भोवरा/दोन टोकं
१८
दोन टोके
दोन टोके म्हणता येतील असे प्रदेश भारतात कितीतरी आहेत. काही वेळा निराळेपणाची जाणीव भौगोलिक परिस्थितीमुळे होते; काही वेळा माणसांच्या निव्वळ बाह्य स्वरूपाने आकारमानाने, रंगाने, कपड्याने होते तर काही वेळा आचारामुळे किंवा विचारामुळे प्रत्ययास येते. बऱ्याच वेळा ह्या सर्व गोष्टी थोड्या थोड्या प्रमाणात मिळून जाणवतात. प्रवास करताना मन काही सारा वेळ तोलीत, जोखत बसत नसते. पुढे दिसते, भासते अनुभवास येते ते पाहायचे; त्याचा आस्वाद घ्यायचा आणि तेही हातांतील काम करता करता. पण एखाद्या वेळी कशाने तरी जुन्या आठवणी जाग्या होतात; व सारखेपणाची नाहीतर निराळेपणाची जाणीव होते.
आसाम आणि कूर्ग - मलबार भारताची दोन टोके. काही दृष्टींनी त्यांच्यात साम्य आहे. दोन्ही जंगली प्रदेश, दोन्ही डोंगराळ, दोन्ही भातखाऊ. जास्तच मौज म्हणजे दोन्ही प्रदेशात काही जमातींची कुटुंबपद्धती मातृप्रधान आहे! मी आसामात गेले तेव्हा भूगोलात वाचलेल्या वर्णनावरून साम्याच्या अपेक्षेनेच; पण प्रत्यक्षात मात्र दर वेळेला फरकच जाणवत गेला. दोन्ही प्रदेशांत रान पण पर्वताची घडण, रानातील वृक्ष, नद्या सर्वच निराळे आहे. मातृप्रधान कुटुंबाची रचनासुद्धा निराळी आहे.
पण मुख्य फरक जाणवला एका रात्रीच्या प्रवासात-
आसामात रात्री जंगलातल्या खेड्यात मुक्काम करावा लागेल की काय असे वाटले होते. तसा प्रसंग आला नाही. पण मी त्याबद्दल बोलत असताना एक आसामी माणूस म्हणाला होत, "काय म्हणता ? खेड्यात ? अहो तिथं हत्ती धुमाकूळ घालताहेत."
मी म्हटले, "अहो, मी काही बाहेर निघणार नव्हते- सरकारी अतिथिगृहात…"
"छे, छे, म्हणून काय झालं? एकदा हत्ती बाहेर निघाले म्हणजे काय करतील त्याचा नेम नाही."
"इतके का या इथले हत्ती द्वाड असतात?" मी विचारले.
"तुम्हांला माहिती नाही का? अहो तुमची मोटर भर दिवसा वाटेत बिघडली नि ती तासाभरात दुरुस्त होऊन तुम्ही निघालात म्हणून बरं. जरा का रात्रीची वेळ असती तर धडगत नव्हती. इथले मोटरवाले मोटर रस्त्यात टाकून खेड्यात जातात, हत्ती आले तर मोटरचा चक्काचूर करतात. जे मोडता येत नाही ते आपटून आपटून चिपटी करतात. माणसाला तर जिवे सोडीत नाहीत."
