<poem>

चिरकाळ अलर्क करी धर्मनयें कुवलयाश्चसा राज्य, प्राज्य विषय सेवुनिहि न तृप्त, अनळ जेंवि भक्षितां आज्य. ॥१॥ ब्रह्मज्ञ सुबाहु म्हणे, ‘ यालाहि मलाहि हें नव्हे युक्त, संसृतिपाशापासुनि बंधु करावाचि सर्वथा मुक्त. ’ ॥२॥ ऐसें चिंतुनि योगी जाय शरण बंधुशत्रुतें आधीं, त्यासि म्हणे, ‘ काशिपते ! यश घे, मत्कार्य तूंचि हें साधीं. ॥३॥ राया ! सुबाहुनामा मीं, जाणमला मदालसातनुज, आतां राज्य करावें म्यां; जो करितो अलर्क, तो अनुज. ’ ॥४॥ तें कार्य यशस्कर कां अभिमानी काशिराज परिसेना ? शरणागत राज्यपदीं स्थापाया, शीघ्र सिद्ध करि सेना. ॥५॥ ‘ दे राज्य अगजातें, ’ ऐसें सांगोनि पाठवी दूत; तो आरिशासन मानी मानी न अलर्क मनुजपुरुहूत. ॥६॥ ‘ भेटोनि अग्रजानें मजला, स्वमुखेंचि राज्य मागावें; लागावें न परमतिस, म्यांही अरिशासनीं न वागावें. ’ ॥७॥ तोहि सुबाह म्हणे, " मीं क्षत्रिय, कां ‘ दे ’ असें म्हणेन मुखें ? सामें देत नसे तरि देयिल दंडेंचि सर्व राज्य सुखें. " ॥८॥ योगिवर सुबाहु बळें युद्धार्थ विरोध वाढवी, राज्या जागें करावया त्या, प्राप्त अहंकार बाढ वीरा ज्या. ॥९॥ चतुरंग सैन्य पुष्कळ मिळउनि, काशीश विजय भावुनि घे; भासे द्याया परिभव, परि भव वारावयासि, भावु निघे. ॥१०॥ सामाद्युपाय योजुनि वश करि सामंत काशिपति सर्व, आक्रमुनि राष्ट्र, पुरही, नुरवी लेशहि अलर्कनृपगर्व. ॥११॥ प्रतिदिन वीरजनक्षय होय, धनक्ष्य, अलर्क असहाय आंत गडबडे, बाहिरमात्र म्हणों दे न वीररस ‘ हाय. ’ ॥१२॥ त्या परमसंकटीं तो स्मरता झाला मदालसामुद्रा, क्षुद्रा उपमा अन्या; त्या ती, गंगा जसी हिता रुद्रा. ॥१३॥ पूजी निजमातेची ती मुद्रारुपिणी दया साची, याची अभयवरातें, रोमांचितदेह होय, तो वाची. ॥१४॥ ‘ संग त्यागावा, जरि न त्यजवे, साधुसीं तरि करावा; कीं संगाचें ओखद संत, मनीं बोध हा हित धरावा. ॥१५॥ काम त्यागावा, जरि न त्यजवे सर्वथा, तदीय जया तरि तोचि मुमुक्षेप्रति करिजे कीं तीच होय ओखद या. ’ ॥१६॥ हा ज्यांत अर्थ, ऐसें श्लोकद्वय अंगुलीयकीं पाहे, जाणे स्पष्ट मुमुक्षायोगेंचि श्रेय या भवीं आहे. ॥१७॥ सत्संगेंचि मुमुक्षाप्राप्ति जना होय, हें मनीं आणी; खाणी तच्चिंताविषवल्लीतें ती मदासावाणी. ॥१७॥ ‘ ज्याच्या संगें होय प्राप्त मुमुक्षा, जिणें भवा अंत, पंत ज्ञानप्रद या समयीं मज कोण भेटतो संत ? ’ ॥१९॥ ऐसें चिंती जों, तों श्रीदत्तात्रेय संत ये ध्यानीं, ज्ञानींद्रा त्या जाय क्षिप्र शरण तो तयाचिया स्थानीं. ॥२०॥ जी अज्ञानतमोघ्नी प्रभुदृष्टि पडे नता नृपावरि ती, शरणागता तयातें तत्काळचि जाहली कृपा वरिती. ॥२१॥ वंदुनि म्हणे, ‘ प्रभो ! मीं शरणागत, मुख्य तूं शरण्यांत; रक्षीं, दु:खीं पडलों, मृग जेंवि दवाकुळा अरण्यांत. ’ ॥२२॥ श्रीदत्तात्रेय म्हणे " बा ! वद तूं कोण ? दु:ख तें काय ? घाय दिसे ना देहीं, हो सावध, ऊठ म्हणसि कां ‘ हाय ? ’ " ॥२३॥ ऐसें विश्वगुरु पुसे, चित्तांत अलर्क जों विचार करी, जाणे, ‘ मीं सच्चित्सुख एक, इतर कोण मित्र ? कोण अरी ? ॥२४॥ देहादि इतर सकलें विकळे, एणें न मीं सकळ विकळ, देहाभिमान नसतां, ताप उठुनही बुधा न कळवि कळ. ’ ॥२५॥ तो श्रीदत्तासि म्हणे, ‘ मज दु:ख बरें विचारितां नाहीं, जीव असम्यग्दर्शी संसारी सुख न पावती कांहीं. ॥२६॥ पुरुषाच्या चित्ताचें जेथें जेथें ममत्व बा ! होतें, तेथुनि तेथुनि दु:खें आणुनि देतें समर्थबाहो ! तें. ॥२७॥ गृहकुक्कुटासि खातां मार्जारें, जेंवि दु:ख होय जना, तेंवि न ममताशून्या चटका कीं मूषका, स्वभक्तधना ! ॥२८॥ म्हणुनि न दु:खी, न सुखी, कीं प्रकृतीहून, पाहतां, पर मीं; कळलें असें, विचारीं या आतां क्षणहि राहतां परमीं. ’ ॥२९॥ त्यातें श्रीदत्त म्हणे " जें तूं वदलासि, सत्य, तें बा ! गा ! दु:खाचें कारण ‘ मम ’, ‘ न मम ’ सुखाचें, नृपा ! महाभागा ! ॥३०॥ हें ज्ञान मत्प्रसादें झालें तुज, साधुवृंद या गातें; ‘ मम ’ हा प्रत्ययशाल्मलितूळ उडविला सुदूर ज्या वातें. ॥३१॥ सत्संगशाणनिशितें विद्याशस्त्रेंकरूनियां ज्याहीं ममतादु तोडिला, बा ! नाहीं भय या भवीं तयां काहीं. ॥३२॥ अमता ममता त्यजितां आत्मसुख प्राप्त होय, गा ! राज्या ! लाजति, विरति, निपट सुख द्याया, नेणोनि सोय, गारा ज्या. ॥३३॥ राजा ! भूतेंद्रियमय हें, स्थूळ न तूं, न मींहि, बा ! समज. क्षेत्रज्ञ क्षेत्राहुनि पर कथितों, बहु अभीष्ट दास मज. ॥३४॥ झषजळ, मशकोदुंबर, या एकत्वीं जसा पृथग्भाव, ऐसा क्षेत्रात्म्यांचा जाण, अलर्का ! धरीं बरा भाव. " ॥३५॥ इत्यादि दत्त बोधी, शोधी मन, कथुनि साधु योगातें; शरणगतासि तारी, कविवृद उगेंचि काय हो ! गातें ? ॥३६॥ श्रीदत्तात्रेयातें नमुनि म्हणे तो अलर्क राजवर, ‘ गुरुजी ! मीं उद्धरिलों, नरकीं होतों निमग्न आजवर. ॥३७॥ झाला बरा पराभव, कोधबळांच्या क्षयें परित्रास; आला हा शरण तुज त्रिजगत्पावनमहाचरित्रास. ॥