महाबळेश्वर/पाहण्यासारखीं प्रसिद्ध ठिकाणें.



पाहण्यासारखीं प्रसिद्ध ठिकाणें.
----------------------------------------

 महाबळेश्वरापासून दहापांच मैलांत पाहण्यासारखीं जीं ठिकाणें आहेत तीं पाहण्याचीं तखलीफ घेतली असतां धर्मश्रद्धा, सृष्टिसौंदर्यावलोकनाकांक्षा, व ऐतिहासिकस्थानदर्शनेच्छा तृप्त झाल्यावांचून रहाणार नाहीं. पृथ्वीवरील अशा भव्य वस्तु पाहून मनुष्याच्या चित्तास इतका आनंद व इतकें समाधान कां होते, अशी एका कवीस शंका येऊन त्यानें पुष्कळ विचार केल्यावर त्या शंकेचें असें समाधान केलें कीं, भव्य वस्तूंच्या निरीक्षणापासून विश्वास उत्पन्न करणारी मनुष्याच्या चित्तांत असलेली अगम्य शक्ति तिचा प्रेक्षकांच्या मनास क्षणभर बोध झाल्यासारखा होऊन तें एक प्रकारच्या अनिर्वचनीय आनंदसुखांत गढून जातें. तेव्हां ज्यास अनुकूल असेल, व ज्याला अशा वस्तूंच्या प्रेक्षणापासून होणाऱ्या आनंदाचा अनुभव घेण्याची योग्यता आली असेल  त्यानें केव्हांतरी त्या पाहण्यास चुकू नये, असें आमचें सांगणें आहे. महाबळेश्वराच्या आसपास असलेल्या या प्रेक्षणीय स्थळांचीं नांवें अशीं आहेत:- प्रतापगड, मकरंदगड किंवा सॅॅडलब्याक्, पारूत, चंद्रगड, कमलगड, चोराची घळ, राजपुरी, पांडवगड, दुतोंडी घळ, गायदरा किंवा गुलेरा घळ."

प्रतापगड.

 प्रतापगड हें गांव महाबळेश्वराप्रमाणेंच घाटमा-

थ्यावर आहे. हें महाबळेश्वरच्या पश्चिमेस सुमारें १० मैलांवर आहे. प्रतापगड किल्ला समुद्राचे पृष्ठभागापासून ३५४३ फूट उंच आहे. जावली प्रांत व निरा आणि कोयना यांचे कांठचा प्रदेश हस्तगत केल्यावर, तेथें जाणे येणें सुलभ व्हावें ह्मणून आणि पारघाटाचें नाकें आपल्या माऱ्यांंत रहावें या हेतूनें या पारघाटानजीकचे टेंकडीवर हा नवीन किल्ला शिवाजीमहाराजांनीं बांधिला. हें काम सातारच्या पिंगळे घराण्यांतील मोरो पंत पिंगळे पेशवे अथवा मुख्यप्रधान यांचे देखरेखी खाली सन १६५६ सालीं पुरें झालें. याला चोहोबाजूंस तट आहेत ते दुहेरी आहेत. त्यांपैकीं बहुतेक ठिकाणीं किल्लयाच्या कडेला स्वाभाविक काताळ खडक अगदीं तटासारखा उभा आहे, व ज्या ठिकाणींं असा खडक नाहीं त्या ठिकाणींं जंग्या राखलेले बुरूज जागजागी असलेला तट काळे दगडांनीं बांधून काढलेला आहे. परंतु हल्ली तटाचें काम बहुतेक ठिकाणी नादुरस्त होत चाललेलें पाहून मनांत येतें कीं ज्या विख्यात छत्रपति शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीपासून बरेच दिवस महान् महान् पराक्रम करून ज्याने स्वदेशसेवा उत्तम प्रकारे बजाविली आणि आपल्या नांवाचा डंका वाजवून सोडला, तो हा प्रचंड परंतु आतां अगदीं दीन दिसणारा किल्ला आपल्या उतारवयामध्यें त्या शिवाजीमहाराजांच्या वेळचे आपले भरभराटीचे दिवस, व आपल्याला बक्षिस ह्मणून दिलेली " प्रतापगड ” नांवाची पदवी व प्राकारादि अलंकारभूषणें मिळण्याचे निरनिराळे प्रसंग, आठवून  व तो वीरश्रेष्ठ, त्याचें युद्धकौशल्य आणि प्रजावात्सल्य स्वप्नवत् झालेलें पाहून जणूं काय शोकावस्थेनें दिवसेंदिवस खचतच चालला आहेसा वाटतो.

