निर्माणपर्व/शहादे
पाप आणि पुण्य जेथे नेहमी एकत्र नांदते तेथे मी, एका दुपारी
एक-दोन वकीलमित्रांमुळे पोचू शकलो होतो.
विनोबाजींची गीता प्रवचने येथे प्रकटली .
असंख्य खुनी दरोडेखोर येथे फासावर लटकले.
तो धुळ्याचा मध्यवर्ती तुरुंग होता.
रविवार असूनही तुरुंगाधिकाऱ्यांनी आरोपींची भेट घेण्याचा आमचा अर्ज विचारात घेऊन त्याप्रमाणे व्यवस्था केली होती.
आरोपी होते एकूण ९६.
सर्वांची भेट घेणे शक्य नव्हते. यादीवरून चार गावांचे चौघेजण निवडले.
सुका झुल्या भिल, अनकवाडे
मोतीराम गुमान भिल, पाडळदे
मंगा दरासिंग भिल, लक्कडकोट
रायसिंग सोन्या भिल, रामपूर
चौघेजण भेटीच्या खोलीत आले. भिंतीशी टेकून माना खाली घालून बसले. या सावल्यांशी काय बोलावे हा प्रश्नच पडला होता.
या चौघांपैकी तीन तर अगदी तरुण दिसत होते. एक जरा उतारवयाचा वाटला.
या सर्वांवर पुढील कलमान्वये फार गंभीर आरोप ठेवले गेलेले आहेत-- कलम १२० (ब) कट करणे, कलम १४७ दंगा करणे, १४८- ठरवून बेकायदेशीर जमाव करणे व गुन्हा करणे, १४९- गुन्हा करून जखम करणे, ३०७- खून करण्याचा प्रयत्न करणे, ३२३- साधी जखम करणे, ३२४- गंभीर जखम करणे व ३९५ -दरोडा घालणे, ३९७-३९८ घातक शस्त्रे हातात घेऊन दरोडा घालणे-
"नाही साहेब ! आम्ही दरोडा घातला नाही, पाटलानीच आम्हाला धान्य नेण्यासाठी बोलावले-" आम्ही उभ्या उभ्या आरोपींची मुलाखत घ्यायला सुरुवात केलेली होती.
शेजारी गणवेशात तुरुंगाधिकारी, वॉर्डर्स उभे होते, त्यामुळे मोकळेपणा असा मुलाखतीत येत नव्हता.
जामिनाचा विषय काढला. या सर्व लोकांना जामिनावर सुटायची इच्छा होती. पण प्रत्येकास ९०० रुपयांचा जामीन कुठून मिळवायचा असा प्रश्न होता.
घरी मुलेबाळे उपाशी होती. जामिनावर सुटले तरी यांना काम मिळण्याची पंचाईत पडणार होती.
यांच्या जमिनी गेलेल्या होत्या. जमिनी मिळाल्या तर शेती करण्याची त्यांची तयारी होती.
‘सरकार तुम्हाला जमिनी देते. पण दारूसाठी, लग्नासाठी तुम्ही कर्ज काढता आणि या जमिनी पुन्हा सावकाराकडे जातात. मग देऊन तरी काय उपयोग'- असा आमचा एक प्रश्न होता.
चौघांपैकी तिघेजण तर म्हणाले की, ते दारू पीत नाहीत. एकाने कबूल केले की, जमीन मिळाली तर दारू सोडायला तो तयार आहे.
मध्येच तुरुंगाधिकारी जरा दुसरीकडे गेले. आम्ही आरोपींना विचारले : लोक असेही म्हणतात की, तुम्हाला पाटलांच्या जमिनी हव्या होत्या. पाटलांनी तुम्हाला धान्य घ्यायलाच जर बोलावले होते, तर हत्यारे कशासाठी घेऊन जमला होतात ? नाही साहेब, हत्यारं नव्हती. आम्हाला धान्य हवे होते. पाटलांनी आम्हाला तसा निरोप दिला होता.'
‘हत्यारं नक्की नव्हती ?'
'नव्हती. खरं सांगतो.' ....
हत्यारे होती, हत्यारे नव्हती, धान्य लुटायला जमले, धान्य घ्यायला जमले. गेले चार दिवस आम्ही यासंबंधीच्या उलटसुलट कथा ऐकत होतो. नक्षलवादी उठावापासून शेतमजुरांना धान्य देण्याघेण्याच्या नेहमीच्या साध्या व्यवहारापर्यंत सर्व तऱ्हेचे तर्कवितर्क लोक लढवीत होते.
ज्यांच्या शेतात ही घटना घडली ते श्री. जगन्नाथ पाटील तर फारच नर्व्हस दिसले, विषण्ण होते.
‘सांगा, अशा परिस्थितीत आम्ही शेती करायची की नाही ?' पाटीलवाडीवर - त्यांच्या शेतीवाडीवर आम्ही चार-सहा लोक त्यांना भेटायला गेलो तेव्हा उतरलेल्या स्वरात, अधूनमधून ते आम्हालाच प्रश्न विचारीत होते.
जगन्नाथ पाटील यांनी सांगितली ती घटना अशी :
दोन मे १९७१. रविवार होता. सकाळी स्नान वगैरे नुकतेच आटोपले होते. इतक्यात कामावरच्या माणसांनी सांगितले की, गर्दी येते आहे. पाठोपाठ वाडीच्या मुख्य रस्त्यावरून जमाव आत येताना दिसला. सगळे लोक रांगेत, चालत येत होते. तिरकामठे, भाले वगैरे हत्यारे जमावाच्या हातात होती. त्यामुळे एकदम भीतीचे वातावरण निर्माण झाले. कामावर येणाऱ्या गड्यांना बाहेरच अडवले गेले. जमावाने मुख्य इमारतीला घेराव घातला. आतले कुणी बाहेर पडू शकत नव्हते. बाहेरूनही कडेकोट बंदोबस्त होता.
गणपतने सुरुवात केली. 'गरिबी हटवण्यासाठी आम्ही आलो आहोत. सरकार आता आमचंच आहे-' असलं काहीतरी तो सांगत होता. त्याने धान्याची मागणी केली. कोठार फोडून धान्य घेण्याचा त्यांचा निश्चय दिसला. प्रतिकार करणे शक्यच नव्हते. मी किल्ल्या टाकल्या. दोन लहान मुलांना जवळ घेऊन बसून राहिलो.
तीन चार तास कोठाराची लूट चालू होती. ५०-६० क्विंटल गहू, ३०-४० क्विंटल ज्वारी असे मिळून सुमारे शंभर क्विंटल धान्य तरी त्या दिवशी लुटले गेले. मी काही हालचाल करू शकत नव्हतो. कारण हातात भाले घेऊन दोनचार जण माझ्या शेजारीच उभे होते.
गणपत हा सर्व जमावाचा पुढारी. तो इतका दारू पिऊन आलेला होता की, माझ्यासमोर त्याने किलो दीड किलो ज्वारीचे दाणे फस्त केले.
आवारात सिमेंटची काही रिकामी पोती पडलेली होती. बऱ्याच जणांनी या पोत्यात भरून धान्य नेले. काहींनी धान्य नेण्यासाठी गाड्याही बरोबर आणलेल्या होत्या. घरातल्या व शेतावरच्या गडीमाणसांनाही धान्य बळजबरीने न्यायला लावले.
नंतर असे कळले की, बाहेर मुख्य रस्त्यावरच्या ट्रक्स व एस. टी. गाड्याही जमावाने अडकवून ठेवलेल्या होत्या. त्यामुळे बातमी लवकर पसरली नाही.
दुपारी ११-११।। पर्यंत हा प्रकार आत चालू होता.
नंतर लोक गेल्यावर मी शहादे (तालुक्याचे गाव, पाटीलवाडीपासून अंतर सुमारे दहा मैल) पोलीस स्टेशनला फोन केला. पोलीस पार्टी आली. धान्य घेऊन जाणाऱ्यांपैकी काहींना वाटेतच पोलिसांनी पकडले.
पण बहुतेकजण गावी सुखरूप पोचलेले होते. शंभर क्विंटलपैकी पंधरा एक क्विंटल धान्य पोलिसांना परत मिळाले.
आम्ही मंडळी दोन-तीन तास पाटीलवाडीवर होतो. सकाळी जगन्नाथ पाटील यांचे वडील डॉ. विश्राम हरी पाटील यांचीही शहादे मुक्कामी गाठ घेतलेली होती. या दोघांनी सांगितले की, नेहमीच्या लोकांचे हे कृत्य नाही. आसपासच्या चार-पाच गावातील लोक तरी या जमावात नसावेत. गेल्या ३०-४० वर्षात कधीही पाटीलवाडीला असला प्रकार घडलेला नव्हता.
मजुरांशी, आदिवासींशी पाटलांचे संबंध अतिशय चांगले होते. विश्राम हरी पाटलांनी तर सांगितले की, आयुष्यात त्यांनी कधी पै-पावण्याची सावकारी केली नाही. असंतोष असण्याचे काही कारणच त्यांना दिसत नव्हते.
आम्ही दोन-चार प्रश्न सकाळी वडिलांना व दुपारी मुलालाही विचारले !
१ : सातआठशे-हजार लोक जमतात आणि आदल्या क्षणापर्यंत तुम्हाला याची कुणकुणही लागू नये, हे जरा चमत्कारिक वाटते. वाहनांची सोय नसता, या डोंगराळ भागात एवढा जमाव गुपचुप जमविणे फार अवघड आहे.
२ : दरोडे साधारणतः रात्री घातले जातात. जमावाने या वेळी सकाळची वेळ का निवडावी ?
३ : धान्याव्यतिरिक्त एकही मौल्यवान वस्तू घरातून हलवली जात नाही. सगळे जिथल्या तिथे होते. दरोडेखोरीत, लूटमारीत हे बसत नाही.
४ : लुटीतही काही गडबड गोंधळ उडालेला दिसत नाही. सगळेजण शांतपणे आपापला ठराविक मोजका वाटा जसा काही नेत आहेत. हेही दृश्य जरा वेगळे वाटते.
५ : एक सज्जन आणि प्रगतिशील शेतकरी म्हणून डॉ. विश्राम हरी पाटलांना या भागात फार मान आहे. आदिवासी शेतमजुरांचे शोषण करणारी, त्यांचेवर दिवसाढवळ्या जुलुम व अत्याचार करणारी शेकडो गुजर पाटील मंडळी व बडे जमीनदार या भागात हयात असताना जमावाने विश्राम हरी पाटलांच्या शेतीवाडीवरच आपले लक्ष का केन्द्रित करावे ?
या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे अद्याप तरी आम्हाला मिळालेली नाहीत.
पाटीलवाडीनंतर दुपारी घडले म्हसावद प्रकरण. म्हसावद हे पाटीलवाडीजवळचे ३।४ मैलांवरचे गाव. जमावापैकी काहीजण या गावचे होते. गोळा केलेल्या धान्याची गाठोडी घेऊन हे लोक गावाकडे परतत होते. काही गावात पोचले, काही वाटेत होते. पुढच्या घटना एका पत्रावरून समजून घेणे चांगले. या भागातील एक सर्वोदयी कार्यकर्ता रतीलाल मराठे याने आपल्या मुंबईच्या कार्यालयाला लिहिलेले हे पत्र आहे. या पत्रात रतीलाल लिहितो -
आपण मागितल्याप्रमाणे मी खालीलप्रमाणे माहिती पाठवीत आहे. आदिवासी समाज अशिक्षित व सुधारलेल्या भागापासून दूर अशा विखुरलेल्या भागात रहात असल्यामुळे व आर्थिकदृष्ट्या मागासलेला असल्यामुळे त्या विभागातील सावकार या आदिवासी समाजाची पालेमोड पद्धतीने, म्हणजे अल्प मुदतीचे कर्ज देऊन किंवा धान्यकर्ज देऊन शेतीचा माल निघाल्यावर दिडीने अगर दुपटीने वसूल करून घेतात. किंवा शेतीमध्ये राबवून दिलेले पैसे किंवा धान्य वसूल करून घेतात. त्यातील एक श्री. विश्राम हरी पाटील हे आहेत.
पहिल्याने दोन चार आदिवासी पाटीलवाडी येथे आम्हाला खाण्यासाठी धान्य पाहिजे म्हणून तपास करण्यासाठी गेले असता श्री. जगन्नाथ विश्राम यांनी सांगितले की, उद्या येऊन धान्य घेऊन जा.
ठरल्याप्रमाणे २-५-७१ रोजी शे-सव्वाशे आदिवासी येथे गेले. (इकडच्या आदिवासींच्या हातात नेहमीच हत्यारे असतात. काठी वगैरे) हातात काठ्या वगैरे होत्या.
पाटीलवाडीला जाऊन आदिवासी जगन्नाथभाईंना भेटले व आम्हाला चारचार पायली दादर (ज्वारी) पाहिजे असे सांगू लागले. जगन्नाथभाई दोन-दोन पायली दादर देऊ असे सांगत होते. शेवटी चार-चार पायली धान्य देण्याचे कबूल केले व त्यांच्या सालदारांना सांगितले की, यांना प्रत्येकाला चार-चार पायली धान्य मोजून द्या. धान्य मोजून देत असता श्री. जगन्नाथभाई जवळच खुर्ची टाकून बसले होते. व त्यांच्या पत्नी पण उभ्या होत्या. याप्रमाणे धान्य मोजून दिल्यावर आदिवासी आपापल्या गावाला परत गेले. काही १२।१३ आदिवासी म्हसावदकडचे होते, तेही म्हसावदला आले. इकडे श्री. जगन्नाथभाईंनी पोलीस स्टेशनला तोंडी निरोप पाठविला. हा हा करता पोलीसयंत्रणा म्हसावदला येऊन पोचली. तसेच प्रत्येक गावचे गुजर लोक आपापली वाहने हत्यारे घेऊन म्हसावदला जमा झाले. म्हसावदकडे गाठोडे घेऊन येणाऱ्या आदिवासींना ते मारायला जात होते. पो. स. इ. श्री. भावसार यांनी गुजर लोकांना सांगितले की, तुम्ही गर्दी करू नका. मी आदिवासींना विचारपूस करतो. पण गुजर लोकांनी त्यांचे ऐकले नाही. आदिवासींना मारठोक चालू केली व बांधून ग्रामपंचायतीच्या ऑफिसमध्ये घेऊन गेले. तसेच सर्व म्हसावद गावातील आदिवासींना घरात जाऊन मारले व बाहेर काढले. त्यांच्या घरातील सर्व धान्य जप्त केले. गुजर लोक जास्तच जमा झाले व आदिवासींना मारू पिटू लागले व ट्रॅक्टर्स करून इस्लामपूर लक्कडकोट येथे आदिवासींना मारण्यासाठी गेले.
ही बातमी एका आदिवासीने त्यांचा मुख्य गणपत पालद यास कळविली. गणपत आपले काही सोबती घेऊन चिकड्याहून निघाला. ट्रॅक्टरवाल्यांचा पाठलाग केला. ते म्हसावदला पळून आले व तेथे दोन्ही गटात बाचाबाची झाली. आदिवासी १५-२० होते. त्यांच्या हातात तिरकामठे होते. गुजर मात्र जास्त संख्येने व वाहनासहित आणि हत्यारासहित होते. आदिवासी तीर चालवायचे, गुजर आपली बंदूक-पिस्तोल चालवायचे. यात एका आदिवासीला गोळी लागली व (तो) ठार झाला. एकाला नाकाजवळ गोळी लागली. तो जिवंत आहे. याप्रमाणे घडल्यावर पुलीसयंत्रणा जोरात चालू झाली व शेकडो आदिवासींना पकडले व मारहाण केली. अजून मारहाण चालूच आहे. जे आदिवासी अटकेत आहेत त्यांची नावे बंडिंग सुपरवायझर श्री. बी. आर. पाटील यांच्याकडून घेतलीत. कारण सर्व आदिवासी बंडिंगच्या कामावर जात होते. याप्रमाणे पाटीलवाडी प्रकरण घडले.
अटकेत असलेले आदिवासी पिरग, लक्कडकोट, म्हसावद, आनकवाडे, आवगे, सुलवाडे, पाडळदे इत्यादी गावचे आहेत.
शहाद्याला सरकारी डॉक्टर गुजर समाजाचे आहेत. म्हणून त्यांनी मेलेल्या माणसाचा खोटा रिपोर्ट दिला की, बंदुकीच्या गोळीने मेलेला नाही. तीरकामठ्याने मेला आहे. प्रेत नदीत पुरले. नंतर डी. आय. जी. आले. त्यांनी प्रेत (उकरून) धुळ्याला पाठविले. तेथे आदिवासीच्या शरीरातून दोन गोळया निघाल्या.
म्हणजे म्हसावदला दोन समाजात दोन मे या दिवशी दुपारी एक लढाईच जुंपलेली होती. दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत ही लढाई थांबलेली नव्हती. रतीलालच्या वरील पत्रात न आलेला या लढाईसंबंधीचा आणखी काही तपशील असा आहे-
सुरुवातीला जरी आदिवासींची संख्या रतीलालने कळविल्याप्रमाणे १५-२० असली तरी लवकरच ती वाढली. 'आपला एक माणूस गुजरांनी ठार केला, ही बातमी वणव्यासारखी पसरली व आसपासच्या गावातून बराच मोठा आदिवासी समाज हत्यारे सरसावून म्हसावदला गोळा झालेला होता.
चिडलेल्या व बदला घेण्याची भाषा बोलणाऱ्या आदिवासींवर ताबडतोब गोळीबार वगैरे न करता परिस्थिती थोडी संयमाने व समजुतीने हाताळण्याचा प्रयत्न करणारे पोलीस सबइन्स्पेक्टर भावसार कामावरून तात्पुरते बडतर्फ झालेले आहेत. (suspended)
ठार झालेला आदिवासी गुजर समाजापैकी एखाद्याच्या हातून बंदुकीच्या गोळीने मेला नाही, दुसऱ्या आदिवासीच्या तीरकामठ्याने तो मेला, असा पुरावा
उभा करण्यासाठी खोटा मडिकल रिपोर्ट देणारा शहाद्याचा डॉक्टरही सध्या बडतर्फ आहे. पण या बडतर्फीचे कारण म्हणून आम्हाला जे देण्यात आले ते असे : He was unqualified. (अरे, तो जर अपात्र होता, तर इतके दिवस तो या जागेवर होताच कसा ? त्याची नेमणूक का झाली ? )
पोलिसांच्या या धरपकडीत या भागातील आदिवासी काँग्रेस आमदारांचा मुलगाही सापडलेला आहे. या आमदारांची शिफारस खुद्द विश्राम हरी पाटलांनीच शिक्षणमंत्री मधुकरराव चौधरी यांचेकडे केलेली होती म्हणतात.
