निर्माणपर्व/म्हैसाळ
म्हैसाळ
आबा पिरू कांबळे 'माणूस' कचेरीत एका दुपारी उपस्थितांना आपल्या संस्थेची माहिती सांगत आहेत.
उपस्थितात आहेत पुण्याच्या विद्यार्थी साहाय्यक समितीचे डॉ. अच्युतराव आपटे, साधना साप्ताहिकाचे संपादक यदुनाथ थत्ते, स्वातंत्र्यलढा व विधायक कार्य यांचा दीर्घ अनुभव व पुण्याई पाठिशी असलेले शिरूभाऊ लिमये, नारायणगावच्या सबनीस विद्यामंदिराच्या विस्तारकार्यात महत्त्वाची कामगिरी बजावणारे काँटिनेंटल प्रकाशनचे अनंतराव कुलकर्णी, महाराष्ट्र टाईम्सचे सहसंपादक व ‘युद्धनेतृत्व' कार दि. वि. गोखले, 'आनंदी गोपाळ' कर्ते श्री. ज. जोशी, 'नाझी भस्मासुराचा उदयास्त ' चे लेखक वि. ग. कानिटकर, पुणे विद्यापीठ वृत्तपत्र शिक्षण विभागाचे संचालक ल. ना. गोखले, स्वाध्याय महाविद्यालयाचे प्राचार्य महाजन-
आबा पिरू कांबळे मिरजेजवळच्या म्हैसाळ गावचे एक हरिजन बांधव. 'हरिजन' आहेत हे सांगितले तरच समजावे इतके इतर समाजाशी मिसळून गेलेले. न्यूनगंडाचा लवलेश नाही. म्हैसाळ गावच्या दोनशे हरिजन कुटुंबांच्या जीवन परिवर्तनाचा अवघड प्रयोग आपण करतो आहोत याची उथळ जाहिरातबाजीही नाही. एक प्रसन्न, निर्मळ व्यक्तिमत्व. प्रयोग एका विशिष्ट टप्प्यावर येऊन थोडा अडखळला आहे. यातून वाट काढावी, प्रयोग पूर्णावस्थेला पोचवावा यासाठी चार मंडळींना ते भेटत आहेत. मदतीची नाही, सहकार्याची रास्त मागणी पुढे ठेवीत आहेत.
कांबळे यांना सहकार्याचा पहिला हात मधुकर देवल यांचा लाभला. देवल हे रा. स्व. संघाचे एके काळचे प्रचारक. प्रचारकार्यातून निवृत्त झाल्यावर म्हैसाळ या आपल्या गावी ते शेती करू लागले. पण पिंड ध्येयवादी प्रचारकाचा असल्यामुळे केवळ शेती करावी, व्यवसाय भरभराटीस न्यावा, एवढ्यातच मन रमेना ! हळूहळू गावच्या आर्थिक–सामाजिक जीवनाची त्यांनी पाहणी सुरू केली. गावातील ताणतणाव त्यांनी जाणून घेतले. तीनशे एकर जमीन बाळगणाऱ्या कुटुंबापासून
वर्षातून चार महिने उपासमार सहन करावी लागणाऱ्या कुटुंबापर्यंत विषमता पचवून जगत असलेले हे गाव. निषेधाचा साधा सूर कधी पाच-पन्नास वर्षात गावात उमटला नाही, तर प्रतिकार-विरोधाचे नावच नको. उपासमार, कर्जबाजारीपणा, यातून उद्भवणारी गुलामगिरी-मारहाण हा पिढनुपिढयांचा वारसा इतर ठिकाणांप्रमाणेच येथेही बिनतक्रार, निमूटपणे भोगला जात होता. वर सगळी आबादीआबाद होती. तळ बर्बादीत बुडालेला होता.
