नाट्यकलेची उत्पत्ती

नाटयकलेला ज्यांनी आपले नावही अर्पण केले आहे त्या भरतमुनींनी एका अनध्यायाचे वेळी आपल्या शिष्यसंघास नाटयोत्पत्तीचा इतिहास येणेप्रमाणे सांगितला आहे की, एके समयी इंद्रादी देव ब्रह्मदेवाकडे गेले आणि म्हणू लागले, हे भगवन्, आम्हाला असे एक करमणुकीचे साधन द्या की, जे दृश्य व श्राव्य असून ज्याचा लाभ शूद्रादिकासही घेता यावा. त्यावरून ब्रह्मदेवाने ऋग्वेदापासून गद्य, सामवेदापासून गीत, यजुर्वेदापासून अभिनय व अथर्वणापासून रस घेऊन सार्ववर्णिक असा हा पाचवा नाटयवेद निर्माण केला. हा नाटयोत्पत्तीचा पौराणिक इतिहास झाला. यावरच पूर्ण विश्वास ठेवून स्वस्थ बसणे हल्लीच्या शोधक काळाला अनुसरून होणार नाही. जुन्या करारात सांगितलेल्या सृष्टीच्या उत्पत्तीबद्दलच्या पवित्र कथेवर विश्वास न ठेवता डार्विनसाहेब मनुष्याच्या उत्पत्तीचा शोध करू लागले. त्यांचेच अल्प अनुकरण करून नाटयशास्त्रांतर्गत या नाटयकलेच्या इतिहासाविषयी थोडासा अविश्वास दर्शविला तर तो क्षम्य होणार आहे.

नाटक हे काव्याचे एक अंग मानले आहे आणि ते तसे आहेही. गद्य व पद्य यांच्या संयुक्त स्वरूपापासून नाटकाची उत्पत्ती आहे. नाटक हे काव्याचे उत्तरस्वरूप आहे; किंवा काव्य हे नाटकाचे आद्यस्वरूप आहे असेही म्हणता येईल. तेव्हा नाटयकलेच्या इतिहासाचा विचार करण्यापूर्वी काव्याची उत्पत्ती कशी झाली असावी याचाच विचार करावयास हवा.

मनुष्याला दोन मार्गांनी आपले विचार प्रकट करिता येतात. एक गद्यात किंवा एक पद्यात. या दोन रीतींपैकी गद्य हे पद्याच्या आधी जन्म पावले असावे असे कोणाही मनुष्यास साहजिकपणेच वाटते व ते नि:संशय खरेही आहे. प्रथम मनुष्य आपले विचार व विकार गद्यातच प्रकट करू लागला असला पाहिजे. स्वाभाविकपणे बाहेर येणार्‍या व स्वैर म्हणावयाच्या गद्याऐवजी बर्‍याचशा अस्वाभाविक रचनेच्या व काही विवक्षित आणि नियमबध्द रीतीने म्हणावयाच्या पद्याच्या रूपाने मनुष्य आपले विचार प्रथम प्रकट करू लागला असेल हे अगदी असंभवनीय आहे. मनुष्यप्राणी आणि व्यावहारिक भाषेतील गद्यभाग या दोहोंची उत्पत्ती अगदी एकाच वेळी झाली असली पाहिजे. पुढे भोवताली पसरलेल्या सृष्टीतील विविध पदार्थांविषयीचे ज्ञान जसजसे वाढत गेले तसतशी भाषेचीही उत्तरोत्तर वाढ होत गेली. माहीत झालेले पदार्थ व त्यांचे उपयोग परस्परास कळविण्यासाठी मनुष्यांना आपली विचार प्रकट करण्याची शक्ती- अर्थात भाषा- वाढवावी लागली. किंबहुना मानवी प्रयत्नाने मुद्दाम केलेल्या साहाय्यावाचून आपोआपच भाषेची वाढ होत गेली. या सुमारास मनुष्याला जीवनसाधनाविषयी पुष्कळसे ज्ञान होऊन त्याचा आयुष्यक्रम बराचसा व्यवस्थित झाला होता. सृष्टीच्या नवीनतेबद्दल त्याला आश्चर्य वाटेनासे होऊन तो तिच्या घटकांच्या उपयुक्ततेबद्दल विचार करू लागला होता. सृष्टीतील नियमाने घडणार्‍या गोष्टीचे चांगले ज्ञान झाले होते व त्याविषयी त्याने निश्चयात्मक मते बनविली होती. उपभोग्य पदार्थांच्या बहुविधतेमुळे त्याचे सुख बरेच वाढले होते. जीवनसाधने बरीच सुलभ होऊन त्याला पुष्कळ वेळ रिकामा सापडू लागला होता. आणि या वेळाचा उपयोग सृष्टीतील अनियमित रितीने घडणार्‍या गोष्टींविषयी म्हणजे सृष्टचमत्काराविषयी विचार करण्यात तो करू लागला. मनुष्याच्या या स्थितीचा काळ हाच काव्याचा जन्मकाळ होय. समीपस्थ प्रत्यक्ष आणि ज्ञात अशा गोष्टींविषयी शोध करून तृप्त झालेली मनुष्याची जिज्ञासा या वेळी दूरस्थ, अप्रत्यक्ष आणि अज्ञात गोष्टींकडे वळू लागली होती. ग्रहनक्षत्रांचे नियमित काळी होणारे उदय, नियमितकालीन पर्जन्यवृष्टी, बीजापासून वृक्षोत्पत्ती, समुद्राची भरती-ओहोटी, भव्य खगोल, काही तरी प्रमाणात वाहणारे वारे वगैरे प्रकाराबद्दल त्याला आता आश्चर्य वाटेनासे झाले होते व जिज्ञासाप्रेरित होऊन तो त्यांची कारणे शोधावयाच्या प्रयत्नास लागला होता. सृष्टिरूप कार्यापेक्षा त्याच्या कर्त्याकडे त्याचे लक्ष वेधले होते. या सर्व उपयुक्त वस्तूचा कोणी तरी एक अदृश्य कर्ता असून तो आपले संरक्षण व पालनपोषण करितो असे त्याला वाटू लागले होते. त्या कर्ताचे आपणावर होत असलेले उपकार त्याला मान्य होत चालले असून, त्याच्या अफाट शक्तीविषयी व इतर अलौकिक गुणाविषयी विचार, कल्पना व उत्प्रेक्षा तो करू लागला होता. हे त्याचे विचार त्याच्या रोजच्या विचारांपेक्षा भिन्न प्रकारचे होते; व निराळया विकाराने युक्त होते. व्यावहारिक विचारांतील साधेपणा त्यात नव्हता. सृष्टीकर्त्याच्या शक्तीविषयी विचार करताना मनुष्याच्या मनात आश्चर्य, गांभीर्य, सभय कृतज्ञता, आदरभाव वगैरे विकार प्रादुर्भूत होऊ लागले. इंद्रधनुष्याचे मनोहर रंग, ताऱ्यांची सुंदरता याबद्दल त्याला कौतुक वाटू लागले. मेघगर्जना, विद्युत्प्रकाश, पर्जन्यवृष्टी, सागरचमत्कार यांना पाहूनही त्याच्या मनात भीती व आश्चर्यही उत्पन्न होऊ लागले. हे सृष्टचमत्कार सृष्टीकर्त्याच्या स्वरूपाचे घटक आहेत, त्याचीच भिन्न भिन्न स्वरूपे आहेत किंवा निरनिराळया शक्तींच्या स्वतंत्र विभूती आहेत असे त्यास वाटू लागले. त्यांनी केलेल्या उपकृतीबद्दल (उपयुक्ततारूप) तो वारंवार कृतज्ञतापर विचार करू लागला, वारंवार कृतज्ञतापूर्वक त्यांची सप्रेम व सादर वर्णने करू लागला. या काळचे त्याचे विचार त्याच्या व्यावसायिक विचाराहून अगदी भिन्न होते, इतकेच नव्हे, तर त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ प्रतीचेही होते. हे विचार मनात येत त्या वेळी त्याची स्थिती जरा निराळयाच तऱ्हेची होई. या विचारांत पावित्र्य व पूज्यभाव वसू लागले, व त्या भरात तल्लीन होऊन तो हळूहळू हे विचार प्रकट करू लागला. नेहमीच्या विचारांपेक्षा हे विचार निराळेच असल्यामुळे त्यांचा उच्चारही तो निराळयाच रीतीने- अर्थात गद्यतर रीतीने- करू लागला. त्यात तो निरनिराळे सूर काढू लागला किंवा त्याच्या तल्लीनतेमुळेच नकळत (unconsciously) तो हे विचार निरनिराळया सुरांत आळवून म्हणू लागला. याप्रमाणे या श्रेष्ठतर प्रकारच्या व अव्यावहारिक विचारांचे काही विवक्षित रीतीने म्हणावयाचे असे जे शाब्दिक मूर्त स्वरूप तेच काव्य होय. हल्लीच्या कवितेचे हे अगदी मूलस्वरूप (crude form) होय.