गोळीबाराच्या, खुनाच्या या मोठ्या आरोपांवरून पकडले गेलेले नऊ गुजर लोक जामिनावर ताबडतोब सुटले. धुळ्यातील एक प्रख्यात वकील या मंडळींचे कामकाज पहात आहेत. आदिवासींची ही बाजू कमकुवत असल्याने पाटीलवाडी-म्हसावद प्रकरणातील सर्व आदिवासी आरोपी अद्याप धुळ्याच्या तुरुंगात डांबले गेलेले आहेत.
श्री. पी. के. पाटील हे या भागातील गुजर-पाटील-कोळी या वरिष्ठ समाजाचे एक वजनदार पुढारी. येथील साखर कारखान्याचे ते अध्यक्षही आहेत. असे कळते की, म्हसावद प्रकरणाची गुप्त चौकशी करण्यासाठी आलेल्या सी. आय. डी. अधिकाऱ्यांंची खास बडदास्त या साखर कारखान्यात ठेवली गेली होती.
म्हसावदला जमलेला आदिवासी जमाव ठार झालेल्या आदिवासीचे प्रेत ताब्यात घेतल्याशिवाय जागचा हलायला तयार नव्हता. 'प्रेत द्या नाहीतर आमच्या महाराजांना बोलवा. ते सांगतील तसे आम्ही करू. तुम्ही गोळीबार करा नाहीतर काय वाटेल ते करा. आम्ही हलणार नाही,' असे आदिवासींनी पोलिसांना निक्षून सांगितले. पोलिसांना शेवटी आदिवासींची ही मागणी पुरी करावी लागली. दोन तारखेला रात्रभर बरेच आदिवासी म्हसावदला तळ ठोकून यासाठी बसलेले होते. दुसऱ्या दिवशी, तीन तारखेला दुपारी, आदिवासींचे महाराज म्हसावदला पोचले. त्यांनी आदिवासींची समजूत घातली. जी माणसे पोलिसांना हवी होती ती गर्दीतून वेगळी काढून पोलिसांच्या हवाली केली. इतरांना घरोघर परत जायला सांगितले.
म्हसावदला तीन तारखेच्या संध्याकाळपर्यंत अशा रीतीने शांतता प्रस्थापित झाली.
□
महाराज
एक तीस बत्तीस वर्षांचा तरुण भिल्ल.
वर्ण काळासावळा. मध्यम उंची. गोल, हसरा, निरागस चेहरा. ओसंडणारी मुग्धता !
शहरात जे हसू प्रयत्नपूर्वक कमवावे लागते ते येथे कसे सहज उमलत असते, खुलत असते !
आदिवासीच्या अंतर्बाह्य निर्मळतेची ही एक खूणच आहे.
ही निर्मळता मात्र आता फार थोड्या काळची सोवतीण आहे. आधुनिक यंत्रयुगामुळे तिचा फार वेगाने चोळामोळा होत आहे.
चोळामोळा न होता, आधुनिकतेच्या आणि नैसर्गिकतेच्या सीमारेषेवर आज घोटाळत असलेले ' महाराज' हे एक निराळे व्यक्तिमत्त्व.
चार वर्षांपूर्वी हा भिल्ल तरुण आम्हाला भेटला, सातपुडा सर्वोदय मंडळाचा कार्यकर्ता म्हणून.
त्यावळी तो भजने वगैरे म्हणतो असे ऐकले होते. पुढे भजनाबरोबर आदिवासींना तो थोडाथोडा उपदेश करू लागला. भांडू नका. दारू सोडा. एकी करा. वगैरे.
हा उपदेश हळूहळू मानला जाऊ लागला.
लक्कडकोट गावची एक भानगड याने आपापसात तडजोड घडवून मिटवली.
एका पावरा आदिवासीचे एका भिल्ल मुलीशी लग्न झालेले होते. पावरा-भिल्ल हा वाद सातपुडा आदिवासींमध्ये आधीच असल्याने हा आंतरजातीय संबंध तसा फारसा कोणालाच रुचलेला नव्हता. त्यात पुढे नवरा-बायकोचे जमेनासे झाले. नवरा बायकोला नांदवतही नव्हता, सोडतही नव्हता. यावरून भिल्ल आणि पावरा आदिवासींमध्ये भयंकर तेढ़ माजली. पावरांनी भिल्लांच्या झोपडया जाळल्या. तिरकामठे ओढण्यापर्यंत पाळी आली. पोलिसांनाही हे प्रकरण आवरेना.
हा भिल्ल तरुण लक्कडकोटला पोचला. दोन्ही पक्षांच्या लोकांना त्याने एकत्र आणले. समजूती काढल्या. बायकोची नवऱ्यापासून सुटका केली. जळलेल्या झोपड्या जाळणाऱ्यांंकडून बांधवून घेतल्या. पोलिसात गेलेले प्रकरण कुशलतेने मोकळे करून घेतले.
लोक हळूहळू या तरुणाला मान देऊ लागले. त्याला ‘महाराज' म्हणू लागले.
नवराबायकोची घरगुती भांडणेही या महाराजाच्या निवाड्याने सुटू लागली.
तो चार वर्षांपूर्वी भेटला तेव्हा आम्ही सर्वजण त्याला अंबरसिंग म्हणत असू. अरे-जारे करत असू. अक्राणी भागातील आमच्या दौऱ्यात तो सामानाची व्यवस्था पाहत होता.
मोठा गोड बोलायचा, वागायचा. वाटेत भेटणा-या डोंगरांची नावे सांगायचा. आसपास घडलेल्या कथा ऐकवायचा.
तो नणंदभावजयीचा घाट तर आजही आठवतो. दोघी नणंदा-भावजया आम्ही चाललो होतो त्याच मार्गाने निघाल्या होत्या. दिवस उन्हाळ्याचे होते. तहानेने फार व्याकुळल्या. सातपुड्याची एक रांग ओलांडून झाली. दुसरी आली आणि गेली. तरी पाण्याचा थेंब आढळेना. चालता चालता दोघीजणी एका टोकावर थांबल्या. त्राण संपले होते. पुढे पाऊल टाकवेनासे झाले. आसपास वस्ती नाही. बरोबर सोबत नाही. खूप तडफडल्या. शेवटी वाघाने खाल्ले की, टोकावरून त्या खाली दरीत कोसळल्या हे आदिवासींना माहीत नाही. त्यांचा शेवट येथे झाला असे तो मानतो एवढे खरे.
ही जागा आजही सातपुड्यातील आदिवासींचे एक पूजास्थान आहे. जातायेताना आदिवासी स्त्री-पुरुष येथील एका झाडाला एखादी बांगडी, एखादी तांबडी चिंधी अडकवल्याशिवाय सहसा पुढे सरकत नाही.
फार पूर्वी घडलेली ही कथा. आजही उन्हाळ्यात या भागातला आदिवासी पाण्यासाठी तडफडतच असतो.
अंबरसिंगचे शिक्षण मॅट्रिकपर्यंत झालेले आहे, हे मला आताच समजते आहे. भजने वगैरेचे पाठांतर तर खूप वाढले आहे म्हणे.
हा मूळ शहाद्याजवळच्या पाडळदा गावचा रहिवासी.
गाववाला म्हणून साहजिकच पाडळद्याचे भिल्ल आपल्या तक्रारी घेऊन याचेकडे वरचेवर येऊ लागले. हाही त्यांची लिखापढीची, कोर्ट-कचेऱ्यांची , पोलीस खात्यातली कामे करून देत राहिला.
पाडळद्याच्या भिल्लवस्तीतून अशा स्वरुपाच्या तक्रारी सरकार दरबारी गुदरल्या जात होत्या -
अर्जदार : सिताराम लिंबा भिल्ल. राहणार पाडळदे बु. ता. शहादे. विनंती अर्ज करितो की -
सन १९६९ साली मार्च महिन्यात होळीच्या अगोदर मौजे मचकुर गावात गुजर व कोळी समाजाच्या लोकांनी आमचे आदिवासी वस्तीवर भयानक दंगा केला होता आणि आम्हा सर्व मुलाबाळांना हालअपेष्टेत ठेवले होते. दंगलीच्या परिस्थितीत आमचे वस्तीत येऊन माझ्या घरात श्री. श्रीपत विठ्ठल हा स्वतः आत
येऊन बाकी सर्व १००-१५० लोक बाहेर शांततेचा भंग करून मला मारून टाकण्याची धमकी देत होते. तशात दर्शविलेला इसमाने माझे कापणीचे धान्य (दादर-ज्वारी) ही सर्व एकूण १।। मण काढून घेऊन गेला होता. सदरचे धान्य मला आजपावेतो मिळाले नाही. सध्या माझी गरिबीची परिस्थिती असल्यामुळे माझी मुलेबाळे आता उपाशी राहतात. करिता माझे गेलेले धान्य मला सुरक्षितपणे मिळून देतील ह्या अपक्षेने धाव घेत आहे. तसेच सध्या उद्योगधंद्यालासुद्धा वाव मिळू देत नाहीत. तरी त्यांच्या धास्तीतच मी माझे जीवन कंठित आहे. तरी कृपादृष्टीने सदरच्या आडदांड लोकांपासून भिती बंद करून माझे धान्य सत्वर मिळवून देतील हीच विनंती.
सही-सिताराम लिबा
अर्जदार : मंगी भ्रतार दुल्या भील रा. पाडळदे बु. विनंतीपूर्वक अर्ज करिते की -
मागे आमचे गावात गुजर व कोळी समाजाचे लोकांनी दंगा उपस्थित करून आमचे समाजावर भयंकर असा अन्याय केलेला आहे. सदर प्रसंगी आम्ही सर्व एकूण १२ बाया भुईमुख शेंगा सरवा करण्यास गेलो असताना आम्हाला शेतातच १ : श्री. भाईदास मदन २ : उद्धव छगन ३ : रमण भाईदास इत्यादी लोकांनी आम्हा स्त्री जातीला इज्जत सोडून वागणूक करून परत गावातील मजीतच्या घरात कोंडून ठेवले व छेडछाड करून लाकड्यांनी मारले व आमचे जवळून प्रत्येकीकडून जबरदस्तीने ७ रुपये वसूल केले आहेत व बलात्कार करून आमची इज्जत चौवढ्यावर आणली. तरी सदर लोकांनी आमच्या स्त्री जीवनाची हानी केली. त्यावर म. सदर लोकांबाबत योग्य रीतीने चौकशी करून आमची झालेली नुकसानभरपाई करून मिळून देण्याची व्यवस्था करावी. तसेच आम्ही वेचून आणलेल्या शेंगाच्या गाठोड्या प्रत्येकीजवळ सुमारे १० किलोप्रमाणे होत्या. त्यासुद्धा सोसायटीत जमा करून घेतल्या आहेत. करिता विचार करण्यात यावा.
आंगठा-मंगी भ्र. दुल्या
भिलाटीत-भिल्ल वस्तीत दारू फार. भिल्लांना-आदिवासींना-दारूच्या पिपातून बाहेर काढणे हे महाकठीण कर्म. निघता निघता घसरतील, बाहेर निघाले तरी पुन्हा आत उड्या घेतील. आदिवासींमधून एखादा गडकरी जन्माला आला तर बहुधा तो आपल्या नाटकाचे नाव 'एकच प्याला' न ठेवता ‘एकच पीप' असे ठेवील. सभा घेऊन, वरचेवर प्रतिज्ञा वदवून घेऊन, पंचांमार्फत ठराव वगैरे संमत करवून घेऊन या व्यसनातून भिल्ल-आदिवासींची सोडवणुक
करण्याचा अंबरसिंगचा प्रयत्न चालूच असतो. तरी ठराव बारगळतात, प्रतिज्ञा विसरल्या जातात. मग असा एखादा कबुली जबाब लिहून घ्यायचा आणि गाडे पुढे ओढीत राहायचे -
तारीख १५।५।७०
मि नामे परशराम एलजी भील लेखी पंचासमोर लिहून देतो की पाडळदे गावामध्ये दारूबंदी केल्यामुळे पाडळदे गावात दारू कोणी पित नाही आणि दारू पिऊन भिलाटीमध्ये शांततेचा भंग केला आहे. त्यानुसार मला भिलाटीमधील लोकांनी तसे सांगितले व ताकिद दिली आणि एवढेच नाही तर मला त्यांनी मारहान केली म्हणून मि पंचासमोर हात जोडून विनंती करतो की यापुढे अशी चुकी होणार नाही असे मी वागेन आणि दारूबंदीचा भंग भिलाटीमध्ये करणार नाही अशी माझी दोघे हात पंचासमोर जोडून नम्र विनंती आहे.
सही XXX
साक्षदार १, २, ३, ४.
पूर्णविराम नसलेली, ऱ्हस्वदीर्घाची शुद्ध गेलेली, विरामचिन्हे, अनुस्वार हरवलेली, मोडक्यातोडक्या मराठीतली पत्रे, अर्जविनंत्या यांचा अंबरसिंगकडे असा ओघ सुरू होता. गुजरपाटील वर्तुळात तो अप्रिय ठरणे आता स्वाभाविकच होते. दबलेला आदिवासी समाज या माणसामुळे थोडा धिटावतो अहे, अन्यायाच्या प्रतिकाराची हवा हळू हळू निर्माण होते आहे, याचा अर्थ काय ? हे वेळीच थांबवले पाहिजे ! अंबरसिंगाबरोबरच त्याच्या संस्थेची पाळेमुळेही उखडून टाकली पाहिजेत ! यासाठी कानाला कान लागू लागले. कंड्या पिकल्या, पसरल्या. अंबरसिंगबरोबर सातपुडा सर्वोदय मंडळाचा उद्धारही होऊ लागला. एक मित्र लिहितो (२१-५-७०)-
श्रद्धेय अंबरसिंगभाई याचे सेवेशी
आपण पाठविलेली टपाल मि ठिक १२ वाजेला पोचती केली आहे. त्यानुसार सोबत पाकिटात मि रजिस्टर पावती पाठविली आहे कळावे. दादा साक्षीसाठी गुजर लोक फकीरा पुरमल याला जबरदस्तीने मोटारीत १० रुपये रोज देऊन नंदुरबारला घेऊन गेले आहेत. त्याजबरोबर नेहरूनगरमधील २ इसम आहेत त्यांचे नाव मला माहीत नाही. मात्र एक आपल्याच भिलाटीतील फकीरा हा तर उघडच आहे. दुसरे असे की पाडळदे गावातील सजातीय गुजर समाजातील बायांचे म्हणणे आहे की अंबरसिंग हा भूदानमधले सर्व पैसे चोरून घेतले आहे व तिकडे भरून दिले आहे. त्यामुळे आपल्या गुजर लोकांना त्रास देत आहे. तसेच इतर दुसऱ्या गोष्टी म्हणजे शेती ही काय अंबरसिंगच्या बापाची थोडी
आहे, त्यांची काय गुजर लोकांनवर ठेव थोडी आहे अशा इतर अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. भेटीअंती खुलासा होईल पण या गोष्टी शींगदाणे फोडणाऱ्या बायांच्या तोंडून आयकले आहे तसेच दादा सजातीय गुजर लोक गावात अशी अफवा उठवत आहेत की पुष्कळ माणसे आपण जिरवून दिलेत तर हा कुठे मोठा लिडर वाया चालला आहे की तो आपल्याने जिरणार नाही केव्हाही शक्य आहे मिनिस्टर पाडवी दिगंबर नरसि यांना जिरवून दिले तर याची काय कथा. लीडर मारू शकतो तर हा आपल्या मानाने शुल्लक मनुष्य आहे तर आपण सावधान राहावे कारण दादा गावात अशी चर्चा प्रत्येक पाडळदे गावातील गुजर लोकांच्या घरी चालत असते कारण तो सध्या भूदानमध्ये फुकटाचे खाऊन आणि मुंदडाजीचा बगलबच्चा राहून तो फार उंटावरचा शहाना झाला आहे याला कारण सर्व भूदान आहे नाहीतर त्याने मुळीच शहाणपणा केला नसता पण असो काही हरकत नाही असे वातावरण पाडळदे गावात सजातीय गुजर लोकांच्या घरी चालतात कळावे. दादा फार लिहावेसे वाटते पण भेटीअंती जास्त बोलत येईल पत्राचे उत्तर ताबडतोब करावे.
आपला विनित
ठाकरे (परशराम)
पत्राखाली डाव्या बाजूला अंबरसिंगने आपल्या हस्ताक्षरात नोंदलेला एक शेरा - ‘दिगंबर पाडवी मृत्यूचा उल्लेख आहे'
आदिवासींवरील अन्याय आणि अंबरसिंगकडे येणारे असे तक्रार अर्जाचे ढीग, दोन्हीही वाढत होते.
- शाळेसाठी वर्गणी हवी. यात भिल्लांवर सक्ती !
- शाळेत भिल्ल- आदिवासी मुले बसत नाहीत, वसू दिली जात नाहीत !
- केलेल्या कामाची मजुरी मागण्यासाठी भिल्ल घरी आला.मालकाने तोंडात दिली.
-पिकाची चोरी केल्याबद्दलचे कठोर प्रायश्चित्त-आदिवासींच्या झोपड्यावरची कौले, घरातले सामानच काढून आणले.
--शंभर शंभर आदिवासी कुटुंबांना मुलाबाळांसकट दहशतीमुळे गाव सोडून, शहाद्याजवळच्या नदीच्या पात्रात बेवारशासारखे वर्ष वर्ष राहावे लागले.
--मारझोड आहे, दमदाटी-शिवीगाळ आहे, प्रसंगी बहिष्कार टाकून कोंडीही केली जात आहे.
काही घटना अर्जातून कळविण्यापलीकडच्या असत.
अंबरसिंगच्या प्रत्यक्ष मावशीचीच कथा. अंबरसिंगने सांगितलेली. आम्ही समक्ष बाईच्या तोंडून तिच्या झोपडीत जाऊन ऐकलेली.
-सकाळी नवरा कामाला गेला. बाई दळायला म्हणून बाहेर पडण्याच्या विचारात. समोर उत्तम हांडू कोळी उभा. त्याच्या हातात भाला असतो. धडीबाईला दळणाचे टोपले खाली उतरवून बाजूस ठेवावे लागते. ओरडलीस तर ठार करीन या दरडावणीपुढे तिचे काही चालत नाही. उत्तम तिला 'वापरून'मोकळा होतो.
