भारतीय लोकसत्ता/गांधीवाद व लोकसत्ता

ते हक्क जो हिरावून घेतो त्याच्याविरुद्ध लढा करण्यास सिद्ध होणें व त्या लढ्यांत प्राणार्पणहि करण्याची तयारी करणे हे लोकसत्ताक देशांतील नागरिकांचे पहिले लक्षण होय. हा गुण नसेल तर स्वातंत्र्यांतहि लोकसत्ता टिकविणें शक्य नाहीं, मग पारतंत्र्यांत तर प्रश्नच नाहीं. हा एक गुण अंगीं येणे याचा अर्थ मानवाचे समूळ परिवर्तन होणे, त्याच्या जीवनांत सर्वस्वीं क्रांति होणें असा होतो. यासाठी त्याच्या मनाची क्षुद्रता नष्ट झाली पाहिजे, त्याचा दृष्टिकोन विशाल झाला पाहिजे, त्याच्या चित्तांत असंतोष निर्माण झाला पाहिजे, त्याच्या आकांक्षा वाढल्या पाहिजेत आणि त्यांच्या परिपूर्तीसाठीं वाटेल तो त्याग करण्याची त्याच्या मनाची सिद्धता झाली पाहिजे. प्राण देऊनहि कांहीं मिळविण्याजोगे आहे ही भावना क्षुद्र मानवांत नसते. जड शरीरांत प्राण धारण करून ठेवणे हे त्याचे अंतिम ध्येय असते. त्याला मरण पत्करूनहि कांहीं मिळविण्याजोगे आहे हे पटवून देणे व तशा कृतीस प्रवृत्त करणे यापेक्षां मानवाची व लोकसत्तेची जास्त मोठी सेवा कोणचीहि नाहीं. आपल्या अनेक सत्याग्रह संग्रामांनी महात्माजींनीं भारतीय जनतेत हें परिवर्तन घडवून आणले आहे आणि म्हणूनच भारतीय लोकसत्ता त्यांची अखंड ऋणी राहील.



प्रकरण सातवें

गांधीवाद व लोकसत्ता


अध्यात्मनिष्ठा

 भारतीय लोकसत्तेचा विकास व प्रगति घडवून आणण्याच्या काम महात्माजींनीं केवढे अलौकिक व बहुमोल कार्य केलें आहे, त्याचा विचार मागील लेखांत आपण केला. त्यांनीं आपल्या सत्याग्रह- संग्रामांनी भारतीय जनतेतील मानव जागृत केला आणि स्वाभिमान, राष्ट्रभक्ति, अन्यायाची चीड, प्रतिकार करण्याचे धैर्य, आत्मार्पण करण्याची सिद्धता या महनीय गुणांनी त्याला संपन्न केले. त्यामुळे या सत्याग्रह- संग्रामांचा इतिहास भारतीय लोकसभेच्या इतिहासांत अग्रस्थानीं राहील, यांत शंका नाहीं; पण हे संग्राम चालवितांना व आपल्या विधायक कार्यक्रमाचा प्रसार करतांना महात्माजींनी एक मोठे तत्त्वज्ञान प्रस्थापित केले आहे. त्या तत्त्वज्ञानाचा व्याप केवळ राजकारणापुरता मर्यादित नसून मानवाच्या इहपरलोकींच्या सर्व जीवनाला सामावून घेईल इतका तो मोठा आहे. त्याचे परीक्षण केल्यावांचून महात्माजींच्या कार्याचें परीक्षण पुरें होणार नाहीं. म्हणून आतां त्या तत्त्वज्ञानाचें म्हणजेच साधारणतः गांधीवाद म्हणून प्रसिद्ध असलेल्या सिद्धान्तसमूहाचे किंवा विचारप्रणालीचे विवेचन करण्याचा प्रयत्न करूं.
 गांधीवादाची चिकित्सा अवश्य खरी, पण ती फार अवघड आहे. जवळजवळ अर्ध शतकभर गांधीजींचें जीवनकार्य चालूं होतें. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रांत त्यांनीं कांहीं चळवळी केल्या आहेत व मतें सांगितली आहेत. त्यांच्या कार्याचा विस्तारहि असाच प्रचंड आहे. भरतभूमि ही जी त्यांची कर्मभूमि हीच अगोदर खंडप्राय आहे आणि त्यांनी येथे जे कार्य केले त्याचे पडसाद सर्व जगभर उमटलेले असून जगांतल्या अनेक पंडितांनीं, शास्त्रज्ञांनीं व कार्यकत्यांनी त्यांच्या कार्याविषयीं चर्चा केलेली आहे. या सर्वाचे मंथन करून कांहीं निर्णय ठरविणे हे मोठे दुष्कर आहे; पण एवढ्यानेच भागत नाहीं. गांधीवादाची चिकित्सा दुष्कर होण्याचे एवढेच कारण नाहीं. यापेक्षां जास्त महत्त्वाची अशीं दोनतीन कारण त्यांचा विचार केल्यावांचून आपणांस पुढे जाता येणार नाहीं आहेत.
 कोणच्याहि तत्त्वज्ञानांत जे भिन्न भिन्न सिद्धान्त सांगितलेले असतात, जी अनेक मते प्रगट केलेली असतात त्यांत कांहीं सुसंगति किंवा सुसूत्रता असावी अशी अपेक्षा असते. आतां ही सुसंगति राखणे फार अवघड आहे व अत्यंत थोर पुरुषांच्या भिन्न कृतीत व मतांतहि पुष्कळ वेळां विसंगति दिसते हें खरें; पण आपल्या भिन्न सिद्धान्तांत सुसंगति राखण्याचा ते प्रयत्न तरी करीत असतात. महात्माजींच्या बाबतींत ही मूलभूत अपेक्षाच विफल आहे. कारण, 'अशी सुसंगति राखणें हा माझा कधींच हेतु नसतो. मी लिहूं लागलों की पूर्वी आपण काय म्हणालो होतो याचा कधींहि विचार करीत नाहीं. त्या त्या क्षणीं ने सत्य मला प्रतीत होतें त्याशीं सुसंगति ठेवर्णे येवढेच माझें धोरण असते.' असे त्यांनीं स्वतःच सांगून ठेवले आहे. (हरिजन ३०- ९- ३९) जन्मनिष्ठ वर्णव्यवस्था त्यांना मान्य आहे. इतकेंच नव्हे तर, आत्म्याच्या विकासासाठीं बेटिबंद जातिव्यवस्था अवश्य आहे, असेंहि ते म्हणतात. पण जातिव्यवस्थेमुळे हिंदुसमाजाचा अधःपात झाला असे सांगून मिश्रविवाह व सहभोजन यांचा पुरस्कारहि ते करतात. वर्धाश्रमांत विवाह व्हावयाचा तर वधूवरांपैकी एकजण हरिजन असलाच पाहिजे अशी त्यांची शेवटी अट असे आणि पहिल्या व दुसऱ्या मतांत विसंगति आहे असें कोणी दाखवून दिल्यास 'मला तसे मुळींच वाटत नाहीं' असे ते सांगत. असे प्रकार एकदोनदांच घडले असे नाहीं. गांधी तत्त्वज्ञानाच्या प्रत्येक शाखेंत, महात्माजींच्या प्रत्येक कार्यक्रमांत, प्रत्येक चळवळींत असे प्रकार अनेक वेळां घडले आहेत. यामुळे अभ्यासक हा गुदमरून जाऊन 'गांधी' या प्रचंड घटनेकडे मूढ होऊन पाहूं लागतो.
