निर्माणपर्व/भारतीय समाजवादाकडे



भारतीय समाजवादाकडे....




 समाजवादी आणि जनसंघी शेवटी वेगळे झाले. जयप्रकाशांनी लावलेली बाग सध्या तशी पूर्ण उध्वस्त झाली. विचारांपेक्षा माणसे भावनावर, पूर्व ग्रहांवर जगत असतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. कार्यक्रमाबाबत, ध्येयधोरणांबाबत मतभेद झाले आणि हे दोन गट वेगळे झाले, जनता पक्ष फुटला, असे घडले नाही. समाजवाद्यांना भय वाटे की, जनसंघ गट संख्येच्या बळावर पक्षाचा आज नाही उद्या ताबा घेणार आणि जनसंघीयांना समाजवाद्यांचा बौद्धिक सासुरवास नकोसा वाटला. आपल्या पूर्वग्रहांवर, द्वेषमत्सरावर ही मंडळी मात करतील आणि काँग्रेसला एखादा समर्थ पर्याय दहापाच वर्षांत उभा राहील, अशी, हा जनता पक्षाची बाग लावताना जयप्रकाशांना आशा वाटत होती; ती आता पूर्ण मातीला मिळाली आणि गाडी आता पुन्हा मूळ ७१।७२ च्या सुमारास होता त्या मुक्कामावर आली. सर्वंकष इंदिरा शासन आणि तीन-चार विरोधी गट, असे ७१।७२ मध्ये होते, तसे राजकीय चित्र आता तयार झालेले आहे. सिंडिकेट काँग्रेसची जागा अरस काँग्रेसने घेतली. जनसंघाचा भारतीय जनता पक्ष झाला. समाजवाद्यांच्या हाती जनता पक्ष;आणि भालोदचे नवे नाव आहे लोकदल कम्युनिस्ट त्या वेळीही अलग होते, तसेच आजही आहेत. आणीबाणी आणि जयप्रकाशांसारखे सर्वमान्य नेतृत्व यामुळे ७१।७२ चे चित्र ७७ ला बदलले; तशीच समान सर्वव्यापी संकटाची स्थिती आणि एखादा सर्वमान्य नेता उदयास आल्याशिवाय आजचेही चित्र बदलेल असे दिसत नाही. राजकीय फुटीरपणा हा एकूण आपला स्थायीभाव दिसतो. क्वचित प्रसंगीच एखादा देशव्यापी राजकीय पर्याय उभा राहतो. काँग्रेस ५०।७५ वर्षे एक राहिली ती पारतंत्र्याच्या समान व सर्वव्यापी संकटामुळे व टिळक-गांधी-नेहरू यांच्या विभूतिसमान नेतृत्वामुळे व्यक्तिगत रागलोभ, द्वेषमत्सर, निरनिराळ्या गटांचे स्वार्थ, या दोन घटकाच्या मिश्रणामळे तयार झालेल्या रसायनात वितळून जातात व देशव्यापी एकत्व टिकून राहते. हे दोन्ही घटक जनता पक्षाजवळ उरले नाहीत. आणीबाणी संपली. जयप्रकाश लांब राहिले किंवा त्यांना लांब ठेवले गेले आणि मिळालेली सत्ता टिकवून धरण्यासाठीसुद्धा एकत्र राहिले पाहिजे, हा शहाणा व व्यवहारी स्वार्थ पाहण्याइतकीही ही मंडळी शुद्धीवर राहिली नाहीत. द्वेषाने आंधळेपणा आला. जो तो पुन्हा आपल्या पूर्वीच्या कोषात बंदिस्त झाला. जयप्रकाशांनी आणि आणीबाणीने हे वेगवेगळ्या प्रवाहात पोहणारे मासे एका मोठ्या समुद्रात आणून सोडले; पण समुद्रात पोहण्याचा सराव नसल्याने सगळ्यांच्या नाकातोंडात पाणी गेले आणि मूळच्या लहान प्रवाहाकडे जो तो वळला आहे. सगळ्यांनी एकाधिकारशाहीविरोध, म्हणजेच इंदिरा विरोध हे आपले मुख्य