धडीबाई त्यावेळी पंधरा दिवसांची बाळंतीण असते.
मुले जवळपासच असतात.
वेळ सकाळची ९-९।। ची असते.
नवरा आल्यावर त्याला सर्व हकीकत कळते.
तो हतबुद्ध होतो.
पंचांकडे आपली तक्रार घेऊन जातो.
पंचमंडळी शाहू-गुजर-पाटील-कोळी या समाजापैकी.
उत्तम हांडू कोळी या लोकांच्या मर्जीतला. पीक संरक्षण सोसायटीचा सेक्रेटरीच. उत्तमला ५१ रुपये दंडाची शिक्षा होते.
अंबरसिंगला ही घटना समजली तेव्हा तो मात्र नवऱ्याला जाऊन सांगतो. तू जगायला नालायक आहेस. तुझ्या बायकोची दिवसा ढवळ्या एवढी इज्जत लुटली गेली तरी तू स्वस्थ कसा? मरून का नाही गेलास? पुढे काहीही घडलं असतं तरी आम्ही ते निस्तरलं असतं. तू जिवंत राहायला नको होतं...
एक नवा अंबरसिंग जन्माला येत होता.
अंबरसिंगला वाटले असावे, आता यापुढची वाटचाल स्वतंत्र करावी. सातपुडा सर्वोदय मंडळाला सारखे गोवणे संस्थेच्या हिताच्या दृष्टीने योग्य नाही. आधीच सरकारी वर्तुळात, गुजर-पाटील समाजात संस्थेबद्दल आकस. आपल्या एखाद्या हालचालीमुळे संस्था, तिचे आदरणीय प्रमुख मुंदडाजी यांच्या कार्याला बाधा यायची. त्याने कोणाला फारसे न विचारता गुपचूप एक संस्था सुरू करून दिली-- 'भिल्ल आदिवासी सेवा मंडळ.' या संस्थेचा अध्यक्ष म्हणून तो काम पाहू लागला.
संस्थेला घटना नव्हती पण कार्यकर्ते खूप होते. त्यामुळे असेल कदाचित, ती
लवकर फोफावली. आपणहून लोक संस्थेच्या अध्यक्षांकडे नवीनवी प्रकरणे घेऊन दाखल होऊ लागले. विविध प्रकारची महत्त्वाची माहिती पुरवू लागले-
पाडळद्याच्या दंगल जाळपोळीबद्दल पोलिसांनी काही गुजरांना धरले व त्यांच्यावर हद्दपारीचा हुकूम बजावला. हा हुकूम गुजरांनी कोर्टात जाऊन कसा बदलून घेतला, त्याची सुरस दंतकथा (!) एका पत्रान्वये संस्थेच्या अध्यक्षांकडे कळविली गेली. पत्र आहे गेल्या वर्षाचे-८।७।७० चे. अनेकजणांनी मिळून लिहिलेले. फार लांबलचक असल्याने सगळे काही येथे देता येत नाही. थोडक्यात ते असे-
अध्यक्षसाहेब, आदिवासी भिल्ल सेवा मंडळ यांचे सेवेशी, आम्ही खाली सह्या करणारे पाडळदे येथील आदिवासी तारीख व वार आठवत नाही नारायण दत्तू पाटील यांचे बुडी गव्हाण रस्त्यावरील उसाचे मळयांत चाऱ्या पाडण्यासाठी सकाळी अंदाजे वेळ ८ वाजता कामाला गाव दरवाज्यातून जात होतो. गांव दरवाज्यात सकाळी बरेच गुजर लोक हजर होते.
आम्ही त्यांचेजवळून जात असता त्यांनी आमची थट्टा मस्करी करता करता शिवीगाळ करण्यास प्रारंभ केला, त्यांनी तीव्र परिणामकारक भावनेच्या भरात बोलण्यास सुरुवात केली, काहीची शिवीगाळ चालूच होती त्या टोळक्यात हजर असलेले १ : उद्धव छगन पाटील २: रोहीदास शंकर पाटील ३ : श्रीपत विठ्ठल पाटील ४: विठ्ठल छगन पाटील ५ : रामजी हसन चौधरी ६ : भायदास मदन पाटील ७ : रोहीदास भूता पाटील यांनी व त्यांचे सोबत असलेल्या सोबत्यांनी अभिमानाने मोठ्या आवाजात आपली बढाई करायला सुरुवात केली. त्यांत श्रीपत विठ्ठल व विठ्ठल छगन, रावजी हसन चौधरी यांनी आदिवासींचा निषेद करून तुमचा अंबरमहाराजाने काय होणार आहे, तुमच्याजवळ कोणाला देण्यासाठी पैसा नाही. आम्ही गुजर लोकांनी जवळजवळ ३ लाख रुपये गावातून वरगनी करून जमवले व ते रुपये, X X X यांना देण्यात आले व त्यामुळे केस-आमची केस काढली आहे. तुमच्याने आमचे काय झाले.
मा. श्री. अंबरसिंग महाराज यांना आमची हात जोडून विनंती आहे. मागीलप्रमाणे आजही त्रास होण्याची व धमकीचा जन्म झालेला आहे. त्यामुळे क्रोधाने अवतार घेतल्यावर आमचे आदिवासी बांधवावर मागील प्रसंग परत हे राक्षसी व खुनशी वृत्तीचे लोक वरील मंडळींच्या सहकार्याने आनणार आहेत. वेळांत पायबंधी घातली नाही तर आम्हाला परत गाव व घर सोडून बायको-मूल व घरातील सामान सोडून मार्ग मिळेल त्या मार्गाने पळून जावे लागेल. मा. कृपाळू आपण आम्हाला आभय कराल अशी विनती आहे.
सह्या :- झालु शंकर, सांबर आंबर, सुदाम नावजी, वाल्या भलजी, सांबरसिंग आंबऱ्या.
अशाच मजकुराचे, पैसे घेणाऱ्यांची नासे वगैरे असलेले, इतर काही जणांनी लिहिलेले आणखी एक १।८।७० चे पत्र मंडळाच्या दप्तरात पडून आहे.
अंबरसिंगनेही या प्रकरणी प्रांताला लिहिले--
श्रद्धेय श्रीप्रांतसाहेब यांचे सेवेशी-
अर्जदार : खाली सह्या करणारे अनाथ आदिवासी बांधव आम्ही विनंती अर्ज करतो की जे पाडळदे येथील हद्दपार प्रकरण अंतिम निर्णयासाठी आपणाकडे आलेले आहे त्याबाबत पाडळदे येथील गुजर लोकांचे म्हणणे आहे की लाख रुपये लागले तरी चालेल. आम्ही प्रत्येकी २०।२० हजार रुपये करून देऊ. परंतु आपल्या हद्दपार होणाऱ्या लोकांना हद्दपार जाऊ देणार नाही. संबंधित ऑफिसरना पैसे देऊन आम्ही ही case निर्दोश काढून घेऊ. अशा प्रकरणी गंभीर तीव्र चरचा पाडळदे गावात सजातीय गुजर लोक करीत आहेत. याप्रकरणी जातीने लक्ष घालून अशा प्रकारच्या ज्या अफवा असतील त्याचेवर अमल करण्याची कृपा करावी.
आम्हा गरिबांना परत धास्ती वाटत आहे. कोठे अधिकारी मायबाप पैसे खाऊन आमचे हाल करण्याची त्यांची इच्छा असेल तर त्यांनी अवश्य करावी. आम्ही त्याच्याच फांद्या आहोत. आपल्या बद्दलची खोटी नालस्ती होऊ नये. जे जे लोक बोलतात ते आपल्या निदर्शनास आणून देणे आम्ही गरिब आदिवासी जनतेचे आद्य कर्तव्य मानतो.
या प्रकरणी आपण कृपावान सरकार, या निर्वासित आदिवासी जनतेवर होणाऱ्या त्रासाला दूर करण्यासाठी आपल्या प्रभावी शक्तीची गरज आहे. योग्य व अचुक co-operation व मार्गदर्शन करून आमची केस तडीस लावाल ही विनंती आहे. आपण पैसे खाणार नाही अशी खात्री आहे. तरी या भेसूर परिस्थितीकडे पाहता भीती वाटते. योग्य ते करावे. आपण आम्हाला सांभाळून घ्याल ही विनंती. खोट्या आफवांना आम्ही भिणार नाही.
सबंध वर्षभर अंबरसिंगाचा अशा स्वरूपाचा बराच पत्रव्यवहार थेट वरपर्यंत चालू होता.
पण तत्पूर्वी ७० सालाला घडलेली आणखी एक घटना. त्याचे असे झाले-
संस्थेसाठी जागा हवी होती.
अंबरसिंगने नदीकाठची एक जागा हेरली. भिल्ल वसती या जागेपासून जवळ होती. वेळप्रसंगी सभा वगैरे घ्यायची तर नदीचे कोरडे पात्रही शेजारी मोकळे
पडलेले होते. रात्रीबेरात्री लोकांना यायलाजायला, मुक्कामाला ही जागा तशी सोयीची होती.
नोंदींप्रमाणे ही जागा सरकारी होती.
जागेची परवानगी अंबरसिंगने कुठून मिळवली कोण जाणे. पण जागेवर झोपडी बांधण्यासाठी लाकूडफाटा हवा, म्हणून मात्र अधिकाऱ्यांकडे त्याने विचारपूस केली.
‘नवीन झाडे तर आम्ही तुला तोडायला परवानगी देणार नाही. आदिवासीला जंगलातले जुने लाकूड झोपडी वगैरेसाठी घेण्याची मुभा असते. या नियमात बसत असेल ते तू कर.' अधिकाऱ्यांनी त्याला सांगितले.
‘पहा हं. नाहीतर झोपडी बांधून झाल्यावर तुम्ही लोक लाकडे बिगरपरवाना तोडून आणली म्हणून आम्हाला त्रास द्याल.' अंबरसिंगने खुंटा हलवून बळकट करून घेतलेला होता.
कारण, नेहमीचा हा येथला अनुभव आहे. एखाद्या आदिवासीला छळायचे असले म्हणजे त्याच्या खोपटातले एखाद अर्धे लाकुड जंगलातून बिगरपरवाना त्याने तोडून आणले म्हणून पोलिसांनी–जंगलखात्यातील नोकरांनी-त्याला अडकवायचा आणि पैसे उकळत राहायचे.
ही पुढची परवड नको म्हणून अंबरसिंगने फौजदार वगैरेंना शब्दाने आधीच बांधून घेतले.
एका रात्रीत झोपडी उभी राहिली.
सकाळपासून कुरबुरीला सुरुवात झाली.
'ही जागा आमची आहे. मुसलमानांचे हे कबरस्थान आहे,' काही जणांनी हरकत घेतली.
हरकत घेणाऱ्यांची संख्या हळूहळू वाढत गेली.
वातावरण ताणले गेले.
अंबरसिंगला बोलावणे गेले. तो आला.
'जागा कागदोपत्री सरकारी मालकीची दिसली म्हणून आम्ही झोपडी बांधली. तुम्ही कशावरून म्हणता ही जागा मुसलमानांच्या मालकीची आहे ? तुम्ही सरकारी अधिकाऱ्यांना तुमचे म्हणणे पटवून द्या. त्यांना जर ते पटले व त्यांनी आम्हाला जर सांगितले तर ताबडतोब आम्ही झोपडी काढून टाकू.' अंबरसिंगने चेंडु सरकारी कोर्टात ढकलून दिला.
हरकत घेणारे तिकडे गेले. पण काही उपयोग नव्हता. कागदोपत्रीचा पुरावा विरुद्ध होता.
दूसरा मार्ग दांडगाईचा. पण तो महागात पडण्याची भीती वाटत असावी. कारण गाठ होती येथे तिरकामठेवाल्या आदिवासींशी. त्यामुळे तिकडूनही बाजू बंद झाली.
त्यामुळे धुमसले, धुमसले आणि एक दिवस हे प्रकरण आपोआप विझून गेले.
शहादे गावात हे जरा वेगळे घडले. कारण येथे मुसलमानांची संख्या तशी बरीच आहे. सहसा त्यांच्या वाटेला कुणी जात नाही. या समाजाने कबरस्थान म्हणून बळकावलेल्या जमिनीवर आदिवासींनी आपली झोपडी उभी केली, या कृत्याकडे म्हणूनच थोडे विशेष कौतुकाने पाहिले गेले. मनातून अंबरसिंगला अनेकांनी धन्यवादही दिले.
आणखीही एका प्रसंगी जरा वेगळे घडले.
नवीन जागेत संस्थेची कचेरी सुरू झालेली होती.
कुणी पाटी आणून लावली. कुणी टेबल दिले. खुर्ची अशीच कुठूनतरी आली. अंबरसिंग येऊन जाऊन काम पहात होता.
एक दिवस कचेरीत किरकोळ कामे करणारा पोऱ्या रडत आला. अंबरसिंग होताच तिथे. त्याने विचारपूस केली. पोऱ्याने सांगितले ‘लाल्या' ने त्याला मारले म्हणून.
लाल्या म्हणजे गावातला एक मुसलमान दादा. बराच वचक होता त्याचा. लोक त्याला भिऊन असत.
अंबरसिंग मुलाला घेऊन लाल्याकडे आला.
‘लाल्या तू याला का मारलंस?'
लाल्याने उत्तर न देता आईमाईवरून शिव्या द्यायला सुरुवात केली.
हे बघ लाल्या, मीही तुला आईमाईवरून शिव्या देऊ शकतो. पण आपल्या दोघांच्या आयामाया इथे नाहीत. त्या लांब आहेत. त्यांना कशाला निष्कारण बोलवून आपण त्रास द्यायचा ? प्रश्न तुझा आणि माझा आहे. आपण तो मिटवून टाकू'-अंबरसिंग स्वर न चढवता लाल्याला समजवीत होता.
लाल्या आणखीनच भडकला. त्याचे दोस्तही भोवती गोळा झाले.
अंबरसिंगने पुन्हा एकदा पहिलाच प्रश्न शांतपणे विचारला, 'लाल्या, तू या पोऱ्याला का मारलेस ?
लाल्याला हा अपमान वाटला असावा. उत्तर देण्याऐवजी त्याने शिवीगाळीचे प्रमाण आणखी वाढवले.
दोन्हीकडून लोक जमले. गर्दी वाढत चालली. पोलिसांपर्यंत वर्दी गेली.
अंबरसिंग अजून शांत होता. लाल्याला तो पुन्हा एकदा म्हणाला : मी दोनदा तुला नीट विचारलं. हे तिस-यांदा, शेवटचं विचारतो आहे. या पोऱ्याला तू का मारलंस ? आता जर तू उत्तर दिलं नाहीस तर माझा माझ्यावरचा ताबा सुटेल. मग काय घडेल ते सांगता येत नाही....
लाल्याला हा पोकळ दम वाटला असावा. त्याने आपला शिव्यांचा सपाटा आणखी वाढवला.
अंबरसिंगने फाडकन् लाल्याच्या मुस्कटात ठेवून दिली.
लाल्या चमकला. त्याचे दोस्तही जरा गडबडले. दिवसभरात केव्हातरी बघून घेऊ, म्हणून एकेक पाऊल मागे हटू लागले.
पोलीसही एव्हाना पोचले होते. त्यामुळे गर्दी पांगली. परिस्थिती अधिक चिघळली नाही.
पण वातावरण तंग होते. लाल्या आज अंबरसिंगला चाकू दाखवणार म्हणून अंबरसिंगचे बरेच लोक हत्यारानिशी अंबरसिंगच्या संरक्षणासाठी जमलेले होते.
लाल्याचा फौजफाटाही सज्ज होता.
अंबरसिंगला निरोप मिळाला, लाल्या चाकू परजून तयार आहे. अंबरसिंग केव्हा दिसतो याची वाट पाहत तो एका ठिकाणी बसलेला आहे.
अंबरसिंगने आपल्या सगळ्या हत्यारी साथीदारांना बळे बळे घरोघर पाठवून दिले आणि तो एकटाच लाल्यासमोर जाऊन उभा राहिला.
लाल्या सकाळीच थोडा नरमला होता. आता तर तो पुरताच गार पडला.
पोलिसांनी निःश्वास टाकला. कारण दिवसभर परिस्थिती स्फोटक होती. दोन्हीकडचे लोक हत्यारे चालविण्यास मागेपुढे पाहणारे नव्हते. भिवंडी, जळगावच्या यादीत शहाद्याचे नाव दाखल होण्याची शक्यता होती.
ही वेळ आली नाही याबद्दल अंबरसिंगला सर्वजण दुवा देत राहिले. अगदी शहाद्याचे मुसलमानही. काहीजण येऊन अंबरसिंगला म्हणालेही, तुम्ही होतात म्हणून आम्ही वाचलो. नाहीतर काय घडले असते सांगवत नाही.
अंबरसिंगने शेवट मोठा छान केला. त्याने दुवा देण्यासाठी आलेल्या मुसलमान भाईबंदांना सांगितले : तुम्ही गरीब, आम्ही गरीब, आपण आपापसात लढाई करणं खराब काम आहे. नुकसान कुणाचं होणार ? आपलंच.
भाईबंद खूष.
इकडे अंबरसिंगने ज्या पोऱ्यावरून हे सगळे लाल्याप्रकरण उदभवले त्याच्या नावात मात्र थोडा बदल करून घेतला. पूर्वी तो शबीर धडा भिल होता. आता सर्वजण रघुवीर म्हणून त्याला ओळखतात, हाका मारतात.
शबीरचा रघुवीर हा असा सहज होऊन गेला.
