बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र/ग्वाल्हेर येथील राज्यक्रांति व बायजाबाईसाहेबांचा वनवास

भाग ७ वा.
बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र (page 126 crop) 2
ग्वाल्हेर येथील राज्यक्रांति व बायजाबाईसाहेबांचा वनवास.

 हाराज जनकोजीराव व बायजाबाईसाहेब ह्यांच्यामधील कलह मिटविण्याबद्दल बाह्यात्कारें तरी निदान ग्वाल्हेरचे रेसिडेट मि. क्याव्हेंडिश ह्यांनी पुष्कळ खटपट केली. परंतु तिचा काहींएक उपयोग न होतां, त्यांच्यामधील वितुष्ट अधिकच वाढत गेलें; आणि ता. १० जुलई इ. स. १८३३ रोजीं ग्वाल्हेर येथें उघड रीतीनें बंड झालें. महाराज जनकोजीराव ह्यांनीं ग्वाल्हेर येथील 'वरुण' व 'बहादुर' हे दोन कंपू अगोदरपासून आपल्याकडे अनुकूल करून घेतले होते, व त्यांचे अधिकारी जे शूर पुरभय्ये लोक होते त्यांच्याशीं वचनप्रमाण पक्कें करून, गादीवर बसल्यानंतर त्यांस मोठमोठे अधिकार देण्याचें मान्य केलें होतें. त्याचप्रमाणें महाराजांनी कर्नल जेकब ह्यांस अनुकूल करून त्यांच्या ताब्यांतील कंपू आपल्या मदतीस घेण्याचा प्रयत्न केला होता. परंतु कर्नल जेकब हे स्वतः अनुकूल न होतां, त्यांचे सैन्य मात्र फितलें होतें. ह्याप्रमाणें सैन्याच्या मदतीची चांगली सिद्धता झाली असें पाहून, महाराजांनीं बायजाबाईसाहेबांस राजवाड्यांत कैद करून स्वतःच्या नांवाने द्वाही फिरविण्याचा निश्चय केला. ता. ८ जुलई इ. स. १८३३ रोजीं ते सहज हवा खाण्याचें निमित्त करून कर्नल जेकब ह्यांच्या कंपूमध्यें गेले; व तेथून इशारत करून कांहीं तरी सैन्याची हालचाल करणार, तों त्यांच्या आगमनाची बातमी कर्नल जेकब ह्यांनीं बायजाबाईंस कळविली; व महाराजांच्या हेतूप्रमाणे सैन्यानें कांहीं गडबड करूं नये ह्मणून सक्त ताकीद दिली. अर्थात् महाराजांचा हा बेत विसकटल्यामुळें ते निराश झाले; व त्या दिवशींची सर्व रात्र राजवाड्याबाहेर घालवून ते सकाळीं रेसिडेन्सीमध्यें गेले. परंतु रेसिडेंटसाहेबांची व त्यांची भेट झाली नाहीं. तेव्हां ते एका लिंबाच्या झाडाखालीं एकसारखें धरणें घेऊन बसले. पुढें रेसिडेंटसाहेब तेथें आले व त्यांनी त्यांस आपल्या बंगल्यामध्यें नेलें. तेथें त्यांचें बराच वेळ संभाषण झालें. परंतु रेसिडेंटांकडून त्यांना कांहीं मदत मिळाली नाहीं. तेव्हां शेवटीं ते निराश होऊन परत राजवाड्यांत गेले. राजवाड्यामध्यें त्यांच्या गुप्त मसलतीची बातमी कळली होती; ह्मणून तिच्यावर पांघरूण घालण्याच्या उद्देशानें त्यांनी बायजाबाईसाहेबांची भेट घेतली, व त्यांची माफी मागून झालेली चुकी पोटांत घालावी अशी त्यांची विनवणी केली; व पुनः असें करणार नाहीं ह्मणून त्यांच्याजवळ शपथ घेतली. परंतु त्यांचे हें सर्व वर्तन मायावी होते, असें लवकरच दिसून आलें.

