परिचय/छत्रपती शिवाजी महाराज

८. छत्रपती शिवाजी महाराज



छत्रपती शिवाजी महाराज यांचा काल होऊन आज जवळपास पावणेतीनशे वर्षे होत आली आहेत आणि त्यांच्या जन्माला तीनशे वर्षांहून अधिक वर्षे होऊन गेली आहेत. पण अजूनही शिवाजी खऱ्या अर्थाने इतिहासाचा भाग झालेला नाही. ऐतिहासिक व्यक्तींच्याविषयी ज्या निर्विकार- पणे चर्चा व्हावयाला पाहिजे ती निर्विकारता आजही महाराष्ट्रीय मनाला शक्य नाही. आणि कदाचित अजून काही शतके शिवाजीचा निर्विकारपणे विचार करणे शक्य होणार नाही. १८६८ इतक्या जुन्या काळी छत्रपतींच्या अभिमानाने पेटलेला कीर्तन्यांच्यासारखा माणूस ग्रॅंट डफवर तुटून पडतो. ज्या काळात इंग्रजी राज्य 'दैवी वरदान' मानले जात असे त्या काळीसुद्धा महाराष्ट्र शिवाजी- विषयी कमीजास्त ऐकून घेण्यास तयार

नव्हता. ज्या काळी इंग्रजांच्या राज्या-विरुद्ध स्वातंत्र्याची चळवळ पेट घेऊ लागली त्या काळी टिळकांनासुद्धा लोकजागृतीसाठी शिवाजीउत्सव सुरू करण्याचे महत्त्व पटले. स्वातंत्र्योत्तरकाळात संयुक्त महाराष्ट्र लढा लढणाऱ्या मंडळींना आणि असा लढा देण्याची गरज नाही असे म्हणणाऱ्यांना शिवाजीचे नाव वापरण्याची गरज भासली. असे एकूण शिवाजीचे व्यक्तिमत्त्व आहे. महाराष्ट्रीय पंडितांनी गेल्या चार पिढ्यांत जे इतिहास संशोधन केले त्याचा फार मोठा व्याप शिवाजीशी निगडित आहे. आमच्या मनात असणाऱ्या स्वातंत्र्य प्रवृत्तीचे, महाराष्ट्राच्या अस्मितेचे शिवाजी कायमचे प्रतीक होऊन गेला त्यामुळे चालुक्यांचा अगर वाकाटकांचा किंबहुना यादवांचा आणि कृष्णदेवरायाचाही इतिहास ज्या निर्विकारपणे लिहिला-तपासला जाऊ शकतो तो निर्विकारपणा शिवाजीच्या बाबतीत संभवत नाही. महाराष्ट्रात तर हे अधिकच कठीण आहे. अजूनही त्याच्या नावाला 'बाजारभाव ' शिल्लक उरला आहे हे नाकारता येणार नाही.
 शिवाजीचे उपलब्ध जुने चरित्र सभासदाचे आहे. कृष्णाजी अनंत सभासदाने ज्या भक्तिभावनेने शिवाजीकडे पाहिले आहे ती भक्तिभावना आजही बदललेल्या स्वरूपात चालू आहे. कृष्णाजी अनंतापासून आजतागायत सर्व महाराष्ट्रीयांनी शिवाजीकडे मोठ्या श्रद्धेने पाहिले आहे. इतिहास ग्रंथ म्हणून पाहताना या सर्व ग्रंथांच्यावर पसरलेला अनैतिहासिकतेचा थर विसरता येणार नाही. आधुनिक मराठीत शिवाजीविषयी खूपच लिहिले गेले आहे. पण शुद्ध इतिहास म्हणून ज्या ग्रंथाकडे पाहता येईल अशा ग्रंथाची उणीव आजतागायत भासत राहिली. नाव घेण्याजोगी जी शिवाजीची तीन चरित्रे मराठीत उपलब्ध आहेत ती पुष्कळच असमाधानकारक आहेत. कृष्णराव अर्जुन केळस्कर यांचा शिवाजी आणि खुद्द सरदेसायांचा शिवाजी अद्ययावत माहिती लक्षात घेता ठिकठिकाणी आज असमाधानकारक वाटतो. जदुनाथ सरकारांच्या शिवाजीविषयी जरी असे म्हणता आले नाही व ते पुस्तक आजही जरी अभ्यसनीय ठरले असले तरी ते मूळ मराठी पुस्तक नव्हे. पर्शियन सामग्री जदुनाथांनी ज्या प्रभुत्वाने हाताळली, त्या प्रभुत्वाने उपलब्ध समकालीन कागदपत्रे हाताळण्यास त्यांचे पूर्वग्रह आडवे आलेले आहेत. यामुळे शिवाजीच्या चरित्राची इतिहासशुद्ध रूपरेखा आणि शिवाजीचे मूल्यमापन दोन्ही भाग थोडक्यात आटोपणारा सदर ग्रंथ पुष्कळसा त्रोटक, शिवाय अतिरेकी असा वाटतो. तपशीलवार बऱ्याच ठिकाणी त्यात सुधारणा आवश्यक आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यामुळे शिवाजीच्या इतिहासशुद्ध चरित्राची व विस्तृत मूल्यमापनाची मराठीत गरज भासत होती. चरित्राच्या मर्यादेपर्यंत ही उणीव काळे यांच्या पुस्तकाने भरून निघाली आहे असे म्हणण्यास हरकत नाही.
 'सह्याद्री'सारख्या विद्वत्मान्य मासिकाचे चिकित्सक आणि कर्तृत्ववान कर्णधार म्हणून, शिवाय विवेचक इतिहासाचे अभ्यासक म्हणून श्री. दि. वि. काळे यांचे नाव महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. पुणे विद्यापीठाने त्यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र लिहून घेतले व प्रकाशित केले. श्री. काळे यांच्या कीर्तीत नवे पीस खोवणारा असा हा ग्रंथ झाला आहे. याबद्दल काळे व पुणे विद्यापीठाचे बहि:शाल शिक्षण मंडळ ही अभिनंदनास पात्र आहेत. विशेषतः तीनशे पृष्ठे छापील असणारा हा ग्रंथ अवध्या दीड रुपयांत उपलब्ध करून देऊन पुणे विद्यापीठाने महाराष्ट्रीय जनतेची फार मोठी सोय केली आहे. मराठवाडा विद्यापीठाने असल्या प्रकारची कार्ये आरंभिली तर आमच्या विद्यापीठाची प्रतिष्ठा कमी होईल असे मानण्याचे कारण नाही. श्री काळे यांच्या मनावर हिंदुत्वाभिमानाचा फार मोठा ठसा आहे. शिवाय या विषयाचा त्यांचा व्यासंग मोठा असल्यामुळे त्यांना मुल्यमापनाची 'खाज' असणे अगदी स्वाभाविक आहे. पण हा ग्रंथ अतिशय संयमाने रेखलेला असा उतरला आहे. विश्वसनीय पुराव्यांच्या आधारे छत्रपतींचे जे चरित्र निश्चित ठरेल ते व्यवस्थित रीतीने रेखाटणे हा या ग्रंथाचा उद्देश आहे. यामुळे विवेचनाचा मोह त्यांना टाळावा लागला. मूल्यमापनाचा वादग्रस्त भाग त्यांनी शक्यतो संक्षेपिला व आपले राजकारण ग्रंथात पाझरू दिले नाही. मर्यादा ठरवून घ्यावयाची व ती निग्रहाने पाळावयाची याचा काळे यांनी चांगला आदर्श घालून दिला आहे. त्यांनी पुराव्याची चर्चा व मतमतांतरांची चर्चा टाकून अधिकृत शिवाजीचे चरित्र कोणताही स्वकालीन रंग येऊ न देता रेखाटले याबद्दल ते धन्यवादास पात्र आहेत.
