बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र/प्रस्तावना

प्रस्तावना.
.

 हिंदुस्थानच्या प्राचीन व अर्वाचीन इतिहासामध्यें ज्या राजकारणी, सद्गुणी, विदुषी, चतुर, साहसी, शूर, स्वाभिमानी, तेजस्वी, उदार, आणि धार्मिक अशा स्त्रिया होऊन गेल्या, त्यांची संख्या पुष्कळ आहे. परंतु त्यांच्या चरित्रांच्या अभावामुळे त्यांचे यश अगदी अप्रसिद्ध व संकुचित राहिले आहे. ह्या योगाने आमच्या राष्ट्रांतील स्त्रिया अगदी कमी प्रतीच्या लेखण्याचा प्रघात पडला आहे. परंतु वस्तुस्थिति तशी नाहीं. आमच्या देशांत “यत्र नार्यस्तु पूज्यन्ते, रमन्ते तत्र देवताः" अशा प्रकारची पूर्वीं स्त्रियांविषयी सन्मानबुद्धि असून, स्त्रियाही आपल्या उत्तम गुणांनी ह्या सन्मानास पूर्णपणे पात्र होत्या. परंतु त्यांची उज्ज्वल चरित्रे किंवा गुणमहिमा आमच्या नेत्रांसमोर नसल्यामुळे त्यांचे सद्गुण, त्यांची बुद्धिमत्ता आणि त्यांची कर्तृत्वशक्ति ह्यांविषयीं आमच्या मनांत यत्किंचितही प्रकाश पडत नाही. त्यामुळे त्यांच्याविषयीं ‘न स्त्रीस्वातंत्र्यमर्हती' असला अनुदार विचार मनांत ठाम बसून, त्यांना बंद्या गुलामाप्रमाणे वागविण्याची स्वाभाविक प्रवृत्ति पडली आहे. त्याकारणाने त्यांच्या शिक्षणाबद्दल व उन्नतीबद्दल निष्काळजीपणा उत्पन्न होऊन आमच्या संसाररथाचे एक चक्र अगदी लुळे पडले आहे व समाजाची व राष्ट्राची फार हानि झाली आहे. म्हणजे, पर्यायेंकरून, चरित्रप्रकाशनाच्या योगाने उत्तम गुणांचे प्रतिबिंब मनावर चांगल्या रीतीने उमटून, सत्कृत्याविषयी प्रेरणा-सद्गुण आणि सत्कृत्त्याविषयी आसक्ति ही उत्पन्न होऊन स्त्रीपुरुषांस जो अप्रतिम लाभ व्हावयाचा तो आमच्या देशांत चरित्रप्रकाशनाच्या अभावामुळें अगदी नाहीसा झाला आहे, असें म्हटलें असतां फारसा बाध येणार नाहीं.

 पौराणिक कालापासून आमच्या देशांतील प्रसिद्ध स्त्रियांच्या चरित्रांचे संशोधन केले, तर ती चरित्रे कोणत्याही राष्ट्रांतील तत्कालीन स्त्रियांच्या चरित्रांपेक्षा कमी मनोरम अथवा कमी सुरस आहेत असें म्हणतां येणार नाहीं. ग्रीस देशांतील सॅफो, ॲस्पाशिया, लेस, ऱ्हीन, टिमॉक्सेना ह्या प्राचीन स्त्रीयांची चरित्रे घेतली, किंवा रोमन राष्ट्रांतील लुशिया, व्हर्जिनिया, कॉर्नि लिया, पोर्शिया, हेलीना ह्या स्त्रियांची चरित्रे घेतली, किंवा इटालियन राष्ट्रांतील कोरिना हिचें चरित्रें घेतलें; तरी आमच्या राष्ट्रांतील अहल्या, सीता, तारा,मंडोदरी, कुंती, द्रौपदी इत्यादि स्त्रियांच्या परम पवित्र, पुण्यशील, चमत्कृति-प्रचुर आणि सुरस चरित्रांत जे स्वारस्य आणि जें अप्रतिमत्व आहे, तेंच आह्मांस परदेशीय स्त्रियांपेक्षां स्वदेशीय स्त्रिया ह्या नात्याने अधिक कौतुकास्पद व अभिनंदनीय असे वाटणें साहजिक आहे. ह्या वंदनपात्र साध्वी स्त्रियांसंबंधानें,

अहल्या द्रौपदी सीता तारा मंडोदरी तथा।
पंचकं ना स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ॥ १ ॥

