बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र/कसोटीचा प्रसंग

बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र (page 157 crop)
भाग ९ वा.
बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र (page 157 crop) 2
कसोटीचा प्रसंग.

 बायजाबाईसाहेब दक्षिणेंतून आल्यानंतर बहुतकरून ग्वाल्हेरीस राहत होत्या. त्यांचा वृद्धापकाळ झाला होता; तथापि त्यांचें शरीर तेजःपुंज असून त्यांच्या शक्ती विगलित झाल्या नव्हत्या. त्यांचा उत्साह व त्यांची ताकद कायम असून, त्यांचा घोड्यावर बसण्याचा नित्यक्रम अव्याहत चालू होता. मित आहार, नियमित व्यायाम, व्यवस्थित वर्तन आणि सत्कार्यीं कालक्षेप असा बायजाबाईसाहेबांचा आयुष्यक्रम असल्यामुळें त्यांचे आरोग्य कायम राहिलें होतें. त्यांचें सत्तर वर्षांचे वय झालें होतें, तथापि त्यांची स्मरणशक्ति खंबीर असून त्यांची सर्व नैमित्तिक कृत्यें अगदी व्यवस्थितपणानें चालत असत. त्यांस इंग्रज सरकाराकडून दोन लक्ष व शिंदे सरकाराकडून चार लक्ष मिळून एकंदर सहा लक्ष रुपये पेनशन मिळत असे. ह्या पेनशनाची त्या स्वतः उत्तम व्यवस्था ठेवीत असत. त्यांचा इतमाम, त्यांचा शागीर्दपेशा, आणि त्यांचा दानधर्म त्यांच्या वैभवास व मोठेपणास शोभेल असाच होता. तथापि त्यांच्या दक्षतेमुळें त्यांस कधींही कर्ज न होतां, उलट त्यांच्या संग्रहीं द्रव्यसंचय फार मोठा झाला होता. उत्तरोत्तर त्यांचे मन ऐहिक व्यवहार व राजकारणें ह्यांपासून पराङ्मुख होऊन, कथापुराण व ईश्वरभक्ति ह्यांच्याकडे विशेष लागलें होतें. तथापि, ग्वाल्हेरच्या राजकारणांत त्यांनी आपले अद्वितीय बुद्धिचातुर्य पूर्वीं व्यक्त केलें असल्यामुळें त्यांच्या शहाणपणाविषयीं व त्यांच्या राजकारस्थानपटुत्वाविषयीं शिंदे सरकारच्या दरबारांत व इंग्रजी दरबारांत त्यांचा लौकिक अद्यापि गाजत होता. खुद्द महाराज जयाजीराव शिंदे हे प्रसंगविशेषीं त्यांची सल्लामसलत घेत असत; व त्यांच्या शहाणपणाची फार तारीफ करीत असत. अशा रीतीने बायजाबाईसाहेबांचा ग्वाल्हेर येथें शांतपणानें व प्रतिष्ठितपणानें कालक्षेप चालला होता. तो मध्यंतरीं, इ. स. १८५७ सालचें बंड उद्भवलें. त्यानें त्यांचा, ग्वाल्हेर संस्थानचा, किंबहुना सर्व हिंदुस्थानाचा शांतपणा भंग केला.

 इ. स.१८५७ सालीं ग्वाल्हेर येथें जें भयंकर बंड झाले, त्याचा वृत्तांत सर्वश्रुतच आहे. ह्या बंडाच्या योगानें ग्वाल्हेर येथें कांहीं वेळ राज्यक्रांति झाली. व खुद्द महाराज जयाजीराव शिंदे ह्यांस आपल्या सर्व कुटुंबीय मंडळीसुद्धा आपली राजधानी सोडावी लागली. त्यांच्या पश्चात् श्रीमंत रावसाहेब पेशवे, झांशीच्या राणी लक्ष्मीबाईसाहेब, व तात्या टोपे ह्यांनीं ग्वाल्हेर सर करून तेथें नवीन राज्याची संस्थापना केली. ह्या बिकट प्रसंगी महाराज जयाजीराव शिंदे, महाराणी बायजाबाईसाहेब, आणि दिवाण दिनकरराव ह्यांनीं जें वर्तन केलें, ते फार शहाणपणाचें व धूर्ततेचें होतें. त्यामुळेंच ब्रिटिश राज्यसत्तेचा विजय होऊन ती पुनः संस्थापित झाली, असें ह्मणण्यास मुळींच हरकत नाही. ह्या अत्युत्कृष्ट वर्तनाबद्दल महाराज जयाजीराव शिंदे व दिवाण दिनकरराव ह्यांची सर्वत्र प्रशंसा झाली आहे; व ती योग्य आहे. तथापि, ह्या प्रसंगीं महाराणी बायजाबाईसाहेब ह्यांनी जें वर्तन केले, ते फार उदारपणाचें व थोर मनाचें असून, तें अधिक स्तुतियोग्य होतें, असे ह्मटल्यावांचून आमच्यानें राहवत नाही. महाराज शिंदे सरकार व दिवाण दिनकरराव ह्यांनी सर्व लोकमताचा प्रवाह झुगारून देऊन, केवळ "ब्रिटिश सरकारचा स्नेह व त्यांचा न्यायीपणा" ह्यांकडे दृष्टि दिली, आणि आपल्या कुलास चिरभूषणावह अशीच गोष्ट केली. ह्यांत त्यांचे दूरदर्शित्व, चातुर्य आणि प्रामाणिकपणा हे गुण व्यक्त झाले, हें सर्व ठीक झालें. परंतु ह्यापेक्षांही बायजाबाईसाहेबांच्या वर्तनांत अधिक प्रशंसनीय आणि अधिक तेजस्वी असा गुण दिसून आला. तो त्यांचे मानसिक औदार्य हा होय. बायजाबाईसाहेबांचा व ब्रिटिश सरकाराचा पूर्वींचा राजकीय संबंध लक्ष्यांत घेतला, तर त्यांनी ब्रिटिश सरकाराशीं जें वर्तन केलें, त्यांत केवळ मनुष्यस्वभावास भूषणप्रद होणारी अशी साधुवृत्ति दर्शविली, असे ह्मटलें असतां खचित अतिशयोक्ति होणार नाहीं. दुसऱ्यानें कितीही अपकार केले, तरी ते विसरून, त्याच्यावर पुनः उपकार करणे, ही साधुरीति होय, असें कोण ह्मणणार नाहीं ?

