परिचय/शोधमुद्रा
७. शोधमुद्रा
इतिहास हा माझ्या वाचन-चिंतनाचा आणि अभ्यासाचा अल्प प्रमाणात भाग असला तरी मी कोणत्याही कक्षेत बसू शकेल असा इतिहाससंशोधक नाही, याची मला जाणीव आहे. प्राचीन हस्तलिखित ग्रंथांच्यावरून अप्रकाशित काव्यग्रंथ प्रकाशित करणे, सनदा, पत्रे आणि ऐतिहासिक कागदपत्र वाचणे हे माझ्या आटोक्यातले नाही. ताम्रपट, शिलालेखांचे ठसे घेणे आणि वाचन करणे किंवा नाण्यांचे वाचन करणे हेही मला जमणारे नाही. उत्खननाचा एखादा कार्यक्रम हाती घेऊन पार पाडणे यालाही मी असमर्थ आहे. मूळ साधने प्रकाशात आल्या नंतर काही प्रमाणात त्यांची संगती लावण्याचा प्रयत्न करून पाहणे ही एकच बाब अशी आहे, जी बराच प्रयत्न केल्यानंतर मला जमण्याचा संभव आहे. म्हणून इतिहासज्ञ अगर
इतिहाससंशोधक या उपाधीवर कोणत्याही प्रकारचा अधिकार मी सांगणार नाही. प्रस्तावना लिहिण्याचा अधिकार मला फक्त दोन कारणांमुळे प्राप्त झालेला आहे. त्यांपैकी पहिले कारण म्हणजे ब्रह्मानंद देशपांडे हे आमचे मित्र आहेत. आणि दुसरे कारण म्हणजे ज्यावर दुसरा कोणताही संशोधक वाद घालू शकणार नाही अशा निर्विवाद पुराव्याने ही गोष्ट सिद्ध आहे की माझ्यापेक्षा ते वयाने धाकटे आहेत.
'शोधमुद्रा' हे पुस्तक जवळजवळ शिलालेखांवरील अभ्यासपूर्ण लेखांचे पुस्तक आहे असे म्हणायला काही हरकत नाही. या संग्रहात लेखकाने आपले तेरा लेख एकत्र केलेले आहेत. त्यांपैकी पहिले आठ लेख तर सरळ शिलालेखांचे वाचन देणारे आणि त्यावर स्पष्टीकरणात्मक टीपा देणारे असे
आहेत. दोन लेख शिलालेखांच्या वाचनाची चर्चा करणारे आहेत. एक लेख शिलालेख, ताम्रपटांतील बिरुदांची चर्चा करणारा आहे. जे राहिलेले दोन विवेचनात्मक लेख आहेत त्यांचाही सबंध शिलालेखांशीच आहे. काही शिलालेख या पुस्तकात प्रथमच प्रकाशित होत आहेत. म्हणजे ते प्रा. देशपांडे यांनीच प्रथम उजेडात आणलेले आहेत. काही शिलालेख इतरांनी यापूर्वी संपादित केलेले असले तरी ब्रह्मानंद देशपांडे यांचे वाचन तरी निराळे आहे, अगर अर्थनिर्णय तरी निराळा आहे. मराठवाड्यातून अशा प्रकारचे शिलालेखांच्या विवेचनाला वाहिलेले असे है पहिलेच प्रकाशन आहे आणि म्हणून त्याचा पुरस्कार करणे एक प्रकारे माझे कर्तव्य होते.
