महाराष्ट्र संस्कृती/अर्थमूलो हि धर्मः



२०.
अर्थमूलो हि धर्मः ।
 


 श्री शिवछत्रपतींनी जी धार्मिक क्रान्ती महाराष्ट्रात केली तिचे स्वरूप आपण पाहिले. मुसलमानी राज्यात, उत्तरेत आणि दक्षिणेतही हिंदुधर्म आणि हिंदुप्रजा यांवर अत्यंत भयानक असे अत्याचार होत होते. आणि हिंदुधर्म समूळ नष्ट करून सर्वत्र इस्लामचा प्रसार करावयाचा अशी मुस्लिम सत्ताधाऱ्यांची प्रतिज्ञाच होती. अशा स्थितीत, एक पराक्रमी पुरुष हातात खङ्ग घेऊन हिंदुधर्माच्या रक्षणासाठी पाय रोवून उभा राहिला आहे, हे पाहताच हिंदु-प्रजाजनांना अपरिमित आनंद झाला, यात शंकाच नाही. आणि त्यामुळेच, सावंत, सुर्वे, मोहिते, घोरपडे, माने, निंबाळकर इ. मोठमोठे सरदार जरी छत्रपतींविरुद्ध होते तरी, सामान्य हिंदू जनता सत्वर त्यांच्या पाठीशी उभी राहिली, हे उघड आहे.

भाकरीचे रक्षण
 पण एवढ्याने भागले नसते. स्वराजाची पायाभरणी करण्यात आणि त्यावर एका मागून एक चालून येणाऱ्या विजापुरी सरदारांना पराभूत करून हाकलून देण्यात छत्रपतींना जे अल्पावधीत यश आले ते केवळ धर्मप्रेरणेने आले असते असे वाटत नाही. सामान्य जनांना धर्माभिमान नसतो असे नाही. पण पोटापाण्याची, भाकरीची, पोराबाळांच्या संरक्षणाची त्यांना जास्त चिंता असते. आपल्या जातीचा, धर्माचा राजा असावा अशी मनोमन त्यांना इच्छा असते, आकांक्षा असते, हे खरे. पण तो तरी कशासाठी ? तो आपले रक्षण करील, आपले घरदार, जमीन आपल्या जवळच राहील व सुखाने दोन घास खाता येतील, अशी राज्यव्यवस्था तो करील, ही त्यांना आशा असते. मुस्लिम राज्यात हे घडत नव्हते. अगदी दुष्काळाच्या काळात फक्त मुस्लिम प्रजेच्या अन्नपाण्याची व्यवस्था सत्ताधारी आधी करीत आणि हिंदूंना वाऱ्यावर सोडीत. मग एरवीच्या काळी काय असेल याची सहज कल्पना येईल. आपले भोगविलास निर्वेध चालविण्यासाठी लागणारे जे धन ते निर्माण करणारे गुलाम, हमाल, मजूर एवढ्याच दृष्टीने मुस्लिम सत्ताधारी हिंदुप्रजेकडे पाहत असत. त्यामुळे दैन्य, दारिद्र्य, दुःख, अन्नान्नदशा, जीवितवित्ताची अशाश्वती, स्त्रियांच्या अपहरणाची, विटंबनेची कायमची भीती हाच हिंदूंचा ललाटलेख मुस्लिम आमदानीत होऊन बसला होता. अशा स्थितीत हिंदूंना जो राजा हवा होता तो धर्मरक्षणाबरोबरच जीवित-वित्ताचे, घरादाराचे, भाकरीचे रक्षण करील असा हवा होता. शिवछत्रपतींनी आरंभापासून तेच कार्य करण्याचे धोरण अवलंबिले. म्हणूनच महाराष्ट्र त्यांना अवतारी पुरुष मानू लागला.

अर्थशास्त्र
 मागे एकदा सांगितलेच आहे की शिवछत्रपतींनी ग्रंथ लिहिले नसले तरी क्रांतीचे तत्त्वज्ञान त्यांनी मनाशी पूर्णपणे निश्चित केले होते. अर्थमूलो हि धर्मः । हे चाणक्याचे वचन कधीही दृष्टिआड होऊ दिले नव्हते. शाइस्तेखानाच्या स्वारीच्या प्रसंगी एकदा आपल्या सचिवांना उद्देशून ते म्हणाले, 'अर्थामुळेच सर्व कामे साधतात आणि अर्थामुळेच धर्माची अभिवृद्धी होते. म्हणूनच पैशाची प्रशंसा करतात. कुल, शील, वय, विद्या, पराक्रम, सत्यवादित्व, गुणज्ञता, गांभीर्य ही सर्व पैशामुळेच प्राप्त होतात. अर्थामुळेच लोकांना इहलोक आणि परलोकही लाभतो. द्रव्यहीन पुरुष हा जिवंत असूनही नसल्यासारखाच असतो. ज्याच्याजवळ विपुल पैसा असतो त्यालाच मित्र लाभतात, ज्याच्याजवळ पैसा असतो तोच पराक्रमी होतो आणि ज्याच्याजवळ पैसा असतो त्यालाच सर्व लोक साह्य करतात.' (शिवभारत, २८, ३६-३९)
 भारतातील प्राचीन ऋषिमुनींनी अर्थाचे हे माहात्म्य चांगले जाणले होते. चाणक्य तर यासाठीच प्रसिद्ध होता. पण महाभारतातही ठायी ठायी हे विचार निरनिराळ्या पुरुषांच्या तोंडून आपल्याला ऐकायला मिळतात. 'धन मिळवणे हाच श्रेष्ठ धर्म होय. धनावरच सर्व काही अवलंबून आहे, धनसंपन्न लोकच जगात जिवंत असतात, धनहीन लोक मेल्यातच जमा होत.' 'धनाच्या योगाने कुळाचा उत्कर्ष होतो. धन असेल तर धर्माची वाढ होते- धनात् धर्मः प्रवर्धते ।- निर्धनाला इहलोकही नाही आणि परलोकही नाही'. असे धनाचे तत्त्वज्ञान प्राचीन भारतात धर्मवेत्ते मुनीही सांगत असत. शिवछत्रपतींनी महाभारताचे उत्तम श्रवण केले होते. त्यामुळेच धर्मक्रांतीबरोबरच आर्थिक क्रांतीही केली पाहिजे, तीवाचून धर्मक्रांती दीर्घकाळ टिकणे शक्य नाही, हे मनाशी दृढपणे ठरवून त्यांनी पहिल्यापासूनच त्या दृष्टीने पावले टाकली होती.
 तशी पावले टाकून त्यांनी जी आर्थिक क्रांती घडविली तिचे रूप आता पहावयाचे आहे.

नवी अर्थव्यवस्था ?
 मुस्लिम सत्ताधारी हिंदुप्रजेचा कमालीचा रक्तशोष करीत असत हे वर सांगितलेच आहे. पण अपहार, लूटमार एवढेच त्या शोषणाचे रूप नव्हते. मुस्लिमांची राज्यव्यवस्था, सर्व राज्यकारभार आणि सर्व अर्थव्यवस्था ही शोषणाच्या पायावरच उभारलेली होती. सरंजामी पद्धती, मनसबदारीचा कारभार, वतनदारी या नावांनी जी प्रसिद्ध आहे तीच ही राज्यव्यवस्था व अर्थव्यवस्था होती. शिवछत्रपतींनी ही सरंजामी वतनदारी अर्थव्यवस्था नष्ट केली, असे आज बरेच पंडित सांगतात. सभासदाची बखर आणि रामचंद्रपंत अमात्य यांचे आज्ञापत्र यांतील अनेक उताऱ्यांवरून त्यांचे हे म्हणणे पुष्कळ अंशी खरे आहे, असे दिसते. पण महाराजांनी वतनदारी नष्ट केली नाही, त्यांना तसे करणे शक्यही नव्हते, असाही एक पक्ष आहे. आणि या पक्षानेही भरपूर कागदपत्रे सादर केलेली आहेत. या दोन्ही पक्षांचे प्रतिपादन लक्षात घेऊन छत्रपतींनी कोणती अर्थव्यवस्था प्रस्थापित केली ते आता निश्चित करावयाचे आहे.

