारूं लागल्या. त्यांनीं राजाच्या प्रश्नांचीं उत्तरे बरोबर दिली. शेवटीं पिंगलेनें राजास बोध केला कीं, माझ्या विरहानें तुम्हांस दुःख झालें ही गोष्ट खरी आहे; परंतु अशाश्वताचा भार वाहणें व्यर्थ होय. मी तुमच्यावर मनस्वी प्रीति करीत असतां आपणास जाळून घेतले; परंतु गोरक्षनाथानें मला पुन्हां दृष्टिगोचार केलें. तथापि शेवटीं आम्हांस व तुम्हांस मरावयाचें आहेच, तें कदापि चुकावयाचें नाहीं. यास्तव आतां माझा छंद सोडून देऊन तुम्हीं आपल्या देहाचें सार्थक करून घेऊन मोक्षाची प्राती करून घ्यावी. फक्त माझा ध्यास धरल्यानें तुम्ही मुक्तीला मात्र अंतराल. मी तुमची कांता असतांना पतिव्रताधर्म आचरून आपलें हित करून घेतलें. आतां तुम्हीं आपल्या हिताचा मार्ग पाहावा. हा सर्व चमत्कार पाहून राजास विस्मय वाटला.

मग भर्तृहरी गोरक्षानाथाच्या पायां पडण्यासाठीं धांवला. तेव्हां गोरक्षानाथानें त्यास हातीं धरून सांगितलें, राजा, माझा गुरु मच्छिंद्रनाथ हा दत्तात्रेयाचा शिष्य आहे व तुलाहि त्या दत्ताचाच अनुग्रह झालेला आहे. तर तूं माझ्या गुरुचा बंधु आहेस म्हणून मला गुरुस्थानीं आहेस, सबब मी तुझ्या पायां पडणें योग्य होय व म्हणुन मीच तुला साष्टांग नमस्कार करितों. राजा, आतां मला सांग कीं, तुझ्या मनांत काय आहे ? पिंगलेसहवर्तमान राज्यसुखाचा उपभोग घेण्याचे इच्छा आहे का वैराग्यवृत्ति घेऊन जन्माचें सार्थक करून घेणार ? तें ऐकून राजानें सांगितलें कीं, मी पिंगलेसाठीं बारा वर्षें भ्रमिष्ट होऊन बसलों होतों, परंतु ती माझ्या दृष्टीस पडली नव्हती. तूं योगसामर्थ्यानें हां हां म्हणतां शेकडों पिंगला मला दाखविल्यास, हें सामर्थ्य राज्यवैभवांत दिसत नाहीं. मी भ्रांत पडून श्रीगुरुच्या हातून निसटलों आणि मोठ्या संकटांत पडलों आतां कृपा करून मला दत्तात्रेयाचें दर्शन करव. मी योगमार्गाचा स्वीकार करणार.

दत्तात्रयाच्या दर्शनास जाण्यापूर्वी भर्तृहरी गोरक्षनाथास म्हणाला कीं, तूं ह्या सर्व पिंगला अदृश्य कर व राज्यकारभार आपल्या हातांत घेण्यासाठीं राजवाड्यांत चल. तें भर्तृहरीचें म्हणणें गोरक्षनाथानें कबूल करून पिंगला अदृश्य केल्या व त्यास घेऊन तो नगरांत गेला. त्या वेळेस सर्वांना आनंद झाला. विक्रमराजानें गोरक्षनाथास सुवर्णाच्या चौरंगावर बसवून त्याची षोडशोपचारांनीं पूजा केली.

भर्तृहरीस कोणत्या युक्तीनें देहावर आणिलें हें मला कृपा करून सांगावें, अशीं गोरक्षनाथाची विक्रमराजानें प्रार्थना केली. तेव्हां त्यानें घडलेला सर्व प्रकार त्यास निवेदन केला व पूढचा संकेतहि त्याच्या कानांवर घातला. मग विक्रमानें त्या दोघांस आणखी सहा महिनेपावेतों तेथें राहण्याचा आग्रह केला. बारा वर्षेपर्यंत भर्तृहरी केवळ झाडांची पानें खाऊन राहिल्यानें अगदी क्षीण होऊन गेला आहे, व तितक्या अवकाशांत त्यास कांहीशीं शक्ती येईन असें विक्रम म्हणाला. तेव्हां गोरक्षनाथानें सांगितलें कीं, आज जी राजाची बुद्धि आहे तीच पुढें कायम राहील हा नेम नाहीं, म्हणुन आमच्यानें येथें राहवत नाहीं. परंतु विक्रमानें अति आग्रह केल्यावरून तो तीन रात्रीं तेथें राहून भर्तृहरीस बरोबर घेऊन निघाला. त्या वेळेस भर्तृहरीच्या स्त्रियांनीं गोरक्षनाथावर फार रागवून शिव्यांची वृष्टि केली. परंतु विक्रमराजानें आनंदानें उभयतांची रवानगी केली. त्या वेळीं गांवची दुसरी बरींच मंडळीहि त्यास पोचविण्यासाठी विक्रमराजाबरोबर गेलेली होती. गोरक्षनाथानें भर्तृहरीस स्पष्ट सांगितलें कीं, जर तुझें मन संसारांत गुंतत असेल तर तुं अजून माघारी जा आणि खुशाल संसारसुखाचा उपभोग घे. मी आडकाठी करीत नाहीं. पण भर्तृहरीस तें बोलणें रूचलें नाहीं. आपण संसारास विटलों, असें त्यानें निक्षून सांगितलें. मग गोरक्षनाथानें आपली शैली, शिंगी, कंथा त्यास देऊन भिक्षेकरितां झोळी दिली. प्रचीति पाहण्यासाठीं त्याच्याच स्त्रियांकडे भिक्षा मागावयास त्याला पाठविलें. तेव्हां स्त्रियांनीं रडून गोंधळ केला. त्याचे गूण आठवून त्या त्यास राहण्यासाठी आग्रह करूं लागल्या. पण भर्तृहरीचें मन डगमगलें नाहीं. तो त्यांचा तिरस्कार करून निघून गेला. मग विक्रम वगैरे सर्व मंडळी परत नगरांत गेली. विक्रमानें भावजयांची समजूत करून त्यांचें शांतवन केलें.

भर्तृहरी फार अशक्त झालेला असल्यानें वाट चालतांना त्याच्या नाकीं नउ आलें तें पाहून गोरक्षनाथानें यानास्त्राची योजना करून भस्म मंत्रून त्याच्या कपाळास लावतांच भर्तृहरीचा अशक्तपणा गेला व ते दोघे डोळे मिटून एका क्षणांत गिरिनार पर्वतावर आले आणि दत्तात्रेयाचें दर्शन घेऊन पायां पडले. दत्तानें त्यांच्या तोंडावरून हात फिरविला व त्यांचें समाधान केलें.


अध्याय ३० संपादन


भर्तरीस दत्तात्रेयाचें दर्शन, चौरंगीची व गोरक्ष-मच्छिंद्रनाथाची भेट, पूर्व इतिहास


गोरक्षनाथ भर्तृहरीस घेऊन गिरिनारपर्वतावर दत्तात्रेयाकडे गेल्यानंतर तेथें तो तीन दिवसपर्यंत राहिला. मग दत्तात्रेयाची आज्ञा घेऊन गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथाकडे जावयास निघाला. त्या वेळेस, मला बहुत दिवस झाले, मच्छिंद्रनाथ भेटला नाहीं, म्हणुन त्यास एकदां माझ्या भेटीस घेऊन ये, असें श्रीदत्तात्रेयानें गोरक्षनाथास सांगितलें.

इकडे दत्तात्रेयानें भर्तृहरीस नाथपंथाची दीक्षा देऊन आपला वरदहस्त त्याच्या मस्तकावर ठेविला व त्यास चिरंजीव केलें. मग त्याच्याकडून अभ्यास करविला. ब्रह्मज्ञान, रसायन, कविता, वेद हीं सर्व व संपूर्ण अस्त्रविद्या शिकविल्या आणि साबरी विद्येंतहि त्यासि निपूण केलें. नंतर नाग अश्वत्थाच्या ठायीं असलेल्या संपूर्ण दैवतांचा आशिर्वाद मिळावा म्हणून त्यास तिकडे पाठविलें. तेथें जाऊन भर्तृहरीनें बावन्न वीर अनुकुल करून घेतले. मच्छिंद्रनाथाप्रमाणें त्यासहि सर्व देव अनुकूल होऊन वर देऊन गेले, मग भर्तृहरीस श्रीदत्तात्रेयानें आपल्याबरोबर बदरिकाश्रमास नेऊन तपश्वर्येस बसविलें व आपण गिरिनारपर्वतीं जाऊन मच्छिंद्रनाथाच्या भेटांची वाट पाहात राहिले.

दत्तात्रेयास विचारून गोरक्षनाथ निघाल्यानंतर तो गर्भगिरीवर येऊन मच्छिंद्रनाथास भेटला व त्यानें त्यास दत्तात्रेयाचा निरोप सांगितला. मग दत्तात्रेयाच्या दर्शनाकरितां कांहीं दिवसांनीं दोघेजण निघाले. ते वैदर्भदेशाचा मार्ग लक्षून जात असतां कौंडण्यपूर नगरांत गेलें. तेथें ते भिक्षेकरितां हिंडत असतां त्याच्या असें दृष्टीस पडलें कीं, तेथील शशांगर राजानें क्रोधाविष्ट होऊन आपल्या मुलाचे हातपाय तोडून त्यास गांवच्या चव्हाट्यावर टाकून दिलें आहे.

शशांगर राजा मोठा ज्ञानी, धीट, उदार, सामर्थशाली, सत्वस्थ व तसाच सदगुणी असतांना मुलची इतकी भयंकर दशा करून टाकण्याइतका राजा कां रागावला ? राजा रागावण्याचें कारण असें आहे कीं, ज्या मुलाचे हातपाय तोडले तो राजाचा औरस पुत्र नसून शंकराच्या आराधनेमुळें तो राजास कृष्णानदींत प्राप्त झाला होता. पुत्र मिळण्यापूर्वी बरेच दिवस राजास संतान नव्हतें. त्यामुळें तो निरंतर उदास असे. राजाची ती अवस्था पाहून त्याची स्त्री मंदाकिनी म्हणत असे कीं, मुलासाठीं असें खंतीं होऊन बसण्यास अर्थ नाहीं. नशिबीं असेल तर संतान होईल, विचार करून काळजी वाहण्याचें सोडून द्या, चिंतेनें शरीर मात्र झिजत चाललें आहे; अशानें संसाराची धूळधाण होऊन जाईल. अशा रीतीनें राणीनें त्यास उपदेश केला असंताहि त्याचें चित्त स्वस्थ होईना. मग राजाच्या मनांत शंकराची आराधना करण्याचें येऊन त्यानें प्रधानास बोलावून आणलें व राज्याचा संपूर्ण कारभार त्याच्या स्वाधीन केला.

भग रामेश्वरास जाऊन शंकरास प्रसन्न करून घेण्याचा विचार ठरवून राजा स्त्रीसह तेथें जावयास निघाला. तो फिरत फिरत कृष्णेच्या संगमावर आला. तेथें शंकरानें त्यास स्वप्नांत दृष्टांत दिला कीं, तूं कांहीं काळजी करूं नको. तुला येथेंच पुत्र प्राप्त होईल. कृष्णा व तुंगभ्रद्रा यांच्यामध्यें माझें वास्तव्य आहे. समागमें पार्वतीहि आहे. तरी तूं आमची पूजा येथें नित्य करीत जा. ह्याप्रमाणें दृष्टांत झाल्यानंतर तो संगमावर मित्रिडोहांत पाहूं लागला असतां तेथें एक जुनाट लिंग त्याच्या दृष्टीस पडलें. त्याची राजानें मोठ्या समारंभानें अर्चा करून प्राणप्रतिष्ठा केली. हाच रामेश्वर आहे अशी त्याची निष्ठा जडली. मग तेथें दर्शनासाठीं पुष्कळ लोक नित्य जाऊं लागले व 'जय जय शिव संगमेश्वर' असें बोलूं लागले. राजा संगमेश्वरीं नित्य पूजा करून त्यावर निष्ठा ठेवून काल क्रमीत राहिला.

तेथून नजीकच्या भद्रसंगम गांवात मित्राचार्य या नांवाचा एक विप्र राहात होता. त्याच्या स्त्रियेचें नांव शरयू. ती मोठी पतिव्रता होती. त्यांसहि पोटीं कांहीं संतान नव्हतें, म्हणूण त्यांनींहि त्याच संगमेश्वराची ( शिवाची ) आराधना आरंभिली.

इकडे कैलासास शंकर कित्येक गणांसह बसले असतां सुरोचना नांवाच्या अप्सरेस शंकरानें बोलावून आणिलें. ती कैलासास आल्यावर शंकराच्या पायां पडून नाचावयास व गावयास लागली. परंतु त्यावेळेस शंकराचे प्रसन्न मुद्रा पाहून ती मोहित झाली. ह्यामुळें नाचतांना तिच्या तालासुरांत चूक पडली, तेव्हां तिचा हा सर्व प्रकार शंकराच्या लक्षांत आला व त्यानें तिला सांगितलें, सुरोचने ! तुझ्या मनांतील हेतू मी समजलों. तूं मनानें भ्रष्ट झाली आहेस, म्हणुन भद्रसंगमीं मित्राचार्य ब्राह्मणाच्या पोटीं तुला जन्म प्राप्त होईल.

शंकरानें सुरोचनेस असा शाप देतांच ती भयभीत झाली. स्वर्गच्युत होणार म्हणून तिला फारच वाईट वाटलें. शंकराशीं रत होण्याचा विचार मनांत आणल्याचा हा परिणाम, अशी तिची खात्री होऊन तिला परम दुःख झालें. मग तिनें शंकराची स्तुती करून उःशाप देण्याकरितां विनंति केली. तेव्हां शंकरानें प्रसन्न होऊन सुरोचनेस उःशाप दिला कीं, तुं आतां मृत्युलोकीं जन्म घे, तुझी मनकामना पूर्ण होण्यासाठीं माझा तुला स्पर्श होतांच तूं स्वर्गीत येशील.

याप्रमाणें उःशापवाणी निघतांच ती तेथून निघाली व मित्राचार्याची स्त्री शरयू हिच्या उदरीं तिचा जन्म झाला. शरयू गरोदर होऊन नऊ महिने पूर्ण होतांच ती प्रसूत होऊन कन्या झाली. ती कन्या मूळची अप्सरा असल्यामुळें तिचें स्वरूप अप्रतिम होतें. तिच नांव 'कदंबा' असें ठेवण्यांत आलें. कदंबा बारा वर्षाची झाली तेव्हां तिच्या बापानें तिच्याकरितां वर पाहण्याचा प्रयत्‍न चालविला. परंतु लग्न करण्याची तिची मर्जी नव्हती. ती रात्रंदिवस शंकराचें ध्यान करण्यांत निमग्न असे. शंकराची पूजा करण्यासाठीं आईबाप नित्य जात, त्यांच्यासमागमें ती नेमानें जात असे; परंतु ती मोठी होऊन तिला जसें समजूं लागलें, तशी ती एकटीहि शंकराच्या पूजेस देवालयांत जाऊं लागली.

एके दिवशी ती एकटीच शिवालयांत गेली होती. त्या वेळीं देवळांत दुसरें कोणी नव्हतें. 'जय शंकर' म्हणून शिवाच्या पाया पडून मस्तक जमिनीस टेकातांच शंकरानें अपलें प्रत्यक्ष रूप प्रकट केलें. तिला पाहतांच शिव कामातुर झाला. मग तो तिला धरण्याचा विचार करून धांवूं लागला, तेव्हां ती तेथून निसटून पळूं लागली. शिवानेंहि तिच्या मागोमाग धांवत जाऊन तिला धरिलें; पण शंकराचा स्पर्श होतांच ती सुरोचना पूर्ववत्‌ अप्सरा होऊन स्वर्गास गेली.

परंतु कृत्य फसल्यामुळें शंकराच्या भलतीकडे वीर्यपात होऊन रेत कृष्णानदींत गेलें. पुढें शशांगर राजानें स्नान करून अर्ध्य देण्यासाठी हातांत उदक घेतलें, तों तें वीर्य हातांत आलें व राजास ओंजळीत मनुष्यदेहाचा पुतळा दिसूं लागला, मग आपणांस शंकरानें प्रसन्न होऊन अयोनिसंभव पुत्र दिला असा मनाशीं विचार करून अति हर्षानें घरीं जाऊन राजानें तो मुलगा मंदाकिनी राणीच्या स्वाधीन केला व तिला समग्र वृत्तांत निवेदन केला. ब्रह्मदेव, शंकर, विष्णु, इंद्र, बृहस्पति ह्यापैकीं कोणीतरी हा अवतार घेतला असावा असें त्यास वाटलें. मग राणीनें आनंदानें त्यास स्तनाशीं लावतांच पान्हा फुटून मुलगा दूध पिऊं लागला. त्याचें नांव कृष्णागर असें ठेविलें व रीतीप्रमाणें सर्व संस्कार केले. मग कांहीं दिवस तेथें राहून राजा कौडण्यपुरास गेला.

पुढें कृष्णागराचें वय बारा वर्षीचें झालें, तेव्हां त्याचें लग्न करण्याचें मनांत आणून राजानें मुलाच्या रूपास व गूणांस योग्य अशी कन्या शोधावयास बरीच मंडळी देशोदेशीं पाठविली. त्या मंडळीनीं अनेक स्थळें पाहिली. पण मुलाच्या योग्य मुलगी त्यांच्या पाहण्यात येईना. मग ते सर्व परत कौडण्यपुरास गेले व त्यांनीं सर्व मजकूर राजाच्या कानांवर घातला. पुढें कांहीं दिवसांनी मंदाकिनी राणी मरण पावली. तिच्या वियोगानें राजास परम दुःख झालें. राजानें वर्षश्राद्धापर्यंतचें तिचें उत्तरकार्य केलें.

पुढें राजास मदनाची पीडा होऊं लागली. पण पुनः लग्न करण्यास त्याचें मन धजेना. शेवटीं लग्न करण्याचा निश्चय करून त्यानें प्रधानास आपल्याजवळ बोलाविलें व त्यास आपला मनोदय सांगितला आणि माझ्यायोग्य एखादी मुलगी तुझ्या पाहण्यांत आहे काय, असें विचारलें, तेव्हां प्रधानानें सांगितलें कीं, पुरोहितानें बऱ्याच मुलींच्या टिपणांच्या नकला करून आणिलेल्या आहेत; त्यापैकीं घटित पाहून कोणत्या मुलीशीं जुळतें तें पहावें, मग त्याचा विचार करून लग्न जुळविण्यास ठिक पडेल. मग प्रधानानें पुरोहितास बोलावून आणलें व मुलींच्या सर्व पत्रिका पाहिल्या त्यांत चित्रकूटचा राजा भूजध्वज ह्याच्या कन्येशीं चांगलें जमल. ती मुलगीहि अत्यंत रूपवती असून उपवरहि झालेली होती.

मग ही कामगिरी बजावण्याकरितां राजानें आपल्या प्रधानाला चित्रकुटास भूजध्वज राजाकडे पाठविलें. त्यानें तेथें जाऊन त्या राजाची भेट घेतली व त्यास सर्व मजकूर कळविला. भूजध्वज राजासहि ही गोष्ट मान्य झाली. पत्रिका काढून पाहतां कांहीं नडण्याजोगें आलें नाहीं. मग त्यास मुलगी देण्याचें त्या राजानें कबूल करतांच प्रधानानें पत्र लिहून आपल्या राजाकडे दूत पाठविला. तो कौंडण्यपुरास गेल्यावर पत्र वाचून शशांगर राजास परमानंद झाला व तो लग्नासाठीं चित्रकूटास गेला. लग्नसोहळा उत्तम प्रकारें पार पडला. नंतर भुजावंती स्त्री घेऊन राजा आपल्या नगरांत परत आला. त्यावेळीं भुजवंती वय तेरा वर्षाचें व कृष्णागर पुत्राचें वय सतरा वर्षांचें होतें.

एके दिवशीं अशी गोष्ट घडून आली कीं, सापत्‍न पुत्राची व तिची नजरानजर झाली. त्यापूर्वीं तिनें त्यास निरखून पाहिलेलें नव्हतें. एकें दिवशीं राजा शिकारीस गेला असतांना राजपुत्र वावडी उडवावयास बाहेर पडला होता. त्यास पाहतांच भुजावंती कामानें व्याकूळ झाली. मग तिनें दासीस बोलावून सांगितलें कीं, तो पलीकडच्या घरीं वावडी उडवीत आहे; त्यास मजकडे घेऊन ये. आज्ञा होतांच दासीनें कृष्णानराजवळ जाऊन तुला तुझ्या सापत्‍न मातेनें बोलाविलें आहे, असा निरोप कळविला.

आईनें निरोप पाठविला म्हणून राजपुत्र आनंदानें दासीसमागमें भुजावंतीकडे गेला. त्यापूर्वीं तो एकदांच तिच्या भेटीस गेला होता. त्यानंतर ही दुसरी भेट बहुत दिवसांनीं होण्याचा योग येत असून आपली माता आपणास बोलावून नेत आहे, म्हणुन आपलें भाग्य उदयास आलें, असें त्यास वाटूं लागलें. त्या वेळीं भुजावंती रंगमहालाच्या दाराशीं त्याची वाट पाहात उभी राहिली होती; इतक्यांत दासी कृष्णागरास घेऊन तिकडे आली व राजपुत्रास भुजावंती दाखवून निघून गेली.

कृष्णागर सापत्‍न आईजवळ गेल्यावर त्यानें आईस नमस्कार केला. परंतु कामानें व्यथित झाल्यामुळें तिनें हा आपला मुलगा आहे हा विचार एका बाजूस ठेवून अन्य नजरेनें कृष्णागराकडे पाहिल्यानें तो मनांत दचकला. ती त्याच्याजवळ जाऊन व त्याचा हात धरून, मला या वेळेस भोग देऊन माझा काम शांत कर, असें तिनें त्यास उघड सांगितलें. तसेंच त्यानें वश व्हावें म्हणुन तिनें दोन शब्द बोलून बराच आग्रह केला. त्या वेळीं कृष्णागरानें संतापून तिची भीड न धरितां तिला अतिशय फजीत केलें. तो तिला म्हणाला, तुं माझी प्रत्यक्ष सापत्‍न माता आहेस; असें असतां तूं आज मजशीं पापकर्म करावयास प्रवृत्त झालीस. तुं काय रानातलें जनावर आहेस ? स्त्रियांची जात अमंगळ व दुष्ट त्या कसा अनर्थ करून सोडतील, याचा नेम नाहीं. असें बोलून हात झिडकारून तो पुन्हा पतंग उडवावयास गेला.

त्या वेळीं कामानें आपला अंमल भुजावंतीवर बसविल्यामुळें ती देहभान विसरली होती. जेव्हां हा आपला सापत्‍न पुत्र आहे, असें तिच्या पूर्ना लक्षांत आलें, तेव्हां ती भयभीत होऊन गेली, तिनें दासीस बोलावून सांगितलें कीं, मघाशीं मी तुजकडून जो पुरुष आणविला तो कोणी परका नसून माझाच सावत्र मुलगा होता; ह्यामुळें मोठ्याच अनर्थाची गोष्ट आपल्या हातून घडली आहे. आतां तो राजास ही हकिकत सांगेल व ती ऐकल्यावर राजा माझा प्राण घेतल्यावांचून राहणार नाहीं. त्यास्तव आतां विष खाऊन आपणच जिवाचा घात करावा हें चांगलें म्हणजे ही घाणेरडी गोष्ट उघडकीस येणार नाहीं.


अध्याय ३१ संपादन


चौरंगीस मच्छिंद्र-गोरक्षाने शशांगर राजाकडून मागून घेतले, चौरंगीची तपश्चर्या


कामविकारवश होऊन कृष्णागरास सापत्‍न मातेनें बोलावून नेलें पण तो तिला झिडकारून निघून गेल्यानंतर तिला पश्चात्ताप होऊन ती जीव देण्यास तयार झाली. परंतु तिच्या दासीनें तिला सांगितलें कीं, तुला जिवाचा घात करण्याचें कांहीं कारण नाहीं; ज्याप्रमाणें ईश्वरी संकेत असेल त्याप्रमाणें घडून येईल, तें कधीं चुकावयाचे नाहीं. आतां तूं झाल्या गोष्टीची खंत करूं नको. स्वस्थ जाऊन नीज. राजा शिकारीहून आल्यानंतर तुझ्या महालांत येईल, तेव्हां तू उठूंच नको. मग तो तुला जागी करून निजण्याचें कारण विचारील. तेव्हां तूं रडून आकांत कर व मी आतां आपला जीव ठेवूं इच्छीत नाहीं म्हणून सांग. जर अब्रू जाऊं लागली, तर जगून काय कारायाचें आहे ? असें तुं राजास सांगून रडूं लागलीस म्हणजे तो तुला काय झालें आहे तें सांगण्यासाठीं आग्रह करील. तेव्हां तूं त्यास सांग कीं, तुमचा मुलगा कृष्णागर यानें माझ्या मंदिरांत येऊन मजवर बलात्कार करावयाचा घाट घाटला होता; पण मी त्यास बळी पडलें नाहीं. यास्तव आपणांस हेंच सांगावयाचें कीं, आपल्यामागें असें अनुचित कर्म घडणार असेल तर मला जगून तरी काय करावयाचें आहे ? असें भाषण ऐकून राजास क्रोध आला, म्हणजे तो सहजच मुलगा-बिलगा मनांत न आणितां ताबडतोब त्यास ठार मारून टाकील. मग तूं निर्भय होऊन आनंदानें खुशाल राहा. अशी युक्ती सांगून दासी निघून गेली.

त्याप्रमाणें भुजांवती सुवर्णामंचकावर निजली. तिनें अन्न, उदक, स्नान वगैरे सर्व सोडून दिल्याचा बहाणा केला. अंगावरील दागदागिने सर्व टाकून दिले. थोड्या वेळानें शशांगर राजा शिकारीहून आला. नेहमीप्रमाणें भुजांवती पंचारती घेऊन कां आली नाहीं म्हणुन राजानें दासीस विचारलें . तेव्हां ती म्हणाली, राणीला काय दुःख झालें आहे तें तिनें सांगितलें नाहीं; पण ती मंचकावर स्वस्थ निजली आहे.

