ब्रहमारण्य.
---------------

महाबळेश्वरच्या पश्चिमेस देवळापासून तीन चार मैलावर एक विस्तीर्ण झाडी आहे. तिला ब्रह्मारण्य असें म्हणतात, असें नांव देण्याचें कारण, इतकेंच आहे कीं, या ठिकाणीं ब्रह्मा, विष्णु महेश यांनीं, पूर्वी वर्णन केल्याप्रमाणें यज्ञ केला त्यावेळीं मुख्य अध्वर्यु जो ब्रह्मदेव त्याचे आपले पत्नी बरोबर भांडण होऊन चिरकाल आठवण राहण्याजोगे अनर्थापात झाले म्हणून ब्रह्मदेवाचें नांव यास मिळालें.

हें ब्रह्मारण्य खरोखरीच फार पाहण्यासारखे ठिकाण आहे, महाबळेश्वरावरील इतर ठिकाणच्या देखाव्यांपेक्षां येथील देखावा फारच भव्य आहे. विशेषेकरून रस्त्यानें न जातां पाऊल वाटेनें जो कोणी जाईल, 

त्यास याची चांगलीच प्रतीति येईल. रस्त्यानें जाणारास एलफिन्सटन पाइंटाकडे व आर्थर सीटकड़े जाण्याचे जेथून रस्ते फुटतात, तेथून आर्थर सीटकडील बाजूस वळलें असतां भरदुपारीं भीती वाटून त्याच्या अंगावर कांटा उभा राहतो. तसा प्रकार महाबळेश्वर सोडून जेथून हे दोन रस्ते फुटतात त्या फूट वाटेला मिळेपर्यंत झाडी ठेंगणी असून पातळ असल्या कारणानें बहुतेक होत नाही. तथापि सर्व जंगल एकसारखें लागून जाऊन निर्जन असल्यामुळे भटकणारी हिंसक जनावरें खाद्य मिळविण्याकरितां बाहेर आलेलीं कधीं कधीं दृष्टीस पडतात. सावित्रीच्या उगमाची जागा पाहण्यास जाण्याची जी जंगलांतून लहान वाट, आरथर सीटकडे जातांनां डावे हातास लागते, तिचे समोरचे बाजूस उजवे हातास तशीच लहान पाऊलवाट केली आहे, त्यास भांगा असें म्हणतात. या वाटेस भांगा असें नांव पडण्याचे कारण असें आहे कीं, ही वाट जंगलांत स्त्रियांच्या केंसाच्या भांगासारखा भांग काढल्याप्रमाणें आहे. या वाटेवरील उंच उंच वृक्षांवर पांच 

सहा ठिकाणीं शिकारी लेकांना बसण्याकरितां माळे बांधले आहेत या माळयावर टपून बसून येथें शिकारी लोक शिकार करितात. परंतु शिकारी प्राणी भुलवून आणण्याकरितां त्यांस या ठिकाणी रेडा किंवा बकरें, किंवा दुसरें कांहीं जनावर एक दोन दिवस बांधून ठेवावें लागतें. पुढें तें जनावर बहुतकरून एक दोन दिवसांच्या आंत त्यांच्या भक्ष्यस्थानी पडलेलें समजतांच हे शिकारी लोक चार पांच बंदुकीनें नेम मारणारे तरबेज लोक बरोबर घेऊन या माळयावर लपून बसतात आणि चटावलेलें हिंसक श्वापद येऊन तें बांधलेलें जनावर खाऊंं लागले, म्हणजे त्याजवर बंदुका झाडतात, या श्वापदांची अशी खोड आहे कीं तें बांधलेलें जनावर एकदम खाऊन मोकळे होत नाही. येऊन जाऊन रोज थोडथोडे असें खाऊन त्याचा फन्ना पाडतें. अशा या डाव्या उजव्या बाजूच्या झाडीत डोकावून पाहिलें, तर कोठे बैलाची तंगडी तर कोठे रेडयाचा पाय, असल्या विलक्षण चिजा कधीं कधीं दृष्टीस पडतात; रस्त्यावरील धुळींत वाघाच्या पंजांचे किंवा 

