प्रशासननामा/सामाजिक प्रबोधन व बहिष्कार - समाज परिवर्तनाचे दुहेरी शस्त्र!



सामाजिक प्रबोधन व बहिष्कार -
समाज परिवर्तनाचे दुहेरी शस्त्र!



 आता कुठे महिलांचा मोर्चा त्यांच्या कार्यालयासमोर आला होता, तो नेहमीप्रमाणे पोलिसांनी अडवला होता. त्याचं सभेत रूपांतर होऊन भाषणांना सुरुवात होणार होती. भाषणानंतर त्यांचे एक शिष्टमंडळ कलेक्टरांना भेटून निवेदन देणार होतं. दौऱ्यावर जाणारे कलेक्टर वेळ होत असल्यामुळे अस्वस्थ झाले होते. त्यांनी चंद्रकांतला बोलावून सांगितलं,

 “चंद्रकांत, त्या तालुक्याची पाणीटंचाईची आजची बैठक माझ्यासाठी तेवढीच महत्त्वपूर्ण आहे आणि आजच्या मोर्चाचं शिष्टमंडळ भेटीस यायला आणखी तासभर तरी लागेल. आधीच मला निघायला उशीर झाला आहे, तेव्हा तू शिष्टमंडळाला भेटून त्याचे निवेदन स्वीकार."

 “आपली तशी आज्ञा असेल तर त्याचं मी जरूर पालन करेन. पण मला असं वाटतं - आपण थांबावं व स्वत:च्या भाऊसाहेबांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या महिलांच्या शिष्टमंडळाला भेटावं, ते मराठवाड्यातले सर्वात ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक वे सर्वमान्य गांधीवादी नेते आहेत. त्यांनी काल आपल्याला फोन करून पूर्वसूचनाही दिली आहे. महिलांवरील अत्याचारांचं, वासनाकांडाचं प्रकरण आहे. साऱ्या मराठवाड्यातून महिला नेत्या व कार्यकर्त्या आलेल्या आहेत, अशावेळी जिल्हाधिकारी म्हणून आपणच शिष्टमंडळाला भेटणे योग्य राहील."

 "आय नो, आय नो." कलेक्टर पुटपुटले,

 "पण यू आल्सो नो देंट आय ॲम स्टीकलर ऑफ डिसिप्लीन अँड कीपिंग द टाईम. मी समोरच्याकडून तीच अपेक्षा करतो. त्यांनी मला साडेअकराची वेळ दिली होती भेटीला. आता बारा वाजून गेले आहेत. या पुढारी मंडळींना टाईम मॅनेजमेंट नावाची गोष्ट कशाशी खातात हे माहीतच नाही."

 चंद्रकांत म्हणाला, “तसं नाही सर. भाऊसाहेबांची इथं येणारी ट्रेन दीड तास लेट आणि म्हणून-"

 "ओ.के. ओ.के. मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की तालुक्याची पाणीटंचाईचा आढावा घेणारी मीटिंगसुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे."

 “त्यासाठी मी आधी जिल्हापरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना वेळेवर जाण्याची विनंती केली आहे, त्याप्रमाणे ते गेले आहेत. आपण शिष्टमंडळाला भेटून निघालात तरी शेवटच्या सेशनला निश्चितच हजर राहू शकता."

 त्याच्या त्यांना कल्पना न देता केलेल्या काहीशा आगाऊ स्वरूपाच्या पण योग्य कृतीनं कलेक्टर निश्चित झाले.

 "ठीक आहे, मी थांबतो आणि भाऊसाहेबांना भेटूनच जातो."

 आजच्या महिलांचा मोर्चा नेहमीच्या आम मोर्चाप्रमाणे नव्हता. कारण त्यासाठी मराठवाड्यातील सर्व आठही जिल्ह्यातील महिल्या कार्यकर्त्या आल्या होत्या आणि मुख्य म्हणजे ज्या कारणासाठी तो मोर्चा होता, ते कारण सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचं, संवेदनाक्षम आणि स्त्रीवरील निघृण जुलमी अत्याचाराचं होतं.

 काही वर्षांपूर्वी गाजलेल्या जळगावं वासनाकांडाची आठवण व्हावी आणि अवघं समाजमन सुन्न आणि संतप्त व्हावं असं हे बलात्काराचं प्रकरण होतं.

