पोशिंद्याची लोकशाही/स्वतंत्र भारताचे नैतिक दर्शन
बदलाचे वारे
भारताच्याच नव्हे, सर्व जगाच्या इतिहासात एक प्रचंड बदल घडून येतो आहे. समाजवादाचा जागतिक ऐतिहासिक पराभव झाला आहे. तिसऱ्या जगातील समाजवादाचे ताबूत घेऊन, हैदोस घालणारे नामोहरम झाले आणि श्रीमंत राष्ट्रांतही अर्थव्यवस्थेतून सरकारी हस्तक्षेप संपवण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली. अर्थक्षेत्रातली या घटना जितक्या महत्त्वाच्या तितक्याच महत्त्वाच्या घटना राजकीय क्षेत्रातही घडत आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर दोन महासत्तांचे युग आले. दोघांच्या टकरीत काही किरकोळ सत्तांचे मोठे फावले होते. समाजवादी महासत्ता कोसळली आणि काही उनाड सत्तांवर शिस्तीचा बडगा उगारला जात आहे. इराक, लिबिया, उत्तर कोरिया, इथियोपिया, हैती, रुआंडा ही ठळक उदाहरणे.
'शहामृगी' विश्व
या सगळ्या, उलथापालथ करणाऱ्या घटना घडल्या; तरी त्यांचा नेमका अर्थ काय याबद्दल स्पष्ट चित्र नाही. जी ती व्यक्ती किंवा संघटना, जो तो समाज आणि देश नवीन वाऱ्यापुढे थोडेसे झुकून, शक्यतो जुन्या पद्धतीनेच मार्गक्रमणा चालू ठेवण्याच्या प्रयत्नात आहेत. आर्थिक अरिष्टे आली, त्यामुळे अर्थव्यवस्थेत काही बदल अपरिहार्य झाले, बाकी सगळे काही पहिल्यासारखेच आहे अशा थाटात जग चालले आहे. शहामृगावर शत्रूचा हल्ला झाला म्हणजे तो वाळूत डोके खुपसून स्तब्ध उभा राहतो, असे म्हणतात. आपल्याला जग दिसले नाही म्हणजे जगालाही आपण दिसत नाही अशी त्याची धारणा. नवीन घटनांचा अर्थ काय, याकडे आपण दुर्लक्ष केले तर त्यांचा आपल्यावर काही परिणामच होणार नाही अशा 'शहामृगी' विश्वात वावरणे आहे.
एकेका घटनेचा नेमका अर्थ काय, हे तपशीलवार सांगण्याची ही वेळ नाही आणि जागाही नाही; पण जगातील उलथापालथींचे निष्कर्ष काय, हे थोडक्यात सारांशाने मांडले पाहिजे.
१ : अब्राहम लिंकनच्या काळापासून 'सर्व मानवप्राणी समान जन्माला आला आहे,' या फ्रेंच राज्यक्रांतीतील तत्त्वाला मान्यता मिळाली. विषमता निर्मूलनाच्या कार्यक्रमात 'माणसे समान आहेत,' म्हणजे एकसारखीच आहेत असे मानले गेले आणि माणसाकडे व्यक्ती म्हणून पाहण्याऐवजी समाजाच्या अनेक घटकांपैकी एक हे स्थान त्याला मिळाले. व्यक्ती हरपली, गर्दीत दडपली गेली. समानतेचे तत्त्व फ्रेंच राज्यक्रांतीच्या पहिल्या तत्त्वाचे शत्रू बनले. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व या फ्रेंच राज्यक्रांतीच्या तत्त्वत्रयीतील स्वातंत्र्य आणि समता यांच्या क्रमाची उलटापालट झाली. स्वातंत्र्यापेक्षा समता महत्त्वाची ठरली. ही ऐतिहासिक चूक आता सुधारली जाणार आहे. माणसे समान आहेत हे खरे; पण त्याचा अर्थ 'ती एका मुशीतली, एकसारखी बाहुली आहेत,' असे नव्हे. एका माणसासारखा हुबेहूब दुसरा कोणी असतच नाही; अगदी जुळेभाऊसुद्धा नाहीत. प्रत्येक मनुष्य त्याच्या स्थलकालात अनन्यसाधारण असतो. प्रत्येक व्यक्ती अनन्यसाधारण असते, म्हणून मनुष्यप्राणी समान असतो. व्यक्तीची अनन्यसाधारणता हा समानतेचा पाया आहे.
