६ मंथन


संशोधनाचे स्वरूपच असे असते की, ते पुराव्यांवर उभे राहते. एक तर समोर आलेला पुरावा पाहून मुद्दा मान्य करावयाचा असतो अगर ह्या पुराव्यातील उणिवा दाखवून मान्यता द्यावयाची असते. या दोन बाबी सोडून कौतुक करणे, उत्तेजन देणे या क्रिया या प्रांतात फारशा उपयोगी नाहीत. अशा या क्षेत्रात सदानंद देहूकर यांचे कौतुक करावयाचे म्हणजे काय करावयाचे हे मला ठरवता येत नाही. या संग्रहाच्या वाचकांना माझा सल्ला इतकाच आहे की, कृपया या लेखकाचे कौतुक करू नका. त्याऐवजी त्याचा मुद्दा बरोबर आहे की चूक यावर पुराव्यांनी चर्चा करा. तुम्हाला मुद्दा मान्य असेल तर मग कौतुक न करता त्याचे मत मान्य करणे पुरेसे आहे. आणि मुद्दा व मत मान्य नसेल तर मग कौतुक निरर्थक आहे असे समजा.

देहूकरांचे प्राचीन मराठी वाङमयाचे व इतर तत्त्वज्ञान वाङमयाचे अवगाहन किती सूक्ष्म व चौफेर आहे याची चुणुक या लिखाणातच आहे. पण चौरस व्यासंग असणारे, निर्दोष विचार करतातच याची खात्री नाही. संशोधन पुरावेशुद्ध व अनाग्रही असावे असा वारंवार जप करूनही व्यक्तीचे ग्रह- आग्रह संशोधनात बलवान होतातच. म्हणूनच संशोधनाच्या क्षेत्रात कारण नसताना पक्षोपक्ष निर्माण होतात. त्यांची आग्रहाने आपापसात झुंज चालू राहते. हा संग्रह वाचताना माझे लक्ष त्यातील शैलीकडे नाही. त्या निमि त्ताने समोर आलेल्या पुराव्याच्या ग्राह्याग्राह्यतेकडे आहे.
देहूकरांचे मुद्दे तसे अगदी सरळ व साधे आहेत. 'युगे अठ्ठावीस विटेवरी उभा' ही आरती अतिशय प्रसिद्ध आहे. गेली काही शतके ती लाखो वारकऱ्यांच्या तोंडी आहे. नामदेवापासून कितीजणांनी पांडुरंग युगे अठ्ठावीस विटेवर उभा आहे याची नोंद केली असेल त्याला गणती नाही. प्रश्न इतकाच आहे की, 'युगे अठ्ठावीस' या शब्दावलीचा अर्थ काय ? प्राचीन मराठी साहित्याचे गाढे व्यासंगी असणारे माझे एक मित्र आहेत. त्यांचे म्हणणे असे की, चार वर्षांचे एक युग होते. अठ्ठावीस युगे म्हणजे एकशे बारा वर्षे. पांडुरंग नामदेवाच्या पूर्वी एकशे बारा वर्षांपासून विटेवर उभा आहे. पुंडलिकाचा काळ नामदेवापूर्वी इतका जुना असावा. आता या विवेचनाला पुरावा काय? तर 'शोधतो आहे ! लवकरच सापडेल,' असे या आमच्या मित्राचे विश्लेषण. 'युगे' च्या ऐवजी 'उगे' हा पाठ असावा, आणि अठ्ठावीस म्हणजे वेदशास्त्रेपुराणे असावीत ही कल्पनाही अशीच आहे, म्हणजे पुरावा नसणारी आहे. देहूकरांची कल्पना अशी की, अठ्ठावीस हा वाकप्रयोग आहे. अतिप्राचीन, अनादि या अर्थाचा. आणि त्याला पुरावा म्हणून त्यांनी रामानुजांच्या गीताभाष्यातील उल्लेख दिलेला आहे. मी या प्रश्नावर एवढेच म्हणू इच्छितो की, आजवर 'युगे अठ्ठावीस' या शब्दावलीचा उलगडाच होत नव्हता; रामानुजांच्या गीताभाष्यामुळे आता दिशा सापडलेली आहे. व्यक्तिशः मला देहूकरांचा अर्थ पटतो. पण पुरावा पुरेसा वाटत नाही. रामानुजांखेरीज मागेपुढे असा इतर कुणीतरी अठ्ठावीस या संख्येचा असा वापर केलेला दाखवला पाहिजे. एक बलवान पुरावा समोर आलेला आहे हे मला दिसते आहे. पण महाराष्ट्राबाहेरच्या एका सुटया उल्लेखाच्या आधारे 'अनंत' असा अर्थ लावण्याची ती सर्वमान्य रूढी होती, असे मी मानणार नाही. अजून काही जणांनी 'अठ्ठावीस' हा शब्द असा वापरल्याचे दाखवायला हवे. म्हणजे हा अर्थ निर्णायक होईल. या क्षणी तरी मी 'जवळजवळ सिद्ध' इतकेच म्हणून थांबेन.
