निर्माणपर्व/हिमालयाच्या अलीकडे आणि पलीकडे
हिमालयाच्या अलीकडे आणि पलीकडे
हिंदुस्थानात डांगे आणि त्यांचे सहकारी ज्या सुमारास कम्युनिस्ट पक्षाची बांधणी करीत होते त्याच सुमारास चीनमध्येही कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झाली. पण गेल्या पन्नास वर्षातील या दोन्ही कम्युनिस्ट पक्षांच्या वाटचालीत केवढी तफावत पडली ! चीनमध्ये कम्युनिस्ट पक्ष केवळ सत्तेवर आला एवढेच नाही; नवचीनची या काळात उभारणीही झाली. चिनी माणसाचे जीवनमान सुधारले, सामाजिक संबंधात बदल घडून आले, जागतिक सत्ता म्हणून चीनला मान्यता लाभली. हिंदुस्थानात मात्र कम्युनिस्ट पक्षाची सतत पिछेहाट होत गेली. स्थापनेपासून महायुद्ध सुरू होईपर्यंतच्या काळात या पक्षाची कमान चढती होती. बेचाळीसनंतर मात्र ही कमान ढासळत गेली. सध्या तर बिहारसंबंधी पक्षाने घेतलेल्या जनता विरोधी भूमिकेमुळे ही कमान जमिनीत पुरती गाडलीच गेलेली आहे; जयप्रकाशांना 'गुंड', सी. आय. ए. चे हस्तक म्हणून या पक्षाने ठरवावे, यापेक्षा भारतीय जनमानसाचे अज्ञान अधिक भयानक असू शकत नाही. डांगे यांचा अमृत महोत्सव साजरा झाला, डांगेकन्या रोझा देशपांडे मुंबईतून लोकसभेवर निवडून गेल्या किंवा केरळात अच्युत मेनन यांचे मंत्रिमंडळ अधिकारारूढ असले, तरी, स्वतंत्र पक्ष म्हणून उजव्या कम्युनिस्टांचे अस्तित्त्व जवळ जवळ संपलेले आहे. डावेही बंगाल–केरळव्यतिरिक्त कुठे उभे नाहीत. हिंदुस्थानपुरते बोलायचे झाल्यास लाल क्रांतीच्या सर्व वाटा आज तरी रोखलेल्या दिसतात. हिमालयापलीकडे, आपल्या शेजारीच असलेल्या, आपल्याप्रमाणेच प्रचंड आकार व प्राचीन परंपरा लाभलेल्या चीनमध्ये पन्नास वर्षांच्या कालावधीत राज्यक्रांती व समाजक्रांती होते, लालसूर्य उगवतो व आपल्याकडे मात्र या सूर्याला ग्रहणच लागते, असे का ? विचारसरणी एकच, मिळालेला कालावधीही दोन्हीकडे जवळपास सारखाच. मग यशःप्राप्तीत जमीनअस्मानचे अंतर का पडावे ? दोन्हीकडच्या परिस्थितींचे वेगळेपण हे कारण मार्क्स-लेनिनवादी पुढे करतील. पण ते पुरेसे नाही, निर्णायक नाही. रशियापेक्षा चीनची परिस्थिती वेगळी होती, तरी चीनमध्येही लाल क्रांतीला यश लाभले. तशीच वेगळी परिस्थिती हिंदुस्थानात असली म्हणून क्रांती न होण्याचे काहीच कारण नव्हते.
