निर्माणपर्व/तळ नाही तोवर बळ नाही

तळ नाही तोवर बळ नाही





 खूप मोहोर आलेला पण फळ न धरलेला आम्रवृक्ष असावा तसे मानवेन्द्र रॉय यांचे जीवन होते.

 फळ का धरले नाही, याची चिकित्सा विद्वानांनी, कार्यकत्यांनी अवश्य केली पाहिजे.

 पण वठलेल्या झाडांचे दाट जंगल सध्या माजले आहे. निदान मोहोर आलेले एक झाड तरी पाहावे, म्हणून 'माणूस मानवेन्द्रनाथ रॉय' विशेषांकाचा हा प्रपंच.

 आणि कुणी सांगावे, मागील हंगामात मोहोर गळून गेला तरी, पुढच्या एखाद्या हंगामात हा वृक्ष फळांनी डवरणार नाही म्हणून ? कदाचित खूप वर्षांनी फळ देणाऱ्या आम्रवृक्षाची ही एखादी वेगळीच जात असेल.

 कदाचित एखादी नवीन कलमजोड केल्यावरच या वृक्षाला फळे धरणार असतील.

 तोवर हा वृक्ष दृष्टीआड जाऊ नये, यासाठी ही अंकाची धडपड.

 'स्वातंत्र्य' हे रॉय या वृक्षाचे नाव. हा लहान होता तेव्हा भारताच्या स्वातंत्र्यासाठी हा फुलला-बहरला.

 हा मोठा झाला तेव्हा श्रमिकांच्या, शेतकरी-कामगारांच्या स्वातंत्र्याचा याने ध्यास बाळगला.

 पुढे ही क्षितिजेही त्याला लहान-अपुरी वाटली.

 तो मानवी स्वातंत्र्याची विशाल स्वप्ने पाहू लागला.

 ही स्वप्ने पाहता पाहताच, तो वृद्ध होण्यापूर्वी चिरनिद्रित झाला.

 हिमालयाच्या कुशीतच याने आपली जीवितयात्रा संपवली.

 स्वातंत्र्य हे स्वप्नच असे आहे की, वास्तवात आणायला जावे तो ते लांब लांब पळते, अनेकदा भंगूनही जाते.
 स्वप्नांचे वेड हा ज्याच्या स्वभावाचा स्थायीभावच असतो, त्याला मग नवे स्वप्न शोधावे लागते, नसले तर नवे निर्माण केल्याशिवाय त्याला चैनच पडत नाही. स्वप्नांशिवाय असा माणूस जगूच शकत नाही.

 खरे म्हणजे आपणही, सर्वसामान्य माणसेही कुठलीतरी स्वप्ने उराशी बाळगल्याशिवाय जगत नसतो.

 कुणाची स्वप्ने लहान, कुणाची मोठी.
 जेवढी स्वप्ने मोठी तेवढे स्वप्नभंगाचे दुःखहीं मोठे.
 पण दुःख मोठे, म्हणून स्वप्नांचे वेड सोडून देता येत नाही.
 आपले जीवनच स्वप्नांशिवाय अशक्य असते.

 आणि ‘मानवी स्वातंत्र्य' हे आजवर माणसाला पडत आलेले सर्वात मोठे, सर्वात सुंदर असे स्वप्न नाही का ?

 मानव जन्माला आला तेव्हापासून या स्वप्नामागे तो धावत राहिलेला आहे.

 मग प्राचीन काळी या स्वप्नाला मोक्ष म्हणत असतील. आपण अर्वाचीन याला मुक्ती म्हणत असू.

 या स्वप्नामागे धावण्याचे मार्ग वेगवेगळे असतील.

 पण प्रेरणा, ध्यास एकच. हा बंधनात अडकलेला मानव मोकळा, स्वतंत्र कसा होईल,राहील.

 बंधने तरी किती प्रकारची !
 बंधने निसर्गाची !
 बंधने परिस्थितीची - माणसाने माणसांवर लादलेली.
 बंधने स्वतःची, आपल्या प्रकृतिधर्माची.

 या सर्व बंधनातून माणसाला पार करत करत न्यायचे. माणसाने जायचे. किती लांबचा प्रवास. तांडा किती तरी मोठा. प्रवास धोक्याचा, प्रचंड गोंधळाचा.

 अनेकदा हा प्रवास ज्यासाठी चालू आहे तो हेतूच विसरला जातो. स्वप्नच हरवते. मग कुणी मार्क्स, कुणी गांधी येतो. पायात थोडे बळ, स्वप्नाची आठवण देऊन जातो.

 कुणी रॉय येतो. पायात बळ देण्याची विद्या त्याला अवगत नसते. पण तो स्वप्नांची आठवण करून देतो. प्रवासाचा हेतू सांगत राहतो.

 आपण याबद्दलही त्याचे ऋणी राहिले पाहिजे.
 कारण मार्क्स आणि गांधी तरी सारखे कुठून येणार ?
 जिथून बळ मिळेल तिथून ते घ्यावे. पण स्वप्नांशिवाय जगण्यात काही अर्थ नसतो.

