निर्माणपर्व/ऑपरेशन लक्ष्मीरोड


ऑपरेशन लक्ष्मीरोड




 'ऑपरेशन लक्ष्मीरोड' चे स्वागत अपेक्षेपेक्षा खूपच अधिक झाले. हे खरे की, या स्वागतात चिकित्सेपेक्षा कौतुकाचाच भाग अधिक होता. बहुतेकांनी कौतुक व्यक्त केले ते एका वैशिष्ट्याबद्दल. सहसा निदर्शने मोर्चे वगैरेत भाग न घेणारा, रस्त्यावर न उतरणारा मध्यमवर्ग या चळवळीत पुढे होता, याबद्दल. वास्तविक हे काही या चळवळीचे प्रमुख वैशिष्ट्य नाही.ज्या ग्राहक संघाच्या वतीने ही चळवळ चालविण्यात आली, तो नुकताच दोन-तीन महिन्यापूर्वी स्थापना झालेला होता. ग्राहकसंघ सभासदांची संख्या मर्यादित होती. मुख्यतः पुण्यातील गरीब मध्यमवर्गातले सर्व सभासद होते. त्यामुळे चळवळीत ओघानेच हा वर्ग अधिक संख्येने सहभागी झाला. थोडा अधिक काळ जाऊ दिला असता तर कामगारवर्ग, झोपडपट्टीतले नागरिक यांचाही समावेश चळवळीत होणे अशक्य नव्हते. कारण चळवळीची मागणी मध्यमवर्गीय नव्हती; चळवळीचे उद्दिष्ट व्यापक होते. सर्वांनाच आवाहन करणारे होते-पटणारे होते. चळवळीमागची भूमिका व्यक्त करणारे पत्रक सुरुवातीला वाटण्यात आले होते. त्यात म्हटले आहे -

 'कापड गिरण्यांना यंदा प्रचंड नका झालेला आहे.
 या नफ्यातील फार थोडा वाटा बोनसरूपाने कामगारांना मिळाला.
 खेड्यापाड्यातील शेतकऱ्यांना, कापूस उत्पादकांना काहीच मिळाले नाही
 आणि कापड खरेदी करणाऱ्या ग्राहकांना ?
 यांना कुणी विचारीतच नाही.'
 वास्तविक भरमसाठ भाव मोजून या विखुरलेल्या, असंघटित ग्राहकवर्गानेच गिरणीमालकांच्या तिजोऱ्यात प्रचंड नफे ओतलेले आहेत.

 गेल्या वर्षभरात सर्व तऱ्हेच्या कापडांचे भाव किती वाढावेत याला काही ताळतंत्रच राहिलेले नाही. पंचवीस-तीस रुपये मोजल्याशिवाय साधा शर्ट-पायजमा होत नाही की, चाळीस-पन्नास रुपयांखाली एकादी बऱ्यापैकी साडी मिळत नाही. धोतरजोडी तर चैनीची वस्तू ठरावी इतकी महागली आहे.

 सर्वसामान्य परिस्थितीतल्या माणसाला कापडबाजाराकडे फिरकण्याची सोय राहिलेली नाही, इतके सर्व तऱ्हेच्या कापडांचे भाव भडकलेले आहेत.

 ग्राहक-उत्पादक लुटले जात आहेत. गिरणीमालक, अधलेमधले दलाल दुकानदार यांची मात्र चंगळ चालू आहे.

 कापड ही एक जीवनाश्यक वस्तू आहे व जाडाभरडा का असेना, अंगभर कपडा प्रत्येकाला रास्त व परवडणाऱ्या भावात मिळाला पाहिजे, अशी मागणी निर्धारपूर्वक करण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे.

 या मागणीसाठी ' ऑपरेशन लक्ष्मीरोड' हा कार्यक्रम योजण्यात आलेला आहे.