गरीब-श्रीमंत, न्याय-अन्याय याची अंबरसिंगला झालेली जाणीव अधिक तीव्र होत चालली. दयेची याचना करण्याऐवजी हक्काची भाषा त्याच्या बोलण्या चालण्यात, लिहिण्यात अधिक स्पष्टपणे उमटू लागली. नागालँड, नक्षलवाद हे राजकीय शब्द तो अधून-मधून वापरू लागला. जमिनीची भूक जागी झाली. आंदोलनांचे इशारे तो शासनाला देऊ लागला. गेल्या वर्षीच्या मध्याला जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेल्या एका पत्राची भाषा पुष्कळच वेगळी उमटलेली आहे. अंबरसिंग लिहितो-
पाडळदे गावाशेजारी चिखली नावाचे एक गाव आहे. त्याठिकाणी पूर्वो बेटसिंग नावाचा आदिवासी राजा होता. तो आता वारला आहे. त्या ठिकाणी श्री. सांवरसिंग बेटसिंग हा कारभार पाहात असतो. त्याच्या नावावर जवळ जवळ पंधराशे एकर जमीन होती. ती आज त्याचेजवळ राहिलेली नाही. आता त्या ( ठिकाणी ) जे बुद्धिवादी गुजर लोक राहतात ते ती खेडीत आहेत. वहितीला त्यांचेकडे आहे. ती आदिवासी राजांची जमीन आहे. तिच्यावर नियमाप्रमाणे आदिवासींचा हक्क आहे. ती आदिवासीला नियमाप्रमाणे वाटून द्यावयास पाहिजे. सरकारी यंत्रणाप्रमाणे आम्ही आदिवासी त्या जमिनीचा शेतसारा भरू. सरकारच्या अटी ज्या असतील ( त्या ) आम्हाला मंजूर आहेत. परंतु आमच्या आदिवासी राजांची जमीन आम्हा आदिवासी बांधवांना मिळणेस नम्र विनंती. या प्रकरणी तातडीने लक्ष घालाल अशी आशा आहे. योग्य मार्गदर्शन करून सुकर खुलासा करणेस नम्र विनंती. नाही ( तर ) आम्हा भूमिहीन आदिवासीला ज्या पडीत जमिनी असतील त्यांचे वाटप करावे. नाहीतर आमच्या आदिवासी राजांची जमीन मिळावयाला पाहिजे. हा धडधडीत अन्याय आमचेवर होत आहे. तो आता आम्ही सहन कसा करावा. या कामी आपले सहकार्य मिळणेस नम्र विनंती आहे. शेवटी वारसा हक्क सोडणार नाही. याकामी आपण आवश्य सहयोग द्याल ही विनंती आहे.
चिखली गाव हे शहादे तालुक्यात आहे ....
८।८।७० ला आदिवासी भिल्ल सेवा मंडळाच्या कचेरीतून मुख्यमंत्री
वसंतराव नाईक यांना गेलेले पत्र तर अधिकच तिखट आहे. या पत्रात अंबरसिंगने कळविले आहे-
मागे बरीच पत्रे रजिस्ट्ररने पाठविली. परंतु एकाही पत्राचे उत्तर आपल्याकडून येऊ नये या सर्व लज्जास्पद गंभीर घटना घडत आहेत. त्यामुळे आम्हा आदिवासींना स्वतःच्या जीविताची शाश्वती राहिली नाही. आम्ही मोठ्या प्रयासाने व सजातीय गुजर लोकांच्या व कोळ्या लोकांचे विरुद्ध जी हद्दपार केस केली होती तिचे मूल्यांकन होण्याऐवजी तिला XXX सारखे नेते आपल्याजवळ असलेल्या सत्तेचा उपयोग करून घेत आहेत. हे महाशय शहादे तालुक्यात येऊन मोठमोठ्या मिटींगा घेत असतात आणि रात्रीतून खाजगीरीत्या मिटींगा घेऊन तुम्ही आदिवासींवर कितीही जुलुम केला, अन्याय केला तरी मी सांभाळून घेईल.
आदिवासींवरील त्रास वाढत चाललेला आहे. या भागातील सामाजिक प्रश्न गंभीर होत चाललेला आहे. आमच्या आदिवासीची घरे यांनी मोडून नेली त्याचे काय ? आज आम्हा (ला) राहायला घर नाही. पिण्याचे पाण्याचा कुवा आमचा मालकीचा यांनी मातीने भरून काढला. बायाची इज्जत दिवसा लुटली जात आहे. याला आपण शासनाने आळा घातला नाही तर शहादे तालुक्यात या भयंकर त्रासाला कंटाळून नक्षलवाद आणायला कमी करणार नाही. रक्त क्रांतीचा उगम शहादे तालुक्यातून निघेल. खून, कापाकापी सुरू होईल. आम्हा आदिवासींना नेहमीच जनम कैदीसारखे ठेवले जाते व तसे आहे. नजरकैदी तर आहोतच. अन्याय, जुलूम, अत्याचार, मारहाण यांना संपूर्ण कंटाळलो आहोत. यावेळी शासनाने या तालुक्याकडे लक्ष दिले नाही ( तर ) भयंकर लाल शेला पांघरून घालावे लागेल यात नवल नाही. या तालुक्यात वशिलेबाजीला फार किंमत आहे. आमची घरे परत मिळावी. आम्हाला शासनाकडून न्याय मिळावा. या प्रकरणी जवळजवळ सर्वांनाच, जिल्हयातील संबंधित अधिकाऱ्यांना विनंती केली आहे. परंतु आदिवासी भिल्ल समाजाची बाजू कोणीच घ्यायला तयार नाही. आम्ही कुठपर्यंत सहन करावे, सहन करण्याची एक सीमा असते आता ते असह्य झाले आहे. क्रांतीचा उगम लवकर होईल. आम्हा आदिवासीला आपण संरक्षण द्याल ही विनंती. अवश्य काही सी. आय. डी. पाठवून खरी परिस्थिती पाहावी. आपण अवश्य लक्ष द्याल ही विनंती व आम्हाला न्याय मिळवून द्याल ही विनंती. म. प्रांतसाहेब व शिवाजीराव पाटील, पी. के. पाटील त्यांचे सहकारीकडे लक्ष द्यावे ही विनंती.
पूनः साभार. असेंब्लीत हा प्रश्न ठेवावा असे वाटते. कृपया आपण हा प्रश्न हाताळून बघावा.
अंबरसिंगला वाटले असावे थोडी चाचपणी आता करून बघावी. आपल्या शक्तीचे सगुण स्वरूपात जरा दर्शन घ्यावे. इतरांनाही घडवावे. मंगल- मूर्तीच्या दर्शनाने अमंगलाला काही सुबुद्धी सुचते का ते पाहावे.
किंवा मंगलमूर्तीनेही आदिवासींना प्रेरणा दिली असेल.
घटना घडली खरी. आदिवासींनी गतवर्षी आपला स्वत:चा वेगळा गणपतीउत्सव शहाद्यात सुरू केला.
यापूर्वी आदिवासी समाज गणपती उत्सवाकडे फारसा कधी फिरकलेला नव्हता. स्वत:चा वेगळा गणपती ही तर एक नवीनच स्फूर्ती.
भराभर आदिवासी कार्यकर्ते कामाला लागले. शहाद्यात मोठी मूर्ती तयार नव्हती. मातीची अडचण होती. आदिवासी कार्यकर्त्यांनी कुठूनतरी माती गोळा करून आणली. मूर्तिकाराला गळ घातली. त्याने दिवसरात्र काम करून चांगली कमरेपर्यंत उंचीची मूर्ती तयार केली. वर्गणी जमलेली नव्हती. तेव्हा मूर्ती ' सप्रेम भेट ' हे ओघाने आलेच.
उत्सव यथासांग सुरू होता. भजनकीर्तनांचे कार्यक्रम चालू होते. उगाच हवा पसरली, आदिवासी काही गडबड करणार ! शहाद्यात दंगल उसळणार !
कारण आदिवासी-मुस्लिम तेढ या भागात पूर्वीपासून आहे. मुस्लिम समाज जास्तच सावध झाला. असे म्हणतात की, दंगलीच्या भीतीने मुस्लिम समाजापैकी काहींनी आपली कुटुंबे इतर सुरक्षित ठिकाणी या दोन चार दिवसांसाठी पाठवूनही दिलेली होती.
उत्सवाच्या शेवटच्या दिवशी ताण खूप वाढला. आसपासच्या व लांबलांबच्या गावाहून आदिवासी समाज शहाद्याकडे लोटला होता. रात्रभर भजनांचे; कीर्तनांचे फड गाजत होते. गोमयी नदीच्या रिकाम्या विस्तीर्ण पात्रात सगळ्यांचे तळ पडलेले होते. असतील सुमारे आठ-दहा हजार तरी लोक.
दहावा दिवस उजाडला. आदिवासींनी आपला गणपती मिरवणुकीने वाजत गाजत नेण्याचा आग्रह धरला. प्रथम पोलीस या मिरवणुकीला परवानगी देत नव्हते. मग त्यांनी सांगितले, ' तुमच्या महाराजांना बोलवा. ते जबाबदारी घेत असतील तर आम्ही परवानगी देऊ.'
अंबरसिंग परगावी होता. तो दुपारी आला. बोलाचाली झाली. व्यवस्था ठरली. अंबरसिंगने सर्व हमी घेतली. एखादा अनुचित प्रकार घडला तर पोलिसांनी परस्पर हस्तक्षेप न करता संस्थेच्या एखाद्या कार्यकर्त्यामार्फत तो अनुचित प्रकार थांबवावा, ही अंबरसिंगची सूचना पोलिसांनीही मान्य केली.
तरीही पोलिसांनी सर्व काळजी घेतलेली होती, बंदोबस्त कडेकोट ठेवला होता.
गावच्या इतर गणपतींबरोबर आदिवासींचा हा नवा गणपतीही वाजतगाजत निघाला. सर्वात अधिक गर्दी या गणपतीमागे होती.
गावच्या मुख्य मशिदीसमोर मिरवणूक आली.
कुठूनतरी आवाज झाला. पोलीस धावले.
पण लवकरच प्रमुखांच्या ध्यानात आले की, कुणीतरी पडले झडले होते. आवाज त्यामुळे झालेला होता.
मशिदीसमोर मिरवणूक थोडी घोटाळलेली होती ती पुढे सरकली.
आदिवासी कार्यकर्त्यांनी मशिदीसमोर पूर्ण शांतता पाळण्याचे ठरवले होते. वाद्ये, घोषणा, गजर वगैरे मुद्दाम थांबवले होते.
मशिदीसमोर आदिवासींचा गणपती आला. अंबरसिंगने तिथे जमलेल्या मुस्लिम पुढाऱ्यांना विनंती केली : आम्ही आपल्या मशिदीचा मान ठेवला. आपणही आता आमच्या गणेशमूर्तीचा सन्मान करा. मिरवणुकीत सगळेजण सामील व्हा. गणपती आमचा एकटयांचा नाही. सर्वाचा आहे. तुमच्याच हस्ते आता विसर्जन होऊ द्या. इच्छा असेल तर गुलाल लावतो. पण बळजबरी कोणतीही नाही.
गुलाल वगैरे सगळ्यांच्याच कपाळावर चढले. वाजतगाजत गणपती बाप्पा पुढे निघाले. शेवटपर्यंत उत्साहाने पोचवले गेले. मिरवणुकीत सामील झालेले मुस्लिम बांधव विसर्जन होईपर्यंत थांबलेले होतेच.
सर्व काही यथासांग, यथाशास्त्र पार पडले.
अंबरसिंगची उंची आणखी अंगुळभर वाढली.
पण विघ्ने काही यायची थांबत नव्हती.
सौ. नर्मदीबाई तुंबा पवार आदिवासी भिल्ल सेवा मंडळाकडे अर्ज करते--
महाशय,
मी आज सकाळपासून भुईमुग शेंगांचा सरवा करण्यासाठी भबुता बापुच्या शेतात जात होती. जाता जाता पाणी पिऊन घ्यावं म्हणून छगन मदनच्या विहिरीवर गेली. मी नकळत पाणी पिऊन त्या ठिकाणी विश्रांती घेण्यासाठी
उभी होती. त्या ठिकाणी छगन मदन पा (टील) सालदार भाग्या रहा भिल यास खालीलप्रमाणे माहिती सांगत होता.
माहिती भयानक असल्यामुळे मी तेथे चुपचाप उभी राहिली. छगन मदन पा (टील) बोलत होता, की भाग्याभाई तुम्ही तुमचे पोरसोर घेऊन ताबडतोब विहिरीवर निघून येणे तू माझा दोस्तचा सालदार आहे म्हणून सांगत आहे. एवढ्या दोन-चार दिवसात आम्ही विकत आणलेली पाच लिटर एन्ड्रीन ज्या ज्या विहिरीतील आदिवासी पाणी पितात त्या त्या विहिरीत पाच लिटर एन्ड्रीन टाकणार आहोत. एन्ड्रीन टाकलेवर आमचे विरोधी आमचे दुष्मण आदिवासी समाज त्या विहिरीतील पाणी प्याल्याबरोबर मरणार. नंतर आम्हाला समाधान लाभेल. भाग्याभाई तुम्ही ताबडतोब आज-उद्या तुमचा सामान व सहपरिवार घेऊन जंगलात निघून यावे अशा प्रकारची वार्ता ऐकून मी शेंगा वेचन्याला न जाता ताबडतोब घाईत घरी आली माझ्या नवऱ्याला ही हकीकत सांगितली व नवऱ्याबरोवर शहादे येथे असलेल्या आदिवासी भिल सेवा मंडळचे अध्यक्ष श्री. अंबरसिंग सुरतवंती यांचेकडे स्वखुषीने येऊन हा जबाब लिहून दिला आहे.
अर्जाखाली अंबरसिंगने आपल्या हस्ताक्षरातील शेरा ओढला.
'-- योग्य कार्यवाहीसाठी पो. स. इन्स्पेक्टरकडे रवाना -'
५-११-७०
असे अनेक अर्ज. छळवादाचे, दहशतीचे वेगवेगळे नमुने. भिल्लांच्या -आदिवासींच्या झोपड्यातून धान्य, भांडीकुंडी बळजबरीने काढून आणणे हा तर सर्रास प्रकार. ही सर्व पार्श्वभूमी ध्यानात घेतली तरच कालपरवापर्यंत मवाळ आणि गरीब भासणारा अंबरसिंग एकदम भडकून स्वतंत्र आदिवासी राज्याची मागणी करण्याइतका बेभान का होतो, याचा व्यवस्थित उलगडा करता येतो. मख्यमंत्री मा. वसंतराव नाईक यांना लिहिलेल्या एका पत्रात अंबरसिंगने ही मागणी या सुमारास स्वच्छपणे पुढे मांडलेली आहे, शब्दाशब्दातून त्याचा संताप, त्याची चीड व्यक्त झालेली आहे. अंबरसिंगने मुख्यमंत्र्यांना लिहिले-
आज वर्षानुवर्ष अन्यायाचा फाशात अडकलेला आदिवासी त्याच फाशात स्वतंत्र काळातही त्याच पदाला जाणून बुजून अडकवला गेला आहे, याची खात्री आपण आपल्या हेरद्वारे घेऊ शकता.
गेल्या वर्षी पाडळदे बु. ता. शहादे या गावातील आदिवासी भिल हिंदू बाधवावर जो अन्याय व अत्याचार झाला त्या परिस्थितीसाठी आठवण जरी
केली तरी अंगावर काटे उभे राहतात. आदिवासी बायांची दिवसा इज्जत लुटली गेली. दिवसा तेथील सजातीय गुजर लोकांनी गरीबांच्या राहत्या झोपड्या बळजबरीने मोडून स्वत:च्या कामी लावल्या. मारहानचे वर्णन तोंडाने करू शकत नाही. याची जाणीव सरकारला करून द्यावी म्हणून सुदर्शन साप्ताहिकमध्ये छापले त्यावरही सरकारी चौकशी झाली नाही. त्यावेळी डी. एस्. पी. ला भेटलो तेही बघायला आले नाही, कलेक्टरला लिहिले त्यांचेकडूनही एका अक्षराने उत्तर आले नाही. म. प्रांत साहेब, नंदुरबार यांना लिहिले परंतु दोन ओळी तरी उत्तर द्यावयास त्यांना या गरीबांचे अर्जाची चौकशीसाठी वेळ मिळाला नाही, अन्याय वाढत चालले...
आजही अन्याय तीव्र रीतीने शहादे तालुक्यात फोफावत आहे. एका बाजूला श्रीमंत व दुसऱ्या बाजूला गरीब जनता शेवटी त्यांच्याजवळ पैसा व वशिला असल्याने त्यांना सजा, अटक होत नाही परंतु गरीबाला मात्र एक कनीस तोडले म्हणून अटक व चार चार दिवसाची सजा होते. जवारीचे कनसे त श्रीमंतच तोडून त्यांच्या हातात देतात व त्यांना चोर म्हणून पोलीस स्टेशन (वर) नेतात व कोर्ट त्याला सजा करते. नांदेडचे प्रकरण असेच आहे. पैशाचे जोरावर श्रीमंतानी ऑफिसरांना पाळलेले आहे. लाच शिवाय कामच होत नाही. प्रकाशाला, पनसवाडे, बोराडे, डामरखेडा, अमलाड, पाडळदे, तऱ्हाडी, कोथरद अशी अनेक गावे आहेत. त्या ठिकाणी गरीबांची (घरे) दिवसा लुटली जात आहेत त्याची दाद कोणत्याही कोर्टात लागत नाही. याचे नवल वाटते.
जमिनीचा तोच प्रश्न आहे, आदिवासी जवळ ज्या नव्या शर्तीच्या जमिनी होत्या त्या जुन्या करून त्याही विक्री करण्यात येत आहेत. दाबदडपन करून खोटेनाटे आंगठे घेऊन त्याच्या त्या जुन्या करून खरेदी स्टॉप करीत आहे. विकासऐवजी भकास होत आहे.
परिस्थिती अन्यायामुळे दिवसेदिवस चिघळत चालली. आदिवासी भिल समाजासाठी न्याय नाही, रहायला घरे नाहीत. अंगाला वस्त्रे नाहीत, संरक्षण नाही, खायला अन्न नाही, रोजचा रोजगार नाही. जीवनांची श्वासती वाटत नाही. शेवटी असे वाटते की, फक्त जमीनदार पैसेवाले व बुद्धिमान लोकांनाच स्वागत मिळाले आहे. गरीब आदिवासी भिल समाजासाठी त्याचा उपयोग काय ? दिल्ली मुंबईवरून भाषण केल्याने समाजवाद होणार नाही.
मिल जनतेलाही असे वाटू लागले आहे, आमची या सरकारला गरज भासत नाही. तर या समाजाने का हिंदु म्हणून हिंदुस्थानात राहावे. याचा स्पष्ट विचार आहे. सरकारला आमचा वीट आलेला आहे.
यासाठी आमची स्वतंत्र राज्याची मागणी करावी लागेल. पाकिस्तान सारखा तो आदिवासी खंड राहील अशी जनजागृती का करू नये ? आमच्याकडे सरकार, शासनकर्त्यांचे लक्ष नसेल तर आम्ही खरोखरच हिंदुधर्माचा त्याग करून झारखंड, नागालँडसारख्या खंडाची उभारणी केल्यास वावगे होणार नाही, याची जाणीव असू द्यावी.
