भोवरा/कोडगूंच्या प्रदेशात
१९
कोडगूंच्या प्रदेशात
एखादा लेख लिहिताना त्या लेखातील वस्तूबद्दलच लिहिले पाहिजे. लेखकाच्या सर्व वृत्ती कथावस्तूत बुडून गेल्या पाहिजेत असा एक जुना दंडक आहे. पण एखाद्या वेळी मन बंड करून उठते. मन म्हणजे एक नव्हे- अनेक- ती एकाच वेळी वावरत असतात- बहुधा त्यांतला एक 'मी' इतका जोरदार असतो की इतर मींचे अस्तित्व जाणिवेत नसते. पण काही वेळा अशा येतात, की कोणताच एक मी जोरदारपणे मनाचे अंगण व्यापू शकत नाही. अशा वेळी निरनिराळे 'मी' गर्दी करतात. ह्यांच्या भांडणाने मन त्रस्त होते. तशातच अमके एक काम अमक्या वेळात झालेच पाहिजे, असे असले म्हणजे वृत्ती अगतिक होते. अशाच एका परिस्थितीत हा लेख लिहिला. एका मनाला मी तो लेख लिहावा हे मुळीच पटत नव्हते. थोड्या रागाने, काहीशा चिडीने घालून पाडून बोलून ते मन सारखे मधेमधे तोंड घालीत होते. इतक्या आग्रही मनाची ही लुडबूड लेखातून काढून टाकली असती पण एका मनाने दुसऱ्या मनाची अशी मुस्कटदाबी करणे जमेना. परत मनाच्या अंधाऱ्या खोलीत भांडणाला सुरुवात झाली आणि त्या कटकटीला कंटाळून दोन मनांनी मिळून लिहिलेला हा लेख तिसऱ्याच एका मीने प्रकाशकाकडे पाठविला.
"तू लिहिणार नव्हतीस ना?"
"नव्हते."
"मग इतकी कामं टाकून का बसलीस लिहिण्याच्या थाटात? अर्धा तास झाला नुसती बसली आहेस."
"खरंच मला ल्याहावसं वाटतच नाही."
"मग का लिहिते आहेस? संपादकांना 'नाही' म्हणून स्पष्ट सांग. एवढी भीड कशाला? बाकीची कामं तरी होतील."
"संपादकांच्या भिडेने नाही लिहीत; आणि हे लिहिले नाही म्हणून दुसरी कामे होतील असे थोडेच आहे ? एकदा वाटतं, काही लिहावं पण त्याचाही कंटाळा येतो. लिहिलं नाही तर झोप येणार नाही- मनातलं कागदावर उतरलंच पाहिजे अशी परिस्थिती झाल्याशिवाय लिहूच नये; असं मला वाटतं म्हणून उगीच बसले आहे."
"अशी कापूस पिंजत बसू नकोस. काही तरी कर."
"बरं."
