उभें करावें, कारण त्यावांचून लोकसत्ता क्षणभरहि टिकणार नाहीं, हे जाणून या सर्वांची संघटना करण्यासाठीं त्यानीं जिवापाड मेहनत घेतली. हिंदूप्रमाणेच मुसलमान, पारशी, खिस्ती यांना त्यांनी या संघटनेत ओढून आणले. श्रीमंत व मध्यम यांच्याप्रमाणेच शेतकरी व कामकरी यांचा राष्ट्रसभेंत रिघाव घडवून आणला. बंगाल, मद्रास, पंजाब, महाराष्ट्र यांच्याप्रमाणेच सिंधरजपुतान्या- सारख्या मागासलेल्या प्रांतांतहि दौरे काढले आणि या सर्वांना बहिष्कार- योगाचं तत्त्वज्ञान सांगून त्याचा प्रत्यक्ष आचार करण्याइतके सामर्थ्य, निर्भयता व त्याग त्यांच्या ठायीं निर्माण केला. या त्यांच्या प्रयत्नांमुळे वर्षाकालांत ज्याप्रमाणे पर्वताच्या पहाडांतून, दऱ्याखोऱ्यांतून, जमिनीच्या गर्भातून सर्वत्र पाण्याचे उमाळे बाहेर येतात त्याप्रमाणे अखेरीस या भरतभूमीच्या सर्व प्रांतांतून प्रतिकारशक्तीचे उमाळे येऊ लागले व आंतून स्फुरणाऱ्या या अहंकाराच्या चैतन्यामुळे ही मागासलेली जनता एका अत्यंत मदांध व धुंद अशा साम्राज्यसत्तेशीं काळझुंज घेण्यास उभी राहिली. टिळकांनी हे पाहिले; त्यांच्या चित्ताचें समाधान झाले; आणि त्या समाधानांतच तीन तपाच्या अविरत कष्टांनी जर्जर झालेला आपला देह अखेरच्या विश्रांतीसाठी त्यांनी भूमीवर ठेविला.



प्रकरण ६ वें

जनताजागृति

 लोकमान्य टिळक व महात्मा गांधी या दोन पुरुषांमध्ये अंतिम ध्येय, तत्त्वज्ञान व कार्यपद्धति या दृष्टींनी कितीहि फरक असला, तरी भरतभूमीच्या उद्धारार्थ कोणच्या शक्तीला आवाहन करावयाचे याविषयीं त्यांच्यांत मतभेद नव्हता. सामान्य जनता हेंच राष्ट्रशक्तीचे मूलस्थान आहे, भावी काळांतील सर्व संग्राम याच शक्तीच्या जोरावर करावयाचे आहेत आणि ही शक्ति एकदां जागृत झाली म्हणजे राजे, सेनापति, सरदार इत्यादि जुनाट शक्तींना ती सहज पादाक्रांत करील, याविषयीं त्या दोघांच्या मनांत अणुमात्र संदेह नव्हता. या दोन्ही विभूति सर्वस्वी स्वयंभू व स्वयंप्रकाश अशा असूनहि अगदीं प्रारंभापासून त्यांनी कार्याची जी दिशा आंखली ती याच तत्त्वानें. आणि हेच भरतभूमीचें विशेष भाग्य होय. इटलीमध्ये मॅझिनीचे सहकारी व त्यांच्या मागून आलेले इटालियन नेते हे दंडसत्तेचे पुरस्कर्ते होते आणि चीनमध्ये डॉ. सनयत्सेन यांचा वारसा चिआंग कै शेक या दण्डधराकडे गेला. त्यामुळे या दोन्ही देशांत लोकसत्ता मूळच धरूं शकली नाहीं. हिंदुस्थानांत लोकशाहीच्या वृत्तीचे बीजारोपण झाले आणि पुढेमागें केव्हां तरी त्यांतून तो कल्पवृक्ष निर्माण होण्याची आशा वाटते याचें मुख्य कारण हेच होय की, येथे टिळकांच्या मागोमाग राष्ट्राची धुरा महात्माजींनीं खांद्यावर घेतली.

लोकशक्तीचा पाया

 सामान्य मानवाची शक्ति जागृत करावयाची याचा नेमका अर्थ काय ते महात्माजींचे आफ्रिकेतील कार्य पाहतांच कळून येईल. नारायण स्वामी, स्वामी नागप्पा, वली अम्मा हे केवळ मुदतबंदीचे मजूर होते. नागप्पा व वली अम्मा हीं तर सतराअठरा वर्षांची पोरें होतीं. महात्माजींच्या आगमनापूर्वी त्यांच्या जीवनाची पातळी कोणची होती ? अहोरात्र काबाडकष्ट, गुलामगिरी आणि कांहीं चूक झाल्यास किंवा न झाल्यासहि लाथाबुक्या ! आणि इतकेहि करून पोटाला पुरेशी भाकरी नाहींच ! यांतच त्यांचा जन्म, यांतच त्यांचा मृत्यु. या स्थितींतून हीं माणसें कोणच्या उंचीला गेलीं ? मायभूमीच्या उद्धारासाठीं, सेवेसाठीं अन्यायाचा प्रतिकार करीत करीत यांनी आत्मबलिदान केले. यापेक्षां जास्त उंच, जास्त उदात्त असे मानवी जीवनांत कांहीं नाहीं. जमिनीवरून सरपटत जाणाऱ्या त्या मजुरांना पूर्वकाळ नव्हता व भावी काळहि नव्हता. तो त्यांच्या जीवनांत निर्माण झाला. स्वदेश, स्वधर्म, आत्मसामर्थ्य ही वैभवें कित्येक पिढ्यांत त्यांच्या स्वप्नांतहि नव्हती. अवमान सोशीत, लाथा खात, कष्ट करीत, भुकेल्या पोटीं राहून, पिचून पिचून मरून जावें, हाच त्यांचा आयुष्यक्रम. अन्यायाचा प्रतिकार, स्वत्व- रक्षणासाठीं संग्राम, जुलमाविरुद्ध लढा या शब्दसंहतीचा अर्थहि त्यांना माहीत नव्हता. पण याच हीन- दीन- दलित जनतेतून स्वजनासाठीं आत्मार्पण करणारे वीरपुरुष महात्माजींनी निर्माण केले; शीलासाठी जोहार करणाऱ्या अंगना यांतूनच निर्माण झाल्या; 'स्व' जाणणे व त्याच्या रक्षणासाठी संग्रामाला व आत्मार्पणाला सिद्ध होणे हाच लोकशक्तीचा पाया, हीच जनता जागृति, हाच राष्ट्रशक्तीच्या गंगौघाचा प्रभाव.
 निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींची सत्ता ती लोकसत्ता होय. पण हें लोकसत्तेचे केवळ बाह्यरूप झाले. आपल्या भूमीची उन्नतिअवनति, तिचें स्वातंत्र्य पारतंत्र्य, तिची कीर्तिअपकीर्ति यांची चिंता प्रत्येक नागरिक- नारायणस्वामी, नागप्पा, वलीअम्मा यांसारखे मजूरसुद्धां- ज्या शासनांत वाहूं लागतो तेच शासन लोकसत्ता या अभिधानास पात्र आहे. एरवीं या पातळीवरच्या लोकांना स्वदेश, स्वभूमि, संस्कृति, प्रगति यांच्या कल्पनाहि नसतात. त्यांच्या जीवनांत यांचा प्रवेश झालेला नसतो. पण अन्यायाचा प्रतिकार करण्याची वृत्ति ही अशी कांहीं दिव्य संजीवनी आहे कीं, तिच्या नुसत्या सिंचनाने या पशुसम मानवांत दिव्यस्फुरण होऊं लागतें. त्यांचे जीवन पालटून जाते. त्यांच्या 'स्व' च्या मर्यादा वाढतात. धैर्य, चिकाटी, त्याग, निष्ठा, बंधुभाव इ. गुणांचा प्रादुर्भाव त्यांच्या ठायीं होतो आणि अंती लोकसत्तेस अवश्य ते 'लोक' त्यांच्यातून निर्माण होतात. महात्माजींनी भारतीय लोकसत्तेची जी सेवा केली ती ही होय. टिळकांनी भारतांत असंतोष धुमसत ठेविला होता. येथील जनतेत ते 'लढा' निर्माण करीत होते आणि त्यासाठीं अखिल भारतीय जनतेला ते आवाहन करीत होते. पण तें अजून तिच्या कानापर्यंत नीट पोचले नव्हतें. सुशिक्षित मध्यमवर्गा- पर्यंतच ती हांक गेली होती. महात्माजींनी तेथूनच प्रारंभ केला आणि चंपारण्य, खेडा, जालियनवाला, दांडी, अशा एकसारख्या चढत चाललेल्या मोहिमांनी स्वदेश, स्वातंत्र्य, समता, या विषयींच्या निष्ठांचे जनतेत बीजारोपण केले. अखेरपर्यंत त्यांचे जागृतीचे साधन एकच होते. आक्रमकांविरुद्ध लढा, अन्यायाचा प्रतिकार ! वर सांगितल्याप्रमाणे ही एक वृत्ति निर्माण होतांच समाजाचे रूप पालटून जाते. पशूचे मानव होतात, मानवांत अनंत सद्गुणांचा उद्भव होतो आणि 'लोक' या महनीय पदावर आरूढ होण्याची योग्यता त्यांच्या ठायीं निर्माण होते.

