निर्माणपर्व/यशवंतराव, तर्कतीर्थ आणि बदल



यशवंतराव, तर्कतीर्थ आणि बदल



 श्री. यशवंतराव चव्हाण यांनी जयप्रकाशांच्या चळवळीविरुद्ध अगदी ठाम भूमिका घेतलेली आहे. बोर्डी शिबिरात व नुकत्याच झालेल्या सातारा दौऱ्यात त्यांनी जयप्रकाशांशी राजकीय सुसंवाद साधण्याची कल्पना पूर्णपणे धुडकावून लावली व कुठल्याही तडजोडीला स्पष्ट नकार दर्शवला. याविषयी बचावत्मक भूमिका घेऊ नये, जनतेत जाऊन खंबीरपणे आपली बाजू मांडावी, असाही थोडा आक्रमक सल्ला त्यांनी काँग्रेसजनांना या दौऱ्यात दिलेला आहे. चव्हाण बोले आणि काँग्रेस डोले अशी (सध्या) निदान महाराष्ट्रापुरती तरी स्थिती असल्याने हा सल्ला पूर्णपणे मानला जाईल व धारिया वगैरे किरकोळ अपवाद निकालात निघतील यात काही शंका नाही. तरी बरे, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी जयप्रकाश चळवळीबरोबर असा संवाद व्हायला हवा, असे मत नुकतेच प्रकट केलेले आहे. तर्कतीर्थांचे आणि यशवंतरावांचे जिव्हाळ्याचे संबंध सर्वश्रुतच आहेत. पण चव्हाणांचे हिशोब वेगळे. तर्कतीर्थांना कुठे दिल्लीचे राजकारण खेळायचे आहे ? आणि चव्हाणांना आजवर फक्त दिल्लीच महत्त्वाची वाटत आलेली आहे. त्यासाठी त्यांनी हव्या त्या तडजोडी आजवर केलेल्या आहेत, नको त्या भूमिका घेतलेल्या आहेत. अर्जुनाला जसा झाडावरील पोपटाचा फक्त डोळाच दिसत होता, तसा चव्हाणांना फक्त सत्तेचा पुढचा गोळाच दिसत आलेला आहे. ज्यांच्या हाती सत्तेची सूत्रे असतील त्यांच्याशी यासाठी कधीही, केव्हाही संघर्षाचा प्रसंग न उद्भवू देण्याचे पथ्य चव्हाणसाहेब कटाक्षाने पाळीत आलेले आहेत व त्याचे फळही आजवर त्यांना मिळत राहिलेले आहे. मग तो जुना संयुक्त महाराष्ट्राचा प्रश्न असो, की नवा जयप्रकाशांच्या चळवळीचा प्रसंग असो. तत्त्वापेक्षा चव्हाणांनी व्यक्ती मोठी मानली, जनतेपेक्षा, ध्येयधोरणांपेक्षा वरिष्ठ नेतृत्वावर विश्वास प्रकट केला. आज इंदिरा गांधी जयप्रकाशांच्या चळवळीला कडाडून विरोध करीत आहेत. चव्हाणसाहेब गप्प राहिले असते तरी चालण्यासारखे होते. तसे त्यांचे स्थान बळकट आहे. पण शंकेला जागा नको म्हणून त्यांनीही र. के. खाडिलकरांप्रमाणे एकदम जयप्रकाश विरोधाचा चढा सूर लावला आणि आपले स्थान अधिकच घट्ट करून घेतले.

उद्या इंदिरा गांधींची भूमिका बदलली, तर चव्हाणांची भूमिकाही बदलल्याशिवाय राहणार नाही. कारण चव्हाणांची अशी खास, वेगळी, स्वतंत्र व आग्रही भूमिकाच नसते. उजव्या कम्युनिस्टांच्या सहकार्याबाबत चव्हाणांनी व्यक्त केलेल्या मताबद्दल म्हणूनच आश्चर्य वाटून घेण्याचे कारण नाही. कारण ते आज इंदिरा गांधींचे मत आहे, बाईंचे सध्याचे ते धोरण आहे. उद्या बाई बदलल्या तर यशवंतरावही बदलतील, हे निश्चित. कारण आजवरची यशवंतरावांची, ही, राजकारणात हमखास यशस्वी ठरत आलेली ‘लाईन' आहे, ‘पॉलिसी' आहे. तर्कतीर्थ पडले विचारवंत. त्यामुळे त्यांनी जयप्रकाशांच्या चळवळीला योग्य ते महत्त्व देण्याचे आवाहन केले. पण चव्हाणांची बात निराळी आहे. त्यांना हे सत्तेपलीकडचे जनमानसाचे प्रवाह ध्यानात घेण्याची आवश्यकताच काय ? त्यांनी आपले सत्तेचे बुरूज या निमित्ताने पक्के करून घेतले हे त्यांच्या आजवरच्या लौकिकाला साजेसे असेच आहे. नवीन काही नाही.



 पण एक गोष्ट खरी. चव्हाणांच्या या धोरणामुळे महाराष्ट्रात सुस्थिरता राहिली हेही नाकारून चालणार नाही. महाराष्ट्रातील सत्तांतरेही त्यामुळे तुलनेने खूपच सुरळित व समजुतीच्या वातावरणात पार पडली. संघर्ष फारसे टोकास गेले नाहीत, आतल्याआत तडजोडी होऊन मार्ग निघाले. अर्थात या सुस्थिरतेलाही किती महत्त्व द्यायचे हा प्रश्न आहेच. सुस्थिरता कशासाठी हा खरा प्रश्न आहे. शेतीक्षेत्रात नाईकांसारखा शेतीप्रेमी मुख्यमंत्री असूनही महाराष्ट्र प्रगती करू शकला नाही हे इंदिरा गांधींनी पुण्यात येऊन सांगेपर्यंत कुणाला माहितच नव्हते. उद्योगधंद्यांचे काय झाले ? नासिक-पुणे-मुंबई या त्रिकोणाबाहेर उद्योगधंदे किती निघाले? उत्पादन वाढले का? बेकारी कमी झाली का? अशा मूलभूत पातळीवर महाराष्ट्राच्या सुस्थिरतेची चिकित्सा एकदा व्हायला हवी. सुप्रसिद्ध चव्हाण-दांडेकर (वि. म.) वादात रागवारागवी फार झाली. चिकित्सा व समालोचन झाले नाही. आतापर्यंतची वाटचाल चुकली असल्यास नवी वाट कशी असावी याबद्दलचा थंड, शास्त्रशुद्ध विचार झाला नाही. असा विचार केल्यावर जे उत्तर निघेल ते खरे चव्हाण कालखंडाचे मूल्यमापन. नाहीतर सुस्थिरतेचे उगाचच स्तोम माजत राहील आणि बदलाचे वारे येईनासे होतील.

 जयप्रकाश चळवळीचा तरी दुसरा अर्थ काय आहे ? आज, येथील जनमानसात, बदल हवा अशी तीव्र जाणीव निर्माण झालेली आहे. जयप्रकाश या जाणीवचे प्रतीक आहेत. मंत्रिमंडळात बदल करून किंवा केवळ मुख्यमंत्री बदलून महाराष्ट्र या जाणिवेकडे डोळेझाक करणार आहे का ?

-७

मग एक वेळ अशी येईल,की सुस्थिरतेची किंमत मोजूनही लोक बदलाचे स्वागत करतील. हे खरे आहे, की ही वेळ अजून महाराष्ट्रात आलेली नाही. पण येणारच नाही अशाही समजुतीत कुणी राहू नये.

फेब्रुवारी १९७५