ह्मणजे “अहल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंडोदरी ह्या पांच स्त्रियांचे जो नित्य स्मरण करील त्याचें महत्पापही नाश पावेल.” असा कोणी मार्मिकानें जो महिमा वर्णन केला आहे, तो अगदीं यथार्थ आहे. ह्या स्त्रियांप्रमाणेच, याज्ञवल्क्य ऋषीची पत्नी मैत्रेयी, वाचकूची मुलगी गार्गी, शकुंतला, गांधारी, उत्तरा, यशोदा, राधा, रुक्मिणी, दमयंती, उखा, वगैरे पुराणप्रसिद्ध स्त्रियांचीं चरित्रें महत्त्वाचीं व बोधपर असून, तीं हिंदुस्थानांत पुराणकालींही किती थोर स्त्रिया निर्माण झाल्या होत्या, हें सिद्ध करीत आहेत.

 ह्या पौराणिक कालांतून इतिहासाच्या कालांत आलें, ह्मणजे दिल्लीची राज्ञी प्रेमदेवी, कालिदासाची पत्नी विद्योत्तमा, भास्कराचार्यांची कन्या लीलावती, वराहमिहिराची बायको, आणि लक्ष्मणसेन राजाची महाराणी, ह्या विदुषी व शास्त्रपारंगत स्त्रिया दृष्टीस पडतात. ह्यानंतर हिंदुस्थानच्या वीरकाला (age of chivalry) मध्ये प्रवेश केला, तर रजपूत स्त्रियांच्या अलौकिक गुणांनीं नेत्र दिपून जातात. त्यांचे अपार शौर्य, अढळ पातिव्रत्य, अप्रतिम तेजस्विता, लोकोतर खामिभक्ति, असाधारण स्वार्थत्याग, आणि अपूर्व रणोत्साह पाहून अंतःकरण आनंदानें व आश्चर्यानें थक्क होऊन जाते; व अशीं स्त्रीरत्नें ज्या राष्ट्रांत निर्माण झालीं, तें राष्ट्र धन्य होय असें वाटतें. राणी संयोगिता, राजकन्या कूर्मदेवी, राणी पद्मिनी, गुर्जरदेशस्थ राज्ञी कमलदेवी व देवलदेवी, साध्वी मिराबाई, ग्वाल्हेरची राणी मृगनयना, ताराबाई, रूपमती, गढमंडलाची राणी दुर्गावती, जोधपुरची राजकन्या जोधाबाई, ह्यांची चरित्रें इतकीं वीररसपरिप्लुत व रमणीय आहेत कीं, त्यांच्या योगाने अंतःकरण तल्लीन झाल्यावांचून राहत नाहीं.

 ह्या रजपूत स्त्रियांनंतर मराठ्यांच्या स्त्रियांकडे वळलें, तर त्यांचींही चरित्रें तशींच मनोहर व रसभरित आहेत असे गर्वानें ह्मणतां येतें. ह्या सर्व महाराष्ट्र स्त्रियांमध्यें इंदूरच्या महाराणी अहल्याबाई ह्यांचे चरित्र अत्यंत पवित्र, अत्यंत रसाळ, आणि अत्यंत सोज्वल आहे. त्या चरित्राची बरोबरी सर्व राष्ट्रांतील व सर्व देशांतील एकाही स्त्रीचरित्रानें करवणार नाहीं. टॉरेन्स नामक इंग्रज ग्रंथकारानें अहल्याबाईची तुलना, रशियाची राणी क्याथराईन, इंग्लंडची राणी इलिझाबेथ, आणि डेन्मार्कची राणी मार्गारेट ह्यांच्याशी करून, देवी अहल्याबाई त्यांच्याहीपेक्षां अनेक सद्भुणांनीं श्रेष्ठ होती, असे प्रांजलपणे कबूल केले आहे. दुस-या एका इंग्रज ग्रंथकारानें ही साध्वी रूपाने सुंदर नव्हती, तरी वर्डस्वर्थ, कवीनें वर्णिल्याप्रमाणेः

“A perfect woman, nobly plann'd
To warn, to comfort, and command;
And yet a spirit still and bright
With something of an angel-light."