 बायजाबाईसाहेब व ब्रिटिश सरकार ह्यांच्यामध्ये मागें जीं अनेक राजकारणें झाली, त्यांच्या बरेवाईटपणाबद्दल चर्चा करण्याचें प्रयोजन नाहीं. शिवाय, त्या राजकीय गोष्टी असल्यामुळें त्यांतील सत्य प्रकार प्रकाशांत येणे शक्य नाहीं. तथापि, स्थूल मानानें इतके ह्मणतां येईल कीं, हीं सर्व राजकारणें न्यायी व दयाळू राजनीतीच्या विरुद्ध असून त्यांच्यायोगानें बायजाबाईसाहेबांच्या मनांतील ब्रिटिश सरकाराविषयींचा प्रेमभाव नाहींसा होणें अगदीं साहजिक होतें. बायजाबाईसाहेब ह्या फार महत्वाकांक्षी व राजव्यवहारचतुर अशा स्त्रीमालिकेंत अग्रस्थानीं शोभणाऱ्या असून, त्यांस ग्वाल्हेरचा राज्यकारभार चालविण्याची फार उमेद होती. गव्हरनरजनरल लॉर्ड आह्मर्स्ट ह्यांनी दौलतराव शिंद्यांच्या इच्छेप्रमाणें बायजाबाईसाहेबांच्या हातीं सर्व राज्यकारभार सोपविला होता; व त्यांचे अनुयायी लॉर्ड उइल्यम बेंटिंक ह्यांनी त्यांस स्वतंत्र रीतीनें राज्यकारभार चालविण्याबद्दल कुल आखत्यार दिला होता. असें असून, इ. स. १८३३ सालीं त्यांना एकाएकीं अधिकारच्युत केलें, ही गोष्ट ह्या स्वाभिमानी राजस्त्रीस बिलकूल आवडली नाहीं. तथापि तिनें कोणत्याही प्रकारें अविचाराचें वर्तन न करितां, आलेलें संकट निमूटपणें सहन केलें. त्या वेळीं तिनें युद्धाचा प्रसंग आणिला असता, तर तसें करणें तिला अशक्य नव्हतें. परंतु इंग्रजांचे सैन्यबल व साधनप्राचुर्य ह्यांचा तिला अनुभव असल्यामुळें तिनें तसा कोणताही अविचार मनांत आणिला नाही. परंतु तिच्या दुर्दैवानें, ब्रिटिश अधिकाऱ्यांस संशयपिशाचिकेनें पछाडल्यामुळें, तिला अत्यंत त्रास व विपत्ति हीं सोसावी लागलीं, त्यास उपाय नाहीं !.

 बायजाबाईसाहेबांस ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या अवकृपेमुळें जे क्लेश व जे ताप सहन करावे लागले, त्यांचें वर्णन बाईसाहेबांची प्रत्यक्ष भेट घेतलेल्या आंग्ल स्त्रियांनी वेळोवेळीं आपल्या ग्रंथांत दाखल केलें आहे. तें वाचलें ह्मणजे त्यांच्या अनुकंपनीय स्थितीबद्दल मनांत करुणा उत्पन्न झाल्यावांचून राहत नाहीं. मिसेस फेनी पार्क्स ह्या आंग्ल स्त्रीनें ता. ९ जून इ. स. १८३६ रोजीं अलहाबाद येथें बायजाबाईसाहेबांची भेट घेतली होती. त्या भेटीची नोंद आपल्या रोजनिशीमध्यें लिहितांना तिनें पुढील उद्गार काढिले आहेत :– "बायजाबाईसाहेबांस फार क्रूरपणानें व अन्यायानें वागविलें जात आहे. ज्या महाराणीनें ग्वाल्हेर संस्थानचा राज्यकारभार चालविला, तिला राहावयास येथें छप्पर देखील नाहीं. पर्जन्यकालास सुरवात झाली असून, तिला सक्तीनें तंबूमध्यें राहावयास लाविलें आहे; व तिच्या मर्जीविरुद्ध तिला राजकीय कैदी करून येथे ठेविलें आहे[]."
 अशा प्रकारें हाल अपेष्टा बायजाबाईसाहेबांस फारच सहन कराव्या लागल्या; एवढेंच नव्हे, तर त्यांच्या काशी येथील राजवाड्यांतून ३७।। लक्ष रुपये ब्रिटिश अधिकाऱ्यांनी जबरदस्तीनें जप्त केले व इंग्रजी खजिन्यांत नेऊन सुरक्षित ठेविले![] अशा रीतीनें त्यांस इंग्रज अधिकाऱ्यांनीं अप्रेमभावाने वागविलें. ह्या कष्टमय स्थितीबद्दल त्यांनी हिंदुस्थानचे गव्हरनरजनरल ह्यांस वेळोवेळी अर्ज पाठविले; व दुःखाने संतप्त होऊन, पुष्कळ झणझणित शब्दांनीं त्यांच्या हृदयास द्रव आणण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांस ह्या राजस्त्रीबद्दल दया आल्याचें दिसत नाहीं. एका अर्जामध्यें त्यांनी खुद्द गव्हरनरजनरलसाहेबांस असें लिहिलें होतें कीं, "लॉर्डसाहेब, आपण माझे संरक्षक असतांना मला अशा प्रकारच्या विपत्तियातना भोगाव्या लागल्या आहेत, ही फार आश्चर्याची गोष्ट आहे. ह्याबद्दल इतकेंच मानणें भाग पडतें कीं, हें केवळ आपल्यासारख्यास फार लज्जास्पद आहे!" बायजाबाईसाहेबांच्या ह्या स्पष्ट लिहिण्यानें गव्हरनरजनरलसाहेबांच्या मनावर कांहींएक परिणाम झाला नाहीं. त्यांनी त्यांस एवढेच उत्तर पाठविलें कीं, "मनुष्याच्या आयुष्यांत अशा प्रकारची स्थित्यंतरें हीं असावयाचींच. त्यावांचून कोणी सुटलें नाहीं. ह्याकरितां ईश्वरेच्छा समजून, शांतपणाने, नशीबीं काय असेल ते सोसिले [] पाहिजे !"

