मनतरंग/फुलण्याचा जन्मसिद्ध अधिकार बापच नाकारतो तेव्हा
< मनतरंग
'स्वत:च्या लेकीवर बलात्कार करणाऱ्या नराधम बापाला सात वर्षाची सक्तमजुरी'. दैनिकातील ही बातमी वाचून मन अक्षरश: फाटून गेलं आणि त्याच पानावर अत्यंत ठळक अक्षरात कविकुलगुरू कसुमाग्रजांच्या निधनाचे वृत्त. माझ्या मनासमोर ओळी लकाकल्या, त्यांच्या कवितेच्या-
“साऱ्याच कळ्यांना जन्मसिद्ध
हक्क आहे फुलण्याचा
जन्म असो माळावरती
अथवा शाही उद्यानात
प्रत्येक कळीला हक्क आहे
फूल म्हणून जगण्याचा."
चार वर्षापूर्वी मुंबईच्या वेश्या विभागातून सुमारे साडेतीनशे बालिकांची सुटका पोलीस विभागाने केली. त्यापैकी दोनशेहून अधिक मुली नेपाळमधल्या होत्या. त्या मुलींचे पालक, नेपाळ शासन, त्या परिसरातील स्वयंसेवी संस्था आणि कार्यकर्ते यांच्याशी संपर्क साधून, एकशे ब्याण्णव मुली नेपाळला परत पाठविण्याचा निर्णय शासनाने घेतला. मुली एअर इंडियाच्या विमानाने पाठविल्या जाणार होत्या. वेश्यावस्तीतून... त्या भयानक अत्याचारातून सुटका झालेल्या कळ्या... ज्यांनी सोळावे वर्षही पार केले नव्हते, या विमानातून जाणार होत्या. त्या विमानातन जाणाऱ्या इतर प्रवाशांनी आपली तिकिटे कॅन्सल केली. तात्काळ रद्द करून टाकली. असल्या मुलींबरोबर गेल्याने ही मंडळी अपवित्र होणार होती म्हणे!
सर्वच आशियाई देशांमधून कळ्यांचा व्यापार जोरात चालतो. नेपाळ, थायलंड, भारत यात अग्रेसर आहेत. बेसुमार वाढणारी लोकसंख्या... मग माणसांचाही व्यापार. अर्थात व्यापार म्हटला की मागणी तसा पुरवठा हा अर्थशास्त्रातला सिद्धान्त आलाच. पाश्चात्त्य देशांनी, युरोपीयन देशांनी शेकडो वर्षांपासून आमचा कच्चा माल लुटला, तीच परंपरा आजही !
पटायामधली ती संध्याकाळ, आजही अंगावर सर्रकन काटा उमटवून जाणारी. जागतिक महिला परिषदेतून परतताना थायलंडमध्ये चार दिवस थांबलो होतो. तेथे पोटासाठी सर्वसामान्य स्त्रीला शरीर विकावे लागते असे ऐकले होते. अंगाला मसाज करणारी, अंग रगडून देणारी विद्यापीठे असतात म्हणे तिथे. हे सारेच पाहायचे होते. पटायाच्या समुद्रकिनाऱ्याने मैलोनमैल आम्ही चालत होतो. उजवीकडे विलक्षण देखणा समुद्र. मध्यात रस्ता आणि डावीकडे अर्धुक्या उजेडाची 'मोटेल', 'इन' नावाची दुकाने. त्यात सजूनधजून बसलेल्या मुली. सौदा पटला, गिऱ्हाईक मिळाले की समोरचा समुद्र किनारा गाठायचा. जेमतेम चौदा पंधराची, जिच्या डोळ्यातले बालपण अजून चिवचिवते आहे अशी मुलगी आणि सत्तरी पार केलेला हौशी म्हातारा. अशा कितीतरी जोड्या...
गेल्या दहा पंधरा वर्षांपासून पाश्चात्त्य देशांतले म्हातारे पुरुष पर्यटन करायला थायलंड, नेपाळ, भारत येथे मोठ्या प्रमाणावर येतात. थायलंडमध्ये तर जास्तच. त्यांना तेरा-चौदा वर्षांच्या मुली आणि मुले हवी असतात... कळ्यांचा व्यापार थांबविण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न केले पाहिजेत. वाढत्या विमेन ट्रॅफिक... स्त्रियांच्या व्यापाराला, थांबवता कसे येईल यासाठी शासन, स्वयंसेवी संस्था व कार्यकर्ते यांच्या कार्यशाळेत एक नेपाळी कार्यकर्ती तळमळीने बोलत होती.
जोवर समाजाचे मन माणसाचे होत नाही, त्यावरील धार्मिक, सामाजिक, अंधश्रद्धांची पुटे गळून पडत नाहीत, नवनवीन व्यसनांच्या चिखलातून ते बाहेर येत नाही, दोन वेळच्या भाकरीच्या चिंतेतून त्याची सुटका होत नाही, तोवर समाजातील कळ्यांना फुलण्याचा जन्मसिद्ध अधिकार मिळणार कसा?
■ ■ ■