<poem>

रवि हर्षवूनि लावी सोडाया जेंवि कुवलया श्वास, करि सुप्रसन्न फ़णिवर पुण्यकथा कथुनि कुवलयाश्वास. ॥१॥ मग राजसुतासि म्हणे, ‘ वत्सा ! नि:शंक सांग, तर्पावें कोणें सुपदार्थें तुज ? सुखवाया वस्तु काय अर्पावें ? ॥२॥ आसन, वाहन, अंबर, आयुध किंवा सुवर्ण, मणि, कांहीं दुर्लभ वस्तु वरावें; द्यावें म्यां, जेंदिजे न आणिकाहीं ’. ॥३॥ नमुनि ऋतुध्वज विनवी, ‘ पाताळीं तात तूं, महिवरि तो, काय उणें ? सर्वसुखें जीं जीवत्पितृक तो मही वरितो. ॥४॥ रत्नादि सर्व पुष्कळ त्या तातगृहीं, जगीं असेना तें; येथेंहि विपुळ, बापा ! घ्यावें द्यावें असें असे नातें. ॥५॥ कार्यहि नाहीं काहीं याहीं, बा हीं यथेष्ट आहेत. अर्थी पावति नमनीं, भोगावें भूषणादि, हा हेत. ॥६॥ जें दुर्लभ वांछावें, पावाया धरुनि आदरा, जीवें, झालें प्राप्त मज, शिरें स्पर्शुनि तव भव्य पादराजीवें ’. ॥७॥ प्रेमें फ़णिवर्य म्हणे ‘ वत्सा ! कनकादि जरि नको, अस्तु; जें तव हृदयास बहु प्रीतिप्रद, तेंचि माग तूं वस्तू ’. ॥८॥ नृपपुत्र म्हणे, " झालों स्पर्शास तुझ्या मनुष्य मी पात्र, अंतर्बाह्य निवालें, अमृतस्नानें जसें, तसें गात्र, ॥९॥ ‘ द्यावा अवश्य वर’ हें चित्तीं, तरि हेतु सर्वशर्माचा, हृदयांतूनि न जावा माझ्या संस्कार पुण्यकर्माचा. ॥१०॥ दिव्यांगराग, रत्नें, स्त्री, सुत, संपत्ति, गीत, वाद्य, असें हें सर्व सुकृततरुफ़ळ, जें होणें मुदित विविधभोगरसें ". ॥११॥ सर्प म्हणे, ‘ सत्य वदसि, हें तुज दिधलें, तथापि जें कांहीं दुर्लभ नरलोकीं तें माग, किमपि कठिन बा ! मला नाहीं. ’ ॥१२॥ या वचनें बहु कोंडे, आग्रह करितां उगाचि तो राहे; वाहे संकोचाचा भर, मित्रांच्या मुखांकडे पाहे. ॥१३॥ फ़णिसुत म्हणती, ‘ ताता ! अहितें कथितांचि शोकदा वार्ता, याची दयिता मेली, होवुनि अत्यंतशोकदावार्ता. ॥१४॥ गंधर्वेश्वकन्या ती सुतनु मदालसा, तदन्या या न रुचे; हा तद्विरहें झाला तापा, जसा पद न्याया. ॥१५॥ मुक्ति मुमुक्षूस जसी, या तीच स्त्री रुचे, नको काहीं; श्रम याच्या प्राणाहीं विरहें विरला, असा न कोकाहीं ॥१६॥ बापा ! घडेल तरि, या तीच समर्पूनि तूं पुरीव रती, भोगवती यास नको, अलकाहि, तिच्याहि जी पुरी वरती. ’ ॥१७॥ अश्वतर म्हणे, ‘ सुत हो ! मृतदर्शन जें सुरांसही जड, तें स्वप्नावांचुनि किंव मायेवांचुनि कसे मला घडतें ? ॥१८॥ नृपपुत्र भीड सोडुनि बोले, ‘ शोकाभिधा अलातातें विझवाया, दावावी कसितरि ती एकदा मला तातें. ॥१९॥ दयिता मदालसा ती ताता ! मायामयीहि दाखवितां, मजवरि परमानुग्रह, जेंवि सुधा ज्वरहतासि चाखवितां. ’ ॥२०॥ अश्वतर म्हणे ‘ माझें विपुळ नसे हृदय या महा माया; अभ्यागत बाळहि गुरु, वांछिसि, तरि तूं सुखें पहा माया. ’ ॥२१॥ ऐसें बोलुनि, सदनीं निजली होती मदालसा दुहिता, ती आणुनि तो दावी, सुतमित्राच्या करी असा सुहिता. ॥२२॥ स्मित करुनि पुसे, ‘ तव मन जीच्या ठायीं सदा असे लोल, ती हे मदालसा, कीं अन्या ? वत्सा ! पहा, खरें बोल. ’ ॥२३॥ अवलोकितांचि, लज्जा सोडुनि, सहसा उठे, ‘ प्रिये ! आली ! ’ ऐसें म्हणत, तिजकडे आलिंगायास धांव तो घाली. ॥२४॥ नागेंद्र विनोद करी, ‘ रे वत्सा ! मजकडे पहा, काय भ्रमसी ? हे माया, कीं योग्य स्पर्शावया न हा काय. ॥२५॥ करितां स्पर्श, न राहे माया, दूरूनि मात्र बा ! पाहें; आलिंगनें न निवविल पळ विद्यारचितगात्र बापा ! हें. ’ ॥२६॥ यापरि वदुनि, निवारण करि जेव्हां पन्नगेंद्र तो हातें, ‘ हाय ’ कुवलयाश्च म्हणे, तत्काळ पडे धरूनि मोहातें. ॥२७॥ मोहे अश्चतराचें पुत्राच्या जेंवि तातमन घातें; सावध करि शीत वनें पवनें, पुत्रांसमेत अनघातें. ॥२८॥ करुनि विनोद क्षणभरि, तो पन्नग सर्वसाधुराय कवी, अर्पुनि कन्या प्रेमें, वृत्त सकळ तें तयासि आयकवी. ॥२९॥ कांतेतें पावुनि, तो बहु हर्षे कुवलयाश्च, करि नमनें, प्रार्थुनि म्हणे, ‘ फ़िटाया ऋण, चरणस्मरण, नित्य करिन मनें.’ ॥३०॥ मग चिंतितांचि आला कुवलय हयवर; चढे तयावरि तो, ये सस्त्रीक स्वपुरा, सुगुण जन पुन्हा महोदया वरितो. ॥३१॥


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.