पायवाट/वा. ल. कुलकर्णी : एक समीक्षक

हैद्राबाद येथे भरणाऱ्या शेहेचाळिसाव्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून वा. ल. कुलकर्णी निवडून आल्यापासून त्यांच्या सत्काराचे कार्यक्रम सर्वत्र चालू आहेत. हा लेख प्रसिद्ध होईल त्या वेळी हे समारंभ संपून वा.ल.च्या अध्यक्षीय भाषणाची चर्चा सुरू झालेली असेल. या अध्यक्षपदाच्या निमित्ताने वा.लं.चे परिचयलेखही लिहिले जात आहेत. नुकतेच 'सत्यकथे'तून रा. भि. जोशी आणि 'नवभारता'तून डॉ. ग्रामोपाध्ये यांनी वा.लं.वर लिहिलेले लेख माझ्या वाचनात आले. दोघेहीजण वा.लं.चे चाहते आणि दीर्घकालीन मित्र. तेव्हा त्यांच्या लिखाणात व्यक्तिगत माहितीच्या तपशिलाला प्राधान्य आणि समीक्षक म्हणून वा.लं.च्याकडे पाहण्याला गौणत्व आले, ही गोष्ट रास्त नसली तरी स्वाभाविक आहे. तेवढी मोठी जवळीक अगर मित्रत्व मी सांगू शकणार नाही. आणि म्हणून वा.लं.च्याकडे व्यक्ती म्हणून न पाहता समीक्षक म्हणून पाहणे मला भाग आहे.

 पण त्याआधी काही वैयक्तिक बाबी नोंदवणे आवश्यकच आहे. त्यांतील पहिली वाव म्हणजे यंदाची अध्यक्षीय निवडणूक. नेहमीचा शिरस्ता बदलून यंदा महामंडळाने संमेलनाध्यक्षपदासाठी नवीन प्रथा रूढ केली. या प्रथेचा एक चांगला परिणाम हा झाला की अध्यक्षपदासाठी उभे असणारे तिघेही इच्छुक श्रेष्ठ साहित्यिक असेच होते. प्रतिस्पर्धी म्हणून वा.लं.च्या बाजूला उभे असणारे डॉ. कोलते आणि श्री. माडगूळकर हे दोघेही वा.लं.चे चांगलेच मित्र आहेत. माझ्यासारख्याला तिघेही मित्र, आणि वंदनीय होते. यंदा मतदारवर्गही विशिष्टच असा होता. त्यामुळे प्रचार, मते मिळवणे ही बाब फारशी जाणवली नाही. तीन श्रेष्ठ वाङ्मयसेवकांतून यंदाचे अध्यक्षपद वा.लं.ना मिळाले, हा कुणी कोलते अगर माडगुळकरांचा पराभव मानणार नाहीत. माझी माहिती बरोबर असेल तर वा.लं.ही अशा जय-पराजयाच्या भाषेत बोलणार नाहीत, कारण ती त्यांची प्रकृती नव्हे. जबाबदार वाङ्मयप्रेमिकांनी एका वाङ्मयसेवकाला यंदा मान्यता दिली.

साहित्यसेवा करणाऱ्यांच्याविरुद्ध बिनसाहित्यिक अध्यक्ष उभा राहावा आणि अवांतर कारणे प्रभावी होऊन साहित्य परिषदेच्या व्यासपीठावर साहित्यिकांचे व वाङ्मयसेवकांचे पराभव व्हावेत, ही घटना फारशी स्पृहणीय कधीच नव्हती. असा रागरंग असता तर त्या धुमाळीत वा.ल. कधीच पडले नसते, असा माझा समज आहे. हा समज खरा अगर खोटा याविषयी अधिकारवाणीने फक्त अतिनिकटवर्ती लोकच बोलू शकतील. या नव्या पायंड्याबद्दल महामंडळाचा एक सदस्य व मराठवाडा साहित्य परिषदेचा अध्यक्ष या नात्याने समाधान व्यक्त करणे हे माझे कर्तव्य आहे.

 तसा वा. ल. कुलकर्णी यांच्याशी माझा परिचय ते मराठवाडा विद्यापीठात येण्याच्या पूर्वीपासूनचा आहे. मराठी समीक्षेचा गंभीरपणे विचार करण्यास मी जेव्हापासून आरंभ केला त्या वेळी- म्हणजे त्रेपन्नचौपन्नच्या सुमारास-- टीकाकार म्हणून वा.लं.च्या नावाला बरीच मोठी प्रतिष्ठा प्राप्त झालेली होती. त्या वेळी त्यांचे 'वाङमयीन टीपा व टिप्पणी' हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झालेले होते. या पुस्तकातील वेगवेगळ्या लेखांवर अनेक दिवस मी प्राध्यापक भगवंत देशमुख आणि गुरुवर्य भालचंद्रमहाराज कहाळेकर यांसह प्रदीर्घ चर्चा केल्याचेही मला आठवते. या चर्चीचा परिणाम म्हणूनच वा.लं.च्या रसविवेचनावर मी माझे आक्षेप एका लेखातून मांडलेले होते. वा.लं.च्यामाझ्या परिचयाचा योग या आक्षेपांच्यामुळे आला. माणूस औदार्य आणि सहिष्णुता यांच्याविषयी बोलतो खूप, पण स्वतःला अंगलट येऊ लागले म्हणजे तो चिडून जातो. वा.लं.च्या व्यक्तिमत्त्वाचे मला सर्वात मोठे आकर्षण वाटले असले, तर ते हे की त्यांचा मतभेदावर खरोखरच प्रामाणिक विश्वास आहे. माणसे मतभेद नाईलाज म्हणून सहन करतात, तसे त्यांचे नाही. त्यांना मनापासून आपल्यापेक्षा भिन्न भूमिकांच्याविषयी आस्था आहे. किंबहुना वेगवेगळ्या बाजू मिळूनच कोणताही विचार पूर्णतेला जात असतो, ही त्यांची अंगभूत श्रद्धा आहे. इतर टीकाकार मतभेद सहन करू शकतात. वा.ल. मतभेदाचे स्वागत करू शकतात, कौतुक करू शकतात, आणि अधिकांत अधिक मतभेद दाखविण्याला प्रेमळ उत्तेजन देऊ शकतात. त्यात औपचारिकतेचा भाग फार थोडा असतो. स्वतःच्या मतांबद्दल वा.लं.ची भूमिका कमी आग्रही असते असे नाही. आपल्या विरोधी मतांतील दोष दाखविताना ते गुळमुळीत बोलतात असेही नाही. पण वाङ्मयाच्या समीक्षेसारख्या क्षेत्रात मतभेदच खरे महत्त्वाचे आहेत, या गोष्टीची जणू त्यांना उपजतच जाणीव आहे. त्या वेळेपासून वेगवेगळ्या प्रश्नांवर त्यांचे व माझे मतभेद आहेत. परिसंवाद इत्यादींमधून हे मतभेद व्यक्तही होतात. हे मतभेद जसे समीक्षेतील भूमिकेबद्दल आहेत, तसे वाङ्मयीन मूल्यमापनाबद्दलही आहेत. आणि हे मतभेद राहणारे आहेत, संपणारे नाहीत, यातच वा.लं.ना मौज वाटते. मी ज्यावेळी एम. ए.च्या परीक्षेला होतो, त्यावेळी एका अर्थी माझी फारच कुचंबणा झाली असती. ट्युटोरियल लिहिताना मी मादरे वा.लं.शी असणारे मतभेद अनुल्लेखित ठेवले असते, तर परीक्षा पास होण्यासाठी मी तडजोड पत्करतो आहे असा ग्रह होण्याचा संभव होता. जर हे मतभेद आपण

स्पष्टपणे नोंदविले तर वा.लं.च्या सौजन्याचा आपण गैरफायदा घेतो आहोत की काय, अशी मला भीती वाटे. मी माझ्या ट्युटोरियल्समधून आवश्यक त्या सर्व स्पष्ट शब्दांत वा.लं.च्यावर टीका केली होती, मतभेदही दाखविले होते. पण कधीही मतभेदांच्यामुळे वा.ल. चिडतील, आपणास 'नापास' करतील अशी भीती त्यांच्याबाबत मला वाटली नाही, हे मी मान्य केलेच पाहिजे. मतभेद दाखविणाराही वा.लं.च्या सहवासात निर्भय होतो ही गोष्ट त्यांच्या व्यक्तिमत्त्वाबाबत मला नित्य मोहक वाटत आली, हेही जाहीररीत्या नोंदविले पाहिजे.

 या थोड्या वैयक्तिक बाबी सोडून समीक्षक म्हणून वा.लं.च्याकडे जेव्हा मी पाहू लागतो, तेव्हा त्यांचे मोठेपण अधिकच मनात भरू लागते. वा.ल. हे मराठीतील एक युगप्रवर्तक टीकाकार आहेत, ही गोष्ट सामान्यत्वे कुणालाच जाणवत नाही. कदाचित वा.लं.नाही आपण असे काहीतरी आहोत याची जाणीव नसेल. किंबहुना तसे कुणी त्यांना म्हटले तर हा माणूस आपली चेष्टा करीत आहे, अशा समजुतीने वा.ल. एकदम चिडून उठतील. त्यांना खळ्या-कोपरखळ्या देण्या-घेण्याची फारशी सवय नाही. प्रत्येक गोष्टीकडे सर्व गांभीर्याने व जबाबदारीने पाहणे, हा त्यांचा स्थायी भाव आहे. पण मला मात्र त्यांचे हे युगप्रवर्तकत्व सतत जाणवत आले आहे. मला वाटते, श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांच्यानंतर मराठी टीका-वाङ्मयावर इतका मोठा परिणाम क्वचितच कुण्या टीकाकाराचा झाला असेल. आज ज्या गोष्टी आम्ही जवळजवळ सर्वमान्य म्हणून गृहीत धरून चालतो, त्या सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी अत्यंत वादग्रस्त होत्या. या बाबी आमच्या मनात आज स्थिरावल्या असल्या तरी त्या प्रथम कुणी सांगितल्या याचा शोध घेतल्याविना टीकाकार म्हणून वा.लं.चा मोठेपणा समजणेसुद्धा फार कठीण आहे.

 मराठी समीक्षेची पायाभरणी प्रामुख्याने श्रीपाद कृष्ण, साहित्यसम्राट केळकर आणि वामन मल्हार यांच्या लिखाणांतून झालेली आहे. तिघांच्यापैकी समीक्षक म्हणून वामन मल्हार हे अधिक सूक्ष्म विचारवंत व वाङ्मयीन सत्यांचा अधिक सुजाण शोध घेणारे म्हणून सर्वश्रेष्ठ ठरतील ही गोष्ट अगदी उघड आहे. पण मराठी समीक्षेवर वामन मल्हारांना फारशी पकड कधीच बसवता आली नाही. समकालीन टीकावाङ्मयावर सर्वांत मोठा पगडा श्रीपाद कृष्णांचा आहे. लघुकथा, नाटक अगर कादंबरी यांची समीक्षा करताना त्यातील 'विषया'ची चर्चा करण्याची पद्धत मराठीला कोल्हटकरांनीच लावली. सुसंगती व संभाव्यता या मुद्दयांवर कथानकाची विस्तृत तपासणी करण्याची सवय, शैली, पद, वर्णने, वातावरण असे कलाकृतीचे तुकडे पाडून प्रत्येकाचा पृथक विचार करण्याची पद्धत इथूनच सुरू होते. वाङ्मयसमीक्षेसाठी आडाखेवजा नियम तयार करणे व या घट्ट चौकटीच्या आधारे कलाकृती तपासणे, एका कलाकृतीत इतर कलाकृतींच्या अनुकरणाचे धागे तपासणे ही बाबही त्यांचीच. चमत्कृतीला, कल्पनाविलासाला स्वतंत्र महत्त्व देण्याची पद्धत पुन्हा त्यांचीच. कोल्हटकर फार रूक्ष असतील, इतर तितके रूक्ष नसतील. कोल्हटकरांच्या टीकेत 'मास्तर' जास्त असेल, इतरांत तितका नसेल. कोल्हटकरांत रसिकतेचे

प्रमाण थोडे कमीच होते, उरलेल्या मंडळींत रसिकता जास्त होती. पण यापुढील मराठी टीका जे वळण गिरवीत राहिली, ते कोल्हटकरांचे होते. तात्यासाहेब केळकर तर सोडाच, पुष्कळदा वामन मल्हारही याच पद्धतीने समीक्षण करतात. फडके, खांडेकर, माडखोलकर यांची समीक्षेची पद्धती मूलतः हीच आहे. फडकेप्रणीत तंत्रवादातील गुंतागुंत, निरगाठ, उकल हे साचे मराठीपुरते तरी क्रमाने कोल्हटकरांपासून उत्क्रांत झालेले दाखविता येतात.