 असे चरित्र रेखाटावयाचे म्हणजे लोकमान्य अशा अनेक समजुती भ्रम म्हणून सोडून द्याव्या लागतात. काळे यांच्या शब्दांत सांगावयाचे म्हणजे बहु ' श्रुत' वाचकाच्या विरसाला कारणीभूत व्हावयाचे. काळे यांनी कटाक्षाने या बहुश्रुत वाचकांचा विचार टाळला आहे. शिवचरित्र निबंधावली आणि मूळ ऐतिहासिक साधने अभ्यासिणे इतका ज्यांचा आवाका आहे त्यांच्यासाठी सदर ग्रंथ नाही. त्यांनी पोतदार आणि शेजवलकर यांच्या संभवनीय बृहद्ग्रंथाची वाट पाहावयाला पाहिजे. ज्यांना मूल्यमापनाची अधिक जिज्ञासा आहे त्यांनी हा ग्रंथ वाचण्याची आवश्यकता नाही. कारण ती या ग्रंथाची प्रतिज्ञा नव्हे. शिवाजीच्या चरित्रातील शंभर टक्के विश्वसनीय पुराव्यांनी सिद्ध होणाऱ्या घटना कालानुक्रमे वाचण्याची ज्यांची इच्छा आहे त्यांच्यासाठी हा ग्रंथ आहे. ही या ग्रंथाची प्रतिज्ञा आहे व ती शंभरटक्के पूर्ण झालेली आहे. सभासद पुनःपुन्हा शिवाजीच्या अंगी कुलदेवता भवानीचा संचार होत असल्याचे सांगतो. असे अद्भुताचे रंग इतिहासाला मान्य नाहीत. तद्वत् या देवतेच्या आश्वासनापर्यंत वाट पाहण्याइतका देवभोळेपणासुद्धा इतिहासाला मान्य नाही. आजचा कुणीही चरित्रकार या बाबतीत नाव काढणार नाही. दैवी चमत्कारातून आम्ही इतिहास वर उचलला आहे. पण रम्य स्वप्नरंजनातून इतिहास बाहेर पडतोच असे नाही. लखुजीच्या मांडीवर बसलेले परस्परांच्यावर गुलाल उधळणारे शहाजी-जिजाबाई आम्हाला संभवनीय वाटतात. हा प्रकार ऐतिहासिक दृष्टीने सत्य असावा असे सरदेसाई यांना १९३५ पर्यंत वाटत होते. पण रम्यतेचे हे रंग इतिहासाला मान्य नाहीत. गरोदर जिजाबाई आपल्या नवऱ्याबरोबर घोड्यावरून पुढे पळते आहे, तिचा प्रत्यक्ष बाप पाठलाग करीत पाठीमागून येतो आहे, शेवटी लखुजीला दिवस भरलेली आपली मुलगी शिवनेरीवर पोचती करावी लागते व चरित्रनायक शिवाजीचा जन्म होतो. असल्या प्रकारचे नाटय इतिहासाला मान्य नाही. शुद्ध इतिहासातून नाटयाचे हे सर्व रंग गळालेले असतात. काळे यांनी असे अनेक गैरसमज या ग्रंथात दूर केलेले आहेत.
 असा एक समज आहे की, मालोजी पूर्वी लखुजीच्या पदरी दरिद्री बारगीर होता. पण हे म्हणणे खरे ठरत नाही. शहाजी आणि जिजाई यांचे लग्न ज्या रम्य दंतकथेच्या आधारे वर्णन केले जाते ती दंतकथा इतिहासत: खोटी आहे. सरकारांच्या सारख्या फार मोठ्या इतिहासकारांचाही असा समज आहे की, जिजाबाई हिचे आयुष्य जवळजवळ परित्यक्तेचे होते. तुकाबाईशी लग्न केल्यानंतर जिजाबाईकडे शहाजीचे दुर्लक्ष होऊ लागले. पण हा समज इतिहासत: खोटा आहे. शहाजीचे तुकाबाईबरोबर लग्न इ. स. १६३० च्या आधी झाले. सरदेसाई यांच्या मते हे लग्न इ. स. १६२६ च्या सुमारास झाले. तर डॉ. बाळकृष्ण यांच्या मते हे लग्न इ. स. १६३० ला झाले. कसेही झाले तरी इ. स. १६४१ पर्यंत जिजाबाई शहाजीबरोबर संसार करीत होती. म्हणजे लग्नानंतर पहिली २० वर्षे दगदगीची असतील; पण ती परित्यक्ता नव्हती. सरदेसाई यांनासुद्धा तुकाबाई आणि जिजाबाई यांच्यातील सवतीमत्सर उल्लेखावा वाटतो. जो निराधार आहे. जिजाबाईचा वडील मुलगा शहाजीचा खूपच लाडका होता व तो शहाजीबरोबर असे. इ. स. १६५४ पर्यंत तो बापाबरोबर होता. त्या साली तो मेला. असाही एक समज आहे की, शिवाजी लहानपणापासून रामदास व तुकाराम यांच्या प्रभावामुळे प्रभावित झालेला होता. तुकाराम महाराजांचा मृत्यू इ. स. १६४९ च्या सुमाराचा आहे. त्यामुळे लोहगावच्या कीर्तनात तुकारामाच्या अभंगामुळे शिवाजीची बिनधोक सूटका झाली असाही समज आहे. शिवाजी आणि तुकाराम यांची भेट झाल्याचा काही पुरावा नाही. समर्थांच्या रामदासी पंथाचा स्वराज्याच्या उभारणीला फार मोठा उपयोग झाला अशी दूसरी समजत आहे. शिळेमध्ये सुरक्षित असणाऱ्या बेडकोळीचीही कथा सांगितली जाते. पण इ. स. १६७२ च्या आधी रामदास-शिवाजी यांची भेट झाल्याचा पुरावा नाही. असाही एक समज आहे की, दादोजी कोंडदेव आधी स्वराज्याच्या उभारणीला विरोधी होता. पण नेमके सत्य याच्या विरोधी आहे. पुढच्या गोष्टी सांगायच्या तर कैद झालेला शहाजी, शिवाजीने आदिलशाहीवर मोगलांकडून दडपण आणून सोडवला. शिवाजीने वाघनखाने अफजलखान मारला. तानाजीच्या आत्माहुतीमुळे कोंडाण्याचे नाव 'सिंहगड' झाले. बाजीप्रभू शिवाजीचा पाठलाग करणाऱ्या सैन्याकडून मारला गेला. शिवाजीने जावळीचे खोरे धोक्याने जिंकले. आगऱ्याहून पळाल्यानंतर शिवाजी वेष पालटून तीर्थयात्रा करीत दमादमाने रायगडला येऊन पोचला. असे शिवाजीविषयीचे अनेकविध प्रवाद आहेत. यांतील काही प्रवाद बखरकारांच्या स्वप्नरंजनातून निर्माण झालेले आहेत. तर इतर, आधुनिक राजकारणाचे रंग शिवचरित्रावर चढल्यामुळे निर्माण झालेले आहेत. हे सर्व गैरसमज बाजूला सारून शुद्ध इतिहास म्हणून शिवाजीचे दर्शन घेणे यासाठी काळे यांचा ग्रंथ आजतरी मराठीत एकुलता एक आहे.
 काही जणांना छत्रपतीच्या मोठेपणाचे समर्थन करताना अनेकविध बाबींचे समर्थन करावेसे वाटते. उदा. शिवाजीने जावळ खोरे इ. स. १६५६ मध्ये दगा देऊन घेतले. आज ही घटना आपण खोटी मानतो. पण सरदेसायांनी आणि सरकारांनी ही घटना खरी मानली आहे. ज्याने शिवाजीच्या सहवासात आयुष्याची १०|२० वर्षे काढली त्या सभासदाचेही 'जावळी दग्याने घेतली' असेच मत आहे. समजा, शिवाजीने जावळी दग्याने घेतली, तर शिवाजीचे समर्थन करण्याची गरज का वाटावी? ज्याला राज्य निर्माण करावयाचे आहे तो शत्रुला कोणत्यातरी मार्गाने पराभूत करणार. महंमद गझनीने जे अचानक छापे घातले त्याबद्दल गझनीला दोष देण्याचे अगर त्याचे समर्थन करण्याचे कारण नाही. त्या काळच्या युद्धतंत्राच्या त्या आवश्यक गरजा आहेत. ज्या मोजमापाने तुकारामाचे मोठेपण मोजले जाईल त्यापेक्षा शिवाजीला वेगळे निकष लावले पाहिजेत. राजकारणात विश्वासघात समर्थनीय आहे, असे माझे मत नाही. नीतिमूल्ये राजकारणात अप्रमाण मानावीत, असे मला वाटत नाही. पण या माझ्या मताची पार्श्वभूमी लोकशाहीच्या संदर्भात निर्माण होते. शिवाजीने लोकशाही निर्माण केली नाही. तो निवडणुकीच्या मार्गाने प्रस्थापित झालेल्या लोकशाही विरुद्ध लढत नव्हता. विश्वासघात आणि खून यांनी परिपूर्ण असणाऱ्या लष्करी एकतंत्री राजवटीच्या संदर्भात शिवाजीचे मूल्यमापन केले पाहिजे. शिवाजीच्या जीवनात दग्याफटक्याचे प्रसंग आहेत काय, हा मुद्दा गौण असून शिवाजीच्या राजकारणाने खुनी राजकारणाला जन्म दिला, की सुस्थिर राजवटीला जन्म दिला हा मुद्दा महत्त्वाचा आहे. शिवाजी अनियंत्रित राजा होता हे उघड सत्य आहे. त्याने महाराष्ट्रात जे राज्य निर्माण केले त्यामुळे जनतेची शक्ती आणि कर्तृत्व वाढले की कमी झाले हा मुद्दा महत्त्वाचा आहे. शिवाजी शेवटी लष्कराश्रयी नेता होता. पण जी राजवट त्याने निर्माण केली तिचा पाया. मुलकीसत्ता लष्करीसत्तेपेक्षा बलवान करणारा होता हा मुद्दा महत्त्वाचा आहे. हे सारे सोडून देऊन भलती समर्थने करण्याचे कारण नाही. शिवाजीने अफजलखानाला मारले. आधी दगा कुणी दिला, याची चर्चा निरर्थक आहे. समजा, शिवाजीने अफजुलखानासारख्या पवित्र, सज्जन, पापभीरू, सदय, शांततावादी माणसाला हेतपुरःसर दगा दिला असला तरी बिघडले कुठे ? या मुद्दयावर शिवाजीचे मोठेपण ठरणार नाही. ज्यांनी जीवनात कुणाला दगाफटका दिला नाही अशी माणसे महाराष्ट्रात पुष्कळ आहेत. पण शिवाजीला आम्ही महाराष्ट्राचे प्रतीक मानतो या 'नाकाच्या नीट' वागणाऱ्या माणसांना विसरून जातो. शिवाजीचे मोठेपण दगा देणे अगर न देणे यात नाही, तह पाळणे अगर मोडणे यात नाही. तेव्हा अशा सर्व ठिकाणी समर्थने देण्याचा मोह आवरला पाहिजे. काळे यांना पुष्कळदा हा मोह आवरत नाही.