 मालकमपेठेच्या बाजूनें त्यावर जाण्यास रस्ता फार राजमान्य आहे. तो मुंबईपाईंंटाचे खालून फिटझरल्डघाटानें अगदीं वाडयापर्यत जाणारा उत्तम गाडीरस्ता आहे. या रस्त्यानें गेलें ह्मणजे एका तासांत वाडागांव येते, तेथें गेल्यावर आराम पाहिजे असल्यास रहदारी बंगल्यांत किंवा दुसरीकडे गांवांत जावें. आणि थोडा विसावा खाऊन मग गडावर चडण्यास कंबर बांधावी. पायाने जाण्याचें अवसान असल्यास एका पाऊण तासांत वर दरवाज्यापाशीं माणूस जाऊन थडकते; परंतु तसें जाण्याला ज्याला नेट नसेल त्याला खुर्चीत बसून जाण्याची सोय होते. फक्त तेथील मावळ्यांच्या पोटाला दोन अडीच रुपये देण्याचा उदारपणा केला ह्मणजे झालें. शिवाजीच्या हाताखालीं ज्या अडाणी लोकांनीं तोंडांत बोटे घालण्यासारखे जिवावरचे धाडसाचे पराक्रम करून मुसलमानांची  खोड मोडली, व इतिहासांत आपलें नांव चिरायु करून सोडिलें, त्या मावळ्यांस पोटाची वीतभर खळी भरण्यासाठीं मडमांस, पारशिणींंस, साहेबांस आणि रावसाहेबांस खुर्च्यांत घालून खांद्यावर वहावें लागत आहे, यावरून दैवाची गति मोठी विचित्र आहे. या प्रामाणिक, कृश, व गरीब लोकांकडे पाहिल्याबरोबर पोटांत असा विचार उभा राहतो. डोंगरांतील वाटेला दुतर्फा झाडांची झालर आहे त्यामुळे भोंवतालचा वारा लागून रस्ता तुडवीत जाणारांस फारसा शीण होत नाहीं. वर गेलेवर तटाबाहेर एका लहानशा टेकडीवर थडग्यासारखी एक इमारत आहे. तींत विजापूरचे बादशाहाचा आफजुलखान सरदार शिवाजीमहाराजांबरोबर लढण्यास आला असतां, त्यास मारून त्याचें डोकें पुरलें आहे असें सर्व लोक सांगतात. पुढें आंत जाऊन गडाचे तटावर उभे राहिलें असतां एकीकडे महाबळेश्वरच्या डोंगराची आणि दुसरीकडे कोंकण घांटमाथ्यापर्यंत पसरलेल्या विस्तृत मावळप्रांताची विलक्षण शोभा दिसते. खुद्द किल्ल्याचें टिकाऊ व मजबूत बांधकाम पाहून जुन्या लोकांनी हीं एवढाली अवाढव्य कृत्येंं यंत्राच्या साह्यावांचून शरीरकष्टाने कशी केली असावी, याचा चमत्कार वाटतो. आणि ज्यांच्या पूर्वजांनींं टोलेजंग किल्ले बांधिले त्यांच्या वंशजांत मर्दुमकी अशी मुळीच राहिली नाही हेंं पाहून पराकाष्ठेचा विस्मय होतो. डावे बाजूचे रस्त्याने आंत गेले म्हणजे पूर्वेच्या सखल बाजूस भवानीचेंं देऊळ दृष्टीस पडतेंं. या देवालयाचे काम काळ्या दगडाचेंं आहे. सभामंडप मात्र लांकडी आहे. तो ५० फूट लांब, ३० फूट रुंद व १२ फूट उंच आहे. सभामंडपाच्या पिंजरीस वरून तांब्याचा पत्रा सातारचे प्रतापसिंह महाराजांनींं मारलेला आहे. गाभाऱ्यांत काळे पाषाणाची भवानीची शाळुंंकामूर्ति स्थापन केलेली आहे. ती सुमारे १।। फूट उंच आहे. तिच्या अंगावरील वस्त्रालंकार अगदींं पाहण्यासारखे असून मौल्यवान आहेत. सूर्योदय झाल्यानंतर आरशानेंं हिचे तोंडावर किरण पाडून तेंं पाहिले असतां मूर्ति स्पष्ट दिसून तोंडावरील चक  व आंगावरील अलंकार पाहून विलक्षण मौज वाटते. हें पाहण्यास येथें आरसा मुद्दाम ठेविला आहे.

 प्रतापगडच्या लढाईनंतर राजकार्यामुळे आपली कुलस्वामिनी जी तुळजापुरची भवानी, इचे दर्शनास जाण्यास शिवाजीमहाराजांस सवड मिळेना म्हणून देवीचें स्थान संनिध, असल्यानें नेहमीं दर्शन होत जाईल, या हेतूनें सन १६६१ मध्यें त्यांनीं ह्या देवालयाची स्थापना केली. शिवाय आफजुलखान हा शिवाजीचा सूड उगवण्यासाठीं संधि पहात होता. हें शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाबाई यांना समजलें होते; ह्मणून महाराज भेटीस जाणार असें कळलें, त्या वेळीं त्यांची मातोश्री जिजाबाई इणें तुळजापुरच्या देवीस नवस केला कीं, माझा शिवाजी यशस्वी झाला म्हणजे मी लोटांगण घालीत तुझ्या दर्शनास येईन. त्याप्रमाणें यश मिळाल्यावर प्रतापगडास देवीची स्थापना करून तिनें तो नवसही फेडला, याशिवाय येथें केदारेश्वर नांवाचें शंकराचें देवालय पुरातनचें आहे.   पुढें आपले ताब्यांत असलेले मुलखापैकीं जवळ पासची १ हरोसी, २ कुमठे, ३ बिरमणी ४ हातलोट, ५ माचूतर, ६ बिरवाडी, ७ करंबे, ८ गौडी, ९. केळघर, १० कुचुंबी, ११ डांगरेघर, १२ कऱ्हार, १३ कावडी व १४ जावली या गांवचे ५००० रुपयांचें उत्पन्न करून दिलें. हें उत्पन्न हल्लींं चौथाई वगेरे जाऊन ४००० रुपयाचें देवीकडे दयाळु इंग्रजसरकारांनीं चालविले आहे. याची व्यवस्था पंचामार्फत चालू आहे. त्यांतून देवीचा नंदादीप, नवरात्र उत्सव, रोजचा अन्नसत्र व नोकरांचा पगार वगैरेंचा खर्च होतो. देवीचे देवळापुढें एक लहानसा तलाव आहे, त्यांत पाणी चांगलें असून विपुल असतें. याशिवाय दुसरा तलाव आहे. पुजारी, पुराणिक, चौघडा वाजविणारे गुरव इत्यादिक गडावर राहून नित्य सेवाचाकरी करीत असतात. व यांच्याच वस्तीचीं सुमारें ८|१० घरं वरच आहेत. याशिवाय येथे वस्ती नाहीं, याचे पश्चिम आणि उत्तर बाजूला अस्मान कडे तुटलेले आहेत, यांची खोली ७००| ८०० फूट आहे. अशा ठिकाणीं उभे राहून  सूर्यास्ताचे वेळीं कोंकणपट्टीकडे नजर फेकिली असतां, समुद्राचा किनारा फार रमणीय दिसतो. प्रतापगडावर शिवाजीमहाराजांच्या वेळेपासून मराठ्यांची बखर आहे. किल्याचें पठार अर्धंमैल लांब आहे. अफजुलखानाबरोबर जो इतिहासप्रसिद्ध प्रसंग झाला त्याचं थोडी हकीकत येणेंप्रमाणें आहे:-