मराठवाडा हा जुन्या हैदराबाद संस्थानचा भाग. जुन्या हैदराबाद संस्थानात शिक्षणाची आबाळ सार्वत्रिक होती. पदवी परीक्षेचे शिक्षण फक्त हैदराबाद शहरातच आणि तेही उर्दू माध्यमातून असे. राजवट, मध्ययुगीन इतिहासात काही प्रमाणात रस घेणारी असली तरी प्राचीन इतिहास हा हिंदूंचा इतिहास होता. त्यात या राजवटीला फारसा रस नव्हता. या घटनेचा हैदराबाद संस्थानातील इतिहाससंशोधनावर अपरिहार्य असा परिणाम घडलेला आहे. विद्यापीठे आणि महाविद्यालये यांच्यामुळे एका बाजूने संशोधनाची सुविधा आणि दुसऱ्या बाजूने संशोधनाची गरज निर्माण होत असते. हे वातावरणच हैदराबाद संस्थानात नव्हते. म्हणून संस्थानाबाहेरच्या ज्या अभ्यासकांना गरज वाटेल त्यांनी स्वयंप्रेरणेने यावे व संशोधन करावे यापेक्षा जुन्या हैदराबाद संस्थानात अधिक काही घडण्याचा संभव नव्हता.
या वातावरणात मराठवाड्यातील संशोधकांची पहिली पिढी निर्माण झालेली आहे. चि. नी. जोशी, र. मु. जोशी, र. म. भुसारी, न. शे. पोहनेरकर, वि. अं. कानोले, भी. ल. परतुडकर ही या पिढीतील संशोधकांची काही नावे आहेत. अर्थातच ही यादी परिपूर्ण नाही. या ठिकाणी या संशोधकांचे संशोधन सांगून त्या संशोधनाचा आढावा घेणे हा माझा हेतू नाही. मला या बाबीकडे लक्ष वेधायचे आहे की, संशोधकांच्या या पिढीत काही वैशिष्टये दिसतात. पहिली गोष्ट म्हणजे या संशोधकांचे मुख्य लक्ष वाङमयेतिहासाकडे आहे. कारण उपलब्ध होणारी अप्रकाशित काव्यग्रंथांची संख्या विपुल होती आणि ते वाचून तिच्यावर परिचयपर लेख लिहिणे या मंडळींच्या आटोक्यातले होते. इतिहासशास्त्राचे पद्धतशीर असे अध्ययन या मंडळींचे नव्हतेच. हौसेने हे अभ्यासक, इतिहास अभ्यासक, इतिहाससंशोधनाकडे वळले आणि हौस म्हणूनच या क्षेत्रात राहिले. प्राचीन साहित्यग्रंथ वाचताना अधुनमधुन मोडीच्या आधारे सनदा व कागदपत्रे वाचण्याचा त्यांनी सराव ठेवला. पण फार्सी सनदा पत्रांचे व साधनांचे संशोधन यांना कठीण होते. नाणी आणि शिलालेख यांचा अभ्यासही या मंडळींना कठीण होता. या सामान्य नियमाला अपवाद फक्त सेतुमाधवराव पगडींचा होता. त्यांचे इतिहासाचे पद्धतशीर अध्ययन झाले होते. त्यांनी फार्सीचा व्यासंगही प्रचंड प्रमाणात वाढविला. पण हे उदाहरण अपवाद समजायचे. संशोधकांच्या या पिढीने केलेल्या कार्याचे महत्त्व कमी लेखण्याचे कारणच नाही. उलट आज सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध असल्यामुळे जो इतिहास- संशोधनाचा अभ्यास चालू आहे त्या मानाने या जुन्या मंडळींनी प्रतिकूल परिस्थितीत जे कार्य केले त्याचे मोल मी फार मोठे मानतो. पण परिस्थितीची मर्यादा ही की, मराठवाड्यात प्राचीन भारताचा पद्धतशीर संशोधनात्मक अभ्यास त्या वेळी होऊ शकला नाही.