 कार्यक्रम अगदी साधा पण परिणामकारक आहे. दिनांक ३१ ऑक्टोबर (७४) सायंकाळ ते ३ नोव्हेंबर सायंकाळ या तीन दिवसात कुणीही कसलेही कापड विकत घेण्यासाठी, लक्ष्मीरोडवर किंवा अन्य ठिकाणच्या कापड दुकानात पाऊलसुद्धा टाकावयाचे नाही. तीन दिवस कापड बाजारावर लोकांनी स्वयंस्फूर्त बहिष्कार टाकावयाचा आहे. प्रमुख दुकानांवर शांततापूर्ण निदर्शनेही ( Picketing ) करावयाची आहेत.

 कोटयवधी जनता ज्या देशात उघड्यानागड्या स्थितीत रहात आहे त्या देशात हा तीन दिवसांचा बहिष्कार म्हणजे फार मोठा त्याग आहे असे नाही. पण चालू उत्पादन व वितरण व्यवस्थेसबंधी आपला निषेध परिणामकारकरीत्या नोंदविण्याचा दुसरा सरळ मार्ग सध्यातरी कुणाच्या दृष्टिपथात नाही. म्हणून हा कार्यक्रम सर्वांनी उचलून धरला पाहिजे.

 तीन दिवस संपूर्ण बिहार बंद ठेवून जयप्रकाशांनी भ्रष्टाचार-महागाई-बेकारी विरुद्ध सर्वत्र चालू असलेल्या आंदोलनातील एक नवा उच्चांक स्थापन केलेला आहे. 'निदान तीन दिवस लक्ष्मीरोड बंद ठेवून पुणेकर स्त्री-पुरुष नागरिकांनी भ्रष्टचार-महागाई- बेकारी विरोधी लढ्यातील आपला अल्पसा वाटा का उचलू नये?'......

 मध्यमवर्गानेच फक्त उचलून धरावी अशी काही ही भूमिका नाही. परिवर्तनासाठी देशभर सुरू असलेल्या आंदोलनाशी या भूमिकेचे काहीएक नाते आहे. एका टोकाला उत्पादकाचा विचार आहे. दुसरे टोक ग्राहकाच्या हातात दिले आहे. आपल्या अर्थव्यवस्थेवरील दलालमध्यस्थ वर्गाची पकड सैल करणे हे व्यापक उद्दिष्ट म्हणून सांगितलेले आहे. कारण भाववाढ–महागाई व आर्थिक अरिष्ट याचे हे आपल्याकडील एक प्रमुख कारण आहे. अनुत्पादक घटकांचे वर्चस्व आपण कमी करीत नाही तर भाववाढ–महागाई आपल्याला रोखता येणार नाही, हे यामागील विचाराचे सूत्र आहे. कापडाचे भाव उतरवणे, पंचवीस-तीस टक्क्यांनी खाली आणणे हे 'ऑपरेशन लक्ष्मीरोड' चे अगदी ढोबळ, तात्कालिक व वरवरचे उद्दिष्ट होते.

मुख्य हेतू होता आपल्या दलाली अर्थव्यवस्थेच्या एखाद्या मोक्याच्या ठिकाणावर लहानसा प्रहार करण्याचा. हा प्रहार करण्यात आज शहरातील मध्यमवर्ग पुढे आला एवढेच. पण उद्या इतरांनाही आपापल्या जागेवरून असे लहानमोठे प्रहार करावे लागणार आहेत. त्याशिवाय परिवर्तनाची आशा बाळगणे व्यर्थ आहे. म्हणूनच मध्यमवर्गीयत्व हे काही या ऑपरेशनचे प्रमुख वैशिष्ट्य ठरू नये. आशय महत्वाचा. कोण माणसे, कुठला वर्ग पुढे येतो हा भाग गौण समजायला हवा.

 स्त्रिया अधिक संख्येने या आंदोलनात उतरल्या हेही वैशिष्ट म्हणून कुणी सांगतात. पण स्त्री-पुरुष हा फरकही याबाबतीत तसा विशेष महत्त्वाचा नाही. अलीकड अनेक क्षेत्रात स्त्रिया आघाडीवर आहेत. अगदी आदिवासी भागातील आंदोलनातही स्त्रिया उत्साहाने भाग घेताना दिसतात.