कुठल्याही दोन देशांची परिस्थिती तंतोतंत कधीही एकसारखी नसते, तेव्हा चीन आणि भारत यामधील परिस्थिती वेगळी होती, हे चीनमधल्या देदिप्यमान यशाचे व भारतातील दारूण अपयशाचे काही निर्णायक कारण ठरू शकत नाही. नेतृत्त्व या घटकाचा एक वेगळा, स्वतंत्र परिणाम यशापयशाला कारणीभूत ठरत असतो. जबरदस्त इच्छाशक्ती व सत्ताकांक्षा असलेल्या नेत्याचे इतिहासघडणीतील स्थान गृहीत धरावे लागते. चीनमध्ये माओ निर्माण झाला; हिंदुस्थानात माओच्या तोडीचे नेतृत्व कम्युनिस्ट पक्षाला लाभले नाही; त्यामुळे दोन्हीकडच्या यश:सिद्धीत एवढे अंतर पडले. आपल्याकडे जातीभेद आहेत, भाषाभेद-प्रांतभेद आहेत, धार्मिक व सांस्कृतिक विविधता आहे. चीनमध्ये हे भेद, ही विविधता नव्हती असे काहीजण म्हणतील. भारतात गेली दीडशे वर्षे एकछत्री अंमल होता व आहे. चीनमध्ये राजकीय फुटाफूट होती, हेही चीनमधील यशाचे व आपल्याकडील अपयशाचे एक कारण म्हणून पुढे केले जाईल. पण या सर्व कारणांवर टिळक मात करू शकले, गांधी-नेहरूंनी मात केली. आपल्याकडील अफाट दारिद्रय, सामाजिक विषमता यामुळे तर कम्युनिस्टांना अशी मात करणे टिळक-गांधीपेक्षाही वास्तविक अधिक सोयीचे होते. शिवाय विसाव्या शतकातील एका अत्यंत प्रभावी व विजिगिषु तत्वज्ञानाचा वारसा त्यांना लाभला होता. काही अनुकूल असे जागतिक हितसंबंध, आंतरराष्ट्रीय लागेबांधे निर्माण झालेले होते. तरीही कम्युनिस्ट पक्ष येथे नामोहरम व्हावा, राज्यकर्त्यांनी टाकलेल्या चार तुकड्यांवर जगत राहण्याची नामुश्कीची पाळी या पक्षावर— या विचारसरणीच्या संघटनांवर यावी, याला श्रेष्ठ नेतृत्त्वाचा अभाव याशिवाय दुसरे कोणते कारण असू शकते ? मार्क्सवादात हे कारण चपखल बसत नाही हे खरे; पण इतिहासाने या कारणाची सत्यता व महत्त्व आजवर अनेकदा निदर्शनास आणलेले आहे. लेनिन नसता तर रशियन क्रांती यशस्वी होऊ शकत नव्हती. असे श्रेष्ठ नेतृत्व भारतीय कम्युनिस्टांना लाभले नाही, हे खरे हिंदुस्थानातील कम्युनिस्टांच्या ससेहोलपटीचे मुख्य कारण आहे. डांगे किंवा त्यांच्या सहकाऱ्यांचा त्याग, बुद्धिमता, त्यांनी भोगलेल्या हालअपेष्टा, त्यांची एकेकाळची लोकप्रियता व कामगार वर्गावरील पकड याविषयी कुणीही आदरच व्यक्त करील. तेलंगणचा लढा, नक्षलवादी उठाव, इत्यादी चळवळींचे क्रांतिकारकत्वही कुणी अमान्य करणार नाही. प्रश्न आहे, या सर्व ठिणग्यांचे ज्वालेत रूपांतर का होऊ शकले नाही ? हे सगळे निखारे लवकर विझून का गेले ? महान् नेतृत्वाचा अभाव याशिवाय दुसरे कारण या शोकांतिकांमागे दिसत नाही.
खरोखरच येथे लेनिन, माओ, हो चि मिन्ह यांच्या तोडीचा एखादा अव्वल दर्जाचा क्रांतिकारक, भारतीय कम्युनिस्टांना नेता म्हणून लाभला असता तर त्याने नेमकी कोणती धोरणे अंगिकारली असती? डावपेच कसे योजले असते? समाजातील विविध वर्गांची , गटांची, जातीजमातींची एकजूट कशी बांधली असती ?
सध्याच्या परिस्थितीत हा एक निष्फळ स्वप्नरंजनाचा विषय ठरतो हे खरे; पण असे वाटते की, येथील मध्यमवर्गाला आकर्षित करणारी कट्टर राष्ट्रवादी भूमिका व खेड्यापाड्यातील गरीब शेतकऱ्यांना, शेतमजुरांना उद्योग मिळवून देणारा जहाल आर्थिक कार्यक्रम यांची बेमालूम सांगड घालणारा एखादा अभिनव पर्याय अशा क्रांतिकारक नेत्याने जनतेसमोर स्वातंत्र्योत्तर काळात ठेवला असता आणि जनतेनेही या पर्यायाचा उत्स्फूर्त स्वीकार केला असता, विजयश्रीची माळ या नेत्याच्या गळ्यात घातली असती. आर्थिक