वतनदारी
 राजाने आपल्या राज्याची अनेक सुभ्यांत किंवा परगण्यांत विभागणी करून ते परगणे निरनिराळ्या सरदारांच्या ताब्यात द्यावयाचे आणि त्या सरदारांनी वा मनसबदारांनी त्या त्या सुभ्यात जवळ जवळ स्वतंत्रपणे कारभार करून राजाला दरसाल ठराविक रक्कम महसूल म्हणून द्यावयाची आणि स्वतःच्या खर्चाने लष्कर नित्य तयार ठेवून युद्धाच्या प्रसंगी राजाच्या स्वारीबरोबर जातीने जाऊन लढाया करावयाच्या, असा ढोबळपणे सरंजामी पद्धतीचा अर्थ होतो. सरंजामदारी, मनसबदारी, वतनदारी या शब्दांचा तांत्रिक दृष्टीने काही भिन्न अर्थ असला तरी भावार्थ हाच आहे.

ग्रामसंस्था
 मुसलमान पूर्व काळात भारतात सरंजामी पद्धती नव्हती. भारतातील राजनीति - निपुणांनी सर्वत्र शासनव्यवस्था उत्तम असावी या हेतूने ग्रामसंस्था निर्माण केली होती. ही ग्रामसंस्था म्हणजे प्रत्येक गावचे एक लहानसे प्रजासत्ताक असे आणि त्याचा कारभार ग्रामपंचायत नावाची सभा करीत असे. मध्ययुगात ही व्यवस्था थोडी पालटली आणि ग्रामीण भागात देशकसत्ता आली. देशमुख, देशपांडे, पाटील, कुळकर्णी, चौगुला आणि प्रमुख ग्रामस्थ या सर्वांना मिळून देशक असे म्हणत. गावाच्या कारभारासाठी ज्या सभा भरत त्यांत बारा बलुतेदार, शेतकरी, जोशी या सर्व जानपदस्थ लोकांचा समावेश असे. यांतील बहुतेक सर्व लोक वतनदार असत. गावचा एकंदर कारभार सर्वांच्या अनुमतीने होत असे.

देशक
 गावच्या जमिनीची सर्व व्यवस्था पाहणे, पडीक जमिनी लागवडीस आणणे, जंगलातून नव्या पिकाऊ जमिनी निर्माण करणे, चोराचिलटांपासून पिकांचे व गावाचे रक्षण करणे, दुष्काळ, लढाया, परचक्रे यांमुळे मुलूख उजाड होई, जमीन ओस पडे, वस्ती उठून जाई, ही सर्व वस्ती पुन्हा जागी आणणे आणि जमिनी पुन्हा लागवडीस आणण्याची व्यवस्था करणे हे देशकाचे काम होते. गावावर टोळखाद येई, रोगराई येई, दरवडे पडत, अतिवृष्टी- अनावृष्टी या आपत्ती येत. या प्रसंगी योग्य उपाय- योजना करून गावाचे रक्षण करणे हे काम देशकाचे असे. जमिनीवरून, गुराढोरा वरून व इतर अनेक कारणांनी गावात तंटे होत. ते सोडून न्याय करणे हेही देशकाचेच काम असे. याचाच अर्थ असा की प्रत्येक गाव हे एक लहानसे प्रजासत्ताक होते.

मिरासदारी
 मुस्लिम सत्ताधाऱ्यांनी ही व्यवस्था मुळात बदलली नाही. पण आपल्या मुलखाचे निरनिराळे विभाग करून त्याचे मोकासे निरनिराळ्या मुस्लिम व मराठा सरदारांना देऊन टाकले. मोरे, सुर्वे, सावंत, मोहिते, निंबाळकर हे असेच सरदार किंवा मनसबदार होते. आपापल्या मुलखातून ठराविक रक्कम सुलतानांकडे भरली की आपल्या परगण्यात ते स्वतंत्र राजेच होते. मुस्लिम सुलतान, त्यांचा पैसा त्यांना मिळाल्यावर त्यांच्या कारभारात कधीच लक्ष घालीत नसत. अशा रीतीने अनियंत्रित सत्ता हाती आल्यावर हे मिरासदार किंवा वतनदार काय धुमाकुळ घालीत असतील याची कल्पना करणे फारसे अवघड नाही. सभासदाने या अंदाधुंद कारभाराचे वर्णन करताना म्हटले आहे, 'इदलशाही, निजामशाही, मोगलाई (यांनी) देश काबीज केला त्या देशात मुलकाचे पाटील, कुळकर्णी यांचे हाती व देशमुखांचे हाती कुलरयत यांनी कमाविशी करावी आणि मोघम टक्का द्यावा. हजार दोन हजार जे गावी मिरासदारांनी घ्यावे, ते गावी दोनशे तीनशे दिवाणात (सरकारला) खंड मक्ता द्यावा. त्यामुळे मिरासदार पैकेकरी होऊन गावास हुडे, वाडे, कोट बांधून, प्यादे बंदुकी ठेवून बळावले.' (सभासद बखर, कलम ३३) मक्तेदारीमुळे प्रजेवर केवढा जुलूम होत असेल याची यावरून कल्पना येईल. सुलतानाचा खंड दोनशे असला तर मिरासदार दोन हजार वसूल करणार. पण तो स्वतः केव्हाच वसुलीला जात नसे. त्याचे कामगार म्हणजे देशमुख आणि त्यांचे सेवक म्हणजे पाटील, कुळकर्णी तेव्हा प्रत्येकजण वसूल करताना आपली तुंबडी भरून घेणार हे उघडच आहे. सुबत्ता असो, दुष्काळ असो, सुलतानाला खंड दिलाच पाहिजे. नाहीतर मिरासदारांना पकडून नेऊन त्यांना सुलतान यमयातना देत असे. त्यामुळे मिरासदारांना शेतकऱ्यांची दया आली तरी तिचा काही उपयोग नसे. तेच पाटील, देशमुख यांचे. अशा स्थितीत ग्रामसंस्था किंवा देशक या असून नसून सारख्याच झाल्या. यामुळे गावेच्या गावे ओस पडली. प्रजा परागंदा झाली आणि या भूमीवर खरा प्रलयान्त ओढवला.