कशासाठी जगणे
२ : प्रत्येक अनन्यसाधारण व्यक्ती त्याच्या त्याच्या प्रकृतीप्रमाणे आपले जाणिवांचे आणि अनुभवांचे विश्व व्यापक करण्याच्या धडपडीत असते. आयुष्य विविधतेने संपन्न व्हावे, निवड करण्याची संधी क्षणाक्षणाला मिळावी, प्रत्येक निवडीच्या वेळी जास्तीत जास्त विकल्प हात जोडून हजर असावेत आणि ते विकल्पही विविध पठडीतले असावेत, यासाठी मनुष्यप्राण्याची धडपड चालू असते. माणसाचा शोध स्वातंत्र्याच्या कक्षा रुंदावण्याचा आहे; सुखाचा नाही, शांतीचा नाही, समाधानाचा नाही, सत्याचा नाही, शिवाचा नाही, सुंदराचा नाही, संपत्तीचा नाही, सत्तेचा नाही, दुःखीजनांच्या सेवेचा नाही आणि मोक्षाचाही नाही. वेगवेगळ्या व्यक्तींच्या स्वातंत्र्याच्या कक्षा रुंदावण्याचे हे वेगळे वेगळे प्रकार आहेत.
स्वार्थ हेच उद्दिष्ट
३ : अनन्यसाधारण व्यक्तीची चालायची वाट रुळलेली नाही, मार्गदर्शक कोणी नाही, त्याच्या प्रेरणा हाच त्याच्या हातातील दिवा. प्रमुख प्रेरणा अहंकाराची. एका बाजूला मी आणि दुसऱ्या बाजूला सारे जग, ही जाणीव मुळी त्याच्या अनन्यसाधारणपणाचा गाभा आहे. त्याचे उद्दिष्ट, स्वार्थ त्याला साधायचा आहे. कोणाला स्वार्थ पैशात दिसेल, कोणाला विद्येत, कोणाला शुद्ध आळशीपणे पडून राहण्यात. या व्यापक अर्थाने प्रत्येक व्यक्ती आपापला स्वार्थ साधण्याकरिता धडपडते. लक्षावधी- कोट्यवधी स्वार्थी व्यक्तींच्या धडपडीतून नकळत परमार्थ संपादिला जातो. शरीरातील एकेक पेशी तिच्या तिच्या स्वभावाप्रमाणे धडपडत असते. अशा धडपडीतूनच सबंध शरीराची एकात्मता बनते. स्वार्थ सत्य आहे, परमार्थ विपाक आहे.
व्यक्तीचा मंचप्रवेश
४: एक व्यक्ती आणि विश्व यांचे हे एकात्मकतेचे निसर्गसिद्ध नाते आहे. हे अध्यात्मात जितके खरे तितकेच अर्थव्यवस्थेत किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात. माणसाच्या अंतिम कल्याणाचा मार्ग दाखवणारे साधू, संत, अवतार, प्रेषित, बाबा, महाराज असत नाहीत. तसेच कोथिंबीर किती पिकवावी आणि आगगाडीची इंजिने किती बनवावीत याचा हिशेब मांडणारा कोणी 'नियोजन महात्मा'ही असत नाही. आर्थर क्लोसर यांचे शब्द वापरायचे तर या जगात 'कमीसारां'नाही स्थान नाही आणि योग्यांनाही नाही. योगी, कमीसार, बाकी सारे मध्यस्थ, अडते व्यक्ती आणि विश्व यांची एकात्मता बिघडवण्याचेच काम करतात आणि आपल्या सिद्धांतांच्या अतिरेकी हट्टापायी रक्ताचे पाट वाहवतात. अनन्यसाधारण व्यक्ती मंचावर येत आहे, 'मध्यस्थ महात्म्यां'ची उचलबांगडी होत आहे.