 आणि स्वातंत्र्याशिवाय, मुक्तीशिवाय उदात्त असे कोणते स्वप्न मानव जातीला श्रेयस्कर आहे ?
 बळ नाही, तोवर रॉयप्रमाणे आपण काही काळ निदान हे स्वप्न तरी पाहत राहू या.



 जरी अनेक उच्चपदे रॉय यांनी राजकारणात–विशेषतः कम्युनिस्ट चळवळीत-भूषविली असली तरी मुख्यतः त्यांनी वैचारिक नेतृत्व केले असेच म्हणावे लागेल. निवडक बुद्धिमंतांना रॉय आकर्षित करू शकले आणि प्रारंभिक स्फूर्तिस्थान हे त्यांचे चळवळीतील स्थान राहिले. मग चळवळ मेक्सिकोतील असो, नाही तर भारतातील असो. रॉय हे अग्रदूत म्हणून सर्व ठिकाणी वावरलेले दिसतात. जनसामान्यांविषयी त्यांना प्रेम असले, शेतकरी कामगारांच्या क्रांतीची स्वप्ने जरी ते पाहात असले तरी जनतेशी प्रत्यक्ष असा संबंध त्यांचा कुठेही आलेला दिसत नाही. त्यामुळे पुढारीपण त्यांच्याकडे न येता धोरणात्मक दिग्दर्शन ही त्यांची ठाम भूमिका ठरत गेली आणि ती मात्र त्यांनी अव्वल दर्जाने, निकराने आणि व्यवस्थितपणे पार पाडली. बुद्धिमंतांचे ( Intellectuals) प्रत्यक्ष राजकारणातील स्थान काय राहते याचा अभ्यास जर कुणाला करायचा असेल तर रॉय यांचे जीवन आणि कार्य अशा अभ्यासकाला खूपच उद्बोधक ठरेल. मूल्यसंस्थापना, मूल्यांचा आग्रह, जुन्यांची चिकित्सा, नव्याचा शोध हे बुद्धिमंतांचे समाजातील मुख्य कार्य असते-असायला हवे. हे कार्य केवळ अभ्यासिकेत-प्रयोगशाळेत बसून कुणी करील; कुणाला अगदी साहित्यकलादिकांच्या उंच मनोऱ्यातूनही हे कार्य साधता येईल. ज्यांच्या कृतीप्रेरणा बलवान असतात अशा रॉयसारख्या व्यक्ती राजकारणाच्या मैदानावर राहून हे कार्य करू पहात असतील. पण मैदानात वावरतात म्हणून अशा व्यक्ती राजकारणी ठरत नाहीत किंवा नेतृत्वही त्यांच्याकडे चालत येत नाही. जनसामान्यांना भुरळ घालणारे, त्यांच्या भावनांना स्पर्श करणारे काहीतरी नेतृत्व गुणात अभिप्रेत असते. रॉय यांचे आवाहन मुख्यतः बुद्धीला होते. त्यामुळे वैचारिक मार्गदर्शनाशिवाय अन्य कुठलेही काम त्यांना जमू शकले नाही.वैचारिक क्षेत्रातही त्यांची आशियाई देशातील क्रांतीबद्दलची धारणा काळाने बऱ्याच प्रमाणात यथार्थ ठरवली.

अव्वल तात्त्विक क्षेत्रातील त्यांचा संचार मात्र अजून मान्यता पावलेला नाही. त्याची अधिक चिकित्सा व्हायला हवी. या चिकित्सेतून काही भरीव निष्पत्ती होवो न होवो, रॉय यांची या क्षेत्रातील कामगिरी, त्यांचे मोठेपण कुणीही अमान्य करू शकणार नाही. बुद्धिमंतांचे कर्तव्य त्यांनी निष्ठेने, निकराने पार पाडले. अविकृत ज्ञानसाधनेचा एक उच्च आदर्श त्यांनी समाजासमोर ठेवला, जो आदर्श पिढ्यान् पिढ्या जपला जाईल, अनेकांना स्फूर्ती देत राहील. प्राचीन भारतीय परंपरेवर रॉय यांनी कितीही आघात केलेले असोत. पण त्यांच्या बाबतीत तरी ही परंपरा शेवटी निर्णायक ठरली आहे. एक ऋषी, एक दार्शनिक म्हणून त्यांना आपले जीवन जगावेसे वाटावे, तेही हिमालयाच्या गूढ सान्निध्यात, याचा दुसरा कोणता अर्थ लावायचा ?

 ही भूमी शेवटी ऋषीमुनींची भूमी आहे.

 रॉयही या परंपरेत समाविष्ट झाले.

 एक ऋषी ठरले.



