निर्माणपर्व/ग्राहकशक्ती-राष्ट्रशक्ती


ग्राहकशक्ती-राष्ट्रशक्ती




 गेल्या आठवड्यात, रामनवमीच्या शुभमुहूर्तावर पुण्यातील ग्राहक चळवळीने एक महत्त्वाचा टप्पा गाठलेला आहे. अनेक दिवस लाखो रुपयांच्या उलाढाली, लहान मोठी आंदोलने चालू असली, तरी चळवळीला मध्यवर्ती व प्रशस्त अशी सोयीस्कर जागा नव्हती. सुधीर फडके यांच्या टिळक मार्गावरील चित्रकुटीत काही काम चाले. अडीअडचणीला 'माणूस' किंवा 'सोबत' साप्ताहिकांच्या कचेऱ्या ताब्यात घेतल्या जात. कुणाचा बंगला, कुणाची पत्र्याची शेड, वेळप्रसंगी उपयोगात आणली जाई. पण यामुळे वेळ व कार्यकर्त्यांची शक्ती फार खर्च होई व परावलंबित्वही जाणवत असे. आता जागेची ही अडचण केवळ दूर झाली आहे इतकेच नव्हे, तर नव्या वास्तूमुळे चळवळीला एक वेगळीच शान आणि उठावदारपणाही येण्यास चांगली मदत होणार आहे. अनेक वर्षे टिळक पथावरील, स. प. महाविद्यालयासमोरील जीवन रेस्टॉरंटची मोक्याची जागा धूळ खात पडली होती. मूळ मालकांपैकी श्री. बोडस जीवन रेस्टॉरंट सोडून गेल्यानंतर या जागेला ऊर्जितावस्था अशी कधी आलीच नव्हती. ही अवकळा आता दूर होऊन ग्राहक चळवळीचा गरूड आता या इमारतीवरून आकाशात अधिक उंच उंच भरारी घेत राहील यात काही शंका नाही. कारण या गरुडाची झेप आहेच तशी विलक्षण. दोन वर्षांपूर्वी चळवळ सुरू झाली आणि आज तीन-चार लाखाची मालकीची इमारत मध्यवर्ती कार्यालयासाठी घेण्याची तिची हिम्मत व्हावी, हे एक आश्चर्यच नाही का? जनतेच्या एका स्वयंस्फूर्त चळवळीने असे मजबूत यश इतक्या अल्पावधीत मिळविले असल्याचे उदाहरण निदान अलीकडच्या महाराष्ट्रात तरी दिसत नाही.लांड्यालबाड्या करून दोन-चार वर्षात संस्था, व्यक्ती उदयास येत असतात. पण स्वच्छ व्यवहारांवर, काटेकोर हिशोबांवर ग्राहक चळवळीच्या सूत्रधारांचा पहिल्यापासूनच कटाक्ष आहे. ही सर्व उचित व्यवहारांची पथ्ये सांभाळून ग्राहक चळवळीने स्वतःसाठी अशी डोळयात भरणारी जागा हस्तगत करावी याचे कुणालाही कौतुकच वटेल. या धडाडीबद्दल ग्राहक चळवळीच्या चालकांचे - विशेषतः श्री. बिंदुमाधव जोशी यांचे, सर्वांनी अभिनंदन करायला हवे. कारण इतरजण सल्लागार, मदतनीस, सहकारी वगैरे असले तरी दिवसरात्र या चळवळीसाठी वेडे होऊन राबणाऱ्यांमध्ये बिंदूमाधवच सतत आघाडीवर राहिलेले आहेत. चळवळीसाठी आता तर त्यांनी आपला धंदाही जवळजवळ सोडलेला आहे. पुण्यातील ग्राहक चळवळीला अशी योग्य व्यक्ती शोधूनही सापडली नसती. बरे झाले एक प्रकारे, त्यांनी पक्षीय राजकारणातून अंग काढून घेतले. पक्षात राहिले असते तर निवडणुकांपलीकडे त्यांचे फारसे लक्ष गेलेही नसते कदाचित. आता पक्षाने परत बोलाविले तरी त्यांनी जाऊ नये. ग्राहक चळवळीला त्यांची अधिक गरज आहे.