समाजव्यवस्थेचे फोल प्रयत्न
५ : व्यक्ती कितीही अनन्यसाधारण असली, तरी तिला समाजात राहावे लागते, साधने संपादन करावी लागतात, वस्तूंची आणि सेवांची देवघेव करावी लागते, देखरेखीसाठी विविध प्रकारची सत्तास्थाने आवश्यक असतात. सोईस्कर वाटतात; पण, सत्ता आली, की भ्रष्टाचार आला. कारण, सत्ता निगर्सविपरीत आहे. सत्तेशिवाय चालत नाही आणि सत्तेने सगळे काही बिघडते, हा मनुष्यजातीला पुरातन कालापासून पडलेला पेच आहे. सत्ता-भ्रष्टाचार, सत्तास्पर्धा हे सगळे टाळण्याकरिता इतिहासात अनेक प्रयोग झाले. माणसाची कामे जन्माच्या आधारानेच ठरावीत आणि त्यात प्रत्येकाने संतोष मानावा अशी व्यवस्था उभारण्याचा प्रयत्न झाला. समाजाला स्वतःच्या सामर्थ्याप्रमाणे देणारा आणि केवळ आपल्या गरजेपुरतेच घेणारा उदात्त समाजवादी माणूस तयार करण्याचेही प्रयत्न झाले. हातातील सत्ता, संपत्ती विश्वस्ताच्या निरिच्छेने हाताळली जावी अशा गांधीवादी नैतिक माणसाची कल्पना पुढे मांडण्यात आली; पण हे सगळे प्रयत्न फसले. माणसाची गुणवत्ता सुधारण्याचे महात्म्यांनी सांगितलेले मार्ग निसर्गाला रुचत नाहीत असे दिसते. श्रेष्ठत्व आणि गुणवत्ता म्हणजे काही एक ठराविक प्रकारची भूमिका हे निसर्गाला मान्य नाही. मनुष्य अनुभवसंपन्न आणि परिपूर्ण असावा. ठोकळेबाज पुरुषार्थाच्या कल्पना निसर्गाला मान्य नाहीत. सत्तेची दुष्टता टाळण्याचे गुणात्मक उपाय सारे फसले. सत्तेची दुष्टता संपवण्याचा एकच मार्ग म्हणजे सत्ताकेंद्राची विविधता आणि त्यांच्यातील स्पर्धा. सत्ताकेंद्र म्हणजे काही फक्त राजधानीतील केंद्र नाही. प्रत्येक माणूस आपापल्या जागी, आपापल्या काळी काही प्रमाणाततरी सत्ता गाजवतच असतो. कोणाचीही सत्ता निरंकुश नको, त्याला स्पर्धा पाहिजे, तरच दुष्टता आटोक्यात राहण्याची काही आशा.
स्पर्धा
६ : स्पर्धा ही जगातील चैतन्याचे रहस्य आहे. ती काही फक्त बलदंडांची टक्कर नाही. स्पर्धा हा प्रशिक्षणाचा सगळ्यांत प्रभावी आराखडा आहे. स्पर्धेत उतरल्याने स्पर्धा करण्याची शक्ती वाढते; जसे, पाण्यात उतरल्याने पोहता येते, मूल पडतापडता चालायला शिकते.