 जे संकेत रामानुजात आहेत पण इतरत्र फारसे नाहीत ते नामदेवात, ज्ञानदेवात आढळू लागले म्हणजे अनेक प्रश्न निर्माण होतात. वैष्णव भक्तिसंप्रदायाचे परस्परसंबंध हा भासतो तितका सोपा विषय नाही.


 असाच एक प्रश्न चक्रधरांनी उल्लेखिलेले 'आचार्य' कोण आहेत. हा आहे. एकेकाळी डॉ. वि. भि. कोलते 'आचार्य' म्हणजे शंकराचार्य असे मानीत. प्रा. निपाणीकर अजूनही तसेच मानतात, असे देहूकरांचे म्हणणे आहे. माझ्यासमोर या क्षणी 'नवभारत' चा जून १९८१ चा अंक आहे. सदर अंकात पृष्ठ ५२ वर निपाणीकरांनी आपण भट्टाचार्य म्हणजे कुमारिल भट्ट मानतो हे स्पष्ट केले आहे. म्हणजे आता चक्रधरोक्त आचार्य हे कुमारिल भट्ट होत यावर देहूकर, कोलते आणि निपाणीकर यांचे एकमत झालेले दिसते. मग वाद कुठे राहिला?
 मला वाटते खरा वाद आचार्य म्हणजे शंकराचार्य की कुमारिल भद्रहा नाही. त्या दोघांपैकी एक अगर दोघेहीजण मिळून नरकात गेले तरी वाद शिल्लक राहतोच. समजा उद्या मी म्हटले ब्राह्मण नरकात गेला. आणि कारण असे दिले की, तो जुगारी होता. तर मग आक्षेप वर्णावर राहत नाही. व्यक्तीपुरता मर्यादित होतो. हिंसा हे पाप आहे. हिंसेच्या पापामुळे नरकात जावे लागते. ही भूमिका घेतल्यानंतर शंकराचार्यांचे अद्वैती वेदप्रामाण्य आणि कुमारिल भट्टांचे कर्मप्रधान द्वैती वेदप्रामाण्य दोन्ही आक्षेपार्ह राहत नाहीत. फक्त आक्षेप राहतो तो हिंसेपुरता. हा मुद्दा महानुभावांना अवैदिक ठरविणारा आहे की नाही ? मध्वसंप्रदायाचे कर्मठ अनुयायी शंकराचार्यांना असुर मानतात. संकर करणारे मानतात. वेगळ्या भाषेत हे आचार्यांना नरक असेच सांगणे आहे. पण त्यामुळे मध्वांना कुणी अवैदिक म्हटलेले नाही. ज्या ज्या वेळी महानुभावांना बहिष्कृत करण्याचा उपद्व्याप झाला त्या त्या वेळी त्यांनी शंकराचार्यांकडून मान्यता मिळविण्याचा प्रयास केला. हा प्रयासच महानुभाव स्वत:ला अवैदिक मानत नसत याचा पुरावा आहे. आपल्या धर्मजीवनाची हीच विलक्षण तऱ्हा आहे की, ज्यांना वेदाचा अधिकार नाही असा आमचा आग्रह आहे आणि ज्यांना वेदाचा अधिकार नाही असेही ज्यांचे स्वतःचे मत आहे तेही वैदिकच आहेत. महानुभाव मराठा आणि महानुभाव ब्राह्मण यांचे बेटीव्यवहार नसतात. महानुभाव ब्राह्मण व इतर वैदिक ब्राह्मण यांचे मात्र बेटीव्यवहार असतात. हेच महानुभाव मराठा समाजाचेही चित्र