 केवळ तेलातुपाचे, धान्याचे, वस्तूंचे वाटप नीट करणे, एवढाच ग्राहक चळवळीचा आवाका राहावा असे कुणीच मानत नाही. इष्ट दिशेने आपल्या अर्थव्यवस्थेचे पसरलेले गाडे वळवून आणणे एवढी होती सुरुवातीच्या ग्राहक चळवळीमागील संकल्पांची व्याप्ती. पाश्चात्य देशात असलेल्या ग्राहकवादाची ( Consumerism) नक्कल करणे , हा काही या चळवळीचा मुळ उद्देश नाही. ग्राहकांना योग्य भावात, योग्य दर्जाचा माल मिळवून देणे एवढीच काही या चळवळीची मूळ प्रेरणा नाही. आपल्या समाजात अनुत्पादक प्रवृत्ती फार बोकाळलेल्या होत्या -आहेत. नको त्या वस्तूंचे उत्पादनही खूप चालू असते. त्यामुळे सर्व अर्थव्यवस्थेचा तोल एकीकडे ढळतो, विषमता वाढते,देश हळूहळू कर्जात रुतत जातो. ही प्रक्रिया बदलवण्यासाठी, पालटवण्यासाठी ग्राहक चळवळीचा उपयोग व्हावा, अशी सुरुवातीची संकल्पना होती. यासाठी, उदाहरणार्थ, 'ऑपरेशन लक्ष्मीरोड' होते. केवळ पंधरा वीस टक्के भाव खाली उतरवा एवढीच मागणी या ऑपरेशनच्या मुळाशी नव्हती. दलाल हटवा असे आपण म्हणत होतो. चैनीचे, महाग कापड काढू नका, सर्वांना परवडण्यासारख्या काही ठरविक कापड प्रकारांचे उत्पादन वाढवा, या व अशा स्वरूपाच्या इतर मागण्या कशासाठी होत्या ? देशातील उद्योगधंद्यांचे केंद्रीकरण थोपवण्याचा, श्रमप्रधान नियोजनाचा, उत्पादनपद्धती व तंत्रात आवश्यक ते बदल करण्याचा विचार या सर्व मागण्यांमागे होता. पण नंतरच्या काळात या विचारांचा निकडीने हवा तेवढा पाठपुरावा झाला नाही, ही एक उणीवेची बाजूही या नुतन गृहप्रवेशाच्या वेळी आपण ध्यानात घेतली पाहिजे. काही जवळची उद्दिष्टे, तात्पुरती कामे, यात फार गुंतून पडल्यामुळे हे घडले असावे कदाचित. पण ही लांब पल्ल्याची उद्दिष्टे डोळ्याआड करून कसे चालेल? एक वाटपयंत्रणा म्हणून ग्राहक चळवळीने खूप मजबूत काम केले हे खरे आहे; पण एक स्वतंत्र शक्ती म्हणून आपला प्रभाव घडामोडींवर पाडण्यासाठी केवळ वाटपयंत्रणा पुरेशी नाही. गरुडाचा हा एक पंख झाला. पण दुसरा पंखही फडफडायला हवा. हव्या त्या वस्तूंचे, हव्या त्या ठिकाणी व पद्धतीने उत्पादन कसे व्हावे हेही ग्राहक चळवळीने हळूहळू सांगायला पाहिजे व सांगितले गेलेले, ऐकले जाण्यासाठी, अवश्य ते शक्तिसामर्थ्य गोळा केले पाहिजे. ही एक जनतेची स्वयंप्रेरित चळवळ आहे आणि संपूर्ण अर्थव्यवस्थेला इष्ट वळण लावण्याची तिची आकांक्षा आहे हे सारखे जाणवत राहिले पाहिजे. भांडारे चालवणे हे चळवळीचे उद्दिष्ट नाही असे बिंदुमाधव आपल्या प्रत्येक भाषणातून सांगत असतातच. प्रश्न एवढाच आहे की, ही भांडारे चालवत असतानाच, तेला-तुपाचे-धान्याचे-वस्तूंचे वाटप निर्दोष पद्धतीने करत असतानाच, ग्राहक चळवळीने, लांब पल्ल्याची, मूळची ठरवलेली उद्दिष्टे गाठण्यासाठी आणखी काही उपक्रम हाती घ्यायला हवेत की नकोत ? केवळ दलाल हटवून उत्पादकांशी थेट संबंध जोडणे, एवढ्यावर