मनतरंग/प्रकाशाच्या दिशेने
< मनतरंग
पंचवीस वर्षांपूर्वीची गोष्ट. आमच्या चिमुकल्या गावात ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले होते. नव्या नवलाईचा उत्साह गावातल्या सर्वांतच असे. बाहेरून-परप्रांतातून आलेले तज्ज्ञ डॉक्टरर्स, विद्यार्थी या साऱ्यांची गैरसोय होऊ नये. 'कुठे खेडे गावात येऊन पडलोय' असे त्यांना वाटू नये म्हणून अवघे गाव काळजी घेई. इतकी की चायनीज पदार्थ बनवण्यासाठी लागणाऱ्या सोया सॉस, अजिनोमोटो वगैरे काय काय चिजा दुकानदार उत्साहाने घेऊन येत. ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय ही गावाची शान. ती गावकऱ्यांनी राखावी ही भावना. एम- कॉम साठी येणाऱ्या त्रिपुरा मणिपूरच्या मुलांना, वैद्यकीय महाविद्यालयातील थेट अंदमान निकोबार, नागालँड वगैरे भागातून आलेल्या एकट्यादुकट्याला, नवरात्राच्या निमित्ताने मीही घरी बोलावीत असे. मुळात मी रविबाबूंच्या कवितांवर... लोकसाहित्यावर आणि बंगाली भाषेवर अगदी उमलल्या वयापासून अक्षरश: भाळलेली. या मुलांना आईच्या... दिदीच्या हाताने खाऊ घालताना खूप छान वाटे. त्यात एक नागा मुलगा होता. डॉक्टर होऊ घातलेला;धर्म, जात, राष्ट्रीयता, भाषा यावर चर्चा होई. एकदा आमचा नागाबंधू अत्यंत नम्रतेने सांगता झाला.
'मी प्रथम ख्रिश्चन आहे आणि मग इंडियन.. भारतीय आहे.'
त्याचे बोलणे आम्हाला धक्का देणारे, न पटणारे होते. आमच्या मनातली अस्वस्थता त्याने ओळखली आणि तो सांगू लागला,
"मॅडम, माझे पणजोबा माणसं खाणारे होते. देवासमोर माणूस बळी द्यायचा नि तो भाजून मिटक्या मारीत खायचा, ही हजारो वर्षांपासूनची आमची परंपरा, आम्ही शरीराने माणूस. काळाच्या प्रवाहात माकडाचे असलेले शरीर माणसासारखे झाले एवढेच. पण आमचे मन ? आमचा व्यवहार ? आम्हांला जगण्याची दिशा दाखवताना शेकडो मिशनरींनी, धर्मगुरूंनी प्राण गमावले. 'करुणा आणि प्रेम' या दोन रेशमी हत्यारांच्या साहाय्याने आमच्यासारख्या लाखोंना माणसात आणले. कपडे घालायला, अन्न शिजवायला, झोपडी बांधायला, शेती करायला शिकवले. भाषेचा वापर शिकवला. आम्ही घनदाट जंगलात राहणारी, रानटी प्राण्यांशी आणि कोपलेल्या निसर्गाशी संघर्ष करीत जगणारी माणसं, ज्यांनी आमचे जगणे माणसांचे केले, त्यांनी शिकवलेला धर्म आमच्या मागच्या पिढ्यांनी सहजपणे स्वीकारला. किंबहुना तोच एकमेव धर्म आमच्या मनात रुजला. आमच्यासारखी एकदोन मुलं भारतातल्या शहरांत शिकण्यासाठी येतात. त्यामुळे देशातल्या मिशनऱ्यांबद्दलचे ऋण अधिक बळकट होत जाते.'
तो नागा मुलगा डॉक्टर झाला आणि नोकरीच्या मागे न लागता परत आपल्या परिसरातील लोकांच्या आरोग्याची काळजी घ्यायला गेला, त्याची पुढची पिढी तरी, 'मी भारतीय आहे आणि मग ख्रिश्चन आहे' असे सांगणारी असेल का ?
आठ मार्चच्या निमित्ताने गोव्याला मला निमंत्रण होते. गोव्याचे समुद्री सौंदर्य पाहण्याचीही इच्छा होती. व्याख्यानांच्या निमित्ताने अत्यंत देखणी देवळे पाहता आली.
घरासमोरच्या देवळीत सायंकाळी दिवा तेवताना पाहिला. खूप प्रसन्न वाटले. जवळ गेले तर त्या देवळीत चिमुकला क्रूस आणि समोर तेवणारी मेणबत्ती. माणसं कुठलीही असोत, कोणत्याही धर्माची असोत, तमसो मा ज्योतिर्गमय... अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा ध्यास-हीच त्यांची दिशा. शांतादुर्गेच्या देवळात गेलो तर एक नाचता झुलता स्त्रीपुरुषांचा जत्था देवीसाठी फुलांनी विणलेली छत्री वाहण्यासाठी येत होता. चौकशी केल्यावर कळले गावातले ख्रिश्चन दरवर्षी देवीला फुलांची छत्री चढवतात. मी त्यांच्यात मिसळून काही महिलांना विचारले की ख्रिश्चन असूनही ही प्रथा कशी ?
"आमचे पूर्वज याच मातीतून जन्मले. याच मातीत मिसळून गेले. आमच्या पूर्वजांची देवी हीच. काळाच्या ओघात आमचे पूर्वज ख्रिश्चन झाले. त्यांना जाणून घेण्याचा प्रयत्न धर्मधुरीणांनी कधी केलाच नाही ?
"विहिरीत पाव टाकलेले पाणी प्यायले म्हणून पूर्वज ख्रिस्ती झाले. पण असे पाणी प्यायल्याने माणसाचा धर्म बदलत नाही, त्याची संस्कृती... जीवन पद्धती बदलत नाही, असा विश्वास दिला का कोणी त्यांना?"
"आमच्या मनातली या मातीबद्दलची, या देवीबद्दलची श्रद्धा नाहीशी कशी होणार?" मला मिळालेले उत्तर.
...संघर्ष, समन्वय आणि समरसता यातून 'वसुधैव कुटुंबकम' भूमिका घेणारी, विश्वात्मक परमेश्वराला 'जो जे वांछील तो ते लाहो' असे प्रार्थणारी आमची भारतीय संस्कृती...
■ ■ ■