पोलिस ॲक्शन नंतर नवीन कालखंड सुरू होण्यास बराच अवधी लागतो. महाविद्यालयांची संख्या पुरेशा प्रमाणात वाढल्यानंतर या दिशेने प्रगती होणे शक्य असते. क्रमाने संशोधकांची एक नवी पिढी मराठवाडयातून उदयाला येत आहे. ब्रह्मानंद देशपांडे, गोरक्ष देगलूरकर, हरिहर ठोसर, प्रभाकर देव, इत्यादी मंडळी या नव्या पिढीतील ठळक उदाहरणे होत. हे सगळेच प्राध्यापक आहेत. इतिहासाचे पद्धतशीर शिक्षण घेतलेले. त्यामुळे संशोधनविषयाची व्यापक पार्श्वभूमी ज्ञात असलेले, संशोधनाच्या पद्धतीचा शास्त्रशुद्ध अभ्यास केलेले, हे अभ्यासक आहेत. यामुळे कागदपत्रांचे संशोधन, हस्तलिखितांचे संशोधन चालू असतानाच शिलालेख, ताम्रपट, नाणी, मराठवाड्यातील वास्तुशिल्प, चित्रकला, मूर्तिकला यांच्या अभ्यासाला आरंभ होत आहे. ज्या मंडळींच्या परिश्रमातून आणि व्यासंगातून ही नवी आघाडी साकार होते आहे त्यांत एक महत्त्वाचे संशोधक म्हणून ब्रह्मानंद देशपांडे आहेत. वातावरण असे बदलले म्हणजे जुन्या पिढीच्या संशोधकांनाही शिलालेख ताम्रपटात रस घ्यावासा वाटू लागतो. हे सुचिन्हच म्हणायला पाहिजे.
हा संग्रह पाहताना मला पुन्हा एकदा तीव्रपणे इतिहासाचार्य राजवाडे यांची आठवण झाली. काही वर्षांपूर्वी यशवंत महाविद्यालय या संस्थेने नांदेड जिल्ह्यातील शिलालेखांचे संपादन करून एक प्रकाशन काढले होते. एक तर हे प्रकाशन इंग्रजीतून केले होते. दुसरे म्हणजे या प्रकाशनासाठी विख्यात संशोधक डॉ. रित्ती ह्यांचे साह्य घ्यावे लागले होते. ते पुस्तक पाहताना मला अशीच राजवाडे यांची आठवण झाली होती. आजही मूळ साधने इंग्रजीतून प्रकाशित करणे हीच गोष्ट सर्वांच्यासाठी सोयीची राहिली आहे. हे पाहिल्यावर राजवाड्यांची आठवण येणारच. अजून महत्त्वाची साधने निश्चितपणे मराठीतून संपादित करण्याची वेळ यायची आहे. हा अभिमानाचा भाग नसून सोयीचा भाग आहे. कारण इतर प्रांतीय संशोधकाचे लक्ष साधनांच्याकडे वळवायचे असल्यास इंग्रजी हेच आजही हुकमी साधन आहे. डॉ. रित्ती यांचा संशोधनक्षेत्रातील अधिकार सर्वमान्य आहे. पण त्याचबरोबर एक गोष्ट तितकीच उघड आहे की, रित्ती यांना या भागातील गावे आणि भूगोल यांची माहिती फारशी नव्हती. शिलालेखांचा संशोधक हा त्या त्या प्रदेशाचा, संस्कृतीचा आणि सांस्कृतिक पार्श्वभूमीचा जाणकार असावा लागतो. केवळ अक्षरवाटिका आणि ठसे वाचून या क्षेत्रात निर्वाह चालणार नाही. आनंदाची गोष्ट ही आहे की, ब्रह्मानंद देशपांडे हे ज्या साधनांचे संपादन करीत आहेत त्यांचे जाणकार आहेत. आणि ते पुरेसे नम्र आहेत,