चंपारण्यांतील क्रांति

 चंपारण्यांतील गरीब शेतकऱ्यांची स्थिति आफिकेंतल्या मजुरांपेक्षां फारशी निराळी नव्हती. लोकायत्त शासनाच्या नागरिकत्वापासून म्हणजेच 'लोकत्वा' पासून ते शेतकरी त्या मजुराइतकेच दूर होते. साध्या मनुष्यत्वाशी सुद्धा त्यांची ओळख शिल्लक राहिली नव्हती. गोरे मळेवाले त्यांना भाल्यांनीं मारीत, गोळ्या घालीत, जाळून टाकीत. त्यांचे अन्न, त्यांचे वस्त्र आणि त्यांच्या नववधूहि हिरावून नेत. हा किळसवाणा जूलूम अनेक पिढ्या चालू होता, या अवधींत त्या शेतकऱ्यांनी चारपांच वेळां दंगे केले हे खरे. पण ते दंगे होते. ते संग्राम नव्हते, ते लढे नव्हते. दंग्यांनी मानवाची उंची वाढत नाहीं. दंगा हा जड, शारीर उद्रेक आहे. त्याचा मनोबलाशीं, तत्त्वज्ञानाशी संबंध नसतो. म्हणून त्यांतून सद्गुणांची निपज होत नाहीं. ती संग्रामांतून होते. कारण त्याच्यामागें तत्त्वज्ञानाची अढळ बैठक असते. तत्त्वज्ञान म्हणजे मानवाच्या विशाल व उन्नत आकांक्षांचे समर्थन माझ्या एकटयाचे सुख किंवा दुःखमुक्तता ही अल्प आकांक्षा आहे. मजसारख्या शेकडो बांधवाचें सुख, स्वातंत्र्य, त्यांची उन्नति ही मोठी आकांक्षां आहे. तिलाच तत्त्वज्ञानाचें रूप येते. आणि तिच्या मोठेपणामुळेच तिच्या प्रेरणेनें निष्ठा, त्याग धैर्य हे गुण निर्माण होऊन व्यक्तीच्या मनःसामर्थ्याचा विकास होतो. मानवाचे हे मनःसामर्थ्य हाच लोकसत्तेचा पाया आहे. महात्माजी जेथें जात तेथील सामान्य जनतेच्या मन:सामर्थ्यांचा आविष्कार घडवून आणीत. चंपारण्यांतील शेतकरी गोऱ्या मळेवाल्याचा नुसता जमादार आला तरी घाबरून जात, लपून बसत. पण महात्माजी तेथे जातांच ते निर्भय झाले व त्या मळेवाल्यालाच आव्हान देण्यास सिद्ध झाले. या जागृतीमुळे तेथे अगदीं अल्प अवधीत कल्पनातीत यश आले. चंपारण्यांत १५ एप्रिल १९१७ या दिवशीं महात्माजींनीं पाऊल ठेवले आणि २९ नोव्हेंबर १९१७ रोजी विधिमंडळांत चंपारण्य ॲग्रेरियन बिल मांडले गेले व त्यामुळे तेथील सर्व अन्याय नष्ट झाला. तो इतका की, अन्यायावरच जगत असलेल्या गोऱ्या मळेवाल्यांना थोड्याच वर्षात तेथील जमिनी व कारखाने विकून तोंड काळें करावे लागले.