 महाराज जनकोजीराव बायजाबाईसाहेबांच्या जवळ शपथक्रिया करून आपल्या महालांत गेले, त्याच रात्रीं, हुकूमसिंग नामक एक पलटणीवरचा नाईक अगोदर ठरलेल्या गुप्त संकेताप्रमाणें राजवाड्यांत चोरून गेला; व त्यानें जनकोजीरावांच्या महालामध्यें शिडीवरून चढून जाऊन त्यांस अचानक उचलून खाली आणिलें. इकडे वरुण व बहादुर ह्या दोन पलटणी फितल्या असून, त्यांनी महाराजांस हस्तगत करून त्यांच्या नांवानें द्वाही फिरविण्याचा व बायजाबाईंस कैद करण्याचा संकल्प केला होता. त्याप्रमाणें त्यांनी महाराजांस हस्तगत करून फुलबागेमध्यें नेले; आणि त्या बायजाबाईंस कैद करण्याच्या प्रयत्नास लागल्या. बायजाबाईसाहेबांचे बंधु हिंदुराव ह्यांनीं महाराजांच्या चळवळीची गुप्त बातमी ठेविली होती. त्यांना महाराज राजवाड्यांतून पसार झाल्याचे वृत्त समजतांच, त्यांनी बायजाबाईसाहेबांवर अरिष्ट येणार असें मनांत आणून त्यांस सूचना केली. त्या वेळीं बायजाबाईसाहेब ह्या बाळाबाईच्या महालांत बसल्या होत्या. त्यांस इशारत पोहोंचतांच त्या, राजवाड्यासभोंवतालच्या सर्व सैन्याची गाफिलगिरी लक्ष्यांत घेऊन, अतिशय गुप्त रीतीनें हिंदुरावांच्या वाड्यांत निघून गेल्या. नंतर त्यांनी निरनिराळ्या सरदार लोकांस हजर होण्याबद्दल हुकूम पाठविले; परंतु कर्नल आलेक्झांडर ह्याच्याशिवाय तेथें एकही सरदार आला नाहीं. नंतर त्या, हिंदुराव घाटगे, आपासाहेब पाटणकर आणि आलेक्झांडरचे ७०० शिपाई ह्यांस बरोबर घेऊन मेण्यांत बसून रेसिडेन्सीकडे गेल्या. त्या वेळीं सर्व रस्त्यांची नाकेबंदी फितुर झालेल्या सैन्यानें केली होती, आणि बायजाबाईंस पकडण्याकरितां चार पलटणी आणि पंचवीस तोफा तयार करून ठेवल्या होत्या. एवढ्या मोठ्या सैन्याची दृष्टि चुकवून आपला बचाव करणें फार कठीण काम होतें. परंतु बाईसाहेबांनीं मोठ्या युक्तीनें विरुद्ध पक्षाच्या हातावर तुरी देऊन आपलें संरक्षण केलें, ही फार प्रशंसनीय गोष्ट आहे. सर्व सैन्य खवळलेलें असतांना व शत्रुवर्ग आपणांस कैद करण्यास टपला असतांना त्यांच्या तावडींतून निसटून जाणें हें कृत्य सामान्य नव्हे.