 पृष्ठ (१०६) वर ते म्हणतात, शिवाजीचे राज्य हे एकच एतद्देशीय राज्य होते. मोगल, विजापूरकर, गोवळकोंडेकर यांची राज्ये उपरी व प्रदेशविस्ताराच्या मागे लागलेली, म्हणून तत्त्वतः असमर्थनीय राज्ये होती. मोगल राजवटी भारतात इ. स. १५२६ ला सुरू होतात. आणि आदिलशाही व कुतुबशाही या राजवटी ज्या बहमनी राजवटीचे अवशेष आहेत ती बहमनी राजवट १३४७ ला. सुरू होते. शिवाजीच्या जन्माच्या आधी स्थापन झालेल्या या राजवटी उपऱ्या फक्त एकाच अर्थाने मानता येतील, तो म्हणजे हिंदुस्थानात मुसलमानांचा प्रवेश असमर्थनीय असल्यामुळे, आजचे हिंदुस्थानातील मुसलमानांचे अस्तित्व असमर्थनीय ठरवणे. हिंदुस्थानात मुस्लिम सत्तांनी प्रवेश केला तो नैतिक कारणे देऊन नव्हे. तेव्हा घोरीच्या भारत स्वारीचे समर्थन करण्याची गरज नाही. पण म्हणून बहमनींची सत्ता उपरी ठरत नाही. नाहीतर द्रविडांनी व्यापलेल्या या भूभागात आपण सर्व आर्याभिमानी उपरे ठरणे भाग आहे. आणि एका उपऱ्याने दुसऱ्या उपऱ्याला अक्कल शिकवणे यांत अर्थ नाही. उपरेपणा एखाददुसऱ्या शतकात संपतो. स्वत: शिवाजी महाराज मुसलमानांना उपरे मानीत नसत. त्यांना दक्षिणेतील प्रस्थापित मुस्लिम राजवटी उपऱ्या वाटत नसत. महाराजांना दक्षिणेत मोगल उपरे वाटले. कारण त्या आधी दक्षिणेकडे मोगलांचा चंचुप्रवेश नव्हता. मोगलांच्या दक्षिणप्रवेशाला आरंभ अकबराच्या काळी झाला. पण महाराजांच्या काळापर्यंत हा आरंभ आरंभच उरला होता. कोणतीही सत्ता जर एतद्देशियांची नसेल तर आरंभी उपरी असते. आदिलशाही सत्तेविरुद्ध शिवाजीचे भांडण ती उपरी आहे म्हणून नसून त्याच्या राज्याच्या अस्तित्वाविरुद्ध ती होती हे आहे. शिवाजीने आपले राज्य कायम केले याचे समर्थन महाराष्ट्रातील जनतेने औरंगजेबाशी झुंज घेऊन ते टिकवले या घटनेने जेवढे होते तेवढे इतर कशानेही होत नाही. प्रदेशविस्तार हे सर्वांचेच सूत्र होते. त्याबद्दल शिवाजी वाखाणला जाऊ शकत नाही. मरेपर्यंत तो प्रदेश विस्ताराच्या मागे होता. शिवाजीच्या राज्याचे समर्थन तो एतद्देशीय राजा होता यासाठी होऊ शकत नाही. तसेच तो हिंदू होता याहीसाठी होऊ शकत नाही. असली समर्थने विनाकारण असतात असे आम्हाला वाटते.
 पृष्ठ १६२ वर काळे म्हणतात-शिवाजी-औरंगजेब तह आधी औरंगजेबाने मोडला. जण औरंगजेबाने जर १६६९ मध्ये तह मोडला नसता तर शिवाजी जन्मभर मोगलांचा मांडलिक राहण्यावर राजी राहिला असता. शिवाजीने मोगलांशी तह केला तो मोडण्यासाठीच. नवे राज्य स्थापन करू इच्छिणाऱ्या राजाने, तयारीसाठी वेळ मिळावा, यासाठी केलेला हा तह योग्य वेळ येताच शिवाजीने मोडलाच असता. पूरंदरचा तह शिवाजीने प्रामाणिकपणे पाळण्यासाठी केला होता, असे मानणे हा वेडेपणा आहे हे काळयांनाही पटते. तरीही तह मोडला यात शिवाजीचा दोष नाही असे समर्थन केल्याविना त्यांना राहवत नाही. जणू तह मोडण्याची संधी औरंगजेबाने साधावी व काळे यांना समर्थनाची सोय उरावी यावर शिवाजीचे मोठेपण अवलंबून होते ! शिवाजीने सुरत लुटली. हा महाराष्ट्राचा गुजराथवर आक्रमक हल्ला आहे, शिवाजीने कारंजे लुटले हा महाराष्ट्राचा विदर्भावर आक्रमक हल्ला आहे, ही भूमिका जितकी वेडेपणाची होईल तितकीच तह मोडण्यात 'शिवाजीची चूक नव्हती, हो, नव्हती' ही भूमिका 'शहाणपणाची' होईल ! सुदैवाने अशी ठिकाणे ग्रंथात फार थोडी असून एकंदरीत चरित्रनायकाकडे पाहण्याची भूमिका प्रभावित करण्याइतकी महत्त्वाची नाहीत. काळे यांनी अशी समर्थने क्वचित का होईना दिली आहेत. याबद्दल कडक तक्रार जशी वाजवी आहे; त्याचप्रमाणे ही ठिकाणे थोडी आहेत याबद्दल अभिनंदन उजू आहे. शिवाजीचे मोठेपण हिंदुस्थानच्या इतिहासाच्या पार्श्वभूमीवर पाहिले पाहिजे. ब्राह्मणाबादचा राजा दाहीर, लाहोरचा राजा अनंगपाळ आणि दिल्लीचा राजा पृथ्वीराज चौहान यांच्या शौर्याविषयी वाद नाही. पण यांच्यापासून आमच्या पराभवाची परंपरा सुरू होते. ही परंपरा १८५७ वर येऊन थांबते. एका अर्थी हे म्हणणे चूक आहे. कारण त्याआधी शक आणि हूण यांच्यासमोर पराभूत होणाऱ्या राजांची यादी कितीही मोठी करू म्हटले तरी अपुरी राहणार आहे. वैयक्तिक शौर्यात कमी न पडणाऱ्या आमच्या परंपरेची ही सतत पराभवाची दु:खद कहाणी आहे. हे दुःख, पराभूत झालेले राजे हिंदू होते याचे नसून जे जे पराभूत झाले त्या सर्वांना जनतेने स्वीकारलेले होते याचे आहे. या सर्व परंपरेला ठळक अपवाद फार थोडे आहेत. सातवाहनातील एखाद दुसरा राजा, राणाप्रतापसारखा, हमीरासारखा एखाददुसरा रजपूत राजा, पुलकेशीसारखा एखादा चालुक्य राजा, एखादा मंदोसरचा यशोवर्मा आणि एखादा शिवाजी. प्रथमदर्शनी ही यादी थोडी मोठी वाटते. पण अजून एका दृष्टीने विचार केला तर ही यादी अधिक आखूड होत जाते. ज्यांनी आक्रमकांना तोंड दिले त्यांच्यापेक्षा ज्यांनी बद्धमल झालेली आक्रमणे उलथून टाकली त्यांचे कर्तृत्व विशेष मानावयाला पाहिजे. या बाबतीत शिवाजीशी तुलना करता येईल असा पुरुष भारतीय इतिहासात शोधून पाहावा लागेल. ज्यांनी जनतेला त्रासदायक वाटणाऱ्या आक्रमक राजवटी उलथल्या आणि स्वतःच्या नेतृत्वाखाली जनतेला आत्मीयता वाटणाऱ्या राजवटी निर्माण केल्या हे विधायक कर्तृत्वही दाखविले अशांची संख्या बोटावरसुद्धा मोजता येणार नाही. लक्षावधींची फौज घेऊन औरंगजेब छातीवर वर्षानुवर्षे उभा आहे, त्या फौजेचा पराभव करण्याची शक्ती शिल्लक नाही, राजा पळून जिंजीत जाऊन लपून बसला आहे, तिथेच तो घेरला गेला आहे, या अवस्थेत महाराष्ट्र सतत पंचवीस वर्षे जिद्दीने लढत होता. महाराष्ट्रात निर्माण झालेली ही जिद्द केवळ शिवाजी हिंदू होता या स्पष्टीकरणाने स्पष्ट होऊ शकत नाही. शिवाजीने निर्माण केलेले राज्य जनतेला प्राणपणाने टिकवण्याइतके मोलाचे वाटले, त्याने जागा केलेला आत्मविश्वास २५ वर्षे सततच्या धूळधाणीला पुरून