 आजची मराठी समीक्षा यापेक्षा निराळी झाली आहे. तुम्ही कलावादी असा की जीवनवादी असा, आता लेखकांच्या अनुभव घेण्याच्या व तो व्यक्त करण्याच्या पद्धतीविषयी शोध घेणे अधिक महत्त्वाचे मानले जाऊ लागले आहे. मानवी जीवनातील वास्तवाचे व सत्याचे आकलन, अवलोकन आणि त्याची स्वयंपूर्ण आकृती म्हणून पुनर्निर्मिती तपासली जाऊ लागली आहे. कलाकृतीकडे एक संपूर्ण आकृती म्हणून पाहण्याचा, तिच्यात व्यक्त झालेल्या अनुभवातील विविध परिमाणे हुडकण्याचा प्रयत्न मराठी टीका करीत आहे. कथानकाच्या मांडणीच्या विचारापासून व कथानकाच्या प्रदीर्घ तपासणीपासून मराठी टीका कुणी सोडवली? तिला वाङ्मयीन टीकेचे व आस्वादाचे अधिक सुजाण स्वरूप कुणी दिले ? ते कुणीतरी दिले असले पाहिजे. कारण समीक्षेत हा बदल डोळ्यांत भरण्याइतका जाणवू लागला आहे. या बदलाचे सर्वात मोठे श्रेय वा.ल. यांचे आहे, अशी माझी समजूत आहे व म्हणून वा.लं.चे स्थान मी युगप्रवर्तक मराठी टीकाकारांत मानतो. त्यांच्याशी माझे मतभेद नाहीत असे नाही. त्यांच्या मर्यादा मला जाणवत नाहीत असेही नाही. पण त्यांचे सामर्थ्यही मला जाणवत आले आहे.

 वा.लं.नी एकोणीसशेपस्तीस-छत्तीस पासून लिहिण्यास आरंभ केला. याआधी थोडेच दिवस श्रीपाद कृष्ण वारलेले होते. वा.ल. ज्या वेळी लिहू लागले, त्यावेळच्या प्रथितयश टीकाकारांत तात्यासाहेब केळकर, वामन मल्हार जोशी यांचा समावेश होत असे. जोग, खांडेकर, माडखोलकर, पेंडसे, पु. ल. देशपांडे, प्रभाकर पाध्ये आणि क्षीरसागर हे टीकाकारही या काळात लिहीतच होते. बेडेकर, वाळिंबे, मढेकर यांचे महत्त्वाचे लिखाण बरेच नंतरचे आहे. समीक्षेत आपणास आज जो बदल दिसतो, त्याला यांपैकी जबाबदार असणारा टीकाकार कोण दिसतो हा माझ्यासमोर प्रश्न आहे. हाच प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने आपण मांडू शकतो. फडके, खांडेकर, माडखोलकर, दिघे, कवठेकर, ठोकळ यांच्या कादंबऱ्यांनी हा कालखंड गाजवला होता. हे सारे वाङमय तांत्रिक, दिखाऊ, खोटे व निर्जीव आहे हा साक्षात्कार वरील टीकाकारांत कितीजणांना झाला ? रविकिरण मंडळाचे व त्यानंतरचे काव्य मोठ्या प्रमाणात आवर्तात सापडलेले आहे ही जाणीव कुणाला झाली ? जोग व वाळिंबे या कालखंडात यशवंतांच्या 'जयमंगले'ला नितान्त रमणीय म्हणत होते. क्षीरसागरांना तर माधव ज्युलियन व गिरीश आजही मढेकरांपेक्षा श्रेष्ठ वाटतात. रविकिरण मंडळाने मराठी कवितेचा विकास केला, अशी या काळात त्यांची भूमिका होती. प्रत्यक्ष वाङ्मयीन मूल्यमापन मढेकर व प्रभाकर पाध्ये यांनी फारसे केलेले

नाही. प्राचीन रसचर्चा समजावून सांगणे, वाङ्मयीन वाद विवरून सांगणे या बाबी आपण बाजूला ठेवू , व जे वाङ्मय मराठीत निर्माण होत होते त्याच्या मूल्यमापनाची कसोशी कुठे दिसते हे जर आपण तपासून पाहू लागलो, तर वर उल्लेखिलेल्या टीकाकारांत वा.लं.खेरीज दुसरे नाव आढळणार नाही. केशवसुतांनी केलेल्या क्रांतीचा तपशीलवार विचार करणारे आणि कलेच्या शाश्वत मूल्यांचा शोध घेऊ इच्छिणारे सारेजण मढेकरांचा उदय झाला तेव्हा त्यांना समजून घेण्यात थिटे पडले. एकोणीसशेपंचेचाळीसच्या पूर्वीचे सारे वाङ्मय क्रमाने नकली व दिखाऊ होत आले आहे हे जाणणारा व वाङ्मयाला कवितेत अगर कथेत जे नवे धुमारे फुटतात त्यांचे स्वरूप समजून घेऊन त्यांचे स्वागत करणारा टीकाकार या दृष्टीने आपण फक्त वा.लं.च्याकडेच पाहू शकतो. म्हणून जर आज मराठी वाङ्मय-समालोचनात बदल दिसत असेल, तर तो वा.लं.चा परिणाम मानावा लागतो. पण ही गोष्ट आज फारशी जाणवत नाही. याचे खरे कारण हे आहे की, वा.लं.ची मूल्यमापने आता पूर्ण अंगवळणी पडली आहेत, व ती त्यांनी एकेकाळी प्रवाहाच्या विरोधी जाऊन वाङ्मयावरील गाढ प्रेमामुळे धैर्य धरून केली आहेत हे आता जाणवतही नाही. श्रीपाद कृष्णांचे असेच झाले होते. 'फडके : व्यक्ती आणि वाङ्ममय' लिहिणाऱ्या मा. का. देशपांड्यांना, स्वतः फडक्यांना, 'मुक्तात्मापासून प्रमद्वरेपर्यंत ' लिहिणाऱ्या वाळिंब्यांना, गडकऱ्यांवर लिहिणाऱ्या खांडेकरांना अगर केशवसुतांवर लिहिणाऱ्या जोगांना आपण कोल्हटकरयुगाचे पाईक आहोत, याची जाणीव असण्याचा संभव फार कमी. वर उल्लेखिलेल्या ग्रंथांच्या बाजूला वा.लं.चा 'वामन मल्हार' ठेवून पाहावा, म्हणजे नेमक्या बदलाचे स्वरूप व त्यातले वा.लं.चे स्थान अधिकच डोळ्यांत भरू लागते. पत्तीस-छत्तीस साली लिहू लागलेल्या टीकाकारांत चालू वाङ्मयाचे समालोचन सर्वात विपुल वा.लं.चेच आहे. म्हणून पंचेचाळीसनंतर होणारा बदल हा वाङ्मयाचा विकास आहे, इथे कोंडी फुटत आहे, हे प्रथम जाणण्याचे श्रेयही त्यांचेच आहे.

 माझ्या वरील विवेचनाचा अर्थ वा.ल. हे स्वयंभू परमेश्वर आहेत असा नाही. त्यांच्याही आधी केतकरांचा नव्या पद्धतीने विचार वामन मल्हार जोश्यांनी केलेला आहेच. कथानके न पाहता मानवी स्वभाव व जीवन आकलन करण्याच्या पद्धतीचे टप्पे पाडून वामन मल्हारांनी मराठी कादंबरीच्या विकासात केतकरांचे स्थान पाहण्याचा प्रयत्न केला आहे. केतकरांच्या वाङ्मयीन प्रकृतीत असणाऱ्या सामर्थ्याचा व मूलभूत उणीवांचा शोध घेतला आहे. पण असा प्रयत्न वामनराव एकदाच करू शकले. वामन मल्हारांचा हा वारसा वृद्धिंगत करून रुजविण्याचे कार्य वा.लं.नाच करावे लागले. वामन मल्हारांच्या अनेक कल्पनांचा विस्तार वा.लं.च्यामध्ये दिसतो. काहीवेळा तर वामन मल्हारांना जे ओबडधोबडपणे जाणवले, पण रेखीवपणे मांडता आले नाही- त्या कल्पनेचा अधिक चांगला विकास वा.लं.च्या लिखाणात सापडतो. एक उदाहरण म्हणून आपण काव्यानंदाच्या प्रश्नाकडे पाहू. काव्यानंद सविकल्प समाधीमुळे होतो ही तात्यासाहेब केळकरांची भूमिका होती. वामनरावांच्या शब्दांत सांगायचे तर ते समाधीला जलसमाधी देऊ इच्छीत

होते. वामन मल्हारांच्या मते काव्यानंदाचे प्रमुख कारण 'ताटस्थ्य' आहे. आनंदाचे कारण तटस्थता- ही गोष्ट त्यावेळी बहुतेक कुणाला पटली नाही. वा.लं.नी तटस्थतेचा अर्थ रसिकांनी व्यक्तिगत जीवनापासून अलग होणे असा मार्मिकपणे केला. तटस्थतेच्या ऐवजी " आपल्या खाजगीपणाची जाणीव मावळते" या पद्धतीने तीच गोष्ट वा.लं.नी मांडली आहे. कलावंताला या 'स्व'चा विसर पडला पाहिजे, रसिकालाही हा 'स्व' टाळता आला पाहिजे, ही वा.लं.ची सर्वत्र 'स्व' गाळण्याची भूमिका अधिक व्यवस्थित रीतीने मांडलेली वामन मल्हारांची ताटस्थ्यतेचीच भूमिका आहे. एका वामनाच्या अनेक कल्पनांचे विस्तार दुसऱ्या वामनात दिसतातच. रसिक, मत्सरशून्य, कौतुकात उत्साही असणाऱ्या पण समतोल अशा वामन मल्हारांची गादी आज वा.ल. चालवात आहत, असे जर मी म्हटले तर बहुधा कोणी ते अमान्य करणार नाही.

 वा. ल.ची समीक्षेतली भूमिका नम्र अशा शोधकाची आहे. हा शोधकपणा नुसता मायचा नाही. तो मूळ वृत्तीचाच गुणधर्म आहे. भाषेचा नम्रपणा सोपा असतो. त्या मानाने वृत्तीचा नम्रपणा अधिक अवघड असतो. हा वृत्तीचा नम्रपणा असल्यापार कलाकृती असो की विचार असो, प्रामाणिकपणे समजून घेण्याची क्रिया बडूच शकत नाही. कित्येक वेळा काहीतरी तुम्हाला जाणवत असते. मात्र ते नीटसे सांगता येत नाही. इतर कणीतरी ते अगदी व्यवस्थितपणे मांडलेले चटकन दिसते. अशा वळा ज आपणाला म्हणावयाचे होते, ते जर इतर कुणी मांडले असेल तर त्याचा प्रामाणिक अनुवाद करण्याची जबाबदारी घ्यावी लागते. यासाठी वा.ल. नम्र भाषांतरकारही झाल आहेत. ही भाषांतरे करण्यामागील त्यांची भूमिका परिचायकाची आहे, तपासनिसाची खासच नव्हे. इंग्रजीत कुणीतरी माणूस महत्त्वाचा विचारवंत आहे, त्याची मते मराठीत समजावून सांगावीत व ती आपणास कुठवर पटतात हे परीक्षून दाखवावे-- या हेतूने वा.लं.नी भाषांतरांना फारच क्वचित हात घातला आहे. जे सांगण्यासाठी मी धडपडत होतो, पण जे मला जमत नव्हते ते इतर कुणीतरी अधिक व्यवस्थितरीत्या मांडलेले आहे हे आढळले म्हणजे मग वा.ल. अनुवाद करतात. त्यांची ही पद्धत 'वाङ्मयातील वादस्थळां पासून चालू आहे. या एका संग्रहात विल्यम मॅक्कॉस, व्हर्जिनिया वुल्फ व वुडहाउस यांच्या विचारांचा अनुवाद सापडेल. असे काही अनुवाद 'वाङ्मयीन मते आणि मतभेद' मध्येही आहेत. विशेषतः आर्थर कोइस्लरच्या कादंबरीवरील लेखाचा अनुवाद महत्त्वाचा आहे. 'वाङ्मयीन टीपा आणि टिप्पणी 'तही ऑस्वेलच्या विवेचनाचा आढावा आहेच. हा प्रकार आरंभीच्या अवस्थेतील खास नव्हे. अगदी अलीकडेसुद्धा 'कलेचे जीवशास्त्र' हा ब्लाडिमिर वाइङ्ले याचा लेख वा.लं.नी अनुवादिला आहे. हे अनुवाद केवळ अनुवाद म्हणून महत्त्वाचे नाहीत. तर वा.लं.ना वेळोवेळी काय म्हणावयाचे होते, याचा शोध घेण्याच्या दृष्टीने हे लेख महत्त्वाचे आहेत. आपणावर कुणाकुणाचा परिणाम होतो आहे याची नोंद ते करीत असतातच. नकतीच वॉरेन आणि वेलेकची अशी नाद वा.ल.ना केली आहे.