 बायजाबाईसाहेबांनीं रेसिडेंटांकडे अगोदर आपला हलकारा पाठवून आपल्या भेटीस येण्याचा उद्देश त्यांस कळविला; व सैन्याची सर्व स्थितिही जाहीर केली. रेसिडेंट मि. क्याव्हेंडिश ह्यांनीं बायजाबाईंचा निरोप पोहोंचतांच, आपले असिस्टंट क्याप्टन रॉस ह्यांस महाराजांकडे पाठवून, फितुर झालेल्या सैन्यास आंवरून धरण्याबद्दल व बायजाबाईंस रेसिडेन्सीमध्यें येण्यास कोणत्याही प्रकारचा अडथळा न करण्याबद्दल ताकीद केली. बायजाबाईंस सुरक्षितपणे रेसिडेन्सीमध्यें येऊं दिलें, व सैन्याची कांहीं चलबिचल झाली नाहीं, तर त्यापासून जनकोजीराव ह्यांस फायदा होईल, असें मधाचे बोटही रेसिडेंटसाहेबांनीं लाविलें होतें. बायजाबाईंचें रेसिडेन्सीमध्यें जाणें ह्याचा अर्थ राज्यावरील आपला सर्व हक्क सोडून देणें, असाच महाराजांनीं समजावा, अशी रेसिडेंटसाहेबांनीं महाराजांजवळ ग्वाही भरली होती असें ह्मणतात. परंतु अशा बिकट प्रसंगीं देखील केवळ आत्मसंरक्षणाकरितां बायजाबाईंनीं रेसिडेंटांजवळ राज्याचा बेदावा कधींही लिहून दिला नसता, असें त्यावेळच्या एका माहितगाराचे मत आहे[]. अस्तु,

 बायजाबाई रेसिडेन्सीमध्यें आल्या व तेथें तंबूमध्यें येऊन राहिल्या. त्यांना कैद करण्याचा महाराजांच्या सैन्याचा निश्चय असल्यामुळें त्यानें ता. ११ रोजी पुनः बंड केले व रेसिडेन्सीवर हल्ला करण्याचा बेत केला. ह्या हल्यास भिऊन ह्मणा, किंवा लष्करी लोक हट्टास पेटले होते त्यांस संतुष्ट करण्याकरितां ह्मणा, किंवा कांहीं नाजूक राजकारणाच्या अंतस्थ उद्देशानें ह्मणा; परंतु मि. क्याव्हेंडिश ह्यांनीं सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन, महाराज जनकोजीराव ह्यांस गादीवर बसविण्याचे त्यांस अभिवचन दिलें; आणि महाराणी बायजाबाईसाहेब ह्यांस ग्वाल्हेरीहून दूर पाठविण्याचें कबूल केलें. त्याप्रमाणें ता. १३ जुलई इ. स. १८३३ रोजी त्यांनीं महाराज जनकोजीराव ह्यांस सिंहासनारूढ करून त्यांच्या नांवाने द्वाही फिरविली. व बायजाबाई ह्यांस प्रतिबंधांत ठेवून त्यांना ग्वाल्हेरच्या सरहद्दीबाहेर पाठविण्याचा निश्चय केला.