 ह्या सर्व गोष्टी बंडाच्या पूर्वीं कित्येक वर्षें घडलेल्या होत्या. तथापि बायजाबाईसाहेब ह्या कोणी सामान्य मनुष्य असत्या, तर त्यांच्या मनांत त्या वज्रलेपाप्रमाणें घट्ट बसून त्यांनी स्नेहभावाचा तेथें कधींही प्रवेश होऊ दिला नसता. किंबहुना, बंडासारखी चांगली संधि प्राप्त होतांच, त्यांनी दुखविलेल्या वाघिणीप्रमाणें चवताळून जाऊन त्यांचा सूड घेतला असता. परंतु अशा अप्रिय व अनिष्ट गोष्टी देखील सर्व विसरून जाऊन, बायजाबाईसाहेबांनीं ह्या बिकट प्रसंगी सार्वभौम प्रभूस उत्कृष्ट साहाय्य केलें, आणि सुवर्णाच्या कोंदणांत तेजस्वी रत्नाप्रमाणें चमकणारें आपल्या सुशील हृदयांतील प्रशंसनीय औदार्य सर्व जगास विश्रुत केले. ह्याबद्दल ह्या राजस्त्रीचें जेवढें अभिनंदन करावे तेवढें थोडेंच आहे.
इ. स. १८५७ च्या बंडामध्यें बायजाबाईसाहेब ह्या इंग्रजांच्या विरुद्ध होऊन बंडवाल्यांचा पक्ष स्वीकारतील कीं काय, अशी इंग्रज अधिकाऱ्यांस अतिशय भीति वाटत होती. त्यामुळें त्यांनी त्यांच्यावर एकसारखी नजर ठेविली होती. ह्या संबंधानें मरे साहेबांच्या "हिंदुस्थानांतील बंड" नामक ग्रंथामध्ये पुढील मजकूर लिहिला [] आहे :-

 "ह्याप्रमाणें चोहोंकडून एकत्र जमलेल्या व निरनिराळ्या हेतूनें प्रोत्साहित झालेल्या बंडवाल्या सैन्यानें महाराज शिंदे सरकार ह्यांस ग्वाल्हेरच्या गादीवरून पळवून लाविले; आणि शिंदे सरकार व त्यांचे दोस्त ब्रिटिश सरकार ह्यांच्या विरुद्ध नवीन राज्य संस्थापित केले. ह्या बंडवाल्यांच्या कारकीर्दीमध्ये बारा महिनेपर्यंत कंपनी सरकारचे जुने व अनुभवी कामगार, शिंदे घराण्यांतील एका विविक्षित माणसाकडे राजद्रोहाचा प्रवेश होईल की काय, अशी शंका बाळगून, त्याकडे एकसारखें लक्ष्य लावून बसले होते. हे माणूस ह्मणजे वयानें वृद्ध असलेल्या महाराणी बायजाबाईसाहेब ह्या होत. ह्यांचें ग्वाल्हेर येथें चांगलें वजन असून त्यांचें नांव सर्वत्र महशूर झाले होते. बंड होण्यापूर्वीं साठ वर्षें, 'दक्षिणची सौंदर्यलतिका' ह्मणून त्यांची प्रसिद्धि असून, इ. स. १७९७ सालच्या विजयी दौलतराव शिंद्यांच्या त्या पत्नी होत्या. त्यांनी साठ वर्षेंपर्यंत आपल्या आयुष्यांतील विविध स्थित्यंतरांचा अनुभव घेतला होता. व लग्न झाल्यानंतर तीस वर्षेंपर्यंत आपल्या यजमानावर व ग्वाल्हेरच्या दरबारावर वर्चस्व चालवून, पूर्वेकडील स्त्रियांचे ठिकाणीं सामान्यतः जी कार्यक्षमता दृष्टीस पडते, त्यापेक्षां अधिक कार्यक्षमता दाखविली होती. इ. स. १८२७ मध्यें दौलतराव शिंदे हे निपुत्रिक मरण पावले. त्यांच्या पश्चात् हिंदु चाली प्रमाणें बायजाबाईसाहेबांनीं शिंद्यांच्या कुलांतला एक मुलगा दत्तक घेतला, आणि त्यास गादीचा धनी केलें. बायजाबाईसाहेब ह्या मुख्य राज्यसूत्रचालक व मुकुटराव हे भावी राजे असे बनल्यानंतर, त्यांच्यामध्ये सात वर्षेंपर्यंत अनेक तंटेबखेडे झाले. शेवटीं, इ. स. १८३४ सालीं, मुकुटरावांस गादी मिळाली, वबायजाबाईसाहेबांस राज्यत्याग करून धोलपुरास जाणे भाग पडलें. तथापि, बायजाबाईसाहेब ह्या मुकुटरावांपेक्षां राज्यकारभार करण्यांत अधिक चतुर आहेत, अशी लोकांची समजूत असल्यामुळें कलह चालू झाला; व ग्वाल्हेरच्या पुष्कळ मराठे सरदारांस त्यांनींच राज्यकारभार करावा हे पसंत वाटूं लागलें. न्यायाकरितां ह्मणा, अथवा राजधोरणाच्या कांहीं विशिष्ट हेतूकरितां ह्मणा, परंतु ब्रिटिश सरकारानें बायजाबाईसाहेबांच्या विरुद्ध पक्ष स्वीकारिला; आणि त्यांनी त्यांस ग्वाल्हेर संस्थानच्या हद्दीबाहेर दूर ठिकाणी राहावे असा हुकूम फर्माविला. इ. स. १८४३ मध्ये मुकुटराव शिंदे मृत्यु पावलें, व ग्वाल्हेर संस्थानावर ब्रिटिश सरकारचें वर्चस्व अधिक स्थापित झाले. तेव्हां त्यांनी कैलासवासी महाराजांच्या घराण्यांपैकीं एक नवीन मुलगा पसंत करून त्यास शिंद्यांच्या गादीवर बसविलें. ह्या नवीन शिंदे सरकाराजवळ ह्या वृद्ध महाराणी बंडाचा प्रादुर्भाव होईपर्यंत राहिल्या होत्या, असें दिसून येते. ह्या सन्मान्य बाईसाहेबांच्या विरुद्ध चकार शब्द काढण्यास मुळींच जागा नव्हती; परंतु ज्या वेळीं बंड उद्भवलें, व झांशीची राणी, अयोध्येची बेगम ह्यांच्यासारख्या कर्तृत्वशाली स्त्रिया इंग्रजांच्या विरुद्ध पक्षास मिळाल्या, व बायजाबाईसाहेब ह्याही त्यांच्याप्रमाणें कर्तृत्वशाली आहेत हें जेव्हां इंग्रज मुत्सद्यांच्या लक्ष्यांत आले, तेव्हां त्यांच्या हालचालीवर नजर ठेवणें त्यांस अत्यंत अवश्य वाटूं लागलें. त्यांतूनही, कांहीं वर्षांपूर्वी, ग्वाल्हेर संस्थानांतील इंग्रजांच्या राजकीय वर्तनाविरुद्ध तक्रार करण्यास बायजाबाईसाहेबांस कांहीं सबळ कारण झालें असल्यामुळें, त्यांच्यावर सक्त नजर ठेवणें अधिक जरूर झालें. परंतु कितीही सूक्ष्म दृष्टीनें निरीक्षण केलें, तरी बायजाबाईसाहेबांचा बंडवाल्यांशी संबंध होता, असा संशय घेण्यासारखी एकही गोष्ट त्यांच्या वर्तनांत आढळून आली नाहीं.”

