एक प्रयोग






 श्रीक्षेत्र माचणूर. पंढरपुरापासून वीस-बावीस मैल अंतरावर असलेले ठिकाण. तालुका मंगळवेढा. चोखामेळा आणि दामाजीपंत यांच्या काळापासून दुष्काळासाठी प्रसिद्ध असलेला भाग. सातशे वर्षे उलटली. भक्तीचे मळे जेथे सातत्याने फुलले, तेथे अजूनही दुष्काळाची सतत भीती बाळगत जगावे लागते. चंद्रभागा संथ वाहत असते. कोट्यावधी लोकांची पापे तिने आजवर धुतली असतील. पण आसपासचा मुलुख हिरवा करून सोडावा, येथील लोकांचे अन्न दुर्भिक्ष कायमचे मिटवावे असे तिला कधी वाटले नाही. यंदाचे वर्षही याला अपवाद नाही. एक पाऊस न पडता तर होतीच नेहमीची ओरड. माचणूरचा उत्सव होतो की नाही, याची शेवटपर्यंत चिंता. अनेकांनी देवाला साकडे घातले. देव शेवटी धावून आला. पुरेसा पाऊस पडला. माणसे पुन्हा चिंता न करायला, आकाशाकडे डोळे लावून बसायला मोकळी झाली.

 वर्षानुवर्षे हे असे चालूच आहे. त्यांना जमिनीकडे पाहायला कुणी सांगितलेच नाही. दहा-बारा वर्षांपासून मात्र, या वृत्तीत थोडा बदल घडवून आणावा या उद्देशाने माचणूर या ठिकाणी एक केंद्र सुरू करण्यात आले. शुद्ध विठ्ठलभक्ती बरोबरच लोकांचे ऐहिक कल्याण साधावे या दृष्टिकोनातून या केंद्राची उभारणी होऊ लागली. प्रथम प्रथम सांप्रदायिकांचा विरोधही झाला. यंदा उत्सवाच्या चालकांना गुरांचे व सुधारलेल्या शेतीतंत्राचे एक प्रदर्शन भरवायचे होते. शुद्ध सांप्रदायिकांना हे मान्य नव्हते. शासनानेही दुष्काळाची शक्यता होती म्हणून प्रदर्शनाला परवानगी नाकारली. त्यामुळे प्रदर्शन झाले नाही, पण पुढच्या वर्षी प्रदर्शन भरवण्याचा चालकांचा विचार आहे. सांप्रदायिक, नाखुषीने का होईना, या उपक्रमांना मान्यता देत आहेत. यंदा परंपरेला सोडून असलेल्या काही विषयांवर प्रवचने मात्र झाली, परिसंवाद-व्याख्यानांचे कार्यक्रम चालकांनी आवर्जून घडवून आणले. खेड्यापाड्यात विज्ञानाचा प्रसार कसा होईल या विषयावर पुण्याच्या नॅशनल केमिकल लेबॉरेटरीचे संचालक डॉ. टिळक यांच्या अध्यक्षतेखाली एक परिसंवाद झाला.