संशोधनाच्या क्षेत्रात ही नम्रता मी अतीव महत्त्वाची मानतो. ज्यांनी शिलालेखाकडे प्रथम लक्ष वेधले, ज्यांनी प्रथमतः एखाद्या साधनाचे वाचन केले त्या पूर्वगामी अभ्यासकांचे व साहाय्यकांचे ऋण मान्य करणे अगत्याचे असते. त्यामुळे अधूनमधून आपल्या चूका लक्षात येतात; त्या सुधारून घेतल्या पाहिजेत. धर्मापुरी शिलालेखाच्या बाबतीत देशपांडे यांनी हे स्पष्ट नोंदवलेले आहे की, डॉ. कोलते यांनी मूळ शिला पाहिलेली नाही, पण त्यांनी जे वाचन केलेले आहे त्यामुळे आता आम्हाला आमच्या वाचनातील चुका आणि त्रुटी सुधारून घेता आल्या आहेत. ज्ञानाच्या क्षेत्रात हा प्रांजळपणा महत्त्वाचा असतो. ऋण सर्वांचे मान्य करावे, कोणत्या ठिकाणी आपल्याला उलगडा होत नाही त्याची स्पष्ट नोंद करावी लागते. अनुमानांना पुरावा आणि संभाव्यतेला निश्चिती भासविण्याची चातुर्यकला प्रयत्नपूर्वक विसरावी लागते. मतभेद असतातच. ज्ञानाच्या क्षेत्रात ते असावेत. मतभेद दाखविताना प्रतिस्पर्ध्याच्या मोठेपणापुढे दबून जाण्याची गरज नसते हे जितके खरे, तितकेच मतभेद अतिशय स्पष्टपणे पण सभ्यतेचे संकेत पाळून, व्यक्तिगत संदर्भ टाळून, दाखवता येतात याचे भानही असावे लागते. ब्रह्मानंद देशपांडे यांच्याजवळ प्रायः ही सर्व गुणसंपदा आहे. यामुळे मला त्यांच्या लिखाणाविषयी अधिक आस्था वाटते.
राजवाड्यांचे ऐतिहासिक लेखसंग्रह व कागदपत्रांचे संग्रह प्रकाशित होऊ लागले तेव्हा त्यावर एक टीकाही होती की, हे शास्त्रशुद्ध संपादन नाही. प्रत्येक कागदपत्राचा ठसा हवा, शिवाय टीपा विस्तृत हव्यात. राजवाड्यांनी उत्तर देताना ही गरज मान्य केली आहे व असे म्हटले आहे की, अशा प्रकारच्या प्रकाशनाचा खर्च कुणी सोसणार असेल तर आपण विनामूल्य सेवेला तयार आहोत. एरवी आमच्या शक्तीत ह्या विदुराच्या कण्या आहेत, त्या गोड मानून घेणे भाग आहे. 'शोधमुद्रा' ग्रंथ पाहताना माझ्या मनात असा विचार आला की, प्रत्येक शिलालेखासोबत एक स्थळाचे छायाचित्र आणि एक मूळ ठशाचे छायाचित्र असते तर बरे झाले असते. शिलालेख, ताम्रपट, नाणी यांच्या अभ्यासात मूळ ठशांना फार महत्त्व पण शेवटी तो जुनाच प्रश्न अजून शिल्लक आहे- हा खर्च सोसणार कोण ? विद्यापीठे व महाविद्यालये, याबाबतीत आपली काही जबाबदारी आहे असे मनापासून मानत नाहीत. एरवी राजवाडचांचे उत्तर याही संशोधकांनी दिले असतेच.