 ह्याप्रमाणें बायजाबाईसाहेबांसंबंधानें युरोपियन लोकांस जी शंका वाटत होती, ती त्यांच्या निर्मल वर्तनानें अगदीं वृथा ठरली; एवढेंच नव्हे, तर त्यांच्याकडून इंग्रज लोकांस व खुद्द महाराज जयाजीराव शिंदे ह्यांस अनपेक्षित परंतु अप्रतिम असें साहाय्य मिळालें.

 बायजाबाईसाहेब ह्यांच्या शहाणपणाचा व इभ्रतीचा लौकिक महाराष्ट्रांत व उत्तर हिंदुस्थानांत सर्वत्र पसरलेला असल्यामुळें, ह्या बंडाच्या प्रसंगी त्यांचे नांव पुढें करून, आपला पक्ष लोकप्रिय करण्याचा प्रयत्न बंडवाल्यांचे पुढारी रावसाहेब पेशवे, तात्या टोपेप्रभृति पुरुषांनी केला होता. इतकेंच नव्हे,तर बायजाबाईसाहेबांस अनुकूल करून घेण्याकरितां, त्यांनी आपला वकील रामचंद्रशास्त्री हा त्यांच्याकडे पाठविला होता. बायजाबाईसाहेब अनुकूल झाल्या, तर त्यांचे अपार द्रव्यभांडार प्राप्त करून घेण्याची, व त्यांच्या सत्कीर्तीचा व वजनाचा लोकचित्ताकर्षणाचे कामीं विद्युल्लतेप्रमाणें उपयोग करण्याची, बंडवाल्यांस फार फार आशा होती. परंतु बायजाबाईसाहेब ह्यांनीं, ह्या प्रसंगी आपल्या मनाची लोकोत्तर निश्चलता व्यक्त करून, बंडवाल्यांच्या कोणत्याही विनवणीचा किंवा भुलथापीचा त्यावर परिणाम होऊं दिला नाहीं. पूर्ववयांत त्यांना स्वतंत्र राज्यकारभार चालविण्याची महत्वाकांक्षा होती; व तत्प्रीत्यर्थ त्यांनी प्रयत्नही केला होता. परंतु ह्या वेळीं अविचारी बंडवाल्यांचें प्रभुत्व स्वीकारण्याची किंवा साम्राज्यवैभव उपभोगण्याची त्यांस इच्छा नव्हती. त्यांच्या ठिकाणीं युक्तायुक्त व कार्याकार्य जाणण्याची शक्ति चांगली असल्यामुळें त्यांनी बंडवाल्यांचा पक्ष स्वीकारिला नाहीं. एवढेंच नव्हे, तर बंडवाल्यांचीं सर्व पत्रें त्यांनी इंग्रज अधिकाऱ्यांकडे पाठविलीं, बंडवाले लोकांनीं ग्वाल्हेर प्रांतांतील प्रजेस व संस्थानच्या कामगार लोकांस अनुकूल करून घेण्याकरितां बायजाबाईसाहेबांच्या नांवाचा बळेंच उपयोग केला; व त्यांच्याकडून आपणांस पूर्ण अभयवचन असल्याची पत्रें आली आहेत, अशी खोटी गप्पही []उठविली. परंतु त्यांत तथ्यांश बिलकूल नव्हता, हें निराळे सांगवयास नकोच.
 बायजाबाईसाहेबांनी ह्या प्रसंगी महाराज जयाजीराव शिंदे व दिवाण दिनकरराव ह्यांच्या मसलतीप्रमाणें वागून, युरोपियन लोकांचें व त्यांच्या स्त्रियांचें संरक्षण करण्याचे काम चांगली मदत केली. इ. स. १८५७च्या मे महिन्यांत, ग्वाल्हेर येथील सैन्यानें ज्या वेळीं बंडाचा झेंडा उभारला, व आपलें रुद्रस्वरूप व्यक्त करून रेसिडेन्सीवर हल्ला केला, त्या वेळीं महाराज जयाजीराव शिंदे ह्यांनीं रेसिडेन्सीमधील युरोपियन लोक वे त्यांची बायकामुलें ह्यांस आपल्या राजवाड्यांत नेऊन तेथे त्यांचे जीव बचावले. त्या समयीं बायजाबाईसाहेब व शिंदे सरकारच्या महाराणी ह्या उभयतांनी त्यांस अभय देऊन त्यांची भीति दूर केली; व आपल्या खास मुतपाकखान्यांतून उत्तम उत्तम पक्वान्नें व निरनिराळे पदार्थ पाठवून त्यांच्या जेवणखाणाची उत्तम व्यवस्था केली. ही गोष्ट मेजर म्याक्फर्सन ह्यांनी ता. १० फेब्रुवारी इ. स. १८५८ रोजीं आग्र्याहून पाठविलेल्या रिपोर्टामध्यें दाखल केली आहे. ह्या वेळीं बायजाबाईसाहेबांनी जी मदत केली, तिची प्रशंसा करावी तेवढी थोडी आहे.