 प्रतापगडची लढाई.  शिवाजी महाराजांचें प्राबल्य फारच वाढत चाललें असें पाहून विजापुरचे बादशहा यांनीं त्याचें शासन करण्याचा निश्चय केला व या कामीं आफजुलखान नामें एका नामांकित सरदाराची योजना केली, आणि त्यास बऱ्याच सैन्यासह शिवाजी महाराजांस जेर करण्यास पाठविलें. यावळीं शिवाजी महाराज प्रतापगडींच होते. पुढें आफजुलखान वांंईसं आला हे वर्तमान महाराजांस कळतांच त्यांनीं त्याजकडे वकील पाठवून गरीबीचें बोलणें लाविलें. त्यांत कांहीं बेआदबीचे शब्द वापरल्यामुळे खानाच्या अंतर्यामी राग येऊन शिवाजीचा घात करण्याचा  आपला हेतू सफल होण्याची संधि तो पहातच होता. अफजुलखान गर्विष्ट असल्यामुळे फार चढून गेला आणि त्यास अंतर्यामीं फार आनंदही झाला कीं, आपण आलों असें ऐकतांच शिवाजी इतका वंगला. त्या गुर्मीतच शिवाजी महाराजांनीं किल्ल्यावर यावें म्हणून बोलावणें केलें, तेंही त्यानें मान्य केलें. प्रतापगडावर शिवाजीचे भेटीस जाण्यास निघते वेळीं त्यानें बरोबर १५०० फौज घेतली होती व एक सय्यद हत्यारबंद शिपाई घेतला होता. काय प्रसंग येईल याचा नेम नाहीं अशी शिवाजी महाराजांच्याही मनांत मोठी धास्ती वाटून त्यांनीं स्वरक्षणासाठीं भेटीच्या ठिकाणाजवळ गुप्तपणें थोडें सैन्य ठेविलें आणि स्वतः स्नान करून नित्य नियम उरकून आपली मातुःश्री जिजाबाई इच्या पायावर मस्तक ठेवून आशीर्वाद घेतला; अंगांत चिलखत चढवून व त्यावर आंगरखा घालून, उजव्या अस्तनींत एक बिचवा गुप्त ठेविला, व डाव्या हातांत वाघनखे घालून स्वारी खानाच्या भेटीस निघाली. खाशाबरोबर फक्त त्याचा बाळमित्र सरदार तानाजी मालुसरे हा होता. ( मालुसरे गांव येथून ४ मैल आहे) भेटीची वेळ येतांच पहिल्यानें आफजुलखानानें एका हातानें शिवाजीस गच्च धरून वार केल्यावर शिवाजीनें खानाच्या पोटांत वाघनखें खुपसलीं आणि त्याचीं आंतडींं बाहेर काढली, त्यासरसा खानाला त्वेष येऊन त्यानें शिवाजीचें डोक्यावर वार केला, तेव्हां शिवाजीनें बिचवा काढून त्याचा प्राण घेतला. खानाच्याबरोबर असलेल्या हत्यारबंद शिपायाला तानाजी मालुसऱ्याने ठार केलें. यांत शिवाजी महाराजांनी दगलबाजपणा केला नाहीं. अशी माहिती जुने पवाडयावरून मिळते तो असाः--

 ॥ अबदुल्यानें कव घातली ॥

 ॥ शिवाजी गवसून धरला सारा ॥

 ॥ चालवी कटारीचा मारा ॥

 ॥ शिल्यावरी न चले जरा ॥

 ॥ राजाने बिचवा लावून दिला ॥

 ॥ वाघपंज्याचा केला मारा ॥

 ॥ त्याचे फोडिलें उदरा ॥  स्काट वारिंगचे इतिहासांतही अशीच हकीकत आहे. असें झाल्यावर त्याचें डोकें कापून किल्यावर पुरून त्यावर कबर बांधिली आणि धड किल्याखालीं पुरलें. त्यावरही अद्यापि कबर आहे. नंतर त्यांच्या सैन्याची कत्तल करून सर्व सामुग्री लुटून आणिली. इ० स ० १६५९ साली महाराजांनीं अशी तरवार बाहदरी केल्यावर त्यांची फार कीर्ति झाली यावेळीं शिवाजीचें वय सुमारे ३२ वर्षांचें होतें. या ऐतिहासिक प्रसंगामुळेच प्रतापगड हें स्थळ इतिहासांत फार प्रसिद्धीस आलें. या प्रसंगापासूनच मोंंगलांवर मराठयांचे वर्चस्वाची सुरुवात झाली. पुढे पेशवाईत सन १७७८ मध्यें याच गडावर नानाफडनविस यांनीं सखारामबापु बोकील यांस कैदेंत ठेविलें होते. असेा. हा किल्ला शिवाजीमहाराजांस यशस्वी झाला व त्यांच्या दौलतीचा मूळखांब बनला. त्यामुळे त्याबद्दलचा मोठा अभिमान सर्व मराठयांस वाटणें साहजिक आहे. परंतु आतां जरी वैभवालंकार जाऊन नुसतें कलेवर राहिलें आहे तथापि प्राणोत्क्रमण झालें असतांही ज्याप्रमाणें  स्नेहाळु जननीस अपत्यकलेवर सोडवत नाहीं त्याप्रमाणें सहदय महाराष्ट्रीयांस याचे जवळ आल्यावर एकवार तरी प्रेमपूर्वक त्याचें दर्शन घेतल्यावांचून रहावत नाहीं, हें अगदीं उचित आहे.

 यावेळीं शिवाजीचा उत्कर्ष कसकसा होत गेला व त्याची स्वधर्मावर असलेली निःसीम श्रद्धा कशी त्यास फळास आली याबद्दलची हकीकत फार रसाळ आणि श्रवणीय असल्यामुळे थोडक्यांत येथें देतों:-

 शिवाजीचा इतिहास   जावली प्रांतांत शिरके मराठे युांस विजापूर बादशहाचे तर्फेने राज्यव्यवस्था पाहण्याकरितां नेमलें होतें. परंतु हे त्यांस बिलकुल जुमानीत नसत. कारण सह्याद्रीचे पहाडामध्यें बादशाहाचे फौजेचा बिलकुल इलाज चालत नसे. आणि ह्मणूनच प्रतापगडच्या लढाईतसुद्धां आफजुलखान वांईस तळ देऊन बसला होता. पुढें कालगतीचे योगानें शिरक्याचा लय होऊन, त्यांचा मुलूख चंद्रराव मोरे यास इनाम मिळाला. त्यांचे राज्य सन १६५५ पर्यंत  अव्याहत चालले होतें. पुढें याजपासून शिवाजी महाराजांनीं घांटमाथा काबीज केला. यावेळींं महाराज हमेशा महाडास राहत असत व सह्याद्रिमार्गाने त्यांचें घाटांवर येणेंजाणें असें. पुढें महाराजांनीं वासोटा किल्ला सर केला, तेणेंकरून संपूर्ण जावली सस्थान त्यांचे स्वाधीन झालें; तेव्हां सन १६५६ मध्यें महाराजांनीं विजापुरवाल्याचा सरदार मोरे याचा वाडा पाडून त्याचीं लांकडे व दगड प्रतापगडचे कामास आणून गडाचें काम केलें, आणि हें जावली प्रांताचें सदर ठिकाण करून टाकिलें. याचे पूर्वी इ० स० १६४७ मध्यें राजगड किल्ला महाराजांनीं तोरण्याजवळ मोरबद या नांवचे टेकडीवर बांधिला. बाणकोट किंवा मंडणगड-रगतगड व रोहिला हेही पूर्वीच बांधिले होते. हे किल्ले कोंकणांत आहेत.