 तीन आठवड्यांपूर्वी महाराष्ट्राच्या सर्व वृत्तपत्रांत पहिल्या पानावर मोठ्या हेडलाईनमध्ये बातम्या आल्या होत्या.

 "जळगाव वासनाकांडाची मराठवाड्यात पुनरावृत्ती!”

 "दोन अश्राप बालिकांवर पाशवी बलात्कार!"

 आदल्या दिवशी चंद्रकांतला शहरातील महिला पत्रकार प्रेमाताई पाटलांनी फोन करून खबर दिली, “मी पोलीस स्टेशनवरून बोलतेय, सर! काल रात्री रेल्वे स्टेशनच्या गुडस् यार्डमध्ये दोन तरुण मुलींवर बलात्कार झाला. त्यांनी जी फिर्याद दिली आहे, तिच्यावरून बलात्कारी तीन व्यक्तींमध्ये माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व एका पक्षाच्या विभागीय सचिवांचा मुलगा सामील असावा असा संशय आहे. पोलीसवाले त्यामुळे नीटपणे प्रकरण नोंदवून घेतील व त्या दोघींची वैद्यकीय तपसाणीला वेळेवर म्हणजे चोवीस तासांच्या आत पाठवतील याची प्रशासनानं काळजी घेतली पाहिजे, म्हणून फोन केला. स्त्रीशक्ती केंदाच्या आम्ही चार-पाच महिला कार्यकर्त्या इथं जातीनं दिवसभर थांबून फॉलो अप करणार आहेत, तरी आपण लक्ष घालावं."

 चंद्रकांतनं कलेक्टरांना त्यांच्या चेंबरमध्ये जाऊन खबर दिली. त्यांनी पोलीस अधीक्षकांनी संपर्क साधला व सूचना दिली की, "नीट फिर्याद नोंदवून घ्या, त्यासाठी महिला पोलीस व प्रेमाताई वगैरे महिला कायर्कत्र्यांचे सहकार्य घ्या, मुख्य म्हणजे त्यांना ताबडतोब वैद्यकीय तपासणीला पाठवा."  "सर, आपण सिव्हिल सर्जनला पण फोन करून सांगा. वैद्यकीय तपासणी काटेकोर व्हावी म्हणून. कोर्टात काही महिन्यांनी जेव्हा बलात्काराचा खटला उभा राहतो, तेव्हा आरोपी सदोष वैद्यकीय तपासणी अहवालाच्या आधारे संशयाचा फायदा घेऊन सुटतात. इथं प्राथमिक चौकशीप्रमाणे संशयित म्हणून प्रदीप जाधवचे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षांच्या लाडावलेल्या व माजलेल्या पुत्राचे नाव घेतले जात आहे. त्यामुळे डॉक्टरांवर राजकीय दडपण येण्याची शक्यता आहे, म्हणून त्यांना बोललं पाहिजे."

 कलेक्टरांनी सिव्हिल सर्जनला फोनने स्पष्ट कल्पना दिली, “वैद्यकीय तपासणी पूर्ण झाल्यावर डॉक्टरांचा अहवाल तुम्ही स्वत: नजरेखालून घाला आणि पूर्ण खात्री करून घ्या. तो अहवाल पोलिसांना देण्यापूर्वी मला समक्ष दाखवा."

 गतवर्षी शासनाच्या दलितमित्र पुरस्कार समारंभाच्या वेळी कलेक्टरांना एका कार्यकर्त्याने गौरवताना, 'दलित, मुस्लिम समाज व स्त्री जातीचे तारणहार व मसीहा' असं म्हटलं होतं. त्याची चंद्रकांतला आठवण झाली. त्याचा उल्लेख करून तो म्हणाला, “सर, ते विशेषण नव्हतं तर वस्तुस्थिती होती व आहे. हे आज मला पुन्हा एकवार प्रत्ययास येत आहे."