 ह्यानंतर ग्वाल्हेर येथें बंडवाल्यांचे प्राबल्य विशेष झालें, व शिंदे सरकारचें सर्व सैन्य फितलें जाऊन युरोपियन लोकांचे जीव सुरक्षित राहण्याची आशा नाहींशी झाली. तेव्हां महाराज जयाजीराव शिंदे व दिवाण दिनकरराव ह्यांनी त्यांस सुरक्षितपणें आग्रा येथें पोहोंचविले. पुढें कांहीं दिवसांनीं ग्वाल्हेरची स्थिति अतिशय भयंकर झाली, व बंडवाल्यांनी सर्व दिशा व्यापून टाकल्या. त्या वेळीं चतुर दिवाण दिनकरराव ह्यांनी फार शहाणपणाने राज्यसूत्रें चालवून, ह्या बंडवाल्या सैन्यास तेथेंच थोपवून ठेविले. त्यामुळें आग्रा येथील किल्याचा आश्रय करून राहिलेल्या सर्व युरोपियन लोकांचे रक्षण झालें. इ. स. १८५८ च्या मे महिन्यांत, बंडवाल्यांचे पुढारी तात्या टोपे, रावसाहेब पेशवे, झांशीची राणी, बांदेवाले नबाब हे ग्वाल्हेरीवर चालून आले, व त्यांनीं शिंदे सर कारच्या सैन्याशीं लढाई करून ग्वाल्हेर सर केली. ह्या वेळीं महाराज जयाजीराव शिंदे व दिवाण दिनकरराव ह्यांना इंग्रज सरकारच्या आश्रयास आग्र्यास पळून जाणें भाग पडलें. ह्या भयंकर प्रसंगीं बायजाबाईसाहेब ह्या ग्वाल्हेरीस होत्या. त्यांना सर्व ग्वाल्हेरचें राज्य अर्पण करण्याचें बंडवाल्यांनीं आमिष दाखविलें; परंतु बाईसाहेबांच्या दृढ निश्चयापुढें त्यांचा अगदी निरुपाय झाला. बंडवाल्यांचे अध्वर्यु रावसाहेब पेशवे ह्यांचा, शिंदे सरकार पळून गेल्यामुळें, पराकाष्ठेचा निरुत्साह झाला; आणि तशांत, बायजाबाईसाहेब अनुकूल होत नाहींत, हें पाहून तर त्यांचा सर्व मनोरथ ढासळून पडला.

 बायजाबाईसाहेब ह्यांनीं रावसाहेब पेशवे ह्यांची सर्व पत्रें मध्यहिंदुस्थानचे पोलिटिकल एजंट सर रॉबर्ट ह्यामिल्टन ह्यांच्याकडे पाठविली; आणि आपण आपल्या खास तैनातींतील लोकांसह महाराज शिंदे सरकाराप्रमाणें इंग्रज सैन्यास जाऊन सामील झाल्या. शिंदे सरकारच्या सर्व राजस्त्रिया बंडवाल्यांनीं ग्वाल्हेर सर केल्यानंतर नरवरास गेल्या. त्या वेळीं प्रथमतः, बायजाबाईसाहेब त्यांच्याबरोबर गेल्या कीं काय, हे बरोबर समजत नाहीं. तथापि सर ह्यू रोज ग्वाल्हेरीवर चालून आले, त्या वेळीं ह्या त्यांच्या सैन्याबरोबर होत्या, असा पुरावा सांपडतो. बंडवाल्यांच्या आटोक्यांतून ज्या वेळी ह्या राजस्त्रिया निसटून गेल्या, त्या वेळीं बायजाबाईसाहेबांची नात गजराजा हिनें अलौकिक शौर्य व धैर्य व्यक्त केलें. ही स्त्री बायजाबाईसाहेबांच्या शिक्षेमध्यें घोड्यावर बसण्यांत व तरवार चालविण्यांत तरबेज झाली असून हिच्या अंगी शौर्यगुण चांगला वसत होता. ग्वाल्हेर येथें बंडवाल्यांची धामधूम चालली असतांना, बायजाबाईसाहेबांच्या राजवाड्यामध्यें, शिंदे सरकारावर कांहीं बिकट प्रसंग गुदरल्याची वार्ता आली. त्या वेळीं गजराजासाहेब ही घोड्यावर स्वार होऊन व हातामध्यें नंगी समशेर घेऊन, शिंदे सरकारच्या राजवाड्यांत बंडवाल्यांच्या
गर्दींतून एकसारखी धांवत गेली; व बंडवाल्यांनीं तोफा व बंदुकी ह्यांचा मारा चालविला असतांना, त्यांतून प्रवेश करून, महाराजांचा शोध करूं लागली. तेथें महाराज सुखरूपपणें आग्र्यास गेले अशी जेव्हां तिची खात्री झाली, तेव्हां ती त्या गर्दीतून तशीच परत आली. तिचें धारिष्ट व शौर्य पाहून सर्व लोकांस परमावधीचें आश्चर्य वाटलें. असो. येणेंप्रमाणें खुद्द शिंदे सरकार व त्यांच्या सर्व राजस्त्रिया बंडवाल्यांस अनुकूल न होतां, त्यांच्या तावडीतून निसटून सुरक्षितपणें ग्वाल्हेर राजधानीच्या बाहेर गेल्या.