प्रचारसूत्र ठेवलेले दिसते. म्हणजे पुन्हा, ७१-७२ चीच चूक. कल्पनादारिद्रयही तसेच. बाई त्यावेळी ‘गरिबी हटाव' ची आकर्षक घोषणा देऊन जनमानस काबीज करीत होत्या. विरोधकांना फक्त 'इंदिरा हटाव' हवे असे त्या सांगत व लोकांनाही ते पटे. बाईंंपेक्षाही काहीतरी मोठी झेप घेतल्याशिवाय तुमच्या पोकळ एकाधिकारशाहीविरोधाला, नकारात्मक इंदिरा हटाव भूमिकेला लोक कशी किंमत देणार ? आणि त्यांनी का द्यावी ? बेबंदशाहीपेक्षा लोकांना एकाधिकारशाही परवडते असा परवाच्या लोकसभा निवडणुकांचा स्पष्ट कौल आहे. बेबंदशाहीची आठवण करून देणारे निरनिराळे आवाजच विरोधीपक्ष यापुढेही काढत राहणार असतील तर लोकही त्यांना विरोधी पक्ष म्हणूनच फार तर जगवत ठेवतील. सत्तेवर त्यांना न बसवण्याची दक्षता बाळगतील. शेवटी राज्यकर्ता पक्ष म्हणून एक प्रतिमा तयार व्हावी लागतेच. त्यासाठी पर्यायी धोरणे, दमदार नेतृत्व, पर्यायी संघटना हा सगळाच जामानिमा खडा असावा लागतो. फुटुन वेगळे झाल्याला ४८ तासही उलटले नाहीत तो याची झाली पुन्हा चुंबाचुंबी सुरू ! अरे, मग भांडलात, वेगळे झालात ते कशासाठी : उभे राहा एकेकटयाच्या बळावर, निदान काही काळ तरी. थोडी उपाससार, हालअपेष्टा, उन्हाळा पावसाळा सहन करून लोकांना कळू द्या तुमची तत्वनिष्ठा आणि त्यासाठी किंमत मोजण्याची तुमची तयारी ! असे केले नाहीत तर लंगडे आणि आंधळे म्हणूनच लोक तुमच्याकडे पाहतील, टाकतील फार तर एखादे दुसरे नाणे पेटीत. दुबळ्यांची कीव केली जाते, त्यांना कुणी राज्यावर बसवत नाही. समाजवादी गटांजवळ तर असा काही स्वबळावर आधारित पर्यायच नसावा, अशी त्यांची युत्यांसाठी, तडजोडींसाठी धावाधाव, शोधाशोध सुरू झालेली आहे. पाहायचे आता कुणाचा घरोबा ही मंडळी धरतात. महाराष्ट्रापुरते पाहता अरस काँग्रेस त्यांना जवळची दिसते आहे. स्थळ ओळखीचे आहे. जमायला हरकत नसावी आणि महाराष्ट्राबाहेर ही मंडळी आहेत तरी कुठे फारशी ? फुटून वेगळे झाले तरी हे दोन्ही गट गांधी, जयप्रकाशांचा वारसा आम्ही पुढे चालवू असे म्हणत आहेत. ‘नाहं कामये राज्यं' अशी गांधीजींची रोजची प्रार्थना होती व जयप्रकाशांनाही सत्तेचे रूढ मार्ग सोडून, क्रांतीचा एखादा नवा पर्याय सापडतो का, हे पाहण्याची तहान लागलेली होती. हा गांधी-विनोबा-जयप्रकाशांचा अव्वल वारसा आहे व त्यावर हक्क सांगण्याचा, तो आम्ही पुढे चालवत आहोत हे म्हणण्याचा, आज थोडा फार अधिकार कुणाला पोचत असेलच तर तो फक्त रा. स्व. संघाला आहे. संघ ही सांस्कृतिक संघटना आहे याचा अर्थ ती सत्तेचे राजकारण करीत नाही, एवढाच घ्यायचा आहे. संस्कृती म्हणजे केवळ नाचगाण्यांचे कार्यक्रम नाहीत. राजकीय क्षेत्र हेही संस्कृतीचा एक भाग आहेच. संघाला राजकीय परिवर्तनाची