याप्रमाणें दासीनें सांगताच राजा भुजावंतीच्या महालांत गेला. तेथें पूर्वी संकेत ठरल्याप्रमाणें ती पलंगावर निजली होती. राजानें तिला निजण्याचें कारण विचारिलें असतां ती कांहींच उत्तर न देतां ढळढळां रडूं लागली. त्या वेळीं राजास तिचा कळवळा येऊन त्यानें तिला पोटाशी धरीलें व तोंडावरून हात फिरवून तो पुन्हां विचारूं लागला. राजा म्हणाला. तूं माझी प्रिय पत्‍नी असतां, इतकें दुःख होण्याजोगा तुला कोणी त्रास दिला काय ? तसें असल्यास मला सांग मात्र, मग तो कोण कां असेना, पाहा त्याची मी काय अवस्था करून टाकितों ती ! अगे, तूं माझी पट्टराणी ! असें असतां तुजकडे वाकडी नजर करण्याला. कोणाची छाती झाली ? तुं मला नांव सांग कीं, याच वेळेस त्यास मारून टाकतो.

राजानें असें क्रोधायुक्त भाषण ऐकल्यानंतर भुजांवंतीस किंचित्‌ संतोष झाला. मग तिनें सांगितलें कीं, तुमच्या मुलाची बुद्धि भ्रष्ट झाली आहे. तो खचित माजला आहे. तुम्ही शिकारिस गेल्यानंतर कोणी नाहीं असें पाहून तो माझ्या महालांत आला व माझा हात धरुन मजवर बलात्कार करावयास पाहात होता. माझी कामशांति कर, असें तो मनांत कांहीं एक अंदेशा न आणतां मला म्हणाला व माझा हात धरून एकीकडे घेऊन जाऊं लागला. त्या वेळीं तो कामातुन झाला आहे असें मी ओळखून त्याच्या हातांतून निसटलें व पळत पळत दुसऱ्या महालांत गेलें. तेव्हां माझी जी अवस्था झाली ती सांगतां पुरवत नाही ! चालतांना पडलें देखील, पण तशीच लगबगीनें पळालें. एकदांची जेमतेम महालांत आलें आणि घेतलें दार लावून ! तेव्हां त्याचा इलाज चालेनासा होऊन तो निघून गेला. आपण नसलेत म्हणजे मजवर असले प्रसंग गुदरणार, ह्यास्तव आतां मी आपला जीव देतें, म्हणजे सुटेन एकदांची या असल्या जाचांतून. आपला एकदां शेवटचा मुखचंद्र पहावा म्हणून हा वेळपर्यंत तशीच तें दुःख सहन करून राहिलें. मोठमोठाल्या हिंसक जनावरांच्या तावडींतून पार पडून आपण सुखरूप घरीं केव्हां याल ह्याच धास्तीत मी राहिलें होते; म्हणून अजूनपर्यंत वाचलें तरी; नाहीं तर केव्हांच आत्महत्या करून घेतली असती.

भुजांवंतीचें तें भाषण ऐकून राजाची नखशिखांत आग झाली. जणूं काय वडवानळच पेटला कीं काय, असें भासूं लागलें. मग राजानें बाहेर येऊन राजपुत्र कृष्णागरास मारून, जळून टाकण्याची किंवा हातपाय तोडून त्यास दूर टाकून देण्याविषयीं सेवकांस आज्ञा केली. ती आज्ञा होतांच सेवक मुलास स्मशांनांत घेऊन गेले व तेथें नेल्याची बातमी त्या सेवकांनीं परत येऊन राजास सांगितली.

ते सेवक चतुर होते. राजानें आपल्या मुलास मारून टाकण्याची आज्ञा रागामध्यें दिली आहे व त्यास मारिलें असतां राजाचा कोप शांत झाल्यावर काय अनर्थ होईल, कोण जाणे, असे तर्क त्यांच्या मनांत येऊं लागले. त्यांनीं पुनःपुनः राजास जाऊन विनविलें. पण राजानें जो एकदां हुकूम दिला तो कायम. मग दूतांनीं निष्ठूर होऊन त्यास चव्हाट्यावर नेऊन सुवर्णाच्या चौरंगावर बसविलें व त्याचें हातपाय बांधून टाकिले. ही बातमी थोडक्याच वेळांत गांवांत सर्वत्र पसरली. त्यासमयीं शेकडों लोक त्यास पाहावयास आले. कित्येक रदबदली करून राजाचा हुकूम फिरविण्यासाठीं राजवाड्यांत गेले. पण राजाची ती भयंकर क्रोधयुक्त मुद्रा पाहुन कोणासहि ही गोष्ट त्याच्यापाशीं काढवेना. इकडे आज्ञेप्रमाणें सेवकांनीं कृष्णागराचे हातपाय तोडले आणि त्यास तसेंच तेथें टाकलें. तेव्हां कृष्णागर बेशुद्ध होऊन पडला. त्याच्या घशास कोरड पडली. डोळे पांढरे झाले व प्राण कासावीस होऊन तोंडातून फेंस निघू लागला. असा तो अव्यवस्थित पडलेला पाहून लोक शोकसागरांत बुडून गेले.

त्या समयीं कित्येकांनी शशांगर राजास दूषण दिलें.

त्या वेळीं गोरक्षनाथ व मच्छिंद्रनाथ भिक्षेकरितां गांवांत आले होतें, ते सहज त्या ठिकाणीं आले. येथें कसली गडबड आहे. हें पहावें म्हणून ते चव्हाट्यावर जमलेल्या लोकांत मिसळले. तेथें गोरक्षनाथानें कृष्णागरास विकल अवस्थेत पडलेला पाहून ती हकीकत लोकांस विचारून माहिती करून घेतली व अंतर्दृष्टीनें पाहतां सर्व बोलण्यावर भरंवसा ठेवून निर्दोषी मुलाचा घात केल्यामुळें त्यानें ते दोघेहि तेथून निघाले. तेव्हां गोरक्षनाथानेंहि अंतर्दृष्टीनें कृष्णागराचा समूळ वृत्तांत ध्यानांत आणिल्यानंतर त्यास नांवारूपास आणावें, म्हणून त्यानें मच्छिंद्रनाथास सांगितलें. त्यांनीं कृष्णागरास त्या परिस्थितींत चौरंगावर पाहिल्यामुळें त्याचें कृष्णागर हें नांव बदलून चौरंगीनाथ असें ठेविलें. राजवाड्यांत जाऊन राजापासून ह्यास मागून घेऊन नाथपंथांत सामील करण्याची गोरक्षनाथानें मच्छिंद्रनाथासं सूचना केली. परंतु राजाराणीस आपलें सामर्थ दाखवून मगच हा कृष्णागर शिवपुत्र घेऊन जाऊं, असें मच्छिंद्रनाथाचें मत पडलें. पण हें गोरक्षनाथाच्या मनांत येईना. तो म्हणाला, प्रथम चौरंगीस घेऊन जाऊन त्यास नाथपंथाची दीक्षा द्यावी व सर्व विद्येंत तयार केल्यानंतर त्याच्याच हातून राजास प्रताप दाखवून त्या व्यभिचारी राणीची जी दशा करावयाची असेल ती करावी. तूर्त युक्तिप्रयुक्तीनें राजाचें मन वळवून त्याजपासून ह्याला मागून घेऊन जावें. ह्या गोरक्षनाथाच्या विचारास मच्छिंद्रनाथानें रुकार दिला.

मग ते उभयता राजवाड्यात गेले.त्यांनी द्वारपाळास आपली नांवें सांगून आपण भेट घेण्यासाठी आलों आहों, असा राजाला निरोप सांगावयास पाठविला. राजास निरोप कळतांच परमानंद झाला व जे हरिहरास वंद्य ते योगी आज अनायासें भेटीस आले आहेत, असें पाहून तो लागलीच पुढें जाऊन त्यांच्या पायां पडला. त्यांची राजानें स्तुति केली व त्यांस राजवाड्यांत नेऊन सुवर्णाच्या आसनावर बसविलें. नंतर त्यानें षोडशोपचारांनीं यथाविधि पूजा केली आणि हात जोडून त्यांच्यासमोर तो उभा राहिला व काय आज्ञा आहे ती कळविण्याची विनंती केली. तेव्हां मच्छिंद्रनाथानें सांगितलें कीं तुम्ही अवकृपेमुळें आज एका मुलाचें हातपाय तोडून टाकिले आहेत. तो मुलगा आमच्या स्वाधीन करावा. इतकाच आमचा हेतू आहे.

मच्छिंद्रनाथाचें हें मागणें ऐकून राजास मोठें नवल वाटलें, तो हंसून म्हणाला, महाराज ! त्यास हातपाय नाहींत, मग त्याचा तुम्हांला काय उपयोग होणार आहे ? उलट तो धनी व तुम्ही त्याचे सेवक असें होऊन तुम्हांस त्याला खांद्यावरून घेऊन फिरावें लागेल. हें ऐकून मच्छिंद्रनाथानें त्यास सांगितलें कीं, तूं त्यास आमच्या स्वाधीन करितोस किंवा नाहीं, एवढें सांग म्हणजे झालें. तो आमच्या कामास उपयोगी पडेल कीं नाहीं ही चौकशी तुला कशाला पाहिजे ? मच्छिंद्रनाथानें असें स्पष्ट म्हटल्यावर त्यास घेऊन जाण्याची राजानें परवानगी दिली. मग ते त्यास चौरंगासुद्धां आपल्या शिबिरांत घेऊन गेले व तेथें त्याचे हातपाय तळविले. येथें अशी शंका येते कीं, हे जती निर्जीवास सजीव करतात, असें असतां याची अशी अवस्था कां झाली ? निर्जीव पुतळ्याचा गहिनीनाथ निर्माण केला, मग कृष्णागराचे हातपाय पुनः निर्माण करणें अशक्य होते काय ? परंतु त्यास त्याच स्थितींत ठेवून कार्यभाग करून घ्यावयाचा होता. गोरक्षनाथ व मच्छिंद्रनाथ तेथें एक रात्र राहून पुढें चालते झाले.

मग ते फिरत फिरत बदरिकाश्रमात गेले व शिवालयांत जाऊंन त्यांनी शंकराचें दर्शन घेतलें, तेथें चौरंगीस ठेवून आपण अरण्यांत गेलें. तेथें त्यांनीं एक गुहा पाहिली व दोघेहि तींत शिरले. त्यांनीं चौरंगीस तेथें ठेवून त्याची परिक्षा पाहण्याचा बेत केला. मग गोरक्षनाथानें एक मोठी शिळा आणिली. अस्त्राच्या योगानें गुहेंत अंधार पाडिला आणि चौरंगीस देवळांतून तेथें घेऊन गेले. त्या गुहेच्या तोंडाशींच एक मोठें झाड होतें, त्याच्या सावलींत तें तिघेहि बसले. तेथें चौरंगीस नाथदीक्षा देण्याची मच्छिंद्रनाथानें गोरक्षनाथास आज्ञा केली.

त्या वेळी गोरक्षनाथानें मच्छिंद्रनाथास सांगितलें कीं, चौरंगीनाथचें तप पाहून मग मी त्यास अनुग्रह करीन. त्याच्या या म्हणण्यास मच्छिंद्रथानें रुकार दिला व चौरंगीस विचारलें कीं, तूं या ठिकाणीं तप करण्यास बसशील काय ? तेव्हां चौरंगीनें उत्तर दिलें कीं, तुम्हीं सांगाल तें करीन व ठेवील तेथें राहीन , नंतर त्यानें त्या दोघांस विनंती केली की, तुम्ही जेथें असाल तेथून माझा नित्य समाचार घेत जा. इतकें मला दान दिलें म्हणजे माझें कल्याण होईल. ती विनंती मच्छिंद्रनाथानें कबूल केली.

मग त्यांनी त्यास आनंदानें गुहेंत नेऊन ठेविलें व त्यास सांगितलें कीं, तुझी दृष्टि निरंतर या वरच्या दगडाकडे असूं दे. जर नजर दुसरीकडे गेली तर दगड अंगावर पडून नाहक मरून जाशील व आपणांस पुढें जीं कामें करावयाचीं आहेत तीं जशींच्या तशीं राहून जातील. यास्तव फार सावधागिरीनें राहून आपलें हित साधून घे. इतके सांगुन त्यास मंत्रोपदेश केला व त्याचाच जप करावयास सांगितला. त्या वेळीं गोरक्षनाथानें त्यास एक फळ आणुन खावयास दिलें आणि सांगितलें कीं, हीं फळें भक्षून क्षुधा हरण कर. मंत्राचा जप करून तप कर. नजर वर ठेवुन जिवांचें रक्षण कर. आम्ही तीर्थयात्रा करून तुजकडे लवकरच येऊं असें चौरंगीस सांगुन गोरक्ष गुहेबाहेर निघाला व तिच्या तोंडाशीं एक शिळा ठेविली. गोरक्षनाथानें चामुंडेंचें स्मरण करतांच ती पृथ्वीवर उतरून त्यास भेटली आणि कोणत्या कार्यासाठीं स्मरण केलें म्हणुन तिनें विचारले. तेव्हां तो म्हणाला, येथें एक प्राण आहे त्याच्यासाठीं तुं नित्य फळें आणून देत जा म्हणजे तो ती खाऊन राहात जाईल. परंतु तेथें फळें नेऊन ठेवशील तीं गुप्तपणें ठेवीत जा; त्याच्या समजण्यांत मुळींच येऊं देऊं नको. अशी चामुडेस आज्ञा करून ते गिरिनापर्वतीं आले. त्या आज्ञेप्रमाणें चामुंडा गुप्तपणानें त्यास फळें नेऊन देत असे.

शिळा अंगावर पडून प्राण जाईल ही चौरंगीनाथास मोठी भीति होती व गोरक्षनाथानें शिळेविषयीं फार सावध राहावयास बजावून सांगितलें होतें. म्हणुन एकसारखी तिकडे नजर लाविल्यानें त्याचें फळें खाण्याचें राहून गेलें. तो फक्त वायू भक्षण करून राहूं लागला. नजर चुकूं नये म्हणुन अंगसुद्धां हालवीत नसे. त्याचें लक्ष योगसाधनेकडे लागल्यानें शरीर कृश होऊन त्याचा हाडाचा सांगाडा मात्र उरला. अशा रीतीनें चौरंगीनाथ तपश्चर्या करीत होता.


अध्याय ३२ संपादन


त्रिविक्रमराजाची कथा, राजाच्या मृत्युनंतर त्याच्या देहांत मच्छिंद्रनाथाचा संचार


चौरंगीनाथास तपश्चर्येस बसविल्यानंतर मच्छिंद्रनाथ व गोरक्षनाथ तेथून निघून गिरिनारपर्वतीं गेले व त्यांनीं दत्तात्रेयाचें दर्शन घेतलें. मच्छिंद्रनाथास पाहतांच दत्तात्रेयास परमानंद झाला. मच्छिंद्रनाथास केव्हां भेटेन असें त्यास होऊन तो त्या भेटीची वाट पाहात होताच. मुलानें आईस भेटावें तसें मच्छिंद्रनाथाच्या भेटीनें दत्तास आले. मग उभयतांच्या प्रेमपूर्वक सुखः दुखाच्या गोष्टी झाल्या. त्यानें त्यास पोटाशीं धरून आतां येथेंच राहा, तीर्थयात्रेस जाऊं नका म्हणून सांगितलें. ते उभयतां तेथें सहा महिनेपर्यंत राहिले. पुढें ते तीर्थयात्रा करावयास आज्ञा मागूं लागले. जगाच्या उद्धारासाठीं आम्ही जन्म घेतला आहे; ह्यास्तव आम्हांस एके ठिकाणीं राहतां येत नाहीं, असें मच्छिंद्रनाथानें सांगितल्यावर दत्तात्रेयानें त्यांस तीर्थयात्रा करावयास जाण्याची आज्ञा दिली.

दत्तात्रेयास सोडून जातेवेळेस त्यांस फार वाईट वाटलें. त्यांच्या डोळ्यांतुन एकसारखें प्रेमाश्रु वाहात होते. ते त्या ठिकाणाहून काशीस जाण्याच्या उद्देशानें निघाले व फिरत फिरत प्रयागास गेले. त्या समयीं तेथें त्रिविक्रम नांवाचा राजा राज्य करीत होता. तो काळासारखा शत्रूवर तुटून पडे. तो मोठा ज्ञानी असून उदास होता. त्यास सर्व सुखें अनुकूल होती, परंतु पुत्रसंतति नसल्यामुळें त्यास तीं सर्व सुखें गोड लागेनात. त्याची साधुसंतांच्या ठिकाणी अति निष्ठा असे. त्याच्या राज्यांत याचक फारसा दृष्टीस पडत नसे. त्याच्यी प्रजा कोणत्याहि प्रकारची काळजी न वाहतां आनंदामध्यें राहात होती. त्याची राणी महापतिव्रता असून त्याच्या मर्जींनुरूप वागत असे. परंतु पोटीं संतति नसल्यानें ती थोडी खिन्न असे. राजा दिवसेदिवस थकत चालल्यामुळें पुत्रप्राप्तीची निराशा वाटून तिला वारंवार दुःख होई. अशी ती काळजींत पडली असतां, एके दिवशीं राजा परलोकवासी झाला. तेव्हां राज्यांत मोठा हाहाःकार झाला. राणी रेवती तर दुःखसागरांत बुडून गेली. तिजवर दुःखाचे डोंगर कोसळले. त्रिविक्रमराजासारखा राजा पुन्हां होणार नाहीं, असें त्याचे अनेक गुण गाऊन लोक विलाप करूं लागले. साऱ्या प्रयागभर रडारड झाली.

त्यास संधीस मंच्छिद्रनाथ व गोरक्षनाथ त्या शहरांत प्रविष्ट झाले. त्या वेळीं मच्छिंद्र्नाथास तेथील परिस्थिति ऐकून कळकळा आला. धन्य हा राजा कीं, ज्यासाठीं सर्व लोक हळहळत आहेत. अशा राजास पुन्हां जिंवत करून दुःखातून सर्वांस सोडवावें, असें मच्छिंद्रनाथाच्या मनांत आलें. त्यानें राजाची आयुष्यमर्यादा शोधून पाहिली तों तो ब्रह्मस्वरूपीं जाऊन मिळाला असें दिसलें. तेव्हां त्याचा उपाय हरला. कारण बीजावांचून वृक्ष कसा होईल ? मग मच्छिंद्रनाथ गांवांतुन परत जाऊं लागला. परंतु गोरक्षनाथाचें मन इतके कळवळलें होतें कीं, लोकांस त्या दुःखांत ठेवून त्यास परत जाववेना. तरी तो तसाच मच्छिंद्रनाथाबरोबर गेला.

गांवाबाहेर एक शिवालय होतें त्यांत ते दोघे जाऊन बसले. तेथून जवळच राजाच्या प्रेतास संस्कार करण्यासाठीं नेऊन ठेवलें होतें. प्रेतासमागमें पुष्कळ मंडळीं होती. त्याचें तें दुःख गोरक्षनाथाच्यानें पाहवेना. व राजाचें प्रेत उठविण्यासाठीं त्यानें मच्छिंद्रनाथास सांगुन पाहिलें. पण मच्छिंद्रनाथानें त्यास खुणेनें उगाच बसावयास सांगितलें. परंतु गोरक्षनाथास निमूटपणें बसवेना. तो म्हणाला, जर तुम्ही ह्यास उठवीत नसाल, तर मी ह्यास उठवून सर्वांच्या दुःखाचा परिहार करतों तें ऐकून राजास उठविण्याचें तुझें सामर्थ्य नाहीं, असें मच्छिंद्रनाथ म्हणाले. तेव्हां गोरक्षनाथा म्हणाला, राजास उठवून सर्वास सुखी करण्याचा मी निश्चय केला आहे. जर ही गोष्ट मजपासुन घडली नाहीं, तर अग्निकाष्ठें भक्षण करून स्वतःचा घात करून घेईन आणि जर याप्रमाणें मी न करीन तर कोटि वर्षेपर्यंत रवरव नरक भोगीन. हें ऐकून मच्छिंद्रनाथानें त्यास सांगितलें कीं. तूं अविचारानें पण केलास; पण राजा ब्रह्मास्वरूपीं जाऊन मिळाला आहे. मग गोरक्षनाथानें अंतदृष्टीनें पाहिलें असतां ती गोष्ट खरी दिसली. तेव्हां त्याची फार निराशा झाली.

नंतर गोरक्षनाथानें प्रतिज्ञा शेवटास नेण्यासाठीं काष्ठें गोळा केली. हा अग्नींत उडी टाकून प्राण दिल्याशिवाय राहणार नाही, अशी मच्छिंद्रनाथाची पूर्ण खात्री होती. करण पूर्वी एकदां त्यानें एका ब्रह्माणाचे स्त्रीस वड्याकरितां डोळा काढून दिला होता. हा अनुभव मच्छिंद्रनाथास आलेला असल्यानें त्यानें गोरक्षनाथास जवळ बोलावून म्हटले कीं, लोकांच्या कल्याणाकरितां तूं आपल्या जिवावर उदार झाला आहेस; म्हणून आतां मी तुला एक युक्ति सांगतों, तसा वाग. म्हणजे तुझ्या मनाप्रमाणें गोष्ट घडून येऊन राजा जिवंत होईल व लोकांचें दुःख निवारण होईल. मी स्वतः राजाच्या देहांत प्रवेश करितो; परंतु तूं माझें हें शरीर बारा वर्षेपर्यंत जतन करून ठेव. बारा वर्षानंतर मी पुनः माझ्या देहांत प्रवेश करीन. मग आपल्याकडून होईल तितकें आपण जगाचें कल्याण करूं या. त्याच्या युक्तीस गोरक्षनाथ अनुकूल झाला.

मग मच्छिंद्रनाथानें आपलें शरीर सोडून राजाच्या मृत शरीरांत संचार केला. त्यामुळें राजा लागलाच स्मशानांत उठून बसला. तेव्हां सर्व लोकांस आनंद झाला. मग लोकांनीं राजाचा एक सुवर्णाचा पुतळा करून जाळला. स्मशानांतील क्रिया उरकून घेतली व सर्वजण आनंदानें घरोघर गेले.

इकडे शिवालयमध्यें गोरक्षनाथ, मच्छिंद्रनाथाचें शरीर कोणत्या रीतीनें रक्षण करावें या विचारांत पडला होता. इतक्यांत एक गुरवीण तेथें आली. तिला पाहून, माझ्या मच्छिंद्रगुरुनें त्रिविक्रम राजाच्या देहांत प्रवेश केला आहे, इत्यादि सर्व वृत्तांत त्यानें तिला निवेदन केला आणि शेवटीं तो तिला म्हणाला कीं, बारा वर्षेपर्यंत माझ्या गुरुचें प्रेत मला सांभाळुन ठेविलें पाहिजे, तरी एखादें निवांत स्थळ मला दाखीव. ही गोष्ट गुप्त ठेवावयास पाहिजे, म्हणुन तू कोणापाशीं बोलूं नकोस. जरी ही गोष्ट उघडकीस येईल तर मोठाच अनर्थ घडून येईल. मग ती गुरवीण गोरक्षणाच्या म्हणण्याप्रमाणें वागण्यास कबूल झाली.

त्या शिवालयांत एक भुयार होतें. तेथें तें प्रेत छपवून ठेवण्यास गुरविणीनें सांगुन ती जागा त्यास दाखविल्यावर गोरक्षनाथानें तें प्रेत तेथें नेऊन ठेविलें. तें स्थळ त्याच्याशिवाय दुसऱ्या कोणास ठाऊक नव्हतें. त्या वेळीं गुरविणीनें गोरक्षनाथास विचारलें कीं बारा वर्षेंपवेतों हा देह जतन करून ठेवावयाचा असें तुम्हीं म्हणतां, परंतु इतके दिवस हें शरीर कसें टिकेल हें मला कळत नाहीं. हें ऐकून गोरक्षनाथानें तिला सांगितलें कीं, माझा गुरु मच्छिंद्रनाथ चिरंजीव आहे; त्याच्या शरीराचा नाश कदापि व्हावयाचा नाहीं. परंतु ही गोष्ट तुला आणि मलाच ठाऊक आहे. दुसऱ्या कोणाच्याहि कानीं जाऊं नये म्हणुन फार खबरदारी ठेव.

इकडे जिवंत झालेला त्रिविक्रमराजा ( मच्छिंद्रनाथ ) राजावाड्यांत गेल्यानंतर मनांत कांहीं किंतु न आणतां सर्व कारभार पाहूं लागला. राणीबरोबर त्याची त्रिविक्रमाप्रमाणेंच भाषणें होऊं लागली. तो पूर्ण ज्ञानी असल्यानें राजाच्या शरीरांत प्रवेश केल्यानंतर माहितगाराप्रमाणें सर्व व्यवस्था चालवूं लागला व राज्यप्रकरणीं सर्व कारभार सुरळीत चालूं झाला.

पुढें एके दिवशीं, त्रिविक्रमराजाच्या स्वरूपांत मच्छिंद्र्नाथ त्या देवालयांत गेला व गोरक्षनाथास तेथें पाहून विचारपूस करूं लागला. गोरक्षनाथानें त्यास उत्तरें देऊन आपण कोण, कोठले ह्याचा खुलासा केला. तसेंच, मच्छिंद्रनाथाचें शरीर सांभाळून ठेविलें होतें ती जागाहि नेऊन दाखविली व बर्बर भाषेंत सर्व हकीकत सांगितली. मग राजा क्षणभर तेथें बसून आपल्या राजवाड्यांत गेला. याप्रमाणें राजा नित्य शिवालयांत जात असे व आपलें शरीर ठेवलेली जागा पाहात असे. तो कांहीं वेळ शिवाजवळ व कांहीं वेळ गोरक्षाजवळ बसून प्रेमपूर्वक गोष्टी करीत असे. ह्याप्रमाणें तीन महिने एकसारखा क्रम चालला असतां एके दिवशीं, गोरक्षनाथानें राजास सांगितलें कीं, आतं आम्ही तीर्थयात्रेस जातों. आपण योगासाधन करून स्वस्थ असावें व स्वहित साधून स्वशरीराचें संरक्षण करावें. तें गोरक्षनाथाचें सर्व म्हणणें मच्छिंद्रनाथानें मान्य करून त्यास तीर्थयात्रा करावयास जाण्याची आज्ञा दिली व गोरक्षनाथ तीर्थयात्रेस गेला.

पुढें सहा महिन्यांनीं रेवती राणी गरोदर राहिली. नऊ महिने पूर्ण होतांच ती प्रसुत होऊन पुत्ररत्‍न झालें. बारावे दिवशीं मुलास पाळण्यांत घालून 'धर्मनाथ' असें नांव ठेविलें. त्या मुलाचें वय पांच वर्षाचें झाल्यावर एके दिवशीं राजा व राणी शिवालयांत पूजा करावयास गेलीं. तेथें राणीनें शिवाजी पूजा केल्यावर प्रार्थना केली कीं, हें शंकरा ! हे उमापते ! राजा त्रिविक्रम याच्याआधीं मला मरण दे. मी सुवाशीन असतां मरणें, हें उत्तम होईल.