उरला. शिवाजीचे मोठेपण त्याच्या या कर्तृत्वात आहे. वैभवहीन, नेतृत्वहीन, दरिद्री जनतेच्या मनात त्याने जो अजिंक्यपणाचा दुर्दम्य आशावाद निर्माण केला यात शिवाजीचे मोठेपण आहे, या दृष्टीने भारताच्या इतिहासात निदान ज्ञात इतिहासात शिवाजीला दुसरी तुलना नाही. हिंदू राजे चिवटपणाच्या बाबत कधीच प्रसिद्ध नव्हते. एखाददुसरा पराभव त्यांची मने मारून टाकीत असे. प्रतिकूल परिस्थितीला शरण जाऊन ते प्रामाणिक दास होत. शिवाजीने हिंदूंचा आणि सर्व भारतीयांचा इतिहास या मुद्द्यावर फिरविला. कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीला टिकणारे आणि योग्य काळ येताच पुन्हा उफाळणारे चिवट राजकारण त्याने जन्माला घातले. त्यात त्याचा मोठेपणा आहे. त्याच्या काळाच्या मानाने त्याने मुसलमानद्वेष्टे होणे शोभून गेले असते, पण मुसलमानांना औदार्याने आणि मानाने वागवून त्याने आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. अकबराला धर्मसमन्वयवादी होणे भाग होते. कारण रजपूतांच्या तलवारी त्याचे राज्य वाढवीत होत्या, सुरक्षित करीत होत्या. तोडरमलची बुद्धिमत्ता स्थिर मोगल राजवटीचा पाया घालीत होती. शिवाय सर्वधर्मीसमानत्वाचा उपदेश अकबराला नुकसानकारक नव्हता. एक म्हणजे मुसलमान बाटवून हिंदू होत नाही. दुसरे म्हणजे हिंदूंना मुस्लिम छळाचा इतिहास नव्हता. या संदर्भात शिवाजीने ज्या औदार्याने अहिंदू प्रजेला वागविले त्या औदार्याला इ. स. ७१२ ते १८५७ या कालखंडात त्याला तुलना नाही. एतद्देशीय राजे नेहमी गाफील असत. शत्रूनी यांना धोके द्यावेत व यांनी शतकानुशतके धोके खावेत. शिवाजीने आपले जीवन या नियमाला अपवाद बनवले. शिवाय तो सर्वांगीण माणूस होता. चढाई आणि माघार, धाडस आणि सावधपणा, भूसेना आणि आरमार, किल्ले आणि त्याखालचा प्रदेश, मुलकी कारभार आणि लष्करी कारभार, धर्माभिमान आणि धार्मिक औदार्य या सर्वांचा अपूर्व आविष्कार त्याच्या रूपाने झालेला दिसून येतो. एतद्देशियांचा तो एकच असा राजा आहे की, ज्याने पराभवाचे तडाखे खात नसत्याचे असते केले. सतत झुंज घेत सिद्धाचे संरक्षण केले. राज्याबाहेर स्वतःविषयी दरारा निर्माण केला. राज्याच्या आत चिवट अजिंक्यपणा निर्माण केला. शिवाजीचे मोठेपण या संदर्भात ठरणार आहे. शिवाजीने अफजुलखानाला दगा दिला, की दगा करू इच्छिणाऱ्या अफजुलखानाचा डाव त्याच्यावर उलटविला यावर त्याचे मोठेपण ठरणार नाही. केलेले तह मोडले गेले याची जबाबदारी शिवाजीवर येते, की इतर कुणावर हा मुद्दा गौण आहे. शुद्ध इतिहास म्हणून जावळी शिवाजीने दग्याने जिंकली काय याचा विचार करावा आणि मत ठरवावे. पण शिवाजी जर दगेबाज ठरत असेल तर दगेबाजीचे समर्थन करण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत बसू नये. दुर्दैवाने शिवाजीचे हे मोठेपण काळयांच्या मुठीतून निसटून गेले आहे आणि अवांतर भानगडींवर मूल्यमापनाच्या प्रकरणात त्यांनी भर दिला.
 शिवाजीच्या मोठेपणाचे मूल्यमापन, त्याच्या लष्करी आणि मुलकी कारभाराचे विवरण हा या ग्रंथाचा प्रमुख उद्देश नव्हे; आनुषंगिक उद्देश आहे. ही भूमिका मान्य करूनही जी दहा पाने या कार्यासाठी खर्चीली त्या दहा पानांत थोडक्यात हे मांडता येणे शक्य होते :- 'महाराजांची कामगिरी' या प्रकरणात त्यांनी शिवाजीच्या तोंडी सभासदाने घातलेल्या एका वाक्यापासून आरंभ केला आहे. ते म्हणजे, 'म्या शिवाजीने चाळीस हजार होनाचा पूणे महाल होता त्यावरा एक क्रोड होनाचे राज्य पैदा केले.' शिवाजीचे हे वचन खोटे नाही. पण फारसे महत्त्वाचेही नाही. कदाचित शिवाजीला त्याचा अभिमान वाटला असेल. आपल्या दृष्टीने त्यात फारसे महत्त्वाचे असे काही नाही. युद्धतंत्रविशारद सेनानी म्हणून शिवाजीची गणना जगातील फार मोठ्या सेनानींच्या तुलनेत निःसंशय कमी पडणार नाही अशी नकारात्मक मोठेपणाची अजून एक सूचना आहे. शिवाजीचा सेनानी म्हणून असलेला मोठेपणा वादातीत आहे. पण शिवाजीशी तुल्यबल सेनानी त्याआधी होऊन गेले आहेत. ज्यांना विपूल अनुकुलता होती त्यांच्याशी शिवाजीची तुलना करण्यात अर्थ नाही. केवळ युद्धतंत्र याचा विचार केला तर जवळ सुरतेवर झडप घालणाऱ्या शिवाजीपेक्षा दूर सोमनाथवर कोसळणाऱ्या गझनीची योग्यता कदाचित मोठी ठरेल. प्रतिकूल परिस्थितीत चिवटपणे राज्यरक्षणासाठी लढणारा सेनानी म्हणून मलिकंबर शिवाजीपेक्षा उणा पडणार नाही. हे लिहिण्याचा उद्देश सेनानी म्हणून शिवाजीचे असामान्यत्व अमान्य करणे हा नाही तर शिवाजीच्या राष्ट्रपुरुष म्हणून असणाऱ्या महात्मतेचा फार छोटा भाग युद्धतंत्रविशारदत्व आहे हे सांगण्याचा आहे.
 शिवाजीने मोगलसत्तेचा लोंढा थोपवून धरला, हा मुद्दा उघड चुकीचा आहे. कारण मोगलसत्तेचा लोंढा शिवाजीच्या काळात प्रथम कोसळला शाइस्तेखानाच्या द्वारे. शिवाजीने शाइस्तेखानाला शासन केले असेल. त्याने मोगलांचा फार मोठा पराभव कधीच केला नाही. दुसरा लोंढा जयसिंगाच्या रूपाने कोसळला. तो वीस वर्षांचे कार्य सपाट करून निघून गेला. तिसरा लोंढा खुद्द शाही नेतृत्वाखाली सन १६८१ मध्ये आला आणि दक्षिण पादाक्रांत करून निघून गेला. शिवाजीने अजिंक्य महाराष्ट्र निर्माण केला. तो जिंकण्यास मोगलांची सर्व शक्ती अपुरी पडली. महाराष्ट्र जिंकण्याच्या प्रयत्नात मोगल सत्ता खिळखिळी होऊन गेली व वेगाने नाशाकड़े घसरली, या म्हणण्याला अर्थ आहे. शिवाजीने मोगलांचा लोंढा थोपवून धरला, या म्हणण्याला फारसा अर्थ नाही. शिवाजीने मोगलांचा लोंढा थोपविला, इतकेच खोटे नसून कुतूबशाही व आदिलशाही यांचा प्रदेशविस्तार थांबविला हेही म्हणणे बरोबर नाही. महाराष्ट्रात त्यांचा प्रदेशविस्तार थोपविला गेला असेल. अतिदक्षिणेकडे त्यांचे राज्य थोडे फार वाढत होते. मूळ म्हणजे शिवाजीने केवढे राज्य निर्माण केले हा मुद्दा फार गौण आहे.