यानंतर आता बरीच मोठी उडी मारावयाची आहे. काव्याला साधारण स्फुट स्वरूप यावयाला व ते नियमबध्द व्हावयाला पुष्कळ काळ जावा लागला. या अवकाशात काव्याची वाढ फार झपाटयाने होत गेली. लेखनकलेचा उद्गम अजून झाला नव्हता. काव्याला पुष्कळ व्यवस्थित स्वरूप प्राप्त झाल्यावर बर्‍याच काळाने लेखनकलेची उत्पत्ती झाली असावी असे दिसते. असे म्हणतात की, होमरचे 'इलियड' नावाचे काव्य बर्‍याच पिढया पाठशक्तीच्या जोरावरच जिवंत राहिले होते. परंतु लेखनकलेचे अज्ञान हेही काव्यवृध्दीचे एक कारण झाले असले पाहिजे. कारण, त्या योगाने नेहमीच्या विचारांपेक्षा काही विशेष महत्त्वाचे विचार काव्यात अवतीर्ण होऊ लागले. कारण, अशाने ते विसरून जाण्याचा संभव नव्हता. असकृदावर्तनाने मनास आल्हाद देण्याजोगे किंवा पुढल्या पिढीच्या उपयोगी पडण्याजोगे असे जे विचार ते काव्यात गुंफून ठेवण्याचा प्रघात पडला. आदल्या पिढीचा काव्यरूपांत गोविलेला अनुभव दुसर्‍या पिढीला शास्त्र म्हणून उपयोगी पडू लागला. काव्याची योग्यता मोठी आहे असे लोकांच्या निदर्शनास येत चालले. पुढे काव्याचे विषयही वाढू लागले. बाल्यावस्थेत असणार्‍या समाजाची बंधने, भूतकाळातल्या ध्यानात ठेवण्याजोग्या गोष्टी, देवरूप मानल्या गेलेल्या सृष्टचमत्कारांचा परस्परसंबंध व त्यांच्या कल्पनाजन्य मानुष कृती, लोकोत्तर पुरुषांच्या मनोरंजक व बोधपर कृती, समाजहितपर पराक्रम आणि सरतेशेवटी स्वत:चे मनोविकारही कवी काव्यात आणू लागले. उत्सव, युध्दारंभ यांसारख्या विशिष्ट प्रसंगी ही काव्ये म्हणून दाखविण्यात येऊ लागली. युध्दप्रसंगी गतकालीन पुरुषांच्या पराक्रमश्रवणाने स्फूर्ती उत्पन्न होई. देवादिकाचे पराक्रम व इतर गोष्टी ऐकून मनुष्याला त्यांचे अनुकरण करावेसे वाटू लागे. यानंतर प्रतिभाशाली मनुष्यांना सृष्टीत जी काही उणीव वाटे ती ती आपल्या काव्यसृष्टीत ते कल्पनेने भरून काढू लागले. जे जे काही असावे असे मनुष्याला वाटे ते बराच वेळ त्याच्या खळबळणार्‍या अंत:करणात राहून पुढे काव्यरूपाने बाहेर येऊ लागले, व याप्रमाणे एक नवीन कल्पनासृष्टी उत्पन्न झाली. या काव्यश्रवणाने पुष्कळ काळपर्यंत मनुष्याला आनंद होत होता. भूतकाळातल्या गोष्टी वर्णनरूपाने त्याच्या डोळयांपुढे मूर्तिमान् येऊन उभ्या राहात असत. वीरांचे पराक्रम पुन्हा आपणासमोर घडताहेत असे वाटून मनास मोठा आनंद होई. परंतु पुढे या आनंदाची मर्यादा वाढविण्याची इच्छा साहजिकपणे त्याच्या मनात खेळू लागली. भिन्नभिन्न देवांची व वीर पुरुषांची भाषणे एकानेच म्हणण्याऐवजी निरनिराळया व्यक्तींनी निरनिराळया लोकांची भाषणे म्हणणे विशेष चांगले वाटून तो प्रकार समाजात आणण्याची सुरुवात झाली, व हेच नाटकाचे आद्यकाव्यरूप होय. भिन्नभिन्न व्यक्तींची भाषणे तत्तद्रसानुरूप अभिनयाच्या साहाय्याने म्हटली जात त्या वेळी एकमार्गी काव्यश्रवणापेक्षा त्या प्रसंगाची प्रत्यक्षता या रीतीने अधिक भासू लागे. श्रोतृमंडळावर आपल्या भाषणाची छाप बसावी म्हणून या काव्यांतर्गत संवादाचे पाठक त्या संवादातील व्यक्तींच्या मनोवृत्तींशी आपल्या स्वत:च्या मनोवृत्तींची