अराजक
 पण प्रजाजनांचे दुर्दैव एवढ्यावर संपत नसे. या मनसबदारांत, या देशमुखांत, जहागिरदारांत वतनासाठी नित्य मारामाऱ्या चालत, नित्य लढाया आणि रक्तपात चाले आणि त्यामुळे मुलखात कायमचे अराजक माजलेले असे. ज्याला आपले वतन वाढावे असे वाटे तो बेदरला किंवा विजापूरला जाऊन तशी सनद घेऊन येई. पण त्या सनदेची अंमलबजावणी कोण करणार ? तो स्वतः आणि त्याचे भाईबंद ! सुलतानांचे काम फक्त सनद देणे, पुढची व्यवस्था ज्याने त्याने पाहावयाची. याशिवाय कुलाभिमान, देशमुखांचे मानापमान, सण-उत्सवाच्या वेळी पहिल्या जागेविषयीचे मानापमान, सोयरिकीवरून होणारे मानापमान यामुळेही रक्तपात होत. शेजवलकरांनी या रक्तपातांची वर्णने दिली आहेत ती वाचून अंगावर काटा येतो. 'जेधे बेदराहून फर्मान घेऊन येत आहेत हे ऐकून खोपडे आधीच तयार होतात व त्यांना खिंडीत गाठून गारद करतात. त्यातून एखादा निसटतो तो माणसे जमवून आणतो आणि खोपड्यांची कत्तल करतो. या कत्तलीतून बायका, मुले, दाया, कुणबिणी याही सुटत नाहीत. खून व त्याचा बदला म्हणून प्रतिखून हे तर वंशपरंपरा चाले. काही वेळा उघड निरोप पाठवून व मोक्याच्या ठिकाणी रणखांब रोवून झुंजायाचा दिवसही ठरवीत. त्याप्रमाणे बांदलाचे साडेबाराशे लोक जेध्यांच्या सातशे लोकांशी लढले. या लढाईत काहींचा निर्वंश झाला. (संकल्पित शिवचरित्राची प्रस्तावना, पृ. १५-१६)

राज्याचे दायाद
 वतनदारी, मनसबदारी, मोकासा पद्धती, मक्तेदारी, सरंजामदारी या पद्धतीचा अर्थ काय ते यावरून ध्यानात येईल. यामुळेच आज्ञापत्रात अमात्यांनी त्यांना राज्याचे दायाद- शत्रू- म्हटले आहे. अमात्य म्हणतात, 'राज्यातील वतनदार, देशमुख, देश- कुळकर्णी, पाटील आदी करून यांस वतनदार म्हणावे. हे स्वतंत्र देशनायकच होत. सार्वभौमापासून बलन्यूनतेने उतरती परंपरा बळवंत राखोन, दुर्बल वर्ततच आहेत. परंतु त्यास साधारण गणावे असे नाही. हे लोक म्हणजे राज्याचे दायादच आहेत. आहे वतन इतकियावर कालक्रमणा करावी, राजाशी एकनिष्ठेने वर्तावे, कोणाचा अन्याय न करावा ही त्यांची बुद्धी नाही. जब तव नूतन संपादावे व बळकट व्हावे, बळकट झाले म्हणजे एकाचे घ्यावे, दावे परवडे करावे हा यांचा सहज हव्यास. परचक्र आले म्हणजे वतनाच्या आशेने अगोदर सलूख करतात, स्वतः भेटतात, तिकडील भेद इकडे, इकडील भेद तिकडे करून राज्यात शत्रूचा प्रवेश करवितात, मग तेच राज्याचे अपायभूत होऊन दुःसाध्य होऊन जातात.' (प्रकरण ६ वे).
 अशा या मनसबदारांच्या किंवा तर्फदारांच्या हाती शिवपूर्वकाली महाराष्ट्र होता. राजसत्ता जरी आदिलशहा, निजामशहा यांच्या हाती होती तरी आपापल्या मुलखात राज्य या तर्फदारांचे होते. सरदेसाई म्हणतात, 'हे तर्फावर नेमलेले अधिकारी एक प्रकारचे स्वतंत्र राजेच होते. दिवाणी, मुलकी, फौजदारी व लष्करी वगैरे सर्व अनियंत्रित अधिकार त्यांजकडे असत. तर्फदारास जहागिरी नेमून दिलेल्या असत. रोकड वेतन नसे. '

अर्थ आणि काम
 वतनदार, तर्फदार यांची निरनिराळ्या ठिकाणी आलेली वर्णने वाचली म्हणजे हे स्पष्ट दिसते की त्यांना कोणतेही मूल्य, कोणतीही निष्ठा अशी नव्हतीच. धर्म नाही, स्वामी नाही, नीती नाही, स्त्री नाही, बाल नाही. ते फक्त वतन जाणीत. प्रजाजनांना पिळून अमाप पैसा वसूल करावयाचा आणि त्यातील ठरीव खंडमक्ता बादशहाला धाडून दिल्यानंतर बाकीच्या पैशावर भोगविलास करावयाचे हा त्यांचा मुख्य धंदा होता. अशा या देशनायकांच्या सत्तेखाली मुलखात काही अर्थव्यवस्था असू शकेल हे शक्यच नव्हते. लूटमार, शोषण हीच सर्व अर्थव्यवस्था तेव्हा होती. सरंजामी अर्थकारण ते हेच. हे शोषणप्रधान अर्थकारण समूळ नष्ट करून प्रजाजनांच्या भाकरीची निश्चित हमी देणारी अर्थव्यवस्था प्रस्थापिल्यावाचून स्वराज्यस्थापनेच्या प्रयत्नात कोणालाही यश येणे शक्य नव्हते. छत्रपतींनी तशी अर्थव्यवस्था निर्माण केली आणि हळूहळू सर्व मराठा समाज, अखिल महाराष्ट्र आपल्या पाठीशी उभा केला. 'धर्मात् अर्थश्च कामश्च ।' असे वेदव्यासांनी म्हटले आहे. छत्रपतींनी मराठ्यांना, शेतकऱ्यांना साळी, माळी, सुतार, कोष्टी सर्वांना दाखवून दिले की त्यांनी स्वधर्मसाधना केली तर धर्माबरोबरच अर्थ आणि काम हेही पुरुषार्थ त्यांना साधतील. हे दिसू लागताच, त्याचा प्रत्यय येताच, सर्व मराठा समाज मुस्लिम सत्तेशी प्राणपणाने लढण्यास सिद्ध झाला. (या विषयाचे सांगोपांग आणि समतोल विवेचन डॉ. अ. रा. कुलकर्णी यांनी आपल्या 'शिवकालीन महाराष्ट्र' या इंग्रजी प्रबंधात केले आहे. जिज्ञासूंनी ते अवश्य पहावे.)

दादोजी शहाणा
 शिवछत्रपतींनी ही जी नवी अर्थव्यवस्था निर्माण केली तिचा पाया त्यांचे गुरुजी दादोजी कोंडदेव यांनी घातला होता. जुन्या बखरीत आणि कागदपत्रात, 'दादोजी शहाणा,' असा त्यांचा उल्लेख नेहमी येतो. आणि खरोखरच दादोजी अद्वितीय असा शहाणा पुरुष होता. पुणे जहागिरी व्यवस्था पाहण्यासाठी शहाजीराजांनी बंगरूळहून शिवाजीराजांच्याबरोबर त्यांना पाठविले, तेव्हा येताक्षणीच त्यांनी या आर्थिक परिवर्तनास प्रारंभ केला. त्यांनी पहिली गोष्ट केली ती ही की रयतेचा आणि राजाचा प्रत्यक्ष संबंध जोडून दिला. असा संबंध नसणे हेच जुन्या अर्थव्यवस्थेचे दुखणे होते. दादोजी शिवाजीराजांना घेऊन प्रथम पुणे आणि सुपे परगण्यात आणि नंतर सर्व मावळ खोऱ्यांतून गावोगाव हिंडले आणि जमिनीची पाहणी मोजणी करून व प्रतवारी लावून दरसाल पिकाचे मानाने वसूल घेण्याचा ठराव त्यांनी केला. प्रारंभी काही वर्षे तर त्यांनी साऱ्याची माफीच दिली, त्यामुळे शेतकऱ्यांना केल्या कष्टाचे फळ मिळेल, अशी खात्री वाटून परागंदा झालेली रयत परत आली आणि वसाहती करून भराभर शेतीची लागवड करू लागली. निजामशाहीतील वजीर मलिकंबर आणि दुसरा अधिकारी चतुर सावाजी यांनी याच पद्धतीने वऱ्हाडात व्यवस्था घडवून आणली होती. दादोजींनी ती स्वतः पाहिली होती. तिची उत्तम फळे त्यांच्या ध्यानात आली होती, म्हणूनच पुणे परगण्यात येताच त्यांनी त्याच पद्धतीने पुणे वसविले.