धळे जिल्ह्यात पावसाळ्यानंतर जमिनीचे वाटप होणार आहे. ज्या ज्या ठिकाणी पडीत जमिनी आहेत त्याचे वितरण त्या त्या तालुक्यातील जिल्ह्यातील आदिवासी मध्येच केले गेले पाहिजे. ते आसाम, इन्दौर, भोपाळच्या सैनिकाला देता येणार नाही याची खबरदारी घ्यावी. नाहीतर शेवटी सामाजिक आंदोलन करून रक्तपात क्रांती घडल्याशिवाय राहणार नाही यांचीही अॅडव्हान्स इन्टीमेंट देत आहोत.
शहादे तालुक्याची परिस्थिती केव्हा भयानक रूप धारण करील, आज सांगणे कठीण आहे. प्राणावर आले, की तो माणस बदलतोच...
१८-१०-७०
पंतप्रधान इंदिरा गांधी यांना गेलेले एक पत्रही दप्तरी दाखल आहे. या पत्रातील भाषेने तर संयमाची सर्व बंधने ओलांडली आहेत. कुठलाही आडपडदा न ठेवता पंतप्रधानांना उघड उघड सवाल केला आहे : आम्ही हातात कुऱ्हाड, भाला, बरची घेऊन आमचेवरील अन्यायाचा प्रतिकार का करू नये?'
--' मरू किवा मारू'
--' खून का बदला खून से'
--' ठोशास ठोसा'
--' रक्तक्रांती'
---अंतर्गत खळबळीला या शब्दांतून अगदी मुक्तपणे या पत्रात वाट करून दिली गेलेली आहे.
पण सगळे व्यर्थ. अंबरसिंग पोलिसांच्या काळ्या यादीत मात्र या पत्रामुळे नोंदला गेला. त्याच्यावर पाळत ठेवली जाऊ लागली.
खुट्ट वाजले, की अंबर सिंग त्यात गोवला जाई.
-- पाडळद्याला, त्याच्या जन्मगावी या वर्षाच्या सुरुवातीला पुन्हा एक गडबड झाली. झोपड्या जळाल्या.
अंबरसिंगला अटक ! जामिनावर सध्या तो सुटलेला आहे. शहादे कोर्टात खटला सुरू आहे.
-- दोन मे या दिवशी घडलेले पाटीलवाडी प्रकरण !
--म्हसावद येथे त्याच दिवशी दुपारी उडालेली चकमक !
अंबरसिंग. अंबरसिंग. या सगळ्यामागे अंबरसिंग चा हात आहे असे गुजर पाटील समाजाच्या पुढाऱ्यांचे ठाम मत आहे. शासनावरही या मताचा पगडा आहे.
मग घटना घडून तीन-चार महिने झाले तरी या पाटीलवाडी- म्हसावद प्रकरणी अंबरसिंगला अटक का नाही ?
बोटभर चिठ्ठीचाही पुरावा अद्याप पोलिसांना मिळालेला नाही. खूप मारठोक झाली तरी आदिवासी अंबरसिंगचे नाव या प्रकरणी अजून तरी घेत नाही.
या भागातील साखर कारखान्याचे चेअरमन व एक वजनदार काँग्रेसनेते श्री. पी. के. पाटील यांची माहिती मात्र वेगळी आहे. आम्ही त्यांना शहाद्याला त्यांच्या घरी भेटायला गेलो असता त्यांनी सांगितले : अटकेचे कागदपत्रे तयार आहेत. काही दडपणे ( Pressure ) येताहेत म्हणून कारवाई थांबली आहे एवढेच. अंबरसिंगचा या प्रकरणात निश्चित हात आहे ...वगैरे वगैरे.
असे धरपकडीचे वारे वाहत असताना आम्ही या भागात पोचलो. मी आणि नासिक 'देशदूत'चे संपादक शशिकांत टेंबे.
धुळ्यात पाऊल ठेवताक्षणीच आम्हाला निरोप. डी. एस्. पी. साहेबांनी भेट्न जायला सांगितले आहे.
जिल्हा प्रसिद्धी अधिकारी श्री. ठोंबरे यांच्यामार्फत आम्ही कळविले : प्रथम हिंडून येतो. परतताना भेटतो.
ठोंबरे यांनी पुन्हा निरोप आणला. डी. एस. पी. व कलेक्टर दोघांचीही विशेष इच्छा दिसली, की जाण्यापूर्वीच आपण त्यांना भेटावे.
ठोंबरे गाडी घेऊनच आलेले होते. आम्ही कलेक्टरांच्या बंगल्यावर सकाळी पोचलो. (२२ जुलै १९७१)
' तुमचा निरोप मिळाला. पण तुम्ही ज्या भागात जाता आहात तिथली परिस्थिती काही ठीक नाही. तुम्हाला कल्पना असावी म्हणून मुद्दाम अगोदर बोलावणे पाठवले.'
'तुम्ही काय ‘पादयात्रा' काढणार आहात ?' कलेक्टर गोकाक अमराठी असल्याने 'पद' यात्रेचा उच्चार ‘पादयात्रा' असा करीत होते.
‘ कसली पदयात्रा ? मला काहीच कल्पना नाही.' मो थोडे आश्चर्यचकित होऊन म्हटले.
'सर्वोदयाचे लोक शहादे भागात आजपासून एक पादयात्रा काढीत आहेत आणि तुम्ही तिचे नेतृत्व करणार आहात. We were told that you are going to lead the Padyatra' -कलेक्टर.
'Till this moment atleast, I am completely in the dark ’ - मी
‘ नाही. व्हॉट हॅपन्स. पादयात्रा निघाली आणि काही बँड एलिमेंट आत शिरले म्हणजे परिस्थिती पुन्हा बिघडेल. आत्ताच ती थोडी निवळू लागली आहे. हील होते आहे ' -डी. एस. पी.
इकडे टेंबे उसळले : 'याची जबाबदारी तुम्ही आमच्यावर कशी काय टाकता ?'
‘हे पहा. या पदयात्रेची भानगड या क्षणापर्यंत तरी मला व टेंबे यांनाही माहीत नाही. We are going there as journalists, as observers. पदयात्रेसंबंधी कुठलेही आश्वासन, अभिवचन (commitment) या क्षणी आम्ही देऊ शकणार नाही. तिथे गेल्यावर हा काय प्रकार आहे तो प्रथम पाहू. नंतरच काय ते ठरविता येईल. ' -मी.
'That's all right. As journalists you can certainly go there, see things, form your own independent judgement. If it is objective. we also like discussing things. But our main concern is to see that law and order situation is not disturbed. ' -कलेक्टर
डी. एस्. पी. इनामदार यांनीही ‘लॉ अँड ऑर्डर'चे महत्त्व आम्हा दोघांना पुन्हा एकदा पटवून दिले.
आम्ही तिथे जाऊन लॉ अँड ऑर्डरमध्ये काय बिघाड होणार होता, शांततेला आणि सुव्यवस्थेला कोणता धोका पोचणार होता, याचा मात्र शेवटपर्यंत काही उलगडा झाला नाही.
परिस्थिती फारच नाजुक असली पाहिजे एवढा निष्कर्ष मात्र यावरून सहज निघत होता.
सरबतपान झाले आणि कलेक्टरांच्या बंगल्यावरची ही सकाळची अर्ध्यापाऊण तासाची ऐन वेळी ठरलेली मुलाखत आटोपली.
आपल्याकडचे लॉ अँड ऑर्डरवाले तरबेज असतात हे माझे आदल्या दिवशीच गाडीत व्यक्त केलेले मत टेंबे यांना थोडे पटू लागलेले होते. त्यांचे मत वेगळे होते. आपल्याकडील शासनयंत्रणा झोपलेली असते असाच जवळजवळ त्यांचा अनुभव होता. मी म्हणत होतो : यंत्रणा झोपू शकते, अनेकदा झोपतेही. पण एखाद्या विषयात जागे राहायचे तिने ठरवले तर तिला अशक्य काही नाही.
संध्याकाळी आम्ही शहाद्याला पोचलो.
सातपुडा सर्वोदय मंडळातर्फे एक पत्रक छापून तेथे वाटण्यात आलेले होते . मंडळातर्फे तालुक्यातील काही गावातून शांतियात्रेचा एक कार्यक्रम योजण्यात आलेला होता. आम्ही तेथे येणार हे अगोदर कळविलेले होते. आमच्या येण्याची आणि या शांतियात्रा कार्यक्रमाची सांगड मंडळाच्या लोकांनी आपल्याच मनाने घालून त्याप्रमाणे प्रसिद्धी करून ठेवलेली होती. २२ ते २६ आसपासच्या गावातून शांतियात्रा व २७ ला शहादे येथे सभा असा भरगच्च कार्यक्रम जाहीर झालेला होता.
हे प्रसिद्धीपत्रक कलेक्टर, डी. एस्. पी. कडे धुळ्याला पोचलेले असणार हे उघडच होते.
सकाळच्या मुलाखतीमागील धागे-दोरे शेवटी असे उलगडले.
शांतियात्रेतून अशांतता माजू नये यासाठी लॉ अँड ऑर्डरवाल्यांनी अशी दक्षता बाळगलेली होती.
ही दक्षता पुढील दोन दिवसात वाढत गेली. लॉ अँड ऑर्डरवाल्यांनी आम्हाला जवळ जवळ नजरकैदेतच अडकवून ठेवलेले होते.
शहादे पोलीस स्टेशनचे प्रमुख अधिकारी श्री. अंकोला व चार पाच हवालदार पहिल्या दिवशी सतत आमच्यासोबत ! शिवाय सी. आय. डी. ची दोन माणसे.
निघण्यापूर्वी आम्ही अंकोला यांना सांगून पाहिले, “ तुम्ही गणवेशात व हत्यारानिशी बरोबर असल्यावर कोण आमच्याशी मोकळेपणे बोलणार ? धुळयाला फोन जोडून द्या. वाटल्यास आम्ही कलेक्टर, डी. एस्. पीं. शी बोलून घेतो.'
' बोलून काही उपयोग होणार नाही. इथल्या परिस्थितीत काय करायचे याचा निर्णय शेवटी मीच घेणार. आणि तुमच्या संरक्षणासाठी बरोबर रहायचे असे आम्ही ठरवलेले आहे.'
'अहो कसले संरक्षण घेऊन बसलात ? आमचे आम्ही पाहून घेऊ. तुम्ही आमची चिंता मुळीच करू नका.'
'ते शक्य नाही. आम्ही येणारच.'
पोलीस ऐकत नाहीत हे पाहिल्यावर संयोजकांनी शांतियात्राच रद्द करून टाकली. पोलीस पहाऱ्यात शांतियात्रा याला काही अर्थच नव्हता.
तरीही २-४ गावातून आम्ही नुसते हिंडलो. आमच्या जीपमागोमाग पोलीस जीपचा ससेमिरा होताच !
मी हळहळ व्यक्त केली-पेट्रोलचा केवढा हा अपव्यय ? शिवाय एवढ्या पोलिसांचे जेवणाचे, प्रवासाचे भत्ते असतीलच.
टेंबे मजेत होते. म्हणाले : ' अहो, हा तरी अनुभव केव्हा घ्यायचा ? साला मिनिस्टरच्या वर आपला रुबाब !'
या रुबाबाचाही त्यांना कंटाळा आला. मग म्हणाले : 'यापेक्षा त्यांनी आपल्याला तालुक्यात यायलाच बंदी केली असती तर बरे झाले असते. साले, आपण ती बंदी मोडून सत्याग्रह वगैरे केला असता. थोडे Sensational तरी काही घडले असते. काय अनिल, तुरुंगातून सुटल्यावर धुळ्याला काही सत्कार,हारतुरे याची व्यवस्था ठेवली असतीस की नाही ?'
अनिल गोटे हा देशदूतचा धुळ्यातील वार्ताहार. तोही आमच्याबरोबर चल म्हटल्यावर आलेला होता.
दुसरे दिवशी ही देशदूतची जोडी परत गेली. दुपारी मी, अंबरसिंग, भाऊ मुंदडा, नानासाहेब देवरे, पाटणकर, गोविंदराव शिंदे, वगैरे मंडळी म्हसावदकडे निघालो होतो. आमची जीप वाटेतच बंद पडली. आमची जीप थांबल्यावर पोलीस जीपलाही थांबणे भाग पडले. जीपचा रागरंग पाहिला आणि आम्ही २-३ जण तसेच पायी सटकलो. पोलीस जीपसमोर एक बारीकसा पेचप्रसंग उभा राहिला. आमचा पाठलाग करायचा, की बंद पडलेल्या जीपवर व तिच्या दुरुस्तीची खटपट करणाऱ्या अंबरसिंग-भाऊ मुंदडा वगैरे लोकांवर पहारा ठेवायचा !
पोलिसांनी दुसरा पर्याय स्वीकारला. तेवढीच २-४ तास आमची नजरकैदेतून सुटका झाली.
लॉ अँड ऑर्डरवाल्यांचे पहारे असे दऱ्यायाखोऱ्यातूनदेखील भिडलेले आहेत. ठाणी बळकट आहेत.
* आधुनिक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असे सेनादल देशातील कुठल्याही कानाकोपऱ्यात चोवीस तासाच्या आत नेऊन खडे करणे या लॉ अँड ऑर्डरवाल्यांना सहज शक्य आहे.
* नोकरशाही यंत्रणा दीर्घसूत्री असली तरी अनुभवी व संघटित आहे.
* एका मागून एक निवडणुका खुल्या वातावरणात व्यवस्थित पार पडत आहेत, जनता आपल्याला हवे ते प्रतिनिधी राज्यकर्ते म्हणून पाठवू शकत आहे.
* केंद्रसत्ता पारतंत्र्य काळातही मजबूत व एकछत्री होती.
* पारतंत्र्यविरोधी आंदोलनही विस्कळित, तुटक-फुटक व उद्रेकी स्वरूपाचे न होता, एका अखंड व अतूट सूत्राने बरेचसे बांधले गेलेले होते.
* स्वातंत्र्य मिळाल्यावरही देशात पहिली पंचवीस वर्षे स्थिर व एकपक्षीय शासन अस्तित्वात आहे.
* देशातील निदान एकतृतीयांश जनतेला या शासनाने पुरेसे खाऊपिऊ घातलेले आहे. विकासाचे, प्रगतीचे काही भरीव कार्य येथे गेल्या पंचवीस वर्षात उभे आहे.
* सहिष्णुतेची दीर्घ परंपरा जनमानसात खोलवर रुजलेली आहे.
* स्वतंत्र व स्वायत्त सांस्कृतिक संस्था लोकजीवनाची अंगोपांगे समृद्ध करीत आहेत.
* मध्यमवर्ग अद्याप कोसळलेला नाही.
* जमीनदार आणि भूमिहीन यांच्यामधली लहान शेतकऱ्यांची संख्या अतिप्रचंड आहे.
* देशातील सर्व जनता गेली शे-दीडशे वर्षे निःशस्त्र आहे.
-नक्षलवादी क्रांतीला प्रतिकूल अशी ही सर्व आपल्याकडील पार्श्वभूमी आहे.
म्हणनच नक्षलवाद-नक्षलवाद या नावाखाली सातपुड्यातील आदिवासी भिल्लांचे, किसानांचे, भूमिहीनांचे, गोरगरिबांचे आंदोलन धोपटून काढण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न चुकीचा आहे, हास्यास्पद आहे.
तसाच इथला प्रश्न केवळ लॉ अँड ऑर्डरचा नाही. आहे तो सामाजिक-आर्थिक असमतोल कायम ठेवून शांतता आणि सुव्यवस्था टिकविण्याचा कितीही प्रयत्न केला तरी तो तात्पुरता, वरवरचा, म्हणूनच फोल ठरणार, हे उघड आहे.
प्रश्न येथले आहेत प्राथमिक. अगदी मूलभूत.
पहिला प्रश्न न्यायप्राप्तीचा. आदिवासींना साधा न्यायच मिळत नाही. मिळालाच तर तो भयंकर महाग असतो. कामधंदा सोडून कोर्टकचेऱ्या करणे त्याला न परवडणारे आहे. त्याला सुलभ, बिनखर्चाचा, निःपक्षपाती न्याय कमीत कमी वेळात मिळणार आहे की नाही ?
पुढचा प्रश्न कामधंद्याचा. गुजर-पाटील जमीनदार वर्ग एकीकडे मजूर मिळत नाही म्हणून ओरडा करीत आहे आणि दुसरीकडे आदिवासी भूमिहीनांचे रोजगारासाठी,मोर्चे निघत आहेत, या वस्तुस्थितीचा एकदा नीट तपास घेतला पाहिजे. असे असावे, की दुसऱ्यांच्या शेतावर मजूर म्हणून राबण्याची आदिवासी भूमिहीनांची आता तयारी नसावी. आपल्या जमिनी श्रीमंतांनी बळकाविलेल्या आहेत, त्या आपल्याला परत मिळाल्या पाहिजेत, मिळणार आहेत, ही जाणीव आता सर्वत्र पसरलेली आहे. दुष्काळी वा इतर कामांचे चार तुकडे अंगावर फेकून जमिनीची ही आदिवासीची भूक यापुढे भागू शकेल असे दिसत नाही. तेव्हा कामधंदा, रोजगारी या प्रश्नांची मुळे आता जमिनीच्या फेरवाटपापर्यंत येऊन ठेपलेली आहेत, हे ओळखूनच सत्ताधाऱ्यांनी यासंबंधीची आपली धोरणे आखली पाहिजेत, हे स्पष्ट आहे. आर्थिक दुखण्यांवर-समस्यांवर राजकीय विचारसरणीचा कसा प्रभाव पडत असतो, याचे हे एक लक्षात घेण्यासारखे उदाहरण आहे.
