मनतरंग/रानफुलं नि मोकळं आभाळ

 "मे आय कम इन् मॅडम" चार - पाच मुलींचा ताजातवाना एकमुखी आवाज. "या" असं म्हणत मी नजर उचलून पाहिले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यशाळेसाठी गेलेल्या पंचकन्या समोर उभ्या होत्या. काही नवे पहिल्याची, नवे शिकल्याची, नवे जाणवल्याची झळाळी डोळ्यांत होती.
 "मॅडम, खूप छान झाले शिबिर. इथल्या इतर महाविद्यालयांतली मुलंही आली होती. खूप चांगली वागली आमच्याशी."
 "होय. येताना एस.टीत त्यांनीच जागा पकडली. खूप मजा आली नाही गं?"
 "गाण्यात...श्रमदानात आणि नाचण्यातही आम्हीच पुढे."
 "आपल्या गावाचं नाव सगळ्या गावकऱ्यांच्या ओठावर असे. हे गाव शहरापासून सहा मैलांवर होतं. आपल्या गावच्या मुलामुलींचे शिस्तशीर वागणं सगळ्यांना आवडलं."
 "शेवटच्या दिवशी आम्ही लोकनृत्य सादर केलं. त्यात मुलंपण होती. पण.."
 "अेऽऽ सगळंच सांगायचं नसतं मॅडमना; आम्हाला पाठवलंत, खूप छान वाटलं."
 मग मीच आग्रह केला. "अगं सांगू द्याना. मलाही आवडेल तुमचे अनुभव ऐकायला."
 "आम्हाला मुलांची मुळीच भीती वाटली नाही. सगळीच मुलं वाईट नसतात."
 अनोख्या अनुभवाने मुली अगदी तरारून गेल्या होत्या. मुलींचे महाविद्यालय, भवतालच्या खेड्यांमधून रोज एस.टीने ये-जा करणाऱ्या मुलींची संख्या भरपूर असूनही खेड्यातील लेकींना दडपूनच वावरावे लागते.

"नको साळा नको पाटी
काय कराचं लिहिनं
बाया बापड्यांचं माये
चुली म्होरं शानपन
गाय दावनीला बरी
हवा मंडप येलीले
मागं...म्होरं नगं पाहू
ठेव नदर भुईले..."

 हा धडा आजही गिरवावा लागतो. आणि तो गिरवला तरच शाळेत वा महाविद्यालयात जाण्याची परवानगी मिळते. मुलींनी शिकायला हवे हे ग्रामीण भागातील पालकांना पटले आहे. परंतु मुलींच्या सुरक्षिततेची हमी त्यांना वाटत नाही. रिंकू पाटील सारखी अनेक प्रकरणे ऐकण्यात, वाचण्यात येतात आणि मग जगावरचा विश्वास उडून जातो. घरातल्या लेकींना गावात आहे तेवढे शिक्षण द्यायचे आणि लगीन जमेपर्यंत घरातच कोंडायचे ही सुरक्षित रीत सर्वत्र पाळली जाते. पण महिला महाविद्यालय तालुक्याच्या गावाला निघाल्यावर वातावरण बदलले. घरातल्या लेकीच नाही तर सुनाही शिकू लागल्या. महाविद्यालयात होणारी विविध व्याख्याने, चर्चा, सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडास्पर्धा यांच्याद्वारे त्यांच्यातला आत्मविश्वास वाढू लागला. राष्ट्रीय सेवा योजनेमुळे सामाजिक जाणीव वाढली. समाजाचे प्रश्न कळू लागले. वाचनाचा, कामाचा उत्साह वाढला. जवळच्याच शहरापासून ५/१० किलोमीटर अंतरावरच्या खेड्यात 'एन.एस.एस.' चे शिबिर होते. एस.टी.बस थेट गावापर्यंत जाणारी. मॅडमची राखण न देता मुलींना शिबिरासाठी पाठवले.
 आणि आज त्या नवा आत्मविश्वास घेऊन माझ्यासमोर उभ्या होत्या. मैत्रीचा अदृश्य बंध जणू आमच्यात निर्माण झाला होता.
 "मॅडम, काही मुली येताना अगदी साध्यासुध्या कपड्यात होत्या. शिबिरात आल्यावर मात्र जिन्स, स्कर्ट नि चेहरे इथून तिथून रंगवलेले असा अवतार. मुलं पाहिली की मुरडत चालणं आणि एकीमेकींना टाळ्या देत हसणं, मग काय? मुलंही त्यांच्यामागे. शेकोटी भोवती गाणी म्हणताना दोघींनी तर हात धरून 'तू हाँ कर या ना कर, तू मेरी किरन' हे गाणं म्हटलं. शी..."
 "अगं तुम्ही समूहनृत्य केलंत ना मुलांचं सहकार्य घेऊन ? घराच्या चौकटीबाहेर गेलं की मनही मोकळं होतं. ते स्वैर होऊ नये, याची काळजी घ्यायची."
 "मॅडम आम्ही आमचा गट सोडलाच नाही. मुलं सुद्धा माणसंच की ! इथल्या कॉलेजची मुलंही आमच्यात सामील झाली. खूप गाणी म्हटली नि शिकवली आम्ही.