 शिवाजीच्या राज्याला नाव काय द्यावे याचाही विचार काळ्यांनी केला आहे. 'हिंदवी स्वराज्य' हे नाव सन १६४५ इतक्या आधी शिवाजीने वापरले आहे. पण पुढे त्या नावाचा वापर आढळत नाही. इतकेच खरे नसून शिवाजीने हिंदुराज्य निर्मितीचा गंभीर प्रयत्न केला नाही हेही खरे आहे. उलट तो सर्वधर्म प्रतिपादनाचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून होता. अखिल भारतभर राज्य निर्माण करण्याची त्याची जिद्द होती काय, याचे उत्तर 'होती' असे द्यावे लागेल. महाराष्ट्राबाहेर त्याने राज्य करण्याचा उपद्व्याप केलेला आहे आणि पुढे राजारामकाली मराठ्यांना अखिल भारतीय राज्याची स्वप्ने पडत होती, हे पुराव्याने सिद्ध आहे. उत्तरेतील हिंदूंच्यावर लादल्या गेलेल्या जिझीयाचा चिमटा शिवाजीला बसला हे जर सिद्ध असले, तर अखिल भारतीय राज्याचे स्वप्न त्याच्या डोळ्यांसमोर तरळत असले पाहिजे. ते साध्य झाले नाही हा प्रश्न अलाहिदा. काळे शिवाजीच्या राज्याला 'सह्याद्रीचे राज्य ' असे प्रदेशवाचक नाव देतात. प्रदेशवाचक अर्थाने ते नाव बरोबर आहे. पण भारतीय इतिहासात शिवाजीचे स्थान सांगण्यासाठी ते नाव अपूरे आहे. काळे म्हणतात, 'शिवाजी महाराज जीवनातील आनंद अनुभविणारे पुरोगामी नेते वाटतात.' हे शिफारसपत्र अनावश्यक आहे. कारण आपल्या परंपरेत जीवनातील आनंद अनुभवणे याला वेगळे अर्थ आहेत. ते म्हणतात, ' शिवाजी महाराजांनी सर्व जातींना राष्ट्रकार्याला जुंपून जातिभेदांतील द्वेषाचे विष मारून टाकले.' दुर्दैवाने इतिहास याच्या विरुद्ध आहे. ब्राह्मण, प्रभू आणि मराठा असे अधिकारी नेमले म्हणजे परस्परांना शह राहतो असे सभासदांनी म्हटले आहे. सरकार म्हणतात, हिंदू समाज जातिभेदांनी बनलेला आहे. त्यामुळे हिंदू समाजाच्या पुनरुत्थानाचा कोणताही प्रसंग प्रत्येक जातीत स्वतंत्र अस्मिता निर्माण करतो. जातीजातींच्या परस्परांना छेदणाऱ्या या अस्मिता एकूण समाज पुन्हा विस्कळीत करतात. दुर्दैवाने शिवाजीचे कार्य याला अपवाद ठरले अशी इतिहासाची साक्ष नाही. काळे म्हणतात, 'जिजाबाई, शहाजी, दादोजी कोंडदेव, दादाजी, नरसी प्रभू अनेक साधुसंत, राजगुरू श्रीसमर्थ रामदासस्वामी इत्यादींनी शिवाजीच्या जीवनात तेजाची ठिणगी फुलवत ठेवण्यासाठी मनापासून कष्ट केले असले पाहिजेत.' हे वाक्य 'छिप्पा पाणी' खेळण्याच्या प्रकारातले आहे. त्यांनी पुराव्याने सिद्ध न होणारा रामदास-शिवाजीसंबंध मागच्या दाराने हळूच माजघरात आणला आहे. नसता असल्या गोल वाक्याची गरज नव्हती. त्याचे गोल उत्तरं म्हणजे इतरांचे माहीत नाही, पण रामदासाने असे काही केल्याचा पुरावा नाही आणि असा पुरावा मागणं कदाचित अरसिकपणाचे असेल पण 'रसिक'तेची जागा इतिहास नव्हे.
 शिवाजीची महत्ता पा-यासारखी चकाकणारी आहे. साच्यात बसवून सांगण्याइतकी ती बाब घन नाही. फुंकरीने उडवण्याइतकी ती हलकी नाही. पण चिमटीत मात्र सापडत नाही. बोटाच्या फटीतून ओघळून जाते. काळे याला जरा घाबरले असावेत. शिवाजीचे मोठेपण चर्चिताना एकतर धर्मवादी, प्रांतवादी व्हावे लागते. ते काळे यांना या ग्रंथात करायचे नाही. नसता, शिवाजी याच्या कर्तत्वावर आधुनिक विचारांची पुटे चढवावी लागतात ते काळे यांना मंजूर नाही. तिसरा मार्ग त्यांना दिसत नाही. इथे पारा निसटला आहे.
 श्री. काळे यांनी दृष्टिकोणात ज्या चुका केल्या आहेत त्या अधिक गंभीर म्हणाव्या लागतील. शहाजी याचा जन्म इ. स. १६०२ चा आहे. १६०६ साली अल्पवयात शहाजी पितृहीन झाला. निझामशाही, मोगल आणि आदिलशाही या तीन सत्तांचा सरदार म्हणून तो आपली प्रतिष्ठा सतत वाढवीत होता. १६३२ साली निजामशाही गादीवर अल्पवयीन मूल बसवून, पण स्वतःच्या नेतृत्वाखाली एक राज्य चालविण्याचा त्याने उद्योग करून पाहिला. पण त्यात त्याला यश आले नाही. १६३६ सालो शहाजी पुन्हा आदिलशाही सरदार झाला. पण ही सरदारी घेताना महाराष्ट्रातील आपली जहागीर शिल्लक राहावी एवढी दक्षता घेण्यास तो चुकला नाही. कर्नाटकात आदिलशाहाच्या वाजूने लढताना दुसरीकडे त्याने आपल्या जहागिरीची नीट व्यवस्था केली. अवघ्या सहा वर्षांच्या धाकटया मुलाच्या नावे १६३६ मध्ये त्याने मावळचा पोट मोकासा दिला. बारा वर्षांचा शिवाजी या विभागात पाठविताना आपले विश्वासू मुत्सद्दी दिले. या भागात शिवाजीला नीट कार्य करता यावे म्हणून शहाजीची जहागीर ज्या विभागात त्याच विभागाचा सुभेदार म्हणून दादोजी कोंडदेव नेमला. इ. स. १६४९ साली कान्होजी जेधे व दा. कृ. लोहकरे यांना शिवाजोच्या मदतीसाठी पाठविले. १६५५ सालपर्यंत या विभागात तो लक्ष घालीतच होता. शिवाजीची मुद्रा असणारे उपलब्ध पत्र जुन्यात जुने काळे यांच्या मते इ. स. १६४६ चे आहे. पण रामदासी खंडांत भाग ९ पान २२ वर २४ सप्टेंबर १६३९ चे मुद्रांकित पत्र उपलब्ध आहे. निदान दादोजी कोंडदेव मृत होण्याच्या पूर्वी शिवाजीचा शिक्का सुरू झाला होता, हे अमान्य करता येणार नाही. शहाजी एकाच वेळी महाराष्ट्रात व कर्नाटकात दोन स्वतंत्र राज्ये निर्माण करण्याच्या उद्योगात होता, हे पृष्ठ ४१ वर काळे यांनी मान्य केले आहे. शिवाजी महाराष्ट्रात १६४२ साली आला. त्या वेळी त्याचे वय १२ वर्षाचे होते. समकालीन परमानंदाने, प्रथमप्रथम त्याचा प्रभाव जनतेवर पडला नाही याचा उल्लेख केलेला आहे. तरीसुद्धा १६४५ साली, आल्यापासून अवघ्या तीन वर्षांत शिवाजीने हिंदवी स्वराज्याची उभारणी करण्याचा घाट घातला आहे. हे सर्व पाहत असताना स्वराज्यस्थापनेची पूर्वतयारी शहाजीच्या डोक्यातून बाहेर पडली असावी हे मानावे लागते. कर्नाटकात शहाजीने शेवटपर्यंत स्वतंत्र राज्य निर्माण करण्याचा उद्योग मधूनमधून केला हे मानावयास जागा आहे. पण काळे यांना शहाजीचे हे कर्तत्व स्पष्टपणे दिसलेले आढळत नाही. मधूनमधून शहाजीचा अधिक्षेप करणारी वाक्ये या पुस्तकात विखुरलेली आहेत. स्वराज्याची कल्पना मनात आणणारा, पूर्वतयारी करणारा आणि निदान इ. स. १६५५ पर्यंत शिवाजीच्या पाठीशी असणारा कर्तृत्ववान बाप या दृष्टीने काळे यांचा