जोपासना दुर्बलांसाठी
७ : याउलट संरक्षणाने देणाऱ्याचे भले होत नाही, ना घेणाऱ्याचे. व्यक्तींच्या विविधतेत काही दुर्बल घटक असणारच. लहान मुले, मतिमंद, दुर्बल, अपंग हेदेखील समाजाचे घटकच आहेत. स्पर्धेशिवाय दुर्बलांच्या जोपासनेचे सूत्रही महत्त्वाचे आहे; पण जोपासणी अपंगपणा वाढवणारी, विकासाची इच्छा खुंटवणारी नको. हातपाय नसलेल्यांना जागतिक खेळांच्या स्पर्धेत भाग घेता येणार नाही; पण त्यांची त्यांची स्वतंत्र खेळांची स्पर्धा असू शकते. लंगडे आणि सुदृढ यांचे सगळ्यांचे मिळून एकत्रच खेळ झाले पाहिजेत, असा कोणी आग्रह धरला, तर ते कोणाच्याच भल्याचे नाही; ना सुदृढांच्या, ना अपंगांच्या.
व्यक्तिविकास हाच समाजविकास
८ : व्यक्तीच्या विकासाच्या धडपडीतून समाजाचा, राष्ट्राचा विकास होतो, विकास कोठे थटला असेल तर समजावे, व्यक्तीच्या विकासाच्या स्वातंत्र्यावर कोणीतरी कोठेतरी बंधन घातले आहे. विकास निसर्गसिद्ध आहे, गरिबी निसर्गविपरीत आहे. व्यक्ती आणि विश्वाच्या एकात्मतेला तडा देऊ पाहणाऱ्यांनी गरिबी तयार केली आहे. गरिबांच्या छातीवरून उठणे यासारखा परिणामकारक 'गरिबी हटाव' कार्यक्रम नाही.
शासन विकासातील आडकाठी
९ : शासन जितके अधिक तितका विकास कमी. फार फार तर कायदा, सुव्यवस्था इत्यादी गोष्टी शासनाने पाहाव्यात. अर्थकारण, शिक्षण, अध्यात्म, न्याय, प्रसार माध्यमे या क्षेत्रातील सत्तास्थाने स्वतंत्र आणि सार्वभौम असली पाहिजेत.
सगळ्या जगात जे खुलेपणाचे वारे वाहत आहे त्याचा अर्थ हा असा आहे. स्वराज्याची तहान सुराज्याने भागणार नाही, असे लोकमान्य म्हणाले. वर्तमान घटनांचा निष्कर्ष असा, की खरे स्वराज्य आपोआपच सुराज्य असते. 'सुराज्य' नाही, तेथे 'स्वराज्य' नाही असे निःशंकपणे समजावे. 'इंडिया-भारत' द्वैत तयार झाले, की गरिबीने ठाण मांडलेच म्हणून समजा.
'समाज'वाद्यांची टीका
स्वातंत्र्याच्या पाइकांची ही अशी भूमिका आहे. स्वातंत्र्य, स्पर्धा, खुली व्यवस्था असे शब्द वापरले, की व्यक्तीपेक्षा समाज महत्त्वाचा मानणाऱ्या विचारांच्या वेगवेगळ्या रंगछटा असलेल्या समाजवाद्यांचा व्यक्तिवाद्यांवर टीकेचा भडिमार सुरू होतो. तुमचा समानतेवर विश्वास नाही, तुम्ही विषमतावादी आहात, तुम्ही डार्विनवादी आहात, समर्थांनी तेवढे जगावे, दुर्बलांनी नष्ट व्हावे अशी तुमची धारणा आहे, तुम्ही अराजकवादी आहात, समाजात सत्तास्थाने म्हणून तुम्हाला नकोत, तुम्ही राष्ट्रवादी नाहीत, तुम्हाला स्वदेशाचा अभिमान नाही, असा आरोपांचा भडिमार होतो. या टीकांतील निरर्थकता दाखवणे महत्त्वाचे आहे.