 “चंद्रकांत, यामध्ये मी विशेष काही करतो आहे असे नाही. ते माझे कर्तव्य आहे, तसं त्यामागे एक फिलॉसॉफी आहे, ती तूही लक्षात ठेव." किंचित आत्ममग्न होत कलेक्टर म्हणाले,

 “आपल्या देशात आर्थिक विषमतेपेक्षाही सामाजिक विषमता अधिक प्रखर आहे. त्याला हिंदू समाजातलं चातुर्वर्ण्य, खास करून दलितांबद्दलची तुच्छता आणि उतरंडीची समाजरचना कारणीभूत आहे. या वर्गात मी भारतीय स्त्रीला बसवतो. तीही समाजरचनेची व त्याच्या अन्यायाची अनिवार्य बळी आहे. हे अत्याचार व शोषण निवडणुकीच्या राजकारणामुळे दिवसेंदिवस वाढत चाललंय. कारण मतांच्या राजकारणात जादा लोकसंख्येच्या जातीचे गट प्रबळ ठरतात व सत्तास्थानी येतात. ते आपल्या गट, जाती आणि त्यांच्या उच्चस्थानाला व आर्थिक हितसंबंधाला जपताना दलित व स्त्रीजातीला अधिकच दडपून ठेवण्याचं धोरण स्वीकारतात. त्यामुळे प्रशासनावर त्यांच्या रक्षणाची जबाबदारी आहे, असं मी मानतो. तीच बाब अल्पसंख्याकांची आहे. त्याबाबतही मी संवेदनक्षम आहे म्हणून या वंचितांसाठी मी काही केलं असेल तर मी माझं कर्तव्यच आहे असं मी मानतो. जेव्हा या बलात्कारींना पोलीस तातडीने पकडून त्यांच्यावर खटला भरतील आणि त्यांना शिक्षा होईल, तेव्हाच मला समाधान वाटेल.”

 बलात्कार झालेल्या दोघींपैकी एक अठरा-वीस वर्षांची तरुणी होती, तर दुसरी नुकतीच वयात आलेली पंधरासोळा वर्षांची किशोरी होती. त्या दोघी शेतमजूर होत्या. त्या इथल्या उरुसासाठी आल्या होत्या.

 मुल्ला फारूख चिश्तीच्या नावाने भरणारा या शहराचा उरूस फार प्रसिद्ध आहे. त्यासाठी हिंदु-मुस्लीम दोघेही नवस बोलून त्या फकिराच्या नावे बकरी कापून 'कंदुरी' करतात. तो नवसाला पावतो व मनोकामना पूर्ण करतो अशी श्रद्धा आहे.

 “म्या-म्या, माजं आत्तेच्या मुलाशीच लगीन व्हावं, तेनं शहरात नव्या बाईला तिथल्या शानशौकीला भुलूनशानी डोरलं बांदू नये म्हणूनशानी म्या नवस बोलला होता आन् कंदुरी केली होती."

 त्या तरुणीची फिर्याद वाचताना चंद्रकांत विमनस्क झाला. तिचं विवाहाचं स्वप्न त्या निघृण बलात्कारानं भंगलं गेलं होतं. तिच्या आत्याचा मुलगाच काय, पण समाजातील कोणताही तरुण तिला या मागासलेल्या भागात स्वीकारणं शक्य नव्हतं. तिचा नवस व कंदुरी वाया गेली होती.

 त्या दोघी इथं आल्यावर कंदुरीसाठी बकरं घेण्यासाठी व ते कापून देण्यासाठी जत्रेच्या जवळच असलेल्या खाटिक गल्लीत गेल्या होत्या. तिथं त्या दोघींना ते आरोपी तरुण भेटले. त्यांच्या शिकारी नजरेनं त्या दोघी परगावाहून उरुसासाठी आलेल्या आहेत हे हेरलं.

 "आमी दोगी पयल्यांदाच इतकं दूर उरुसालं आलो व्हतो. त्यामुळे ते तिथे आम्हास्नी मदत करणाऱ्या भावापरमाणे वाटतले. तेंनी कंदुरीसाठी बकऱ्याचा सौदा जमवून दिला. मंग आमास्नी होटलात जेवायला चलण्याचा अग्रेव केला. आम्ही जलमात कंदी हॉटेलात जेवलो नव्हतो, मनुनशानी व्हय म्हनलं."

 चंद्रकातला बासू भट्टाचार्यांच्या 'आस्था' या सिनेमाची आठवण झाली. त्यातील मध्यमवर्गीय नायिकेला पंचतारांकित हॉटेलच्या चकचकीत वातावरणाचा मोह पडतो व एका अनोळख्या माणसाला वातानुकूलित खोलीत देह देत त्या वातावरणाचा उपभोग घेते, हे पाहताना चंद्रकांतला धक्का बसला होता. काहीतरी असंभाव्य व अतर्क्य पाहात आहोत असं त्यावेळी त्याला वाटलं होतं. पण आज बासू किती सच्चा व काळाच्या पुढे होता हे जाणवून गेलं. खेडेगावात शेतमजूर म्हणून काम करणाऱ्या मुलीला शहरातील उंची हॉटेलमध्ये जेवण व सिनेमाला जाणं याची भूल पडू शकते, नव्हे, त्यात असंभव असं काही नसतं हे प्रत्ययास येत होतं.