मुळीच आकांक्षा नसती तर पंचवीस साली हेडगेवारांनी काँग्रेस सोडून या संस्थेला जन्म दिलाच नसता व निर्भेळ मानवसेवेचे आपले रामकृष्ण मिशनमधील कार्य सोडून गोळवलगुरुजींनी संघाची सूत्रे आपल्या हाती घेतलीच नसती ! दोन बाबतीत हेडगेवार व सावरकर यांचे गांधीजींच्या काँग्रेसशी त्या काळी मतभेद झाले व मुख्यतः या दोन मुद्द्यांवरूनच हिंदू आणि हिंदी राष्ट्रवाद यांची प्रथम फारकत झाली. पहिला मुद्दा होता गांधीजींनी अहिंसामार्गाला दिलेले सार्वभौम महत्त्व, हा. हेडगेवार-सावरकर यांची सशस्त्र क्रांतिमार्गाची परंपरा होती. स्वातंत्र्यासाठी शक्य आणि योग्य वाटले तर हिंसा सशस्त्र उठाव हे मार्ग हेडगेवारांनी वर्ज्य मानले नव्हते व सावरकर तर पूर्वायुष्यात अग्निगोलकांशी खेळणारे क्रांतिकारकच होते. गांधीजींनी मात्र अगदी भगतसिंगालाही कधी क्षमा केली नाही. दुसरा या दोन राष्ट्रवादांमध्ये मतभेदाचा मुद्दा होता, तो मुस्लिम अनुनयाबाबतचा. अनुनयाने गांधीजी मुस्लिमांना, डोक्यावर बसवत आहेत, हा हिंदू-मुस्लिम ऐक्याचा मार्ग नाही, असे सावरकर- हेडगेवारांचे व त्यांनी प्रतिपादन केलेल्या हिंदुत्ववादाचे म्हणणे होते. या दोन्ही मुद्द्यांबाबत गांधीजी चूक ठरले व हिंदुत्ववाद खरा ठरला असा इतिहासाचा दाखला आहे. ४२ मध्ये हिंसाचार मोठ्या प्रमाणावर झाले. चळवळीला भूमिगत स्वरूप प्राप्त झाले व या सगळ्याचा निषेध न करण्याइतपत गांधीजींचाही अहिंसाग्रह सैलसर झालेला होता. आपले स्वातंत्र्ययुद्ध सशस्त्र आणि निःशस्त्र, हिंसा व अहिंसा, या दोन्ही मार्गांनी पुढे सरकले व शेवटी जागतिक परिस्थिती अनुकूल झाल्यावर भारत स्वतंत्र झाला. मुस्लिम अनुनयाचे फलित म्हणजे पाकिस्तान. हिंदुत्ववाद नसता तर झालेल्यापेक्षा दुप्पट मोठे पाकिस्तान जीनांनी हिसकले असते. गांधीजींनी तर कोरा चेकच द्यायची तयारी दाखवली होती. या दोन्ही मुद्दयाबाबत पुनर्विचार करावा असे गेल्या तीस चाळीस वर्षांत काय घडले आहे ? उलट अपरिहार्य म्हणून गांधीपरंपरेचा वारसा सांगणाऱ्या जयप्रकाशांनीच नक्षलवादी हिंसाचाराला मान्यता देऊन ठेवलेली आहे. पाकिस्तान झाले तरी मुस्लिम प्रश्न आहे तेथेच आहे. तेव्हा जनता पक्षाच्या वेगळ्या झालेल्या घटकांनी, विशेषत: पूर्वाश्रमीच्या जनसंघीयांनी, आपण जयप्रकाशांचा-गांधीजींचा वारसा चालविणार म्हणजे नेमके काय करणार, याचाही तात्विक ऊहापोह नीट करून लोकांसमोर ठेवला पाहिजे. ज्याअर्थी पक्ष स्थापन करून निवडणुका लढविणार, सत्ता हस्तगत करू पाहणार, त्या अर्थी गांधी-जयप्रकाशांचा सत्तानिरपेक्ष समाजपरिर्वतनाचा अव्वल व मुख्य वारसा कुठल्याच जनताघटकाला अभिप्रेत नाही हे उघड आहे. जयप्रकाशांनी आपल्या कारागृहातील रोजनिशीत लिहिले आहे-