अभय दिले
 पुणे प्रांती दादोजींना शहाजी राजांनी पाठविले, तेव्हा त्याच वेळी त्यांच्या तैनातीस एक हजाराची पागा बनवून दिली होती. शिवाय दादोजींनी स्वतः मावळे लोकांच्या बिनकवायती पलटणी तयार केल्या. कारण त्यावाचून त्यांना एक पाऊलही पुढे टाकता आले नसते. रयतेशी राजांचा साक्षात संबंध जोडणे याचा अर्थ देशमुख, पाटील, कुळकर्णी, देसाई, तर्फदार यांची सत्ता कमी करणे किंवा नष्ट करणे असा होता. याला सुखासुखी कोणीही कधीही तयार होत नाही. दादोजींनी लष्करी बळाने या सगळ्या मोकासावाल्यांना, मक्तेदारीला चटावलेल्या लोकांना, प्रथम नरम केले. कृष्णाजी बांदल हा भोर परगण्यातील देशमुख फारच पुंडाई करू लागला. दादोजींनी त्याला पकडून आणून त्याचे हात पाय तोडले. रामजी चोरघे, फुलाजी नाईक यांना त्यांनी ठार मारले. एका ब्राह्मणाने वसुलाचा भरणा करण्यात टाळाटाळ चालविली. त्यालाही दादोजींनी देहान्त शासन दिले. कास्मा दि गार्दा याने पोर्तुगीज भाषेत जे शिवचरित्र लिहिले त्यात म्हटले आहे की शिवाजीने प्रथम रयतेला अभय दिले. या अभयाचा हा अर्थ आहे. मिरासदार, तर्फदार, देशमुख हे रयतेचे काळच होते. त्यांच्या मुलखात रयतेला कशाचीही शाश्वती वाटत नसे. शेतीची लावगड करण्याचा तर लोकांना मुळीच उत्साह नसे. कारण उभ्या पिकाची किंवा धान्याची लूट केव्हा होईल याचा काही धरबंधच नव्हता. दादोजींनी प्रथम अनेक देशमुखांना दहशतीने आणि पुढे सौजन्याने वश करून घेतले आणि रयतेला निर्भय केले. तिच्या जीवित- वित्ताची शाश्वती निर्माण केली. त्यामुळे दहा वर्षाच्या काळात मुलखात अबादानी व भरभराट होऊन वसूल पुष्कळ येऊ लागला आणि दादोजींना द्रव्यसंचय करता आला. अमात्यांनी म्हटलेच आहे, 'खजिना म्हणजे राज्याचे जीवन' सभासद बखरीत दादोजींच्या कार्याचे पुढीलप्रमाणे वर्णन केले आहे: 'शहाजी राजे यांनी दादाजीपंतास व राजे यांस पुण्यास रवाना केले. ते पुण्यास आले. येताच बारा मावळे काबीज केली. मावळे देशमुख बांधून, दस्त करून, पुंड होते त्यांस मारिले. पुढे शिवाजी राजे कारभार करीत चालले.'
 शिवाजी राजे यांनी दादोजींच्या मृत्यूनंतर स्वतःच कारभार हाती घेतला. पण धोरण तेच ठेवून दादोजींनी जी पायाभरणी केली होती तिच्यावरच नव्या अर्थव्यवस्थेची उभारणी केली. या अर्थव्यवस्थेचे पहिले लक्षण त्या मुलखात माजलेले अराजक, तेथला अंधेर कारभार, तेथली अंदाधुंदी मोडून काढून शेतकरी, कष्टकरी यांना दिलासा देणे व शेतीचा व कारागिरीचा उद्योग करण्यास प्रोत्साहन देणे हे होय. तसे केल्यानेच मुलूख समृद्ध होतो हे दादोजींनी दाखवून दिले होते.

वेध लावला
 वतनदार देशमुख यांना वश करताना राजे प्रथम स्नेह, प्रेम, मधुर वाणी यांचा उपयोग करीत. बखरकार म्हणतात, 'मातबर चहू जागचे मराठे यांसी आप्तपणा करावा, पत्रे लिहावी, त्यांस आणून भेट घ्यावी, आपण त्यांजकडे जाऊन, आम्हांस अनुकूल असावे, असे बोलावे. असे करण्यात महाराजांचे बोलणे परम आदराचे व पराक्रमाचे. ऐकावे त्यांस वेध लागून वाटावे की हे परम थोर आहेत. यांचेच संमते चालावे. हे सांगतील तसे वागावे. प्राणही गेले तरी जावोत, परंतु सेवा करून यांचे आज्ञेत चालावे. अशी सर्वांची चित्त वेधून घेतली.' (सप्त प्रकरणात्मक चरित्र, चिटणीस)

अमानत केले
 कान्होजी जेधे, बाजी पासलकर, चाकणचा किल्लेदार फिरंगोजी नरसाळा यांना छत्रपतींनी या प्रकारे वश केले. आणि त्यांनीही आमरण त्यांची एकनिष्ठेने सेवा केली. त्यांनी स्वतःचा मुलूख तर स्वराज्यात सामील केलाच, पण इतर देशमुख, वतनदार यांनाही नरम करण्यात महाराजांना साह्य केले. जावळीच्या मोऱ्यांच्या बाबतीत छत्रपतींनी प्रथम समोपचारच केले होते. १६४८ च्या सुमारास दौलतराव मोरे वारले. तेव्हा त्यांच्या बायकोच्या मांडीवर दत्तक देऊन तिला कारभारात सर्वतोपरी साह्य केले. पण पुढे अफजलखानाची नेमणूक वाईस झाली, तेव्हा दत्तक यशवंत फितला. एवढेच नव्हे, तर हैबतराव सिलीमकर, कान्होजी जेधे यांनाही फितवू लागला आणि ते ऐकेनात, तेव्हा त्यांच्या मुलखावरही आपली सत्ता सांगू लागला. यातूनच जावळी प्रकरण उद्भवले व महाराजांना मोऱ्यांचा निःपात करावा लागला.
 सुप्याचे संभाजी मोहिते हे शिवाजी राजे यांचे सावत्र मामा यांनी मोऱ्यांच्या प्रमाणेच पुंडाई चालविली होती. तेव्हा त्यांच्यावर एका रात्री छापा घालून राजांनी त्यांना कैद केले. आणि ते काहीच ऐकावयास तयार होईनात, तेव्हा त्यांना कर्नाटकात पाठवून दिले. राजमाची किल्ला विजापुरी सरदार मुल्ला महंमद याच्या ताब्यात होता. लोहगडावर हिलाल हबशी होता. हिरडस मावळात बांदल देशमुख होते. पुरंदरावर निळो नीळकंठ होता. या सर्वांना अनेक युक्या प्रयुक्या करून राजांनी पदच्युत केले आणि तो मुलूख म्हणजे बारा मावळे स्वराज्यात आणली. सभासद म्हणतो, 'राजियाने देश काबीज करून हुडे, वाडे, कोट पाडिले. नामांकित कोट जाहाला तेथे आपले ठाणे ठेविले. आणि मिरासदारांचे हाती नाहीसे केले. असे करून, मिरासदार इनाम इजारतीने मनास मानेसारखे आपण घेत होते ते सर्व अमानत करून (जप्त करून) जमीनदारास गल्ला व नख्त गाव पाहून देशमुखांस व देशकुलकर्णी यांस व पाटील कुलकर्णी यांस हक्क बांधून दिले. जमीनदारांनी वाडा बुरजांचा बांधू नये, घर बांधून राहावे. ऐसा मुलकाचा बंदोबस्त केला.'
 यानंतर पुढच्या काळात जेव्हा जेव्हा नवा मुलूख स्वराज्यात महाराज सामील करून घेत तेव्हा तेव्हा तेथे असाच बंदोवस्त करीत. रयत आणि राजसत्ता यांचा प्रत्यक्ष संबंध जोडणे, मोकासा किंवा मक्तेदारी नष्ट करून, शेतकऱ्याला अभय देऊन, त्याच्या कल्याणाची चिंता राजसत्तेने वाहणे हे नव्या अर्थव्यवस्थेचे प्रधान लक्षण होय. देशमुखी, वतनदारी, मिरासदारी, महाराजांनी समूळ नष्ट केली किंवा काय याचा विचार पुढे शेवटी करू. पण त्यांची अनियंत्रित सत्ता व तिच्यामुळे माजलेले अराजक त्यांनी नष्ट केले यात शंकाच नाही. ते नष्ट करून एकंदर व्यवस्था काय केली ते थोडक्यात पाहून पुढे जाऊ.

