मनतरंग/समुद्राच्या काठाने



 सेंटजोन हे कॅनडातील अतिपूर्वेकडील न्यूफाऊंलंड प्रांतातील देखणे शहर. ते ॲटलांटिक सागराच्या किनारी आहे. खरे तर हा प्रांतच चिमुकल्या बेटासारखा. दोन दिवसांपूर्वी इथे आल्यापासून मला वेध लागला होता, ॲटलांटिक महासागरात पाय बुडवून, डोळे मिटून उभे राहण्याचा. वसंत ऋतू नुकताच सुरू झालेला. थोडे लवकरच आलो होतो आम्ही. थंडी अजूनही आळस देत उभी होती. उत्तरेकडचे पाणी गोठलेलेच होते. उन्हाळा वाढू लागला की बर्फ वितळू लागे आणि बर्फाची जमीन उत्तरेकडून वाहत वाहत थेट या किनाऱ्यावर येऊन धडके. ते बर्फाळ सौंदर्य पाहण्याचा योग भाग्यात नसला तरी अटलांटिक समुद्राच्या फिक्कट निळ्या लाटाच्या झुळकी पावलांवर झेलण्यातली मौज मनसोक्त अनुभवली. ती अनुभवतो आहोत एवढ्यात थोड्या दूरवर एक अतिप्रचंड मासा उसळी मारून वेलांटी घेत पाण्यात गडप झाला नि मधुश्री ओररडली 'शार्क... शार्क !! केवढा मोठा शार्क !!!
 मग आम्ही डोळ्यांनी आणि स्मरणशक्तीला ताण देत त्या शार्कचे तैलजाडी असलेले गलेलठ्ठ शरीर आठवू लागलो.
 यापूर्वी समुद्र पाहिला होता तो जुहूचा आणि अगदी आकंठ समुद्र अनुभवला तो उंबरगावचा. उतरत्या घनदाट सुरूच्या झाडांची हिरवाई, लाटांच्या पापण्यात साठवीत ऐसपैस पहुडलेला अरबी समुद्र. किनाऱ्यावरची चंदेरी वाळू पाण्यात मिसळल्याने समुद्राचा रंग रुखाफिका दिसायचा. अर्थात ऐन उन्हाळ्यात; आम्ही आत्याकडे सुट्टीत जायचो तेव्हा.
 एकतीस डिसेंबरची रात्र सरत चालली आहे. एक जानेवारीची पहाट थोड्याच वेळात होईल, अशी अधमुरी वेळ. कन्याकुमारीच्या टोकावर आम्ही उभे. समोर निळाभोर हिंदी महासागर, डावीकडे गुलाबी निळा बंगालचा उपसागर आणि उजवीकडे फिकट निळा अरबी समुद्र. एकाच वेळी बुडणारा चंद्र आणि उगवणारा सूर्य. पहाटेच्या अधुक्या उजेडात अनुभवलेला तो समुद्र कसा विसरता येईल?
 मद्रासजवळील महाबलीपुरमचा खडकाळ किनारा त्या किनाऱ्यावर शिल्पकलेचा अत्युत्कृष्ट नमुना असलेली सात मंदिरे हजारो वर्षांपासून उभी आहेत. त्यातील सहा पाण्याखाली गेली असून शेवटचे लाटा झेलीत उभे आहे. तेही एखाद्या शतकात पाण्याखाली जाईल. त्या मंदिराच्या पायऱ्यावर लाटांचे तुषार झेलीत काढलेली अमावस्येची रात्र, माझ्या मनात बंगालच्या उपसागराच्या आठवणींनी भिजवून ठेवली आहे आणि न्यू फाऊंडलंड किनाऱ्यावरील अटलांटिक सागरात पाय बुडवत असताना मनाला बजावले की, हा मी अनुभवलेला चौथा समुद्र...