रेवती राणीनें केलेली प्रार्थना ऐकतांच तेथील गुरविणीस खदखदां हसूं आलें. तें पाहून राणीनें तिला विचारलें कीं, कांहींतरी आश्चर्य वाटल्याशिवाय तुला हसूं येत नाहीं, तरी तुला कोणतें नवल वाटलें तें तूं मनांत संशय न धरतां मला सांग. तेव्हां गुरवीण म्हणाली कीं, तुम्ही ती हकीकत विचारूं नये व मलाहि खरी हकीकत तुम्हांपाशीं बोलतां येणार नाहीं; कां कीं, कदाचित्‌ अनर्थहि घडून यावयाचा, म्हणुन मला भय वाटतें. आम्ही दुर्बळ असून तुम्ही सत्ताधीश आहांत आणि मी सांगेन ती हकीकत ऐकून तुम्हांस क्रोध आल्यास आमच्या जिवावर येऊन बेतायचें ! तें ऐकून, माझ्यापासून तुला कोणत्याहि प्रकारचें दुःख व जिवास कांहीं एक भीति होणार नाहीं, असें राणीनें तिला वचन दिलें. मग गुरविणीनें तिला मुळापासुन शेवटपर्यंत संपूर्ण वृत्तांत निवेदन केला. शेवटीं ती म्हणाली, त्रिविक्रमराजा मरण पावला असून त्याच्या देहांत मच्छिंद्रनाथानें संचार केला आहे; ह्या कारणानें तूं विधवा असतां सुवाशीव म्हणवितेस म्हणुन मला हसूं आलें; परंतु तुं आतां इतकेंच कर कीं, ही गोष्ट कोणाजवळ बोलूं नको.

नंतर, राणीच्या आग्रहावरून गुरविणीनें तिला मच्छिंद्रनाथाचें शरीर भुयारांत होतें तें नेऊन दाखविलें. तें पाहून रेवती उदास होऊन राजवाड्यांत गेली; तिला चैन पडेना. नाना प्रकारच्या कल्पना तिच्या मनांत येऊं लागल्या. ती म्हणाली, दुदैवानें पतिव्रतापणास मी अंतरलें हें खचित.योगायोग होता त्याप्रमाणें घडून आलें, पण पुढें येणाऱ्या परिस्थितीचा आतांपासून बंदोबस्त केला पाहिजे. स्वस्थ बसून राहतां कामा नये. वास्तविक पाहूं गेले असतां, मच्छिंद्रनाथाचाचा हा हल्लींचा संसार आहे. परंतु बारा वर्षांनी पुन्हां येणारें संकट टाळलें पाहिजे. मच्छिंद्रनाथ परकायाप्रवेश पूर्णपणें जाणत असल्यामुळें तो भुयारांत ठेविलेल्या आपल्या शरीरांत प्रवेश करील. पण आपला मुलगा त्या वेळीं लहान राहून मीहि निराश्रित होऊन उघड्यावर पडेन. तरी मच्छिंद्रनाथाचा देह छिन्नभिन्न करून टाकला, हाच एक उत्कृष्ट उपाय दिसतो. देह नसल्यावर मच्छिंद्रनाथ कोठें जाणार ? अशी कल्पना मनांत आणुन त्याच्या देहाचा नाश करून टाकण्याचा तिनें पक्का निश्चय केला. नंतर कोणास न सांगतां एकां दासीस बरोबर घेऊन ती मध्यरात्रीस भुयारांत दरवाजा उघडून शस्त्रानें मच्छिंद्रनाथाच्या देहाचे तुकडे करून बाहेर नेऊन टाकून दिले आणि पूर्वीप्रमाणें गुहेचें द्वार लावून ती राजवाड्यांत गेली.

इतकें कृत्य झाल्यावर पार्वती जागृत झाली. तिनें शंकरास जागें केलें व रेवती राणीनें मच्छिंद्राच्या देहाचे तुकडे करून टाकल्याचें त्यास सांगितलें. तेव्हां आज आपला प्राण गेला असे शंकरास वाटलें. मग त्यानें याक्षिणींस बोलावून मच्छिंद्रनाथाच्या देहाचे तुकडे एकत्र करून कैलासास पाठवून देण्याबद्दल पार्वतीस सांगितलें. तिनें बोलावितांच कोटि चामुंडा येऊन दाखल झाल्या. त्यांस शरीराचे तुकडे वेंचून नीट जतन करून ठेवण्याची व वीरभद्राच्या स्वाधीन करण्याची पार्वतीनें आज्ञा केली. त्या आज्ञेप्रमाणें शरीराचे तुकडे वेंचून चामुंडा कैलासास गेल्या व ते तुकडे वीरभद्राच्या स्वाधीन करून त्यास सर्व वृत्तांत समजाविला. शेवटीं त्या वीरभद्रास म्हणाल्या कीं, आमचा व तुमचा शत्रु मच्छिंद्रनाथ हा मरण पावला आहे. त्यानें आम्हांस नग्न करून आमची फारच फजिती केली होती. तसेंच अष्टभैरवांची दुर्दशा केली, तुमचीहि तीच दशा केली, मारुतीचाहि तोच परिणाम; सर्व देवांना भारी असा प्रबळ शत्रु अनायासें तावडीनें सांपडला आहे. तरी ह्याचें शरीर नीट जतन करून ठेवावें. ह्या मच्छिंद्रनाथाचा शिष्य गोरक्षनाथ महान् प्रतापी आहे, तो हें शरीर घेऊन जाण्याकरितां येईल; यास्तव फर सावध राहावें. तें ऐकून वीरभद्रानें चौऱ्यांयशीं कोटि बहात्तर लक्ष शिवगण रक्षणासाठी बसविले व कोटि यक्षिणी, चामुंडा, डंखिणी व शंखिणी यांचा खडा पहारा ठेविला.

इकडे त्रिविक्रमराजा ( मच्छिंद्रनाथ ) नित्य शिवालयांत गेल्यावर भुयाराकडे जाऊन पाही, पण खूण जशीच्या तशीच असल्यामुळें हा घडलेला प्रकार त्याच्या समजण्यांत आला नाही. त्याची बारा वर्षांची मुदत भरली. गोरक्षनाथ तीर्थयात्रेस गेला होता तोहि मुदत पुरी झाली म्हणून सावध झाला.

अध्याय ३३ संपादन


माणिक शेतकऱ्याची भेट; त्याची परीक्षा, चौरंगीनाथास बरोबर घेऊन मच्छिंद्रनाथाकरितां वीरभद्राबरोबर युद्ध

.

गोरक्षनाथ तीर्थयात्रेस गेला असतां मागें रेवती राणीनें मच्छिंद्रनाथाच्या कलेवराचा नाश केला व पार्वतीनें तें यक्षिणीकडून जतन करून ठेवण्यासाठी कैलासास वीरभद्राच्या ताब्यांत दिलें, वगैरे झालेला प्रकार गोरक्षनाथास ठाऊक नव्हता. गोरक्षनाथ फिरत फिरत गोदावरीच्या तीरीं भामानगर आहे, त्याच्या जवळच्या अरण्यांत आला. तेथें त्यास क्षुधेनें फारच व्याकुळ केलें. उदकसुद्धां कोठें मिळेना. परंतु तो तसाच फिरत असतां माणिक या नावांचा एक दहा वर्षें वयाचा शेतकऱ्याचा मुलगा, शेतांत काम करीत असतांना त्यानें पाहिला. ऐन दोनप्रहरीं तो भोजनास बसणार, इतक्यांत गोरक्षनाथानें तेथें जाऊन 'आदेश' केला. तो शब्द ऐकून माणिक तसाच उठला व गोरक्षनाथाच्या पायां पडला आणि तुम्ही कोण, कोठें जातां, येथें आडमार्गांत कां आलेत, वगैरे विचारपूस मोठ्या आदरानें केली. तेव्हां गोरक्षनाथानें सांगितलें कीं, मी जति आहे; मला आतां तहान व भूक फार लागली असून जर कांहीं अन्न पाण्याची सोय होईल तर पाहा. हें ऐकतांच माणिक म्हणाला, महाराज! तयारी आहे भोजनास बसावें. असें म्हणून त्यानें त्यास जेवावयास वाढलें, पाणी पाजिलें व त्याची चांगली व्यवस्था ठेंविली. गोरक्षनाथ जेवून तृप्त झाल्यावर त्यास समाधान वाटलें.

मग गोरक्षनाथानें प्रसन्न होऊन माणिक शेतकऱ्यास, तुझे नाव काय म्हणुन विचारलें. तेव्हां तो म्हणाला, आतां आपलें तर कार्य झालें ना ? आतां माझें नांव वगैरे विचारण्यांत काय अर्थ आहे? कार्य साधून घेण्यासाठी प्रथम सर्व विचारण्यांत करावयाची जरूर असते; पण आतां ही चौकशी निरुपयोगी ! आतां आपण हळूहळू आपली मजल काढा ! यावर गोरक्षनाथानें उत्तर दिलें कीं, तें म्हणतोस ती गोष्ट खरी; पण आज ऐनवेळीं तुं मला जेवावयास घातलेंस तेणेंकरून मी प्रसन्न झालों आहे; यास्तव तुझ्या मनांत कांही इच्छा असेल ती तूं माग; मी देतों. तेव्हां माणिक म्हणाला, महाराज आपण घरोघर अन्नासाठीं भिक्षा मागत फिरतां, असें असतां तुम्हांस माझ कळवळा आला असला तरी तुमच्याजवळ मला देण्याजोगें काय आहे ? हें ऐकून गोरक्षनाथानें सांगितल की, तूं जें मागशील तें मी देतों. तें माणिकास खरें न वाटून तो म्हणाला, तुम्ही भिक्षुक, मला काय देणार ? तुम्हांलाच कांहीं मागावयाचें असेल तर मागा, मी देतों. तें घेऊन आपण आपला रस्ता सुधारावा.

याप्रमाणें भाषण ऐकुन गोरक्षनाथानें विचार केला कीं, शेतकरी लोक अरण्यांत राहत असल्यानें त्यांना फारसें ज्ञान नसतें; यास्तव आपण याचें कांहीं तरी हित केलें पाहिजे. मग नाथ त्यास म्हणाला, अरे, मी सांगेन ती वस्तु देईन असें तुं म्हणतोस ! पण वेळ आली म्हणजे मागें सरशील. हें ऐकून माणिक वर्दळीवर येऊन म्हणाला, अरे, जो जीवावरहि उदार, तो पाहिजे तें देण्यास मागें पुढें पाहिल काय ? तुला वाटेल तें तूं माग. पाहा मी तुला देतों कीं नाहीं तें असें बरेंच भाषण झाल्यावर गोरक्षनाथानेंहि त्याची परीक्षा पहाण्याकरितां त्यास सांगितलें कीं, जी जी गोष्ट तुला करावीशी वाटेल किंवा ज्यावर तुझी इच्छा असेल, अशाच तुं तिरस्कार करावास, हेंच माझें तुझ्यापाशीं मागणें आहे. तें गोरक्षनाथाचें मागणें त्यानें आनंदानें कबूल केलें व नाथ तेथून पुढें निघून गेला.

नंतर माणिक आपलें आउतादि सामानाचें ओज्ञें डोक्यावर घेऊन शेतांतून घरीं निघाला व प्रथम जेवणाकडे त्याचें लक्ष गुंतलें इतक्यांत गोरक्षनाथ वचन दिल्याची त्यास आठवण झाली. मनांत येईल तें न करणें हाच वचन देण्यांत मुद्दा होता. मग त्याच्या मनांत आलें कीं, मन घरीं जाऊं इच्छीत आहे, त्याअर्थी वचनास गुंतल्याअन्वयें आतां घरीं जातां येत नाहीं. म्हणून तो तेथेंच उभा राहून झोंप घेऊं लागला. डोक्यावर बोचकें तसेंच होतें. मग अंग हलवावयास मन इच्छीत होतें, पण त्यानें अंग हालूं दिलें नाहीं. त्या वचनाचा परिणाम असा झाला कीं, वायुभक्षणा वांचून त्यास दुसरा मार्गच राहिला नाहीं. यामुळें कांहीं दिवसांनीं त्याचें शरीर कृश झालें. रक्त आटून गेलें; तिळभरसुद्धां मांस राहिलें नाहीं त्वचा व अस्थि एक होऊन गेल्या; असें झालें तरी तो रामानामस्मरण करीत एंका जागीं लाकडाप्रमाणें उभा राहिला.

इकडे गोरक्षनाथ फिरत फिरत बदरिकाश्रमास गेला. तेथें बदरिकेदाराच्या पायां पडून चौरंगीनाथाची काय स्थिति झाली आहे. ती पाहावयास गेला. त्यानें गुहेच्या दाराची शिळा काढून आंत पाहिलें तों चौरंगीचें सर्वांग वारुळानें वेष्टून टाकिलेलें, मुखानें रामानामाचा ध्वनि चाललेला, अशी त्याची अवस्था दिसली. ती पाहून गोरक्षनाथ हळहळला. त्यानें त्याच्या अंगावरचें सर्व वारूळ काढून टाकले आणि त्याच्या शरीराकडे पाहिले. तपःसामर्थ्यानें त्यास हातपाय फुटलेले दिसले. मग गोरक्षनाथ आलों आहें, असें बोलून त्यानें चौरंगीस सावध केल व बाहेर घेऊन आल्यावर त्याच्याकडे कृपादृष्टीनें पाहतांच त्यास चांगली शक्ती आली. तेव्हां चौरंगीनाथ गोरक्षनाथाच्या पायां पडला व मी आज सनाथ झालों, असें त्यानें बोलून दाखविलें.

मग गोरक्षनाथानें खाण्यापिण्याची कशी व्यवस्था झाली म्हणून विचारपूस केली. तेव्हां त्यानें उत्तर दिलें कीं , मला माहीत नाही. तें चामुंडा सांगेल. मग तिला विचारल्यावर ती म्हणाली, आम्ही रोज फळें आणून देत होतों, परंतु चौरंगीचें लक्ष वर शिळेकडे असल्यामुळें त्यानें तीं भक्षण केलीं नाहींत. इतकें बोलून चांमुडेनें फळांचे पर्वताप्रमाणें झालेले ढीग दाखविले. ते पाहून गोरक्षनाथास विस्मय वाटला. त्याने चोरंगीच्या तपाची फारच वाखाणणी केली व आपला वरदहस्त त्याच्या मस्तकीं ठेविला. मग तो त्यास घेऊन बदरिकेदाराच्या देवालयांत गेला. तेथें उमारमणास जागृत करून चौरंगीस भेटविलें. नंतर गोरक्षनाथानें सहा महिनें तेथें राहून चौरंगीनाथाकडून विद्याभ्यास करविला व शस्त्रास्त्रविद्येंत त्यास आशीर्वाद देवविले.

नंतर बदरिकेदारेश्वरास वंदन करून गोरक्षनाथ चौरंगीनाथास घेऊन निघाला आणि वैदर्भदेशांत उतरून कौंडण्यपुरास गेला. तेथें चौरंगीनाथास आपल्या आईबापांस भेटून येण्यास सांगितलें , त्यांनीं तुझे हातपाय तोडिले. म्हणुन तूं आपला प्रताप त्या दोघांस दाखीव असेंहि गोरक्षनाथानें सुचविलें. त्या आज्ञेप्रमाणें चौरंगीनाथानें वातानें भस्म मंत्रुन तें राजाच्या बागेकडे फुंकिलें. तें वातास्त्र सुटतांच बागेंत जे सोळाशें माळी रखवालीस होते, ते सर्व वादळ सुटल्यामुळें आकाशांत उडून गेले. मग वातास्त्र काढून घेतांच ते सर्वजण खालीं उतरले. त्यांतुन कित्येक मूर्च्छना येऊन पडले; कित्येक पळून गेले. कित्येकांनीं जाऊन हा बागेंत झालेला प्रकार राजाच्या कानांवर घातला. तेव्हां सर्व विस्मयांत पडले. मग हें कृत्य कोणाचं आहे, ह्याचा शोध करण्याकरितीं राजानें दूतांस पाठविलें. ते दूत शोधाकरितां फिरत असतां त्यांनीं पाणवठ्यावर या उभय नाथांस बसलेले पाहून राजास जाऊन सांगितलें कीं, महाराज ! पाणवठ्यांशीं दोन कानफडे गोसावी दिसत आहेत ! ते महातेजस्वी असून त्यांच्याजवळ कांहीं तरी जादू असावी असें दिसतें.

दूतांचें भाषण ऐकून राजनें विचार केला कीं, हे गोरक्षनाथ व मच्छिंद्रनाथ असतील, त्यांस आपण शरण जावें; नाहीं तर हें नगर पालथें घालून ते सर्वाचे प्राण संकटांत पाडतील. मग तो आपल्या लव्याजम्यानिशीं त्यास सामोरा गेला. तेव्हां आपला प्रताप दाखविण्याची गोरक्षनाथानें चौरंगीनाथास आज्ञा केली. त्या अन्वयें त्यानें राजाबरोबर आलेल्या सैन्यावर वातास्त्राची योजना केली. त्याक्षणींच राजासहवर्तमान सर्व लोक हत्ती, घोडे, रथासुद्धां आकाशांत उडून गेले. त्यामुळें सर्व भयभीत होऊन त्यांची प्रार्थना करूं लागले मग गोरक्षनाथाच्या आज्ञेवरून चौरंगीनाथानें पर्वतास्त्र सोडून वातास्त्र परत घेतलें. तेव्हां सर्वजण पर्वतास्त्राच्या आश्रयानें हळूंहळूं खाली उतरले.

मग गोरक्षच्या आज्ञेनें, चौरंगी आपला पिता जो शशांगार राजा, त्याच्या पायां पडला व आपण पुत्र असल्याची त्यानें ओळख दिली. ओळख पटतांच राजानें त्यास पोटाशी धरिलें. नंतर राजा गोरक्षनाथाच्या पायां पडला. मग त्या उभयतांचीं चौरंगीच्या प्रतापाविषयीं भाषणें झाली. इतक्यांत चौरंगीनें वज्रांस्त्र सोडून पर्वतास्त्राचा मोड केला.

थोड्या वेळानें राजानें घरीं येण्याबद्दल गोरक्षनाथास अति आग्रह केला; पण चौरंगीनें राजास सांगितलें कीं, तुझ्या घरीं आम्हीं येणार नाहीं, कारण सावत्र आईच्या कपटी बोलण्यावर विश्वास ठेवुन तूं माझे हातपाय तोडिलेस. असें बोलून मुळारंभापासुन खरा घडलेला वृत्तांत त्यानें सांगितला. त्यासमयीं आपलीं भुजावंती स्त्री जारिणी आहे असें समजून राजास तिचा अत्यंत राग आला. त्यानें राणीस मारीत झोडीत तेथें घेऊन येण्याची सेवकांस आज्ञा केली, परंतु तसें करण्यास चौरंगीनें किरोध केला. घरींच तिला शिक्षा करावी असें त्याचें मत पडलें. मग त्या दोघांस पालखीत बसवुन राजा आपल्या वाड्यांत घेऊन गेला. तेथें राजानें राणीचा अपराध तिच्या पदरांत घालून तिला शिक्षा केली व घरांतुन घालवून दिलें. नंतर गोरक्षनाथानें राजाचे शांतवन करून दुसरी स्त्री करण्याची आज्ञा केली व आपला वरदहस्त त्याच्या मस्तकावर ठेवून वंश वाढेल असा आशीर्वाद दिला. तेथें गोरक्षनाथ एक महिना राहून चौरंगीनाथास घेऊन तेथून पुढें गेला.

कौंडण्यापूर सोडल्यावर ते फिरत फिरत प्रयागास गेले तेथें स्नान करून शिवालयात देवाचें दर्शन घेतल्यानंतर पूर्वीच्या गुरविणीस बोलावून गोरक्षनाथानें तिला गुरुच्या देहाबद्दल विचारलें तेव्हां ती भयभीत होऊन थरथरां कापूं लागली. अडखळत बोलूं लागली. ती त्याच्या पायां पडली व म्हणाली, महाराज,रेवती राणीनें मला धमकी देऊन विचारल्यावरून मी खरी गोष्ट तिच्यापाशीं सांगितली. गुरुच्या देहाची कय व्यवस्था झाली आहे ती प्रत्यक्ष जाऊन पाहावी. असा जेव्हां तिच्या बोलण्याचा आशय दिसला, तेव्हां गोरक्षाच्या मनांत संशय उत्पन्न झाला. तो लागलाच भुयाराकडे गेला व दार उघडून पाहातो तो आंत मच्छिंद्रनाथाचें प्रेत दिसेना. तेव्हा तो शोक करूं लागला. तें पाहून गुरविणीनें त्यास सांगितलें कीं, तुम्हीं अंमळ स्वस्थ बसा; मी राणीस भेटून तिनें प्रेताची काय व्यवस्था केली आहे, तें विचारून येतें. असे सांगून ती लागलीच तेथून निघाली.

नंतर तिनें राजवाड्यांत जाऊन राणीची भेट घेतली आणि राणीस म्हटलें, मच्छिंद्रनाथाच्या शरीराबद्दल मी तुमच्यापाशीं गोष्ट काढून बारा वर्षाची मुदत सांगितली होती, ती पुरी झाली म्हणुन मला आज त्या गोष्टीचें स्मरण झाल्यावरून आपल्याकडे आलें आहें, तें तिचें भाषण ऐकून राणी तिला एकीकडे घेऊन गेली व म्हणाली राजा त्रिविक्रमाच्या देहांत मच्छिंद्रनाथानें प्रवेश केला व आपला राजा त्रिविक्रमाच्या देहांत मच्छिंद्रनाथानें प्रवेश केला व आपला देह शिष्याकडून शिवालयाच्या भुयारांत लपवून ठेविला वगैरे हकीकत तुं मला सांगितलीस. त्यानंतर थोड्याच दिवसांत तुझ्या नकळत मीं त्याच्या शरीराचे तुकडे करून ते रानांत टाकून दिले. या गोष्टीस आज पुष्कळ दिवस झाले. ते तुकडे किडीमुंग्यांनीं खाऊन सुद्धां टाकले असतील. अशा रीतीनें मी चिंतेचें बीज समूळ खणुन टाकिलें. आतां तूं निर्धास्त राहा.

राणीचें हे भाषण ऐकून ती फारच घाबरली. परंतु नशिबावर हवाला ठेवुन व आतां पुढें काय भयंकर परिणाम होणार अशी भीति मनांत आणुन तिनें परत येऊन गोरक्षनाथास ती हकीकत सांगितली. तेव्हां त्यास अत्यंत राग आला आणि राणीस शिळा करण्याचें त्याच्या मनांत आलें. परंतु आतां ती मच्छिंद्रनाथाची स्त्री असल्यामुळें आपली माता झाली. असा विचार येऊन तिला शिक्षा करण्याचा विचार त्यानें सोडून देला. त्यानें मनांत विचार केला कीं, गुरुच्या शरीराचे तुकडे झाले असले तरी ते नाश पावावयाचे नाहींत. कोठें तरी पडलेले असतील, ते शोधून काढावे. नंतर त्या उद्योगास लागल्याचें त्यानें ठरविलें आणि तो चौरंगीस म्हणाला, मच्छिंद्रनाथाच्या देहाचा शोध करण्याकरितां मी माझा देह येथें ठेवून सूक्ष्मरूपानें जातों, माझ्या शरिराचें तूं नीट संरक्षण कर. येथील राणी रेवती हिनें मच्छिंद्राच्या देहाचा जसा नाश केला तसा ती माझ्याहि शरीराचा नाश करील. यास्तव फार सावधगिरी ठेव. असें सांगून गोरक्षनाथ शरीरांतुन प्राण काढून जिकडे तिकडे पाहूं लागला. त्यानें सुक्ष्म रूपानें सर्व पृथ्वी, पाताळ, स्वर्ग आदिकरून सर्व ठिकाणी धूंडून पाहिलें; पण पत्ता लागेना. शेवटी तपास करीत करीत तो कैलासास गेला व शिवगणांस पाहू लागल. तेथें मच्छिंद्रनाथाच्या अस्थि, त्वचा, मांस वगैरे त्यास दिसुन आलें.

त्या वेळेस त्या शिवगणांस वीरभद्र सांगत होता कीं, बारा वर्षांची मुदत पुरी झाली; आतां मच्छिंद्रनाथाच्या शरीराचें रक्षण करण्यास फारच सावध राहा. कारण, त्याचा शिष्य गोरक्षनाथ हा शोध करण्यासाठीं केव्हां कोणत्या रूपानें येईल याचा नेम नाहीं.हे वीरभद्राचे शब्द गोरक्षनाथाच्या कानीं पडतांच तो तेथून निघुन पुनः परत येऊन आपल्या देहांत शिरला. मग गोरक्षनाथ व चौरंगीनाथ एक विचार करून भस्म व झोळी घेऊन युद्धास सिद्ध झाले. गोरक्षनाथानें सूर्यावर प्रथम पर्वतास्त्राची योजना केली, तेणेंकरून त्याचा रथ चालेना. सूर्यानें वज्रास्त्रानें पर्वतास्त्राचा मोड केला व मला अडथळा करण्यासारखें पर्वतास्त्र सोडणारा कोण, ह्याचा सूर्यानें मनांत शोध केला, तो गोरक्षनाथाजवळ आला. त्याचा ताप लागूं नये म्हणुन गोरक्षनाथानें चंद्रास्त्राची योजना करून कोटी चंद्र निर्माण केले; तेणेंकरून थंडावा येऊन सूर्याचा ताप लागेनासा झाला. नंतर गोरक्ष व चौरंगी हे दोघेहि सूर्याच्या पायां पडले. ह्या वेळेस मला हैराण करण्याचें कारण कोणतें, म्हणुन सूर्यानें विचारल्यावर गोरक्षनाथानें सांगितलें कीं, मच्छिद्रनाथाचा देह शिवगणांनी कैलासास नेला आहे. यास्तव आपण मध्यस्थी करून तो आमच्या हातांत येईल असें करावें. म्हणजे आपले आम्हांवर मोठें उपकार होतील.