 गांधीवादाचा अभ्यास करून त्यावरून कांहीं निष्कर्ष काढणे हे काम कंठीण होण्याचे आणखी एक कारण आहे. महात्माजी कांहीं तत्त्वें, कांहीं विचार, कांहीं मतें ही अंतिम ध्येयाविषयींचीं म्हणून सांगतात व कांहीं मतें आजच्या व्यवहारास अनुलक्षून सांगतात; आणि या दोहोंचीं वाचकांच्या मनांतच नव्हे तर महात्माजींच्या लेखनांतहि सारखी गल्लत होत असते. त्यांच्या अंतिम रामराज्याचें जें रूप त्यांत कसल्याहि प्रकारचे यंत्र असणार नाहीं हें तर निश्चितच आहे. पण लुई फिशरशीं बोलतांना आजच सर्व आगगाड्या नष्ट झाल्या तरी मला मुळींच दुःख होणार नाहीं असें ते बोलून जातात. साध्य व साधने दोन्ही सारखींच शुद्ध असली पाहिजेत, या दोहींचा मी अभेद मानतो, असे एकदां म्हणतात. कोणच्याहि व्यवहारांत त्याला अपवाद नाहीं असें सांगतात. पण काँग्रेसचे कार्य हें शेकडा शंभर टक्के भांडवलदारांनीं दिलेल्या पैशावरच चालले आहे, हें दुर्दैवानें खरें आहे हे लुई फिशरजवळ प्रांजळपणे मान्य करतात. साध्य व साधने यांच्या या भेदाभेदांतून निश्चित निर्णय करणे जवळ जवळ अशक्य होऊन बसतें.
 पण यापेक्षांहि जास्त चमत्कारिक कारण आहे. गांधीवादी पंडित असे सांगतात की, गांधीजींचे विचार व मतें आणि त्यांनी घेतलेले निर्णय बहुधा योग्य व अचूक असतात. पण त्यांचे समर्थन पुष्कळ वेळां ते इतक्या विचित्र पद्धतीने करतात कीं, त्या विचारांची हानीच व्हावी. तर्कशुद्ध रचना करून आपला मुद्दा सिद्ध करण्याची कला महात्माजींना तितकीशी वश नव्हती व त्यामुळे त्यांचे सिद्धांत समर्थनीय व शास्त्रशुद्ध असूनहि त्यांच्याविषयीं घोटाळा होतो, असें यांपैकीं कांहीं पंडितांचे मत आहे. 'पॉवर ऑफ नॉनव्हायोलन्स' या आपल्या पुस्तकांत रिचर्ड ग्रेग यांनी अशासारखाच विचार मांडला आहे. 'अनत्याचारी, अहिंसात्मक, प्रतिकाराच्या सिद्धांताविषयीं गांधीजी जें स्पष्टीकरण देतात, समर्थन करतात तें आपणां पाश्चात्यांना पटण्याजोगें नाहीं. आपणांहून त्यांची जीवनविषयक वृत्ति व वैचारिक पार्श्वभूमि फार निराळी आहे, म्हणून त्यांच्या सत्याग्रहाचे स्वतंत्र विवेचन करण्याची आवश्यकता आहे' असें प्रारंभींच ग्रेग यांनी सांगून ठेवले आहे. आचार्य कृपलानी यांचेंहि मत असेंच आहे.
 या कारणामुळे महात्माजींचे कार्य व गांधीवाद म्हणून प्रचलित असलेले तत्त्वज्ञान यांचा आपण अत्यंत सावधगिरीने अभ्यास केला पाहिजे. गेल्या प्रकरणांत वर्णिलेले त्यांचे सत्याग्रह- संग्राम व त्यामुळे त्यांनी घडवून आणलेली लोकजागृति ही क्षणभरहि दृष्टिआड न करता त्यांच्या प्रकाशांतच महात्माजींच्या कृति व उक्ति आपण जोखून पाहिल्या पाहिजेत. त्यांची अनेक तत्त्वे व कृति, सकृतदर्शनीं पहातां, लोकशाहीला व एकंदर समाजाच्या प्रगतीला निश्चित घातक अशीं दिसतात; पण तेवढ्यामुळे आपण त्यांच्या महाकार्याचा विपरीत अर्थ केला, त्यांच्या थोर चारित्र्यावर पामीदत्ताप्रमाणे कलंक फासला तर त्यांत आपलाच घात आहे. उलट पट्टाभीप्रमाणे भोळ्याभाबड्या अंधभक्तीने सर्वच्या सर्व गांधीवाद आपण उपकारक म्हणून स्वीकारला तर तेहि हानिकारक आहे. तेव्हां आपला विवेक सर्वतोपरी जागृत ठेवून मोठ्या दक्षतेने आपण या जगद्वंद्य महाविभूतीच्या कार्याचे परीक्षण केले पाहिजे.
 गांधी-जीवनाचें व म्हणूनच गांधीवादाचें मूल महातत्त्व म्हणजे अध्यात्मनिष्ठा हे होय. पंचज्ञानेंद्रियें व बुद्धि यांना अनाकलनीय अशी एक शक्ति या विश्वाचे नियंत्रण करीत असते, ती विश्वाचें भरणपोषण करते, मानवाच्या उन्नतीची काळजी वहाते, विश्वांत न्यायाची प्रस्थापना करते, सत्याचा सर्वत्र जय होईल अशी व्यवस्था करते आणि मानवानें मनापासून तिची प्रार्थना केल्यास ती त्याला अनुकूल होते अशी अध्यात्मवादाची श्रद्धा आहे. गांधीजींची अशीच श्रद्धा होती. आगरकरांच्या कार्याचे विवेचन करतांना भौतिक अधिष्ठान या लेखांत आपण असें पाहिले आहे कीं, ही श्रद्धा मानवाच्या सर्व जीवितावर प्रभुत्व गाजवीत असेल, तिचे वर्चस्व सर्वत्र अबाधितपणे चालत असेल, तर ती श्रद्धा लोकशाहीला मारक झाल्यावांचून रहाणार नाहीं. मानवाची जी अल्पस्वल्प बुद्धिवशता आहे, तर्कनिष्ठा आहे तिच्यावरच लोकशाहीची सर्व इमारत उभी रहात असते आणि अध्यात्मवादांत बुद्धि, तर्क, बौद्धिक चिकित्सा, भौतिक ज्ञान यांची अवगणना होते. गांधीवादानें कळून वा न कळून अशी अवगणना निश्चित केली आहे. महात्माजी परमेश्वराचे स्वरूप वर्णून सांगतांना, सत्य म्हणजेच परमेश्वर, असें कांहीं वेळां सांगतात. ही निष्ठा बुद्धिवादाला मारक होत नाहीं; पण त्यांची खरी निष्ठा तुकाराम- नामदेवांसारखी आहे. त्यांचा परमेश्वर प्रार्थनेला वश आहे. तो अभक्तांना शासन करतो. भक्तांचा योगक्षेम चालवितो. म्हणून त्यांनी कसलाहि सांठा करण्याची गरज नाहीं. हा परमेश्वर जगाच्या व्यवहारांत नित्य हस्तक्षेप करतो आणि आपण अस्पृश्यतेसारखी पापें केली तर भूकंपासारखे उत्पात घडवून आपणांस शासन करतो. अशा या परमेश्वराचे आकलन होण्यास गुरुकृपेची आवश्यकता आहे, त्यावांचून सत्यज्ञान होणे अशक्य आहे, अशीहि महात्माजींची श्रद्धा आहे. (आत्मचरित्र पृ. ११३). जगाच्या व्यवहारांत नित्य हस्तक्षेप करणारा, सत्याचा विजय घडवून आणण्यांत तत्पर असलेला, पापपुण्याची यथायोग्य दखल घेणारा व गुरूच्या मध्यस्थीनेंच वश होणारा परमेश्वर हा बुद्धिवादाला व म्हणूनच लोकसत्तेला अत्यंत घातक आहे.