मला वाटले, हा माणूस मला उगीच भेवडावीत असेल. पण मागून चौकशी केली तर त्याच्या सांगण्यात बरेच तथ्य आहे, असे कळले व मला एकदम कोडगूंच्या प्रदेशाची (कूर्गची) आठवण झाली. तेथे हत्ती कधीच धुमाकूळ घालीत नाहीत. रानात बांबू व पानांनी केलेल्या तीनचार फूट उंचीच्या झोपड्यांतून वन्य लोक राहातात. त्याच रानातून माणसाळलेले व जंगली हत्ती फिरत असतात. पण माणूस दगावल्याची वा झोपडी उद्ध्वस्त झाल्याची हकीकत ऐकली नाही. पंधरा-वीस वर्षांनी एखादा द्वाड हत्ता निघतो व त्याला मारावे लागते. पण एरवी कधी कोणी हत्तीला भीत नाहा. आम्ही दिवसभर रानातून भटकत होतो; पण कोणी 'हत्तीला जपा' अस सांगितले नाही. आम्ही तेथे असताना एका माणसाला एका हत्तीने इजा केली. हा हत्ती 'द्वाड' आहे का काय, म्हणून आम्ही काळजीत होतो. पण सगळ्या जंगल ऑफिसरांनी व जंगली लोकानी निक्षून सांगितले, 'हा हत्ती नेहमी फिरत असतो, मुळीच दुष्ट नाही. तो माणूसच द्वाड, दुष्ट असला पाहिजे, चोरून हत्तीची शिकार करीत असला पाहिजे. त्याच्यावर खटला करून लेकाला तुरुंग दाखवला पाहिजे.'
आसामला जाण्याच्या पूर्वीची माझी हत्तीची आठवण तर जन्मात विसरण्यासारखी नव्हती. आम्ही सकाळी उठून गुरुवायूरच्या देवळात होतो. प्रवेशद्वाराच्या आत मोठे भव्य पटांगण होते. समोरच दोनतीनशे फुटांपलीकडील गाभाऱ्यातील नुकतीच पूजलेली मूर्ती स्पष्ट दिसत होती.
पटांगणात मधले दहा फूट सोडून डाव्या बाजूला पन्नासएक लोकांचे उभ्याने गायन व वादन चालले होते; व उजव्या बाजूला तीन हत्ती मधल्या मार्गाकडे तोंड करून उभे होते. मधला हत्ती प्रचंड उंच व रुंद होता. सोंडेच्या टोकापासून शेपटीपर्यंत लखलखणाऱ्या सोन्याचा साज त्याच्यावर चढविला होता. वर सोन्याचे सिंहासन होते व पाच ब्राह्मण मागेपुढे उभे राहून चवऱ्या ढाळणे, पंखा फिरवणे, अबदागीर धरणे वगैरे कृत्यात मग्न होते. दोन बाजूचे हत्ती बरेच लहान लहान होते. आम्ही देवळात सुमारे पाऊण तास होतो. शेकडो लोक सारखे जात येत होते. शेकडो भजन म्हणत होते. गवयाचे, माझ्या कानांना कर्कश वाटणारे गायन चालले होते व हत्ती संथपणे मधून मधून सोंड हलवीत उभे होते, माझी खात्री आहे की त्या शृंगारलेल्या हत्तीला सर्व सोहळा आपल्या प्रीत्यर्थ चालला आहे असे वाटत असणार!