नव्या युगाचे शस्त्र– सत्याग्रह

 चंपारण्यांतील या विजयामुळे भारतीय जनतेत एक अपूर्व चैतन्य निर्माण झाले. ब्रिटिशासारख्या बलशाली, सार्वभौम, अजिंक्य सत्तेविरुद्ध आपण अगदी सामान्य शेतकरी हात उचलू शकूं ही आशा त्या लोकांच्या स्वप्नांतहि कधीं आली नसेल. कधीं संग्राम करण्याची वेळ आलीच तर तो तेथले बडे लोक करतील; येथले राजे, सरदार, जमीनदार यांचें तें काम आहे; आपल्या हातीं त्यांतले कांहीं नाहीं; आपण गरीब लोक हमाली, कष्ट, सेवाचाकरी यापलीकडे कांहीं करूं शकणार नाहीं, ही भावना बहुसंख्य भारतीय जनतेच्या मनांत युगानुयुगें दृढमूल होऊन बसली होता. आतां तिच्या असें ध्यानांत आले की आपल्याहि हातीं एक शस्त्र आहे आणि मनांत आणले तर या शस्त्रानें कोणच्याहि प्रचंड शक्तीशीं आपण सामना देऊं शकूं. या नव्या जाणीवेने तिच्या अंगी केवढा आत्मविश्वास संचरला असेल याची कोणालाहि सहज कल्पना करतां येईल. सत्याग्रह संग्रामाची अलौकिकता आहे ती यांत आहे. दीन, दुबळे, दलित, निःशस्त्र युगानुयुग दास्यांत खितपत पडलेले असे जे बहुसंख्य मानव त्यांना आपली उन्नति करून घेण्याचें एक अमोघ साधन सत्याग्रहानें प्राप्त करून दिलें. लोकशाही राज्यपद्धति सत्याग्रहाची अखंड ऋणी राहील ती यासाठीं. ज्यांच्या आधारावर तिचें मंदिर उभें रहावयाचे ते मानव या संग्रामामुळे व्यक्तित्वसंपन्न होतात.
 चंपारण्यानंतर खेडा जिल्ह्यांत जो लढा सुरू झाला त्यानें युग पालटल्याचे हें चिन्ह स्पष्टपणे दाखवून दिले. दुष्काळाने पिके बुडालीं तरी सरकारने सगळा सारा दडपून वसूल करावा ही गोष्ट नवीन नव्हती. हाच जगाचा इतिहास होता. तरी आतांपर्यंत भारतांतील शेतकऱ्याने असल्या अन्यायाविरुद्ध चकार शब्द काढला नव्हता. आपण कांहींही प्रतिकार करूं शकणार नाहीं ही त्याला मनोमन असलेली जाणीव हीच या दैन्याच्या बुडाशी होती. पण सत्याग्रहाचे प्रभावी शस्त्र त्यांच्या हाती देऊन, अन्यायाचा प्रतिकार करणे तुला शक्य आहे, वाटेल त्या शक्तीशीं तूं लढू शकशील, तिला नमवूं शकशील, असा दिव्य संदेश महात्माजींनी त्याला दिला. त्याबरोबर त्या दलित मनाचे रूप अंतर्बाह्य पालटून गेले. 'राजकीय शिक्षा लौकिक शिक्षेस अनुसरून नसल्यास तीपासून कधींहि फायदा होणार नाहीं; फार काय पण राजकीय शिक्षा लोकमतावरच अवलंबून असते. आपण जर उद्यां तुरुंगांत जाणें ही शिक्षा आहे असे मानले नाहीं तर राजकीय शिक्षेचा उपयोग काय होणार ? लोक आनंदाने तुरुंगांत जातील.' असे टिळकांनी १८८१ साली लिहून ठेविले होते. महात्माजींनी टिळकांचे ते दिव्य स्वप्न प्रत्यक्षांत आणले; आणि 'सार्वलौकिक मत म्हणून जो एक नियामक अद्भुत उपाय आहे- ज्याला जुलमी राजे व अहंपणाचा तोरा बाळगणारे मंत्रीहि भितात '- (केसरी १८८२) तो नियामक उपाय, ते सार्वलौकिक मत या देशांत निर्माण करण्यास प्रारंभ केला. चंपारण्य व खेडा येथील लढा हा शेतकऱ्यांचा लढा होता. अहमदाबादला महात्माजींनी कामगारांचा प्रश्न हातीं घेऊन त्यांनाहि आपल्या प्रभावी शस्त्राचा परिचय करून दिला. या दोनतीन लढ्यांनीं भावी संग्रामांतील प्रास्ताविक घटना संपल्या आणि १९१९ साली रौलेट बिलाविरुद्ध महात्माजींनी जी सत्याग्रहाची चळवळ सुरू केली तिला एकदम अखिल भारतीय रूप प्राप्त झाले.
 भारतीय स्वातंत्र्याचा लढा चालविण्यासाठी गांधीजींनी शांततामय सत्याग्रहाच्या मार्गाचा अवलंब केला. यासाठी ही भरतभूमीच केवळ नव्हे तर सर्वं जग त्यांचें कायमचें ऋणी राहील. या मार्गाची कांहींशीं कल्पना टॉलस्टॉय यांनी सांगितली होती. हंगेरींतील खाणी-कामगारांनी त्याचा एक यशस्वी प्रयोगहि केला होता. पण हिंदुस्थानसारख्या खंडप्राय देशांत, तीस- चाळीस कोटी लोकांच्या समाजांत व स्वातंत्र्यप्राप्तीसारख्या महान् कार्यासाठीं या अस्त्राचा प्रयोग अजून कधींच कोणी केला नव्हता. तो प्रयोग यशस्वी करून भावी काळांतील लोकायत देशांतील संग्रामांना महात्माजींनी कायमचा आदर्श निर्माण करून ठेविला आहे.
 येथे सत्याग्रहाचा विचार त्यांतील कायदेभंग व करबंदी या प्रधान घटकांकडेच फक्त लक्ष ठेवून केला आहे. त्यांतील आत्मबल, प्रतिपक्षाविषयीचे प्रेम, त्यांतील कायावाचामनाची अहिंसा यांचा विचार येथे केलेला नाहीं. अन्यायाचा शांततेनें प्रतिकार करणे, जुलमी सत्तेविरुद्ध निःशस्त्र लढा पुकारून त्या लढ्यांमुळे भोगावे लागणारे सर्व क्लेश, शारिरिक व मानसिक यातना आणि इतर आपत्ति या शांतपणे सोसणे हे जें सत्याग्रहाचे लौकिक रूप तेंच फक्त येथे अभिप्रेत आहे आणि त्या दृष्टीने पाहतां असें निश्चित वाटतें कीं, या पंचवीस वर्षांच्या सत्याग्रहसंग्रामाने लोकसत्तेच्या दृष्टीनें भारतीय जनतेत जेवढी प्रगति झाली तितकी दुसरी कशानेंहि झाली नसती. या संग्रामाचें प्रधान कार्य म्हणजे लोकजागृति हें होय. शासन स्वकीय असो वा परकीय असो, तें जर जुलमी असेल तर देशांतील जनतेची तें अनेक प्रकारांनी गांजणूक करीत असतें. लोकांना त्यामुळे अनंत यातना सोसाव्या लागतात. या यातना दूर करण्यासाठी संघटित होऊन त्या सरकारला शस्त्रबळाने किंवा मतांच्या संख्याबलाने पदच्युत करणे हाच उपाय असतो. पण या उपायाचा अवलंब करण्यास जनता जागृत असावी लागते. नाहीं तर हे मार्ग व्यर्थ होत. अशा वेळीं त्या यातना दूर करण्यासाठी देशांतील कांहीं धीर पुरुष सरकारच्या कायद्यांचा भंग यरून त्यासाठी होणारी शिक्षा शांतपणे भोगू लागले कीं, बाकीच्या जनतेत हळूहळू प्रक्षोभ होऊन ती जागृत होऊं लागते आणि हे आंदोलन सर्वव्यापी होऊं लागतें. मूलतः सत्याग्रह हा प्रेमाचा मार्ग असून त्यामुळे हळूहळू प्रतिपक्षाचा हृदयपालट घडविणें हें त्याचें अंतिम उद्दिष्ट असते. महात्माजींनीं त्याचा जो पुरस्कार केला तो याच उदात्त पातळीवरून. जुलूम करणाराचा हृदयपालट घडविणे किंवा जुलूम निमूटपणे सहन करणाऱ्यांचा स्वाभिमान जागृत करून, त्यांची शक्ति संघटित करून जुलमी शासकाला नमविणे, हे जुलूम नाहींसे करण्याचे दोन उपाय होत. महात्माजींनीं सत्याग्रह सुरू केला तो पहिल्या हेतूनें. पण आतांपर्यंतच्या इतिहासावरून हे ध्यानी येईल की सत्याग्रहाचें हें सात्त्विक रूप प्रत्यक्षांत कधींच दिसलेलें नाहीं. जे भांडवलदार, जमीनदार किंवा जे इंग्रज राज्यकर्ते यांच्याविरुद्ध जनतेने सत्याग्रह केला त्यांचा अणुमात्रहि कधीं हृदयपालट झाला नाहीं. पण त्यामुळे माझ्यामतें महात्माजींच्या सत्याग्रह संग्रामांचे महत्त्व मुळींच कमी होत नाहीं. कारण प्रतिपक्षाचा जरी त्यामुळे हृदयपालट झाला नाहीं तरी भारती जनतेचा हृदयपालट, कायाकल्प निश्चित झाला आहे. शतकानुशतकें पारतंत्र्यांत पिचत पडलेला, स्वतःच्या हीनदीन स्थितीची आणि गुलामगिरीची जाणीवहि नसलेला, अज्ञान व दारिद्र्य यांनी ग्रासलेला, अन्यायाचा प्रतिकार स्वप्नांतहि न करणारा असा हा भारतीय समाज हळूहळू प्रबुद्ध झाला, संघटित झाला आणि ब्रिटिशांचे राज्य नष्ट करण्यासाठी आत्मबलिदान करण्यास सिद्ध झाला, हे कल्पनातीत असे परिवर्तन होय. सत्याग्रहाने केलेला हृदयपालट तो हाच. हा दुसऱ्या कोणच्याहि मार्गाने झाला नसता. दहशतवादाने सर्व देशभर तीव्र अहंकाराची जाणीव उमटून जाते, नाहीं असें नाहीं. पण ती क्षणभरच; आणि त्याची प्रतिक्रिया फार भयंकर स्वरूपाची असते. सरकार आपल्या सर्व आसुरी सामर्थ्यानिशी दहशतवादी तरुणांचे निर्दाळण करते व तें पाहून जनता जास्तच भयग्रस्त होऊन चिडीचीप होऊन जाते. त्यापेक्षांहि दहशतवादाचे मोठे वैगुण्य म्हणजे तो मार्ग आपला नव्हे, त्याशीं आपला कांहीं संबंध नाहीं, अशीच जनतेची त्याविषयींची भावना असते. तो मार्ग अत्यंत अल्पसंख्यांचा आहे. जनता जागृतीचे, सुप्त लोकशक्तीला आवाहन करण्याचे उद्दिष्ट त्याने साधत नाहीं. सरदारवर्गाच्या किंवा लष्कराच्या साह्याने क्रांन्ति घडविणे हा दुसरा मार्ग, त्याचा विचार आपण मागें केलाच आहे. जर्मनी, इटली, स्पेन यांनी तो अंगीकारला आणि त्यामुळे तेथील सत्ता कायमच्या लोकविन्मुख राहिल्या. त्या मार्गांतहि सर्वांना सहभागी होतां येत नसल्यामुळे, सर्वांच्या शक्तीला आवाहन नसल्यामुळे, लोकसत्तेच्या प्रगतीच्या दृष्टीनें त्याचे महत्त्व अल्प