या ग्रंथामुळे चनई शिलालेख, रांजणा शिलालेख, सिल्लोड शिलालेख असे अनेक शिलालेख प्रथमच प्रकाशित होत आहेत. या शिलालेखांत छोटे छोटे असे यादवकालीन आठ मराठी शिलालेख दोन वेगवेगळ्या लेखांत आहेत. ही साधने केवळ अप्रकाशित आहेत. इतकेच त्यांचे महत्त्व नाही; त्यांतून काही महत्त्वपूर्ण सत्यकण बाहेर येत आहेत, ते राजकीय इतिहासाशी निगडित आहेत, तसे मराठी भाषेच्या लिपी, लेखन आणि शब्दरचना यांवर नवीन प्रकाश टाकणारेही आहेत. धर्मापुरी शिलालेख तर तत्कालीन सामाजिक इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असा शिलालेख आहे. म्हणून ही साधने अतिशय महत्त्वाची आहेत. याचे भान आपण ठेवले पाहिजे. ठिकठिकाणी देशपांडे लेख कोरणाऱ्याचा निष्काळजीपणा दाखवीत असतात. लेख त्रुटित स्वरूपात उपलब्ध होणे, त्यावरील अक्षरे पुसट होणे आणि कोरक्यांचे निष्काळजीपणे कोरणे या अशा बाबी आहेत की ज्यामुळे नानाविध प्रकारचे वाद निर्माण होतात. सर्वच ठिकाणी प्रा. देशपांडे यांनी कोरक्यांचा निष्काळजीपणा सांगितला आहे, जो सर्वमान्य होण्याचा संभव कमी आहे. आणि प्रत्येक शब्दाच्या बाबतीत निष्काळजीपणा हे स्पष्टीकरण पटणे कठीण आहे. असे ठिकाण आले म्हणजे मतभेद निर्माण होतात. दोन अधिकारी माणसे मतभेद दाखवू लागली म्हणजे त्यांतून अनेक कूटे उकलली जातात. या ग्रंथात मानुर शिलालेखावर असा एक वाद संग्रहित आहे.
आमचे मित्र हरिहर ठोसर आणि ब्रह्मानंद देशपांडे यांनी शिलालेखावर वाद घालावा, परस्परांच्या वाचनावर टीका करावी ही गोष्ट मी आनंदाची मानतो. ज्ञानाच्या क्षेत्रात मित्रांनी मित्रांवर टीका करायचीच नाही अशी गटबाजी नसावी. मी स्वतः या क्षेत्रातील अधिकारी नव्हे, पण मला स्वतःला वेगळ्या काही गोष्टी जाणवतात. त्यांतील एक बाब म्हणजे इराई ही ग्रामदेवता महाराष्ट्रात आहे याची नोंद घेतली पाहिजे. काही ठिकाणी म्हसोबा, खंडोबा ह्या देवता विरोबा असल्यामुळे म्हाळसा ही इराई झाली आहे, ते विराई या शब्दाचे रूप आहे. काही ठिकाणी हमखास पावणारी देवी ही इराई झाली आहे. ते वराई शब्दाचे रूप आहे. काही ठिकाणी एकवीरा म्हणजे रेणुका हीच इराई झाली आहे. ते एकवीरा आई या शब्दाचे रूप आहे. म्हणजे इराई ही देवता महाराष्ट्रातील ग्रामदेवतांत आहे. आता प्रा. देशपांडे जर मला यादीत नाव दाखवा म्हणणार असतील तर माझा नाइलाज आहे. कारण महाराष्ट्रातील संपूर्ण ग्रामदेवतांची नावे व पर्यायी नावे असणारी बृहन्नामावली माझ्या पाहण्यात नाही. मात्र इराई हे नाव यादव काळात संभवते की नाही हा वादविषय नव्हे. वादाचा विषय आहे इराउतु हे स्त्रीलिंगी नाम यादवकाळात संभवते काय? त्याबाबत मात्र मलाही असे वाटते की, एरावताचे ऐराउतु हे रूप यादवकाळात संभवत नाही. यादवकालात महाराष्ट्रात इरावती असे नाव होते की नाही, ते मराठी वाटते की नाही, याची चर्चा अधिकारी पुरुषांनी जरूर करावी. माझे मत असे की, इरावती नाव मला महाराष्ट्रीय वाटते. यादवकालात ते मला महाराष्ट्रात संभवनीय वाटते, पण त्याचे रूप इराउतु होत नाही. या शिलालेखापुरता विचार करावयाचा तर दोन बाबी स्पष्ट वाटतात.