प्रा. गं. बा. सरदार यांनी मार्क्सवादी दृष्टिकोनातून संतवाड्.मयाची फलश्रुती उपस्थितांसमोर मांडली. 'ग्रामीण आणि शहरी संस्कृती' या विषयावरील परिसंवादात सोलापूरच्या 'संचार' या वृत्तपत्राचे संपादक श्री. रंगा वैद्य यांनी शेतकऱ्यांना शेतीमालाचे भाव बांधून दिल्याशिवाय ग्रामीण भागांचे उत्थान होणार नाही, असे आग्रहाने प्रतिपादन केले; श्री. बिंदुमाधव जोशी यांनी मधले दलाल वगळून ग्रामीण उत्पादकाशी थेट संपर्क साधण्यासाठी पुण्याची ग्राहक पंचायत कशी प्रयत्नशील आहे, याचा वस्तुपाठ श्रोत्यांसमोर ठेवला. पारमार्थिक भजनपूजने होतीच. पण त्यासोबत प्रपंचविज्ञानाचाही उपक्रम आवर्जून योजला गेला होता. यामुळे ओढाताण जाणवत होती हे खरे. सुमन ताडे यांच्या 'ठेविले अनंते' या अभंगावरच्या रसाळ परमार्थप्रवचनात श्रोते तल्लीन होतात न होतात तोच, पुढच्या ज्ञानसत्राची घंटा वाजे आणि लय विस्कटून जाई. प्रपंच आणि परमार्थ ही दोन्ही टोके एकदम पकडण्यासाठी चालकांनी चालवलेली ही धडपड स्पृहणीय; पण मधून वाटे असे, हे शक्य आहे का ? दुष्काळ पडल्यावर ही इष्टापत्ती मानून तुकारामाने संसार मोडला आणि भंडारा डोंगरावर तो निघून गेला. प्रपंचविज्ञान सांगते-त्याने असे करायला नको होते, लोकात जागृती निर्माण करायला हवी होती. दुष्काळाची कारणे हुडकून ती दूर करण्याचा प्रयत्न त्याने का करू नये ? शुद्ध भौतिकता किंवा शुद्ध अध्यात्म एकमार्गी असल्याने आचरण्यास सरळ आणि सुलभ, पण या दोहोंचा समन्वय फार कठीण. मग कोणी सांगितली आहे ही उरस्फोड ? तो केल्याशिवाय मात्र गत्यंतर नसते. माणसाचे शरीर ‘धर्मक्षेत्र' आहे, 'कुरूक्षेत्र 'ही आहे, तोवर ही उरस्फोड अटळ आहे. सृष्टीच्या उत्क्रांतीतील मानवाचे विशिष्ट स्थान त्याला या दोन्ही क्षेत्रात वावरण्यास भाग पाडत आहे. माणसाला नियतीने टाकलेला हा सनातन पेच आहे आणि सगळे श्रेष्ठ ज्ञानविज्ञान हा पेच कसा सोडवावा, याविषयीच्या चिंतनातून निर्माण झालेले आहे. प्रवृत्तीचा अतिरेक माणसाला पशु बनवतो आणि निवृत्तीवादानेही जडता येते. सत्वाधिष्ठित रजोगुणाचा आदर्श नेहमी समाजासमोर असावा असे टिळक म्हणत असत. माचणूरच्या उत्सवाची, विशेषत: यंदाच्या डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात साजऱ्या झालेल्या साधनसप्ताहाची मांडणी हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून करण्यात आली होती आणि ती बरीच परिणामकारकही ठरत होती. ज्यांना प्रवृत्ती किंवा निवृत्ती यांपैकी एकाच मार्गाने पुढे-शेवटपर्यंत जायचे असते, अशांना ही मांडणी अर्थातच अपूर्ण व वरवरची वाटण्याचा संभव आहे. पण उत्सव, मेळावे अशा थोड्यांसाठी नसतातच. ते समुदायांसाठी असतात. या दष्टीने माचणूरचा यंदाचा उत्सव खूपच यशस्वी व मार्गदर्शक ठरला असे म्हणायला हरकत नाही. आपल्या धार्मिक संचिताचा असा नवा उपयोग जितक्या मोठ्या प्रमाणावर होईल तितका हवा आहे. सरळ दोन भाग कल्पिले जावेत. जसे ते कलेच्या किंवा विज्ञानाच्या क्षेत्रात कल्पिले जातात. शुद्ध कला, शुद्ध विज्ञान आणि शुद्ध अध्यात्म यांची एक पातळी; दुसरी पातळी उपयोजनाची. उपयोजित ( applied ) कला असू शकते, विज्ञान असू शकते, मग अध्यात्म का नसावे ? एकनाथ-रामदासांपासून अशी उपयोजनाची परंपरा आपल्याकडे आहे. नाथांनी भागवतापाठोपाठ रामायणावर एरव्ही ग्रंथ कशाला लिहिला असता ? भारुडे कशाला रचली असती ? दासबोध हा तर उपयोजनावरील ग्रंथराज आहे. रामदासांचा महाराष्ट्र धर्म हा वारकरी संतांच्या भागवत धर्माचेच स्थलकालसापेक्ष असे उपयोजन ( application ) आहे. ही परंपरा अगदी आधुनिक काळातही दिसून येते. रामकृष्ण परमहंसांच्या शुद्ध अध्यात्माचे विवेकानंदांनी उपयोजन केले. गांधीजी याच परंपरेचे प्रतीक होते. भारताच्या स्वातंत्र्यलढयाला ही परंपरा अशी उपयोगी ठरली, तर नवभारताच्या उभारणीसाठी ती टाकावूच ठरेल असे समजण्याचे कारण नाही. शुद्ध विज्ञानात मौलिक संशोधन करणारे न्यूटन किंवा आइन्स्टाईन शतकातून एखाददुसरेच होत असतात. पण विज्ञानाच्या उपयोजनासाठी शेकडो प्रयोगशाळा अस्तित्वात असतात. यातून वैज्ञानिक संस्कृतीचे पाऊल पुढे पुढे पडत जाते. अध्यात्मक्षेत्रही याच क्रमाने विकसित होते. मानवजातीच्या आध्यात्मिक ज्ञानात-अनुभवात नवीन भर टाकणारा ख्रिस्त, बुद्ध, ज्ञानेश्वर किंवा परमहंस शतकाशतकांतून एखादाच उदयास येतो. पण या ज्ञानाचे-अनुभवाचे उपयोजन झाले नाही तर आध्यात्मिक 'मूल्ये' निर्माण होत नाहीत. फक्त विचार अस्तित्वात राहतात. वैज्ञानिक संस्कृती म्हणजे जसा बुद्धिवादाचा स्वीकार, तसे 'आध्यात्मिक मूल्य' म्हणजे मानवामानवामधील आणि मानव आणि निसर्ग यांमधील प्रेमभाव-एकात्मतेची जाणीव. या जाणिवेशिवाय मानवी जीवन कोरडे, भकास, आणि उध्वस्त होत आहे हे आज वैज्ञानिकदेखील सांगू लागले आहेत. मग शुद्ध प्रेमाचा शुद्ध भागवतधर्म आणि त्याचे स्थलकालसापेक्ष असे माचणूरसारखे उपयोजन या दोन्हींचे स्वागतच व्हायला हवे-असे अनेक उपयोजनप्रयोग ठिकठिकाणी उभे राहायला हवेत.