या तळाकडेच देवलांचे लक्ष प्रथम गेले. वर्ग संघर्षाची ठिणगी येथे पेटवून देणे शक्य होते. पण देवलांनी दुसरा मार्ग पत्करला. हरिजनांची आर्थिक परिस्थिती सुधारण्याचा, त्यांना आपल्या पायावर उभे करण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला. सरकारी आणि सहकारी संस्थांचे लाभ हरिजनांच्या पदरात बांधण्यासाठी त्यांनी आपल्या संघटनविद्येचे कौशल्य पणास लावले. आपल्याजवळची माया या कामासाठी खर्च केली. सचोटी व हिंमत म्हणजेच पत हे तत्व डोळ्यासमोर ठेवून म्हैसाळ दूध पुरवठा सोसायटी तळापासून व्यवस्थित बांधून काढली. पत नाही म्हणून बँकांचा उपयोग नाही, बँका नाहीत म्हणून पुन्हा सावकाराचे पाय धरण्याशिवाय गत्यंतर नाही, हे गरीब शेतमजुराला, हरिजनाला भेडसावणारे दुष्टचक्र त्यांनी विश्वासाच्या बळावर मोडून काढले. नाहीतर कोण देतो हरिजनांना उत्तम प्रतीच्या म्हशी विकत घेऊन ? कुठलेही तारण नसताना ? आधीच कर्जात बुडालेले हरिजन. त्यात अज्ञान, दैववाद, फाटाफूट, द्वेषमत्सर यांचा बुजबुजाट. शेळीसुद्धा आपल्या दारात बांधण्याची स्वप्ने या समाजाने कधी पाहिली नव्हती. म्हशी आल्या तेव्हा धारा काढण्याचे शिक्षण या मंडळींना देण्यापासून सुरुवात करावी लागली. असा सगळा शेंडीपासून संन्याशाच्या लग्नाची तयारी करण्याचा मामला होता. कसोटी देवलांची होती आणि आबा पिरू कांबळे यांची व त्यांच्या सहकाऱ्यांची होती. एकीकडे आपल्या बांधवांना नवीन जबाबदारी पेलण्याचे शिक्षण द्यायचे, त्यांचा आळस, संशय, अविश्वास झटकायचा, दुसरीकडे गावातील हितसंबंधितांनी आणलेल्या अडथळ्यांनाही तोंड द्यायचे; अशा दोन्ही आघाड्यांवर या मंडळींना झगडावे लागत होते. पण गडी बहादुर ठरले. सावकाराघरचे शिळेपाके ताक सटीसामासी भाकरीबरोवर चाखू शकणाऱ्या हरिजन कुटंबाच्या दाराशी, मालकीची, निदान एकेक म्हैस तरी बांधली गेली. एका वेळच्या दुधाचे पैसे घरी ठेवायचे, दुसऱ्या वेळच्या दुधाच्या पैशातून कर्ज फेडायचे, अशी सोसायटीने घालून दिलेली शिस्त कटाक्षाने पाळली गेल्यामुळे एकीकडे कर्जफेड होत गेली व दुसरीकडे पावसाळ्यात, शेतमजुरीची कामे थंडावल्यावर, हमखास सहन करावी लागणारी उपासमारही टळली.
म्हैसाळ ग्रामपंचायतीच्या प्रशस्त खोलीत एका रात्री ही सर्व मंडळी जमली होती.
पुण्याहून आलेल्या पाहुण्यांचा परिचय वगैरे कार्यक्रम पार पडला. असतील एक साठ-सत्तर लोक. पाहुणे (संपादक माणूस) हरिजनांना प्रश्न विचारून माहिती घेत होते. कुणीच सलग चार ओळी उत्तर देत नव्हते. जो तो दुसऱ्याकडे बोट दाखवीत होता. मळके कपडे, ओढग्रस्त चेहरे, दबलेले भाव; सरपंच व इतर दोन-चार प्रमुख गावकरी वगळता कुणीच म्हैसाळकर या सभेला उपस्थित नव्हते. तरुण चेहरेही दिसले नाहीत. स्त्रिया तर नव्हत्याच. सभा काही फुलेना. खोदून खोदून एखाद्याला विचारावे : पूर्वी तू काय जेवत होतास, हल्ली काय जेवतोस ? मुलं शाळेत जातात काय ? दारू कमी झाली का वाढली ? पुढे काय ठरवलं आहे ? सोसायटी चालू ठेवायची का आपलं पूर्वीचच बरं होतं ? देवल–कांबळे आज आहेत, उद्या नसतील. तुमच्यापैकी कोण कोण सोसायटीचे काम पाहायला पुढे येणार ? कॉलेजपर्यंत शिक्षण झालेले दोन-चार हरिजन तरुण आहेत असे कळले. त्यापैकी आज कुणी कसे हजर नाहीत ? त्यांना या प्रयोगात गोडी वाटत नाही का ? -- अनेक प्रश्न. उत्तरे मात्र तुटक तुटक. मतितार्थ एवढा निश्चित. हल्ली या सर्व मंडळींना दोन वेळ पुरेसे जेवायला मिळते. सावकाराचा धाक वाटत नाही. पूर्वी असे नव्हते. वर्षातून काही महिने तरी उपास सहन करावेच लागत. अधून मधून मारहाणही होई. कर्जबाजारी तर सगळेच होते.