आमच्या महिन्या-दीडमहिन्याच्या प्रवासात हत्ती पाहिला नाही असा आमचा दिवस गेला नाही; आणि तो भेटायचा किंवा त्याच्याबद्दलच्या गोष्टी ऐकू यायच्या, त्यासुद्धा इतक्या छान असायच्या की आम्ही अगदी हत्तीच्या प्रेमात सापडलो असे म्हणायला हरकत नाही. हत्ती अक्कल आणि चांगुलपण यांचे प्रचंड प्रतीक अशी आमची ठाम समजूत झाली होती. पण इथे पहावे, तो सगळाच प्रकार निराळा. आसामातले हत्ती असे पिसाळल्यासारखे का वागतात, हे काही मला समजेना. परत चौकशीला सुरुवात केली आणि मग मात्र हे कोडे उलगडले. इथे गावाच्या आसपास जे हत्ती भटकत असतात त्याला प्रत्येकाला निदान एकदा तरी बंदुकीची गोळी लागलेली असते. गारो टेकड्यांत पुष्कळ लोकांना बंदुकीचा परवाना आहे. त्यातले बरेच जण हत्तीवर बंदूक उडवून बघतात. एखाद्या बंदुकीची गोळी पायात किंवा पाठीत घुसली तरी हत्ती काही मरत नाही; पण मनुष्य म्हणजे आपल्याला दुःख देणारा एक प्राणी हे काही हत्ती विसरत नाही व एकटीदुकटी वाटेत अडकलेली गाडी किंवा एकटादुकटा मनुष्य सापडला की त्याच्यावर सूड उगवल्याखेरीज तो राहात नाही. पिकाची नासाडी करतो. या सबबीवर लोक हत्तीला मारायला टपलेले असतात. सरकारने संरक्षण दिले नसते. तर हत्तींचा फन्ना उडाला असता. पण हत्ती जिवंत असले तरी त्यांच्याबद्दल प्रेम मात्र कुणाला असत नाही. कोठे म्हैसूर, कूर्ग आणि
त्रावणकोर येथे हत्तीला मिळणारी वागणूक व कोठे हा द्वेष, हे मनात आल्याखेरीज राहिले नाही. आसाम, त्रावणकोर भौगोलिकदृष्ट्या हिंदुस्तानची दोन टोके खरी, पण दोन्हीकडच्या लोकांच्या मनातले अंतर दोन हजार मैलांपेक्षाही कितीतरी जास्त वाटते.
असाच फरक मी ओरिसाहून राजपुतान्यात आले तेव्हा जाणवला. परत तेच शब्द मनात उमटले- दोन टोकं!
पश्चिम ओरिसाची घनदाट अरण्ये, पूर्व ओरिसाची हिरवीगार भातशेती, सगळीकडे भरून राहिलेले पाणी आणि त्यात उमललेली असंख्य कमळे हे पाहताना दृष्टी निवत होती. चिल्का सरोवराइतके रमणीय स्थान क्वचितच दृष्टीस पडते; पण त्याच चिल्का सरोवराकाठी एका खेडेगावात २५ टक्के प्रजा महारोगाने पछाडलेली दिसली. जगन्नाथ मंदिराच्या भव्य पटांगणात हत्तीरोग झालेले भिकारी इतके बसले होते, की नको ते देवदर्शन, नको ती प्रदक्षिणा, असे आम्हांला झाले. ओरिसामध्ये, विशेषतः किनाऱ्याच्या भागात, शेतकरी दारिद्र्याने गांजलेला, अंगावर धड वस्त्र नसलेला; स्त्रिया अंगाभोवती काही तरी, एका काळी पांढरे असलेले पण आता काळे मिच्च झालेले वस्त्र अगदी कलाहीनपणे गुंडाळतात. अशोकाची झाडे उंचच्या उंच वाढलेली सर्वत्र दिसायची. त्यांचे बुंधे दोन माणसांच्या वावेत मावणार नाहीत इतकाले जाड होते. पुन्नागाची (उंडीची) हिरवी तकतकीत झाडे सुंदर पांढऱ्या शुभ्र फुलांनी डवरली होती. निसर्ग समृद्ध होता. पण माणसं रोग, दारिद्र्य, अज्ञान ह्यांनी पिडलेली होती.