आहे. सत्याग्रहाचे स्वरूप याहून निराळे आहे. त्याचा पहिला मोठा गुण म्हणजे त्यांत बहुसंख्य लोकांना सहभागी होतां येते. यातना, हाल, देहदंड यांच्या दृष्टीने पहातां हा मार्ग इतर मार्गापेक्षां सोपा आहे. सुसाध्य आहे. पण याचें फल मात्र फार मोठे आहे. कोणचेंहि राजशासन जनतेची कळत वा नकळत संमति असल्यावांचून टिकूं शकत नाहीं हा राज्यशास्त्राचा सिद्धांत आहे. सत्याग्रहाने जनतेची संमति हा जो शासनाचा मूलाधार तोच उखडला जातो. प्रारंभी अगदीं अल्पसंख्य लोक जरी चळवळींत असले तरी हळूहळू हा असंतोष, हा क्षोभ, ही जागृति पसरत जाते व शेवटी या लाटा सैन्यापर्यंत पोचतात आणि सैन्यानें राजसत्तेची सेवा करण्यास नकार देणें ही सत्याग्रहाच्या वा निःशस्त्र- प्रतिकाराच्या चळवळीची परिणति होय. कायदेभंग व करबंदी यांचे या लोकजागृतीच्या दृष्टीने महत्त्व आहे. चार पोतीं मीठ लोकांनी नेलें, किंवा एकाद्या जिल्ह्यांतील लोकांनी एखाद्या वर्षी सरकारसारा दिला नाहीं, तरी तेवढ्यामुळे सरकारचें विशेष नुकसान होणार आहे असे नाहीं. पण सरकारच्या राक्षसी सामर्थ्याला अवहेलून अखिल जनता-- केवळ मूठभर दहशतवादी नव्हे-- कायदेभंगाला किंवा करबंदीला सिद्ध होते यांत विश्वव्यापी अर्थ आहे. हे इतके लोक प्रबुद्ध झाले, आपल्या देशाची उन्नति- अवनति त्यांना उमजूं लागली आणि देशाच्या उन्नतीसाठी वाटेल तो त्याग, प्राणत्यागसुद्धां करण्यास ही जनता सिद्ध झाली असा विशाल अर्थ या घटनेत समावलेला आहे आणि तोच अर्थ या भूमीत महात्माजींनी प्रगट केला.
 वर सांगितल्याप्रमाणे १९१९ सालीं रौलेटविलाविरुद्ध जी चळवळ झाली तिच्या वेळी महात्माजींच्या सत्याग्रहाला प्रथम अखिल भारतीय रूप प्राप्त झाले. पुढील वर्षी खिलाफतीची चळवळ झाली; आणि नंतर बार्डोलीच्या संग्रामाची महात्माजींनी सिद्धता केली. हा संग्राम आयत्या वेळीं महात्माजींनीं स्थगित केला व त्यामुळे निराशेची फार मोठी लाट देशावर आली हे खरे, पण मार्च १९९९ ते मार्च १९२२ या पहिल्या मोहिमेमुळे या देशांत नवयुग निर्माण झाले यांत शंका नाहीं. जर्मनीसारख्या अत्यंत बलाढ्य व शस्त्रास्त्रांनी संपन्न अशा देशाला ब्रिटिशांनी नुकतेच लोळविले होतें. त्यामुळे अशा बलशाली राष्ट्रापुढे शस्त्रास्त्राच्या लढाईत आपला निभाव लागेल अशी पुसटसुद्धां आशा येथे कोणाला वाटत नव्हती. शस्त्रास्त्राच्या लढाईत आशा नाहीं आणि दुसरा कोणचाहि मार्ग माहीत नाहीं यामुळे १९१८/१९ साली भारतीय जनतेवर निराशेची अत्यंत घोर अशी अवकळा पसरली होती. सामान्य जनता अजून राजकारणांत फारशी आलीच नव्हती आणि जो मध्यमवर्ग चळवळीच्या आघाडीवर होता तो शत्रूच्या या भयानक सामर्थ्याच्या दर्शनाने हबकून गेला होता. अशा वेळीं महात्माजींनी जेव्हां हें नवीन अस्त्र लोकांच्या हातीं दिले आणि ब्रिटिशांसारखा समर्थ शास्ताहि या अस्त्रापुढे नमतो हें लोकांना सप्रयोग दाखवून दिले तेव्हां या भूमींत कांहीं अपूर्व उत्साह व आशा निर्माण झाली असल्यास नवल नाहीं.
 बार्डोलीचा संकल्पित लढा स्थगित झाल्यानंतर, पुढे काय, असा प्रश्न निर्माण झाला. या लढ्याकडे सारा भारतवर्ष डोळे लावून बसला होता. त्याच्याबद्दल त्याला फार मोठ्या आशा होत्या, पण त्या अगदीं धुळीस मिळाल्याने त्याला घनदाट निराशा सर्वत्र दिसू लागली आणि गांधीजींनीं 'पुढे काय?' या प्रश्नाला जें उत्तर दिले तेंहि फारसे आशादायक नव्हते. 'विधायक कार्यक्रम' हे त्यांचे उत्तर होते. या त्यांच्या कार्यक्रमाचाही आपण वरच्याच दृष्टीने विचार केला पाहिजे. सत्याग्रहाचे जसें लोकशाहीच्या दृष्टीने आपण मूल्यमापन करीत आहों तसेंच याचे केले पाहिजे. खादी, ग्रामोद्धार, अस्पृश्यतानिवारण, मद्यपानबंदी, जातीय ऐक्य, मूलोद्योग शिक्षण, गांव- सफाई, प्रौढशिक्षण इ. बहुविध कार्यांचा गांधीजींनीं विधायक कार्यक्रमांत अंतर्भाव केला होता. सत्याग्रहाचा अंतिम हेतु जसा भारताच्या राजकीय स्वातंत्र्याहून अगदीं निराळा होता, त्याचप्रमाणें विधायक कार्यक्रमाचाहि अंतिम हेतु गांधींजींच्या मनांत निराळा होता. अखिल भारतीय जीवन आमूलाग्र बदलून टाकावें, पाश्चात्य संस्कृतीचे आपल्यावर दृढ होत चाललेले वर्चस्व नष्ट करावे आणि साधी, ग्रामप्रधान, वैराग्याभिमुख अशी भारतीय संस्कृति निर्माण करावी हे महात्माजींच्या मतें विधायक कार्यक्रमाचे उद्दिष्ट होतें. म्हणजे सत्याग्रहाप्रमाणेच विधायक कार्यक्रमाचाहि हेतु भरतभूमीची आध्यात्मिक प्रगति हाच होता. पण सत्याग्रह जसा उच्च आध्यात्मिक पातळीवरून, प्रत्यक्षांत येतांना, निःशस्त्र प्रतिकाराच्या भौतिक पातळीवर आला आणि म्हणूनच लोकजागृतीचे महान् कार्य त्याने साधले त्याचप्रमाणे विधायक कार्यक्रमाचहि झाले. निःशस्त्र प्रतिकाराचे जे लोकजागृतीचे कार्य त्याला पोषक असा जेवढा भाग विधायक कार्यक्रमांत होता तेवढ्यालाच तेज प्राप्त झाले व हें तेजहि विधायक कार्यक्रमाचा पुढे करावयाच्या लढ्याशीं स्पष्ट संबंध दिसत असे तेवढ्यापुरतेच टिकून राही. एरवीं विधायक कार्यक्रम लोकांना अगदीं नीरस, शुष्क व हेतुशून्य असा वाटे. १९२२ नंतर कायदेभंग व करबंदी गेली व गाधीजींनीं आणि काँग्रसने देशाला विधायक कार्यक्रम करीत रहा, असा आदेश दिला. पण एकदोन वर्षांतच त्याची गति मंदावली व पुढे पुढे तर लोक त्याची चेष्टा करूं लागले. पं. जवाहरलाल यांना तर विधायक कार्यक्रमाचा फारच कंटाळा असे, खादीविरुद्ध ते एखादे वेळी अगदी उसळून उठत. १९३५ सालीं युरोपांतून आल्यावर ते जेव्हां कॉंग्रेसचे पुन्हां अध्यक्ष झाले तेव्हां त्यांनीं गांधींना प्राणभूत वाटणाऱ्या विधायक कार्यक्रमाचा एकहि ठराव केला नाहीं. त्याचा नामनिर्देशहि केला नाहीं. काँग्रेसमधील अनेक कार्यकर्त्यांची हीच वृत्ति होती. याचा अर्थ असा कीं लोकांना स्वतंत्रपणे विधायक कार्यक्रमाची महती मुळींच मान्य नव्हती. चरखा हा गांधीजींच्या स्वातंत्र्यसंदेशाचे प्रतीक म्हणून त्यांना स्वीकार्य वाटे. आणि याच दृष्टीने विधायक कार्यक्रमांतील इतर भागाकडे लोक पहात. स्वातंत्र्य व क्रान्ति या कल्पना अमूर्त आहेत. त्यांचे नित्य स्मरण रहावें व त्या प्रेरणा लोकांच्या मनांत मूळ धरून बसाव्या येवढ्यासाठीं चरख्याचे महत्त्व फार होते. त्याला आर्थिक बाजू असल्यामुळे दुधांत साखर पडल्यासारखे झाले. पण खरें दूध म्हणजे लढ्याचा संदेश, स्वातंत्र्याची प्रेरणा हेच होते. ती प्रेरणा व तो संदेश खेडुतांच्या घरोघर नेऊन पोचविण्याचे फार मोठे कार्य चरखा व खादी यांनीं केलें यांत शंकाच नाहीं. याचा अर्थ असा की निःशस्त्र प्रतिकारानें ज्या प्रक्षोभाच्या लाटा जनसागरावर उठविल्या त्या कालांतराने मंदावू लागल्या तरी त्यांनें निर्माण केलेली जागृति कांहीं काल टिकवून धरण्यासाठी विधायक कार्यक्रमाचा फार उपयोग झाला. खादीचा प्रसार, मद्यपान- निषेध, गांवसफाई, प्रौढशिक्षण, ग्रामोद्योग, राष्ट्रभाषेचा प्रसार, जातीय ऐक्य या निमित्ताने काँग्रेसचे पाईक देशाच्या कान्याकोपऱ्यांत जाऊन पोचले, खेडुतांत, कामगारांत मिसळले आणि त्यांनीं वरच्यापैकी कोणच्या ना कोणच्या प्रतीकाच्या साह्याने काँग्रेसचा स्वातंत्र्याचा, क्रान्तीचा संदेश घरोघर पोचविला व तेथे तो स्थिर केला. खादी, हातसडीचे तांदूळ, भरड कागद यांचें आध्यात्मिक व सांस्कृतिक दृष्ट्या महात्माजींना जे महत्त्व वाटे त्याचीं फारशी कोणाला जाणीवहि नव्हती. म्हणजे विधायक कार्यक्रमाचा आध्यात्मिक हेतु विफल झाला पण त्याने लोकक्रान्तीला अवश्य ती जागृति मात्र कांहीं अंशी घडवून आणिली व टिकवून धरली. 'दि इल्यूजनस् ऑफ चरखा' या पुस्तकांत अनिल बरण रे यांनीं व्यवहाराच्या व अर्थशास्त्राच्या दृष्टीनें खादीवर जे आक्षेप घेतले आहेत ते सर्व खरे वाटतात; पण खादीने राजकीय जागृति घडवून आणली हे जे राजेन्द्रबाबूंनी त्या आक्षेपांना उत्तर दिले आहे, ते तितकेच खरे आहे. जे खादीचे तेच एकंदर विधायक कार्यक्रमाचें. काँग्रेसच्या मध्यमवर्गीय सुशिक्षित पाईकांना क्रान्तीच कांहीं दृश्य प्रतीक खेडोपाडी घेऊन जाण्यास हे साधन फार उपयोगी पडले; पण लोकजागृतीचे खरे प्रभावी साधन म्हणजे कायदेभंग हेंच होय हे आपण विसरू नये.