आत्मबल

 या अध्यात्मनिष्ठेतून निर्माण होणारी आत्मबलाची कल्पना अशीच लोकशाहीशीं विसंगत आहे. या आत्मबलाचा कांहींसा बुद्धिगम्य अर्थ सांगण्याचा आचार्य जावडेकरांनी प्रयत्न केला आहे. 'निष्कामसेवा, निःपक्षपाती प्रेम आणि अहिंसक शौर्य या गुणांना आत्मबल ही संज्ञा देतां येईल. सेवा, जनताप्रेम, शौर्यशाली सत्यनिष्ठा, त्याग, शौर्य, चिकाटी हे सर्व आत्मगुण होत असा अर्थ सांगून, जुन्या निष्ठा नष्ट करून नव्या निर्माण करणें हें आत्मबलाशिवाय शक्य होत नाहीं. केवळ बुद्धिबलाचा सामाजिक क्रान्तिकार्यास फारसा उपयोग होत नाहीं,' असा सिद्धान्त आचार्य सांगतात. (गांधी- जीवन रहस्य पृ. ४२८-२९). पण आत्मबलाचा एवढाच अर्थ असेल, तर त्यांत नवीन असें कांहींच नाहीं. वरील आत्मगुणांची महती सर्वांनाच मान्य होती व आहे. भौतिकनिष्ठ व भोगवादी युरोपांतहि मॅझिनी, लिंकन, लेनिन यांसारखे क्रान्तिधुरीण व सामाजिक क्रान्तीच्या लहानलहान क्षेत्रांतले शेकडों कार्यकर्ते आत्मबलानें संपन्न होते, हे कोणालाहि मान्य करावें लागेल; पण महात्माजींचे आत्मबल ते हें नव्हे. ते कांही तरी गूढ व अतींद्रिय असेंच बल असले पाहिजे. १९३४ साली काँग्रेसमधून गांधीजी बाहेर पडले, त्यावेळी त्यांनी बाहेर पडण्याचीं जीं कारण सांगितलीं, त्यांतलें एक प्रमुख कारण त्यांनी असे सांगितले की, 'सत्याग्रहास अवश्य असणारी शुद्ध आत्मिक शक्ति वाढविण्यासाठी मीं राष्ट्रसभेच्या कार्यातून निवृत्त होत आहे.' आतां गांधीजींनीं आत्मशक्ति वाढवावयाची म्हणजे काय करावयाचे ते कळत नाहीं. काँग्रेसमध्ये ते राहिले तर ती वाढणार नाहीं व बाहेर पडले तरच वाढणार, म्हणजे काय ते कळणें त्याहून कठीण आहे. प्राचीन काळच्या ऋषिमुनींसारखेच हेंहि बल गूढ, अतर्क्य व अनाकलनीय आहे असे मानले तरच याचा कांहीं अर्थ लागतो. 'खरा प्रामाणिक व निष्ठावंत असा एक जरी सत्याग्रही मिळाला तरी तो इंग्रजांना नमवूं शकेल' असे जेव्हां ते म्हणतात, तेव्हां त्या आत्मबलाचा असाच अर्थ त्यांच्या मनांत असला पाहिजे. ही उक्ति केवळ अतिशयोक्ति असती तर तिचा अर्थ समजला असता; पण महात्माजींच्या बाबतींत तसें म्हणतां येत नाहीं. त्यांच्या अध्यात्मनिष्ठेच्या कोणच्याच बाबतींत हें म्हणणे सयुक्तिक ठरणार नाहीं. वर सांगितलेली भोळी, श्रद्धाळू ईश्वरनिष्ठा ही लोकशाहीच्या अनेक पुरस्कर्त्यांच्या चित्तांत पूर्वी असे व अजूनहि असणे शक्य आहे; पण स्वतःची मनःशांति व मानसिक उन्नति यापलीकडे ते तिची मर्यादा जाऊं देत नाहींत. महात्माजींचे तसें नाहीं. अध्यात्मक्षेत्रांतील प्रत्येक श्रद्धा सामाजिक प्रपंचाच्या ऐहिक व्यवहारांत प्रभावी ठरते, असे मानून ते त्या धोरणानें कार्याला वळण देतात. एकटा एक सत्याग्रही आत्मबलाने शत्रूला जिंकील, ही त्यांना अत्युक्ति वाटत नाही. त्या श्रद्धेमुळे ते वैयक्तिक सत्याग्रहाचा आदेश देतात आणि सत्याग्रहींच्या पापपुण्याची चवकशी करूनच त्यांना चळवळींत भाग घेण्यास अनुज्ञा देतात. याच्या जोडीला त्यांच्या प्रार्थना, त्यांचे रामनामाचे जप, त्यांची उपोषणे यांचा विचार केला तर त्यांचे आत्मबल हें एक गूढ व अतींद्रिय बल असले पाहिजे, याविषयी शंका रहात नाहीं. समाजाच्या ऐहिक व्यवहारावर बुद्धीला अनाकलनीय अशा अतींद्रिय बलाचें म्हणजेच आत्मबलाचे प्रभुत्व जो जो जास्त होते, तो तो तो समाज लोकशाहीपासून दूर जाऊं लागतो. कारण हें आत्मबल (अशी कांहीं शक्ति आहे असे क्षणभर गृहीत धरले तरी) लाखांतून एखाद्याला वश असणार. इतरांना स्वप्नांतहि त्याची प्राप्ति होणें शक्य नाहीं. अर्थात् ही पराकाष्ठेची विषमता होय. भांडवलामुळे निर्माण झालेली विषमता या अध्यात्मामुळे निर्माण झालेल्या विषमतेपुढे कांहींच नव्हे. प्रार्थना, रामनामजप, उपोषणे यांचा जोर वाढला म्हणजे भांडवलशाहीत झाली नसतील इतकी जनतेचीं मनें पंगु होतात, दुबळीं होतात. असल्या जनतेला लोकशाही पेलणे कधींच शक्य नाहीं.

