कच्छ करार
 

 पृथ्वीराज चव्हाणाने महंमद घोरीला पकडून सोडून दिल्यापासून थेट आजतागायत आपल्या राज्यकर्त्यांची औदार्याची घातक चटक काही कमी झालेली दिसत नाही. आपल्या शूर जवानांनी कच्छसीमेवर पाकिस्तानला चांगलेच पाणी पाजले. त्यांना थोडी अधिक सवड व अधिकार दिले गेले असते, तर आपला ज्यावर संपूर्ण हक्क आहे असे राज्यकर्त्यांना वाटते, त्या सर्व मुलखातून पाकिस्तानला काढता पाय घ्यावा लागला असता आणि नंतर सीमाआखणीचे काम कटकटीवाचून भारताला पार पाडता आले असते.'आमचे नीतिधैर्य उत्तम आहे. शत्रूला खडे चारण्यास आम्ही उत्सुकच आहोत, पण दिल्लीतील राज्यकर्त्यांनी नेहमीसारखा आमचा अवसानघात करू नये म्हणजे मिळविली-' अशा अर्थाचे उद्गार सैन्यातील काही अधिकाऱ्यांनी दिल्लीतील पत्रकार कच्छसीमा-पाहणीसाठी गेले असता त्यांचेजवळ काढल्याचे वृत्तपत्रात येऊन गेलेच आहे. सैन्य सज्ज आहे, राज्यकर्ते कच खातात असाच आजवरचा अनुभव आहे, हे काही खोटे नाही. काश्मिरात काय घडले ? १९४७ साली टोळीवाल्यांनी आक्रमण केले. आपल्या सैन्याने टोळीवाल्यांना पिटाळण्यास सुरूवात केली. टोळीवाले पळू लागले आणि दिल्लीहून टोळीवाल्यांचा पाठलाग थांबवण्याचा एकदम हुकूम आला. असे म्हणतात की, हा हुकम चार आठ तास उशिरा आला असता तर संपूर्ण काश्मिर आपल्या हातात आले असते. काश्मिरचा प्रश्न शिल्लकच उरला नसता. पण सैन्याचे पाय राज्यकर्त्यांनी मागे ओढले, युनोकडे त्यांनी धाव घेतली, युद्धबंदीचा घोळ घातला आणि गेली अनेक वर्षे या प्रश्नावर भारताचे रक्तशोषण चालू आहे. कोट्यवधी रुपये वर्षाकाठी खर्ची पडत आहेत. सैन्य अडकून राहिले आहे. आंतरराष्ट्रीय क्षेत्रात भारताची बदनामी चालूच आहे. 'सैन्याला पाठलाग थांबवण्याचा हकूम दिला गेला ती चूक झाली. सैन्यबलाच्या जोरावर काश्मिरप्रश्न त्याचवेळी निकालात काढला असता तर बरे झाले असते, असे, इतरांप्रमाणे माझेही त्यावेळी मत होते-' अशा आशयाचे उद्गार श्रीमती इंदिरा गांधींनी चारसहा महिन्यांपूर्वी न्यूयॉर्क येथे काढले होते. पण मागाहून बोलून काय उपयोग ! वेळ एकदा निघून गेली ती गेलीच.