 शिंदे सरकार ग्वाल्हेरीहून निघून गेल्यानंतर बंडवाल्यांनी ता. १ जून इ. स. १८५८ पासून अठरा दिवसपर्यंत तेथें आपलें साम्राज्य चालविलें. त्या अवधीमध्यें त्यांनी तेथें जी बेबंदबादशाही स्थापन केली, तिचें वर्णन झांशीच्या राणीच्या चरित्रांत सादर केले आहे. ह्यास्तव त्याची पुनरुक्ति करण्याचें येथें प्रयोजन नाहीं. ता. १८ जून इ. स. १८५८ रोजीं सर ह्यू रोज ह्यांचे सैन्य ग्वाल्हेरीवर चालून आलें, व त्यांचा व बंडवाल्यांचा घनघोर रणसंग्राम होऊन त्यांत विरुद्ध पक्षाकडील रणशूर सेनानायिका झांशीची राणी लक्ष्मीबाई ही धारातीर्थीं पतन पावली; आणि बंडवाल्यांची वाताहत होऊन ग्वाल्हेरनगरी इंग्रज सेनापतीच्या ताब्यांत आली. नंतर तेथें ता. १९ रोजीं, सर ह्यू रोज, सर रॉबर्ट ह्यामिल्टन, व मेजर म्याक्फर्सनप्रभृति विजयी योद्ध्यांनी अलिजाबहादरांच्या लष्कर राजधानींत प्रवेश केला, आणि आपले दोस्त परम विश्वासू महाराज जयाजीराव शिंदे ह्यांना गादीवर बसविण्याचा विजयोत्साहपूर्वक प्रचंड समारंभ केला. ग्वाल्हेरचें विजयवृत्त ऐकून गव्हरनरजनरल लॉर्ड क्यानिंग ह्यांस अत्यंत हर्ष झाला. त्यांनी शिंदे सरकारास राज्यारूढ करण्याबद्दल पूर्ण परवानगी दिली; आणि हें आनंदकारक वर्तमान सर्व हिंदुस्थानभर कळवून, प्रत्येक शहरीं शिंदे सरकारास सन्मानपूर्वक व जयघोषसूचक तोफांची सलामी द्यावी ह्मणूने आज्ञा फर्माविली. त्यामुळें सर्वत्र विजयोत्सव होऊन आनंदीआनंद झाला. शिंदे सरकारच्या 'फुलबाग' येथील प्रासादामध्यें रोषनाई, मेजवान्या व दरबार ह्यांचा थाट उडाला, व शिंदे सरकारच्या अप्रतिम साहाय्याबद्दल सर्व ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांचे फार फार धन्यवाद गायिले. ह्या प्रसंगी बायजाबाईसाहेब ह्यांचाही योग्य गौरव करण्यांत आला, हें निराळें सांगावयाचे प्रयोजन नाहीं. महाराज जयाजीराव व बायजाबाईसाहेब ह्यांचा समावेश 'शिंदे सरकार' ह्या एकाच नांवांत होतो.

 शिंदे सरकारच्या कृपासाहाय्याबद्दल आग्रा येथील दरबारामध्यें हिंदुस्थानचे गव्हरनरजनरल लॉर्ड क्यानिंग ह्यांनी ता.२ डिसेंबर इ. स. १८५९ रोजी त्यांचा फार सत्कार केला; व त्यांचे कृतज्ञतापूर्वक अत्यंत आभार मानून त्यांस दत्तकाची परवानगी दिली, व त्यांच्यावर अनेक प्रकारच्या मेहेरबान्या करून त्यांस तीन लक्षांचा मुलूख बक्षीस दिला. ह्या प्रसंगी त्यांनी आपल्या भाषणामध्ये, "शिंद्यांचे राजानिष्ठ व प्रतापशाली घराणें हें अक्षय्य नांदत राहून त्याचा सदैव उत्कर्ष व्हावा अशी सार्वभौम ब्रिटिश सरकारची अंतःकरणपूर्वक इच्छा आहे, अशी महाराज शिंदे सरकार व त्यांचे प्रजाजन ह्यांनी खात्री बाळगावी[]" असें आश्वासन दिले. ह्यांतील प्रत्येक शब्दच काय, परंतु प्रत्येक अक्षर देखील बहमूल्य रत्नाच्या किंमतीचें असून, त्याची योग्यता वरील जहागिरीपेक्षाही अधिक आहे, असे ह्मटल्यावांचून आमच्याने राहवत नाहीं. इ. स. १८५७ च्या बंडामध्यें शिंद्यांच्या घराण्यानें ब्रिटिश सरकारावर केलेले उपकार जसे यावचंद्रदिवाकरौ विसरण्यासारखे नाहींत, तसे हे शब्दही यावच्चंद्रदिवाकरौ विसरले जाणार नाहींत अशी आशा आहे. ह्याच प्रसंगी गव्हरनरजनरलसाहेबांनीं, शिंदे सरकारचे दिवाण दिनकरराव ह्यांच्या अप्रतिम राजनिष्ठेबद्दल व अद्वितीय साहाय्याबद्दल त्यांचा योग्य नामनिर्देश करून त्यांचा उत्कृष्ट रीतीनें सन्मान केला; आणि त्यांच्या संबंधाने असे उद्गार काढिले कीं, "अशा संकटप्रसंगी आपल्या राज्यकर्त्याची सेवा करणारा आपल्यासारखा स्वामिनिष्ठ, धैर्यवान् आणि शहाणा दिवाण क्वचितच अवतीर्ण झाला []असेल." हे धन्यवाद दिवाण दिनकरराव ह्यांस व त्यांच्या यजमानांस सारखेच भूषणावह होत ह्यांत शंका नाहीं.

