मनतरंग/तुजसाठी मरण ते जनन
सौरव...मनोज...अजय...नचिकेत असे अनेक. कुणाचे वय पंचवीस तर कुणी सत्तावीस, कुणी नुकतीच पस्तिशी ओलांडलेला. कावऱ्या बावऱ्या नजरेने त्या लाकडी पेटीकडे, फुलांच्या चक्राने सजलेल्या लाकडी पेटीकडे पाहणारी पाच सात वर्षांची चिमुकली मुले. त्यांना घट्ट पकडून उभ्या असलेल्या कोऱ्या कपाळाच्या तरुण सौभाग्यवती. रडता रडता मुलाच्या मृत्यूने उद्ध्वस्त झालेले मन मोकळं करणाऱ्या आया...
हे सारे दूरदर्शवरून पाहताना डोळे भरून येतात, रक्ताच्या ज्वाला होऊन उसळू लागतात. १७ हजार फूट उंचीवर बर्फाच्या माऱ्यात, भूक...भावना लाथाडून कारगिल खोऱ्यात घुसलेल्या घुसखोरांना हुसकावून भारताच्या हद्दीबाहेर घालवण्यासाठी सर्वस्व समर्पून लढणाऱ्या तरुण भारतीय रणवीरांच्या पाठीवरून मायेचा हात फिरविण्यासाठी, मन धावू लागतं. भारतातील, स्त्रिया 'विदुला' आहेत. विदुला... रणांगणातून पळून आलेल्या मुलाला...संजयला मृत्यूला कवटाळण्यासाठी धाडस देऊन परत पाठवणारी आई. पण काळाबरोबर आम्हीही बदललो आहोत. जोहार करणाऱ्या स्त्रियांपेक्षा प्रत्यक्ष रणभूमीवर जाण्यासाठी सिद्ध असलेल्या तरुणी आज तयार आहेत. पूर्व वैदिक काळात विश्पला ही अत्यंत कुशल अशी सैन्याधिकारी होऊन गेली. झाशीची राणी, रझिया सुलताना, अहिल्यादेवी या तर अगदी अलीकडच्या वीरांगना. महात्मा गांधींच्या अहिंसामय लढाईत एक लाख स्त्रिया गजाआड गेल्या. आजही पतीच्या समर्पणानंतर अत्यंत धैर्याने, गर्वाने, आईवडील या दोहोंचे प्रेम, मुलांना देणाऱ्या वीरपत्नी काय कमी आहेत ? पण तरीही...
पण तरीही. शौर्याने सकटांना समोरे जाणाऱ्यांची, मग त्या स्त्रिया असोत वा पुरुष...परंपराच कुठेतरी खंडित झाली आहे. 'हे हवे ते हवे, दिसेल ते माझ्या कवेत हवे' ही भोगवादी वृत्ती क्षणोक्षणी वाढते आहे. समोर वर्तमानपत्र आहे. त्यात कर्जाच्या काटेरी जाळ्यात आकंठ अडकलेल्या एका सुखवस्तू (?) घरातील तरुण माणसाने आपल्या दोन चिमुकल्यांचे गळे कापून आणि पत्नीला आढ्याला टांगून खून केल्यानंतर, स्वत:लाही पंख्याला टांगून घेतल्याची बातमी पहिल्या पानावर, ठळक अक्षरात आली आहे. स्वत:च्या 'कर्तुकी' ची शिक्षा स्वत:च्या तरुण पत्नीला ? दोन निष्पाप मुलांना ? इथेही हे माझे. माझ्या असण्याशी त्यांचे असणे बांधलेले. मी नष्ट होण्यापूर्वी त्यांच्या असण्याचे दोर कापून मग स्वत: संपायचे ही वृत्ती दिसते.
अशा वेळी आठवतात चायनात ठिकठिकाणी वेळोवेळी भेटलेली तरुण मुलं आणि मुली. चेहऱ्यावर मंद आणि काहीसं गोठलेलं हसू. डोळ्यात खूप उत्सुकता. पण ती पापण्यात बंदिस्त झालेली. १९९५ च्या बीजिंग महिला परिषदेतील सुमारे ३६ हजार महिलांना मदत करण्यासाठी ही मुले तत्परतेने पुढे येत. परिसरातल्या रस्त्यांची सफाई असो, केराच्या प्रचंड टोपल्या उचलण्याचे काम असो, सर्व सार्वजनिक कामे ही मुले करीत.
एका रंगाच्या पोषाखातल्या या चटपटीत पोरी-पोरांबद्दल मनात खूप उत्सुकता होती. तिचे निरसन होणार कसे ? अडचण भाषेची. चायनात हजारात एकाला तरी इंग्रजी कळत असेल की नाही तेच जाणोत ! इकडून तिकडून कळले की, चीनमध्ये १६ ते १८ वयोगटातील मुलामुलींना सक्तीची राष्ट्रसेवा करावी लागते. या काळात सैनिकी शिक्षण दिले जाते. ते देण्यापूर्वी त्यांना रस्ते व सार्वजनिक ठिकाणांची सफाई करणे, झाडे लावणे, रात्री गस्त घालणे यांसारखी कामे करावीच लागतात. शिस्त अत्यंत कडक, आम्ही आमच्या डब्यातल्या चकल्या, अनारसे खाण्याचा किती आग्रह केला. पण थंडपणे हसून नकारच मिळाला. दुपारी आणि रात्री विशिष्ट वेळी त्यांच्या जेवणाचे सरकारी डबे घेऊन गाडी येई. त्यातील जेवणच ते खात. दुकानातली कोणतीही वस्तू विकत घेण्याची मुभा त्यांना नव्हती. भोगवादी जाळ्यात अडकलेले व्यसनाधीन तरुण, पत्नी व मुलांचे गळे घोटणारे बाप, रिंकू, अमृताचे तरुण मारेकरी, खेड्यातल्या वा शहरातल्या पानाच्या ठेल्यावर उभी असलेली 'बेकरी'च्या होरपळीत तडफडणारी तरुण मुले...असे अनेक, पाहिले की वाटते, आमच्या भारतातही १६ ते १८ वयोगटातील मुलामुलींना सक्तीची राष्ट्रसेवा...सैनिकी शिक्षण अंतर्भूत - असायला हवी. केवळ राष्ट्रगीत ऐकून वा दूरदर्शनवरील देशप्रेमाच्या जाहिराती पाहून का कुठे तरुणांच्या अंतर्मनात अग्निबिंदू पेटत असतो ? त्यासाठी तरुणाईत प्रवेश करणाऱ्या, ज्यांच्या मनगटात उभारण्याचे आणि उद्ध्वस्त करण्याचे बळ आहे, मृत्यू ज्यांना फुलासारखा कोमलही वाटू शकतो अशा तरुण तरुणींना 'एन.एस.एस.' राष्ट्रीय सेवा योजना सारखी गोंडस देशसेवा सांगून चालणार नाही. या वयात त्यांच्या मनात एकच लक्ष्य गोंदवायला हवे.
"तुजसाठी मरण ते जनन
तुजवीण जनन ते मरण !!"
■ ■ ■