गोरक्षनाथाचें तें भाषण ऐकून शिष्टाई करण्याचें कबूल करून सूर्य कैलासास गेला. त्यास पाहतांच शिवगणांनीं त्याच्या पायां पडून येण्याचें कारण विचारिल्यावर गोरक्षनाथकडून मध्यस्थीचें काम घेऊन आलों आहें. असें सांगून सूर्यानें त्यांस मच्छिंद्रनाथाचें शरीर परत द्यावें म्हणुन फारच सुरस बोध केला व गोरक्षनाथाचा प्रतापहि वाखाणिला. परंतु सूर्याच्या बोलण्याचें वीरभद्राजवळ वजन पडलें नाहीं. त्यानें उत्तर दिलें कीं, मच्छिंद्रनाथानें आम्हांस अत्यंत त्रास देऊन दुःसह दुःखे भोगावयास लावून आमचे प्राण सुद्धा धोक्यात घातले; असा शत्रु अनायासें आमच्या तावडीत आलेला असल्यानें प्राण गेले तरी आम्ही त्यास सोडून देणार नाहीं, जर गोरक्ष युद्ध करील तर त्याचीहि मच्छिंद्राप्रमाणें अवस्था करुं. असें वीरभद्राचें वीरश्रीचें भाषण ऐकून सूर्यानें त्यास सांगितलें कीं,एवढे पाणी जर तुमच्यामध्यें होतें तर मच्छिंद्रनाथानें मागें तुमच्यी दुर्दशा करून प्राणावर आणुन बेतविलें, तेव्हां तुमचा प्रताप कोणीकडे लपून राहिला होता ? आतां तो सहज तुमच्या हातात आला म्हणून तुम्हीं इतकी मिजाज करित आहां. पण मच्छिंद्र आणि गोरक्ष हे दोघे सारखे बलवान आहेत. शिवाय त्या वेळेस मच्छिंद्रनाथ एकटाच होता. आतां गोरक्षानाथाच्या साह्यास चौरंगीनाथ आला आहे, यास्तव तुझ्या या अविचारी व दांडगाईच्या उत्तरेनें चांगला परिणाम घडून येणार नाहीं. परंतु सूर्यानें सांगितलेलें हें सर्व भाषण फुकट गेलें व कांहीं झालें तरी मच्छिंद्राचा देह परत देणार नाहीं, असें वीरभद्रादिकांनीं स्पष्ट सांगितलें.

मग सूर्याने त्यास सांगितलें कीं , तुम्हीं आतां इतकें करा कीं, हें युद्ध कैलासास न होतां पृथ्वीवर होऊं द्या. कैलासास झालें तर कैलासाचा चुराडा होऊन जाईल; असें सांगुन सूर्य तेथून निघाला.

सूर्य निघून गेल्यावर युद्धाकरितां तुम्हीं पुढें चला मी मागाहून लवकर येतों असा वीरभद्राचा शिवगणांस हुकूम झाला. त्याप्रमणें अष्टभैरव, गुण आदिकरून सर्व युद्धास येऊन थडकले.बहात्तर कोटि चौऱ्याऐंशीं लक्ष गण शस्त्रास्त्रांसह युद्धांस आले असे पाहून गोरक्ष व चौरंगी सावध झाले. दोन्हीं बाजु जयाची इच्छा धरून लढू लागल्या. शेवटीं चौरंगीच्या मोहिनी व वातास्त्रांनी वीरभद्राच्या दळांतील लोकांचा मोड होऊन ते भ्रमिष्टासारखे होऊन देहभान विसरले. इतक्यांत वीरभद्र चामुंडांसह येऊन दाखल झाला. आपल्या दळाचा पराभव झाला असें पाहून वीरभद्र गोरक्षनाथावर चवताळला. त्यांनी एकमेकांच्या नाशास उद्युक्त होऊन शस्त्रास्त्रांचा एकसारखा मारा चालूं केला. परंतु गोरक्षाच्या शक्तीमुळें वीर भद्राचीं अनेक शस्त्रें व अस्त्रें दुर्बल झाली. शेवटीं गोरक्षनाथानें संजीवनीं अस्त्राची योजाना करून सकल दानव उठविले. त्यात त्रिपुर, मधु महिषासुर , जलंधर काळयवन, अद्यासुर , बकासुर, हिरण्यापक्ष, हिरण्याकशिपु , मुचकुंद, वक्रंदत, रावण, कुंभकर्ण इत्यादि अनेक महापराक्रमी राक्षस युद्धासाठीं येऊन पोचलें. त्यावेळीं तेहतीस कोटि देवांनीं रणक्षेत्र सोडून आपपली विमानें पळविली व त्यांना मोठी चिंत्ता उप्तन्न झाली. त्यांनीं वैकुंठास जाऊन हा सर्व प्रकार श्रीविष्णुच्या कानांवर घातला. तेव्हां अतां पुनः अवतार घ्यावा लागेल, असें वाटून त्यालाहि काळजी पडली, मग विष्णुनें शंकरास बोलावून आणुन सर्व वृत्तांत त्यास सांगितला व वीरभद्राच्या वेडेपणानें या पल्ल्यास गोष्ट आली, असें सांगितलें.

मग तंटा मिटवून विघ्न टाळण्यासाठीं ते गोरक्षनाथाकडे गेले व त्यास त्यांनी पुष्कळ प्रकारांनी समजावून सांगितलें. परंतु गुरुचें शरीर माझ्या स्वाधीन करा म्हणजे तंटा मिटेल, असें गोरक्षनाथानें स्पष्ट उत्तर दिलें, मग शंकरानें चामुंडास पाठवुण मच्छिंद्रनाथाचा देह आणविला. व गोरक्षनाथाच्या स्वाधीन केला आणि राक्षसांस अदृश्य करावयास सांगितले. तेव्हा गोरक्ष म्हणाला, अस्त्राच्या योगानें राक्षस उप्तन्न न होतां संजीवनीं मंत्रप्रयोग केल्यामुळें राक्षस उप्तन्न झालें आहेत. यास्तव पुनः अवतार घेऊन त्यास मारुन टाका किंवा वीरभद्राची आशा सोडा. दोहोंतुन जसें मला सांगाल तसें मी करितो. हें ऐकून शकरानें सांगितलें कीं, मधुदैत्य माजला त्या वेळेस आम्ही रानोमाळ पळुन गेलों, शेवटीं एकादशीस अवतार घेऊन त्याचा नाश करावा लागला. अशीं संकटें अनेक वेळां सोसावीं लागली यास्तव आतां विलंब न लावितां लौकरच राक्षसांचा बंदोबस्त कर; आम्हीं वीरभद्राची आशा सोडून दिली असें शिव व विष्णु त्यास म्हणूं लागले. त्या वेळीं प्रतापवान वीरभद्र एकटाच त्या राक्षसमंडळींशीं लढत होता. तें पाहून गोरक्षनाथानें वाताकर्षण अस्त्राची योजना केली आणि मंत्र म्हणुन भस्म फेंकतांच वीरभद्रासह सर्व राक्षस गतप्राण होऊन निश्चेष्ट जमिनीवर पडले. तेव्हां शंकर व विष्णु यांनीं गोरक्षनाथाची स्तुति केली. मग गोरक्षनाथानें अग्न्यस्त्र योजून निश्चेष्ट पडलेल्यांस जाळून टाकलें हा वाताकर्षण प्रयोग नाथपंथावांचून देवदानवांस ठाऊक नव्हता.


अध्याय ३४ संपादन


वीरभद्रास सजीव केलें; मच्छिंद्रनाथानें त्रिविक्रम राजाचा देह सोडला; अडभंग कथा; रेवणनाथ जन्मकथा


युद्धामध्यें वीरभद्र जळल्यानंतर शंकर शोक करीत बसले. ही गोष्ट गोरक्षनाथाच्या लक्षांत येतांच त्याचें अंतःकरण द्रवून गेल. त्यानें विचार केला कीं, ज्या वेळेस गुरुनें मला बदरिकाश्रमास तपश्चर्येंस बसविलें, त्या वेळीं शंकरानें मजविषयीं विशेष काळजी बाळगिली होती व पुष्कळ श्रम घेतले होते. मातेसमान त्यांनीं माझा प्रतिपाळ केला. असा माझा स्वामी आज पुत्राच्या मरणानें शोक करित असलेला मी पाहावा हें मला शोभत नाहीं आणि हें अयोग्य कर्म मजकडून झालें, असा मनांत विचार आणून गोरक्षनाथ शंकराच्या पायां पडला आणि म्हणाला. वीरभद्राचें तुम्हांस अतिशय दुःख झाले आहे, परंतु जर मला त्याच्या अस्थि आणुन द्याल तर मी वीरभद्रास उठवीन. संजीवनीमंत्राच्या योगानें मी त्यास तेथेंच उठविलें असतें, पण सर्व राक्षसांच्या मेळ्यांत तो जळला असल्यामुळें त्याच्याबरोबर पुन्हां राक्षस उठतील. मग वीरभद्राची हाडें मी ओळखून घेऊन येतों, असें सांगून शंकर समरभूमीवर गेले. जी हाडें शिवनामस्मरण करतील ती वीरभद्राचीं हांडें असें ओळखून गोरक्षनाथाजवळ आणिली. मग गोरक्षनाथानें संजीवनीमंत्र सिद्ध करून वीरभद्रावर भस्म टाकतांच वीरभद्र उठून धनुष्यबानाची चौकशी करुं लागला व म्हणूं लागला कीं, आतां राक्षसांचा संहार करून शेवटीं गोरक्षनासहि यमपुरिस पाठवून देतो. तेव्हां शंकरानें त्यास म्हटलें, आतां व्यर्थ बोलूं नका. नंतर त्यास संपूर्ण मजकूर निवेदन केला आणि त्याची व गोरक्षनाथाची मैत्री करून दिली. इतक्यांत वायुचक्रीं भ्रमत असलेले बहात्तर कोटी चौऱ्यांयशी लक्ष शिवगण गोरक्षनाथास नमस्कार करून परत कैलासास गेले. मग गोरक्षनाथाहि मच्छिंद्राचें शरीर घेऊन शिवालयांत आला.

इकडे त्रिविक्रमराजा ( मच्छिंद्रनाथ ) राजविलासांत निमग्न झाला होता. एके दिवशीं तो नित्यनेमाप्रमाणें दर्शनाकरितां शिवालयांत गेला असतां गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथाच्या शरीराचें तुकडे जवळ घेऊन बसलेला दिसला. तेव्हां त्यास राजा प्रीतीनें भेटला. मग राजानें सर्व वृत्तांत विचारल्यावरुन गोरक्षनाथानें त्यास झालेला वृत्तांत निवेदन केला. तो ऐकून त्यास तळमळ लागली. त्यानें गोरक्षनाथास सांगितलें कीं, कांहीं दिवस असाच धीर धरुन राहा. धर्मनाथास राज्यावर बसवुन मग मी येतों. असें सांगुन तो राजवाड्यांत गेला. त्यानें लागलेंच या गोष्टींविषयीं प्रधानाचा विचार घेऊन एका सुमुहूर्तावर धर्मनाथास राज्याभिषेक केला. त्या उत्सवसमयीं याचकांस विपुल धन देऊन संतुष्ट केलें. पुढें एक महिन्यांनंतर एके दिवशीं त्रिविक्रमराजाच्या शरीरांतुन निघून मच्छिंद्रनाथ शिवालयांत ठेवलेल्या आपल्या देहांत गेले. इकडे राजवाड्यांत राजास उठण्यास वेळ लागल्यानें राणी महलांत गेली व हालवून पाहते तों राजाचें शरीर प्रेतवत्‌ पडलेलें. मग तिनें मोठा आकांत मांडिला. इतक्यांत धर्मनाथ धांवून गेला व प्रधान आदिकरुन मंडळी जमली. ह्या बातमीनें नगरांत एकच हाहाःकार होऊन गेला.

त्रिविक्रमराजा मरण पावला, हा वृत्तांत शिवालयमध्यें गोरक्षनाथ होता. त्यास लोकांकडुन समजला. तो ऐकून त्यानें संजीवनीप्रयोगानें भस्म मंत्रून अस्थी, मांस वगैरे जमवाजमव केली तोंच मच्छिंद्रनाथानें देहांत प्रवेश केला व उठून बसला.

इकडे राजाचें प्रेत स्मशानांत नेऊन तेथें सर्व संस्कार झाल्यावर लोक घरोघर गेले. रेवती राणीनें मात्र मच्छिंद्रनाथाचा देवालयांतुन शोध आणविला होता. तिचा मुलगा धर्मनाथ यास राजाच्या मरणानें अतिशय दुःख झालें. त्यास अन्न‌उदक गोड लागेना. त्यास आपला प्राणहि नकोसा झाला. तें पाहून रेवतीमातेनें त्यास एकीकडे नेऊन सांगितले कीं, तूं व्यर्थ का शोक करितोस ? बाळ ! तुझा पिता मच्छिंद्रनाथच होय. तो चिरंजीव आहे. तूं आतांच शिवालयांत जाऊन त्यास प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहून ये.

मच्छिंद्रनाथ माझा पिता कसा, म्हणुन धर्मनाथानें रेवती राणीस विचारल्यानंतर तिनें मच्छिंद्रनाथाच्या परकायाप्रवेशाची समग्र वार्ता त्यास निवेदन केली. ती ऐकून धर्मनाथ लवाजम्यानिशीं शिवालयांत गेला व मच्छिंद्रनाथाच्या पायां पडून त्यास पालखींत बसवून राजवाड्यांत घेऊन आला. तो एक वर्षभर तेथं होता. नंतर मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ, चौरंगीनाथ हे तीर्थयात्रेस जावयास निघाले. त्यासमयीं धर्मनाथास परम दुःख झालें. तोहि त्यांच्यासमागमें तीर्थयात्रेस जावयास सिद्ध झाला. तेव्हां मच्छिंद्रनथानें त्याची समजुत केली कीं, मी बारा वर्षांनीं परत येईन; त्या वेळीं गोरक्षनाथाकडून तुला दिक्षा देववीन व मजसमागमें घेऊन जाईन. आतां तूं रेवतीची सेवा करून आनंदानें राज्यवैभवाचा उपभोग घे. अशा रीतीनें मच्छिंद्रनाथानें त्याची समजुत केल्यावर ते तिघे तेथून निघाले.

ते त्रिवर्ग तीर्थयात्रा करीत करीत गोदातटीं धामानगरांत येऊन पोचलें. त्या ठिकाणीं गोरक्षनाथास माणिक शेतकऱ्याचें स्मरण झालें. त्यानें त्या मुलाबरोबर झालेला सर्व मजकूर मच्छिंद्रनाथास कळविला. मग शेताची जागा लक्षांत आणुन तिघेजण माणिकाजवळ गेले. तेथ तो काष्ठासमान उभा असलेला त्यांनीं पाहिला. त्याच्या अंगावर तिळभरसुद्धां मांस नसुन हाडांचा सांगाडा मात्र उरला होता व तोंडानें सारखा राममंत्राचा जप चालला होता. त्याचें तें कडक तप पाहून गोरक्षनाथानें तोंडात बोट घातलें व 'मी म्हणतों तो हाच माणिक' असें त्यानें मच्छिंद्रनाथास सांगितलें. मग तिघेजण त्याच्याजवळ गेले व त्यांनीं त्यास तप पूर्ण करावयास सांगितलें तेव्हा त्यानें त्यांस उत्तर दिलें कीं, तुम्हाला ही पंचाईत कशाला पाहिजे ? तुम्ही आपलें येथुन चालू लागा. विनाकारण कां खोटी करतां ? त्यांनी त्यास जें जें विचारावें त्या त्या प्रत्येक प्रश्नाचा माणिक उलट जबाब देई. तें पाहून मी आतां ह्यास युक्तीनें ताळ्यावर आणतों , असे गोरक्षनाथानें म्हटलें.

मग गोरक्षनाथ एकटाच तेथें राहून मच्छिंद्रनाथ व चौरंगीनाथ जवळच्या झाडाखालीं बसले व गोरक्ष काय करितो हें पाहूं लागले. गोरक्षनाथानें माणिकाजवळ उभें राहून मोठ्यानें म्ह्टलें कीं, अहाहा ! असा तपस्वी मी अजूनपावेतों पाहिला नव्हता; अशाचा उपदेश घेऊन ह्यास गुरु करावा हेंच चांगलें. माझें दैव उदयास आलें म्हणुन समजावं, नंतर गोरक्ष त्यास बोलला; स्वामीं ! मी आपणांस गुरु करीत आहे; तर आपण कृपा करून मला अनुग्रह द्यावा. हें ऐकून माणिक त्यास म्हणाला. बेट्या, एवढा मोठा झालास तरी अजुन तुला अक्कल नाहीं. तु मला गुरु करुं पहातोस त्यापेक्षां तुंच कां माझा गुरु होईनास ! त्याचा उलटा जबाब येणार हें ओळखून गोरक्षनाथानें त्यास हा प्रश्न केला होता. त्याप्रमाणें उत्तर ऐकतांच गोरक्षनाथानें त्यास मंत्रोपदेश केला. त्यामुळें तो त्रिकाळज्ञानी सोडून गोरक्षनाथाच्या पायां पडला. तेव्हां गोरक्षनाथानें शक्तिप्रयोग मंत्रुन गोरक्षानें त्यास हातीं धरून मच्छिंद्रनाथाकडे नेलें. त्यांनी त्याचा विचित्र स्वभाव पाहून त्याचें नाव 'अंडभंग' असें ठेवलें व त्यास नाथदीक्षा देऊन ते चौघे मार्गस्थ झाले, वाटेंत गोरक्षनाथानें अडभंगास सकल विद्यांत निपूण केलें.

नंतर तीर्थयात्रा करीत बारा वर्षानीं प्रयागास आले. त्या वेळेस धर्मनाथराजास पुत्र झाला असुन त्यांचें नांव त्रिविक्रम असं ठेविलें होतें हे चौघे गांवांत आल्याची बातमी धर्मनाथास समजांच तो त्यास सामोरा जाऊन राजवाड्यात घेऊन गेला. धर्मनाथानें आपल्या मुलास राज्यावर बसवुन आपण योगदीक्षा घेण्याचा निश्चय केला. माघ महिन्यांतील पुण्यतीथ द्वितीया, जिला धर्मबीज असें म्हणतात, त्या दिवशीं गोरक्षनाथानें धर्मनाथास अनुग्रह देऊन दीक्षा दीली. त्या वेळेस सर्व देव बोलाविले होते. नगरवासी लोकांचाहि मोठा मेळा जमला होता. सर्वजण प्रसाद घेऊन आनंदानें आपपल्या स्थानीं गेले. दरसाल असाच उत्सव होऊन प्रसाद मिळावा अशी देवांसुद्धां सर्वांनीं आपली इच्छा दर्शविली. मग ' धर्मनाथबीजेचा' उत्सव प्रतिवर्षीं करण्याची गोरक्षानें त्रिविक्रमास आज्ञा दिली. तेव्हां सर्वास आनंद झाला व दरसाल या दिवशीं उत्सव होऊं लागला.

गोरक्षनाथानें आपल्या 'किमयागिरी' नामक ग्रंथांत असें लिहिलें आहे कीं. आपपल्या शक्त्यनुसार जो कोणी हें बीजेचें व्रत करील त्याच्या घरीं दोष, दारिद्र्य, रोग आदिकरुन विघ्नें स्वप्नांत देखील यावयाची नाहींत. त्या पुरुषांचा संसार सुयंत्रित चालेल प्रत्येक्ष लक्ष्मी त्याच्या गृहीं वास्तव्य करील. याप्रमाणें धर्मनाथ बीजेचा महिमा होय.

धर्मनाथास नाथदीक्षा दिल्यानंतर ते तिघेजण त्यास घेऊन निघाले. त्यांनी तीर्थ फिरत फिरत बदरीकाश्रमास जाऊन धर्मनाथास शंकराच्या पायांवर घातलें व त्यास त्याच्या स्वाधीन करून तपश्चर्येस बसविलें. नंतर, बारा वर्षांनीं परत येऊं असें सांगुन तो तिघेजण तीर्थयात्रा करण्यास गेले व मुदत भरतांच ते पुनः बदरिकाश्रमास गेले मग तेथें मोठ्या थाटानें मावंदे केलें. मावंद्याकरितां सर्व देवांना बोलावून आणलें होतें. मावदें झाल्यावर सर्व देव वर देऊन निघुन गेले. व मच्छिंद्रनाथ, गोरक्षनथ, चौरंगीनाथ, अडभंगनाथ व धर्मनाथ असे पांचीजण तीर्थयात्रेस गेले.

ब्रह्मादेवाच्या वीर्यापासून पुर्वी अठ्यांयशीं सहस्त्र ऋषि उत्पन्न झाले; त्याच वेळीं जे थोडेंसे रेत पृथ्वीवर रेवानदीच्या तीरीं पडलें न्यांत चमसनारायणानें संचार केला; तेव्हां पुतळा निर्माण झाला. तें मूल सुर्यासारखें दैदीप्यमान दिसूं लागलें. जन्म होतांच त्यानें एकसारखा रडण्याचा सपाटा चालविला. त्याच संधीस सहन सारुख या नांवाचा एक कुणबी पाणी आणावयास नदीवर गेला होता. त्यानें तें मूल रेतीत रडत पडलेलें पाहिलें; तेव्हां त्याचें हृदय कळवळलें. त्यानें त्या मुलांस उचलून घेतलें व घरीं नेलें आणि रेवातीरीं वाळवंटावर पुत्र मिळाल्याचें वर्तमान स्त्रीस सांगितलें व त्यास तिच्या हवली केलें. तिनें आनंदानें त्यास स्नान घालून पाळण्यांत आपल्या पोटच्या मुलाशेजारीं निजविलें. तो रेवतीरीं ' रेवेतं ' सांपडला म्हणुन त्याचें नांव ' रेवणनाथ ' असें ठेविलें. त्यास थोडथोडें समजूं लागतांच तो काम करावयास बापाबरोबर शेतांत जाऊं लागला. तो बारा वर्षांच्या वयांत शेतकीच्या कामांत चांगलाच हुशार झाला.

एके दिवशी रेवणनाथ मोठ्या पहाटेंच उठून आपले बैल रानांत चरावयास नेत होता. त्या समयीं लखलखीत चांदणें पडलें होते; ह्यामुळें रस्ता साफ दिसत होता. इतक्यांत दत्तात्रेयाची स्वारी पुढें येऊन थडकली. दत्तात्रेयास गिरिनारपर्वतीं जावयांस होतें. त्यांच्या पायांत खडावा असून त्यांनीं कौपीन परिधान केली होती, जटा वाढविल्या असुन दाढी, मिशी पिंगट वर्णाची होती. असा तिन्ही देवांचा अवतार जे दत्तात्रेय ते जात असतां त्यांची व रेवणनाथाची भेट झाली. त्यास पाहतांच रेवणनाथास पूर्ण ज्ञान होऊन पूर्वजन्माचें स्मरण झालें. मग आपण पूर्वीचें कोण, व हल्लीचें कोण व कसें वागत आहों याची त्यास रुखरुख लागली. तसेच मला आतां कोणी ओळखत नाहीं, मी अज्ञानांत पडलों असें त्यास ज्ञान होऊन तो स्तब्ध राहिला. तेव्हां तूं कोण आहेस, असें दत्तात्रेयानें त्यास विचारल्यवर त्यानें उत्तर दिलें, तुमच्या देहांत तिन्ही देवांचे अंश आहेत; त्यांत सत्त्वगुणी जो महापुरुष तो मी असुन मला येथें फारच कष्ट भोगावे लागत आहेत; तर आतां कृपा करून या देहास सनाथ करावें. इतकें बोलून त्यांनें दत्तात्रेयाच्या पायांवर मस्तक ठेविलें. त्याचा दृढ निश्चय पाहून दत्तात्रेयानें आपला वरदहस्त त्याच्या मस्तकावर ठेवला. नऊ नारायणाच्या अवतांरांपैकीं हा चमसनारायणाचा अवतार होय, हें दत्तात्रेयास ठाऊक होतें.

त्यास दत्तात्रेयानें त्यास वेळेस अनुग्रह कां दिला नाहीं अशी शंका येईल. पण त्याचें कारण असें कीं, भक्तिमार्गाकडे प्रवृत्ति झाल्यावांचून अनुग्रह देऊन उपयोग नाही; यास्तव भक्तीकडे मग लागलें म्हणजे ज्ञान व वैराग्य सहज साध्य होतें असा मनांत विचार आणुन दत्तात्रेयानें फक्त एका सिद्धीची कला त्यास सांगितली. तेव्हां रेवणनाथास परमानंद झाला. तो त्याच्या पायां पडून आनंद पावल्यानंतर दत्तात्रेय निघून गेले. एक सिद्धि प्राप्त झाली तेवढ्यावरच त्यानें समाधान मानल्यानें तो पूर्ण मुक्त झाला नाहीं.


अध्याय ३५ संपादन


रेवणनाथास सिद्धिची प्राप्ति; त्याची तपश्चर्या व वरप्राप्ति; सरस्वती ब्राह्मणाच्या मृत पुत्राकरिता यमलोकीं गमन


रेवणनाथानें एका सिद्धिकलेस भूलून दत्तात्रयेयास परत पाठविल्यानंतर रेवणनाथ शेतांत गेला. दत्तात्रेयानें त्याची त्या वेळेची योग्यता ओळखूनच एक सिद्धकलेवर त्यास समाजावून वाटेस लाविलें होतें. रेवणनाथ शेतांत गेला व काम झाल्यावर तो मंत्रप्रयोगाचें गाणें गाऊं लागला. तेव्हां सिद्धि प्रत्यक्ष येऊन उभी राहिली व कोणत्या कार्यास्तव मला बोलाविलें म्हणून विचारूं लागली. प्रथम त्यानें तिला नांव विचारलें तेव्हां मी सिद्धि आहे, असें तिनें सांगितलें. ज्या वेळेस दत्तात्रेयानें रेवणनाथास सिद्धि दिली होती, त्या समयीं त्यानें तिच्या प्रतापाचें वर्णन करून सांगितलें होतें की, सिद्धि काम करावयास प्रत्यक्ष येऊन हजर राहिल व तूं सांगशील तें कार्य करील. जेवढे उपभोग घेण्याचे पदार्थ पृथ्वीवर आहेत तेवढे सर्व ती एका अर्ध क्षणांत पुरवील. सारांश, जें जें तुझ्या मनांत येईल तें ती करील; यास्तव जें तुला कार्य करावयाचें असेल तें तूं तिला सांग. अशी तिच्या पराक्रमाची परस्फुटता करून दत्तात्रयानें त्यास बीजमंत्र सांगितला होता. ती सिद्धि प्राप्त झाल्याचें पाहून रेवणनाथस किंचित गर्व झाला. परंतु स्वभावानें तो निःस्पृह होता.