स्वातंत्र्य संग्राम

 बार्डोलीनंतर आठ वर्षांनी १९३० साली महात्माजींच्या दांडीप्रयाणानें सुरू झालेला जगविख्यात असा सत्याग्रह संग्राम झाला. त्याची तयारी महात्माजी वर सांगितल्याप्रमाणे विधायक कार्यक्रमानें करीत होते; पण त्याच्याच बरोबर त्या आठ वर्षांत ब्रिटिश सरकारच्या सत्तेस आव्हान देऊन तिच्याविरुद्ध लोकांनीं अनेक लहानमोठे संग्राम केले त्यामुळेच जनतेत खरें चैतन्य टिकून राहिले व तिचा आत्मविश्वास वृद्धिंगत झाला. मुळशी पेट्यांत आपल्या जमिनी जाऊं नयेत म्हणून शेतकऱ्यांनी लढा केला. दरवडेखोरांना सामील असल्याच्या खोट्या आरोपावरून गुजराथेतील बोरसद तालुक्यावर सरकारने जादा पोलीस बसवून खेडुतांना जबर दंड केला होता. त्याविरुद्ध त्या तालुक्यांतील लोकांनीं सत्याग्रह करून सरकारला माघार घेण्यास भाग पाडिलें, शीखांनी केलेला 'गुरुका बाग' सत्याग्रह प्रसिद्धच आहे. १९२३ साली नागपूरला राष्ट्रध्वजाचा अपमान झाला त्या वेळेस अखिल भारतांतून स्वयंसेवक जमले व त्यांनी सत्याग्रह करून त्या ध्वजाची इभ्रत राखिली. वरील प्रत्येक सत्याग्रहांत एक हजारपर्यंत लोक तुरुंगांत गेले होते. लाठीमार याच्यापेक्षा किती तरी जास्त लोकांनीं साहिला आणि तो साहतां साहतां अन्यायाचा प्रतिकार करण्याची वृत्ति भरतभूमत निर्माण झाल्याची ग्वाही दिली. १९२८ साली बार्डोलीस सरदार वल्लभभाईच्या नेतृत्वाखालीं झालेला सत्याग्रह हा मोठाच संग्राम होता. सारावाढ हे त्याचे कारण होते आणि ती इंग्रजी राज्याची खरी नस होती. हे ओळखूनच १८९६ सालापासून टिळकांनीं तिच्यावर प्रहार करण्यास प्रारंभ केला होता. तोच लढा आतां महात्माजींच्या अभिनव पद्धतीने रंगास आला होता. सरदारांनी सर्व तालुका संघटित करून त्याला एखाद्या लष्करी छावणीचे रूप आणले. झगडा, लढा, प्रतिकार, संग्राम या शब्दांनी वातावरण अगदीं कोंदून गेलें होतें. लढा सुरू झाला. सरकारने अनन्वित जुलूम केले. धमकी, दंड, कैद, जप्ती, लाठी हीं आपली सर्व पाशवी शर्ते वापरली; पण शेतकऱ्यांनी धीरानें, चिकाटीने व शांततेनें तें सर्व सोसले. सर्व भरतखंडावर या प्रतिकाराच्या नादलहरी उमटू लागल्या. तेव्हां सरकारने नमते घेतले. बार्डोली- पेक्षांहि सायमन कमिशनवरील बहिष्कारांने उद्भवलेला लढा प्रक्षोभक व व्यापक स्वरूपाचा होता. मद्रास, लखनौ, पाटणा, लाहोर येथे कायदा तोडून पन्नास पन्नास हजारांच्या मिरवणुकी निघाल्या व लाठीमार, घोडदौड, गोळीबार यालाहि दाद न देतां लोकांनीं आपला निषेध जगापुढे मांडला. लाहोरच्या या मिरवणुकींतच लालाजींना लाठीचा मार बसला व तो प्राणघातक ठरला. आणि सरदार भगतसिंग यांनी असेंब्लींत फेकलेला बाँब आणि त्यानंतरचा सॉंडरस् च्या खुनाचा खटला हीं प्रकरणे त्यांतूनच उद्भवून त्यांनीं बहिष्कारानें निर्माण केलेल्या प्रक्षोभांत प्रत्यक्ष ठिणगीच टाकली. लाहोरच्या पूर्ण स्वातंत्र्याच्या ठरावाच्या रूपाने त्या प्रक्षोभांतून निवालेली ज्योत भरतभूमीला स्पष्ट दिसूं लागली व राष्ट्र पुन्हां संग्रामाला सिद्ध झालें. त्याला घेऊन महात्माजी दांडीकडे निघाले.