 फिर्यादीमधील पुढील भाग म्हणजे गल्लाभरू हिंदी सिनेमात शोभणारा घटनाक्रम होता.  त्या दोघींना त्यांनी शहरातल्या बड्या हॉटेलात मटणाचं सामिष भोजन दिलं होतं. त्याचवेळी त्यांना माहीत नसलेलं पेयही थोडं पाजलं. “ते काय व्हतं माहीत नाय मला, पण तेची चव नाय आवडली पहिल्या झूट. पण तेंनी मोप आग्रव केला, म्हणूशान आम्ही दोघी गुमान ते पियेलो."

 भोजनानंतर ते तिघे या दोघींना घेऊन सिटीलाईटमध्ये चित्रपटाला गेले. बी व सी ग्रेडचे मल्याळी व तामिळी व सेक्सी हिंदी व इंग्रजी सिनेमे तिथे दाखवण्यात येत. त्यासाठी ते टॉकिज कुविख्यात होतं. तिथं एक सॉफ्ट पोर्नोग्राफिक सिनेमा चालू होता. सिनेमानंतर रात्री बारा वाजता त्या दोघींना रेल्वे स्टेशनावर सोडण्यासाठी ते गेले होते. ट्रेन आधीच निघून गेली होती. म्हणून रेल्वे गेस्ट हाऊसमध्ये चला म्हणून त्यांनी त्या दोघींना गुड्स यार्डात नेलं व आळीपाळीने बलात्कार केला.

 कलेक्टरांनी लक्ष घातल्यामुळे तपासाची चक्र वेगाने फिरू लागली. त्या तिघा संशयित आरोपींपैकी एकाला पकडण्यात पोलिसांना यश मिळालं. त्यांच्या जबानीतून हा सारा प्रकार प्रदीपनं (माजी जिल्हा अध्यक्षाच्या पुत्रानं) रचल्याचे निष्पन्न झालं. तो व त्याचा मित्र फार फरार झाले होते.

 वृत्तपत्रांनी हे वासनाकांडाचं प्रकरण लावून धरल्यामुळे वातावरण चांगलंच तापलं होतं. पण आरोपी पकडले जात नव्हते. त्यामुळे पोलीस व जिल्हा प्रशासनावर टीका होत गेली. त्याची गांभीर्याने दखल घेत कलेक्टरांनी पोलीस अधीक्षकांना व पोलीस अधिकाऱ्यांना सांगितले,

 "तुम्ही माजी अध्यक्षांना भेटून तपास करायचा प्रयत्न केला आहे. त्यांना आज पुन्हा भेटा व सक्त वॉर्निग द्या की, जर तीन दिवसात प्रदीप आपणहून पोलिसांपुढे हजर झाला नाही तर त्याला पळून जाण्यास व फरार होण्यास मदत केली म्हणून तुम्हाला अटक केली जाईल. माझा होरा आहे की, हे तंत्र यशस्वी ठरेल."

 कलेक्टरांची ही जालीम मात्रा लागू पडली. 'प्रदीप पोलिसांना शरण येईल. त्याला दोन दिवसांची मुदत द्या' असं अध्यक्षांनी सांगितलं. त्यानुसार प्रदीप आज शरण यायला हवा होता. तो जर शिष्टमंडळाच्या भेटीपूर्वी पोलीस ठाण्यात हजर झाला तर संवेदनक्षम प्रशासनाचा पुरावाच देता आला असता.

 पण तसं घडलं नाही. प्रदीप हजर होईपर्यंत त्याची वाच्यता करणंही गैर होतं. म्हणून कलेक्टरांनी शांतपणे महिलांच्या संतप्त भावनांना तोंड दिलं. भाऊसाहेबांच्या नेतृत्वाखाली आलेल्या शिष्टमंडळातील महिला एकामागून एक टीकेचे आसूड ओढत होत्या.