'तेयाचा' हा शब्द निश्चितपणे त्यापुढे ज्या भिवू थोराताचे नाव आहे तो थोरात नावाचा माणूस त्याआधी उल्लेखिलेल्या देशाधिपतीचे अधिनत्व सांगतो म्हणून भिव थोरात देशाधिपती नव्हे. दुसरे म्हणजे इराउत हे वाचन संभवत नाही. म्हणून या शिलालेखात राणीचे नाव नाही. तसे राणीचे नाव असण्याचे कारणही नाही. माझे मत अशा प्रकारचे असल्यामुळे माझा कल देशपांडे यांचे वाचन स्वीकारार्ह मानण्याकडे आहे. अर्थात हा अनाधिकाऱ्याचा कल आहे. ठोसर आणि ब्रह्मानंद देशपांडे या दोन अधिकारी पुरुषांना परस्परांशी वाद घालण्याची अजून पन्नास वर्षे संधी मिळो अशी शुभेच्छा आहे !
सिल्लोड येथे वामेश्वर मंदिराचा लीळाचरित्रातील उल्लेखही असाच अतिशय महत्त्वाचा आहे. प्रा. देशपांडे यांचा शिलालेखांचा अभ्यास आद्य महानुभाव ग्रंथातील माहितीची यथार्थता व विश्वसनीयता वृद्धिंगत करणारा आहे. केवळ एक सत्य म्हणून याची आपण नोंद घेतली पाहिजे.
या संग्रहातील सेउणदेशकर सिंघणदेव प्रथम, याच्या शिलालेखाची उपलब्धी ही एक महत्त्वाची घटना आहे. सेउणदेश हा नेमका कोणता भाग आहे यावर संशोधकांत वाद आहे. रित्तीसारखे काही संशोधक यादवांचे कुलनाम सेउण असल्यामळे ते संपूर्ण घराणेच कानडी आहे असे मानतात. यादवांचे घराणे हे एक महाराष्ट्रीय घराणे आहे. या शिलालेखाच्या मधुन येणारी नामदेवासारखी व्यक्तिनामेही महत्त्वाची आहेत. कारण साधुसंतांची आपल्याला ज्ञात असणारी नावे त्यांच्याही पूर्वी व्यक्तिनामे म्हणून रूढ कशी होती या मुद्द्याला महत्त्व आहे. नामदेव हे नाव नामभक्तीचा प्रचार झाल्याच्या नंतरच येते हे विसरता येणार नाही. धर्मपुरी शिलालेखात 'तैलंगी' हा शब्द आहे. त्याचा तेली हा अर्थ मला विवाद्य वाटतो. 'कारण तैलकेणी यात तेली हा शब्द येऊन जातो' त्याच ओळीत किरकोला हा शब्द आहे. 'तो मला महत्त्वाचा वाटतो.' कारण हा शब्द मराठीत आलेला असण्याचा संभव आहे. सेठी चांगदेव यावर या लेखांनी पडणारा प्रकाश असाच महत्त्वाचा आहे, वापीकार हा शब्द बिडकीन येथील शिलालेखात ओविकार जसा आलेला आहे. यामुळे ओम हे अक्षर वा लिहिण्यासाठी वापरले जात होते असा ग्रह होतो. ॐ या अक्षराचे उच्चार ओम ओं, वों, ओ असे व्यक्तिपरत्वे होतात. हा उच्चार काही जणांच्या बाबतीत वा असा जर होत असेल तर ते संभवनीय आहे. मात्र अजून काही लेखांतून याला उपोद्बलक पुरावा मिळायला पाहिजे. माणकेश्वर हे शंकराचे त्या वेळचे लोकप्रिय नाव दिसते. माणकेश्वर गावी माणकेश्वर सापडावा यात नवल नाही, पण कैलास लेण्याचे जुने नावही माणकेश्वर लेणे आहे. मणी हा बौद्ध वाङ्मयात लिंगवाचक शब्द आहे, त्यामुळे माणकेश्वर हे शंकराचे नाव महाराष्ट्रातील वज्रयान बौद्धांच्या प्रभावाचा अवशेष असण्याचा संभव आहे. थोरातसारखी आडनावे, मढूसारखे मठवाचक शब्द हेही विचारांना पुष्कळ खाद्य देतात.