 वा.लं.च्या या नम्रतेबरोबरच त्यांचा व्यासंगही आपण समजून घेतला पाहिजे. याबाबतीत वा.लं.च्या विद्यार्थ्यांनी त्यांच्यावर सर्वात मोठा अन्याय केला आहे. वा.लं.च्या विद्यार्थ्यांत असा एक ग्रह आढळतो की वाङ्मयीन अभ्यासाशिवाय इतर कशाचेही महत्त्व वा.ल. मनण्यास तयार नाहीत. ही भूमिका निर्माण होण्याची पुष्कळशी जबाबदारी स्वतः वा.लं.ची आहे, अशी माझी नम्र समजूत आहे. खरे म्हणजे वा.ल. हे समीक्षेपेक्षा ललित वाङ्मय जास्त महत्त्वाचे मानतात. समीक्षेवर माझे प्रेम आहे पण वाङ्मयावर त्यापेक्षा अधिक आहे, किंबहुना वाङ्मयावर प्रेम आहे म्हणूनच समीक्षेवर प्रेम आहे हे वा.ल. आवर्जून पुनः पुन्हा सांगतात. पण वाङ्मयापेक्षाही जीवनावर त्यांचे प्रेम अधिक आहे. किंबहुना जीवनाविषयी त्यांना अखंड कुतूहल आहे. म्हणूनच त्यांना वाङ्मयाविषयीसुद्धा कुतूहल आहे, ही गोष्ट त्यांच्या विद्यार्थ्यांच्या नीटशी लक्षात येत नाही. जीवनाचा एकूण व्यवहार म्हणजे फक्त वाङ्मयीन व्यवहार नव्हे, इतर व्यवहारही तितकाच मोलाचा व महत्त्वाचा आहे यावर वा.लं.ची श्रद्धा आहे. या श्रद्धेतून व्याकरणात मुरलेल्या मोडकांचा विषय निघाला की वा.ल. उत्साहाने बोलू लागतात. ज्ञानेश्वरीच्या पाठ-चिकित्सेचा विषय निघाला की आपले मित्र मंगरूळकर यांच्याविषयी ते उत्साहाने बोलतात. सार्वजनिक किंवा राजकीय जीवनातील चारित्र्याचा प्रश्न उपस्थित झाला म्हणजे ते एस. एम. जोशींच्याविषयी तितक्याच उत्साहाने बोलतात, ही गोष्ट वा.लं.च्या विद्यार्थ्यांच्या नीटशी ध्यानात आलेली दिसत नाही.

 वाङ्मयाचे मूल्यमापन आणि आकलन यांत मराठी समीक्षक पुष्कळ वेळा गोंधळ करतात. वा.लं.नी या दोन बाबी भिन्न आहेत याची जाणीव सतत ठेवली आहे. वाङ्मयाचे यथार्थ आकलन व्हायचे असेल तर कलाज्ञानाइतकीच समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राजकारण इत्यादींचीही गरज आहे, ही गोष्ट वा.लं.नी कधी नाकारली नाही (पाहा 'वाङ्मयीन टीपा आणि टिप्यगी, पृष्ठ ११). तथापि आकलनासाठी या बाबींचे महत्त्व मान्य करूनही वाङ्मयीन मूल्यमापनास मात्र वाङ्मयीन मूल्यांचाच आग्रह वा.लं.नी सतत धरला आहे. खरोखरी यात विसंगती नाही; असेल तर महत्त्वाची सुसंगतीच आहे. ललित वाङ्मयात तुमचा स्पर्श समग्र जीवनाशी, त्याच्या सर्व अंगांशी सामग्र्याने होतो. ही सारी अंगे समजून घेणे आवश्यकच असते. पण हे समजून घेणे म्हणजे मूल्यमापन नव्हे. वाङ्मयाचे आकलन निराळे आणि मूल्यमापन निराळे. समीक्षेला मात्र दोन्ही बाबी नीट पाहिजेत. ते पाहण्याची तयारी वा.ल. नेहमी दाखवतात. अव्वल इंग्रजीच्यानंतर मराठी वाङ्मय नवा आकार धारण करीत गेले, या क्रियेबरोबरच मराठी भाषाही नव्याने घडत गेली, ही गोष्ट वा.लं.ना सदैव जाणवत असते. नवीन आशय व्यक्त करण्यासाठी सतत मराठीला नवनवे शब्द घडावे लागले. या घडविल्या गेलेल्या नव्या शब्दांच्याकडे वा.ल. लक्ष वेधतातच. मग ते केळकरांवर लिहीत असोत किंवा चिपळूणकरांवर लिहीत असोत. उदाहरणार्थ, चिपळूणकरांचे विविध वाक्प्रचार सांगतानाच त्यांनी घडविलेले नवे मराठी शब्दही वा. ल. नोंदवितात ( वस्त्वैक्य, एकराजक, वाताकर्षक यंत्र, व्यक्तिभूत मनुष्य इत्यादी) कोल्हटकरांच्यावर लिहितानाही हा विचार वा. ल. करतातच (उदाहरणार्थ विचारसंगती, ललित, बहुजनसुखवाद, तर्कवाद, सौंदर्यवाद इत्यादी). वामन मल्हारांनी घडवलेले अहंगंड, न्यूनगंड असे शब्दही त्यांनी नोंदवलेले आहेत. वस्तुतः ही वाव वाङ्मयीन अभ्यासात येणार नाही, पण वाङ्मयीन आकलनाला तिचा उपयोग आहे. एकोणीसशेसव्वीस साली 'कथासप्तक' प्रकाशित झाले. इथून मराठीत एकेका व्यक्तीचे लघुकथासंग्रह प्रकाशित होण्याचा क्रम सुरू झाला. ही गोष्ट वाङ्मयाच्या इतिहासात महत्त्वाची आहे. 'मासिक मनोरंजना'त आलेल्या कथा कलात्मक वाङ्मय म्हणून महत्त्वाच्या नसतील, पण आजच्या मराठी लघुकथेची वाटचाल पाहण्यासाठी हा अभ्यास महत्त्वाचा आहेच. मराठी वाङ्मयाच्या प्रपंचात 'मासिक मनोरंजना'चे स्थान पाहिलेच पाहिजे. कारण याच मासिकातून एकोणीसशेवीसपर्यंतचे सर्व महत्त्वाचे मराठी काव्य प्रकाशित झाले, यातूनच मराठी लघुकथेने आकार घेतला, इथेच पुस्तकपरीक्षणाला व विनोदाला एक गती मिळाली. दिवाकरांची नाट्यछटा आणि वामन मल्हारांची 'रागिणी' जिथून प्रकाशित झाली, ते 'मासिक मनोरंजन' ही मराठी वाङमयातील एक महत्त्वाची घडामोड आहे. वाङ्मयीन आकलनासाठी वाङ्मय-व्यवहारातील अवाङ्मयीन बावी अभ्यासिण्याचे वा.लं.नी कधी नाकारले नाही.

 या दृष्टीने त्यांनी केलेल्या आणखीही दोन प्रयत्नांच्याकडे लक्ष वेधले पाहिजे. खाडिलकरांवरील ग्रंथात शेवटी त्यांनी एक तक्ता दिलेला आहे. खाडिलकरांच्या पूर्वी. खाडिलकरांच्या प्रत्येक नाटकाच्या बरोबर, आणि खाडिलकरांच्या दोन नाटकांच्या दरम्यान महत्त्वाचे मराठी नाट्यवाङ्मय कोणते होते हे या तक्त्यात नोंदविलेले आहे. खाडिलकरांची नाटके आणि त्यांच्या भोवतालची रंगभूमी समजून घेण्यासाठी हा तक्ता महत्त्वाचा आहे. पण याहीपेक्षा अत्यंत चौरस असे त्यांचे परिशिष्ट वामन मल्हार व त्यांचा काळ हे आहे. या परिशिष्टाची व्याप्ती नीट समजून घेतल्याशिवाय वा.लं.च्या अभ्यासातील चौरसपणा समजणे कठीण जाईल. वामन मल्हार अठराशेन्याऐंशी साली जन्मले. पण वा.लं.च्या नोंदी त्याआधी अठरा वर्षे सुरू होतात. कारण वामन मल्हार समजून घेण्यासाठी हरिभाऊंचा जुना काळ समजणे, हरिभाऊ समजण्यासाठी राजवाडे समजणे आणि वामन मल्हारांवर ज्या घटनेचा फार मोठा ठसा आहे ती घटना--- राष्ट्रीय शिक्षण, हिचे जन्मदाते विजापूरकर समजणे हे महत्त्वाचे आहे. हे परिशिष्ट पाहताना स्पष्टपणे काही गोष्टी कळतात. वामनरावांच्या जन्माआधी मार्क्सचा 'कपिटल' ग्रंथ प्रकाशित झाला होता. पहिला गाजलेला पुनर्विवाह होऊन गेला होता. जॉन स्टुअर्ट मिलचा मृत्यू झाला होता. निर्णयसागर छापखाना स्थापन झालेला होता. थिऑसफिकल सोसायटीची स्थापना व वासुदेव बळवंतांचे बंड या घटना तर वामन मल्हारांच्या जन्माच्या ऐन आधीच्या. वामन मल्हारांचा जन्म व नाथमाधवांचा जन्म एकाच वर्षीचा. याच वर्षी दादोबा वारले, चिपळूणकरही वारले. वामन मल्हार दोन वर्षांचे झाले आणि केशवसुतांची पहिली कविता प्रकाशित झाली, केतकर जन्माला आले, इंग्लंडमध्ये फेबियन सोसायटी स्थापन झाली.

वामनराव चार वर्षांचे झाले तो अण्णा किर्लोस्कर वारले होते, इंग्लंडमध्ये नास्तिकाला लोकसभेत बसण्याची परवानगी मिळालेली होती, इब्सेनच्या नाटकाचा लंडनमध्ये पहिला प्रयोग होत होता. त्याच वर्षी भारतात पंचहौद चहा-बिस्किट प्रकरण झाले. हरिभाऊंची 'उपःकाल' कादंबरी आणि आगरकरांचा मृत्यू या वटना एकाच वर्षीच्या. ऑस्ट्रेलियाला वसाहतीचे स्वराज्य, नीत्शेचा मृत्यू , न्या. रानड्यांचा Rise of Maratha Power हा ग्रंथ, माडखोलकरांचा जन्म आणि हरिभाऊ मॅटिक होणे या घटना एकाच वर्षीच्या. वामनराव बी.ए. झाले त्या वर्षी चेकॉव्ह वारला. वामनराव एम.ए. झाले त्याच्या आधल्या वर्षी केशवसुत वारले; त्याच वर्षी इब्सेन वारला. मराठी वाङ्मयातील, महाराष्ट्रीय जीवनातील, जागतिक वाङ्मयातील आणि जगातील विविध घटनांचे आलेखन करून त्या कालपटात वा.लं.नी वामनरावांचे जीवन बसवून दिलेले आहे. या कालपटात उल्लेखिलेल्या घटना उगीचच व अनावश्यक नाहीत. वामन मल्हारांच्या सर्वांगीण आकलनाला या घटना उपयोगी आहेत; किंबहुना आवश्यक आहेत. एकेका व्यक्तीच्या अभ्यासासाठी किती चौरस तयारी करावी लागते याचे हा पट म्हणजे उत्तम उदाहरण आहे. पुन्हा हे सांगितले पाहिजे की हे सारे वाङ्मयाचे आकलन आहे, मूल्यमापन नव्हे. वा. ल. कुलकर्णी ललित वाङ्मयाच्या वाङ्मयीन रसग्रहणाच्या पलीकडे इतरत्र कुठे जात नाहीत, अवांतर बाबींशी आपल्या वाङ्मय-विवेचनाचा संबंध येऊ देत नाहीत, असा वा.लं.च्या विद्यार्थ्यांचा गैरसमज आहे. हा गैरसमज दूर व्हावा आणि त्यांच्या अभ्यासाचा चौरसपणा नीट समजावा, यासाठी म्हणून हा प्रपंच केला आहे. सोपे लिहिणारा माणूस अगर इतरांच्या भूमिकांची खंडन-मंडनपर चर्चा न करणारा माणूस हासुद्धा चौरस अभ्यासू असू शकतो, हे मुद्दाम सांगण्याची गरज वाटावी इतके वा.लं.च्या 'वाङ्मयीनते 'बाबत गैरसमज आहेत. काहीजण व्याकरण त्यांचा प्रांत नव्हे असे मानतात. काहीजण महानुभाव वाङ्मय त्यांची कक्षा नव्हे, असे मानतात. माझ्या माहितीप्रमाणे वा.लं.च्या आकलनाला अनेकविध बाजूंचा चौरसपणा आहे. त्यांच्या मूल्यमापनाची गती माहिमभट्टापासून शंकर पाटलांच्यापर्यंत व ज्ञानेश्वरांपासून ते विंदा करंदीकरांपर्यंत अकुंठित व अप्रतिहत आहे, हेही वा.लं.चे एक विलोभनीय वैशिष्टय म्हणावे लागेल.

 वा.लं.ची वाङ्मयसमीक्षेतील भूमिका कोणती १ खरे म्हणजे याबाबत वाद होऊ नये. कलेचे जग हे स्वायत्त, स्वयंपूर्ण जग आहे ही गोष्ट त्यांनी पुनःपुन्हा सांगितलेली आहे. ललित वाङ्मयाच्या मूल्यमापनात अवाङ्मयीन बाबींची लुडबूड असू नये असे ते सतत सांगत असतात. वाङ्मयाकडून नीतिबोधाची, उद्बोधनाची, समाजोन्नतीची अपेक्षा करण्यात वाचक हा वाङ्मयाकडे केवळ एक साधन म्हणून पाहत आहे. पण ललित वाङ्मयकृती ही केवळ साधन नव्हे, ती साध्य आहे. बोधवादाच्या चौकटी कलेतील जिवंतपणाला मारक ठरतात असे त्यांचे म्हणणे आहे. वा.ल. एखादी गोष्ट एक वेळ सांगून थांबणारे लेखक नव्हत. या बाबीचा पुनरुच्चार त्यांच्या लिखाणात अक्षरशः शेकडो वेळा येतो. इतके म्हटल्यानंतर ते कलावादी आहेत हे सांगण्याची गरज पुन्हा पडू नये, पण

ती पडते. काही दिवसांपूर्वी 'आलोचने'च्या परीक्षणकारांनी त्यांची समीक्षा जीवनवादाच्या खुंटयाभोवती फिरते आहे' असा आक्षेप घेतलेला होता. वा.ल. हे कलावादी असूनसुद्धा ते जीवनवादी असावेत असा दाट समज 'आलोचने 'च्या परीक्षणकाराचा काय म्हणून व्हावा १ हे होण्यास काही कारणे आहेत. तीही आपण समजून घेतली पाहिजेत.
 कला ही कलेसाठी आहे की जीवनासाठी, या वादाला खरे महत्त्व युरोपात पुनरुज्जीवनानंतर जी मूल्ये वाढली त्यामुळे आले. ही मूल्ये एकीकडे लोकशाहीचा पुरस्कार करीत होती, आणि दुसरीकडे व्यक्तिस्वातंत्र्याचा, व्यक्तीच्या महात्मतेचा जयजयकार करीत होती. दीर्घकाळ युरोपचे जीवन चर्चच्या सर्वकष बंधनात जखडले गेलेले होते, त्याला नुकतीच वाट फुटू लागली होती. कला ही कलेसाठी आहे या भूमिकेचा मुळात अर्थ ती धर्मदासी नव्हे इतकाच होता. कलावंताने कशाचे चित्रण करावे, कशाचा पुरस्कार करावा याबाबत इतर कुणी त्याला मार्गदर्शन करू नये, कलावंताला त्याच्या आत्माभिव्यक्तीचे पूर्ण स्वातंत्र्य असले पाहिजे या भूमिकेतून 'कलेसाठी कला 'वादाचा उदय झाला. रोमँटिसिझमच्या चळवळीमुळे ही भूमिका अधिकच बलवान झाली. कलावंत सृष्टीतील सौंदर्याचा आस्वादक असतो व कलेतील सौंदर्याचा निर्माता असतो, यापलीकडे त्याचा जगाशी संबंध काय ? मला जर तारे आणि वारे यांत रमावेसे वाटत असेल, तर मी कुठे रमावे हे सांगण्याचा इतर कुणाला अधिकार काय- हा मुद्दा पुनःपुन्हा मांडला जाऊ लागला. पुढच्या काळात जर्मन तत्त्वज्ञानाच्या प्रभावामुळे 'उपयोगशून्यता' हे सौंदर्याचे फारच महत्त्वाचे लक्षण समजले जाऊ लागले. या साऱ्या पार्श्वभूमीतून कला ही कलेसाठी आहे या वादाकडे पाहिले पाहिजे. जवळजवळ याच काळात क्रमाने जनतेच्या चळवळी वाढत होत्या. धर्मविरोधी भावना वाढत होती. आपणाला नको असणाऱ्या बंधनाविरुद्ध चीड निर्माण करण्याचे कार्य विनोद मोठ्या प्रमाणात करीत होता. विडंबने, उपरोध व उपहास यांचे कामच हे होते. आपल्याला हव्या असणाऱ्या घटनांचा पुरस्कारही हे वाङ्मय करीत होते. लोकशाहीत प्रचार-प्रसार व एखादी भूमिका जनतेला पटवून देणे या भूमिकेला फार मोठे महत्त्व होते. या प्रक्रियेत विनोदी, उपरोधपटू मोलियरबरोबर गंभीर व्हिक्टर हयूगो हाही एक महत्त्वाचा भाग होता. आणि म्हणून वाङ्मयाने समाजजागृती केली पाहिजे, सामाजिक प्रश्न सोडविले पाहिजेत, जीवनाचे यथार्थ चित्र लोकांच्यासमोर धरले पाहिजे अशी मागणीही तितक्याच जोरात पुढे येत होती. आज या दोन्ही बाबींच्याकडे आपण थोडे तटस्थतेने पाहू शकतो.

 असे पाहत असताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात येते ती म्हणजे, कलावादाच्या नावाखाली काहीजण कलेला करमणूक आणि मनोरंजन याचे साधन बनवू पाहत होते. शेवटी जीवनाला प्रगत करण्याचे साधन म्हटले तरी काय, अगर समाजाला रमविण्याचे साधन म्हटले तरी काय, ललित वाङ्मयाचा आणि एकूण कलाकृतीचा हा साधन म्हणूनच विचार झाला. वा.ल. स्वतः कला ही कलेसाठी आहे असे मानत असले, तरी ती समाजाच्या करमणुकासाठी अगर मनोरंजनासाठी आहे हे त्यांना कधीच पटणारे नाही. कलेचे

कार्य उच्च, सात्त्विक आनंद देण्याचे आहे हे म्हणून झाल्यानंतर जर आपण अतृप्त वासना पूर्ण करण्याच्या, जीवनाच्या कंटाळवाणेपणातून विरंगुळा देण्याच्या व वाचकांची उत्कंठा सतत वाढविण्याच्या कार्यासाठी कलेने काय करावे याचाच विचार करणार असू, तर मग या सगळ्या ठिकाणी 'आनंद' हा शब्दच 'मनोरंजन' या अर्थाचा होऊन जातो. असे होणे वा.लं.ना मान्य नाही. आणि म्हणून जीवनाच्या अवलोकनावर, निरीक्षणावर भर देणारी, पण जीवनाच्या आकलनाबद्दल जीवनाच्या अंतःप्रवाहाच्या संदर्भात एखाद्या घटनेची संगती व स्थान पाहण्याबद्दल मूक असणारी वाङ्मयीन दृष्टी त्यांना कधीच पटू शकणार नाही. कलेचा उगम जीवनातून होतो ही गोष्ट फडके यांनाही अमान्य नव्हती. कलावंताला जीवनाचे मार्मिक अवलोकन करावे लागते हे तेही सांगत. पण हे सगळे अवलोकन करायचे कशासाठी १ जीवनातील वास्तवाचा हुबेहूब भास निर्माण करून वाचकांची मने जिंकावी, त्यांना कल्पनेच्या सृष्टीत नेऊन सोडावे व त्यांना विरंगुळा द्यावा यासाठी हा उद्योग असेल, तर या कलावादाशी वा.लं.चे पटणे कधी शक्य नाही. प्रा. फडके अक्षर व अक्षय भावनांच्याविषयी खूपच बोलत असतात. जणू वाङ्मयात अक्षर भावना रंगविणारे वाङ्मय व विनाशी भावना रंगविणारे वाङ्मय असे दोन गट पडतात ! या विनाशी भावना आणावयाच्या कुटून ? भांडवलदाराचा द्वेष करणारा कामगार दाखवला तरी द्वेष ही भावना अक्षरच असणार. भावना नेहमी अक्षरच असतात, आणि त्या नेहमी मर्त्य घटनांतूनच प्रकट होत असतात. त्या प्रकट होणे महत्त्वाचे असते. त्या घटना महत्त्वाच्या नसतात. पण भावना ही अशी कोणती वस्तू आहे काय की जिचा स्वतंत्र विचार करता येईल ? मी राग रंगवतो या वाक्याला काही अर्थ आहे काय ? कारण प्रत्येकाचा राग निराळा असणार. तो राग येण्याची कारणे, रागाचे प्रसंग, रागावणारा माणूस, त्याला आलेला राग-- ही सारी वाङ्मयात एकजीव होऊन प्रकट झाली पाहिजेत. भावना काहीतरी वेगळी असते, 'काय ' सांगितले हे वेगळे असूनही कलेत महत्त्वाचे नसते, त्यापेक्षा 'कसे' सांगितले ही अगदीच वेगळी बाब महत्त्वाची असते- ही रंजनवाद्यांची द्वैती भूमिका वा.लं.ना कधीच मान्य नव्हती. म्हणून वा.ल. कलावादी असले तरी तंत्रवादी होऊ शकत नाहीत.
 फडके यांची भूमिका एका विशिष्ट पद्धतीने तंत्रवादी आहे, तर दुसऱ्या एका विशिष्ट पद्धतीने मढेकरांची भूमिकाही तंत्रवादीच आहे. ललित कलाकृतीत परिवर्तनशील अर्थाचे शब्द, अपरिवर्तनशील अर्थाचे शब्द अशी विभागणी प्रथम करायची, त्यानंतर एकेका शब्दामुळे सुसंगती कुठे आहे, विरोध कुठे आहे, समतोल कसा आहे हे नोंदवीत बसायचे व पूर्वसिद्ध ठरीव सौंदर्यतत्त्वांनी ही आकृती सुंदर कशी ठरते हे दाखवून द्यायचे, मात्र त्यातून कलावंत काय व्यक्त करू पाहतो या गोष्टीकडे कानाडोळा करायचा ही वाङ्मयदृष्टी वा.लं.ना तांत्रिकच वाटते. तशी तक्रार त्यांनी 'साहित्य आणि समीक्षे'च्या वेचाळीस-त्रेचाळिसाव्या पृष्ठांवर केली आहे. मढेकरांच्या वाङ्मय-विवेचनातील हा तंत्रवाद सामान्यत्वे लक्षात येणारा नाही. पण एकदा सौंदर्य वस्तुनिष्ठ मानल्यानंतर समीक्षेचे स्वरूप तंत्रवादी होणे भागच असते. निवेदन बाजूला सारून, कलावंताचा अनुभव काय हे नजरेआड करून माध्यमांच्या रचनेतून जी समीक्षा साकार होऊ पाहते, ती तांत्रिकच राहणार. वा.लं.चे जसे फडक्यांच्या तंत्रवादाशी जुळणारे नाही, तसे त्यांचे मर्टेकरांच्या तंत्रवादाशीही जुळणारे नाही. कारण मुळात कोणत्याच तंत्रवादाशी त्यांचे मन जुळू शकणारे नाही. मला वाटते, मराठी टीकाकारांत वा.लं.चा हा एक लक्षणीय विशेष आहे.
 ललित वाङ्मयकृतीचे कार्य, तिचे प्रयोजन- माध्यमामधून एक अनुभव साक्षात करणे हे असते. जीवनाचा व्यवहार अनुभवांच्यावर विधाने आधारून अनुभवांचे स्पष्टीकरण करीत किंवा या विधानांची संगती जोडीत चाललेला असतो. ललित वाङ्मय या सर्वसामान्य व्यवहारापेक्षा थोडे निराळे असते. ते अनुभवच साक्षात करीत असते. हा अनुभव साक्षात करणे हे ललित वाङ्मयात भाषेचे काम असते. या अनुभवाचा जिवंतपणा, त्याचे अनेकपदरी स्वरूप, त्याच्या ठिकाणी असणारे अनन्यसाधारणत्व, अनेकसंदर्भसूचकत्व जसेच्या तसे सांभाळण्याचे काम भाषेने केले पाहिजे. हा मुद्दा वा.लं.च्या एकूण विवेचनातील मध्यवर्ती मुद्दा आहे. ललित वाङ्मयातून अभिव्यक्त होणारा हा अनुभव सलग असतो, एकजीव असतो, उत्कट असतो व मूल्यवान असतो, ही भूमिका एकदा घेतल्यानंतर जीवनाचा संदर्भ टाळता येणे कठीणच होऊन जाते. कारण ललित वाङ्मय जो अनुभव साक्षात करील, तो जीवनाच्या कक्षेतीलच असणार. त्या अनुभवाच्या ठिकाणी जे अनेकसंदर्भसूचकत्व येणार, ते पुन्हा एकूण जीवनाच्या प्रवाहात या अनुभवाचे स्थान निश्चित करतानाच येणार. वा.लं.नीच या बाबत आर्थर कोइस्टर एके ठिकाणी उद्धत केला आहे. ते म्हणतात, " तेव्हा कादंबरी म्हटली म्हणजे तिने केवळ एखाद्या जीवनावंडाची वास्तव पुनर्निर्मिती करून भागत नाही. तर त्या जीवनखंडाचे एकूण जीवनप्रवाहातील स्थान तिने निश्चित केले पाहिजे." हे असे होते याचे कारण अनुभवाच्या जिवंतपणावर वा.लं.ची श्रद्धा आहे. शेवटी अनुभवाचा सलगपणा आणि जिवंतपणा हा पाया गृहीत धरणारा टीकाकार ललित वाङ्मयात अभिव्यक्त झालेल्या अनुभवाची अपरिहार्यता व दर्शनाची समर्थनीयता पाहणार. वाङ्मयात काहीतरी पटत जात असते, निदान पटल्यासारखे वाटत असते- या वा.लं.च्या म्हणण्याचा हाच अर्थ. जीवनाच्या संदर्भात कलाकृतीकडे पाहणे, कलाकृतीकड़न जीवनाच्या आकलन-अवलोकनाची, त्यावरील निरूपणाची, हे सारे साकार झालेल्या 'सलग अनुभवा'त पाहण्याची वा.लं.ना होस वाटते ती यामुळेच. हा जीवनाचा संदर्भ टाळण्याचा एकच मार्ग असतो व ता म्हणजे तंत्रवादी होणे. वा.ल. तंत्रवादी नाहीत, म्हणून त्यांच्या समीक्षेला जीवनाचा संदर्भ टाळता येणे शक्य नाही.
 म्हणूनच वा. ल. कुलकर्णी नाविन्याचा केवळ नावीन्य म्हणून पुरस्कार करू शकत नाहीत. मनोविश्लेषणाचे प्रयोग करू इच्छिणाऱ्या 'रात्रीचा दिवस 'सारख्या कादंबरीत ते रमू शकत नाहीत. नवकाव्याच्या सत्काराला ते उत्सुक होते याचे कारण नव्या प्रतिमा नव्हेत, तिरकसपणा नव्हे अगर दुर्बोधपणाही नव्हे. पंचेचाळीसपूर्वीचे वाङ्ममय रजंनाच्या चौकटीमुळे, बोधाच्या चौकटीमुळे किंवा संकेतांच्यामुळे नकली झाले, याबद्दल ठिकठिकाणी वा.लं.नी इपारा दिला आहे. नवकथा, नववाङ्ममय, नवकाव्य यांचे स्वागत वा.ल. यासाठी करतात की, या ठिकाणी आपण नकली संकेतापासून दूर जाऊन पुन्हा एकवार साक्षात जीवनाचे अधिक निकट अवलोकन करू शकतो. तिथे आकलनही अधिक वास्तविक वाटू लागते. मानवी जीवनाच्या आकलनात, अवलोकनात अधिक खरेपणा भासू लागतो. याला ते वाङ्मयाचा विकास म्हणतात. पण नवकाव्यातही सांकेतिकता वाढू लागली, आपल्या वेगळेपणाचे प्रदर्शन करण्याची, विकृतीत मुद्दाम रमण्याची, अनावश्यक मनोविश्लेपणाची वाङ्ममयाला सवय लागू लागली, म्हणजे वा.ल. इपारा देतात. नवकथाकारांना वा.लं.चे मालवणचे भाषण बरेच झोंबले. खरे म्हणजे ते झोंबण्याचे कारण नव्हते. कारण नवकथेचे नवीन म्हणून स्वागत वा.लं.नी कधी केलेच नाही. प्रत्येक नाविन्याचे केवळ नावीन्य म्हणून कोडकौतुक व म्हणून समर्थन, ही त्यांची वाङ्ममयीन भूमिका नव्हे. या विशिष्ट कारणासाठीच मर्टेकरांच्या आत्मनिष्ठेच्या मुद्दयाच्या वा.ल. फारसे आहारी गेले नाहीत. ललित वाङ्ममय आत्मनिष्ट असलेच पाहिजे, हे विधान स्थूलमानाने त्यांनाही पटते. पण या विधानाला मर्यादा आहेत. कारण वाङ्ममयाच्या वेगवेगळ्या प्रकारांत आत्मनिष्ठेचे स्वरूप वेगवेगळे असणार ही एक गोष्ट. एखाद्याचा अनुभवच कोता असेल. तो कोतेपणा वाङ्ममयीन मोठेपणाला बाधणारच ही दुसरी गोष्ट. आणि तिसरी गोष्ट म्हणजे, शेवटी कलावंताचा अनुभव प्रामाणिक आहे की नाही हे आपण कसे ठरविणार ? त्याच्या ललित कृतीच्या मागे जाण्याची आपणाजवळ कोणतीच सोय उपलब्ध नसते. वाङ्मयकृती जो अनुभव व्यक्त करते, तो सलग आणि स्वयंपूर्ण आहे की नाही इतकेच आपण पाहू शकतो. यापुढे जाऊन काहूर आधी की डोळ्यांत जमणारे पाणी आधी ही चर्चा करू लागणे म्हणजे प्रत्येक कवितेसाठी मानसशास्त्रीय कसोट्यांचा वापर करू लागणे होय. मढेकरांच्या विवेचनातील हा धोका वा.लं.नी ओळखला. कारण अशा रीतीने चर्चा करणे म्हणजे पुन्हा तंत्रवाद्यांच्या तथाकथित संभवनीयतेच्या कसोटीला जागा करून देणे. वाङ्ममयात संभवनीयता असते हे खरे, पण तिचा पुरावा तार्किक अगर मानसशास्त्रीय नसतो. वा.ल. हे जीवनवादी राहिले असा भास होतो. कारण अनन्यसाधारण जिवंत अनुभवाची संगत सोडून ते तंत्रवाद्याच्या जवळ सरकण्यास तयार नाहीत.