‘इतिहासाला विचारा की काही वर्षांपूर्वी / बनू शकलो नसतो का पंतप्रधान ? पण मला क्रांतिशोधकाला दुसरेच मार्ग / मान्य होते-हवे होते. मार्ग त्यागाचे, सेवेचे, निर्माणाचे / मार्ग संघर्षाचे, संपूर्ण क्रांतीचे ......'

 आहे का तयारी या मार्गावरून जाण्याची अटलजींची किंवा मधू दंडवत्यांचीही? आज तरी या दोघांनी व त्यांच्या अनुयायांनी या वारशावर आपला दावा सांगू नये. जयप्रकाशांना जो नंबर दोनचा मार्ग वाटत होता तो या मंडळींना नंबर एकच वाटतो आहे. या नंबर दोनच्या मार्गाने जाणारेही समाजाला हवेच असतात, हा भाग वेगळा ! लोकांना चांगले राज्यकर्ते नको आहेत का ? जसे चांगले कारखानदार हवे असतात, चांगले शिक्षक हवे असतात, तसे चांगले राज्यकर्ते, हीही समाजाची एक गरज आहे व ती जनता पक्षाकडून पूर्ण झाली नाही, ही खरी लोकांची तक्रार आहे. फक्त गांधीजी-जयप्रकाशजी, चांगले राज्यकर्ते, राजकारण करणारा कुशल वर्ग, एवढीच समाजाची गरज आहे. यामुळेच समाज परिवर्तित आणि विकसित होणार आहे, असे मानत नव्हते. राज्यकर्त्यांवरही अंकुश ठेवणारी लोकशक्ती, समाजाची आत्मशक्ती जागृत करण्यावर त्यांचा मुख्य भर होता, त्यासाठी त्यांचा जीवनयज्ञ सुरू होता. 'संतो तपसा भूमीं धारयन्ति' हे वेदवचनच जणू त्यांच्या रूपाने समूर्त झाले होते. आयुष्यभर राजकारणात राहूनही 'नाहं कामये राज्यम्' अशी दैनंदिन प्रार्थना त्याशिवाय कशी होऊ शकली असती ? अटलजी, दंडवतेजी यांना तर राज्य हवे आहे, त्यांनी २८ महिने राज्य उपभोगलेही आहे. मग जयप्रकाशांचा, गांधीजींचा दुसरा कोणता वारसा त्यांच्या डोळ्यासमोर आहे असे समजायचे ? विकेंद्रित अर्थ व समाजरचना एवढाच सध्या तरी हा वारसा दिसतो आहे व वेगवेगळे राहून का होईना, तो जरी अटलजी-दंडवतेजी यांनी पुढे नेला तरी इंदिरा काँग्रेसला व कम्युनिस्टांना तो एक चांगला पर्याय ठरू शकेल. एकत्र राहून हे कार्य अर्थातच अधिक चांगल्या प्रकारे होऊ शकले असते. एकाजवळ राष्ट्रवादाची स्वयंभू शक्ती व आत्मनिर्भर संघटना होती, दुसऱ्याजवळ समतेची दृष्टी होती. आर्थिक प्रश्नांकडे आजवर तरी हिंदुत्ववाद्यांनी दुर्लक्षच केलेले आहे.दीनदयाळ उपाध्याय हाच काय तो एक सन्माननीय अपवाद. याउलट समाजवाद्यांजवळ नाही आत्मनिर्भरता-जी एखाद्या दृढ श्रद्धेवाचून कधीही निर्माण होत नाही. कम्युनिस्टांजवळ श्रध्दा आहे, तशीच राष्ट्रवाद्यांजवळही आहे. एक कामगारांचे राज्य पृथ्वीवर आणू इच्छितो; दुसऱ्याला हवा आहे बलसागर भारत. समाजवाद्यांजवळ असे काय आहे की, ज्यासाठी वर्षानुवर्षे झुरत राहावे, पिढ्यानुपिढ्या झगडत राहावे ? उपेक्षा झाली, अवमान आणि पराभव झाले तरी न खचता, न विकले जाता, कंटकाकीर्ण मार्गाने ध्वज खांद्यावर घेऊन पुढे पुढे जातच रहावे ? एखादा सखोल आत्मप्रत्यय असला, तरच असे सामर्थ्य, हे निश्चयाचे बळ निर्माण होत असते-जे आज या दुभंगलेल्या स्थितीतही पूर्वाश्रमीच्या जनसंघीयांजवळ दिसते आहे. हिंदुत्ववादातून निघालेली ही राष्ट्रीय पुननिर्माणाची जबरदस्त प्रेरणा आणि समाजवाद्यांची समतादृष्टी यांचा जनता पक्षात संगम होऊ शकला असता, पण ती संधी हुकली. आताही, वेगळा झालेला जो गट असे दोन्ही पंख विस्तारून झेप घेईल, त्यालाच भवितव्य आहे, हे नीट ओळखूनच पुढची वाटचाल केलेला बरी. केवळ हिंदुत्ववाद, केवळ समाजवाद घेऊन हे गट पूर्वीप्रमाणेच अलग अलग चालत राहिले तर लवकरच दोघेही थकतील, गिळंकृतही होतील. विकेंद्रित अर्थरचना असलेला भारतच बलशाली भारत असू शकतो, हे सत्य हिंदुत्ववाद्यांनी ध्यानात घ्यायला हवे व इतर नव्या-जुन्या जनतापक्षीयांनी, समाजवाद्यांनाही गांधीजींचा मुस्लिम अनुनयाचा, अहिंसा परमोधर्मवादाचा पुनर्विचार करून हिंदुत्ववाद्यांची या क्षेत्रातली ऐतिहासिक कामगिरी मोकळेपणाने मान्य करायला हवी. अशा समन्वयातून जो ध्येयवाद, जी विचारसरणी जो कार्यक्रम तयार होईल त्यात जयप्रकाश-गांधीजी असतील, शिवाजी - राणाप्रतापही असतील; नाही तर काहीच उभे राहू शकणार नाही. गांधीवादी समाजवाद असे या समाज विचारसरणीचे नामकरण करण्यात आलेले आहे; पण एखाद्या व्यक्तिनामापेक्षा सरळ भारतीय समाजवाद असेच का म्हणू नये ? प्रत्येक देशाने आपापल्या परंपरेप्रमाणे, लोकरिवाजाप्रमाणे, नाही तरी, समाजवादाची वेगवेगळी रूपे उत्क्रांत केलेली आहेतच. भारतीय किंवा दंडवते-जनता पक्षीयांनी खेड्यांच्या आधुनिक करणावर आधारलेला, समाजवादाचा नवा विकेंद्रित भारतीय नमुना उत्क्रांत करण्याची मनीषा का बाळगू नये ? नेहरूंनी शहरे वाढवली. जनतावाल्यांनी खेडी मोठी करण्याची, आधुनिक करण्याची आकांक्षा बाळगावी, एवढेच शक्य आहे, आवश्यक आहे. यावर जोर दिला तर देश खूप पुढे जाणार आहे. गांधीजींचा सत्तानिरपेक्ष मानवपरिवर्तनाचा प्रयोग ही फार लांबची गोष्ट आहे. सत्तेचा वापर करून, तिचा उपभोग घेऊन, विकेंद्रित समाजवादाचा पर्याय जरी भारतीय जनता पक्ष म्हणा, नुसता जनता पक्ष म्हणा, सिद्ध दाखवू शकला, तरी उद्याचा भारत त्यांचा ऋणी राहील.