असाच एक शब्द 'रायनारायण' हा आहे. हे कल्याणी चालुक्याचे बिरुद आहे. या शब्दाचा रावोनारायणु या शब्दाशी काय संबंध आहे याचा शोध घेतला पाहिजे. एकच शब्द झंपडाचार्य झंपणाचार्य, झंपळाचार्य, झेपडाचार्य, अशी रूपे धारण करतो. या शब्दात जगथाप या आडनावाचे मूळ आहे ही माहिती महत्त्वाची आहे. असे संशोधनाला खाद्य देणारे किती तरी प्रश्न या शिलालेखांच्यामुळे निर्माण होतात. आजचा पाटील हा शब्द यादव काळातील पाटेल आहे आणि तो सातवाहन काळातील पट्टकील आहे. या वतनाचा शब्द म्हणून शोध घेणे सामाजिक इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. असाच एक शब्द वेठबिगार आहे. मराठीत असे जोडशब्द सापडतात. रोजगार म्हणजे वेतन, बेगार म्हणजे वेतन न देता घ्यावयाचे काम हाच वेठ शब्दाचा अर्थ आहे. पण जून्या काळी वेठ, वेठी आणि त्या पूर्वीच्या काळी विष्ठी हे शब्द सापडतात. त्यामुळे ही कल्पना समजून घेणे महत्त्वाचे आहे. कारण हा एक प्रकारचा कर दिसतो.
ब्रह्मानंद देशपांडे यांचे स्वतःचेच अध्ययन अतिशय चौरस आहे.ते एका शिलालेखाचा इतर अनेक लेखांशी, ज्ञात इतिहासाशी संबंध स्पष्ट करतात. असे संबंध स्पष्ट करताना पाहता पाहता निरनिराळ्या ऐतिहासिक समजुती बदलून टाकतात. आजतागायतची समजूत अशी की, घारापुरी येथील लेणी कलचुरीची आहेत, ब्रह्मानंदांनी ती चालुक्यांची ठरविली आहेत. मराठवाड्यातील परमार राजवंशाच्या संचाराकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. शिलालेखांचा, समकालीन जैन, संस्कृत आणि महानुभाव वाङमयाशी सांधा ते स्पष्ट करतात. सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहासावर अतिशय मार्मिकपणे नवा प्रकाश टाकतात तेव्हा त्यांचा व्यासंग आणि चौरसपणा इतका स्पष्ट आहे की, त्यावर पुन्हा विवेचन करण्याची गरज नाही. गरज आहे महाविद्यालयांनी आणि विद्यापीठांनी त्यांच्यामागे आर्थिक साहाय्य उभे करून अधिक व्यापक प्रमाणावर संशोधन करून घेण्याची.
आत्ता इतके सगळे सांगितल्याच्या नंतर काही ठिकाणी मतभेद दाखविणे भाग आहे. या मतभेदप्रदर्शनाचे कारण आपणही त्या विषयातील जाणकार आहो हे नसते. मतभेदाचे कारण हे आहे की, असे मतभेद दाखविणे ही विद्वानांची प्रथा आहे. केवळ प्रथा म्हणून तिचे पालन करणे मला भाग आहे. भोजाला भारतीय परंपरा दुसरा विक्रमादित्य मानते ही गोष्ट पुष्कळशी घोटाळा निर्माण करणारी आहे. राजा भोज आणि कालिदास यांच्या कथा, विक्रमादित्य आणि कालिदास यांच्या कथा यांतील ही सरमिसळ आहे. पण याहीखेरीज अनेक विक्रमादित्य आमच्या परंपरेत आहेत. त्यामुळे शनिमाहात्म्यातील विक्रमादित्य नेमका कोणता हे सांगता येणे कठीण आहे. शनिमाहात्म्य हा ग्रंथ अगदी अलीकडचा चौदाव्यापंधराव्या शतकातील. शनीच्या कथेत राजा विक्रमादित्य आहे की नाही हेच अजून नक्की सांगता येत नाही, म्हणून शनिमाहात्म्यातला विक्रमादित्य परमार भोज असावा काय ? आणि चालुक्य तैल्याने राजा मुंज याचा वध केला या घटनेचे रूप तेल्याने विक्रमाचे हात-पाय तोडले असे झाले असावे काय ? ही चर्चा मला अधांतरी वाटते. शिलालेखासारख्या दृढ पुराव्याच्या विवेचनात, लोकसाहित्याच्या अभ्यासात शोभणारी अनुमाने परवडतील, असे मला वाटत नाही. अर्थात ज्ञानाची क्षेत्रे मी भिन्न मानीत नाही. देशपांडे यांचे अनुमान कदाचित खरेही ठरेल, पण त्यासाठी याहून अधिक बलवत्तर प्रमाणाची गरज आहे.