 ग्राहक चळवळीने जो हा प्रतिकाराचा फणा काढला, बहिष्काराचे जे हे, शस्त्र उपसले ते वास्तविक या 'ऑपरेशन'चे मुख्य वैशिष्ट्य आहे. तशी ग्राहक चळवळ महाराष्ट्रात काय किंवा भारतात इतरत्र काय, नवीन नाही. ग्राहकांसाठी सहकारी भांडारे आजवर बरीच चालवली गेली आहेत. पण हा फक्त वस्तूंच्या वाटपाचा प्रयत्न होता. पुण्यात प्रथमच हे घडले की, ग्राहक चळवळीने ही आपली जुनी मर्यादा ओलांडली आणि आक्रमक धोरण स्वीकारले. मिळतील त्या भावात, मिळतील तितक्या वस्तूंचे समान वितरण करण्यावर समाधान न मानता पुण्यातील ग्राहक संघटित होऊन प्रथमच म्हणू लागले की, जीवनावश्यक वस्तूंचे भाव सर्वसामान्य माणसाला परवडतील असे असले पाहिजेत. चालू भावातली वाढ गैर आहे, नफेखोरीमुळे ती अवास्तव व बेफाट वाढलेली आहे. ही नफेखोरी कमी झाली पाहिजे. यासाठी उत्पादन व वितरण तंत्रात व यंत्रणेत जे दोष असतील ते काढून टाकले पाहिजेत, हे होत नसेल तर आम्ही यासाठी चळवळ करून, बहिष्कारापासून सत्याग्रहापर्यंत प्रतिकाराचे सर्व मार्ग हाताळू. ऑपरेशन लक्ष्मीरोडचे नाविन्य या ग्राहक चढाईत आहे, ग्राहकशक्तीच्या या लढाऊ आविष्कारात आहे. ग्राहक चळवळ येथे प्रथमच वयात आली असेही म्हणता येईल. दहा-वीस टक्क्यांनी कापडांचे भाव उतरले हे या चळवळीचे अगदी मामुली यश आहे. ग्राहकांचा आत्मविश्वास जागा झाला, त्यांना आपल्या सामर्थ्याचा प्रत्यय आला, हे यश अधिक मोलाचे, महत्त्वाचे. निघाल्यापासून अवघ्या दोन अडीच महिन्यात तिने यशाचा हा टप्पा गाठावा, ही विजयी झेप घ्यावी हे नि:संशय चळवळीच्या संघटकांना भूषणावह आहे.

 संघटक मुख्यतः युवक होते. एकीकडे या युवकवर्गाने ग्राहक चळवळीला जसे चढाईचे आक्रमक स्वरूप दिले तसेच दुसरीकडे तिच्या रचनात्मक स्वरूपाचेही भान ठेवले. नूतन मराठी विद्यालयाच्या प्रांगणात या युवकांनी चालवलेली