एके दिवशीं तो आनंदानें मंत्रप्रयोग म्हणत शेतांत काम करीत असतां महिमा नांवाची सिद्धि जवळ येऊन उभी राहिल्यानें त्यास परमानंद झाला. त्यानें हातांतील औत व दोर टाकून तिला सांगितलें कीं, जर तुं सिद्धि आहेस तर त्या पलीकडच्या झाडाखालीं धान्याची रास पडली आहे ती सुवर्णाची करून मला चमत्कार दाखीव; म्हणजे तूं सिद्धि आहेस अशी माझी खात्री होईल. मग मला जें वाटेल तें काम मी तुला सांगेन. त्याचें भाषण ऐकून महिमा सिद्धि म्हणाली, मी एका क्षणांत धान्याच्या राशी सुवर्णाच्या करून दाखवीन. मग तिनें धान्याच्या राशीं सुर्वणाच्या डोंगराप्रमाणें निर्माण करून दाखविल्या. त्याची खात्री झाली. मग तो तिला म्हणाला, तुं आतां माझ्यापाशीं रहा. तुं सर्व काळ माझ्याजवळ असलीस , म्हणजे मला जें पाहिजे असेल तें मिळण्यास ठीक पडेल. त्यावर ती म्हणाली, मी आतां तुझ्या संनिध राहीन; परंतु जगाच्या नजरेस न पडतां गुप्तरूपानें वागेन. तूं माझ्या दर्शनासाठी वारंवार हेका धरुन बसुं नको. तुझें कार्य मी ताबडतोब करीत जाईन. रेवणनाथानें तिच्या म्हणण्यास रुकार दिल्यावर ती सुवर्णाची रास अदृश्य करून गुप्त झाली.

मग रेवणनाथ सांयकाळपर्यंत शेतांत काम करून घरीं गेला. त्यानें गोठ्यांत बैल बांधिले व रात्रीस स्वस्थ निजला. दुसरे दिवशीं त्यानें मनांत आणिलें कीं, आतां व्यर्थ कष्ट कां म्हणुन करावे ? मग दुसरे दिवशी तो शेतांत गेलाच नाहीं. त्यामुळें सुमारें प्रहर दिवसपर्यंत वाट पाहून त्याचा बाप सहनसारुक हा त्यास म्हणाला, मुला ! तूं आज अजूनपर्यंत शेतांत कां गेला नाहींस ? हें ऐकून रेवणानाथानें उत्तर दिलें कीं, शेतांत जाऊन व रात्रंदिवस कष्ट करून काय मिळवयाचें आहे ? त्यावर बाप म्हणाला, पोटासाठी शेतांत काम केलें पाहिजे. शेत पिकलें की, पोटाची काळजी करावयास नको, नाहीं तर खावयाचे हाल होतील व उपाशी मरावयाची पाळी येईल. यावर रेवणनाथ म्हणाला, आपल्या घरांत काय कमी आहे म्हणुन शेतांत जाऊन दिवसभर खपून पोट भरण्यासाठी धान्य पिकवावें ? आतां मेहनत करण्याचें कांहीं कारण राहिलें नाहीं. तें ऐकून बापानें म्हटलें, आपल्या घरांत अशी काय श्रीमंती आहे ? मी एक एक दिवस कसा लोटीत आहें, हें माझें मलाच ठाऊक. तें ऐकून रेवणनाथ म्हणाला, उगीच तुम्हीं खोटें बोलतां सारें घर सोन्याचें व धान्यानें भरलेलें आहे. मी बोलतों हें खरें कीं खोटें, तें एकादां पाहून तरी या; उगीच काळजी कां करतां ? मग बाप पाहूं लागला असतां घरांत सोन्याच्या व धान्याच्या राशीच्या राशी पडलेल्या दिसल्या. त्यावेळेस त्यास मोठेंच आश्चर्य वाटले. मग हा कोणी तरी अवतारी पुरुष असावा, असें त्याच्या मनांत ठसलें व तो रेवणनाथाच्या तंत्रानें वागूं लागला.

रेवणनाथाचा बुंधुलगांव मोठा असून रहदरीच्या रस्त्यावरच होता, ह्यामुळें गांवांत नेहमी पांथस्थ येत असत. रेवणनाथास सिद्धि प्राप्त झाल्यानंतर गांवांत येणाऱ्या पांथस्थास रेवणनाथ इच्छाभोजन घालूं लागला. ही बातमी साऱ्या गांवांत पसरली. मग लोकांच्या टोळ्याच्या टोळ्या त्याच्या घरीं जाऊं लागल्या. वस्त्र, पात्रं, अन्न, धन आदिकरुन जें ज्यास पाहिजे तें देऊन रेवणनाथ त्याचे मनोरथ पुरवीत असे. रोगी मनुष्याचे रोगाहि जात असत. मग ते त्याची कीर्ति वर्णन करून जात. यामुळें रेवणनाथ जिकडे तिकडे प्रसिद्ध झाला. सर्व लोक त्यास ' रेवणसिद्ध ' असें म्हणू लागले.

इकडे मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करीत फिरत असतां बुंधुलगांवांत येऊन धर्मशाळेंत उतरला. मच्छिंद्रनाथ श्रीगुरुंचें चिंतन करीत आनंदानें बसला असतां कित्येक लोक त्या धर्मशाळेंत गेले. त्यांनी त्यास भोजनासाठीं रेवणनाथाचें घर दाखवून दिलें व त्यानें विचारल्यावरुन लोकांनीं रेवणसिद्धिची समूळ माहिती सांगितली. ती ऐकून रेवणनाथ चमसनारायाणाचा अवतार आहे, असें मच्छिंद्रमनांत समजला. नंतर जास्त माहिती काढण्याकरितां रेवननाथास कोन प्रसन्न झाला म्हणुन मच्छिंद्रनाथानें लोकांस विचारलें. परंतु लोकांस त्याच्या गुरुची माहिती नसल्यामुळें त्याचा गुरु कोण हें कोणी सांगेना.

मग मच्छिंद्रनाथानें कांहीं पशु, पक्षी, वाघ, सिंह निर्माण करून त्यांस तो आपल्या अंगाखांद्यावर खेळवून एके ठिकाणीं खावयास घालूं लागला. हा चमत्कार पाहून हा सुद्धां कोणी ईश्वरी अवतार असावा असें मच्छिंद्रनाथाविषयीं लोक बोलू लागले. हा प्रकार लोकांनीं रेवणसिद्धाच्या कानांवर घातला व हा अद्‌भुत चमत्कार प्रत्यक्ष पाहावयास सांगितला. हें वृत्त ऐकून रेवणसिद्ध तेथें स्वतः पाहावयास गेला. सिंह, वाघ, आदिकरून हिंस्त्र जनावरें, तसेंच पशुपक्षीसुद्धां मच्छिंद्रनाथाच्या अंगाखांद्यावर निवैर खेळत आहेत, असें पाहुन त्यास फार चमत्कार वाटला.

रेवणनाथ घरीं गेला व दत्तमंत्रप्रयोग म्हणतांच प्रत्यक्ष सिद्धि येऊन प्रविष्ट झाली. तिनें कोणत्या कारणास्तव बोलावलें म्हणुन विचारतां तो म्हणाला, मच्छिंद्रनाथाप्रमाणें पशुपक्ष्यांनीं माझ्या अंगाख्याद्यांवर प्रेमानें खेळावें व माझ्या आज्ञेंत असावें, असें झालें पाहिजे. तें ऐकून तिनें सांगितलें कीं, ही गोष्ट ब्रह्मवेत्त्यावांचुन दुसऱ्याच्यानें होणार नाहीं, या सर्व गोष्टी तुला पाहिजे असल्यास प्रथन तूं ब्रह्मवेत्ता हो. मग रेवणासिद्धानें तिला सांगितलें कीं, असें जर आहे तर तुं मला ब्रह्मवेत्ता कर. तेव्हां तिनें सांगितलें कीं तुझा गुरु दत्तात्रेय सर्वसमर्थ आहे; ह्यास्तव तूं त्याची प्रार्थना कर; म्हणजे तो स्वतः येऊन तुझ्या मनासारखें करील. असें सिद्धीनें सांगितल्या वर तसें करण्याचा त्यानें निश्चय केला.

मग ज्या ठिकाणी पूर्वी दत्तात्रेयाची भेट झाली होती, त्याच ठिकाणीं रेवणनाथ जाऊन तपश्चर्येंस बसला. दत्तात्रेयाची केव्हां भेट होते असें त्यास झालें होतें. त्यानें अन्नपाणीसुद्धां सोडलें व झाडांची उडून आलेली. पानें खाऊन तो निर्वाह करूं लागला. तेणेंकरून त्याच्या हांडांचा सांगडामात्र दिसूं लागला.

रेवणनाथाचा गुरु कोण हें मच्छिंद्रनाथाच्या लक्षांत नव्हतें त्याच्या गुरुनें अर्धवट शिष्य कां तयार केला म्हणुन मच्छिंद्रनाथास आश्चर्य वाटत होतें. त्यानें रेवणनाथाबद्दल चौकशीं केली. पण त्याचा गुरु कोण ही माहिती लोकांस नव्हती; ते फक्त त्याची बरीच प्रशंसा करीत. उपकार करण्यात, अन्न्‌उदक व द्रव्य देण्यास रेवणनाथ मागेंपुढें पाहत नसे, यावरुन कोणत्या तरी गुरुच्या कृपेनें, ह्यास सिद्धि प्राप्त झाली असावी, असें मनांत येऊन मच्छिंद्रनाथानें तो शोध काढण्यासाठीं अणिमा, नरिमा, लघिमा, महिमा इत्यादि आठहि सिद्धिस बोलाविलें. त्या येतांच त्याच्या पायां पडल्या. त्या वेळेस नाथानं त्यास विचारलें कीं, रेवणसिद्धाच्या सेवेस कोणत्या सिद्धिची कोणी योजना केली आहे हें मला सांगा.त्यावर महिमासिद्धीनें उत्तर दिलें कीं, त्याच्या सेवेस राहण्यासाठीं श्रीदत्तात्रेयाची मला आज्ञा झाली आहे.

मग हा रेवणनाथ आपला गुरुबंधु होतो असें जाणुन त्यास साह्य करावें, असें मच्छिंद्रनाथाच्या मनांत आलें त्यानें लगेच तेथून निघुण गिरीनापर्वती येऊन श्रीदत्तत्रेयाची भेट घेतली व रेवणसिद्धिचा सर्व मजकूर कळविला आणि त्याच्या हितासाठीं पुष्कळ रदबदली केली. मच्छिंद्रनाथ म्हणाला, महाराज ! रेवणसिद्ध हा प्रत्यक्ष चमसनारायणाचा अवतार होय. तो तुमच्यासाठीं दुःसह क्लेश भोगीत आहे. तर आपण आतां त्यावर कृपा करावी. ज्या ठिकाणीं तुमची भेट झाली त्याच ठिकाणी तो तुमच्या दर्शनाची इच्छा धरून बसला आहे.

तें ऐकून मच्छिंद्रनाथास समागमें घेऊन दत्तात्रेय यानास्त्राच्या साह्यानें रेवणनाथापाशीं आले. तेथें तो काष्ठाप्रमाणें कृश झालेला पाहिल्यावर दत्तात्रेयास कळवळा आला व त्यांनी त्यास पोटाशीं धरिलें रेवणनाथानें दत्तात्रेयास पायांवर मस्तक ठेविलें. तेव्हां दत्तानें त्याच्या कानांत मंत्रोपदेश केला. तेणेकरून त्याच्या अज्ञान व द्वैत यांचा नाश झाला. मग वज्रशक्ति आराधून दत्तानें रेवणनाथाच्या कपाळीं भस्म लाविले; त्यामुळें तो शक्तिवान् झाला. नंतर त्यास बरोबर घेऊन दत्तात्रेय व मच्छिंद्रनाथ गिरीनारपर्वतीं गेले. तेथें त्यास पुष्कळ दिवस ठेवुन घेऊन शास्त्रास्त्रासुद्धां सर्व विद्यांत निपुण केलें. तेव्हां, आतां आपण एकरूप झालों, असें रेवणनथास भासूं लागलें. त्याचा द्वैतभाव नाहिंसा होतांच सर्व पशुपक्षी निवैर होऊन रेवणनाथाजवळ येत व त्याच्या पायां पडत. दत्तानें रेवणनाथास नाथपंथाची दीक्षा देऊन मच्छिंद्रनाथाप्रमाणेंच शस्त्रास्त्रादिसर्व विद्यांत निपूण करून त्यास त्याच्या स्वाधीन केलें. मग ते उभयतां मार्तंडपर्वतीं गेलें. तेथें त्यांनी नागेंश्र्वर स्थान पाहून देवदर्शन घेतलें व वर मिळवून साबरींमंत्र सिद्ध केले.

सर्व विद्येंत परिपूर्ण झाल्यानंतर गिरीनारपर्वती येऊन तेथें मावंदें घालण्याचा रेवणनाथानें बेत केला. त्या समारंभास विष्णु, शंकर आदिकरून सर्व देवगण येऊन पोंचले. चार दिवस समारंभ उत्तम झाला. मग सर्व देव रेवणनाथास वर देऊन आपापल्या स्थानीं गेले. रेवणनाथहि दत्तात्रेयाच्या आज्ञेनें तीर्थयात्रा करावयास निघाला.

त्या कालीं माणदेशांत विटे तीर्थयात्रा गांवांत सरस्वती या नावांचा एक ब्राह्मण राहात असे. त्याच्या स्त्रीचें नांव जान्हविका. त्यांची एकमेकांवर अत्यंत प्रीति. त्यांस मुलें होत, पण तीं वांचत नसत; आठ दहा दिवसांतच तीं मुलें मरत. ह्याप्रमाणें त्याचें सहा पुत्र मरण पावले. सातवा पुत्र मात्र दहा वर्षेपर्यंत वांचला होता व आतां यास भय नाहीं असें जाणुन सरस्वती ब्राह्मणानें अतिहर्षानें ब्राह्मणभोजन घेतलें. त्यासमयीं पंचपक्कान्ने केलीं होतीं व प्रयोजनाचा बेत उत्तम ठेविला होता. त्याच दिवशीं त्या गांवात रेवणनाथ आला. तो भिक्षा मागवयास फिरत असतां त्या ब्राह्मणाकडे गेला. त्यास पाहतांच हा कोणी सत्पुरुष आहे, अशी ब्राह्मणाची समजुत झाली. तेव्हां ब्राह्मणानें त्यास जेवून जाण्याचा आग्रह केला व त्याच्या पायां पडून माझी इच्छा मोडूं नये असें सांगितलें. त्यास रेवणनाथानें सांगितलें कीं, आम्हीं कनिष्ठ वर्णाचें व तूं ब्राह्मण आहेस, म्हणुन आमच्या पायां पडणें तुला योग्य नाहीं, हें ऐकून तो म्हणाला, ह्या कामीं जातीचा विचार करणें योग्य नाहीं. मग त्याचा शुद्ध भाव पाहून रेवणनाथानें त्यांचें म्हणणें मान्य केलें.

मग रेवणनाथ त्याच्याबरोबर घरांत गेल्यावर सरस्वती ब्राह्मणानें त्यास पात्रावर बसविलें व त्याचें भोजन होईपर्यंत आपण जवळच बसून राहिला. जेवतांना त्यानें करून त्यास भोजनास वाढिलें व नाथाची प्रार्थना केली कीं, महाराज ! आजचा दिवस येथें राहून उदईक जावें. त्याची श्रद्धा पाहून रेवणनाथानें त्याच्या म्हणण्यास रुकार दिला व तो दिवस त्यानें तेथें काढिला. रात्रीस पुनः भोजनासाठीं सरस्वती ब्राह्मणानें नाथास आग्रह केला, परंतु दोनप्रहरीं भोजन यथेच्छ झाल्यानें रात्रीं क्षुधा लागली नव्हती; यास्तव नित्यनेम उरल्यानंतर नाथानें तसेंच शयन केलें. त्या वेळीं तो ब्राह्मण नाथाचे चरण चुरीत बसला. मध्यरात्र झाली असतां अशी गोष्ट घडली कीं, आईजवळ असलेल्या त्याच्या मुलाचे प्राण सटवीनें झडप घालून कासावीस केले. त्या वेळेस मोठा आकांत झाला. बायको नवऱ्यास हाका मारूं लागली, तेव्हां तो तिला म्हणाला, आपण पूर्वजन्म केलेल्या पापाचें फळ भोगीत आहों, यास्तव आपणांस सुख लाभणार कोठून ? आतां जसें होईल तसें होवो. तूं स्वस्थ राहा. मी उठून आलों तर नाथाची झोंप मोडेल, यास्तव माझ्यानें येववत नाहीं. जर झेंप मोडली तर गोष्ट बरी नाहीं. इतकें ब्राह्मण बोलत आहे तो यमाच्या दूतांनीं पाश टाकून मुलाच्या प्राणाचें आकर्षण केलें व मुलाचें शरीर तसेंच तेथें पडून राहिलें.

मुलगा मरण पावला असें पाहून जान्हवी मंद मंद रडूं लागली. तिनें ती रात्र रडून रडून काढिली. प्रातःकाळ झाला तेव्हा नाथास रडका शब्द ऐकूं येऊं लागला. तो ऐकून त्यानें कोण रडतें म्हणुन सरस्वती ब्राह्मणास विचारिलें. त्यानें उत्तर दिलें कीं, मुलाचे प्राण कासावीस होत आहेत म्हणुन घरांत माझी बायको अज्ञपणनें रडत आहे. तें ऐकुन मुलास घेऊन ये, असं नाथानें विप्रास सांगितलें. त्यावरुन तो स्त्रीजवळ जाऊन पाहतो तों पुत्राचें प्रेत दृष्टीस पडलें. मग त्यानें नाथास घडलेलें वर्तमान निवेदन केलें. ही दुःखदायक वार्ता ऐकून नाथास यमाचा राग आला. तो म्हणाला, मी या स्थळी असतां यमानें हा डाव साधून कसा घेतला ? आतां यमाचा समाचार घेऊन त्यास जमीनदोस्त करून टाकितों, असें बोलून मुलास घेऊन येण्यास सांगितलें. मग सरस्वती ब्राह्मणानें तो मुलगा नाथापुढें ठेविला. त्या प्रेताकडे पाहून नाथास परम खेद झाला. मग तुला एवढास मुलगा कीं काय, असें नाथानें त्यास विचारल्यावर, हें सातवें बालक म्हणुन ब्राह्मणानें सांगितलें व म्हटलें, माझीं मागची सर्व मुलें जन्मल्यानंतर पांचसात दिवसांतच मेली; हाच फक्त दहा वर्ष वांचला होता. आम्ही प्रारब्धहीन ! आमचा संसार सुफळ कोठून होणार ! जें नशिबीं होतें तें घडलें. याप्रमाणें ऐकून रेवणनाथानें सरस्वतीस सांगितलें कीं, तूं तीन दिवस या प्रेताचें नीट जतन करून ठेव. हें असेंच्या असेंच राहील, नासणार नाहीं. आतां मी स्वतः यमपुरीस जाऊन तुझीं सातहि बाळें घेऊन येतो. असें सांगुन नाथानें अमरमंत्रानें भस्म मंत्रुन मुलाच्या अंगास लाविलें व यानास्त्राच्या योगानें तो ताबडतोब यमपुरीस गेला.

रेवणनाथास पाहतांच यमधर्म सिंहासनावरून उतरला व त्यास आपल्या आसनावर बसवून त्यानें त्याची षोडशोपचारांनीं पूजा केली आणि अति नम्रपणानें येण्याचें कारण विचारलें. तेव्हा रेवणनाथानें म्हटलें, यमधर्मा ! मी सरस्वती ब्राह्मणाच्या घरीं असतां तूं तेथें येऊन त्याच्या मुलास कसा घेऊन आलास ? आतां न घडावी ती गोष्ट घडली तरी चिंता नाहीं. परंतु तूं त्याचा पुत्र परत दे आणि त्याचे सहा पुत्र कोठें ठेविलें आहेस. तेहि आणुन दे. हें न करशील तर माझा राग मोठा कठीण आहे; तुझा फडशा उडून जाईल. तेव्हा यमधर्मानें विचार केला कीं, ही जोखीमदारी आपण आपल्या अंगावर घेऊं नये. शंकराकडे मुखत्यारी आहे, असें सांगून त्यास कैलासास धाडावें; मग तिकडे पाहिजे तें होवो. असें मनांत आणुन तो म्हणाला, महाराज ! माझें म्हणणें नीट लक्ष देऊन ऐकून घ्यावें. विष्णु, शंकर व ब्रह्मदेव हे तिघे या गोष्टीचे अधिकारी आहेत आणी हा सर्व कारभार त्यांच्याच आज्ञेनें चालतों. या कामाचा मुख्य शंकर असून आम्ही सारे त्याचे सेवक आहों. यास्तव मारण्याचें वा तारण्याचें काम आमच्याकडे नाहीं, सबब आपण कैलासास जावें व शंकरापासून ब्राह्मणाचे सात पुत्र मागुन न्यावे. ते तेथेंच त्यांच्याजवळ आहेत. त्याचें मन वळवून आपला कार्यभाग साधून घ्यावा. ते ऐकून रेवणनाथ म्हणाल, तूं म्हणतोस, हें काम शंकराचें आहे, तर मी आतां कैलासास जातो. असें म्हणुन रेवणनाथ तेथून उठून कैलासास शंकराकडे जावयास निघाला.


अध्याय ३६ संपादन


रेवणनाथानें सरस्वती ब्राह्मणाचे मृत पुत्र सजीव केले; नागनाथाची जन्मकथा


यमपुरीहून यम कैलासास गेला. त्यास शिवगणांनीं विचारपूस करण्यासाठीं उभें राहावयास सांगितलें व आपण कोण, कोठें जातां, काय काम आहे वगैरे विचारलें. त्या वेळेस त्यानें सांगितलें कीं, मला रेवणनाथ म्हणतात. मी शंकराची भेट घ्यावयास जात आहें, कारण त्यानें एका ब्रह्मणाचा मुलगा चोरून आणिला आहे; तर त्यास शिक्षा करुण मुलास घेऊन जाण्यासाठी मी आलों आहे.

तें भाषण ऐकून शिवगणांस राग झाला. ते म्हणाले, तुझा गुरु गंधर्व आहे असें वाटतें, म्हणूनच तूं असें बोलत आहेस. तुं आपला परत जा कसा. हें ऐकून नाथास फारच राग आला. तो म्हणाला माझा गुरु गंधर्व म्हणून म्हणतां, पण तुम्ही गंधर्वसमान आतां रानामाळ फिराल. असें बोलून त्यानें स्पर्शास्त्राची योजना केली व भस्म मंत्रून त्यांच्यावर फेंकलें. त्यामुळें द्वारपाळ व तेरांशें शिवगण हे सर्व जमिनीस खिळून बसले. जमिनीपासून त्यांचे पाय सुटताना, जमिनीस चिकटले आणी सर्वजण ओणवे होऊन राहिले.

याप्रमाणें गणांची झालेली अवस्था पाहुन तेथचे सर्व लोक भयभीत झाले. ते शिवापुढें जाउन हात जोडून उभे राहिले व म्हणाले कीं, गावच्या दाराशीं एक मनुष्य आला असून त्याने तेराशें द्वाररक्षकगणांस जमिनीस खिळून ओणवें करून टाकिलें असून तें त्या दूःखानें ओरडत आहेत. हें ऐकून शिवानें त्या शिक्षा करावयास आठहि काळभैरवांस आज्ञा केली. त्याप्रमाणें ते काळभैरव शतकोटि गण घेऊन बाहेर पडले. हें पाहून नाथानें स्पर्शास्त्रानें त्या गणांनाहि ओणवे केलें, पण भैरवांनीं त्या अस्त्रास जुमानिलें नाहीं. त्यानीं धनुष्यें हाती घेऊन बाणांवर वातास्त्र अग्नस्त्र, नागास्त्र यांची योजना करुण बाण सोडिले. तेव्हां नाथानें पर्वतास्त्र, पर्जनास्त्र याप्रमाणें योजना केली. ह्या अस्त्रांनीं भैरवांच्या अस्त्रांचा मोड झाला. नंतर तीं अस्त्रें भैरवांवर पडली, तेणेंकरुन ते जर्जर झाले.

मग हें वर्तमान हेरांनीं शंकारास कळविलें. तेव्हां रागानें तो नंदीवर बसुन युद्धस्थानी आला. तेव्हा रेवणनाथानें विचार केला कीं शंकराशीं युद्ध करण्याचें कारण नाहीं, एकाच अस्त्रानें बंदोबस्त करावा म्हणजे झालें. मग वाताकर्षकास्त्र मंत्रानें भस्म मंत्रून तें शंकरावर फेंकलें. त्यामुळें शंकराचा श्वासोच्छवास बंद झाला व उमाकांत नंदीवरुन खाली पडला व अष्टभैरव बेशुद्ध पडले.

याप्रमाणें शंकाराची व गणांची प्राणांत अवस्था केल्याचें वृत्त विष्णुस कळतांच तो लागलाच तेथें धावून आला. त्यानें नाथास आलिंगन देऊन पोटाशीं धरिलें आणि विचारिलें कीं, कोणत्या कारणामुळें रागावून तुं हा एवढा अनर्थ केलास ? तेव्हां रेवणनाथानें विष्णुस सांगितलें कीं, मी सरस्वती ब्राह्मणकडे असतां शंकरानें त्याचा पुत्र मारिला. या कारणास्तव मी शिवाचा प्राण घेऊन संजीवनी अस्त्राच्या योगानें मुलास जिवंत करून घेऊन जाईन. तुम्ही ब्राह्मणाचीं सातहि बाळें आणुन द्या म्हणजे शंकराच्या प्राणांचे रक्षण करितो; तें ऐकून विष्णुनें सांगितलें कीं, ती सर्व बाळें माझ्याजवळ आहेत, मी ते सातहि प्राण तुझ्या हवाली करितो, पण देह मात्र तूं निर्माण कर. हे विष्णुचें बोलणें रेवणनाथानें कबूल केलें. मग वातप्रेरक अस्त्र जपून नाथानें शंकरास सावध केलें व मग विभक्त अस्ताचा जप करून सर्व गण मुक्त केले व स्थितिमंत्र म्हणुन अष्टभैरवांना भस्म लावून त्यांस अस्त्रापासुन मोकळें केलें. मग सर्वांनीं नाथास नमन केलें. तेव्हां विष्णुनें सातहि प्राण नाथाच्या स्वाधीन केले व त्यास जावयांस परवानगी दिली.