 विजापूरच्या बादशाहानीं शिवाजीस पुष्कळ वेळांं धमकी देऊन पाहिली व लालुचही दाखविली. परंतु सर्व प्रयत्न पाण्यांत गेले असें पाहून आफजुलखानास सैन्यासह महाराजांवर पाठविलें. तो पूर्वी वांईस सुभेदारीचे कामावर असल्यामुळे वाईस येऊन राहिला. हें शिवाजीस कळतांच तो प्रतापगडावर येऊन दाखल झाला आणि सन १६५९ सालीं पूर्वी सांगितल्याप्रमाणें प्रतापगडच्या लढाईत त्याचा त्यानें पराजय केला. नंतर त्यावर्षी ( १६५९ त ) पावनगड व पन्हाळा हे विजापूरबादशहाचे किल्ले घेतले. हे किल्ले जवळ जवळ आहेत. ह्याच सालीं घोसाळ्याजवळचा बिरवाडीचा किल्ला प्रतापगडच्या लढाईनंतर बांधिला. सन १६६० मध्यें विजापूरच्या बादशाहांनीं पुन्हां शिद्दीजोहार यास महाराजांवर पाठविलें, तेव्हां महाराज पन्हाळ्यावर हेोते. शिद्दी जोहारानें तेथें पुष्कळ दिवस तळ देऊन वेढा दिला होता. शेवटीं महाराज रांगण्यावर गेले व शिद्दीजोहार याचे हातीं पन्हाळा लागू दिला नाहीं. पन्हाळा व पावनगड हे मजबूतीविषयीं फार प्रसिद्ध होते, असें महाराजांचे पवाडयावरून समजतें. असा महाराजांचा राज्य विस्तार वाढत चालल्यामुळे तुळजापूरचे कुलस्वामिनी देवीस जाण्यास फुरसत होईना म्हणून त्यांनी  प्रतापगडावरच त्या देवीचें नांवानें एक देवी करून बसविली. असें करण्यास त्यांस तुळजापुरचे देवीचा दृष्टांत झाला होता.

 महाराज रायगडीं असतां त्यांनीं कीर्तनांत गोसाव्याचे तोंडून सद्गुरूवांचून मोक्ष नाहीं असें ऐकिल्यावर त्यांना मोठा विचार पडला. तेव्हां ते आपली कुलस्वामिनी जी भवानी इची प्रार्थना करण्याकरितां प्रतापगडीं आले, आणि गुरु कोणास करावें याविविषयीं आज्ञा व्हावी ह्मणून त्यांनीं देवीची आराधना केली, तेव्हां देवीनें सांगितले कों, "रामदासस्वामी यांसच शरण जावें, कारण ते तुम्हांकरितांच उत्पन्न झाले आहेत. ” हा दृष्टांत झाल्यावर महाराज स्वामींच्या दर्शनाकरितां चाफळास आले. स्वामी तेथे नव्हते ह्मणून स्वामींचा शोध करीत महाराज बरेंच फिरले, परंतु शोध न लागल्यामुळे प्रतापगडीं राज्यकारणामुळे निघून आले. आणि पुन: देवीची प्रार्थांना केली कीं प्रयत्न केला असतांही दर्शन होत नाहीं याचें कारण काय? त्याच दिवशीं रात्रींं स्वप्नामध्येंं--पायीं पादुका, कटीं  कौपीन, हातीं माळ, कांखेस कुबडी, मस्तकीं जटाभार याप्रमाणें रामदास स्वामींची मूर्ति महाराजांपुढे उभी राहिली, व नारळ प्रसाद दिला, आणि आपण कोण ह्मणून महाराजांनीं विचारल्यावर स्वामींनीं सांगितलें कीं " आम्ही गंगातिरीं राहणार परंतु सांप्रत तुमच्याकरितां कृष्णातिरीं आलों आहोत, व तुम्हाला एवढेंच सांगणें आहे कीं, तुम्ही जें राज्यसाधन आरंभिलें आहे तेंच चालवावें, आणि धर्माचा उच्छेद झाला आहे त्याची स्थापना करून देवब्राह्मणांचे ठायीं सादर असावें." इतकें म्हणून स्वामी अदृश्य झाले व महाराज जागृत झाले. पुढें मातोश्रीची आज्ञा घेऊन महाराज निघाले ते महाबळेश्वर, वांई व माहुलीपावेतो गेले तों त्यांस स्वामींकडून पत्र आलें. त्यावरून स्वप्नाचें मजकुरास जास्त पुष्टीकरण मिळालें. तें पत्र असें:-