पुनरुज्जीवन
 महाराजांनी पहिली गोष्ट केली ती ही की त्यांनी ग्रामसंस्थेचे पुनरुज्जीवन करून तिला तिचे पूर्वीचे स्थान मिळवून दिले. वर सांगितलेच आहे की मुसलमानी अमलात या ग्रामसंस्था टिकून राहिल्या असल्या तरी त्या नावापुरत्याच होत्या. वतनदारी, तर्फदारी या पद्धतीमुळे रयत पूर्णपणे नागवली गेली होती. देशमुख, देशपांडे, देश- कुलकर्णी हे फार प्रबळ झाले होते. त्यांच्यातलेच काही पातशाही सरदार झाले होते. त्यामुळे गावपंचायतीचे त्यांच्यापुढे काही चालत नसे. शिवाय पंचायतीच्या हुकमांची अंमलबजावणी पातशाही अधिकाऱ्यांमार्फत होत नसल्यामुळे त्या हुकमांना व पंचायतीच्या कारभाराला काही अर्थ उरला नव्हता. छत्रपतींनी प्राचीन काळच्या ग्रामसंस्थांना तो अर्थ पुन्हा प्राप्त करून दिला.

कुनबियाची खबर
 गोतसभा आणि देशक अशा दोन ग्रामसंस्था त्या वेळी होत्या. गोतसभा ही एका गावापुरतीच असे. पाटील, कुळकर्णी, शेटे, महाजन, बलुतेदार, चौगुला हे सर्व मिळून गोतसभा होई. आणि एका देशमुखाच्या सत्तेखालच्या सर्व गावांचे म्हणजे देशात्य पाटील, कुळकर्णी, शेटे, महाजन, शिवाय देशमुख, देशपांडे, देस कुळकर्णी यांची मोठी सभा ती देशक होय. या सभांना पुन्हा पहिले अधिकार देऊन आणि त्यांच्यावर आपले सुभेदार व इतर अधिकारी यांच्या मार्फत सक्त नजर ठेवून शिवछत्रपतींनी सर्व प्रांताचे पुनर्वसन घडवून आणले व या अर्थव्यवस्थेचा मूलाधार जो शेतकरी त्याला नवी संजीवनी दिली. प्रभानवल्लीच्या सुभेदारास १६७६ साली महाराजांनी एक पत्र लिहिले. त्याचा भावार्थ पुढे देतो. त्यावरून शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाची कल्पना स्पष्ट होईल. 'इमाने इतबारे साहेब काम करावे. येक भाजीच्या देठासही मन न दाखविता रास्त वर्तणे, शेतीची लावणी, संचणी, उगवणी सर्व ठीक करून, रयतेचा वाटा रयतेस पावे आणि राजभाग आपणास येई, ते करणे. रयतेवरी काडीचे जाल (जुलूम) केलिया साहेब तुजवरी राजी नाहीत यैसे बरे समजणे. रयतेस तवाना (ताजे तवाने) करावे आणि कीर्द करवावी हे गोष्टीस इलाज साहेबी तुज फर्माविला आहे की कष्ट करून गावाचा गाव फिरावे. गावचे कुनबी गोला करावे. कुणब्यांजवळ सेत कराया बैल, दाणे, संच, असीला (असला) तर बरेच जाले. पण नसेल तर त्यास बैलाचे दाण्याचे पैके रोख द्यावे व पेरजर (पुढील साल) मूळ मुदल फक्त वाढी- दिढी न करता (व्याज वगैरे न घेता) हे पैके वसूल करावे. मात्र कुणब्याची तवानगी राहिली पाहिजे. नाही तर वसूल करू नये. या कलमास जरी दोन लाखपर्यंत खर्च करशील आणि कुणबियाकुनबियाची खबर घेऊन त्याला तवानगी येती ते करून कीर्द करशील आणि पडजमीन लाऊन दस्त (महसूल) जाजती (जास्त) करशील तरी साहेबा कबूल आहे. आकलेने व तजविजीने समजोन याप्रमाणे कारबार करीत जाणे.'

दुहेरी कैची
 शिवकालीन पत्रसारसंग्रह, शिवचरित्रसाहित्य यांतून त्या काळची अनेक पत्रे प्रसिद्ध झाली आहेत. त्यांवरून हे स्पष्ट होते की देशमुख, देशपांडे, पाटील, कुळकर्णी यांनी शेतकऱ्यायाची सर्व प्रकारची काळजी वाहिली पाहिजे आणि जमिनीचे उत्पन्न वाढवून त्या मार्गाने सरकारी महसूल वाढविला पाहिजे असा सक्त दंडक महाराजांनी घालून दिला होता. देशमुख, देशपांडे यांना वतने दिली, इनामे दिली ती लढाईत पराक्रम करण्यासाठी तर आहेतच, पण शेतकऱ्याचे संरक्षण करणे, त्याला संभाळणे, त्याला सर्वतोपरी साह्य करून जमिनीचे उत्पन्न वाढवून परगण्यात समृद्धी निर्माण करणे हेही वतनदारांचे कर्तव्य आहे. ही नवी समजावणी छत्रपतींनी त्या वतनदारांना दिली आणि वतनदारांनी, देशमुखांनी ही जबाबदारी व्यवस्थित पार पाडावी म्हणून त्यांना महाराजांनी दुहेरी कैचीत धरले होते. वरून सरकारी अधिकारी त्यांवर सक्त नजर ठेवीत आणि रयतेकडून गोतसभा जागरूक असे. यासाठीच त्या ग्रामसंस्थेचे पुनरुज्जीवन केले होते. गोतसभा ही प्राचीन काळच्या पूग, कुल यांसारखीच समर्थ व कार्यक्षम व्हावी हा महाराजांचा हेतू होता हे पुढील उदाहरणांवरून दिसून येईल. एका गावचा पाटील गोतसभेला नको होता. छत्रपतींनी सभेचा निर्णय मान्य करून त्या पाटलाला गावावर लादण्याचे नाकारले. दुसऱ्या एका गावच्या सभेने कुळकर्ण्याची नेमणूक आपली आपणच केली. छत्रपतींनी तिला मंजुरी दिली. पाटबंधारे बांधणे, विहिरी खोदणे, पडीत जमीन लागवडीस आणणे या कामी नाना कटकटी निरनिराळे लोक निर्माण करीत. पण या बाबतीत गोतसभेचा निर्णयच महाराज नेहमी उचलून धरीत. म्हणूनच मावळात आणि कोकणात अल्पकाळातच जमिनी फुलू लागल्या, आबादानी निर्माण झाली आणि स्वराज्याचा महसूल वाढला. फ्रेंच प्रवासी कॅरे याने कोकणातल्या अनेक खोऱ्यांत जमिनी सुपीक होऊन सुबत्ता कशी निर्माण झाली होती याचे वर्णन लिहून ठेविले आहे. छत्रपतींनी आर्थिक क्रांती घडविली तिचे स्वरूप असे आहे. शेतकऱ्याला पिळून नागवून पातशाही खजिना भरणे ही जुनी पद्धत होती. शेतकऱ्याला व रयतेला साह्य करून तिचे उत्पन्न वाढवून त्यातून स्वराज्याचा खजिना भरणे ही नवी पद्धत होय. क्रांती म्हणण्याइतकी ती निश्चितच भिन्न आहे.