 माचणूर प्रयोगक्षेत्र उभारताना कोणती दृष्टी बाळगण्यात आली होती ? मूळ प्रेरणा बाबामहाराज आर्वीकर यांची. बाबामहाराज यांची काही भाषणे, प्रवचने उपलब्ध आहेत. त्यावरून या प्रयोगक्षेत्रामागील दृष्टिकोनाची थोडी कल्पना येऊ शकते. 'चुये' या एका गावातील गावकऱ्यांसमोर केलेल्या भाषणात बाबामहाराज म्हणाले होते--  ‘गावाचे कल्याण व्हावे असे वाटत असेल तर गावातले सर्व पक्ष, पंथ, जाती मोडून टाका. गाव हाच एक पक्ष ! पक्षोपक्षांच्या ज्वालेत गाव होरपळून देऊ नका. ऐक्याच्या भावनेतच गावाचा विकास आहे. धर्माची सुरुवात याच वृत्तीपासून होते. विकासाचा निश्चित मार्ग ज्ञात नसला म्हणजे विपरित घटना घडतातच. साऱ्या देशात आज हेच चालले आहे. विकास नेमका कशात आहे व तो कसा साधावा, हे अंध:कारमय परिस्थितीतून चाललेल्या माणसांनी ठरविणे घातक आहे. विकास हा मानवी प्रवृत्तीच्या स्नेहमय अवस्थेचा व्हावयाचा असतो. माझे घर-माझे गाव या भावनेत विकासाचे मूळ आहे. जेव्हा त्यातील 'माझा' शब्द विसरला जातो तेव्हा विकास हा राक्षस बनतो. अशा राक्षसाचा विकास आपल्या गावात होऊ देऊ नका.'

 ‘माणसात देव पहाल व त्याच्या आत्म्याला शांत करणारे काम कराल तेव्हाच खरे भजन होणार आहे. मानवामानवात भांडणे ही पशुता आहे. भजनपूजनादी कार्यक्रमांद्वारे ही पशुता नष्ट करावयाची असते. पण आपला पशुपणा राखून भजनपूजन करणारे लोक धार्मिक नव्हेत हे निश्चित समजा. अशा धर्महीन वृत्तीला गावात थारा देऊ नका. आपले गाव स्वर्गतुल्य करण्यासाठी सारे मिळून अहर्निश झटत राहा. गाव स्वच्छ करण्यापूर्वी तुमचे संतान धैर्यशाली करा. गावात देवळे बांधण्यापूर्वी स्त्रियांचे शील-पावित्र्य रक्षण करा. यामुळे प्रत्येक घरच देऊळ बनेल.'

 ‘प्रथम तुम्ही प्रत्येकजण महान् व मंगल होण्यासाठी सावधान असा. द्वेष, सूड, मत्सर व परहानी या दोषांना मूठमाती द्या. मग गावात मंदिरे, विद्यामंदिरे, विद्युद्दीपांचे झोत, नळ या व्यवस्था करा. श्रम, परोपकार, सहिष्णुता, प्रेम व ज्ञान संपादन करण्याची पराकाष्ठा करा. यासाठी कोणताही पक्ष, राजकीय डाव नको. यासाठी हवी आहे निर्मळ माणुसकी.....'

 जुन्या भागवतधर्मवृक्षाला आलेले हे नवे मानवताधर्माचे फळ परिपक्व नाही असे कोण म्हणेल ?

 माणसाने स्वत:ही बदलले पाहिजे–परिस्थितीही बदलवून घेतली पाहिजे, हेच नवा मानवताधर्म सांगतो.

 सुरुवात गावापासून.

 म्हणून तर 'ग्रामायन'चे काही कार्यकर्ते या धार्मिक उत्सवाला-माचणूरच्या मेळाव्याला मुद्दाम पुण्याहून गेलेले होते. हेमलकसा-भमरागडच्या आदिवासी भागात काम करणारा जगदीश गोडबोले म्हणून तर इतक्या लांबवरून येथे येऊन तळ ठोकून बसला होता. वास्तविक तो काही भजनपूजनवाला नाही. पण धर्माचा उपयोग समाजपरिवर्तनासाठी करून घ्यायला हवा असे त्याचे, प्रत्यक्ष काम करता करता झालेले मत. म्हणून तो माचणूरकडे वळला आणि इतरांनीही वळावे असे आता तो सांगू लागला आहे.

डिसेंबर १९७६