मनतरंग/हिंदू...धर्म की जीवनप्रणाली ?
< मनतरंग
कांबळे नावाचे त्यांचे मित्र होते. त्यांच्या सहकार्याने त्यांनी सहभोजन आयोजित केले. त्याचा परिणाम असा, ब्राह्मणांनी आमच्या घरावर बहिष्कार टाकला. माझ्या आजीचे श्राद्ध घालण्यास भटजींनी नकार दिला. 'तुमचा मुलगा महारा-मांगाच्या मांडीला मांडी लावून बसतो आणि जेवतो. अधर्म माजवतो, अशा घरात श्राद्ध घालण्यासाठी येण्याचा अधर्म आम्ही करणार नाही', असे उत्तर माझ्या आजोबांनी ऐकले आणि त्यांनी उसळून उत्तर दिले ते असे, 'तुमच्या धर्मात परदेशगमन, परस्त्रीगमन, विलायती मद्यप्राशन या गोष्टीही निषिद्ध आहेत. जो ब्राह्मण माणूस शिक्षणासाठी परदेशी गेला, येताना प्रथम पत्नी असतानाही मडमिणीला घेऊन आला, जो पाण्यासारखी विदेशी दारू पितो, अशा माणसाच्या घरी तुम्ही भटजी, दक्षिणा जास्त मिळते म्हणून जाता आणि धार्मिक कार्य करण्याचा अधर्म करता. माझा मुलगा माणसांबरोबर जेवला हा काय अधर्म आहे? जन्माला येणारा माणूस...माणूस म्हणून जन्माला येतो. कपाळावर जात लिहून जन्माला येत नाही; यापुढे माझ्या घरातील सर्व धार्मिक कार्ये, श्राद्ध बंद !' तेव्हापासून आमच्या घरातील श्राद्ध बंद झाले आणि स्व. काकासाहेब बर्वे यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या हरिजन छात्रालयाला २५ रुपये देणगी दिली जाऊ लागली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलित समाजाची अस्मिता जागी केली. हजारो वर्षे अंधारयात्री असलेल्या दलित समाजाला प्रकाशाच्या दिशेने जाण्यासाठी सबल, सजग केले. 'शिका आणि संघटित व्हा' हा मंत्र त्यांच्या मनात पेरला आणि अवघ्या १५/२० वर्षांत दलित समाजातील सर्वांगीण जागृतीचे उत्साहवर्धक दर्शन समाजातल्या प्रत्येक क्षेत्रांत उमटू लागले; हे जरी खरे असले तरी अ-दलित किंवा जे उच्चवर्णीयांत जन्मले, अशांच्या मनातील स्पृश्यास्पृश्यतेची तेढ कमी करण्याचे श्रेय महात्माजींनाच द्यावे लागते. हरिजन या शब्दाबद्दलचा राग आज जन्माने ब्राह्मण असलेला माणूस समजू शकतो परंतु हे समजून घेण्यापर्यंतची वाटचाल महात्माजींनी सुरू केलेल्या 'अस्पृश्यता हा मानवतेला लागलेला कलंक आहे.' या वाक्यापासूनच सुरू होते. महात्माजींच्या विचारांच्या प्रभावाखाली असलेल्या घरातून किंवा गटातून 'जात' स्वयंपाकघरातून नष्ट झाली होती. राष्ट्र सेवा दलाचे युवक-युवती 'घ्यारे हरिजन घरात घ्यारे-जगी जे हीन अति पतित, जगी जे दीन पददलित तया जाऊनि उठवावे | जगाला प्रेम अर्पावे।। यासारखी साने गुरुजींची गीते म्हणत. ही गीते म्हणणाऱ्या अनेक तरुण-तरुणींच्या मनातून जातीयतेचे घट्टपणे चिटकलेले पापुद्रे आपोआप गळून पडले.
मला आठवते आमच्या घरात प्रत्येक सणावाराला हरिजन छात्रालयाच्या मुलींना आई जेवायला बोलवीत असे आणि त्यांना भाज्या-कोशिंबिरी कशा करायच्या हे आवर्जून शिकवीत असे. आमच्या घरी अर्थातच सर्व जातिधर्माच्या भरपूर मैत्रिणी गोळा होत. त्यांना पाण्याच्या माठापर्यंत जायची मुभा असे. त्यांच्यासाठी ती नवलाईची गोष्ट होती कारण अनेक घरी खालच्या जातीतील मुलींना स्वयंपाकघरात व पाण्यापर्यंत येऊ दिले जात नसे. या खालच्या जातीच्या प्रकरणात ब्राह्मणेतर सर्व जाती येत. माझ्या अनेक मैत्रिणींच्या घरांतून त्यांच्यासाठी कपबशाही वेगळ्या असत. मी आंतरजातीय विवाह केला आणि अंबाजोगाईसारख्या काहीशा कर्मठ गावात आले.
एकदा एका घरी आम्हांला जेवायला बोलावले. मी आणि कै. सिंधूताई परांजपेंना. आमचे पाट मुख्य ओळीच्या नव्वंद अंशाच्या कोनात आडवे मांडलेले होते. मला त्याचा अर्थ काहीच कळला नाही. जेवण आटोपून घरी जाताना सिंधूताई म्हणाल्या, 'शैला, तुला आडव्या पाटाचा अर्थ कळला का ? तू बामणाची लेक मारवाड्याच्या घरात आलीस आणि मी बंजारीण बामणाच्या घरात आले म्हणून आपले पाट आडवे. आपण बाटग्या ब्राह्मण.' हा वस्तुपाठ मला नवाच होता आणि मग आम्ही दोघीही मनसोक्त हसलो.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलित समाजातील सर्वांना नवा मार्ग दाखवला. वास्तविक पाहता बौद्ध धर्म स्वीकारण्यापूर्वी हिंदूंनी त्यांना समजून घ्यावे यासाठी खूप वेळ दिला. माणूस...मग तो काळा, गोरा, पिवळा, सावळा कोणत्याही रंगाचा असो. तो माणूसच असतो. त्याला मन असते. कार्यकारण भाव लावून विचार करण्याची शक्ती असते. ते विचार व्यक्त करणारी वाणी असते. म्हणूनच माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे. एवढीच माणसाची माणसाकडून अपेक्षा असते. ही अपेक्षा हिंदू म्हणवणाऱ्यांचे पौरिहित्य करणाऱ्यांना कधीच उमजली नाही. कारण त्यांच्यातले 'माणूसपण' अहंकाराच्या लेपामुळे लोपून गेले होते. डॉ. बाबासाहेबांना आर्य समाजानेही समजून घेण्याचा मनस्वी प्रयत्न केला नाही. तसे झाले असते तरी परिवर्तनाचे चक्र वेगाने फिरले असते.
हजारो वर्षांपासून हिंदू मनात खोलवर गोंदले गेलेले चुकीचे विचार परमेश्वराच्याच माध्यमाचा वापर करून घालविण्याचा प्रयोग महात्माजींनी केला असावा. चातुर्वण्याच्या बिनजिन्याच्या चौमजली इमारतीला आता बऱ्यापैकी झादरे बसू लागले आहेत. ते किल्लारीच्या भूकंपाइतके जोरदार, किमान ७.३ रिष्टरचे असायला हवेत, तरच 'हिंदू' हा धर्म नसून ती जीवनप्रणाली...' Way of Living आहे या म्हणण्याला अर्थ प्राप्त होईल.
■ ■ ■