“सर्व जनांस सन्मार्ग दाखविण्याकरितां, त्यांना सुख देण्याकरितां, आणि त्यांच्यावर अधिकार चालविण्याकरितां निर्माण झालेली ही सर्वगुणसंपन्न अशी स्त्री परमेश्वराची एक अपूर्व कृति होती. तिची कांति तेजस्वी असून सुशांत अशी होती; किंबहुना ती एक तेजोमयी देवताच होती.” असें ध्वनित करून, निरभिमानतया असें कबूल केले आहे कीं, ही लोकोत्तर स्त्री आपली अपूर्व धर्मशीलता, उदात्त सुशीलता, निस्सीम कर्तव्यदक्षता, विलक्षण कार्यक्षमता, अद्भुत तेजस्विता आणि प्रशंसनीय उद्यमशीलता - इत्यादि सद्गुणांच्या योगानें हिंदुस्थानांतील पुण्यश्लोक व महाप्रतापी अशा कोणत्याही नृपवर्याच्या मालिकेंत, अथवा कोणत्याही राष्ट्रांतील स्त्रीजातीच्या अत्यंत तेजस्वी अशा रत्नावलींत, विराजमान होण्यासारखी आहे[]  अशी महासाध्वी-केवळ अवतारी-स्त्री मराठी राज्यांत निर्माण झाली असून, तिचें सविस्तर व साधार चरित्र उपलब्ध नसावें ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट होय[]  ! अहल्याबाईप्रमाणेंच मराठ्यांच्या इतिहासांत, जिजाबाई, येसूबाई, दीपाबाई, ताराबाई ह्या भोंसले घराण्यांतील व राधाबाई, काशीबाई व गोपिकाबाई ह्या पेशवे घराण्यांतील स्त्रिया चरित्रलेखनयोग्य आहेत. त्यांच्या तोडीच्या उमाबाई दाभाडे, मैनाबाई पवार, बायजाबाई शिंदे, आणि रखमाबाई चासकर ह्या प्रख्यात स्त्रिया होऊन गेल्या; परंतु त्यांची सुंदर व विस्तृत चरित्रे प्रसिद्ध नसल्यामुळें इतिहासग्रंथांत व जुन्या बखरींत फक्त त्यांचा नामनिर्देश मात्र दृष्टीस पडतो.

 ह्यांशिवाय वाराणशीबाई पेशवे व जिऊबाई फडनवीस ह्या स्त्रियांच्या संबंधाने युरोपियन लोकांनीं क्वचित् क्वचित् उल्लेख केलेला दृष्टीस पडतो. मेजर-जनरल सर आर्थर वेलस्ली ह्या प्रसिद्ध इंग्रजी सेनापतीने नाना फडनविसांची बायको जिऊबाई हिची भेट घेऊन, ता. १८ मे इ. स. १८०४ रोजीं, पुण्याचे रेसिडेंट कर्नल क्लोज ह्यांस असे कळविलें कीं, “ही बाई फार सुस्वरूप व सौंदर्यवती असून, हिच्या संबंधाने तहामध्ये कांहीं तजवीज व्हावी अशी हिची योग्यता आहे[] .” शेवटचे बाजीराव पेशवे व प्रतिनिधि ह्यांच्या स्त्रियांसंबंधानें ग्रांटडफसाहेबांनीं एके

ठिकाणीं फार प्रशंसा केली आहे. ग्रांटडफसाहेबांस शेवटच्या पेशव्यांची स्त्री वाराणशीबाई हिला वाईहून ब्रह्मावर्तास श्रीमंतांकडे पाठविण्याचा प्रसंग आला, त्या वेळी ह्या बाईने फारच चांगले वर्तन केले, असे त्यांनी लिहिले आहे. एवढेंच नव्हे, तर "हिंदुस्थानांतील उच्च वर्गातील लोकांशीं वागतांना त्यांच्या मानमरातबांत किंवा शिष्टाचारांत जोपर्यंत अंतर पडू दिलें नाहीं, तोंपर्यंत अगदीं श्रेष्ठ दर्जाच्या व विद्याचारसंपन्न अशा युरोपियन लोकांमध्ये जें सौजन्य व जी विनयशीलता आढळून येते, ती त्यांच्या ठिकाणीं दृष्टीस पडते, हे पाहून फार विस्मय वाटतो." असें मोठ्या कौतुकाने लिहिले आहे[] . असो.
 पेशवाईअखेरपर्यंत मराठ्यांच्या स्त्रियांमध्यें अलौकिक गुण होते, असेच केवळ मानण्याचें कारण नाहीं. अद्यापि देखील ब्रिटिश सरकारच्या कृपेनें अवशेष राहिलेल्या मराठे संस्थानांत राजकारस्थानपटु, धर्मनिष्ठ, ईश्वरभक्तिपरायण, परोपकाररत, आणि विद्याभिलाषी अशा स्त्रिया क्वचित् क्वचित् चमकत असतात. फलटण संस्थानांतील सगुणाबाई निंबाळकर, औंध संस्थानांतील आईसाहेब पंतप्रतिनिधि, डफळापूर येथील वाईसाहेव डफळे, आणि

आर्या.