आहे. धर्मसंप्रदायाहून इथे जात बलवान आहे. आणि दोघांनाही वेदावर आधारित स्मृतींचा कायदा लागू ही वास्तवता समोर ठेवली तर महानुभावांना हिंदू तर मानणे भाग आहे, वैदिकही मानणे भाग आहे. कोणतेही आणि कितीही आचार्य नरकात गेले तरी याबाबत बदल होत नाही. मी महानुभावांना वैदिक मानतो आणि सर्व वैदिकांनी वेद गुंडाळून ठेवणे जरुरीचे आहे असे मानतो.
 संशोधन क्षेत्रातील सर्व वादांचे स्वरूप असेच आहे. प्रथमदर्शनी पाहणाऱ्यांना हा सारा वाद एखाद्या किरकोळ मुद्द्यावर चालू आहे असे वाटते. पण तो किरकोळ मुद्दा एखाद्या प्रदीर्घ विवेचनाचा आरंभबिंदू असतो. 'महानुभाव हे वैदिक की अवैदिक ?' हा खरा मोठा वादविषय ! ह्या विषयाच्या चर्चेचा आरंभ 'आचार्य कोण ?' या मुद्दयापासून अनेकजण करतात. कधी कधी तर असेही दिसून येते की, वादविषय मुख्य प्रतिपादनाचा आधार आहे, हीही समजूत भ्रामकच आहे. तत्त्वज्ञानात शिरून सांगायचे तर भ्रम काही कर्माला कमी प्रवृत्त करतो असे नाही.


 हाच प्रकार 'उत्तर गीते' विषयी आहे. मराठीत 'उत्तर गीता' या नावाचे एक छोटेखानी काव्य आहे. काव्यकर्ता स्वतःला ज्ञानदेव म्हणवून घेतो. या ग्रंथाच्या जुन्या प्रती पाहता हा ग्रंथ एकनाथाच्या काळी अस्तित्वात होता असेही आढळून येते. इतक्या बाबी निर्विवाद आहेत. ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव या ग्रंथाचा कर्ता निवृत्तीशिष्य ज्ञानदेव हाच उत्तरगीतेचा कर्ता आहे काय, हा फक्त वादाचा विषय आहे. सदर ग्रंथ मराठवाडा साहित्यपरिषदेने छापलेला असून संपादक डॉ. श्रीधर कुलकर्णी आहेत. त्यांचे मत त्या काळी असे होते की, हा ग्रंथ मोठया ज्ञानेश्वरांचा म्हणजे त्याच ज्ञानेश्वरांचा आहे. आज त्यांनाही तसे वाटत नाही. हा ग्रंथ ज्ञानेश्वरांचा आहे असे आग्रहाने प्रतिपादन करणारा कुणीही नाही. हा ग्रंथ त्या ज्ञानेश्वरांचा नाही यावरच जवळजवळ एकमत आहे. आपण निवृत्तिशिष्य आहोत असे 'उत्तर गीता' कारांनीही म्हटलेले नाही.
 याबाबत दोन मुद्दे लक्षात घेणे जरुरीचे आहे, असे मला वाटते. ज्ञानेश्वर या नावाचे अक्षरश: शेकडो लोक गेल्या सातशे वर्षांत होऊन गेले. त्यांच्यातील काही निवृत्तिसुतही असणार व वारकरी संप्रदायाचे कवीही असणार. पण इथे घोटाळा केला जातो. आपण सारे वाङ्मय विठ्ठलपंत आपेगावकरांच्या पुत्राच्या नावे टाकतो.