जनशक्ति

 भारतीय जनतेत निर्माण झालेल्या लढाऊवृत्तीचा खरा आविष्कार १९३० सालच्या संग्रामांतच प्रथम प्रतीतीस आला. मागल्या प्रकरणांत सांगितल्याप्रमाणे, या देशाचे खरे स्वामी म्हणजे येथले जे बहुसंख्य कष्टकरी लोक, त्यांनी परकीय आक्रमकाविरुद्ध उभे रहावें, यांतच लोकशाहीची खरी प्राणप्रतिष्ठा आहे हा विचार टिळकांनी १८८० सालींच निश्चित केला होता व प्रारंभापासून चळवळीचे तसे धोरणहि त्यांनी आंखले होते. आतां कष्टकरी जनता लढ्यास उभी राहिलेली पहाण्याचे भाग्य त्यांना जिवंतपणी लाभले नाहीं. पण महात्माजींनीं त्यांच्या स्वर्गस्थ आत्म्याला ते मिळवून दिले. ३० सालचा संग्राम सार्थ नामाने जनतेचा संग्राम होता. या भारती राष्ट्राला आपल्या स्वतःच्या सामर्थ्याचे स्वतःलाच एवढे भव्य दर्शन कधींहि घडलें नव्हते, अखिल भरतभूमि हें एक राष्ट्र आहे, याचा असा प्रत्यय इतिहासांत कधीं आला नव्हता, तो या वेळीं आला.
 १९३० सालच्या या संग्रामाचें आपण जितके बारकाईनें अवलोकन करूं तितकें जास्त स्पष्टपणे, भारतीय लोकसत्ता महात्माजींची किती ऋणी आहे हे आपल्या ध्यानीं येईल. ब्रिटिश सरकारच्या राज्याचें कायद्याचे अधिष्ठान नष्ट करावयाचेंच या हिरिरीने भारताचा शेतकरी या संग्रामांत उतरला होता. धारासना येथे २५०० लोकांनी मिठागरावर हल्ला केला. वडाळ्याला ही संख्या पंधरा हजारांवर गेली. संगमनेरला एक लाख लोकांनीं जंगलाचा कायदा तोडला. बागलाणांतील भीलवाड या क्षेत्राच्या ठायींहि असाच एक लाख लोकांनी कायदेभंग केला. या मोहिमेंत दोन हजारावर तर स्त्रियाच होत्या. साक्री (खानदेश), चिरनेर (पनवेल), बिळाशी (सातारा) विरमगांव, विलेपार्ले, शिरोडा इ. अनेक ठिकाणी सहस्रावधि शेतकऱ्यांनी आपल्या ठायीं लढा जागृत झाला असल्याचीं लक्षणें स्पष्टपणे प्रकट केलीं. कर्नाटकांत तीन लाख ताडीची झाडें तोडण्यांत आली. संयुक्तप्रांत, पंजाब, बिहार, बंगाल, येथेहि कायदेभंगाच्या चळवळीला असेंच उधान आलें होतें. मुंबई, सोलापूर, पेशावर हीं तर नित्याचींच रणक्षेत्रे झाली होतीं. मिठाचा कायदा मोडणे, जंगलचा कायदा तोडणे, निरोधन करणं, बहिष्कार घालणें, करबंदी करणे, जप्त वाङ्मय जाहीरपणें वाचणें व विकणें, बेकायदा सभा भरविणे व मिरवणुका काढणें इ. अनेक मार्गांनी जनतेनें राज्ययंत्राला हादरे देऊन ते खिळखिळे करून टाकलें. प्रत्यक्ष तुरुंगांत असें सव्वा लक्ष लोकच गेले. पण वरील अनेक मार्गांनीं, सरकारला आव्हान देऊन, प्रत्यक्ष कायदेभंग करून लाठी व गोळी खाण्याची सिद्धता ज्यांनीं दाखविली, त्यांची संख्या याच्या दसपट तर सहजच होती. शिवाय गिरण्या, रेल्वेचे कारखाने, इतर कारखाने यांतील लक्षावधि कामगारांनी संप पुकारून सहानुभूति दाखविली ती निराळीच. या चळवळीचें महत्त्व आहे ते यासाठीच. या देशावर पारतंत्र्यामुळे जी आपत्ति आली होती तिची खरी झळ या बहुसंख्य जनतेलाच लागत होती. दारिद्रय, उपासमार, रोग, गुलामगिरी या यातना खऱ्या तिच्या कपाळीं आल्या होत्या. त्याची तिला आतां जाणीव होऊन ती या आक्रमणाच्या प्रतिकारार्थ सिद्ध झाली. यांतच भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाची अलौकिकता आहे. येथे लोकसत्तेचा पुढे मागें उत्कर्ष होईल असा विश्वास वाटतो तो जनतेच्या या जागृतीमुळेच.
 सत्याग्रह, कायदेभंग, करबंदी या चळवळीचें खरें कार्य शत्रूर्चे हृदय- परिवर्तन हे नसून जनताजागृति हें आहे, हें मागें सांगितलेच आहे. या जागृतीची जी अंतिम सीमा महात्माजींनीं सांगितली होती ती कांहीं अंशी तीस सालच्या चळवळीनेंच गांठली होती. विधिमंडळे व न्यायालये यांवरील बहिष्कार, सरकारी नोकऱ्यांचा त्याग, कायदेभंग व करबंदी या पायऱ्यानंतर पोलीस व लष्कर यांनीं सरकारशीं असहकारितां करणे ही शेवटची पायरी, असे महात्माजींनी सांगितले होते. यामध्ये फार मोठे तत्त्व आहे. परकीय आक्रमण नष्ट करण्यासाठीं प्रारंभींच लष्करांत क्रांति घडविणे हा मार्ग अयोग्य आहे. जनतेंत जागृति झाली, लोक संघटित झाले, ते निग्रहानुग्रहास समर्थ झाले, म्हणजे त्यानंतर लष्कर जागृत होणे यांतच लोकशाहीचा खरा विकास आहे. प्रारंभींच लष्करी क्रान्ति झाली तर परकीय आक्रमण एखादे वेळीं नष्ट होईलहि, पण मग देशावर त्या लष्कराचे आक्रमण सुरू होईल. जर्मनी, इटली, चीन, जपान येथे हेच झाले, हे मागें सांगितलेच आहे. पण जनता जागृत व संघटित होऊन ती सैन्याचे नियंत्रण करण्यास समर्थ झाली म्हणजे मग सैन्य जागृत होऊन ते जनतेकडे येणे हा लोकसत्ताक क्रांतीचा स्वाभाविक क्रम होय. १९३० साली येथील जागृति याच स्वाभाविक क्रमाने चालली असल्याचे एक मोठेच गमक निदर्शनास आले. सरहद्द प्रांतांत हा प्रसंग घडला. तेथे खानबंधूंची खुदा-इ-खिदमतगार ही चळवळ फोफावत चालली होती. त्यांच्या एका सभेवर सरकारला गोळीबार करावयाचा होता. म्हणून गढवाल पलटणीतल्या शिपायांना तिकडे जाण्याचा हुकूम देण्यांत आला. त्या शिपायांनीं आपल्या निःशस्त्र बांधवांवर गोळी झाडण्याचे नाकारलें. आत्मक्लेशाच्या मार्गाने स्वकीयांचा-परकीयांचा नव्हे- हृदयपालट होतो तो असा. लष्कर ही आक्रमकांची आदिशक्ति होय. परवश असलेली ही आदिशक्ति स्ववश करून घेणें ही निःशस्त्र प्रतिकाराची परिपूर्ति होय. १९३० साली सैनिकांत जी जागृति झाली ती अगदीं अल्परूप होती, तरी तिचे महत्त्व या दृष्टीने फार मोठें आहे. शत्रूच्या बालेकिल्ल्याला पहिला सुरुंग लागला असा त्या घटनेचा अर्थ होता. ब्रिटिश साम्राज्य हें आतां एक दिवस कोसळून पडण्याचा संभव आहे अशी आशा जाणत्या भारतीयांच्या मनांत त्या दिवशीं निर्माण झाली.
 तीस सालच्या लढ्यानंतरचा मोठा लढा म्हणजे ४२ सालचा होय. या लढ्याचे नेतृत्व काँग्रेसने मुंबईच्या ठरावानें जरी महात्माजींकडे दिलें होतें, तरी तो लढा त्यांच्या पद्धतीनें व मार्गाने झाला नाहीं. पहिल्यापासूनच लढ्याची सूत्रे सोशॅलिस्टांनी हाती घेतली व अनत्याचारावर त्यांचा विश्वास नसल्यामुळे त्यांनीं त्याला घातपाताचे व कांहींसे दहशतवादाचे रूप दिले. हें आंदोलन फार प्रचंड झाले हे खरे; पण महात्माजींच्या कायदेभंग- करबंदीच्या पद्धतीने ३० सालच्या धर्तीवर हा संग्राम झाला असता तर त्याचे स्वरूप जास्त प्रभावी झालें असतें. तीस सालीं लाख सव्वा लाख लोक तुरुंगांत गेले होते व त्याच्या दसपट लोकांनी कायदेभंग केला होता. ही संख्या आतां ४०/५० लाखांवर जाऊन हिंदुस्थानांतच लष्करांत क्रान्ति घडून आली असती. त्या वेळीं एक गढवाल झालें. आतां सर्वत्र गढवालच झाले असते; पण तसे फारसे घडलें नाहीं. तरी सुदैव असे कीं, ही उणीव नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी भरून काढली. ४२ चे आंदोलन यशस्वी झाले याचे कारण सुभाषचंद्रांची ही उठावणी हेंच होय. लोकजागृतीच्या लाटा लष्करापर्यंत येऊन भिडल्या हें ब्रिटिशांनी या घटनेमुळे जाणले आणि ते शहाणे असल्यामुळे त्यांनी येथून काढता पाय घेण्याचे ठरविले.