पर्यायी जनता कापड पेठ हा युवकांचे वय आणि अनुभव लक्षात घेता खरोखरच एक भव्य व धाडसी प्रयोग होता. मागे डॉक्टरांच्या संपाच्या वेळी रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून पुण्यात दोन-चार ठिकाणी रस्त्यावरच रुग्ण सेवेची केंद्रे काही तरुण डॉक्टरमंडळींनी चालवलेली होती. त्याच धर्तीचा पण अधिक मोठ्या प्रमाणावरचा हा नू. म. वि. मधील पर्यायी कापड पेठेचा प्रयोग म्हणता येईल. आठवडाभर ही पेठ भरभरून वाहात होती. लाख दीड लाख ग्राहक तरी या कालावधीत पेठेला भेट देऊन गेले असावेत. आठवडाभरच्या विक्रीचा आकडा दहा-बारा लाखांच्या घरात गेला होता. या आकडेवारीपेक्षाही या प्रयोगामागील योजकता, व्यवहारकौशल्य, जबाबदारीची जाणीव आणि धडाडी यांचे मोल विशेष आहे. सातआठ दिवस अशी पर्यायी कापड पेठ युवक संघटित करू शकतात, पैचीही अफरातफर न होता लाखो रुपयांच्या उलाढाली पार पाडू शकतात, ही एकूण युवक चळवळीलाच भूषण आणणारी घटना आहे. ठाणे जिल्ह्यातील मनोरजवळ, आदिवासींच्या आर्थिक-सामाजिक पुनरुत्थानाचे कार्य करणारे ‘भूमिपुत्र प्रतिष्ठानचे ' आबा करमरकर यांचा युवक चळवळीवरील एक नेहमीचा आक्षेप आहे. युवक संघर्षाला उत्सुक असतात पण रचनात्मक काम म्हटले की बिचकतात. त्यातला तपशील, आकडेवारी, आर्थिक गुंतागुंत, किचकट व्यवहार त्यांना मानवत नाही. या जंजाळापासून लांब राहण्याची युवक संघटनांची व त्यांच्या नेत्यांची प्रवृत्ती असते. पुण्यातील युवकानी वेळप्रसंगी आपण हे व्यावहारिक उलाढालींचे आव्हानही यशस्वीरीत्या पेलू शकतो, हे या पर्यायी कापड पेठेच्या प्रयोगाने निश्चितच सिद्ध करून दाखविले आहे. यापूर्वीही तेल, तूप इत्यादी जीवनावश्यक वस्तूंच्या वाटपाचे लाखो रुपयांचे व्यवहार या युवकांनी उरकले होते; त्यामुळे ही कापड पेठ चालविणे हा त्यांच्या हातचा मळ ठरावा हे साहजिकच आहे. पण योग्य त्या बिंदूवर थांबणे, व्यवहाराच्या फापटपसाऱ्यात गरजेपेक्षा अधिक न अडकणे, यापक उद्दिष्टांवरची नजर ढळू न देणे, याही गोष्टींना चळवळीत फार महत्त्व असते. लाखो रुपये मोलाचे, केवळ विधायक कार्य, आजवर अनेकांनी अनेक ठिकाणी केलेले आहे. अनेक करीतही आहेत. केवळ संघर्षात्मक चळवळीही पेटतात आणि विझतात. या दोन्ही बाजूवर व्यवस्थित पकड जमवणे अवघड असते. पुण्यातील युवकांनी व त्यांच्या मागे उभ्या राहिलेल्या असंख्य स्त्री-पुरुष नागरिकांनी ही पकड ऑपरेशन लक्ष्मीरोडद्वारा उत्तम तऱ्हेने जमवून दाखवली यात शंका नाही. रचनात्मक संघर्षाचा हा एक वस्तुपाठच होता.



 ग्राहकांनी बहिष्काराचे शस्त्र पुनः पुन्हा उपसले, कापड भाव गडगडू लागले तर एक नवेच संकट या ग्राहकचळवळीसमोर उभे राहण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात मुंबईच्या वृत्तपत्रात एक वार्ता झळकली आहे. वार्तेत म्हटले आहे --


 'कमला मिलची तिसरी पाळी बंद झाली. श्रीराम मिलची पाळी ६ डिसेंबरपासून बंद करण्यात येईल अशी नोटीस लावण्यात आली आहे. ब्रॅडबरी मिल बंद पाडण्याच्या मार्गावर आहे व आजच अर्धीअधिक गिरणी बंद झालेली आहे.

 'फिनिक्स, हिंदुस्थान मिल, क्राऊन मिल, इंदू ग्रुप इत्यादी गिरण्यात खातीच्या खाती बंद करून सर्व बदली कामगारांना महागाईच्या काळात रस्त्यावर फेकण्यात आले आहे...'