 बायजाबाई रेसिडेन्सीमध्ये गेल्या व त्यांनीं रेसिडेंट मि. क्याव्हेंडिश ह्यांची भेट घेतली. परंतु त्यांस तेथील सर्व प्रकार एकदम विलक्षण दिसून आला. आजपर्यंतचा बायजाबाईंचा व ब्रिटिश सरकारचा संबंध फार स्नेहभावाचा असून, हरएक बाबतींत ब्रिटिश रेसिडेंट ह्यांनीं बायजाबाईंचा पक्ष घेऊन त्यांस साहाय्य केलें होतें. त्याप्रमाणें पाहिलें असतां, ब्रिटिश रेसिडेंटानें ह्या आणीबाणीच्या प्रसंगी बायजाबाईंचा पक्ष घेऊन त्यांस मदत करणें योग्य होतें. परंतु तसा कांहींच प्रकार न होतां, रेसिडेंटांनीं बायजाबाईंस ग्वाल्हेरच्या गादीवर तुळसीपत्र ठेवून गंगातीरीं हरी हरी करीत बसण्याचा उपदेश करावा, व ज्या तरुण व अविवेकी महाराजांच्या कृती ब्रिटिश रेसिडेंटांस कधींही रुचल्या नव्हत्या, त्यांस एकदम गादीवर बसविण्यास त्यांची मनोदेवता प्रसन्न व्हावी, हा काय अपूर्व चमत्कार आहे हें सांगता येत नाहीं. हिंदुस्थान सरकारांनी हा वेळपर्यंत बायजाबाईसाहेब जें करतील तें प्रमाण समजून तटस्थ वृत्ति धारण केली होती; व ग्वाल्हेर संस्थानच्या राजकारणांत हात घालावयाचा नाहीं असा त्यांचा निश्चय होता. परंतु त्यांची ही तटस्थ वृत्ति (जीस इंग्रजीमध्यें Non-interference Policy ह्मणतात ती) एकदम बदलण्याचें काय प्रयोजन झालें असावें तें समजत नाहीं. तात्पर्य, ग्वाल्हेर येथें तरुण महाराजांच्या फुसलावणीनें जे बंड झालें, त्याचा परिणाम राज्यक्रांति हा होऊन, महाराणी बायजाबाईसाहेब ह्यांस राज्याधिकारास मुकावें लागलें; व महाराज जनकोजीराव शिंदे ह्यांच्या इच्छेप्रमाणें त्यांस गादी मिळाली. ह्या राज्यक्रांतीमध्यें आंग्ल राजनीतीचें स्वरूप एकदम कां बदललें, हे ऐंद्रजालिक गूढ समजणें फार कठीण आहे. तथापि, वामन पंडितांनीं ह्मटल्याप्रमाणें :-

श्लोक.

केव्हां सत्य वदे वदे अनृतही केव्हां वदे गोडही।
केव्हां अप्रियही दयालुहि असे केव्हां करी घातही ॥
जोडी अर्थहि जे यथेष्ट समयीं कीं वेंचही आदरी ।
ऐशी हे नृपनीति भासत असे वारांगनेचेपरी ॥ १ ॥

राजनीति ही चंचल व वारांगनेप्रमाणें बहुरूप धारण करणारी असल्यामुळें ती स्वार्थ साधण्याकरितां एकदम बदलली असल्यास त्यांत आश्चर्य मानण्याचेंही कारण नाहीं.[]
 बायजाबाई रेसिडेन्सीमध्यें आल्यानंतर, ब्रिटिश रेसिडेंट मि. क्याव्हेंडिश ह्यांनी त्यांस ग्वाल्हेर सोडून बाहेर जाल, तर महाराज जनकोजीराव ह्यांचेकडून तुह्मांस कांहीं उपद्रव होणार नाही, असें अभिवचन दिलें; व त्यांना आपखुषीनें किंवा खुषीच्या सक्तीनें ग्वाल्हेर संस्थानच्या बाहेर पाठविलें. बायज़ाबाईसाहेब ह्यांजवर ह्या वेळीं महत्संकट आल्यामुळें त्यांना नाइलाजास्तव ब्रिटिश रेसिडेंटाचें ह्मणणें कबूल करावें लागलें, व तत्काळ त्या ग्वाल्हेर सोडून प्रथमतः सहा मैल अंतरावर कसोली ह्मणून गांव आहे तेथें गेल्या; व तेथून धोलपुरास गेल्या. धोलपूर येथें त्यांनी कांही दिवस मुक्काम केला व ब्रिटिश सरकारास विनंतिपत्रें पाठवून आपली दाद घ्यावी ह्मणून विनंति केली. परंतु तिचा कांहींएक उपयोग झाला नाहीं. उलट, त्या परत ग्वाल्हेरीस येऊन कांहीं गडबड करतील ह्मणून त्यांस आग्र्यास दूर अंतरावर पाठविलें. धोलपुराहून त्या गेल्या, त्या वेळीं त्यांचेजवळ ५००० पाय दळ व १००० घोडेस्वार होते. आग्र्यास गेल्यानंतर बायजाबाईसाहेब .. ह्या रिकाबागंजामध्यें बिद्दीचंद्र शेट ह्यांच्या वाड्यांत राहिल्या होत्या. ग्वाल्हेरीहून आग्र्यास जाईतोंपर्यंत त्यांचे प्रवासामध्यें फार हाल झाले व ब्रिटिश सरकारच्या गैरमर्जीचीं कटु फलेंही अनुभवण्याचे त्यांस अनेक प्रसंग आले.