  निश्चयाचा महा मेरु । बहुत जनासी आधारू ।
  अखंड स्थितीचा निर्धारू । श्रीमंत योगी । १ ।
  परोपकाराचिया राशी । उदंड घडती जयाशी ।
  ज्याचे गुण महत्वाशी । तुलणा कैची ॥ २ ॥   नरपती हयपती । गजपती गडपती |
  पुरंधर आणि शक्ति । पृष्ठभागीं ॥ ३ ॥
  यशवंत कीर्तिवंत । सामर्थ्यवंत। वरदवंत ।
  पुण्यवंत आणि जयवंत । जाणता राजा ॥ ४ ॥
  आचारशील विचारशील | दानशील धर्मशील ।
  सर्वज्ञपणें सुशील । सर्वाठायीं ॥ ५ ॥
  धीर उदार सुंदर । शूर क्रियेशीं तत्पर ।
  सावधपणेशीं नृपवर । तुच्छ केले ॥ ६ ॥
  तीर्थें क्षेत्रें तों मोडिलीं । ब्राह्मण स्थानें बिघडलीं ।
  सकळ पृथ्वी आंदोळली । धर्म गेला ॥ ७ ॥
  देवधर्म गोब्राम्हण । करावयासी रक्षण ।
  हृदयस्थ जाहला नारायण । प्रेरणा केली ॥ ८ ॥
  उदंड पंडित पुराणिक । कवीश्वर याज्ञिक वैदिक ।
  धूर्त तार्किक सभानायक । तुमचे ठाई॥ ९ ॥
  या भूमंडळांचे ठायीं । धर्म रक्षी ऐसा नाहीं |
  महाराष्ट्रधर्म राहिला कांहीं । तुह्माकरितां ॥ १० ॥
  आणखी कांहीं धर्म चालती । श्रीमंत होऊनि कित्येक असती ।
  धन्य धन्य तुमची कीर्तिं । विश्वीं विस्तारिलीं ॥११॥   कित्येक दुष्ट संहारिला । कित्येकांस धाक सुटला ।
  कित्येकांस आश्रय झाला । शिवकल्याण राजा ॥ १२ ॥
  तुमचे देशीं वास्तव्य केलें। परंतु वर्तमान नाहीं घेतलें।
  ऋणानुबंधें विस्मरण झालें । बा काय नेणूं ॥ १३ ॥
  सर्वज्ञ मंडळी धर्ममूर्ती । सांगणें काय तुह्माप्रती ।
  धर्मस्थापनेची कीर्ति । संभाळिली पाहिजे ॥ १४ ॥
  उदंड राजकारण तटलें । तेथें चित्त विभागलें ।
  प्रसंग नसतां लिहिलें । क्षमा केली पाहिजे ॥ १५ ॥

  हें वाचून शिवाजीनें उत्तर लिहिलें कों आशीर्वादपत्र पाहून परमानंदातें पावलों. दर्शनाची इच्छा धरून येत आहें. शेवटीं हें पत्र व आपण स्वत: स्वामिस एकाचवेळीं प्रास झाल्यावर स्वामींनीं त्यांस एक नारळ प्रसाद दिला आणि मूठभर खडे, मूठभर माती व मूठभर लीद दिली. त्याचा अर्थ-नारळ स्वकल्याणार्थ; माती दिली त्याचा अर्थ पृथ्वी प्राप्त होईल; खडे दिले त्यावरून किल्ले ताब्यांत राहतील; लीद दिली याचा अर्थ पागा ताब्यांत राहील. तसेंच सन १६५९ पूर्वी तुकारामबोवांनीं शिवाजीस पत्र  लिहिलें होतें त्यांत "छत्रपती " हें विशेषण स्पष्टपणें दिलेलें आहे, तें असें:--

  शिवनाम तुझें । ठेविलें पवित्र । छत्रपति सूत्र ।
   विश्वाचें कीं ॥ १ ॥

 यावरून छत्रपति हे नांव प्रतापगडच्या लढाईचे वेळीं व त्यापूर्वी सर्व लोकांत प्रसिद्ध होतें. पुढे महाराजांनीं गुरूपदेशाप्रमाणें हिंदुधर्माचे व गोब्राम्हणाचें रक्षण केलें. हल्ली याच महाराजांच्या घराण्याची शाखा कोल्हापुरास आहे व तेथील गादीला पूर्वी ईश्वरी प्रसादानें मिळालेली “ छत्रपति ” ही पदवी अद्यापि चालत आहे. शिवाजी महाराजांच्याच उपदेशाची स्मृति चोहीकडे राहून त्यांच्या राज्याच्या सर्व शाखा अशाच चिरकाल आणि निर्विघ्नपणे चालेीत, अशी परमेश्वरास आमची प्रार्थना आहे. असे रामदासस्वामींसारखे अवतारी पुरुष धर्माची निकृष्ठावस्था होत चालली म्हणजे परमेश्वरी अंशरूपाने जगांत निर्माण होतात, हें गीतेंतील कृष्णाच्या वाक्यावरून सिद्ध होते:   परित्राणाय साधूनां । विनाशायच दुष्कृतां ॥
  धर्मसंस्थापनार्थाय ॥ संभवामि
  युगे युगे ॥ १ ॥

मकरंदगड.

 मकरंदगड यास येथील लोक घोणसपूर असें म्हणतात. हाही प्रतापगडाप्रमाणेंच डोंगरी किल्ला आहे. परंतु यावर प्रतापगडाप्रमाणें एकादें युद्ध झाले असतें तर त्यांचें नांव इतिहासांत प्रतापगडाप्रमाणें अमर होऊन राहिले असतें. तथापि याचा उपयोग जरी प्रत्यक्ष रीतीनें स्वदेशसेवा करण्यास झाला नसला, तरी हा आड बाजूला असल्यामुळे शत्रूचा घाला आला असता छपून बचाव करण्यास किंवा वासोटा वगैरे किल्यावर जाण्यायेण्यास ह्यानें अनेक वेळां चांगली मदत दिली. सन १६५६ मध्यें जेव्हां प्रतापगड बांधिला त्याच वेळीं शिवाजी महाराजांनीं याचीही दुरुस्ती करून घेतली. याची उंची ४०५४ फूट आहे. याचें पठार उंच सखल आहे.