आणि जमिनीच्या अशा फेरवाटपाला या भागात तरी भरपूर वाव आहे. सरकारी मालकीच्या अतिरिक्त जंगल जमिनी, पडीत जमिनी आदिवासींकडे जायला हव्यात. जंगले आदिवासी गावांच्या मालकीची करून टाकण्याचा प्रयोगही करून पाहण्यासारखा आहे. पाच वर्षांपूर्वी अक्राणी महालातील धडगाव येथे भरलेल्या ग्राम स्वराज्य परिषदेने या अर्थाचा ठरावही केलेला होता. जंगलांची चोरटी तोड थांबविण्याचा व आदिवासींमध्ये जंगलसंरक्षणाची जाणीव निर्माण करण्याचा हा एक विधायक प्रयत्न ठरू शकला असता. याशिवाय दोन-दोनशे, तीन-तीनशे एकर जमिनी बाळगणारी अनेक कुटुंबे या भागात आहेत. ज्यांचे धान्यकोठार दोन मे या दिवशी रिकामे झाले त्यांची सरकारकडून विनामूल्य मिळालेली जमीन आहे पाचशे एकर. नगरहून प्रसिद्ध होणाऱ्या 'ग्रामीण श्रमिक' या पाक्षिकाने तर ही जमीन यापेक्षा अधिक असावी अशी माहिती प्रसिद्ध केली आहे. हे पत्र म्हणते : श्री. विश्राम हरी पाटील हे १९३२ साली अमेरिकेला जाऊन पी. एच डी. होऊन आले आहेत. १९३५ साली त्यांना ५०० एकर सरकारी जमीन मिळाली असून त्यापूर्वीची त्यांना ६०० एकर जमीन आहे. दाम दुपटीने व्याज घेऊन ( धान्य ) सावकारी करण्याचा त्यांचा धंदा असून दरवर्षी या दराने या भागातील आदिवासी त्यांचेकडून धान्य नेतात व मजुरी रूपाने अगर धान्य रूपाने दुपटीने परत करतात. ( १ ऑगस्ट १९७१ अंक )
या पत्राची ही माहिती खरी नसण्याचीही शक्यता आहे. कारण डॉ. विश्राम हरी व त्यांचे शेतीवाडीवर असलेले चिरंजीव जगन्नाथ विश्राम या दोघांनी आम्हाला ५०० एकर जमीनच त्यांच्याकडे असल्याचा निर्वाळा दिला. शिवाय आपण सावकारी पै पाव आण्याचीही करीत नसल्याचे सांगितले. खरेखोटे परमेश्वर जाणे. पण पाचशे एकर हीसुद्धा काही लहान जमीन नाही. आदिवासींना असे खासच वाटत असले पाहिजे, की या जमिनीवर आपला हक्क आहे. आपल्याला या जमिनीचा वाटा मिळाला पाहिजे. ही त्यांची अपेक्षा-मागणी अन्याय्य आहे असे चालू काळात तरी कुणीच म्हणू शकणार नाही.
आदिवासीला आपल्या नावावर चालू असणारी फसवणूक आणि लुटालूट समजू लागली आहे. समजल्यावर तो संतापणे, सूडाची भावना त्याच्या ठिकाणी जागी होणे साहजिक आहे. शहादे भागात एक साखर कारखाना सुरू होत आहे. भागधारकांची संख्या असेल दोन-अडीच हजार तरी. आदिवासी भागातील उद्योग म्हणून सरकारी कृपादृष्टीला विशेष पात्र ठरलेला हा कारखाना. आदिवासींचे प्रमाण भागधारकांत किती असावे ? एक टक्कादेखील नाही. आदिवासी कल्याणाच्या नावावर गुजर-पाटील-कोळी या सधन जमीनमालक वर्गाने सर्व राखीव सरकारी सवलती तर लाटल्याच आणि प्रत्यक्ष आदिवासींच्या हातावर तुरीदेखील ठेवल्या नाहीत.
‘या साखर कारखान्याच्या गाड्यातून दोन तारखेला (मे) म्हसावदला माणसे आणली गेली, आमच्यावर हल्ला करण्यासाठी. यासाठी हा कारखाना इथे आहे काय ?' एक आदिवासी कार्यकर्ता संतापून बोलत होता, आम्ही शहाद्याला पोचलो त्यादिवशी संध्याकाळीच झालेल्या एका बैठकीत. आदिवासींच्या विकासासाठी निघालेला कारखाना आदिवासींवर अन्याय व जुलूम करणाऱ्या शक्तींचा बालेकिल्ला ठरणार असेल तर आदिवासी एक दिवस तो ताब्यात घेतल्याशिवाय राहणार नाहीत. हे पुढचे चित्र सूचित करणारे हे उद्गार नाहीत, असे कोण म्हणेल ?
अल्पसंख्य धनिक समाजाचे, बहुसंख्य श्रमिक जनतेवरील या प्रकारचे वर्चस्व, ही मक्तेदारी यापुढे चालणार नाही, हा 'न्याय' या शब्दाचा व्यापक सामाजिक अर्थ आहे. सामाजिक व आर्थिक न्यायही आदिवासीला मिळाला पाहिजे. भीक म्हणून वाढलेल्या विकासाच्या चार तुकड्यांवर समाधान मानण्याइतका तो राजकीय दृष्ट्या अप्रबुद्ध राहिलेला नाही. त्याची अस्मिता आता जागृत झालेली आहे. चालू स्थितीत हा सामाजिक न्याय मिळविण्याचा मार्ग त्याला सापडत नाही, म्हणून स्वतंत्र आदिवासी राज्याची स्वप्ने तो कधी रंगवतो, तर कधी नक्षलवादाची लकेर मारण्याची ऊर्मी त्याला येते. या स्वप्नांपासून आणि ऊर्मीपासून याला परावृत्त करायचे असेल तर त्याच्या लोकसंख्येच्या
प्रमाणात, त्या त्या ठिकाणच्या सत्तेचा आणि संपत्तीचा त्याचा न्याय्य वाटा त्याला ताबडतोब दिला गेला पाहिजे. याअलिकडचे कुठलेही थातुर मातुर उपाय चालणार नाहीत.
उदाहरणार्थ--
शहादे तालुका हा आदिवासी तालुका म्हणून ओळखला जातो. एकूण सुमारे एक लाख वसतीपैकी पन्नास ते साठ हजार लोक आदिवासी आहेत. तालुक्यातील एकूण जमिनींपैकी पन्नास ते साठ टक्के जमिनीवर आदिवासींची प्रत्यक्ष मालकी असायला हवी. ती आज आहे का ? सामाजिक-आर्थिक न्याय आदिवासींना मिळतो आहे, हे ठरविण्याची ही आजच्या काळातील मुख्य कसोटी राहील. कारण जमिनीशिवाय संपत्ती उत्पादनाचे दुसरे महत्त्वाचे साधन अद्याप या भागात निर्माण झालेले नाही.
या तालुक्यात खर्च होणारा किती टक्के सरकारी पैसा आदिवासी-भूमिहीन-शेतमजूर यांच्यासाठी खर्च होत आहे ?
कर्ज वाटपाचे प्रमाण लोकसंख्येच्या प्रमाणाशी मिळते जुळते आहे काय ? सामाजिक-आर्थिक न्याय ठरविण्याची ही आणखी एक कसोटी मानता येईल.
राजकीय सत्तेचे वाटप आज अस्तित्वात आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात जिल्हा परिषदांपासून लोकसभेपर्यंत आदिवासींना राखीव अशा जागा आहेत. पण सामाजिक-आर्थिक न्यायाचा पाया नसल्याने हे लोकप्रतिनिधित्वाचे अधिकार पोकळ राहिलेले आहेत. असून नसून सारखेच आहेत. कुणाच्या तरी हातातले बाहुले म्हणून हे आदिवासी आमदार-खासदार आणि जि. प. सदस्य इकडून तिकडे फिरवले जातात, वापरले जातात. आदिवासींवर होणाऱ्या अन्यायांविरुद्ध आवाज यांचेपैकी एकाने तरी उठवला आहे का ? म्हसावद प्रकरणी येथल्या आदिवासी आमदारांचा मुलगाच पकडला गेलेला आहे. आपला मुलगा विनाकारण या प्रकरणात ओढला गेलेला आहे हे या आमदारांचे ठाम मत. पण हात चोळत बसण्यापलीकडे ते काही करू शकत नाहीत. आम्हीच त्यांना बैठकीत सांगत होतो : 'अहो ! असेंब्लीत हा सगळाच प्रश्न काढा. इतर पक्षांच्या आमदारांनाही भेटा. तुम्ही गप्प का राहता ?' काय परिणाम झाला आमच्या या सांगण्याचा तो दिसेलच. पण सामाजिक-आर्थिक सत्तेतील सहभागाशिवाय राजकीय सत्तावाटपाला काही अर्थ नाही, हे ध्यानात घेण्यासाठी हे एक उदाहरण पुरेसे आहे.
या दिशेने या भागातील ढळलेला समतोल पुन्हा स्थापन करण्याचे प्रयत्न झाले तरच शांतता आणि सुव्यवस्था येथे नीट नांदू शकेल. सरकारचे लॉ अॅण्ड ऑर्डरवाले आणि सर्वोदयाचे शांतियात्रिक हे अगदी काठाकाठावर चालत आहेत. सरकारचा दृष्टिकोन बदलण्याची शक्यता आज तरी कमी वाटते. पण सर्वोदयी कार्यकर्त्यांनी या
दिशेने आपले मोर्चे बांधण्यास काहीच हरकत नाही. दमन आणि नमन यामधला वमन हाही प्रकृतिस्वास्थ्याचा, ‘अशांतिशमनाचा' एक उपाय आहे. मात्र भूदान समित्यांचे यासाठी जमीनवाटप समित्यांत ताबडतोब रूपांतर व्हायला हवे. दान याचा संविभाग हाच अर्थ विनोबांना अभिप्रेत आहे. पदयात्रा, शांतियात्रा काढून हे वाटपाचे, संविभागाचे काम होत नाही, असा गेल्या पंधरा-वीस वर्षांतील रोकडा अनुभव आहे. अशा एखाद्या ठिकाणी लक्ष केंद्रित करून जमीनवाटपाच्या प्रश्नाची तड लावण्याचे सर्वोदयी कार्यकर्त्यांनी ठरवले तर भूदान-ग्रामदानाचे रुतलेले गाडे पुन्हा वर येण्याची शक्यता आहे. सर्वोदयी हे आपल्याकडील आद्य भूमिक्रांतिकारक आहेत हे 'माणूस' अगदी पहिल्यापासून सांगत आहे. नक्षलवादी नंतर आले. आणि राजकीय पक्ष तर काल-परवापर्यंत झोपलेलेच होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर वीस-पंचवीस वर्षांनी राजकीय पक्षांचे या मूलभूत समस्येकडे लक्ष गेले व लक्ष गेल्यावरही, मागील वर्षी, दिवस-दोन दिवस जमीन बळकाव आंदोलनाचा गहजब उडवून देण्यापलीकडे या विषयाचा अधिक पाठपुरावा करण्याची त्यांना गरज भासलेली नाही. सर्वोदयींनी ही आपली क्रांतिकारक आघाडी सोडू नये असे वाटते. हे या मंडळींचे स्वकष्टार्जित यश आहे व ते त्यांनी अधिक ठळक करण्याची आज आवश्यकता आहे.
असे घडू लागले तरच शांतियात्रा या खऱ्या अर्थाने अशांतिशमन करणाऱ्या क्रांतियात्रा ठरतील. नाहीतर ती एक निरर्थक क्रिया, वरवरचा उपचार, टिंगलटवाळीचा विषय म्हणून ओळखला जाईल. उशाखाली विंचू असताना डोक्याला पट्टी बांधून झोपण्यात काय राम आहे ?
____________________________________________________________________________________________
____________________________________________________________________________________________
दिनांक ३० जानेवारी १९७२. रविवार. ऐन दुपारची वेळ, शहादे येथील नदीकाठचे भिलाटी मैदान माणसांनी गजबजायला सुरुवात झाली होती. चारही दिशांनी माणसे थव्याथव्यांनी येत होती. पाहता पाहता हजार झाली. दोन हजार झाली. तीन तीनच्या रांगात सर्वजण उभी राहिली. लाऊडस्पीकरवरून सूचना मिळाली. मोर्चा सुरू झाला. वाटेत, वळणावळणावर आणखी माणसे सामील होत गेली. बहुतेकजण आपल्या गावाहून, दहाबारा मैलांवरून पायीच या मोर्चासाठी मेळाव्यासाठी आलेले होते. तासभर मोर्चा गावातील निरनिराळ्या रस्त्यांवरून फिरला.मूकपणे.
गडबड नाही, गोंधळ नाही, अचकटविचकट हावभाव नाहीत. तरी घराघरातून मंडळी मोर्चा पाहण्यासाठी बाहेर येऊन उभी राहात होती. मुख्य चौकात मोर्चा आला तेव्हा भूमिहीन शेतमजुरांचे नेते श्री. दत्ता देशमुख, जनसंघाचे या भागातील एक प्रमुख कार्यकर्ते श्री. लखन भतवाल मोर्चाला सामोरे झाले. मोर्चा पुढे तहसील कचेरीकडे सरकला. मोर्चा मूक का म्हणून काहींनी नाराजी व्यक्त केली. हा मूक नसून शोकमोर्चा समजा, कारण या लोकांच्या जमिनी गेलेल्या आहेत असा कुणी खुलासा परस्पर करून मोकळेही झाले. गर्दी वाढतच होती. शहरी चेहरेही मोर्चात अधूनमधून खूप दिसत होते. धूळ्याहून, पुण्या-मुंबईहून, सोमनाथहून बरेच लोक या मोर्चा-मेळाव्यासाठी आलेले होते.
दोन मे १९७२ या दिवशी घडलेल्या पाटीलवाडी-म्हसावद प्रकरणानंतर या भागातील आदिवासी-शेतमजुरांमध्ये बरीच जागृती झालेली आहे. आपल्यावर होणारे अन्याय, आपली उपासमार, आपण संघटित झाल्याशिवाय दूर होणार नाही असे सर्वाना आता तीव्रतेने जाणवत आहे. शहादे-तळोदे तालुक्यात हे जागृतीचे प्रमाण विशेष आहे, कारण गोविंदराव शिंदे, अंबरसिंग महाराज व इतर अनेक सर्वोदय कार्यकर्ते पूर्ण वेळ याच कामाकडे लक्ष पुरवीत आहेत. या मंडळींनी गावोगाव हिंडून जमिनींच्या हस्तांतरांची एक जुजबी पाहणीही केलेली आहे. त्यावरून असे दिसून आले, की केवळ शहादे-तळोदे या दोन तालुक्यात मिळून दोन-अडीचशे आदिवासी कुटुंबांची, सुमारे पाच हजार एकर जमीन गैरमार्गाने सावकारांनी बळकावलेली आहे. निदान या जमिनी तरी आदिवासी मालकांना ताबडतोब परत मिळायला काय हरकत आहे ? यासाठी नवीन कायदा होण्याची वाटसुद्धा पाहायला नको. आहेत तेच कायदे फक्त काटेकोर पद्धतीने अंमलात आणले जायला हवेत. पण हे आज, निदान या भागात तरी घडत नाही. दिल्ली-मुंबईतली सरकारे भली डावी असोत, की क्रांतिकारक घोषणा या सरकारांनी केलेल्या असोत. स्थानिक पातळीवर, खालपर्यंत धोरणे कशी अंमलात आणली जातात, घोषणा व कार्यक्रम कसे राबवले जातात हा खरा महत्त्वाचा मुद्दा आहे. या भागात कागदोपत्री जमिनी आदिवासींच्या मालकीच्या आहेत. सावकारांशी केलेल्या करारमदारांची मुदतही संपून गेलेली आहे. तरी कूळ म्हणून, बटाईदार म्हणून सावकारच सर्व जमिनी कसत आहेत, उपभोगत आहेत. मालक असूनही आदिवासी मात्र उपाशी तो उपाशीच आहे. कारण शासन या आदिवासींच्या हक्कसंरक्षणाबाबत जागरूक नाही. सरकारी यंत्रणा व सत्ता जमीनदार-सावकार वर्गाच्या हितासाठी बिनदिक्कत राबवली जाते. म्हणून दानपत्रे गोळा करीत हिंडण्यापेक्षा एके ठिकाणी तळ ठोकून आदिवासींची, भूमिहीन शेतमजुरांची स्थानिक शक्ती जागृत करावी, गावोगाव या जागृत जनशक्तीच्या जोरावर जमिनीचे, रोजगारीचे प्रश्न सोडवून घ्यावेत हा पर्याय येथील सर्वोदयी कार्यकर्त्यांनी स्वीकारला आणि यादृष्टीने गेल्या आठदहा महिन्यात खूपच काम केले.
गावोगाव सभा घेतल्या, शिबिरे भरवली, वृत्तपत्रांचे साहाय्य घेतले, समानविचारी व्यक्तींशी व संस्थांशी सहयोग साधला. भू-मुक्तीचा कार्यक्रम सर्वांसमोर ठेवला. सावकारांनी गैरकायदा बळकावलेल्या जमिनी सोडवून घेणे, मुक्त करणे- यासाठी आजचा मोर्चा आणि मेळावा होता. जे गेले सहा महिने सभासभांतून सांगितले त्याचा सामुदायिक पुनरुच्चार आज होत होता.
मोर्चा मूक होता तरी फलक बोलके होते. 'आम्हाला काम द्या', 'आम्हाला न्याय हवा, भीक नको', 'आमचा मंत्र जय जगत्','आमचे तंत्र ग्रामदान-ग्राम स्वराज्य', 'जागृत जनता अब न सहेगी, धन और धरती बाट रहेगी' - आणखी अशा कितीतरी घोषणा, मागण्या, निर्धार फलकांवर व्यक्त झालेले होते. तुकड्या वाढल्या तसे फलकही वाढले. ज्यांना काठ्याही मिळू शकल्या नाहीत त्यांनी हातांनीच फलक उंच धरलेले होते- फणा नसलेल्या नागासारखे हे हात ! शस्त्र नसलेली ही सेना ! युद्धाला निघालेले हे शांतियात्रिक !
पण आपल्या श्रमाचे चीज झाले म्हणून सर्वोदयी कार्यकर्ते मनोमनी तृप्त होते. एकेक तुकडी दृष्टीच्या टप्प्यात आली, की अंबरसिंगाचा चेहरा समाधानाने उजळून निघत होता.
