उथळ आणि खोल काम





 उत्तरेकडे; दिल्लीत; खुद्द बिहारमध्ये जयप्रकाशांची चळवळ अधिकाधिक उथळ होत चालली आहे की काय, अशी शंका येते.

 मोरारजी देसाई यांचे उपोषण हा या उथळपणाचा एक नमुना.

 गुजराथमध्ये दुष्काळ आहे. भ्रष्टाचार-भाववाढ हे प्रश्न आहेतच. यासाठी मारजींचे उपोषण असते तर त्याला व्यापक सहानुभूती लाभली असती.
 पण मोरारजींचे उपोषण यासाठी नव्हते. गुजराथमध्ये निवडणुका लवकर घ्या ही त्यांची प्रमुख मागणी आहे.
 खरोखरच ही आजची निकडीची गरज आहे का ? अगदी गुजराथपुरते बोलायचे झाले तरी निवडणुकीसाठी तेथील जनता अगदी आसुसलेली आहे काय ? का निवडक राजकीय शक्तींना वा व्यक्तींनाच जाणवणारी ही निकड आहे ?
 या मागणीचा जनतेच्या आजच्या हालअपेष्टांशी तसा निकटचा संबंध नाही. त्यामुळे लोकांच्या जिव्हाळ्याची ही मागणी ठरत नाही.

 मोरारजींच्या उपोषणाकडे म्हणूनच केवळ राजकीय डावपेचाचा एक भाग म्हणून पाहणे भाग पडते .

 त्यादृष्टीने मोरारजींनी वेळ चांगली निवडली हे मान्य केले पाहिजे.

 मोहन धारियांना मंत्रीमंडळातून काढून टाकण्यात आले. हा धक्का हा स्फोट शांत होतो न होतो, तोच मोरारजींनी उपोषणाला सुरुवात केली. धारियांच्या वेळेपेक्षा यावेळी इंदिराजी थोड्या जास्त पेचात आल्या. कारण प्रश्न मोरारजींच्या प्राणाशी खेळण्याचा होता आणि कितीही बदनाम झालेली व्यक्ती असली तरी मोरारजींना गुजराथच्या व एकूण देशाच्या राजकारणातही काही विशिष्ट स्थान अजूनही आहे. त्यांचे प्राण धोक्यात येणे ही बाईंंना न परवडण्यासारखी गोष्ट होती. म्हणून त्यांनी झटपट तडजोड करून टाकली.

 जयप्रकाशांनी आपल्या चळवळीचा रोख वळवावा असे या उपोषण प्रकरणात काही नव्हते, हा बड्यांचा खेळ होता व बड्यांनाच तो खेळू द्यायला हवा होता.
जयप्रकाशांनी लहान माणसांना जागे केलेले आहे. आता या बड्यांच्या खेळात गरजेपेक्षा जास्त लक्ष घालून, उगाच लुडबूड करून त्यांनी या लहान माणसाला विसरू नये, अर्ध्या वाटेतच त्याचा एकदा धरलेला हात सोडून देऊ नये. केवळ बिहारमध्ये जरी जयप्रकाशांनी या लहान माणसाला उभे केले, संघटित केले, तेथील राजकारणावर-अर्थकारणावर या लहान माणसाचा प्रभाव पडू लागला, तरी ती एक फार मोठी कामगिरी ठरेल. हे ठोस व मुख्य महत्त्वाचे काम सोडून जयप्रकाश उगाच दिल्लीच्या आसपास रेंगाळत राहिलेले आहेत. कुणी तरी त्यांना सांगितले पाहिजे--त्यांनी बिहारमध्येच तळ ठोकून संघटनात्मक कामाकडे अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे म्हणून. आता खोल कामाची अवस्था आहे, अपेक्षा आहे. व्यापक फैलाव पुरेसा होऊन गेलेला आहे.

 खोल काम म्हणजे ग्रामीण व शहरी भागात जनता सरकारांचे तळ उभारणे, या तळांचे एकमेकांशी नाते जोडणे, लोकांना कारभाराचे, अनुशासनाचे प्रत्यक्ष शिक्षण देणे, आपले भवितव्य आपण घडवीत आहोत असा अनुभव त्यांना प्राप्त करून देणे.

 जयप्रकाशांचे एक ज्येष्ठ सहकारी, बिहार आंदोलनाचे एक प्रथमपासूनचे समर्थक व प्रमुख संघटक प्रा. ठाकुरदास बंग यांचे नुकतेच एक पत्र ‘ माणूस' संपादकांना आलेले आहे. त्यात त्यांनी लिहिलेले आहे---

 “ बिहार आंदोलनाच्या समर्थनासाठी मी या भागात (कोल्हापूर) ३ दिवसांपासून भ्रमंतीवर आहे. काल सांगलीत 'माणूस' चा २३ मार्चचा अंक पाहिला. 'साम्यवादी पर्याय नको असेल तर' हा आपला लेख वाचला. मनस्वी आवडला. झकास वठला आहे. तुमचे प्रारंभीचे चळवळीचे विश्लेषण अनुपम आहे ......