तरीही वा.ल. आहेत कलावादीच. कारण जीवनवादी समीक्षा कलेला आजच्या जीवनांच्या गरजांच्यासाठी वापरू इच्छिते. स्वतःला जीवनवादी म्हणविणारे विचारवंत कलावंताला आदेशच देत असतात; तुम्ही कामगारांच्या बाजूने, शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहिले पाहिजे; तुम्ही मानवतावादी असले पाहिजे; माणसाची आशा वाढली पाहिजे; नीतीचा उपदेश केला पाहिजे; मंगलाचा पुरस्कार केला पाहिजे- या बाबी वा.लं.ना जमणाऱ्या नाहीत. जीवनाचे मार्गदर्शन करणाऱ्या कोणत्याही शास्त्राचे महत्त्व वा.ल. नाकारणार नाहीत. पण कलेच्या स्वायत्त क्षेत्रात यांपैकी कोणत्याही शास्त्राचे हुकूम मूल्यमापनासाठी ते स्विकारण्यास तयार नाहीत. जीवनवाद्यांचा एक आवडता सिद्धान्त वाङ्ममय व जीवन याच्या संबंधाचा आहे. ललित वाङ्ममयात समकालीन जीवनाचे प्रतिबिंब पडते इतकेच म्हणून जीवनवादी थांबत नाहीत. ज्या प्रमाणात हे प्रतिबिंब सर्वागीण असल, त्या प्रमाणात ते त्या कलाकृतीचे मोठेपण सांगू लागतात; कलावंताच्या व्यक्तिनिष्ठ प्रतिभाधर्माच्यापेक्षा सामाजिक वातावरणाचा एक परिपाक म्हणून ते कलेकडे पाहू लागतात. काळ बदलला की त्या काळाचे चित्रण करणारी कलाही मागे पडते, असे ते सांगू लागतात. त्याच्या दृष्टीने गुप्तकाळ इतिहासजमा होताच 'शाकुंतल' इतिहासजमा झाले पाहिजे, किंवा गुप्तकालीन जीवनाच्या माहितीचा संग्रह 'शाकुंतला'त आहे, म्हणून ते मोठे ठरल पाहिजे. काहीजण मग कण्याच्या उदार मानवतावादाचा दाखला देऊन 'शाकुंतला'चे माठयण सांगू लागतात, उरलेले काहीजण दुष्यंताच्या वेजबाबदारपणावर पांवरूण घालून राजेशाहीचे समर्थन करण्यासाठी कालिदासाने दुर्वासांचा शाप आणला हा 'शाकुंतला'चा दाप मानतात. जीवनवादी समीक्षा ही अशी असते. तिला वाङ्मयातील काही गृहीते मुळा मान्यच नसतात. कवी हे असत्याला सत्य भासविणारे थापाडे असू नयेत, यावर त्यांचा कटाक्ष असतो. यापैकी वा.लं.च्यामध्ये काहीच नाही. म्हणून वा.ल. जीवनवादी टीकाकार नाहीत; ते कलावादीच आहेत.