मागण्यांमध्येच गुंतून राहिलेला कामगारवर्ग या पर्यायात कदाचित सुरुवातीला आघाडीवर दिसला नसता. पण यामुळे काही बिघडत नव्हते. मार्क्सचे पोथीबंद अनुयायी फार तर अस्वस्थ झाले असते. पण पर्याय सिद्ध झालेला पाहिल्यावर त्यांनीही पोथ्यातून हवे तसे नवे अर्थ काढून दाखविले असते. लेनिनपेक्षाही हा पर्याय माओ, हो चि मिन्ह यांच्या अधिक जवळ जाणारा आहे. पण हिंदुस्थानात कदाचित हाच पर्याय लागू पडला असता, अजूनही पडण्याची खूप शक्यता आहे. पण यासाठी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ताबडतोब अशा क्रांतिकारक पक्षाने फाळणीविरोधी भूमिका घ्यायला हवी होती. शक्य त्या मार्गाने फाळणी मोडून काढण्याच्या उद्योगास हात घालायला हवा होता. कारण फाळणी हा भारतीय राष्ट्रवादाचा एक फार मोठा पराभव आहे आणि या पराभवाची खंत येथील बहुसंख्य जनतेच्या मनात अजूनही फार खोलवर घर करून आहे. बांगला देश मुक्त झाल्यावर येथील राष्ट्रभावनेला केवढे उधाण आले हे सर्वांनी पाहिलेले आहे, अनुभवलेले आहे. या उधाणाचा अर्थ व या भावनेची ताकद आपल्याकडील डाव्या क्रांतिकारक म्हणवणाऱ्या पक्षांनी अजूनही नीटशी ध्यानात घेतलेली दिसत नाही. या भावनेचा एकीकडे परिपोष करीत असतानाच दुसरीकडे समतावादी आर्थिक व सामाजिक कार्यक्रमांची अंमलबजावणीही व्हायला हवी होती. शहरांपेक्षाही या अंमलबजावणीसाठी खेडेभाग हा अधिक अनुकूल होता. गांधीजींच्या खेड्यात चला या मंत्राला नवीन कलाटणी देऊन हे सर्व साधता आले असते. मध्यमवर्ग व शेतकरीवर्ग या दुहेरी चालीमुळे एकत्र आणता आला असता, चळवळ शहरात आणि खेड्यात पसरत राहिली असती. कामगारवर्ग केव्हातरी या प्रक्रियेत ओढला गेला असता हे निश्चित, कारण तोही समाजाचा एक घटकच आहे- इतर घटकांशी जोडला गेलेला, अनेक धाग्यादोऱ्यांनी एकत्र बांधला गेलेला. पण तोच नेतृत्व करील अशी वाट पहात बसणे हा भाबडेपणा आहे, मार्क्सवादाचा हा आंधळा स्वीकार आहे. मूळ मार्क्सवादी क्रांतीत शेतकरीवर्गाला स्थान नाही. लेनिनने ते प्रथम दिले आणि माओने तर या वर्गाला आघाडीवर आणून ठेवले. हिंदुस्थानात मध्यमवर्गाबाबत असेच, मार्क्सवादी क्रांतीला अभिप्रेत नसलेले स्थानांतर घडू शकले असते-अजूनही ही शक्यता दृष्टिआड करता येत नाही. असे सर्व वर्ग एकत्रित करीत करीत व्यापक आघाडी उभी करणे,प्रस्थापित राज्यकर्त्यांना जनतेपासून अलग पाडणे, हीच सर्व यशस्वी क्रांत्यांची पूर्वशर्त असते.
ती पूर्ण झालेली असली तर शेवटी, दहा-वीस वर्षातून केव्हातरी, एखादा संधीचा क्षण येतच असतो. तो पकडण्याची जागरुकताही ठेवावी लागते. नेतृत्वाचा घटक महत्त्वाचा व निर्णायक ठरतो तो विशेषतः या टोकाच्यावेळी. गरूड आणि घार यातील फरक याक्षणी स्पष्ट होऊन जातो. हिंदुस्थानातील कम्युनिस्टांना असा एकही गरूड पन्नास वर्षात लाभलेला नाही हे खरे त्यांचे दुर्दैव आहे.
अर्थात हे सगळे आज तरी स्वप्नरंजन आहे. कुणीच अशी गरूडझेप आपल्याकडे घेतलेली नाही, घेण्याची कुणाची तयारीही दिसत नाही. पण जर खरोखरच मुळापासून बदल हवा असेल, चालू परिस्थिती असह्य वाटत असेल तर अशी काही थक्क करणारी व वरवर पहाता परस्परविरोधी वाटणारी झेप, बदल करू म्हणणाऱ्यांनी घ्यायला हवी. जुन्या चाकोऱ्या मोडायला हव्यात. नवीन व्यूह रचले जायला हवेत. डांगे व त्यांचे सहकारी यांच्याजवळ असे व्यूह रचण्याची, नवीन झेप घेण्याची थोडीफार शक्ती एकेकाळी होती असे दिसते. आता मात्र ही शक्यता फारफार दुरावलेली आहे.