आठवड्याकाठी दोन-दोन, तीन-तीन दिवस उपासमार ही माणसं कशी सहन करीत असावीत ?
अशाही पिळवटलेल्या स्थितीत, कधीकाळी घेतलेल्या दोन-चारशे रुपयांच्या कर्जफेडीसाठी सावकाराघरी वर्षानुवर्षे ही माणसे कशी राबत असतील ?
देवल या पिळवणुकीचे एकेक नमुने माणूस कचेरीतील बैठकीच्या वेळी उपस्थितांना सांगत होते. ऐकूनसुद्धा कुणाचा त्यावर विश्वास बसू शकत नव्हता. शिरूभाऊ, यदुनाथ यांनी मध्येच अडवून विचारले देखील ! ‘हरिजनांची संख्या गावात तशी काही कमी नाही. सावकार-जमीनदारांची मारहाण या मंडळींनी सहन तरी का केली ?'
पिढ्यानुपिढ्या खाली मान घालून वावरणारा हा समाज. साध्या पिण्याच्या पाण्यासाठीही गावकऱ्यांवर अवलंबून असलेला. पायात बळ नाही. पोटांत अन्न नाही. कशाच्या जोरावर प्रतिकार करणार ? एखाद्याने केला तरी बाकीचे त्याला साथ देणार नाहीत. सावकारी कावे काही थोडे का असतात ? प्रतिकारासाठीसुद्धा थोडी संघटित ताकद, आर्थिक बळ असायला हवे. सध्यातरी सहकारी प्रयत्नातून हे बळ जेवढे वाढविता येईल तेवढे वाढवायचे. हरिजनांना, गरीब शेतमजुरांना, हक्काचा बारमाही उद्योग आणि प्रतिष्ठा प्राप्त करून द्यायची,
असा कांबळे-देवलांचा दृष्टिकोन आहे. गावचे वातावरणही आता खूप निवळले आहे, पूर्वी विरोधच होत होता. आता निदान मागितलेला सहकार तरी थोडाबहुत लाभत आहे.
' आनंदी गोपाळ' कर्ते श्री. ज. जोशी यांना ही भूमिका वास्तववादी वाटली. 'बरोबर आहे कांबळे म्हणतात ते. आपण इथे दोनशे मैलावर शहरात राहाणार. स्थानिक परिस्थितीची आपल्याला नीटशी कल्पना नाही. उगाच गरमागरम उपदेश इथे बसून करण्यात काय अर्थ आहे ?' असे श्री. जं. चे मत पडले.
म्हशींबरोवर सोसायटीने हरिजनांना काही गाई देण्याचा प्रयोगही करून पाहिला. पण तो चांगलाच अंगलगट आला. उपस्थितांनी- विशेषतः अच्युतराव आपटे यांनी या अपयशाबद्दल कांबळे-देवल जोडीला चांगलेच धारेवर धरले. देवलांना शेवटी कबूल करावे लागले की, सोसायटीने हे धाडस करायला नको होते.
गाय लाभली नाही, पण म्हशींनी चांगलाच हात दिला. सोसायटीचा कारभार उत्तम चालला, हरिजनांनी घेतलेली कर्जे परत केली, यामुळे मंडळींचा उत्साह अधिकच वाढला. म्हशींसाठी हिरवा चारा हवा म्हणून शोधाशोध सुरू झाली. यातून शेती सोसायटीच्या कल्पनेने मूळ धरले. वास्तविक हरिजनांकडे १९५२ पासून ३६ एकर वैरणीचे सरकारी रान होते. पण हितसंबंधी लोकांनी नाना क्लृप्त्या लढवून या जमिनी हरिजनांकडून केव्हाच लुबाडून घेतलेल्या होत्या. मग सावकारांकडे गहाण पडलेल्या हरिजनांच्या जमिनी सोडवून घेणे, हा एकच पर्याय उरला. देवलांच्या ओळखीने थोडीफार रक्कम कर्जाऊ, देणगी वा दीर्घ-मुदतीच्या ठेवी म्हणून गोळा केली गेली. यातून सावकारांची देणी देऊन जमिनी सोडवून घेण्यात आल्या व जमिनींचे एकत्रीकरण करून ' श्रीविठ्ठल संयुक्त सहकारी शेती सोसायटी ' या संस्थेची स्थापना करण्यात आली. जमीन असणाऱ्यांनी जमीन नसणाऱ्या शेतमजुरांनाही या संस्थेचे लाभ देण्याचे ठरवून सहकारी तत्त्वाला खरा अर्थ प्राप्त करून दिला. काही हरिजन स्त्रियांकडेही किरकोळ जमिनी होत्या. त्यांनीही सोसायटीच्या सामीलनाम्यावर सह्या-आंगठे उठवून हा सहकारी प्रकल्प उचलून धरण्यातील आपला वाटा पुरा केला.