 हा किल्ला मालकमपेठेपासून दक्षिण दिशेस ७ मैल अंतरावर आहे, याला त्याच्या बाह्यस्वरूपाव रून “ सॅॅडल बॅक ” असें नांव प्राप्त झालें आहे. याला उंटावर घालण्याच्या खोगिराचा आकार आला आहे. तो फार चमत्कारिक दिसतो. याच खुणेवरून अपरिचित मनुष्याला या शैलसमुदायामध्ये त्याची ओळख करून देतां येतें. सासून व बाबिंगटन पाईंटापासून हा उत्तम दिसतो. याच्या अगदीं शिखरावर जाण्यास १० किवा १२ मैल चालून जावें लागतें. या किल्ल्यावर जाण्यास बाबिंगटन पाईंटाच्या पलीकडून एक पाऊलवाट आहे ती मांघर, चतुरबेट गांवांवरून इकडे घोणसपूर गांवावर गेली आहे, व ही फारशी त्रासदायकही नाहीं. या डोगराला जी दोन पूर्वपश्चिम शिखरे आहेत, त्यांपैकीं पूर्वेकडील बाजूचे शिखराची वाट सोपी आहे व त्या शिखरावर जाण्याची तसदी घेतली, तर कांहीं सृष्टिचमत्कार पाहून सार्थक होण्यासारखे आहे. परंतु वाट अरुंद असून दोन्ही बाजूला कडे तुटलेले असल्यामुळे वर जाईपर्यंत जिवांत जीव असत नाही. पश्चिम बाजूच्या शिखराची वाट फारच खडतर अमून वर कांहीं रमणीय देखावाही  नाहीं. पूर्वबाजूच्या शिखराचे पायथ्याशी घोणसपूर ह्मणून गांव आहे. तेथून वर गेलें ह्मणजे तेथील देखावा पाहून मनास मोठा विस्मय वाटतो. त्याचप्रमाणें चोहों बाजूला तट पडित झालेला पाहून आर्यमातेच्या मुलांनीं आपल्या कर्तबगारीच्या दिवसांत अशा दुर्घट स्थळीं हा तट कसा बांधला असेल, याचें सानंद आश्चर्य वाटतें व आतां असा त्याचा त्राता कोणी राहिला नसल्यामुळे तो उध्वस्त झालेला पाहून मागल्या अमदानीची आठवण होऊन मन उद्विग्न होतें. तेथील मल्लिकार्जुनाचें देऊळाची व्यवस्था आतां कोणी मुळींच पहात नाहीं यामुळे आकाशांतील सृष्टिक्रमाप्रमाणें तें पंचतत्वाला मिळत असलेले पाहून पूज्यबुद्धि वाटून मनाची व्यग्रता होतें. याच किल्ल्यावर पेशव्यांचे कारकिर्दीत पूर्वी ज्या ताई तेलिणीनें पुष्कळ दिवस टिकाव धरून बापू गोखल्यासारख्या शूर सरदारास दाद लागू दिली नाहीं तिनें खोदून काढलेले एक पाण्याचें तळघर फार आरामदायक आहे. त्यामध्यें खोदलेली जागा सुमारें आठ खणी दुजोडी सोप्याइतकी पैस असून मधून मधून  खांब खोदलेले दिसतात. यांत नेहमीं जिवंत पाणी भिंगासारखें स्वच्छ भरलेलें असतें. वर जाऊन हे पाणी प्याले हमणजे पूर्ण श्रमपरिहार झाल्यासारखें वाटतें. ज्यांनीं पुण्याचे गाडीरस्त्यावरील खंडाळ्याच्या घाटांतला खांबटकीचा तलाव पाहिला असेल, त्यांस या तळघराची प्रतिमा जलद डोळ्यापुढें येईल. हा डोंगरमाथा प्रतापगडापेक्षांही जास्त उंच असल्यामुळे चोहीकडे फार अफाट प्रदेश दिसतो, आणि आकाश निरभ्र असल्यास बऱ्याच लांबीचा कोंकणप्रदेश व समुद्रावरून बदकाप्रमाणें चाललेल्या आगबोटी पाहून मजा वाटते. असा सर्वत्र भव्य देखावा पाहून आपल्या सूक्ष्मपणाविषयीं विचार मनांत येऊन आपले मन अगदीं खट्टू होऊन जातें.

कमलगड.

 कमलगड हाही बांधिव किल्लाच आहे. या किल्यावर चोहोबाजूला तटासारखा खडक आहे. तेथें विजापुरच्या बादशहाचे पदरचे चंद्रराव मोरे ह्मणून कोणी जावलीचे राजे जाऊन येऊन असत. या मोऱ्यांच्या सात पिढ्या पावेतों त्यांचें राज्य चाललें होतें, तें सन १६५५ सालीं शिवाजी महाराजांनीं घाटमाथा काबीज केला त्यावेळीं घेतलें तेव्हां हा किल्ला महाराजांकडे आला. ह्या डोगरांची उंची ४५११ फूट आहे. ही टेकडी केटपाईंंटाच्या उत्तरेस आहे. या टेकडीवर जावयाचे असल्यास केटपाईंटपर्यंत टांग्यानें किंवा घोडयावरून जावें. तेथून पुढें शिडीदारें घाटाच्या पाऊलवाटेने पायी डोंगराखाली उतरून वैगांवावरून कृष्णानदीचे पलीकडे जावें. तेथून नांदगणें आणि परतवडी ही गांवे डावे बाजूस सोडून डोंगरावर चढावयास लागावें. हा चढ तीन मैल आहे. चालणारा खंबीर असल्यास दोन तासांत गडावर जाऊन पोहोंचतो. ह्या डोंगराचे योगानें एका खोऱ्याचे दोन भाग झाले आहेत. ते एक कृष्णाखोरें व दुसरें जांबूळखोरें; कृष्णाखोऱ्यांंत कृष्णानदी वाहत चालली आहे व जांबूळखोऱ्यांंत वळखीनदी वाहत चालली आहे. आणि दोघींचा संगम कमलगडाचे पूर्व सोंडेकडे वेलंग गांवाजवळ झाला आहे. या डोंगरावरील माथ्याचा पठार १० किंवा १२ च एकर असेल. या किल्ल्याला भोंवता लून खडक आहे, त्यांतून आंत जाण्यास कोठे वाट नसल्यामुळे वरून चढून जाण्यास फार आयास होतात. पूर्वी खडकाच्या तळांतून वर जाण्यास एक भुयार असे, त्यांतून लोक येत जात असत. अलीकडे या भुयारांत एक मोठा थोरला दगड कोसळून पडल्यामुळे भुयारांत जाण्याची अगदींच बंदी झाली आहे. त्याच दगडाजवळ पायराच्या झाडावरून लोक वर जात येत असतात. येथे कोणी इमारती किंवा तट बांधिल्याचीं कांहींच चिन्हें दिसत नाहींत. येथे एक खोल विहीर आहे ती सर्व कावेच्या दगडांची असून नेहमीं पाण्यानें गच्च भरलेली असते. हल्लीं इची खोली सुमारे ३० पासून ३५ फुटांपावेतों आहे. या विहिरींत कोनाडे होते. आरोपी लोकांना उपाशी ठेविले असतां लवकर जीव देणें बरें किंवा उपासमार होत होत मरणें बरें वाटतें, हें पाहण्याकरितां ही कोनाडयांची तजवीज केली होती असें ह्मणतात. परंतु हे कोनाडे कोठे आहेत तें आतां विहीर बुजत आल्यामुळे दिसत नाहींसें झालें आहे.  या टेंकडीवर मुळींच वस्ती नाहीं. या गडाच्या दोहों अंगास लहान झुडपांची पुष्कळ दाट झाडी आहे. भोवतालच्या खडकाचे पायथ्याजवळ पाण्याचा झरा आहे व त्याचे पश्चिमेस गोरखनाथाचें एक ओबडधोबड देऊळ आहे. हा डोंगर हल्लीं अजगांवाखालीं आहे. यावर एप्रिल व मे महिन्यांत डुकरांचा बराच प्रळय होतो. त्या वेळीं त्यांची पारध करण्याची फार मौज असते.