निघायचं निघायचं म्हणून सकाळपासून सामान बांधून बसलो होतो. पण ट्रक आली रात्री नऊ वाजता. ट्रकबरोबर जंगलातला एक छोटासा अधिकारी पण होता. तो म्हणाला, "काय करावं, सकाळपासून वाट पाहात होतो. संध्याकाळी ट्रक लाकडं भरून आला. तो खाली केला, ड्रायव्हरचं जेवण झालं, तो ही वेळ आली." मी म्हटले, "चिंता नाही, आमची तयारी आहे." पाच मिनिटांत सामान आत भरलं, गाद्या अर्धवट पसरल्या व चांगले हातपाय पसरून बसलो… बसलो कसले, रेललो. आमचे बहुतेक काम जंगलात चालणार होते व जंगलाच्या मुख्य अधिकाऱ्याने जंगलखात्याच्या ट्रक रिकाम्या असतील तेव्हा वापरण्याची आम्हांला परवानगी दिली होती. महिनाभर होणाऱ्या प्रवासातील हा पहिलाच प्रवास. जंगलातून रात्रीच्या प्रवासाची मोठी मौज असते, आणि त्यातूनही वरून उघड्या असलेल्या ट्रकमध्ये रेलून, अर्धवट निजून प्रवास तर फारच रम्य हे आम्हांला सर्वांना पटले. झाडांच्या भिंतींतून प्रवास चालला होता. झाडे वाऱ्याने हालली की काळ्या भिंतीला भोके पडत व त्यांतून आकाश दिसे. वरती निरभ्र आकाशाच्या धांदोटीत तारे चमकत होते. झाडे उंच असली की वरच्या प्रकाशाचा पट्टा नाहीसा होई व बोगद्यात प्रवास केल्यासारखा वाटे. प्रवासाच्या वाटेवर कळकांची बेटे होती. त्यांच्या पानांची हालती झालर आकाशाच्या पट्टीला अधूनमधून लागे व काळ्या पण प्रकाशमय अवकाशावर पानांची गडद वेलपत्ती उठून दिसे. थोडा वेळ डोळा लागे. जागे होऊन वरती पाहावे तो पहिल्यांदा पाहिलेले नक्षत्र कललेले दिसे व नवे
सरळ दृष्टीच्या टप्प्यात येई. आकाशातल्या मोठ्या घड्याळाचे काटे हालत होते. सबंध रानात झाडे हालत होती. आमची ट्रक पण निर्मनुष्य रस्त्यातून वेगाने चालली होती. पण ह्या सर्व हालचालीत गडबड नव्हती-सर्व प्रकारची अगाध शांतता भरून राहिली होती.
मी जागी झाले ती एका बंगल्यात, माझी मदतनीस मुले अजून गाढ निजली होती. त्यांना हलवून हलवून जागे केले. तोंड धुऊन चहा घेतो ताे जंगलातील अधिकारी दोन रखवालदारांना (फॉरेस्ट गार्ड) घेऊन आला. "ही माणसे तुम्हांला वाट दाखवतील." तो जरा थांबला व किंचित चाचरत म्हणाला "आज इथे ट्रक नाही, पण तुम्हांला ट्रॅक्टर चालत असला तर त्याच्यामागे एक दोन चाकांवरची गाडी लावून तुम्हांला काही मैल जंगलात जाता येईल. पुढे काही मैल चालावे लागेल."
मी म्हटले, "उत्तम. येऊ द्या तुमचा ट्रॅक्टर."
"कुशालपणा, कुशालपणा!" त्याने मोठ्याने हाका मारलेल्या व एक उंच सडसडीत हसतमुख माणूस आम्हांपुढे आला. त्याच्याबरोबर आम्ही दोन-चार दिवस होतो. तो अगदी मूर्तिमंत खुशालपणा होता. त्याचं नाव खुशा+अप्पा+अण्णा असं मिळून कोडगू भाषेत 'कुशालपणा' झाले होत. कुशालपणा ट्रॅक्टरच्या मुख्य बैठकीवर बसला. मागे लावलेल्या गाडयात एक बाक ठेवलं होत त्यावर आम्ही बसलो. ट्रॅक्टरला स्प्रिंग नसते त्यामुळे रानातील खाचखळग्यांतून जाताना आमची काय अवस्था झाली, हे सांगून कळणार नाही- अनुभव घेतला पाहिजे. मागून कित्येक दिवस आम्हाला ढुंगण टेकून बसता आले नाही.
ट्रॅक्टर थांबल्यावर चार मैल चालायचे होते. बरोबर कोडगू गार्ड. हे लाक उंचच उंच होते. सर्व पाच फूट आठ इंचांच्या वर. अंगाने अगदी सडसडीत. चालताना काही विशेष चालतात असे दिसत नसे. पण त्यांच्याबरोबर चालताना आम्हाला चांगले पळावे लागे, नंदू गार्डच्या बरोबरीने चाले. चंदू व मी गार्डच्या मागे दहा पावले व आमच्या मागे चांगली पंधरा पावले कमल बिचारी धावत येत होती. त्या रात्री ठरवले की, कामकरी मंडळीचे दोन विभाग करायचे. चंदू व कमल घरी राहणारे व नंदू आणि मी चालणारे. एखाद्या दिवशी मीसुद्धा फार दमून जाई. मग चंदू व कमल जात असे. चालणाऱ्यांनी लांबून रक्त आणायचे,
घरच्यांनी ते तपासायचे, नावनिशी टिपून ठेवायची, नळ्या धुवायच्या, दुसऱ्या दिवसाची चालणाऱ्यांची तयारी ठेवायची.