 पण कलावादी समीक्षा तंत्रवादी, रंजनवादी असलीच पाहिजे असे मानण्याचे कारण नाही. त्याप्रमाणेच जीवनवादी समीक्षा बोधवादी, उपयोगवादी असलाच पाहिज असहा मानण्याचे कारण नाही. एका बाजूने कलेला कारागिरीप्रधान करमणूक करणे अगर दुसऱ्या बाजूने कलेला सांकेतिक, भ्रष्ट, आक्रस्ताळी प्रचारसाधना बनविणे अपरिहार्य नाही. ललित वाङ्मयात सलग, स्वयंपूर्ण, जिवंत, उत्कट असा अनुभव असतो व तो सर्व चैतन्यानिशी प्रकट झालेला असतो हे जबाबदार कलावादी समीक्षकाने मान्य केलेच पाहिजे. जीवनवाद्यांनीही ही गोष्ट मान्य केली पाहिजे. जबाबदार जीवनवादी समीक्षक ही बाब मान्य करतातच. हे मान्य केल्यानंतर कलावादी व जीवनवादी यांच्यात नेमका फरक कोण्या ठिकाणी उरतो ? माझ्या मते तो एका महत्त्वाच्या ठिकाणी शिल्लकच राहतो. आणि ते म्हणजे कलात्मक अनुभवाला जे मूल्य निर्माण होते, त्या मूल्याचे स्वरूप कसे ठरविणार या ठिकाणी. इथे आपण आलो म्हणजे वा.ल. क्रमाने कलावादापासून कधी दूर तर जीवनवादापासून कधी दूर असे जाताना दिसतील. याचे कारण या प्रश्नाबाबत एक निश्चित उत्तर देताना त्यांची अडचण होत असावी हे आहे. आणि या अडचणीचे कारण वा.लं.ची समीक्षा हेच आहे.
 वा. ल. कुलकर्णी हे मराठी समीक्षेतील मार्मिक व रसिक आलोचनाकार आहेत. ही आलोचना करताना समीक्षेतील सत्याचे कण त्यांना सारखे जाणवत राहतात. त्यांची प्रामाणिक रसिकता या सत्यापासून त्यांना विचलित होऊ देत नाही. पण हे कण एकत्र साधून त्यांचे दर्शन बनविण्याचा काटेकोर प्रयत्न करणे वा.लं.च्या पिंडात नाही. कोणत्याही विधानात दडलेल्या अनेक गृहीतकृत्यांची बारकाईने चिरफाड करून पाहणे त्यांना आवडत नाही, बहुधा जमतही नसावे. त्यांच्याबद्दल ही माझी तक्रार फार जुनी आहे. पण खरे म्हणजे ही तक्रार नव्हेच. वा.लं.नी असे सुव्यवस्थित दर्शन निर्माण करावे ही आम्ही त्यांच्यावर लादलेली अपेक्षा आहे. येथे आलोचना आणि समीक्षा हे शब्द विशिष्ट अर्थाने वापरले आहेत. समीक्षेचे काम वाङ्ममयाकडून अपेक्षा कोणत्या याचे सर्वसामान्य विवेचन करण्याचे असते. आलोचना विशिष्ट ललितकृती अगर वाङ्ममयप्रकार याबाबतच्या आपल्या प्रतिक्रिया नोंदवीत असते. समीक्षेचा व आलोचनेचा हा व्यवहार परस्पराश्रयी व परस्परपूरक आहे. यांपैकी तार्किक काटेकोरपणा समीक्षेला लागतो. ही वा.लं.च्या विवेचनातील मूलतः दुबळी जागा आहे. एक उदाहरण म्हणून आपण साध्य-साधनाचा मुद्दा पाहू या.
 वा.लं.च्या मते कलाकृती ही साधन नसून साध्य असते. लगेच एक प्रश्न निर्माण होतो. कलाकृतीचे काम अनुभव साक्षात करणे व तो रसिकापर्यंत नेऊन पोहचविणे हेच आहे ना ? हे जर असेल तर माध्यमाच्या जड रचनेला कलाकृती म्हणावे लागेल आणि ती कलावंताचा अनुभव वाचकापर्यंत नेऊन पोहचविण्याचे साधन होईल. जर आपण काळ आणि अवकाशात असणाऱ्या माध्यमाच्या आधारे मूर्त असणारा पण रसिकांच्या मनात साक्षात होणारा अनुभव हीच कलाकृती मानणार असू , तर मग कालकृती साध्य होईल; पण त्यानंतर कलानिर्मात्याची चर्चा ही कलामीमांसेत आनुषंगिक व अप्रस्तुत होईल. अजून एका पातळीवर साध्य-साधनाचा विचार करावा लागतो. तो म्हणजे काही साधने चटकन उपयोग सांगता येण्याजोगी असतात. उदाहरणार्थ, एखादे औषध. उपयोग-- अमुक रोगावर लागू पडणे हा. पण वैद्यकीय ज्ञानाचा उपयोग सांगणे त्या मानाने थोडे दूरचे असते. नीतीचा उपयोग सांगणे त्याहीपेक्षा दूरचे असते. एकूण मानवी जीवनात एकूण कलात्मक व्यवहार काहीच भर टाकीत नाहीत काय ? जर कोणतीही भर मानवी जीवनात कलात्मक व्यवहार टाकीतच नसेल, तर कलात्मक व्यवहाराच्या विनाशाने जीवनाची कोणतीही हानी संभवू नये. मग तो टिकविण्याची गरज भासू नये. कलात्मक व्यवहार जर माणसाच्या माणुसकीसाठी, तिच्या संगोपनासाठी आवश्यक वाटत असेल, तर मग त्याची कारणे सांगितली पाहिजेत, व कलात्मक व्यवहार हे मानवी जीवनाच्या अमुक गरजांचे साधन म्हटले पाहिजे. आणि एकदा कलात्मक व्यवहाराला साधन म्हटल्यावर प्रत्येक कलाकृती त्या संदर्भात थोडीफार साधन ठरणारच; त्याला इलाज नाही. कलाकृतीचा चटकन दिसणारा असा उपयोग नसतो हे म्हणणे निराळे, व कोणत्याच कलाकृतीचा कोणताच उपयोग नसतो हे म्हणणे निराळे. शेवटी माणसाला कलात्मक आस्वादाची भूक लागते ती तरी काय म्हणून ? तशी जर ती लागत नसती तर कलानिर्मिती व कलांचा आस्वाद हा अखंड व्यवहार माणसांच्या जातीत दिसलाच नसता. वा.लं.चा आवडता टीकाकार ऑस्बोर्न हा कलावादी आहे. पण कलावादी असूनसुद्धा कलाकृतींनी व्यक्तीची संवेदनक्षमता विकसित होते हे तो मानतोच. असे मानले म्हणजे लगेच एका मर्यादेत संवेदनाक्षमता विकसित करण्याचे कलाकृती या साधन होतात. पण या साऱ्या बाबी तर्काच्या चिमटीत नीट पकडून एक सुसंगत दर्शन निर्माण करणे हा वा.लं.चा पिंड नाही. वाङ्ममयावर प्रेम करणे, आपल्या प्रतिक्रिया नोंदवणे हाच त्यांचा पिंड आहे. श्रेष्ठ वाङ्ममयाच्या संपर्कात आपण सोंदर्यापेक्षा, कलारमकतेपेक्षा साक्षात जीवनालाच सामोरे असतो हे वा.लं.ना जाणवते. हे जाणवत असल्यामुळे जीवनाचा संदर्भ ते टाळू शकत नाहीत. आणि वाङ्ममयीन मूल्यमापन नैतिकतेवर, उपयोगितेवर आधारलले असू शकत नाही हेही तितकेच उत्कटतेने जाणवत असल्यामुळे, ते आपण कलावादी आहोत, मूल्यमापनात वाङ्ममयबाह्य मूल्य आणण्याची आपली तयारी नाही हे सांगितल्याशिवाय राहू शकत नाहीत.
 या आलोचनेच्या व्यवहारातच सहजगत्या वा.ल. अत्यंत महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करतात, यात त्यांचे मोठेपण आहे, डार्विनचा वाङ्ममयसमीक्षेवरचा परिणाम खूपच मोटा आहे. जे टिकण्यालायक असेल तेच टिकते, उरलेले जीवनाच्या संघर्षात नष्ट होते, ही भूमिका ललित वाङ्ममयाच्या प्रांतात उलटी होऊन आली आहे. ती म्हणजे जे-जे दीर्व काळ टिकून राहिले आहे, ते ते श्रेष्ठ व चांगले असलेच पाहिजे असे मानण्याचा मोह समीक्षकांना होतो. मग लोक अक्षरवाङ्मयाची वैशिष्टये हुडकून काढू लागतात. एकेकाळी वा.लं.नी हा मुद्दा गृहीत धरला होता. वाचक वर्तमानकालात ज्यावेळी वाङ्मय उचलून धरतो, त्यावेळी प्रेयस्चा, रजन, करमणुकीचा भाग त्यात अधिक असतो असे ते म्हणत. उलट बाजूने कालमुखाने हाच वाचक जेव्हा कौल देतो, तेव्हा श्रेयसचा भाग अधिक असतो असे वा.लं.ना वाटे. पण काळाच्या प्रवाहात सामान्य आणि निरुपद्रवीही टिकून राहते. तुकारामही टिकतो व गुरुचरित्रही टिकते हे आता वा.लं.ना जाणवू लागले आहे. एक दिवस काळाच्या ओघात चांगलेही लुप्त होते हेही त्यांना जाणवेल, आणि मग टिकणे हा मुद्दाच त्यांच्या विवेचनात वाङ्ममयसमीक्षेतील अप्रस्तुत मुद्दा म्हणून उल्लेखिला जाईल या गोष्टीची खात्री वाटते. चटकन वा.लं.ना एखादा विचार सुचतो. मर्नेकर कलांची वर्गवारी लावीत असताना संगीताला सर्वश्रेष्ठ मानतात. कारण संगीताचे माध्यम सूर हे एकाच इंद्रियाशी निगडित असणारे शुद्ध माध्यम आहे. पण माध्यमाची शुद्धता ही त्या सगळ्या कलाप्रकारातच असणार. करीमलाँचे माध्यम आणि आडगल्लीतील एखाद्या 'टरे हुसेनखाँ 'चे माध्यम, दोघांचेही माध्यम शुद्ध स्वर हेच असणार. मग एका कलाप्रकारातील सारेच कलावंत एकाच तोलामोलाचे समजायचे की काय ? हे जर हास्यास्पद असेल, तर मग माध्यमाच्या शुद्धतेपेक्षा कलेच्या श्रेष्ठतेचे गमक वेगळे असले पाहिजे हे गृहीत धरून वा.ल. विचारतात- संगीत शुद्ध असेल, पण म्हणून ते श्रेष्ट कसे मानायचे? नेहमीनेहमी आपण कला आणि चारित्र्य यांचा विचार करतो. श्रेष्ठ कलावंत चारित्र्यवान असलाच पाहिजे काय ? काहीजण 'हो' म्हणतात; इतर काही 'नाही' म्हणतात. श्रेष्ठ चारित्र्यवानांनी निर्माण केलेले वाङ्मय कलेच्या दृष्टीनेही श्रेष्ठ असेल काय ? पुन्हा याची 'हो', 'नाही' अशी दोन उत्तरे येतात. पण हे सारे विवेचन वाङ्मयसमीक्षेला गैरलागू नाही काय? जे जीवनात आपण मंगल म्हणू , ते वाङ्मयात कदाचित कंटाळवाणे सुद्धा होईल. समीक्षेने चारित्र्याचा विचार कलाकृतीच्या संदर्भातच करणे आवश्यक आहे. म्हणून जो जीवनाच्या आकलन-अवलोकनात प्रामाणिक असतो व कोणतीही तडजोड न करता अनुभवांची अभिव्यक्ती करतो, तो कलावंत चारित्र्यवान अशी वा.ल. व्याख्या करतात. कला आणि चारित्र्य यांविषयीच्या चर्चेत वा.लं.ची ही दिशा नुसती निराळी नाही, हीच समीक्षेला खरी प्रस्तुत दिशा आहे. असे छोटेछोटे शेकडो कण वा.लं.च्या टीकावाङ्मयात विखुरलेले असतात. या वाङ्मयीन सत्याच्या कणांचे मला अधिक आकर्षण आहे; त्यांना एकत्र सांधून त्यांचे सुसंगत दर्शन बनविणे वा.लं.ना जमो अगर न जमो. एक असाच वा.लं.चा चमकदार विचार नोंदवतो. ते म्हणतात : सुखात्मिकेचे आवाहन वरिष्ठ वर्गाला, सुशिक्षितांना अधिक असते. सुखात्मिका परिस्थितीत असते, ती व्यक्तीची नसते. ती संस्कृतिसंबद्ध असते. या संस्कृतीच्या कक्षेबाहेर तिचे आवाहन फारसे पोचू शकत नाही. शोकात्मिकेचे आवाहन त्या मानाने अधिक व्यापक व सार्वत्रिक असते. वा.लं.नी हा विचार शेवटापर्यंत ओढलेला नाही. वा.ल. म्हणतात ते खरे असेल, तर श्रेष्ठ वाङ्मय फक्त व्यथेने आर्द्र होऊनच जन्माला येऊ शकते. सुखात्मिकेला वाङ्मयीन श्रेष्ठता कधीच मिळू शकणार नाही.
 वा.लं.च्या अशा सुट्या विचारांतील अजून दोन महत्त्वपूर्ण बाबींच्याकडे लक्ष वळविल्याशिवाय मी पुढे जाऊ शकत नाही. त्यांतील एक महत्त्वाचा मुद्दा बालवाङ्मयातील आहे. बालवाङ्मय कसे असावे, कसे असते, त्याचे पुस्तक कसे छापावे यांबाबतचे विवेचन वा.लं.नी केव्हा तरी एकोणीसशेएकूणपन्नासपूर्वी केलेले आहे. त्यावेळी अजून करंदीकरांच्या अप्रतिम बालगीतांचा मराठीत उदय झालेला नव्हता. वा.ल. हे गोपीनाथ तळवलकरांप्रमाणे बालवाङ्मयाचे तज्ज्ञ म्हणून फार प्रसिद्ध नाहीत. पण मराठीत या विषयावरील इतके नेटके व नेमके लिखाण फारच क्वचित आढळेल. बालवाङ्मयाने नुकत्याच बोलू लागलेल्या मुलांच्या अभिरुचीचे संगोपन करून प्रौढ वाङ्मयाशीही सांधा जोडला पाहिजे; त्यातही एक स्वतंत्र प्रकारचा कल्पनाविलास असतो. कल्पनाविलासाने शिशूंच्या कल्पनाविलासाला वळण लावून फुलवले पाहिजे,-- असे अनेक महत्त्वाचे मुद्दे या लेखात एकत्र आहेत. मूळ म्हणजे चांगले बालवाङ्मय हे स्थूल असले तरी ललित वाङ्मय आहे आणि त्याचे शैक्षणिक मूल्य आहे. तेही मूल सज्जन करणे, नीतिमान करणे, राष्ट्रभक्त करणे या अर्थाने नव्हे, तर मूल अभिरुचिसंपन्न करणे, संवेदनक्षम करणे, त्याची भाषा व कल्पकता, भावना व वृत्ती संस्कारित करणे, सौंदर्यदृष्टी चोखंदळ करणे या दृष्टीने. वा.लं.नी या विषयावर खूप विस्ताराने लिहावे अशी माझी एक इच्छा आहे.