अंतःसंवेदना

 गांधीजींची अंतःसंवेदनेवरील श्रद्धा व भारतीय राजकारणाचें त्यांनी त्या अंतःसंवेदनेने॑- म्हणजेच प्राकृत भाषेत आंतल्या आवाजानें- केलेले सूत्रचालन ही गांधीवादांतील अध्यात्मनिष्ठेची पराकोटी होय. आपली ज्ञानेंद्रियें व बुद्धि यांच्याहून निराळें असें एक ज्ञानसाधन थोर पुरुषांना उपलब्ध असतें, अशी कल्पना प्राचीन काळी सर्व जगांत रूढ होती. सर्व धर्मसंस्थापक, धर्मप्रवक्ते, साधुसंत, पोपसारखे धर्मपीठांचे अधिकारी यांना ही परमेश्वरी वाणी प्रसन्न असते, अशी लोकांची समजूत होती. पंधराव्यासोळाव्या शतकांत विज्ञानाचा उदय झाल्यावर या श्रद्धेचा जोर कमी झाला आणि अलीकडे ऐहिक व्यवहारापुरती तरी बहुतेक सर्व जगांत ही श्रद्धा नाहींशीं होत आली होती. महात्माजींनी या अंतःसंवेदनेवरील श्रद्धेला पुन्हां दृढता आणली. स्वतःला अंतर्ज्ञान होते असे त्यांना वाटत असे आणि भारतीय राजकारणांत अनेक महत्त्वाचे निर्णय त्यांनी या अंतःसंवेदनेवर विसंबून कायम केले आहेत. अंतःसंवेदनेवरील ही श्रद्धा लोकसत्तेला पराकाष्ठेची घातक ठरते. कारण या श्रद्धेमुळे बुद्धिगम्य ज्ञान, तार्किक विचारसरणी, बुद्धिवाद यांना गौण स्थान प्राप्त होते, त्यांची अवगणना होते आणि ही अवगणना झाली कीं समाजांत पराकाष्ठेची विषमता निर्माण होते. भांडवलशाहीत अपार धन जसे कांहीं थोड्या व्यक्तींनाच लाभते, त्याचप्रमाणे परमार्थशाहीत अंतःसंवेदनेचें धनहि फार थोड्यांनाच लाभते; आणि मग ती भाग्यवान् माणसे इतरांना आपले दास करून ठेवतात. भांडवली धनाचा भांडवलशहा जसा आज दुष्ट उपयोग करतात, तसाच याहि बलाचा पोपसारखे लोक दुष्ट उपयोग करतात, हे इतिहासाने दाखविले आहे. युरोपांत भौतिक विद्येच्या पुनरुज्जीवनाची जी चळवळ झाली तिनें लोकांना या पारमार्थिक शहांच्या गुलामगिरीतून सोडविलें. प्रत्येकाला स्वतःच्या बुद्धीनें निर्णय करण्याचा अधिकार आहे, हे महातत्त्व या चळवळींतून निर्माण झाले आणि लोकशाहीचा पाया तेथेच घातला गेला. बुद्धीचा अधिकार मान्य झाल्यामुळे माणसांचे व्यक्तित्व सिद्ध झाले. स्वतःची बुद्धि वापरण्याचा हा अधिकार, आपल्या विवेकानें निर्णय करण्याचा हा हक्क, प्रत्येक घटनेची स्वतः चिकित्सा करण्याची मानवाची ही योग्यता अमान्य झाली, तर लोकशाहीला शून्य अर्थ आहे. गांधीवादाने कळून वा नकळून हा हक्क अमान्य केला आहे. महात्माजी दांडीला निघाले तेव्हा आपल्या अनुयायांनी नंतर काय करावयाचे हे त्यांनी कोणालाच सांगितले नव्हतें. त्याविषयीं पट्टाभि म्हणतात, 'कदाचित् गांधींनाहि ते माहीत नसेल. एखाद्या स्फूर्तिस्फुलिंगाच्या प्रकाशांत त्यांना ज्ञान होई व अंतःसंवेदनांनीं ते आपला व्यवहार करीत. धर्मप्रवण व्यक्तीला विवेक आणि बुद्धि हीं मार्गदर्शक नसतात आणि म्हणूनच आपल्या प्रतिकार-पद्धतीची बौद्धिक चिकित्सा न करण्याची धोक्याची सूचना गांधीजींनी दिली होती.' (काँग्रेसइतिहास, खंड १ ला, उत्तरार्ध पृ. ६१) १९४० सालीं पुढील लढा कसा द्यावयाचा याची चर्चा काँग्रेसच्या बैठकींत चालू होती. लढा तत्काळ सुरू करावा, राष्ट्र त्याला सिद्ध आहे असे कित्येकांचे मत होते. गांधीजींना या मतानें धक्काच बसला. त्यांच्या मते राष्ट्र मुळींच सिद्ध नव्हते. लढ्याची पूर्वतयारी झाली नव्हती. तेव्हां सत्याग्रह संग्राम सुरू करण्यांत अर्थ नव्हता. आतां लढ्याची पूर्वतयारी म्हणजे काय, असा प्रश्न येणारच. चरखा व खादी हें त्याला गांधीजींचे उत्तर होते. ते उत्तर देऊन त्यांनी असे स्पष्ट बजावलें कीं, 'तुमच्यापैकी बहुतेकांचा चरख्यावर विश्वास नाही. तुम्हांला हा कार्यकारणसंबंध मान्य नाहीं; पण मी तुमचा सेनापति आहे आणि काँग्रेस ही लढाऊ संघटना आहे. तिच्यांत शिस्त अवश्य आहे; आणि खरी शिस्त कोणची? आपल्या बुद्धीला पटत नसलेल्या आज्ञासुद्धां उत्साहाने पार पाडणे ही खरी शिस्त होय. सेनापति निवडतांना तुम्ही बुद्धि वापरा; पण नंतर प्रत्येक आज्ञेची चिकित्सा करण्याचा अधिकार तुम्हांला नाहीं. तेवढ्यापुरती लोकशाही संपली असें समजा' (पट्टाभि, काँग्रेस-इतिहास, खंड २ रा पृ. १७७). सेनापति, लढाई हें उदाहरण घेतलें तर वरील आदेश सयुक्तिक दिसतो. कारण लोकशाहीतहि प्रत्येक सैनिकाला चिकित्सा करण्याचा अधिकार देतां येणार नाहीं; पण हे उदाहरण घेण्यांत मोठा हेत्वाभास आहे. सेनापतीनें प्रत्येक सैनिकाला कारणमीमांसा सांगत बसूं नये हें युक्त आहे; पण सेनापतीजवळ कारणमीमांसा तयार असलीच पाहिजे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना तरी त्याने ती पटवून दिली पाहिजे. महात्माजींच्या जवळ तर्कगम्य अशी मीमांसाच नव्हती आणि म्हणूनच जवाहिरलाल, राजाजी, वल्लभभाई यांनाहि तिचे आकलन होत नव्हते. तरीसुद्धा आपल्याला सेनापति नेमावयाचे असेल तर लोकांनी चिकित्सा न करता आपल्या आज्ञा मानल्या पाहिजेत, असा त्यांचा आग्रह होता. याचा अर्थ असा कीं, गांधीजींची मीमांसा आध्यात्मिक होती, गूढ होती, अतीन्द्रिय होती. महात्माजींच्या सर्व कृतींवर, विचारांवर, मतांवर अध्यात्माचे असें गूढ व अगोचर वातावरण पसरलेले असे. त्यांचा मुख्य आलंब म्हणजे आंतला आवाज. बार्डोलीचा लढा त्यांनी स्थगित केला तो त्याच्याच आदेशानें खादी व अहिंसा यांचा स्वातंत्र्याशी संबंध ते प्रस्थापित करतात तो त्याच्याच आधाराने. अस्पृश्यतेमुळे भूकंप होतात यालाहि प्रमाण तोच. १९३९ सालीं ते राजकोटला गेले. त्या वेळी महादेवभाईना लिहिलेल्या पत्रांत ते म्हणतात, 'मी कुठे जात आहे, कां जात आहे; याचा कांहींहि विचार केलेला नाहीं. ईश्वर मला नेत आहे. तेव्हां मी विचार करणे हे ईश्वरी योजनेंत कदाचित् विघ्नहि ठरेल.' वर्णाश्रम धर्मावर महात्माजींची श्रद्धा होती; पण ते म्हणत कीं, 'शूद्रानें ब्राह्मणाचें कर्म करण्यास हरकत नाहीं, तरी त्याने ब्राह्मण म्हणवून घेण्याचा आग्रह मात्र धरूं नये. या जन्मी त्याने पुण्य संपादन केले की, त्याला पुढोल जन्मीं ब्राह्मण जातीतच जन्म मिळेल.' (यंग इंडिया. २३-४-२५) समाजरचनेंतल्या मूल समस्यांनाहि महात्माजी असे अतींद्रिय निष्ठेनें उत्तर देत. एखाद्या व्यक्तीला- मग ती कितीहि लहान किंवा मोठी असो- विशिष्ट हेतूने राजकोटला घेऊन जाण्याइतका परमेश्वर जेव्हां सामाजिक प्रपंचात हस्तक्षेप करतो आणि तुम्हीं बौद्धिक चिकित्सा केलीत तर माझ्या योजनेंत विघ्न येईल असे बजावतो, तेव्हां हा परमेश्वर लोकशाहीला ठार केल्यावांचून रहाणार नाहीं असें निश्चित समजावें.