 बायजाबाईसाहेब ग्वाल्हेरीहून गेल्यानंतर ब्रिटिश रेसिडेंट मि क्याव्हेंडिश ह्यांनी महाराज जनकोजीराव शिंदे ह्यांस राज्यारूढ करून सर्व मुखत्यारी दिली. महाराज जनकोजीराव हे ग्वाल्हेरच्या सैन्याच्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या सर्वस्वीं आधीन होऊन त्यांच्या तंत्राने वागूं लागले. त्यामुळे ते अधिकारी फार प्रमत्त होऊन, ग्वाल्हेरचें राज्य ह्मणजे केवळ लष्करी लोकांचें साम्राज्य झालें. महाराजांनीं नारोपंत आपटे ह्यांस दिवाणगिरीचीं वस्त्रें दिलीं, व रामराव फाळके, बळवंतसिंग मुनशी, मुल्लाजी शेट, उदाजी खडके, भाऊ पोतनीस वगैरे लोकांस दरबारांतील अधिकाराचीं कामें दिलीं. परंतु त्यांची एकंदर कारकीर्द अस्वस्थतेची व बेबंदशाहीची होऊन राज्यामध्यें एकसारखे तंटेबखेडे व दंगेधोपे चालले होते. महाराजांनी बायजाबाईंच्या वेळचे खजिन्याचे प्रमुख अधिपति मणीरामशेट ह्यांस कैद केलें व त्यांचा फार छल केला; त्याचप्रमाणें बायजाबाईंच्या लोकांचाही फार छल केला. तात्पर्य, बायजाबाईंच्या पश्चात् ग्वाल्हेर येथें बिलकूल शांतता न राहून प्रजा फार असंतुष्ट झाली. ह्या वेळीं ग्वाल्हेर दरबारांतील सर्व राजकारणांवर एकसारखी नजर ठेवण्यास मि. क्याव्हेंडिश ह्यांच्यासारखे खबरदार रेसिडेंट होते, ह्मणून रक्तपातासारखे भयंकर अनर्थ गुदरले नाहींत, हें भाग्यच समजलें पाहिजे.

 ग्वाल्हेर सोडल्यापासून बायजाबाईंच्या पाठीमागे एकसारखें दुर्दैव लागले होतें. आग्र्यास गेल्यानंतर त्यांची एकुलतीएक मुलगी चिमणाबाईसाहेब ही ता. १४ आक्टोबर इ. स. १८३३ रोजी बाळंत होऊन मृत्यु पावली. तिच्या मृत्यूनें बायजाबाईवर दुःखाचा डोंगर कोसळल्यासारखें झालें. ही मुलगी फार सुस्वरूप व सुस्वभावी अशी होती. बायजाबाईंची हिजवर अत्यंत प्रीति असून, ती केवळ त्यांना जीव कीं प्राण वाटत असे. अशा मुलीच्या मृत्यूनें त्यांची स्थिति अतिशय करुणास्पद व हृदयद्रावक व्हावी हें साहजिक आहे. स्वातंत्र्यहीन व राज्यहीन होऊन त्यांत आणखी प्रियकर अपत्याचा विरह व्हावा, ह्यापेक्षां अधिक दुःखाची गोष्ट कोणती आहे ? दुर्दैवानें दुःखपरंपरा सुरू झाली ह्मणजे ती मनुष्याचा कसा छल करिते, ह्याचें उदाहरण ह्या अभागी राजस्त्रीच्या अनुभवावरून घेण्यासारखें आहे. कवि मोरोपंत ह्यांनी एके ठिकाणीं ह्मटलें आहे :-

आर्या.
अनुकूल दैव असतां न समर्थ करावयास हानि यम ।
होतां तें प्रतिकूल प्रबलहि दुर्बलचि होय हा नियम ॥

हें अक्षरशः खरें आहे.