वतनदारी आवश्यक
 शिवछत्रपतींनी केलेल्या आर्थिक क्रांतीचे हे स्वरूप पाहिल्यानंतर आता त्यांनी वतनदारी, सरंजामदारी, तर्फदारी नष्ट केली काय या प्रश्नाचे उत्तर देता येईल. या विषयाचे उत्कृष्ट विवेचन शं. ना. जोशी यांनी 'अर्वाचीन महाराष्ट्रेतिहासकालातील राज्यकारभाराचा अभ्यास' (भाग १ ला) या पुस्तकात केले आहे. त्यांच्या मते महाराजांनी वतनदारी मुळीच नष्ट केली नाही, इतकेच नव्हे तर तसे करणे इष्टही नव्हते. तो काळ धामधुमीचा होता. लढाई झाली नाही, लष्कराने उच्छाद मांडला नाही, मोगल, विजापूर, सिद्दी यांपैकी कोणाची स्वारी आली नाही असे एक वर्षही जात नसे. अशा स्वाऱ्या आल्या की गावचे गाव बेचिराख होत, ओसाड पडत. वसती उठून जाई. जमिनीची लागवड, मशागत वर्षावर्षात होत नसे. शेतकऱ्यांची घरेदारे आणि त्याबरोबरच बैल, नांगर, औते, बीबियाणे हा शेतीचा सरंजाम नष्ट होऊन जाई. अशा स्थितीत या गावांची आणि परगण्यांची पुन्हा वसाहत कोणी करावयाची ? हे काम गोतसभेचे व देशकाचे म्हणजे देशमुख, देशपांडे, देसाई, देशकुळकर्णी, पाटील, कुळकर्णी, शेटे, महाजन, जमीनदार यांचे होते. गावचे परागंदा झालेले समस्त लोक पुन्हा जमा करून त्यांच्या मदतीने गावाची पुन्हा वसाहत करणे व जमिनीची कसणूक पुन्हा सुरू करणे हे कार्य ही वतनदार मंडळीच करीत. कोठल्याही राजसत्तेला हे शक्य झाले नसते. कारण एवढी माणसे उभी करणे हे त्या धामधुमीच्या, अदाधुंदीच्या काळात अशक्यच होते. ज्यांचे स्वहित त्यात गुंतलेले आहे, ज्यांचे भवितव्य या वसाहतीवर, शेतीवर अवलंबून आहे, जे त्या देशचे आहेत, ज्यांचा तो देश आहे तेच लोक हे काम करणे शक्य होते.
 अराजक, अंदाधुंदी याविषयी हे झाले. पण गावावर व शेतीवर इतरही अनेक आपत्ती नेहमीच येत असतात. अवर्षण, दुष्काळ, अतिवृष्टी, महापूर, रोगराई, टोळधाड, दरवडेखोरी, लुटालूट, चोऱ्यामाऱ्या या आपत्ती नित्याच्याच होत्या. शिवाय पडीत जमीन लागवडीस आणणे, पाटबंधाऱ्यांची व्यवस्था करणे, रानटी जनावरांचा बंदोबस्त करणे हीही कामे नित्याचीच होती. प्राचीन काळापासून पूग, श्रेणी, कुल या ग्रामसंस्थाच ही कामे करीत. मुस्लिम रियासतीतही त्या नष्ट झाल्या नव्हत्या आणि छत्रपतींनाही त्या नष्ट करणे शक्य नव्हते आणि इष्टही नव्हते. त्यांच्या अभावी स्वराज्य ओसच झाले असते.
 मग सभासद बखर, आज्ञापत्र यात या वतनदारांची इतकी निर्भर्त्सना का केली आहे ? त्यांना राज्याचे दायाद का म्हटले आहे ? याचे कारण हे की ते वतनदार मुस्लिम रियासतीत बेजबाबदार झाले होते, कर्तव्यच्युत झाले होते. गावाचा संभाळ करण्यासाठी आपल्याला वतने दिली आहेत, याचा त्यांना विसर पडला होता. ते चढेल, मुजोर झाले होते आणि परकी सत्तेखाली त्यांचे भोगविलास निर्बंध चालत असल्यामुळे त्यांना स्वराज्यस्थापना हे संकट वाटत होते. म्हणून स्वराज्याचे मुख्य शत्रू तेच झाले होते.
 यासाठीच महाराजांना त्यांच्यावर हत्यार धरावे लागले. तसे हत्यार धरून त्यांच्यावर सत्ता प्रस्थापित होताच महाराजांनी त्यांचे गडकोट पाडून त्यांनी उभारलेली लष्करी पथके नष्ट करून त्यांना नरम केले, त्यांच्या कर्तव्याची जाणीव देऊन त्यांना पुन्हा स्वपदी प्रस्थापित केले आणि त्यांच्याकडून वर वर्णन केल्याप्रमाणे सेवा घेऊन महाराष्ट्रभूमी पुन्हा वसविली.

सेवेचा मुशाहिरा
 शिवछत्रपतींचे वतनाविषयी काय धोरण होते, हे यावरून ध्यानात येईल. वतन ही मागे केव्हा एकदा केलेल्या पराक्रमाची बक्षिसी आहे असे ते मानीतच नव्हते. तर वर सांगितल्याप्रमाणे गाव किंवा देश- म्हणजे आपापला परगणा - संभाळणे ही जी कायमची सेवा तिचा तो मुशाहिरा होता; आणि म्हणूनच त्या कर्तव्यापासून जे च्युत होत त्यांना ते शिक्षा करून वठणीवर आणीत आणि पुन्हा वतनावर कायम करीत. वतने नष्ट करावी, वतनदारी पद्धतच नष्ट करावी असे त्याचे धोरण नव्हते.

कौलनाम
 त्यांनी काही वतने अमानत म्हणजे जप्त केली हे खरे आहे. पण ती वतनदार फितूर झाले किंवा उद्दाम होऊन चढेलपणे वागू लागले किंवा देशाची कामगिरी करीनासे झाले तेव्हा जप्त केली. पुण्याच्या देसकुळकर्ण्याचे वतन त्यांनी अनामत केले. मुसे खोरे तरफेचे देशमुख व देशकुलकर्णी यांची वतने खालसा केली. रोहिडखोऱ्याचे देशमुख, रांजाचे पाटील यांना त्यांनी अशीच शिक्षा केली. पण या फितूर, भ्रष्ट, चढेल वतनदारांना केलेल्या शिक्षा होत्या. वतनदारी पद्धतीविरुद्ध ही मोहीम नव्हती. तशी मोहीम त्यांना करावयाचीच नव्हती. कारण गाव, देश, परगणा संभाळण्याचे, उजाड झालेली गावे पुन्हा वसविण्याचे, सर्व भूमी सजल - सफल करण्याचे अत्यंत मह्त्त्वाचे कार्य हे वतनदार करीत असत या कार्याचे छत्रपतींना इतके महत्त्व वाटत असे की फितूर झालेले, बंडखोरी करून उठलेले वतनदार जर माफी मागून परत येण्यास तयार असतील, तर त्यांना कौलनामा देऊन म्हणजे अभय देऊन त्यांची वतने ते परत देत असत. केदारजी खोपडे हा अफजलखानास मिळाला होता. पुढे अफजलखान मेल्यावर परत येऊन तो गावाला त्रास देऊ लागला. त्या वेळी छत्रपतींनी अत्यंत कडक शब्दांत त्याची कान उघाडणी केली; पण शेवटी त्याचे वतन त्यास परत दिले. 'कोणे बाबे आंदेशा न करून आपल्या वतनास येणे आणि आपले देशमुखीचा हक्क व इनाम खाऊन खुशालीने राहणे, काही शक (भीती) न धरणे.' असा कौलनामा त्याला दिलेला आहे. पण त्यापूर्वी 'साहेबासी गैररुजू असावे आणि आपल्या हक्कास खलल करून घ्यावे हे अक्कल तुम्हांस कोणे दिधली आहे' अशी त्याची कठोर निर्भर्त्सनाही केलेली आहे. कानद खोऱ्याचा देशमुख झुंजारराव मरळ, गुंजन मावळाचा देशमुख हैबतराव सिलीमकर यांनाही असाच कौलनामा दिलेला आहे. झुंजारराव तर जयसिंगाकडे गेला होता. त्याला 'तुम्हांपासून जो गुन्हा झाला आहे तो माफ केला आहे, तुमच्या जिवास खता होणार नाही' असे अभय देऊन त्याची वतनाची मिरास त्याला परत दिली.