पश्चिम राजपुतान्यात आल्याबरोबर तिथल्या रणरणत्या उन्हाने डोळे उघडू नयेत असे वाटले. पाहावे तिकडे उन्हात चमकणारी वाळू. कुठे काही वृक्ष नि शेती दिसलीच, तर त्याने डोळ्यांना बरं वाटायच्याऐवजी त्या बिचाऱ्या झाडांचीच कीव वाटे. राजपुतान्यांतून उत्तर गुजरातमध्ये गेल तेथेही तोच प्रकार. आम्ही जेवून उठल्यावर गड्याने भांडी घासून आणली. तो प्रकार पाहून तर मी अगदी थक्कच झाले. ताटे, वाट्या, जळकी भांडी… सगळी वाळू घासून लखलखीत करून आणली होती. त्यांना पाण्याचा स्पर्शसुद्धा झाला नव्हता. गावातल्या एकुलत्या एका विहिरीला जेमतेम पिण्यापुरते पाणी होते. तो भांडी घासायला कसले पाणी वापरणार? पण ह्या मुलुखात डास नाही, माशी नाही, रोगराई अतिशय
कमी, लोक धिप्पाड, तेजस्वी व अगदी गरिबांतला गरीब शेतकरी हिंवा मेंढपाळ मोठ्या रुबाबात दिसायचा. पायांत तंग विजार, वर चुणीदार अंगरखा आणि डोक्यावर पागोटे किंवा रंगीबेरंगी रुमाल असा पुरुषाचा पोषाख. बायका रंगीबेरंगी घागरे घातलेल्या, त्याच्यावर तशीच रंगीबेरंगी काचोळी आणि तीनचार हातांची ओढणी अशा पोषाखात असायच्या. बांध्याने उंच, रुंद, ताठ मानेच्या; डोक्यावरून पाण्याचा घडा घेऊन ह्या बायका चालू लागल्या म्हणजे त्यांच्या प्रत्येक अवयवांतून सौंदर्यांची व निरोगीपणाची प्रचीती येई. प्रदेश दिसायला ओसाड दिसला तरी अतिशय सुपीक होता. जिथे जिथे म्हणून पाणी मिळे तिथे पीक भरपूर येई. मुख्य खाणे गहू, बाजरी आणि घट्ट उडदाच्या वरणाचा गोळा. ओरिसा व राजस्थान आणि उत्तर गुजरात इथली सृष्टी निराळी; माणसे निराळी, माणसांची राहणी निराळी; खाणेपिणे निराळे. इतका फरक दुसऱ्या दोन विभागांत क्वचितच आढळेल.
आज 'दुसरे टोक' हे शब्द माझ्या मनात यायला सृष्टीपेक्षा माणसेच जास्त कारणीभूत झाली. बंगालमधल्या काही खेड्यांची पाहणी करून मी विमानाने दिल्लीला आले होते; नि तिथून आगगाडीने राजपूरला गेले. आणि काही तासांतच, बंगालपासून सर्वस्वी भिन्न अशा ठिकाणी मी वावरत आहे, हे तीव्रतेने मला जाणवले. पंजाबच्या मानाने बंगालचा निर्वासितांचा प्रश्न कितीतरी पटींनी जास्त गुंतागुंतीचा व कितीतरी जास्त व्यापक हे जरी खरे असले, तरी अशा आणीबाणीच्या वेळी वागण्याची तऱ्हा मात्र दोन्ही लोकांची अगदी भिन्न यात शंकाच नाही. पश्चिम पंजाबमध्ये ब्रिटिश सरकारने कालवे काढले आणि त्या कालव्यावर पंजाबी शेतकऱ्यांनी संपन्न शेती उभारली. ती सर्व टाकून त्यांना पूर्व पंजाबात यावे लागले. पण ती शेती त्यांनी सुखासुखी टाकली नाही. तिच्यासाठी त्यांनी रक्त सांडले. हिंदुस्थान सरकार मध्ये पडले नसते; तर पंजाबी कित्येक वर्षे आपल्या भूमीसाठी लढत राहिले असते. त्यांच्या खेड्यांतून हिंडले, तेव्हा प्रत्येकाने आपले किती लोक गमावले ह्याबरोबरच त्यांचे किती मारले, हेही मोठ्या अभिमानाने सांगितले. सर्वस्वाला मुकून अर्धी अधिक कुटुंबे गायब होऊन जे आले ते कपाळाला हात लावून बसले नाहीत. ते झपाट्याने भारतभर पसरले. कलकत्ता, मुंबई, दिल्ली वगैरे शहरांतून ते हजारोंनी स्थायिक झाले.