एका मुक्कामावर आम्हांला एक अगदी तरुण पोरगेलासा अधिकारी आमच्या दिमतीला मिळाला. कुठल्याही झाडाचे, वेलीचे नाव विचारले की तो चटदिशी सबंध लॅटिन नाव सांगे. आम्ही पण मोठ्या हौसेने आमची जिज्ञासा पुरी करून घेत होतो. चालता चालता एक झाड आतापर्यंत न पाहिलेले दिसले. मी विचारले "ह्याचे नाव काय".
त्याने झाडाची पाने पाहिली, खोड पाहिले व मान हलवून म्हणाला, "नाही बुवा माहीत, पण एस् नाहीतर टी ने सुरुवात असणार नावाची."
मी आश्चर्याने विचारले, "अहो, ज्या झाडाचे नाव माहीत नाही त्याच्या नावाची सुरुवात तुम्हांला कशी माहीत?"
तो मोठ्याने हसला, "अहो, मी डेहराडूनच्या कॉलेजात जाण्यासाठी अभ्यास करीत आहे." त्याने एक भला लठ्ठ इंग्रजी ग्रंथ पोतडीतून काढून माझ्यापुढे केला. "त्या बुकात भारतातील झाडांची वर्णनं अकारानुक्रमाने केली आहेत. इंग्रजी आर् पर्यंत माझी सर्व झाडे पाठ झाली आहेत म्हणून म्हटले एस नाही तर टीने सुरुवात असेल म्हणून."
तो आम्हांला शेवटला दिसला तो एका ट्रकमध्ये. इंग्लंडमधून कोणी बडा लॉर्ड शिकारीला आला होता. त्याच्या दिमतीला त्याला दिले होते. तो लॉर्ड पुढच्या मऊ जागेवर बसला होता व हा मुलगा मागे जोडलेल्या गाड्यात. आम्हांला जंगलाच्या रस्त्यावर पाहिल्याबरोबर तो उभा राहिला. त्याच्या हातात तो लठ्ठ ग्रंथ होता. तो ग्रंथ त्याने हातात वर धरून हालवला व हसत हसत ओरडला, "मी आता एस संपवला आहे, पण ते झाड त्यात नाही."
एक दिवस आम्ही हत्तींच्या कँपात पोहोचलो. तेथे बरीच माणसे, विशेषतः आदिवासी कामावर असतात व एकदम बऱ्याच जणांच्या रक्तांचे नमुने आम्हांला मिळतील ही माझी अपेक्षा होती. हत्तींच्या कँपात गेल्यावर माझे सर्व मदतनीस पसार झाले. तेथे पाहायला इतक्या गोष्टी होत्या की मला मदत करायला कोणीच तयार नव्हते. मग मी एक दिवसाची सुटी जाहीर केली व कँपात फिरायला गेले. माणसाळलेले हत्ती कामे करीत होते. एक पिल्लू -असेल माझ्या कमरेइतके उंच-तर मुलांच्यात मिसळून गेले होते. बा, बा (ये,
ये) म्हटले की ते मुलांच्या मागे जाई. मुलांनी त्याला गूळ दिला. मग तर ते इतके चिकटले, की दुपारच्या फराळासाठी आम्ही बसलो तर सरळ आत येऊन आमच्या पंक्तीला बसले! एक हत्ती नवा धरून आणलेला होता. तो सारखा आपल्या लाकडी पिंजऱ्याला धडका देत होता. कित्येक मोठे ओंडके त्याने पार मोडून टाकले होते. पण त्याच्या रागाचा सपाटा व अचाट शक्ती पाहून जिवाचा थरकाप होई. पण तितकीच त्या रागाची विफलता पाहून मनाला फार वाईट वाटले. केवढाले प्रचंड हत्ती आम्ही काम करताना पाहिले. त्यांच्या डोक्यावर एखादा बेट्टा