मग यानास्त्र जपून रेवणनाथ महीवर उतरून ब्राह्मणाकडे आला. व त्यास मुलाचे कलेवर कुटून त्याचा गोळा करून आणावयास सांगितलें, त्याप्रमाणें प्रेत कुटुन आणिल्यानंतर त्याचे सात भाग करुन, सात पुतळे तयार केले. नंतर संजीवनी प्रयोग प्रेरून सातहि बालकें जिवंत करतांच तीं रडूं लागली. त्यांना सरस्वती ब्राह्मणाच्या व त्याच्या स्त्रीच्या स्वाधीन केलें. बाराव्या दिवशीं मुलें पाळण्यांत घालून सारंगीनाथ, जागीनाथ, निरंजननाथ, जागीनाथ, निजानंद, दीनानाथ, नयननाथ, यदुनाथ, निंरजनाथ , गहिनीनाथ अशीं त्यांची नावें. रेवणनाथानें ठेविलीं, हे सातहि पुरुष पुढें जगविख्यांत झाले. रेवणनाथानं त्यांना बारा वर्षानंतर दीक्षा दिली व सर्व विद्यांत तप्तर केले. रेवणनाथ हा त्यात प्रांतांत राहिला.

पूर्वी सरस्वतीच्या उद्देशानें ब्रह्मदेवाचें वीर्यपतन झीलें असतां तें एका सर्पिणीच्या मस्तकांवर येऊन पडलें. तें तिनें भक्षण करुण आपल्या पोटांत सांठवून ठेविलें. मग दिवसेंदिवस गर्भ वाढत चालला. ही गोष्ट आस्तिकऋषीच्या लक्षांत आली. नऊ नारायणांपैकीं एकजन पोटीं येईल व त्यास लोक नानगाथ म्हणतील हेंहि तो समजला. मग आस्तिकमुनीनें त्या सर्पणीला जवळ बोलावून सांगितलें कीं, तूं या गोष्टीबद्दल कांहीं चिंता करुं नको तुझ्या पोटीं ऐरहोत्रनारायण जन्मास येणार आहे, परंतु तुला सांगावयाचें कारण असें कीं, पुढें तुजवर मोठा कठिण प्रसंग गुजरणार आहे. सध्यां जनमेजयराजानें सर्पमात्र आरंभिलें असून मोठ मोठ्या ऋषीच्या साह्यानें समिधांच्या ऐवजीं सर्पांची योजना करून त्याची यज्ञकुंडांत आहुति देत आहे; म्हणुन ही गोष्ट मी तुला सांगुन ठेविली. यास्तव आतां तुं कोठें तरी लपून राहा. याप्रमाणें आस्तिक मुनीनें जेव्हा तिला भय घातलें, तेव्हा तिनें आपणास राहावयास निर्भय स्थळ कोणतें म्हणून त्यास विचारिलें, तेव्हा जवळच एक वडाचें झाड होतें. त्याच्या पोखरामध्यें लपून राहाव यास आस्तिक ऋषीनें तिला सांगितलें. मग ती सर्पीण त्या वडाच्या पोखरांत लपून राहिली व आस्तिकानें अचळ वज्रप्रयोगानें तें झाड सिंचन करून ठेविलें व आपण हस्तिनापुरास गेला.

नंतर आस्तिकमुनीनें जनमेजयराजाच्या यज्ञमंडपांत जाऊन सर्व ऋषींची भेट घेऊन त्यांना हा गुप्त वृत्तांत कळविला आणी म्हटलें, ब्रह्मवीर्य सर्पणीच्या उदरांत असून पुढें तो पुरुष वटसिद्ध नागनाथ या नावानें प्रकट होईल. नऊ नारायणापैकीं ऐरहोत्र नारायणच हा अवतार घेणार आहे, त्यास मारुं नये. तें सर्व ऋषींनीं कबूल केल्यानंतर पुढें सर्पसत्र समाप्त झालें; इकडे सर्पिणाचे नवमास पूर्ण झाले. मग ती पद्मिण नावांची सर्पीण प्रसुत होऊन तिनें एक अंडें घातलें. तें वडाच्या पोकळींत बहुत दिवसपावेतों राहिलें होतें त्यांत ऐरहोत्र नारायणानें संचार केला. पुढें त्याचा देह मोठा झाल्यवर अंड फूटून मूल दिसूं लागलें.पुढें तें मुल रडू लागलें पण त्याचें रक्षण करण्यात तेथें कोणी नव्हतें.

त्या वेळीं कोशधर्म या नांवाचा एक अथर्वणवेदी गौडब्राह्मण वेदशास्त्रांत निपूण होता, परंतु तो फार गरीब असल्यानें त्याच्या संसाराचे हाल होत. दारिद्र्यामुळें तो उदास होऊन गेला होता. गरिबी पाठीस लागल्यामुळें पत्रावळींकरितां तो वडाची पानें आणावयास जात असे. एके दिवशीं तो त्या झाडाजवळ गेला असतां तेथें मुलाच्या रडण्याचा आवाज त्याच्या कानीं पडला. तो ऐकून कोण रडतें हा शोध करण्यासाठीं तो आसपास पाहूं लागला. परंतु त्यास कोणिही न दिसल्यामुळें तो संशयांत पडला. तरी पण हा मुलाचाच शब्द अशी त्याची खात्री झाली. मग त्यास देवांनीं सांगितलें कीं, कोशधर्म या वड्याच्या झाडाच्या पोकळींत बालक रडत आहे, त्यांस स्पर्श झाला कीं त्याचा काळिमा जाऊन सुवर्ण होते; तद्वतु हा मुलगा तुझ्या घरीं आला कीं, तुझें दारिद्र नाश पावेल. हा देवांनीं एक बाण सोडला. त्यासरसें तें झाड मोडून पडलें. झाड पडतांच आंतील वर्षाव केला. मग देवांनीं हात जोडून त्या नारायणास नमस्कार केला. आणी कोशधर्म ब्राह्मणास सांगितलें कीं, महाराज ! या भुमंडळावर आपण मोठे भाग्यवान आहां म्हणुन ह वटसिद्ध नागनाथ तुम्हांस प्राप्त झाला आहे. हा पद्मिणी नांवाच्या नागिणीच्या पोटीं जन्मला असून वटवृक्षामध्यें ह्याचें संरक्षण झालें आहे. त्यास्तव आतां ह्याचें ' वटसिद्ध नागनाथ ' हेंच नांव प्रसिद्ध करावें. हा सिद्ध असुन योगी लोकांचा नाथ होईल.

ती देववाणी ऐकतांच कोशधर्मानें त्या मुलास उचलून घरीं नेलें. त्या समयीं त्यास परमानंद झाला. तें ऐकून त्याची स्त्री सुरादेवी हीदेखील समग्र झाली. ती म्हणाली, मला वाटतें कीं, हा चंद्र किंवा सूर्य अवतरला असावा. तिनें मुलास उचलून स्तनाशीं लाविलें तो पान्हा फुटला. मग तिनें आनंदानें मुलास स्नान घालून पाळण्यांत घातलें व त्याचें ' वटसिध्द नागनाथ ' असें नांव ठिविलें. सुरादेवींचें त्या मुलावर अत्यंत प्रेम जडलें. तो मुलगा मोठा झाल्यावर कोशधर्मानें सातव्या वर्षा त्याचें यथाविधि मौंजीबंधन केले.

एके दिवशीं दोन प्रहरीं वटसिध्द नागनाथ भागिरथीच्या तीरीं काशीविश्वेश्वराच्या समोर कांहीं मुलें जमवून खेळूं लागला त्या संधीस दत्तात्रेयाची स्वारी तेथें गेली व मुलांचा खेळ पाहूं लागली. तेथें मुलांच्या पंक्ति बसवुन त्यांस वटसिद्ध नागनाथ लटकेंच अन्न वाढीत होता, मुलें पुरें म्हणत होती. हा त्यांस घ्या, घ्या म्हणून आग्रह करून वाढीत होता. असा मुलांचा चाललेला लटका खेळ दत्तात्रेयानें पाहिला. तेव्हां त्यास आश्चर्य वाटलें. लटक्यांच अन्नानें पोट भरलें म्हणून मुलें म्हणत, हें ऐकून त्यास हसुं आलें. नंतर बालरूप धरुण दत्तात्रेयानें त्या मुलांत संचार केला व अंगणांत उभा राहून तो म्हणाला, मी अथीत आलों आहें, मला भूक फार लागली आहे. कांहीं खावयास अन्न वाढा. हें ऐकून तीं मुलें त्याच्या पाठीस लागली व म्हणाली, तु रे कोण आमच्या मडळींत खेळावयास आला आहेस ? जातोस कां मारूं तुला ? असें म्हणुन कांहीं मुले काठीं उगारूं लागली व कांहीं मुलें दगड मारावयास धावलीं. हें नागनाथानें पाहिलें तेव्हां तो सर्व मुलांस म्हणाला आपल्या मेळ्यांत जो नवीन मुलगा आला आहे त्यास घालवून देऊं नका, आपल्याप्रमाणे त्यासहि वाढूं आयत्या वेळीं आलेल्या ब्राह्मणास अथीत समजुन परत दवडू नये, असे बोलुन त्याने त्या मुलास बसविलें. मग कल्पननें स्नान, षोडशोप चारांनीं पूजा, भोजन वगैरे झाले. जेवतांना सावकाश जेवा, घाई करुं नका. जें लागेल तें मागून घ्या, असा त्यस तो आग्रह करीत होताच. तेव्हा हा उदार आहे असें दत्तात्रेयास वाटले. हा पूर्वीचा कोणी तरी योगी असावा असेंहि त्याच्या मनांत ठसलें. दुसऱ्यास संतोशवून त्यावर उपकार करण्याची बुद्धी होणें पूर्वपुण्याईवांचुन घडावयाचें नाहीं, असा मनांत विचार करून तो त्याचे पूर्वजन्मकर्म शोधूं लागला. तेव्हा त्याच्या जन्माचा सर्व प्रकार दत्तात्रेयाच्या लक्षांत आला. मग दत्तात्रयानें त्यास कृपा करून सिद्धि दिली. तिचा गुण असा झाला कीं नागनाथ ज्या पदार्थाचें नांव तोंडांतुन घेई, तो पदार्थ तेथें उत्पन्न होऊं लागला. नंतर मुलांना जेवावयास वाढ म्हणून दत्तात्रेयानें नागनाथास सांगितलें. पण त्या सिद्धिचें अन्न खाण्याची नागनाथानें फक्त मनाई केली होती. जातेसमयीं दत्तात्रेयानें आपलें नांव सांगुन त्याचें नांव विचारुन घेतलें.

मग खेळतांना नागनाथ ज्या पदार्थाचे नांव घेई तो पदार्थ उप्तन्न होऊं लागला. त्यामुळें मुलें नित्य तृप्त होऊन घरीं बरोबर जेवीनातशीं झालीं न जेवण्याचें कारण आईबापांनीं मुलांना घरीं विचारलें असतां आम्हीं षड्रस अन्न जेवून येतो; म्हणुन मुलांनी सागांवे. प्रथम ही गोष्ट आईबापांना खरीं वाटली नाहीं; पण त्यांनी स्वतः भागीतथीतीरीं जाऊन नागनाथ षड्रस अन्नें वाढतो हें पाहतांच त्यांची खात्री झाली. मग ही बातमी सर्व क्षेत्रभर झाली व नागनाथाचा बाप कोशधर्म याच्या देखील ती कानांवर गेली. कित्येकांनी त्यास सांगितलें कीं, भागीरथीच्यां कांठी तुझा मुलगा मुलांच्या पंक्ति बसवुन उत्तम उत्तम पक्वाअन्नांच्या जेवणावळी घालीत असतो. हे आम्ही प्रत्यक्ष पाहून आलों आहों. तो अन्न कोठून आणितो व कसें तयार करितो त्याचें त्यासच ठाऊक. त्यानें जमिनीवर हात ठेविला कीं, इच्छिला पदार्थ उप्तन्न होतो. ही बातमी कोशधर्मानें जेव्हां ऐकिली, तेव्हां तो पूर्वी देवांनीं सांगितलेली खून समजला. पण त्यानें लोकांस ती हकिकत बोलून दाखविली नाहीं.

पुढें एके दिवशीं कोशधर्मानें आपल्या वतसिद्ध नागनाथ मुलास मांडीवर बसवून त्याच्या तोंडावरुन हात फिरवित व मुलाच्या जेवणांसंबधीं गोष्ट काढिली. तेव्हा तो म्हणाला, तुम्हांसहि मी असाच चमत्कार दाखवुन भोजनास घालितो. असें म्हणुन तो मांडीवरुन उतरला व जमिनीवर हात ठेवुन षड्रस अन्नाची इच्छा प्रकट करतांच उत्तम उत्तम पदार्थानीं भरलेलें पान तेथें उप्तन्न झालें तें पाहून कोशधर्मास फारच नवल वाटलें. मग हें साधन तुला कसें साध्य झालें. असें बापानें विचारल्यावर तो म्हणाला बाबा ! आम्हीं एकदां पुष्कळ मुलें नदीतीरीं खेळत होतो. इतक्यांत दत्तात्रेय नांवाचा मुलगा आला. त्याचा सर्व मुलांनी धिक्कार केला पण मी त्याची लटक्याचा पदर्थानें मनोभावें पूजा केली. तेव्हां त्यानें माझ्या मस्तकावर हात ठेवून कानांत कांहीं मंत्र सांगितला व अन्न वाढावयास लाविलें. त्या दिवसापासून माझ्या हातुन पाहिजे तो पदार्थ निर्माण होतो. हें ऐकुअन बापास परमानंद झाला. मग तो त्या दिवसापासुन मुलाकडून अथीताभ्यागतांची पुजा करवून त्यांस भोजन घालुन पाठवू लागला. त्यानें दत्तात्रयास आनंद झाला नागनाथाकडे हजारो मनुष्य जेवून द्रव्य, वस्त्र , धान्ये वगैरे घेऊन जाऊं लागली. या योगानें तो जगविख्यात झाला. जो तो त्याची कीर्ति वाखाणूं लागला.

एके दिवशीं नागनाथानें बापास विचारलें कीं , माझ्या हातानें या गोष्टी घडतात यांतला मुख्य उद्देश कोणता ? तसाच तो दत्तात्रेय मुलगा कोण होता, हें मला खुलासा करून सांगावें तेव्हां बाप म्हणाला तो द्त्तात्रेय तिन्हीं देवांचा अवतार होय. तुझे दैव्य चांगले म्हणून तुला भेटुन तो सिद्धि देऊन गेला. तें ऐकून पुनः त्यावर बाप म्हणाला , तो एके ठीकाणी निसतो; यामुळें त्याची भेट होणें कठीण होय. त्याच्या भेटीची इच्छा धरुन प्रयत्‍न चालविल्यानें भेट होते असें नाहीं. तो आपण होऊन कृपा करून दर्शन देईल तेव्हां खरें असें सांगुन बाप कांहीं कामाकरितां घराबाहेर गेला.

मग दत्तात्रेयाच्या दर्शनाकरिता जायाचा नागनाथानें निश्चय केला. तो कोणास न विचारतां घरुन निघाला व मातापुरी, पांचाळेश्वर वगैरे ठिकाणीं शोध करुं लागला. परंतु तेथें पत्ता न लागल्यामुळें कोल्हापुरास गेला व तेथील लोकांजवळ तो दत्ताविषयीं चौकशीं करुं लागला . तेव्हा लोक त्यास समजुन हंसले व दत्तात्रेय येथें येतो पण कोणास दिसत नाहीं कोणत्या तरी रुपानें येऊन भिक्षा मागूण जातो असें त्यांनी सांगितले. तें ऐकून दुसऱ्या क्षेत्रांत त्यास भिक्षा मिळत नाहीं कीं काय असें नागनाथानें विचारिलें या नाथाच्या प्रश्नावर लोकांनीं उत्तर दिलें कीं तो या कोल्हापुराशिवाय दुसऱ्या ठिकाणचें अन्न सेवन करीत नाहीं. येथें अन्न न मिळालें तर तो उपवास करील, पण अन्नासाठी दुसऱ्या गांवीं जाणार नाहीं. अन्य गांवच्या पक्वांन्नांस विटाळाप्रमाणें मानून या गांवांत अन्न परम पवित्र असं तो मानितो.

मग वटसिद्ध नागनाथानें विचार केला कीं, गांवांत कोठेंहि स्वयंपाक होऊं न देतां सर्वांस येथेंच भोजनास बोलवावें म्हणजे त्यास तिकडे कोठें अन्न मिळणार नाहीं व सहजच तो आपल्याकडे येईल. परंतु आपल्याकडचें सिद्ध अन्न तो घेणार नाही, ही खून लक्षांत ठेवुन ओळख पटतांच त्याचें पाय धरावे. माझें नांव त्यास व त्याचें नांव मला ठाऊक आहे, असा मनांत विचार करून तो लक्ष्मीच्या देवालयांत गेला व पुजाऱ्यापासुन एक खोली मागून घेऊन तेथें राहिला.

कांहीं दिवस गेल्यावर गांवजेवणावळ घालावी असें नाथाच्या मनांत आलें त्यानें ही गोष्ट पुजाऱ्याच्यापाशीं काढून खटपटीस मदत करण्यासाठी विनंती केली. तेव्हां पुजारी म्हणाला, साऱ्या गावाच्या समाराधनेस पुरेल इतक्या अन्नाचा संग्रह तुझ्याजवला कोठें आहे? एरव्हीं वरकड सर्व खटपट आम्हीं करुं पण सामान कोठून आणणार ? त्यावर नाथानें सांगितलें कीं, सामग्री मी पुरवितो, तुम्ही खटपट मात्र करुं लागा. तें त्याचें म्हणणें पुजाऱ्यानें कबूल केलें. शेवटीं नाथानें द्रव्य, धान्यें, तेल, साखर वगैरे सर्व सामुग्री सिद्धीच्या योगानें चिकार भरुन ठेविली व पुजाऱ्यास बोलावून ती सर्व सामग्री दाखविली.


अध्याय ३७ संपादन


नागनाथास दत्तात्रेयाचे दर्शन, नागनाथ व मच्छिंद्रनाथ यांची भेट


वटसिद्ध नागनाथ कोल्हापुरास आल्यानंतर ग्रामभोजनाच्या मिषानें दत्तात्रेयाचें दर्शन होईल; असा विचार करुण त्यानें समानाच्या व द्रव्याच्या राशी तयार केल्या. पुजाऱ्यास दाखविल्या आणि राजापासुन रंकापर्यंत व ब्राह्मणापासुन अत्यंजापर्यंत सर्वास दोन्ही वेळचें सहकुंटूंब, सहपरिवार, पाहूण्यासुद्धां भोजनाचें आमंत्रण दिले. गांवांत स्वयंपाकासाठीं कोणी चूल पेटवू नये, सकाळीं व मध्यल्या वेळींही भूक लागली तर तिकडेच फराळाचा बेत ठेविला असल्याचें आमंत्रणांत सुचविलें होते. निरनिराळ्या जातींत भ्रष्टाकार होऊं नये म्हणुन बंदोबस्त ठेवुन कार्याची सुरुवात झाली. यामुळें गांवांत कोणीच स्वयंपाकाकरितां चूल पेटविली नाहीं. अन्न घरीं घेऊन जाण्यादेखील मनाई नव्हती. कोरडं किंवा शिजलेलें अन्न, जसें हवें असेल तसें व लागेल तितकें घेऊन जाण्याची मुभा होती. यामुळें गांवांत ज्याच्या त्याच्या घरी सिद्ध अन्न भरलें होतें. दिव्या लावण्यासाठीं मात्र लोकांनी विस्तवाची गरज पडे. हा समाराधनेचा समारंभ एकसारखा महिनाभर चालला होता.

त्यामुळें पहिल्याच दिवशीं दत्तात्रेयास भिक्षेची मारामार पडली. त्या दिवशीं तो कुत्सित रूप घेऊन घरोघर भिक्षा मागत होता. तो तेथें जाई तेथें लोक त्यास म्हणत कीं, अरे भीक कां मागतोस ? आज गांवात मोठें प्रयोजन आहे तिकडे जा, चांगलें चांगले जेवयास मिळेल. तूं तरी एक वेडा दिसतोस. उतम उत्तम पक्वान्नांचें भोजन सोडून कदान्नाकरितां गांवांत कां भटकतोस ? आम्हां सर्वांना जेवावयास जावयाचें आहे, तुझ्यासाठीं स्वयंपाक करावयास कोण बसतो ?

मग प्रयोजनाचा कसा काय बेतबात आहे तो स्वतः जाऊन पाहण्याचा दत्तात्रेयाचा विचार ठरला. त्यानें तिकडे जाऊन संपूर्ण पाकनिष्पत्ति कशी काय होते हें नीट लक्षांत आणिलें सिद्धिच्या योगानें अन्नाच्या राशी झाल्या, हें तो पक्केपणीं समजला. मग ही मोठी समाराधना येथें कोण घालीत आहे ह्याची दत्तात्रेयानं विचारपूस केली. तेव्हां वटसिद्ध नागनाथाचें नांव त्यास लोकांनीं सांगितले. आपण वीस वर्षापूर्वी ज्यास सिद्धि दिली तो हा असुन आपल्या दर्शनाच्याच इच्छेनें त्यानें या गांवीं येऊन हें संतर्पण करण्याचें सुरु केले, असें दत्तात्रेयाच्या लक्षांत आलें. त्यानें त्या दिवशीं उपवास केला. तो तेथून तसाच परत जाऊं लागला असतां लोकांनी त्यास पुष्कळ आग्रहा केला. पण तें सिद्धीचें अन्न असल्यामुळें न जेवतां तसाच तेथून निघून गेला. तो दररोज गांवांत येऊन सुकी भिक्षा मागे. कोणी जास्त चौकशी करून विचारिलें तर मी भिक्षेच्या अन्नाशिवाय अन्नसेवन करीत नाहीं, असें सांगे व काशीस जाऊन भोजन करी. याप्रमाणें एक महिना लोटला.

नागनाथानें विचार केला कीं, अजुन स्वामींचें दर्शन होत नाहीं हें काय ? मग त्यानें ग्रामस्थ मंडळींस विचारिलें कीं, गांवांत भिक्षा मागणारा कोणी अथीत येत असतो काय ? त्यावर लोकांनी सांगितलं कीं, एकजण नियमितपणें येतो; परंतु त्याच्या भिक्षान्न सेवन करण्याचा नियम असल्यामुळें तो तुमचें अन्न घेत नाही. गांवांत इतर शिजलेलें अन्न त्यास मिळत नाहीं म्हणून कोरान्न मागतो. मग भिक्षेकरी पुनः आल्यास मला सांगावें म्हणजें मीं स्वतः जाऊन त्याची विनवणी करीन व त्यास आणुन भोजन घालीन, असें नाथानें त्या लोकांना सांगुन ठेविलें त्या वेळीं त्यांना अशीहि सूचना केली होती कीं, त्या भिक्षा मागणाऱ्याला कोरडी भिक्षा घालूं नये. येथल्याच अन्नाची त्यास सांगुन सवरून भिक्षा घालावी व ती जर त्यानें न घेतली तर मला लागलेंच कळवावें. असें सांगून त्यांस सिद्धिचें पुष्कळ अन्न दिलें.

पुढें दत्तात्रेय भिक्षेस आला असतां हें नाथाकडचं अन्न असें बोलून लोक भिक्षा घालूं लागले. ती तो घेईना. मग आपापल्या घरची कोरडी भिक्षा घालूं लागले. पण संशयावरून तीहि तो घेईना. इतक्यांत कोणी जाऊन ही गोष्ट नाथास कळविली. त्या सरसा तो लगबगीनें तेथें आला. त्यास लोकांनी लांबूनच तो भिक्षेकरी दाखविला. त्याबरोबर नाथानें त्याच्याजवळ जाऊन हात जोडून पायांवर मस्तक ठेविलें. नंतर बहुत दिवसांत माझा समाचार न घेतल्यामुळें मी अनाथ होऊन उघड्यावर पडलो आहें. आतां मजवर कृपा करावी, अशी स्तुति केली. त्याची तिव्र भक्ति पाहून दत्तात्रेयानें त्यास उठवून हृदयीं धरिलें व तोंडावरुन हात फिरविला. तसेंच त्याच्या डोळ्यांतले अश्रु पुसलें व त्यास एकीकडे नेऊन आपला वरदहस्त त्याच्या मस्तकावर ठेवून कानांत मंत्र सांगितला. ती आत्मखून समजतांच तो ब्रह्मापरायण झाला व त्याच्या अज्ञानाचा समुळ नाश झाला. दत्ताचें स्वरूप पाहातांच त्यास अनुपम आनंद झाल. त्या समयीं तो दत्तात्रेयाच्या पायां पडला. त्यास स्वामीनें मांडीवर बसविलें व त्याची पूर्वजन्मकथा सांगितली व तुं ऐरहोत्र नारायाणाचा अवतार आहेस, ह्यामुळें मी तुला सिद्धि दिली होती, असेंहि बोलून दाखविलें. तुही भेट घेण्याचें फार दिवस मनांत होतें, पण प्रारब्धानुसार तो योग घडुन आला, असें दत्तात्रेयानें सांगितलें.

मग ते उभयंता तेथून काशीस निघाले. जातांना दत्तानें यानमंत्रानें भस्म मंत्रुन नाथाच्या कपाळीं लाविलें व ते एका निमिषांत काशीस गेले. तेथें नित्यनेम उरकून क्षणांमध्यें ते बदरीकाश्रमास गेले व शिवालयांत जाऊन दत्तानें उमाकांताची भेट घेतली. उभयतांच्या भेटी झाल्यानंतर समागमें दुसरा कोण आणिला आहे, असें शंकरानें दत्तास विचारलें. तेव्हा दत्तानें हा नागनाथ ऐरहोत्र नारायणाचा अवतार आहे, असें कळविल्यानंतर शंकरानें त्यास नागपंथाची दीक्षा देण्याची सुचना केली, ती लागलीच दत्तानें कबूल केली. मग नागनाथासह दत्तात्रेय तेथें सहा महिनें राहिले. तितक्या अवकाशांत नाथांस सर्व विद्यांत व चौसष्ट कलांत निपुण केलें. मग नागाश्वार्त्थी जाऊन सर्व साधने सिद्धि करून घेतल्यावर दत्तानें त्यास पुनः बदरिकाश्रमास नेऊन तपश्चर्येस बसविलें व नाथदीक्षा दीली. तेथें त्यानें बारा वर्षें तपश्चर्या केली. त्यास संपूर्ण देवांनीं अनेक वर दिलें नंतर त्यानें मावंदे करून देव, ऋषि आदिकरून सर्वांस संतुष्ट केलें. नंतर सर्व आपपल्या स्थानीं गेले. पुढें दत्तात्रेयानें नाथास तीर्थयात्रेस जाण्याची आज्ञा केली. त्यानुसार दत्ताच्या पायां पडून नागनाथ तीर्थयात्रा करावयास निघाला व दत्तात्रेय निरिनारपर्वतावर गेला.