मोटर व मोठाले मालट्रक हाकणे व मोटरदुरुस्तीची लहान लहान दुकाने काढणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. लहान लहान यंत्रे चालवून त्यांवर छोटा छोटा माल तयार करणे व यंत्रांची दुरुस्ती करणे ह्या दोन्ही प्रकारची लहान लहान दुकाने ह्या लोकांनी दिल्लीभोवती शेकडोंनी काढली आहेत. राजपूरला ओस पडलेल्या कित्येक बराकीवजा इमारती मला दिसल्या. राजपूर हे निर्वासितांचे एक मोठे केन्द्र होते. त्यांच्यासाठी या तात्पुरत्या इमारती उभारल्या होत्या. सर्व निर्वासितांची सोय लावल्यामुळे त्या आता मोकळ्या पडल्या आहेत. अगदी मोठमोठ्या कुटुंबांतील बायांनीसुद्धा पडेल ते काम करून कुटुंबे सावरली आणि आज ती मंडळी मार्गाला लागली आहेत.
याच्या उलट बंगालचा निर्वासितांचा प्रश्न अजून तसाच भिजत पडला आहे. लहानमोठ्या जमीनदारांच्या कुटुंबांची सोय लावली आहे, पण ज्यांना जमिनी वगैरे काही नव्हत्या, असे गरीब निर्वासित हजारोंनी कलकत्त्यात इतर गावागावांतून तळ देऊन आहेत. नुसते बंगालातच नव्हे, तर आसामातही ठिकठिकाणी हे लोक भेटतात. त्यांची याचना व रडगाणे कधीही संपत नाही. आसामी लोक तर या निर्वासितांबद्दल नुसते उदासीनच नव्हे, तर अगदी विटलेले दिसले. कलकत्त्याचे सिआल्डा स्टेशन तर हजारो निर्वासितांची राहण्याची एक कायम वस्तीच झाली आहे. पहिल्या प्रथम सिआल्डा स्टेशनवर पाऊल ठेवले की एक भयानक दृश्य डोळ्यांपुढे दिसते. भांडीकुंडी, लक्तरे, डबडी असा संसार भोवती मांडून एकेक कुटुंब वसलेले आहे. कुठे मोलमजुरी करून, भिक्षा मागून जे मिळेल ते पोटात ढकलायचे नि परत स्टेशनवर आपापल्या घरकुलात येऊन बसायचे. हाता-पाया काड्या, खोल गेलेले डोळे, अंगावरची लक्तरे, कधी फणी न फिरवलेले केस अशा बायका, मुले, पुरुष स्टेशनभर पसरलेली आहेत. सर्व स्टेशनभर एक कुबट दुर्गंधी पसरलेली आहे. या लोकांच्या अंगी काही माणूसपणा असला, तरी तो आता नाहीसा झाल्यासारखा दिसतो. राजकीय पक्षाच्या सत्तास्पर्धेतील, माणसांचा भास निव्वळ ज्यांच्यावर राहिला आहे. अशी ही प्यादी. कम्युनिस्टांनी मनावर घेतले व सत्ता बळकावण्यापेक्षा माणसांच्या दु:ख निवारणाकडे लक्ष दिले तर निर्वासितांची कोठेही पुनर्वस्ती करता येईल; पण ती तशी करणे अशक्य झाले आहे. अर्थात बंगाली मनुष्याची मनःप्रवृत्तीसुद्धा या दैन्याला जबाबदार आहे. मधूनमधून काही थोडा पैसा
मिळतो म्हणून अशा दैन्यात कोणीही पंजाबी राहिला नसता. पंजाबचा माणूसच काही वेगळा हे खरे; काय वाटेल ते करायचे पण या जंगलातल्या चांगल्या गोष्टी हस्तगत करायच्या हा त्याचा बाणा. सरकारचे शेतीतज्ज्ञ सांगतात की, पंजाबी शेतकरी कुठलाही नवीन प्रयोग करून पाहायला तयार असतो. नवीन खत द्या; नवीन बियाणे द्या; शेतीची नवीन अवजारे द्या, सर्व काही वापरून पाहायला त्याची तयारी असते. हल्लीच्या स्पर्धेच्या युगात पुढे कसा जाऊ असा विचार चुकूनसुद्धा त्याच्या मनात येत नाही, तो सगळ्यांना कोपरखळ्या मारीत धडाक्याने पुढे सरकतो. पूर्वापार चालत आलेल्या संस्कृतीने घालून दिलेल्या मर्यादा त्याला अडवू शकत नाहीत. मध्यम स्थितीतील बंगाली मनुष्य पुष्कळच बहुश्रुत असतो. त्यांचे स्वतःचे काव्य, नाट्य व इतर वाङ्मय यांच्या परंपरेचा त्यांना मोठा अभिमान असतो. कुटुंबाची खानदानी परंपरा त्यांच्या हाडीमासी खिळलेली असते. कित्येकदा हा खानदानीपणा इतक्या पराकोटीला जातो की दारिद्र्य, मानहानी इतकेच काय, पण मरणसुद्धा ही माणसे पत्करतात पण आपले उच्च समजले जाणारे आचार-विचार सोडायला तयार नसतात. काही दृष्टींनी बंगाली हिंदुस्थानातील सर्वांत सुसंस्कृत लोक, पण त्यांची संस्कृतीच त्याच्या विकृतीलाही कारण आहे. बंगाली कथा व बंगाली पटकथा यांमध्ये सहृदय, सुशील पण सर्वथैव निष्क्रिय बंगाली पुरुषांचे चित्रण फारच सुंदर केलेले आहे. परिणीता, विराज बहू, पथेर पांचाली ह्या विख्यात चित्रपटांतून पुन्हा पुन्हा तेच ते दृश्य दृष्टीस पडते. लाचार, निष्क्रिय, वेळी अवेळी जेवाय पुरता घरी येणारा पुरुष व त्याची वाट पाहात बसणारी, त्याच्या पानावर भरपूर अन्न वाढून स्वतः न जेवणारी, तो जेवताना त्याला पंख्याने वारा घालणारी बंगाली पत्नी हे दृश्य पाहून माझ्या मनात भयंकर घृणा उत्पन्न होते. जवळजवळ तोच प्रकार बंगाली निर्वासितांना पाहून होतो. त्याची भयंकर स्थिती पाहून अतीव करुणा तर वाटतेच पण 'मरू; पण कलकत्ता किंवा बंगाल सोडणार नाही', ही वृत्ती किंवा स्वतःच्या व कुटुंबाच्या प्राणाचे मोल व्यर्थ देणारी माणसे, किंवा अशांचे दैन्य व लाचारी ह्यांचे राजकीय भांडवल करणारे सुसंस्कृत बंगाली पाहिले म्हणजे तितकाच त्वेष वाटतो.
इकडे पंजाबात अगदी ह्याउलट वृत्ती. पृथ्वी काबीज करायची त्यांची
तयारी आहे. हिंदुस्थानभर ते जातातच, पण परदेशी जाण्यासाठी जिवाचा भयंकर आटापिटा करतात. दिल्लीला खोटे पासपोर्ट तयार करणारी एक टोळी नुकतीच पकडली. मला इकडच्या लोकांनी सांगितले, "एक टोळी पकडली म्हणून काय झाले? हा उद्योग काही थांबायचा नाही." मी सहा वर्षांपूर्वी सॅन्फ्रान्सिस्कोला होते, तेथे कस्टम कचेरीत तीसचाळीस पंजाब्यांचा जथ्था बसला होता-बायका-पोरे पुरुष-कोणाला म्हणून इंग्रजीचे एक अक्षर येत नव्हते. मी दिसल्याबरोबर सर्वांनी मला गराडा घातला व कस्टम अधिकाऱ्यांशी त्यांचे काय काम होते, तिथून पुढे जायला त्यांना कधी मिळणार, वगैरेची चौकशी करावयास सांगितले. त्यांचे काम करून दिल्यावर मी पण त्यांना विचारले, तुम्ही इकडे कुणीकडे? मला कळले की कॅनडात काही शेकडा पंजाबी शेतकऱ्यांना गव्हाची लागवड करण्यासाठी जमिनी मिळाल्या आहेत व पंजाबी कुटुंबे कॅनडात जाऊन स्थायिक झाली आहेत. उद्या सैबेरियात वसाहत करण्यासाठी बोलावले तरी हजारोंनी पंजाबी लोक जातील, ह्याबद्दल माझी खात्री आहे.