सांबरांच्या खुरांचे स्पष्ट उमटलेले माग व याच जनावरांची ठिकठिकाणी पडलेली विष्टा हीं सहज जातां जातां नजरेस येतात: तेव्हां पोटांत अगदी धस्स होऊन जाऊन पांचावर धारण बसते. पाऊलवाटेनें जाणारास या ब्रह्मारण्यांत यज्ञसमयाचे वेळीं राहण्याकरितां केलेली एक गुहा आहे ती पाहण्यास मिळते. ही चार पांच माणसें बसण्यासारखी मोठी आहे. यज्ञस्थंडिलाची जागा व सावित्रीनें संतापानें आपला कडेलोट करून घेतलेला कडा ही अगदी एकमेकाला लागूनच असलेलीं आर्थरसीटकडे जातांना डावे हातास लागतात. यावरून यज्ञाचेवेळीं सावित्रीची व देवाची चकमक उडाली म्हणून जी हकीकत आहे तिचा मेळ जमतो. हीं स्थळे पाहण्यास जातांना दाट झाडीतून जावें लागतें. या झाडींत दोन प्रहरींसुद्धां सूर्याचें लंबायमान किरण आंत शिरकू शकत नाहींत. या यज्ञस्थंडिलाची जागा अद्यापि ओळखून पाहण्याची कोणाही हिंदुगृहस्थास इच्छा झाल्याशिवाय राहत नाही. ती पाहणारे लोकांस येवढीच सूचना आहे, कीं हा यज्ञ होऊन हजारों  वर्षे झालीं असल्यामुळे पावसाच्या पाण्याच्या मोठमोठ्या लोंढयांबरोबर उंच प्रदेशांतील गाळ वाहत येऊन त्याचा यज्ञकुंडावर लेप (खपली) बसल्यासारखा झाल्याकारणानें यज्ञकुंडाचें भस्म वरील माती उकरून मग काढून पहावें लागतें व तें भस्माप्रमाणे पांढरे असून हातावर पाणी घेऊन चोळून पाहिलें असतां स्निग्ध आहे असें वाटतें. या ब्रह्मारण्यांत चतुष्पाद हिंसक श्वापदाप्रमाणेंच पोटानें चालणारे फार विषारी सर्प जिकडे तिकडे दृष्टीस पडतात. पूर्वी एकदां या ब्रह्मारण्यांतील वाळलेल्या गवतास वणवा लागला होता तेव्हां सर्पांचीं भेंडुळीं मरून पडलेलीं पुष्कळच पाहण्यांत आलीं होती. सकाळीं व सायंकाळीं या विषारी जिवांच्या बिळाबाहेर पडण्याच्या समयास अनवाणी फिरणें फार धोक्याचें आहे.

  या ब्रह्मारण्यांत एकटें दुकटें पाहण्याकरितां जाण्याचें फार कठीण काम आहे. मंडळीबरोबर जाण्यांत इतकी भीति वाटत नाहीं. साहेब लोक तर हातांत बंदुका घेतल्याशिवाय तिकडे फिरावयास जात नाहीत, या ब्रह्मारण्यांत अगदीं उत्तर बाजूस एक  आर्थरसीट म्हणुन फार प्रेक्षणीय जागा आहे तिचें वर्णन पुढे आलें आहे. ती पाहण्यास जाण्याचा रस्ता या ब्रह्मारण्यांतून गाडी जाणे सारखा केलेला आहे तरी तो रस्ता, जागा डोंगराळ असल्यामुळे फार चढउताराचा आहे. या ब्रह्मारण्यांतून मालकमपेठेकडे दृष्टि फेंकिली असतां लांबपर्यंत हिरव्या रंगानें मढविल्यासारखी जमीन दिसते.

---------------