भोंडल्याची गाणी/श्रीकांता कमलाकांता
श्रीकांता कमलाकांता असं कसं झालं.
असं कसं वेडं माझ्या नशिबी आलं
वेडयाच्या बायकोने केले होते लाडू
तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले
चेंडू चेंडू म्हणून त्याने खेळायला घेतले
वेडयाच्या बायकोने केला होता चिवडा
तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले
केरकचरा म्हणून त्याने बाहेर फेकला
वेडयाच्या बायकोने केल्या होत्या करंज्या
तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले
होडया होडया म्हणून त्याने पाण्यात सोडल्या
वेडयाच्या बायकोने केल्या होत्या चकल्या
तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले
बांगडया बांगडया म्हणून त्याने हातात घातल्या
वेडयाच्या बायकोने केले होते श्रीखंड
तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले
क्रीम क्रीम म्हणून त्याने तोंडाला फासले
वेडयाच्या बायकोने केल्या होत्या शेवया
तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले
गांडूळ गांडूळ म्हणून त्याने फेकून दिल्या.
वेडयाची बायको झोपली होती
तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले
मेली मेली म्हणून त्याने जाळून टाकले.
हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. |