सत्संगफल मिळालें सुगमपथा लाविलें मला पतिनें |
आस्वादिलें यथेष्ट द्विरदमुखकथासुधेसि मन्मतिनें ॥ १ ॥

अशा प्रेमळ व रसाळ वाणीने पतिकृपेचा महिमा वर्णन करून ईशस्तवनांत कालक्षेप करणाऱ्या कविराज कै. बापूसाहेब कुरुंदवाडकर ह्यांच्या पत्नी, ह्या स्त्रियाही कमी योग्यतेच्या नाहींत. परंतु त्यांची चरित्रें अथवा गुणवर्णनें प्रसिद्ध नसल्यामुळें निर्जन अरण्यांतील जातिकुसुमाप्रमाणे त्यांचा कीर्तिसौरभि कालरूपी वायू भक्षण करीत आहे.

 ह्या सर्व स्त्रियांची चरित्रें जसजशी प्रसिद्ध होतील, त्याप्रमाणें आपल्या राष्ट्रांतील स्त्रियांचे उत्तम गुण व त्यांची योग्यता अधिक प्रकाशित होऊन भावी पिढीस त्याचा फार फायदा होईल. परंतु हे काम इतिहासग्रंथ व चरित्रें ह्यांवांचून होणे दुरापास्त आहे. ह्याकरितां प्रत्येकाने यथामति व यथाशक्ति इकडे लक्ष्य देणें अवश्य आहे.

 हाच हेतु मनांत धरून झांशीच्या राणीचे चरित्र महाराष्ट्र भाषेत स्वतंत्र माहिती गोळा करून इ० स० १८९४ सालीं प्रसिद्ध करण्यांत आलें. त्याचा अनेक रसिक व सहृदय वाचकांनीं मोठ्या प्रेमभावानें स्वीकार केला, हें कळविण्यास फार संतोष वाटतो. ह्या पुस्तकास जरी महाराष्ट्रांत चांगला लोकाश्रय मिळाला नाहीं, तरी त्याची गुजराथी, बंगाली वगैरे परभाषांतून जीं भाषांतरें प्रसिद्ध झाली आहेत, तींच त्याच्या लोकप्रियतेची साक्ष होत. अशा प्रकारें प्रथम प्रयत्नास प्रोत्साहन मिळाल्यामुळें इतिहासप्रसिद्ध व कर्तृत्वशाली स्त्रियांची हळूहळू चरित्रमाला गुंफण्याचा आमचा दृढ संकल्प झाला आहे. त्या मालेचें "महाराणी बायजाबाईसाहेव शिंदे ह्यांचे चरित्र" हें द्वितीय पुष्प होय.

 बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे नांव जुन्या लोकांच्या मुखांतून मात्र आजपर्यंत ऐकू येत होतें; परंतु त्यांचे सुसंगत व साधार असें एकही चरित्र प्रसिद्ध नव्हतें. तें प्रसिद्ध करण्याच्या उद्देशानें अनेक इंग्रजी ग्रंथ व जुने लेख ह्यांतून माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात् हा अगदीं पहिला प्रयत्न असल्यामुळें हे चरित्र सांगोपांग व परिपूर्ण तयार करण्याइतकी विपुल माहिती मिळण्याचा संभव नाहीं. ह्मणून जेवढी माहिती उपलब्ध झाली, तेवढी ह्या चरित्रामध्यें दाखल करून हें ऐतिहासिक चरित्र महाराष्ट्र वाचकांस सादर केले आहे. बायजाबाईसाहेब शिंदे ह्या गेल्या शतकांतील राजकारणी व कर्तृत्वशाली स्त्रियांपैकीं एक सुप्रसिद्ध स्त्री असून त्यांचे चरित्र वाचनीय व विचारयोग्य असे आहे. त्याच्या योगानें महाराष्ट्र स्त्रियांच्या अंगीं राज्यकारभार चालविण्याची किती धमक असे, व त्या मर्दुमकीच्या कामांतही कशा निपुण असत, हे चांगले कळून येतें. मराठ्यांच्या स्त्रिया ह्मणजे गोषामध्यें असणारे बंदीवान, अशी जी प्रचलित समजूत आहे, ती सर्वथा चुकीची आहे, हें ह्या चरित्रावरून दिसून येते. मराठ्यांच्या स्त्रिया शौर्यपराक्रमाच्या गुणांत परिपूर्ण असून, घोड्यावर बसणें, भाला फेकणें वगैरे शौर्यविद्या त्यांस चांगली अवगत असे, व गोषाचा प्रतिबंध त्यांना त्या कामीं फारसा होत नसे, असे इतिहासावरून सिद्ध होतें. पेशवाईच्या अखेर अखेर देखील मराठे स्त्रियांना पुष्कळ स्वातंत्र्य होतें, व त्या घोड्यावर बसण्यांत चांगल्या तरबेज होत्या, अशी साधार माहिती मिळते. मि० एल्फिन्स्टन ह्यांनी “पेशव्यांची बायको भररस्त्यांतून देवदर्शनाकरितां पायीं जात असे, आणि घोड्यावर अथवा उघड्या पालखीत बसून सर्व लवाजम्यासह फिरत असे.” असे लिहिलें आहे; आणि स्कॉटवेरिंगसाहेबांनी बाजीरावसाहेब पेशव्यांची बायको लोकांच्या गर्दीतून घोडा भरधाव फेंकीत जातांना प्रत्यक्ष पाहिल्याचा उल्लेख केला आहे. हीच मर्दानी विद्या बायजाबाईसाहेबांसही अवगत होती व यशवंतराव होळकराची मुलगी भीमाबाई हिलाही येत होती. पहिलीने सर आर्थर वेलस्लीसाहेबांस आपली अश्वारोहणविद्या व्यक्त करून आश्चर्यचकित केलें, व दुसरीनें महिदपुरच्या लढाईनंतर सर जॉन मालकम ह्यांस आपले अलौकिक शौर्य व्यक्त करून तोंडांत बोट घालावयास लाविलें[] . ह्या गोष्टी सांप्रतच्या स्थितींत विचार करण्यासारख्या नाहींत असे कोण ह्मणेल ?
 सर जॉन मालकम ह्यांनी मराठ्यांच्या स्त्रिया संबंधानें जें वर्णन लिहिलें आहे, तें बायजाबाईसाहेबांच्या वेळच्या स्थितीचे अगदी हुबेहूब प्रतिबिंब असून फार वाचनीय व मनोरंजक आहे. ते लिहितातः- "ब्राह्मण व मराठे संस्थानिक व जहागीरदार ह्यांच्या स्त्रियांचे दरवारामध्यें बहुतकरून फार वजन असतें; व त्यांचा अधिकार व्यक्तिविशेषांवरच चालत नसून त्यांचा राजकारणामध्यें चांगला प्रवेश असतो. मोठ्या दर्जाच्या पुरुषांशी त्यांचे लग्न झालें, ह्मणजे त्यांस बहुतकरून स्वतंत्र तनखा व जातसरंजाम मिळत असतो, व त्यांना वाटेल तितकें स्वातंत्र्य असते. त्या आपल्या तोंडावर क्वचित् बुरखा घेतात. त्या नेहमीं जन्मोत्सवाप्रीत्यर्थ मेजवान्या देत असतात, आणि सणवारानिमित्य सदोदित उत्सव करीत असतात. शिंदे, होळकर आणि पवार ह्यांच्या घराण्यांतील स्त्रियांच्या हातीं किती सत्ता असते तें वर्णन केलेंच आहे. त्यांचे गुप्त खलवतामध्यें अतोनात वर्चस्व चालत आलेंच आहे, परंतु अलीकडे रूढीच्या प्रभावामुळें राज्यकारभारामध्यें देखील त्यांचे फार माहात्म्य वाढलें आहे. पुष्कळ वेळां तर सर्व राजकारणांचें स्वामित्वच प्रसिद्धपणें त्यांच्या हातीं असल्याचे दिसून येते. त्यांना लिहिणे, हिशेब ठेवणें वगैरेचें ज्ञान बहुतकरून प्राप्त झालेलें असतें. घोड्यावर बसण्याची कला हा त्यांच्या शिक्षणाचा एक नेहमींचा भाग असून, त्यानें त्यांच्या अंगीं स्थितिपरत्वें प्राप्त होणारें राजकीय कर्तव्य उत्तम रीतीनें बजावण्याची पात्रता उत्पन्न होते. यशवंतराव होळकराची मुलगी भीमाबाई हिची व माझी एक वेळ मुलाखत झाली होती. त्या वेळी तिनें होळकराच्या घराण्याचा व राज्याचा नाश होण्याचा प्रसंग आला असतांना, मोठ्या वक्तृत्त्वपूर्ण वाणीने राजकन्येच्या कर्तव्यांचे सुरेख वर्णन केले, आणि असे सांगितले कीं, “आमच्यासारख्या निपुत्रिक व विगतपति अबलांनी अशा आणीबाणीच्या प्रसंगीं आपल्या थोर घराण्याचा लौकिक व राज्य हीं रक्षण करण्याकरितां रणामध्ये सैन्याचे आधिपत्यही स्वतः स्वीकारिले पाहिजे." भीमाबाई घोड्यावर फार डौलदार रीतीनें बसत असे, आणि तिची भाला फेकण्याची चतुराई इतर लोकांस क्वचितच साधत असे. खानदानीच्या घराण्यांतील मराठे स्त्रिया बहुधा रेखल्याप्रमाणें सुंदर नसतात; परंतु त्यांचा चेहरा गंभीर असून त्यांच्या मुद्रेवर तेजस्विता आणि हुषारी चांगली प्रगट होते. वहुतकरून सर्व मराठे स्त्रियांनीं, ज्या ज्या वेळीं प्रसंग प्राप्त झाला, त्या त्या वेळीं आपली कार्यक्षमता आणि धैर्यशीलता उत्तम प्रकारे व्यक्त केली आहे. एवढेच नव्हे, तर त्यांपैकीं काहींनीं आपला बुद्धिप्रभावहीं लोकविश्रुत केला आहे"[] . ह्या वर्णनावरून मराठे स्त्रियांविषयीं एकंदरीत फार अनुकूल ग्रह उत्पन्न होऊन त्यांतील बायजाबाई किंवा भीमाबाई ह्यांच्या सारख्या सुप्रसिद्ध व लोकोत्तर स्त्रियांची चरित्रे महाराष्ट्र भाषेत प्रसिद्ध करणे अत्यंत अवश्य आहे असे वाटल्यावांचून राहत नाहीं.
 बायजाबाईंच्या चरित्राची साधनें फारशीं उपलब्ध न झाल्यामुळें त्यांचे चरित्र अतिशय संक्षिप्त व त्रोटक असें झालें आहे. परंतु त्या योगानें त्यांच्या राजकारणचातुर्याची व इतर अनेक गुणांची कल्पना करण्यास हरकत नाहीं. राजकारण व इतिहास ह्यांचा परस्पर संनिकट संबंध असल्यामुळें ख-या इतिहासाच्या अभावीं बायजाबाईचीं राजकारस्थानें आजपर्यंत निव्वळ गप्पा बनून राहिली आहेत. त्यांस इतिहासाची खरी मदत मिळेल, त्या वेळी तींच राजकारणें अधिक गंभीर व विचारार्ह अशीं भासतील. बायजाबाईंच्या वेळच्या कित्येक राजकारणांचा उलगडा करण्यास त्यावेळचा खरा इतिहास अवश्य प्रसिद्ध झाला पाहिजे. त्यावांचून पुष्कळ गोष्टींचा खुलासा होणे शक्यच नाहीं. अशा गोष्टी जरी एकीकडे ठेविल्या, तरी बायजाबाईंच्या कारकीर्दीत नेटिव्ह संस्थानांच्या वारसासंबंधाने गव्हरनरजनरल लॉर्ड आह्मर्स्ट ह्यांनी जो उदारपणा दाखविला, तो फार लक्ष्यांत घेण्यासारखा आहे[] त्या वेळीं एतद्देशीय संस्थानिकांस