१ जानेवारी १९६९ या दिवशी मा. वसंतदादा पाटील यांच्या हस्ते या हरिजनांच्या-बहुधा महाराष्ट्रातील पहिल्या व एकमेव-सहकारी शेती संस्थेच्या कार्याचा शुभारंभ झाला.
संस्थेकडे ९० एकर जमीन असून त्यापैकी सध्या तीस एकर पाण्याखाली आहे. माळाची आणखी २३ एकर जमीन लिफ्ट इरिगेशनखाली येण्यासारखी आहे. शेती सुधारणा, फळबागविस्तार, हरिजनांसाठी चांगली घरे, शास्त्रीय पद्धतीचे गोठे इत्यादी अनेक योजना संस्थेच्या कार्यक्रमपत्रिकेवर आहेत.
काही सावकरांनी हरिजनांच्या शब्दावर विश्वास टाकून पैसे चुकते होण्यापूर्वीच जमिनींचे ताबे सोडून संस्था उभारणीला मदत केली आहे. ही देणी अद्याप बाकी आहेत. हरिजनांनी या सावकारांना आंगठा दाखविला तर ते आता हतबल आहेत, कायदेशीररीत्या ते काही करू शकत नाहीत, हे खरे आहे. 'आम्ही इकडे आमच्या तुटपुंज्या पगारातून संस्थेला मदत करायची. आणि तिकडे आधीच गबर असलेल्या सावकारांची घरेच भरायची नं ? हा काय सामाजिक न्याय आहे?' असा युक्तिवाद काहींनी केलाही. पण युक्तिवाद म्हणूनही हा तितकासा बरोबर नाही. ज्या लहानसहान जमीनमालकांनी, सावकारांनी हरिजनांवर विश्वास टाकून, गावात काही चांगले घडते आहे म्हणून, पैसे पदरात पडण्यापूर्वीच जमिनी सोडल्या त्यांना टांग मारायची आणि ज्यांनी रोकडा व्यवहार म्हणून अगोदरच पैसे वसूल करून घेतले त्यांच्या निष्ठुर स्वार्थबुद्धीला प्रतिष्ठा व यश मिळवून द्यायचे, हा तरी कुठला आला आहे सामाजिक न्याय ? शिवाय मुख्य प्रश्न दानतीचा आहे. वैयक्तिक व सामाजिक नीतिमत्तेचाही आहे. कुणीतरी, कुठेतरी, दिलेला शब्द पाळण्याची जोखीम स्वीकारणार नसेल, तर सामाजिक अनीतीचे दुष्टचक्र केव्हाच थांबणार नाही. म्हैसाळचे हरिजन ही जोखीम नाकारू इच्छित नाहीत, या प्रवृत्तीचे वास्तविक सर्वानी स्वागतच करायला हवे आहे.
