महाबळेश्वर/भूगर्भपदार्थ.

भूगर्भपदार्थ.
---------------

 येथील जमिनीचा रंग बहुतेक ठिकाणीं तांबडा आहे, व कांहीं जागींं जमीन तपकिरी आहे. येथील तांबडी माती डोंगरावरील ढिसूळ तांबडे दगड ढासळून खालीं पडतात आणि फुटतात त्यांपासून झालेली आहे. मातीचा तपकिरी रंग पावसाळ्यांत उगवणारीं लहान सान झाडेझुडपें वाळून किंवा कुजून जाऊन जंगलांत जागचेजागीं पडतात आणि मातींत मिसळून जातात, त्यामुळे होतों. ही तपकिरी माती एकप्रकारचें खत असल्यामुळे कोठेही जमिनीत नेऊन घालून पीक केलें असतां तें चांगलं तरतरून येतें. लहान लहान छिद्रे असणा-या तांबडे दगडांपासून लोखंड निघतें. ते दगड फार ढिसूळ असल्यामुळे त्यांचाही बुक्का होऊन या तांबडे मातींतच,ते तद्रुप होऊन गेले आहेत. येथील जमिनीच्या पृष्ठभागावर चोहींकडे अशा रीतीनें लो- 

खंडी मातींचे लुकणच वसून गेलें आहे, त्यामुळे कुरूंदाचे व दुसरे प्रकारचे जमिनीच्या पोटांतील दगड अगदीं दडपून गेले आहेत. याची प्रतीति, येथील इमारतींकरितां जेव्हां दगड पाहिजे असतात तेव्हां ते कसे काढतात हें पाहिल्यावर, झटकन् येईल. येथें बंगल्यांच्या व घरांच्या इतक्या दगडी इमारती झाल्या आहेत, त्यांजकरितां दगड काढावयाचा, तो सुरुंग लावून काढण्याची जरूरी एकंदरींत फार कमी होती. येथें थोडया मेहनतीनें दगड सहज सांपडतो. हें मातीचें लुकण येथील दरसालच्या जबरदस्त पावसानें ढिसूळ दगडाची माती झालेली पसरून किती एक वर्षे बनतच आहे. तें आज तागाईत निदान १०० फूट तरी जाडीचें झालें असेल असें वाटतें. याला प्रत्यक्ष प्रमाण येथील विहीरी पाहिल्या असतां त्यांस कोठेही तळांत बांधकामाला खडकाचा धर नाहीं यावरून लख्ख दिसतें. या ठिकाणचे लोखंडी दगड दगडी कोळशाप्रमाणें एकाच ठिकाणी खोल खणले असतां सांपडत नाहीत. त्यांचे कड्यावरून व जमीनीचे पोटांतून आडवे पदर आहेत, पांचगणी कडील बाजूस 

हें तांबडे मातीचें लुकण कमी कमी होत गेलें आहे. या जमीनीतील तांबडे दगडाच्या थरांत कित्येक वेळीं पांढरे किंवा पिंवळे पैलूदार लहान लहान खड्यांचा थर लागतो. येथील मातींत जें अशोधित लोखंड आहे तें येथील मूळ राहणारे धावडलोक, यांत्रिक साधनाची मदत नसतां, ओबड धोबड साधनाने व अल्प मेहनतीने काढून, त्याचे ओबड धोबड जिन्नस तयार करीत आणि त्यावर आपलें पोट भरीत असत. तथापि लोखंड शोधून निघाल्यावर त्याची कमाई त्यांचे हातून चांगली होत नसल्यामुळे तवे, कढया यापेक्षां विषेश खुबीदार माल त्यांजकडून होण्याची व लोखंडी कारखान्यानें त्यांची चलती होण्याची आशाच नव्हती. असें पुरतेपणीं जाणून पुष्कळ धनाढ्य लोकांनीं मनांतल्या मनोराज्यांत कारखाने काढण्याच्या अनेक खटपटी केल्या. परंतु त्या तशाच स्वप्नाप्रमाणें झोंपेतल्या झोंपेतच राहिल्या. हल्ली जंगलांतील लांकूड व कोळसा यांची जंगलखात्याच्या विषेश सक्तीच्या नियमांमुळे टंचाई झाल्यानें हा लोखंड काढण्याचा कारखाना अगदीं बुडून  जाऊन धावड लोकांना मोलमजूरी करून पोटाचीआग शमविण्याची पाळी येऊन पोहोचली आहे.

 येथील जमिनीचा हा भगवा रंग सातारचे बाजूकडे ६/ मैलपर्यंत, व पुण्याचे बाजूकडे १३ / मैलपर्यंत व महाडाचे बाजूकडे थेट कोंकणपट्टीपर्यंत पसरलेला आहे. हा रंग चालणाराच्या जोडयास किंवा गाडीच्या चाकांस लागल्यावांचून राहत नाहीं, यामुळे देशावर राहणा-यांस गाडी किंवा प्रवाशी कोठून आले आहेत तें भगव्या रंगावरून सहज ओळखतां येतें. हा भगवा रंग अंगांस किंवा पांघरूणास लागला असतां लागलींच आपल्यासारखे करून टाकण्याची याच्यामध्यें विलक्षण कर्तबगारी आहे. यावरून या तांबडे मातीच्या आंगीं बरीच स्निग्धता असावी, असें उघड दिसतें. याचा दाखला मातींत काम करणा-या धावडांच्या ध्यानाकडे पाहिलें असतां चांगला येतो. या मातींचा असा पडलेला डाग साधारण धुण्याला दाद देत नाहीं. बारसोप किंवा शिककई यांचाच प्रयोग त्यावर करणें भाग पडतें. यामुळें येथें बारसोपचा बराच खप होतो. दुसरें असें आहे की, येथील परीट  लोक कोरें चिरगुट धुण्यास दिलें असतां तें धुवून काढण्यानें अगदीं रडकुंडी येतात. कारण कोरीं चिरगुटें पांघरुणें उन्हांत ओपत पसरून त्यावर बरेंच वेळ पाणी शिंपडावें लागतें. परंतु असें करण्यानें खालून तांबडे मातीचे डाग पडण्याचे बरेंच भय असतें.

---------------