 "प्रशासनाचा तोंडावळा तसेच मनोरचनाही पुरुषीच आहे कलेक्टरसाहेब, त्याचं हे ज्वलंत उदाहरण आहे. आरोपी बलदंड राजकीय पुढाऱ्याचा बिघडलेला मुलगा आहे व त्याला वाचविण्याचा खटाटोप चालू आहे, म्हणूनच अजूनही तो फरार आहे. फुले, कर्वे, आंबेडकरांच्या पुरोगामी राज्यात स्त्रीची अब्रू आज किती स्वस्त झाली आहे. त्यांचं सोयरसुतक आज कुणालाच नाही याचा मला तीव्र खेद वाटतो."

 कलेक्टरांनी साऱ्यांचं बोलणं झाल्यावर उत्तर देताना म्हटलं, “तुमच्या संतप्त भावना मी समजू शकतो आणि झाला प्रकार निंद्यच आहे. त्याबाबत प्रशासन संवेदनशील जरूर आहे. आरोपी लवकरच पकडले जातील. आम्ही प्रशासकीय अधिकारीही सामाजिक कार्यकर्त्यांच्या भावनेनेच याकडे बघतोय."

 औरंगाबादहून आलेल्या एका बोलभांड महिला कार्यकर्तीनं हेटाळणीच्या सुरात म्हटले, “अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते ? जस्ट इम्पॉसिबल. प्रशासन हे नेहमीच सत्ताधाऱ्यांचं बटीक राहिलं आहे. अन्यायाकडे डोळेझाक करीत राहिलं आहे."

 “तुमचं हे जनरल विधान असेल तर मला काही म्हणायचं नाही." कलेक्टर तरीही संयम बाळगून होते. पण आवाजाला थोडी धार चढली होती, "पण रोख आमच्याकडे असेल तर एवढंच म्हणेन, तुम्ही माहिती न घेता पूर्वग्रहदूषित नजरेतून पाहात व बोलत आहात. मोर्चा काढला, दोन तास कंठाळी भाषणं दिली, चार लेख पेपरात लिहिले म्हणजे झालं? या बलात्काराच्या रूटकॉजकडे आपण पाहता काय? त्याच्या निर्मूलनासाठी काही स्ट्रॅटेजी, लाँग टर्म प्लॅनिंग व प्रबोधनासाठी काही कार्यक्रम पण आखावा व अंमलात आणावा लागतो. याचा आपण विचार केला आहे?"

 ती कार्यकर्ती अवाक् झाली. अधिकाराचा तोराच मिरवणारे अधिकारी तिने आजवर अनुभवले असल्यामुळे कलेक्टरांचं विधान तिला चकित करून गेलं.

 तेव्हा हस्तक्षेप करीत भाऊसाहेब म्हणाले,

 “आम्ही विश्वास ठेवतो की, आपण जातीने लक्ष घालत आहात व आरोपी लवकरच पकडले जातील. पण त्याची ओळख परेड घेणाच्या अधिकाऱ्यांनाही योग्य त्या सूचना द्या. कोर्टातही प्रकरण नीट उभे राहील, याची काळजी घ्या, अशी समस्त महिला वर्गाच्या वतीने मी विनंती करतो."

 “जरूर, भाऊसाहेब. मी तुम्हाला कलेक्टर म्हणून तसाच एक माणूस म्हणूनही शब्द, नव्हे वचन देतो. गेल्या आठवड्यात हे वासनाकांड घडल्यापासून मी विचार करतो आहेच. तरुण मुलामुलींमध्ये निकोप मैत्री नसणं आणि सेक्सकडे विकृत दृष्टीनं पाहणे हे अशा वाढत्या बलात्कारांचं मूळ कारण आहे. पुन्हा राँग मॅनहूडची कल्पना याच्यामागे आहे. आज आधुनिकतेच्या नावाखाली स्त्री देहाला सिनेमा, टि.व्ही.मधून फॅशनच्या नावाखाली ज्या पद्धतीने प्रदर्शित केलं जातं, त्यामुळे तिला ‘ऑब्जेक्ट ऑफ डिजायर' वा अधिक ब्लंटली सांगायचं झालं, तर उपभोगाची वस्तू म्हणून पेश केलं जातं. तरुण कोवळी मनं त्यामुळे भ्रष्ट होत आहेत. या सामाजिक समस्येची व्यापकता किती आहे याची कल्पनाही करता येणार नाही, एवढं त्याचं भयानक रूप झालं आहे. शिक्षण, नोकरीमुळे स्त्री अधिक मुक्त होत आहे, तिचा सार्वजनिक जीवनात वावर वाढला आहे, पण पुरुषी मनोवृत्तीत फारसा पड़क पडला नाहीये. उलट, या आधुनिकतेच्या विकृत कल्पनेमुळे आणि वाढत्या चंगळवादामुळे स्त्रीवर अन्याय वाढत आहेत, याचा समाजाने विचार करण्याची वेळ आली आहे."