कुरुबा बसलेला असायचा. ही माणसे इतकी लहान असत की त्यांचा उघडा हस्तिवर्णी चिमुकला देह पहिल्याप्रथम दिसतसुद्धा नसे. तो बिचारा पिंजऱ्याला धडका देणारा हत्ती काही दिवसांतच एका लहानशा प्राण्याच्या हुकमतीखाली काम करायला लागणार होता. हत्तीखान्याच्या एका कोपऱ्यात काही आजारी हत्ती होते व एक डॉक्टर मदतनिसाच्या साहाय्याने औषधे देत होता. एका हत्तीची दाढ दुखत होता. त्याच्या किडलेल्या दातांत डॉक्टरांनी एका पिचकारीने हायड्रोजन पेरॉक्साइड घातले व त्यातून पिपेच्या पिपे फेस निघत होता. तो हत्तीच्या डोक्यात व नाकात गेला की हत्ती बेचैन होई. मुले तर आजारी हत्ती व डॉक्टर ह्यापासून दूर व्हायला तयार नव्हती. एका हत्तीला इंजेक्शन द्यावयाचे होते. हत्तीच्या कातडीतून आत पोचायला म्हणून सुई चांगलीच दणकट व जाड होता. तिसऱ्या हत्तीला एरंडेल पाजीत होते. एका मनुष्याने उंच उभे राहून हत्तीच्या तोंडात एक बांबूचे नळकांडे धरले होते. दुसरा त्यांत एरंडेल ओतीत होता. जितके ओती, त्यातील निम्मे घशात जाई व निम्मे बाहेर पडे. हत्तीला पुरेसा डोस जाईपर्यंत डॉक्टर व आसपासचे मदतनीस एरंडेलाने न्हाऊन निघाले! मुलांना आश्चर्य वाटले की, हत्ती सर्व उपचार होईपर्यंत स्वस्थ राहतो कसा ! डॉक्टर म्हणाले, "माणसापेक्षा हत्ती किती तरी शांत व समजूतदार. मी आज पंधरा वर्षे काम करीत आहे, पण कोणत्याही हत्तीने कधी त्रास दिला नाही."
आम्ही रात्रीचे जेवत होतो. साडेआठ वाजले असतील. आमच्याबराबर त्या दिवशी जंगलचे एक अधिकारी होते. एक गार्ड आत आला व त्यात खिशातून काहीतरी काढून कोपऱ्यातल्या टेबलावर ठेवले. आम्ही पाहिले तो एक वीत लांब व पाउण वीत उंच असे सोनेरी पट्टे असलेले हरणाचे पिल्लू! गार्ड म्हणाला, जंगलातल्या पायवाटेवर त्याला एकटे पिल्लू सापडले. जनावर
पाठी लागले म्हणून आई त्याच्यादेखतच पळून गेली होती. आई परत आली नाही म्हणून त्याने खिशात घालून पिल्लू आणले. हरीण होते बारीक हरिणाच्या जातीचे. मोठे झाले तरी ते फार तर १० इंच उंच होते. जंगल अधिकारी म्हणाला, पिल्लू दोन दिवसांत मरेल. पण आम्ही ते मागून घेतले. लहान काचेच्या नळीला रबर लावून त्यातून त्याला दूध पाजले. पुण्याला आल्यावर ते फारच माणसाळले. आम्ही त्याचे नाव होन्ने (सोनी) ठेवले. पण सर्वांना चटका लावून ते तीन महिन्यांचे होऊन गेले. त्याचे पेन्सिलीएवढ्या पायाचे खूर फरशीवर वाजायचे, त्यांचा आवाज अजून ऐकू येतो. ते नंदूच्या कुशीत शिरायचे ते आठवते. त्याच्या चिमुकल्या चेहऱ्यातले मोठमोठे भावपूर्ण डोळे प्राण ओतून माझ्याकडे बघतातसे वाटते.