बुद्धिवादाची अवहेलना

  गांधीवादांतील जगत्कल्याणकारी परमेश्वर, त्यांतील आत्मबल व अंतःसंवेदना यांच्या वर्चस्वामुळे म्हणजेच एकंदर अध्यात्मनिष्ठेमुळे समाजाची दोन प्रकारानें कशी हानि होते ते सांगितले. एक म्हणजे समाजांत पराकाष्ठेची विषमता निर्माण होते व दुसरे म्हणजे त्यामुळे बुद्धिवाद, भौतिकज्ञान, तर्कनिष्ठा यांची अवहेलना होते. त्यांतील दुसऱ्या प्रकारच्या नुकसानीचें थोडें जास्त विवेचन करणे अवश्य आहे. महात्माजींचें एकंदर लेखन वाचतां असें स्पष्ट दिसून येते की, त्यांना भौतिक विद्या, इतिहास, अर्थशास्त्र, नानाप्रकारची विज्ञानें, यांतील पांडित्याची, यांच्या खोल अभ्यासाची विशेष महती वाटत नाहीं. इतकेच नव्हे तर त्यांच्या अंतरांत खोल कोठेंतरी या भौतिक पांडित्याविषयीं तिटकारा आहे. 'हिंदस्वराज्य' या आपल्या पुस्तकांत या ज्ञानाचा जेवढा अधिक्षेप करणे मनुष्याला शक्य आहे, तेवढा त्यांनी केलेला आहे. ज्या इंग्रजी शिक्षणामुळे आपल्या देशांत वरील ज्ञानाचा प्रसार झाला, त्याच्याविषयों त्यांनी काय म्हटले आहे पहा. 'इंग्रजी शिक्षणाच्या प्रसारामुळे आपला देश गुलाम झाला आहे. इंग्रजी शिकलेल्या लोकांनींच जनतेला फसविले आहे. खेडी अजून पाश्चात्य ज्ञानापासून मुक्त आहेत, म्हणूनच खरी भारतीय संस्कृति तेथें दृष्टीस पडते. जे पाश्चात्य सुधारणांच्या आहारी गेले, तेच फक्त गुलाम झाले असून त्यापासून मुक्त असलेला शेतकरी हा अजिंक्य आहे. त्याला कोणी जिंकलेले नाहीं व जिंकणे शक्य नाहीं. (म्हणजे काय ते कळणे शक्य नाहीं !) अर्वाचीन शिक्षणानें हितापेक्षां अहितच जास्त होतं.' हे व अशा तऱ्हेचे विचार प्रगट करून ते म्हणतात की, 'मी जे प्राथमिक व उच्च शिक्षण घेतलें ते मुळींच घेतले नसतें तरी माझे जिणें व्यर्थ झाले असते असे मला वाटत नाहीं. या शिक्षणाच्या घातक वर्चस्वांतून मी सध्यां मुक्त झालो आहे. सत्याग्रही वीराला फक्त मनोजय लागतो. त्याला शिक्षण लागत नाहीं. मनोजय साधला, की त्या एकट्या सत्याग्रहीच्या नुसत्या दृष्टिपातानें शत्रु नष्ट होतो.' सामान्यतः विद्यासंपन्न सुशिक्षितांनीं नागर संस्कृति निर्माण केली असे आपण समजतो. पण महात्माजींच्या मते मोठीं नगरें, शहरें ही सर्वथा त्याज्य होत. चोर, डाकू, बदमाष, वेश्या हे वर्ग शहरांमुळे निर्माण होतात आणि म्हणूनच ते म्हणतात की, 'तुम्ही एक सहा महिने खेड्यांत जाऊन रहा की तुम्ही खरे देशभक्त व्हाल.' महात्माजींच्या मतें रेल्वे येण्यापूर्वी भरतखंड हें एक राष्ट्र होतें. रेल्वे आल्यामुळे सर्व नाश झालेला आहे. रेल्वेमुळे दळणवळण वाढले व त्यामुळेच प्लेगासारखे रोग पसरले; दुष्काळ वाढले व तीर्थक्षेत्रे बिघडून गेलीं. परमेश्वरानें मनुष्याच्या हातापायांत बेताची शक्ति ठेवली होती. त्याचा हेतु असा की, माणसाने फार प्रवास करूं नये. आसपासच्या टापूंत फार तर जावे; पण माणसानें आपल्या दुष्ट बुद्धीने या दैवी मर्यादांचें उल्लंघन करण्याच्या युक्त्या शोधून काढल्या (म्हणजे शास्त्रीय शोध लावले) आणि आपल्या बुद्धीचा दुरुपयोग केला.' हे सर्व विचार गांधीजींनी १९०८ साली लिहिलेल्या 'हिंदस्वराज्य' या पुस्तकांत सांगितले आहेत. पुढील काळी त्यांनी मत बदलले असे नाहीं. १९३८ सालीं वरील पुस्तकांविषयी लिहितांना, यांतील एक अक्षरहि फिरविण्यास मी तयार नाहीं, असे त्यांनी जाहीर केले आहे.
 बुद्धि व भौतिकज्ञान यांची ही अवगणना अगदीं अक्षम्य असून परिणामी घातक ठरल्यावांचून रहाणार नाहीं. निसर्गघटनांचा कार्यकारणभाव ज्या मनुष्याला कळत नाहीं, तो मनानें कर्धीहि स्वतंत्र होऊ शकणार नाहीं. त्याचें मन कायम गुलामच रहाणार. भूकंप, ज्वालामुखी, ग्रहणें, धूमकेतु, वादळें, अतिवृष्टि, अनावृष्टि, भरती, ओहोटी, चंद्रसूर्यांची खळीं यांमुळे अज्ञानी माणूस भिऊन जातो व या घटनांची खरीखोटी कारणमीमांसा जो कोणी सांगेल त्याचा तो दास होऊन बसतो. मग तो गुरु सांगेल ती व्रते तो आचरतो, त्याच्या कोणच्याहि वचनावर श्रद्धा ठेवतो आणि आपला विवेक व बुद्धि सर्वस्वी त्याला विकून टाकतो. या निसर्गशक्तीच्या अज्ञानांतून ज्यानें मानवाला सोडविले ते भौतिक ज्ञान हाच लोकशाहीचा खरा आधार होय. अत्यंत खेदाची गोष्ट ही की, गांधीवादानें ज्ञानाची ही महती जाणलेली नाहीं. २६-१-४७ च्या हरिजनमधील आपल्या एका लेखांत इंग्लंडमधील औद्योगिक क्रांतीविषय डॉ. जे. सी. कुमाराप्पा यांनीं विवेचन केले आहे. त्यांच्या मतें इंग्लंडचें खरें वैभव या क्रांतीपूर्वीच्या काळी दृष्टीस पडतें, क्रांतीनंतरची जी व्हिक्टोरिया राणीची कारकीर्द ती म्हणजे ब्रिटनचें तमोयुग होय. क्रांतीपूर्वीच्या वैभवाचीं प्रमाणे म्हणून, त्यांनी शेक्सपीयर, मिल्टन, जोशा-रेनाल्डस्, ख्रिस्तोफर रेन, लॅटिमर यांची उदाहरणे दिली आहेत. आश्चर्याची गोष्ट अशी की, यांत बेकन आणि न्यूटन यांची नांवें नाहींत. ते भौतिक शास्त्राचे आद्यगुरु असून त्यांना अर्वाचीन युरोपचे जनक समजतात. पण कुमाराप्पांच्या मतें इंग्लंडच्या वैभवांत त्यांना स्थान नाहीं ! आणि हा अनुल्लेख सहजासहज झालेला नाहीं. व्हिक्टोरियाच्या कारकीर्दीत फॅरडे, डार्विन, सिम्सन, लीस्टर, केल्व्हिन, हक्सले, रूदर फोर्ड हे जगविख्यात शास्त्रज्ञ होऊन गेले. मिल्, स्पेन्सर, सिडने बेब् यांसारखे पंडित होऊन गेले. तरी तो काळ कुमाराप्पांच्या मते तमोयुगाचा आहे ! कुमाराप्पा हे आज गांधीवादाचे एक प्रधान पुरस्कर्ते आहेत.
 शास्त्रीय ज्ञानाच्या अभावीं मानवी मन गुलामगिरींतून मुक्त होणें कठिण आहे आणि त्या मुक्ततेवांचून त्याला व्यक्तित्वाची रग प्राप्त होणे अशक्य आहे. हा माणूस नेहम नेभळा, भाबडा, अडाणी, भोळसट असाच रहाणार. त्याला लोकायत्त शासन पेलण्याचें सामर्थ्य कधींहि येणार नाहीं. गांधीवादामध्ये सत्य व नीति यांना फार महत्त्व आहे. पण आपण हे विसरतों की, सत्य व नीति यांनाहि भौतिक ज्ञानाचा आधार अवश्य आहे. खोटें बोलू नये, चोरी करूं नये, मातापित्यांचें ऐकावें ही वैयक्तिक व कौटुंबिक नीति फारतर भौतिक ज्ञानाच्या अभावीं टिकूं शकेल; पण सामाजिक व राष्ट्रीय नीतिमत्ता जिला म्हणतात ती शास्त्रीय भौतिक ज्ञानाच्या अभावीं क्षणभरहि टिकणार नाहीं. अशिक्षित, अडाणी मनाला राष्ट्राच्या विशाल स्वरूपाचें आकलनच होत नाहीं. त्याला आई दिसूं शकते म्हणून तिच्याविषयींचें कर्तव्य त्याला आकळतां येते; पण अखिल भरतखंड त्याला दिसतच नाहीं. त्याला इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, रसायन, पदार्थविज्ञान यांचा नेत्रच प्राप्त व्हावा लागतो. विद्येच्या पुनरुज्जीवनानंतर पश्चिमेच्या युरोपीय राष्ट्रांना तो प्राप्त झाला. म्हणूनच हळूहळू त्यांच्यांत राष्ट्रनिष्ठा व लोकशाही यांचा उदय झाला. हिंदुस्थानांत अखिल समाजाला एकत्र बांधून कार्यप्रवण करणारी अशी एकहि निष्ठा उदय पावली नाहीं. इंग्रज व मराठे यांच्या लढाईत इंग्रज हा इंग्रजाविरुद्ध लढणार नाहीं हें ठरलेले होते. पण हिंदुस्थानांत तसें कांहींच ठरलेले नव्हते. हिंदु-हिंदु एक नव्हता, मुसलमान-मुसलमान नव्हता, मराठा-मराठा नव्हता. स्वामिनिष्ठाहि या समाजाला, किंवा येथल्या कोणच्याहि अल्पसमूहाला दीर्घकाल बांधूं शकली नाही. याचें कारण हेंच कीं, यांची मानसिक शृंखला तुटलेली नव्हती व यांना विशाल प्रपंच पाहण्याची दृष्टि आलेली नव्हती. तेव्हां सत्य व नीति यांनाहि ज्ञानाचा आधार अवश्य आहे. पण गांधीवादाला ज्ञानाचें हे सामर्थ्य मान्य नाहीं. उत्तर आयुष्यांतल्या कांहीं लेखनांत गांधींजींनी शिक्षणाचा प्रसार होणे अवश्य आहे, मी उच्च ज्ञानाच्या विरुद्ध नाहीं असे प्रतिपादन केले आहे. पण ज्या ज्ञानाच्या उपासनेसाठी माणसाने शक्तिसर्वस्व वेचणे अवश्य आहे त्याविषयीं बोलतांना 'मी त्याच्याविरुद्ध नाहीं.' एवढाच पुरस्कार कोणी करूं लागला तर त्याचा अर्थ सहज कळण्याजोगा आहे.
 इतकेंहि करून अंतःसंवेदना ही शक्ति तशीच प्रभावी असती तर तिला मान्यता देऊन बुद्धिवादाला गप्प बसावे लागले असते; पण तसे काहींच नाहीं. ही अंतःसंवेदना महात्माजींना पुष्कळ वेळां असत्य ज्ञानच देत असे व म्हणून त्यांना पश्चाताप करण्याची पाळी येत असे. लोकांना अहिंसाधर्म पूर्णपणे कळण्यापूर्वीच आपण त्यांना कायदेभंगाची प्रेरणा दिली हा हिमालयाएवढा प्रमाद झाला, असें १९१९ साली त्यांनींच म्हटलें. बार्डोलीचा संग्राम स्थगित करावा असे त्यांना अंतःसंवेदनेने सांगितले; पण हा इषारा या अद्भुत शक्तीनें दोन महिने आधीं दिला असता, तर राष्ट्राचा तेजोभंग टळला असता. १९४० सालानंतर गांधीजींनी जाहीर केले की, स्वातंत्र्य मिळाल्यावांचून हिंदुमुसलमानांचे ऐक्य होणे अशक्य आहे. त्यापूर्वी ४० वर्षे हिंदु-मुस्लीम ऐक्यावांचून स्वातंत्र्य नाहीं असें ते आग्रहाने सांगत. १९४० नंतरचे सत्यज्ञान त्यांना अंतःसंवेदनेने ४० वर्षे आधी दिले असतें तर केवढे अनर्थ टळले असते ! त्या दृष्टीने प्रारंभापासून सावधता ठेवली असती तर कदाचित् पाकिस्तानहि टळले असतें. पण अंत:संवेदनेने ते ज्ञान दिले नाहीं. १९४७ सालच्या अखेरीस साखरेवरचीं नियंत्रर्णे सरकारने उठविली. त्या वेळीं बुद्धि, विवेक, माहिती, अनुभव या साधनांनी विचार करणाऱ्या सर्व पंडितांनी उलट निर्णय दिला होता; पण गांधीजींच्या संवेदनेने निराळा कौल दिला आणि नियंत्रण उठवितांच अगदीं थोड्या अवधींत व्यापाऱ्यांनी जनतेच्या खिशांतले २४ कोटी रु. गिळंकृत केले. म्हणून महात्माजींना स्वतःला तसें वाटत असले तरी त्यांना बुद्धिपेक्षां जास्त प्रभावी अशी कसलीहि शक्ति वश नव्हती हें आपण ध्यानांत घेतले पाहिजे आणि या अंतःसंवेदनेपासून सावध राहिले पाहिजे. बुद्धि ही शक्ति सर्वंकष व सर्वज्ञ आहे असे मुळींच नाहीं; पण मानवाला वश अशी एवढीच शक्ति आहे. तेव्हां तिचीच जास्तीत जास्त जोपासना करणे अवश्य आहे; आणि म्हणूनच भौतिकवादाची व बुद्धिनिष्ठेची आपण केव्हांहि अवगणना करता कामा नये. गांधीवादांतील ही प्रवृत्ति आपण वाढू दिली तर आपली लोकशाही अल्पावधीतच कोसळून पडेल.