 नुकतीच घडलेली कारगिलची कथा अशीच. ही पाकिस्तानी ठाणी भारतीय जवानांनी मोठ्या शर्थीचा पराक्रम करून जिंकून घेतली. पुन्हा आम्ही यूनो निरीक्षकांवर भरवसा टाकून ठाणी परत करण्यास तयार ! हे यूनो निरीक्षक काश्मिर युद्धबंदीरेषेवर इतकी वर्षे आहेतच. त्यांची कितीशी पत्रास पाकिस्तानने बाळगली आहे ? या निरीक्षकांच्या डोळ्यांदेखत पाकिस्तानने अनेकदा गोळीबार केले. या गोळीबारांची झळ निरीक्षकांनाही काही वेळा लागली, तरी पाकिस्तानची दांडगाई कमी नाही. आणि यू. नो. च्या आश्वासनांवर विसंबून कारगिलची ठाणी सोडायची होती, तर एवढा आटापिटा करून ती जिंकून घेण्याची तरी काय गरज होती ! जवानांचा सारा पराक्रम मातीमोलच झाला म्हणायचा ! अशा परिस्थितीत ती मरणोत्तर वीरचक्रे आणि गौरवपदके हा सारा पोकळ व अर्थशून्य देखावा वाटू लागतो. एकीकडे रणगीतांचा देशावर भडीमार आणि दुसरीकडे रणशूरांच्या पराक्रमाचे हे खच्चीकरण ! राज्यकर्त्यांच्या हेतूविषयी संशय यावा, अशीच ही विरोधी वस्तुस्थिती आहे.
 कच्छबावत वाटाघाटींचे गुऱ्हाळ आता सुरू होईल, तेव्हा सैन्याने मिळविलेले राज्यकर्त्यांनी किती राखले ते कळून येईलच. पण सकृद्दर्शनी तरी ' पाकिस्तानचा दरोडा' पचलेला दिसतो. कच्छसीमेबाबत कोणताही आणि कसलाही वाद नाही, ही भारताची मूळ भूमिका आज सुटलेली आहे. सरदार ठाणे व बियारबेट ही आमचीच ठाणी आम्ही खाली केली आहेत. कच्छमधील आमच्या मुलखातून पाकिस्तानने बेकायदा बांधलेल्या सोळा मैल रस्त्याचा वापर करण्यास पाकिस्तानला मुभा दिली गेली आहे. हा रस्ता पाकिस्तान बांधीत - होते, तेव्हा आमचे राज्यकर्ते काय करीत होते ? अक्साई-चीनमधून चीन रस्ता बांधीत असताना जे केले तेच. त्यावेळी नेहरू-मेनन होते. यावेळी शास्त्री-चव्हाण आहेत इतकाच फरक. माणसे बदलली तरी गाफीलपणा कमी झाला नाही.
 अशी सारी वस्तुस्थिती असता पाटण्याच्या सभेत संरक्षणमंत्री श्री. यशवंतराव चव्हाण यांनी विरोधकांना व कच्छ कराराच्या टीकाकारांना पराभूत मनोवृत्तीचे', 'न्यूनगंडाने पछाडलेले' अशी दूषणे दिलेली आहेत. आपले तुटलेले शेपूट लपविण्यासाठी सर्वांच्या धड शेपटांना कमी ठरवण्याचा हा उद्योग अजबच म्हटला पाहिजे. देशात एक बोलणारे आणि परदेशात जाऊन दुसरेच ठरवून येणारे ‘पराभूत मनोवृत्तीचे ' व 'न्यूनगंडाने पछाडलेले' की, 'जे बोलता ते खरे करून दाखवा, त्यासाठी पडेल ती किंमत द्यायला, हवा तो त्याग करायला देश तुमच्यामागे उभा आहे', असे कंटशोष करून ओरडणारे विरोधक 'पराभूत मनोवृत्तीचे?,' 'न्यूनगंडाने पछाडलेले' ? यशवंतरावांचा राजकीय बचावाचा हा आक्रमक पवित्रा त्यांच्या मुत्सद्देगिरीवर प्रकाश टाकणारा असला, तरी सत्य त्यामुळे लपणार नाही. शास्त्रीजींनीच हे सत्य हैद्राबादच्या आपल्या भाषणात सांगून टाकले आहे. पाकिस्तानशी युद्ध करण्याची कल्पनाच मला अशक्यप्राय वाटते. इतर कोणत्याही देशाशी होणाऱ्या युद्धापेक्षा पाकिस्तानशी होणारे युद्ध हे अधिक भयंकर आणि गुंतागुंतीचे झाले असते. शास्त्रीजींचे हे उद्गार पुरेसे बोलके आहेत. पराभूत कोण आणि खंबीर कोण याचा यावरून कोणालाही चटकन् बोध होऊ शकेल.