नागनाथ तीर्थयात्रा करीत बालेघाटास गेला. तेथें अरण्यांत राहिला असतां गांवोगांवचे लोक त्याच्या दर्शनास येऊं लागले. त्यांनीं त्यास तेथें राहण्याचा आग्रह केला. व त्याच्याजवळ पुष्कळ लोक येऊन राहूं लागले. त्या गांवाचें नांव वडगाव असें ठेविलें. पुढें एकें दिवशीं मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करीत असतां त्या गांवात आले. तेथे नागनाथाची कीर्ति त्याच्या ऐकण्यांत आली. मग मच्छिंद्रनाथ नागनाथाच्या दर्शनास गेला असतां दरवाजांतुन आंत जातांना दाराशीं असलेल्या शिष्यांनी त्यास हरकत करून आंत जांताना मनाई केली. ते म्हणाले, नाथबाबा ! पुढें जाऊं नका. आम्ही नागनाथास कळवून मग तुम्हांस दर्शनास नेऊं . त्याच्या परवानगीवांचून आंत जाण्याचि मनाई आहे. शिष्याचें हें भाषण मच्छिंद्रनाथानें ऐकताच त्यास मोठा क्रोध आला. देवाच्या किंवा साधुच्या दर्शानास जाण्याची कोणाचीही आडकाठी नसावी, अशी पद्धत असतां येथें हा सर्व दांभिक प्रकार दिसतो, असें मनांत आणुन मच्छिंद्रनाथानें त्या शिष्यांस तांडण केलें. तें पाहून नागनाथाचे दुसरे सातशें शिष्य धांवले. परंतु त्या सर्वांना त्यांनीं स्पर्शास्त्राच्या योगानें जमिनीस खिळवुन टाकिले. व तो एकेकाच्या थोबाड्यांत मारूं लागला. तेव्हां त्यांनीं रडुन ओरडुन आकांत केला.

मठामध्यें नागनाथ ध्यानस्थ बसला होता.तो ही ओरड ऐकून देहावर आला.ध्यानंत घोटाळा झाल्यानें नागनाथास राग आला; त्यानें शिष्यांची ही अवस्था समक्ष पाहिली व मच्छिंद्रनाथासहिं त्यांच्या थोबाडांत मारतांना पाहिलें.

तेव्हां त्यानें प्रथम गरुडबंधनविद्या जपून स्थर्गी गरुडाचें बंधन केलें व नंतर विभक्तास्त्र जपून आपले शिष्य मुक्त केले. ते मुक्त होतांच नागनाथाच्या पाठीशीं जाऊन उभे राहिले. त्या सर्वांना चूर्ण करण्याचा मच्छिंद्रनाथाच्या विचार करून पर्वतास्त्राची योजना केली तेव्हां आपल्या अंगावर विशाल पर्वत येत आहे, असें पाहून नागनाथानें वज्रास्त्राचा जप करितांच इंद्रांनें वज्र सोडून दिलें. तेव्हां तो पर्वत चूर्ण झाला अशा रीतींने ते उभयतां एकमेकांचा पाडाव करण्याकरितां मोठ्या शौर्यानें लढत होते. शेवटीं नागनाथानें सर्पास्त्र पेरून मोठमोठाले सर्प उप्तन्न केले. ते येऊन मच्छिंद्रनाथास दंश करुं लागले. तेव्हां मच्छिंद्रनाथानें गरुडास्त्राची योजना केली, परंतु नागनाथानें पूर्वीच गुरुडास्त्रानें गरुडास बांधून टाकिल्यामुळें मच्छिंद्रनाथास गरुडास्त्राचा प्रयोग चालेनास झाला. सर्पानीं मच्छिंद्रनाथास फारच इजा केली, तेणेंकरून तो मरणोन्मुख झाला. त्यानें त्या वेळी गुरुचें स्मरण केलें की, देवा दत्तात्रेया ! या वेळेस विलंब न करता धाव.

मच्छिंद्रनाथानें दत्तात्रेयाचें नांव घेतल्याचें पाहून नागनाथं संशयांत पडला. आपल्या गुरुचें स्मरण करित असल्यामुळें हां कोण व कोणाचा शिष्य ह्याचा शोध करण्याकरितां नागनाथ मच्छिंद्रनाथाच्या जवळ गेला आणि त्यास विचारूं लागला. तेव्हां ' आदेश ' करून मच्छिंद्रनाथानें आपलें नांव सांगुन म्हटलें, माझा गुरु दत्तात्रेय, त्याच्या मी शिष्य आहे. माझ्याजवळ जालंदर, नंतर भर्तृहरी, त्याच्यामागुन रेवण. या नाथपथांत प्रथमच मीच आहे. म्हणुन मी दत्तात्रेयाचा वडील मुलगा आहे. अशी मच्छिंद्रनथानें आपली हकिकत सांगितली. ती ऐकून नागनाथास कळवळा आला. त्यानें लागलेंच गरुडांचे बंधन सोडुन गरुडाचा जप केला तेव्हां गरुड खालीं उतरला व सर्प भयभीत होऊन व विष शोधून अदृश्य झाले. गरुडाचें काम होतांच तो दोघां नाथांस नमस्कार करून स्वर्गास गेला. नंतर नागनाथ मच्छिंद्रनाथाच्या पायां पडला व म्हणाला, वडील बधु पित्यासमान होय, म्हणुन तुम्ही मला गुरुच्या ठिकाणी आहांत. मग त्यास तो आपल्या मठांत घेऊन गेला व एक महिना आपल्याजवळ ठेवून घेतलें.

एके दिवशीं मच्छिंद्रनाथानें नागनाथास विचारलें कीं, तूं दाराशीं सेवक ठेवुन लोकांना आंत जाण्यास प्रतिबंध करतोस ह्यातील हेतु काय, तो मला सांग. भाविक लोक तुझ्या दर्शनास येतात. तुझ्या शिष्यांनी त्यांना जाऊं दिलें नाहीं म्हणजे त्यांना परत जावें लागतें. आपला दोघांचा तंटा होण्याचें मुळ कारण हेंच. हें ऐकून नागनाथानें आपला हेतु असा सांगितला कीं, मी निरंतर ध्यानस्थ असतो व लोक आल्यानें धानभंग होतो. म्हणुन दाराशीं रक्षक ठेविले. त्यावर मच्छिंद्रनाथानें त्यास सांगितलें कीं असें करणें आपणास योग्य नाहीं. लोक पावन व्हावयास आपल्या कडे येतात. व ते दारापासुन मागें जातात. तरी आतांपासुन मुक्तद्वार ठेव. असें सांगुन मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रेस गेले.

इकडे दाराशीं मनाई नसल्यामुळें नागनाथाच्या दर्शनास लोकांची गर्दी होऊं लागली. त्या नाथाच्या शिष्यांतच गुलसंत म्हणुन एक शिष्य होता. त्यांची स्त्री मठांत मृत्यु पावली; तिला नाथानें उठविलें. हा बोभाटा झाला. मग कोणी मेलें म्हणजे प्रेत मठांत नेत व नागनाथ त्यास जिवंत करुण घरीं पाठवुन देई; यामुळें यमधर्म संकटांत पडला. त्यानें हें वर्तमान ब्रह्मदेवास कळविलें, मग ब्रह्मदेव स्वतः वडवाळेस येऊन त्यानें नाथाचा स्तव करून तें अद्‌भुत कर्म करण्याचें बंद करविलें.


अध्याय ३८ संपादन


चरपटीची जन्मकथा; सत्यश्रव्याकडे बालपण, नारदाचा सहवास


चरपटीच्या उप्तात्तीची अशी कथा आहे, कीं , पूर्वी पार्वतीच्या लग्नासमयीं सर्व देव, दानव, हरिहर, ब्रह्मदेव आदिकरुन देवगण जमलेला होता, ज्या वेळीं पार्वतीचें अप्रतिमा लावण्य व रूप पाहून ब्रह्मदेवास काम उप्तन्न झाला. तो त्याच्या आवाक्याबाहेर जाऊन वीर्य पतन पावलें. तेव्हां ब्रह्मादेवास संकोच वाटला. व त्यानें तें वीर्य टांचेनें रगडिलें; तें पुष्कळ ठिकाणीं पसरलें. त्यापैकीं एक बाजुस गेलें त्याचें साठ हजार भाग झालें व त्यापासुन साठ हजार वालखिल्य ऋषि निर्माण झाले. दुसऱ्या बाजूस गेलेला एक भाग तसाच राहून गेला होता. तो सेवकानें केर झाडुन काढिला त्यांत गेला. पुढें लग्नाविधींनंतर लज्जाहोमाचें भस्म व तो केर सेवकांनीं नदींत टाकुन दिला. त्यांत तें रेतहि वहात गेलें. पुढें तें एका कुशास ( गवतास ) अडकून तेथेंच त्यांत भरुन राहिलें तें तेथें बरेच दिवस राहिलं होतें त्यांत पिप्पलायन नारायणानें सचार केला. तोच हा चरपटीनाथ. हा मुलगा नऊ महिन्यांनीं बाहेर पडुन स्पष्ट दिसूं लागला.

सत्यश्रवा या नांवाचा ब्राह्मण पुनीत गांवांत राहात असे. तो सुशील व वेदशास्त्रांत निपुण होता. तो एकंदां भागीरथीतीरीं दर्भ आणावयास गेला असतां कुशाच्या बेटांत गेला. तेथें त्यानें त्या मुलास पाहिलें. तो मुलगा सूर्याप्रमाणें तेजस्वीं दिसत होता. त्यावेळीं सत्यश्रव्याच्या मनांत त्या मुलाविषयीं अनेक शंका येऊं लागल्या. असें हें तेज:पुंज बाळ कोणाचें असावें बरें ? उर्वशीं तर हें आपलें मुल टाकून गेली नसेल ना ? किंवा हा सुंदर मुलगा राजाचा असावा व त्याला त्याच्या आईच्या बाजेवरून जलदेवता तर येथें घेऊन आल्या नसतील ? अशा प्रकारच्या अनेक कल्पना त्याच्या मनांत येऊं लागल्या. तो मुलाकडे पाही, पण त्याला हात लावीना. आपण ह्यास घरीं घेऊन जावें. हा विचार त्याच्या मनांत येई; पण मुलगा कोणाचा हा निर्णय न ठरल्यामुळें त्या मुलास तो उचलून घेईना. अशा तर्‍हेनें विचार करीत तो कांहीं वेळ तेयेच उभा राहिला होता व मुलगा हातपाय हालवुन रडत होता.

थोड्याच वेळांत पिप्पलायान नारायणाचा अवतार झालेला पाहून देवांनीं त्या मुलावर पुष्पवृष्टी केली व जयजयकार करून आजचा दिवस सुदिन मानून कृतकृत्य झालों, असें मनांत आणिलें मुलाच्या अंगावर देव फुलें टाकीत तीं सत्यश्रवा काढी. देव एकसारखी फुलें टाकीत, पण सत्यश्रव्यास ती दिसत नसत; यामुळें त्याच्या मनांत संशय येऊन तो दचकला व हा पिशाच्च्याचा सर्व खेळ असावा असें त्यास वाटलें, मग तो जिवाची आशा धरुन दर्भ घ्यावयाचें सोडून चपळाईनें पळत सुटला. तें पाहून देव हसूं लागलें व सत्यश्रव्या पळूं नको, उभा रहा, असें म्हणूं लागलें. हें शब्द ऐकून तर सत्यश्रवा फारच घाबरला व धूम पळत सूटला.

मग सत्यश्रवाची भीति घालवून तो मुलगा त्याच्या हवाली करावा. म्हणुन देवांनीं नारदास पाठविल. नारद ब्राह्मणाचा वेष घेऊन सत्यश्रव्यापुढें येऊन उभा राहिला. सत्यश्रवा भयानें पळत असल्यामुळें धापा टाकीत होता व त्याचे प्राण कासावीस झाले होते. इतक्यांत ब्राह्मणरुपीं नारदानें त्यास उभें करून घाबरण्याचें कारण विचारलें तेव्हां त्यानें आपल्या मनांत आलेले सर्व विकल्प सांगितलें. मग नारदानें त्यास एका झाडाखाली नेलें व सावलींत बसुन स्वस्थ झाल्यावर पिप्पलायन नारायणाच्या जन्माचा सर्व वृत्तांत सांगितला. तसेंच ही भूतचेष्टा नसल्याबद्दल त्याची खात्री केली आणी मुलास घरीं नेऊन त्याचा सांभाळ करावयास सांगितलें. शेवटीं नारद त्यास असेंहि म्हणाला. कीं मीं जें तुला हें वर्तमान सांगितलें ते देवांचें भाषण असुन त्यावर भरंवसा ठेवुन मुलास घेऊन जा व त्याचें उत्तम प्रकारें संगोपन कर.

तरी पण माझें स्वर्गांत कसें कळलें हे सत्यश्रव्यास संशय उप्तन्न झाला व क्षणभर उभा राहूण तो पाहूं लागला. नारदाच्या कृपेनें देव त्याच्या दृष्टीस पडलें मग सत्यश्रव्यानें नारदास म्हटलें कीं, तूं सांगतोस ही गोष्ट खरी, मला येथुन देव दिवस आहेत; पण तुं आतां मजबरोबर चल व तो मुलगा तेथून काढूण माझ्या हातांत दे. हें त्याचें म्हणणें ब्राह्मणरूपीं नारदानें कबुल केलें मग तें दोघें भागीरथीच्या तटीं गेले. तेथें नारदानें परमानंदानें मुलगा सत्यश्रव्याच्या स्वाधीन केला व त्याचें नांव चरपटीनाथ असें ठेवावयास सांगितलें हेंच नांव ठेवावें असें देव सुचवीत आहेत असेंहि त्यास सांगितले. नंतर नारद स्वर्गास गेला व सत्यश्रवा आपल्या घरीं आला.

सत्यश्रव्याची स्त्री चंद्रा परम पतिव्रता असून मोठी धार्मिक होती. तो तिला म्हणाला, मी दर्भ आणावयस भागीरथीतीरीं गेलों होतो; देवानें आज आपणांस हा मुलगा दिला. याचें नांव चरपटी असें ठेवावें. त्याच्या योगानें देवांचे चरण माझ्या दृष्टीस पडले. असें सांगुन सर्व वृत्त थोडक्यांत त्यानें तिला सांगितला. तें ऐकून तिला परम हर्ष झाला. ती म्हणाली आज दर्भाच्या निमित्तानें वंशवेल आपल्या हातीं आली, असें बोलून तिनें मुलास हृदयीं धरिले. मग तिनें त्यास न्हाऊं घालून स्तनपान करविलं व पाळण्यांत घालूंन त्याचें चरपटी असें नांव ठेवून ती गाणी गाऊं लागली.

पुढें तो मुलगा उत्तरोत्तर वाढ्त चालला. सातव्या वर्षी त्याची सत्यश्रव्यानें मुंज केली व त्यास वेदशास्त्रांत निपुण केलें. पुढें एके दिवशीं नारदाची स्वारी भ्रमण करीत करीत त्याच गांवांत आली. आंगंतुक ब्राह्मणाच्या वेषानें नारद सत्यश्रव्याच्या घरीं गेला. त्यानें चरपटीनाथास पाहिलें, त्या वेळेस त्याचें वय बारा वर्षाचं होतें. ब्रह्मदेवाच्या वीर्यापासुन चरपटीची उत्पत्ती असल्यामुळें तो आपला भाऊ असें समजून त्याचा विशेष कळवळा येई .

चरपटीनाथास पाहिल्यानंतर नारद तेथुन निघुन बदरिकाश्रमास गेला व तेथें त्यानें शंकर, दत्तात्रेय व मच्छिंद्रनाथ ह्यांची भेट घेतली. मग चौघेजण आनंदानें एकें ठिकाणीं बसलें असतां गोष्टी बोलतां बोलतां चरपटीचा मूळारंभापासुन वृत्तांत त्यांस नारदानें सांगितला. तो ऐकून शंकरानें दत्तात्रेयास सांगितलें कीं, तुमची मर्जी नवनारायणांस नाथ करुण्याची आहे; त्याअर्थीं चरपटीस आपण दीक्षा देऊन नाथपंथात आणावं त्यावर दत्तात्रेयानें म्हटलें कीं पश्चात्तपावांचुन हित करुण घेतां येत नाहीं; यास्तव चरपटीस अनुताप झाल्यानंतर पाहतां येईल त्यावर नारदानें म्हटलें कीं, ही खरी गोष्ट आहे; आतां चरपटीस पश्चात्ताप होईल अशी व्यवस्था मी करितों. पण आपण अनुग्रह देण्याची सिद्धतां करावी, इतकें दत्तात्रेयास सांगुन नारद पुनः त्या गांवीं सत्यश्रव्याकडे आला व त्यानें आपण विद्यार्थीं होऊन राहतो; मला विद्या पढवावी अशी त्यास विनंती केली सत्यश्रव्यानें त्याच्या म्हणण्याचा रुकार दिला . नारदास तो कुलंब या नांवाने हांक मारी. मग कुलंब व चरपटी एके ठिकाणी विद्याभ्यास करूं लागले.

सत्यश्रवा ग्रामजोशी होता. एके दिवशीं एका यजमानाकडे ओटीभरण होतें. म्हणुन त्यानें सत्यश्रव्यास बोलाविलें; परंतु सत्यश्रवा स्नानसंध्येंत गुंतल्यामुळें त्यानें चरपटीस पाटविलें व समागमें कुलंबास मदतीस दिलें होते. तो संस्कार चरपटीनें यथाविधि चालविल्यावर यजमानानें त्यास दक्षिणा देण्यासाठीं आणिली. त्यावेळीं कांहीतरीं कुरापत काढून व तंटा करून चरपटीचें संसारावरचें मन उडवावें असा नारदानें बेत योजून तो चरपटीस म्हणाला, तूं या वेळेस दक्षिणा घेऊं नकोस. कारण, दोघे विद्यार्थीं अजून अज्ञाआणा आहो; दक्षिणा किती घ्यावयाची हें आपणेंस समजत नाहीं व यजमान जास्त न देतां कमीच देईल. यास्तव घेतल्या वांचून तूं घरीं चल. मागाहून सत्यश्रवा येऊन दक्षिणा घेईल. त्यावर चरपटी म्हणाला, मी रिकाम्या हातीं घरीं कसा जाऊं ? तेव्हां नारद म्हणाला तूं घेतलेली दक्षिणा जर कमी असली तर ती तुझा पिता कबूल करणार नाहीं. हें ऐकून चरपटी म्हणाला, मी यजमानापासुन युक्तीनें पुष्कळ दक्षिणा काढून घेतों. वाजवीपेक्षां जास्त दक्षिणा दाखविल्यावर बाप कशासाठीं रांगे भरेल ? उलट शाबासकी देईल अशीं त्यांची भाषणे होत आहेत इतक्यांत यजमानानें थोडीशीं दक्षिणा भिजवून चरपटीच्या हातावर ठेविली.

नारदानें आधींच कळ लावून दिली होती. तशांच दक्षिणाहि मनाप्रमाणें मिळाली नाहीं, म्हणुन चरपटीस राग आला. तो यजमानास म्हणाला, तुम्हीं मला ओळखिलें नाहीं. हें कार्य कोणतें, ब्राह्मण किती योग्यतेचा, त्याच्यायोग्य दक्षिणा किती द्यावयाची याचें तुम्हांस बिलकुल ज्ञान नाहीं. तें चरपटीचें भाषण ऐकून यजमान म्हणाला, मुला ऐकून घे. तुजा पुष्कळ दक्षिणा द्यावी खरी, पण यजमानास सामर्थ नसेल तर तो काय करील ? तेव्हां चरपटी म्हणाला, अनुकुलता असेल त्यानेंच असलीं कार्यें करण्यास हात घालावा ! अशा तर्‍हेनें दक्षिणेबद्दल उभयतांची बरीच बोलाचाली सुरु झाली.

तें पाहून, चरपटीनें दक्षिणेसाठीं यजमानाशीं मोठा तंटा करून त्यानें मन दुखविल्याचें वर्तमान नारदानें घरीं जाऊन सत्यश्रव्यास सांगितलें आणि त्यास म्हटलें, चरपटीनें निष्कारण तंटा केला. यामुळें आतां हा यजमान मात्र तुमच्या हातांतुन जाईल. यजमान गेल्यावर तुमची कमाई बुडणार. आज चरपटीनें भांडून तुमचें बरेंच नुकसान केलें. आपण पडलों याचक; आर्जव करून व यजमानास खूष करून त्याच्यापासून पैसे घेतले पाहिजेत.

नारदानें याप्रमाणें सांगितल्यावर सत्यश्रवा रागावला व पूजा आटोपून लागलाच यजमानाकडे गेला. तेथें दोघांची बोलाचाली चालली होती, ती त्यानें समक्ष ऐकीली. ती पाहून त्यास मुलाचा अधिक राग आला व यजमानाबरोबर भांडल्याबद्दल त्यानें खाडकन त्याच्या तोंडांत मारली.

चरपटी अगोदर रागांत होताच, तशांच बापानें शिक्षा केली. या कारणानें त्यास अत्यंत राग येऊन तो तेथून पश्चात्तापानें निघून गांवाबाहेर भगवतीच्या देवालयांत जाऊन बसला. नारद अंतसीक्षच, त्याच्या लक्षांत हा प्रकार येऊन त्यानें दुसऱ्या ब्राह्मणाचें रूप घेतलें व तो भगवतीच्या देवालयांत दर्शनास गेला दर्शन घेतल्यावर त्यानें चरपटीजवळ बसून तुम्हीं कोण, कोठें राहतां म्हणुन विचारलें. तेव्हां चरपटीनें सर्व वृत्तांत त्यास सांगितला. तो ऐकून ब्राह्मणरूपी नारदानें बोलून दाखविलें कीं त्या सत्यश्रव्या ब्राह्मणाला वेड लागलेलें दिसतें. अविचारानें मुलगा मात्र हातांतला घालविला. त्या मुर्ख म्हाताऱ्याची बुद्धि चळली खचित आतां तूं त्याला पुनः तोंड दाखवूच नको, खुशाल त्याचा त्याग करून अरण्यांत जा. ह्याप्रमाणें नारदानं सांगतांच, चरपटीस पूर्ण पश्चात्ताप होऊन त्यानें पुनः घरीं न जाण्याचें ठरविलें आणि तो त्या ब्राह्मणास म्हणाला, तुम्हीं माझ्या घरीं जाऊन गुप्तपणानें त्या कुलंबास घेऊन या, म्हणजे आम्ही दोघे कोठें तरी अन्य देशांत जाऊन विद्याभ्यास करून राहूं.

मग तो ब्राह्मणरुपी नारद कुलंबास आणावयासाठीं उठून बाहेर गेला. थोड्या वेळानें कुलंबाचा वेष घेऊन आला. नंतर सत्यश्रव्यापाशीं न राहतां अन्यत्र कोठं तरी जाऊन अभ्यास करून राहूं असा कुलंबाचाहि अभिप्राय पडला. मग ते दोघे एके ठिकाणी एकमतानें राहण्याचें ठरवून तेथून निघाले. ते बरेच लांब गेल्यावर कुलंबानें म्हटलें कीं, आतां आपण प्रथम बदरिकाश्रमास जाऊं व बदरी केदाराचें दर्शन घेऊन मग काशीस जाऊन तेथें विद्याभ्यास करुं हा कुलंबाचा विचार चरपटीस मान्य झाला.

मग ते दोघे बदरिकाश्रमास गेले. तेथें देवालयांत जाऊन त्यांनीं बदरीकेदारास नमस्कार केला. इतक्यांत दत्तात्रेय व मच्छिंद्रनाथा प्रकट झाले. कुलंबानें ( नारदानें ) दत्तात्रेयाच्या पायां पडून मच्छिंद्रनाथास नमस्कार केला. चरपटीहि दोघांच्या पायां पडला व हें उभयतां कोण आहेत म्हणुन त्यानें कुलंबास विचारलें. मग कुलंबानें त्याची नावें सांगितली व स्वतःकडे हात करून म्हटलें कीं, या देहाला नारद म्हणतात; तुझें कर्य करण्यासाठीं मीं कुलंबाचा वेष घेतला होता. हें ऐकून चरपटी नारदाच्या पायां पडून दर्शन देण्यासाठीं विनंति करुं लागला. तेव्हां नारदानें त्यास सांगितलें कीं, आम्ही तिघे तुला प्रकट दर्शन देऊं. परंतु गुरुप्रसादावांचुन आम्ही तुला दिसणार नाहीं. एकदां गुरुनें कानांत मंत्र सांगितला कीं, सर्व जग ब्रह्मरूप दिसेल. तें ऐकून चरपटी म्हणाला,

तुमच्याहुन श्रेष्ठ असा कोणता गुरु मी शोधून काढूं ? तरी आतां तुम्हीं मला येथें अनुग्रह देऊन सनाथ करावें. तेव्हां नारदानें दत्तात्रेयास सुचना केली. मग दत्तानें चरपटीच्या मस्तकावर हात ठेविला व कानांत मंत्र सांगितला. तेव्हां त्याचें अज्ञान लागलेंच जाऊन त्यास दिव्यज्ञान प्राप्त झालें. मग चरपटीनाथास त्यांचें दर्शन झालें. त्यानें तिघांच्या पायांवर मस्तक ठेविलें. ह्याच संधीस शंकरानेंहि प्रकट होऊन चरपटीनाथास दर्शन दिले. त्याच्या तोंडावरून हात फिरविला आणि विद्याभ्यास करवून नाथपंथ देण्याबद्दल दत्तात्रेयास सांगितलें. मग दत्तात्रेयानें त्यास सर्व विद्या पढविल्या; संपूर्ण अस्त्रविद्येंत वाकबगार केलें व तपश्चर्येंस बसविलें. पुढें नाग‍अश्वर्त्थी जाऊन बारा वर्षें राहून वीरसाधन केलें व नवकोटी सातलक्ष साबरी कवित्व केलें. मग त्यास सर्व देवांनीं येऊन आशीर्वाद दिले. नंतर श्रीदत्तात्रेय गिरिनारपर्वतीं गेले व चरपटी तीर्थयात्रेस निघाला. त्यानें रामेश्वर, गोकर्णमहाबळेश्वर, जगन्नाथ, हरिहरेश्वर, काशीं आदिकरून बहुतेक तीर्थें केली, त्यानें पुष्कळ शिष्य केले, त्यातुंन सिद्धकला जाणणारें नऊ शिष्य उदयास आले.