ह्या दोन प्रदेशांतील लोकांच्या प्रत्येक आचारात फरक दिून येताे. आधीच लंबा-चवडा असलेला पंजाबी, मोठी थोरली दाढी राखून, माेठा थोरला उंच फेटा बांधून, जाडजूड अंगरखा व तुमान घालून आपल्या उंचीत व रुंदीत भर घालतो व आपल्या दांडग्या पौरुषाची जाहिरात लावतो, तर आधीच ठेंगणा व नाजूक बंगाली पुरुष तलम, झिरझिरित अंगरखा घालून पोकळ धोतर नेसून व लांब केसांचा भांग काढून आपला नाजुकपणा आणखीनच वाढवितो; पंजाबीसुद्धा आपल्या पोषाखाच्या ऐटीत असतो पण त्याची ऐट एखाद्या पोराची असते, एकदा छानछोक पोषाख झाला म्हणजे लोक आपल्याकडे पाहतात ना याबद्दल त्याला जिज्ञासा व कुतूहल असते. तो नेहमी लोकाभिमुख असतो. ह्याउलट बंगाली मनुष्य आपली बुद्धी, आपली कला, आपली संस्कृती यात बुडालेला, अंतर्मुख तर खासच नव्हे पण आत्मसंतुष्ट असतो. मला आठवते, मी कलकत्त्याला काही कामानिमित्त गेले होते, तेथल्या एका बागेत आम्हा निमंत्रितांना चहा हाेता. आमच्या यजमानांपैकी एका बंगाली तरुण पुरुषाबद्दल मला जिज्ञासा वाटली. होता पोरगेलासाच, बंगाल्यांच्या मानाने उजळ, नाक-डोळे रेखीव, भव्य उंच कपाळ, मध्यम उंचीचा असा होता त्याच्या रूपापेक्षाही त्याच्या
वागणुकीने माझे त्याच्याकडे लक्ष वेधले. अत्यंत तलम लांब बाह्यांचा अंगरखा त्याने घातला होता. धोतर तितकेच तलम होते व त्याचा पुढचा लांब ओचा लीलया अंगरख्याच्या खिशात खोचलेला होता. केसांना तेल लावून सुंदर भाग काढला होता. चेहरा तरुणीलाही लाजवील इतका नाजूक व गुळगुळीत होता. हा मनुष्य मंद पावलांनी, वस्त्राची घडी न चुरगळता चालत आला. त्याची दृष्टी लोकांकडे नव्हतीच. मी विचारले तर मला कळले की हा मनुष्य आपल्या स्वतःच्या शाखेत फार विद्वान् म्हणून नाव कमावलेला होता. तो आला. एका टेबलापाशी बसला. काय हवे ते घेऊन खाल्ले. थोडा वेळ बसला. अधून मधून स्वतःशीच मंद मधुर हसत होता; जणू आम्हांला न दिसणारा एक आरसा त्याच्यासमोर होता, व त्यात दिसणाऱ्या स्वतःच्या रमणीय रूपावर तो भुलला होता. नार्सिसस असाच स्वतःच्या रूपावर भुलून, बाहेरच्या मनोहर जगाला विन्मुख होऊन मेला नव्हे का?
*