 बायजाबाईसाहेबांनीं आग्र्याहून ब्रिटिश रेसिडेंट व हिंदुस्थान सरकार ह्यांना आपली दुःखें कळवून, त्यांनी राज्याधिकार परत द्यावा अशाबद्दल वारंवार खलिते पाठविले; परंतु त्यांचा कांहीं उपयोग झाला नाहीं. उलट, त्यांचे आग्र्यास राहणें ग्वाल्हेरच्या सरहद्दीनजीक असल्यामुळें त्यांच्या गुप्त कटानें ग्वाल्हेर संस्थानास अपाय पोहोंचेल, ह्मणून त्यांची रवानगी आग्र्यापासून दूर अशा फत्तेगड गांवीं केली. व त्याप्रमाणें त्यांस कांहीं दिवस फत्तेगड ऊर्फ फरुकाबाद येथें एका निळीच्या कारखान्यामध्यें राहण्याचा प्रसंग आला. त्यावेळच्या त्यांच्या स्थितीबद्दल 'दिल्ली गॅझेट' 'मुफसल आखबार' वगैरे पत्रांत जे लेख प्रसिद्ध झाले आहेत, त्यांत त्यांची शोचनीय स्थिति व हालअपेष्टा ह्यांचे वर्णन केलेलें दृष्टीस पडते. फत्तेगड येथून बायजाबाईनीं, श्रीभागीरथीच्या तीरीं शृंगीरामपूर क्षेत्रीं राहाण्याबद्दल आपला मानस गव्हरनरजनरलसाहेबांस कळविला, परंतु तीही त्यांची विनंति मान्य झाली नाहीं. बायजाबाईसाहेब ह्या इ. स. १८३५ सालच्या अखेरपर्यंत फत्तेगड येथेंच होत्या. नंतर कोर्ट ऑफ डायरेक्टर ह्यांनीं त्यांना काशीस किंवा दक्षिणेंत जाण्याबद्दल सक्तीचा हुकूम पाठविला; व तो अमलांत आणण्यास त्यांस एक महिन्याची मुदत दिली. त्याप्रमाणें त्यांचे निघणें न झाल्यामुळें त्यांस क्याप्टन रॉस ह्यांनी लष्करी साहाय्यानें फरुकाबादेहून अलहाबादेस आणिलें.

 नंतर कांहीं दिवस बायजाबाईसाहेबांनी अलहाबाद येथे व बनारस येथें वास केला. पुढे इ. स. १८४० सालीं हिंदुस्थान सरकारनें मुंबई सरकारच्या परवानगीनें त्यांस गोदावरी नदीच्या कांठीं नासिक येथें राहण्याची मोकळीक दिली व चार लक्ष रुपये पेनशन करून दिलें. त्याप्रमाणें बायजाबाईसाहेब दक्षिणेंत येऊन नासिक येथे राहिल्या. इ. स. १८४० पासून इ. स. १८४५ पर्यंत त्यांचे वास्तव्य दक्षिणेंतच होतें.

 मध्यंतरीं ता. ७ फेब्रुवारी इ. स. १८४३ रोजी महाराज जनकोजीराव शिंदे हे मृत्यु पावले. मृत्युसमयीं त्यांची इच्छा बायजाबाईसाहेब ह्यांस भेटावे अशी फार होती. परंतु त्यांस ब्रिटिश सरकारची परवानगी न मिळाल्यामुळे तो योग घडून आला नाहीं. मृत्यूपूर्वीं महाराजांस आपल्या वर्तनाचा पश्चात्ताप होऊन, बायजाबाईसाहेबांची माफी मागावी व आपला राज्यकारभार पुनः त्यांचे स्वाधीन करावा, असाही सुविचार उत्पन्न झाला होता, असें ह्मणतात.