 दुसरे म्हणजे क्षेपक ग्रंथरचना करण्याची प्रथा भारतभर रूढ आहे. इतिहाससंशोधक कानोले ह्यांच्या संग्रहात माझ्या पाहण्यात अशी एक 'गीता टीका' आली आहे की तिचा लेखक स्वत:ला निवृत्तीचा शिष्य ज्ञानदेव असे म्हणवून घेतो. तो गीतेवर टीका लिहितो. पण तो माणूस प्रामाणिक आहे. तो ज्ञानेश्वर, नामदेव यांच्यापासून एकनाथांपर्यंत सर्वांना मोठ्या आदराने नमन करतो. ज्ञानेश्वरांच्या नावे तर क्षेपक वाङ्मय भरपूर आहेच, ते ज्ञानेश्वरांचे नाही हेही सर्वांना मान्य आहेच. पण जे ज्ञानेश्वरांचे आहे असे सर्वजण मानतात त्यातही मोठया ज्ञानेश्वरांचे नाही असे खूप आहे. सारेच नाममुद्रा मिरविणारे अभंग ज्ञानदेवकृत आहेत असे मी समजत नाही.


 या 'बनावट' अशा संज्ञेने ओळखल्या जाणाऱ्या पण निवृत्तिशिष्य नसणाच्या कुणातरी १५ व्या शतकातील ज्ञानदेव नामधारी सामान्य कवीच्या 'अस्सल' ग्रंथाचा विचार करताना त्याला जोडूनच रंगनाथ मोगरेकरांचाही विचार केला पाहिजे. माझे मित्र सदानंद देहूकर या गरीब बिचाऱ्या रंगनाथ मोगरेकरावर एकदम उखडलेले आहेत. रंगनाथ मोगरेकरांनी वाङ्मयचौर्य केले आहे, असे त्यांना वाटते. त्याने वाङ्मयचौर्य केलेले नाही असे माझे मत आहे. वाङ्मयचौर्य इतरत्र प्रसिद्ध असणाऱ्या, आपणास उत्तम वाटलेल्या ग्रंथाच्या संदर्भात संभवते. पण आपल्या काळात तर हा ग्रंथ कुणाला परिचित नाही, म्हणून तो आपणास विनाप्रज्ञा व विनाप्रतिभा ख्याती देईल या खात्रीवर ते असते. लाखो लोकांच्या नित्य पठनात असणाऱ्या सर्वपरिचित ग्रंथाच्या संदर्भात वाङमयचौर्य होत नसते. झाले आहे ते इतकेच की, रंगनाथ मोगरेकरांची टीका ज्ञानेश्वरीने कमालीची प्रभावित झालेली आहे. रंगनाथांनीही ते मान्य केले असते. पण नमन करताना ज्ञानेश्वराला मात्र त्यांनी नमन केलेले नाही. आपणावर प्रभाव टाकणाऱ्या सर्वांना काळजीपूर्वक न विसरता नमन करावे इतका व्यवस्थितपणा देशस्थ ब्राह्मणाकडून अपेक्षू नये.
 ज्ञानेश्वरीच्या सांप्रदायिक प्रतीबाबत शासनाने जो गोंधळ केला आहे त्याविषयी माझे मत देहूकरांशी जवळजवळ मिळतेजुळते आहे. वारकरी संप्रदायाच्या लाखो भाविकांसाठी सांप्रदायिक ज्ञानेश्वरी उपलब्ध करून द्यावयाची असेल तर प्रत्येक ओवीचा अर्थ सुबोध व नेमका हवा. शासकीय प्रतीत तिथेच गोंधळ आहे. प्रत संप्रदायमान्य हवी. पण इथेही गोंधळ आहे. 'शासकीय समितीने हे काम अतिशय बेजबाबदार पद्धतीने केले आहे,' या देहूकरांच्या मताशी मी सहमत आहे. माझा मतभेद आहे ते ठिकाण म्हणजे कोणत्या प्रतीला संप्रदायमान्य म्हणावे ह्या मुद्दयावर. देहूकर अतिशय दृढपणे सांप्रदायिक ज्ञानेश्वरी म्हणजे एकनाथीप्रत होय, असे गृहीत धरून चालले आहेत. आणि तिथेच एक घोटाळा आहे. घोटाळा प्राचीनांचा नसून अर्वाचीनांचा आहे. आणि घोटाळा एक नसून घोटाळे अनेक आहेत.