"ये वक्त की आवाज है मिलके चलो...
अमन के हम रखवाले एक है. एक है ।..."

 गाणी खूप आवडली सगळ्यांना. मग काय, रोज कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी आमचे समूहगीत होणारच. 'एक गोष्ट मात्र खूप बोचली !

"ले कंधोंपर आधा आकाश
सर को उठाते चले
हम विश्वकी महिला इक्किसवी सदी की ओर चले ।"


 "हे गाणे झाल्यावर मात्र खूप चर्चा झाली. आपण स्त्रिया माणसं आहेत, पुरुषांसमान आहोत हे कुणाला पटतच नाही अगदी सरांना सुद्धा.
 "स्त्रियांना बुद्धी आहे. पण ताकद ? शक्ती नाही आणि धाडसही नाही. जन्मत:च स्त्रिया सशासारख्या भित्र्या असतात. हे सरांचं म्हणणं. मग सरांशी वाद घातला आम्ही. रेखीनं छान अडवलं सरांना. ती म्हणाली, "आम्हाला समाज संधीच देत नाही. कळायला लागल्यापासून इथे जाऊ नको... तिथे जाऊ नको, अशी वाग...तशी वाग... बोलायचं हळू नि चालायचं हळू. मग धाडस येणार कसं ? पण वेळ आली अन संधी मिळाली तर ती कमी पडत नाही. अहिल्यादेवी, झाशीची राणी यांच्यावर वेळ आली तेव्हा दाखवून दिले ना त्यांनी धाडस ?"
 "पण अशी 'अवेळ' आली तरच आम्हाला संधी मिळणार का ?"
 मुली बोलत होत्या. मी मनोमन सुखावत होते. ही खेड्यांतली रानफुलं. मुकेपणाने डुलणारी, ना रंगाची जाणीव ना सुगंधाची. समोर येणारी अक्षर वाचायची, पाठ करायची नि पास व्हायचं. वर्तमानपत्र चाळावे, पुस्तकं वाचावीत, जगात काय चाललंय ते जाणून घ्यावं, आपले नि जगाचं नातं काय हे शोधावं असे कुतूहल शिक्षणाने त्यांच्या मनात पेरलेच. शिक्षणव्यवस्था परीक्षांशी जोडलेली. शिक्षण मनापर्यंत...हृदयापर्यंत पोचवण्याची भूमिका शिक्षकांच्या पायाखालून केव्हाच निसटली आहे. सती ज्या शिळेवर पाय ठेवून अग्निचितेवर चढतात तिला 'भूमिका' म्हणतात. शिक्षण देणे हा व्यवसाय झाला आहे. त्यातून खेड्यात 'गुरुजी' धावत-पळत, धापा टाकीत वर्गात येणार आणि एसटीची वेळ झाली की, अर्धा शब्द सोडून घराकडे धावणार. मग या रानफुलांनी जगाची भव्यता, जगाचे सुंदर...सुंदर रूप कोणत्या डोळ्यांनी न्याहाळायचं?
 ज्या परमेश्वराने वा निर्मिकाने हे जग निर्माण केले त्याच्या मनात स्त्रीपुरूष भेद नव्हता. तसे असते तर त्याने स्त्रियांचे आणि पुरुषांचे जग वेगवेगळे बनवले असते. मग शिक्षणव्यवस्थेत तरी स्त्रियांसाठी वेगळ्या शाळा, महाविद्यालये वा विद्यापीठे हवीत कशाला ? असा सवाल केला जातो.
 गेल्या दोन-तीन हजार वर्षांपासून सामान्य स्त्रीचे जगणे इतके 'दगडी' आणि 'निर्जीव' करून ठेवलेय की, त्यांच्यातले चैतन्य जागे होण्यासाठी, त्यांच्यातली जगण्याची कला उमलून येण्यासाठी, जिथे भयाचा, अहंकाराचा, अडचणींचा म्हणजेच पुरुषी वर्चस्वाचा वाफारा नाही अशा अवकाशाची गरज असते तिथेच ही रानफुले उघड्या डोळ्यांनी आभाळ निरखायला शिकतात, भवतालच्या घटनांकडे, जगाकडे विचक्षण नजरेने पाहायला शिकतात. आर्ट ऑफ लिव्हिंग... जगण्याची कला ज्यांना साध्य झाली आहे त्यांचा 'उद्या' उद्यमशील असतो.

■ ■ ■