 वा.ल. सहजगत्या अत्यंत महत्त्वाचा प्रश्न कसा उपस्थित करतात याचे एक लक्षणीय उदाहरण म्हणून मी त्यांचा 'कलाभिव्यक्तीतील एक समस्या' हा लेख पाहतो. या लेखात ते विचारतात-- अन्नाची क्षुधा आणि लैंगिक क्षुधा या दोन्ही मानवी जीवनातील अत्यंत प्रबलतम क्षुधा आहेत. पण यांच्या तृप्तीचा अनुभव ललित वाङ्मयात साकार होत असताना क्वचितच दिसतो. माझ्या मते हे असे का व्हावे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. अतिशय साध्या दिसणाऱ्या मुद्दयांच्यापासून आपण सरळ कलामीमांसेच्या गाभ्यापर्यंत जाऊ शकतो. वा.ल. यांनी विचारलेले नाही पण आपण विचारू शकतो-कोणत्यातरी तृप्तीचा अनुभव कलेचा विषय कुठवर होऊ शकतो? समाधान वाङ्मयात व्यक्त होऊ शकेल, पण तृप्तीचा क्षण पकडता येईल काय ? वा.लं.नी ललित वाङ्मयात असे का होते, याची दोन उत्तरे दिली आहेत. पहिले उत्तर असे की, या दोन्ही क्षधा केवळ मानवी नाहीत, त्या सर्व प्राणिमात्रांना समान आहेत. या उत्तरावर माझे समाधान नाही; कारण दुःखही सर्व प्राणिमात्रांना समान आहे, भीती समान आहे. क्रौर्य आणि शत्रूवर त्वेषाने आघात करणे याही बाबी केवळ मानवी नाहीत. मानवी सृष्टीतील पुष्कळसा भाग प्राणिसृष्टीत निदान काही ठिकाणी सापडतोच. पण म्हणून त्या बाबी कलांचे विषय होत नाहीत असे नाही. त्यांचे दुसरे उत्तर असे आहे की, या दोन क्षुधांचा वैयक्तिकतेशी वाजवीपेक्षा अधिक घनिष्ट संबंध आहे. त्यांना जणू व्यक्तीच्यापेक्षा वेगळे अस्तित्वच नाही. पण हेही उत्तर मला समाधानकारक वाटत नाही. कारण क्षधेची तृप्ती ही जशी माणसाशी निगडित आहे, तशी लैंगिक तृप्तीप्रमाणे सारी वासनाच मानवी जीवनाशी निगडित आहे. पण वासनेच्या तृप्तीचे वर्णन वाङ्मयात क्वचित असले तरी तिच्या अतृप्तीचे वर्णन वाङ्मयात विपुल आहे. हे असे का ? याचे समाधानकारक उत्तर हे संभवते की, तुप्तीचा क्षण चित्रित करणे हे वाङ्मयाचे कार्य नाही. सुटा क्षण कधी कलाविषय होणारच नाही. जेव्हा 'क्षण' साऱ्या 'प्रवाहा'ला एक नवा अर्थ देतात, त्यावेळी दर्शनी क्षणाचे--पण वस्तुतः प्रवाहाचे-चित्रण आपण करीत असतो. क्षुधेच्या तृप्तीचे वर्णन अगर लैंगिक तृप्तीचे वर्णन एकूण भुकेच्या व्याकुळ अनुभवाच्या संदर्भात व वासनातृप्तीचे अतृप्तीच्या संदर्भात वर्णन करणे भाग असते. एक उत्तर हेही संभवते की, वासना आणि क्षुधा यांचे निर्भेळ चित्रण हे माणसाच्या माणुसकीचे चित्रण होणार नाही. ते त्याच्या पशुतेचे चित्रण होईल. कोणतेच उत्तर फारसे समाधानकारक नाही. पण आपण या उत्तरांच्या विचारापासून शेवटी कलेत असते काय व ती असते कशासाठी या प्रश्नापर्यंत जाऊ शकतो. म्हणून हा अनुत्तरित प्रश्न महत्त्वाचा आहे. विवेचनाच्या ओघात ते सहज विचारतात- हास्यसुद्धा कलेच्या पातळीवर जाणे इतके कठीण का असावे ? माझ्या मते हा प्रश्न तर अजून मराटीत कुणी विचारलाच नव्हता. आम्ही हास्य म्हणजे काय हा प्रश्न विचारतो व त्याचे औचित्यविसंगती, अपेक्षाभंग असे काहीतरी तकलादू उत्तर देतो. जण केळीच्या सालीवरून पाय घसरून पडणे ही औचित्यविसंगती आहे, आणि मोटरखाली येणे हे औचित्य आहे ! कानात हळूच एक काडी घातली म्हणजे विनोद होतो, पण कान कापल्यावर होत नाही ! औचित्यविसंगती विनोदाप्रमाणे दुःखालाही जन्म देते. हानीचे स्वरूप गंभीर की तकलादू, इतकाच प्रश्न महत्त्वाचा असतो. जेव्हा म्हातारी बाई नटते व हास्यास्पद होते, तेथेही औचित्यविसंगती असते; आणि जेव्हा एखाद्या बाईचे पाऊल वाकडे पडते, तिथेही औचित्यविसंगती होते. औचित्यविसंगती हे हास्याचे मूलभूत कारण नव्हे. पण खरा प्रश्न यापेक्षा निराळा आहे. तो असा की, विनोद प्रसंगप्रधान असेल, शब्दनिष्ठ असेल, स्वभावनिष्ठ असेल, तो खदखदा हसवणारा असेल, स्मित फुलविणारा असेल, अगर अस्वस्थ करणारा असेल, विषण्ण करणारा असेल. लोक हसले की आम्ही विनोद जमला असे म्हणतो. लोक रडले म्हणजे करुणरस जमला असे मात्र म्हणत नाही. मग प्रश्न उत्पन्न होतो : विनोद जमणे निराळे, कलेच्या पातळीवर जाणे निराळे. हास्य कलेच्या पातळीवर जाणे फार कठीण आहे, आणि ते गेले असे केव्हा म्हणायचे याचे उत्तरही तितकेच कठीण आहे. पण वा.लं.नी दोन्ही प्रश्न विचारले आहेत. अतिशय महत्त्वाचे, मौलिक आणि मार्मिक प्रश्न उपस्थित करणे हे त्यांच्या समीक्षेचे मुख्य काम आहे. संपूर्ण, सुसंगत दर्शनाची त्यांच्याकडून अपेक्षा करणे हे मूळातच चूक; कारण त्यासाठी लागणारा निर्विकार जडपणा वा.लं.च्या पिंडात बसणार नाही.
 मार्मिकपणा हेच त्यांचे खरे वैशिष्टय, आणि अप्रतिह रसिकता हे, मला वाटते, मराठी टीकाकारांत एकमेव त्यांचेच वैशिष्टय. जे लोक जुन्याच मराठी वाङ्मयात गढलेले असतात, त्यांना अठराशेअठरानंतरच्या वाङ्मयाचा आस्वाद घेणेच जमत नाही. जे अठराशेअठरानंतर वावरत असतात, त्यांना जुन्या वाङ्मयाकडे जाणे मनातून आवडत नाही. फार काय, जे टीकाकार केशवसुत, बालकवी, गडकरी, हरिभाऊ, फडके, खांडेकर यांच्या युगात रमले त्यांना एकोणीसशेपंचेचाळीसनंतरच्या वाङ्मयात रस घेणे जमत नाही. वा.लं.ची रसिकता या दृष्टीने अप्रतिहत आहे. वाळिंवे आणि क्षीरसागर यांचा नव्या वाङ्मयाशी संबंध एकदा नजरेसमोर आणला म्हणजे ही गोष्ट अधिक महत्त्वाची भासू लागते. ही अप्रतिहत रसिकता असल्यामुळेच वा.ल. तुकारामाचे वाङ्मयीन परीक्षण करू शकले. प्राचीन मराठी वाङ्मयाचे फारसे वाङ्मयीन मूल्यामापन झालेलेच नाही. एक तर रस, अलंकाराच्या कसोट्या निर्जीव यांत्रिकपणे वापरून जुन्या कवींची चर्चा होते. जो कोणी कवी सापडेल तो रसाळ व प्रासादिक आहेच हे सांगण्याची घाई सुरू होते. ज्ञानेश्वरांच्या बाबतीतसुद्धा त्यांच्या कल्पनाविलासावर व विचार समजावून मांडण्याच्या पद्धतीवरच चर्चा होते. या कवींची अनुभव घेण्याची व व्यक्त करण्याची पद्धती, त्यांची कलात्मक श्रेष्ठता व त्यांच्या वाङ्मयीन मर्यादा कधी नीट तपासल्याच जात नाहीत. या दृष्टीने प्राचीन मराठी साहित्यापुरते शुद्ध वाङ्मयीन मूल्यमापन तुकारामाचे आहे, व ते अजून एकुलते एकच आहे. माहिमभट्ट व ज्ञानेश्वर अजून तसेच वाट पाहात उभे आहेत. (वाळिंबे यांचे ज्ञानेश्वरीवरील विवेचन माझ्या ध्यानात आहे, पण ते कोणकोणत्या इंद्रियांनी काय काय टिपले याची यादी देणारे; लाल म्हटले की दृक्संवेदनेचे सौंदर्य व गरम म्हटले की स्पर्शसंवेदनेचे सौंदर्य असे मानणारे पुन्हा यांत्रिक व भोळे विवेचनच आहे.)
 हीच गोष्ट पुढल्या वाङ्मयाविषयी म्हणता येईल. हरिभाऊंच्यावर मराठीत काही थोडे लिहिले गेले नाही, पण त्यांची सर्वश्रेष्ठ कलाकृती 'पण लक्षात कोण घेतो?' हिचे सर्वोत्कृष्ट वाङ्मयीन मूल्यमापन असेल तर ते पुन्हा वा.लं.चेच आहे. त्यांची रसिकता वाङ्मयाच्या सर्व प्रकारांत व सर्व कालखंडांत सारखीच अकुंटित प्रवास करणारी आहे. कारण ती अस्सल रसिकता आहे. म्हणून ती तुकारामाप्रमाणे मर्ढेकरांत रस घेऊ शकते आणि वामन मल्हारांप्रमाणे जी. ए. कुलकर्ण्यातही रस घेऊ शकते. श्रेष्ठ कलावंतांच्या वाङ्मयाचे मूल्यमापन तुलनेने थोडे सोपे असते. क्षीरसागर नेहमी टॉलस्टॉय, हार्डी व शरतचंद्रांवर लिहितात. तुलनेने हे काम समकालीन लेखकांवर लिहिण्यापेक्षा सोपे आहे. समकालीन लेखकांची सामर्थे व मर्यादा अचूक ओळखण्याची फार मोठी गरज असते. या ठिकाणी रसिकतेची कसोटी असते. वा.लं.च्या जवळ हे सामर्थ्य आहे. त्या दृष्टीने वा.लं.नी अरविंद गोखल्यांचे केलेले मूल्यमापन पाहण्याजोगे आहे. ते म्हणतात गोखल्यांचे सारे सामर्थ्य त्यांच्या ठिकाणी असलेल्या सहृदयत्वात, परमनप्रवेशाच्या शक्तीत आहे. परंतु आशय-अभिव्यक्तीच्या अभिन्नतेवर गोखले यांचा फारसा विश्वास नाही. गोखले कुशल निवेदक आहेत. पण निवेदनशक्तीवरच त्यांचा वाजवीपेक्षा जास्त भर आहे. जो हिणकसपणा चाळीसपूर्वीच्या वाङ्मयात होता, त्यापासून गोखले फारसे मुक्त नाहीत. गाडगीळ व माडगूळकर ह्यांची जशी कथेच्या विकासाला मदत झाली त्याप्रमाणे मराठी कथेच्या विकासाला गोखल्यांची फारशी मदत होऊ शकली नाही. वा.लं.चे हे विवेचन एकोणीसशेसत्तावन्न सालचे आहे. आज पासष्ठ साली हे विवेचन पूर्णपणे खरे वाटते. ज्यावेळी सत्तावन्न साली मी ते वाचले, त्या वेळी मला हा हल्ला गरजेपेक्षा कठोर वाटला. या काळाच्या सुमारास मराठी नवकथेचे निर्माते गंगाधर गाडगीळ यांनीही गोखले यांच्या कथेचे विवेचन केले आहे. पण नवकथेच्या या युगप्रवर्तकाला गोखल्यांचे सामर्थ व मर्यादा यांवर अचूक बोट ठेवणे तितके जमले नाही,- जितके वा.लं.ना जमले. आणि वा.लं.ची ही मते सत्तावन्नची नाहीत, ती निदान बावन्न-त्रेपन्नच्या पूर्वीपासूनची आहेत.
 या आलोचनेच्या व्यवहारात फार मोठा लवचिकपणा असावा लागतो. तो वा.लं.च्या जवळ आहे. 'भाऊबंदकी पेक्षा 'मानापमाना'चा व 'कक्षा'पेक्षा बबन प्रभूच्या 'फार्स'चा विचार भिन्नच हवा. 'सवाई माधवरावांचा मृत्यू' या नाटकातील मुख्य दोष कोणता ? केशवशास्त्री ! तो वा.लं.नी अचूक ओळखला आहे. ऐतिहासिक नाटकाला प्रत्यक्षाचा भक्कम आधार लागतोच, निदान मूलभूत महत्त्वाचे पात्र काल्पनिक असू नये. खाडिलकरांचे नाट्यतंत्र शेक्सपिअरकडून उचलले गेले आहे. शेक्सपिअर करुण व हास्य यांची मिश्रणे आलटून पालटून करून देतो. हीच प्रथा गडकऱ्यांची आहे, खाडिलकरांची आहे. पण खाडिलकरांचा विनोद रसभंगकारक वाटतो. खाडिलकरांना विनोद जमत नव्हता काय ? 'मानापमान' पाहिल्यावर आपण असे म्हणू शकणार नाही. खरी गोष्ट अशी आहे की, गंभीर नाटकातील विनोद उपहास व उपरोधप्रधान असला पाहिजे, तरच तो खुलतो आणि गांभीर्य गडद होते. शेक्सपिअर हेच करतो. हे खाडिलकरांना जमत नाही. ' भाऊबंदकी'त मात्र खाडिलकरांचा विनोद खुपत नाही. कारण तिथे मुख्य पात्रेही क्षुद्रच आहेत. खाडिलकरांचे विवेचन मराठीत आजवर काही कमी झालेले नाही. पण त्यांच्या एकएकट्या नाटकाचा इतका मार्मिक विचार केलेला फारच क्वचित आढळेल. 'कीचकवध' नाटकातील विचारनाट्य प्रभावी व्हायचे असेल तर भीम दुबळा असून चालणार नाही. तसा तो आहे, हा विचार वा.लं.नीच मांडला. कंकभट गोखले नसून गांधी आहे, सैरंध्री ही पीडित भारतमाता नसून खरी क्रांतिदेवता आहे, व भीम मात्र पोकळ आहे. प्रत्येक नाटकाचा प्रकार वेगळा असतो. खाडिलकरांच्या गंभीर विचारनाट्याला लागणाऱ्या कसोट्या 'मानापमाना'ला लागू शकणार नाहीत. 'मानापमान' 'मेलोड्रामा' म्हणूनच पाहायला पाहिजे. शक्यता व संभवनीयता, अपरिहार्यता व आवश्यकता यांची बंधने बाजूला सारूनच हे हलकेफुलके नाटक पाहिले पाहिजे, ही गोष्ट वा.लं.नीच प्रथम ओळखली. 'मानापमाना'च्या वाङ्मयीन प्रकृतीला साजेसे माझ्या पाहण्यातले पहिले मार्मिक परीक्षण पुन्हा हेच आहे.