 पाटण्याच्या आपल्या भाषणात यशवंतराव पुढे असेही म्हणाले की, "जगात आज सर्वत्र एक शांततावादी देश म्हणून भारताची प्रतिष्ठा उंचावली आहे. याउलट एक ‘मारका बैल' म्हणून पाकिस्तानची जगात नाचक्की झालेली आहे; तेव्हा विरोधकांनी एखादा करमणुकीचा कार्यक्रम चालू असल्याच्या सुरात सरकारवर टीका करू नये." आपण कोण हे जाणून घेण्यासाठी इतरांची ज्यांना मदत घ्यावीशी वाटते, आपल्याविषयी जग काय बोलते याकडे ज्यांचे सारखे लक्ष असते, अशा व्यक्ती न्यूनगंडाने पछाडलेल्या व पराभूत मनोवृत्तीच्या असतात, अशी माहिती मानसशास्त्रावरच्या प्राथमिक पुस्तकात सापडते. कच्छकराराच्या विरोधकांना वाटते- 'जग आपल्याला काय वाटेल ते म्हणो; आपल्या स्वाभिमानाला धक्का पोहोचेल, आपल्या राष्ट्रीय स्वार्थाला बाधा येईल, असे काहीही राज्यकर्त्यांनी करू नये. देशातील पौरुष आणि स्वाभिमान जागृत असणे, हे जागतिक कीर्तीच्या बुडबुड्यांपेक्षा अधिक महत्त्वाचे व मोलाचे आहे. परदेशी कोडकौतुकापेक्षा आपल्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा' असे सांगणारे विरोधक 'न्यूनगंडाने पछाडलेले' की, मौंटबॅटन-विल्सन इत्यादींची गोरी कातडी पाहून विरघळणारे व आपल्या प्रदेशावर पाणी सोडायला तयार होणारे आमचे राज्यकर्ते 'न्यूनगंडाने पछाडलेले', याचा निर्णय आता आमच्या ‘साहेबांनी'च करावा.
 आणि ‘ भारताची प्रतिष्ठा फार वाढली', ही यशवंतरावांची समजूत तरी कितपत खरी आहे ? कच्छ आक्रमणाचे वेळी पाकिस्तानने अमेरिकन रणगाड्यांचा वापर केला आपल्या वैमानिकांनी जीव धोक्यात घालून हे सिद्ध करण्यासाठी पुरावे गोळा केले. अमेरिकेने पाकिस्तानच्या निषेधाचा एक शब्द तरी उच्चारला ! भारत आणि चीनचे शत्रुत्व आणि पाकिस्तान-चीनची युती. तरीही अमेरिकेची मदत (शस्त्रास्त्रांची व इतरही) भारतापेक्षा पाकिस्तानला अद्यापही जास्तचीन आणि अमेरिका यांचे हाडवैर असताना. व्हिएटनामविषयी शास्त्रीजींनी वक्तव्य केले. जॉन्सन सोडाच, त्याचा परराष्ट्रमंत्री डीन रस्क यानेसुद्धा ‘मूर्खाची बडबड' यापेक्षा त्याला अधिक किंमत दिली नाही. ही झाली अमेरिकेतील आमची प्रतिष्ठा. रशियाने कच्छबाबत आपली भूमिका मानली का ? शास्त्रीजींचे भरघोस स्वागत केले. पण कच्छबाबत मौन. आफ्रिकेत तर आपल्याला अद्याप स्थानच नाही. आशियातील स्थान चीनने आक्रमण करून केव्हाच हिरावून नेले. एकूणएक भारतीयांची बिनदिक्कत हकालपट्टी करणाऱ्या लंगोटीएवढ्या ब्रह्मदेशाला आपला धाक नाही, तर आम्ही प्रतिष्ठेच्या गोष्टी काय बोलाव्यात ! उलट आजवर अनुभव असा आहे की, 'मारका बैल' म्हणून जरी पाकिस्तान जगात ओळखले जात असले तरी त्याचीच कड सर्वांनी भारतापेक्षा अधिक घेतली आहे. काश्मिरबाबत तर भारताची भूमिका जगात कोणालाही मान्य होत नाही. आर्थिक व शस्त्रास्त्रांची मदत पाकिस्तानपेक्षा कमी, संघर्षाचे वेळी पाकिस्तानकडे सहानुभूती, अशी अवस्था असताना, ' आमची जगातील प्रतिष्ठा मोठी' या म्हणण्याला पुरावा काय ?