सार्वभौम ब्रिटिश सरकार फार स्वतंत्र रीतीनें वागवीत असून, त्यांच्या अंतर्व्यवस्थेत हात घालण्यास तें किती नाखूष असे; व त्यांच्या गादीवर त्यांस (संस्थानिकांस) योग्य वाटेल तो मनुष्य बसविण्यास त्यांची किती मुभा असे, हें चांगले शिकण्यासारखें आहे. ह्या उदार राजनीतीचें उत्तम उदाहरण ग्वाल्हेर संस्थान हेंच होय, असें म्हणण्यास व त्याबद्दल ब्रिटिश सरकारच्या पूर्वीच्या उदार राजनीतीचें अभिनंदन करण्यास हरकत नाहीं.
 बायजाबाईसाहेबांच्या चरित्रांत आणखी एक गोष्ट फार महत्त्वाची आहे. ती ही कीं, इ.स. १८५७ च्या बंडाच्या प्रसंगीं त्यांनी ब्रिटिश सरकारचा पक्ष स्वीकारून त्यास अप्रतिम साहाय्य केलें.बायजाबाईसाहेब ह्यांस ब्रिटिश सरकारावर रुष्ट होण्यासारखे कारण असून त्यांनी उदार मनानें त्यांस मदत केली, ही फार प्रशंसनीय गोष्ट आहे. ह्या उदाहरणावरून बंडाचे वेळीं हिंदुस्थानांतील स्त्रियांनीं देखील इंग्रज सरकारास किती उत्तम मदत केली हें चांगले दिसून येतें. बायजाबाईसाहेबांप्रमाणे इतर उदाहरणे अनेक आहेत. ब्रह्मावर्त येथील पेशव्यांच्या बायकांनी युरोपियन स्त्रियांस बंडाचे वेळी चांगली मदत केली, असा उल्लेख जस्टिन म्याकर्थी ह्यांनी आपल्या ग्रंथांत केला आहे. होळकराची राणी ताईसाहेब व नागपूरची राणी बांकाबाई ह्यांनीही त्या वेळीं असेच उत्कृष्ट साहाय्य केलें. ह्यावरून आमच्या राजास्त्रियांनादेखील देशकालप्रसंग ओळखण्याचे शहाणपण असून त्यांच्या ठिकाणीं ब्रिटिश सरकाराविषयीं प्रेमादरभाव वसत आहे हे चांगलें सिद्ध होते. तात्पर्य, महाराष्ट्र स्त्रियांच्या चरित्रांवरून अनेक प्रकारचा बोध होण्यासारखा आहे, ह्यांत शंका नाहीं.