अधिक्षेप अन्यायकारक तर आहेच; पण मुख्य म्हणजे तो ऐतिहासिक पुराव्याच्या विरोधी आहे. पृष्ठ२२ वर काळे म्हणतात,"आपला कर्तृत्ववान बाप जिथे थांबला त्याच्यापुढे जाण्याचा विचार शिवाजीच्या मनात आकार घेऊ लागला होता. आपला बाप परके राज्य टिकवण्यासाठी झटला, आपण स्वतःचे राज्य उभारू, असा विचार बालशिवाजीच्या मनात आला असेल." इ. स. १६७० पर्यंत शिवाजी निदान बाह्यतः स्वतःला मोगलांचे मांडलिक मानण्यास तयार होता. आणि अंतरंगाच्या दृष्टीने पाहिले तर शहाजीने जन्मभर दोन स्वतंत्र राज्ये आकाराला आणण्याचा घाट घातला. बाप जिथे येऊन थांबला' ह्या म्हणण्यास अर्थ नाही, कारण शहाजीचे उद्योग थांवले होते असे म्हणण्यास जागा नाही. उलट शिवाजीच्या अंगी पुरेशी समज येण्याच्या आधी व त्याचे कर्तृत्व उजाडण्याच्या आधी त्याचा शिक्का सुरू झाला होता, असे मानण्यास मात्र जागा आहे. पृष्ठ ३३ वर काळे म्हणतात, 'यापुढे बापाच्या जहागिरीच्या राज्याबरोबर आपल्या नळयाची यात्रा पुरे असे शिवाजीच्या हितचिंतकांना वाटले असावे." काळे यांना शहाजीचा अधिकार १६५५ पर्यंत कमीत-कमी चालू होता हे मान्य आहे. १६५३ साली शिवाजी स्वत:ला नरपती म्हणवून घेताना व मंत्र्यांचे शिक्के सनदांवर नोंदविताना दिसतो हेही त्यांना मान्य आहे. पण मंत्रिमंडळाच्या उभारणीचे श्रेय, स्वराज्याच्या संकल्पाचे श्रेय शहाजीच्या पदरी बांधण्याची मात्र त्यांची इच्छा नाही. पृष्ठ ५० वर ते म्हणतात, 'वयपरत्वे शहाजी सुखासीन व ऐदी बनत चालला होता, असे घडले असेल काय ? नसेल कुणी म्हणावे.' पृष्ठ ११५ वर ते म्हणतात, 'शहाजी राजे आदिलशाहीत केवळ निर्माल्य होऊन राहिले होते असे म्हणता येणार नाही; पण शिवाजीला त्यांनी नक्की कोणत्या प्रकारे मदत केली हे सांगता येत नाही.' पृष्ठ ११६ वर पुन्हा तेच म्हणतात, 'शहाजीच्या पराक्रमामुळे तंजावरचे राज्य स्थापन करणे व्यंकोजीला शक्य झाले.' असा हा धरसोडीचा प्रकार आहे. उपलब्ध साधनसाहित्याच्या प्रकाशात शहाजीचे कर्तृत्व व शिवाजीवर त्यांचे ऋण अधिक स्पष्ट व सुसंगत रेखाटता आले असते, असे म्हटल्याशिवाय राहवत नाही.
 अशीच दृष्टिकोणात दुसरी गंभीर चूक जयसिंगाच्या प्रकरणी झाली आहे, पृष्ठ १२७ वर ते म्हणतात, 'शिवाजीचे शौर्य मोगलांना प्रत्यक्ष दिसले तेव्हा अधिक प्राणहानी होऊ देण्यात अर्थ नाही, असे समजून जयसिंग तहाला तयार झाला. याच पृष्ठावर पुढे ते म्हणतात, " एवढा मोठा विजय केवळ दोन-तीन महिन्यांच्या आत झपाट्याने मिळविल्यानंतर जयसिंग शिवाजीला तहाच्या सोप्या अटी देणे शक्य नव्हते. शेवटी काळे यांचे काय मत आहे ? जयसिंगाने आपल्या कर्तृत्वाने शिवाजीच्या २० वर्षांच्या उद्योगावर पाणी फिरविले हे, की जयसिंगाला शिवाजी जिंकणे अवघड आहे हे ? तहाच्या अटी पाहता जयसिंगाने शिवाजी संपविला होता असे म्हणणे भाग आहे. मग जयसिंगाने तह का केला? औरंगजेबाने तरी अशा तहाला मान्यता का दिली? याचे स्पष्ट कारण म्हणजे दक्षिण जिंकण्याला पराक्रमी व माहीतगार सेनानी मिळविण्यासाठी, शिवाजीने अनेकवार सर्व दक्षिण जिंकून देण्याचे आश्वासन दिलेले आहे हे विसरता येणार नाही. काळे यांना पृ. १३० वर हे ध्यानात आलेले दिसते. तरी पृ. १३१ वर काळे म्हणतात, 'जयसिंगाची या स्वारीतील वागणूक निर्दयपणाची झाली. जयसिंग मराठ्यांचा उठाव हरप्रयत्नाने मोडून टाकण्यासाठी आला होता. मोगलांच्या कारस्थानी राजकारणात मुरलेला तो अजिंक्य योद्धा होता. शाइस्तेखानाची बोटे तोडल्यानंतर जयसिंगाकडून दयेच्या अपेक्षेत अर्थ नव्हता. शक्य तर शिवाजीस शरण आणणे, नसेल तर युद्धात ठार करणे, तेही न जमल्यास शिवाजीवर मारेकरी घालणे, हे सर्व मनाशी योजून जयसिंग हालचाल करीत होता. त्याबद्दल त्याला दोष देण्यात अर्थ नाही.' त्या वेळच्या रजपूताची काय ही अवनती अशी हळहळ व्यक्त करणे हास्यास्पद आहे. असा शिवाजीचे कार्य निकालात काढणारा शिवाजीशी तह जयसिंगाच्या कल्पनेतून साकार झाला. आग्रा भेटीच्या निमित्ताने शिवाजीला दक्षिणेत गैरहजर करणे या कल्पनेचा व शिवाजी आग्ऱ्यात अडकवला जावा, दक्षिणेकडे परत येऊ दिला जाऊ नये या कल्पनेचा जनकही स्वत: मिर्झा राजा जयसिंग. असा हा सामदामभेददंडपटू व औरंगजेबाचा विश्वासू सरदार. त्याच्या हमीवर विश्वास ठेवून शिवाजी आगऱ्यास गेला. हे पृ. १३८ वरचे मत फक्त मौजेचे म्हणता येईल. आणि दुसरे मौजेचे मत म्हणजे शिवाजीला मोगलदरबाराची अंतःस्थिती प्रत्यक्ष पाहून घ्यावीशी वाटली असेल हे मत. शिवाजी आगऱ्याला गेला कारण जाणे भाग होते. ही साधी वस्तुस्थिती काळे यांना सरळ मान्य करावीशी वाटत नाही. पुरंदरचा तह, मिर्झा राजा जयसिंग व शिवाजीची आग्रा भेट या प्रकरणी काळे यांची मीमांसा चाचपडत जात आहे. सत्याचे सर्व कण त्यांना ज्ञात आहेत, हे पृ. १३६ व १४३ वाचताना कळते. पण या दुव्यांची संगती त्यांना नीट जोडता आली नाही. शिवाजी औरंगजेबाला भेटला १२ मे १६६६ या दिवशी. या दरबार भेटीत त्याचा खटका उडाला. पण २९ मे पर्यंत त्याच्यावर पहारे बसविण्यात आले नव्हते. मधले सतरा दिवस औरंगजेबाने शिवाजीला कैद का केले नाही याचे उत्तर फक्त एक आहे. तो जयसिंगाच्या पत्राची वाट पाहत होता. शिवाजी २९ मे ते १७ ऑगस्ट कैदेत होता. पण संभाजी दरबारात जात-येत होता. विविध प्रकारे संभाजीवर ‘कृपेचा वर्षाव' चालू होता. याचे कारण फक्त एक की, औरंगजेबाच्या मते दक्षिण दिग्विजयाचे जयसिंगाचे काम संपल्यावर शिवाजीला दक्षिणेत परत पाठविणे शक्य होईल. आलमगीर-नामा म्हणतो, 'पण त्याचा मुलगा संभाजी बादशाही हुकुमाप्रमाणे रामसिंगबरोबर कुर्निस करावयास जाई. त्यावर मात्र बादशाही कृपा होई...बादशाहाने राजाचे हे म्हणणे मान्य करून त्यावर कृपा केली. व फौलादखानाला हुकूम झाला की, त्याच्या घरावर बसविलेला पहारा उठवावा...हेतू हा की, त्यावरही कुर्निस करण्याची काही दिवसांनंतर कृपा व्हावी. व तऱ्हेतऱ्हेचे प्रसाद देऊन निरोप घ्यावा.' (भा. इ. सं त्रै. वर्ष २० अंक ३, पृ. ४०) औरंगजेबाचा सूर यावरून कळू शकेल.