स्वतंत्रतावादी भूमिका
स्वतंत्रतावादी व्यक्तीला केंद्रस्थानी मानतात. व्यक्तीची अनन्यसाधारणता पवित्र मानतात; पण याचा अर्थ, मनुष्यप्राण्यांत श्रेष्ठ-कनिष्ठता मानतात असे नाही. कोणी श्रेष्ठ नाही, कोणी कनिष्ठ नाही. जो तो अनन्यसाधारण आहे आणि ज्याच्या त्याच्या फूटपट्टीने श्रेष्ठ आहे. मनुष्यप्राणी समान आहे. त्याचे समानत्व त्याच्या अनन्यसाधारणपणात आहे. जन्मजात आळशी माणूससुद्धा कनिष्ठ नाही. स्वस्थ आरामात पडून राहावे, त्यामुळे, पोटाला थोडे कमी मिळाले तरी चालेल, संसार नासला तरी चालेल. इतक्या खंबीरपणे आळशी असलेला मनुष्यदेखील उद्योगी पुरुषसिंहापेक्षा कनिष्ठ नाही. त्याच्या वैशिष्ट्याचे पारितोषिक त्याच्या क्षेत्रातील चलनातच मिळणार, उद्योजकांच्या चलनात नाही, एवढाच काय तो फरक.
स्वतंत्रतावादी अराजक मानत नाहीत. सत्तास्थाने लागतात, उपयोगी असतात हे, दुर्दैवी का होईना, वास्तव आहे. सत्तेतील भ्रष्टता टाळण्याकरिता सत्तास्थाने बहुविध असावीत, अनेक असावीत, सार्वभौम असावीत ही मांडणी अराजकाची नाही, बहुराजकाची आहे.
डार्विनवादाचा आरोप असाच खोटा आहे. जगून राहण्याची धडपड विनाशकारीच असते हे खरे नाही. संघर्षात माणसाचे यच्चयावत ऊर्जास्रोत संपूर्णपणे पणाला लागतात. त्या स्पर्धासंघर्षात जे टिकणार नाहीत त्यांना 'जोपासना वर्गा'त जाता येईल. खुल्या स्पर्धेत कच्चे लिंबू म्हणून भाग घेण्याचा आग्रह त्यांना सोडावा लागेल किंवा वरच्या वर्गात बरोबरीला येण्याची क्षमता सिद्ध करावी लागेल.
'खुली व्यवस्था'वादी राष्ट्रवादी नाहीत, आंतरराष्ट्रवादी आहेत हा आरोपही चुकीचा आहे. व्यक्तीच्या विकासाच्या धडपडीत विविध प्रकारच्या संघटना उदयाला येतात, नष्टही होतात. कुटुंब, गाव, जाती, धर्म, राष्ट्र अशा चढत्या श्रेणीच्या संघटना उत्क्रांतीच्या प्रवाहात माणसाने तयार केल्या. या सगळ्या संघटनांचे आणि सामुदायिक जाणिवांचे अलग अलगपणे आणि एकत्र मोठे महत्त्व आहे. आजपर्यंत माणसाची वाहतुकीची, संचाराची, देवघेवीची साधने मर्यादित राहिली. त्यामुळे त्याचे सारे संपर्क भूगोलाने मर्यादित केले. तंत्रज्ञानाची प्रगती वाढेल, तासाभरात पृथ्वीप्रदक्षिणा करता येईल किंवा आपल्या जागी बसून, जगातील दुसऱ्या कोणत्याही माणसाशी बोलता येईल, तिला पाहता येईल, कदाचित् स्पर्शही करता येईल अशी प्रगती झाली, तर भौगोलिक राष्ट्र या संकल्पनेचे फारसे महत्त्व राहणार नाही, हे उघड आहे.