३८॥ उपकारी काशीश्वर, अग्रज माझा सुबाहुही मोटा, खोटा गमला जाड्यें, त्वत्संगचि लाभ, राज्य तो तोटा. ॥३९॥ व्यसन बहु बरें तें, कीं आलों या ज्ञानदा पदापाशीं, सांपडतों काळाच्या, भोगाया आपदा सदा, पाशीं. ॥४०॥ स्वामी ! भवत्प्रसादज्वलनें आज्ञान सर्वही जळलें, कळलें स्वहित, नुमजतें, कीं मन बहु विषयसेवनें मळलें. ॥४१॥ आतां बा ! निजराज्य प्राज्यभ्रमतापकारण त्यजिन; अजि न व्यसनप्रद, तें ह्ति सेविन वन्य धरिन मीं अजिन. ’ ॥४२॥ दत्त म्हणे, ‘ भव्य तुझें नित्य असो, योजिलें बरें बा ! हें, जा, राजा ! हो निर्मम, निरहंकार, प्रसन्न मीं आहे. ’ ॥४३॥ झालें ज्ञान घडींतचि, लावुनि चरणांबुजा शिरा ज्याच्या, त्या गुरुसि नमुनि, गेला सत्वर शिबिरासि काशिराज्याच्या. ॥४४॥ भेटुनि बंधुसमक्षचि काशिपतिस विहितसंगकुत्स वदे, ‘ घे राज्य नृपा ! हें, कीं अर्पुनि मम अग्रजासि उत्सव दे. ’ ॥४५॥ काशिपति म्हणे, ‘ सहसा त्वां निजराज्य न उगेंचि सोडावें, मोडावें न क्षत्रियवृत्त, सुयश रण करूनि जोडावें. ’ ॥४६॥ स्मित करुनि अलर्क म्हणे ‘ पूर्वी माझें असेंचि मन होतें, सांप्रत विरक्त झालें, भरलें तें जेंवि रिचवलें पोतें. ॥४७॥ कारण काशिपते ! मीं कथितों, तें श्रवण तूं करीं साचें, जो प्राणिग्राम असे, एक गुणत्रयचि मूळ हें याचें. ॥४८॥ स्वामी, मित्र, द्वेषी, भृत्य, असें तेधवां पहायाचें कारण काहींच नसे, केवळ अज्ञींच हें रहायाचें. ॥४९॥ तुजपासुनि मज झालें भय काशीशा ! महोग्र भेदानें, शरण श्रीदत्तातें गेलों, होवूनि विकळ खेदानें. ॥५०। त्याच्या पदप्रसादें गेलें अज्ञान सकळ विलयातें, आत्मस्वरूप कैसा तो ज्ञानादर्श न कळविल यातें ? ॥५१॥ राजा ! त्वछत्रु न मीं, मछत्रु न तूं, क्षय भ्रमा झाला ; एक व्यापक आत्मा सर्वत्र प्रत्यया असा आला. ’ ॥५२॥ ऐसें अलर्क वदतां, बहुतचि हर्षे सुबाहु तो आर्य; उठुनि म्हणे, ‘ काशिपते ! माझें सिद्धीस पावलें कार्य. ॥५३॥ झालों कृतार्थ, आतां जातों, हो तूं सदा सुखी, राया ! जाया आज्ञा दे; बहु हर्ष दिला, कार्य करुनियां, बा ! या. ’ ॥५४॥ काशिपति म्हणे, ‘ बापा ! सांग, मजकडे कशास आलास ? निष्पन्न अर्थ कोण ? स्पष्ट वद, कसा कृतार्थ झालास ? ॥५५॥ वदलासि, ‘ मला साधुनि दे भोगितसे अलर्क मद्राज्या. ’ तें जिंकूनि दिलें, घे, वांछित होतासि नित्य भद्रा ज्या. " ॥५६॥ ब्रह्मज्ञ सुबाहु म्हणे, ‘ राजा ! माझा अलर्क हा भ्राता, ख्याता ज्ञानसुधेची तटिनी देवी मदालसा माता. ॥