<poem>

येवुनि पुरासि, वंदुनि तातातें, सर्व वृत्त तो कळवी, पळवे शोक पळांत, स्वयशें शात्रवजनाननें मळवी. ॥१॥ ‘ वाहो देह यशासि, न मोत्यांच्या हा तसा सरा, सासो सुचिर असां ’ म्हणति असें, शिरिं ठेवुनि हात, सासरा, सासु. ॥२॥ होय पुरांत महोत्सव, वांटिति जन कनक, शर्करा, जीवां; तो वासर बहु सुखवी त्या पौरां, जेंवि अर्क राजीवां. ॥३॥ वर्णिति अश्वतरा किति, शत्रुजिता किति, ऋतुध्वजासि कवी, त्यांतें, ‘ मदालसाव्रत, निजभाग्यहि गा ’ असें प्रजा सिकवी. ॥४॥ मंदाकिनींत जैसा जाणे तापा महागज न काहीं, हा नृप तैसा; वरिलें सुख इतरांच्या महान जनकाहीं. ॥५॥ स्वर्गासि शत्रुजिन्नृप, परिपाळुनि पुत्रवत् प्रजा गेला; मग कुवलयाश्व राजा, पडुनि गळां प्रकृतिनीं बळें केला. ॥६॥ पोटीं मदालसेच्या शुभलग्नीं प्रथम होय सुत राजा; संसृति, सतीसहाया, नीतिरता सर्वकाळ सुतरा ज्या. ॥७॥ प्रेमें ‘ विक्रांत ’ असें नाम ऋतुध्वज तया सुता ठेवी, तेव्हां ती हास्य करी ज्ञानामृतनिधि मदालसा देवी. ॥८॥ उल्लापनछळें ती ज्ञानाब्धि मदालसा स्वतोकातें बोधी, न सांपडाया इतरांपरि संसृतींत शोकातें. ॥९॥ ‘ ताता ! शुद्ध अससि तूं सर्वगत, अनादिनिधन, निष्काम, आतांचि कल्पनेनें केलें ‘ विक्रांत ’ हें तुला नाम. ॥१०॥ तूं नामरूपवर्जित, मायेनें विश्व कल्पनागेह, स्नेह नसे विषायांचा, पंचात्मक हा तुला नसे देह. ॥११॥ अन्नें उदकें भूतें वाढति; तुज वृद्ध, हानि बा ! नाहीं; तूं एक, अविद्येनें दिसती भूतें उगीच नाना हीं ’. ॥१२॥ स्तन पाजितां, निजवितां, हालवितां, बाळकासि खेळवितां, दे बोध, जो सुदुर्मिळ थोरांसि सहस्त्र कल्प मेळवितां; ॥१३॥ जन्मापासुनि बोधुनि केला विक्रांत पुत्र सुज्ञानी, वांछीना गृहधर्म, स्तविला बहु नारदादि सुज्ञानीं. ॥१४॥ त्यावरि ‘ सुबाहु ’ ऐसें नाम स्थापी द्वितीय तनयातें; हांसे मदालसा, जरि मानवती आप्त सुज्ञ जन यातें. ॥१५॥ त्यासहि बाल्यापासुनि बोध करी ती मदालसा सुसती, अहिता संसारावरि त्याचीही बुद्धि जाहली रुसती. ॥१६॥ मग तिसरा सुत होतां, पुर झालें अद्भुतोत्सवा धाम; त्यालाहि ‘ शत्रुमर्दन ’ ऐसें ठेवी पिता स्वयें नाम. ॥१७॥ त्या नामें जन हर्षे, तेव्हांहीं बहु मदालसा हांसे, दे आत्मबोध त्यासहि, जो तोडी विषयवासनाफ़ांसे. ॥१८॥ नाम चतुर्थ सुताचें जों योजी कुवलयाश्च, तों पाहे, ती हसितमुखी देवी बहु पहिल्याहूनि जाहली आहे. ॥१९॥ नृपति पुसे, ‘ हद कारण हास्याचें, जें मना तुज्या येतें; नाम चतुर्थ सुताला ठेवावें त्वांचि आजि जाय ! तें. ॥२०॥ नामें बरवीं केलीं विक्रांत, सुबाहुम शत्रुमर्दन, हीं राजसुतातें, उचितें कुशळें घालावया जनास महीं. ’ ॥२१॥ ती साध्वी पतिस म्हणे, ‘ आख्या आली मनास माज्या जी, ती तुमच्या आज्ञेनें ठेवितसें या सुतासि, राज्याजी ! ॥२२॥ हा सुत अलर्कनामा या वंशीं, जेंवि दीप ओकांत ; धर्मज्ञ, साधु, सद्गुण होयिल विख्यात सर्व लोकांत ’. ॥२३॥ हास्य करुनि भूप म्हणे, ‘ सुज्ञे ! दयिते ! ‘ अलर्क ’ हें नाम गमतें अबद्ध, याचा वद अर्थ; सुगंध धार्य तें दाम ’. ॥२४॥ राज्ञी म्हणे " अहो जी ! हे व्यवहारार्थ कल्पना जाणा; युष्मत्कृतनामांची कथितें चित्तीं निरर्थता आणा. ॥२५॥ जे प्राज्ञ, ते जन म्हणति ‘ पुरुष व्यापक, तया घडे न गती; ’ केली ‘विक्रांत ’ असी आख्या जी, सार्थाका कसी मग ती ? ॥२६॥ पुरुष अमूर्त, तयातें काय म्हणावें ‘ सुबाहु ’ ? पंडित हो ! या सुविचारें दुसरें नाम सुताचें कसें न खंडित हो ? ॥२७॥ तिसरेंहि ‘ शत्रुमर्दन ’ हें नाम व्यर्थ, सर्व देहांत एकचि पुरुष बहु दिसे, जैसा आदर्शजडित गेहांत. ॥२८॥ अरि कोण ? मित्र कोण ? स्वामी ! सुविचार करुनि, सांगावें; सुतनाम शत्रुमर्दन हें मग ‘ सार्थक ’ म्हणोनि कां गावें ? ॥२९॥ भूताहीं भूतांचें मर्दन तत्वज्ञ जाणतात असें, पुरुष अमूर्त तयाचें मर्दन, बोला, बरें घडेल कसें ? ॥३०॥ संव्यवहार घडावा, म्हणुनि असन्नाम कल्पिलें जातें; ऐसें असतां, म्हणतां कां ‘ व्यर्थ, ’ अलर्क नाम जें या, तें ? " ॥३१॥ त्या तथ्यवादिनीचें श्रवण करुनि वचन मानवेश तदा, वाक्या सरस्वतीच्या चतुरानन, तेंवि मानवे शतदा. ॥३२॥ जेंवि तिघे सुत धाले; चवथाहि असा अलर्क तो धाया, बोधाया ती लागे, तदविद्यामलिनहृदय शोधाया. ॥३३॥ क्रुद्ध कुवलयाश्च म्हणे, जीतें स्तविती समस्त संत, तितें; ‘ मूढे ! हें काय करिसि, माझ्या बुड्वावयासि संततितें ? ॥३४॥ मत्प्रिय करणें हें जरि तुझिया चित्तीं असेल, हा तनय योजीं प्रवृत्तिमार्गीं, नच होवू हातधर्म, हातनय. ॥३५॥ परिपालन प्रजांचें, सिकिव अनुष्ठान सर्व धर्मांचे; हें कारण देवांच्या, पितरांच्या, होय तृप्तिशर्मांचें. ’ ॥३६॥ ती पतिच्या आज्ञेनें तैसाचि करी सुतासि उपदेश, ‘ वत्सा ! पितृमन शीळें रंजिव, हो साधुभक्त सुपदेश. ॥३७॥ मित्रांवरि उपकार, द्वेषिजनांचा करीं विनाश रणीं, भूतहित प्रेमभरें, विप्रार्चन सर्वदा स्वयें शरणीं. ॥३८॥ स्वप्नींहि परस्त्रीतें न सिवे ऐसें करी अधीन मन; गोविप्राश्वत्थांचें न चुकों द्यावें तुवां कधीं नमन. ॥३९॥ श्रीविष्णुध्यान करीं, नित्य श्रीशंकरा सदारा ध्या; तरसिल भवीं, अभेदें भजतां श्रीशा, शिवा सदाराध्या. ॥४०॥ शरणागतगोविप्रत्राणार्थ रणीं शरीर सोडावें, जोडावें पुण्य यश; ज्ञातिश्रुतिवच कधीं न मोडावें. ॥४१॥ विधिवत् सर्व सव करीं, विप्रांतें विपुल वित्त दे हातें; वृद्धपणीं सोड, वनीं करुनि तपें शुद्ध चित्त, देहाते. ’ ॥४२॥ यापरि उपदेश करुनि, देवीनें तो कुमार कवि केला; मातेच्या शिक्षेला वश होय जसा सदश्व कविकेला. ॥४३॥ झाला प्रौढगुणी, मग अनुरूपा करुनियां दिली महिला, ती प्रसवी सुतरत्नें, जीं योग्यें भूषवावया महिला. ॥४४॥ जाणुनि धर्मनयज्ञ, क्षितिरक्षाक्षम, विनीत, शुचि तातें अभिषेक करुनि, दिधला निजराज्यपदाधिकार उचितातें. ॥४५॥ वृद्धपणीं सुविवेकें गमले बहुभोग ते सपक राया, जाया तपोवनातें, जायासख तो निघे तप कराया. ॥४६॥ तेव्हां मदालसा ती उपदेश करी तया सुता चरम; ‘ वत्सा ! दु:ख शमाया तुज एक उपाय सांगत्यें परम. ॥४७॥ तुज बोधाया बा ! या मुद्रागर्भीं असे चिटि कवीला, ती कथिल तें करावें; ताप गुरुक्तें नसेचि टिकवीला. ॥४८॥ लिहिलें या मुद्रेंत व्यसनीं वत्सा ! बरें पहा, वाल; तेंचि करीं; गुरुवचनीं विश्वास तुझा सदा रहावाच. ’ ॥४९॥ ऐसें सुतासि सांगुनि, देवुनियां कनकमुद्रिका आशी; त्या शीलाढ्यासि पुसुनि, गेली जोडावया तपोराशी. ॥५०॥


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.