कार्यक्षमतेची उपेक्षा

 गूढ अतींद्रिय अशा अध्यात्माचें प्रभुत्व समाजावर बसूं लागले म्हणजे त्यांत विषमता निर्माण होते आणि भौतिक ज्ञानाची अवहेलना करण्याची प्रवृत्ति निर्माण होते हें येथवर सांगितले. अध्यात्मामुळे निर्माण होणाऱ्या आणखी एका घातकी प्रवृत्तीचा विचार करून हें विवेचन संपवूं. या अध्यात्मामुळे बुद्धीची जशी अवहेलना होते त्याचप्रमाणे सुघटित, रेखीव, योजनाबद्ध, शास्त्रनिष्ठ जीवनाची व तज्जन्य कार्यक्षमतेचीहि उपेक्षा होऊं लागते. इंग्रजपूर्व काळांत हे पाप आपण केलेंच होतें. मध्यंतरी कार्यक्षमतेचें, शास्त्रनिष्ठेच महत्त्व आपण कांहीसे जाणूं लागलो होतों; पण गांधीवादाचें वर्चस्व झाल्यापासून पुन्हां या महनीय गुणांची अनास्था होऊं लागली आहे असे वाटतें. गांधीवादाचा सर्व भर मनाची शुद्धता, सद्भावना, हेतूंची पवित्रता, उच्च संकल्प यांवर असतो. योजना, कुशाग्रता, सावधता, चतुरस्रता या गुणांची तेथें महती नाहीं. शत्रूला जिंकावयाचें तें आत्मबलानें ! अर्थात् तेथें योजनेची व कुशाग्रतेची जरूरच काय ? वर सांगितलेल्या श्रद्धांच्या जोडीला गांधीजींची आणखी एक श्रद्धा होती. 'अत्यंत शुद्ध सद्हेतु असून जर एखाद्याच्या हातून चुका घडल्या तर त्यामुळे वस्तुतः जगाला, इतकेंच नव्हे तर कोणत्याहि व्यक्तीला इजा पोचत नाहीं, अशी माझी श्रद्धा आहे. ईश्वराला भिऊन वागणाऱ्या माणसाकडून अहेतुकपणें झालेल्या चुकांच्या परिणामापासून ईश्वर जगाचें नेहमीं रक्षण करतो. माझ्या चुकांमुळे जगाला कधींहि पीडा सहन करावी लागलेली नाही. कारण त्या चुका माझ्या हातून अज्ञाज्ञानें घडल्या होत्या' असे प्रतिपादन गांधीजींनीं 'सत्याचा सिद्धांत' या लेखांत केलेले आहे. (गांधीजींच मानस पृ. २६) गांधीजींची ही श्रद्धा अनुभव, इतिहास यांशी अगदी विसंगत आणि म्हणूनच अगदी भोळी आहे. पूर्ण अध्यात्मवादी अशा एका तत्त्ववेत्याने सुद्धां 'अग्नि थंड आहे अशा अर्थाची शंभर श्रुतिवचनें सांपडलीं तरी तें सत्य मानतां येणार नाहीं.' असे स्वच्छ बजाविले आहे. ती श्रद्धा बाळगण्याचे धाडस त्यालाहि झाले नाहीं. पण गांधीजींनी ते केले आहे. मानवाच्या हातून प्रमाद घडला कीं, परिस्थिति किंवा निसर्ग कसलीहि क्षमा करीत नाहींत असा नित्याचा अनुभव आहे. अत्यंत कठोर व क्रूर अशी शिक्षा ते करतात. यातना भोगायला लावतात. पण यातनांचा अग्नि परमेश्वर कृपेनें थंड होतो अशी गांधीजींची श्रद्धा आहे. या अध्यात्मवृत्तीमुळेच योजना, आंखणी यांचा पूर्ण अभाव हें गांधीजींच्या सर्व संग्रामांचे मुख्य लक्षण होऊन बसलें होतें आणि त्यांचे पट्टाभीसारखे अनुयायी त्यांतच भूषण मानीत असत. तीस सालचा लढा, राजकोट प्रकरण यांचा उल्लेख मागें केलाच आहे. आपल्या चळवळीची योजना काय, तिचें भवितव्य काय याची गांधीजींनाच स्वच्छ कल्पना नव्हती, मग अनुयायांना कोठून असणार? गांधीजींचे चरित्रकार शिखरे म्हणतात की, 'बार्डोलीच्या प्रकरणानंतर हा जवळ जवळ नियमच झाला.' 'चळवळीची तपशीलवार योजना मजजवळ नाहीं' 'सारा अंधार आहे' 'प्रकाशाची वाट पहात आहे' असे उद्गार पुढील चळवळीच्या वेळी निघू लागले. ४२ चे आंदोलन ही या दृष्टीने पाहतां एक दुःखद कहाणीच म्हटली पाहिजे, एवढ्या मोठ्या या संग्रामाची कसलीहि पूर्वयोजना नव्हती. १४ जुलै १९४२ चा ठराव व त्यावर मोर्तब करणारा ८ ऑगस्टचा ठराव यांत 'व्यापक प्रमाणावर देशभर सामुदायिक संग्राम करावा, महात्माजींच्या आज्ञा पाळाव्या' एवढाच संदेश आहे. संग्रामाच्या स्वरूपाची, योजनेची, भवितव्याची कांही एक कल्पना त्यांत नाहीं. ८ ऑगस्टनंतर गांधीजी सरकारशीं बोलणी करणार होते व ती अयशस्वी झाल्यानंतर संग्राम पुकारणार होते, हे जरी खरे असले तरी, सरकार आपणावर एकदम झडप घालणार आहे, हे गांधीजींना व सर्वांनाच आधीं माहीत होतें. (पट्टाभि, काँग्रेस इतिहास, २ रा खंड. पृ. ३६५) आणि याची तरी काय गरज होती. एवढ्या मोठ्या अखिल भारतीय संग्रामाची योजना व पूर्वतयारी ही काय आठचार दिवसांत होणार होती काय ? तिला वर्ष दोन वर्षे सहज लागली असती. आतां अशी दीर्घकालीन तयारी गांधीजी करीत होते. नाहीं असें नाहीं. पण ती पूर्वतयारी आध्यात्मिक होती. गूढ व अतींद्रिय होती. तिचा व संग्रामांतील यशापयाशाचा संबंध काय हे कोणालाहि कळणे शक्य नव्हते. १९३९ सालापासूनच 'लढा सुरुं करावा' असें अनेकांचे म्हणणे होतें. सुभाषचंद्रांचा तर तो आग्रहच होता. गांधीजींचे उत्तर एक. राष्ट्र तयार नाहीं. त्याची पूर्वतयारी केली पाहिजे. ती कोणती ? तर चरखा, खादी, विधायक कार्यक्रम ! प्रत्येक काँग्रेसहौस हे चरखाकेंद्र झाले पाहिजे. प्रत्येक भावी सत्याग्रहीनें रोज सूत कांतले पाहिजे, रोज इरिजन वस्तीत गेले पाहिजे, प्रेमभाव वाढविला पाहिजे वगैरे. संग्राम होणार होता तो कायदेभंगाचा, करबंदीचा. पण त्याच्या योजना, त्याची प्रांतवार आंखणी, त्या काळांतील शेतकऱ्यांच्या उपजीविकेची व्यवस्था, या संबंध एक अक्षरहि रामगडच्या त्यांच्या भाषणांत नाहीं. म्हणजे ही तयारी आध्यात्मिक होती. बरें, दोनतीन वर्षे ही जी आध्यात्मिक तयारी केली, तिचें फल काय ? तर चळवळीच्या दुसऱ्याच दिवशी तिच सूत्रे सोशॅलिस्टांनी हाती घेतली. दोन वर्षांच्या तयारीनंतर महात्माजींच्या तत्त्वान्वयें एकहि दिवस लढा चालला नाहीं. कसलीहि योजना न आखल्यामुळे विध्वंसक चळवळीला महात्माजींची संमति आहे, असें मश्रूवाला, काका कालेलकर यांना सुद्धां वाटले. म्हणजे अगदीं निकटवर्तीयांना सुद्धां गांधीजींची योजना माहीत नव्हती, त्यांचे मानस कळले नव्हते. पण योजना आंखणें व स्वतः विचार करणे हे ईश्वरी नियमनाच्या विरुद्ध आहे असेच तत्त्व जेथे अंगीकारलेले आहे तेथे दुसरे काय होणार? आणि अज्ञानामुळे हातून कितीहि चुका झाल्या तरी त्याचें शासन भोगावे लागत नाहीं, त्यामुळे कोणाचेच अहित होत नाहीं, ही त्याच्या भरीला श्रद्धा ! आपल्या देशांतील अनेक संस्थांचा कारभार सध्या या श्रद्धांच्या प्रेरणेनेच चालला आहे असे वाटते.
 भारतांत गेल्या तीस वर्षांत महात्माजींनी जे स्वातंत्र्य संग्राम केले, ते त्यांच्या मनांतून जरी सत्याग्रह-संग्राम करावयाचे होते, तरी ते निःशस्त्र प्रतिकार झाले हे मागे सांगितलेंच आहे. असे असले तरी काँग्रेसचे नेते सत्याग्रहाचेंच तत्त्व मनांत धरून बसल्यामुळे त्यांतील आत्मबलाच्या व आध्यात्मिकतेच्या मायामोहांतून ते सुटले नाहींत. आणि त्यामुळेच त्यांना योजनापूर्व तयारी, कार्यक्षमता, सावधता या गुणांची महती वाटली नाहीं. तशी वाटली असती तर १९३७ सालीं हाती सत्ता येतांच, ही सत्ता लवकरच केव्हांतरी सोडावी लागणार आहे, पुन्हां स्वातंत्र्याचा लढा लढावा लागणार आहे, हे जाणून त्या लढ्यासाठी दर खेड्यांतून संघटना उभारण्याची, त्यांनीं, दारूबंदीचे प्रयत्न करण्याच्या आधी, व्यवस्था केली असती. हा लढा शांततेनें, अहिंसेनें, अत्याचार न करतांच करावयाचा होता हें जरी खरें तरी, १९२६ सालीं वल्लभभाईनीं बार्डोलीस जशी तयारी केली होती तशी, या महासंग्रामाची योजना व तयारी करणे फार अवश्य होते. प्रत्येक खेड्यांतून सत्याग्रहींचे किंवा निःशस्त्र प्रतिकारकांचें दल उभारून त्यांची संघटना करून अखिल भारतीय सत्याग्रह दल तयार करणे यावर काँग्रेसनें सर्वस्व खर्च करणें अवश्य होते. त्यामुळे ४२ चा लढा पहिल्याच दिवशी काँग्रेसच्या हातून गेला नसता व हा खरा महात्माजींचा लढा नव्हे असे सांगून आपल्याच लोकांना दुखविण्याची पाळी आली नसती. बार्डोलीचा लढा महात्माजींनीं अंतःसंवेदनेच्या प्रेरणेमुळे स्थगित केला. त्यामुळे काँग्रेसचा लढाऊ कार्यक्रम संपला. आणि म्हणून पंडित मोतीलाल, चित्तरंजन दास हे लढाऊ वीरहि फुटून निघाले. ४२ च्या लढ्याच्या आध्यात्मिक पूर्व तयारीमुळे सोशॅलिस्टांना फुटावे लागलें. या लढ्यासाठी अखिल भारतीय संघटना उभारली असती तर वरील आपत्ति तर टळली असतीच; पण शिवाय त्या लढ्याच्या योजनेने लोकांना कार्यक्षमता, कुशाग्रता, इ. गुणांचं बाळकडू मिळाले असते. पण ज्ञान, बुद्धि यांची जशी गांधीवादाला आस्था वाटत नाही त्याचप्रमाणे योजना, संघटना, आंखणी यांची वाटत नाहीं. नानासाहेब हर्डीकरांनी उभारलेल्या काँग्रेससेवादलाची काँग्रेस नेत्यांनी कशी उपेक्षा केली व असली संघटना गांधीवादांत बसत नाहीं, हा घातक विचार ते कसे घरून बसले हे पाहिले, म्हणजे गांधीवादांतील अध्यात्मनिष्ठेने भारतीय लोकसत्तेची किती हानि झाली आहे याची सम्यक् कल्पना येईल.

