बलसागर/स्मरण
□
स्मरण
□
“ प्रत्यक्ष यशाचा आणि राजकीय मुत्सद्देगिरीचाच फक्त निकष लावला तर स्टॅलिनच्या आसपास त्याच्या कालखंडातील क्वचितच कोणी व्यक्ती पोहोचू शकेल, याबद्दल मला शंका नाही.
“ मी अर्थातच असे मानीत नाही की, यश हा एकच निकष राजकारणात मानण्यात यावा. साधनांची शुचिता राजकारणात अवश्य पाळली गेली पाहिजे. सामान्य नीतितत्त्वे राजकारणात पायदळी तुडविली जाणे नेहमीच संभवनीय असते, कारण 'अस्तित्वासाठी सतत चढाओढ' हे त्याचे नित्याचे स्वरूप असते. पण मी त्याच राजकीय पुढाऱ्यांना आणि मुत्सद्यां ना थोर समजतो की, जे व्यवहार आणि ध्येयवाद यांची सांगड घालू शकतात व मूलभूत नीतिमूल्यांची योग्य ती कदर ठेवूनही आपल्या ध्येयाकडे निश्चित वाटचाल करू शकतात .."
–मिलोव्हन जिलास-Conversations with Stalin
पंडित नेहरूंच्या निधनाला एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यांच्या चरित्राचे व कार्याचे यथायोग्य मूल्यमापन होण्यास अद्याप बराच कालावधी जावा लागेल. खूप माहिती व घटना अप्रकाशित आहेत व अवश्य ती वस्तुनिष्ठताही इतक्या जवळच्या काळात धारण करणे अनेक कारणास्तव शक्य नसते. त्यातून पं.नेहरूंचे जीवन हे एकसुरी व समन्वित जीवन नव्हते. निरनिराळ्या काळी निरनिराळ्या प्रेरणांचा, विचारांचा पगडा त्यांच्या मनावर असे आणि या सर्व विविध प्रेरणांचा आणि विचारांचा समन्वय साधणे त्यांना अखेरपर्यंत जमू शकले नाही. किंबहुना असेही म्हणता येईल की, त्यांचा स्वतःचा किंवा सत्याचा शोध शेवटपर्यंत अखंडपणे चालूच राहिला होता. ते सतत विकसित होणारे, प्रकाशाच्या दिशेने वाटचाल करणारे एक ओजपूर्ण जीवन होते. नेहरू पूर्णमानव नव्हते. त्यांना तसे होणे कदाचित आवडलेही नसते. अपूर्णाकडून पूर्णत्वाकडे जाण्यातच धन्यता मानणारे ते एक श्रेष्ठ मानवी जीवन होते.
वर दिलेल्या जिलासच्या अवतरणातील अखेरचा भाग पंडितजींना जेवढा लागू पडतो, तेवढा त्यांच्या समकालीनात इतर कोणासही लागू पडत नाही. पंडितजींची अनेक धोरणे फसली; त्यांची शत्रुमित्रपारख चुकली; त्यांचे अनेक निर्णय इतिहासाने निखालस चुकीचे ठरविले. हे सर्व जरी सत्य असले, तरी 'मूलभूत नीतिमूल्यांची योग्य ती कदर ठेवून ते आपल्या ध्येयाकडे निश्चित वाटचाल करीत होते,' यात तिळमात्र शंका नाही. यश व निश्चित फलप्राप्ती हा एकच निकष मानला, तर पंडितजींचा वारसा इतरांच्या तुलनेने कदाचित कमी भासेल; पण राजकारणाच्या कलहसष्टीत वावरत असतानाही त्यांनी बाळगलेले नैतिकतेचे भान हा त्यांनी मागे ठेवलेला फार मोठा वारसा आहे-प्रत्येक भारतीयाने अभिमान बाळगावा असा. नेहरूंच्या भारतीयत्वाचा, हिंदुत्वाचा हा अस्सल अंश होता, असे म्हटले तरी चालेल. हा अंश, हे भान विसरा आणि रामायण-महाभारतात किंवा एकूणच भारतीय संस्कृतीत काय शिल्लक उरते ते पाहा. जणू हा महाभारतकालीन धर्मराजच नव्या रूपाने आधुनिक काळात वावरत होता.
या धर्मराजास, या आधनिक राजर्षीस सहस्र प्रणाम.
⚜
मे १९६५