चोरांची घळ.

मालकमपेठेपासून सुमारें ५ मैलांवर दक्षिण अंगास एक घळ आहे ती पाहण्यास बरेच लोक जात असतात. तिकडे जाण्यास बाबिंगटन पॉईंट पासून पुढें वाट फुटलेली आहे. हा फुटवाट एक मैलपर्यंत गाडी किंवा घोडे जाणेसारखी आहे. नंतर पायानें जाण्याची पाऊलवाट लागते. ती एका खडकाळ मैदानांत गेली आहे. ह्या मैदानाचे एका बाजूस ही घळ आहे. मालुसरे गांवच्या धावड लोकांची या पाउलवाटेनें फार रहदारी असते. या घळीसंबंधानें लोकांनीं निरनिराळी अनुमाने केलीं आहेत, परंतु याबद्दलची निश्चयात्मक माहिती मिळत नाहीं, कांहीं लोकांचें असें म्हणणें आहे कीं पूर्वी येथें अरण्यांत राक्षस राहत होते, त्यांचें हें वसतिस्थान असावें; कांहींचें असें म्हणणें आहे कीं, ऋषींनीं तपश्चर्या करण्याकरितां अशा एकांत जागीं गुहा केली असावी; कांहीं आधुनिक मंडळीचें असें मत झालें आहे कीं, पूर्वी येथील धावड लोकांचा लोखंड काढण्याचा कारखाना होता त्या वेळीं त्यांनीं येथून दगड नेऊन नेऊन ही जागा खोदून टाकिली असावी. परंतु या शेवटच्या कल्पनेवर अशी शंका उत्पन्न होते कीं, लोखंडी दगड येथील जमीनीचे पृष्ठभागावरच जर हवा तितका सांपडतो तर जमीनीचे आंत खोदून दगड काढण्याचें त्यांस काय प्रयोजन होते?

 ही घळ आंत सुमारें १५० फूट लांब आहे. घळीचें तोंड १० फूट रुंद असून न ओणवतां आंत जाण्यासारखे उंच आहे. मध्यभागाची जमीन सखल होत आली आहे. कांहीं वर्षांपूर्वी ही घळ म्हणजे एक ५०० फूट लांबीचा आरपार जाण्या सारखा बोगदाच होता अंसें सांगतात. हल्लीं ही येथील कहरी पावसाच्या पाण्याचे लोंढयांनीं आंत गाळ येऊन भरत चालली आहे असें दिसतें. या घळीच्या आसपास झाडी गर्द असून त्यांत हिंसक जनावरांची जाग ( चाहूल ) आहे. तेव्हां तीं या घळींत जाऊन स्वस्थ पडत असण्याचा बराच संभव आहे. यामुळे जवळपासच्या खेड्यांतील लोक आंत जाण्यास फारसे धजत नाहींत. या घळीला येथील लोक शिन शिन घळ किंवा भयंकर रस्ता असें म्हणतात.

दुतोंडी घळ.

ही घळ सिंडोला डोगराची ओळ व पांचगणी रस्ता यांपासून जेथें केट पांइटला जाण्याचा रस्ता फुटतो त्यांचे दरम्यानचे सखल जागेंत केलेली आहे. ही वर सांगितले घळीपेक्षां लहान आहे, तथापि ही फार प्रसिद्ध आहे आणि पुष्कळ लोक ही पाहाण्यास येतात.

पारूत.

दक्षिणेस कोयना खो-याच्या बाजूस या डोंगराच्या शैलबाहुवर हें एक खेडें आहे. हें बाबिंगटन  पाईंंटापासून सुमारें ६ मैल आहे. याला जाण्यास पाऊलवाटच आहे, पण चांगली आहे. या गांवचे आसपास फार किर्र झाडी आहे. त्यांत डुकरें, भेकरें, ससे, सांबरे, पांखरें वगैरे पुष्कळ प्राणी आहेत. या गांवाच्यापलीकडे सुमारें १०|१२ मैलांवर बामणोली गांव आहे त्याचे जंगलांत अस्वले, सांबर हीं जनावरें आहेत. बामणोलीला जाण्यास मेढें गांवावरून चांगली पाऊलवाट आहे. हीं ठिकाणें शिकारी लोकांना रंजविण्यासारखीं आहेत व यांवर मैदानांतील हौसी लोकांना झाडीची मजा पाहण्यासारखीं आहेत.

चंद्रगड

प्रतापगडच्याच दिशेकडे मालकमपेठेपासून सुमारें ६ मैलांवर आर्थरसीटचे बाजूस भैरव दऱ्यानें ढवळ्या घाटालगत एक टेंकडी आहे तिला चंद्रगड असें ह्मणतात. या गडाचे भोंवतालच्या जंगलांत मोठ मोठे हिंसक पशू आहेत. त्यांची पारध करण्यास येथून लोक कधीं कधीं जातात.

पांडवगड.

कमलगडाच्या पलीकडे ५ मैलांवर पांडवगड आहे.  त्याला जाण्यास रस्ता पांचगणीपर्यंत, उत्तम गाडीचा आहे. तेथून तायघाटानें खालीं उतरून धौम अबेपुरीवरून पाऊलवाट गेलेली आहे. पायथ्यापासून माथ्यापर्यंत दीड मैल चढून जावें लागतें. हा किल्ला चोहोबाजूंनीं चांगला बांधलेला आहे. याची उंची ४१७७ फूट आहे. येथून फार लांबीचा प्रदेश दिसतो. या किल्ल्यावर पाणी फार चांगलें आहे. येथेंच पांडव पूर्वी अज्ञातवासांत असतांना येऊन छपून राहिले होते अशी आख्यायिका आहे. कारण डोंगराचे माथ्यावरून जमीन पोंखरून तळापर्यंत वाट केलेली तीन चार जागीं आहे तीस पांडवदरा असें म्हणतात. हल्लीं हा आंतून पडल्यामुळे बुजून गेला आहे. पांडवाच्या मूर्तीही वर आहेत. त्यांस पांडवजाईचें देऊळ म्हणतात. येथें वार्षिक जत्रा भरत असतें. ह्या डोंगरांत तीन पाण्याचें हौद व एक गुहा आहे.