कल्याणकारक विसंगति

 गांधीवादांतील अध्यात्मनिष्ठा, नित्यहस्तक्षेप करणारा परमेश्वर, आत्मबल, अंतःसंवेदना आणि सद्भावनेने केलेल्या प्रमादामुळे अहित होत नाहीं ही श्रद्धा ही लोकशाहीला सर्वस्वीं मूले कुठार: सारखी कशी होते त्याचा विचार येथवर केला; पण आरंभी म्हटल्याप्रमाणे तेवढयावरून महात्माजींच्या कार्यासंबंधी एकदम निर्णय करणे हा मोठाच प्रमाद होईल. कारण या त्यांच्या विविध श्रद्धांशी अगदी विसंगत असेहि अनेक सिद्धान्त त्यांनीं सांगितले आहेत व त्याप्रमाणे आचरणहि केले आहे. मार्क्सविषयीं विवेचन करतांना एका लेखकानें म्हटले आहे कीं, त्याच्या प्रतिपादनांत विसंगति होती म्हणूनच जगाचें हित झाले आहे. मला हे खरे वाटते. मार्क्स ही आजच्या जगांतली एक अत्यंत उपकारक, अमोघ व दिव्य अशी शक्ति आहे; पण आर्थिक नियतीच्या मूळ सिद्धान्ताशीं मार्क्स एकनिष्ठ राहिला असता तर ही शक्ति वांया गेली असती. महात्माजींच्याबद्दल असेंच म्हणावेंसें वाटतें. अध्यात्मनिष्ठेतले त्यांचे जे सिद्धान्त होते त्यांतून निघणारी क्रमप्राप्त व अटळ अशीं जीं निगमनें तींहि त्यांनी पावलोपावलीं स्वीकारली असती, त्यांचाहि प्रत्येक वेळीं अवलंब केला असता व आग्रह धरला असता तर गांधी ही महाशक्ति अगदीच वांया गेली असती; पण त्या क्रमप्राप्त निगमनांना महात्माजींनीं थारा दिला नाहीं, असेंहि कधीं कधीं घडलेले आहे; आणि त्या निगमनांशी अत्यंत विसंगत व म्हणूनच लोकशाहीला उपकारक असे अनेक सिद्धान्तहि त्यांनी सांगितले आहेत. अनेक श्रद्धा मनाशीं बाळगल्या आहेत व अनेक कृतीहि केल्या आहेत; त्यामुळे परिणामतः ही महाशक्ति लोकशाहीला उपकारकच झालेली आहे. सनातन धर्मावरील दृढश्रद्धेमुळे टिळकांच्या मनांत अनेक श्रद्धा अशा होत्या कीं, त्यांचा अलगपणे विचार केला तर त्या निश्चितपणे प्रतिगामी वाटाव्या; पण तेवढ्यामुळे त्यांच्या कार्याचा मूलौघ आपण जाणून न घेतां त्याचा अधिक्षेप केला तर त्यांत आपलाच घात आहे हे मागें सांगितले आहे. महात्माजींच्या कार्याचे मूल्यमापन करतांना हीच दृष्टि ठेवणे अवश्य आहे. महात्माजींच्या बाबतींत हे काम जास्त दुष्कर आहे हे खरें; पण ते केले नाहीं तर एक महाशक्ति येथें संचरून गेली पण आपण करंटेपणानें तिला आंचवलों असें होईल.
 अंतःसंवेदना ही शक्ति आपल्या ठायीं आहे, असे ज्यांना वाटते ते तिच्या जोरावर समानावर अनियंत्रित अधिकार गाजवूं पहातात. मागल्या धर्मपीठांनी हेच केले आहे आणि अंतःसंवेदना ही परमेश्वरी प्रेरणा मानली तर ते सयुक्तिकच आहे. बुद्धि, तर्क यापलीकडे ज्यांची धांव जात नाहीं त्यांनीं सर्वज्ञ अशा परमेश्वरीवाणीपुढे नमलेच पाहिजे, हें बुद्धीला पटण्याजोगे आहे. शब्दप्रामाण्य किंवा वेदप्रामाण्य तें हेंच आणि तेंच लोकशाहीच्या नाशाला कारण होतें. कारण ही ईश्वरी प्रेरणा लाखांतून एखाद्यालाच वश असते. बुद्धि, तर्क ही शक्ति अल्प खरी; पण अल्पप्रमाणांत का होईना ती प्रत्येक मानवाला प्राप्त होऊं शकते आणि म्हणूनच ती समतेला पोषक होते. अंतःसंवेदना ही अलौकिक महापुरुषानांच प्राप्त होते, सामान्यांना ती कालत्रयीं प्रसन्न होणार नाहीं. महात्माजींना हें मत मान्य आहे. अंतर्ज्ञान ज्यांना होते ते पुरुष प्रमादरहित असतात, या अत्यंत घातक मतावरहि त्यांची श्रद्धा होती. (यंग इंडिया ११-१०-२८) आणि इतके असूनहि प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तित्वाला सारखाच मान द्यावा असा त्यांचा आग्रह होता. इतकेच नव्हे तर सामान्य जनांच्या व्यक्तित्वावर, बुद्धिस्वातंत्र्यावर, वैयक्तिक आकांक्षाच्या न्याय्यतेवर बुद्धिवादाचा जसा पराकाष्ठेचा दृढ विश्वास असतो, तसाच त्यांचा होता. कधीं कधीं तर अराजक वाद्याप्रमाणे दुसऱ्या धृवाला जाऊनहि या बाबतीत ते प्रतिपादन करीत. 'शासनसंस्था कितीहि शुद्ध असली तरी ती लोकांच्या व्यक्तित्वावर आक्रमण करतेच. त्यामुळे तिच्या सत्तेची वाढ होणे धोक्याचे आहे. कारण व्यक्तित्व हेच सर्व प्रगतीचें मूल कारण आहे' असे त्यांनी म्हटले आहे. विकेन्द्रीकरणाठी ते अट्टाहास करीत, त्याचें एक प्रबल कारण हेच होतें. दिल्लीहून अखिल भारताचा जो राज्यकारभार चालतो, त्यांत सामान्य जनांना कांहींच गम्य नसते. हल्लीचें गुंतागुंतीचे आर्थिक, सामाजिक व आंतरराष्ट्रीय व्यवहार सामान्य जनांच्या आटोक्यापलीकडचे आहेत; त्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवणे त्यांना मुळींच शक्य नाहीं. म्हणून ते व्यवहार ज्यांत अवश्य होतात ती समाजाची घडीच बदलावी आणि या सर्व व्यवहाराचे व सत्तेचेंहि विकेन्द्रीकरण करून सामाजिक प्रपंचाचा सर्व व्यवहार सामान्य जनांच्या आकलनांत आणून ठेवील अशीच समाजव्यवस्था रचावी असे त्यांचे मत होतें. (सर्व समाजप्रपंच सामान्य जनांच्या आकलनांत आणून ठेवण्याचा आग्रह धरणाऱ्या पुरुषाने त्या सामान्य जनांना सर्वस्वी अनाकलनीय व दुष्प्राप्य अशा अंतर्ज्ञानाची मात्र तरफदारी करावी हें किती विपरीत व विसंगत आहे ! पण तें आहे.) आतां तें कितपत व्यवहार्य होते व त्या समाजरचनेमुळे अंतीं राष्ट्राचें काय झाले असते हे प्रश्न निराळे. वरील मत उद्धृत करण्याचा हेतु एवढाच की सामान्य जन, त्यांचे हक्क व त्यांचे व्यक्तित्व यावरची महात्माजींची श्रद्धा अगदी अढळ होती हें दाखवावे. ही श्रद्धा लोकशाहीला अत्यंत पोषक आहे. लोकशाहीचा तो मुळारंभच होय.
 अंतःसंवेदनेवरील श्रद्धा व एकंदर अध्यात्मनिष्ठा ही कोणच्याहि स्वरूपांत समाजाला हानिकारक होणारच; पण महात्माजींची ती श्रद्धा जुन्या काळच्या धर्मगुरूंच्या श्रद्धेइतकी हानिकारक झाली नाहीं. याचे कारण हें कीं, या विषाचे अनेक उतारेहि त्यांच्याच तत्त्वज्ञानांत त्यांनी निमाण करून ठेवले आहेत. स्वतःला अंतर्ज्ञानाचे अधिकारी असें जे म्हणवितात, त्यांचे व्यक्ति व समाज यांच्या संबंधाविषयीचे मत दंडसत्तेच्या पुरस्कर्त्याप्रमाणेच असते. समाज, राष्ट्र हा एक स्वतंत्र पुरुष आहे. त्याचें हिताहित स्वतंत्र आहे. केवळ सर्व व्यक्तींच्या हितांची बेरीज म्हणजे समाजपुरुषाचें हित, असें नाहीं. आणि म्हणूनच व्यक्ति ही समाजासाठी आहे, व्यक्तिजीवन हें स्वतंत्र अंतिम होऊं शकत नाहीं, समाज पुरुषाचा एक अवयव हेंच व्यक्तीचें स्थान, अशी त्यांची विचारप्रणाली असते. या विचारसरणीनें लोकशाहीचा पायाच उखडला जातो. कारण व्यक्तीचे स्वतंत्र अस्तित्व ती मान्य करीत नाही. महात्माजी अंतःसंवेदनावादी आहेत, जन्मनिष्ठ वर्णव्यवस्था, व केव्हांकेव्हां जातिव्यवस्थाहि ते मान्य करतात, परमार्थातील गुरूची महती त्यांना मंजूर आहे, आणि तरीसुद्धां व्यक्ति व समाज यांच्या संबंधाविषयींचे वरील मत त्यांना मुळींच मान्य नाहीं. समाजाचा मूल पाया म्हणजे व्यक्ति हाच होय. व्यक्ति ही कोणाची घटक किंवा अवयव नसून स्वतः पूर्ण आहे, अंतिम आहे, तिचा गुणविकास, तिचे हित हेच समाजरचनेचें ध्येय आहे, लोकांचें स्वराज्य म्हणजे व्यक्तींच्या स्वराज्याचा समवाय होय, अशा तऱ्हेचीं क्रांतिकारी, व्यक्तिवादाला पोषक अशींच तत्त्वे त्यांनी पुरस्कारिली आहेत. याचा अर्थ असा होतो की, गांधीजी हे हाडाचे क्रांतिकारक व व्यक्तिवादी होते; पण सनातन धर्माचे अत्यंत प्रबल संस्कार त्यांच्या मनावर झाले असल्यामुळे त्या क्रांतिवृत्तीवर व व्यक्तिवादावरील निष्ठेवर केव्हांकेव्हां आध्यात्मिकतेचें, परंपराप्रेमाचें व त्यामुळेच स्थितिवादित्वाचें घन पटल येऊन बसे. आणि त्या अध्यात्मनिष्ठेच्या व परंपरेच्या आहारी गेल्यावर ते जीं मतें व्यक्त करीत, तीं इतकीं चमत्कारिक व विपरीत असत कीं, त्यांच्या आधारें प्रतिपक्षीयांनीं त्यांच्यावर वाटेल ते आरोप करावे. मिश्रविवाह व मिश्रभोजन यांची बंदी आत्म्याच्या विकासाला अवश्य आहे, असेंच गांधीजींनी म्हटल्यावर (यंग इंडिया ६- १०- २१) लोकांनी तरी काय करावे ? एका थोर गांधीवादी पंडिताशी चर्चा करीत असतांना त्यांनी मला असें सांगितले की, 'महात्माजींवर तुम्ही वाटेल ते आरोप करा. आणि ते सिद्ध करण्यासाठी जीं वचनें अवश्य तीं तुम्हांला सांपडत नसतील तर मी त्यांच्या लिखाणांतून काढून देईन; पण असें असूनहि मी तुम्हांला सांगतों कीं, 'गांधीजीवनाचा तुम्हीं सांगोपांग अभ्यास केलात तर गांधीजींच्यावर एकहि अश्लाघ्य आरोप तुम्हांला करता येणार नाहीं.' या म्हणण्यांत पुष्कळच तथ्यांश आहे. टिळकांच्यावर येणाऱ्या प्रतिगामित्वाच्या आरोपांचा विचार करतांना मीं याचे थोडेसे विवेचन केले आहे. कोट्यवधि सामान्य जनांना जो जागृत करतो, त्यांच्या ठायीं प्रतिकारशक्ति निर्माण करतो, त्यांच्या अहंकारास चेतना देऊन वाटेल त्या सुलतानी सत्तेशीं मी लढू शकेन, हा आत्मविश्वास त्यांच्या ठायीं जो निर्माण करतो, त्याच्याएवढा मानव जातीचा व लोकशाहीचा मोठा उपकारकर्ता दुसरा कोणी नाहीं. कारण भांडवलशाही, वर्ण-व्यवस्था, धर्मगुरूंचे प्रभुत्व असल्या विषम व्यवस्थेचा व तिच्यामुळे होणाऱ्या अन्यायाचा, जुलमाचा निःपात करण्याचें अत्यंत प्रभावी साधनच त्याने जनतेच्या हाती देऊन ठेवलेले असते. आतां हे करूनहि त्या जुलमी संस्थांचा त्याने पुरस्कार केला तर परंपरेच्या अभिमानामुळे, कांही जुन्या निष्ठांच्या वर्चस्वामुळे किंवा चुकीच्या विचारसरणीमुळे ही विसंगति निर्माण झाली आहे, असे समजून आपण त्याच्या कार्याचे मूल्यमापन करणे अवश्य आहे. तसें न केले तर त्यांत समाजाची अतिशय हानि आहे. कारण टिळक, गांधी असल्या महाशक्ति निर्माण होऊनहि समाजाच्या या प्रवृत्तीमुळे समाज त्यांना आंचवून बसेल.