 असो. ह्याप्रमाणें महाराज शिंदे सरकार ह्यांनीं व त्यांच्या पितामही श्रीमती बायजाबाईसाहेब ह्यांनीं इंग्रज सरकारास अत्युत्कृष्ट साहाय्य केलें, त्याचें उत्तम सार्थक झाले. ह्या साहाय्यामुळें इंग्रजी राज्यावर आलेलें भयंकर संकट दूर होऊन तें चिरस्थायी झालें, ही गोष्ट निर्विवाद आहे. महाराज जयाजीराव शिंदे ह्यांच्या अनुकूलतेमुळें इंग्रजी राज्य बचावलें गेलें, ही गोष्ट इंग्रज ग्रंथकारांनी प्रांजलपणें कबूल केली आहे. ग्वाल्हेरचे रेसिडेंट मेजर म्याक्फर्सन ह्यांनी "शिंदे सरकार विरुद्ध पक्षास सामील झाले असते, तर बंडास काय स्वरूप प्राप्त झालें असते, ह्याची कल्पना करवत नाहीं." असे स्पष्ट उद्गार काढिले आहेत. त्याचप्रमाणें मध्यहिंदुस्थानचे पोलिटिकल एजंट सर रॉबर्ट ह्यामिल्टन ह्यांनी ता. २६ एप्रिल १८५८ च्या एका खलित्यामध्यें बायजाबाईसाहेबांचा नामनिर्देश करून असे लिहिले आहे कीं, "पेशव्यांच्या पक्षानें, होळकर, बायजाबाईसाहेब आणि शिंदे ह्या तिघांच्या नांवांचा उपयोग करून, लोकांमध्ये असंतोष उत्पन्न करण्याचे कामीं व राजद्रोह वाढ विण्याचे कामीं शक्य तितका प्रयत्न केला. परंतु ह्या प्रत्येकाच्या ब्रिटिश सरकाराविषयींच्या खऱ्या भक्तीमुळें त्यास यश न येऊन, तो हताश, झाला. ह्या त्रयीपैकीं एकाने जरी पेशव्यांचा पक्ष स्वीकारिला असता, तरी आह्मांस किती अडचणी प्राप्त झाल्या असत्या, त्याची कल्पना करवत नाहीं. तसें झालें असतें, तर ठाकूर लोक व जमीनदार लोक लगेच त्यांस मिळाले असते; आणि प्रत्येक गांव उघडपणें आमच्या विरुद्ध होऊन पदोपदीं आह्मांस विघ्न आलें असतें. शेवटी आमचा विजय झाला असता ह्याबद्दल कोणास शंका नाहीं; परंतु एतद्देशीय संस्थानिक आमच्या विरुद्ध होऊन पुष्कळ दिवसपर्यंत हिंदुस्थानांत एकसारखें युद्ध चाललें असतें, तर त्या योगानें युरोपखंडामध्यें देखील अनेक भानगडी उत्पन्न झाल्या असत्या; आणि आह्मांस जी नेटिव्ह सैन्याची फायदेशीर व महत्त्वाची मदत मिळाली, ती नाहींशी झाली असती[]."
 सर राबर्ट ह्यामिल्टन ह्यांच्यासारख्या चतुर मुत्सद्यांच्या लेखणींतून हे शब्द निघाले असल्यामुळें त्यांची योग्यता किती आहे, हें निराळे सांगण्याचें प्रयोजन नाहीं. ह्यावरून बायजाबाईसाहेबांनी ह्या प्रसंगी ब्रिटिश सरकाराशीं जें दोस्तीचें व एकनिष्ठपणाचें वर्तन केलें, तें त्यांस किती महत्त्वाचें व कल्याणप्रद झालें, हें आपोआप सिद्ध होतें. अर्थात् बायजाबाईसाहेबांचा व ब्रिटिश सरकारचा मागील राजकीय संबंध आणि प्रस्तुतचें त्यांचें सोज्वल व सप्रेम वर्तन ह्यांची तुलना केली, ह्मणजे ह्या वयोवृद्ध, सुशील, आणि सत्वस्थ राजस्त्रीसंबंधानें, मोरोपंतांच्या वाणीने,

आर्या
सुजनातें सुखवाया सुयशें वरिती परासुता राजे ।
निवविति चंदन गंधें छेदूं देती परा सुतारा जे ॥ १ ॥

किंवा, सुभाषितकारांच्या वाणीनें,

सुजनो न याति विकृतिं परहितनिरतो विनाशकालेऽपि ।
छेदेऽपि चन्दनतरुः सुरभयति सुखं कुठारस्य ॥ १ ॥

असे ह्मटल्यावांचून राहवत नाहीं.


बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र (page 174 crop)
  1.  1. "Surely she is treated cruelly and unjustly - she who once reigned in Gwalior has now no roof to shelter her: the rains have set in; she is forced to live in tents, and is kept here against her will, — a state prisoner, in fact."- Wanderings of a Pilgrim, Vol. II. page 51.
  2.  १. काशी येथील बायजाबाईसाहेबांचा खजिना जप्त केल्याचा उल्लेख मिसेस फेनी पार्क्स ह्यांनी केला आहे. ह्या बाई काशी येथील बायजाबाईसाहेबांचा वाडा पाहण्याकरितां गेल्या होत्या. ज्या वेळीं त्यांनी त्यांच्या खजिन्याच्या पेट्या पाहिल्या त्या वेळीं त्यांस त्यांतील अठरा हजार मोहरा कंपनी सरकाराने नेल्या असें समजून आले. त्या लिहितात ;-
     "The Mahratta, who did the honours on the part of her Highness, took me into one of the rooms, and showed me the two chests of cast-iron, which formerly contained about eighteen thousand gold mohurs. The government took that money from the Bai by force, and put it into their treasury. Her Highness refused to give up the keys, and also refused her sanction to the removal of the money from her house; the locks of the iron chests were driven in, and the tops broken open; the rupees were in bags in the room; the total of the money removed amounted to thirty-seven lakhs."-Page 63.
  3.  1. "The Bai, in her correspondence with the Governor-General, always-unhesitatingly asserted that he had confirmed her in the Regency, and authorised her to continue in the management of the State. "It is very extraordinary" she remarks, "that while your Lordship is my protector, such injuries have been inflicted on me, a circumstance which cannot but be considered a cause of shame to yourself." The only answer she received was the remark that no station in life was exempt from vicissitudes, and an exhortation to bear her with resignation.”–Mill's History of India.
  4.  1. "Thus did a body of rebels, collect from different quarters, and actuated by different motives, expel the Maharaja Scindia from the throne of Gwalior, and install a government avowedly and bitterly hostile to him and to the British with whom he was in alliance. Throughout twelve months events at Gwalior, the more experienced of the Company's officers frequently directed their attention to a certain member of Scindia's family, in doubt whether treachery might have been exhibited in that quarter. This was a princess, advanced in life, whose influence at Gwalior was known to be considerable, and whose experience of the checkered politics of Indian princedom had extended over a very lengthened period. She was known as the Baiza Baiee of Gwalior. Sixty years before the mutiny began, she was the beauty of the Deccan, the young bride of the victorious Dowlat Rao Scindia of 1797; and she lived through all the vicissitudes of those sixty years. During thirty years of married life she exercised great influence over her husband and the Court of Gwalior, exhibiting more energy of purpose than is wont among eastern women. In 1827 Scindia died without a legitimate son; and the widow, in accordance with Indian custom adopted a kinsman of the late Maharaja to be the new Scindia. The Baiza Baiee as regent, and Mugut Rao as expectant Rajah, had many quarrels during the next seven years; these ended, in 1834, in the installation of the young man us Rajah, and in the retirement of the widowed princess to Dholpur. Tumults continued: for the princess was considered the more skilful ruler of the two, and many of the Mahrattas of Gwalior wished her to continue as regent. Whether from justice, or from motives of cold policy, the British Government sided with Scindia against the Baiza Baiee ; and she was ordered to take up her abode in some district beyond the limits of the Gwalior territory. In 1843, when Mukut Rao Scindia died, this territory came more closely than before under British influence; a new Scindia was chosen, with the consent of the Governor-General, from among the relations of the deceased Maharaja ; and with this new Scindia the aged Baiza Baiee appears to have resided until the time of the mutiny. Nothing unfavourable was known against this venerable lady, but when it was considered that she was a woman of great energy, and that many other native princesses of great energy—such as the Ranee of Jhansi and the Begum of Oude—had thrown their influence in the scale against the English, it was deemed proper to watch her movements. And this the more especially, as she had some cause to complain of the English policy in the Mahratta Dominions in past years. Although watched, however, nothing appeared to justify suspicion of her complicity with the rebels."

    -The Revolt in India, Page 509.

  5.  १ ग्वाल्हेरचे पोलिटिकल एजंट मेजर म्याक्फर्सन ह्यांच्या चरित्रांत, खुद्द रावसाहेब पेशवे ह्यांनी आमेन येथील शिंद्याच्या मुलकी कामगाराजवळ बायजाबाईसाहेबांची पत्रें आल्याबद्दल व शिंदे सरकारचें आपणास उत्तेजन असल्याबद्दल खोटी वल्गना केल्याचा उल्लेख आहे:-
     "About Amaen were posted, when the rebels crossed, 400 of Scindia's foot, 150 horse, and 4 guns. Scindia's Civil Officer told the Rao Saheb, 'It is the order of the Maharajah and the Dewan that you retire.' 'And who,' replied the Rao Saheb, 'are you ? A ten-ruppee underling of a Soobah, drunk with bhang! And who are the Maharajah and Dinkar Rao ? Christians! We are the Rao and Peishwa. Scindia is our slipper-bearer. We gave him his kingdom. His army has joined us. We have letters from the Baiza Baiee, Scindia himself encourages us. Tantia Topeh has visited Gwalior and ascertained all. He having completed everything I am for the Lushkar. Would you fight with us ? All is mine'. Scindia's detachment did not attempt resistance."

    -Memorials of Service in India, Page, 333.

  6.  1. "Your Highness and all your Highness' subjects may be sure that it is the earnest desire of the paramount power that the loyal and princely house of Scindhia shall be perpetuated and flourish."
  7.  1. "I believe that seldom has a ruler been served in troubled times by a more faithful, fearless and able minister than yourself."
  8.  1 " * * * It cannot be denied that nothing has been left undone by the Peishwa's party, in the Deccan especially, to use his Highness' name with that of the Baiza Baee and Sindiah to create distrust and excite sedition,* * * * What has really foiled them has been the personal fidelity of Holker, Sindiah and Baiza Baee. Had any one of these declared for the Peishwa, our difficulties would have been beyond conception; the smaller Thakoors and rural chiefs would have instantly joined the standard of their sovereign; every village would have been openly hostile ; and every impediment thrown in our way. That we should have ultimately conquered no one will doubt; but a protracted war in India, with native sovereigns against us, might have led to complications in Europe, and withdrawn from us that support from native mercenaries which has been so advantageous and important."
     -Letter from Sir R. Hamilton to G. F. Edminstone Esqr., Secretary to the Government of India. Parliamentary Papers A. D. 1960.