अध्याय ३९ संपादन


सत्यलोकी चरपटीनाथ व नारद यांचें वास्तव्य

पुढें चरपटीनाथानें पृथ्वीवरील सर्व तीर्थयात्रा केल्यावर स्वर्ग, पाताळ या ठिकाणच्याहि तीर्थयात्रा कराव्या असें त्याच्या मनांत आले. मग त्यानें बदरिकाश्रमास जाऊन उमाकांताचें दर्शन घेतलें. तेथें त्यानें यानास्त्राचा प्रयोग सिद्ध करून भस्म कपाळास लावून स्वर्गी गमन केलें. तो प्रथम सत्यलोकास गेला व ब्रह्मदेवाच्या पायां पडून व हात जोडून जवळ उभा राहिला. तेव्हां हा योगी कोण कोठून आला, याची ब्रह्मदेव चौकशी करुं लागला असतां नारद तेथें होताच; त्यानें चरपटीनाथाचा जन्मापासुन सर्व वृत्तांत त्यास निवेदन केला. तो ऐकून घेऊन ब्रह्मदेवानें त्यास मांडिवर बसविलें नंतर येण्याचे कारण विचारल्यावर, तुमच्या दर्शनासाठी आलों असें चरपटीनाथानें सांगितले, मग ब्रह्मादेवाच्या आग्रहास्तव तो तेथें एक वर्ष राहिला. चरपटीनाथ व नारद एकमेकास न विसंबितां एक विचारानें राहात असत.

एके दिवशीं नारद अमरपुरीस गेला असतां ' यावें कळींचे नारद' असें इंद्राने सहज विनोदानें त्यास म्हटलें. तें शब्द ऐकतांच नारदास अतिशय राग आला. मग तो ( कळीचा ) प्रसंग तुजवर आणीन, असं मनांत योजून नारद तेथून चालता झाला. कांहीं दिवस लोटल्यानतंर चरपटीनाथाकडून इंद्राची फटफजिती व दुर्दशा करण्याचा नारदानें घाट घातला. एके दिवशीं फिरावया करितां नारद चरपटीनाथास बरोबर घेऊन इंद्राच्या बागेंत गेला. जातेवेळीं चरपटीनाथ हळू चालत होता. तेव्हा अशा चालण्यानें मजल कशी उरकेल, म्हणुन नारदानें त्यास म्हटल्यावर चरपटीनाथानें उत्तर दिलें की आमची मनुष्याची चालावयाची गति इतकीच. जलद जाण्याचा एखादा उपाय तुमच्याजवळ असल्यास तो योजून मला घेऊन चला. तेव्हां नारदानें त्यास गमनकला अर्पण केली. ती कला विष्णुनें नारदाला दिली होती; ती चरपटीनाथास अनायास प्राप्त झाली. तिचा गुण असा आहे. कीं ती कला साध्य असणाऱ्याचा जेथें जावयाचें असेल तेथें ती घेऊन जाते व त्रिभुवनांत काय चाललें आहे, हें डोळ्यापुढें दिसतें. कोणाचें आयुष्य किती आहे. कोण कोठें आहे, मागें काय झालें, संध्यां काय होत आहे व पुढेहि काय होणार वगैरे सर्व कळतें. अशी ती गमनकला चरपटीनाथास प्राप्त होतांच त्यास अवर्पनीय आनंद झाला. मग ते उभयतां एक निमिषांत अमरपुरीस इंद्राच्या पुष्पवटिकेत गेले. तेथें मला येथील फळें खाण्याची इच्छा झाली आहे, असें चरपटीनथानें नारदास म्हटलें. मग तुला तसें करण्यास कोण हरकत करतो, असें नारदानें उत्तर दिल्यावर चरपटीनें यथेच्छा फळें तोडून खाल्ली. नंतर तेथील बरींच फुलें तोडून सत्यलोकास ब्रह्मदेव देवपूजेस बसले होते तेथें त्यांच्याजवळ नेऊन ठेवली; याप्रमाणें ते नित्य इंद्राच्या बागेंत जाऊन फळें खात व फुलें घेऊन जात.

त्यामुळें बागेचा नाश होऊं लागला. पण तो नाश कोण करतो, याचा इंद्राचे माळी तपास करीत असतांहि त्यांना शोध लागेना. ते एके दिवशीं टपून बसले. थोड्या वेळानें नारद व चरपटीनाथ हे दोघें बागेंत शिरले व चरपटीनाथानें फळें तोडण्यास हात लावला तोच रक्षकांनी हळुच मागून जाऊन नाथास धरिलें हें पाहून नारदा पळून सत्यलोकास गेला. मग रक्षकांनीं चरपटीनाथास धरुन खूप मारले. तेव्हां त्यास राग आला. त्यानें वाताकर्षण अस्त्राचा जप करून भस्म फेकतांच रक्षकांच्या नाड्या आखडून ते विव्हळ होऊन पडले. त्याचें श्वासोच्छवास बंद झाले, डोळे पाढरे झाले व तोंडातुन रक्त निघाले. ही अवस्था दुसऱ्या रक्षकांनीं पाहिली व तें असे मरणोन्मुख कां झाले ह्याचा विचार करीत असतां चरपटीनाथ दृष्टीस पडला, मग ते मागच्या मागेंच पळुन गेले. त्यांनी इंद्रास जाऊन सांगितलें कीं, एक सूर्यासारखा प्रतापी मुलगा बागेंत बेधडक फिरत आहे व त्यानें आपल्या रक्षकांचा प्राण घेतला असून सर्व बागेची धूळदाणी करून टाकिली आहे. आमच्या त्याच्यापुढें इलाज चालत नाहीं म्हणुन आपणांस कळविण्यासाठीं आम्हीं येथें आलों. हें ऐकून त्याच्याशीं युद्ध करून त्यास जिंकण्याकरितां इंद्रानें सर्व देवांनां पाठविले. महासागराप्रमाणें देवांची ती अपार सेना पाहून चरपटीनाथानें वाताकर्षण अस्त्रानें सर्वांस मरणप्राय केलें.

युद्धास गेलेल्या देवसैन्याची काय दशा झाली ह्याचा शोध आणावयास इंद्रानें कांहीं दूत श्वासोच्छवास कोंडून मरावयास टेकल्याची बातमी इंद्रास सांगितली व ते म्हणाले कीं, तो येथें येऊन नगरी ओस पाडुन तुमचाहि प्राण घेईल. तो लहान बाळ दिसतो; परंतु केवळ काळासारखा भासत आहे. हें ऐकुन इंद्रास धसका बसला. त्यानें ऐरावत तयार करण्यास सांगितलें. तेव्हां हेर म्हाणाले, त्या बालकाच्या हातांत धनुष्यबाण नाहीं, कीं अस्त्र नाहीं कोणती गुतविद्या त्यास साध्य झाली आहे, तिच्या साह्यानें प्राणी तडफडुन मरण्याच्या बेतास येतो, आपण तेथें जाउं नयें, काय इलाज करणें तो येथुन करावा. नाहीं तर शंकरास साह्यास आणावें म्हणजें तो देवास उठवील.

हेरांचे तें भाषण ऐकुन इंद्र कैलासास गेला व शंकराच्या पायांपडून झालेला सर्व वृत्तांत सांगुन ह्या अरिष्टातुन सोडविण्याकरितां प्रार्थना करुं लागला. त्या समयीं तुझा शत्रु कोण आहे म्हणुन शंकरानें विचारल्यावर इंद्र म्हणाला, मीं अजुन त्यास पाहिलें नाहीं त्यानें माझ्या बागेचा नाश केल्यावरुन मी सैन्य पाठविलें. परंतु ते सर्व मरणप्राय झालें, म्हणुन मी पळून येथें आलों आहें. मग शत्रुवर जाण्यासाठीं शंकरानें आपल्या गणांस आज्ञा केली व विष्णुस येण्यासाठीसाहिं निरोप पाठविला. मग अष्टभैरव, अष्टपुत्र, गण असा शतकोटी समुदाय समागमें घेऊन शंकर अमरावतीस गेले. त्यांस पाहतांच चरपटीनाथानें वाताकर्षण मंत्रानें भस्म मंत्रुन फेंकलें; त्यामुळें शंकरासुद्धां सर्वांची मागच्यासारखिच अवस्था झाली. इंद्र शंकर व सर्व सेना मूर्च्छित पडलेली पाहून नारद इंद्राकडे पाहुन हंसु लागला. नरदास मात्र घटकाभर चांगलीच करमणुक झाली.

शिवाच्या दूतांनी वैकुंठीस जाऊन हा अत्यद्भुत प्रकार विष्णुला सांगितला. मग छप्पन्न कोटी गण घेऊन विष्णु अमरावतीस आला व शंकरासुद्धां सर्वांस अचेतन पडलेले पाहून संतापला. त्यानें आपल्या गणांस युद्ध करण्याची आज्ञा दिली. तेव्हां चरपटीनाथानें विष्णुच्या सुदर्शनाचा, गांडीवाचा व इतर शस्त्रास्त्रांचा उपयोग होऊं नये म्हणुन मोहनास्त्राची योजना केली. मग वाताकर्षण मंत्रानें भस्म फेंकतांच संपूर्ण विष्णुगणांची अवस्था सदरहूप्रमाणें झाली.

आपल्या गणांची अशी दुर्दशा झालेली पाहून विष्णुनें सुदर्शनाची योजना केली. विष्णुनें महाकोपास येऊन तें आवेशानें प्रेरिलें पण तें नाथाजवळ जातांच मोहनास्त्रांत सांपड्यामुळें दुर्बल झाले. पिप्पलायन हा प्रत्यक्ष नारायण; त्याचाच अवतार हा चरपटीनाथ अर्थात हा आपला स्वामी ठरतो; वगैरे विचार सुदर्शनानें करून नाथास नमन केलें व तें त्याच्या उजव्या हातांत जाऊन राहिलं हातांत सुदर्शन आल्यामुळें चरपटीनाथ प्रत्यक्ष विष्णु असाच, भासूं लागला. शत्रुच्या हातांत सुदर्शन पाहून विष्णुस आश्चर्य वाटलें. मग विष्णु नाथाजवळ येऊं लागला. तेव्हां त्यानें वाताकर्षणास्त्राची विष्णुवर प्रेरणा केली. त्यामुळें विष्णु धाडकन जमिनीवर पडला. त्याच्या हातातली गदा पडली व शंख वगैरे आयुधेंहि गळाली. मग चरपटीनाथ विष्णुजवळ येऊन त्यास न्याहाळून पाहूं लागला. त्यानें त्याच्या गळ्यांतील वैजयंती माळ काढून घेतली. मुगुट, शंख, गदा हीं देखील घेतली. नंतर तो शंकराजवळ गेला व त्याची आयुधें घेऊन सत्यलोकास जाऊन ब्रह्मदेवासमोर उभा राहिला.

विष्णुचीं व शिवाची आयुधें चरपटीनथाजवळ पाहुन ब्रह्मदेव मनांत दचकला व कांहीं तरी घोटाळा झाला असें समजून चिंतेंत पडला. मग नाथास मांडीवर बसवुन ही आयुधें कोठून आणलींस असें त्यानें त्याला युक्तीनें विचारलें. तेव्हां चरपटीनें घडलेला सर्व वृत्तांत त्यास सांगितला. तो ऐकून ब्रह्मा घाबरला व त्यास म्हणाला बाळ ! विष्णु माझा बाप व तुझा आजा होता. महादेव तर सर्व जगाचें आराध्य दैवत होय. ते दोघे गतप्राण झाले तर पृथ्वी निराश्रित होऊन आपलें कांहीं चालणार नाहीं. यास्तव तूं लौकर जाऊन त्यांस उठीव किंवा मला तरी मारून टाक. तें भाषण ऐकून मी त्यांस सावध करतो. असें नाथानें ब्रह्मदेवास सांगितलें.

मग ते अमरपुरीसे गेले. तेथे विष्णु, शंकर आदि सर्व देव निचेष्टित पडलेले ब्रह्मदेवास दिसले. तेव्हां त्यानें त्यांस लौकर सावध करण्यासाठीं चरपटीनाथास सांगितलें. त्यानें वाताकर्षणास्त्र काढून घेतलें व जे गतप्राण झाले होते त्यास संजीवनीमंत्रानें उठविलें, मग ब्रह्मदेवानें चरपटीनाथास विष्णुच्या व शंकराच्या पायावर घातलें. त्यांनी हा कोण आहे म्हणून विचारल्यावर ब्रह्मदेवानें नाथाच्या जन्मपासुनची कथा विष्णुस सांगितली विष्णुची व शिवाची सर्व भूषण त्यांना परत देवविली. मग सर्व मडळीं आनंदानें आपापल्या स्थानीं गेली.

नंतर नारद गायन करीत इंद्रापाशीं गेला व नमस्कार करून त्यास म्हणाला, तुम्हाला जें इतकें संकटांत पडावें लागलें त्याचें कारण काय बरें ? आम्ही तुमच्या दर्शनास येतो व तुम्हीं आम्हांस कळलाव्या नारद म्हणतां. आजचा हा प्रसंग तरी आमच्या कळीमुळें नाहीं ना गुदरला ? तुम्हांस कोणी तरी चांगलाच हात दाखविलेला दिसतो ! हें नारदाचें शब्द ऐकून इंद्र मनांत वरमला. त्यानें नारदाची पूजा करून त्यास बोळविलें व त्या दिवसापासुन त्यानें ' कळीचा नारद ' हे शब्द सोडून दिलें.

नंतर पर्वणीस ब्रह्मदेव चरपटीनाथास घेऊन मणिकर्णीकेच्या स्नानास गेले. एकवीस स्वर्गीचें लोकहि स्नानास आले होते. नंतर चरपटीनाथ सत्यलोकास वर्षभर राहोला. तेथुन पृथ्वीवर येऊन तो अन्य तीर्थ करून पाताळांत गेला. त्यानें भोगावतीनें स्नान केलें. तसेंच सप्त पाताळें फिरुन बळीच्या घरीं जाऊन वामनास वंदन केले. त्याचा बळीनें चांगला आदरसत्कार केला. नंतर तो पृथ्वीवर आला.

अध्याय ४० संपादन


इंद्रानें केलेला सोमयाग; त्याकरिता सर्व नाथाचें आगमन, नवनाथांचा आशिर्वाद व समारोप


चरपटीनाथानें इंद्राची दुर्दशा करून टाकली म्हणुन इंद्रास फारच खिन्नता वाटली व झालेला अपमान त्याच्या मनास लागुन राहिला. त्यानें चरपटीनाथाचा प्रताप वर्णन करून बृहस्पतीजवळ गोष्ट काढली कीं, तो अल्पवयीं असून तेजस्वी आहे हें खरें ! परंतु प्रत्यक्ष हरिहराच्या प्राणावर आणुन बेतविली आणि आपली करामत दाखविली. इतकें सामर्थ्य दुसऱ्या कोणाचें नाहीं. एक वाताकर्षणविद्या ही देव विद्या कशी फैलावली कळत नाहीं; परंतु ती विद्या आपणांस साध्य होईल.अशी कांहीं तरी युक्ती काढावी. नाहीं पेक्षा त्यांच्या घरीं जाऊन त्यांचें दास्यत्व स्वीकारुन त्यांस आनंदीत करावें. अशा भावार्थाचें इंद्राचें भाषण ऐकून बृहस्पतीनें सांगितलें कीं, नाथांस येथें आणावें हें फार चांगलें, सोमयाग करावा म्हणजे त्या निमित्ताने नाथास येथें आणावयास ठीक पडेल. ते तेथें आल्यनंतर तूं त्यांच्या खुशामतीमध्यें तत्पर रहा आणि त्यांच्या मर्जीनुरुप वागूंन त्यास प्रसन्न करून घेऊन आपला मतलब साधुन घे, हाच एक मार्ग सुलभ व साध्य दिसतो.

ही बृहस्पतीची युक्ति इंद्रास मान्य झाली व त्यास आनंदहि झाला. परंतु चरपटीकडे कोणाला पाठवावें हा विचार पडला. बृहस्पति म्हणाला, अष्टवसुपैकीं उपरिक्षवसु हा मच्छिंद्रनाथाचा पिता होय; तो जाऊन त्यास घेऊन येईल. पूर्वी मच्छिंद्रनाथ येथें आला. होता तेव्हां त्याचा चांगला आदरसत्कार झालेला आहे. तो नऊ नाथांस घेऊन येऊन तुझा हेतु सफल करील, हें ऐकून इंद्रानें उपरिक्षवसुस बोलावून त्यास आपला हेतु सांगितला व विमान देऊन नाथांस आणावयास पाठविलें.

मग तो बदरिकाश्रमास येऊन मच्छिंद्रनाथास भेटला. गोरक्ष, धर्मनाथ, चौरंगी, कानिफा, गोपिचंद्र चालंदर अडबंगी आदि नाथमडळीहि तेथेंच होती. उपरिक्षवसु येतांच मच्छिंद्रनाथानें उठून त्याच्या पायांवर मस्तक ठेविलें त्यानें सर्वासमक्ष इंद्राचा निरोप कळविला आणि बोध करून नवनाथांस अमरपुरीस घेऊन येण्यासाठीं फारच आग्रह केला व त्याजकडून येण्याचें कबूल करून घेतलें. मग जालंदर , कानिफा, चौरंगी, मच्छिंद्र, गोरक्ष , अंडबंगी, गोपीचंद्र आदिकरुन जोगी विमानांत बसले. गौडबंगाल्यास हेळापट्टणास येऊन गोपीचंदानें आपल्या आईस घेतलें. मग तेथून वडवाळ गांवीं जाऊन वटसिद्धनाथास बोध करून बरोबर घेतलें. तसेंच गोमतीच्या तीरीं. जाऊन भर्तृहरीस घेतलें. ताम्रपर्णीचें कांठीं जाऊन चरपटीनाथास घेतलें. पूणें प्रांतांत विटगांवाहून रेवणनाथास घेतलें असो; याप्रमाणें चौऱ्यांयशीं सिद्धासंह नवनाथ विमानांत बसुन सोमयागाकरितां अमरावतीस गेले.

त्याचें विमान आलेलें पाहिल्यबरोबर, इंद्र नाथांस सामोरा गेला आणि नम्रपणानें बोलून त्यांच्या पायां पडला. मग त्यानें सर्वांस घरीं नेऊन आसनावर बसविलें व त्यांची षोडशोपचांरानीं पूजा केली. सर्व देव आनंदानें त्यांच्यापूढें उभे राहिलें. नंतर सोमयज्ञ करण्याचा आपला हेतु इंद्रानें सर्वास सांगितला व कोणत्या स्थानाची योजना करावी हें कळविण्यासाठी प्रार्थना केली. मग मच्छिंद्रनाथ व बृहस्पति यांनीं आपसांत विचार करून सिंहलद्विपामध्यें जें अटव्य अरण्य आहे, तेथें शीतल छाया असुन उदकाचा सुकाळ असल्यानें तें ठिकाण यज्ञान तयारी केली व स्त्रीसह स्वतः यज्ञान बसण्याचा विचार करून बृहस्पतीकडे मंत्र म्हणण्याची व नवनाथांकडे कुंडांत आहुती देण्याच्या कामाची त्यानें योजना केली.

हें वन किलोतलेच्या सीमेंत होतें म्हणुन तेथें असलेल्या मीननाथाची मच्छिंद्रनाथास आठवण झाली. म्हणुन मच्छिंद्रनाथानें उपरिक्षवसुस त्या दोघांस घेऊन येण्यास सांगितलें . त्याप्रामाणें किलोतलेसहि मी येथें घेऊन येतो असें सांगुन उपरिक्षवसु गेला व ते सर्व आल्यावर मच्छिंद्रनाथानें त्यांना राहवुन घेतलें. मच्छिंद्रनाथानें मीननाथास विद्याभ्यास शिकविला. पुढें बृहस्पतीनें इंद्रास सांगितलें कीं, आपण यज्ञास न बसतां उपरिक्षासुस बसवावें. मग बृहस्पतीच्या शिफारशीवरून उपरिक्षवसुच्या हातांत इंद्रानें यज्ञकंकण बांधिलें व आपण देखरेख ठेवूं लागला. जो पदार्थ लागेल तो इंद्र स्वतः देत होता; त्यानें सेवा करण्यांत कसुर ठेवली नाहीं. ता वेळेची इंद्राची आस्था पाहून सर्व जती प्रसन्न झाले.

मीननाथास मच्छिंद्रनाथ विद्या शिकवीत असतां, इंद्रानें मयुराच्या रूपानें गुप्तपणें झाडावर राहुन वाताकर्षणमंत्रविद्या साधून घेतली. ती प्राप्त होतांच इंद्रास परमसंतोष झाला. एक वर्ष यज्ञ चालला होता. तोंपर्यंत मच्छिंद्रनाथ विद्या शिकवीत होता. यज्ञसांगतां होतांच मच्छिंद्रनाथ अग्रपूजेस बसला मग यथासांग पूजा झाल्यावर इंद्रानें दुसऱ्या नाथांची पूजा केली व वस्त्रेंभूषणें देऊन सर्वांस गौरविलें. मग सर्व नाथ कनकासनांवर बसल्यावर इंद्र हात जोडून विनंति करुं लागला कीं, माझ्याकडुन एक अन्याय घडला आहे, त्यची मला क्षमा करावी. तो अन्याय हा कीं, मीननाथास विद्या पढवीत असतां ती सर्व मी चोरून शिकलों आहें.यास्तव आपण वर देऊन ती फलद्रूप करावी. इंद्राचें हें चौर्यकृत्य ऐकून सर्व नाथांनी रागानें शाप दिला कीं तुं कपटाने आम्हांस आणुन विद्या साधुन घेतली आहेस; पण ती निष्फळ होईल. तो शाप ऐकून उपरिक्षवसु व बृहस्पति यांनीं पुष्कळ प्रकारांनीं विनवून त्यास संतुष्ट केलें. नंतर इंद्रानें एवढ्या दीर्घ प्रयत्‍नानें व अति श्रमानें साधलेली विद्या फलद्रुप होण्यासाठीं काहीं तरी तोड काढावी अशी देवदिकांनीम विनंति करून रदबदली केली मग नाथ म्हणाले, इंद्रानें बारा वर्षे तपश्चर्यें करावी व नाथपंथाचा छळ करूं नये, म्हणजे त्यास ती फलद्र्प होईल. असा उःशाप देऊन विमानारुढ होऊन सर्व नाथ पृथ्वीवर आले व तीर्थयात्रा करूं लागले. या वेळीं मच्छिंद्रनाथानें किलोतलेस विचारुन मीननाथासहि समागमें घेतलें होतें. मैनावतीस हेळापट्टाणास पोंचविलें मीननाथाचें सिद्ध शिष्य तीन झाले. त्या सर्व नाथांची फटाफूट होऊन ते तीर्थयात्रा करीत फिरूं लागले.

इंद्रानें सह्याद्री पर्वतावर बारा वर्षें तपश्चर्या केली. मंत्रयोगाच्या वेळेस तो जें पाणी सोडी त्या उदकांचा प्रवाह वाहं लागून तो भीमरथीस मिळाला. त्या ओघास इंद्रायणी असें नाव पडलें . या प्रमाणें तपश्चर्या पूर्ण झाल्यावर इंद्र अमरावतीस गेला.

नवनाथ बहुत दिवसपर्यंत तीर्थयात्रा करित होते. शके सत्राशें दहापर्यंत ते प्रकटरूपानें फिरत होते. नंतर गुप्त झाले. एका मठीमध्यें कानिफा राहिला. त्याच्याजवळ पण वरच्या बाजुनें मच्छिंद्रनाथ ज्याच्या बायबा असें म्हणतात तो राहिला. जालंदनाथास जानपीर म्हणतात, तो गर्भगिरोवर राहिला आणि त्याच्या खालच्या बाजूस गहिनीनाथ त्यासच गैरीपीर म्हणतात. वडवाळेस नागनाथ व रेवणनाथ वीटगांवीं राहिला चरपटीनाथ, चौरंगीनाथ व अंडबंगी नाथ गुप्तरुपानें अद्याप तीर्थयात्रा करीत आहेत. भर्तरी ( भर्तृहरि ) पाताळीं राहिला. मीननाथानें स्वर्गास जाऊन वास केला. गिरिनारपर्वतीं श्रीदत्तात्रेयाच्या आश्रमांत गोरक्षनाथ राहिला. गोपीचंद्र व धर्मनाथ हे वैकुंठास गेले. मग विष्णुनें विमान पाठवुन मैनावतीस वैकुंठास नेलें. चौऱ्यांयशीं सिद्धांपासुन नाथपंथ भरभराटीस आला.

आतां नवनाथानें चरित्र संपलें असें सांगुन मालुकवि म्हणतात. गोरक्षनाथाचा या ग्रंथाविषयीं असा अभिप्राय आहे कीं, यास जो कोणी असल्या मानील किंवा त्याची निंदा करील तो विघ्नसंतोषी इहपरलोकीं सुखी न राहतां त्याचा निर्वश होऊन तो शेवटी नरकांत पडेल. हा श्रीवनाथभक्ति कथासागर ग्रंथ शके सत्राशें एकेचाळीस, प्रमाथीनामसंवत्सरीं ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदेस मालुकवीनें श्रोत्यांस सुखरुप ठेवण्यासाठीं व त्यांचे हेतु परिपूर्ण होण्यासाठीं श्रीदत्तात्रेयाची व नवनाथांची प्रार्थना करून संपविला.

साचा:हिंदू धर्मामधील पंथ आणि संप्रदाय

 
बहूतेक या पानावरील मजकूर प्रताधिकारीत आहे, त्यामुळे हे पान हटवण्यात येईल. या पानातील मजकूराच्या प्रताधिकार स्थितीची तपासणी करून त्यानंतर तो ठेवायचा की काढून टाकायचे हे ठरवले जाईल. आपण कोणत्याही पानाच्या चर्चा पानावर त्या त्या मजकूराच्या प्रताधिकार स्थितीबद्दल चर्चा सुरु करु शकता. ती करित असताना आपण इतर सक्रिय सदस्यांना त्यात सामील करून घ्या. स्थानिक किंवा वैश्विक प्रचालक फक्त समुदायाने घेतलेल्या निर्णयाची तांत्रिक अंमलबावणी करतील. हा विकिस्त्रोत प्रकल्प आहे त्यामुळे या प्रकल्पावर फक्त आणि फक्त स्त्रोत असलेलाच मजकूर जो पूर्व प्रकाशित पुस्तकांमधून घेतलेला आहे, आणि पुरावा म्हणून त्या पूर्व प्रकाशित पुस्तकाची प्रत कॉमन्सवर अपलोड करण्यात आलेली आहे. या व्यतिरीक्त इतर सर्व मजकूर पुराव्या अभावी आणि प्रताधिकाराचा भंग होत असल्याच्या कारणाने काढून टाकण्यात येईल.