 बायजाबाईंच्या चरित्रामध्यें माहितीच्या कमतरतेमुळें अनेक दोष घडण्याचा संभव आहे. ह्याकरितां त्याबद्दल प्रांजलपणे माफी मागून, आणखी माहिती कोणाजवळ असल्यास ती त्यांनी आमच्याकडे अवश्य पाठवावी, अशी प्रार्थना आहे. तिचा द्वितीय आवृत्तीच्या वेळीं उपयोग करण्यांत येईल.

 शेवटीं, आणखी एका गोष्टीचा उल्लेख करणें येथें अवश्य आहे. पूर्वी प्रसिद्ध केलेलें झांशीच्या राणीचे चरित्र सर्वांच्या आदरास पात्र झाले आहे, हे वर निर्दिष्ट केलेच आहे. तथापि त्या चरित्राच्या लेखनशैलीसंबंधाने एका विद्वान् टीकाकारांनी असा आक्षेप घेतला आहे कीं, तें कल्पनेच्या साहाय्यानें फुगवून लिहिलें आहे. परंतु हा आक्षेप अगदीं वृथा आहे. ह्या टीकेचा अर्थ, केवळे मनःकल्पित गोष्टीची भर घालून ग्रंथविस्तार केला, असा असेल तर तें म्हणणे यथार्थ नाही. कारण, त्या ग्रंथांत प्रमाणावांचून कोणतीही गोष्ट लिहिलेली नाहीं. परंतु इतिहास किंवा चरित्रवर्णनांत कल्पनाशक्तीची मुळीच मदत न घेतां, नुसती शुष्क हकीकत दाखल करावी, आणि त्यांत, शब्दसौष्ठव, भाषालंकार अथवा वर्णनचमत्कार वगैरे कांहीं नसावे, असा उद्देश असेल, तर तो आम्हांस मान्य नाहीं.

 इतिहास ह्मणजे मेकालेसाहेबांच्या व्याख्येप्रमाणे काव्य आणि तत्वज्ञान ह्यांचे मिश्रण होय. अर्थात् ह्या मिश्रणाचे साहाय्य घेतल्यावांचून कोणतेही ऐतिहासिक चरित्र हृदयंगम आणि सुरस वठणार नाहीं. ह्याप्रमाणे पाहिले असतां, चरित्रग्रंथामध्ये वर्णनात्मक व कल्पनाप्रचुर लेखनशैली कां ठेवूं नये हें समजत नाहीं. अस्सल माहितीच्या आधारें, सत्यास न सोडितां, वाटेल त्या तऱ्हेनें चरित्रग्रंथास रमणीयत्व प्राप्त होईल अशी भाषाशैली ठेवणें हे प्रत्येक ग्रंथकाराचे अवश्य कर्तव्य आहे. चरित्र व काव्य ह्यामध्ये किती निकट संबंध आहे, तें आंग्ल भाषेतील प्रख्यात ग्रंथकार कार्लाइल ह्याने एके ठिकाणी सांगितलेच आहे. तो म्हणतो: “There is no heroic poem in the world but is at bottom a biography, the life of a man; and there is no life of a man, faithfully recorded, but is a heroic poem of its sort, rhymed or unrhymed.”

 ह्या उक्तीचे रहस्य ज्या मार्मिक वाचकांच्या लक्ष्यांत येईल, त्यांच्याकडून चरित्रग्रंथांतील कल्पनाप्राचुर्य व भाषासौंदर्य काढून तो रसहीन व रंजनशून्य करावा, अशी अप्रयोजक सूचना कधीही येणार नाहीं.

 अखेर, हा चरित्रग्रंथ वाचून पाहण्याचे कामीं मराठी भाषेचे भोक्ते व माझे सन्मान्य मित्र रा. सा. विष्णु कृष्ण भाटवडेकर बी. ए. एल्. एल्. बी. ह्यांनीं जें कृपासाहाय्य केलें, त्याबद्दल त्यांचे फार फार आभार मानून ही प्रस्तावना संपवितों.