नेताजी

 महात्माजींचा सत्याग्रह व सुभाषचंद्राची लष्करी उठावणी यांचा अन्योन्य संबंध आपण नीट ध्यानांत घेतला पाहिजे. तरच सत्याग्रहाचीं आंदोलने हीं लोकसत्तेस कोणत्या दृष्टीनें उपकारक झाली व त्याअन्वयें भावी काळांत आपणांस कोणते धोरण आंखले पाहिजे याचा उमज पडेल.
 सत्याग्रहाचा पहिला लढा महात्माजींनीं दक्षिण आफ्रिकेंत लढविला. त्याच वेळी एका सभेंत भाषण करून सत्याग्रह व निःशस्त्र प्रतिकार यांतील फरक त्यांनीं स्पष्ट करून सांगितला. निःशस्त्र प्रतिकार हे दुर्बलांचें साधन आहे. आपल्याजवळ शस्त्रं नाहींत म्हणून या मार्गाचा अवलंब करणे भाग आहे, असे त्याचे पुरस्कर्ते समजतात. त्या पुरस्कर्त्यांच्या मते हे निःशस्त्र लढे भावी सशस्त्र लढ्यांची पूर्वतयारी म्हणून लढावयाचे असतात. त्यांनी जनताजागृति होते. प्रक्षोभ वाढतो आणि अखेरीस सशस्त्र लढा यशस्वी होण्याचा संभव निर्माण होतो. सत्याग्रह हें साधन गांधींच्या मते या जातीचे नाहीं. ते प्रबलांचे शस्त्र आहे. त्यांत शत्रूला प्रेमाने जिंकावयाचे आहे. शस्त्र नाहीं म्हणून त्याचा अवलंब करावयाचा असे नसून ते सर्वात प्रभावी साधन आहे म्हणून त्याचा अवलंब करावयाचा असतो. ते सर्वात प्रभावी व समर्थ आहे याचे कारण असे कीं, तें आत्मिक सामर्थ्य आहे आणि इतर साधने हीं जड व पाशवी आहेत. म्हणून सत्याग्रह व निःशस्त्र प्रतिकार यांचा कोणी घोटाळा करूं नये.
 महात्माजींनीं दक्षिण आफ्रिकेत १९०६ सालीं जर्मिस्टन येथे सत्याग्रहाचे विवेचन केले त्याचा आशय वर दिला आहे. त्यावरून असे स्पष्ट होते कीं ते सत्याग्रहाला निःशस्त्र प्रतिकार म्हणून संबोधण्यास कधींच तयार नव्हते. पण काँग्रेसने त्यांच्या नेतृत्वाखालीं केलेले लढे व स्वतः महात्माजींनीं स्वतंत्रपणें केलेले लढे यांचा इतिहास आपण जर नीट पाहिला तर आपणांस असें दिसून येईल की खऱ्या अर्थाने त्यांतील एकाहि लढ्याला सत्याग्रह म्हणतां येणार नाहीं. जेव्हां जेव्हां लढ्यांत यश आले तेव्हां तेव्हां त्या लढ्यांतून जनतेची जी 'अद्भुत नियामक शक्ति' शत्रूला दिसली तिला तो भ्याला होता व म्हणूनच नमला असे दिसतें. जनरल स्मटस् किंवा एखादा चंपारण्यांतील युरोपीय मळेवाला यांच्या मनाचे क्षणभर परिवर्तन झाले असले तरी त्यावरून आफ्रिकन सरकारला किंवा युरोपीय मळेवाल्यांना हिंदी लोकांबद्दल प्रेम वाटू लागले होतें असें कोणी म्हणेल असे वाटत नाहीं. खुद्द महात्माजींनाहि आपल्या पंचवीस वर्षांच्या संग्रामांनी किंवा उपोषणांनी ब्रिटिशांचे हृदयपरिवर्तन केलें असें वाटलें नाहीं. (शिखरे चरित्र पृ. ४४९). त्याचप्रमाणे ज्या जनतेनें मळेवाल्यांशी किंवा ब्रिटिश सरकारशी लढा दिला, तिच्या मनांत या शत्रूबद्दल प्रेम वाटत होते असे म्हणण्याचे धाडस कोणी करील असेंहि वाटत नाहीं. पण शत्रूबद्दल प्रेम वाटणे व त्याचा हृदयपालट घडवून आणून शेवटीं त्याला आपल्यावर प्रेम करावयास लावणे, हे तर सत्याग्रहाचें मूल तत्त्व आहे. तेव्हां हिंदुस्थानांत जे लढे झाले ते महात्माजींनीं जरी सत्याग्रहाच्या उच्च व उदात्त पातळीवरून केले असले तरी वस्तुतः ते निःशस्त्र प्रतिकारच होते. निःशस्त्र प्रतिकार म्हणजेच मागच्या प्रकरणांत सांगितलेला टिळकांचा बहिष्कारयोग होय. गांधीजीवनरहस्यांत आचार्य जावडेकरांनी हे स्पष्ट केले आहे. 'जनतेला व कार्यकर्त्यांनाहि सत्याग्रहाची खरी वृत्ति अद्यापि समजलेली नाहीं' हे गांधीजींचे १९३४ सालचे मत दोनतीनदां उधृत करून त्यांनी स्वतःचे म्हणून असे मत दिले आहे कीं, 'राष्ट्रसभेचे लढे व तिचीं साधनें हीं बहिष्कारयोगांतच बसूं शकतात. प्रतिपक्षाविषयीं प्रेम हे जे सत्याग्रहनिष्ठेचे लक्षण तें राष्ट्रसभेच्या मार्गास लावता येणार नाहीं.' (पृ. ४०५) 'अहिंसा ही आम्ही धोरण म्हणून स्वीकारली आहे,' हें पंडितजींनीं तर अनेकवेळां बोलून दाखविले आहे. गांधीजींचे उजवे हात राजगोपाळाचारी यांचा प्रथम सत्याग्रहावर विश्वास होता. पण पुढे तेहि अविश्वास दाखवूं लागले. तेव्हां भारतीयांनी ब्रिटिशांशीं जे लढे दिले ते सर्व सत्याग्रही लढे नसून निःशस्त्र प्रतिकार होते, हे आपण लक्षांत ठेवले पाहिजे आणि या दृष्टीनें आपण पाहूं लागलों तर नेताजींच्या लष्करी मोहिमेशीं त्यांचा कसा दृढ संबंध आहे ते आपणांस कळून येईल.
 निःशस्त्र प्रतिकार हा सशस्त्र प्रतिकाराची पूर्व तयारी म्हणूनच केला जातो. लोकजागृति हें त्याचे मुख्य उद्दिष्ट असते, आणि या लोकजागृतीतच लोकसत्तेचीं बीजें असतात. सत्याग्रहांत या लोकजागृतीचे महत्त्व नाहीं. त्यांत मानवाची आध्यात्मिक उंची वाढविणे हा हेतु असतो. आणि मुख्य म्हणजे त्यांत संख्येला महत्त्व नसते. आपणाला अगदीं अस्सल, बावनकशी, एकनिष्ठ असे सत्याग्रही हवे. मग ते कितीहि थोडें असले तरी चालतील, असे महात्माजींनी अनेक वेळां जाहीर केले आहे. 'जर आपली बाजू न्याय्य असेल व प्रतिकारसाधनें शुद्ध असतील तर एकटी एक एक व्यक्ति देखील सत्याग्रहलढा सुरू करून तो चालू ठेवू शकेल' असे रंगराव दिवाकरांनी म्हटले आहे. १९३४ सालापर्यंत महात्माजींनी सुरू केलेल्या लढ्याला १७/१८ वर्षे पुरी झाली होती. त्या अवधीत दोन प्रचंड संग्राम व अनेक लहानसहान झगडे होऊन गेले होते. तरी सत्याग्रहाचे खरें तत्त्व माझ्याखेरीज कोणालाच समजलें नाहीं, असें ३४ साली महात्माजींनी मत दिलें. लोकसत्तेला शुद्ध सत्याग्रहाचा मुळींच उपयोग कसा नाहीं हें यावरून ध्यानीं येईल. देशांतील बहुसंख्य जनता आपल्या हक्कांच्या जाणीवेनें जागृत झाली तरच लोकशाहीचा उद्भव होतो व ती यशस्वी होते. सत्याग्रहाचीं तत्त्वें कितीहि थोर असलीं तरी ती पूर्णपणे अंगी मुरलेले लोक नर अगदी अल्पसंख्य असले तर त्यांचा राष्ट्रीय स्वातंत्र्याला किंवा लोकशाहीच्या प्रस्थापनेला कसलाच उपयोग होणार नाहीं. पण त्यांनीच आपल्या सामर्थ्यांचा उपयोग करून लोकांच्या ठायीं प्रतीकार भावना निर्माण केली, व बहुसंख्य जनतेत लढा निर्माण केला तर त्यायोगे लोकजागृतीच्या ज्या प्रचंड लाटा निर्माण होतील त्यांनी मात्र राष्ट्राची अभूतपूर्व प्रगति होईल यांत शंका नाहीं. महात्माजींनीं या भरतभूमित हें कार्य केले व करविलें. त्यांना जितक्या उंच पातळीवर जनतेस न्यावयाचे होते तितक्या उंचीवर ती गेली नाहीं हें खरे. पण त्यामुळे त्यांच्या लढ्याचे महत्त्व रतिमात्र कमी होत नाहीं. तीस कोटी लोकांना जागृत करणे हें यश एक आयुर्मान सफल करण्यास अगदीं पुरेसे आहे.
 नेताजी सुभाषचंद्र बोस हे सशस्त्र लष्करी क्रान्तीचे पुरस्कर्ते होते आणि शेवटी त्यांनीं तसा प्रचंड प्रयत्नहि केला होता, हे आतां सर्वश्रुत आहे. पण असे असले तरी या सशस्त्र क्रान्तींची पूर्व तयारी महात्माजींनी केलेल्या निःशस्त्र प्रतिकारामुळेच झाली होती, हें त्यांनी सिंगापूराहून केलेल्या भाषणांत प्रांजळपणे मान्य केलें आहे. 'गेल्या वीस वर्षांत हिंदुस्थानांत जी जागृति झाली आहे ती महात्माजींनी भारतीयांच्या हातीं जें अभिनव शस्त्र दिले आहे त्यामुळे झाली आहे या म्हणण्यांत मुळींच अतिशयोक्ति नाहीं, भारतीयांच्या ठायीं जो स्वाभिमान व आत्मविश्वास जागृत झाला आहे त्याचे श्रेय गांधीजींनाच आहे.' असे २ ऑक्टोबर १९४३ च्या भाषणांत त्यांनी निःसंदिग्ध उद्गार काढले आहेत. पण हे सांगून वर ते म्हणतात, 'हिंदुस्थानांत महात्माजींनीं सत्याग्रहाचा लढा सुरू केला तो सशस्त्र लढा शक्य नव्हता म्हणून. आतां काळ बदलला आहे. आतां भारतीयांना शस्त्र उपसणे शक्य आहे. आतां स्वातंत्र्यसेना सिद्ध झाली आहे याचा मला मोठा अभिमान वाटतो. हिंदुस्थानांत सध्या भारतीयांनीं जे प्रयत्न चालविले आहेत त्यांनीं स्वातंत्र्य मिळाले तर सर्वांत जास्त आनंद मलाच होईल. पण तशी मुळींच आशा वाटत नसल्यामुळे सशस्त्र क्रान्ति अपरिहार्य आहे असे माझे निश्चित मत झाले आहे; आणि म्हणूनच आम्हीं हें भारताचे अखेरचें स्वातंत्र्ययुद्ध आरंभिले आहे.' असे म्हणून नेताजींनीं शेवटी, 'राष्ट्रपिताजी, आमच्या या पवित्र स्वातंत्र्यसंगरांत आपला आम्हांला आशीर्वाद असावा.' अशी महात्माजींच्या चरणी प्रार्थना केली आहे.