स्नेह व दंड
 महाराजांच्या याच धोरणाचे वर्णन अमात्यांनी आज्ञापात्रात केले आहे. 'अनेक दोष या लोकांत आहेत. म्हणून त्यांचा केवळ द्वेष करावा, वतने बुडवावी म्हणता हाही परम अन्याय, समयविशेषे अनर्थाचे कारण. पण त्यास मोकळी वाग देईन म्हणता यांची निजप्रकृती तेव्हाच प्रगट होणार. या करिता या दोन्ही गोष्टी (वतने बुडविणे किंवा त्यांना बेलगाम राहू देणे ही दोन टोके) कार्यास येत नाहीत. म्हणून त्यास स्नेह व दंड या दोहोंमध्ये निक्षून ठेवावे लागतात. आहे वतन ते चालवून प्रजेवर त्यांची सत्ता चालू न द्यावी, हक्क इनाम आज्ञे विरहीत घेऊ न द्यावे आणि त्यांनी देशाधिकारी यांचे आज्ञेत वर्तावे.'

नवी वतने
 ज्या अमात्यानी वतनदारांची अत्यंत निंदा केली त्यांनीच त्यांना संभाळून ठेवावे असा उपदेश केला आहे. याचे कारण हेच की देशमुख, देशपांडे, पाटील, कुळकर्णी हे लोक त्या वेळच्या अर्थव्यवस्थेचे आधारस्तंभ होते. त्यांच्या अभावी सर्व मुलूख उजाड पडून सर्व अर्थव्यवस्थाच नव्हे, तर अंती राज्यव्यवस्थाही कोसळून पडली असती. यामुळे महाराजांनी जुन्या वतनदारांना तर संभाळलेच, पण काही थोडी नवी वतनेही दिली. बकाजी फर्जंद यास पाटीलकी दिली. रामचंद्र नीलकंठ यास सबनिसी वतन दिले. कोणाला दूधभात म्हणून, कोणा स्त्रीला साडीचोळी म्हणून इनामेही दिलेली आहेत. याशिवाय धर्मार्थ जमिनी दिल्या त्या निराळ्याच. तशा त्या दिल्या पाहिजेत असा अमात्यांचा सुद्धा आग्रह आहे. ते म्हणतात, 'धर्मार्थ भूमिदान देणे याचे पुण्य अनंत आहे. श्रीची, वेदशास्त्रसंपन्न, सद्ब्राह्मण पाहून पर्वादी पुण्यकाळी ग्राम अथवा भूमी द्यावी. तशीच देवायतने, सत्पुरुषांचे मठ, समाधिस्थाने असे स्थळीही ग्राम अथवा भूमी द्यावी.' याप्रमाणे छत्रपतींनी दाने दिल्याची उदाहरणेही आहेत. समर्थांना अशी भूमी दिली होती हे तर प्रसिद्धच आहे. चाफळच्या मठास व उत्सवास महाराजांनी कायमचे उत्पन्न करून दिले होते. भोसल्यांचे पुरोहित राजोपाध्ये यांना सूर्यग्रहणाच्या वेळी एक चावर जमीन दिली होती. अशी आणखी काही उदाहरणे आढळतात. पण धर्मार्थ इनामे, वतने, अग्रहार दिले तरी त्यासंबंधातही महाराज सावध असत. गावाचा संभाळ करणे हे जसे देशमुखाचे कर्तव्य तसेच धर्मकार्य करणे हे ब्राह्मणांचे कार्य होय. ते त्यांच्याकडून होत नाही असे दिसताच महाराजांनी ब्राह्मणांची इनामे व अग्रहारही अमानत- जप्त- केले आहेत. राजाराम छत्रपती यांच्या एका सनदेत तसा उल्लेख आहे. 'मौजे माहुली हा गाव आदिलशाहीचे वेळेपासून इनाम चालत होता. पुढे हा देश राजश्री कैलासवासी स्वामीस हस्तगत झाला. त्या दिवसापासून ब्राह्मणाचे इनाम अनामत करून ब्राह्मणांच्या योग्यता व कुटुंबे पाहून त्या त्या योग्य ब्राह्मणांस धान्य देविले होते.' (सनदापत्रे पृ. १३६)

प्रजाभिमुख अर्थव्यवस्था
 या सर्व विवेचनावरून शिवछत्रपतींचे वतनदारीविषयी धोरण काय होते ते ध्यानात येईल. रयत सुखी झाली पाहिजे हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट होते. तिला संभाळण्यासाठी देशमुख, देशपांडे, देसाई, पाटील, कुळकर्णी यांना वतने दिलेली असतात. हे वतनदार जोपर्यंत आपले कर्तव्य चोख पार पाडतात तोपर्यंत त्यांच्या वतानाला हात लावावा असे महाराजांना वाटत नसे. कारण त्या काळी तीच अर्थव्यवस्था फलप्रद होती. पण ते कर्तव्यच्युत होताच महाराज त्यांची वतने अमानत करीत किंवा त्यांना कडक शिक्षा करीत. याचा अर्थ असा की वतने ही पूर्वजांच्या पराक्रमासाठी दिलेली इनामे नसून प्रत्यक्ष राजसेवा करण्यासाठी दिलेला तो तनखा होता. दरमहा देण्याऐवजी तो कायमचा असे, एवढाच फरक. स्वराज्यापूर्वी या वतनांना स्वतंत्र, बेजबाबदार राज्यांचे स्वरूप आले होते व त्यात प्रजा नागविली जात होती. महाराजांनी ते स्वरूप पालटून टाकले आणि प्रजाभिमुख अर्थव्यवस्था निर्माण केली.
 महाराजांच्या आर्थिक क्रांतीचे स्वरूप येथवर स्पष्ट केले. पण सभासदाची बखर आणि अमात्यांचे आज्ञापत्र यात थोडी निराळी तत्त्वे सांगितली आहेत. ती महाराजांची म्हणून सांगितली आहेत आणि तशी थोडी माहितीही दिली आहे. त्याविषयी थोडी तात्विक चर्चा करून हे विवेचन संपवू.