एका शिलालेखात कोरक्याने सम्राटाचे नाव कोरताना त्याची युवराज असतानाची बिरुदे सम्राट झाल्यानंतरही चुकून वापरली असा तर्क केलेला आहे (पृष्ठ ८३). दुसऱ्या एका शिलालेखात सिंघणदेव युवराज असतानासुद्धा सम्राटपदाची बिरुदे त्यामागे लावली गेली असा उल्लेख आहे (पृष्ठ १५). याचा अर्थ मला तरी एवढाच कळतो की, या बिरुदाचा त्या त्या ठिकाणी आपल्याला सुसंगत उलगडा करता येत नाही. आपण कोरक्याने चुका केल्या असाव्यात अशी अनुमाने करणे धोक्याचे आहे. शिलालेखातील लेखाच्या बाबतीतसुद्धा शुद्धाशुद्ध ठरविणे कठीण असते. अनेक शिलालेखांत 'श्री, च्या ऐवजी स्री कोरलेले असते. जो शिलालेख निष्काळजीपणामुळे अशुद्ध आहे असे आपण म्हणतो, त्या शिलालेखात आणि जो शिलालेख आपण अशुद्ध म्हणत नाही त्या शिलालेखात दोनही ठिकाणी शके हा शब्द सकु असा कोरलेला असतो. कोरके तत्कालीन रीतीप्रमाणे उच्चार कोरीत आहेत, की तत्कालीन रूढ प्रादेशिक उच्चार कोरीत आहेत, की कोरताना स्वतःचा निष्काळजीपणा, अडाणीपणा दाखवीत आहेत, हे सांगणे कठीण आहे. तत्कालीन शिलालेखांत ठिकठिकाणी न ऐवजी ण येतो, श ऐवजी स येतो. या बाबी जैनमहाराष्ट्रीय अपभ्रंशांचा प्रभाव किती प्रमाणात सांगतात आणि किती प्रमाणात अशुद्धपणा दाखवतात हे सांगणे सोपे नाही. या सर्व मतभेदांना समर्पक उत्तरे असतील ती मला माहीत नाहीत इतकेच माझे म्हणणे.
प्रा. ब्रह्मानंद देशपांडे यांनी शिलालेखाच्या क्षेत्रात, इतिहास विवेचनाच्या क्षेत्रात आणि संशोधनाच्या क्षेत्रात आता आपले स्थान पक्के रुजविले आहे. रित्ती आणि मिराशी यांच्यासारख्या दिग्गजांना त्यांनी योग्य त्या ठिकाणी सुधारणा सुचविलेल्या आहेत व त्यांनी इतरांची मान्यता मिळविली आहे. तेव्हा आता ते नवखे नाहीत. या क्षेत्रातले तज्ज्ञ म्हणून मान्य होत आहेत.
(शोधमुद्रा- ले. प्रा. ब्रह्मानंद देशपांडे. अलकनंदा प्रकाशन, औरंगाबाद.)