 संभाजीच्या बाबतीतही काळे यांची अशीच गफलत झाली आहे. शिवाजीच्या राज्याभिषेक प्रसंगी संभाजी युवराज म्हणून घोषित झाला होता. त्या आधी १६७१ पासून जिजाबाईच्या ऐवजी संभाजीने मराठी राज्याचा कारभार पाहण्यास आरंभ केला होता. तेव्हापासून १६७८ पर्यंत संभाजी राज्यकारभार पाहत होताच. १६७८ ला कर्नाटक मोहिमेच्या वेळी शिवाजीने कारभार मंत्रिमंडळाच्या हवाली केला व संभाजीस शृंगारपुरास राहावयास सांगितले, यामुळे संभाजी रुसला व मोगलांच्याकडे गेला. १६८० साली आरंभीच संभाजी परतला. शिवाजीने त्याला पन्हाळा, दाभोळ याचा सरसुभा नेमले. ही सारी हकीकत काळे यांच्या कानावर होती. बेंद्रे यांच्या ग्रंथातील प्रतिपाद्य विषय काळे यांना ज्ञात असावयास हरकत नव्हती. तरीही तीन बाबी त्यांनी नोंदविल्या आहेतच. (१) शिवाजीची इच्छा राज्याचे दोन तुकडे करावे. पैकी कर्नाटकाचा भाग संभाजीस द्यावा व महाराष्ट्राचा भाग राजारामास द्यावा अशी होती. (२) संभाजीने शृंगारपुरास असताना तरुणपणीचा काही वाह्यातपणा केला होता. (पृ. २२१) (३) महाराजांना आपल्या मृत्यूनंतर होणारी दुर्दिनाची कल्पना आली असली पाहिजे. या तिन्ही बाबी निराधार आहेत. काळे यांना आवडणाऱ्या शंभर टक्के विश्वसनीय पुराव्यांनी यांतील एकही बाब सिद्ध होत नाही. मोगलांच्या फौजा महाराष्ट्राच्या सीमेवर शिवाजीच्या अंतःकाळी जमू लागल्या होत्या. अल्पवयीन आठ-नऊ वर्षांच्या दुबळ्या राजारामाला महाराष्ट्राचे राज्य आणि मुलकी कारभार व लष्कर यांचा अनुभव असणाऱ्या, फौजा अनुकूल असणाऱ्या संभाजीला तुलनेने बिनधोक असणारे कर्नाटकचे राज्य ही वाटणी शिवाजी कशी सुचवील? आपल्या मत्यूनंतर संभाजी आणि मंत्रिमंडळ यांत संघर्ष येईल अशी कल्पना शिवाजीच्या मनात कदाचित आली असेल. पण संभाजी व्यसनी नव्हता. फौज त्याला अनुकूल होती व तो कर्तृत्ववान होता हे लक्षात घेता शिवाजीने संभाजी व मंत्रिमंडळ यांतील संघर्ष मिटविण्याची योजना केली नाही ही शिवाजीची चूक म्हटली पाहिजे. संभाजीला दोष देण्याचे कारण दिसत नाही. संभाजीच्या व्यसनीपणाचा पुकारा करणा-या या मराठी लेखकांना राजारामाविषयी जदुनाथ सरकार काय म्हणतात हे गावीही नसते. सरकारांच्या मते राजारामाच्या मंत्रिमंडळाने त्याला व्यसनी केले. प्रल्हाद निराजीने त्याला अफू, गांजा व विलासांत मग्न केले आणि स्वत: प्रल्हाद निराजी खराखुरा कारभारी झाला. (पहा- औरंगजेब हिंदी भाषांतर-ले. जदुनाथ सरकार). काळे यांनासुद्धा संभाजीकडे नीट पाहता आले नाही. हे संभाजीचे दुर्दैव म्हटले पाहिजे. राजारामाचा पक्षपाती सभासद संभाजीविषयी लिहिताना प्रमाण मानता येत नाही. काळे यांच्या ग्रंथातील दष्टिकोणात अशा काही गंभीर चुका आहेत; पण ही ठिकाणे फार थोडी. इतर सर्वत्र त्यांची विषयावर पकड घट्ट आहे.
 डॉ. बाळकृष्ण यांचा शिवाजी प्रकाशित झाल्यानंतर शिवाजीविषयी ग्रंथ लिहिणाऱ्या प्रत्येक लेखकावर शिवाजीच्या पूर्वजांचा विचार करण्याची जबाबदारी येऊन पडते. चितोडच्या रजपूत घराण्याचा राजा रावल कर्णसिंह याला दोन मुले. पैकी क्षेमसिंह चितोडचा वारस झाला, आणि राहप याने शिसोदिया घराण्यांची स्थापना केली. क्षेमसिंहाचा आठवा वंशज रत्नसिंह आणि राहपाचा दहावा वंशज लक्ष्मणसिंह इ. स. १३०३ च्या चितोडच्या स्वारीत सहभागी होते. लक्ष्मणसिंहाचा मुलगा अरिसिंह याचा मुलगा राणा हमीर याने चितोड परत जिंकले. अरिसिंहाचा धाकटा भाऊ अजयसिंह याची मुले सज्जनसिंह व क्षेमसिंह. हे दोघे भाऊ सन १३२० मध्ये दक्षिणेत आले. इ. स. १३५२ चे एक बहमनी फर्मान उपलब्ध आहे; ज्यात दिलीपसिंह पिता सज्जनसिंह पिता अजयसिंह यांचा उल्लेख आढळतो. या दिलीपसिंहाचा मुलगा सिधोजी. इ. स. १३९८ च्या एका फर्मानात भैरवसिंह पिता सिधोजी याचा उल्लेख आहे. इ. स. १४२४ च्या एका फर्मानात उग्रसेन पिता देवराज पिता भैरवसिंह याचा उल्लेख आहे. इ. स. १४७१ च्या एका फर्मानात भीमसिंह पिता कर्णसिंह पिता उग्रसेन याचा उल्लेख आहे. इ. स. १४९१ च्या आदिलशाही फर्मानात खेलोजी पिता भीमसिंह पिता कर्णसिंह याचा उल्लेख आहे. खेलोजी पुत्र मालोजी, पुत्र अक्षयसिंह, पुत्र कर्णसिंह, पुत्र चोलराज, पुत्र पिराजी, पुत्र प्रतापसिंह, पुत्र बाजी घोरपडे अशी वंशावळ फर्मानाच्या आधारे सिद्ध आहे. तेव्हा बाजी घोरपडे आणि सिसोदीया वंशाचा संबंध सिद्ध आहे असे म्हणण्यास हरकत नाही. १६३७ सालच्या वाटणीपत्राप्रमाणे शहाजी भोसले बाजी घोरपडे याचा भावकी मानला गेला आहे. म्हणजे शहाजी भोसले व सिसोदीया घराण्यातील रजपूत यांचा संबंध जोडणारी कागदपत्रे उपलब्ध आहेत. शिवाजी स्वतःला जेव्हा रजपूत म्हणवतो व मराठी बखरकार त्याला सिसोदीया वंशाचा रजपूत मानतात तेव्हा ती अगदीच थाप नसून त्याला पुरेशा अस्सल पुराव्याचा आधार आहे. भोसले घराणे हे मूळचे रजपूत घराणे आहे हा समज शिवाजीच्या काळी सार्वत्रिक दिसतो. १६५६ इतक्या आधीच्या काळी शिवाजीचा 'ग्रेट राजपूत' असा उल्लेख करणारी इंग्रजी कागदपत्रे उपलब्ध आहेत. या सर्व प्रकरणाचा काळे यांनी अजिबात विचारच केलेला नाही. ही या ग्रंथाची एक महत्त्वाची उणीव मानली गेली पाहिजे.