 रॉय यांचा मानवतावाद केवळ स्वप्नाळू होता असे नाही. सत्तेच्या विकेन्द्रीकरणाबाबतच्या रॉय यांच्या आग्रहाला अगदी निकडीचा संदर्भ आहे. जगात सर्वत्र आज आर्थिक-राजकीय सत्तेचे केन्द्रीकरण होत आहे. मोठमोठी औद्यागिक साम्राज्ये आपल्या आर्थिक जीवनाचे आज नियंत्रण करीत आहेत. तंत्रज्ञानाची प्रगतीही या दिशेने झेपावते आहे. यामुळे राजकीय केन्द्रीकरणही अटळ ठरत आहे. अशा परिस्थितीत लोकशाही जीवन पद्धतीचे भवितव्य काय असा प्रश्न सर्वच ठिकाणी उत्पन्न झालेला आहे. भारतात तर तो विशेषच आहे. कारण येथील लोकमानसही लोकशाहीला अभिप्रेत असणाऱ्या स्वातंत्र्याला पुरेसे महत्त्व देणारे नाही. अशा स्थितीत लोकशाही जीवनपद्धती टिकवायची, विकसित करायची, तर विकेंद्रीकरणाचा आग्रह अनिवार्य ठरतो आणि या संदर्भात रॉय-गांधी-विनोबा यांच्या दर्शनातील समान दुवे हुडकून, त्यात काही नवीन भर घालून, एखादा सर्वमान्य पर्याय पुढे येण्याची निकड विशेषच जाणवते. आणखी एखादा राजकीय पक्ष काढून ही लोकहाची कोंडी फुटेल असा संभव मुळीच नाही. आता नवीन दिशेने अगदी अगदी श्रीगणेशापासून सुरुवात करायची तयारी हवी. खेडोपाडी, लहानलहान स्वरूपात, रॉय यांनी सुचविल्याप्रमाणे लोकसमित्या काढून, लोकशाही जीवन पद्धतीचा साक्षात्कार तळामुळात घडवायची जिद्द बाळगणारे लोकसेवकच नवा मार्ग दाखवू शकतील. जुन्या सर्व वाटा आता बंद पडल्या आहेत. ते दोर आता कापले गेले आहेत. जे. पी. चे नवनिर्माण आंदोलन बिहारमध्ये असे काही मूलभूत काम करू पाहत होते. आंदोलनाच्या काळात नवनिर्माण प्रेरणेने भारलेले तरुण खेडोपाडी जाऊ पाहत होते. तेथील भ्रष्टाचार हटवू पाहत होते. शेतकऱ्यांचे काही प्रश्न तरी समजावून घेत होते. हे काम मजबूत व्हायला हवे होते, त्याला पुरेसा अवधी मिळायला हवा होता. पण मध्येच परिस्थितीने वेगळे वळण घेतले व हे ग्रामीण भागातील तळ बांधणीचे काम वाहून गेले, निकालात निघाले. पण जेव्हा केव्हा भविष्यात शक्य होईल तेव्हा याच कामापासून पुन्हा नवा आरंभ करावा लागेल हे रॉय-गांधींचे भाकित आहे आणि भारतात जरी नाही, तरी इतर आशियाई देशात हे आजवर खरे ठरत आलेले आहे. तळ कसे बांधायचे त्या पद्धतीत फार तर लोकस्थिती, परंपरा, परिस्थिती यामुळे फरक पडत राहील. इतर ठिकाणी सोव्हिएतस निघाली असतील. आपल्याकडे आश्रम कदाचित चालवावे लागतील, तर काही ठिकाणी आर्थिक विकासाचे कार्यक्रमही राबवावे लागतील. कुठे प्रथमपासूनच संघर्ष उभा करावा लागेल. टिळकांची प्रतियोगी सहकारिता हे आपल्याकडच्या परिस्थितीत नेहमी अचूक ठरत आलेले धोरण आहे. पहिल्या महायुद्धाच्या काळात सैनिकीकरणाचा ब्रिटिशांचा-प्रत्यक्ष परकीय शत्रूचा–कार्यक्रमही टिळकांनी राबवला. कारण त्यामुळे देशाचे हित होणार होते. तसेच अगदी वृक्षारोपणाचे, नाहीतर कुटुंबनियोजनाचे कार्यक्रमही राबवायची नवनिर्माणवाद्यांची तयारी हवी. शेवटी नवनिर्माण आंदोलनही कशासाठी होते ? 'नया देश बनायेंगे' ही त्या आंदोलनाची प्रेरणा होती. यासाठी जे कुणी, जिथे कुठे प्रयत्नशील असतील, त्यांचे त्यांचे, त्या त्या ठिकाणी सहकार्य घेतले गेले पाहिजे. अनुशासनवाद्याचेही. अर्थात त्यांनी घेतले तर,देऊ दिले तर. नाहीतर एकला चलो रे चीही तयारी हवी. तळ नाही तोवर बळ नाही, हे मात्र निश्चित. लोकशाहीचा वृक्ष असा तळात नीट रूजलेला असला तरच वर तो फळांनी डवरेल. खतपाणी या मुळाशी घातले पाहिजे. वर चार थेंब शिंपडून किंवा मंत्रपठन करून काय साधणार आहे ?

रॉय-गांधी आपल्याला या तळाकडे पुन्हा पुन्हा जायला सांगत आहेत.

१४ ऑगस्ट १९७६