 पाचवा समुद्र पाहिला नि अनुभवला तो पॅसिफिक महासागर. उसळ्या मारणारा आणि घनगर्द निळ्या रंगाचा. पॅसिफिक सॅनफ्रैंसिस्कोचा, लॉस एंजिल्सचा आणि व्हँकुवरचा. तीनही एकच आणि तरीही वेगवेगळे.
 पण पॅसिफिकची आठवण लक्षात राहिली व्हँकुवरची. काही माणसं पहिल्यांदा भेटली तरी वाटतं की रोज न रोज ती भेटतात. वर्षानुवर्षांचा संवाद आहे. जणू अंतस्थ भावरेषा जुळालेल्याच असतात. तसेच आम्हां दोघांचे आणि अशोक गर्टुडचे झाले. आल्याक्षणी पॅसिफिकच्या किनाऱ्यावर वेळ काढून जायचे ठरले होतेच.
 तिथली दुपारी रेशमी. ओढणी अंगावर पांघरावी तशी असते गर्टूड नोकरीवर गेलेली. साशा आणि शानू दोघीजणी शाळेत गेलेल्या. आम्ही तिघे समुद्रावर निघालो. भारतात वाढलेले भारतीय कॅनडात जाऊन 'इंडो कॅनडियन' झाले आणि एक तपाच्यावर वर्षे त्याभूमीत घालवली तरी त्यांच्या मनात पुरलेला 'भारत' एखादा भारतीय भेटला की वर उसळून येतो. तसेच झाले. गप्पांच्या ओघात, गाडी नेमक्या जागी लावून ठेवताना अशोक शेजारील यंत्रात वेळ नोंदवून नाणे टाकायला विसरला. जेमतेम शंभर पावलेच पुढे गेलो असू. अशोकच्या चूक लक्षात आली आणि तो अक्षरश: गाडीकडे धावला. पण गाडीच्या बॉनेटवर पंधरा डॉलर्स दंडाची पावती ठेवली होती आणि दुसऱ्या दिवशी दंडाची रक्कम न भरल्यास दर दिवशी दहा डॉलर्स उशीराचा दंड भरावा लागेल असा सज्जड दम त्यावर लिहिला होता. पोलिसमामा अक्षरशः अदृश्य मानवासारखे वावरतात इथे. आपल्याला ते दिसत नाहीत पण आपण नि आपल्या चुका मात्र त्यांना ठसठशीत दिसत असतात.
 जिवाला डसून जाणारा समुद्र बँकाँकचा... पटायाचा. रात्रीच्या झगमगाटात कण्हणारा. पटायाच्या किनाऱ्याने आम्ही पायी हिंडत होतो. सत्तरी पुढचे तरुण आणि परिस्थितीच्या भोवऱ्यात गरगरणाऱ्या तेरा-चौदाच्या त्यांच्या जोडीदारिणी. एकमेकात मिसळून चालणारे ते. भडकपणे रंगलेल्या डोळ्यातून आक्रंदणारा वैराण समुद्र. अर्धुक्या उजेडात देहाचा बाजार मांडून लेकरांच्या पोटात दोन घास घालण्यासाठी ठुमकणाऱ्या उदास आया. रात्रभर तो झगझगणारा किनारा सतावीत होता. शेवटी,
 कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति ।
 असे ठामपणे सांगणारी भारतीय संस्कृती दक्षिण अशियाभर पसरली आहे. तरीही पटायाचा किनारा असो, किंवा गोवा-केरळचा चंदेरी किनारा असो, त्यात थरथरणारी प्रतिबिंबे असतात. उदास देहस्विनींची. अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर यांच्या संगमावर ती तेजस्विनी... मनस्विनी 'कन्या'... कन्याकुमारी जग जन्मल्यापासून उभी आहे. वाट पाहते आहे, त्या अंबराची... आकाशाची.जे तिच्या अंतरीच्या शिवत्वावर भाळून तिला आपल्यात सामावून घेईल. तो किनारा अजूनही तिला सापडलेला नाही.

■ ■ ■