 छोट्याछोट्या मुद्द्यांवर कुठे शैलीचे तर कुठे माहितीचे कच्चे दुवे या पुस्तकात विखुरलेले आहेत. एक तर ही ठिकाणे लेखकाच्या ढिसूळ शैलीची अगर चूक विवेचनाची समजली पाहिजेत किंवा ती लेखकाच्या गैर माहीतगारपणाची द्योतक मानली पाहिजेत. अशी या ग्रंथात सुमारे ५० स्थळे आढळतात. त्यांपैकी वेचक दहा इथे नोंदवतो. (१) उत्तरेतील हिंदूंप्रमाणे दक्षिणेतील हिंदू कर्मठ राहिलेले नव्हते. कारण परदेशाशी आलेला व्यापारी व अनेक प्रकारचा संबंध (पृ.६). महाराष्ट्रातील हिंदू लोक कर्मठ राहिलेले नव्हते हे खरे पण ते श्रेय ज्ञानेश्वर ते तुकाराम या संतांच्या चळवळीला दिले पाहिजे. (२) महाराजांनी २४ ऑक्टोबर १६५७ च्या सुमाराला कल्याणभिवंडी घेतली. काळे लिहितात, 'औरंगजेब सिंहासन मिळविण्याच्या कारस्थानात गुंतलेला नसता तर हा उद्योग महाराजांच्या अंगाशीच आला असता.' (पृ. ६२). खरे म्हणजे शिवाजीची माहिती नेहमी अद्ययावत असे. आदिलशाह आजारी व अफजुलखान कर्नाटकात ही संधी साधून त्यांनी झपाटयाने जावळ खोरे जिंकले. औरंगजेब असा गुंतलेला होता म्हणूनच कल्याणभिवंडी घेतली नसता घेतलीच नसती. (३) शिवाजी शाईस्तेखानावर छापा घालण्यासाठी लालमहालात गेला, असे काळे यांना वाटते (पृ. १०५). सर्व समकालीन पुरावा व सभासदाची वखर, शिवाजी शाइस्तेखानाच्या डेऱ्यात गेला व हा डेरा लालमहालाच्या बाजूला होता' असे दर्शवतो. याच पृष्ठावर जसवंतसिंगाचे शेजारी असणारे दहा हजार सैन्य असूननसून सारखे झाले असा उल्लेख आहे. शिवाजीने जसवंतसिंग आधीच फितवून ठेवला होता असे मानण्यास जागा आहे.(४) मुसलमान झालेला नेताजी पालकर शिवाजीने हिंदू करून घेतला. यात शिवाजीचे नेताजीविषयी प्रेम दिसून येते, असे काळे यांचे मत आहे (पृ. १३६). शिवाजीने फलटणकरांनाही हिंदू करून घेतले आहे. सरसेनापती नेताजीला शिवाजीने हिंदू करून घेतले, जवळ बाळगले, पण पुन्हा त्याच्या दर्जाला शोभेसे मोठे काम मात्र दिले नाही. यात शिवाजीचा धोरणीपणा दिसून येतो, नेताजीबद्दलचे केवळ प्रेम नाही. त्याच नेताजीने एकदा कामात कुचराई केली तेव्हा त्याला कामावरून दूर करण्यात आले. त्याला पुन्हा महत्त्वाची जागा दिली नाही. पण एवढा पराक्रमी माणूस पुन्हा हिंदू होऊन जवळ राहत असेल तर सन्मानाने जगण्याची संधी देण्याचे हे औदार्य इथे दिसून येते. शिवाय शत्रूकडील एक पराक्रमी माणूस कमी करण्याचा हिशेबीपणाही दिसून येतो.(५)शिवाजीच्या आग्यातील आगमनामुळे राजधानीतील शिळया संथपणाला कंटाळलेल्या लोकांना अगदी नव्या प्रकारचे खळबळजनक दृश्य पाहता आले (पृ. १६९). शिवाजीचे आग्रा येथून धाडसी पलायन खळबळजनक ठरले असल्यास नवल नाही. पण शिवाजी आला तेव्हा पराभूत व मांडलिक होता. म्हणून आग्रानिवासी जनतेला खळबळ वाटण्याचे काही कारण नाही. (६) शाहूला सोडून देताना औरंगजेबाने खाष्ट सावकाराप्रमाणे खंडणीची बाकी त्यावर काढली (पृ. १५१). आमची आजतागायतची समजूत औरंगजेब मेल्यानंतर व मेल्यामुळे शाहू सुटला अशी आहे. शाहआलमने शाहूची ब-हाणपूरला सुटका केली. त्या वेळी शाहआलम गादीचा वारस होण्याच्या प्रयत्नात होता. त्याला दिल्लीला जाऊन राजा व्हावयाचे होते. पैशाचा हिशोब करण्याच्या मनःस्थितीत तो नसला पाहिजे. (७) पावसाळा असतानाही दोन लहानसे हत्ती राज्यारोहणासाठी रायगडावर चढवण्यात आले (पृ. १९४). शिवाजीचे राज्यारोहण ६ जून १६७४ रोजी झाले. आपल्याकडे मृग ७ जूनला सुरू होतो. कदाचित त्या वर्षी एखाददुसरा पाऊस पडून गेला असेल, पण राज्यारोहणाच्यावेळी पावसाळा नक्की नव्हता. शिवाजीचे दुसरे राज्यारोहण २४ सप्टेंबरला झाले. त्याचा हेतू निश्चलपुरी या शाक्तपंडिताचे समाधान करणे हा होता. त्या काळच्या युगाप्रमाणे महाराजांवर थोडाबहुत शकुनांचा परिणाम होत असला पाहिजे. पहिला राज्याभिषेक ठरविला; तो बेत जमत आला इतक्यात १९ मार्चला महाराजांची एक पत्नी निवर्तली. महाराजांची मुंज २९ मे ला झाली. ३० मे ला उपलब्ध ४ राण्यांपैकी घरगुती अडचण आल्यामुळे त्यांना तिघींशीच लग्न करावे लागले. राज्यारोहणानंतर अवघ्या १७ दिवसांनी मातोश्री जिजाबाई मृत झाल्या. निश्चलपुरीच्या मते योग्य बलिदान झाले नाही. महाराजांनाही ते पटले असावे. पुन्हा राज्यारोहण २४ सप्टेंबर रोजी झाले. हे राज्यारोहण झाल्यानंतर लवकरच प्रतापगडच्या भवानीच्या देवळावर वीज पडली. असा इतिहास आहे. तेव्हा पृष्ठ १९६ वर काळे म्हणतात त्याप्रमाणे सर्वसाधारण लोकांचे पाठबळ मिळविणे हा दुसऱ्या राज्यारोहणाचा हेतू नव्हता. (८) महाराजांनी मद्रासच्या इंग्रजांच्याकडून १६७७ ला शोधपूर्वक विषाच्या उताऱ्यावरील औषधे मार्गावली. यावरून स्वतःला विषप्रयोग झालेला आहे अशी महाराजांनाही शंका होती असे दिसते (पृ. २०२). यावरून फक्त महाराजांना स्वतःला विष. प्रयोग होण्याची शंका होती इतकेच कळते. (९)तंजावरच्या राज्यात मराठीची छाप राहून विद्याकलांना उत्तेजन मिळाले याचे काही श्रेय महाराजांच्या दिग्विजयाला द्यावे लागेल (पृ. २१८). तंजावर येथील विद्या व कला यांचे संरक्षण व संवर्धन याचा शिवाजीच्या कर्नाटक दिग्विजयाशी अर्थाअर्थी संबंध नाही. आपल्या कर्नाटकातील जहागिरीत विद्या व कला यांना आश्रय देण्याची परंपरा शहाजीने सुरू केली. पुढे व्यंकोजी व सर्कोजी यांनी ती वाढविली. या परंपरेचा निर्माता शहाजी, संवर्धक व्यंकोजी आणि सर्कोजीने उपलब्ध साहित्याचा प्रचंड संग्रह केला. शिवाजी वजा जाता मराठेशाही व पेशवाई विद्या व कलेच्या आश्रयासाठी कधीच प्रसिद्ध नव्हती. आणि व्यंकोजीच्या मानाने शिवाजीचा आश्रय फार मर्यादित होता. झाले असेल तर इतकेच की, शिवाजी व व्यंकोजी यांच्या पराक्रमाने मराठ्यांच्या कर्नाटकस्थ राज्याची पूर्वतयारी झाली. शिवाजीने हे राज्य स्थापिले. शहाजीचा कर्नाटकात जहागीर स्थापन करण्याचा उद्योग राजारामाचे काळी मराठी राज्य जिवंत ठेवण्यास उपयोगी पडला. (१०) तत्कालीन खानदानीच्या मानाने भोसले घराणे बेताबेताचे मानण्यात येत असे; अशी शंका घेण्यास जागा आहे (पृ. २३५). शिवाजीचे विवाह ज्या घराण्यात झाले त्यापेक्षा मोठ्या तोलदारीची घराणी महाराष्ट्रात कोणती होती याचे सूचन झाल्याखेरीज या शंकेला जागा उरत नाही. शिवाजीच्या राज्यारोहणानंतर राजारामाची लग्ने झाली आहेत. ती क्रमाने गुजर, मोहिते, घाटगे, कागलकर या घराण्यांतील मुलींशी झाली. हीही घराणी फार मोठी म्हणता येत नाहीत. कदाचित राज्य स्थापन झाल्याच्यानंतर व शिवाजी छत्रपती झाल्याच्या नंतरसुद्धा त्याचे घराणे बेताबाताचे मानले जात असल्यास न कळे ! खरी गोष्ट अशी आहे की, शिवाजीच्या सोयऱ्यांत भोसल्यांइतके पराक्रमी घराणे नाही. पण सोयरे तर शहाण्णव कुळीत आहेत आणि शहाण्णव कुळीतसुद्धा त्या काळी फार मोठी घराणी दाखविता येत नाहीत. तेव्हा ही शंका निराधार आहे.
 असो. परीक्षण फार लांबले. चांगला ग्रंथ म्हटला की, असा विस्तार करावाच लागतो. प्रत्येक सुशिक्षित महाराष्ट्रीयाने एकवार अवश्य वाचावा इतका चांगला हा ग्रंथ आहे; यात शंका नाही. मतभेदाची स्थळे अनेक असली म्हणजे ग्रंथाची किंमत कमी होत नसते.


 (छत्रपती शिवाजी महाराज - ले. दि. वि. काळे. प्रकाशक : पुणे विद्यापीठ बहिःशाल शिक्षण मंडळ)