कांगावखोर 'स्वदेशी' वाले
पण, आज तशी स्थिती नाही. प्रादेशिक सरहद्दीत शेजारी म्हणून राहणाऱ्या लोकांमध्ये विविध प्रकारांनी आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, भाषिक जवळिकीची भावना आहे. आपापल्या समाजात वावरताना घरी असल्यासारखे वाटते, ही जाणीवही मोठी मौल्यवान गोष्ट आहे. त्यासाठी शेकडो भगतसिंग फाशी चढायला तयार होतात. खरे तर, राष्ट्रवादाचा आणि स्वदेशीचा उदे उदे, उद्घोष करणाऱ्या लोकांनी राष्ट्रकल्पनेचा बाजार मांडला आहे. 'स्वदेशी'च्या नावाखाली आपला खत्रूड माल आपल्याच देशबांधवांच्या गळी महागड्या किमतीने बांधता आला म्हणजे देशभक्ती आणि कातडीचा रंग थोडा वेगळा असणाऱ्या लोकांनी सर्वसामान्य जनतेला उत्कृष्ट माल कमी भावात आणून दिला तर मात्र देश बुडाला अशी हाकाटी करणाऱ्यांचा 'स्वदेशी' हा कांगावा आहे.
'स्वदेशी'वाल्यांनी देशाला काय दिले? महान परंपरांचा, उज्ज्वल इतिहासाचा हा देश. आजही इथली माणसे परदेशांत गेली तर सर्वांना अचंबा वाटावा अशी कर्तबगारी दाखवतात. समाजवाद्यांनी, सरकारवाद्यांनी, 'स्वदेशी'वाद्यांनी स्वार्थासाठी देशाभोवती कुंपणे घातली आणि एक महान राष्ट्र जगातील कंगाल आणि दळभद्री राष्ट्र बनवून टाकले. देशातील 'खऱ्या राष्ट्रवाद्यांची' इच्छा ही कुंपणे तुटावीत, इथल्या कर्तबगार जनतेच्या हातापायांतील सरकारशाहीच्या दंडबेड्या तुटाव्यात आणि जगातील राष्ट्रांच्या बैठकीत भारताला त्याचे इतिहाससिद्ध, निसर्गसिद्ध स्थान पुन्हा एकदा लाभावे अशी आहे. स्वतंत्रतावाद्यांची भूमिका राष्ट्र जोपासण्याची आहे, राष्ट्र खाण्याची नाही.
'स्वतंत्र भारत'च्या पाइकांचे स्वप्न
जगात भारताचे स्थान पुन्हा एकदा उंचावण्याचा कार्यक्रम फारसा कठीण नाही. एकविसावे शतक उगवण्याआधी त्याची अंमलबजावणी सहजशक्य आहे. या देशाचे लोक प्रेरणा घेऊन उठले, तर तीन वर्षांत हे होऊ शकेल. कार्यक्रम सोपा आहे. सरकारी हस्तक्षेप कमी करा, सरकारशाहीचे ओझे उतरवा, गेल्या पन्नास वर्षांत सरकारशाहीने देशाचे जे नुकसान केले, ते नुकसान संपवावे आणि राष्ट्राच्या जिव्हारी लागलेल्या जखमा भरून काढा.
बेकारी, गरिबी, भ्रष्टाचार, गुन्हेगारी यांनी जर्जर झालेल्या या देशाचा आज जगात मान नाही. इथेल भाईबंददेखील देशातून निघून वेगळी चूल मागत आहेत. भारत स्वतंत्र झाला, तर आज त्याची हेटाळणी करणारे, दुष्टावा करणारे, त्यापासून फुटून जाऊ पाहणारे उद्या त्याच्याशी संपर्क असावा, जमले तर त्याने आपणास सामावून घ्यावे असे प्रतिपादू लागतील आणि त्यासाठी जुन्या इतिहासातील, पुराणातील नकाशांचे दाखले देऊन अखंड भारताचा आग्रह धरू लागतील. हे स्वातंत्र्याच्या पाइकांचे स्वप्न आहे.
यासाठी 'स्वतंत्र भारत' चळवळीचे तोरण बांधायला घेतले आहे.
(२१ जून १९९४)
◆◆