तित्तिमट्टीचा मुक्काम आटपला. मला वाटते तित्तिमट्टीच होते ते. होन्नीला पुण्याला पाठवून मुक्काम हालवला. नीटसे आठवत नाही. किती दिवस झाले. गावाची न् माणसांची नावे स्मरत नाहीत.
"आठवत नसेल तर लिहावंच कशाला?"
"विचार केला की आठवेल की आणि लिहिलं की पक्कं होईल."
"पक्कं म्हणजे काय?"
"परत विसरलं तर लिहिलेलं असलं म्हणजे आठवण जागी होईल."
"पण जे विसरलं असेल ते जाणून-बुजून जागं करावंच कशाला? ते मेलं. मेलेला अवयव जिवंत शरीराला चिकटवला तर त्याचं ओझं होतं. तसंच स्मृतीचं नाही का? माणसांचे फोटो काढायचे, त्यांना विसरायचं आणि मग कधी तरी ते पाहिले म्हणजे एकमेकांना विचारायचं, 'हे कोण बरं?' तसंच तुझं चाललं आहे."
"ज्यांची स्मृती असेल, त्यांच्या फोटोची गरज नाही."
"आणि ज्यांची नाही, त्यांच्याही नाही. अनुभव जिवंत रसरशीत असला तर लिहावे; उगाच मेलेल्या मढ्यावरचे निखारे फुकायचे कारण नाही."
"काय ठरलं होतं?"
"काय?"
"उगीच भरकटायच नाही. पुढे लिही."
"बरं…"
नंदू नि मी उठून भल्या पहाटे कामाला गेलो. कमल सर्व सामान घेऊन
पोन्नम्पेटच्या बंगल्यात जाणार होती. आम्ही काम झाले की तेथे भेटायचे ठरले होते. सकाळी दहाच्या सुमारास चांगले सहा मैल चालून पोन्नम्पेटला पोचलो, तो कमल आपली एका झाडाखाली लांब तोंड करून बसलेली. बंगला म्हणे आम्हांला मिळणार नाही. मी तावातावाने बंगल्याकडे गेले. तेथील माणसाचे आपले एक म्हणणे, "जंगलच्या अधिकाऱ्याला मी जाणत नाही. मिनिस्टरची चिठी असल्यास बंगला उघडतो." आता काय करावे ? मिनिस्टरला आम्ही भेटलो होतो. त्याने परवानगी पण दिली होती. पण आम्ही पत्र घेतले नव्हते. शेवटी बऱ्याच अधिकाऱ्यांना भेटून रस्त्यावरच्या एका सरकारी चाळीत एक खोली मिळाली. खोली झाडली, मुलांनी पाणी आणले. बसायला सतरंजी पसरायला घेतली तो कमल म्हणाली, "काकू, लुगडे कसे फाटले?" मी पाहते तो पुढेच सबंध वरपासून खालपर्यंत फाटून खाली लोंबत होते. मी बंगल्यात तशीच गेले होते, अधिकाऱ्यांना तशीच भेटले होते. पोन्नम्पेटच्या रस्त्यांतून तशीच भटकले होते, फार काय, सहा मैल तशीच चालत आले होते. मी मटकन् खाली बसले. लहान लहान गोष्टींचा मला छडा लागला. तो बंगल्यातला नोकर असा चमत्कारिक का बघत होता ? त्या अधिकाऱ्याच्या चपराशाने आत येण्यास बंदी का केली? मी इंग्लिश बोलू लागून कोण हे सांगितल्यावर तो अधिकारी चकित कसा झाला ? एक ना दोन, गेल्या दोन तासांची चित्रे माझ्या डोळ्यांपुढून गेली. मी परत माझ्या लक्तराकडे पाहिले. सकाळच्या खेड्यातून बाहेर पडून रस्त्याला लागून काही तरी चिरल्याचा आवाज झाला तेव्हाच बहुतेक लुगडे फाटले असले पाहिजे. आम्ही अंतर काटायचे म्हणून भराभर चालत होतो हातात रक्ताच्या नमुन्यांची पेटी— लक्ष गेले नाही. मी लुगडे बदलले. पण पुढचे दोन दिवस पोन्नम्पेटच्या रस्त्यातून जाताना वर मान करून मला चालवले नाही.