 एकनाथांनी ज्ञानेश्वरीची एक प्रत सिद्ध केली. ती सर्व वारकरी प्रमाण मानतात इथवर ठीक आहे. पण ज्ञानेश्वरी छापली जाण्यापूर्वी एकोणिसाव्या शतकापर्यंत प्रत्येकजण असे मानत आला की, त्याच्याजवळ असणारे हस्तलिखित हेच एकनाथप्रणीत पवित्र ज्ञानेश्वरी होय. साखरेप्रत, दांडेकरप्रत यांच्यासह कुंटे, भिडे, बंकटस्वामी इत्यादी सर्व प्रती सांप्रदायिकच आहेत. आणि १८-१९ व्या शतकांतील उपलब्ध असणारी शेकडो हस्तलिखिते सांप्रदायिकच आहेत. संप्रदाय चिकित्सेवर उभे नसतात; आपल्या हाती आहे ते शुद्ध व पवित्र आहे अशा श्रद्धेवर उभे असतात. दांडेकरीप्रतसुद्धा यथामूल पुनर्मुद्रण आहे, याची खात्री कोण देणार? ते तपासूनच ठरवावे लागेल.
 शिवाय एकनाथपूर्वपरंपरेच्या ज्ञानेश्वरीच्या प्रती आहेत त्या काय कोणी पाखंडी आणि पाप्यांनी थोड्याच सिद्ध केल्या आहेत ? त्याही श्रद्धाळू भाविकांनीच सिद्ध केलेल्या आहेत. राजवाडे, माडगावकर, हर्षे, पां. ना. कुलकर्णी, खुपरेकरशास्त्री यांच्या प्रती असांप्रदायिक म्हणण्याचे कारण नाही.
 संप्रदाय प्रमाणप्रत छापता येत नसते हे खरे सत्य आहे. कारण सर्व संप्रदाय प्रमाणप्रती ह्या उपगटांना प्रमाणच वाटत असतात. दांडेकरांना अनुयायी आहेत, तसे साखरे महाराजांनाही आहेत. आपल्याहून भिन्न असणारा पाठ हा असांप्रदायिक आहे असे कुणीतरी म्हणणारच. प्रमाणप्रत ही कधी सर्व सांप्रदायिकांचे एकमत होईल अशी प्रमाणप्रत करता येत नसते. फक्त प्रमाण अशी पाठचिकित्सापद्धती वापरणारी प्रत सिद्ध करता येते. शासनाने गोंधळ केलेला आहेच. पण संपादक मंडळालाही आपले ज्ञान दाखवावे लागते. त्याविना कीर्ती व बिदागी ठरत नाही. शासनाने गोंधळ करावयाचा नाही असे ठरविले असते तरी सर्व परंपरावाद्यांना प्रमाण वाटेल अशी प्रत सिद्ध करता येणे अशक्य होते. परंपरावादाची खरी अडचण हीच आहे. 'परंपरा' ही एक श्रद्धा असते. तीत थोडे थोडे पूरक, ही वास्तवता असते. आणि मीच तेवढा प्रमाण, हा अभिमान तिथे अधिक असतो. चर्चा आणि चिकित्सा, तुलना आणि अभ्यास ह्यांसह जे ठरते ते शास्त्रानुसारी ठरो, की बहुमताने ठरो, सर्वांना कधी प्रमाण नसतेच.