एकतानता करण्याचा प्रयत्न करू लागले. काव्यस्थ पुरुषांचे हे प्रतिनिधी (Representatives) गत पुरुषांना पुन: पुन्हा समोर आणून उभे करीत. नुसत्या काव्यश्रवणापेक्षा अशा प्रकारचे हे प्रतिविधानात्मक (Representative) काव्यश्रवण लोकांना नि:संशय अधिक प्रिय वाटले असले पाहिजे. पुढे जसजसा हा प्रकार अधिकाधिक रूढ होत चालला, तसतशी यात सुधारणा होत गेली असावी. काव्यातील वर्णनपर वगैरे पाठयेतर भाग संवादातील पुरुषांच्या प्रतिनिधींनी न म्हणता दुसर्‍या कोणीतरी म्हणण्याचा प्रघात पुढे पुढे सुरू झाला असावा. या प्रकारचे अत्यंत परिपक्व व सुधारलेले स्वरूप अद्यापही विद्येत मागासलेल्या मारवाडी लोकांच्या रामलीला वगैरे उत्सवप्रसंगी दिसून येते. या रामलीलेत श्रोतृजनांच्या- अथवा प्रेक्षक जनांच्या म्हटले तरी चालेल- मध्यभागी रामायण वाचणारा पुराणिक (!) बसतो व त्याच्याजवळ रामकथेतील व्यक्तींची सोंगे घेतलेले लोक असतात. काव्याचा पाठयेतर भाग तो पुराणिक म्हणून दाखवितो व संवादात्मक भाग ते सोंगे घेणारे लोक योग्य अभिनयासह प्रसंगी कृतीसह म्हणून दाखवितात. असो. यानंतर थोडया काळाने संवादाच्या प्रवाहाला वारंवार अडथळा करून रसभंगोत्पादक होणारा असा हा पाठयेतर भाग अशा प्रसंगी वजा करण्यात येऊ लागला असावा, व जेथे जेथे सवड सापडेल तेथे तेथे प्रसंग पाहून कुशल पाठक स्वत:च्या कल्पनेने अधिक रसोत्पत्तीसाठी गद्यभागाचाही पुरवठा करू लागले असावे. नुसत्या काव्यात्मक संवादांपेक्षा गद्यपद्यमिश्रित संवाद लोकांस विशेष आवडणे अगदी स्वाभाविक आहे. येथे हल्लीच्या नाटयकलेच्या जीवनाची पहिली अवस्था संपून दुसरीस सुरुवात होते. लेखनकलेचा यावेळी बराच प्रसार झाला असावा. यापुढेही गतकालीन लोकांची सोंगे घेण्याचा प्रकार सुरू झाला असावा. श्रोतृमंडळातच सर्व सोंगाडयांनी बसून आपापली भाषणे म्हणण्याऐवजी श्रोतृमंडळासमोर एखादी विवक्षित जागा करून तेथे हे संवाद म्हणण्याची कल्पना पुढे लवकरच निघाली असली पाहिजे. प्रत्येक संवादाच्या वेळी आवश्यक तेवढया सोंगाडयांनी पुढे येऊन त्या जागेवर आपली भाषणे म्हणावीत व बाकीच्या सोंगाडयांनी श्रोतृसमूहास न पाहता यावे म्हणून त्याच जागेच्या एखाद्या आच्छादिलेल्या भागात बसून राहण्याचा पुढे प्रघात पडला असावा, अशी कल्पना केल्यास फारशी हरकत नाही. ही विवक्षित जागा म्हणजे आमच्या प्रस्तुतच्या रंगभूमीची मूलपीठिका होय व त्या आच्छादिलेल्या भागातूनच सध्याच्या नेपथ्याची उत्पत्ती आहे. असो. इतकीच सुधारणा करून सुखपरायण मनुष्याची शोधक बुध्दी थांबली नाही. त्याच्या सुखलालसेला हा रमणीय संवादही अपुरा वाटू लागला. कल्पक व प्रतिभाशाली मनुष्ये याच्याही पुढे जाण्याचा प्रयत्न करू लागली. काव्यातील निरनिराळया प्रसंगांचे असे त्रोटक व परस्परांशी फारसा संबंध न ठेवणार्‍या संवादांपेक्षा देवादिकांच्या चरित्रातल्या काही विवक्षित प्रसंगांचे संवादरूपाने दिग्दर्शन करण्याची विशेष श्रेयस्कर रीती लौकरच शोधून काढण्यात आली. कोणता तरी एखादा प्रसंग घेऊन त्रयस्थ मुख्य रसाला पोषक व परस्पर सुसंगत वाक्यांनी परिपूरित अशा