 हा मार्मिकपणा (व ही रसिकता) पुष्कळदा पुनर्मूल्यमापन अपरिहार्य करून टाकतो. हेही काम वा.लं.नी बरेच यशस्वी केले आहे. वामन मल्हार जोश्यांचे मराठी वाङ्मयात स्थान, हरिभाऊंच्यापर्यंत आलेल्या मराठी कादंबरीचा वामन मल्हारांत झालेला विकास, इत्यादी तपासताना असे पुनर्मूल्यमापन झालेच आहे. नेहमीची पद्धत म्हणजे वामन मल्हारांना वैचारिक कादंबरीकार, तत्त्वज्ञ कादंबरीकार म्हणण्याची. शेवटी लांबरुंद चर्चा म्हणजे वाङ्मयीन सोंदर्य नव्हे. कलावंत म्हणून मराठी कादंबरीत वामन मल्हारांचे स्थान काय याचे उत्तर देण्याचा प्रयत्न प्रथम वा.लं.नी केला. आता ते विवेचन जवळपास सर्वमान्य झाले आहे. हे विवेचन करताना 'रागिणी'चे मोटेपण वा.लं.ना नाकारावे लागले. 'सुशीलेचा देव' आणि विशेषतः 'इंदू काळे व सरला भोळे' या वामन मल्हारांच्या सर्वश्रेष्ठ कलाकृती आहेत, या नव्या निर्णयावर त्यांना यावे लागले. हे करताना वामन मल्हारांची सामर्थ व उणीवा ते सतत दाखवत गेले आहेत. चिंतनशील पात्रांचे स्वभावरेग्खन व थोर कलावंताच्या ठिकाणी असणारी निरूपणात्मक प्रतिभा यांचे स्वरूप ते स्पष्ट करीत गेले आहेत. वामन मल्हार हे कलावंत म्हणून हरिभाऊंच्यापेक्षा मोठे कलावंत आहेत हा निर्णय देणारे पहिले समीक्षक वा.ल. (वामन मल्हार कलावंत म्हणून फडक्यांच्यापेक्षा मोठे आहेत हे मत प्रथम व्यक्त करणारे मर्टेकर.) असेच पुनर्मूल्यमापन त्यांना लघुकथेबाबतही करावे लागले आहे. मराठी लघुकथेच्या विकासक्रमात एकीकडे क्रमाने 'मासिक मनोरंजन' व हरिभाऊंची 'स्फुट गोष्ट' यांच्यातून वा.ल. मराठी लघुकथेची पायाभरणी पाहतात. पण हे करताना दिवाकर कृष्णांचे स्थान निश्चित केल्याशिवाय ते पुढे जात नाहीत. कला म्हणून लघुकथेच्या विकासाला हातभार यानंतर कुणी लावला १ वा.लं.नी य. गो. जोशी, चोरघडे व कुसुमावती देशपांडे ही नावे घेतली आहेत. तंत्र म्हणून फडके व खांडेकर यांनी मराठी लघुकथेला नवा आकर्षकपणा दिला असेल, तिला लोकप्रियही केले असेल, पण कला म्हणून लघुकथेच्या विकासात या मंडळींचे स्थान काय ? इथून पुढे ते नवकथेपर्यंत येतात. लघुकथेचे वा.लं.नी केलेले हे मूल्यमापन गंगाधर गाडगीळांच्या विवेचनापेक्षा अधिक निकोप आहे हे तरी मान्य केले पाहिजे किंवा तंत्राचा विकास हाही कलेचा एक विकास आहे, हा तंत्रवाद स्वीकारून वा.लं.चे विवेचन सुधारले पाहिजे. व्यक्तिशः मी बव्हंशी वा.लं.च्या मूल्यमापनाशीच सहमत आहे. (गाडगीळांचे मूल्यमापन ' खडक आणि पाणी'त आहे.)
 ही अस्सल रसिकता असली म्हणजे लिखाणात एक प्रकारचा द्रष्टेपणा आढळतो. तसा तो वा.लं.च्या ठिकाणी आहे. या दृष्टीने मी पुनःपुन्हा 'वाङ्मयातील वादस्थळां'चे वाचन केले आहे व माझा ग्रह दर वेळी अधिक पक्का झाला आहे. विशारदच्या परीक्षेसाठी अभ्यासक्रमातच हे पुस्तक समाविष्ट होते म्हणून तीनचार वेळा मला ते शिकवावेही लागले. या पुस्तकातीलं सारे लिखाण शेहेचाळीसापूर्वीचे आहे. जवळजवळ वा.लं.ची सर्व वाङ्मयीन भूमिका बीजरूपाने या पुस्तकात सापडतंच. पण त्यापेक्षा समकालीन वाङ्मयावरील वा.लं.चे विचार महत्त्वाचे आहेत. ते म्हणतात : सध्याची कादंबरी अवास्तव, तकलादू , अग्रस्तुत, अर्थशून्य वर्णनांनी भरलेली आहे. या कादंबरीतील ठाकठीकपणा व प्रमाणबद्धता, तिचा नकलीपणा व खोटेपणाच सिद्ध करतात. खोटी भावमयता व दिखाऊपणा आजच्या वाङ्मयात आहे. एकोणीसशेचाळीसच्या सुमाराचे वा.लं.चे हे विवेचन आज आपण प्रमाण मानतो. सहजगत्या ते म्हणून जातात,-- आजचे जीवनच जर खोटे, कृत्रिम आणि नकली असेल तर अस्सल कलाकृतीने वाचकांच्या अंतःकरणात या जीवनाविषयी उत्कट जुगुप्सा, तिटकारा निर्माण केला पाहिजे. जीवन खोटे म्हणून खोटेपणा आकर्षक करणे हे वाङ्मयाचे काम नव्हे. वा.लं.नी बोलून दाखविलेली अपेक्षा पंचेचाळीसनंतरच्या कथेने पूर्ण केलेली आहे. केव्हातरी त्रेचाळीसच्या सुमारास वा.ल. म्हणतात- 'आपल्याही काव्याचा प्रांत येथून पुढे दुर्बोधच होत जाणार आहे. नवी प्रतीके, उपमाने व संकेत, नव्या पद्धती, किंबहुना आजवर काव्यात मज्जाव असणारे शब्द यांनी हे काव्य गजबजून जाईल. या प्रचंड उद्योगामुळे कवितेच्या क्षेत्रात क्रांती होईल. आणि ही क्रांती कवितेला अधिक सजीव, सकस व खरी कलात्मक बनवील. पंचेचाळीसनंतरच्या मराठी कवितेने ही अपेक्षा पूर्ण केली आहे. ते सांगतात- 'लघुनिबंध साचेबंद होऊ लागला आहे. सर्वांना परिचित असलेली बाजू वाचकासमोर न मांडता अर्थशून्य का होईना, पण अपरिचित वाजू मांडण्याचा प्रयत्न आता सुरू आहे. गोष्टी, दृष्टान्त सांगून मुद्दा पटवण्यात हा लघुनिबंध गढलेला आहे. लघुनिबंधाचा हेतू सौंदर्यशोध आहे. हा साचा मोडल्याशिवाय या वाङ्मयप्रकाराचा विकास होणार नाही.' पुढे इरावती कर्वे आणि दुर्गा भागवत यांना हा साचा मोडून लघुनिबंधाचा विस्तार करावा लागला. हे द्रष्टेपण ज्योतिष सांगणाऱ्या, कुंडली मांडून भाकित सांगणाऱ्या फलज्योतिप्रकाराचे ज्योतिष नव्हे. भविष्यकालात काय घडणार आहे, हे सांगत बसण्याचा वा.लं.चा धंदाही नव्हे. या द्रष्टेपणाचे कारण निर्दोष रसिकता, समकालीन वाङ्मयावरील घट्ट पकड, व वाङ्मयव्यवहाराच्या प्रवाहाची उपजत जाणीव यात आहे. म्हणूनच आपल्या समकालीनांत वा.ल. मला नेहमी वेगळे वाटतात, व एकूण मराठी समीक्षेत ते युगप्रवर्तक वाटतात. वाङ्मयाची त्यांची समज इतकी पक्की आहे की, शब्दचित्र म्हणजे काय याचा पंचेचाळीसपूर्वी विचार करतानाही ते या वाङ्मयप्रकाराचा साचा स्पष्ट करीत बसत नाहीत. या वाङ्मयप्रकारात नवनिर्मितीची शक्यता तपासून पाहतात.  याचा अर्थ वा.लं.शी आमचे मतभेद नाहीत असे मात्र नव्हे. मी आरंभीच सांगितले आहे की असे मतभेद आहेत व ते टिकणारे आहेत. ते विषय मांडण्याच्या पद्धतीवर आहेत, भाषेवर आहेत, विचारांवर आहेत, विचार करण्याच्या पद्धतीवर आहेत, --किंबहुना त्यांच्या आलोचनेवरही मतभेद आहेतच. वा.लं.नी रस म्हणजे काय यावर एक टिपण लिहिले आहे. ललित वाङ्मयाची प्रकृती लक्षात घेता रस शब्दाचा काय अर्थ करावा याविषयीचे त्यांचे विचार या टिपणात आहेत. मला ही पद्धत मान्य नाही. रसविचाराला दोन हजार वर्षांची परंपरा आहे, तो विचार अपुरा वाटत असेल तर सरळ नाकारावा व वाङ्मयविचारांच्या विकासातील एक टप्पा म्हणून ऐतिहासिक दृष्टीने त्याकडे पाहावे. पण दोन हजार वर्षांची परंपरा सोडून, आज रस शब्द नव्या अर्थाने वापरणे सोयिस्कर व्हावे यासाठी आमच्या आजच्या भूमिका त्या शब्दावर लादल्या जाऊ नयेत, असे मला वाटते. जे रसाविषयी वाटते तेच कॅथार्सिसविषयी वाटते. त्या शब्दाने अॅरिस्टॉटलला काय म्हणावयाचे आहे इतकेच पाहावे. अॅरिस्टॉटलच्या भूमिकेचा असमाधानकारकपणा जाणवत असेल तर तो नोंदवावा. पण वाङ्मयाबाबतच्या आजच्या माझ्या समजुती ज्यात सोयिस्करपणे सामावतील असे अर्थ या शब्दांना देऊ नयेतदू त्यामुळे विचारांच्या विकासाचा अभ्यास करणे कठीण होते, असे मला वाटते. एखाद्या लेखकाच्या प्रकृतिधर्माचा शोध घेणे हे काम महत्त्वाचे आहे. त्या दृष्टीने 'गडकऱ्यांचा महान गुण व महान दोष' हा प्रयत्न मला मोलाचा वाटतो. पण त्या लेखातील निष्कर्ष मला पटत नाहीत. गडकऱ्यांची प्रतिभा, त्यांची वाङ्मयीन प्रकृती मूलतः फार्सिकल होती असे मला वाटत नाही. उलट गडकरी हे कल्पक, संवेदनाक्षम व गंभीर प्रकृतीचे लेखक होते असे मला वाटते. गडकरी-वाङ्मयात दोष आहेतच; पण त्यातील बहुतेकांचा उगम कोल्हटकरांचे शिष्य म्हणवून घेण्यात आहे, असे मला वाटते. वामन मल्हारांच्या 'इं काळे, सरला भोळे' या कादंबरीविषयी वा.ल. म्हणतात- ' या कादंबरीत नारायणराव पाटक आणि काशी ढवळे, विनायकराव व सरला भोळे यांच्याद्वारे ज्ञानजिज्ञासा विरुद्ध प्रेम, देशसेवा विरुद्ध संसार, हा झगडा दाखविण्यात वामनरावांना यश आले. पण इं काळे व विंदुमाधव म्हसकर यांच्याद्वारे कला विरुद्ध नीती हा प्रश्न रंगवण्यात त्यांना यश आले नाही. जोपर्यंत विंदुमाधव म्हसकर कलावंतांचा समर्थ प्रतिनिधी होऊ शकत नाही, तोपर्यंत त्याच्याद्वारे कला विरुद्ध नीती हा संघर्ष दाखविणे यशस्वी होणार नाही.' मला ही भूमिका पटली नाही. कारण त्या कादंबरीत मला प्रश्नाचे हे स्वरूप जाणवत नाही. सरला आणि काशी ढवळे यांच्या मानाने भाऊ काळे व बिंदुमाधव म्हसकर यांचे रेखाटन फिके आहे, हे मला मान्य आहे. पण विनायकरावांच्या जीवनात देशसेवा की संसार हा झगडा नाही. देशसेवा आणि संसार या दोन्हींवर त्यांची निष्ठा आहे. योग्य वेळी विनायकराव दोन्हींनाही आवश्यक ते महत्त्व देतच असतो. नारायणरावाच्या जीवनातसुद्धा ज्ञानजिज्ञासा विरुद्ध प्रेम असा खरा झगडा नाही. कारण या दोन बाबी सहकार्याने नांदू शकतात असे काशी ढवळेचे मत आहे. शेवटी नारायणरावाला हेच मत पटते. नसलेला झगडा आहे असे गृहीत धरण्यात आपण फार मोठी चूक केली, हा नारायणरावाचा वेळ निघून गेल्यानंतरचा पण शेवटचा निष्कर्ष आहे. इंदूच्या जीवनातील संघर्ष यापेक्षा निराळा आहे. तिने गाणे शिकावे याला कुणाचाच विरोध नाही. पण गायनमास्तराच्या सहवासात वेळ किती घालवावा, त्याच्याबरोबर एकान्तात किती वेळ थांबावे, गप्पा किती माराव्या, त्याच्याबरोबर सायंकाळी फिरावयास जावे काय-यांवर तक्रारी आहेत. इंदूला नुसते बिंदुमाधवाचे गाणेच आवडत नाही, त्याचे बोलणे मोहक वाटते, त्याचा सहवास हवाहवासा वाटतो. आपल्या या चमत्कारिक प्रश्नाला इंदू ' कलानीतिवाद' असे म्हणते. पण तो कलानीतिवाद नव्हे हे सौम्यपणे विनायकराव सुचवतोच. वा.लं.शी असणारे माझे मतभेद असे अजूनही मी पाचपंचवीस नोंदवू शकेन.
 पण हे मतभेद नोंदवल्यामुळे काही बाबी खोट्या ठरत नाहीत, त्या एक सत्य म्हणून शिल्लक राहतात. मराठीत कोणाही टीकाकारापेक्षा वा.लं.ची रसिकता अस्सल, निर्दोष व अप्रतिहत आहे हे एक असे सत्य आहे. १८१८ ते १८८५ हा प्रारंभाचा काळ सोडला तर १८८५ ते १९४५ व १९४५ ते आजतागायत हे मराठी वाङ्मयाचे स्थूल मानाने दोन मुख्य गट पडतात. यांपैकी पहिल्या गटाचे युगप्रवर्तक समीक्षक श्रीपाद कृष्ण आहेत, दुसऱ्या गटातील युगप्रवर्तक समीक्षक स्वतः वा.ल. आहेत. हे एक असेच दुसरे सत्य आहे. पहिल्या गटात वामन मल्हार जोशी हे व्यक्तिशः सर्वांत मोठे समीक्षक ठरतील. दुसऱ्या गटात मर्डेकर हे व्यक्तिशः सर्वांत मोठे ठरतील. पण समकालीन वाङ्मयाचे मूल्यमापन, त्याचा समकालीनांवर प्रभाव आणि मूल्यमापनाच्या पद्धती व परंपरा या संदर्भात येणारे युगप्रवर्तकत्व या वंदनीयांचे नव्हे; ते श्रीपाद कृष्णांचे युग आहे; केळकर, वामन मल्हारांचे नव्हे, हा अर्धा भाग पुन्हा वा.लं.नीच मांडला आहे. उरलेला अर्धा भाग मी मांडत आहे.
 एक शेवटचा विचार-हा लेख मी लिहीत असताना, वा.ल. अध्यक्ष झाले आहेत व त्यानिमित्त निघणाऱ्या विशेषांकासाठी तो मी लिहीत आहे, या घटनेचा या लेखावर किती परिणाम झाला असावा ? फारसा झाला नसावा असे वाटते. पण याबाबत खरा निर्णय मी कसा देणार ?

प्रतिष्ठान, नोव्हेंबर-डिसेंबर १९६५