 संत तुकारामांना आयुष्याच्या उत्तरार्धात खुप प्रतिष्ठा आणि मान्यता होती. त्यांचा शिष्यपरिवारही खूप मोठा होता. तुकोबांची कीर्तनेही प्रसिद्ध होती असे मानणे भागच आहे. ते काही एकांतनिवासी मठाधिपती नव्हते. तेव्हा तुकाराम टाळकरी नव्हते व टाळकरी ही कल्पना उत्तरकालीन आहे हा मुद्दा पटणार नाही. बेंद्रे यांच्या विवेचनातील त्रुटी देहूकरांनी चांगल्या दाखविलेल्या आहेत. संताजी जगनाडे यांचे स्थान या टाळकऱ्यांत अत्यंत महत्त्वाचे आणि मध्यवर्ती आहे.
 प्रस्तावना मनात ठरविली होती त्यापेक्षा अधिक लांबत जात आहे असा तोल सुटणे बरे नव्हे याची मला जाणीव आहे. इतर अनेक मुद्दे महत्त्वाचे व चिंतनीय आहेत याची नोंद करून फक्त अजून दोन बाबींना मी धावता स्पर्श करणार आहे..


 वारकरी संप्रदायाचे स्वरूप स्पष्ट करताना आपण काही बाबींकडे दुर्लक्ष करतो. त्यांना विवेचनात गौण स्थान देतो हे न्याय्य आहे असे मला वाटत नाही. आपण प्रथम ज्ञानेश्वर आणि नंतर तुकाराम यांचा तपशिलाने विचार करतो. नामदेव आणि एकनाथ यांना आदरपूर्वक नमन आपण करतो पण त्यांचा विचार ओघाओघाने जमेल तेवढा करतो. दुसरे म्हणजे वारकरी संप्रदायातील परस्परविरोधी प्रेरणांचा आपण फारसा विचार करीत नाही. या प्रश्नाशी निगडितच दूसरी बाब आहे ती म्हणजे आपण प्रवृत्तीनिवृत्ती यांचा विचार गोंधळासह करतो. हा गोंधळ भक्तिमार्गातील भिन्नभिन्न प्रेरणांच्या पृथक नादामुळे निर्माण होतो. देहूकरांनी दोन लेखांत या प्रश्नांना स्पर्श केलेला आहे.
 क्रमाने विचार करायचा तर प्रवृत्तिमार्ग म्हणजे काय, असा प्रश्न आपण विचारला पाहिजे. कर्मातूनच मोक्ष मिळतो, कर्म म्हणजे वर्णविहित वैदिक कर्म, यज्ञ हा इहलोकी इष्ट व फलदायक आणि. शिवाय परलोकी मोक्षदायक. म्हणून यज्ञाखेरीज इतर मार्गांचा विचार करण्याची गरज नाही, ही पूर्वमीमांसकांची भूमिका म्हणजे प्रवृत्तिमार्ग. कर्मातून मोक्ष हे प्रवृत्तिमार्गीयांचे प्रमुख सूत्र. लोकयात्रेसाठी कर्माचे महत्त्व मान्य, पण कर्मातून मोक्ष मिळत नाही, तो ज्ञानाने मिळतो ही उत्तर मीमांसकांची ऊर्फ वेदांताची भूमिका म्हणजे निवृत्तिमार्ग. सर्व भक्तिमार्ग, मग तो वल्लभ-मध्वांचा असो की वारकऱ्यांचा असो वा अजून कोणत्या संप्रदायाचा असो, सारेजण उत्तरमीमांसकांचा भाग आहेत. त्यांना प्रवृत्तिमार्गी होता येणे शक्य नाही. या अर्थाने सारे वारकरी ज्ञानोबा ते तुकोबा आणि पुढे विनोबा हे सगळे निवृत्तिमार्गीच आहेत. प्रवृत्तिनिवृत्तीचा हा एक अर्थ आहे.