एकजण तर विशेषच गहिवरला. पाडळद्याची तुकडी मोर्चात सामील होण्यासाठी एका वळणावर उभी आहे हे दिसल्यावर! या तुकडीत मुले होती आणि स्त्रियाही होत्या. केवढे परिवर्तन! बारा वर्षांपूर्वी हा इथे आला तेव्हा काय स्थिती होती! शहरी इसम पाहिला, की भिऊन मोठी माणसेही लांब पळत होती. शरीरांचे कोळसे. मने भुताखेतांच्या सृष्टीत वावरणारी. लंगोटीशिवाय वस्त्र नाही. दारू पाचवीला पुजलेली. भाषा वेगळी. मुलुख परका. प्रवास सगळा पायी. तरी हा इथे ठाण मांडून बसला. विनोबांचा देश म्हणून. भूदानाचा पाईक होऊन. आदिवासींसाठी शाळा काढ, स्वस्त धान्याची दुकाने चालव, एक नाही अनेक उद्योग याने आरंभले. काही चालले, काही फसले. तरी याने जागा सोडली नाही. अवमानित, एकाकी. जमीनदार आणि राज्यकर्ते यांच्याकडून होणारे बदनामीचे घाव झेलीत झेलीत हा आपले काम करीतच राहिला. पराभवाच्या वेदनेने हा आतून कितीवेळा तरी ढासळला असेल ! पण आज त्याला आधार सापडला असावा. आपण केलेले सगळेच काही वाहून गेले नाही या विचाराने त्याला खूप सावरले असावे. त्याने पेरलेले थोडेथोडे उगवत होते त्याचा आदिवासी आज जागा झालेला दिसत होता. त्याने हाताशी धरून लहानाची मोठी केलेली आदिवासी मुले आता मोर्चे काढीत होती, मेळावे भरवीत होती. या मोर्चा-मेळाव्यांसाठी लांबलांबहून, शहरातून मंडळी आस्थेवाईकपणे येत होती. वृक्ष वठतो की काय, कोसळून पडतो की काय, अशी भिती होती. आज या वृक्षालाच पालवी फुटलेली होती.
भूदानाला-सर्वोदयाला आज एक नवी वाट सापडली होती. भाऊ यामुळेच गहिवरले होते. त्यांच्या तपश्चर्येचे आज सार्थक झालेले त्यांना दिसत होते. भाऊ मुंदडांमुळेच आजचा दिवस या भागात असा उगवला होता. बारा वर्षांपूर्वी ते या अंदमानात आले नसते तर ! बिहारात जसा पूर्णिया तसा महाराष्ट्रात हा सातपुडा. संथाळांप्रमाणेच भिल्लांचीही दिवसाढवळ्या शिकार होत राहिली असती.
मोर्चाचे रूपांतर मेळाव्यात झाले. एव्हाना दुपारचे दोन-अडीच वाजलेले होते.
चार तास मेळावा भर उन्हात शांतपणे बसून होता. पाच-सहा हजार तरी लोक असावेत. बहुतेक आपला रोजगार बुडवून आलेले. किंवा कामच नसलेले !
वक्तेही खूप होते. ठाकुरदास बंग, वसंतराव बोंबटकर, गोविंदराव शिंदे, अंबरसिंग ही सर्वोदयाची आघाडी. दत्ता देशमुख, पन्नालाल सुराणा, बा. न. राजहंस, रतन भतवाल ही राजकारणात वावरणारी मंडळी, सर्व्हिस सिव्हिल इंटरनॅशनलचे कॅनॉस, भूमिपुत्र प्रतिष्ठानचे आबा करमरकर -या सर्वांनीच मेळाव्यासमोर ठेवल्या गेलेल्या कार्यक्रमाला जोरदार पाठिंबा व्यक्त केला.
कार्यक्रम साधा आणि सरळ होता-
१. ज्या जमिनी आदिवासी खातेदारांच्या नावावर नोंदलेल्या आहेत, पण आज जबरदस्तीने इतर कुणी ज्या कसत आहेत, त्या ताबडतोब ताब्यात घ्या.
२. दहा वर्षांच्या कराराने करायला दिलेल्या जमिनी कराराची मुदत संपल्यावर लगेच ताब्यात घ्या.
३. प्रत्येकाला रोजगार मिळण्याची हमी सरकारने जाहीर केली आहे. तिची अंमलबजावणी ताबडतोब झाली पाहिजे. ही मागणी संघटितरीत्या आंदोलनाच्या मार्गाने सरकारपुढे मांडण्यासाठी, रोजगार नसलेल्या आदिवासींनी ग्राम स्वराज्य समितीच्या कार्यालयावर आपली नावे उद्यापासून नोंदवावीत.
कार्यक्रमाच्या जोडीने काही मागण्याही शासनासमोर या मेळाव्याच्या द्वारा मांडण्यात आलेल्या होत्या-
१. सर्व गावांना १५ ऑगस्ट १९४७ पासून नवी शर्त सरकारने लागू करावी व गेल्या २५ वर्षातील सर्व जमिनींची हस्तांतरे रद्द करावीत.
२. सरकारच्या संस्था व खाती यांच्यामार्फत आदिवासींना देण्यात आलेली कर्जे रद्द करावीत.
३. शेतमजुरीचे किमान दर ताबडतोब बांधून द्यावेत.
मेळावा आटोपला. रात्रीपासून निवडक कार्यकर्त्यांचे एक शिबिरही सुरू झाले.
परगावची मंडळी परतली. सोमनाथहुन, मुंबई पुण्याहून आलेले काही तरुण मात्र शिबिरासाठी थांबलेले होते.
मेळाव्यात ठरलेला कार्यक्रम प्रत्यक्षात अंमलात कसा आणता येईल, अडचणी काय आहेत, कार्यकर्त्यांची शक्ती किती, वातावरण कसे आहे, शासनाची, जमीनदार सावकारवर्गाची भूमिका कोणती राहील-वेगवेगळ्या प्रकारे विषयाची छाननी चालू होती. कोणी तात्त्विक बोलत होते. कुणाचा भर वास्तवावर होता. काहींना तर दुपारची वास्तवताच भेडसावत होती. आज धान्य संपले. शिबिरासाठी जमलेल्या लोकांची दुपारच्या जेवणाची सोय कशी करायची ? भाजीवाल्याचे कालचे पैसे दिल्याशिवाय आज तो भाजी नाही म्हणतो. गावात आता पैसे मिळण्याची सोय नाही. सावकारमंडळी आता सर्वोदयाला नावे ठेवू लागलेली आहेत. मग मुंबईचे दाते-करमरकर उपयोगी पडतात. जीपचा दोन दिवसांचा पेट्रोल खर्च ते पुढे करतात. तेवढ्या पैशांत आजची दुपारची वेळ तरी निभावली जाते.
फोटोवाला येतो. त्याने आदल्या दिवशीचे, मोर्चा-मेळाव्याचे फोटो काढलेले असतात. हौशीने कुणीतरी सांगितलेले असते. पण बील पाहून मंडळी हबकून जातात. एकशे सत्तर रुपये. कुठून आणायचे एवढे पैसे ?
भाऊ मुंदडा सर्व्हिस सिव्हिल इंटरनॅशनलच्या पाहुण्याला घेऊन तोरणमाळ-धडगावकडे रवाना झालेले असतात. त्यांच्या सोबत सहज तो भाग पाहावा म्हणून निघालेले असतात, पुण्याचे सुधीर बेडेकर, मुंबईचे लिमये-बिडवाई.
दाते-करमरकर-राणे या मुंबईच्या मंडळींनीही शहादे सोडलेले असते.
जानेवारीची ही एकतीस तारीख असते. रात्री शिबिरात चर्चा चालू असते. विषय असतो या भागातील रोजंदारीची परिस्थिती. मेळाव्याने 'काम द्या' अशी मागणी केलेली असते. कुणीतरी माहिती सांगतो - शहाद्यापासून दहा-बारा मैलांवर सरकारने दरा-धडगाव रस्त्याचे मोठे काम काढलेले आहे. पण लोक कामाला जात नाहीत. नासिकहून कामगार आणावे लागतात. असे का होते ? दोघा-चौघांनी समक्ष जाऊन जागेवर चौकशी करून यावी असे ठरते. त्याप्रमाणे श्री. ग. माजगावकर, दिलीप कामत, बाबा दौल्या वळवी, कुमार शिराळकर हे चौघेजण दुसऱ्या दिवशी सकाळी बसने तिकडे जायचे ठरवतात.
दुसरी एक अशीच तुकडी कुरंगीला पाठवावी असे ठरते. या गावचा एक आदिवासी शिबिराला आलेला असतो. त्याची जमीन इतर कुणी बळकावलेली असते. सात-बाराचा उतारा वगैरे त्याने बरोबर आणलेला असतो. गावाला जाऊन याबाबत खरी परिस्थिती काय आहे हे जाणून घेणे, हे या दुसऱ्या तुकडीचे काम असते.
एक फेब्रुवारीचा दिवस उजाडला. पहिली तुकडी चार भाकऱ्या व मिरच्या पिशवीत बांधून एस टी. स्टॅडवर पोचली . तास झाला. दीडतास होऊन गेला. तरी दरा-धडगाव गाडीचा पत्ता नाही. चौकशी करता समजले, की गाडी बिघडली आहे. वेळेचा काहीच भरवसा सांगता येत नाही. असे घोटाळे येथे वरचेवर होतच असतात. कार्यक्रम सगळे विस्कटून जातात.
सायकली किंवा जीप मिळते का हे पाहण्यासाठी ही तुकडी पुन्हा शिबिराच्या जागी येते. गोविंदराव शिंदे, अंबरसिंग शिबिराचा समारोप करण्याच्या बेतात असतात.
जीपसाठी निरोप जातो. गोविंदराव शिबिर संपता संपता एक बातमी सांगून तेवढ्यात सगळ्यांना थक्क करून सोडतात. बातमी अशी-
-मेळावा संपल्यावर अमुक अमुक गावचा एक आदिवासी आपल्या मालकीच्या पण सावकाराने बळकावलेल्या शेतात गेला. त्याने पीक कापायला सुरुवात केली. सावकाराने पोलीस पाठविले. आदिवासीने पोलिसांना कागदपत्र दाखविले. पोलिसांची खात्री पटली. काहीही कारवाई न करता पोलीस परत गेले.
शिबिरात टाळ्यांचा कडकडाट होतो.
जीपची सोय झालेली आहे असा निरोप येतो.
एक वयस्क आदिवासी तेवढयात येऊन बाजूला बसलेला असतो, हे कुणाच्या लक्षात येत नाही. अंबरसिंगचे व त्याचे हळू आवाजात काहीतरी बोलणे चालू असते. पहिल्या तुकडीतले, जीपची वाट पाहणारे तरुण कान टवकारतात. गोविंदरावही ओढले जातात. शिबिर आवरलेले असल्याने घोळका आणखीनच वाढतो.
वयस्क आदिवासी असतो सलसाडीचा. त्याने बातमी आणलेली असते, की मेळाव्यानंतर, सलसडीच्या शिवारातील एका आदिवासीच्या जमिनीवरचे पीक बाहेरगावचे मजूर बोलावून सावकार रातोरात कापायला आला. सलसडीच्या आदिवासींना ही गोष्ट समजली. त्यांनी शेतावर जाऊन सावकाराच्या माणसांना रोखले, पीक कापू दिले नाही. सावकाराने पोलीस बोलाविलेले आहेत. दोन्ही बाजूचे लोक शेतावर बसून आहेत.
पहिल्या तुकडीने आपला मोर्चा आता बदलला आहे. दरा-धडगाव रस्त्याच्या कामाची माहिती घेण्यासाठी दऱ्याला जायचे ठरले होते. तेथून जवळच असलेल्या उनभदेवाच्या गरम झऱ्यावर आंघोळी उरकाव्यात, बरोबर घेतलेला भाकरतुकडा खावा आणि परतावे असा विचार होता. पण आता उनभदेवाला येथूनच रामराम. सलसडीचे शिवार या तुकडीला खुणावत होते.
पहिली तुकडी सलसाडीच्या शिवारात पोचते.
सूर्य ऐन माथ्यावर असूनही वातावरणात जळजळ नाही.
दुपारझोपेच्या गुंगीत पहुडलेला समोरचा निळासावळा सातपुडा !
सलसाडी व्यसनमुक्त आहे. गाव गरीब असला तरी स्वावलंबी आहे. सुसंस्कृत आहे.
अडीचशे वस्तीच्या या लहान टुमदार आदिवासी गावाचा सरपंच लिहितो :
अर्जदार : गनसिंग जंगू ठाकरे (सरपंच, सलसाडी, ता. तळोदे, जि. धुळे.)
विषय : तळोदे पो. चौकीतील पो. स्टाफच्या गैरवाजवी वर्तनाबद्दल.
मा. मॅजिस्ट्रेट साहेब तळोदे.
मे. साहेब, वरील अर्जदार अर्ज करतो,की ता. ३१ जानेवारी १९७२ च्या मध्यरात्री नंतर साधारण ३। ते ३।। च्या सुमारास मी माझ्या घरी (मु. सलसाडी) झोपलो असता श्री. भामट्या सखा ठाकरे (पो. पा. सलसाडी) व जंगल सोसायटीचे वॉचमन श्री. मोहनसिंग सोन्या भिल व श्री. करणसिंग हरिराम ठाकरे हे माझ्याकडे आले व त्यांनी मला सांगितले, की श्री. करणसिंग हरिराम ठाकरे यांच्या शेतावर (स. नं. १३ सलसाडी) प्रतापपूर येथील सुमारे ४०-५० लोक, १५ गाड्या, छकडे व ४ पोलीस (नं. १९२, १७३, २८२) (आले आहेत ! ) त्या सांगण्याप्रमाणे मी व पोलीस पाटील श्री. भामड्या सखा ठाकरे व श्री. मोहनसिंग सोना भिल सकाळी चार वाजताच्या सुमारास त्या शेतावर गेलो. तिथे गेल्यावर श्री. दौलतसिंग तोडरसिंग रजपूत यांच्याजवळ चौकशी केली असता त्यांनी आम्हास या भानगडीत न पडण्याची ताकीद दिली. श्री. दौलतसिंग याच्याबरोबर त्याचा भाऊ श्री. गुलजार तोडरसिंग रजपूत, श्री. रामसिंग खंडा रजपूत व श्री. नारायण नवलसिंग रजपूत हेही होते. मग आम्ही चौघे परत आलो.
ता. १ फेब्रुवारीला आम्ही सकाळी ६ च्या सुमारास शेतावर गेलो. शेतावर लोक आणि पोलीस होते. आम्ही परत गावात आलो आणि श्री. करणसिंग हरिराम ठाकरे यांनी श्री. सुपड्या बापू ठाकरे यास सरळ ग्राम शांति सेनेच्या शिबिरात (पाठविले ! ) तेथे बरेच कार्यकर्ते होते व श्री. गोविंदराव शिंदेशी सर्व बोलणी केली.
सुमारे १० च्या (११-११।। च्या) सुमारास खालील व्यक्ती १, २, ३, ४, ५, ६, ७ जीपने गावात आल्या. (गोविंदराव शिंदे, अंबरसिंग, श्री. ग. साजगावकर इत्यादी) आम्ही तिघे व आलेले कार्यकर्ते गेलो. तेव्हा प्रतापपूरचे मजूर कापणी करत होते व पाच गाड्यांमध्ये कापलेली कणसे भरलेली होती. बाकी गाड्या खाली होत्या.
त्यानंतर सर्व सर्वोदय कार्यकर्त्यांच्या सांगण्याप्रमाणे आम्ही लोक व प्रतापपूरचे सर्व लोक आणि पोलीस यांनी एकत्र बसून समझोत्याची बोलणी केली व समझोता झाल्यानंतर लिखापडीस सुरुवात करणार असता पीक संरक्षण सोसायटीचे प्रमुख श्री. नरोत्तम भबुता गुजर (रा. तळोदे) हे आपल्या स्वत:च्या जीपमध्ये पो. इ. देशमुख (नंदुरबार), पो. स. इ. जहागिरदार व से. पो. स. ई. कोळी यांना घेऊन (आले !) तेथे जीप वेगाने आली व आमच्या अगदी जवळ येऊन उभी राहिली. जीप थांबल्याबरोबर काहीही प्राथमिक चौकशी न करता वरील पो. अधिकाऱ्यांनी व श्री. नरोत्तम गुजर यांनी सर्व लोकांवर लाठ्यांनी एकदम मारहाण सुरू केली. या धामधुमीत पो. स. इ. जहागिरदार यांनी काहीही चौकशी न करता मला हातातील वेत फेकून मारली. याच वेळी पो. पा. (पोलीस पाटील) श्री. भामटया सखाराम ठाकरे यांच्या पाठीवरही श्री. नरोत्तम यांच्या हातातील वेताचा निसटता वार बसला. मारहाण करीत असता स. इ. जहागिरदार, सलसाडी गावातील कोणीही येथे थांबू नये नाहीतर मी गोळ्या चालवीन, असे ओरडत होते. कित्येक मजूर या लाठीहल्याला घाबरून पळून जात असता पो. अधिकाऱ्यांनी थोड्या अंतरापर्यंत मारत पाठलाग केला. आम्हीही बाजूला सरून दूर उभे राहिलो.
त्यानंतर पो. अधिकाऱ्यांनी शहाद्याहून आलेल्या श्री. माजगावकर व त्यांच्या बरोबरच्या इतर लोकांना अभद्र बोलून, जीपमध्ये बसवून नेले व प्रतापपूरचे लोक भरलेल्या व रिकाम्या गाड्या जुंपून घेऊन गेले.
त्या भीतीच्या वातावरणामुळे मी कुठेच जाऊ शकलो नाही म्हणून मी मे. साहेबांना आज फिर्याद देत आहे.
हा माझा जबाब बरोबर आहे.
पोलीस आम्हा मंडळींच्या संरक्षणासाठी शेतात आले, पोलिसांनी लाठीमार केलाच नाही, पोलीस केवळ दिसताच शेतात जमलेले शेसव्वाशे आदिवासी पळन गेले, प्रतापपूरच्या ग्रामपंचायतीत आम्ही नरोत्तम यांच्या जीपमधून पोलिसांची विनंती पटल्यामुळे स्वखुषीने गेलो, पोलिसांना कळवून यापुढे कुठल्याही शेतात जाण्याचे आम्ही मान्य केलेले आहे व तसे लिहूनही दिलेले आहे,
वगैरे अर्थाचा वरील सलसाडी-प्रतापपूर प्रकरणाबाबतचा सरकारी खुलासा किती बनावट आहे, खोटा आहे हे वरील फिर्यादीवरून आता चांगलेच स्पष्ट होत आहे.
फिर्याद करणारे गृहस्थ सलसाडी गावचे सरपंच आहेत. पोलिसांचा लाठीहल्ला त्यांनी आमच्याप्रमाणे केवळ डोळ्यांनी पाहिलेलाच नाही, प्रत्यक्ष भोगलेलाही आहे. या हाणामारीतून गावचे पोलीस पाटीलही सुटलेले नाहीत. अशा जबाबदार व्यक्तींनी, लोक प्रतिनिधींनी केलेल्या तक्रारींची तरी सरकार दखल घेणार आहे की नाही ?