५७॥ या ग्राम्यभोगसक्ता ब्रह्मज्ञानें घडावया मुक्ति, वैराग्यार्थ करविली, तुज योजुनि, हे पराभवा युक्ति. ॥५८॥ मातेनें कर्णांत ज्ञान दिलें, आननीं जसें स्तन्य; धन्य तिघे सुत झालों, हा अज्ञचि राहिला जसा अन्य. ॥५९॥ राहुनि मदालसेच्या गर्भीं, प्राशूनिही तिचें दुग्ध, न रहावा संसारीं साक्षात् भ्राता अलर्क हा मुग्ध. ॥६०॥ यास्तव उद्योग असा करवुनि, हें साधिलें महाकार्य, हो पात्र ज्ञानातें गावोत तुझ्याहि कीर्तितें आर्य. ’ ॥६१॥ काशिपति म्हणे, ‘ घडत्ये ज्या ज्ञानें गति परा, सुबाहो ! तें ! सांग मजहि, अमृत उठवि सत्वातें, जें परासु बा ! होतें. ॥६२॥ तूं साधु, प्रणतजनीं सर्वींही त्वां दया करावि खरी; जो उगवला अमृतकर, सर्वत्रहि तो दयाकरा विखरी. ’ ॥६३॥ तो ज्ञानी त्यासि म्हणे, " विश्वासें ‘ मम, अहं, ’ असा राया ! त्वां प्रत्यय न करावा; यावरि सोडून दे असारा या. ॥६४॥ वृत्तिरहित अभ्यासें हो; ‘ न स्वामी दुजा, न दास मज, आपण एक विशुद्ध ब्रह्म ’ असें निश्चयें सदा समज. " ॥६५॥ ऐसा उपदेश करुनि, हरुनि भवभ्रम, सुबाहु साधु निघे, काशिप, अलर्कहि सुता दे राज्य, स्वपद, भव्य साधुनि घे. ॥६६॥ तो आपणासि पाहे सावध, सर्वा जगा प्रमत्तातें, प्रमुदित अलर्क होय ब्रह्मानुभवें भजोनि दत्तातें. ॥६७॥ ‘ हा ! हा ! केलें राज्य, क्लेशद विषयांत सर्वदा रमलों; श्रमलों व्यर्थ, ‘ परम सुख योगचि ’ हें नुमजलों, बहु भ्रमलों. ॥६८॥ करूणासुधासमुद्रा ! श्रीदत्ता ! ब्रह्मवित्सभानाथा ! माथा पदीं वहातां उद्धरिसि, ’ अलर्क गाय हे गाथा. ॥६९॥ राज्य सुतांतें देवुनि गेला, ठेला तपोनिधी रानीं, पावे गति ते, वरिली जी श्रुतिगीता तपोनि धीरानीं. ॥७०॥ पावे सुबाहुबोधित, संग त्यागूनि, काशिराज गती; झांकी विरक्ति, न तसी ज्याच्या बहुभोगदा शिरा जगती. ॥७१॥ श्रीमद्गुरुपुत्रांहीं आज्ञा केली, निरोप पाठवुनि; श्रीरामसुत मयूरें लिहिलें श्रीहरिहरांघ्रि आठवुनी. ॥७२॥ श्रीहरिहरकीर्ति - तसी न मुखमनांतुनि मदालसा जावी; ‘ साधुसभेंत ’ रसिक हो ! प्रेमें ऐकुनि वदाल, ‘ साजावी. ’ ॥७३॥ मूर्तिमती श्रीशंकरकरुणाचि मदालसा, असी अन्या धन्या कोणालाही झली नाहीं अहासती कन्या. ॥७४॥ हें सच्चरित्र भावें गावें नि:शेषही अघ सराया, उच्चपदीं वेधाय, तेथुनि कल्पक्ष्यीं न घसराया. ॥७५॥


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.