 ता. १ मार्च १९०२. |   दत्तात्रय बळवंत पारसनीस.

  1. 1 "This wonderful woman, for her piety, her elevation of character, her profound sense of duty, her great ability, and her amazing energy and activity, will bear favourable comparison either with the greatest administrators of her country, or with the brightest ornaments of her sex in any land.”
  2. १ अहल्याबाईसारख्या लोकोत्तर स्त्रीचें चरित्र सांगोपांग व कागदपत्रांच्या अस्सल माहितीवरून लिहिण्याचा आमचा फार दिवसांचा हेतु होता. परंतु ही माहिती उपलब्ध नसल्यामुळे तो हेतु आजपर्यंत सिद्धीस नेता आला नाही. तथापि कळविण्यास आनंद वाटतो कीं, ह्या उदार व साध्वी स्त्रीच्या चरित्राची बरीच माहिती उपलब्ध झाली असून हे चरित्र लवकरच प्रसिद्ध करण्याचा आमचा मानस आहे.
  3. 2. "She is very fair and handsome, and well-deserving to be the object of a treaty."
  4. 1."The most ladylike Brahmin ladies I ever had occasion to converse with were the wives of the last Peishwa and of the Pratineedhee. The celebrated Waranussee Bye I was obliged to send from Waee, and she behaved so well when I told her how disagreeable it was for me to be obliged to tell her that the Sirkar required that she should proceed to join Shreemunt. But so long as one is not obliged to depart from the terms of personal respect, it is surprising how the better classes in India manifest a refinement and polish only known among Europeans of the highest rank and in an advanced state of culture."
  5. 1. "After the battle of Mahidpore, the Bheema Bai, Holkar's daughter, with a small body of retainers, for a long time kept the country in a flame. One day Sir John Malcolm was moving with a large force, when the lady was seen on horseback on a neighbouring eminence, attended by only one follower. The order was given to surround the hillock so as to ensure her capture. The slave escaped before the re quisite cordon could be formed, but the Bheema Bai made no attempt to fly. When, however, it was thought that her apprehension was certain, she suddenly made a dash towards the small party near the General, and owing to the speed of her mare, made her way fast then, and darted off scot-free"

    -Reminiscences of an Indian Official. Page 89.

  6. 1 "The females both of the Brahmin and Shudra Mahrattas have, generally speaking, when their husbands are Princes or Chiefs, great influence, and mix, not only by their power over individuals, but sometimes, as has been shown, personally in affairs of the State. If married to men of rank, they have usually a distinct provision and estate of their own; enjoy as much liberty as they can desire; seldom, if ever, wear a veil; and give feasts and entertainments on births and marriages, and on particular anniversaries. The power which the Mahratta ladies of the families of Scindia, Holkar, and the Puwar enjoy, has been described. They have always had great influence in their secret councils; and usage has latterly given them a considerable and increased share in the Government: and in some cases they have been the acknowledged heads. They are usually instructed in reading, working Arithmetic. The management of the horse always constitutes part of their education, which is directed to qualify them for the duties to which their condition makes them liable to be called. (In a long conference I had with Bheemabai, the daughter of Jeswuntrao Holkar, she expatiated with much eloquence on the duties inculcated as those of a Mahratta Princess, when the interest of her family and nation were at stake. It was, she said, an obligation for such in extreme cases (where she had neither husband nor son) to lead her troops in person to battle. Bheemabai rode with grace, and a few excelled her in the management of the spear.) The Mahratta ladies of rank may be generally described as deficient in regular beauty, but with soft features and expression that marks quickness and intelligence. They have almost all, when called forth, shown energy and courage, and some of them great talent.”
  7. १ लॉर्ड आह्मर्स्ट ह्यांनीं ग्वाल्हेर संस्थानच्या वारसाबद्दल त्या वेळीं जें लिहिले आहे तें वाचण्यासारखे आहे:--
     "Nothing could be farther from the wish and intention of the British Government than to exercise, now and hereafter, any intervention in the internal administration of his. (Scindia's) country—that it did not pretend to any right to control or regulate the succession to the state of Gwalior— that its sole motive in offering advice on the subject was the interest which it took in the maintenance of the general tranquillity”—that Scindiab, as the absolute and despotic ruler of the country, must be considered to possess the undoubted right of determining the succession,”—and that it was prepared to recognize any selection that might be "made by the general voice, or by a majority of the chiefs and principal persons of the country, according to the usage, whether the letter of the written law was adhered to or not.”