मनतरंग/कुमारिका...समृद्धीचा आदिबिंदू
"माँ, मला ना कुमारिका म्हणून गुप्ता काकूकडे बोलावलं होतं. आम्ही नऊजणी नि अमन, त्याला कौंगडा म्हणायच्या काकू. काकूनी आमची पूजा केली नि चक्क नमस्कार केला आम्हांला. माँ, मोठी माणसे लहानांच्या पाया नाही ना गं पडत ? दुधात शिजवलेला गोड भात खाल्ला. माँ, दोन वर्षाच्या निकिताने प्रसादाचा भात खाल्लाच नाही. माँ, कुमारिका म्हणजे काय गं ?' चार वर्षांची अवनी, काही नवे आणि आगळे पहिल्यागत मला उत्साहाने सांगत होती.
तिचे गोंडस रूप, अतीव निरागस... अनघ दिसत होते. कपाळावर ओल्या कुंकवाचा टिका. त्यावर तांदळाचे दाणे... अक्षता चिकटलेल्या. हळदीचे बोट भिवयांच्या मध्यात टेकलेले. ओठ विड्याने लालचुटूक झालेले. मनगटावर चंदनाचा लेप. त्यावर हळदीकुंकवाच्या रेषा. पावलांवर लाल-पिवळे स्वस्तिक. चिंग्यावेण्यांवर गजरा माळलेला.आणि चंदनाने रेखलेली पावले. अंगात सुरेखसा हिरवा धारवाडी परकर. आणि त्यावर गुप्ताकाकुंनी दिलेली लालचुटुक रंगाची, चंदेरी झिळमिळ् किनार लावलेली चुन्नी.
तिच्याकडे पाहतापाहता, माझे मन थेट पन्नास वर्षे मागे गेले. आपटे कांकूकडे बोडण असले की कुमारिका म्हणून माझी हजेरी असे. आणि आईचा मान सवाष्णीचा. खूप मज्जा यायची. आपण कोणीतरी आगळ्यावेगळ्या आहोत असे वाटे.पाहता पाहता मला 'कुमारिका' म्हणून बोलावणे येईनासे झाले. आईचा सवाष्णीचा मान मात्र कायम. मग मला खूप राग येई. वाईट वाटे माझ्या प्रश्नाचे उत्तर आईजवळ नव्हते. शेवटी तिनेच सवाष्ण म्हणून जेवायला जाणे सोडून दिले.
माझ्यासमोर तेव्हा पडलेले प्रश्न माझ्या नातीलाही छेडणार का ? आज तर ती खूप खुशीत आहे; पण उद्या...परवा ?
नवरात्रात तर कुमारिकेला विशेष महत्त्व. हस्त नक्षत्राचा हा काळ. खरिपाची पिके हाती येत असतात तर, रबीच्या पिकांची पेरणी सुरू असते. आश्विन महिन्याला उत्तरेत 'क्वारका महिना'... कौमार्याचा मास, असे म्हणतात. धनधान्य समृद्धीचा हा महिना. पावसात न्हालेली भूमी हिरवाईच्या... तरुणाईच्या उंबरठ्यावर उभी असते.
मंत्राक्षरमयीं लक्ष्मी मातृणाम् रूपधारिणीम् ।
नवदुर्गात्मिका साक्षात् कन्यामावाह्याम्यहम् ॥
पण आज ? ज्या कुमारिकेला समाजात, धर्मकार्यात महत्त्वाचे स्थान होते, जी कुमारिका तेजाचे प्रतीक मानले जाई त्या 'कुमारिके' बद्दल आम्ही भारतीय...२१ व्या शतकाच्या उंबरठ्यावर उभे असलेले भारतीय काय विचार करतो ? कोणती कृती करतो?
कौमार्याची कल्पनाच किती मधुर ! कौमार्य विकासोन्मुख असते. स्त्री जातीची सुकुमारता, सर्जनक्षमता आणि प्रसंगी दाहक अशी तेजस्विता त्यातून व्यक्त होते. व्यासमहर्षीनी द्रोपदीला दिलेली तीन विशेषणे... भाविनी, मनस्विनी आणि अग्नीकन्या ही किती व्यक्तिसंपन्नत्व देणारी, पण आज ?...
प्रथमावस्थेत कृषिजीवनात स्त्रीच्या विविध रूपांना सन्मान होता. कुटुंबात त्या अधिकारिणी होत्या. ब्रह्मवादिनी होण्याची त्यांना संधी होती. कृषिनिर्भर व्यवसायात त्यांचा उत्पादक म्हणून सहभाग होता. शेतीची, विणकामाची कला त्यांनी शोधली व विकसित केली. पण, मानवी विकासाच्या एका टप्प्यावर त्यांचे समाजातील व कुटुंबातील स्थान दुय्यम होत गेले. 'मनस्वी' असलेले स्थान 'देहस्वी' होत गेले. भर सभेत वस्त्र फेडण्याचा वस्तुपाठ, गुरुजनांच्या आणि ज्येष्ठांच्या साक्षीने गिरवला गेला. मग 'अवगुंठन' पांघरून स्वत:ला 'अदृश्य' करून घेण्यापलीकडे तिच्या हाती काय उरले होते ?
बाईने अध्ययन करू नये, प्रश्न विचारू नयेत, वाट्याला येईल ते जिणे न कुरकुरता, परमेश्वराची इच्छा म्हणून जगावे, असे संकेत निर्माण झाले. आणि वर्षानुवर्षे हे संकेत आमच्या मनात एवढे घट्ट रुतले आहेत, इतके खोलवर रूजले आहेत की जणू 'एडस्' चे विषाणू. त्यातूनच रिंकू पाटील, अमृता देशपांडे, रूपाली पाटीलसारख्या घटना अवतीभवती घडत असतात.
उद्याचे नवनवोन्मेषी भविष्य जिच्या उदरात फलित होणार आहे, वाढणार आहे, ती कुमारिका समाजाच्या दृष्टीने कोण आहे आज? मालकी हक्क मिळविण्याची एक वस्तू ? एक शरीर ? तिचा मालकी हक्क एका पुरुषाकडे. तिने आपल्या स्वतंत्र मनस्वी रूपाची झलक जरी दाखवली तरी तिला संपवण्याची भाषा बोलली जाते, कृती केली जाते. आज तर ती 'परंपरा' होऊ लागली आहे. साथ मिळते ती 'डर' सारख्या चित्रपटांची. जाहिरातींची माध्यमे शेवटी ही आमच्या मनाचा आरसाच.
आजही नवरात्रात कुमारिकांची पूजा केली जाते. केवळ साग्रसंगीत पूजा करण्यापेक्षा, त्यांच्यातील तेजस्विता, ऋजुता, प्रगल्भता वाढविण्याच्या दृष्टीने काही परंपरा निर्माण करण्याची खरी गरज आहे. कारण त्या उद्याच्या समृद्धीचा आदिबिंदू आहेत. त्या समृद्ध आणि निर्भय जीवन जगतील तरच पुढची पिढी उन्मेषाने पुढे झेपावेल. झाड निरोगी, सुदृढ, बहरलेले तर फळेही तेजस्वी आणि मधुर मिळणार. बाबा आमटे म्हणाले होते,
...आपल्या बाळाच्या हातात आईच जेव्हा स्टेनगन देते तेव्हा टेरेरिस्ट निर्माण होणार नाही तर कोण ?
■ ■ ■