 "आता तपशीलातील दोन तीन मुद्यांबाबत लिहितो. आर्थिक प्रोग्राम अलीकडच्या काळात मांडला गेला आहे. बेघरांना गावात घरासाठी जमीन देणाऱ्या कायद्याची जनता सरकारने अंमलबजावणी करणे, सीलिंग कायद्याची गावच्या पातळीवर de facto चौकशी, ग्रामसभा भरवून, ठराव करून, अंमलबजावणी करून भूमिहीनांना जमीन वाटणे या कार्यक्रमांना जनता सरकार अग्रक्रम देईल असे ठरले आहे. निकटच्या भविष्यात याची अंमलबजावणी अनेक खेडयांतून झालेली आपणास दिसेल.

 " RSS ने आपले कार्यक्रम नवीन संदर्भात तपासावेत. RSS व सर्वोदयवाद्यांनी जवळ यावे. नित्य संघर्ष व शुद्धिकरणाची प्रक्रिया निरंतर सुरू ठेवावी--आदि मांडणी योग्य आहे."
 माणूस संपादकांनी प्रा. बंग यांना पत्रोत्तरी लिहिले--

 "जनता सरकार हेच जयप्रकाशांच्या चळवळीचे आता खरे मर्मस्थान आहे. क्रांतीपूर्वकालात रशिया-चीनमध्ये सोव्हिएट्सने जी कामगिरी बजावली ती कामगिरी आपल्याकडे ही जनता सरकारे बजावू शकतील. म्हणून त्यांच्या स्थापनेकडे व कारभाराकडे अधिक लक्ष पुरवायला हवे आहे ......"

 जिथे, ज्या भागात, ज्या राज्यात ही स्थापनेचीही वेळ अद्याप आलेली नाही, तिथेही यादष्टीने वाटचाल व्हायला हवी आहे. पर्यायी सत्तांचे असे स्वायत्त तळ उभारले गेल्याशिवाय चालू कोंडी फुटणार नाही. नवी वाटही दिसणार नाही. संपूर्ण क्रांती अभिप्रेत असणाऱ्यांना या पद्धतीने आपल्या पक्षांची, संघटनांची पुनर्बांंधणी करावी लागणार आहे. या ठोस कामाऐवजी मोरारजींच्या उपोषणासारख्या वरवरच्या उपायांच्या मलमपटया करण्यात विरोधी पक्ष, संघटना, जयप्रकाशांसारखे संपूर्ण क्रांतीचे उद्गाते कितीकाळ खर्च करणार आहेत ? इंदिराजींच्या सत्तेला एक बारिकसा शह म्हणून फार तर संपूर्ण क्रांतीवादी शक्तींनी मोरारजींच्या उपोषणाला पाठिंबा देणे, काही लाक्षणिक कृती करणे समजू शकते. पण यापेक्षा अधिक महत्त्व अशा कार्यक्रमांना दिले जाऊ नये. उत्तम प्रशासक असले तरी मोरारजी स्वतःही एक हुकुमशाही प्रवृत्तीचे राज्यकर्तेच आहेत. जुन्या मुंबई राज्यात त्यांनी विरोधी शक्तींचे केलेले शिरकाण विसरले जाऊ नये. या मोरारजींनी बाईच्या हुकुमशाहीविरुद्ध आवाज उठवावा, हा एक विनोदच आहे. संपूर्ण क्रांतीवाद्यांच्या दृष्टीने इंदिराजी आणि मोरारजी, यात तसा काही फारसा फरक नाही. एक सत्तेवर, दुसरा सत्तेबाहेर. सत्तामुक्त कुणीच नाही. मग संपूर्ण क्रांतीवाद्यांनी अशा डावपेचात, क्षुद्र लढाईत स्वत:ला फार अडकवून घेण्यात काय अर्थ आहे ? पुढील पाच सात वर्षे तरी दिल्ली वर्ज समजून काम केले, तर जयप्रकाश चळवळीला भवितव्य आहे. नाही तर मिळाले आहे तेही यश निसटून जाईल, पुन्हा पाटी कोरी दिसेल. 'चलो दिल्ली' हा अगदी शेवटच्या घटकेला दिला जायला हवा असा मंत्र आहे. आज दिल्लीतून बाहेर पडायची वेळ आहे. कारण दिल्लीचा सूर्य अजून मध्यान्ही आहे. अजून काहीकाळ तो तेथेच राहणारही आहे. तोवर वनवासात, विजनवासात, गिरिकंदरात नवी, छोटी लोकराज्ये स्थापन करणे. चालवणे, हाच एकमात्र क्रांतिकारक कार्यक्रम ठरू शकतो. जयप्रकाशांनी या कार्यक्रमाकडे अधिक लक्ष पुरवायला हवे. मोरारजीछाप कार्यक्रम हे फालतू वेळ दवडणे आहे.

एप्रिल १९७५