संवादरूपाने अभिनयासह व प्रसंगी कृतीसह प्रयोग करून दाखविण्यात येऊ लागले. कवी या प्रसंगांच्या वर्णनात पुढे पुढे अधिक रसपोषासाठी कल्पनेची भर घालू लागले. हीच नाटक ग्रंथांची मूल पायरी होय. याप्रमाणे चित्रकला व कविता या दोन ललितकथांच्या संमिश्रणाने ही तिसरी ललितकला उत्पन्न झाली. सूत्रधार या शब्दावर टीका करताना कै. शंकर पांडुरंग पंडित आपल्या विक्रमोर्वशीयच्या आवृत्तीत म्हणतात की, सजीव यमपुरीसारख्या देखाव्यांचे, सुताच्या साह्याने हालचाल करणार्‍या कळसूत्री बाहुल्यांच्या योगाने जे खेळ होतात त्यावरून नाटकप्रयोगाची उत्पत्ती झाली असावी. परंतु हे म्हणणे बरोबर दिसत नाही. कदाचित उलट प्रकार मात्र विशेष संभवनीय असावा असे वाटते. केवळ 'सूत्रधार' शब्दातील 'सूत्रा'च्या साह्याने असे स्वर्गास जाणे ठीक नव्हे. येथून पुढे सोंगाची, रंगभूमीची व नाटकग्रंथांची झपाटयाने सुधारणा होत गेली. यानंतरच रंगभूमीवर पडदे सोडण्यात आले व प्रसंगानुरूप देखावेही दाखवू लागले. नाटकात व्यवस्थित रीतीने अंक व प्रवेश यांचे प्रवेश झाले. परंतु हे सर्व प्रकार नाटयकलेची उत्पत्ती या सदरात येत नसून 'नाटयकलेची वाढ व सुधारणा' या सदरात येतात. अतएव याविषयी विवेचन करण्याचे या निबंधात प्रयोजन नाही.

सरते शेवटी एका गोष्टीचा उलगडा करावयाचा आहे. या निबंधात बरेच ठिकाणी 'काव्य' हा शब्द वापरण्यात आला आहे. हा शब्द प्रस्तुत कोणत्या अर्थाने वापरला आहे हे कळविणे जरूर आहे. 'काव्य' शब्दाचे दोन अर्थ होऊ शकतात. सृष्टीतील प्रत्येक गोष्ट अगदी पहिल्या वेळी मनुष्याचे दृष्टीस पडताक्षणीच तिच्या नवीनतेमुळे स्वाभाविकपणेच त्याच्या मनात ते आश्चर्यमय विचार उत्पन्न झाले त्यासही कोणी कोणी 'काव्य' ही संज्ञा देतात. 'वाक्यं रसात्मकं काव्यं' ही व्याख्याही अतिशय व्यापक अर्थाने घेतली असता या अर्थी 'काव्य' या शब्दाला लागू पडते. या दृष्टीने पाहू गेले असता 'काव्य'चा जन्म भाषेच्या काव्येतर भागाच्या आधी आहे असे म्हणावे लागते. 'काव्य' शब्दाचा हा अर्थ खोटा आहे असे नाही. वास्तविक म्हटले तर हाच अर्थ खरा होय. परंतु या अर्थाने हा शब्द सध्या फारसा रूढ नाही. याचा दुसरा व सामान्यत: प्रचलित अर्थ असा आहे की, मनुष्याच्या उत्कट विचारांना व मनोवृत्तींना शब्दमय मूर्तस्वरूप देणारी प्रसादपरिपूर्ण व सहजागत- क्वचित प्रयत्नसाधित- अशी जी छंदोमयी वाणी तिचे नाव काव्य. साहित्यशास्त्रातून ज्याविषयी विवेचन केलेले असते ते काव्य अशा प्रकारचेच होय आणि या रूढ अर्थानेच हा शब्द या निबंधात वापरला गेला आहे. असो.

याप्रमाणे नाटयकलेच्या उत्पत्तीचे विवेचन करीत असता मनात येणारे विचार येथे नमूद केले आहेत. हे खरेच आहेत असे म्हणण्याचा उद्देश मुळीच नाही. हे निव्वळ तर्क आहेत म्हणूनच पुढे ठेविले आहेत. या निबंधात काही सत्य आहे असे विद्वज्जनांस वाटले तर उत्तमच आहे; परंतु निदान याच्या वाचनाने त्यांच्या मनात सत्यशोधनाची नुसती प्रेरणा जरी उत्पन्न झाली तरीसुध्दा या निबंधाने आपले काम केले असे होणार आहे.


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.