 “आपले निरीक्षण मार्मिक व अचूक आहे. पण यावर तुम्ही काय उपाय सुचवाल?" भाऊसाहेब कलेक्टरांच्या प्रतिपादनाने चांगलेच प्रभावित झालेले दिसत होते.

 “मी इथल्या कॉलेजच्या उपप्राचार्यांशी बोललो आहे व काही दिवसांतच काही कॉलेज युवकयुवतींसाठी प्रबोधन शिबीर आयोजित करणार आहोत. त्यात निकोप मैत्री, स्त्री-पुरुष समानता आणि निरोगी नैसर्गिक लैंगिकता याबाबत व्याख्याने, चर्चा व दृकश्राव्य माध्यमाच्या आधारे नवा विचार देण्याचा प्रयत्न करणार आहोत."

 “दुसरी बाब असहकार, निषेध व पिकेटींगची. भाऊसाहेब, मी तुम्हाला गांधीमार्ग सांगावा एवढा मी मोठा खचितच नाही. असे प्रकार घडण्यामागे, खास करून सत्ता व संपत्ती असणाऱ्या वडिलांचे स्वत:चे सैल वर्तन आणि मुलांवर कळत नकळत केले जाणारे चुकीचे संस्कार आहेत. प्रस्तुत प्रकरणात काय घडले? माजी अध्यक्ष आपली सामाजिक प्रतिष्ठा व राजकीय प्रभावाचा त्याला वाचवण्यासाठी वापर करत आहेत, पण त्यात ते सफल होणार नाहीत हें नक्की. पण आजही ते समाजात उजळ माथ्याने कसे वावरू शकतात? आणि मुख्य म्हणजे लोकही त्यांना उद्घाटन, सत्कार सोहळ्याला का निमंत्रण देऊन बोलावतात? लोक त्यांच्या हस्ते पारितोषिक व हार-तुरे कसे घेतात? त्यात त्यांना संकोच, लज्जा का वाटत नाही? अशा बेजबाबदार समाजद्रोही माणसावर आपण सामाजिक बहिष्कार का नाही घालत? का नाही तुम्हीं आज त्यांच्या घरावर मोर्चा नेत? भाऊसाहेब, हे सामाजिक बहिष्काराचं जालीम अस्त्र वापरायच असेल तर तुमच्यासारख्या विवेकी व साधनशुचिता मानणाऱ्या गांधीवादी नेत्यांनीच पुढाकार घेतला पाहिजे. सामाजिक प्रबोधन आणि बहिष्कार या दुहेरी मार्गाने कार्यकर्ते, प्रशासन आणि लोकनेते यांनी मिळून काम केलं, तरच अत्याचाराला बळी पडणाच्या मायभगिनींना न्याय देऊ शकू."

 हा प्रसंग इनसायडरला सांगताना चंद्रकांत म्हणाला, “मित्रा, प्रशासनात या कलेक्टरांसारखे सामाजिक विचार करणारे व त्यासाठी अधिकार वापरणारे प्रशासक वाढले तर स्त्री-अत्याचार निर्मूलन चळवळीत. गुणात्मक फरक पडू शकतो, हे नक्की! पण आम्ही हाती एकवटलेले अधिकार व त्याच्या वापरातून उपभोगाच्या जीवनशैलीत रममाण झालेले बहुसंख्य अधिकारी आहेत. जो समाज आपल्या करातून आमचं पगारपाणी करतो, त्या समाजाचं आपण काही देणं लागतो याचा गांभीर्याने विचार आम्ही अधिकारीवर्ग, केव्हा करणार? हा सवाल आजच्या घडीचा आहे. त्याचं उत्तर, दुर्दैवाने, आज तरी होकारार्थी देता येत नाही, ही वस्तुस्थिती आहे."