एप्रिल १९८०



_________________________________________________________________________________

श्रीग्रामायन
बलसागर

या पूर्वीच्या दोन पुस्तकांप्रमाणेच

निर्माणपर्व

या प्रस्तुत पुस्तकाचा विषय आहे
विकसनशील भारत.

एका खळबळजनक कालखंडातील हे चिंतन.
चळवळीतील प्रत्यक्ष सहभागाची पाश्र्वभूमी लाभलेले.
-शहादे चळवळ, जेपींचे बिहार आंदोलन, आणीबाणी,
जनता पक्षप्रयोग, ग्राहकचळवळ, म्हैसाळप्रयोग...


श्रीग्रामायन या पुस्तकाबद्दल एका तरुण वाचकाने
लिहिले होते - ‘ग्रामीण भारताच्या वाटांचा शोध
घेणाऱ्या कोणाही कार्यकर्त्याला ' श्रीग्रामायन 'मध्ये
रेखाटलेली या ग्रामजीवनाची चित्रं आजच्या काळात
आणि संदर्भात तितकीच ताजी वाटावीत, अशी आहेत.
कदाचित त्यांना वाट पुसतच एखादा पुढली चित्रं चितारू शकेल.'

याच वाचकाने ‘बलसागर'बद्दल लिहिले होते-
‘विविध विचारधारांना खुल्या मनाने
लेखक येथे सामोरा जात आहे. त्यांचे सुस्पष्ट व तर्कसंगत
विश्लेषण येथे आहे आणि आजच्या संदर्भात भारतीय राष्ट्रवादाची
नवी मांडणी करण्याचा प्रयत्नही आहे.'
या पुस्तकात, या 'निर्माण पर्वा'तही हा प्रयत्न आहे,
एक मांडणी आहे.
समन्वयाचे पूर्वसूत्र आणखी पुढे नेले आहे...

_______________________________________________________________________________________