रोख पगार
 वतनदारी पद्धत नष्ट करावी असे महाराजांचे धोरण नव्हते. पण आपल्या सेवकांना वतने किंवा इनामे न देता रोख पगार देण्याचे धोरण त्यांनी अवलंबिले होते. सभासदाने हे स्पष्ट केले आहे. तो म्हणतो, 'सरनौबत, मुजुमदार, कारकून हुजरातीतील लोक यास तनखे वराता (डिमांड ड्राफ्ट) देत. लष्करात व हशमास वगडास एकंदर मोकाशे महाल गाव दरोबस्त देणे नाही. जे देणे ते वरातेने द्यावे अगर पोत्यातून रोख ऐवज द्यावा. मोकाशी जहालियाने रयत अफरा (परागंदा) होईल किंवा बळावेल. कमाविशीची कैद राहणार नाही. ज्यास मोकाशे द्यावे तो व जमीदार एक जाहलियाने बेकैद होतील. म्हणून मोकाशे कोणास देणेच नाहीत.'
 येथे छत्रपती कोणास वतन किंवा मोकासा देत नसत येवढेच सांगितलेले नाही. त्यामागे तत्त्व होते व ते सयुक्तिक होते असे सभासदाने सांगितले आहे. ही वतन पद्धतीवर मोठीच टीका आहे.

यवोदर प्रमाणही
 आज्ञापत्राच्या ७ व्या प्रकरणात तर वतनपद्धतीवर मुले कुठारः असेच प्रतिपादन आहे. 'भूमी इनाम करून देणे हा परम अन्याय. राजास भूपती असे भूमिकरिता म्हणावे, ते भूमीच गेल्यावर राज्य कशाचे होणार ? पती कोणाचा होणार ? तेव्हा राजाने सर्वार्थी मोह न पावता यवोदर प्रमाण भूमी तीही इनाम देऊ नये !'
 असे निक्षून का सांगितले ? यामागेही तत्त्व आहे. 'एक तर रयतेवर हक्क करून दिला तर रयतेवर जलाल (जुलूम) होऊन रयत पीडा पावते, श्रमी होते. तसेच ज्यांस वृत्ती द्यावी त्याजसारखे वंशज होतील असे नाही!' वतनपद्धतीवर यापेक्षा जास्त टीका ती काय असू शकते ? आणि शिवछत्रपतींची राजनीती म्हणून हे प्रतिपादन केले आहे. प्राचीन काळच्या शास्त्रवेत्त्यांनी कायमचा अधिकार कोणाला देण्यावर हीच टीका केली आहे. शुक्रनीतिकार म्हणतात, 'राजाने कोणत्याही अधिकारपदी कोणाचीही कायमची नेमणूक करू नये. कारण अधिकाराने कोणता मनुष्य मत्त होत नाही ? अधिकाऱ्याच्या मागे त्याच्या पुत्राच्या ठायी तसेच गुण असतील तरच त्याची नेमणूक करावी.' (शुक्रनीति, २, ११२- ११५)

ग्रंथकार नव्हते
 यावरून वतनपद्धतीचे सर्व दोष शिवछत्रपतींच्या ध्यानी येऊन ती नष्ट केली पाहिजे, असे त्यांच्या मनात असले पाहिजे, असे वाटते. वर सांगितलेले काही अपवाद सोडले तर त्यांनी आपल्या तानाजी, नेताजी, प्रतापराव, मोरोपंत, अनाजी यांसारख्या थोरथोर सेवकांनाही वतने दिली नाहीत, रोख पगार दिले, यावरूनही हेच दिसते. तरीही त्यांनी जुनी वतनदारी सर्वत्र चालू ठेवली याचे कारण एकच की एवढी प्रचंड आर्थिक क्रांती करणे त्या काळी शक्य नव्हते. गाव आणि देश संभाळण्याची जी कामगिरी देशक आणि गोतसभा करीत असत ती राजसत्तेकडून करून घेण्याइतके माणूसबळ त्या वेळी निर्माण करणे दुर्घट होते. ती कामगिरी ग्रामीण भागात स्थायिक झालेल्या लोकांकडून करवून घेण्यावाचून गत्यंतरच नव्हते आणि देशमुख, देशपांडे, पाटील, कुळकर्णी यांच्याकडून हे कार्य करून घ्यावयाचे तर त्यांना वतन देणे अवश्यच होते. मराठ्यांची वतनासक्ती इतकी प्रबळ होती की वतनाची कायमी दिल्यावाचून हे लोक ती सेवा करण्यास तयार झालेच नसते. शिवाय दुसरी गोष्ट अशी की मोगल किंवा आदिलशाही मुस्लिम सत्ताधारी मराठ्यांचा हा वतनलोभ पूर्णपणे पुरवीत होते. वतने कायम राहून शिवाय त्या राज्यांत वतनदारांना अनियंत्रित सत्ताही चालविता येत असे. मोरे, भोंसले, निंबाळकर, मोहिते, सावंत, सुर्वे इ. मोठमोठे वतनदार छत्रपतींच्या विरुद्ध उभे टाकले होते याचे कारण हेच होते. वतनासक्ती! जनमानसातून ही आसक्ती समूळ नष्ट करून या सर्वांना स्वराज्याभिमुख करणे एका आयुष्यात कोणालाच शक्य झाले नसते. नवे आर्थिक व राजकीय तत्त्वज्ञान निर्माण करून त्याची शिकवण समाजाला दिली असती तरच हे घडून आले असते. पण ते करणारे ग्रंथकार, तत्त्ववेत्ते, पश्चिम युरोपात याच काळात जसे निर्माण झाले तसे, महाराष्ट्रात किंवा भारतात त्या काळी आणि पुढेही निर्माण झाले नाहीत. मराठ्यांच्या साम्राज्यसत्तेसाठी शेकडो रामदास हवे होते, असे राजवाड्यांनी म्हटले आहे. त्याचा हाच अर्थ आहे. शिवछत्रपतींना त्यांच्यासारखेच दोन-तीन समर्थ वारस लाभले असते तरी या वतनासक्तीचा बराच बीमोड करता आला असता. पण तसा एकही वारस त्यांना लाभला नाही. त्यामुळे त्यांच्या मृत्यूनंतर वतनदारीचा विषवृक्ष पहिल्या एकदोन वर्षातच पुन्हा जोरावला आणि छत्रपतींनी प्रारंभिलेली आर्थिक क्रांती समूळ करपून गेली.

बहुजन अर्थशास्त्र
 पण तरीही छत्रपतींनी जे आर्थिक धोरण प्रस्थापित केले त्याचे मराठ्यांच्या पराक्रमाच्या दृष्टीने व हिंदवी स्वराज्याच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व आहे यात शंका नाही. वतनदार वर्गाची बेजबाबदार जुलमी सत्ता त्यांनी नष्ट केली आणि देशकांचे पुनरुज्जीवन करून सर्व अर्थव्यवहार जनताभिमुख केला. शेतकरी, रयत, तिचा उत्कर्ष हे सर्व अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट आहे हे जे तत्त्व त्यांनी मराठ्यांना शिकविले ती खरी आर्थिक क्रांती होय. राजा आपल्या कल्याणाची चिंता वाहतो ही कल्पनाच, मुस्लिम काळात, मराठी जनता विसरून गेली होती. त्यामुळे हा राजा पित्यासारखी आपल्यावर माया करतो हे दिसताच अखिल बहुतजन हर्षनिर्भर झाले. त्यांच्यांत नवे चैतन्य निर्माण झाले आणि ते स्वराज्य कार्यार्थ सिद्ध झाले.
 अर्थमूलो हि धर्मः । हे जाणून छत्रपतींनी धर्मप्रेरणेला अर्थप्रेरणेची जोड दिली. म्हणूनच त्यांना असाध्य ते साध्य करता आले. या अर्थव्यवस्थेचे फल काय मिळाले?
 शिवभारतकार कवींद्र परमानंद म्हणतो-

महाराष्ट्रो जनपदः तदानीं तत्समाश्रयात् ।
अन्वर्थतामन्वभवत् समृद्धजनतान्वितः ॥ १०-३२

शिवाजीच्या आश्रयाखाली महाराष्ट्राची जनता समृद्ध होऊन महाराष्ट्र नावाला सार्थत्वः प्राप्त झाले.