हत्तींचे डॉक्टर आम्हांला मधूनमधून भेटत असत. बऱ्याचदा त्यांनी आमच्याकडे मुक्काम केला. आमच्या सर्वांच्या लक्षात एक गोष्ट आली. ती म्हणजे त्या रमणीय सदानंदी प्रदेशात हा डॉक्टर तेवढा एक कायम कष्टी दिसायचा. आम्ही चौकशी केली, तर कळले की त्याला बायकामुले आहेत. संसारही छान चालला होता. मग त्या माणसाचे दुःख तरी काय? शेवटी एकदा न राहवून नंदू त्यांना म्हणाला, "क्षमा करा, डॉक्टर, तुम्ही नेहमी काळजीत दिसता ते का बरं?"
डॉक्टरांनी एक भला मोठा उसासा टाकला व म्हणाले, "अहो, त्या हत्तींची काळजी आहे ना ! एखादा हत्ती तरुणपणी आजारी पडून मेला की कौन्सिलमध्ये किती प्रश्नोत्तरे होतात; व शेवटी डॉक्टरच्या हयगयीमुळे हत्ती मेला की नाही, हे ठरविण्यास कमिशने नेमतात. हत्तीची किंमत असते दहा हजार रुपये - माझ्या सारख्या जनावरांच्या डॉक्टरला काय किंमत ? ह्या एवढ्या प्रदेशात हत्ती आजारी नाही, असे सहसा होत नाही व मी कधी काळजीतून मुक्त होत नाही. "
कूर्गमध्ये हरिजनांची एक विशिष्ट जात आहे. तिकडे गेले होते. गावापासून पाऊण मैलभर मैदानात एक स्वतंत्र वस्ती आहे. तिचे नाव नेहरूनगर. लहान लहान सुबक घरे होती. काम छान झाले. पाहुणचार पण चांगला झाला. पूर्वी हे हरिजन गावाजवळ होते. आता ते गावापासून दूर व बरेचसे स्वतंत्र झाले होते. दुसऱ्या गावी असेच गांधीनगर आहे. निवडणुका जवळ आल्या की निरनिराळे पुढारी येथे येतात. एरवी त्या वस्तीचा गावाशी संबंध नाही. शाळा स्वतंत्र, पाणोठा स्वतंत्र, देऊळ स्वतंत्र, सभागृह पण स्वतंत्र. ह्यामुळे जातिनिर्मूलन कसे होते कोण जाणे !
कॉफीच्या मळ्यांसंबंधी व संत्र्यांच्या बागांसंबंधी असते. हे सुंदर घरातून राहतात. दर जेवणाला कोंबडी व डुकराचे मांस खातात. यथेच्छ दारू पितात व मोठमोठ्या मोटरींमधून हिंडतात. ते व त्यांच्या बायका सुस्वरूप असतात. बरेचसे लष्करात जातात व सर्वच एकंदर युरोपियनांसारखे राहतात. राजकारण, समाजकारण असल्या कटकटी त्यांना माहीत नाहीत. त्याच देशात, जंगलात लहान झोपड्यांतून बेट्टा-कुरुबा व जेनु-कुरुबा राहतात. त्यांना पण वीरराजाचे नाव माहीत नाही. ते जंगलात काम करतात. मिळेल तेव्हा मध खातात, दारू पितात, सण आला म्हणजे रात्रभर नाचतात, गातात, रामायणाचे नाट्य करतात. त्यात राम काळा चष्मा घालतो व सीता ओठ रंगवते, गोरे होण्यासाठी तोंडाला हळद फासते. ते पण कोंबड्या बाळगतात. राजकारण अजून त्यांच्यापर्यंत फारसे पोचले नाही. पण एक जेनु-कुरुबा व एक बेट्टा-कुरुबा कोडगू कौन्सिलचे मेंबर असलेले मला भेटले होते. एकजण आपले घर शाकारीत होता. दुसरा घराभोवती कळकाची वई घालीत होता.