राजपुरी

पांचगणी गांवचे मागील बाजूस खिंडीतून राजपुरी येथें येण्यास वाट आहे. ही वाट फक्त पायाने  जाण्यासारखी आहे. या वाटेनें सुमार ४ मैल गेलें, म्हणजे एक गुहा डोंगराच्या मध्यभागीं मुद्दाम कोरल्याप्रमाणें दिसते. ही गुहा कोणी कोरली असावी हें समजत नाहीं.या गुहेला बाहेरील बाजूस व्हरांडयासारखी जागा असून त्यांत चौकोनी पाण्याचे दोन हौद बांधलेले आहेत. यांतील पाणी जिवंत असून नेहमीं भरलेलें असतें. हें पाणी क्षेत्र महाबळेश्वरचे पाण्याप्रमाणें गोड व थंडगार असते. पलीकडे देवळांतील गाभाऱ्याप्रमाणें एक अंधाराची सुमारे २० फूट लांबीची कोरीव घळ आहे, त्यांत खडबडीत पाषाणाची २ फूट उंचीची मूर्ति आहे. तीस कार्तिकस्वामी, असें ह्मणतात. हिंदु धर्माप्रमाणें फक्त पुरूष मंडळी याची पूजा करण्यास जाते बायका या देवास कधींही जात नाहींत. जत्रा कार्तिकी पौर्णिमेस भरते, त्या वेळीं येथें जवळपासचे पुष्कळ लोक जमतात हें कोरीव काम फार पैस असून मजबूत आहे. याची आजपावेतों कोणीही दुरुस्ती केली नाहीं तथापि अद्याप पावेतों ते कोठेहीं भंगलेले किंवा पडलेले दिसत नाहीं. 

गायदरा किंवा गुलेरा घळ.

 ही घळ पांचमैलाच्या हद्दीतील गोळेगांवचे रानांत जोर व गोळेगांव या गांवांच्या दरम्यानचे टापूच्या डोंगरांत सपाटीवर आहे. या ठिकाणी येण्यास वाट मालकंपेठेपासून महाबळेश्वरक्षेत्रपावेतों उत्तम गाडी रस्त्याची असून पुढें मात्र पायानें गेलें पाहिजे. ही पायवाट महाबळेश्वरीं गणेशदाऱ्यानें फुटते. ही मातट जमीनीची लहान पाउलवाट असून तिच्या दुतर्फा दाट झाडीची थाप लागून गेलेली आहे. त्यामुळे पादचारी लोकांना या वाटेनें त्या झाडाची थंडगार हवा लागून येतां जातां घामानें अंगावरची पैरण भिजून चिप होण्याची वेळ येत नाहीं. तळातील जोरगांवचे लोक या वाटेनें डोकीवरून मोठमोठाले भारे वगैरे आणून मालकमपेठेत विकून टाकितात व लागलींच संध्याकाळी परत घरीं जातात. खाली उतरून जाताना डावीकडे व उजवीकडे डोंगराच्या बाजवा दाट झाडीने आच्छादित झाल्यामुळे चोहोंकडे जमिनीचा किंवा पाषाणाचा यत्किंचित भाससुद्धा होत नाहीं. परंतु मा थ्याच्या भागाचा उंच मान काढून उभा राहिलेला खडक सर्व ठिकाणीं उघडा व काळाभोर दिसून जवळ असल्यामुळे पाहणाराच्या मनास गर्भगळित करून टाकतो. डावे अंगास तळांतील सपाट जाग्यावर चिमुकले धनगरी पद्धतीचें कमलजा देवीचें देवालय व त्याच्यापुढील पटांगणास लागून वाहत असलेला वेदगंगेचा प्रवाह हीं त्या हिरव्यागार पसरलेल्या सृष्ट गालिच्यास चित्रविचित्र प्रकारची शोभा देतात, असें सुमारे तीन मैल डोंगर उतरून गेलें हमणजे जोरगांव लागते. ह्या गांवास सपाटीची जागा नसल्यामळे गावांतील केंबळी घरांची त्रेधा उडल्यासारखी दिसते. कोठें दोन, कोठें चार, अशीं जागजागीं खोपटीं केलेलीं दिसतात, यावरून देशावरील मनुष्यास हें गांव आहे किंवा सोंग आहे असें वाटल्यावांचून राहत नाहीं. पुढे डावेबाजूनें निघून चाललें ह्मणजे कृष्णानदीचें झुळझुळ वाहत चालणाऱ्या प्रवाहाचें लहान ओढयासारखे पात्र लागतें, तें आणि वेदगंगेचा मोठा प्रवाह यांचे येथें ऐक्य होऊन कृष्णाबाईचें मोठे प्रस्थ झालें  आहे. पुढें डोंगराच्या बाजूकडे जरा वळलें असतां ही घळ दिसू लागते. तिची आंतून लांबी ५० हात, रुंदी २० हात व उंची १० हात आहे. तोंडाची रुंदी सुमारें १६ हात असून उंची १० हात आहे. ह्या घळीच्यावरून पाण्याचा प्रवाह बारा महिने पुढें पडून वाहत असतो. यावरून यांत मनुष्यवस्ति असावी असें अनुमान होतें. ही घळ सरकारी जंगलाच्या हद्दीत आहे. तथापि या ठिकाणीं मनुष्यांची व जनावरांची वर्दळ असल्यामुळे आंत जाऊन पाहण्याची धास्ती वाटत नाहीं. याजबद्दल जवळपासच्या गांवकरी लोकांची अशी कल्पना आहे कीं वाघ वगैरेच्या धाडी पडण्याची काळजी असल्यामुळें गुरें बंदोबस्तानें ठेवण्याकरितां ही घळ कोरली असावी. हल्ली ५०|६० गुरें मावण्यासारखी विस्तीर्ण जागा यांत असून ती स्वच्छ आहे.


--------------