 महाराज जनकोजीराव ह्यांस औरस संतती नसल्यामुळें ब्रिटिश सरकारच्या परवानगीनें दरबारचे मुत्सद्दी कृष्णराव मामासाहेब कदम ह्यांनी त्यांच्या अल्पवयी महाराणी ताराबाई ह्यांचे मांडीवर शिंद्यांच्या वंशजांपैकीं हणमंतराव ह्यांचा मुलगा भगीरथराव ह्यांस ता. १९ फेब्रुवारी इ. स. १८४३ ह्मणजे माघ वद्य ५ शके १७६४ रोजीं दत्तक देऊन त्यांचे नांव महाराज जयाजीराव असें ठेविलें, व राज्यकारभार आपल्या हातीं घेतला. परंतु पुढें मामासाहेब व दादासाहेब खाजगीवाले ह्या दरबारांतील प्रमुख पुढाऱ्यांचा बेबनाव होऊन सर्वत्र घोंटाळा झाला; व राज्यामध्यें अशांतता उत्पन्न होऊन ग्वाल्हेर दरबार व इंग्रज सरकार ह्यांच्यामध्येंही तेढ उत्पन्न झाली. अखेर हिंदुस्थानचे गव्हरनरजनरल ह्यांस ग्वाल्हेर दरबारातील राजकारणाचे घोंटाळे नाहींसे करण्याकरितां ग्वाल्हेर येथें स्वतः येण्याचा प्रसंग आला. त्याप्रमाणें त्यांची स्वारी ग्वाल्हेरजवळ हिंगोणा येथें आली. तेथें त्यांच्याशीं तडजोड करण्याकरितां दरबारच्या वतीने बापू शितोळे हे गेले होते. परंतु सुलभ रीतीनें व सरळपणानें ह्या राजकारणाचा निकाल न लागतां, शिंद्यांचें सैन्य व इंग्रजांचे सैन्य ह्यांची महाराजपूर व पनियार येथें लढाई झाली.

 महाराजपूर व पनियार येथें शिंद्यांच्या पक्षास अपयश आल्यानंतर, गव्हरनरजनरलसाहेबांनीं महाराज जयाजीराव शिंदे ह्यांस आपल्या ताब्यात घेऊन, त्यांस ता. १३ जानेवारी इ. स. १८४४ रोजीं पुनः गादीवर बसविले; व ते अज्ञान आहेत तोपर्यंत त्यांचा राज्यकारभार पाहण्याकरितां रामराव फाळके, देवराव जाधव, मुनशी राजे बळवंतराव बहादुर, उदाजीराव घाटगे, मुल्लाजी शेट आणि नारायणराव भाऊ पोतनीस ह्या सरदारांचे मंत्रिमंडळ नेमिलें. ह्या मंत्रिमंडळाशीं तह करून, शिंदे सरकारानें सैन्याच्या खर्चाकरितां १८ लक्षांचा मुलूख कंपनी सरकाराकडे नेमून द्यावा, व ग्वाल्हेर संस्थानांत फक्त ६००० स्वार, ३००० पायदळ, ३२ तोफा आणि २०० गोलंदाज इतकें सैन्य ठेवावे वगैरे महत्वाचे मुद्दे ठरविले. ह्याप्रमाणें तह झाल्यानंतर ग्वाल्हेर येथे शांतता स्थापित झाली व संस्थानचा राज्यकारभार इ. स. १८५३ पर्यंत मंत्रिमंडळाचे विद्यमानें चालला. नंतर महाराज जयाजीराव शिंदे हे वयांत आले, व त्यांस हिंदुस्थान सरकारानें सर्व राज्याची मुखत्यारी दिली.