त्या दिवशी प्रवासातच जाई व जाईचे वडील बरोबर होते. असे प्रसंग क्वचितच येत. आता तर ते कधीच येणार नाहीत. जाई परघरी गेली आहे. तिचा जीव तिच्या माणसांभोवती घोटाळत आहे- आणि माझा पण.
"मग सर्व सोडून जायच्या गोष्टी बोलतेस ते खोटंच ना?"
"जे खरं नाही ते खोटं आणि खोटं नाही ते खरं, अशा दोनच टोकांत का सर्व गोष्टींची विभागणी करायची ?"
"असा दुटप्पीपणा करू नकोस. माणसानं आपल्या मनाशी तरी खरं बोलावं."
"मी खरं तेच सांगते. पण पटवून घ्यायचं नाही त्याला काय म्हणावं ? माझ्या मनाच्या अडचणीचीच मला भीती वाटते म्हणून मी तोडायची भाषा बोलते."
"उगीच काही तरी उगाळायच नाही असं ठरलं होतं ना ?"
"हो!"
"मग पुढे चालू कर."
सबंध सकाळ रानात घालविली होती. कळकांच्या बेटांत, हत्तींच्या कळपात कुरुबांच्या झोपड्यांत, कावेरीच्या काठावर काम आटोपून
मोटरच्या सडकेला मिळायला आम्ही चाललो होतो. मला गचाळ काव्य सुचत होते व जाई मला मदत करीत होती. शेवटी एकदाच्या चार ओळी झाल्या व दिनूने लगेच डायरी काढून टिपून ठेवल्या
सा रम्या तटिनी मरुन्मुखरितास्ते कीचका उन्नताः
वर्षामेघनिभा गजा मदयुतातस्ते शृंखलाकर्षिणः।
जल्पनत्या विविधाः कथा वनगृहे (अर्थात् फॉरेस्ट रेस्ट हाऊस)
सार्ध दुहित्रा मया
नीतो वो दिवसस्त्वया सह सखे विस्मर्यते सः कथम्॥
"कशा काय झाल्या आहेत!" तो म्हणाला, "उत्तम." जाई म्हणाली, "दुसरं ग काय म्हणणार!" आम्ही सर्व हसलो. रस्त्यावर पोचलो. कडेला एक झोपडी होती. तिच्या उघड्या पडवीत मुक्काम केला. सबंध रान सुवासाने भरून राहिले होते. कूर्गभर ठिकठिकाणी हा वास येतो. फुलाला 'कुरुंजी' म्हणतातसे वाटते. काहीतरी चमत्कारिक आवाज डोक्यावर घुमू लागला. म्हणून पाहिले तो मधमाश्यांचा मला मोठा थवाच्या थवा वरून चालला होता. पाहता पाहता तो काळा ढग गुणगुणत लांब गेला. आम्हांला सपाटून भूक लागली होती, म्हणून पोळ्यांचा डबा व मधाची बाटली काढली. कूर्गच्या मधाला तो वास येतो. अजूनही कूर्गच्या रानात दरवळणारा सुगंध, मधमाश्यांची दिवसभर चाललेली गुणगूण, मधाची कडवट गोडी व माझ्या माणसांच्या मायेची संगत ह्यांनी त्या एका दिवसाची स्मृती रसरशीत नाही, धगधगीत नाही, पण शांत आणि स्निग्ध अशी मनात भरून राहिली आहे.
"झालं का तुझं?"
"हो. झालं लिहून."
"मग दे एकदाचा तो लेख संपादकांकडे पाठवून."
"बरं."
१९५८
*