 या बेकारीविरुद्ध कापड गिरणीकामगारांच्या संघटना जो काही लढा देतील तो हवाच आहे. परंतु ग्राहक चळवळीलाही हे एक आव्हानच आहे. कापडाचे भाव तर उतरले पाहिजेत पण कामगारही बेकार होता कामा नये, अशी या चळवळीची यापुढील मांडणी हवी. नाहीतर ग्राहक चळवळ कामगारविरोधी आहे असा खोडसाळ प्रचार करण्याची एक आयतीच संधी विरोधकांना मिळेल व सुरुवातीपासूनच चळवळ धोक्यात येईल, तिची वाढ खुटेल. 'ऑपरेशन लक्ष्मीरोड ' मध्येही हा एक अंतर्विरोध होता. झगमगाट कमी करा, भाव खाली आणा असे ग्राहकांनी म्हटल्यावर मालकांनी आपल्या दुकानातील नोकरवर्गाकडे वक्र दृष्टीने पाहायला सुरुवात केली. असे अंतर्विरोध प्रत्येक चळवळीत असतात. सुरुवातीला नसले तरी पुढे उत्पन्न होतात. चळवळीची उद्दिष्टे स्पष्ट असली तर हे अंतर्विरोध कमी करण्याचे मार्गही निघत राहतात. म्हणूनच पुण्यात सुरू झालेल्या ग्राहक चळवळीला आपली उद्दिष्टे आणि ती गाठण्याचे मार्ग यासंबंधी काही निश्चित भूमिका यापुढे घ्यावी लागणार आहे. मिळालेले यश कमी नाही, खूप उत्साहवर्धक आहे. पण पुढची वाटचाल अधिक कठीण आहे, गुंतागुंतीची आहे. केवळ उत्साह व संघटनाकौशल्य या वाटचालीत पुरेसे ठरणार नाही. विषम अर्थव्यवस्थेच्या मर्मावर आघात करण्याची क्षमता चळवळीत यावी, हे जर ग्राहक चळवळीचे अखेरचे उद्दिष्ट असेल तर उत्पादकांशी लवकरात लवकर नाते जोडण्याचा प्रयत्न व्हायला हवा; मग तो उत्पादक खेड्यातील कापूस पिकवणारा शेतकरी असो की शहरातील कामगार असो. कामगार, शेतकऱ्याला बरोबर घेऊनच चळवळीची पुढची वाटचाल व्हायला हवी. मालक जर गिरण्या बंद करीत असतील, कामगारांना रस्त्यावर फेकीत असतील तर ग्राहक चळवळीने कामगारांच्या पाठीशी उभे राहून शक्य ती दडपणे आणली पाहिजेत. त्यांच्या नफेखोरीविरुद्ध आवाज उठवला पाहिजे,

व कामगारांना बेकारीच्या खाईत ढकलणारे, गिरण्यामधील नफेखोरीवर आधारलेले उत्पादनतंत्र आणि अंतर्गत यंत्रणा बदलायला लावली पाहिजे. हे होत नसेल तर कामगारांना गिरण्यांचा ताबा घ्यायला प्रवृत्त केले पाहिजे व या कामगारसंचालित गिरण्यांना बाजारपेठ मिळवून देण्याचे आश्वासन ग्राहक चळवळीने दिले पाहिजे. खादीचे पुनरुज्जीवन आजच्या काळात जसेच्या तसे शक्य नाही. आवश्यकही नाही. परंतु त्यामागचा विचार ध्यानात घेऊन संपूर्ण कापड धंद्याचीच पुनर्घटना करण्याची मागणी कालानुरूप ठरेल, त्याप्रीत्यर्थ होणारी चळवळ नवीन व क्रांतिकारकही मानली जाईल. असा सगळा दूरदृष्टीचा विचार करून ग्राहक चळवळीचा पुढचा टप्पा निश्चित केला जावा. ती केवळ भाववाढ–महागाईविरोधी चळवळ न ठेवता, अर्थव्यवस्थेला इष्ट ते वळण देणारी चळवळ म्हणून उभारली जावी. अशी उभारणी वास्तविक कामगारसंघटनांकडून अपेक्षित आहे. पण आज या संघटना आपले क्रांतिकारकत्व हरवून बसल्या आहेत. ग्राहक चळवळीने हे निशाण आता आपल्या खांद्यावर घ्यावे-काळ फार अनुकूल आहे.

नोव्हेंबर १९७४