 गावात राहणे, सामाजिक आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडणे आणि सगळे कर्तव्यकर्म ईश्वरार्पण बुद्धीने करून परलोककल्याण करून घेणे इतकाच प्रवृत्तिमार्गाचा अर्थ असेल तर मग सारा वारकरी संप्रदायच प्रवृत्तिमार्गी म्हणायला हवा. विठ्ठलभक्तीची गोडी सांगण्यासाठी वारंवार जन्म घेऊन भक्तीची गोडी चाखू ही भूमिका अर्थवाद समजायची. ती परमार्थाने घ्यायची नाही. जन्ममत्यूच्या चक्रातून सुटका होणारच नसेल तर मग भक्तिमार्गाला काहीच अर्थ उरत नाही. आणि भक्तिपूर्वक ईश्वरीकृपाही कुणी मागणार नाही. वारकरी संप्रदाय हा आरंभापासून जनतेचा संप्रदाय आहे. काळीवर शेत आणि पांढरीवर घर नसणारा जातिबहिष्कृत ज्ञानेश्वर हा वैचारिक नेता आणि नामदेव हा प्रचारक संघटक असे त्याचे स्वरूप आहे. अलुतेदार बलुतेदार असणाऱ्या अठरापगड जातींचा हा संप्रदाय. त्याच्या पोटात वरिष्ठ आणि सर्वसामान्यजन असे दोन्ही प्रवाह कधी एकत्र, कधी समांतर तर कधी विरोधी, असे वाहत आले आहेत. ब्राह्मणांनी ज्ञानेश्वरांचा निर्वश केला आणि त्याला आपला सर्व श्रेष्ठ संतही मानला. श्रुतीस्मृतींचे मोठेपण सांगणारा पण कर्मकांड न मानणारा जनतेचा संप्रदाय या भूमिकेवरून वारकरी संप्रदायाकडे पाहायचे असेल तर नामदेवाचा विचार गंभीरपणे केला पाहिजे. नुसता ज्ञानेश्वर पुरेसा नाही.
 एकनाथ म्हणजे वारकरी संप्रदायाचा दुसरा टप्पा. सामाजिक सुधारणावाद आणि राजकीय जाणीव असे दुहेरी व्यक्तिमत्त्व असणारा पुरुष म्हणजे एकनाथ. तर तुकाराम हा लोककवी आणि महाकवी. पण सामाजिक प्रवाहात एकनाथ म्हणजे तुकाराम व रामदास. एकनाथाची भूमिका वारकरी संप्रदायात फारशी रुजली नाही याची कारणेही पाहावी लागतील. अंतरंग भक्तीला संपूर्ण मोठेपण देऊन बहिरंग गौण करणारा प्रवाह आणि हे सगळे तोंडाने बोलणारा पण व्यवहारात परंपरेला घट्ट धरणारा प्रवाह हे दोन्हीही वारकरी संप्रदायात वावरतच होते. हे सारे धागे काळजीपूर्वक पाहून वारकऱ्यांचे ऐतिहासिक कार्य तपशिलाने अभ्यासावे लागणार आहे. दिशा देहूकरांचीच पण तिचा व्याप वाढायला हवा असे माझे म्हणणे आहे.
 देहूकरांनी शिवाजीवर लिहिले आहे. ग्रामीण साहित्यावरही लिहिले आहे. जे लिहिले आहे ते जबाबदारीने आणि अभ्यासपूर्वक लिहिलेले आहे. त्यांचा पिंडच मुळी चौरस अभ्यास करून समतोलपणे विवेचन करणारा आहे. बारकाईने माहिती गोळा करावी आणि ती सावधपणे मांडावी, हे त्यांना सहज साधले आहे. ही माहिती देताना शब्दाच्या उलगड्यापासून ग्रंथाच्या प्रामाण्यापर्यंत आणि नवेपाठ सुचविण्यापासून नवे विवेचन सुचविण्यापर्यंत सर्व वैविध्य त्यांच्याकडे आहे. तुकाराम महाराजांच्या एका अभंगातील पाठ त्यांनी महींपतीच्या आधारे दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला आहे.


 (मंथन ले. सदानंद देहूकर, नगर जिल्हा ऐतिहासिक वास्तुसंग्रहालय प्रकाशन, अहमदनगर.)