'महाराष्ट्र टाइम्स'ने आपल्या अग्रलेखात (दिनांक १७ फेब्रुवारी १९७२) या सर्व प्रकरणाची नि:पक्षपाती चौकशी झाली पाहिजे अशी जाहीर मागणी केलेली आहे. एका जबाबदार व वजनदार वृत्तपत्राच्या या मागणीचा तरी शासन विचार करणार आहे की नाही ?
कठीण वाटते. कारण सरपंच स्वतः तळोद्याला दुसऱ्या दिवशी वरील फिर्याद दाखल करण्यासाठी गेलेले असता त्यांना अनुभव वेगळा आला. ओळखीच्या वकिलांनी मदत करण्यास नकार दिला. अवश्य ती डॉक्टरी सर्टिफिकेट्स मिळाली नाहीत. सरपंच असला तरी आदिवासी माणूस पडला तो, आदिवासी पोलिसांविरुद्ध फिर्याद करतो म्हणजे काय !
फिर्याद आजतागायत नोंदली गेलेली नाही.
कायदा कुणाचे संरक्षण करतो, न्याय कुणाच्या बाजूला झुकलेला असतो हे उघड करून दाखविणारी ही सलसाडी-प्रतापपुर घटना आहे. लोकांनी परस्पर जरी काही समझोता केला, शांततामय मार्गाने आपले प्रश्न सोडवले, तरी बडे जमीनदार हे प्रयत्न हाणून पाडतील. पोलिसांची त्यांना मदत होईल. कोर्टकचेऱ्यापर्यंत गोरगरिबांचे हात पोचूच शकणार नाहीत अशी व्यवस्था केली जाईल. नाईलाजाने, निरुपाय म्हणून गोरगरीब जनतेने मग इतर मार्ग हाताळले, की आहेतच कपाळावर मारण्यासाठी शिक्के तयार ! नक्षलवादी, हिंसाचारी, लोकशाहीविरोधी, शांतता आणि सुव्यवस्था धोक्यात आणणारे....इत्यादी इत्यादी.
सलसाडीला जाण्यापाठीमागे निदान भूमुक्ती मेळाव्यात संमत झालेल्या ठरावाची व कार्यक्रमाची अंमलबजावणी करावी हा काहीसा आक्रमक व आव्हानात्मक पवित्रा तरी होता. पण तसा काही पवित्रा नसतानादेखील पोलीस जमीनदारांनाच कशी साथ देतात, गोरगरीब जनता कशी नाहक छळवादाला बळी पडते, कायदा कसा बिनदिक्कत पोलिसांकडूनच पायदळी तुडविला जातो, कायदेशीर उपाययोजनांची वाट गरिबांसाठी कशी बंद झालेली असते, हे अनेक दैनंदिन
घटनांवरून या भागापुरते तरी सहज सिद्ध करणे शक्य आहे-सलसाडीनंतर चारच दिवसांनी घडलेली ही एक घटना नमुना म्हणून पाहण्यासारखी आहे
रात्री आठचा सुमार होता. शहाद्याच्या ग्रामस्वराज्य समितीच्या कचेरीत एक पन्नाशीच्या जवळपासचा आदिवासी आला. काही वेळ बसून, काही वेळ निजून आणि काही वेळ चक्क जमिनीवर गडबडा लोळून त्याने आपली कर्मकहाणी तेथे असलेल्या कार्यकर्त्यांना सांगितली. कार्यकर्त्यांनी ती सलगपणे लिहून काढली. माणूसकडे पाठवून दिली. दोन वकील, दोन पत्रकार, एक डॉक्टर असा ताफा तडक शहादे मुक्कामी पोचला. कहाणीची सत्यासत्यता पुन्हा एकदा पडताळून पाहण्यात आली. सर्वांची अशी खात्री पटली, की आदिवासी सांगतो आहे ते खरे आहे. पोलिसांनी केलेला छळवाद भयंकरच अमानुष आहे. कायद्याचा त्याला कुठलाही आधार नाही. पण कायद्याच्या चौकटीत राहून या अन्यायाचे निराकरणही होऊ शकत नाही. पुरावा कुठून, कसा आणायचा ?
कहाणी अशी आहे-
ग्रामस्वराज्य समिती शहादा, जिल्हा धुळे.
अर्जदार : आवल्या पवल्या (माळचे) भिल, राहणार मनरद, ता. शहादा, जिल्हा धुळे.
मी मनरद शिवारातील शिरूडकडील मनरद व शिरूड या विभागातील पीक संरक्षण सोसायटीचा वॉचमन आहे. पाच वर्षांपासून वॉचमनचे काम करीत आहे. माझ्या शिवारातील श्री. त्रिंबक हरी पाटील, राहणार मनरद यांचे शेतातील S 4 कंबोडिया कपासाचे पीक चोरी गेल्याचे आरोपावरून मला पोलीस स्टेशन शहादा येथे आणण्यात आले. तुम्ही गुन्हा कबूल करून घ्या असे पी. एस. आय. म्हणत होता. मी म्हणालो, मला माहीत नाही. मी स्वतः रखवालदार असून मी चोरी कशी करणार. एवढे ऐकून पोलीस सब-इन्स्पेक्टर याने वीज लावली. वीज लावल्यामुळे मला खूप शारीरिक त्रास झाला. खूप वेदना झाल्या. तोंडाला कोरड आली. अंगाला आग सुटली. त्या आगीमुळे शरीर जळू लागले. मी मोठमोठ्याने ओरडुन रडू लागलो. पाया पडू लागलो. तेव्हा त्यांना दया आली. वीज काढली. परत शिवीगाळ करून विचारपूस केली. खरे सांगून दे. मी म्हणालो, मला माहीत नाही. परत पी. एस्. आय्. ला राग आला. त्याने पोलिसांना मला पकडायला लावले. परत माझ्या हातांना वीज लावली. माझ्या अंगातील अग्नी भडकला. शरीर जळू लागले. सर्व अंगात आग भडकू लागली. तोंडाला परत खूप कोरड पडली. दाह वाढत होता. शरीरातील अग्नी एके ठिकाणी बसू देत नसे. सारखी ऊठबस लोळणे करावे लागत होते. स्थिरता नाही. नंतर मी ओरडलो. परत वीज काढली. नंतर पी. एस. आय. ने विचारले. खरे सांग, कपाशी कोणी चोरली?
मला माहीत नाही साहेब. परत साहेब शिव्या देऊ लागला. नंतर तो तपासासाठी निघून गेला. मग पोलिसाला विचारून इंजेक्शन घेण्यासाठी अंगातील अग्नी व तोंडातील कोरड कमी करण्यासाठी डॉक्टरकडे जाण्यास निघालो. प्रथम डॉ. सुरेश पटेलकडे गेलो. त्यांनी वेळ नसल्याचे सांगितले. नंतर मी ग्रामस्वराज्य समिती शहादा यांचेकडे आलो. तेथे वरील प्रकार सर्व सांगितला. नंतर त्यांनी म्हणजे अमरसिंग सुरतवंती यांनी लढ्ढा डॉक्टरचे नावे चिठ्ठी दिली. नंतर चिठ्ठीप्रमाणे डॉक्टरने मला तपासणी करून अग्निशामक दाह कमी करण्यासाठी एक इंजेक्शन व चार गोळ्या देऊन परत केले. नंतर मी ग्रामस्वराज्य समिती, शहादा यांच्या ऑफिसात जाऊन हा विनंती अर्ज करीत आहे. कृपया मला निरपराधीस न्याय मिळवून देणेस नम्र विनंती. वरील अन्यायास वाचा फोडणेस विनंती. परत पी. एस. आय. ने बोलाविले आहे. तो परत मला मारण्याची व वीज लावण्याची शक्यता आहे. कृपया वीज लावणे व मारणे थांबवणेस विनंती.
टीप :
१ : तिरसिंग मुरा भिल.
२ : गुल्या भिल्या भिल.
३ : दामू आवल्या भिल.
वरील तिघांनाही माझेसमोर वीज लावली. वीज लावल्याबरोबर त्यांनी तोंडात येईल त्याची नावे सांगितली. त्यामुळे त्यांचा त्रास कमी झाला. रात्रीतून परत होईल असे वाटते.
पंचवीस वर्षे लोकशाही नांदत असलेल्या स्वतंत्र देशातील ही कहाणी आहे.
समाजवादी घडण होत असलेल्या देशात अशा घटना राजरोस दिवसा घडत आहेत.
एक किंवा दोन नाहीत. शेकडोंनी.
कसे लक्ष वेधायचे याकडे लोकशाही आणि समाजवाद मिरवणाऱ्यांचे ?
सांगून झाले. लिहून झाले. मोर्चे निघाले. मेळावेही भरले.
पण उपेक्षा संपत नाही. हालअपेष्टा आणि छळ थांबत नाहीत.
आता निवडणुका आलेल्या आहेत. हे सर्व संपल्याचे, थांबल्याचे वरवर तात्पुरते दिसेल. पण मुळात काही बदल होणार नाहीत. कारण चार निवडणुका होऊन गेल्या, पक्ष आणि माणसे बदलली तरी असा मूळबदल काही झालेला नाही.
हा मूळबदल, आदिवासींची, उपेक्षित जनतेची अस्मिता आणि सामुदायिक पुरुषार्थ जागृत होईल तेव्हाच घडून येणार आहे.
या आत्मपुरुषार्थाशिवाय सगळे बाहेरचे आहे, उसने आहे, कृत्रिम आहे.
बहिष्कार ही पुरुषार्थ जागृतीची एक प्रारंभिक अवस्था आहे.
छळाकडून बळाकडे जाण्याची ही एक पहिली पायरी आहे.
निवडणुका जवळ आल्यामुळे साहजिकच मतदानावर बहिष्कार टाकून आपल्या उपेक्षेकडे, हालअपेष्टांकडे, छळवादाकडे बाहेरच्या जगाचे लक्ष वेधावे असा विचार या भागातील- विशेषतः शहादे भागातील आदिवासी जनतेमध्ये मूळ धरू पहात आहे.
शहादे तालुक्यापुरती ही कृती मर्यादित आहे, फार लहान आहे, म्हणून ती दुर्लक्षणीय मात्र ठरू नये. कारण या लहानशा सामुदायिक कृतीने आदिवासी आपला गमावलेला आत्मविश्वास परत मिळवू पाहात आहे.
आजवर त्याने मते विकली. दोन-चार रुपयांसाठी. दारूच्या एका बाटलीसाठी.
आज तो या मोहांवर विजय मिळवून हे मत साभार परत करायला निघालेला आहे. या लोकशाहीचा, या तथाकथित कायद्याच्या राज्याचा आमच्या दैनंदिन जीवनाला कसलाही स्पर्श नाही; ही लोकशाही व तिचे कायदे आम्हा गोरगरिबांना कसलेही संरक्षण देऊ शकत नाही, हे तो आज प्रथमच संघटितपणे सांगत आहे.
एका शहादे मतदारसंघापुरतेच हे सांगणे आहे, फार तर दहा-वीस हजार मूक जनतेचा हा मौन प्रतिकार आहे म्हणून तो डावलला जाऊ नये.
कारण डावलला गेलेला फारफार डावीकडे झुकण्याचा धोका असतो आणि असा धोका लोकशाहीला परवडण्यासारखा नसतो.
____________________________________________________________________________________________
____________________________________________________________________________________________
तरुण मित्राचे प्रेत घेऊन गाडी शहाद्याकडे निघाली.
हा हन्त हन्त !
पुढचे मागचे बराच वेळ काही आठवले नाही.
मग हळूहळू एकेक चरण आठवत गेला.
रात्रीर्गमिष्यति भविष्यति सुप्रभातम्
रात्र संपेल, पहाट उजाडेल.
भास्वान् उदेष्यति हसिष्यति पद्मजालम्
सूर्य वर येईल, सगळी कमळे उमलतील.
इत्थं विचिंतयती कोषगते द्विरेफे
रात्रभर कमळात अडकलेला भ्रमर अशी स्वप्ने रचित होता-
हा हन्त हन्त नलिनीम् गजमुज्जहार..
हाय ! हत्तीने देठासकट कमळच उपटून नेले..
माझ्या तरुण मित्राच्या आयुष्याची आज अशीच शोकांतिका झाली होती.
आत्ताच कुठे शहाद्यातील हे कमळ उमलू लागले होते.
येथल्या आदिवासींची शतकानुशतकांची रात्र सरली होती.
नव्या आशा आकांशा उमलत होत्या.
मनोरथ धावू लागले होते.
भ्रमर स्वप्ने पहात होता- लवकरच आपण मुक्त होऊ;
जंगलात गाऊ, नाचू; शेतात काम करू.
पण हाय ! स्वप्ने निखळली. मनोरथ कोसळले.
अगदी देठासकट कमळ उपटले गेले.
पुन्हा रात्र. पुन्हा तो बंदिवास.
पुढची पहाट आता केव्हा उजाडेल !
गाडी पुढे धावत होती.
पहिली साखळी मध्येच केव्हातरी तुटली. मन इतिहासात गेले.
गड आला पण सिंह गेला !
आजवरची मोहिम तर यशस्वी झाली होती शहाद्यातील आदिवासींना जमिनी तर मिळाल्या होत्या. पण मोहिमेचा सेनापती, या भूमुक्ती आंदोलनाचा नेता लढाईत कामास आला होता. गड मिळाला पण सिंह गमवावा लागला.
असे मरण तरी किती जणांच्या भाग्यात असते ? लढाईतले मरण ! हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम् ..
अंबरसिंगला हे मरणभाग्य लाभले आहे..
पांढरी चादर. त्यावर निघताना कुणीतरी वाहिलेली कण्हेरीची ताजी फुले.
आतले निश्चेष्ट, गोठलेले, थंड शरीर.
ही प्रथा का पडली असावी !
प्रेतावर ही प्रसन्नतेची पखरण कशासाठी ?
मृत्यूची भीषणता कमी जाणवावी म्हणून !
मरण दु:खदायक आहे, पण जीवन तरी कुठे थांबते आहे ?
लांबरुंद पांढया चादरीवर तांबडी फुले हसतातच आहेत.
न जायते म्रियते वा कदाचित् ..
कल्लोळ. लाटा. बेभान शोक.
किंचाळ्या. आक्रोश. हंबरडे.
शववाहिनी शहाद्यात पोचली होती.
असे वेढून टाकणारे दु:खदृश्य यापूर्वी कधी पाहिले नव्हते. अशा गदारोळात कधी सापडलो नव्हतो. ऐकले होते, वाचले होते, की आंबेडकरांच्या वेळी लक्षावधी अनुयायी असेच धाय मोकलून रडले, महाशोक उसळला-सागरासारखा.
तो सागर मुंबईला उसळला होता. हा एक महाराष्ट्राचा कोपरा होता- हाच काय तो फरक.
लाटांवर लाटा. दुःखाच्या, शोकाच्या. कार्यकर्ते गांगरून गेले. कसा आवरायचा हा समुद्र !
लोंढे येतच राहिले. चहू दिशांनी. बातमी पसरली गेली तसतसे शहाद्यातून, आसपासच्या गावातून, लांबलांबहून. वाहनांनी, पायी, धावतपळत, हातातली कामे टाकून, जेवणखाण सोडून.
कुणी आल्या आल्या जमिनीवर कोसळत. मातीत गडबडा लोळत. मिठ्या मारमारून कुणी हंबरडत. कपाळ बडवीत. छात्या पिटत.
बायांचा तर कहरच उसळला होता.
तास झाला. दोन तास झाले. समुद्र शांत होत नव्हता.
या शोकसमुद्रात सापडणे, लाटांनी वेढले जाणे, त्यात बुडणे आणि वर येणे हा एक महानुभव होता.
आपली 'सुविहित' मरणे, टापटिपितली !
आदिवासी समाज सगळे कसे बेभानपणे करत असतो !
उत्सवानंदात रात्र रात्र बेहाय नाचतो, शिकारीमागे दोन दोन दिवस पळत राहतो. दुःखावेगालाही मर्यादा नाही. बांध नाही. आवर नाही. सगळेच अफाट. छात्या फुटून निघाव्यात इतके.
पाडळद्याला. अंबरसिंगच्या गावी. शहाद्यापासून पाच मैलांवर. ज्या झाडाखाली भजने म्हणत, स्वत:ची रचत अंबरसिंग लहानाचा मोठा झाला, तेथे सगळेजण जमलेले आहेत.
झाड लहानसेच. अशोकाचे की पिंपळाचे ?
भाऊंनी तो अशोक सांगितला. भाऊ मुंदडा. अंबरसिंगला ज्यांनी आपला मुलगा मानले होते. सभेत त्यांनी अंबरसिंगचे ऐकलेले पहिले भजन म्हणून दाखवले होते-थोड्या वेळापूर्वी-
या दिव्यात तेल नाही-
तरीही तो जळतो आहे !
जवळ सत्ता नाही, संपत्ती नाही, कुठलीही साधने नाहीत. तरीही आदिवासी समाजाला नवा प्रकाश हा अंबरदिवा देत राहिला. अगदी काल-परवापर्यंत. जेमतेम चार-पाच वर्ष ही ज्योत तेवली. पण तिने मागच्या पुढच्या कित्येक वर्षांचा अंधार उजळून टाकला.
सूर्यास्ताची वेळ झाली.
झाडाखालचे विवर खणून तयार होते.
यात अंबरसिंगचा देह ठेवायचा, त्यावर नंतर एक लहानसे देऊळ बांधायचे असे सर्वांनी अगोदरच ठरवले होते. देवळातल्या देवाचे लोकांनी नावही ठेवले- श्रमदेव. आमचा अंबरदादा, आमचे महाराज, आमचा श्रमदेव. सातपुड्यातील आदिवासींचा जुना वाघदेव होताच- अजूनही आहे. अंबरसिंग आता त्यांचा नवा श्रमदेव होणार !
तेहतीस- चौतीस वर्षांचे सारे आयुष्य !
माणसाचा देव होऊ शकतो !
विवरात बाजूला आणखी एक कोनाडा केला होता. त्यात बसलेल्या स्थितीत अंबरसिंगला अगदी हळूवार हातांनी ठेवले गेले.
बायांची शेवटची शोकगीते..
भाऊ मुंदडांची रामधून, गीता..
अमर रहे, अमर रहे, हा जनकंठनिनाद..
मिठाची रास वाढत होती. लिंबाचा पाला पसरून झाला.
शेवटचा नैवद्य ठेवला. आरती झाली.
सूर्य मावळला.
मातीचा एक थर
दुसरा थर
भराभर माती लोटली जात होती.
आम्हीही एकेक मूठ माती वाहिली.
नमस्कार केला आणि निघालो.