 येणेंप्रमाणें स्थिरस्थावर झाल्यानंतर बायजाबाईसाहेब ह्या पुनः उत्तर हिंदुस्थानांत गेल्या, त्या मग अखेरपर्यंत तिकडेच राहिल्या. महाराज जयाजीराव शिंदे ह्यांनी आपल्या वृद्ध आजीबाईंचा परामर्ष उत्तम रीतीनें घेऊन, त्यांस जनकोजीरावांच्या कारकीर्दींत जीं दुःखें भोगावी लागलीं, त्यांचा विसर पडेल अशा रीतीनें प्रेमादरपूर्वक वागविलें, हें त्यांस अत्यंत भूषणावह होय. बायजाबाईंनीं आपली नात जयाराजा ही खानविलकर घराण्यांत दिली होती; तिची कन्या चिमणाराजा ही जयाजीराव शिंदे ह्यांस देऊन ह्या उभयतांशीं वात्सल्यभावाचें वर्तन केलें. बायजाबाईसाहेब ह्या जयाजीराव महाराजांच्या कारकीर्दींत उज्जनी व लष्कर येथेंच राहत असत. ब्रिटिश सरकारानेंही इ. स. १८४४ नंतर त्यांचे सर्व प्रतिबंध दूर करून, त्यांना पूर्ण स्वातंत्र्य दिले होते. त्याचें फळ त्यांस इ. स. १८५७ सालीं फार उत्तम प्रकारचें मिळालें.


बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र (page 137 crop)
  1.  1 "It is, however, asserted, and I can scarcely doubt the truth, that the Resident positively pledged himself to the Rajah, that he should consider the Rajah’s allowing her escape to the residency as a virtual resignation of her claims; but I can assure you from personal information, that the Baiza bai never would have yielded her claims even situated as she was for any promises of protection that the Resident could have offered." -

    -India Gazette. November 13, 1833.

  2.  १. शिंद्यांच्या दरबारचे सर्जन डा. होप ह्यांनी ह्या प्रसंगी इंग्लिश राजनीतीचें धोरण दर्शविलें आहे, त्यावरून इंग्रज मुत्सद्यांच्या मनांत सुप्राप्त संधीचा कांहीं तरी चांगला फायदा करून घेऊन, मुंबईपासून आग्र्यापर्यंतचा प्रांत ब्रिटिश राज्यास जोडून टाकावा असा हेतु होता, असें ध्वनित होतें. ते लिहितात:-
     "* * * * Secret deliberations were there (in the Council of Calcutta ) being held, with a view to discover what profit could be made out of the troubles of this weak but most faithful young prince......A demi-official letter was written to the resident, by the Chief Secretary of the Foreign Department, desiring him to learn, at a private interview, by way of a feeler if the Maharaja, encircled as he was by serious troubles- troubles mainly caused by our Government- would like to resign; assigning over the country to the British Government, and receiving a handsome pension, which would be paid out of his own revenues. There can be very little doubt that this demi-official document was of the genus mystic, and that no copy of it can now be found among the archives pertaining to India. Mr. Cavendish, than no Englishman ever attained a greater ascendancy over the minds of the natives with whom he had concern, declined to make such a suggestion, and his answer
    threw a damp upon the hopes of the annexationists...... When his refusal to put the question of the pension reached Calcutta, and it was known then that all tumult had passed away, intense was the displeasure in all quarters......Presently another demi-official letter arrived; this time from the Deputy Secretary of the Foreign Department-a 'mystic' one we may be quite sure-strongly expostulating with Mr. Cavendish upon his proceeding, and concluding with this significant remark:—'you have thus allowed a favourable chance to escape of connecting the Agra to the Bombay Presidency.' Of course the Resident's doom was fixed, though not just then declared. A few months afterwards, the Governor-General gratified his feelings of resentment by removing Mr. Cavendish to another native court."

    -The House of Scindiea. Page, 27-28.