टिळक- गांधी- नेताजी

 १९१७ सालापासून गांधीजींनी लढविलेले जे संग्राम त्यांचा अखेरच्या सशस्त्र क्रान्तीशीं कसा अविभाज्य संबंध आहे, ती अखेरची क्रान्ति म्हणजे पूर्वीच्या संग्रामांचीच कशी परिणति आहे, हें नेताजींच्या वरील उद्गारांवरून स्पष्ट होईल. १८८० सालापासून या देशांत ज्या चळवळी झाल्या त्या सर्वांचा लोकजागृति हा हेतु होता. त्या महाशक्तीच्या सामर्थ्यानेंच स्वातंत्र्यप्राप्ति करून घ्यावयाची हे टिळकांनीं प्रारंभीच निश्चित करून अखिल भारतीय जनतेच्या अंगच्या सुतशक्तीला आवाहन करण्यास प्रारंभ केला आणि चाळीस वर्षांच्या आपल्या अविरत तपश्चर्येने जागृतीचे लोण त्यांनी सुशिक्षित मध्यमवर्गापर्यंत आणून ठेविलें. बहुसंख्य जनतेत शिरावयाचें व कायदेभंग व करबंदी- म्हणजेच बहिष्कार योग या मार्गानें लढा करावयाचा अशी योजना आंखून जागृत होत चाललेल्या मध्यमवर्गाला जनतेत मिसळण्याचा व तेथे राजकीय जागृति घडवून आणण्याचा ते सारखा उपदेश करीत होते; पण बहिष्कारयोगाचा प्रत्यक्ष आचार त्यांना त्यांच्या आयुर्मानत घडवून आणतां आला नाहीं. ते कार्य महात्माजींनीं केलें. सुशिक्षित मध्यमवर्गाच्या कक्षेतून अनंतमुखांनी पाट फोडून त्यांनी हा जागृतीचा लोंढा कष्टकरी जनतेपर्यंत नेऊन पोचविला. तिसरी कक्षा लष्कराची. देश परक्यांच्या अधीन असतांना हा सैनिकांचा वर्ग सर्वात प्रतिगामी व संस्कार- अक्षम असा असतो. तो तसाच रहावा अशी जेत्यांनी बुद्धिपुरःसर योजना केलेली असते. म्हणून लोकशाही पद्धतीनें निर्माण केलेल्या जागृतीच्या लाटा तेथे सर्वात शेवटीं पोचतात. त्या तेथे पोचल्या की लोकजागृतीच्या कार्याची सांगता होते. ही सांगता नेताजींनीं घडवून आणली. बहुसंख्य जनतेंत महात्माजींनीं निर्माण केलेला प्रक्षोभ, स्वत्वाचा अभिमान, आत्मविश्वास व अन्यायाच्या प्रतिकारार्थ आत्मार्पण करण्याची बुद्धि हे गुण त्यांनीं हिंदी लष्करापर्यंत नेऊन पोचविले. त्यांचे प्रत्यक्ष कार्य भारताबाहेर झाले असले तरी त्यांनीं तेथे दिलेल्या प्रेरणा हिंदुस्थानांत लष्करापर्यंत येऊन पोचल्या होत्या, हें १९४५- ४६ साली कलकत्ता, मुंबई व कराची येथे नौदळांत जी उठावणी झाली तीवरून दिसून येते. १८५७ च्या आधी एका पलटणीनें ब्रह्मदेशांत जाण्याचे नाकारले होते. त्या वेळी या आज्ञाभंगाबद्दल त्या सर्व पलटणीला तोफेच्या तोंडी देण्यांत आले होते. १९३० सालीं गढवाल- पलटणीनें सत्याग्रहीवर गोळ्या झाडण्यास नकार दिला, तेव्हां त्यांतील सैनिकांना १० ते १५ वर्षापर्यंतच शिक्षा झाल्या आणि त्यासुद्धां कांहींना. १९४३ व ४५ सालीं प्रत्यक्ष बादशहाविरुद्ध हिंदी लष्कर लढाईस उभे राहिले होते; पण या लष्कराला शिक्षा अशी जवळजवळ झालीच नाहीं. टिळक, गांधी व नेताजी यांचा हा महिमा आहे. त्यांनी कोणचें परिवर्तन, कोणची क्रांति घडवून आणली आहे, हे ब्रिटिशराजकर्त्यांना कळले. या अफाट जनसागराचे सामर्थ्य त्यांनीं ओळखले व शहाणपणाने माघार घेतली. लोकायत्त क्रान्तीच्या महायशाचे हे प्रथम लक्षण होय.

 टिळक व गांधी हे दोघेहि लोकशाहीचे निःसीम उपासक होते आणि म्हणूनच जनता जागृति हा त्यांच्या चळवळीचा आत्मा होता. महात्माजी हे स्वातंत्र्यप्राप्ति व लोकसत्तेची प्रस्थापना यापेक्षांहि उच्च हेतूने प्रेरित झाले होते. अखिल मानव्याकडे त्यांची दृष्टि होती. सत्य अहिंसेचे संदेश देऊन या मानव्याची उंची वाढवावी, असें बुद्धजीजसप्रमाणे त्यांचे ध्येय होते. प्रत्यक्षांत त्यांचा सत्याग्रह निःशस्त्र प्रतिकाराच्या वर जाऊं शकला नाहीं; पण लोकशाहीच्या दृष्टीने पाहतां तिच्या प्रस्थापनेस अवश्य ती लोकजागृति घडवून आणण्याचे महाकार्य त्यांच्या संग्रामांनी घडवून आणले आहे, यांत आतां शंका घेण्यास जागा आहे असे वाटत नाहीं. या संग्रामांनी शत्रूचा हृदयपालट झाला नसला तरी हा भारतीय समाज त्यामुळे आमूलाग्र बदलून गेला आहे. ब्रिटिश राज्यकर्ते व त्यांचे अगदी सामान्य अधिकारी यांच्याकडे मान वर करून बघण्याची ज्या खेडुतांना पूर्वी ताकद नव्हती, तेच आतां पूर्ण निर्भय बनले व त्या राज्यकर्त्यांना आव्हान देण्यास सिद्ध झाले. मानवत्वाची व म्हणूनच लोकशाहीची ही प्रगति केवळ असामान्य होय. आपल्या मूलभूत हक्कांची जाणीव होऊन ते हक्क जो हिरावून घेतो त्याच्याविरुद्ध लढा करण्यास सिद्ध होणें व त्या लढ्यांत प्राणार्पणहि करण्याची तयारी करणे हे लोकसत्ताक देशांतील नागरिकांचे पहिले लक्षण होय. हा गुण नसेल तर स्वातंत्र्यांतहि लोकसत्ता टिकविणें शक्य नाहीं, मग पारतंत्र्यांत तर प्रश्नच नाहीं. हा एक गुण अंगीं येणे याचा अर्थ मानवाचे समूळ परिवर्तन होणे, त्याच्या जीवनांत सर्वस्वीं क्रांति होणें असा होतो. यासाठी त्याच्या मनाची क्षुद्रता नष्ट झाली पाहिजे, त्याचा दृष्टिकोन विशाल झाला पाहिजे, त्याच्या चित्तांत असंतोष निर्माण झाला पाहिजे, त्याच्या आकांक्षा वाढल्या पाहिजेत आणि त्यांच्या परिपूर्तीसाठीं वाटेल तो त्याग करण्याची त्याच्या मनाची सिद्धता झाली पाहिजे. प्राण देऊनहि कांहीं मिळविण्याजोगे आहे ही भावना क्षुद्र मानवांत नसते. जड शरीरांत प्राण धारण करून ठेवणे हे त्याचे अंतिम ध्येय असते. त्याला मरण पत्करूनहि कांहीं मिळविण्याजोगे आहे हे पटवून देणे व तशा कृतीस प्रवृत्त करणे यापेक्षां मानवाची व लोकसत्तेची जास्त मोठी सेवा कोणचीहि नाहीं. आपल्या अनेक सत्याग्रह संग्रामांनी महात्माजींनीं भारतीय जनतेत हें परिवर्तन घडवून आणले आहे आणि म्हणूनच भारतीय लोकसत्ता त्यांची अखंड ऋणी राहील.



प्रकरण सातवें

गांधीवाद व लोकसत्ता


अध्यात्मनिष्ठा

 भारतीय लोकसत्तेचा विकास व प्रगति घडवून आणण्याच्या काम महात्माजींनीं केवढे अलौकिक व बहुमोल कार्य केलें आहे, त्याचा विचार मागील लेखांत आपण केला. त्यांनीं आपल्या सत्याग्रह- संग्रामांनी भारतीय जनतेतील मानव जागृत केला आणि स्वाभिमान, राष्ट्रभक्ति, अन्यायाची चीड,