संस्थेच्या उभारणीकार्यात प्रथमपासूनच जाणवणारी ही नैतिकता आज विशेषच मोलाची आहे. सावकारशाही नष्ट व्हायला पाहिजे, विषमता हटली पाहिजे, हे सर्व खरेच आहे. त्यासाठी जे व्यापक प्रयत्न हवेत, आंदोलने हवीत, ती जिथे जिथे होत आहेत - त्या सर्वांचे स्वागतच आहे. पण येथे प्रश्न मर्यादित आहे. दोनशे हरिजन कुटुंबे आपल्या पायावर, आपल्याच पुरुषार्थबळावर उभी राहू पाहत आहेत. इतर समाजाचा दु:स्वास, द्वेषमत्सर न करता. हक्कांच्या जाणीवेबरोबरच कर्तव्याची जबाबदारी ओळखण्याची, झीज सोसूनही ती पार पाडण्याची त्यांची हिंमत आहे. या परिस्थितीत उर्वरित समाजघटकांनी त्यांचेकडे तटस्थ भावनेने, केवळ कौतुकानेही पाहत न राहता, त्यांच्या धडपडीला सक्रीय प्रोत्साहन देणं, हे सामाजिक अभिसरणाच्या दृष्टीने फार उपयुक्त आहे. हरिजनांचा हा प्रकल्प नावारूपाला आला तर आसपासच्या इतरही दहा-पाच गावातून त्याचे इष्ट परिणाम जाणवणार आहेत. आजच शेजारच्या सलगर गावातील हरिजन शेतमजूर या प्रयोगाकडे आकर्षित झालेले आहेत. पण चालकांचा सध्याचा आग्रह आहे मूळ पायाच प्रथम भक्कम करण्याचा. या पायाभरणीत सर्वांनी सामील व्हावे यासाठी संस्थेच्या वतीने एक आवाहनही प्रसृत झालेले आहे. या आवाहनपत्रकात शेवटी म्हटलेले आहे :
‘इतरांच्या पैशाने हरिजनांना पोसावे अशी संस्थेची कल्पना नाही. हरिजनांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यास शिकवणे हे संस्थेचे उद्दिष्ट आहे. पण गहाण जमिनी सोडवून घेण्यासाठी जो एक लक्ष रुपये खर्च आलेला आहे तो देणे हरिजन-
बंधूंच्या आवाक्याबाहेरचे आहे. ती रक्कम मदत म्हणूनच मिळणे जरूर आहे. जमीन सुधारणा व अन्य भांडवली खर्च यासाठी जे सुमारे एक लक्ष पसतीस हजार रुपये लागतील ते 'श्री विठ्ठल संयुक्त शेती सहकारी सोसायटी'ला दीर्घ मुदतीचे हलक्या व्याजाचे कर्ज म्हणून हवे आहेत. हे कर्ज विविध बँका व आर्थिक संस्था यांच्याकडून मिळू शकेल. पण या संस्थांचे व्याज आमच्या संस्थेला आजच्या घटकेला परवडणार नाही. या व्याजापायीच संस्था दुर्बल बनेल अशी भीती आहे.
यासाठी आम्ही आपल्याला मदतीचे आवाहन करीत आहोत.
आपण सोसायटीला देणगी देऊ शकाल किंवा दीर्घ मुदतीच्या कमी व्याजाच्या ठेवी देऊ शकाल. या ठेवी संस्था ५ ते १० वर्षात परत करील.
म्हैसाळच्या सोसायटीत जी शंभर हरिजन कुटुंबे सहभागी झालेली आहेत, ती येत्या पाच वर्षात दुधाच्या धंद्यावर स्वावलंबी होतील अशी कल्पना आहे. त्यांना मदत म्हणून दिली जाणारी रक्कम वीस वर्षांत वसूल केली जाईल. या हप्त्यांमुळे सोसायटीकडे जमणारी रक्कम दरवर्षी दूध उत्पादनाचे नवीन गट निर्माण करण्यासाठी खर्च केली जाईल. यामुळे गावातील सर्व दोनशे हरिजन कुटुंबांना येत्या काही वर्षात कामधंदा मिळेल व ते स्वत:च्या पायावर उभे राहतील, अशी अपेक्षा आहे. म्हैसाळनंतर इतर गावे निवडून तेथेही या पद्धतीने काम करण्याची कल्पना चालकांसमोर आहेच.'
नामवंत मंडळींचा पाठिंबा संस्थेमागे हळूहळू उभा राहत आहे. या नामवंतात समाजातील विविध थरातील, विविध विचारांचे लोक एकत्रित आलेले आहेत, हा कांबळे-देवल यांच्या विधायक कार्यकौशल्याचा एक पुरावाच म्हटला पाहिजे. हे कौशल्यच त्यांना यशाचे शेवटचे टोक गाठून देणार आहे हे उघड आहे. हे टोक थोडे लवकर गाठले जाईल, इतर समाजघटकही थोडे फार हलले, कार्यप्रवृत्त झाले तर. ते होतील अशी आशा आहे.