थांबून चालणार नाही. मोठ्या उत्पादकांकडून छोट्या उत्पादकांकडे जाणेही अवश्य आहे. समाजातील दुर्बल घटकांना बाजारपेठा मिळवून देणे, हेही कार्य जोमाने व्हायला हवे. ग्राहक चळवळीचा उगम शनवारवाड्यावरील एक ऑगस्टच्या १९७४ मेळाव्यातून झालेला आहे. या मेळाव्यात स्वदेशी आणि बहिष्काराचे ठराव संमत झाले. हे ठराव वास्तवात उतरविण्यासाठी ग्राहक संघाची चळवळ सुरू करण्यात आली. टिळक-गांधींच्या काळातील स्वदेशी बहिष्काराच्या व्याख्या आता बदलल्या पाहिजेत, हेही त्या मेळाव्यानेच स्पष्ट केले. टिळकांच्या वेळी परदेशी वस्तू वर्ज्य मानल्या गेल्या. देशात तयार झालेली कोणतीही वस्तू स्वदेशी मानली गेली. परंतु आता दुर्बल घटकांकडून, मागासलेल्या, अविकसित भागातून तयार झालेल्या वस्तू स्वदेशी म्हणून मानल्या जायला हव्यात व मोठ्या, मक्तेदारी गटातून उत्पादित झालेल्या वस्तू परदेशी म्हणून बहिष्कृत ठरायला हव्यात. म्हणजेच ग्रामोद्योगांना, लहानलहान ठिकाणांहून निघणाऱ्या वस्तूंना चालना देणे हेही ग्राहक चळवळीच्या विविध उपक्रमांमागील एक महत्त्वाचे सुत्र ठरायला हवे. काही दिवसांपूर्वी म्हैसाळ येथील हरिजन शेतमजुरांनी आपल्या सहकारी शेती संस्थेद्वारा उत्पादित केलेली द्राक्षे ग्राहक चळवळीने मागवून पुण्यात मोठ्या प्रमाणावर त्यांची विक्री संघटित केली. अशा उपक्रमात खंड पडता कामा नये. याला जोडूनच शहरी भागात, मक्तेदारी मोठ्या उत्पादनकेंद्रातून विनाकारण गर्दी करणाऱ्या मालाविरुद्ध बहिष्काराचे अस्त्रही उचलण्याचा विचार व्हायला हवा. आता कोल्हापूरच्या चपलांना पुण्यात मोठी बाजारपेठ मिळवून देण्याची कल्पना चालकांच्या मनात घोळते आहे. याला जोडूनच बाटा वगैरे परदेशी मक्तेदार कंपन्यांच्या मालाविरुद्ध बहिष्काराची चळवळही संघटित करायला नको काय? विधी आणि निषेध एकदमच समोर यायला हवा. नाहीतर चळवळ एकांगी व परिणामी निष्फळ ठरते. नव्या देशी अवतारातल्या वसाहतवादाचे दुष्परिणाम रोखायचे, तर बहिष्कार ही या चळवळीतली ढाल आहे व दुर्बल घटकांकडून आलेल्या मालाला उठाव मिळवून देणे ही तलवार आहे. या दोन्ही साधनांचा वापर वेळ व प्रसंग पाहून करण्यात आला तरच अर्थव्यवस्थेला इष्ट ते श्रमप्रतिष्ठित वळण लावण्याची महत्त्वाकांक्षा पूर्ण होण्याची शक्यता आहे. नाहीतर ग्राहक चळवळ हा केवळ मुठभरांचा आर्थिक स्वार्थ संघटित करणारी एक युनियन-पद्धतीची चळवळ ठरेल. 'राष्ट्रदेवो भव' हे ग्राहक चळवळीचे बोधवाक्य निरर्थक ठरेल. आर्थिकदृष्ट्या राष्ट्र मजबूत व स्वावलंबी बनवायचे तर प्रसंगी नुकसान सोसूनही दुर्बल घटकांसाठी सहकार्याचा हात पुढे करायला ग्राहकांना शिकवले पाहिजे. स्वस्त आणि मस्त वस्तूंचे त्यांचे वेड कमी करायला त्यांना भाग पाडले पाहिजे. गरुडाने आता अशा उंच भराऱ्या घेण्याचा विचार लवकर करावा. नूतन वास्तुप्रवेशाचे त्यामुळे सार्थक होईल.

एप्रिल १९७६