 उलट पुरावा येथे पाहा. इंग्लंडचे भारतातील सध्याचे वकील फ्रीमन हे वकील म्हणून या ठिकाणी येण्यापूर्वी ' New Statesman' या समाजवादी विचारसरणीच्या, इंग्लंडमध्ये भारदस्त व वजनदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साप्ताहिकाचे संपादक होते. फ्रीमन हे पं. नेहरूंचे चाहते, हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचा फ्रीमन व त्यांचे स्टेट्समनपत्र यांनी जोरदार पुरस्कार केलेला. किंग्सले मार्टिन हे पं. नेहरूंचे असेच मित्र, चाहते, त्यांच्या ध्येयधोरणांशी सहमत असलेले, भारताविषयी आपुलकी बाळगणारे, स्टेट्समनपत्राच्या संपादक मंडळातील आणखी एक नामांकित पत्रकार. इतकी सारी मानसिक अनुकूलता असतानादेखील हे वजनदार पत्र व विशेषतः किंग्सले मार्टिन कच्छबाबत भारताची बाजू मानायला तयार नाहीत. त्यांच्या हिशेबी भारत आणि पाकिस्तान सारखेच. 'न्यू स्टेट्समन' मधील त्यांच्या लेखातील या १-२ उताऱ्यांवरून त्यांच्या हिशेबी आमची नैतिकता आणि पाकिस्तानची दांडगाई सारखीच असल्याचे कळून येते. ३० एप्रिल १९६५ या अंकात ते लिहितात-
 "We are not living in a sane world. Fighting ( in Kutch ) has broken out on a considerable scale; both sides ( India and Pakistan) are massing troops and arms. The press and radio propaganda, both in Delhi and Karachi, is of a kind only too familiar in Europe : 'Our troops are defenders of our frontiers and honour and the other side is cuncing and wicked and basely determined on our destruction......"
 “Reason has never played a notable part in Pakistan politics. But there now seems little to choose between the rival follies of this dispute......”
 “ There is now grave danger of communal outbreaks against the Muslims all over India......"
 इत्यर्थ असा की, 'भारत आणि पाकिस्तान दोघेही युद्धखोर आहेत. पाकिस्तान थोडे अधिक भडक माथ्याचे असले तरी दोघेही मूर्खासारखे भांडत आहेत. भारतात मुसलमानांच्या कत्तली होण्याचा फार धोका नजीकच्या काळात संभवतो.'
 आमच्या निधर्मी तपाचरणाचे, सौजन्याचे, शांतताप्रेमाचे काय हे फलित ! मित्र म्हणवणाऱ्या जाणकारांची आमच्याविषयी ही समजूत तर इतरेजनांची कथा काय ! आणि असल्या फसव्या आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेच्या भाकडकथा सांगून कच्छप्रकरणातील राजकीय पराभव झाकला जातो, ते तर अधिकच खेदजनक! शिवाजीचे उत्सव साजरे होत असले, तरी पृथ्वीराज चव्हाणाची परंपराच येथे जोरावर आहे, असे समजणे यावरून भाग पडते.

जुलै १९६५