गांधीवाद व गांधीजीवनकार्य

 वरील विवेचन करतांना गांधीवाद व गांधीजीवनकार्य अशी विभागणी केली आहे. ही विभागणी अगदीं तर्कशुद्ध आहे असें नाहीं व समाधानकारक आहे असेंहि नाहीं. कारण गांधीवाद म्हणून जो तात्त्विक सिद्धांतसमूह आहे, त्यांतील कांहीं तत्त्वे लोकशाहीला अगदीं घातक आहेत, तर त्याशी विसंगत असलेली कांहीं तत्त्वें तिला पोषक आहेत. जीवनकार्यातहि असेंच दिसर्ते आणि त्यामुळेच महात्माजींच्या कार्याचे मूल्यमापन करतांना अभ्यासक हतबुद्ध होतो असें मीं आरंभी म्हटले आहे. स्थूल मानानें पहातां वरील विभागणीमुळे विवेचन करणे सुलभ होतें, मनांतील अभिप्राय बऱ्याचश यथार्थतेनें व्यक्त करता येतो, म्हणून तिचा अवलंब केला आहे. या मर्यादा वाचकांनी ध्यानांत ठेवल्या तर मी असें म्हणेन कीं गांधीवाद हा- त्यांतील अध्यात्मनिष्ठा, वैराग्यवृत्ति, त्यांतील बुद्धीची अवगणना, त्यांच्या ग्रामोद्योगांतून निर्माण होणारी आदर्श समाजरचना- बव्हंशी लोकशाहीला हानिकारक आहे आणि गांधीजीवनकार्य– त्याने निर्माण केलेली जनताभिमुख दृष्टि, अस्पृश्यता व जातिव्यवस्था यांचे निर्मूलन करून मानवतेचें वृद्धिंगत केलेले मूल्य आणि विशेषतः सर्वांत श्रेष्ठ म्हणजे त्यांचे सत्याग्रह संग्राम व त्यांतून निर्माण केलेली प्रतिकारवृत्ति– लोकशाहीला अत्यंत पोषक झालेले आहे. यांतील कांहीं घटकांचे विवेचन आपण केले. ग्रामोद्योग व तत्प्रणीत अर्थव्यवस्था अशा कांहीं महत्त्वाच्या घटकाचे विवेचन करावयाचें आहे. ते केल्यानंतर समारोप करतांना एकंदर गांधीकार्याचे अधिक निर्णायक व निश्चित असे मूल्यमापन करण्याचा प्रयत्न करूं.





( गांधीवाद व लोकसत्ता )
'ग्रामवाद'
(हा लोकसत्तेचा पाया होऊं शकेल काय ?)

 महात्माजींच्या कार्याचें लोकशाहीच्या दृष्टीने येथवर विवेचन केले. त्यांत त्यांचे सत्याग्रहसंग्राम व त्यांची अध्यात्मनिष्ठा यांचाच प्रामुख्याने आपण विचार केला. आतां या लेखांत गांधीवादांतील एका महातत्त्वाचें लोकशाहीच्या दृष्टीने परीक्षण करावयाचे आहे. भारतीय समाजाच्या भवितव्यावर दृश्य व्यवहारांत जो शाश्वत परिणाम व्हावयाचा आहे, तो महात्माजींच्या या तिसऱ्या महातत्त्वानें तें तत्त्व म्हणजे 'ग्रामवाद' हें होय. आक्रमकांचा पराभव करून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिल्यानंतर येथील समाजाची पुनर्घटना कशी करावयाची, याविषयींचे जे महात्माजींचें तत्त्वज्ञान ते सर्व या ग्रामवादांत समाविष्ट झालेले आहे आणि त्या